भली केली हीन याति – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग -34
भली केली हीन याति। नाही वाढली महंती ॥१॥
जरी असता ब्राम्हण जन्म ।तरी हे अंगी लागते कर्म ॥२॥
स्नान नाही, संध्या नाही । याति कुळ संबंध नाही ॥३॥
सावता म्हणे हीन याति । कृपा करावी श्रीपती ॥४॥
मथितार्थ:-
सावता महाराजांनी या अभंगामध्ये प्राचीन काळामध्ये असणारी जातिव्यवस्था, वर्णव्यवस्था सांगितली आहे. पूर्वी खेडे हे स्वयंपूर्ण असल्याने गावगाडा संस्कृतीत जे चार वर्ण सांगितले होते त्या त्या वर्णानुसार कामाची विभागणी केली होती. लढाईवर कुणी जायचे, वेदाचा अभ्यास कुणी करायचा व्यापार, उदीम कुणी करायचा आणि या तीन वर्णाची राहिलेली कामे करणारा एक वर्ग होता या वर्णाच्या उतरंडीमुळे समाजामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ उच्च-नीच हा भेदभाव केला जात होता. पण ही संत मंडळी आपण कोणत्या जातीत जन्माला आलो हे महत्त्वाचे मानत नसून परमेश्वर भक्तीला महत्त्व देत होते. हीन जातीत जन्मल्याचे दुःख नसून त्यांना आनंदच वाटतं होता.
परमेश्वर भक्ताचे कुळ, जात वर्ण पाहत नाही तर त्यांची भक्ती पाहतो हा जातिनिरपेक्ष धर्मविचार संत मांडतात आणि हाच विचार सावतोबांनी मांडला आहे.
सावता महाराज विठ्ठलाला म्हणतात हे देवा तू मला या माळ्याच्या जातीत जन्माला घातलेस हे अतिशय चांगले झाले. श्रेष्ठ कुळ जात वंश याचा कुठेही संबंध असल्याचे मला वाटत नाही. म्हणून हे देवा तू माझ्यावर कृपा करशील का?
माझ्यासाठी मोक्षाचे व्दार उघडे ठेवशील ना? कान्होपात्रा, चोखामेळा, भक्त प्रल्हाद यांची भक्ती पाहून परमेश्वराने त्यांचा उद्धार करुन त्यांना मोक्षप्राप्ती मिळाली. असा समतेचा, समानतेचा लोकशाही मार्गाचा संदेश सावता महाराज देतात .
श्री. दत्तात्रय संभाजी ढगे
श्रीक्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.