पूर्वापार कुळी पंढरीचा नेम। मुखी सदा नाम विठ्ठलाचे॥
तारी अथवा मारी, देवा तुचि एक। न घ्यावी भाक पांडुरंगा।।
वडिलांचा सेवा-धर्म अजुनि चालवी। व्यर्थ न भुलवी मायापाश ॥
सावता म्हणे देवा, अखंड घ्यावी सेवा। आठव असू द्यावा, माझा बाप।।
मथितार्थ : या अभंगात सावता महाराजाना आपला जन्म वारकरी असलेल्या कुळात झाला. याचा सार्थ अभिमान वाटतो आहे. हे दिसुन येते. ते म्हणतात हे विठ्ठला माझ्या कुळातील सर्वजण तुझे भक्त होते. वडील परसोबा, आई नागीताबाई, परसोबाचे वडील देऊ माळी हे विठ्ठल भक्त होते. विठ्ठलाचे भक्त हे अखंड सेवा करणारे अनेक आहेत. संत चोखामेळा आणि संत नामदेव यांचे कुटुंबच विठ्ठल भक्त होते, त्यांची सेवा अखंडच होती. म्हणूनच विठ्ठलाने सर्वांची सेवा स्विकारली, हाच भाव सावतोबा सांगतात. त्यांचे ही सर्व कुटुंब विठ्ठल भक्त होते याची आठवण ते या अभंगात करून देतात. हाच सेवा भाव सांगताना तुकाराम महाराज म्हणतात “लौकिकापुरती नव्हे माझी सेवा | अनन्य केशवा दास तुझा ||”
म्हणून कुळातील मी ही तुझाच भक्त आहे. म्हणून तु आमचा सांभाळ कर. पूर्वजांची सेवा मी चालु ठेवली आहे. त्याचा तु स्विकार करावा ही विनंती महाराज विठ्ठलाला करतात. या अभंगात सावता महाराज आपल्या कुळाची कुळपरंपरा सांगतात. ते जन्माने माळी व परंपरेने माळकरी होते.
सावता महाराजाप्रमाणेच तुकाराम महाराजसुध्दा कुळाविषयी माहिती सांगतात,”कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधनं | कुळधर्म निधान हाता चढे | तुका म्हणे कुळधर्म दावी देव | यथाविध भाव जरी होय ||” आपल्या कुळातच पंढरीच्या विठ्ठलाचे नामस्मरण करण्याचा नियम आहे. तेच नामस्मरण तारणारे आहे. माझ्या पूर्वज जे तुझी सेवा नित्यनियमाने करत तोच नियम मी चालु ठेवला आहे. देवा तुच माझे म्हणजे माझ्या कुटुंबाचे रक्षण कर. आम्हाला सांभाळण्याची जबाबदारी देवा तुझी आहे. हे तू विसरू नकोस. मला संसारातील मायेच्या पाशात गुंतू देऊ नकोस. माझी परंपरेने आलेली तुझी सेवा मी तशीच चालू ठेवतो आहे. या सेवेचा तू स्विकार करावा. माझी आठवण तुला असू दे, अशी विनंती सावता महाराज विठ्ठलाला करतात.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.