जपतप क्रिया धर्म साधन – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 26

जपतप क्रिया धर्म साधन – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 26

जपतप क्रिया धर्म साधन । वाउगें बंधन उपाधीचें ॥
येणे काय घडे समाधान सर्वथा । वाउगाची शीण व्यथा होत आहे ।।
सावता म्हणे सार, कंठी धरा नाम । नको दुजा नेम वाउगाची ।।

 

मथितार्थ : या अभंगातून सावता महाराज आपल्याला सांगतात की, परमेश्वर आपल्याला भेटावा म्हणून माणूस वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतो. त्यापैकी जपतप व्रतकैवल्य अशा प्रकारची अनेक अवघड धर्मसाधनांचा तो वापर करतो, पण एवढे करुन ही त्याला परमेश्वर काही भेटत नाही व परमेश्वर न भेटल्याने तो असमाधानी राहतो. विनाकारण शरीराला मनाला त्रास मात्र होतो आणि शेवटी पदरी निराशाच येते. यावर उपाय म्हणून सावता महाराज म्हणतात.

मुखाने देवाचे नाव घेतल्याने परमेश्वर लवकर भेटतो परमेश्वराच्या भेटीसाठी कोणताही नियम किंवा व्रतवैकल्याची गरज नाही. शरीराला यातना देण्याची गरज नाही. काही योगी तपस्वी अखंड साधना करतात. अन्नाचा त्याग करतात. परमेश्वरासाठी दंडवत घालत, अनवाणी पायी चालत जातात. उपास तापास करतात. यातून साध्य तर काहीच होत नाही. उलट देखावाच केला जातो. संतवचनाप्रमाणे “नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरीची ।” याप्रमाणे मुखाने फक्त परमेश्वराचे नाव घेतले तरी अनेक जन्माची पापे नष्ट होऊन पुण्याचा संग्रह होतो व जन्माचे काही सार्थक होते. म्हणून सावता महाराज नाम घेण्यास सांगतात. नाम घेण्याला कशाचे ही बंधन असत नाही.

श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.