ज्या नामे तरले दोषी जे अपार – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 25

ज्या नामे तरले दोषी जे अपार – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 25

ज्या नामे तरले दोषी जे अपार । तोचि हा श्रीधर कर कटी ॥
मौनेचि उभा मौनेचि उभा । मौनेचि उभा विटेवरी ॥
सावता म्हणे ते जन्मा ये अंबरी । केशर कस्तुरी मळवट ।।

मथितार्थ : या अभंगातून सावता महाराजांनी नामाचे महत्त्व सांगून आपल्याला उपदेश केला आहे. त्याच बरोबर विठ्ठलाचे ही वर्णन केले आहे. विठ्ठल वैकुंठ सोडून पंढरीत अवतरला, कारण त्याला अनेक पातक्याचा उद्धार करायचा होता. उद्धाराचे कार्य करण्यासाठी विठ्ठलाने अवतार धारण केला व मौनत्व धारण करून ते आपले कार्य करतात. ज्यावेळी पृथ्वीतलावर दुर्जनांचा अतिरेक होतो, दुर्जनाच्या कृत्याने सज्जनांना त्रास होतो. त्यावेळी सज्जनांच्या संरक्षणासाठी व दुर्जनांच्या विनाशासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो आणि धर्माचे रक्षण व सज्जनांचा उद्धार करावा लागतो.

म्हणून पृथ्वीतलावर वैकुंठ सोडून विठ्ठल आला व कमरेवर हात ठेऊन, कपाळावर केशरी तिलक लावून, शांतपणे उभा राहुन सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा नि:पात करतो आहे. अशा या विठ्ठलाचे वर्णन सावता महाराजांनी या अभंगात केले आहे. जे भक्त परमेश्वराचे नाम घेतात, त्याच्या मदतीला हा सावळा विठ्ठल वैकुंठ सोडून येतो. आपल्या प्रिय भक्ताच्या ओढीने विठाई माऊली धावत येते व भक्त जणाचा उद्धार करते, हेच त्यांचे अवतार कार्य असते. असे सावता महाराज या अभंगातून सांगतात.

श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.