विश्रांति सुखासि सुख पैं जाहलें – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 29
विश्रांति सुखासि सुख पैं जाहलें । ते उभे असे ठेलें विटेवरी ॥
डोळियांचे धनी पाहतां न पुरे । गौळी ते साजिरे खेळविती ॥
आगमा न कळे, निगमा वेगळे । गोकुळी लोणावळे चोरितसे ।।
सावता म्हणे ज्याचा न कळेचि पार । तो हरी साचार चारी गाई ।।
मथितार्थ : या अभंगात सावता महाराज विठ्ठलाचे कृष्णावतारातील वर्णन करतात. जो देव, वेद, श्रुति, उपनिषदे, पुराणे यांना कळला नाही. गवळ्यांच्या पोरांबरोबर विविध खेळ खेळतो, गवळणीच्या घरातील लोणी, दूध, दही, चोरून खातो. गवळ्याची गाई, गुरे राखतो. गवळणीच्या खोड्या काढणारा हाच विठ्ठल विटेवर उभा आहे. त्याच्या दर्शनाने भाविकांना सुख समाधान लाभते संसारीक मानव संसारातील भौतिक तापाने पोळून निघलेला असताना, त्याला कुठेतरी विसावा
घ्यावा असे वाटते. म्हणून तो सुखाचे ते सुख असणाऱ्या विठ्ठलाच्या मुखाकडे पाहतो व त्याचे डोळे धन्य होतात. संसारातील गोष्टीचा त्याला काही काळ का होईना विसर पडतो व त्याची सर्व इंद्रिये विठ्ठलाच्या दर्शनाने तृप्त होतात. असा हा विठ्ठल म्हणजेच बाळकृष्ण होय. त्यांच्या विविध लीला सावता महाराज या अभंगात वर्णन करतात. गोप गोपिकांबरोबर खेळलेल्या खेळाचे वर्णन ते करतात.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.