पैल पहा हो परब्रह्म भुलले | जगदीश काहो परतंत्र झाले ||
काय सुख केले येणे नेणिजे | कोण भाग्य गौळियाचे वर्णिजे ||
आदि अंतु नाही जया व्यापका | तो माये उखळी बांधिला देखा ||
सर्व सुखाचे सुख निर्मळ | कैसे दिसला हे श्रीमुखकमळ ||
योगिया ह्रदय कमळीचे हे निधान | दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण ||
सावता स्वामी परब्रह्म पुतळा | तनु मनाची कुरवंडी ओवाळा ||
मथितार्थ : या अभंगात सावता महाराजांनी कृष्णावतारातील बाळकृष्णाच्या बाळ लीलेचे वर्णन केले आहे. परब्रह्म परमेश्वर भक्तांच्या भक्तीला भुलतो, सगुण साकार होऊन गवळीवाड्यातील गोपाळांबरोबर वेगवेगळे खेळ खेळतो. यशोदा माता त्यांच्या खोड्यांना कंटाळून त्याला उखळाला बांधते. असा हा जगाचा स्वामी यशोदा मातेकडून लाड करून घेतो. या सगुण रूपाच्या दर्शनाने सावता महाराज ही आनंदित झाले आहेत. परमेश्वर हा चराचरामध्ये व्यापून उरला आहे. प्रत्येक अवतारामध्ये हा परमेश्वर वेगवेगळी रुपे घेतो, कधी यशोदेचा कृष्ण होतो. तर कधी कौशल्याचा राम होतो. आपल्या लीला सर्वांना दाखवतो. यशोदेचे प्रेम, गोपाळ व गोपी यांच्यामध्ये असलेले निस्वार्थ प्रेम हे सर्व आनंद देणारे आहे. हेच सावता मानाने या अभंगातून वर्णिले आहे.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.