शिव, ब्रह्मा, विष्णू तिन्ही देव एक – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 21
शिव, ब्रह्मा, विष्णू तिन्ही देव एक । जो निराकार सम्यक, विठ्ठल माझा ।
विठ्ठलनामाचा महिमा अगाध । होणे पूर्ण बोध ऐशा परी ।।
अद्वैत वासना संतांची संगती । वायाची उपाधी बोलू नये ।।
रामकृष्ण हरि मुकुंद, मुरारी । हा मंत्र उच्चारी सावता म्हणे ।।
मथितार्थ : या अभंगात सावता महाराज सांगतात की, परमेश्वर हा एकच असून, आपण त्यांची नावे मात्र वेगवेगळी ठेवली आहेत. पंढरीच्या पांडुरंगामध्येच विश्वाची निर्मिती करणारे शिव, ब्रह्मा, विष्णू हे तिन्ही देव एकरूप झालेले आहेत, अशी सावतोबाची श्रद्धा होती. त्याचप्रमाणे भक्ती करता करता देव आणि भक्त एकरूप होतात असे त्यांना वाटते. देवाचे नाव काहीही असो तो आवडीने घेतल्याने मुक्ती मिळते, असा विठ्ठलनामाचा महिमा ते सांगतात. संताच्या साहित्यामध्ये त्या त्या काळातील समाज जीवनातील परिस्थितीचा परिणाम साहित्यात दिसून येतो.
त्याप्रमाणे सावता महाराजाच्या काळामध्ये असलेला शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय या दोन संप्रदायाला अनुसरून सावतोबानी हा अभंग लिहिलेला असावा. विठ्ठलाचे म्हणजे परमेश्वराचे रूप समजून घेऊन संताचा सहवास लाभावा हीच सावतोबाची इच्छा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटी ते सांगतात प्रत्येक भाविक भक्ताने मुखाने ‘रामकृष्ण हरि’ हा मंत्र उच्चारावा. कारण रामकृष्ण हरि हा वारकरी संप्रदायाचा मंत्र. राम म्हणजे हृदयात रमवणारा. कृष्ण म्हणजे आकर्षण करणारा आणि हरी म्हणजे ऐक्यरूप असणारा विठ्ठलरूप परमात्मा होय.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.