प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी । वासनेची बेडी पडली पाया ।।
सोडवण करा आलोनि संसारा । शरण जा उदारा देवराया ।
प्रबळ मोहपाश विषयासी गोवी । अखंड भोगवी क्लेश नाना ।॥
सावता म्हणे तुम्ही विचारावे मनी । सोयरा निर्वाणी हरी एक ।।
मथितार्थ : या अभंगातून महाराज सांगतात की, प्रापंचिक माणसाला जीवन जगताना येणाऱ्या अडचणीतून सुटका करायची असेल तर, विठ्ठलाला शरण गेले पाहिजे. मोह, मायेचे पाश त्याला बांधून ठेवतात, हे पाश घट्ट झाल्याने त्याच्या वाट्याला दु:खच येते, या दुःखातून सुटका करण्यासाठी विठ्ठलालाच जवळ केले पाहिजे. प्रपंच हा मिथ्या आहे, हे समजून कसलीही इच्छा न बाळगता त्यांचा त्याग करावा. हे सावता महाराज सांगतात. संसारातील प्रत्येक गोष्टीत आपण अडकून पडतो. अशा मोह, माया, वासनेत कायमस्वरूपी जखडलेलो असतो. यातून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल, तर परमेश्वराला शरण जाणे हाच एक मार्ग आहे. संसारातील मोह, मायेची बेडी सुटता सुटत नाही. दु:ख झाल्यावरच माणसाला परमेश्वराची आठवण येते. म्हणून मोह, मायेत न गुंतता सुखाच्या क्षणीच परमेश्वराला आपलेसे करावे, सावता महाराज हे प्रपंचाच्याबाबतीत उदासीनता दाखविताना सांगतात की, मोह, माया सारखे जे षडविकार माणसामध्ये आहेत. त्यापासून दूर राहावे, त्या विकारामध्ये रममाण होऊ नये. असे सावता महाराज सांगतात.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.