साधनांची आटाआटी – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 13
साधनांची आटाआटी। कासया पाठी लाविता।।
एक तुमचे नामाचि पुरे। हेचि धुरे साधन॥
भाळी भोळी करीन सेवा। माना देवा तुम्ही धन्य॥
सावता म्हणे रुक्मिणीवरा। अहो अवधारा वचन माझे ।।
मथितार्थ : या अभंगात सावता महाराज म्हणतात, परमेश्वराच्या भेटीसाठी वेगवेगळी साधने सामान्य भक्त वापरतात. कोणी शरीराला कष्ट देतात, कोणी उपासतापास करतात, महाराजांच्या मते देवाचे नाव घेतले तरी तो आपल्याला भेटतो. नामाचा सोपा मार्ग त्यांनी सांगितला आहे. परमेश्वर प्राप्ती साठी केले जाणणारे जप-तप, व्रत-वैकल्ये आणि समाधी हे मार्ग सारे फुकट जाणारे आहेत. अशा प्रकारची साधना म्हणजे नुसती उठाठेव होय. खरे तर भक्तीचा मार्ग हाच खरा मार्ग होय, इतर सारे मार्ग म्हणजे निरर्थक आहेत. यामुळे समाधान आनंद तर मिळत नाहीच उलट त्रास मात्र होतो. म्हणून परमेश्वराच्या नामस्मरणात नियम करा, कारण हे सर्वात सोपे साधन आहे. देवासाठी भोळीभाबडी भक्ती म्हणजे आनंद समाधान होय. म्हणून महाराज म्हणतात, देवा मी तुमचे नामस्मरण करतो हीच माझी भोळीभाबडी भक्ती, मनापासून करतो आहे आणि करीन ती गोड मानून घ्या, माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका अशी विनंती विठ्ठलाला ते करतात. हाच भक्तिमार्ग भागवत धर्मातील सर्व वारकरी आचरतात व परमेश्वर प्राप्तीमध्ये आनंदी होतात. काही तर संत पदापर्यत पोहचतात अशा पद्धतीने सावता महाराज नामाचा महिमा या अभंगातून आपल्याला सांगतात.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.