नेणो योग-याग तपे – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 24

नेणो योग-याग तपे – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 24

नेणो योग-याग तपे । वाचे जपे विठ्ठल ।।
हेची आमुचे निजधन । सुखसंपन्न विठ्ठल ।।
नलगे संपत्ती मान-धन । आम्हा परिपूर्ण विठ्ठल ।।
सावता माळी म्हणे देवा । मज निरवा संतापायी ।।

 

मथितार्थ : या अभंगातून महाराज विठ्ठल नामाचे महत्त्व आपल्याला सांगतात. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी नाम व भक्ति महत्त्वाची आहे. विठ्ठल हेच खरे धन आहे, जीवनात पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, मान, सन्मान यापेक्षा विठ्ठल हेच खरे ऐश्वर्य आहे. विठ्ठल हाच खरा सुखाचा ठेवा आहे. विठ्ठलाचे नावच आयुष्यात तारणार आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करण्यासाठी विठ्ठलाचे नामच कामी येणार आहे. त्याच धनाची लालसा बाळगा व मोक्ष मिळवा. विठ्ठलाचे नाम घेण्यासाठी कठोर परिश्रम शारिरीक यातना सहन करायची गरज नाही. सतत मुखाने नाम घेणे सोपे आहे. असा संदेश महाराज देतात सावता महाराजांच्या काळातील परिस्थितीचे प्रतिबिंब या अभंगात पाहावयास मिळते. त्या काळातील काही सांप्रदयामध्ये परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी, हठ योगासारख्या गोष्टी केल्या जात होत्या. म्हणून सावता महाराज म्हणतात, या अवघड साधने पेक्षा मी मुखाने परमेश्वराचे नावच घेईन. कारण विठ्ठलाचे नाव सर्वात घबाड (धनलाभ) आहे. मोठे धन आहे आणि हीच भक्तीची भावना सतत महाराजांच्या मनात रहावी, असे सावता महाराजांना वाटते.

श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.