विवाद करिता भागली दरूशने – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 15

विवाद करिता भागली दरूशने – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 15

विवाद करिता भागली दरूशने । तोचि आले केणे भीमा-तीरी ।।
पुंडलिक-पेठे रहिवासु केला । शब्द हा मिरविला विठ्ठलनामे ॥
आषाढी-कार्तिकी दोन्हीच पै हाट । वैष्णव बोभाट करिताती ।।
सावता म्हणे तया घालू लोटांगण । हरले भाग शीण जन्मोजन्मी ।

 

मथितार्थ : जसा भाव तसा देव विठ्ठलाचे म्हणजेच परमेश्वराचे वर्णन करता करता वेद, शास्त्र, दर्शने, उपनिषद अठरा पुराणे थकली आहेत. पण परमेश्वर कसा आहे, हा प्रश्न काही सुटला नाही, म्हणून सावता महाराज आपल्या व्यवहारातील दाखला देतात, तो म्हणजे बाजारपेठाचा. एवढी वस्तू कुठेच मिळत नाही, ती वस्तू जर बाजारात आली, तर ग्राहकांची झुंबड पडते. त्याप्रमाणे भीमातीरावर भक्त पुंडलिकामुळे आलेला देव त्याच्याच जवळ राहू लागला आणि त्याने विठ्ठल हे नाव घेतले.

आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी भाविक भक्त मोठ्या संख्येने भीमातीरी येतात व विठ्ठल नामाचे स्तवन करतात, गुणगान गातात. पूर्वी राजाच्या दरबारात राजाचे गुणगान करणारे भाट असत. त्याच प्रमाणे हे भाविक भक्त विठ्ठलाचीही भक्ती करतात आणि त्यातच त्यांना परमेश्वर भेटीचा आनंद प्राप्त होतो. अशा या कोणालाही न कळणाऱ्या विठ्ठलाच्या चरणावर आपण लोटांगण घालू त्यामुळे अनेक जन्माचे सार्थक होईल. सर्व जन्माचे कष्ट नाहीसे होईल, कारण विठ्ठल हा सर्व भोळ्या भक्तांच्या दुःखाचा परिहार करतो व जीवनात आनंद निर्माण करतो.

श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.