युद्धकान्ड – संत रामदास

श्री रामदास्वामीं विरचित – युद्धकान्ड

युद्धकान्ड – प्रसंग पहिला

नमू विघ्रहर्ता मुळीं सैन्यभर्ता । मुढां धूर्तकर्ता विभांडी विवता । चतुर्भूज मताननू शोभताहे । तया चिंतितां भ्रांति कोठें न राहे ॥१॥
सदा भेदहंती महंती । सदा ज्ञानवंती नियंती नियंता । सुविद्याकळास्फूर्तिरूपा अमूपा । नमस्कारिली शारदा मोक्षरूपा ॥२॥
नये बोलतां चालतां रूप कांहीं । नये भावितां दावितां सर्वथाही । सदा संत आनंदरूपीं भरावें । पदीं लागतां सद्नुरूचे तरावें ॥३॥
नमस्कारिला राम कोदंडपाणी । पुढें गावया रामराभेति वाणी । भविष्योत्तरें बोलिलीं तीं पुराणीं । उमाकांत ध्यातो सदा शूळपाणी ॥४॥
कथा शंकराची कथा कार्तिकाची । कथा चंडिकेची कथा मोरयाची । कथा वेंकटाची कथा विठ्ठलाची । कथा मल्लयाची कथा भैरवाचीz॥५॥
कथा नृसिंह वामना भार्गवाची । कथा कौरव पांडवां माधवाची । कथा देव इंद्रादि ब्रह्मादिकांची । समस्तांमधें श्रेष्ठ या राघवाची ॥६॥
जिणें फेडिला पांग ब्रह्मादिकांचा । बळें तोडिला बंध त्या त्रीदशांचा । म्हणोनि कथा थोर या राघवाची । जनीं ऐकतां शांति होते भवाची ॥७॥
कथा थोर रामायणीं सार आहे । दुजी ऊपमा या कथेला न साहे । तिन्ही लोक गाती सदा आवडीनें । भविष्योत्तरें वानिली शंकरानें ॥८॥
ऋषीमाजिं श्रेष्ठू विचारें वरिष्ठू । सदा एकनिष्ठू सगूणीं प्रविष्ठू । चरित्रें विचित्रें वनामाजिं वस्तां । मुखें बोलिला राम नस्तां समस्तां ॥९॥
कथा राघवाची सदाशीव पाहे । तळीं ऐकतां शेष थक्कीत राहे । कथा श्रेष्ठ हे ऐकतां दोष जाती । महासुकृती ऐकती धन्य होती ॥१०॥
कथा संपली कांड सुंदर्य मागें । प्रवाहो पुढें चालिला लागवेगें । स्वयें श्रोतयांतें कवी प्रार्थिताहे । पुढें युद्धकांडीं कथा रम्य आहे ॥११॥
ऋषीपर्वतीं रामसौमित्र होते । अकस्मात आला हनूमंत तेथें । म्हणो जानकी देखिली रामचंद्रा । क्षमारूप लंकेसि आहे नरेंद्रा ॥१२॥
सिमा रावणें रक्षिली वाटिकेसीं । प्रभू पाहिली म्यां स्वयें निश्चयेंसीं । तयें घोर नीशाचरी रक्षणेसी । बळें ठेविल्या कर्कशा गर्वराशी ॥१३॥
पुढें राघवें सुग्रिवाचे निमित्तें । विचारूनियां सर्वही वानरांतें । दळेंशीं बळें दक्षिणे चालि केली । विरांचि असंभाव्य सेना मिळाली ॥१४॥
कपी सुग्रिवें सर्व भूमंडळीचें । बहू आणिले वीर मेरू बळाचे । विरापाठिशीं भार कोट्यानुकोटी । रिसां वानरांची असंभाव्य दाटी ॥१५॥
अती आदरें स्कंदभागीं विरानें । रघूनायका घेतलें मारुतीनें । सुमित्रासुतालगिं त्या अंगदानें । प्रभू चालिला ते बळी थोर मानें ॥१६॥
सिता शोधिली भीमराजें विशाळें । दळें लेटिलीं वानरांचीं ढिसाळें । गिरीतुल्य झेंपावती वायुवेगें । करापल्लवा झेलिती शैलशृंगें ॥१७॥
अपारें कुरें वानरें सैर मेळा । कठोरें करीं फोडिती चंडशीळा । रिसें कर्कशें भीम भिंगोळवाणीं । मधें सांवळा राम कोदंडपाणी ॥१८॥
पुढें चालतां भार गोलांगुलांचें । कडे लागले थोर विंध्याचळाचे । तया पर्वतामाजिं चंडें उदंडें । विशाळें बहू लागलीं झाडखंडें ॥१९॥
कपीभार विंध्याचळामाजिं आले । असंभाव्य ते झाडखंडीं निघाले । वरी वाड झाडें तळीं दाट छाया । कपी सर्वही सिद्ध जाले उडाया ॥२०॥
तळीं पोटळे उंच शाखा फुलांचे । वरी लोंबती घोस नाना फळांचे । बहूतांपरींच्या बहू पक्षियाती । बहू श्वापदें तीं फळें भक्षिताती ॥२१॥
तयांमाजिं ते भार कोटय़ानुकोटी । रिसां वानरांची असंभाव्य दाटी । झडा घालिती एकमेकां पुढारें । खडाडां बळें वृक्षवल्ली विदारें ॥२२॥
कितीएक ते बैसले वृक्षअग्रीं । वरी वाइलीं वक्र पुच्छें समग्रीं । कितीएक मध्येंच ते गुप्त जाले । कितीएक ते वृक्षमाथां मिळाले ॥२३॥
स्वइच्छा फळें भक्षिती आदरेंसीं । बहू वांटती एकमेकां  त्वरेंसीं । फळें तोडिती टाकिती ते अपारें । वनामाजिं ते क्रीडती भूभुकारें ॥२४॥
कितीएक हेलविती वृक्ष आंगें । कितीएक ऊफाळती लागवेगें । कितीएक ते झोंबती आंग व्यस्तें । कितीएक ते लोंबती एक हस्तें ॥२५॥
कितीएक पोटाळिती वाड झाडें । किती मोडिती आंगभारें कडाडें । बहू मांडिली झाडखंडी धुमाळी । कितीएक झेंपावती अंतराळीं ॥२६॥
वनें व्यापिली वानरें गर्जताती । दिशा लंघिती श्वापदें पक्षियाती । भुतें खेचरें थोर धाकें पळालीं । चळीं कांपती दैन्यवाणीं गळालीं ॥२७॥
कपींचीं पुढें चालिलीं दाट थाटें । वनें चालतां सर्व होती सपाटें । महा थोर विंध्याचळा लागवेगें । पुढें चालिले सर्व सोडूनि मागें ॥२८॥
तयां चालतां चालतां दक्षणेसी । बहूसाल आवेश माहा विरांसी । पुढें देखिलें शृंग मैळाचळाचें । तयामस्तकीं भार गोळांगुळांचे ॥२९॥
गिरीशृंगपाठार पाहोनि वेगीं । बळें चालिले भार ते दक्षिणांगीं । पुढें चालतां चालतां अस्तमाना । समुद्रातिरीं लोटली भीम सेना ॥३०॥
कपसैन्य सिंधूतिरामाजिं आलें । असंभाव्य देखोनि चक्कीत जालें । जळें मातला सिंधु लाटे धडाडी । करी गर्जना मेघ जैसा घडाडी ॥३१॥
दिसे पाहतां सर्व आकाश जैसें । कळेना सिमा दाटलें तोय तैसें । बहूपाणजंजाळ देखोनि डोळां । भयासूर त्यां कंप सूटे चळाळां ॥३२॥
समुद्रातिरीं राहिली चंडसेना । असंभाव्य तें सैन्य भूमी दिसेना । गिरांवृक्ष देखोनि येती फुराणें । बळें साधिती अंतराळीं किराणें ॥३३॥
कपीभार ते सर्वही स्वस्थ जाले । महापर्वतांचे परी ते मिळाले । समुद्रातिरीं राहिलें सैन्य जैसें । पुढें वर्तलें त्रीकुटामाजिं कैसें ॥३४॥
सिताशुद्धि घेऊनियां रुद्र गेला । तयीं आखयातें क्षयो प्राप्त जाला । बहू मानसीं दु:ख मंदोदरीला । तिनें शीघ्र पाचारिलें देवराला ॥३५॥
म्हणे देवरालगिं बीभीषणा हो । तुम्ही आणि वेगीं सभेमाजिं जा हो । मदोन्मत्त तो अंकुशें आवरावा । विवेकें बळें राव तैसा वळावा ॥३६॥
म्हणे धन्य हो धन्य तूं राजकांते । मनीं माझिया हीत ऐसेंचि होतें । बरी अंतरीं मात घेऊनि पूर्ती । निघाला स सभेमाजिं तो धर्ममूर्ती ॥३७॥
तया रावणाच्या गृहामाजिं गेला । बहूतांपरी रावणू शीकवीला । पुढें दोघेही ते सभंमाजिं आले । महावीर राक्षेस सर्वे मिळाळे ॥३८॥
सभे श्रेष्ठ तो रावणू कुंभकर्णू । सभेमाजिं बीभीषणू आग्रगण्यू । सभे सर्वही पुत्र मंत्री मिळाले । तयालगिं तो रावणू काय बोले ॥३९॥
तया रावणें सर्व सांदूनि शुद्धी । पुढें प्रेरिता जाहला पापबुद्धी । म्हणे ऐक गा बुद्धिवंता प्रहस्ता । करी रे मला वश्य ते रामकांता ॥४०॥
सितेकारणें म्यां बहू कष्ट केले । परी पाहतां सर्वही व्यर्थ गेले । मनीं चिंतिलें कोद कांहीं पुरेना । उरे शीण तो शोक पोटीं धरेना ॥४१॥
सिते सुंदरीलगिं संभोग द्यावा । समूळें बळें रामशत्रू वधावा । न हे ईतुकें सर्वही कृत्य जालें । सुखें सर्वदा चित्त माझें निवालें ॥४२॥
अहंकारला रावणू कोटिगूणें । मनीं मानिलें सर्व ब्रह्मांड ऊणें । समस्तांमधें आगळा मेघवर्णू । पुढें बोलता जाहला कुंभकर्णू ॥४३॥
वदे कुंभकर्णू तया रावणाला । मदें सर्वही नीतिधर्मू बुडाला । अकस्मात लंकापतीबुद्धि नासे । पुढें सर्वही सूख तेणें विनाशे ॥४४॥
जगें निंदिलें तेंचि टाकून येतां । पुढें वेळ नाहीं तया दु:ख होतां । विषें घोळिलें ठेवितां प्रीति तेथें । पुढें सत्वरा जाइजे मृत्युपंथें ॥४५॥
म्हणे कुंभकर्णू असें काय केलें । सिता आणितां सर्वही राज्य गेलें । पुढें भंगलें चित्त जाणूनि जीवें । मनासारिखें बोलिला तो स्वभावें ॥४६॥
शुभाशूभ जें मानलें तूजलगिं । घडो तेंचि आतां भलें या प्रसंगीं । बळें माझिया सर्व सूखें रहावें । पुढें काय होईल तैसें पहावें ॥४७॥
कपी मानवी सर्व कैसे मिळाले । क्षुधेकारणें माझिये प्राप्त जाले । रिपू घालितों ऊदरामाजिं सांठा । नरें वानरें घांस घेतों घटाटा ॥४८॥
उदल्या महाघोर माझेनि कोपें । पुढें देखतां तो चळीं काळ कांपे । रिसें मर्कटें बापुडीं दैन्यवाणीं । रिपू आमचे थोर वाटे शिराणी ॥४९॥
तया बोलतां रावणा सूख जालें । स्तुतीउतरें आदरें गौरवीलें । महावीर पारश्च ऊदीर वेगीं । पुढें बोलता जाहला ते प्रसंगीं ॥५०॥
अहो कासया मंत्र पूसा रिपूचा । जनीं कोण लेखा तया मर्कटांचा । समर्थापुढें दूसरा कोण कैंचा । करूं एकला सर्व संहार त्यांचा ॥५१॥
सितेची बहू प्रार्थना कां करावी । प्रभू सांगतों बुद्धि पोटीं धरावी । म्हणे वीर पारश्च त्या रावणाला । बळात्कार राया करावा सितेला ॥५२॥
म्हणे रावणू धन्य गा बुद्धिवंता । तुझें बोलणें मानलें दृढ चित्ता । परी शाप आहे मला ब्रह्मयाचा । करीना बळात्कार हे सत्य वाचा ॥५३॥
तयां बोलतां दु:ख बीभीषणाला । बहूसाल संतापला क्रोध आला । म्हणे रे रघूनाथ पूर्णप्रतापी । दुरात्मे तुम्ही नष्ट चांडाळ पापी ॥५४॥
तुम्ही राक्षसें निर्बळें बुद्धिहीनें । मती मंदली पातकाचेनि गूणें । सुराकारणें राम आला कळेना । मदें मातला रावणू ओळखेना ॥५५॥
कपी वीर ते दूरि टाकूनि शंका । मिळले करायास निर्मूळ लंका । त्रिकूटाचळू दृश्य नाहीं तयांला । तंव जानकी भेटवा राघवाला ॥५६॥
रुपें कर्कशें कोपला वीर गाढा । रणामंडळीं राम वाईल मेढा । तया देखतां काळ भीडूं शकेना । तुम्ही मश्यकें राक्षसें सर्व सेना ॥५७॥
रणीं तीव्र त्या राघवाचेनि बाणीं । तुटों लागले तूमचे पादपाणी । धडें मस्तकें मेदमांसें चिडाणी । न होतां सिता भेटवा चापपाणी ॥५८॥
तया बोलतां ते सभा तप्त जाली । सुतां मंत्रियाचे मुखीं तीव्र बोली । असंभाव्य तो रावणा कोप आला । कुशब्दें बहू त्रास बीभीषणाला ॥५९॥
सभेमाजिं धिक्कारिलें रावणानें । उठोनि पदें ताडिलें दुर्जनानें । बहूर्तामधें एकला धर्ममूर्ती । मनीं खोंचला तो उदासीन चितीं ॥६०॥
मनू भंगला हो तया धार्मिकाचा । पुढें त्याग तात्काळ केला सभेचा । उडाला नभोमंडळामाजिं वेगीं । पुरोहीत चत्वारि ते पृष्ठभागीं ॥६१॥
झळंबे मनीं लोभ त्या सांडि केली । अकस्मात ते वृत्ति भंगूनि गेली । पुढें वाक्य बोलेनियां रावणातें । उदासीन तो चालिला व्योमपंथें ॥६२॥
पुरोहति चत्वारि ते पृष्ठभागीं । त्वरें उत्तरें चालिले लागवेगीं । समुद्रासि लंघूनि पैलाड गेले । नभीं पारखे सुग्रिवें ओळखीले ॥६३॥
कपींद्रू म्हणे पैल पाहे विशाळू । नभीं येतसे कोण हा पंचमेळू । अकस्मात खालावला व्योमपंथें । भिडों पाहती वानरें त्या अनर्थें ॥६४॥
मिळाळे कपी बोलती त्यासि वाचा । अकस्मात आलास तूं कोण कचा । म्हणे बंधु मी होय लंकापतीचा । परी दास अंकीत या राघवाचा ॥६५॥
पुरी त्यागिली सर्व एका जिवेंशीं । करा हो तुम्ही भेटी या राघवाशीं । म्हणे सत्य बीभीषणू नाम माझें । नव्हे अन्यथा सर्वथा वाक्य दूजें ॥६६॥
कपी सर्वही जुत्पती धममूतीं । बहूतांपरी ऐकिली वाड कीर्ती । समस्तीं तुम्हीं हीत माझें करावें । कृपाळूपणें राघवा भेटवावें ॥६७॥
म्हणे वीर सुग्रीव नावेक बैसा । त्वरें मात हे जाणवीतों सुरेशा । कपीराज तो लागवेगें निघाला । अती आदरें भेटला राघवाला ॥६८॥
समाचार साकल्य तो सांगताहे । म्हणे भेटि नीशाचरू इच्छिताहे । परी अंतरीं कोण कैसा कळेना । तया ठेवितां राजनीती मिळेना ॥६९॥
समस्तांकडे पाहिलें राघवानें । बहूतांपरी बोलिलें तें सभेनें । मनीं पाहतां देखिला दैन्यवाणा । कृपाळूपणें आणवी रामराणा ॥७०॥
उभें राहिले भाग्य बीभीषणाचें । करी अंतरीं ध्यान पादांबुजाचें । भिजे दिव्य सर्वांग त्या अश्रुबिंदीं । मिठी घातली रामपादारविंदीं ॥७१॥
कृपासागरें ठेविला हस्त माथां । चिरंजीव लंकापती होय आतां । मधूरें गिरें राघवें ऊठवीला । पुढें तिष्ठतू हात जोडोनि ठेला ॥७२॥
बहू स्तूति केली रघूनायकाची । करी आदिनारायणाची विरिंची । तयाचेपरी । शब्दकारुण्य बोले । पुढें पाउलें लक्षितां अश्रु आले ॥७३॥
म्हणे राम बीभीषणा बैस आतां । पुरे स्तूति सांडी तुझी सर्व चिंता । सुमित्रासुतालगिं संकेत केला । दिजे मंगळस्नान बीभीषणाला ॥७४॥
त्वरें ऊठला बंधु त्या राघवाचा । घटू आणिला पूर्ण सिंधूदकाचा । पुरें शीघ्र बीभीषणालगिं शेषें । विशेषे दिलें सौख्य राज्याभिपेकें ॥७५॥
म्हणे राम बीभीषणा सत्य वाचा । प्रतापें वधू जालिया वैरियाचा । तुला दीधलें राज्य लंकापुरीचें । चळेना चिरंजीव जैसें ध्रुवाचें ॥७६॥
वरू दीधला रामचंद्रें दयाळें । कृपासागरें दासपाळें नृपाळें । प्रसंगीं तये थोर आनंद जाला । दिल्हें अक्षयी राज्य बीभीषणाला ॥७७॥
कषी सुग्रिवादीक मांदी मिळाली । समस्तीं विरीं आदरें स्तूति केली । जगीं धन्य हें भाग्य बीभीषणाचें । प्रितीपात्र जाला रघूनायकाचें ॥७८॥
रघूनायका देखतां सूख जालें । बहु दु:ख मागील सर्वै निमालें । जगीं धन्य गा धन्य बीभीषणा तूं । तुला जाहला प्रसन्न श्रीअनंतू ॥७९॥
समस्तांसि सन्मानिलें आदरेंसीं । नमस्कार केला रघूनायकासी । पुढें मंत्रियामांजिं तो बैसवोला । तेणें थोर आनंद बीभीषणाला ॥८०॥
म्हणे राम बीभीषणा बैस आप्ता । त्रिकूटाचळू सांग साकल्य वार्ता । वदे राज्य लंकापुरी सर्व सेना । मनामाजिं संतोषला रामराणा ॥८१॥
पुढें राम बीभीषणा मंत्र पूसे । कपीभार पैलीकडे जाति कैसे । विचारूनियां सुग्रिवाचेनि मतें । म्हणे हो क्षमा मागिजे मार्ग यातें ॥८२॥
समुद्रासि देऊनियां श्रेष्ठ मानू । करावा अती आदरें सुप्रसन्नू । मनीं बोलणें सत्य मानूनि देवें । समुद्रातिरीं बैसिजे शुद्ध भावें ॥८३॥
त्रिकूटाचळाहून तो हेर आला । पुढें सर्व पाहूनि शार्दूळ गेला । समाचार सांगे तया रावणाला । म्हणे वानरेसीं बळें राम आला ॥८४॥
मिळाले कपी रीस कोटयानुकोटी । समुद्रातिरीं जाहली थोर दाटी । बळें राहिली ते असंभाव्य सेना । विरांची असंख्यात संख्या असेना ॥८५॥
शिळाशीखरें झेलिती वृक्षपाणी । सदा सर्वदा गर्जती घोर वाणी । तयामाजिं ते मानवी वेषधारी । रुपें रम्य लावण्य कामावतारी ॥८६॥
असंख्यात मेळा रिसांवानरामचा । कपिश्रेष्ठ सुग्रीव राजा तयांचा । प्रभू सांगतों सिद्ध आतां असावें । पुरीमाजिं दुश्चीत कांहीं नसावें ॥८७॥
तयें सांगतां थोर उद्धेग जीवा । म्हणे मागुता कोण रे पाठवावा । पुढें शूक बोलविला आदरेंसीं । म्हणे जाय रे बोल त्या सुग्रिवासी ॥८८॥
म्हणावें कपी तूं सखा आमुचा रे । अनूचीत हें वाउगें कासया रे । बहूतांपरी शूक तो शीकवीला । अलंकारे देऊनियां तोषवीला ॥८९॥
नमस्कार केला तयें रावणासी । निघाला बळें हेर तैसा त्वरेंसीं । नभोमंडळीं शीघ्र उड्डाण केलें । देहें आपुलें सर्वही पालटीलें ॥९०॥
रुपें सुंदरू जाहला शुद्ध पक्षी । निराळा नभामाजि तो सैन्य लक्षी । म्हणे सुग्रिवा ऐक रे ऐक भावें । कपी व्यर्थ आलसि मागें फिरावें ॥९१॥
त्वरें आपुल्या भूवनामाजिं जावें । समारंगणीं वाउगें कां मरावें । त्रिकूटाचळा रामकांतेचि नेलें । कपी सांग पां रे तुझें काय गेलें ॥९२॥
तया मानवा साह्य जालसि कैसा । मनीं नेणतां चालिला मूर्ख जैसा । बळें हीन झुंजासि त्याच्या न जावें । कदा कृपणाचें वर्‍हाडी न व्हावें ॥९३॥
महा मूर्ख रे सख्य याचें नसावें । स्वयें हीत तें ज्ञान पोटीं बसावें । त्रिकूटाचळू लभ्य नाहीं सुरेशा । नरांवानरां प्राप्त होईल कैसा ॥९४॥
कपीपुंगवा व्यर्थ आलसि वांयां । समारंगणीं बाणघातें मराया । समस्तीं रणामाजिं जीवें मरावें । तये मैत्रिकीचें जनीं काय घ्यावें ॥९५॥
बहुतांपरी हेंचि आतां करावें । तुवां आपुल्या भूवनामाजिं जावें । शुकें निंदिलें सर्वहि वानरांतें । बहूसाल धिक्कारिलें हो तयांतें ॥९३॥
तिहीं पाडिला ताडिला कुस्त केला । पुन्हां सोडिला तो नभामाजिं गेला । म्हणे शूक ऐका रिसें वानरें हो । तुम्हां रावणें रक्षिलें निर्बळें हो ॥९७
अरे मूर्ख हो व्यर्थ आलांत येथें । समारंगणीं जावया मृत्युपंथें । अरे सुग्रिवा वानरा भूललाशीं । रिसांमर्कटांमाजिं तूं मूर्ख होती ॥९८॥
मुढा व्यर्थ घेऊनि आलसि सेना । तुला रावनू कोण कैसा कळेना । पुन्हां बोलता जाहला घोर वाणी । कपी मागुते क्षोभले वृक्षपाणी ॥९९॥
धरूनी बळें आणिलें पक्षियाला । तिहीं रक्षिलें पाशबंधीं तयाला । पुढें शीघ्र कोपेल हा रामचंद्रू । म्हणे दास भेटेल भावें समुद्रू ॥१००॥
प्रतापें बळें तारिती चंड शीळा । बळे सेतु बांधूनि घेती सुवेळा ॥१०१॥


युद्धकान्ड – प्रसंग दुसरा

समुदातिरीं राम राजीवनेत्रें । भुमी सेज दर्भाजनीं तीन रात्रें । बहूतांपरी दीधला श्रेष्ठ मानू । परी सागरू तो नव्हे सुप्रसन्नू ॥१॥
फळें तोय सांडूनियां नित्य नेमें । बहूतांपरीए प्रार्थिला सिंधु रामें । परी नायके जो बळें धुंद जाला । रघूनायका कोप तात्काळ आला ॥२॥
उभा राहिला काळ कृतांतु जैसा । बळें सिंधु जाळावया राम तैसा । दिसे रूप अद्भूत वज्रांग ठाणें । करीं चाप तें सज्जिलें अग्रिबाणें ॥३॥
बळें ओढितां घोरघोषें करारी । दिशा दाटल्या वन्हि शीतें थरारी । भयें बैसला काळपोटीं दरारा । चवों लागल्या त्या असंभाव्य तारा ॥४॥
बहू क्षोभला राम जाळूं निवाला । पुढें सिंधु भेटावया शीघ्र आला । म्हणे स्वामि हो थोर अन्याय जाला । समुद्रासि हो शीघ्र पालाण घाला ॥५॥
नळाचेनि हस्तें जळीं चंड शीळा । गिरिशृंग तर्तीला हो जी नृपाळा । वदे निश्चयें आदरें हा समुद्रू । तेणें थोर संतोषला रामचंद्रू ॥६॥
बहूतांपरी राम संतोषवीला । पुढें सिंधु तोही जळामाजि गेला । नळें वानरांचीं दळें सिद्ध केलीं । गिरीशृंग आणावया शीघ्र गेलीं ॥७॥
त्वरें उत्तरें चालिले भार सैरा । बळी धांवती एकमेकां पुढारां । शिळा शीखरें झाडखंडें प्रचंडें । बळाचे कपी चालवीती उदंडें ॥८॥
कपी धांवती लक्ष कोटयानुकोटी । बळें गर्जती थोर आनंद पोटीं । गिरीकंदर देश लंघूनि जाती । शिळा शीखरें शीघ्र घेऊनि येती ॥९॥
निळे पींवळे श्वेत आरक्त काळे । पिके जांभळे गौर जाभे गव्हाळे । बहु रंग पाषाण नानापरींचे । उभे वक्र वर्तूळ गाभे गिरीचे ॥१०॥
कपीवीर ते शीघ्र घेऊनि जाती । बळें मघवाचेपरी वर्षताती । शिळीं सेतु बांधी नळू लागवेगें । असंभाव्य तीं चालिलीं शैलशृंगें ॥११॥
कपी मोडिती वाड झाडें कडाडां । कडे पाडती पर्वतांचे खडाडां । उडया घेति आकाशपंथें धडाडां । बळें टाकिती सिंधुमव्यें थडाडां ॥१२॥
विशाळा जडा वर्तुळा त्या उदंडी । बहू मस्तकीं वाहती चंड धोंडी । शिळा शीखरें फोडिती ते अभंगें । नभों भार झेंपावती लागवेगें ॥१३॥
कपी मारुतीसारिखें जे उडाले । गिरी मंदरासारिखे चालवीले । कपी साक्षपी देवरूपी बळापे । कडे लागले ते सुवेकाचळाचे ॥१४॥
बळें सेतु बांधावया वेगु केला । शतें योजनें लांब विस्तीर्ण जाला । दश योजनें भव्य रुंदी तयाची । जळीं बांधलीं सर्व पांचां दिसांची ॥१५॥
कपी सर्व आनंदले कार्य जालें । बळें गर्जती चित्त सूखें निवालें । सुवेकाचळा सेतु बांधोनि नेला । नळा वानराला जयो प्राप्त जाला ॥१६॥
म्हणे रामराणा तया सुग्रिवातें । दळें चालवा सागराचेनि पंथें । निरूपी कपी शीघ्र सेनापतीला । निळें सर्व सेनेसि संकेत केला ॥१७॥
दळें सर्वही वानरांची निघालीं । पुढें चालतां दाटणी थोर जाली । कडेचा पडे तो उडे अंतराळीं । सुवेळाचळा पावले शीघ्रकाळीं ॥१८॥
सुवेकाचळाभीतरीं राजभारें । दळें लोटलीं वानरांचीं अपारें । बळें घोरघोषें कपी गर्जताती । दिशाचक्र सिंधू गिरी पाहताती ॥१९॥
त्रिकूटागिरीशीखरीं दिव्य जें कां । रघूनायकें देखिली रम्य लंका । दिसे तेजबंजाळ लावण्यराशी । तयां देखताम पारणें लोचनांशीं ॥२०॥
म्हणे धन्य रे धन्य तो विश्वकर्मा । असंभाव्य या पर्वताचा महीमा । सुवर्णाचळासारिखा दीसताहे । सिता सुंदरी या स्थळामाजिं आहे ॥२१॥
पुढें राम बोले रिसांवानरांशीं । असावें तुम्हीं सर्व सेनाप्रदेशीं । कपीचक्र अव्यग्र तें सिद्ध जालें । निळें वानरें सर्व सन्नद्ध केलें ॥२२॥
कपीभार ते सर्वही स्वस्थ जाले । पुढें धर्मता उत्तरीं राम बोले । म्हणे सुग्रिवा बापुडें शुक्र सोडा । तया पायिंचे सर्वही पाश तोडा ॥२३॥
तया आंगदें सोडतां तो उडाला । मुखीं रामनामें नभीं गुप्त जाला । बळें चालिला मुक्ता मूखें त्वरेंशीं । त्रिकूटाचळीं भेटला रावणासी ॥२४॥
म्हणे रावणू गा शुका काय झालें । नव रात्रपर्यंत कोठें क्रमीलें । वदे शूक हो लंकनाथा वरिष्ठा । मुखें व्यर्थ बोलों नये अप्रतिष्ठा ॥२५॥
तयां वानरांच्या दळामाजिं गेलों । देहें पालटीलें स्वयें शूक जालों । नभोमंडळीं राहिलों अंतराळीं । बळें वानरांचीं दळें तीं न्यहाळीं ॥२६॥
समुद्राचिये उत्तरें भीम सेना । दहा योजनें दाट भूमी दिसेना । तिथें मुख्य ते रामसौमित्र बंधू । कपिश्रेष्ठ सुग्रीव राजा अगाधू ॥२७॥
उचिष्टोत्तरें तूमंचीं त्या कपीला । मुखें बोलिलों सर्वही सुग्रिवाला । मला सांगतां वीर कोपासि आले । कितीएक ते पाठिलगिं उडाले ॥२८॥
कपीवीर धांवोनियां पाठिलागीं । मला ताडिते जाहले ते प्रसंगीं । बहू सूख जालें तयां वानरांतें । कठोरें करें ताडिलें या देहातें ॥२९॥
बहू कष्ट जाले प्रभो या जिवासी । नसो वोखटी वेळ ती वैरियासी । रिसां वानरांचीं असंभाव्य मांदी । पुढें घातलें हो मला पाशबंदीं ॥३०॥
प्रभू काय सांगों चमत्कार जाला । समुद्रांतुनी सिंधु बोहर आला । रुपें भव्य तो मूर्तिमंतू निघाला । अती आदरें भेटला राघवाला ॥३१॥
पुढें बोलतों जाहला तोयराशी । तयें शुद्धि सांगीतली राघवासी । म्हणे जी बळें सिंधु बांधा दयाळा । नळाचेनि हस्तें जळीं चंडशीळा ॥३२॥
कपी प्रेरिले त्या रघूनायकानें । शिळा तारिल्या त्या नळा वानरानें । कपी भार ते सर्व ऐलाड आले । सुवेळाचळा मस्तकीं ते मिळाले ॥३३॥
कृपाळूपणें बोलिला रामचंद्र । कपीला म्हणे शूक सोडा नरेंद्र । पुढें वानरीं सोडिलें लागवेगीं । समर्था तुला भेटलों ये प्रसंगीं ॥३४॥
प्रभू सांगतों बुद्धि आतां करावी । त्वरें जानकी राघवा भेटवावी । सिता पाठवीतां बरें लंकनाथा । न होतां असें प्राप्त होईल वेथा ॥३५॥
शुकें सांगतां रावणा कोप आला । म्हणे कोण लेखा नरां वानरांला । रणामंडळीं सोडितां बाणवृष्टी । बळें आपुल्या सर्व जाळील सृष्टी ॥३६॥
बळें पूजितों भूमि आकाश बाणीं । म्हणे काय तीं लेंकुरें दैन्यवाणीं । न होतां असंभाव्य त्या बाणवृष्टी । सुखें  सांगती थोर संग्रामगोष्टी ॥३७॥
अमित्रीं तिहीं एक अद्‍भूत केलें । समुद्रासि पालणिलें सैन्य आलें । नव्हे पाहतां गोष्टी सामान्य कांहीं । परी राक्षसां शुद्धि अद्यापि नाहीं ॥३८॥
पुढें हेर बोलीविले आदरेशीं । शुका सारणातें म्हणे गर्वराशी । मिळालीं दळे श्रावणारीसुताचीं । तुळा रे बळें त्या रिसां वानरांचीं ॥३९॥
तयें बोलिल्यानंतरें लंकनाथें । बळें चालिले शीघ्र आकआशपंथें । सुवेळाचळा देखतां सिद्ध जाले । देहे आपुले ते तिहीं पालटीले ॥४०॥
रुपें जाहले वानरू वेषधारी । कळेना कळा बाणलीसे शरीरीं । दळीं कोटिच्या कोटि संख्या असेना । तिहीं राक्षसीं तूळिली सर्व सेना ॥४१॥
सभे बैसले राम सौमित्र जेथें । शुका सारणाला नव्हे रीघ तेथें । पुढें अंतरीं दूर राहून वेगीं । बळें तूळिते जाहले ते प्रसंगीं ॥४२॥
सभे अंतरें लक्ष लावोनि ठेले । अकस्मात बीभीषणें ओळखीलें । धरीलें करीं त्या शुका सारणातें । म्हणे दूत हे धाडिले लंकनाथें ॥४३॥
तदा बोलिला राम बीभीषणाला । दळें दाखवा सर्वही शीघ्र त्याला । तुळा जा दळें तीं शुकासारणा हो । तुम्ही आपुलें कार्य सिद्धीस न्या हो ॥४४॥
स्तुतीउत्तरें सारण शीघ्र बोले । कृपासागरें हेर ते रक्षियेले । प्रभू देहजे स्नेहआज्ञा दयाळा । तुजलगिं कल्याण हो जी नृपाळा ॥४५॥
निरोपेंचि तात्काळ ते हेर गेले । तया रावणाला नमस्कार केले । प्रभू मृत्यु आला बळें लागवेगें । परी सूटका जाहली थोर भाग्यें ॥४६॥
दळामाजिं बीभीषणें ओळखीलें । धरूनी बळें तैं सभेमाजिं नेलें । उदारें रघूनायकें सोडवीलें । कृपाळूपणें भूपती मुक्त केले ॥४७॥
कळेना दळीं कोण संख्या बळाची । असंभाव्य सेना बहू विक्रमाची । तयांच्या बळा ऊपमा काय द्यावी । समारंगणीं भेटि त्यांची न  व्हावी ॥४८॥
रघूनाथ सौमित्र बीभीषणानें । कपी सुग्रिवें अंगदें मारुतीनें । बळें घेऊं लंका असा नेम केला । घडीनें घडी कोप येतो तयांला ॥४९॥
मनीं वाटतें बुद्धि ऐशी करावी । सिता आदरें राघवा भेटवावी । तया बोलतां कोपला गर्वराशी । म्हणे ताडिलें काय नेणों तुम्हांसी ॥५०॥
भया सांगतां त्या नरां वानरांचे । सदा सर्वदा भक्ष जें राक्षसांचें । मज रावणासारिखा कोण आहे । समारंगणीं काळ भीडों न राहे ॥५१॥
महा थोर दामोदरीं गर्वराशी । पुढें रावणू वेंवला सारणेंसी । तया मस्तकीं उंच आकाशपंथीं । पुढें पाहतां दृष्टि फांके दिगंतीं ॥५२॥
सुवेळा चळीं दृष्टि घालेनि पाहे । असंभाव्य तें सैन्य पोटीं न साहे । पुढें रावणू सारणालगिं पूसे । कपी सांग रे सर्व आहेत कैसे ॥५३॥
कपीभार पाहूनियां हेर आले । पुसे रावणू सारणू शीघ्र बोघे । वदे देखिल्यासारिखें सत्य वाचे । पुढें दाखवी भार गोळांगुळांचे ॥५४॥
म्हणे सारणू ते कपी वीर जेठी । मिळाले असंभाव्य कोट्यानुकोटी । देहे पर्वतासारिखे काळरूपी । रणीं भीडतां शूर संग्रामकोपी ॥५५॥
म्हणे लंकनाथा कपी पैल पाहें । समस्तांमधें आगळा बैसलाहे । समारंगणी वीर नेतां विरामा । महा मुख्य सेनापती नीळनामा ॥५६॥
दिसे दूसरा त्याचिये दक्षिणांगीं । बळें डुल्लतू वीर लोहीत अंगीं । धरा हाणतां पुच्छघातें थरारी । कपी अंगदू नाम त्याचें सुरारी ॥५७॥
मिळाले कपी रीस कोट्यानुकोटी । पुढें बैसला भार घालेनि पाठीं । सदा सर्वदा लक्ष ज्यांचें त्रिकूटीं । बहूसाल युद्धा उतावीळ पोटीं ॥५८॥
करी चंड उडडाण आकाशपंथें । महामेघ वीतूळती अंगवातें । समारंगणीं भीडतां अग्रवादू । बळें आगळा नाम त्याचें कुमूदू ॥५९॥
देहे सिंधुरासारिखा पैल पाहे । महावीद विंघ्याचळामाजिं राहे । सुपर्णास सांडून उड्डाण ज्यांचें । कपी थोर हा ऋषभू नाम त्याचें ॥६०॥
दिसे पैल पुच्छासनीं वीर भारें । खचे स्वर्ग तें याचिया भूभुकारें । कपी शर्भ ऐसें तया नाम राया । उतावीळ हा थोर शूत्र जिताया ॥६१॥
कपी वीनतू पैल पाहा विशाळू । रणीं धांवतां परिप्रेतां सुकाळू । देहे आचळासारिखा ताम्रवर्णी । विरां वानरांमाजिं अद्‍भूत कर्णी ॥६२॥
भृकूटी भयासूर त्या भीम पाहें । भुमी अंगरोमावळी रूळताहे । कपी क्रंदनू भूपती नाम ज्याचें । तयासारिखें देह नाहीं बळाचें ॥६३॥
प्रमाथी कपी वीर कैसा कडाडी । महामेघ गंभीर जैसा गडाडी । रणीं झुंजतां थोर कल्पांत मांडे । तयां वानरांशीं बळें कोण भांडे ॥६४॥
सुवर्णाचळासारिखा देह ज्याचा । मुखें विक्रमू बोलवेना बळाचा । गवायू कपी वीर तात्काळ कोपे । उडाणें सवीतारथीं अश्व कांपे ॥६५॥
विशाळू गजू वानरू पैल पाहो । तुळीतो सदा सर्वदा सख्य बाहो । त्रिकूटाचळीं लविली दृष्टि जेणें । बळें सर्व रोमांच येती फुराणें ॥६६॥
विरांभाजिं हा धूम्रचंड प्रतापी । महापर्वतासारिखा चंडकोपी । रिसू कर्कशू घोर घोषू अगाधू । बळी होय हा जांबुवंतासि बंधू ॥६७॥
कपीचें बहूसाल सामर्थ्य वानी । मुखें बोलतां रावणू वीट मानी । म्हणे रावणू सारणा मूर्ख होशी । मजदेखितां मर्कटां वर्णितोसी ॥६८॥
असों दे रिसें मर्कटें या प्रसंगीं । रिपू दाखवी मुख्य तो राम वेगीं । अभिप्राय जाणूनि लंकापतीचा । वदे सारणू मागुतीं रम्य वाचा ॥६९॥
पहा राम तो पैल कोदंडपाणी । रुपें सांवळा रम्य लावण्यासाठी । रतीचा पती तूळितां तुच्च होये । विराजे रिसां वानरांमाजिं पाहें ॥७०॥
पहा राम विश्राम आत्मा जगाचा । बळें काळहर्ता विहर्ता अवाचा । तुणीरांबरें कांत माथां लपेटा । झणत्कारिती वाजटा चापघंटा ॥७१॥
महावीर तो देखतां धाक सूटे । समारंगणीं भीडतां काळ वीटे । तयाशीं बळें भीडतां पूरवेना । कदाही जयो प्राप्त होतां दिसेना ॥७२॥
तया दक्षणे दूसरा बैसला हो । महावीर सौमित्र राया पहा हो । असंभाव्य सामर्थ्य याचें कळेना । बळें आगळा जिंकितां जिंकवेना ॥७३॥
कपी राघवा वामभागींच आहे । त्रिकूटाचळू दृष्टिनें वक्र पाहे । कपीनाथ सुग्रीव तो ओळखावा । कळेना असंभाव्य त्याचा उठावा ॥७४॥
कपी आणिले सर्व भूमंडळींचें । असंख्यात संख्या नसे भार त्यांचे । वनीं मैत्रिकी जोडिली राघवांशीं । रघूनायका साह्य जाला जिवेंसी ॥७५॥
सिता शोधिली मारिलें कूमरासी । वनें मोडिलीं जाळिलें त्रीकुटासी । बळें आगळा भूपती पैल पाहे । समस्तांमधें मारुती शोभताहे ॥७६॥
महाभीम भिगोळ काळा कराळू । विशाळें नखें फोडितो ब्रह्मगोळू । रिसां कर्कशांमाजिं हा काळकेतू । बळें आगळा पैल जो जांबवंतू ॥७७॥
उतावीळ मारावया दैत्य पाहे । महा वीर बीभीषणू शोभताहे । तयें सांगतां रावणा दु:ख जालें । असंख्यात कोपानळें दग्ध केलें ॥७८॥
करीं खड्‍ग घेऊनियां सारणाला । प्रसंगीं तये शीघ्र मारूं निघाला । म्हणे सारणू जी पिडा कां करीतां । सुखें बोललों सर्वही सत्य वार्ता ॥७९॥
तुळाया दळें पाठवीलें भुपाळें । रिपूचीं दळें पाहिलीं तीं विशाळें । तयासारिखें बोलिलों सत्य भावें । समर्थापुढें मिथ्य कैसें वदावें ॥८०॥
प्रभू आमचा कोण अन्याय जाला । खरें सांगतां कोप येतो तुम्हांला । नसे पाहतां अल्प अन्याय कांहीं । नसे मिथ्य आम्ही नसों स्वामिद्रोही ॥८१॥
पुढें रावणू कोप सांडून ठेला । पुसे आदरें मंत्र माहोदराला । सुवेळाचळा कोण रे पाठवावा । रिपूचा विवेकें बरा शोब घ्यावा ॥८२॥
वदे वीरु माहोदरू रावणातें । सुवेळाचळा पाठवा शार्दुलातें । महा धूर्त हा जाणतो सर्व मत्तें । बळें शीघ्र तूळील रीपूदळातें ॥८३॥
पुढें दैत्य बोलविला आदरेंसी । म्हणे सैन्य पाहोनि यावें त्वरेंशीं अलंकार देऊनियां तोषवीला । बळें हेर तो शीघ्र जाऊनि आला ॥८४॥
नमस्कारिला राव तो आदरेंशीं । म्हणे रावणू म्लान कां दीसतोशी । अधोमूख राहोनि शार्दल बोले । म्हणे हो कपी काळ जैसे उदेले ॥८५॥
बहू दाटलीसे असंभाव्य सेना । नसे रीघ तेथें कदा जाववेना । परी मी तयांमाजिं तैसाच गेलों । बहू ताडिलों पाडिलें कुस्त केलों ॥८६॥
निरोपें तुझ्या शीघ्र गेलें सुरासी । रुपें जाहलों वानरू वेषधारी । मला हिंडतां हिंडतां थोर मानें । पुढें लक्षिलें धूर्त बीभीषणानें ॥८७॥
कपी धांवले दूत त्या सुग्रिवाचे । पुरोहीत चत्वारि बीभीषणाचे । धरूनी मला चालवीलें त्वरेंशीं । पुढे चालतां देखिलें राघवासी ॥८८॥
म्हणे धन्य तो रामराजा दयाळू । मला देखतां शीघ्र सोडी नृपाळू । मनीं माझिये वाटतें निश्चयेशीं । रघूनायका भेटवावें सितेसी ॥८९॥
समाचार तो सर्वही श्रूत केला । तया सांगतां रावणा क्रोध आला । पुढें राक्षसें शीर केलें रिपूचें । वनीं चालिला सत्व घ्याया सितेचें ॥९०॥
अशोकीं वसे जानकी भूमिबाळा । वदे रामनामावली सत्त्वशीळा । पहा रावणें शीर मायीक केलें । छळाया सितेकारणें शीघ्र नेलें ॥९१॥
म्हणे रावणू व्यर्थ त्वां धीर केला । रणीं दीर भर्तार तूझा निमाला । कपी राक्षसांतें महा मार जाला । प्रहस्तू जयो शीघ्र घेऊनि आला ॥९२॥
रिपू सांगतां ते भयातूर जाली । भयें जानकी शोकसिंधू बूडाली । शिरें देखतां मूर्च्छना  शीघ्र आली । देहे सांवरेना भुमीं अंग घाली ॥९३॥
भविष्योत्तरें बोलिलीं वाल्मिकाचीं । म्हणे कायसा बोलिला तो विरिंची । पहा आजि तें सर्वही व्यर्थ जालें । कृतांतापुढें मश्यका येश आलें ॥९४॥
बहू लोक होतां देहेभाव सांडी । म्हणे रावणू सत्त्व सीता न सांडी । महा प्रेत्न सायास म्यां व्यर्थ केला । पुढें शीघ्र लंकापुरीमाजिं गेला ॥९५॥
दळें सिद्ध केलीं बळें लंकनाथें । प्रतीमल्ल राक्षेस चत्वार पंथें । महा वीर ते सर्वही शस्रपाणी । बुजूं पाहती भूमि आकाश बाणीं ॥९६॥
कपीचक्र तेंही बळें सिद्ध जालें । निळें वानरेंशी प्रतीमल्ल केलें । महा वीर ते गर्जती मेघ जैसे । भुतां खेचरां थोर कल्पांत भासे ॥९७॥
सुवेळाचळा राम पाहे स्वभावें । तया मस्तकीं शृंग तें दोन गांवें । नभीं लागला उंच आकाशपंथें । म्हणे राम गा सुग्रिवा जाई तेथें ॥९७८॥
म्हणे वीर सुग्रीव आज्ञा प्रभूची । असंभाव्य सेना रिपां वानरांची । महा वीर तात्काळ सर्वै मिळाले । बळें शृंग वेंघावया सिद्ध झाले ॥९९॥
कथेलगिं श्रोतीं पुढें चित्त द्यावें । म्हणे दास अर्थांतरीं वीवरावें । स्वहीता कथामृत घ्यावें फुकाचें । सदा सेवितां दु:खदारिद्य कैंचें ॥१००॥


युद्धकान्ड – प्रसंग तीसरा

पुढें चालिला शीघ्र तो रामराजा । कपी धांवती वीर वेष्टीत फौजा । करीं हस्त घेऊनि बीभीषणाचा । बळें वेंघलें शृंग त्या पर्वताचा ॥१॥
कितीएक ते राहिले भार मागें । बळें वेंघलें शृग तो लागवेगें । पुढें शीघ्र आटोपिलें जातजातां । मिळाले कपी राम सौमित्र माथां ॥२॥
सुवेळागिरीशीखरीं राम पाहे । अती साजिरा त्रीकुटू शोभताहे । उभा रावणू गोपुरीं थोर धीट । तिथें पावला सुग्रिवाचा चपेट ॥३॥
कवे घातली पेटला शीघ्र कोपा । बळें रावणू ताडिला चंड थापा । बळें झाडिलीं तोडिलीं दिव्य छत्रें । म्हणे जानकी आणिली या कुपात्रें ॥४॥
पुढें देखतां रावणा क्रोध आला । पदीं झाडिलें ताडिलें सुग्रिवाला । मदें मातले दूर टाकून शंका । कळा लविली नीकरें एकमेकां ॥५॥
बहू कोपले मल्लयुद्धासि आले । रिपू भीडतां अंग अंगीं मिळाले । बळें हाणिती पृष्ठिसी वज्रमुष्टी । दणाणीतसे त्रीकुटीं सर्व सृष्टी ॥६॥
विरश्रीबळें वीर झोंबीस आले । झडा चांचरा भूतळामाजिं गेले । पुढें रावणें देह संकोचवीलें । अनर्थास भीऊनि गंतव्य केलें ॥७॥
कपीनाथ तो येथ घेऊनि आला । रिपूगर्व हो सर्वही भग्र केला । नमस्कारिलें राघवा ते प्रसंगीं । कपीभार ते सर्व आनंदसंगीं ॥८॥
कपीशीं सुवेळाचळा राम आला । असंभाव्य तो वीरमेळा मिळाला । दळें भूतळीं लोटले भार सैरा । पुढें आणिलें राजनीतीविचारा ॥९॥
कपी शोधितां शोधितां लक्ष कोटी । तयांमाजिं हा अंगदू वीरजेठी । बळें आगळा दक्ष चातुर्य जाणे । वयें अल्प लावण्य तारुण्य बाणे ॥१०॥
स्तुती उत्तरीं राम बोले तयासी । म्हणे धन्य गा अंगदा गूणराशी । मिळालसि तूं आमुच्या स्नेहवादा । विवेकें तुवां सोडिलें पितृद्वंद्वा ॥११॥
बहूतांपरी राघवें गौरवीला । तेणें शोभला शीघ्र ऊदीत जाला । प्रतीउत्तरें अंगदें स्तूति केली । उभा दृष्टि हे रामपायींच ठेली ॥१२॥
पुढें आपुला विक्रमू वाड बोले । महावीर ते सर्व चक्कीत जाले । तया अंगदा थोर आवेश आला । तेणें राघवा थोर संतोष जाला ॥१३॥
म्हणे रामराणा तया अंगदासी । त्रिकूटाचळीं भेट रे रावणासी । तयां सांगरे भीम पुरुषार्थ माझा । वदे सर्व संहारिशी कोण काजा ॥१४॥
प्रसंगोत्तरें अंगदा त्वां वदावें । बहूतांपरी रावणा बोधवावें । सिताकारणीं युद्ध मागून घ्यावें । परी शेवटीं भाग तोडून यावें ॥१५॥
नमस्कारिलें त्या रघूनायकाला । समस्तांसि सन्मानिलें सिद्ध जाला । कपी राम आज्ञेसि घेऊनि माथां । उडाला बळें चालिला व्योमपंथा ॥१६॥
नभामाजिं झेंपावला वेग केला । बळें शीघ्र लंकापुरीमाजिं गेला । अकस्मात खालावला व्योमपंथें । रिपूची सभा बैसली भीम जेथें ॥१७॥
पुढें पावला तो सभेमाजिं कैसा । कपी राक्षसां भासला काळ जैसा । रिपू शस्रपाणी बळें सिद्ध जाले । उगे सर्व कोणासि कोणी न बोले ॥१८॥
कपीनें सभा सर्व आमान्य केली । पुढें रावणू लक्षिला भेटि जाली । मनीं पाहतो तो रिपू उच्च होतो । महापुच्छसिंहासनीं बैसला तो ॥१९॥
रिपू सर्वही बैसले स्तबध जाले । तयांलगिं हा अंगदू काय बोले । पुढें बोलतां बोलतां येरयेरां । बहुसाल धिक्कारिलें थोरथोरां ॥२०॥
बहूतांपरीच्या बहू शब्दयाती । महावीर तोंडागळे गर्जताती । रिपू घोर तो आपुलाल्या वगत्रें । बळें मातले हाणिती शब्न्दशस्रें ॥२१॥
बहू बोलती बोल नानापरीचे । महा युक्तिचे भक्ति संख्या रसाचे । तयां बोलतां मातला शब्दसिंधू । असंख्यात संख्या नसे तो अगाधू ॥२२॥
बहूतांपरी रावणू बोधवीला । परी नायके मानसीं गर्व केला । म्हणे काय रे पाहतां घ्या कपीला । महावीर तो अंगदू आक्रमीला ॥२३॥
कपीनें बळें थोर उड्डाण केलें । सभामंडपामस्तकीं शीघ्र नेलें । रिपू घोर तेही भयातूर जाले । धिराचे बहू स्तंभ झोकें उडाले ॥२४॥
विरें अंगदें त्रीकुटीं ख्याति केली । नभीं अंतराळीं बळें झेंप गेली । बळाचे भुजीं मल्ल राक्षेस कैसे । गळाले तळीं मारिले सर्प जैसे ॥२५॥
पुढें अंगदू भेटला रामचंद्रा । नमस्कारिलें आदरें त्या नरेंद्रा । कपी सर्वही तो समाचार सांगे । म्हणे शत्रुचा गर्वताठा न भंगे ॥३६॥
बहू बोलिलों जी तया रावणासी । परी नायके मातका गर्वराशी । भिजेना जळामाजिं पाषाण जैसा । धरीना मनीं सांगतां शब्द तैसा ॥२७॥
बहूसाल त्या रावणें गर्व केला । रघूनायका कोप तात्काळ आला । म्हणे राम गा सुग्रिवा ये प्रसंगीं । त्रिकूटाचळू पालथा घालिं वेगीं ॥२८॥
कपींद्रू वदे शीघ्र सेनापतीला । निळें सर्व सैन्यास संकेत केला । बळें चालिलीं तीं दळें वानरांचीं । अयूधें करीं शैल शृंगादिकांचीं ॥२९॥
कपी क्षोभले गजती मेघ जैसे । बळें भार ऊठावले शीघ्र तैसे । महा घोर घोषें भुमीकंप जाला । त्रिकूटाचळा थोर कल्पांत आला ॥३०॥
हुडे कोट आटोपिले लंकनाथें । कपीभार झेंपावले व्योमपंथें । महायुद्ध आरंभिलें एकमेका । बळें घेतली वानरीं शीघ्र लंका ॥३१॥
त्रिकूटाचळीं वानरीं वेग केला । कपीराक्षसांतें महामार जाला । बहू कोपले वीर ते चंडकोपा । बळें हाणिती मस्तकीं वज्रथापा ॥३२॥
ग्रिवा तोडिती मोडि ती पंजरांतें । कपी झोडिती पाडिती वृक्षघातें । रिपू भांडतां थोर आवेश पोटीं । बलें ओढिती हात घालेनि झोंटी ॥३३॥
कपी कोपले गर्जती युद्धकाळीं । शिळा टाकिती पाडिती दुर्गपौळीं । गिरी हाणिती थोर नेटें धडाडी । बलें लागतां दिव्य लंका धडाडी ॥३४॥
त्रिकूटाचळीं लोटली सर्व सेना । असंभाव्य ते भार लंका दिसेना । कपी क्षोभले गर्जती काळ जैसे । दळेंशीं बळें धांवती वीर तैसे ॥३५॥
दळें पायिंची थोर अश्र्वा गजांचीं । रणीं चालिलीं दाट थाटें स्थांचीं । बहू भार शृंगारिले राक्षसांचे । महावीर ते घोर नानापरींचे ॥३६॥
रणीं पातली ते भयातूर सेना । रजें मातलीं चंद्रसूर्यो दिसेना । बहूसाल वाद्यें बहूतांपरींचीं । महा कर्कशें वाजती राक्षसांचीं ॥३७॥
समारंगणीं चालिले राजभारे । दळें दाटलीं वानरांचीं अपारें । बळें हाणिती एकमेकां धबाबां । झरे लागले शोणिताचे * थबाबां ॥३८॥
पुढें धांविले पायिंचे शस्रधारी । जया देखतां रोम आंगीं थरारी । कपीराक्षसांतें महामार जाला । तेणें शोणिताचा नदीपूर आला ॥३९॥
रणीं तोडिती वीर वीरां धसासां । भगाडें बहू पाडिती ते घसासां । बळें टोंचिती शूळ पोटीं भसासां । शिरें फोडिती मुष्टिघातें ठसासां ॥४०॥
पुढें झुंजतां भार तो मृत्यु पावे । करीती बळें वीर मागें उठावे । कपी कोपले थोर काळाग्रि जालें । रिपू पायिंचे सर्वही भग्र केले ॥४१॥
निमाले रणीं देह त्या पायिंच्यांचे । बळें ऊठले भार त्या राउतांचे । देहे टाकिती झुंजती स्वामिकाजा । पुढें धांवती वीर मागील फौजा ॥४२॥
कपी झुंजतां भंगल्या अश्वयाती । रणीं लेटिलीया बळें भदजाती । गिरीसारिखे थोर कीकोटघोषें । गजीं वानरां त्रासिलें हो विशेषें ॥४३॥
कपीराज ते हाणिती मत्त हस्तें । बळें झोडिती कुंजरें खस्तव्यस्तें । दळें पायिंची अश्वरत्नें अपारें । रणीं पाडिलीं कुंजरें थोरथोरें ॥४४॥
कळेना महामार त्या वानरांचा । रणीं थोरसंहार केला गजांचा । तया पृष्ठिभागीं पुन्हां भार आले । रिपू वानरीं सर्व संहार केले ॥४५॥
पुढें चालिले भार नाना रथांचे । बहू बाणजाळें कपीसैन्य खोंचे । रणीं धांवती चक्रचाली घडाडां । कपी टाकिती चंडशीळा धडाडां ॥४६॥
रथीं सारथी सर्वही चूर्ण केले । महावीर ते भार मागूनि आले । रणीं राक्षसांतें क्षयो प्राप्त जाला । जयो वानरां शीघ्र ठाकून आला ॥४७॥
रणीं मारुतें पाडिला जंबुमाळी । सुखेणें विदूणा पुढें तेचि काळीं । विरें सुग्रिवें क्षिप्र भट्टांसि द्वंद्वें । बळें सोडिलें वज्रमुष्टीस मैंदें ॥४८॥
द्बिवीदा करें वज्रस्पर्शू निमाला । बळ ताडिलें शीघ्र प्रातीपनाला । रणीं लक्ष्मणें भेदिलें वीरुपाक्षा । चतुर्थाशिं रामें शरें एक शिक्षा ॥४९॥
दळीं राक्षसांचे हाहाकार जाला । दळेंशीं नळें वीरुपाक्षू निमाला । कपी राक्षसांचे बहुसाल सेना । रणीं माजलें युद्ध तें वोहटेना ॥५०॥
निशी प्राप्त जाली रणीं घोर मारेम । महावीर ते झुंजती अंधकारें । बळें हाणती कोण कोणा कळेना । विरश्रीबळें मातले ते ढळेना ॥५१॥
पुढें शीघ्र चंद्रोदयो शुद्ध जाला । दिसों लागले राक्षसां वानरांला । रिपू हाणती एकमेकां कडाडां । नद्या वाहती शोणिताच्या भडाडां ॥५२॥
कपी वीर चंद्रोदयाच्या उजेडे । बळें हाणिती एकमेकां निवाडें । दळें भांडती राक्षसां वानरांचीं । असंभाव्य भ्यासूर प्रेतें विरांचीं ॥५३॥
कपी तापले कोपले वीर जेठी । बलें तोडिले दैत्य कोटयानुकोटी । समारंगणीं आटली सर्व सेना । रणीं राक्षसां येश येतां दिसेना ॥५४॥
क्षयो प्राप्त जाला बहू राक्षसांतें । पुढें युद्ध आरंभिलें इंद्रजीतें । दिसे पाहतां सर्वही येश गेलें । तया राक्षसें शीघ्र कापटय केलें ॥५५॥
अकस्मात तो इंद्रजीतू उडाला । नभोमंडळीं रावणी गुप्त जाला । पुढें घोर नीशाचरें तेचि काळीं । कपी पाडिले सर्वही सर्पजाळीं ॥५६॥
बहू सर्प झेंपावले व्योमपंथें । बलें धांवती वानरी सैन्य जेथें । महा काळ कर्कोट नानापरींचे । रणीं पाडिती भार गोळांगुळांचे ॥५७॥
कपींची पडों लागली सर्व सेना । पुढें पाहतां युद्धकर्ता दिसेना । गमे सर्व आकाश व्यालें विखारीं । बळें झोंबती सर्पकूळें जिव्हारीं ॥५८॥
कपीभार ते सर्व निर्जीव जाले । निचेष्टीत ते रामसौभित्र केले । रिपू पाडिले थोर आनंद जाला । पुढें शीघ्र लंकापुरीमाजिं गेला ॥५९॥
नमस्कारिला राव तो आदरेंसीं । तेणें पुत्र आलिंगिला सौख्यराशी । अती आदरें सुंदरें रम्य सारें । पिता अंगिंचीं दे अलंकार चीरें ॥६०॥
म्हणे हो रणीं शांति केली रिपूची । बळें सर्वही त्या रिसां वानरांची । बहूतांपरी राव संतोषवीला । निरोपोंचि तो भूवनामाजिं गेला ॥६१॥
बहू सूख जालें तया रावणाशीं । तेणें शीघ्र पाचारिलें त्रीजटेशीं । म्हणे हो विमानीं सिता बैसवावी । रिपू मारिले शीघ्र तेथेंचि न्यावी ॥६२॥
रणीं पाडिले ते तये दाखवावे । सिता वीट मानील ऐसें करावें । बहूतांपरी रावणें । शीकवीली । वनामाजिं ते त्रीजटा शीघ्र गेली ॥६३॥
पुसे जानकी ते तया त्रीजटेला । सभामंडपी कोण वृत्तांत जाला । म्हणे त्रीजटा सोडिं चिंता स्वभावें । रणामंडळा राजआज्ञेस जावें ॥६४॥
अहो जानकी दु:ख चिंतीन तूंतें । तरी देह माझा पडो वज्रघातें ।  म्हणे सोडिं चिंता सिते सर्व कांहीं । तया लंकनाथ जयो प्राप्त नाहीं ॥६५॥
सिता ऐकतां शोक सांडूनि ठेली । तये त्रीजटेची बहू स्तूति केली । पुढें बैसल्या शीघ्र दोघी विमानीं । रणामेदिनीं पावल्या घोरबाणी ॥६६॥
पुढें पाहतां लक्ष कोटयानुकोटी । रणीं पाडिले हुंबती वीर जेठी । धडें तूटलीं राक्षसां वानरांची । शिरें दाटलीं घोर माहाविरांचीं ॥६७॥
भयासूर हा घोर संहार जाला । रणीं राक्षसां वानरां अंत आला । असंभाव्य उत्पाटिले वृक्ष जैसे । रणीं भग्र केले महावीर तैसे ॥६८॥
असंभाव्य ते तूटले पादपानी । धडे मस्तकें थोर विक्राळवाणी । बहू जाहली मेदमांसें चिडाणी । महा दर्प ते माजली वोरढाणी ॥६९॥
रणी एक ते छेदिलें सर्व अंगीं । तेणें काळिजें दीसती पृष्ठिभागीं । शिरें तोडिलीं मेंदु नीघे बरारां । बहु घाय तें रक्त वाहे झरारां ॥७०॥
कितीएक ते वीर जाले उताणे । किती पालथे दीसती दैन्यवाणे । कितीएक ते वीर घालूनि मेटें । भुमी पीटिती थोर दु:खें ललाटें ॥७१॥
कितीएक भूमी वमीती अशुद्धें । कितीएक ते मोडलें माजमध्यें । कितीएक ते वीर चौरंग जाले । कितीएक ते दूधडी भग्र केले ॥७२॥
कितीएक ते मुंडकीहीन जाले । कितीएक वक्षास्थळीं चूर्ण केले । कितीएक तीं तूटलीं जानुघोटीं । कितीएक ते कंठ बोटीं ललाटीं ॥७३॥
कितीएक वोटारिती तीव्र डोळे । निघाले वहू पोटिंचे मांसगोळे । पितें चारटें फोफसें रक्त मेंदु । शिसें आंतडीं कांतडीं मूळ कंद ॥७४॥
कितीएक जाली शिरें चूर चेंदा । बहू दाटलासे रणीं रक्तरेंदा । कितीएक हुंकारिती दैन्यवाणीं । कितीएक ते मागती अन्नपाणी ॥७५॥
कितीएक ते खूडिती पादपाणी । कितीएक ते शब्द कारुण्यवाणी । कितीएक ते दंशिती भूमि दंतीं । कितीएक ते लागले मृत्युपंथीं ॥७६॥
शिरें राक्षसांचीं धडें वानरांचीं । रणीं लागलीं एकमेकां विरांचीं । विरां शाकटां कुंजराघोडियांचीं । रिसां वानरां सर्व इत्यादिकांचीं ॥७७॥
नदीं शोणिताचे महापूर जाती । धडे कोथळे फूगळे वाहताती । शिरें पादपाणी बहू मांसमाळा । धनू खेटकें भातडया त्या विशाळा ॥७८॥
गिधें श्वापदें तीं असंभाव्य आलीं । स्वइच्छा बहू मांस भक्षूं निघालीं । भुतें सर्वही औट कोटी मिळालीं । बहूतांपरींचीं बहू तृप्त जालीं ॥७९॥
पुढें जानकी बोलिली त्रीजटेशीं । रणीं पाडिलें सर्वही वानरांशीं । महावीर ते कोण वेळा तयांतें । म्हणे त्रीजटे दाखवीं सर्व मातें ॥८०॥
रणीं त्रीजटा दाखवी जानकीसी । महा वीर ते पाडिले नागपाशीं । दिसे राम सौमित्र तोही निमाला । पुढें जानकीनें महाशोक केला ॥८१॥
बहूतापरी जानकी शांत केली । तये त्रीजटा शीघ्र घेऊनि गेली । समाचार सांगे तया रावणाला । वनामाजिं आली सिता रक्षणाला ॥८२॥
कपी सर्वही पावले मृत्युपंथू । जिती मारुती आणि नैरृत्यनाथू । जयालगिं जाली दया राघवाची । पहाया तया शक्ति काळासि कैंची ॥८३॥
रणें शोधिलीं सर्व बीभीषणानें । विरांलगिं अश्र्वासिलें थोर मानें । पुढें दृष्टिनें पाहिलें राघवानें । गरूडास्र नीरूपिलें व्योम जानें ॥८४॥
तयालगिं प्रायोजिलें शीघ्र पंथें । असंभाव्य झेंपावले व्योमपंथें । उडया घालिती पक्षिकूळें झडाडां । बळें तोडिती सर्पकूळें तडाडां ॥८५॥
विहंगी तिहीं सर्पसंहार केला । कपीभार तो मोकळा सिद्ध जाला । गिरीशीखरीं सर्व सेना घडाडी । त्रिकुटाचळीं घोष तेणें धडाडी ॥८६॥
म्हणे रावणू थोर आश्चर्य जालें । कपीचक्र तें सर्व निर्जीव केलें । सुतें वैरियां दाविली थोर ख्याती । रणीं मागुती ते कपी गर्जताती ॥८७॥
रणीं शत्रु जिंकील धूत्राक्षनामा । तया पाठवीजे प्रभू सार्वभामा । पुढें मंत्र ऐकों नका मंत्रियांचा । वदे रावणू आदरें त्यासि वाचा ॥८८॥
म्हणे गा विरा शीघ्र तूं ते प्रंसगीं । रिपूलगिं मारावया जाय वेगीं । अलंकार देऊनियां तोषवीला । महावीर धूत्राक्ष युद्धा निघाला ॥८९॥
रणी वीर धूम्राक्ष तो वज्रदंष्ट्री । तिचा अंकपू चालिला भार पृष्ठी । रणामंडळीं थोर संहार केला । पुढें राक्षसांतें क्षयो प्राप्त जाला ॥९०॥
बहू युद्ध केलें तया राक्षसानें । महावीर धूम्राक्ष त्या अंकपानें । बळें दोघेही मारिलं मारुतीनें । रणीं वज्रदंष्ट्री तया अंगदानें ॥९१॥
महा वीर ते झुंजतां भग्र जाले । बहुसाल घायाळ धाकें पळाले । तिहीं सर्व सांगीतली युद्धवार्ता । तेणें रावणामानसीं थोर चिंता ॥९२॥
रणीं राक्षसांतें क्षयो प्राप्त जाला । प्रहस्तू पुढें शीघ्र युद्धा निघाला । कपीराक्षसां थोर संहार जाला । निळें झोडिला पाडिला भग्र केला ॥९३॥
पुढें रावणू चालिला लागवेगें । तयालगिं मंदोदरी नीति सांगे । न मानीत तो चालिला आवरेना । बळें लोटली ते असंभाव्य सेना ॥९४॥
महा वीर झुंजार ते भार आले । बहूसाल शृंगारमंडेत जाले । बळें पुत्रप्रधानमेळा मिळाला । रणामंडळा रावणू शीघ्र आला ॥९५॥
बहू त्रासिलें सैन्य गोळांगुळांचें । रिपूबाणजाळें बहू सैन्य खोंचे । महा वीर तेही बळें मग्र चेले । पळले कपी राघवाआड गेले ॥९६॥
बहू त्रासिलों राक्षसांचेनि बाणीं । कपीभार ते बोलिले दैन्यवाणी । बळें कांपती खोंचती देति धांपा । बळें रक्षिं गा राघवा मायबापा ॥९७॥
तया देखतां राम  कार्मूक ओढी । पुढें शीघ्र सौमित्र तो हात जोडी । म्हणे वीर तो स्थीर व्हावें समर्थें । करीतों बळें भग्र त्या रावणातें ॥९८॥
रणीं रावणा वीर सामर्थ्य नेलें । नेट नील माया तया भग्र केलें । पुढें शीघ्र पाचारिलें रावणाला । महावीर सौमित्र युद्धा निघाला ॥९९॥
सुमित्रासुता रावणा युद्ध आता । पुढें देइजे आदरें चित्त श्रोता । म्हणे दास हा वीर कोदडपाणी । रणीं रावणालगिं त्रासील बाणीं ॥१००॥


युद्धकान्ड – प्रसंग चवथा

दशशीर सौमित्र युद्धा निघाले । समारंगणीं वीर सन्मूख जाले । महावीर संग्राम आवेश पोटीं । पुढें देखिलें एकमेकांसि दृष्टीं ॥१॥
बहूसाल धिक्कारिलें येरयेरां । बहू सोडिलीं बाणजाळें सरारां । दळीं टाकिती थोर शस्त्रें शरांचीं । बळें तोडिती एकमेकां विरांचीं ॥२॥
रणीं भीडतां हाणिती एकमेकां । म्हणे रावणू वीरा हा थोरु नीका । पुढें शक्ति काढूनियां ब्रह्मयाची । बळें सोडिली ओळि विद्युल्लतेची ॥३॥
शरें वारितां बैसली शक्ति अंगीं । रणीं वीर सौभित्र तो देह त्यागी । पुढें धांवला रावणू शीघ्र तेथें । बळें ताडिता जाहला मुष्टिघातें ॥४॥
तया देखतां मारुती कोप आला । अकस्मात तो व्योमपंथीं उडाला । कठोरें करें ताडिलें वज्रमुष्टी । वमूं लागला रावणू रक्तसृष्टी ॥५॥
रिपू रावणू मागुता शीघ्र गेला । पुढें लक्ष्मणू ऊठला स्वस्थ जाला । पुन्हां रावणू कोपला काळरूपी । विरां राक्षसांमाजिं चंडप्रतापी ॥६॥
दहा मस्तकीं त्या दहा दिव्य छत्रें । पताका बहू मत्स्य मार्तंडपत्रें । महावैभवेंशीं स्थारूढ जाला । तया मागुती थोर आवेश आला ॥७॥
बहू बाण जुंबाड वाहोनि पृष्ठीं । दहाही धनुष्यें करीं दृढ मुष्टी । करूं लागला मागुती बाणवृष्टी । रघूनायकें देखिलें त्यासि दृष्टीं ॥८॥
उभा राहिला राम वज्रांग ठाणें । करीं सज्जिलें चाप चंद्रार्धबाणें । दहा हममूगूट छत्रें धनुष्यें । बळें तोडिलीं पाडिलीं तीं निमेषें ॥९॥
पुढें रावणू तो भयातूर जाला । बहुतांपरी राघवें शीकवीला । म्हणे जाइं रे रक्षिलें आजि तूला । रिपू प्राण घेऊनि तैसा पळाला ॥१०॥
महा मेघनादू असे नाम ज्यासी । पले लंकनाथासवें तो त्वरेंशीं । तयासारिखीं मूढ मूढें मिळालीं । रणीं भ्रष्टलीं सर्व मागें पळालीं ॥११॥
न पाहात मागें पुरीमाजिं गेले । विरांमाजिं कोणी कुणासी न बोले । पुढें सर्वही मंडपामाजिं आले । समस्तांसि तो रावणू काय बोले ॥१२॥
भयातूर लंकापती दैन्यवाणा । म्हणे ऊठवा हो बळें कुंभकर्णा । तयावीण आणीक कोणी दिसेना । रिपू घोर हा थोर संहारवेना ॥१३॥
पुढें धाडिलें शीघ्र माहोदराला । महाघोर वाद्यें दळें सिद्ध जाला । किती एक ते धीट मोठे पळाले । कितीएक पोटीं भयातूर जाले ॥१४॥
निजेला दरीभीतरीं कुंभकर्णू । दिसे काळ विक्राळ तो मेघवर्णू । शरीरें भयासूर हा घोररूपी । विरां भासला मृत्यु येमस्वरूपी ॥१५॥
तया ऊठवीतां भयातूर जाले । महावीर ते कंप अंगीं उदेले । पुढें जाहले धीट ते नेटपाटें । उभीं पाहती सर्व नैरृत्यथाटें ॥१६॥
बहूसाल वाद्यें बहूतांपरींचीं । महा कर्कशें चंड घोरध्वनींचीं । तयांच्या पुढें जाहला एक वेळा । नभोमंडळीं नाद गेला भुगोळा ॥१७॥
गदा तोमरें हाणती वज्रघातें । महामार आरंभिला राक्षसांतें । कळा लविती टाकिती वृक्ष नाना । गळाले परी कुंभकर्णू उठेना ॥१८॥
शिळा टाकिती टोंचिती शूळ शस्रें । महाघोष संपूर्ण तो कर्णपात्रें । बळें लोटळें मस्त ते हस्ति वेगीं । शरीरावती चालती ते प्रसंगीं ॥१९॥
विरा ऊठवाया बहू यत्न केला । परी नूठतां सर्वही व्यर्थ गेला । तया मारितां हिंपुटे वीर जाले । उठेना महा वीर सर्वै गळाले ॥२०॥
नव्हे कार्य तेणें बहुसाल शंका । पुढें बोलती वीर ते एकमेकां । उठेना महा वीर कैसें करावें । तयीं अंतरीं जाहलें वर्म ठावें ॥२१॥
तया किन्नरीं रम्य गाती विशेषें । अलापें शिळा वीरती तोय जैसें । जयाचेनि नटवांग लावण्यवेषें । मनीं होय शक्रादिकां कामपीसें ॥२२॥
तयांलागीं बोलविले आदरेंशीं । पुढें आलिया गायकी स्वर्गवासी । करीं टाळ मृदंग यंत्रें उपांगें । बहू गीत संगीत तें रागरंगें ॥२३॥
सुखें भोगिती देव त्या गायनांचीं । मनें धांवती ऊर्ध्व शेषादिकांचीं । सुधा सेवितां त्यापुढें वीष वाटे । खरा सुस्वरें अमृतानंद लोटे ॥२४॥
तिथें गायनाची कळा रम्य जाली । तेणें कुंभकर्णासि जागृति आली । भुकेला दिसे बैसला काळ जैसा । बगू भक्षिलें शोणिता मेदमांसा ॥२५॥
रिपू सिद्ध होऊनि लंकेंत चाले । कपी देखतां ते भयातूर जाले । उभा राहतां शीर बाहेर आलें । रघूनायकें थोर आश्चर्य केलें ॥२६॥
पुसे आदरें राम बीभीषणाला । महावीर हा कोण हो सिद्ध जाला । कथी सर्व साकल्य तो मंत्र त्याचा । म्हणे राघवा बंधु हा रावणाचा ॥२७॥
बळें आगळा वीर हा कुंभकर्ण । महापर्वतासारिखा मेघवर्ण । समारंगणीं काळ भीडों शकेना । सखा बंधु हा रावणा होय साना ॥२८॥
पुसे कुंभकर्ण सभेमाजिं गेला । नमस्कारिलें भेटला रावणाला । म्हणे भोगणें लागलें कर्म केलें । सिता आणितां दु:ख हें प्राप्त जालें ॥२९॥
मनीं भंगला राव जाणोनि नेणें । पुन्हां तोषवीला विरें कुंभकर्णें । रिपू मारणें हेचि आज्ञा प्रतिज्ञा । उभा राहिला शीघ्र घेऊनि आज्ञा ॥३०॥
पुढें पावला तो रणीं शीघ्र काळें । दळेंशीं बळें चालिला एक वेळें । कपी ग्रासिले त्रासिले घोर मारें । समारंगणीं लागले घायवारे ॥३१॥
रिसां वानरां मांडिली थोर आटी । कपी गीळिले लक्ष कोटयानुकोटी । उठे सृष्टि भक्षावया काळ जैसा । रणीं वावरे तो महावीर तैसा ॥३२॥
रिपूभार तो भक्षिला भग्र केला । कपीनाथ काखें दुपाडें उडाला । पुरी पावतां पावतां सुग्रिवानें । त्वरेनें पणू सिद्ध केले विरानें ॥३३॥
तया सुग्रिवें कर्ण नाशीक नेलें । पुढें पाहतां दर्पणीं दु:ख केलें । म्हणे व्यर्थ आताम जिणें रूपहाणी । रणीं लोटला मागुती शूळपाणी ॥३४॥
बहू कोपला वीर राक्षेस कैसा । कडाडी बळीं थोर काळाग्रि जैसा । कपीवाहिनीची मनी सांडि केली । रणीं रामचंद्रा उच धांव घाली ॥३५॥
तया राक्षसें खर्डिल्या वज्र दाढा । रणीं राघवें वाहिला चंडमेढा । बळें लागतां मेरुमांदार फोडी । रघूनायकू क्रूर तो बाण सोडी ॥३६॥
रणामाजिं तें तीव्र संधान ऐसें । गिळूं लागला आदरें खाद्य जैसें । बहू सोडिले बाण कोटयानुकोटी । बळें राक्षसें घातलें सर्व पोटीं ॥३७॥
शुकासारिखे बाण पोटीं निघाले । असंभाव्य मध्येंच ते गुप्त जाले । महाघोर संधान या राघवाचें । गिळीतो रणीं कोण सामर्थ्य याचें ॥३८॥
महाघोर त्या मुद्रलाचेनि घातें । रणीं हाणतां जाहला राघवातें । रघूनायकें छेदिला वामबाहो । भुमीं चालिला शोणिताचा प्रवाहो ॥३९॥
रणीं जाहलें हस्त सव्यांग ऊणें । पुढें दैत्य तो कोपला कोटिगूणें । कळें ताळ उत्पाटिला वाम हस्तें । रघूनायकें तोडिलें बाणघातें ॥४०॥
बहू कोपला दैत्य सन्मूख आला । रणीं पाद छेदूनि चौरंग केला । पदेंवीण चाले महासर्प जैसा । बळें ऊपरे चालिला वीर तैसा ॥४१॥
पुढें राघवें शीर छेदूनि नेलें । बहूसाल तें व्योमपंथें उडालें । रणीं कोथळा फोडिला बाणघातें । महावीर तो चालिला मृत्युपंथें ॥४२॥
तया देखतां वीर मागें पळाले । भयें शीघ्र लंकापुरीमाजिं गेले । पुढें देखिला रावणू मेघवूर्ण । तया सांगती पाडिला कुंभकर्णू ॥४३॥
करूं लागला रावणू शोक भारी । पुढें त्रीशिरा त्यासि बोधें निवारी । म्हणे हो रणीं आजि युद्धासि जातों । रिपू थोर सामर्थ्य याचें पहातों ॥४४॥
महावीर तो त्रीशिरा प्राप्त जाला । सुतां आणिकां थोर आवंश आला । करूं लागले पुत्र मंत्री प्रतिज्ञा । निघाले बळें शीघ्र घेऊनि आज्ञा ॥४५॥
महामत्त माहोदरू सिद्ध केला । तुरंगीं नरा अंतकू स्वार जाला । बहूसाल तेजाळ तें खड्‍ग हातीं । बळें चालिले वीर ते राजपंथीं ॥४६॥
रणीं शूर देवांतकू त्रीशिरा हा । अतीकाय तो वीर पारश्व माहा । बळें चौघहि चौरथीं स्वार जाले । दळें लोटलीं विक्रमेंशीं निघाले ॥४७॥
निघाले बळें भार साहीजणाचें । महावीर ते गर्जती विक्रमाचे । रणामंडळीं पारखे वीर कैसे । दळेंशीं बळें धांवती काळ जैसे ॥४८॥
महामार दाहीं दळीं एक जाला । कपीवीर राक्षेस कीती निमाला । पुढें वानरीं घोर घातें निघातें । रणीं भग्र केलें तयां राक्षसातें ॥४९॥
तयां देखतां लोटला दिव्य घोडा । नरां अंतकू कोपला वीर गाढा । बळें हांणतां शस्र वाजे घडाडां । तुटों लागले पादपाणी थडाडां ॥५०॥
बहू वेग संहारिती सर्व सेना । कपी पाहती अश्व कोठें दिसेना । पुढें पाहतां पाहतां लागवेगीं । अकस्मात तें आदळें खड्‍ग अंगीं ॥५१॥
बहूसाल तेणें रिसां वानरांच्या । ग्रिवा कापिल्या थोर माहाविरांच्या । कपीवाहिनीचा रणीं आट जाला । भुमीं लेटिले शोणितें पूर आला ॥५२॥
कपीवीर ते खोंचले भग्र जाले । माहामार देखोनि वेगें पळाले । कितीएक ते सुग्रिवा आड गेले । पुढें अंगदें सर्वही स्वस्थ केले ॥५३॥
उणें देखिलें धांवला शीघ्र कोपें । बळें ताडिला अश्व तो वज्रथापें । नराअंतकाला रणीं अंत आला । बहू मेदमांसें भुमीं गाळ जाला ॥५४॥
नराअंतका मारिलें अंगदानें । पुढें वीर ऊठावले घोर त्राणें । रणामंडळामाजिं ते शीघ्र आले । तया अंगदाही कपी साह्य जाले ॥५५॥
करी नीळ तो युद्ध माहोदराशीं । महावीर देवांतकू मारुताशीं । भिडे त्रीशिरा पार्श्व तो ऋषभेशीं । बळें झुंजती चौघे तीघां जणांशीं ॥५६॥
पुढें मांडिला थोर संहार तेथें । रणीं माजलीं तैं बहूसाल प्रेतें । महावीर ते धीर संग्रामसैरें । बळें धांवती एकमेकां पुढारें ॥५७॥
विरश्रीबलें दूर टाकूनि शंका । रणीं हाणती घाय ते एकमेकां । महाथोर संग्राम साहीजणांचा । पुरीं पूरला अंत त्या राक्षसांचा ॥५८॥
गजारूढ माहोदरू त्या निळानें । रणामाजिं देवांतकू मारुतीनें । महावीर पारश्र्व त्या ऋषभानें । रणीं झुंजतां पाडिलें थोर मानें ॥५९॥
बळें कोपला तो अती चंडकाया । रथू लेटिला शत्रु तेणें जिताया । कपीवीर ते आडवे शीघ्र आले । पुढें चालतां सर्वही भग्र केले ॥६०॥
रथीं बैसला पर्वतासारिखा तो । म्हणे राम हा कोण युद्धासि येतो । वदे शीघ्र बीभीषणू रम्य वाचा । रघूनायका पुत्र का रावणाचा ॥६१॥
सख्या होय सौमित्र तुम्हासि जैसा । अतीकाय तो मेघनादासि तैसा । न लेखी कपीवाहिनीचा उठावा । तुम्हीं कीं सुभित्रासुतें हा वधावा ॥६२॥
म्हणे त्यासि पाहा बरें रावणारी । उभा राहिला शीघ्र कोदंडधारी । विरश्रीबळें बाणिली दिव्य शोभा । रणामंडळीं ठाण मांडूनि ऊभा ॥६३॥
पुढें राघवें ओढिला बाण जैसा । वदे आदरें वीर सौमित्र तैसा । पहावें घडी एक राजीवनंत्रें । वधीतों बळें दैत्य मूहूर्तमात्रें ॥६४॥
पुढें पावला तो अतीचंड काया । बहू बोलती एकमेकां छळाया । तयां एकमेकांस निर्माण जालें । शरां सोडिलें व्योम संपूर्ण केलें ॥६५॥
शरां तोडिती एकमेकां विरांचे । पुन्हां मागुती भार येती शरांचे । बळें भीडती बाण बाणांस कैसे । पडों लागती छेदिलें सर्प जैर्स ॥६६॥
शरीं राक्षसें व्योम संपूर्ण केलें । विरें लक्ष्मणें शीघ्र छेदूनिं नेलें । रिपू कोपला मागुते बाण सोडी । बळें वीर सौमित्र तात्काळ तोडी ॥६७॥
पुढें वीर रामानुजें तेचि काळीं । नभीं मंडपू घातला बाणजाळीं । किती चूकले भार येतां शरांचे । देहे खोंचले एकमेकां विरांचे ॥६८॥
विरश्रीबळें दु:ख नाहीं तयांचे । नभीं पाहती देव कौतूक त्यांचें । दळें थोकळीं युद्ध होतां खणाणां । तया मस्तकू डोलवी रामराणा ॥६९॥
भला रावणी वीर हा चंडदेही । दुजा मानवी वीर सौमित्र तोही । महावीर दोघे रणाभाजिं कैसे । बळें मातले भीडती काळ जैसे ॥७०॥
पुढें शीघ्र सौमित्र तो वज्रठाणें । बळें तोडिलें शीर चंद्रार्धबाणें । रणीं पाडिला तो अतीचंडकाया । बळें लागले दैत्य मागें पळाया ॥७१॥
बहूसाल ते मृत्युपंथेंचि गेले । परी अल्प घायाळ मागें पळाले । पुरीमाजिं जाऊन लंकापतीला । भयें सांगती सर्व संहार झाला ॥७२॥
बहू झुंजतां झुंजतां भग्र झाले । रणीं सर्वही पुत्रमंत्री निमाले । नरां वानरांला जयो प्राप्त झाला । क्षयो राक्षसां शीघ्र ठाकूनि आला ॥७३॥
पुढें रावणू तो भुमीं अंग घाली । तया ऐकतां मूर्च्छना शीघ्र आली । शरीरीं नसे शुद्धि सर्वै उडाली । बहू दैन्यवाणी दशा प्राप्त जाली ॥७४॥
करी रावनू शोक शंकारहीतू । सभामंडपीं धांवला इंद्रजीतू । पिता शीघ्र आलिंगिला मेघनादें । म्हणे काय जी शीणतां व्यर्थ खेदें ॥७५॥
बहूतांपरी तो पिता शीकवीला । म्हणे शीघ्र मारूनि येतों रिपूला । तेणें रावणू शोक सांडूनि ठेला ।बहूसाल सन्मानिलें त्या सुताला ॥७६॥
बहू दीस होती गळां रत्नमाळा । तमे पाहतां मोल थोडें भुगोळा । करीं घेतली माळिका आवडीनें । सुताच्या गळां घातली रावणानें ॥७७॥
रणा चालिला वीर संग्रामसैरा । दळेंशीं बळें लोटला भार सैरा । रथां घोडिमां कुंजरां मीति नाहीं । बहूसाल वाद्यें पुढें एक घाई ॥७८॥
महा वैभवेंशीं रणामाजिं आला । तया इंद्रजीतें रणीं होम केला । यथायोग्य पूर्णाहुतीचेनि तोषें । रथू दीधला अग्रिवर्णू हुताशें ॥७९॥
रथू तोमरू खड्‍गबाणीं विराजे । वरी रावणी तो महावीर साजे । उडाला रथेंशीं बळें अंतराळें । असंभाव्य सोडी तळीं बाणजाळें ॥८०॥
बळें सूटला बाण त्या राक्षसांचे । बहू खोंचले भार गोळांगुळांचे । फुटों लागले कोथळे पादपाणी । भयें बोलती वानरें दैन्यवाणीं ॥८१॥
कितीएक ते वीर भेणें पळाले । पुढें जातजातांचि चौरंग केले । कितीएक धाकें विरां आड जाती । अकस्मात तेथेंचि ते भेदिजेती ॥८२॥
कपीवाहिनीमाजिं आकांत जाला । रणीं तो विरें वीर सर्वै निमाला । सुमित्रासुतू बोलिला राघवाला । बहू आट जाला रिसां वानरांला ॥८३॥
पुढें बोलतां बोलतां तेचि काळीं । अकस्मात ते भेदिले बाणजाळीं । निचेष्टीत भूमीं धनुष्यें गळालीं । विरें इंद्रजीतें रणीं ख्याति केली ॥८४॥
बळी रावणी एकला वीर जेठी । कपी पाडिले लक्ष कोटयानुकोटी । महावीर ते धीर मेरूबळाचे । प्रतापें सुरांहूनि ते विक्रमाचे ॥८५॥
रिसां वानरां सर्व संहार केला । पुरीमाजिं तो येश घुऊनि गेला । नमस्कार केला तया रावणाला । दळेंशीं बळें रामशत्रू निमाला ॥८६॥
रणीं सर्वही पाडिलें प्रेतराशी । बहूसाल आनंद त्या रावणाशी । महा सूख लंकापुरीमाजिं ऐसें । पुढें वर्तलें वानरांमाजिं कैसें ॥८७॥
कपी रीस ते पर्वतातुल्य कैसे । निमाले रणीं पाडिले वृक्ष जैसे । तयांमाजिं कल्याण दोघांजणाला । कपी मारुती आणि बीभीषणाला ॥८८॥
रणू माजलें सर्वही प्रेतरूपी । तयामाजिं ते दोघे उद्विग्ररूपी । विचारूनियां वन्हिशीखाउजेडें । रणा शोधिलें सर्व तींही निवाडें ॥८९॥
रणा शोधितां सर्व सेनेसि अंत । तयामाजिं तों बोलिला जांबुवंत । पुढें वीर ते शीघ्र धांवोनि आले । तयां पाहतां बाण अंगीं बुडाले ॥९०॥
बहूसाल तो रीस घायाळ जाला । बळीं बाणजाळीं रणीं आकळीला । महावीर बीभीषणें उठवीला । बळें बाण ओढूनियां स्वस्थ केला ॥९१॥
पुढें ऋक्ष बीभीषणालगिं पूसे । महावीर ते मुख्य आहेत कैसे । म्हणे जांबुवंतासि नैरृत्यनाथू । विरा पूससी काय जाला अनर्थू ॥९२॥
महावीर दोघे निचेष्टीत जाले । कपी सुग्रिवादी सर्वै निमाले । रणामाजिं ते शोधिली सर्व सेना । समस्तांमधें एक तोही दिसेना ॥९३॥
प्रसंगीं निरूपी यथातथ्य मातू । मनामाजिं तो जांबुवंतू निवांतू । म्हणे वीर बीभीषणू जांबुवंता । समस्तांसि कल्याण तें सांग आतां ॥९४॥
महणे ऋक्ष तो मारुतीवीण कांहीं । विरां ऊठवाया दुजा प्रेत्न नाहीं । क्षिराब्धीतटीं योजनें चारि कोटी । गिरी द्रोण आणील हा वीर जेठी ॥९५॥
महा रम्य द्रोणाचळू भव्यरूपी । तया मस्तकीं औषधी दिव्यरूपी । बळें आणितां ऊठती सर्व सेना । कपी मारुतीवीण दूजा दिसेना ॥९६॥
म्हणे जांबुवंतासि नैरृत्यनाथू । असंभाव्य तूं सांगशीं दूर पंथू । गमे प्रेत्न हा सर्वथाहा घडेना । गिरी मारुतीचेनिही आणवेना ॥९७॥
म्हणे गा विरा काय तूं बोलिलासी । कपीसारखा मारुती भावितोसी । परी जाण हा ईश्वरू साक्षरूपी । कळेना जना रुद्र पूर्णप्रतापी ॥९८॥
बहू स्तूति केली तया मारुताची । तयें तोषली वृत्ति बीभीषणाची । म्हणे गा विरा संकटीं धांव घाली । बळें ऊठवीं सर्व सेना निमाली ॥९९॥
कपी मारुती उत्तरें सिद्ध जाला । मनीं चिंतिलें रामपादांबुजाला । महावीद आणील द्रोणाचळातें । पुढें वीनवी दास तो श्रोतयांतें ॥१००॥


युद्धकान्ड – प्रसंग पांचवा

उभा राहिला वीर मंदार जैसा । मनाहूनि पूढें बळें वेग तैसा । रुपें कर्कशू पाहतां पाहवेना । बहूसाल उंचाट त्या राहवेना ॥१॥
अकस्मात तो व्योमपंथें उडाला । मही झोंकली पन्नगा भार जाला । बहू झोंकिलें कूर्म वाराह दंती । झडा चांचरें ते धरा सांवरीती ॥२॥
स्फुरद्रूप सर्वांग वाजे झडाडां । उडाले नभीं वृक्ष वातें फडाडां । असंभाव्य पिंजारिलें पुच्छ मागें । नभोमंडळीं जातसे लागवेगें ॥३॥
बहू लंघिली पोक ळा वेग केला । द्विपें पांचही शीघ्र टाकूनि गेला । उडाला बळें पांच सिंधू अगाधू । पुढें देखिला साहवा क्षीरसिंधूं ॥४॥
तयाच्या तिरीं उंच आकाशपंथें । विरें देखिलें रम्य द्रोणाचळातें । तया मस्तकीं दिव्य वल्ली अपारा । प्रभा फांकली तेजकल्लोळ सैरा ॥५॥
पुढें देखतां मारुता सांवरेना । धरीतां बळें तेज हाता चढेना । महा औषधी दिव्य शैल्या निशैल्या । कपी देखतां सर्वही गुप्त जाल्या ॥६॥
तया पर्वताची बहू स्तूचि केली । परी नायकें सर्वही व्यर्थ गेली । बहूसाल त्या आचळें गर्व केला । पुढें मारुता कोप तात्काळ आला ॥७॥
महा थोर धिक्कार केला तयासी । बळें शीघ्र उत्पाटिलें पर्वतासी । गिरी घेतला पुच्छ वेष्टीत माथां । कपीराज तो चालिला व्योमपंथा ॥८॥
रणीं जाहला सर्व संहार जेथें । महावीर आला अकस्मात तेथें । निशा दाटली अंधकारें दिसेना । गिरी ठेवितां देखिली सर्व जेना ॥९॥
पिता पावला तो बळें मारुतीचा । रणीं वास नेला तया औषधींचा । सुगंधेंचि ते वीर आरोग्य जाले । कपी सर्वही मृत्यु मारूनि ठेले ॥१०॥
दळेंशीं बळें ऊठला रामराजा । स्फुराणें रणीं गर्जती वीरफौजा । पुढें मारुतें घेतलें पर्वताला । क्षिराब्धीतटीं शीघ्र ठेवूनि आला ॥११॥
तुलेना गती शक्ति माहा विराची । कळेना करी कोण संख्या बळाची । दिसे पाहतां वानरू वेषधारी । परी जाणिजे सत्य हा त्रीपुरारी ॥१२॥
निशींच्या पदें चारि कोटी उडाला । गिरी दों पदीं शीघ्र घेऊनि आला । पुन्हां मागुती तीपदामाजिं नेला । प्रभातेचि चौथे पदीं प्राप्त जाला ॥१३॥
सहस्रक गांवें गिरी स्थूळ मोठा । असंभाव्य या मारुतीचा चपेटा । उडाला नभीं योजनें कोटि सोळा । नसे शोधिताम दूसरा या भुगोळा ॥१४॥
बहू पंथ चाले रवी भार नाना । बहू भार वाहे फणी तो उडेना । गुरूडासि तो आचळू हालवेना। दुजी साम्यता ब्रह्मगोळीं दिसेना ॥१५॥
पुढें मारुती भव्य आनंदरूपी । नभोमंडळीं भानु जैसा प्रतापी । महावीर तैसा दळामाजिं आला । समस्तांसि देखोनि आनंद जाला ॥१६॥
सखा तो जिवाचा असे दूरि देशीं । सदा लागलें चित्त हें त्याजपाशीं । पुढें पाहतां तो अकस्मात आला । तयासारिखें जाहलें मारुताला ॥१७॥
कपीनें कसें पाहिलें राघवासी । पुढें देखिलें लेभियानें धनासी । तया बाळकें देखिलें जननीला । तयासारिखें जाहलें मारुताला ॥१८॥
नमस्कारिलें त्या रघूनायकासी । उभा राहिला हात जोडोनि पाशीं । म्हणे धन्य गा धन्य वीरा उदारा । कपी काय द्यावें तुझ्या ऊपकारा ॥१९॥
अगा मारुती तूझिया ऊपकारें । जिवा ऋण जालें बहूसाल भार । सदा सर्वदा आमुची थोर चिंता । समस्तांसि तूं एकला प्राणदाता ॥२०॥
म्हणे मारुती सर्व स्वामीप्रतापें । प्रभू काय कीजेल म्यां दीनरूपें । समर्था तुझेनी कृपेवीण कांहीं । स्वत: अल्पही कार्य होणार नाही ॥२१॥
बहूतांपरी मारुतें स्तूति केली । मनोवृत्ति ते राघवाची निवाली । पुढें राघवें रुद्रे संतुष्ट केला । बहूतांपरी आदरें गौरवीला ॥२२॥
प्रसंगें कपीनाथ सुग्रीव बोले । म्हणे मारुती प्राण त्वां रक्षियेले । कुळामाजिं जालसि पूर्ण प्रतापी । कपींचीं कुळें सर्वही श्र्लाघ्यरूपी ॥२३॥
कपी सर्वही बाणजाळें निमाले । तुझीया प्रतापें पुन्हां जन्म जाले । प्रसंगें सखा राघवें निर्मिलासी । कपींकारणें तूं बहू कष्टलासी ॥२४॥
तया बोलतां मारुता सूख जालें । पुन्हां मारुतेंही बहू तोषवीलें । असो हे बहूसाल पाल्हाळगोवी । कथा राहिली ते पुढें चालवावी ॥२५॥
कपीनाथ बोले रघुनायकासी । न ये रावणू चंडदु:खे रणासी । तरी शीघ्र लंकापुरी जाळवावी । समर्थें कपीलगिं आज्ञा करावी ॥२६॥
पुढें बोलिजे सुग्रिवालगिं देवें । तुम्हीं कल्पिलें कार्य सिद्धीस न्यावें । कपी रामआज्ञेस घेऊनि वेगीं । विरांलगिं आज्ञा करी ते प्रसंगीं ॥२७॥
तुम्हीं लागवेगें चुडया पाजळीजे । बळें शीघ्र लंकापुरी दग्ध कीजे । करीं घेतले उंच बांधूनि भारे । कपी धांवती एकमेकां पुढारे ॥२८॥
चुडया पावकें सर्वही दीप्त केल्या । अकस्मात लंकापुरीमाजिं नेल्या । बळाचे कपी धांवती लक्ष कोटी । चुडया खेळती थोर आनंद पोटीं ॥२९॥
शिखा लागतां शीघ्र जाले उमाळे । निळे पींवळे श्वेत आरक्त काळे । बळू लागला चंड वारा भरारां । पुरीमाजिं तो वन्हि धांवे सरारां ॥३०॥
गृहागोपुरा जाहला एक वेळा । असंभाव्य हेलावती तीव्र ज्वाळा दिशा दाटल्या धूत्र आकाशपंथें । पिडा जाहली खेचरां भूचरांतें ॥३१॥
मळें धूविलीं तीं तया रावणानें । सळें ऊसणें घेतलें पावकानें । बळें लागतां थोर कोपें कडाडी । बळें माजला वन्हि पोटीं धडाडी ॥३२॥
बळें क्रोध आला तया पावकाला । वरी वात वेगीं बळें साह्य जाला । सिखा चालिल्या अंतराळीं धडाडां । जळों लागली दिव्य लंका भडाडां ॥३३॥
अपारें घरें गोपुरें रम्य सारें । बहूसाल दामोदरें थोरथोरें । पडों लागलीं दग्ध होतां धबाबां । महा राक्षसी तोंड घेती खबाबां ॥३४॥
ध्वनी राक्षसांची असंभाव्य जाली । मुखें बोलती आगि रे आगि आली । किती एक राक्षेस धांवूनि आले । अकस्मात ते वीर सर्वै मिळाले ॥३५॥
बळें धांवली ते असंभाव्य सेना । पुढें जावया लाग कोठें दिसेना । शिखा धांवती वन्हिच्या पाठिमागें । पळाळे बळी प्राण घेऊनि वेगें ॥३६॥
बळें सूटलीं वैभवें राक्षसांचीं । बहू दाटलीं वाट प्रेतें विरांचीं । कितीएक ते धीट नेटें जळाले । कितीएक ते वीर मागें पळाले ॥३७॥
त्रिकूटाचळीं थोर आकांत जाला । असंभाव्य राक्षेस कीती निमाला । स्रिया बाळकें जेथ जेथें पळालीं । शिखा लागतां तेथ तेथें जळाळीं ॥३८॥
पळायासि मागें पुढें रीघ नाहीं । जळाले पुरीमाजिं ते सर्व कांहीं । बहू कुंजरें शाकटें अश्र्व नाना । निमाले रथी सारथी सर्व सेना ॥३९॥
सहस्रें दहा भूवनें रावणाचीं । जळालीं बहू संपदा वैभवाची । सुवस्ता अळंकार दिव्यांबरांचीं । सुगंधेल आज्यादि नाना  रसांचीं ॥४०॥
गुरें वांसरें जाळिलीं पावकानें । बहू हाट बाजार केणीदुकानें । बहूतांजणांचें बहू बित्त गेलें । त्रिकूटाचळा पावकें शुद्ध केलें ॥४१॥
बहू वेवसायी भले मोठमोठे । भुसारी जरी जोहरी आणि चाटे । जळालें बहू वित्त हाणोनि घेती । धरेना कदा सांवरेना रुदंती ॥४२॥
सभामंडपीं राक्षसीं हांक नेली । म्हणे पाहतां काय लंका जळाली । दहा योजनें तीसरा भाग जो कां । बळें जाळिली वानरीं सर्व लंका ॥४३॥
तया रावणा वाटली सर्व चिंता । म्हणे पा।ठवावें रणीं कोण आतां । न दीसे मुखीं मंदली सर्व शोभा । पुढें बोलिला शीघ्र कुंभा निकुंभा ॥४४॥
म्हणे वानरीं जाळिली सर्व लंका । तयांशीं करा युद्ध टाकूनि शंका । तयां सांगतां सर्व ऊदीत जाले । महावीर ते सात युद्धा निघाले ॥४५॥
बळी कुंभ नीकुंभ जंघ प्रजंघे । दळें सिद्ध केलीं बळें लागवेगें । महावीर झुंजार तो वीरुपाक्षू । दळीं चालिला क्रोधून शोणिताक्षू ॥४६॥
बळी सातही ते रथारूढ जाले । महावीर राक्षेस सर्वै मिळाले । बळें चालिलीं राक्षसांचीं अपारें । भुमी शेष सांडूं म्हणे थोर भारें॥४७॥
बहू दग्ध लंकापुरी होय जेथें । बळें चालिले भार तेणेंचि पंथें । निमिष्यांत कुंभें विरें तेचि काळीं । महा मेघ तो पाडिला बाणजाळीं ॥४८॥
बळें मातला वन्हि तो वीझवीला । त्रिकूटाचळीं लोक आनंदवीला । विझाली पुरी शीघ्र तेणेंचि मार्गें । निघाली पुढें वाहिनी लागवेगें ॥४९॥
रणामंडळा पारखे वीर आले । कपी द्रूमपाणी बळें सिद्ध जाले । समस्तांपुढें अंगदू वीर रागें । रणीं लोटला क्रोधनू लागवेगें ॥५०॥
बळें फोडिली हांक कल्पात जैसी । रणीं मांडलें युद्ध दोघांजणांशीं । विरें विंधिलें वानरांलगिं बाणीं । कपी कोपला अंगदू शैलपाणी ॥५१॥
गिरी टाकितां क्रोधनू गुप्त जाला । महा पर्वताचे तळीं तो निमाला । तया साव्हया शोणिताक्षू निघाला । तयें अंगदू भेदिला भग्र केला ॥५२॥
रणीं वीर लक्षूनियां बाण घाली । बळें गेलिया अंग भेदूनि भालीं । उणें देखतां शीघ्र मैंदें द्विवीदें । तरू घेतला हांक देऊनि क्रोधें ॥५३॥
कपीवर धांवोनि युद्धासि आला । रणीं अंगदालगिं तो साह्य जाला । तईं शीघ्र येरीकडे लागवेगें । बळें धांवले ते विरश्रीत रागें ॥५४॥
प्रजंघें युपाक्षें तया शोणिताक्षा । दिल्हें पूट धांवोनि घेऊनि पक्षा । त्रिवर्गा त्रिवर्गीं रणीं युद्ध जालें । शरीं राक्षसीम व्योम संपूर्ण केलें ॥५५॥
शिळा शीखरें वृक्ष पाषाणघातें । कपीवीर ते हाणिती राक्षसातें । समांरगणीं दूर टाकोनि शंका । बळी नीकुरें भेदिती एकमेकां ॥५६॥
तंई अंगदें थोर अद्‍भूत केलें । बळें वाड झुंबाड ते उन्मुळीलें । प्रजंघासि हाकूनि क्रोधें बहूतें । रणीं झोडिला पाडिला वृक्षघातें ॥५७॥
पुढें देखिलें त्या युपाक्षासि मैंदे । बळें गर्जला तो कपी घोर नादें । रणीं झुंजतां थोर आवेश मैंदा । शिळा टाकितां जाहला चूर्ण चेंदा ॥५८॥
द्बिवीदें किरें पाडिला शोणिताक्षू । उणा देखिला सर्व नैऋत्यपक्षू । तिघां राक्षसां थोर संहार जाला । रणमाजिं युद्धासि तो कुंभ आला ॥५९॥
पिता कुंभकर्ण महावीर जैसा । तयासारिखा लोटला कुंभ तैसा । उभा रे उभा तूं रणामाजिं मैंदा । अरें अंगदा जासि कोठें द्बिवीदा ॥६०॥
बहू विक्रमें पाडिलें राक्षसांशीं । रणीं ऊसनें शीघ्र घेतों तुम्हांशीं । क्षणीं तेंचि कोदंड घेऊनि हातीं । कपी मैंद तो भेदिला बाणघातीं ॥६१॥
नवां बाणघातीं कपी भग्र केला । रणामाजिं तो प्रेत होऊनि ठेला । द्बिवीदासि दाही शरीं तेचि काळीं । विरें राक्षसें पाडिलें बाणजाळीं ॥६२॥
पुढें पाहतां देखिलें अंगदाला । कपीवीर तो वृक्ष घेऊनि आला । बळें हाणितां खीळिले हस्त बाणीं । चळेना कपीवीर तो वज्रठाणीं ॥६३॥
उभा राहिला बाण झेलीत कैसा । कुठारातळीं छेदिजे वृक्ष जैसा । तया अंगदा शीघ्र प्राणांत आलें । रघूनायका वानरीं जाणवीलें ॥६४॥
मुखें बोलती अंगदू वीर गेला । कपीनाथ सुग्रीव तैसा उडाला । रथारूढ होऊनि कोदंड हातें । बळें मोडिलें तोडिलें वृक्षघातें ॥६५॥
रणीं कुंभ तो मल्लयुद्धासि आला । बळें तोडिता जाहला सुग्रिवाला । तया सुग्रिवें दीधली वज्रमुष्टी । रणीं पाडिला कुंभ तो प्रेतसृष्टी ॥६६॥
महावीर तो धाडिला मृत्युपंथें । निकुंभें रणीं हाकिलें सुग्रिवातें । कपीनाथ सुग्रीव घालूनि मागेम । पुढें धांवला मारुती लागवेगें ॥६७॥
तया राक्षसेम भेदिलें मारुताला । कपीवीर किंचीत मूर्छीत जाला । पुढें ऊठला तो कपी काळ जैसा । मनामाजिं आवेश अद्‍भूत तैसा ॥६८॥
महापर्वतू घेतला मारुतानें । निकुंभावरी टाकिला थोर त्राणें । गिरी टाकितां शांति जाली तयाची । फळी फूटली सर्वही राक्षसांची ॥६९॥
त्रिकूटाचळामाजिं घायाळ गेले । रिपू प्राण घेऊनि तैसे पळाले । भयातूर ते सांगती रावणाला । बळी तो विरें वीर सर्वे निमाला ॥७०॥
बहू दु:ख जालें तया रावणाशीं । पुढें धाडिलें शीघ्र तीघां सुतांशीं । विशालाक्ष मक्राक्ष आणी खरातें । रणा पाठवीलें तिघां कूमरातें ॥७१॥
तिघेही दळेंशी बळें सिद्ध जाले । असंभाव्य ते भार मागें मिळाले । महा विक्रमें झेलिती वीर खर्गें । समारंगणीं पावले लागवेगें ॥७२॥
बडंगें लोहो मूसळें शूळपाणी । कटार्‍या सुर्‍या तोमरें चापपाणी । बहू खेटकें भुद्रलें आणि भाले । महावीर राक्षेस युद्धा निघाले ॥७३॥
कपीवाहिनीचा असंभाव्य थावा । प्रतापें बळें शीघ्र केला उठावा । शिळा शीखरें हाणिती राखसांतें । रिपू मारिती वानरां बाणघातें ॥७४॥
महायुद्ध आरंभिलें एकमेकां । तयां भीडतां तो धरी काळ शंका । रणीं राक्षसां पाडिलें घोर मारें । कपीवीर ते गर्जती भूभुकारें ॥७५॥
रणामाजिं मक्राक्ष तो शीघ्र कोपे । पुढें चालिला चापपाणी प्रतापें । स्वयें आपुलें सैन्य घालूनि मागें । कपी भेदिता जाहला लागवेगें ॥७६॥
बळें सोडिलीं राक्षसें बाणजाळें । तुटों लागती वानरांचीं शिसाळें । थटाटां रणीं तूटती पादपाणी । शरीरें बहूसाल विक्राळवाणी ॥७७॥
देहे खोंचलें थोर माहा विरांचे । झरे लागले वाहती शोणिताचे । रिपू झुंजतां राक्षसें भग्र केले । कितीएक ते भार मागें पळाले ॥७८॥
बळें धांवती बाण ते लागवेगें । पळाले बळाचे कपी सर्व मागें । कपींचीं दळें भंगिलीं राक्षसानें । तया मस्तकू तूकिला राघवानें ॥७९॥
रणीं मांडिला थोर कल्पांत सृष्टी । बहूतां विरीं दीधली त्यासि पृष्ठी । रणामाजिं कोणासही राहवेना । करी घोर संधान तें साहवेना ॥८०॥
म्हणे राम हो कोण सामर्थ्य याचें । रणीं भंगिलें सैन्य गोळांगुळांचें । वरी अंतराळीं बहू बाणजाळें । क्षणामाजिं तें तोडिलें शीघ्र काळें ॥८१॥
उभा राहिला राम वज्रांगठाणें । गुणीं लविलें चाप चंद्रार्धबाणें । टणत्कारिलें सात बोटीं थरारी । महाचंड ब्रह्मांड घोषें गरारी ॥८२॥
बळें राक्षसें व्योम संपूर्ण केलें । रणीं राघवें शीघ्र छेदूनि नेलें । पुढें घेतला दूसरा बाण रामें । गुणीं लविला थोर शत्रू विराभें ॥८३॥
विरें मागुतें थोर संधान केलें । रिपूचें रणा शीर छेदूनि नेलें । महावीर मक्राक्ष तो बाणघातें । निमाला रणीं चालिला मृत्युपंथें ॥८४॥
पुढें राम पाचारिला त्या खरानें । विशालाक्ष ऊठावला थोर त्राणें । म्हणे राजपुत्रा बरें युद्ध केलें । रणीं विक्रमें शीर छेदूनि नेलें ॥८५॥
असे सर्वदा तो जयो प्राप्त कैंचा । करी ग्रास राहू रवीमंडळींचा । प्रतीउत्तरें बोलिला राम वाणी । बळें बूजिलें भूमिआकाश बाणीं ॥८६॥
तिहीं राक्षसीं घोर संधान केलें । विरां वाटलें थोर कल्पांत जालें । पुढें तोडिले सर्वही बाण रामें । प्रतापें रणामाजिं त्या पूर्णकामें ॥८७॥
प्रतापें रणीं राघवें बाणघातें । रिपू दोघेहि धाडिले मृत्युपंथें । रणीं राक्षसां थोर संहार जाला । समाचार गेला तया रावणाला ॥८८॥
पुढें रावणानें बहू दु:ख केलें । नसे अंतरीं सौख्य टाकून गेलें । दशग्रीव बोले विरा इंद्रजीता । प्रतापें रणामाजिं तूं जाय आतां ॥८९॥
रिसां वानरांची असंभाव्य सेना । तुजावेगळी सर्व संहारवेना । उभा राहिला शीघ्र ऊदीत जाला । म्हणे शीघ्र संहारितों वैरियाला ॥९०॥
दळें चालिलीं राक्षसांचीं अचाटें । पुढें वानिती भाट वेताळथाटें । बळी रावणी तो रथारूढ जाला । बहूसाल वाद्यें दळेंशीं निघाला ॥९१॥
रणामाजिं येवोनियां होम केला । महा भीम कृत्या रथ प्राप्त जाला । रथारूढ होवोनि वेगीं उडाला । नभोमंडळामाजिं तो गुप्त जाला ॥९२॥
असंभाव्य तीं मोकळीं बाणजाळें । बळें धांवती प्रेरिले दूत काळें । कपींची तुटों लागलीं कंठनाळें । रणी लोटती वीर प्रेतें सुकाळे ॥९३॥
असंभाव्य सामर्थ्य त्या रावणाचें । कळेना कळा कोण कापटय याचें । कदा नेणती बापुडे देव कांहीं । रणी पाडितो वीर सन्मूख नाहीं ॥९४॥
बहू खोंचली ते असंभाव्य सेना । दिशा दाटल्या बाणजाळीं दिसेना । कपीवाहिनीमाजिं आकांत जाला । पुढें मारुतीचा पिता शीघ्र आला ॥९५॥
निरूपी अती आदरें राघवाशीं । म्हणे अंगिरी अस्र योजी त्वरेंशीं । पुढें राम तात्काळ तें अस्र घाली । तयें तूतलें शीर कृत्या निमाली ॥९६॥
पुढें रावणी भूतळामाजिं आला । रणामंडळीं मृत्यु जैसा उदेला । भयासूर तो वीर घोरप्रतापी । शरा सोडिता जाहला काळरूपी ॥९७॥
समस्तीं अकस्मात तो देखियेला । तया एक वेळा बहू भार केला । कपीवीर ऊठावले शीघ्र काळें । शिळा शीखरें टाकिती बाणजाळें ॥९८॥
रणीं रावणी एकला वीर जेठी । कपी लोटले लक्ष कोटयानुकोटी । रिसीं वानरीं थोर कल्लोळ केला । बळें ताडिते जाहले राक्षसांला ॥९९॥
बळें फेंकिला शूळ त्या मारुतानें । गदा घेतली शीघ्र बीभीषणानें । परीघासि घेऊनियां शीघ्र धांवे । कुमूद करीं वेग नेटें उठावे ॥१००॥
कपीऋषभा थोर आवेश आला । शतघ्नीस घेऊनि सन्मूख जाला । द्विवीदें बळें सोडिलें चक्र कैसें । महा पर्वतीं चालिलें वज्र जैसें ॥१०१॥
सुगंधें विरें ताडिला शस्रघातें । गिरीशृंग तो टाकिला जांबुवंतें । शिळा टाकिली चंद त्या अंगदानें । महा खड्‍ग तें मोकलीलें नळानें ॥१०२॥
बहू गा निळें झोंकिला तो विशाळू । कपी सुग्रिवें टाकिला चंड शैलू । सुमित्रासुतें राघवें तेचि काळीं । रिपू रावणी विंधिला बाणजाळीं ॥१०३॥
बहूतांमधीं एकला इंद्रजीतू । रणीं वेढिला काळ जैसा कृतांतू । बळें वानरांचा बहू मार जाला । रिपू राक्षसें अंतरीं तुच्छ केला ॥१०४॥
बहुतां जणांचा बहू एक मेळा । निमिष्यांत तोडूनि नेला स्वलीला । पुढें राक्षसें घोर संधान केलें । विरें विक्रमें सर्व सामर्थ्य नेलें ॥१०५॥
रिपूचीं दळें पाडिलीं इंद्रजीतें । रणामाजिं जालीं असंभाव्य प्रेतें । रिसें वानरें राम सौमित्र बाणीं । बळें भेदुनी चालिला चापपाणी ॥१०६॥
पुढें सज्जनीं चित्त द्यावें कथेला । समाचार सांगेल हा रावणाला । ऐकतां वैर नासे । म्हणे दास निर्वैर सूखें विलासे ॥१०७॥


युद्धकान्ड – प्रसंग सहावा

सभे बैसला राव त्रीकूटवासी । पुढें भेटला इंद्रजीतू तयांसी । नमस्कार केला तया रावणाला । म्हणे शत्रुचा सर्व संहार केला ॥१॥
बहू लंकवासी रणीं भग्र केले । कितीएक ते मृत्युपंथेंचि गेले । बळें ऊसणें हो तयांचें । प्रभू शोधिले मुख्य त्या वैरियांचे ॥२॥
तया रावणा थोर संतोष जाला । बळें अमृताचे नदी पूर आला । अकस्मात संताप सर्वै उडाला । पुढें बोलता जाहला कूमराला ॥३॥
म्हणे इंद्रजीता विरा बैस आतां । सुपुत्रा तुवां तोडिली सर्व चिंता । बळी चक्रचूडामणी वीर राजा । असाव्या तुझ्या वज्र कल्याण भूजा ॥४॥
अगा इंद्रजीता सखे गोत्र बंधू । प्रतापें बळें आगळे वीर सिंधू । निमाले रणीं । वैरियांचेनि हातें । बहूसाल वाटे मनीं दु:ख मातें ॥५॥
त्रिकूटाचळीं वानरीं लाग केला । मुळारंभ राक्षेस कीती निमाला । पुढें थोर संग्राम दारूण जाला । विरू राक्षसू सर्वही तो बुडाला ॥६॥
तयाऊपरी वीर धूम्राक्ष जेठी । तयें जिंकिले देव तेतीस कोटी । समारंगणीं त्या विरा अंत आला । रणामंडळीं देह त्यागून गेला ॥७॥
रणीं वज्रदंष्ट्री दिसे काळरूपी । गिरीसारिखा अंकपन्न प्रतापी । महावीर ते दोघे युद्धासि गेले । समारंगणीं युद्ध होतां निमाले ॥८॥
बळी दक्ष वित्पन्न चातर्य जाणे । तया देखतां अंतरा सूख बाणे । प्रसंगेंचि तो वीर युद्धासि गेला । प्रहस्तू रणीं युद्ध होतां निमाला ॥९॥
तयाचा बहू क्रोध आम्हांसि आला । रिपू राम जिंकावया वेग केला । तयाचें महा युद्ध तें काय बोलों । समारंगणीं भ्रष्टलों भग्र जालों ॥१०॥
तयाऊपरी धीर आम्हां धरेना । पुढें ऊठवीलें बळें कुंभकर्णा । तयासारिखा कोण आहे बळाचा । समारंगणीं धीर काळासि कैंचा ॥११॥
महावीर तो घोर युद्धासि गेला । रिसां वानरां थोर संहार केला । रिपूनें तया शेवटीं बाणघातें । समारंगणीं धाडिला मृत्युपंथें ॥१२॥
प्रतापी सखा बंधु माझा निमाला । बळें आगळा थोर आधार गेला । मला पूसिल्यावीण गंतव्य केलें । नये बोलतां दु:ख ब्रह्मांड जालें ॥१३॥
तयाऊपरी चौघेही सूत माझे । अगा इंद्रजीता सखे बंधु तूझे । तयांच्या प्रतापानळें सूख लोटे । समारंगणीं भीडतां काळ वीटे ॥१४॥
नरा अंतकाला नरा अंतकानें । बळें पीटिलें देवदेवांतकानें । तळीं घातले सर्व त्या त्रीशिरानें । रणीं वानरीं घेतले सर्व प्राणें ॥१५॥
अतीकाय तो वीर मेरू बळाचा । प्रतापें बळें आगळा विक्रमाचा । रथारूढ होऊनि युद्धासि गेला । तयाचा सुमित्रासुतें घात केला ॥१६॥
निमाले सखे दु:ख ऊदंड जालें । पुढें पाहतां वीर सामर्थ्य गेलें । महावीर ते मृत्युपंथेंचि जाती । नरें वानरें बापुडीं येश घेती ॥१७॥
निमाले सखे सूत बंधू बळाचे । प्रतापें सुरांहूनि ते विक्रमाचे । रणामंडळीं सर्व सेना निमाली । बहूसाल संहारिली कूळवल्ली ॥१८॥
अगा इंद्रजीता तुवां सूख द्यावें । प्रतापें रणीं सर्व शत्रू वधावे । मला सांगसी लविले मृत्युपंथीं । परी मागुती ते रिपु गर्जताती ॥१९॥
रिपू ऊठती मागुती हें न व्हावें । बळें सर्व निर्मूळ त्यांचें करावें । प्रतापें रणीं सर्व पाहून येसी । परी मागुता जीव येतो तयांशीं ॥२०॥
बहू वेळ तां युद्धसामर्थ्य केलें । परी पाहतां सर्वही व्यर्थ गेले । प्रतापे रणीं पाडिले बाणघातीं । सभारंगणी मागुते सिद्ध होती ॥२१॥
महीमंडळीं नाम त्यांचें नसावें । विरा विक्रमें त्वां मला सौख्य द्यावें । पिता बोलतां धीर पोटीं धरेना । असंभाव्य कोपानळू सांवरेना ॥२२॥
उभा राहिला वाक्य बोले पित्याशीं । म्हणे शीघ्र संहारितो वैरियांशीं । समारंगणाभाजिं ऐसें न होतां । तरी जाणिजे भेटि ते हेचि आतां ॥२३॥
बहु कोपला चालिला वीर जेठी । प्रतापें म्हणे सर्व जाळीन सृष्टी । पुढें बापुडीं वानरें दैन्यवाणीं । खिळी तो बळें सर्व ब्रह्मांड बाणीं ॥२४॥
पित्याकारणें वीरभद्रू निघाला । तयां दैत्यजांला धरूं सिद्ध झाला । तयाचेपरी कोपला काळरूपी । बळें चालिला शक्रशत्रू प्रतापी ॥२५॥
तुरे वाजती नाद गेला भुगोळा । दळेंशीं बळें पावळा होमशाळा । तया राक्षसें मागुती होम केला । महावीर मेघासनीं गुप्त झाला ॥२६॥
बळें पूजिलें सर्व आकाश बाणीं । पडों लागलीं वानरें दैन्यवाणीं । कपीवाहिनीमाजिं आकांत जाला । पुन्हां मागुतां थोर कल्पांत आला ॥२७॥
वरी पाहतां युद्धकर्ता दिसेना । धडाडां पडों लागली सर्व सेना । महावीर ते घोर मागें पळाले । पळाले कपी राघवा आड गेले ॥२८॥
म्हणे राम तो सुग्रिवा मारुता हो । नभोमंडळीं युद्धकर्ता पहा हो । प्रतापें बळें वीर सप्तै उडाले । असंभाव्य ते पोकळीमाजिं गेले ॥२९॥
महा थोर तें युद्धसामर्थ्य गेलें । तया इंद्रजीतें पुढें काय केलें । अकस्मात तो भूतळामाजिं आला । रणामंडळीं सैन्यसिंधू मिळाला ॥३०॥
खटाटोपिले ते बहू शस्रपाणी । रुपें कर्कशे काळ कर्कोटबाणीं । बळें चालिला भार वेष्टीत सेना । रजें मातला व्योम पूढें दिसेना ॥३१॥
कपीवीर राक्षेस सन्मूख जाले । समारंगणामाजिं युद्धा निघाले । पुढें राक्षसें रूप केलें सितेचें । महा रम्य लावण्य तें जानकीचें ॥३२॥
रणीं लोटल्या वीर राक्षेसफौजा । कपीभार ऊठावले स्वामिकाजा । दळीं राक्षसांचा बळीं इंद्रजीत । बळी चालिला काळ जैसा कृतांतू ॥३३॥
तयां देखतां धांवला रुद्र तैसा । करीं घेतला शैला ब्रह्मांड जैसा । बळें इंद्रजीता उजू धांव घाली । तंई इंद्रजीतें सिता दाखवीली ॥३४॥
म्हणे रे कपी हे सिता राघवाची । गुणी स्वामिणी हे तुम्हां मर्कटाची । महापापिणी सर्पिणी दु:खदाती । त्रिकूटाचळीं राक्षसीकूळहंती ॥३५॥
अशोकावनामाजिं हे शोकवल्ली । अकस्मात कोठून निर्माण झाली । तया दीवसापासुनी दु:ख झालें । त्रिकूटाचळा थोर दारिद्य आलें ॥३६॥
बळाचें बहू वीर हे पापिणीनें । सखे आमुचे ग्रासिले सर्पिणीनें । कळी मांडली त्यास हे मूळ सीता । करीतो इचा शीघ्र संहार आतां ॥३७॥
तया राक्षसें मारिलें जानकीला । म्हणे रे कपी सांग त्या राघवाला । समारंगणीं शीर छेदूनि नेलें । तया राक्षसें शीघ्र गंतव्य केलें ॥३८॥
सिता देखतां मारुती अंग घाली । प्रसंगीं तये मूर्छना शीघ्र आली । महा शोक आरंभिला त्या कपीनें । म्हणे काय केलें जगज्जननीनें ॥३९॥
बहू दू:ख मागील तें आठवीलें । उदासीन हें चित्त दुश्चीत जालें । म्हणे काय सांगों तया राघवाला । कपी मारुती शोकसिंधूं बुडाला ॥४०॥
म्हणे रे कपाळा असें काय केलें । बहू थोर हें पाप माझें उदेलें । न सांगों तरी गोष्टी राहों नये कीं । पुढें सांगतां राघवा दु:ख हें कीं ॥४१॥
प्रवाहो बळें चालिला अश्रपातीं । विलापें करूं लागला तो रुदंती । बळें ऊठला चालतां चालवना । रघूनायका भेटला दैन्यवाणा ॥४२॥
अधोमूख पाहोनि कांहीं वदेना । दुखें दाटला कंठ त्या बोलवेना । म्हणे जानकीसारखी शस्रघातें । रणीं मारिली राक्षसें इंद्रजीतें ॥४३॥
तयें सांगतां मांडिला शोक रामें । मिळालीं दळें दैन्यवाणीं विरामें । कपीवाहिनीमाजिं आकांत जाला । सुमित्रासुतें राम तो शांत केला ॥४४॥
भविष्योत्तरें वाल्मिकी सत्य व्हावीं । देहें सोंगसंपादणी कां करावी । म्हणूनी रघूनायकें शोक केला । तदा वीर बीभीषणू शीघ्र आला ॥४५॥
म्हणे जी प्रभू शोक वायां करीतां । असे सत्य नेमस्त कल्याण सीता । अशोकावना दूत म्यां पाठवीले । प्रसंगीं समाचार घेऊनि आले ॥४६॥
तया इंद्रजीतें रणीं भाव केली । नव्हे सत्य हें मिथ्य होऊनि गेली । पुरीं होम आरंभिला मेघनादें । पुरा जालिया कोण घेईल द्बंद्वें ॥४७॥
तया इंद्रजीतासि आधीं वधावें । वृक्षा शोक सांडूनियां सिद्ध व्हावें । पुरा होम हो जालिया आवरेना । समारंगणीं मारितांही मरेना ॥४८॥
प्रभू जाहलीं अश्रिणी व्योमपंथें । वधावा सुमित्रासुताचेनि हात । तयें सांगतां सर्व आनंद जाला । बहुतांपरी राघवें गौरवीला ॥४९॥
पुढें राघवाची बहू स्तूति केली । विरांची असंभाव्य भांदी मिळाली । सभामंडळीं । ते कपी रीसराजे । तयां मध्यभागीं महावीर साजे ॥५०॥
समस्तांसि सोडीलसिम इंद्र भावी । समर्था तया ऊपमा काय द्यावी । असा राम हा देव ब्रह्मादिकांचा । सुमित्रासुताची वदे रम्य वाचा ॥५१॥
म्हणे होम आरंभिला इंद्रजीतें । मुखें बोलिलें सत्य नैरृत्यनाथें । पुरा होम होतां कदा आवरेना । समारंगणीं मारितांही मरेना ॥५२॥
प्रतापें समारंगणीं त्या वधावें । बलें आजि ब्रह्मादिकां सौख्य द्यावें । पुढें ऊठिला शीघ्र सौमित्र कैसा । नभोमंडळीं तीव्र आदित्य जैसा ॥५३॥
जया देखतां काळ कांपे थरारां । सवें दीधलें राघवें पंचवीरां । हनूमंत बीभीषणू जांबुवंतू । सुगंधू कपी ऋषभू वीर्यवंतू ॥५४॥
महावीर ते पांचही सिद्ध जाले । कपी रीस आणीक कीती निघाले । सुमित्रासुतालगिं राजाधिराजें । मुखें बोललीं शक्तिसामर्थ्यबीजें ॥५५॥
वरू दीधला स्वामि देवाधिदेवें । म्हणे शत्रु जिंकोनियां शीघ्र यावें । करू मस्तकीं ठेविला रामचंद्रें । नमस्कार तैसाचि केला फणींद्रें ॥५६॥
समस्तीं विरींही नमस्कार केले । पुढें सव्य घालूनि तैसे निघाले । अती आदरें स्कंघभागीं विरानें । सुमित्रासुता घेतलें मारुतीनें ॥५७॥
निघाले महावीर ते लागवेगें । पिता हिंपुटी मारुती मागमागें । पुढें चालतां पंथ नीकुंबळेचा । विरां थोर आवेश काळासि कैंचा ॥५८॥
महा घोर तो लंघिला मार्ग तीहीं । पुढें पाहतां पाहतां वाट नाहीं । तरूंचीं वनें लागलीं  तीं वितंडे । प्रचंडें उदंडें बहु झाडखंडें ॥५९॥
भुमीं दाटले वृक्ष वृक्षां मिळाले । तयां अंतरीं वंश मिश्रीत झाले । वरी पाहतां वाड आकाशंपथें । पुढें रीघ नाहीं तया वारियातें ॥६०॥
समें वीषमें झाडखंडें अचाटें । मिळालीं बळें वाजती कर्कराटें । कडे तूटले थोर त्या पर्वताचे । झरे वाहती झाडखंडीं विषाचे ॥६१॥
तया अंतरीं सिंह शार्दूल कैसे । मदें मातले गर्जती काळ जैसे । गजांचीं बहू दाट थाटें विशेषेम । पळों लागती थोर किंकाटघोषें ॥६२॥
बहू संकटें धांवतीं रानह्मैसे । रिस कर्कशें देखतां जीव त्रासे । बहू  सांबरें चीतळें रानगाई । शुनी सूकरां मर्कटां मीति नाहीं ॥६३॥
बहु श्र्वापदें घोर नानापरींचीं । बहू गर्जताती बहूतां स्वरांचीं । भुतें खेचरें शक्ति वेताळ पीसे । बहू धांवती वन्हिचे ज्वाळ जैसे ॥६४॥
बहू व्याळ वेटाळले झाडखंडीं । वनें व्यापिलीं सर्व कूळीं उदंडीं । बहूतांपरींचीं बहू तीं विखारें । विषें घोळती लोळती थोरथोरें ॥६५॥
बहाती विषाचे महा ओघ तेथें । धुधूकारतां ज्वाळ आकाशपंथें । गिरीशीं बळें आदळे तोयराशी । बहूसाल त्या तोडिलें पर्वताशीं ॥६६॥
गिरीशृंग पाठार दारीं कपाटें । शिळा शीखरें वृक्ष पाषाण थाटें । दरे दर्कुटे थोर भ्यासूरवाणे । बहूतांपरींचे तरू ते पुराणे ॥६७॥
कडे कापले तोय नेटें भडाडी । गिरीकंदरीं घोष तेणें धडाडी । धडाडां नद्या लोटल्या व्योमपंथें । भुमी तूटल्या घोर घातें विघातें ॥६८॥
महारण्य तें घोर नीकुंबळेचें । पुढें जावयालगिं सामर्थ्य कैंचें । समुद्रातिरीं दाटले वीस गांवें । पुढें जावया वाट नाहीं स्वभावें ॥६९॥
भुमीपंथ नाहीं पुढें जावयातें । उडाले महावीर आकाशपंथें । समुद्रासि सांडूनि वेगें निघाले । बलें शीघ्र नीकुंबळेमाजिं गेले ॥७०॥
पुढें काळविक्राळ ते वीर गाढे । बळें राक्षसीं घातले सप्त वेढे । तयां मध्यभागीं विरें इंद्रजीतें । त्वरें आणिलीं होमद्रव्यें बहूतें ॥७१॥
घटीं मद्य आज्यादिक मांस नेलें । विरें राक्षसें शोणितें स्नान केलें । पुढें वेदिकेमाजिं हूताशनू तो । महावीर प्रेतासनीं बैसला तो ॥७२॥
सहस्रैक आहूतिंचा नेम केला । म्हणे म्यां वधावें नरां वानरांला । शतें भक्ति संख्याहुति लागवेगें । विरें घातल्या अग्रिमूखीं प्रसंगें ॥७३॥
रथू नीघतां हिंसती दिव्य घोडे । उदेलें भुखीं आगळे घोष गाढे । तया धूर्त बीभीषणा श्रत जालें । सुमित्रासुतालगिं तें जाणवीलें ॥७४॥
म्हणे होम पूर्णाहुतीलगिं आला । प्रतापें बळें पाहिजे यत्न केला । म्हणो शेष गा धन्य बीभीषणा तूं । सवें धाडिलें राघवें याचि हेतू ॥७५॥
वधूं शीघ्र राक्षेस हे बाणघातें । तंई वारिलें त्यासि नैरृत्यनाथें । झणे वो प्रभू झुंजतां पूरवेना । पुरा होम होतां रिपू आवरेना ॥७६॥
तंई बोलिला ऋक्ष तो जांबुवंतू । म्हणे वीर हो आइका एक मातू । तुम्हीं होम विघ्वंसिजे लागवेगें । रणामाजिं मी पाडितों दैत्यदुर्गे ॥७७॥
मुखें बोलिला वीर मेरूबळाचा । सुमित्रासुतू गौरवी रम्य वाचा । कपी ऋषभू आणि त्या वायुसूतें । बळें घातली धांव आकाशपंथें ॥७८॥
नभीं मुख्य हे वीर दोघे उडाले । कपी रीस ऊदंड धांवूनि गेले । धबाबां शिळा टाकिती व्योमपंथें । बळें होम विध्वंसिला घोर घातें ॥७९॥
रथू मोडिला फोडिलीं सर्व पात्रें । विरें मोडिलें कुंड संकेतमात्रें । पुढें वन्हि वीदारिला वेग केला । कितीएक राक्षेस तेथें निमाला ॥८०॥
रिपू रावणी ध्यान भंगून पाहे । तंई भंगिला होम तो दीसताहे । त्वरें इंद्रजीतू नभीं दृष्टि घाली । तंई ऋषभानें दिशा शीघ्र केली ॥८१॥
बळें होम विध्वंसिला मारुतीनें । देहेधर्म संपादिला ऋषभानें । पुढें पाहतां होम भंगून गेला । महावीर राक्षेस युद्धा निघाला ॥८२॥
बळें कोपला काळ कृतांत जैसा । महावीर उठावला शीघ्र तैसा । कपीवीर दोघे त्वरेंशीं निघाले । बळें आपुल्या ते दळाभाजिं आले ॥८३॥
सुमित्रासुतें वाहिला चंड मेढा । पुढें चालिला तो बळें वीर गाढा । कपी लोण कल्लोल कोटयानुकोटी । दळेंशीं बळें चालिला वीर जेठी ॥८४॥
महावीर ते थोर राक्षेस होते । कपीवीर ते धांवले शीघ्र तेथें । समारंगणीं भार भारी मिळाले । कितीएक ते भीडतां भग्र जाले ॥८५॥
दळें लोटलीं राक्षसांचीं अचाटें । समारंगणीं चाललीं दाट थाटें । बळें हाणीती शस्रघातें खणाणां । महीमंडळीं घोष ऊठे दणाणा ॥८६॥
असंभाव्य राक्षेस मारीत आले । कपी वीर ते भंगले भग्र केले । तयां देखतां मारुता कोप कैसा । बळें चालिला काळ कृतांत जैसा ॥८७॥
गदा घेतली शीघ्र नैरृत्यनाथें । उडाला कपी ऋषभू व्योमपंथें । सुगंधू कपी लोटला वीर्यवंतू । बळें आगळा चालिला जांबवंतू ॥८८॥
कंपी काळ कलांतिंचे मेघ जैसे । रणीं लोटले गर्जती वीर तैसे । बळें घालिती पालथें या भुगोळ । तिहीं मांडिला आट राक्षेसकूळा ॥८९॥
रणीं हाणिती एकमेकां फडाडां । तुटों । लागले पादपाणी तडाडां । नद्या लोटल्या शोणिताच्या भडाडां । समारंगणीं घोष ऊठे धडाडां ॥९०॥
रणीं पाडिले दैत्य कोटयानुकोटी । बहूतीं विरीं दीधली त्यासि पृष्ठी । पुढें देखतां कोपला काळ जैसा । रणीं लोटला रावणी वीर तैसा ॥९१॥
तया राक्षसें घोर संधान केलें । कपीवाहिनीभाजिं कल्पांत आलें । मयूरासि पिंजारिलें पुच्छ जैसें । रणीं पाडिले ते कपीवीर तैसे ॥९२॥
कपी मारुतीसारिखे भग्र केले । कितीएक ते वीर धाकें पळाले । पुढें पाहतां वीर सौमित्र कैसा । गजा देखतां ऊठला सिंह जैसा ॥९३॥
टणत्कारिले चाप काळाग्रिरोषें । थरारी धरा राप्त पाताळ घोषें । भुभीं वर्षती मेघ ऊदंड गारा । चळों लागल्या त्या असंभाव्य तारा ॥९४॥
भिडाया रणीं ऊठले वीर कोपें । बळें सृष्टि जाळील नेणों प्रतापें । तंई शीघ्र बीभीषणें वेग केला । गदा घेउनी वार सन्मुख जाला ॥९५॥
सुमित्रासुतालगिं सांडूनि मागें । पुढें धांवला वीर तो लागवेगें । रणीं देखिला वीर बीभीषणू तो । तया बोलता जाहला रावणी तो ॥९६॥
म्हणे रे बहूतां दिसां देखिलासी । वृक्षा पुष्ट तूं राक्षसांमाजिं होशी । नरें वानरें दास जालसि त्यांचा । मनू भांगिला रे तुवां पूर्वजांचा ॥९७॥
तुला ठाउका कोप माझा कृतांतू । मला इंद्रजीता पुढें मश्यकू तूं । करूं पाहशी थोर सामर्थ्य येथें मश्यकू तूं । करूं पाहशी थोर सामर्थ्य येथें । समारंगणीं धाडितों मृत्युपंथें ॥९८॥
म्हणे इंद्रजीतास नैरृत्यनाथू । बळेंवीण तूं बोलशी व्यर्थ मातू । मजलगिं तो काल मारूं शकेना । वरू दीधला तोषला रामराणा ॥९९॥
बहू शीकवीलें तुम्हां दुर्जनांसी । परी नायका रे तुम्ही पापराशी । मला सांगतां हीत अव्हेर केला । समस्तांसि येणें गुणें मृत्यु आला ॥१००॥
मला ताडिलें वैभवाचेनि तोषें । बुडालेत रे सर्व तेणेंचि दोषें । समस्तांसि मारील हा रामराजा । समारंगणीं मीच पाहीन वोजा ॥१०१॥
सभामंडपीं फार तां गर्व केला । कळेना तुला मृत्यु संनीध आला । तुला आजि मारील सौमित्र बाणीं । मुढा राक्षसा जाण हे सत्य वाणी ॥१०२॥
बहूसाल धिक्कार केला तयातें । प्रतापें सिमा सांडिली इंद्रजीतें । पदें ताडितां तो महा सर्प जैसा । रणीं कोपला वीस राक्षेस तैसा ॥१०३॥
म्हणे रे उभा फीर सन्मूख राहें । समारंगणीं धीर संधान साहे । बळें सोडिले बाण दारूण आले । सुमित्रासुतें सर्व छेदून नेले ॥१०४॥
रणीं घातला रावणानूज पाठीं । प्रतापें पुढें चालिला वीर जेठी । समारंगणीं अंतकातुल्य भासे । महावीर तो देखतां जीव त्रासे ॥१०५॥
महा युद्ध होईल दोघांजणांशीं । पुढें सज्जनीं चित्त द्यावें कथेसी । म्हणे दास ऊदास श्रोतीं न व्हावें । ऋषी बोलिला तेंचि हें सार ध्यावें ॥१०६॥


युद्धकान्ड – प्रसंग सातवा

फणी रावणी वीर सन्मूख जाले । बळाचे महाकाळ जैसे उदेले । करायास निर्वाण ते एकमेकां । विरश्रीबळें सोडिली सर्व शंका ॥१॥
पुढें बोलता जाहला इंद्रजीतू । कृतांतापुढें निर्बळी मानवा तूं । मरायासि कां व्यर्थ आलसि येथें । निमिष्यांत मारीन रे प्राणघातें ॥२॥
रणामाजिं सन्मूख होतां बळेंशीं । समस्तां तुम्हां पाडिलें नागपाशीं । पुन्हां मागुती सर्वही बाणजाळीं । निमालेत माझ्या करें युद्धकाळीं ॥३॥
अरे काय झाली तुझी शक्ति तेथें । पुन: शीघ्र आलसि युद्धास येथें । तुवां आणिलें काय सामर्थ्य जाया । बळें दावितां निर्बळें व्यर्थ वायां ॥४॥
वृथा पुष्ट रे हा बहू राजभ्राता । नृपें ताडिला रे सभेमाजिं  लाथा । समस्तांमध्यें रावणें भ्रष्टवीला । तुम्हां मर्कटांमाजिं तो श्रेष्ठ केला ॥५॥
बळें आपुल्या रे तुझे पादपाणी । नभामाजिं खंडून धाडीन बाणीं । समस्तां तुम्हां ठाउकी शक्ति माझी । रहाया पुढें काय रे प्राप्ति तूझी ॥६॥
बहू बोलिला वाजटू घोर शत्रू । प्रतीउत्तरें बोलिला तो सुमित्रू । मि हा कोण तूं नेणशी काय मूढा । वृथा विक्तमू बोलशी वाड पूढां ॥७॥
मही रुंद विस्तीर्ण छप्पन्न कोटी । गिरी दिग्गजांची असंभाव्य दाटी । तटाकें नद्या मातले भव्य सिंधू । वरी दाटली जीवसृष्टी अगाधू ॥८॥
असंभाव्य हा भार कोणा धरेना । न घेतां पुढें जीवसृष्टी उरेना । सहस्रां फणीचा असंभाव्य व्याळू । तयांमाजिं एकें फणीं हा भूगोळू ॥९॥
स्वभावें शिरीं ठेविजे पुष्प जैंसें । तयाचे परी घेतलें विश्व तैसें । तयाहून तो कोण आहे विशेषू । मुढ नेणसी कां स्वयें मीच शेषू ॥१०॥
भविष्योत्तरें सर्वही सत्य व्हावीं । बळं वैभवें राक्षसांचीं दिसावीं । म्हणूनी तुवां घेतलें येश युद्धीं । नभामाजिं जाऊनि कापटयबुद्धी ॥११॥
जनीं हीन त्याला बरी वेळ आली । अकस्मात ते कीर्ति होऊनि गेली । बळें आगळा राम आत्मा जगाचा । तयाहूनि रे विक्रमू कोण कैंचा ॥१२॥
तुह्मां पापरूपांमधें भक्त एकू । महावीर बीभीषणू पुण्यश्लोकू । तयाशीं सभामंडपीं गर्व केला । दिसेंदीस राक्षेस सवैं बुडाला ॥१३॥
रिपू बोलतो जाणरे सत्य वाणी । प्रतापें तुझें शीर छेदीन बाणीं । तया बोलितां ताविली भीमदृष्टी । उभा काळ जाळावया जीवसृष्टी ॥१४॥
बळ छेदिता जाहला वोष्ठ दंतीं । सिमा फांकली वैभवाची दिगंतीं । करारां रणीं खादल्या वज्रदाढा । शतें सोडिलीं बान वोढूनि मेढा ॥१५॥
बलें धांविलीं बाणजाळें उफाळें । लखाखीत सौदामिनीचेनि मेळे । तडाडीत घोषें कडाडीत आले । सुमित्रासुतें सर्व छेदून नेले ॥१६॥
पुन्हां कोपला तो रिपू कोटिगूणें । शतांचीं शतें सोडिले बाण तेणें । नभामाजिं ते बाण बाणीं सणाणा । कितीएक स्फुल्लिंग भालीं फणाणा ॥१७॥
असंभाव्य ते जाहला बाणवृष्टी । जळों लागली पावकें सर्व सृष्टी । अतीचंड ते दंड अद्‍भूत कैसे । महाकाळ कल्पांतिंचे मेघ जैसे ॥१८॥
कडाडां खडाडां गडाडां घडाडां । तडाडां थडाडां दडाडां धडाडां । बहूतांपरींचे बहू घोष झाले । ग्रहां चंद्रसूर्यादिकां कंप आले ॥१९॥
कितीएक सिंधूदकें तप्त जाली । कितीएक सिंधूदकें तीं उडाली । असंभाव्य त्यां दाटल्या बाणकोटी । बलें सोडिती पाडिती वीर जेठी ॥२०॥
नभामाजिं कल्पांत ते बाणजाळीं । महा युद्ध तें होतसे अंतराळीं । रिपू पेटले दोघही घोर मारा । भुमीं वृष्टि गारांपरी सर्व तारा ॥२१॥
वरी पाहतां बाणबाणीं खणाणां । रिपू एकमेकांसि तो भेदवेना । रथारूढ तो रावणी धांवताहे । पदीं चालतां शेषऋक्षां न साहे ॥२२॥
पुढें चालिला वीर तो जांबुवंतू । शिळा घेतली धांवता काळकेतू । बळें हांक देऊनियाम चक्रचालीं । उफाळें शिळा तो रथामाजिं घाली ॥२३॥
रथा मोडिलें पाडिलें भग्र केलें । सुमित्रासुता रावणी साम्य जालें । सुगंधें विरें वैभवें लागवेगें । महा अश्र्व ते चूर्ण केले प्रसंगें ॥२४॥
कपीनाथ बीभीषणें मारुतीनें । विरांलगिं सन्मानिलें थोर मानें । भले हो भले थोर आश्चर्य केलें । रिपूच्या रथा विक्रमें भ्मगवीलें ॥२५॥
नभीं सर्व आनंदली देवसृष्टी । बहूसाल संपादिली पुष्पवृष्टी । समस्तां मनीं थोर आनंद जाला । रिसीं वानरीं घोष अद्‍भूत केला ॥२६॥
म्हणे रावणी हा रिपू आवरेना । बहूसाल सामर्थ्य याचें सरेना । शरां मारितां सर्व तोडीत आहे । पुढें अग्रिअस्रासि तो सोडिताहे ॥२७॥
तयें सोडितां अस्र तैसें निघालें । धडाडीत तेम तेजपुंजाळ आलें । नभीं धूम्र दाटे असंभाव्य ज्वाळा । करूं पाहती भस्म नक्षत्रमाळा ॥२८॥
असंभाव्य ते चालिली वन्हिधाडी । मही सर्व आकाश तेणें कडाडी । बहूवर्ण ज्वाला शिखी धांवताती । कडाडीत नेटें कपींमाजिं येती ॥२९॥
कपी ऋक्ष तेणें भयातूर जाले । कितीएक ते धीर पोटीं गळाले । बहू सोडिला धीर नैरृत्यनाथें । म्हणे गा विरां सर्व गेलों अनर्थें ॥३०॥
सुमित्रासुतें देखिलें अग्रिअसा‍ । पुढें सोडिता जाहला मेघ अस्रा । तया सोडितां मेघ तैसे उदेल । गिरीचे परी अंबरीं भार आले ॥३१॥
नभीं दीसती ते हुडे कोट झाडें । महामेघ गर्जोनि गंभीर वाडें । नभा व्यापिलें घोर अंधार जाला । दिसेना रणामाजिं दोन्ही दळांला ॥३२॥
नभीं चालिले ते बहू कीट काळे । झकाकीत सौदामिनीचेनि मेळें । बळें मेघधारा असंभाव्य गारा । सुटे कंप सूसाट घोषें थरारां ॥३३॥
प्रसंगी तये पाणजंजाळ जाला । रणामंडळीं तोय सद्‍भूत आलें । कितीएक झाडें भुमीं चूर्ण होती । पुरें पट्टणें सर्व वाहूनि जाती ॥३४॥
सुमित्रासुतें थोर अद्‍भूत केलें । जनांला गमे आजि कल्पांत आलें । बुडों लागले भार त्या राक्षसांचे । बहूसाल त्या धीर गेले विरांचे ॥३५॥
रणीं सोडिलें अस्त्र नेटें विझाल । बहू राक्षसां थोर कल्पांत आलें । त्वरें रावणी वायुअस्त्रास सोडी । असंभाव्य तो वाट नेटें झडाडी ॥३६॥
कडाडीत पाडे असंभाव्य झाडें । बळें पाडिलीं वाड झुंबाड झाडें । फुटों लागलीं शैलशृंगें खडाडां । कडे चालिले पर्वतांचे भडाडां ॥३७॥
भ्रमों लागलीं खेचरें प्रेत जालीं । गृहें गोपुरें एक वेळे उडालीं । बहूसाल तो वातआवर्त जाला । तया देखतां मेघ नेटें उडाला ॥३८॥
सुमित्रासुतें देखिला चंड वारा । गिरीअस्त्र सोडूनि केला निवारा । असंभाव्य तीं चाललीं शैलशृंगें । बहू वात निर्वात केला प्रसंगें ॥३९॥
गिरी चालिले ते असंभाव्य कैसे । नभीं धांवती मातले मेघ जैसे । महावीर तो वज्रअस्त्रासि सोडी । रणीं रावणी शैल तात्काळ तोडी ॥४०॥
रिपू राक्षसें शैल ते पिष्ट केले । बळें आपुल्या दिग्गजां आड नेले । पुढें जाहली ते बहू वज्रदाटी । त्या देखता जाहला वीर जेठी ॥४१॥
पुढें वीर सौमित्र ब्रह्मास्त्र सोडी । तयापासुनी वन्हि नेटें भडाडी । गमे कोटि विद्युल्लता एक वेळा । महा लोळ कल्लोळ भासे भुगोळा ॥४२॥
रणामंडळीं पावकें त्या अचाटें । जळों लागलीं सर्वहि वज्रथाटें । पुढें चालिल्या त्या असंभाव्य ज्वाळा । रणामंडळीं जाहली एक वेळा ॥४३॥
तया देखतां रावणी तेंचि सोडी । रणामंडळीं एकमेकांसि तोडी । रणामाजिं ताक्ताळ सन्मूख आले । महाज्वाळ ते एक होऊनि गेले ॥४४॥
पुढें घोर रुद्रास्त्र त्या रावणानें । बळें सोडिलें शीघ्र माहाविरानें । रणामाजिं तें चालिले एकवेळे । भुमीं पाय आकाशपंथीं शिसाळें ॥४५॥
बळें धांविले तें रणामाजिं कैसें । गिळाया भुगोळा महा विघ्न जैसें । तयां देखतां कंप माहाविरांसी । भयें मूर्छना घातली वानरांसी ॥४६॥
तया देखतां तो फणी सिद्ध जाला । पुढें सोडिलें शीघ्र माहेश्वराला । उठे मातला काळ कल्पांतकाळी । दिशा दाटल्या सर्व आकाशज्वाळीं ॥४७॥
रवी कोटि विघुल्लता एक वेळां । रणीं धांवती कंप जाला भुगोळा । महातेज हेलावलें तेचि काळीं । असंभाव्य तें चालिलें ब्रह्मगोळीं ॥४८॥
तया देखतां अस्त्र मागें पळालें । बहू कूळ तें खेचराचे जळाले । पुढें देखतां रावणी भ्रांत जाला । भये भूलला वारवेना तयाला ॥४९॥
मनीं भावितो कोण राखेल गेलें । कळेना मला व्यर्थ येथें जळालों । तंई शीघ्र रामानुजें काय केलें । प्रतिज्ञापणाला मनीं आठवीलें ॥५०॥
म्हणे हो मनीं शीर छेदूनि न्यावें । म्हणोनि बळें अस्त्र मागें वळावें । रणामंडळामाजिं वीरें सुभित्रें । बळें वारिलें अस्त्र तें वीजमंत्रें ॥५१॥
म्हणे मेघनादू मला विघ्र आलें । परी थोर आश्र्चर्य कां वांचवीलें । भला वीर सौमित्र हा वीर्यवंतू । मनासारिखें युद्ध मोठें करीतू ॥५२॥
असेना पुढें वीर होणार नाहीं । बहू देखिले पाहिले झुंजतांहि । महावीर हे सूर्यवंशी बळाचे । रिपूलगिं रक्षावया कोण कैंचे ॥५३॥
महावीर दोघे रणीं तेचि काळें । पुन्हां सोडिते जाहले बाणजाळें । रणामाजिं ते भेदिती एकमेकां । नभीं सोडिल्या बाणभाळीं अनेका ॥५४॥
रिपूंचीं रिपू तोडिती बाणजाळें । पुन्हां मागुती सोडिती ते उफाळे । विरें वीर तो भेदितांही ढळेना । विरश्रीबळें काय होतें कळेना ॥५५॥
पुढें काय केलें तया मेघनादें । रणीं हांक घेऊनि धांऊनि क्रोधें । महातेज पुंजाळ त्या शीघ्रकाळीं । बळें भेदिल्या तीन भाळी कपाळीं ॥५६॥
महावीर तो रावणी काळरूपी । पुराणा बहू काळ कापटयरूपी । सुमित्रासुत तो दिसे बाळलीला । बळें भेदिला रक्त वाहे कपाळा ॥५७॥
तया देखतां कोप नैरृत्यनाथा । पुढें चालिला पाववायासि वेथा । रणीं हांक देऊनि बीभीषणानें । गदा घेतली चालिला थोर त्राणें ॥५८॥
तया देखतां त्या दशग्रीवसूतें । रणीं विंधिला पाडिला बाणघातें । पुढें देखिला कोपला वीर गाढा । सुमित्रासुतें वाहिला चंड मेढा ॥५९॥
रणीं रावणी लक्षिला तेचि काळीं । बळें भेदिल्या बाणभाळी कपाळीं । नवां बाणघातें रिपू स्वस्थ केला । तया मेघनादा बहू खेद जाला ॥६०॥
कपाळीं बळें भेदिलें बाण वीरें । प्रवाहो बळें चालिला तो रुधीरें । महामस्तकामाजिं सर्वै बुडाले । कपाळावरी पिच्छ बाशिंग जालें ॥६१॥
म्हणे वीर बीभीषणू वीर छात्रा । बरें ऊसणें घेतलें गा सुमित्रा । रिपू रावणी तापला वीर कैसा । शुळें टोंचितां ऊठला सर्प जैसा ॥६२॥
महावीर निर्वाणिंचे बाण सोडी । लघू लाघवें शेष तात्काळ तोडी । असंभाव्य कोपानळें तीव्र ज्वाळा । मुखें सांडितां काळ कांपे चळाळां ॥६३॥
सिमा सांडिली थोर कल्पांत काळीं । महावीर ते खीळिले बाणजाळीं । बहू खोंचले देह दोघांजणांचे । झरे लागले वाहती शोणिताचे ॥६४॥
विरश्रीबळें दु:ख नाहीं प्रतापें । रणीं भेदिती एकमेकांस कोपें । बहू माजले युद्ध तें ओसरेना । बळें भीडती एकमेकां सरेना ॥६५॥
पुढें काय केलें सुमित्रासुतानें । गुणीं सज्जिलें त्या रवीचक्रबाणें । मुखीं धांवती त्या शिखा पावकाच्या । बहू चंचला कोटि विद्युल्लतेच्या ॥६६॥
कडाडीत कोपानळें बाणभाळीं । बळें सोडितां शीघ्र तैशी निघाली । भयातूर दोन्ही दळीं कंप जाले । ऋषी देव गंधर्व धाकें पळाले ॥६७॥
ग्रहादीक आकाशपंथीं जळाले । बहू खेचरें भार भूमीं गळाले । ध्वनी ऊठला घोर घोषें तडाखा । बळी कांपती ईतरां कोण लेखा ॥६८॥
सुमितासुतें शीघ्र संधान केलें । रणीं रावणीशीर छेदून नेलें । समस्तां सुरांलगिं आनंदवीलें । सुरेशामनींचें महा शल्य गेलें ॥६९॥
रणामाजिं तो इंद्रजीतू निमाला । समस्तां सुरांलगिं आनंद जाला । महाकंटकृ थोर संहार केला । त्रिलोकीं बहू कीर्तिचा घोष केला ॥७०॥
पुढें शेष सूगंध बीभीषणानें । दळें सर्वहि सिद्ध केलीं विरानें । कपीशीं सुवेळाचळा राम जेथें । महावीर ते चालिले सर्व तेथें ॥७१॥
प्रभू राम तो बंधुची वाट पाहो । उतावील पोटीं वियोगा न साहे । बहूसाल चिंता करी बांधवाची । म्हणे कोण वेळा सुमित्रासुताची ॥७२॥
तयां बोलतां भार तैसे उदेले । दळेंशीं बळें येश घेऊनि आले । समर्था प्रभूला नमस्कार केले । रघूनायका भेटले स्वस्थ जाले ॥७३॥
सुमितासुताचा देहे स्वस्थ जाला । पुढें राघवें वैद्य पाचारवीला । मुखें बोलिला राम तो वीरबाहो । करावा अती आदरें दिव्य देहो ॥७४॥
रणीं इंद्रजीतासि प्राणांत जालें । कपी ऋषभानें सवें शीर नेलें । निचेष्टीत काया रणीं स्तब्ध ठेली । प्रियेलागीं सांगावया भूज गेली ॥७५॥
त्रिकूटाचळीं भूवनें रावणाचीं । तया सारिखीं रम्य नीकुंबळेचीं । तया भूवनामाजिं सूलोचना ती । सुखें वैभवाची बरी वेळ जाती ॥७६॥
अकस्मात तेथें ध्वनी घोष जाला । परीचारिका सांगती भूज आला । भुमी रम्य राजांगणें पांचबंदी । पडे भूज तेथें स्रवें रक्तबिंदी ॥७७॥
मनामाजिं ते शंकली दिव्य बाळा । रणामाजिं भर्तार त्या कोण वेळा । भ्रमें चित्त दुश्चीत बाहेर आली । फणीचेपरी भूज ते ओळखीळी ॥७८॥
खुणें दाविलें लीहिलें पत्र हातें । म्हणे चालिलों मी पुढें मुक्तिपंथें । तुझ्याकारणें धाडिली मूळ बाहे । प्रिये चाल वेगीं तुझी वाट पाहें ॥७९॥
तया वाचितां थोर आकांत जाला । दुखामाजिं तो सौख्यसिंधू बुडाला । मनीं वैभवाची तिनें सांडि केली । त्रिकूटाचळा जावया सिद्ध जाली ॥८०॥
बहू पूतळ्या पिंजरे पक्षियाती । तये भोंवतीं भोंवतीं रूददाती । अहो माय आम्हांसि सांडून जाशी । तुझ्या वेगळीं सर्व आम्ही विदेशी ॥८१॥
तयालगिं संबोखिलें रम्य वाणीं । तुम्हां रक्षिता देव तो शूलपाणी । मिळाले बहू लोक ते दाटि जाली । शिबीकेमधें भूज वेगें निघाली ॥८२॥
विसोरे बहूसाल नानापरींचे । अलंकार भांडार ते सुंदरीचे । धनें संपदा पाहतां मीति नाहीं । तिनें वाटिलें लूटिलें सर्व कांहीं ॥८३॥
पुढें अश्विनीलगिं आरुढ जाली । बहू वेग लंकापुरीमाजिं गेली । नमस्कार केला तया रावणाला । पुढें टाकिलें पत्र आकांत जाला ॥८४॥
रणीं झुंजतां इंद्रजीतू निभाला । बहू नायकांचा ध्वनीघोष झाला । दुखें व्याप्त लंकापती आंग घाली । नसे मानसीं शुद्धि सर्वै उडाली ॥८५॥
प्रधानीं बहूतांपरी सांवरीला । पुढें रावणा कोप तात्काळ आला । म्हणे आजि संहारितों वैरियांला । दळेंशीं रणीं जावया सिद्ध जाला ॥८६॥
म्हणे सासुर्‍यालगिं सूलोचना ते । घडीनें घडी आमुची वेळ जाते । समर्था मला शीर आणून द्यावें । पुढें काय मानेल तैसें करावें ॥८७॥
शिरें आणितों आजि आठां जणांचीं । मुखें तीव्र क्रोधानळें रावणाचीं । रिपू दोघे बीभीषणा अंगदाचे । रिसा सुग्रिवा मारुता ऋषभाचे ॥८८॥
बहूसाल तो कोप रायासि आला । पुढें मंदिरामाजिं नेलें सुनेला । तियेलगिं मंदोदरी नीति सांगे । रघूनायका भेट वो लागवेगें ॥८९॥
अहो देखिलें स्वप्र म्यां घोरवाणें । निमाले रणीं सर्व राक्षेस प्राणें । नव्हे स्वप्र हें वाटतें सत्य आहे । दिलें राज्य बीभीषणालगिं पाहे ॥९०॥
ग्रह सूटले तूटले पाशबेडी । पुढें सोडिले देव तेतीस कोडी । त्रिलोकीं उभी राहिली रामगूढी । पुढें साच होईल ऐशीच प्रौढी ॥९१॥
म्हणोनि तुवां शीघ्र आतां उठावें । दिनाचे परी रामचंद्रा वदावें । करूणास्वरें राघवा आळवावें । बहूतांपरी शीर मागूनि घ्यावें ॥९२॥
त्वरें ऐकतां ऊठली शब्दनेटें । पुढें वानिती भाटवेताळथाटें । कपीवाहिनीनें महाद्‍भूत केलें । त्वरें बोलती जानकी पाठवीलें ॥९३॥
म्हणे राम हें सर्वथाही घडेना । रिपू मारिल्यावीण दृष्टी पडेना । असंभाव्य सेनासभा दाटली ते । पुढें शीघ्र सूलोचना भेटली ते ॥९४॥
पुढें देखतां राम सूखें निवाली । कृपा भाकितां ते नमस्कार घाली । कृपासागराची बहू स्तूति केली । सुशब्दें रघूनायकें तोषवीली ॥९५॥
प्रसंगीं तये थोर आश्र्चर्य जालें । निचेष्टीत शीरें बरें हास्य केलें । कृपें पाहिलें रामचंद्रें दयाळें । पती ऊठवीतों तुझा शीघ्र काळें ॥९६॥
खुणा दाविती वो वळावें दयाळा । सभे घालितां एकमेकांसि डोळा । कपीवीर ते सांगती कानगोष्टी । पुढें ऊठतां सर्व आटील सृष्टी ॥९७॥
वदे ऋक्षस्वामी बरेंसें विचारा । रिपू नूठवावा कदा ऊपकारा । वदे मारुती राघवालगिं रागें । रघूनायका सांडिली गोष्टि मागें ॥९८॥
उदासीन देखोनि सूलोचना ते । नमस्कार केला त्वरें चालिली ते । प्रभू सव्य घालूनियां शीघ्र गेली । मनोभावना सर्वही सिद्ध केली ॥९९॥
समुद्रातिरीं भीमकुंडा प्रचंडा । बळें चेतल्या वन्हिशीखा उदंडा । दशग्रीव मंदोदरी राजभारें । सवें चालिली गांवलोकें अपारें ॥१००॥
ऋषीदेवगंधर्वमांदी मिळाली । समस्तीं तियेची बहू स्तूति केली । करी ती ऋषीनायका अक्षवाणें । उडी घातली अग्रिमूखीं स्फुराणें ॥१०१॥
मनामाजिं होता मनांतील हेतू । पुढें देखिला इंद्रजीतू समर्थू । सती आदरें मुक्तिपंथास गेली । कथा राहिली पाहिजे चालवीली ॥१०२॥
फणीगर्भरत्नासि हो दग्ध केलें । म्हणे दास हें राक्षसी कृत्य जालें । पुढें सज्जनीं चित्त द्यावें कथेला । महाशक्ति भेदील रामानुजाला ॥१०३॥


युद्धकान्ड – प्रसंग आठवा

सुमित्रासुतें पाडिला इंद्रजीतू । रणीं ग्रासिला काळ जैसा कृतांतू । दळें फूटलीं वीर मागें पळाळे । कितीएक घायाळ लंकेंत गेले ॥१॥
सभामंडपीं वीर घालेनि मेटें । भुमीं पीटिती थोर दु:खें ललाटें । मुखें बोलती इंद्रजीतू निमाला । पुरीभाजिं तो थोर आकांत जाला ॥२॥
त्रिकूटाचळीं मृत्यू आला बहूतां । समस्तांसि संहार हे मूळ सीता । सुपारश्व संबोखितां ते प्रसंगीं । पिशाचापरी ऊठला लागवेगीं ॥३॥
तया रावणा मूर्छना सांवरेना । भुमीं आंग घाली कदा आवरेना । स्त्रियापुत्रकन्यादिकें तोंड घेती । प्रसंगीं तये थोर जाली रुदंती ॥४॥
अशोकावनामाजिं तो शीघ्र गेला । सितेलगिं मारावया सिद्ध जाला । पुढें देखतां ते भयातूर जाली । सुपारश्व धांवोनियां आड आली ॥५॥
बहूतांपरी राव तो बोधवीला । पुढें रावणू क्रोध सांडून ठेला । महावीर दोघे पुरीमाजिं आले । रणीं जावयालगिं ते सिद्ध जाले ॥६॥
पुढें ऊठवीलीं दळें सिद्ध होती । रथी सारथी हस्ति घोडे पदाती । महाविक्रमें चालिलें राजभारें । दणाणीतसे मेदिनी घोरभारें ॥७॥
असंभाव्य तीं सोडिलीं बाणजाळें । कपी टाकिती चंड शीळा उफाळें । महावीर संघट्टले एकमेकां । बळें भेदिती दूरि टाकूनि शंका ॥८॥
महाभार आरंभिला वानरांतें । पुढें बाण कामूक तें सिद्ध होतें । उभा राहिला विक्रमें वीर कैसा । बळें सर्व संहारितो काळ जैसा ॥९॥
बहूसाल तों सोडिलीं बाणजाळें । तुटों लागलीं राक्षसांचीं शिसाळें । असंभाव्य तीं पोकळीमाजिं जाती । पुरे धांव तेथूनियां खालिं येती ॥१०॥
बहूसाल संहार केला दळाचा । करी कोण लेखा तया घायकांचा । रणीं राघवें लविलें घायवारे । पळाले पुरीमाजिं ते थोर मारें ॥११॥
भयें बोलती सांगती रावणाला । रणामाजिं तो सर्व संहार जाला । असंभाव्य तो कोपला पापराशी । पुढें धाडिलें शीघ्र तीघाजणांशीं ॥१२॥
विरूपाक्ष विद्युन्मतू आणि मन्तू । रथारूढ होऊनियां लंकनाथू  । महाशस्त्रसामुग्रिया तो समर्थू । बळें चालिला रुंधिला राजपंथू ॥१३॥
असंभाव्य सेना पुढें आणि मागें । रणामंडळा चालिला लागवेगें । बहूसाल वाघें पुढें एक वेळां । समारंगणीं नाद केला भुगोळा ॥१४॥
रथां घोडियां कुंजरां दाटि जाली । उफाळे बळें चंड सेना निघाली । बहू शस्त्रपाणी बहू छत्रछाया । बळें वोळले मेघ जैसे पडाया ॥१५॥
उभा राहिला रावणू राजभारें । तिघे वीर ते भीडती घोर मारें । पुढें देखितां रावणू सांवरेना । उभा राहतां धीर पोटीं धरेना ॥१६॥
बळें वाइलीं रावणें चंड चापें । बहूसाल ते बाण सोडे प्रतापें । असंभाव्य तीं सोडिलीं बाणजाळें । तुटों लागलीं पादपाणी शिसाळें ॥१७॥
कपी सर्वही छेदिले मुख्य शत्रू । रणामंडळीं गर्जला तो अमित्रू । कपी खोंचलें नेट पोटीं धरेना । पराधिक्य तें सुग्रिवा साहवेना ॥१८॥
बळें हांक देऊन तैसा निघाला । तया पाठिशीं तो विरें वीर आला । कितीएक ते बाड जुंबाड हातीं । कितीएक ते धांवती शृंग घेती ॥१९॥
कितीएक घेऊनियां चंड शीळा । कितीएक फीराविती भिंडिमाळा । कितीएक ते झाडिती शस्त्रधारा । कितीएक घेऊनि आले कुठारा ॥२०॥
कितीएक ते खड्‍ग घेऊनि आले । कितीएक ते शूळपाणी मिळाले । कितीएक लोहार्गळा ते प्रसंगीं । कितीकीं गदा घेतल्या लागवेशीं ॥२१॥
कितीएक घेऊनि आले दशघ्री । कितीएक घेऊनि आले शतध्नी । किती तोमरें पट्टिशेंशीं निघाले । कितीएक ते शूळ घेऊनि आले ॥२२॥
किती फर्शपाणी किती चक्रपाणी । कितीएक ते वीर खट्‍वांगपाणीं । कितीएक आसीलता झाडिताती । कटयारा सुर्‍या वीर घेऊनि येती ॥२३॥
बहूतांपरींचीं बहूसाल शस्त्रें । बहू हांक देती विशाळें वगत्रें । कपीनायका भोंवतीं दाट थाटें । रणीं धांवती वीर ते कड्‍कडाटें ॥२४॥
पुढें रावणें देखिला थोर थावा । असंभाव्य तो सुग्रिवाचा उठावा । कपीचक्र तें घोर अद्‍भूत आलें । मनामाजिं तें थोर आश्चर्य केलें ॥२५॥
कपींचा रणीं लोळ कल्लोळ आला । गजारूढ माहामतू सिद्ध जाला । तया रावणा देखतां युद्ध होतें । बहू मांडला आट त्या राक्षसांतें ॥२६॥
गजारूढ माहामतू शैल जैसा । शिळा टाकितो वीर सुग्रीव तैसा । गजामस्तकीं ते शिळा चंड आली । गरारून तो कुंजरू आंग घाली ॥२७॥
गजा पाडितां छेदिला उष्ट्रदंतीं । बळें चालिला शूळ घेऊनि हस्तीं । म्हणे साहरे साह तूम सुग्रिवाला । सुळा टाकितां वीर वर्ता उडाला ॥२८॥
पुढें शूळ मोडूनियां लागवेगें । गदाघात हाणे तया पृष्टिभागें । महा वीर तो घोर मारें पळाला । रणीं राक्षसां थोर संहार जाला ॥२९॥
विरें वीर राक्षेस ते भग्र केले । कपी धीट ते नीट मारीत आले । तयां देखतां वीरुपाक्षू निघाला । बहूसाल धिक्कारिलें सुग्रिवाल ॥३०॥
पुढें सुग्रिवें बाड जुंबाड हातें । रिपूचे रथीं टाकिलें थोर घातें । वरी पाहतां झाड सन्मूख आलें । विरें बाण टाकूनि छेदून नेलें ॥३१॥
शिळा टाकिली चंड त्या सुग्रिवानें । बळें फोडिली बाणघातें विरानें । पुन्हां राक्षसें घोर संधान केलें । कपी सुग्रिवें तुच्छ मानूनि नेलें ॥३२॥
पुढें सुग्रिवें शृंग त्या आचळाचें । करीं घेतलें अग्र मंद्राचळाचें । बळें टाकिली ते शिळा घोर घातें । विरूपाक्ष तो चालिला मृत्युपंथें ॥३३॥
रणीं राक्षसां पातली मृत्युवेळा । पुढें देखिलें रावणें त्यांसि डोळां । अहा रे कसें काय जालें कपाळा । भयें भूलला पातली कंपवेळा ॥३४॥
पुढें रावणें देखिलें सव्यभागीं । महावीर विद्युन्मतू ते प्रंसगीं । तया बोलला पाहसी काय वीरा । महावीर तो पेटला घोर मारा ॥३५॥
रथारूढ होऊनियां सुग्रिवाला । पुढें शीघ्र पाचारिलें त्या कपीला । शरांचीं शतें टाकिलीं राक्षसानें । विरश्रीबळें राहिलें सुग्रिवानें ॥३६॥
पुढें सुग्रिवें घेतली चंड शीळा । बळें टाकिली त्यासि लक्षूनि डोळां । शिळा फोडिली राक्षसें बाणघातें । बहू कोप आला तया सुग्रिवातें ॥३७॥
शिळा घेतली दूसरी सुग्रिवानें । पुन्हां टाकिली चंड माहाविरानें । तयें राक्षसें फोडिलें त्या शिळेला । महावीर तो धीर देता दळाला ॥३८॥
कपीनाथ सुग्रीव देखोनि ऊणें । बहू कोपला वीर तो कोटिगूणें । बळें लांगुलें घाव हाणे महीला । गदें झेलिलें तोडिलें त्या रथाला ॥३९॥
निमाले गदा लागतां दिव्य घोडे । रथू वीघडे चूर्ण होऊनि मोडे । पडे सारथी दैन्यवाणा उताणा । विरां राक्षसां मूर्छना सावरेना ॥४०॥
रणीं ऊठला वीर तो सिद्ध जाला । गदा घेतली हांकिलें सुग्रिवाला । बळें हाणतां झेलिली त्या कपीनें । पुन्हां हाणिती एकमेकां गदेनें ॥४१॥
बळाचे महावीर दोघे प्रतापी । गदा हाणिती भीडती काळरूपी । गदाघात संघट्टणें वन्हिवृष्टी । जळों लागली पावकें सर्व सृष्टी ॥४२॥
बळें हाणतां भंगलें सर्व कांहीं । गदा टाकिल्या घेतले शूळ तेही । रणीं भीडतां शूळ ते चूर्ण झाले । महावीर ते मल्लयुद्धासि आले ॥४३॥
दणाणा रणामाजिं ते मुष्टिघातें । बळें हाणिती एकमेकां निघातें । कपी सुग्रिवें दीधली वज्रमुष्टी । महावीर तो पाडिला प्रेतसृष्टी ॥४४॥
तया देखतां मंत धांवोनि आला । रणामंडळीं हांकिलें अंगदाला । बहू त्रासिता जाहला घोर वाणीं । तयें अंगदा भेदिलें पंचबाणीं ॥४५॥
तया मूर्छना देखितां जांबुवंतें । महावीर तो तोडिला वृक्षघातें । विरें राक्षसें वृक्ष छेदूनि नेला । रणीं भेदिला ऋक्ष तो मग्र केला ॥४६॥
रणीं भेदिलें देखिलें त्या रिसाला । गवाक्षा विरा थोर आवेश आला । पुढें लक्षिता जाहला राक्षसांतें । बळें ताडिले थोर पाषाणघातें ॥४७॥
विरें शीघ्र पाषाण तो भग्र केला । शरें नीकुरें भेदिलें त्या कपीला । गवाक्षू कपी तो भुमीं अंग आली । तंई अंगदें मूर्छना सावरीली ॥४८॥
करीं सार आसीलतेशीं निघाला । बळें हांक देऊनि सन्मूख आला । कठोरें करें ताडिलें राक्षसातें । महामंतु तो चालिला मृत्युपंथें ॥४९॥
रणामंडळीं शामति जाली रिपूंची । दळें गर्जतीं जाहलीं वानरांचीं । उणें देखतां रावणा कोप आला । प्रतापें रणामाजिं युद्धा निघाला ॥५०॥
रथू लेटिला रावणें शीघ्र काळें । बहूसाल तीं सोडिलीं बाणजाळ । पुढें देखतां राम तत्काळ छेदी । पुन्हां रावणू घोर संधान साधी ॥५१॥
नभीं सोडिले बाण कोटयानुकोटी । असंभाव्य जाली बहू थोर दाटी । महामेघ तो मोकली मेघधारा । रघूनायकें छेदिले ते सरारां ॥५२॥
पुढें रावणू थोर कोपें कडाडी । करी गर्जना मेघ जैसा गडाडी । बहू कोपला तो असूरास्त्र सोडी । तंई चालिल्या त्या नभीं चक्रकोडी ॥५३॥
असंभाव्य तीं चाललीं घोर चक्रें । महा तेज पुंजाळ त्यांचीं वगत्रें । कपीवाहिनीमाजिं ते एकवेळे । तुटों लागलीं वानरांचीं शिसाळें ॥५४॥
पुढें देवगंधर्व अस्त्रांस सोडी । तिहीं तोडिल्या सर्वही चक्रकोडी । रणीं रावणू रुद्रअस्त्रास घाली । शुळामूसळांची नभीं दाटि जाली ॥५५॥
धुधाटें कपीच्या दळामाजिं यावें । तंई योजिलें तें महाअस्त्र देवें । महाथोर माहेश्वरी मूळमंत्रें । तयें सोडिलें सूटलीं वज्रशस्त्रें ॥५६॥
लोहोमूसळें ते गदा शूळ होते । बळें तोडिले पाडिले वज्रघातें । दशग्रीव तो क्षोभला काळ जैसा । तये भेदिलें पंचबाणीं सुरेशा ॥५७॥
रिपूबाण सर्वांग भेदून गेले । दळीं रावणाच्या महा घोष जाले । वपू भेदिली रावणें पंच बाणीं । चळेना रणीं राम तो वज्रठाणी ॥५८॥
रणीं ऊसणें घेतलें राघवानें । दशग्रीव तो भेदिला सप्त बाणें । महा दु:ख जालें तया रावणाला । सुमित्रासुता थोर आवेश आला ॥५९॥
तया अग्रजालागीं घालूनि मागें । महावीर तो चालिला लागवेगें । सुमित्रासुतें बाणघातें निघातें । रिपूसारथी धाडिला मृत्युपंथें ॥६०॥
पुढें मागुतें थोर संधान केलें । रिपूच्या धनूलगिं छेदून नेलें । तया वीर बीभीषणा कोप गाढा । रणीं चालिला चंड वाहून मेढा ॥६१॥
तयें पाडिलें अष्ट तूरंगमांतें । ध्वजस्तंभ तो छेदिला बाणघातें । रथू सारथी सर्वही भ्रग्र केला । दशग्रीव दूजे रथीं स्वार जाला ॥६२॥
महाशक्ति ब्राह्मी तया रावणानें । अनूजावरी टाकिली तैं फुराणें । कडाडीत धांवे महावीज जैसी । करी शेष मागें रिपूबांधवांसी ॥६३॥
सुमित्रासुतें घोर संधान केलें । महाशक्तिनें शीघ्र छेदून नेलें । शरें ताडितां पावका वृष्टी झाली । कितीएक राक्षेससेना निमाली ॥६४॥
रणीं रावणू तो कडाडीत कोपें । सिमा सांडली घोर रूएपं प्रतापें । धुधु:कार सांडीत धर्डीत दाढा । अनर्थासि ऊठावला वीरा गाढा ॥६५॥
महाशक्ति काढूनि मायासुरासी । बहू काळ सन्नीध तैशी विरांची । तयेलगिं त्या रावणें सिद्ध केलें । जयेमाजिं ब्रह्मांड बिंबोन गेलें ॥६६॥
कडाडीत घोषें धडाडीत ज्वाळा । तडाडी नभामाजिं नक्षत्रमाळा । महावीर ते थोर ध कें गळाले । विमानाहुनी देव नेटें पळाले ॥६७॥
सुमित्रासुता लक्षिलें रावणानें । त्वरें टाकिली शक्ति माहविरानें । बळें आदळे ते अकस्मात अंगीं । रणीं वीर सौमित्र तो प्राण त्यागी ॥६८॥
दळीं वानरांचे हाहाकार जाला । महावीर सौमित्र युद्धीं निमाला । कपी वीर नैरृत्य धांवोनि आले । तया भोंवतीं वीर सर्वै मिळाले ॥६९॥
पुढें शोक आरंभिला राघवानें । तया वारिलें शीघ्र बीभीषणानें । म्हणे काय जी स्वामिया कोण वेळा । उभा रावणू तो पिटावा नृपाळा ॥७०॥
सुमित्रासुता मारिलें तो उभासे । कपीवाहिनीं थोर आकांत भासे । प्रभी शोक सांडोनि वेगें उठावें । धनुर्बाण घेऊनियां सिद्ध व्हावें ॥७१॥
रणीं रावणें भेदिला ब्रह्मचारी । मिळाले कपी देखिल्या दैत्यहारी । बळें हांक देऊनि क्रोधें नरेंद्रें । सिमा सांडली रामकाळग्रिरुद्रें ॥७२॥
करीं बाण कोदंड चंड प्रतापी । रणीं रावणा भासला काळरूपी । पुढे देखतां पातली कंपवेळा । उभा राम ग्रासील नेणों भुगोळा ॥७३॥
चळें सूटला रावणा कंप देहीं । भयें भूलला न स्मरे युद्ध कांहीं । पडे चांचरे धांवतां थोर धाकें । पुढें पाहतां राम सर्वत्र देखे ॥७४॥
रणीं पाडिलीं दैत्यकूळें अपारें । तया रावणा लागले घायवारे । बळें झोडितां थोर नेटें पळाला । चळीं कांपतो गर्वताठा गळाला ॥७५॥
रणीं भ्रष्टला तो भयातूर जाला । पुढें रावणू मंदिरामाजिं गेला । समाचार मंदोदरीलगिम बोले । म्हणे आजि युद्धीं बहू कष्ट जाले ॥७६॥
समाचार तो सर्वही सांगताहे । म्हणे काय होणार ते होते आहे । बहूतापरी तूं मला शीकवीलें । परी मूर्ख मीं सर्वही तुच्छ केलें ॥७७॥
करूं काय आतां प्रिये सांग वेगीं । बहू बोलतां जाहला ते प्रसंगीं । त्बरें काळनेमी पुढें पाठवीला । स्वयें शीघ्र ऊठोनि होमास गेल ॥७८॥
पुढें चालिला वीर तो काळनेमी । बहूसाल तो थोर कापट्यकर्मीं । हनूमंत जाईल द्रोणागिरीला । पथामाजिं तो बैसला योग केला ॥७९॥
वने कर्दळी पोफळी नारिकेळी । वनें आंवळी जांवळी रम्य वोळी । बहू वृक्षजाती बहू पुष्पजाती । बहू कूप बावी तळीं ओघ जाती ॥८०॥
वनें पावनें जीवनें भूवनें तीं । सुखें गोमुखें रम्य वृंदावनें तीं । तिरें सुंदरें बांधले सारवाटे । अकस्मात ते देखतां सौख्य वाटे ॥८१॥
रणीं पाडिली वीर सौमित्र जेथें । मिळाले कपी ऋक्ष ते सर्व तेथें । सभस्तां मनीं लागली थोर चिंत्ता । कपी बोलती नासलें कार्य आतां ॥८२॥
पुढें राघवा शोक तो आंवरेना । धरीतां बळें धीर पोटीं धरेना । मिळाली दळें भोंवतीं दैन्यवाणीं । विलापें वदें राम कारुण्यवाणी ॥८३॥
पुढें बोलतां जाहला वैद्य तेथें । प्रभू शोक केल्या पुढें काय होतें । म्हणे औषधी शीघ्र आतां अणाव्या । न जातां निशी सर्व देहीं पिळाव्या ॥८४॥
बहूसाल तो पंथ दूरस्थ आहे । करा वेग हा काळ जातो न राहे । समस्तांकडे पाहिलें राघवानें । कपी बोलते जाहले सर्व मानें ॥८५॥
बळासारिखी बोलिली सर्व सेना । निशीमाजिं तो आचळू आणवेना । रघूनायकें पाहिलें मारुतीला । कपीराज तो शीघ्र ऊदीत जाला ॥८६॥
म्हणे राम गा मारुता ये प्रसंगीं । विरांसारखी शक्ति तूं बोल वेगीं । वदे मारुती स्वामि देवाधिदेवा । गिरी आणितों शीघ्र सांगाल तेव्हां ॥८७॥
तयें बोलतां राघवा सूख जालें । कपीतें प्रतीउत्तरीं गौरवीलें । म्हणे मारुती जाय गा हे प्रसंगीं । गिरी आणिला पाहिजे रात्रभागीं ॥८८॥
म्हणोनि तुवां शीघ्र आतांचि जावें । विरा लक्ष्मणालगिं त्वां ऊठवावें । कपी मारुती वीर तैसा उडाला । अकस्मात तो आश्रमामाजिं गेला ॥८९॥
स्थळें निर्मिलीं रम्य नानापरींचीं । बहूसाल तों भूवनें कूसरीचीं । मुनी बोलती हो दयाळा बसावें । फळें तोय सेऊनि सूखें रहावें ॥९०॥
म्हणे मारुती राहतां पूरवेना । तृषा लागली धीर पोटीं धरेना । मुनीनें तडागा जळा दाखवीलें । जळा सेवितां थोर आश्चर्य जालें ॥९१॥
जळांतूनि धाविन्नली जी विशाळा । विरें मारुतें देखिलें तीस डोळां । मिठी घातली मारुतें चूर्ण केली । तिच्या मेदमांसें भुमीं तृप्त जाली ॥९२॥
निघाली तियेंतून तें दिव्य कांता । निरूपी सुखें सर्व साकल्य वार्ता । म्हणे राक्षसू बैसला कूडभावें । समर्था प्रभो त्यासि आधीं वधावें ॥९३॥
नव्हे मिथ्य साचार हे सांगतों मी । प्रभो धाडिला रावणें काळनेमी । तयें बोलतां मारुती वाड जाला । ऋषी ऊठला शीघ्र युद्धासि आला ॥९४॥
महावीर राक्षेस कैसा कुकमीं । बहूसाल ते साहले काळनेमी । प्रसंगीं तये थोर संग्राम जाला । कपीच्या करें काळनेमी निमाला ॥९५॥
विरें सुंदरीलगिं उद्धार केला । उडाला बळें तो नभामाजिं गेला । गिरीचंद्र टाकूनियां लागवेगीं । कपीवीर द्रोणाचळीं ते प्रसंगीं ॥९६॥
वटा वेढिता जाहला शेष जैसा । गिरी बांधुनी छेदिला शीघ्र तैसा । उडाला नभामाजिं तो लागवेगें । बळें जातसे मारुती व्योममार्गें ॥९७॥
कपी लागवेगें बळें जात आहे । महीमंडळीं तेज हेलावताहे । अयोध्यापुरीमाजिं । रामानुजानें । कपी भेदिला पाडिला एक बाणें ॥९८॥
मुखीं रामनामावळी बोलताहे । महावीर तो त्यास येऊन पाहे । म्हणे कोण तूं सांग आम्हां कपी रे । बहूसाल तूं दीससी साक्षपी रे ॥९९॥
मुखीं रामनामें सखा वाटतोसी । विरा कोण तूं कोठपर्यंत जाशी । म्हणे मारुती वोखटें थोर जालें । सुमित्रासुतालगिं देहांत आलें ॥१००॥
समाचार सांगीतला मारुतानें । मुखें बोलिलें शीघ्र रामानुजानें । कपी कष्टलासी बहू दूर जातां । सुखें बाणमूखावरी बैस आतां ॥१०१॥
त्वरें पाठवीतों विरा शीघ्र जावें । पुढें राहिलें कार्य वेगीं करावें । म्हणे मारुती हें कदाही घडेना । उडाला नभीं लंघितो देश नाना ॥१०२॥
त्रिकूटाचळीं राम तो वात पाहे । विरें वीर तो सर्वही बैसलाहे । अवस्था बहू लागली आवरेना । बहू रात्र जाली कपी कां दिसेना ॥१०३॥
बहू राम तेथें उतावेळ जाला । अकस्मात तों मारुती शीघ्र आला । कपी सर्व आनंदले गर्जताती । प्रभूलगिं सांगावया शीघ्र जाती ॥१०४॥
मनीं चिंतिलें शीघ्र हातासि आलें । तयासारिखें तें समस्तांसि जालें । सुषेणें रसू काढिला औषधीचा । क्षतामाजिं तो ओतिला अमृताचा ॥१०५॥
सुमितासुतालगिं आरोग्य जालें । समस्तीं विरीं मारुता गौरवीलें । त्वरें ऊठिला वीर सौमित्रबाहो । रघूनायकें देखिला दिव्य देहो ॥१०६॥
कपी राम सौमित्र मेळा मिळाला । गिरी मारुती शीघ्र ठेऊन आला । पुन्हां मागुती भेटती एकमेकां । तया देखतां सूख जालें अनेकां ॥१०७॥
कथा ऐकतां नासतें कार्य होतें । महा विघ्र तें भग्र होऊनि जातें । सुखानंद आनंद नाना विलासी । अखंडीत हे प्राचिती रामदासीं ॥१०८॥


युद्धकान्ड – प्रसंग नववा

म्हणे वीर सौमित्र स्वामी समर्था । बळें तोडिजे थोर चत्वारि चिंता । सुरेशासि ह्या मुक्त आधीं करावें । अरिभ्रातया राज्य हें शीघ्र द्यावें ॥१॥
कपीराज हा राज्य त्यागोनि आला । कपींशीं पुन्हां पाहिजे शीघ्र गेला । प्रभो नीजबंधूस त्या भेट द्यावी । अयोध्यापुरी सर्व सूखी करावी ॥२॥
पुढें शीघ्र त्या रावणाच्या वधांतीं । समाधान तें पाविजेतें समस्तीं । म्हणोनी त्वरें हेंचि आतां करावें । बळें सर्व लोकत्रया सूख द्यावें ॥३॥
वदे रावणानूज वाक्य प्रमाणें । प्रभो कल्पवृक्षातळीं काय ऊणें । परी होम आरंभिला रावणानें । पुरा जालिया भीडिजे त्यासि कोणें ॥४॥
कपीवीर ते पाठवावे भुपाळें । महा होम विध्वंसिजे शीघ्र काळें । अरी रावणू तो रणामाजिं येतां । पुढें पाठवावें तया मोक्षपंथा ॥५॥
प्रभूहेर ते गुप्त लंकेसि गेले । समाचार साकल्य घेऊनि आले । कपींद्राकडे पाहिलें राघवानें । विरां जाणवीलें तया सुग्रिवानें ॥६॥
पुढें ग्रंथसंख्या कपी सिद्ध जाले । सहस्रें दहा वीर मागें मिळाले । हनूमंत तारासुतू जांबुवंतू । गवाक्षू सुषेणू बळी वीर्यवंतू ॥७॥
सुगंधू कपी नीळ तो शर्म नामें । महा मैंद तो द्वीविदू वीरधर्में । सहस्रें दहांशीं बळें सिद्ध झाले । महावीर ते व्योमपंथें निघाले ॥८॥
कितीएक राक्षसे ते रक्षणेशीं । कपींनीं बळें युद्ध केलें तयांशीं । मुखें हांकिती हांकिती थोर नेटें । तयां पूसती रे दशग्रीव कोठें ॥९॥
गुहेचे सुखीं लविली चंड शीळा । तये भोंवतें जाहले वीर गोळा । शिळेनें शिळा फोडिली थोर घातें । कपी चालिले ते गुहेचेनि पंथें ॥१०॥
पुढें मारुती चालिला लागवेगें । कपी चालिले सर्वही मागमागें । महा योगियाचे परी बैसला तो । नभीं पावकू तो भडाडीत जातो ॥११॥
तया हाणिते जाहले द्रूमपाणी । मुखीं हांकिती टाकिती घोर वाणी । शिळा शीखरें हाणिती तो उठेना । कपी लोटती ध्यान त्याचें सुटेना ॥१
कितीएक ते गर्जती कर्णबीळीं । मुखामाजिं ते टाकिती एक धूळी । विरीं वानरीं मांडिलीसे धुमाळी । बहूतांपरी ताडिला होमकाळीं ॥१३॥
बहूतांपरी मांडिले प्रेत्न नाना । परी रावणू कांहिं केल्या उठेना । विरे अंगदें थोर वोचार केला । बळें शीघ्र अंत: पुरामाजिं गेला ॥१४॥
बहूसाल अंत:पुरीं त्या सुनारी । तयांमाजिं मंदोदरी मुख्य नारी । तियेलगिं घेऊनि वेगें उडाला । महावीर तेथें अकस्मात आला ॥१५॥
अलंकार चीरें करें चूर्ण जालीं । बहू कंकणें भूषणें भग्र केलीं । कपी कंचुकी केश ओढूनि घेती । विटंबूनि लोटूनियां शीघ्र देती ॥१६॥
अरे रावणा घे तुझी नीज कांता । जगज्जननी आणिली व्यर्थ सीता । तिचें ऊसणें काढिती द्रूमपाणी । वदे मुख्य मंदोदरी दैन्यवाणी ॥१७॥
अहो प्राणनाथा असें काय केलें । तुम्हादेखतां कीं मला कष्टवीलें । महा रम्य नेत्रीं महाओघ जाती । विलापें करूं लागली ते रुदंती ॥१८॥
करूणास्वरें रावणालगिं बाहे । प्रभू धांव रे वानरू नेत आहे । प्रसंगीं तये थोर आकांत जाला । भुमीकंप होतांचि पाहों निघाला ॥१९॥
पुढें अंगदा लात हाणोनि पाडी । तया जांबुवंतासि वेगें लथाडी । कितीएक ते ताडिले मुष्टिघातें । किती ओढिले पाडिले व्योमपंथें ॥२०॥
नभीं ऊर्ध्व पाहोनि वेगीं उडाला । बळें झोडिलें पाडिलें मारुतीला । धरी हदयीं शीघ्र मंदोदरीला । विवेकेंचि संबोखिलें त्या वधूला ॥२१॥
अहल्या सती ते शिळारूप होती । विचारूनि पाहें नळाची दमंती । बहू कष्टली मुख्य वृंदा पुलोमा । सिता सुदंरी सांगणें काय तुम्हां ॥२२॥
बहुतापरी ते सती तोषवीली । पती धाडितां भूवनांमाजिं गेली । दळें सिद्ध केलीं रथारूढ जाला । रणीं शूर संग्राम सैरा निघाला ॥२३॥
प्रतापें बळें वाहिनी घोर चाले । कपीवीर ते सर्व पूर्वींच गेले । पुढें सोडिता जाहला बाणजाळें । बळें धांवती प्रेरिले दूत काळें ॥२४॥
कपीभार ऊठावले लागवेगें । करीं घेतलीं वृक्ष पाषाण शृंगें । बळें टाकिते जाहले द्रूमपाणी । रणीं रावणें भेदिले सर्व बाणीं ॥२५॥
गळाले महावीर धाकें पळाले । चळीं कांपती राघवा आड गेले । उभा राहिला राम तो वीरा गाढा । करीं घेतला चंड वाढूनि मेढा ॥२६॥
बहू बाण सोडी महावीर कैसा । रणीं क्षोभला काळ कृतांत जैसा । महा वीर ते दोघ सन्मूख आले । बळें सोडिती बाण बाणीं मिळाले ॥२७॥
रणामाजिं ते तोडिती बाण बाणीं । बहू मातली ते विरश्री फुराणीं । पुन्हां रावणें सोडिल्या बाणकोडी । लिलविग्रही राम तात्काळ तोडी ॥२८॥
बहू क्षोभले व्योम संपूर्ण केलें । शरीं दाटलेंसें नभीं थाट जालें । बळें तोडिती एकमेकां विरांचे । पुन्हां मागुती भार येती शरांचे ॥२९॥
रणीं झुंजती ते महा वीरबाहो । मोहो पावले ते भयें केतु राहो । बुधा मंगळा थोर आकांत आला । शनी सोम तो आपधाकें पळाला ॥३०॥
ग्रहानें ग्रहो भूतळालगिं आले । विमानाहुनी देव धाकें पळाले । दिशा दिग्गजां व्यापिल अंतकाळें । चळी द्वीचळी कांपती ते चळाळें ॥३१॥
महावीर ते मातले घोर मारें । दिशा दाटल्या व्यापिलें अंधकारें पुढें पाहतां एकमेकां दिसेना । ध्वनी मातली ऊठले घोष नाना ॥३२॥
महावीर दोघे रणीं स्तब्ध जाले । पुढें पाहतां बाण बाणीं गळाले । पुन्हां मागुती हाणिती एकमेकां । भरें नीकुरें टाकुनी थोर शंका ॥३३॥
पुढें रावणू पन्नगास्रास सोडी । तयें चालिल्या त्या नभीं सर्पकोडी । उभ्या वानरांमाजिं आकांत जाले । मुखें बोलती सर्प रे सर्प आले ॥३४॥
गरूडास्त्र तें राम सोडी भडाडां । नभीं चालिलीं पक्षिकूळें झडाडां । तिहीं तोडिलीं सर्पकूळें तडाडां । कपी गर्जती नामघोषें घडाडां ॥३५॥
पुढें रावणें सोडिलीं तीं अचाटें । नभीं चाललीं थोर गंधर्वथाटें । भुमीं पाय आकाशपंथीं शिसाळें । बहू भार ते धांवले एकवेळे ॥३६॥
निवारावया राम तो तेंचि सोडी । नभामाजिं तें अस्त्र अस्त्रासि तोडी । रणीं रावणू थोर क्रोधाग्रिज्वाळा । रुपें जाहला थोर कर्कोट काळा ॥३७॥
शरा अस्त्र तें सोडिलें लंकनाथें । बहूसाल वर्षाव केला अनर्थें । महासिंह नानापरी सर्प जैसे । महामत्त व्याघ्रापरी बाण तैसे ॥३८॥
अशन्यस्त्र सोडूनि राजीवनेत्रें । असंभाव्य तीं चालिलीं वज्रअस्त्रें । तिहीं सर्वही बाण छेदन नेले । कपीवीर ते थोर आनंदवीले ॥३९॥
तया रावणा कोप पोटी भडाडी । कडाडीत कोपें रणीं बाण सोडी । अकस्मात तो त्यावरी स्पर्श जाला । गडाडीत मेघापरी शब्द केला ॥४०॥
रथारूढ जाला रणीं लंकनाथू । पदीं चालतो रामराजा समर्थू । नभीं देव ते देखवेना तयांला । रथू मातली शीघ्र तो पाठवीला ॥४१॥
बहू अस्त्रमंडीत रत्नीं विराजे । परी अंतकातुल्य तो राम साजे । नभीं दुंदुभीघोष आकाश गाजे । तया रावणा अंतरीं क्रोध माजे ॥४२॥
पुढें बोलतां जाहला घोर वाणी । तुला साह्य जाला रणीं वज्रपाणी । उभा रे रिपू खीळितों आजि बाणीं । तुशीं झुंजतां थोर वाटे शिराणी ॥४३॥
तुझा बंधु म्यां पाडिला एकवेळा । रणामाजिं त्या देखिलें त्वांचि डोळां । तयासारिखें तूज मारीन आतां । पतंगापरी जाळितों जात जातां ॥४४॥
पुढें ऐकतां राम बोले तयासी । म्हणे ऐक रे रावणा गर्वराशी । असंभाव्य रे वैभवें मातलासी । मराया रणीं आजि तूं पातलासी ॥४५॥
म्हणे राम रे रावणा वीरधर्में । रणामाजिं मी तूज मारीन नेमें । पळालसि कोठें तरी हें सुटेना । तुझी मृत्युवेळा कदा पालटेना ॥४६॥
रिपू जाण रे तूजला मृत्यु आला । दिल्हे अक्षयीं राज्य बीभीषणाला । सितेकारणें थोर कापटय केलें । अभाग्या तुझें सर्वही राज्य गेलें ॥४७॥
तयें बोलतां कोपला वीर गाढा । रणामाजिं त्या घडिल्या वज्रदाढा । पुढें शूळपाणी करी सज्ज मेढा । बळें ओढितां चूकला रामवोढा ॥४८॥
कडाडीत घोषें रणीं तेचि काळीं । रघूनायका बैसला बाणभाळीं । असंभाव्य तो कोपला चापपाणी । दशग्रीव तो छेदिला शीघ्र बाणीं ॥४९॥
बळें मारिती वारिती बानजाळें । पुन्हां क्षोभळे धांवती ते उफाळे । रिपू कोपला थोर काळाग्रि जाला । तया रावणा थोर आवेश आला ॥५०॥
प्रतापें रणीं राघवें एकवेळे । बळें फोडिलीं बाणघातें कपाळें । रथी सारथी पाडिलें अश्व जे कां । विरें नीकुरें भेदिलें एकमेकां ॥५१॥
बळें छेदिता जाहला ओष्ट्र दंतीं । बहू बान ते सोडिले व्योमपंथीं । कितीएक ते राघवें चूर्ण केले । कितीएक ते बाण अंगीं बुडाले ॥५२॥
तया देखतां रावणू हांक फोडी । असंभाव्य ते मागुते बाण सोडी । बळें अश्व ते मातली भग्र केला । ध्वजस्तंभ तो शीघ्र छेदून नेला ॥५३॥
भयातूर ते भार गोळांगुळांचे । ऋषी देव गंधर्व इत्यादिकांचे । रणीं आगळें दाखवी लंकनाथू । भयें बोलती मांडिला कीं अनर्थू ॥५४॥
पडे मातली अश्र्व तेही पळाले । ऋषी देव गंधर्व साशंक जाले । कपी बोलती मांडलें विघ्न हें कीं । रणामाजिं त्या रावणें जिंकिलें की ॥५५॥
अगस्ती ऋषी तो रणामाजिं आला । रणीं मंत्र सांगे तया राघवाला । जपे आदरें राम तो मूळमंत्रें । रवी शीघ्र येऊनि दे सारशस्त्रें ॥५६॥
म्हणे राघवा जिंकिशी रावणाला । अती काळ हा वेळ नाहीं तयाला । पुढें राघवें विंघिलें पंच बाणीं । तुरंगू रणीं पाडिले दैन्यवाणी ॥५७॥
रणीं राघवें चूर्ण केलें रथाचें । बळें ऊसनें घेतलें मातलीचें । विरें सारथी धाडिला मृत्युपंथें । ध्वजस्तंभ तो पाडिला बाणघातें ॥५८॥
पुन्हां राघवें मागुती तेचि काळीं । रिपू भेदिला बाणजाळीं कपाळीं । सुरां देखतां थोर आनंद जाला । महाद्‍भूत तो वानरीं घोष केला ॥५९॥
असंभाव्य त्या राक्षसा कोप आला । बळें टाकिलें शीघ्र तेणें शुळाला । रणीं फोडिली हांक नैरृत्यनाथें । म्हणे शूळ आला प्रभो व्योमपंथें ॥६०॥
बहू बाणसंहार जातां जळाला । पुढें शूळ पाशूपतें भग्र केला । पुन्हां राघवें थोर संधान केलें । असंभाव्य ते पोकळीमाजिं नेले ॥६१॥
सुरेशें गिरी फोडिला वज्रघातें । तयाचे परी भेदिलें रावणातें । देहे खीळिला बाण पैलाड गेला । महीमंडळामाजिं जातां निवाला ॥६२॥
पुन्हां सोडिलीं राघवें बाणजाळें । बहूसाल सूसाटती अंतराळें । रथीं खीळिला प्राण व्याकूळ जाला । बहू मूर्छना सांवरेना तयाला ॥६३॥
रिपू भेदिला थोर लक्षून वर्में । उभा राहिला राम तो वीरधर्में । रथू सारथी शीघ्र घेऊनि गेला । पुढें शुद्धि जाली तया रावणाला ॥६४॥
बहू कोप आला तया रावणासी । म्हणे सारथ्या तूं भयातूर होसी । रथू काढिला कां तुवां लागवेगीं । न येतां उणें दीसतें या प्रसंगीं ॥६५॥
म्हणे सारथी स्वामिया हो उदारा । रिपू पेटला तो रणीं घोर मारा । रथारूढ राया तुम्ही वीकळांगें । म्हणोनी रथू काढिला लागवेगें ॥६६॥
तये बोलतां राव संतुष्ट जाला । समर्पीतसे हातिंच्या कंकणाला । बहू वेग केला तया लंकनाथें । रथू फीरविला रणाचेनि पंथें ॥६७॥
रणीं माजल्या त्या बहू प्रेतराशी । पुढें जावया वाट नाहीं रथासी । भुमी दाटली मेदमांसें अचाटें । रथांगें बळें वाजती चर्चराटें ॥६८॥
समारंगणीं रावणू शीघ्र आला । वदे घोरवाणीं तया राघवाला । उलंघी सिमा शीघ्र मृत्यू जयाळा । रणीं कोण लेखा तुला मानवाला ॥६९॥
असंभाव्य तो रावणू बाण सोडी । नभीं वावडीचे परी ते झडाडी । उफाळें बलें धांवती दिव्य घोडे । रथामाजिं संघट्टणीं घोष गाढें ॥७०॥
धुरा ऊलथों पाहती शीघ्र मागें । विरीं ओडिले बाण ते लागवेगें । रथामाजिं तो पैसा ऊदंड जाला । विरां मागुतां थोर आवेश आला ॥७१॥
रणीं राघवा रावणा युद्धकाळू । रिपूभारसंहार भूतां सुकाळू । करीं चंड कोदंड मंडीत बाणीं । उभे राहिले वीर ते वज्रठाणी ॥७२॥
रणीं एकमेकांसि ते घोर शब्दें । बहू भाषणें त्रासती वीर द्वंद्वें । बळें धांवती क्षोभले वीर क्रोधें । पुढें मारिती शस्त्र क्रोधें विरोधें ॥७३॥
रणीं लोटला राम हा सूर्यवंशीं । महायुद्ध आरंभिलें रावणाशीं । उभे राहिले काळकृत्तांत जैसे । महावीर त्या घोर आकांत भासे ॥७४॥
बळें सोडितां शक्ति नेटें सरारी । महावात प्रख्यात पिच्छीं भरासी । मही सप्तपाताळ घोषें गरारी । पळालीं भुतें काळ पोटीं थरारी ॥७५॥
फणी कूर्म वाराहू चक्कीत जाले । विमानांहुनी देव ऋषी पळाले । ग्रहो सोम सूर्यादि पोटीं गळाले । कपी खेचरां दिग्गजां कंप जाले ॥७६॥
प्रसंगें तयें थोर उत्पात जाला । नभीं शोणिताचा बळें पूर आला । धुमारा बहू दाटलासे दिगंतीं । असंभाव्य ते ऊलकापात होती ॥७७॥
बळें कोपले रुद्र कालग्रि जैसे । अरीराय ते मातले भीम तैसे । तया झुंजतां कोण कोणा निवारी । रणीं भीडती काळ कोदंडधारी ॥७८॥
रिपू सांडिती वोर शस्त्रें झणाणा । बळें वाजती बाणभाळी खणाणा । बहूसाल स्फुलिंग जाती फणाणा । महीमंडळीं घोष ऊठे दणाणा ॥७९॥
महाशक्ति ते काळरूपें कडाडीं । असंभाव्य ते ज्वाळवन्ही भडाडी । मही मेरु मंदार घोषें गडाडी । बळें शोषला सिंधु पोटीं तडाडी ॥८०॥
पुढें राघवें लक्षिलें रावणातें । बळें मस्तकें तोडिलीं बाणघातें । गिरीशीखरांचे परी तीं विशाळें । पुन्हां नीघती कंठनाळें ढिसाळें ॥८१॥
शिरें देखतां राम चक्कीत जाला । म्हणे मृत्यु नाहीं गमे रावणाला । वदे मातली स्वामि देवाधिदेवा । सुधा वक्ष भेदून शत्रू वधावा ॥८२॥
कुपी फोडिली बाणघातें निघातें । तयें रावणू चालिला मृत्युपंथें । ऋषी देव गंधर्व ते सर्व तोषें । विमानीं सुखें गर्जती नामघोघें ॥८३॥
नभीं दुंदुभीं वाजती एकनादें । बहुतांपरींचीं बहूसाल वाद्यें । ध्वनी दाटले पूर्ण ब्रह्मांड घोषें । कपी गर्जती नामघोषें विशेषें ॥८४॥
सुखानंद आनंदली सर्व सृष्टी । विमानाहुनी जाहली पुष्पवृष्टी । ऋषी देव गंधर्व सर्वै मिळाले । विणे लाउनी नारदादीक आले ॥८५॥
मिळाल्या सुखें नायिका अष्ट भावें । करी ताळ मुंर्दग वीणे स्वभावें । कळा कौतुकें दाविती ते प्रसंगीं । गुणी नाचणी नाचती रागरंगीं ॥८६॥
बहू गायनें थोर गंधर्व गाती । कळा ऐकतां देव थक्कीत होती । जयाच्या अलापें देहेभाव जाती । मृगें श्वापदें लाभल्या त्या द्विजाती ॥८७॥
रुपें सुंदरीं किन्नरी दिव्य यंत्रें । बहूसाल विद्याधरी गूणपात्रें । उठे रागकल्लोळ सप्त स्वरांचा । गमे ओळला मेघ हा अमृताचा ॥८८॥
तुरें वाजती अंबरीं शंख भेरी । जयो पावला राम लीलावतारी । सुरांमानसीं थोर आनंद जाला । महा घातकी रावणू तो निमाला ॥८९॥
समस्तां सुरांमानसीं सौख्य जालें । परी दु:ख बीभीषणा प्राप्त जालें । रणीं रावणू श्रेष्ठ बंधू निमाला । झळंबे मनीं शोक उत्पन्न जाला ॥९०॥
रुदंती प्रसंगीं ध्वनी घोष जाला । झळंबे मनीं दु:ख बीभीषणाला । अहा हो अहा हो मुखीं बोलताहे । विलापेंचि तो श्वास टाकीत आहे ॥९१॥
बहू लोटले ओघ नेत्रोद्काचे । दिनासारिखे शब्द कारुण्यवाचे । घडीनें घडी तो भुमीं अंग घाली । अरे भ्रातया शुद्धि सर्वै उडाली ॥९२॥
देहेभाव सांडून तो रूदताहे । मोहोजाळ होतांचि आक्रंदताहे । बहुतांपरींचे बहू सौख्य दीलें । मनामाजिं तें सर्वही आठवीलें ॥९३॥
मुखें श्वास सोडोनि पाणी चुरीतो । भुमीं मस्तकू आपटीतो पिटीतो । म्हणे वीर तो ओखटा काळ आला । त्रिकूटाचळाचा अलंकार गेला ॥९४॥
नव्हे रावणासारिखा संपतीचा । नव्हे रावणासारिखा वित्पतीचा । बहू सांगतां वैभवालगिं कांही । प्रतापी तयासारिखा वीर नाहीं ॥९५॥
मनाचा उदारू धनाचा कुबेरू । बहूसा विचारू जनीं दानशूरू । गळाला बहू धीर त्या राक्षसांचा । महीमंडळीं धाक गेला सुरांचा ॥९६॥
बहूतां जनांचें बहू भाग्य गेलें । गमे सर्व ब्रह्मांड हें ओस जालें । जयाकारणें देव लीलावतारी । तयाच्या गुणा तूळणा कोण सारी ॥९७॥
उदासीन वाटे जनीं पाहवेना । मनीं स्वस्थ नाहीं तया राहवेना । गताचे गुणें वीर तो भग्र जाला । तयालगिं वारावया राम आला ॥९८॥
उभा चाप्रपाणी वदे रम्य वाणी । सदा सर्वदा गाइजे जो पुराणीं । म्हणे गा विरा थोर आश्चर्य जालें । मोहोसागरीं ज्ञानतारूं बुडालें ॥९९॥
तयासारिखें आजि हेम दीसताहे । प्रभू बोलतां वीर तात्काळ राहे । करीं घेतलें शीघ्र बीभीषणाला । कृपाळू दिनाचा दळामाजिं आला ॥१००॥
म्हणे राम बीभीषणा बुद्धिवंता । रणीं रावणालगिं देहांतवेथा । तुम्हीं शीघ्र आतां पुरामाजिं जावें । संमस्तांसि पाहावया आणवावें ॥१०१॥
समर्थामनीं लागली सर्व चिंता । परी अंतरीं जाणतो सौख्यदाता । तयाची कथा ऐकतां दु:ख नासे । चरित्रें बरीं अंतरीं दास तोषे ॥१०२॥


युद्धकान्ड – प्रसंग दहावा

तया रावणालगिं देहांत आलें । प्रधानासि बीभीषणें पाठवीलें । तुम्हीं शीघ्र अंत:पुरामाजिं जावें । समस्तांसि तात्काळ घेऊन यावें ॥१॥
प्रभू बोलतां वीर तैसे निघाले । पुढें शीघ्र अंत:पुरामाजिं गेले । समस्तां वधू मार्ग लक्षीत होत्या । उदासीन उद्विग्र चिंतातुरा त्या ॥२॥
तया देखिले ते अकस्मात डोळां । भयातूर त्या कंप सूटे चळाळां । तयांमाजिं मंदोदरी मुख्य नारी । तये सांगती हो निमाला मुरारी ॥३॥
प्रसंगीं तये थोर कल्लेळ जाला । दुखमाजिं तो सौख्यसिंधू बुडाला । भुमीं लोळती रूदती एकवेळा । देहे व्यस्त हाणोनि घेती कपाळा ॥४॥
समस्तां जणींचे महा शब्द जाले । दुखाचे तया योग सर्वै मिळाले । मुखें बोलती थोर कल्लोळ जाला । समस्तां सुखांचा अळंकार गेला ॥५॥
धळी टाकिती ऊर हाणून घेती । धरेना असंभाव्य जाली रुदंती । चिरें फाडिती ते अळंकार गेले । भुमीं लोळती मोकळे केश जाले ॥६॥
पुढें सर्व राजांगना त्या निघाल्या । दशग्रीव जेथें रणामाजिं आल्या । रणीं कांत देखून आकांत केला । बहू पाप हो ओखटा काळ आला ॥७॥
अकस्मात तें सर्व सौभाग्य गेलें । समर्था प्रभू कां उदासीन केलें । समस्तांसि शोकार्णवीं बूडवीलें । असंभाव्य हें दू:ख ठाकूनि आलें ॥८॥
म्हणे राम बीभीषणा जाय आतां । बहूतांपरी तोषतावें समस्तां । निमाल्यावरी वैर कां हो करावें । विवेकेंचि मंदोदरी नीववावें ॥९॥
कृपासागरें वीर तो पाठवीला । अक्रस्मात राजांगनांमाजिं आला । प्रबोधेंचि नानापरी तोष केल्या । समस्तीं जणीं भूवना पाठवील्या ॥१०॥
पुन्हां मागुती वीर तात्काळ आला । म्हणे हो प्रभू पाठवीलें तयांला । वदे मागुता राम बीभीषणाला । रणीं रावणू अग्रि द्या जा तयाला ॥११॥
पुढें ऊठला तो रणामाजिं आला । हुताशीं तया रावणा वीधि केला । समुद्रीं शुचिष्मंत होऊनि आला । नमस्कार केला तया राघवाला ॥१२॥
वदे राम तैसाचि त्या बांधवातें । कपीनाथ सुग्रीव राजा तयांतें । तुम्हीं शीघ्र नैरुत्यआथासि न्यावें । विधीयुक्त भद्रासनीं बैसवावें ॥१३॥
महावीर तींही नमस्कार केले । पुढें सव्य घालूनि तैसे निघाले । सवें चालती ते असंभाव्य सेना । ऋषी देव ते रूढ झाले विमाना ॥१४॥
बहूसाल वाद्यध्वनी घोष जाला । बळीं गर्जती नाद गेला भुगोला । कपीनाथ सौमित्र ते राजभारें । दळें चालिलीं वानरांचीं अपारें ॥१५॥
महादूत वेगीं पुढें पाठवीले । बळें सिद्ध लंकापुरीमाजिं गेले । त्वरें लविले काम पूर्वींच तींहीं । बहू वेग त्या राक्षसां वानरांही ॥१६॥
बहूसाल कामार ते लक्ष कोटी । स्थळें सिद्ध होतां असंभाव्य दाटी । प्रसंगीं तया तांतडी फार जाली । पहाया सुखें लोकमांदी मिळाली ॥१७॥
शिडया पायिंच्या उंच आकाशपंथें । असंभाव्य तें लागलें काम तेथेम । बहू जाणते वेग मोठया बळाचा । पुरीमाजिं तो एक मेळा तयांचा ॥१८॥
कपींच्या करें अल्पशी भग्र जाली । पुरी मागुती सर्वही सिद्ध केली । त्रिकूटाचळीं भव्य चत्वार द्बारें । विशाळें नभासारखीं थोरथोरें ॥१९॥
दिसे रम्य लंकापुरी कांचनाची । बरी पाहतां हांव पूरे मनाची । हुडे कोट गेले नभामाजिं उंची । जगीं धन्य निर्माण केली विरंची ॥२०॥
पहाया गवाक्षें लघू दीर्घ द्वारें । बहूसाल जाळंधरें थोरथोरं । असंभाव्य चर्या गिरी तो विलासे । वरी सर्व रेखाटिलें व्योम भासे ॥२१॥
बहु कोट दामोदरें थोरथोरें । सजे बाहुडया चौक नाना प्रकारें । महा मंदिरें सुंदरें थोरथारें । भुयेरें बरीं वीवरें तीं अपारें ॥२२॥
बहू चित्रशाळा बहू होमशाळा । बहू सुंदरा धर्मशाळा विशाळा । तके थोर वृदावनें पार ओटे । सभामंडपीं देखतां सौख्य वाटे ॥२३॥
बिदी हाट बाजार माडया दुकानें । मठया पर्णशाळा महा यागस्थानें । वनें वाटिका जीवनें ओघ जाती । झरे कालवे वाहती पाट जाती ॥२४॥
ध्वजा गोपुरें शीखरें तीं अपारें । बहू देव देवालयें थोरथोरें । तळीं कूप बावी जळ पूर्ण जालीम । बहूतांपरींचीं स्थळें सिद्ध केलीं ॥२५॥
बळी झाडिती लोटती सर्व शाळा । सडे शिंपिती घाडिती रंगमाळा । सुगंधी बहू गुंफल्या पुष्पमाळा । जळें निर्मळें बैसका त्या सुढाळा ॥२६॥
सुवर्णाचिया रत्नमंडीत भिंती । हिरे पाच गोमेद ते ढाळ देती । सडे शिंपिले कस्तुरी केशरानें । बहूसाल तीं रम्य यानें विमानें ॥२७॥
ध्वजा त्या गुढया तोरणें ऊभवीलीं । पुरी सर्व शृंगारमंडीत केली । पताका निशाणें वरी दिव्य छत्रें । बहू चामरें दिव्य मांर्तडपत्रें ॥२८॥
तया राजद्बारीं बहू दाटि जाली । सभामंडपीं मंडळी ते मिळाली । पुढें रावणानूज शृंगारवीला । विधीयुक्त बैसवीला ॥२९॥
धमामा नभीं दुंदुभीनाद जाला । सुरीं अंबरीं पुष्पर्षाव केला । रघूनायकें सेवका राज्य दीलें । सुरां सोडिलें थोर आन्मदवीलें ॥३०॥
असंभाव्य तो वाद्यकल्लोळ जाला । निशाणावरी तो विरीं घाव केला । महावीर संतोषले राज्यतोषें । बहूसाल ते गर्जती नामघोषें ॥३१॥
समस्तांजणांचें बहू पाप गेलें । सुरांचें महा शल्य निर्मूल केलें । यथासांग लंकापुरी ते प्रसंगीं । विरीं वानरीं पाहिली लागवेगीं ॥३२॥
पुढें सर्वहि वीर तैसे निघाले । रघूनायका भेटले स्वस्थ जाले । समाचार ते सर्वही सांगताती । जगन्नायका थोर आनंद चितीं ॥३३॥
म्हणे राम गा मारुती ये प्रसंगीं । अशोकावना जाय तूं लागवेगीं समाचार सांगे तये सुंदरीला । कपीवीर तो शीघ्र तैसा निघाला ॥३४॥
अशोकीं वसे जानकी शोक भारी । अकस्मात तेथेंचि आला वनारी । नमस्कार घालूनि तो बोलताहे । सुवेळे समस्तांस कल्याण आहे ॥३५॥
दशग्रीव संहारला लंकवासी । प्रतापें दिलें राज्य बीभीषणासी । प्रभूनें समाचार हा सांगवीला । तंई जानकी थोर आनंद जाला ॥३६॥
स्तुतीउत्तरें बोलती एकमेकां । सिता तोषली दूरि टाकूनि शंका । म्हणे मारुती हा समाचार नेतों । पुढें जावया शीघ्र जाऊनि येतों ॥३७॥
नमस्कार केला तये जानकीसी । म्हणे रे कपी तूं चिरंजीव होसी । त्वरें चालिला भेटला राघवाला । पुन्हां मागुती पाठवीलें तयाला ॥३८॥
म्हणे गा विरा सांग बीभीषणातें । वना जाउनी आणिजे जानकीतें । दिजे मंगळस्नान नाना प्रकारें । सुगधें फुलेलें अलंकार चीरें ॥३९॥
महावीर ते शीघ्र तैसे निघाले । पहाया सिता सर्वही सिद्ध जाले । बहूसाल वाद्यें दळेंशीं निघाले । कपी लागवेगीं त्रिकूटासि गेले ॥४०॥
सुवेळाचळामाजिं तो रामराजा । पहा तया चालिल्या देवफौजा । मदोन्मत्त ऐरावतारूढ जाला । सुरांशीं सुरेशू पुढें शीघ्र आला ॥४१॥
पुढें शीघ्र मेषारुढ पावकानें । करीं शुभ्र शक्ती तया ताम्रवर्णें । बहू भूषणें देव तो अग्नि आला । सुखे चालिला राम पाहावयाला ॥४२॥
पहा दंडपाणी महामेघ जैसा । तयालगिं बैसावया थोर ह्मैसा । पती दक्षिणेचा तदारूड जाला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥४३॥
नरारूढ होऊनि नैरृत्यनाथें । त्वरें जाइजे धूम्रवर्णें समर्थें । करीं खड्‍ग घेऊनियां सिद्ध जाला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥४४॥
जळाधीश नक्रीं समारूढ जाला । करीं पाश तो शीघ्र घेऊनि आला । सवें सागरांचा समूदाव आला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥४५॥
निळा वर्ण तो वायु अंकूशपाणी । मृगारूढ होवोनियां नीळवर्णीं । सुताच्या गुणें आवडीनें निघाला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥४६॥
गदा घेउनी तो प्रभू उत्तरेचा । हयारूढ तो शुभ्र वर्णू तयाचा । महा सुंदरू तो सुधारूप आला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥४७॥
रुपें कर्दळीसूत तो शूळपाणी । जपे अंतरीं रामरामेति वाणी । महादेव नंदीवरी रूढ जाला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥४८॥
गणेंशीं गणाधीश अंकूशपाणी । चतुर्भूज तो भव्य सिंदूरवर्णीं । महास्थूळ तो मूषकारूढ जाला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥४९॥
सुरांचा गुरू आंगिरा दूसरा तो । प्रतापें कुबंरू धनाचा बळो तो । रथारूढ होऊनि मार्तंड आला । सुखें चालिला राम पाहावयाला ॥५०॥
विधी मुख्य हंसासनीं सृष्टिकर्ता । तयाचेनि उत्पत्ति हा विश्वभर्ता । ऋषी देव गंधर्वमेळा मिळाला । सुखें चालिले राम पाहावयाला ॥५१॥
गुणी नाचणी गायका स्वर्गवासी । अलापें कळा कूशळा त्या विलासी । दळें भूतळीं चालिले देव कोटी । बहूतांपरी चालिले रामभेटी ॥५२॥
सदाशीव तो शीघ्र भेटीस आला । पदीम चालि तो राम सन्मूख आला । प्रितीने सखे भेटती एकमेकां । तया भेटतां सौख्य जालें अनेकां ॥५३॥
विरंचीस आलिंगिलें राघवानें । बहू सूख तें मानिलें ब्रह्मयानें । पुढें भेटला शक सूखे निवाला । तया मानसीं थोर आनंद जाला ॥५४॥
ऋषी देव गंधर्व सर्वै मिळाले । पुढें राम आलिंगनीं सिद्ध जाले । समस्तांसि तो भेटला रामचंद्र । महीं लोटला सर्वसूखें समुद्र ॥५५॥
सभा बैसली सर्वही स्वस्थ जाली । कथा राहिली पाहिजे चालवीली । रघूनायकें मारुती पाठवीला । त्वरें शीघ्र लंकापुरीमाजिं गेला ॥५६॥
पुढें भेटला शीघ्र बीभीषणातें । बहूसाल सन्मानिलें मारुतातें । तयालगिं उंचासनीं बैसवीलें । म्हणे आजि हें भाग्य माझें उदेलें ॥५७॥
सखा वाटसी राघवें धाडिलासी । बहूसाल तें सौख्य जालें मनासी । प्रभूची मला काय आज्ञा करावी । शिंरीं वंदितों मी करन्यास दावी ॥५८॥
पुढें मारुतें मात ते जाणवीली । म्हणे जानकी वैभवें आणवीली । महावीर ते शीघ्र तैसे निघाले । दळेंशी अशोकावनामाजिं गेले ॥५९॥
बहूसाल यानें गजां घोडियांचीं । सर्व चालिलीं दिव्य सूखासनाचीं । महावीर ते सर्व येऊनि मागें । त्वरें वीर ते चालिले लागवेगें ॥६०॥
पुढें भेटते जाहले जानकीला । नमस्कार साष्टांग केला तियेला । अनूवादिजे शीघ्र नैरृत्यनाथें । तुम्हां न्यावया पाठवीलें समर्थें ॥६१॥
तरी जन्ननी शीघ्र आतां उठावें । महा मंगलस्नान आधीं करावें । अळंकार चीरें पुढें सिद्ध केलीं । सुगंधेल तेलें बहू आणवीली ॥६२॥
बहूसाल आनंद तो जानकीला । स्तुतीउत्तरीं गौरवीलें तयाला । म्हणे मारुती जन्ननी मान दीजे । उदासीन बीभीषणाला न कीजे ॥६३॥
कपी बोलतां मान्य ते गोष्टि केली । सवें राक्षसी शीघ्र तैशी निघाली । बहूसाल उष्णोदकें सिद्ध होती । बहू कूशळा राक्षसी माखि ताती ॥६४॥
स्तुतीउत्तरीं माखिलें जानकीला । म्हणे आजिंचा दीन हा धन्य जाला । चिरें सुंदरें कंचुकी रत्नमाळा । सुगंधी बहू घातल्या पुष्पमाळा ॥६५॥
अळंकार भांगार जांबूनदाचे । महीमंडळींच्या नृपाळांत कैंचे । तया मारुतें बैसका सिद्ध केली । जगज्जन्ननी बैसली सिद्ध जाली ॥६६॥
पुढें ठेविलें पात्र दूधाफळांचेम । शकूनार्थ द्यावें म्हणे रम्य वाचें । दिलीं पंचकें दोनि दोघां जणांला । कपी मारुती आणि बीभीषणाला ॥६७॥
जिवाच्या सख्या राक्षसी जानकीच्या । बहू दीस होत्या वनीं संगतीच्या । दिलीं पंचकें दोन दोघीं जणींला । महाशर्म नामें तये त्रीजटेला ॥६८॥
म्हणे जानकी लोभ आतां असावा । उदासीन वाटे बहूसाल जीवा । समस्तां जणांतें फळें पाठवीलीं । मुखें जानकीनें बहू स्तूति केली ॥६९॥
फळें सेविलीं आच्मनें शुद्धि केलीं । पुढें शीबिका ते विरें आणवीली । पताका चिरें सुंदरें दिव्य छत्रें । पुढें विंजणे चामरें तें विचित्रें ॥७०॥
दळें चाललीं दाटणी थोर जाली । सिता शीबिकेमाजिं तैशी निघाली । तुरें सुंदरें गंभिरें वाजताती । असंभाव्य वाद्यें ध्वनी गर्जताती ॥७१॥
महा सुंदरें रम्य दिव्यांबरें ते । वरी सर्व आच्छादिलें शीबिकेतें । पुलस्ती कपी वीर सन्नीध जाती । पुढें वारिती वेत्र घेऊनि हातीं ॥७२॥
अशोकावनींहूनि ते लागवेगें । बहूवीध सन्नीध येती प्रसंगें । सवें चालिले लोक त्रीकृटवासी । पहाया अती आदरें जानकीसी ॥७३॥
सभे बैसला देव कैलासवासी । गणाधीश तो ईश सर्वां गुणांसी । विधी शक्र ते सर्व गंधर्व आले । ऋषी देव तेतींस कोटी मिळाले ॥७४॥
मिळाले कपी रीस कोटयानुकोटी । सिता आणितां जाहली थोर दाटी । शतांचीं शतें धांवती वेत्रपाणी । दळें वारिती गर्जती घोर वाणीं ॥७५॥
पहाया सिता वीरमांदी मिळाली । प्रसंगीं तये दाटणी थोर जाली । बळें टाकिती एकमेकांसि मागें । कपी रीस ते धांवती लागवेगें ॥७६॥
झडा घालिती एकमेकां पुढारें । दिसेना पदीं सर्व सेना उभारें । पुढें पाव्हया घालती मस्तकांतें । महा वीर ते हाणिती वेत्रघातें ॥७७॥
कितीएक आकाशपंथीं उडाले । कितीएक ते वृक्षअग्रीं दडाले । कितीएक ते फीरती अंतराळीं । कितीएक ते घोष उल्हासकाळीं ॥७८॥
कपींचीं दळें चचळें फार जालीं । महाभार देखोनि मागें पळालीं । बळी गर्जती थोर घोषें फुराणें । वरी साधती अंतराळीं किराणें ॥७९॥
महाभार देखोनि माहाविरांचे । भ्रमों लागले भार गोळांगुळांचे । दिसेना सिता आर्त पोटीं सरेना । उतावीळ त्यां धीर पोटीं धरेना ॥८०॥
कपी धांवती शीघ्र पाहावयाला । परी रीघ नाहीं पुढें जावयाला । प्रसंगीं महा भार देखोनि दृष्टीं । रघूराज तो बोलिला एक गोष्टी ॥८१॥
सितेकारणें वानरीं कष्ट केले । किती वेळ हे बाणघातें निमाले । उतावीळ पोटीं पहाया सितेला । दिसे स्पष्ट ऐसें करावें तियेला ॥८२॥
महोत्साव यात्रा तथा पर्वकाळीं । विवाहीं युधांतीं तया अंतकाळीं । गृहीं सासर्‍याचे तया जन्नकाचे । नव्हे नित्य ते संगतीं नोवर्‍याचे ॥८३॥
पुढें धाडिलें शीघ्र त्या अंगदाला । म्हणे रे तया सांग बीभीषणाला । म्हणावें बळें आपुलें लोक वारा । पुढें शीघ्र येऊनियां दूरि सारा ॥८४॥
त्वरें धांवला राव त्रीकूटवासी । बहू वारिलें मारिलें मारिलें राक्षसांसी । पुढें काढिले पट्टकूळा सकूळा । दिसों लागली जानकी दिव्य बाळा ॥८५॥
समस्तीं सिता देखिली आदरेंशी । असंभाव्य सौंदर्य लावण्यराशी । तये देखतां सर्व सूखें निवाले । कपी बोलती आजि नि:पाप जालें ॥८६॥
सिता देखती जाहली रामचंद्रा । नमस्कार केला तसाची महेंदा । तया राघवें पाहिलें जानकीला । पुढें भूलतां वक्र आव्हेर केला ॥८७॥
उदासीन ते जानकीलगिं केलें । सभामंडळीं सर्व बेरंग जालें । सभेमाजिं ते बोलती एकमेकां । सितेलगिं आव्हेरिलें राघवें कां ॥८८॥
अवस्था नहू लागली ते प्रसंगीं । बुडाले कपी धीर सर्वै विरंगीं । मुखें बोलती सर्वही कोण वेळा । शिणे मारुती कंप जाला भुगोळा ॥८९॥
सभा बैसली त्या द्बिजाब्राह्मणांची । असंभाव्य सौंदर्यता त्या सितेची । कितेकीं मनामाजिं संकेत केला । तिहीं अंतरीं कल्पिले दोष तीला ॥९०॥
रघूनाथ हा हेत जाणे मनींचा । सदा सर्वदा साक्ष सर्वां जनांचा । जिवांतील जाणे तया चोरवेना । महा पातकी पाप त्याचें सरेना ॥९१॥
म्हणोनी प्रसंगें उदासीन केलें । जनीं कल्पिलें सर्वही व्यर्थ गेलें । म्हणे राम तो जानकीलगिं जावें । स्वइच्छा सुखें त्वां दिगंतीं फिरावें ॥९२॥
प्रसंगीं तये शब्दकाठिण्य रामें । मुखें बोलिजे अर्थभेदें विरामें । अधोमूख सीता विलोकी भुमीतें । मही भीजती जाहली अश्रुपातें ॥९३॥
म्हणे न्याय अन्याय सर्वै बुडाला । दिसे आज कल्पतरू वांज जाला । नसे अल्प अन्याय सर्वै बुडाला । दिसे आज कल्पतरू वांज जाला । नसे अल्प अन्याय ब्रह्मांड केला । वृथा दंड हा कोण धर्मै मिळाला ॥९४॥
मनीं अल्प हे कल्पना कां करावी । म्हणे कल्पिली बुद्धि पोटीं धरावी । बहूसाल बोलेनियां काय आतां । महासौख्य तें पावकें भस्म होतां ॥९५॥
म्हणे  जानकी त्या रिसां वानरांसी । बहूसाल ते कष्ट जाले तुम्हांसी । परी मागुती एक जीवीं धरावें । बहूसाल त्या पावका चेतवावें ॥९३॥
पुढें शीघ्र खाणोनियां कुंड केलें । असंभाव्य त्या पावका चेतवीलें । शिखा धांवती ऊर्ध्व आकाशपंथें । पिडा जाहली खेचरां भूचरांतें ॥९७॥
विरंची हरादीक देवां समस्तां । मनामाजिं ते थोर जाली अवस्था । मुखें बोलती सर्वही कार्य जालें । परी मागुती काय हें विघ्र आलें ॥९८॥
स्वभावेंचि हा वन्हि जाळीत आहे । तयामाजिं हे जानकी केंवि राहे । धडाडीत ज्वाळा पुढें पाहवेना । तया अंतरेंही उभें राहवेना ॥९९॥
मनामाजिं पूजा यथासांग केली । पुढें जानकी पावकामाजिं गेली । तये स्पर्शतां पावकू शुद्ध जाला । निवाला प्रसंगीं तये शांत जाला ॥१००॥
तयामाजिं ते जानकी शोभताहे । समस्तीं सभा लोक त्रैलोक्य पाहे । पुटीं घालिजे पूतळी कांचनाची । तयेहूनि ते दिव्य काया सितेची ॥१०१॥
अळंहार चीरें बहू पुष्पमाळा । सुगंधें तनू चर्चली दिव्य बाळा । जगज्जननी शीघ्र बाहेर आली । सभे देखतां दिव्य सीता निघाली ॥१०२॥
महावीर ते गर्जले नामघोषें । कपीवीर ते तोषले सर्व तोषें । सुरीं अंबरी पुषवर्षाव केला । नभीं दुंदुभीनाद कल्लोळ जाला ॥१०३॥
सिता मुख्य ते पावकामाजिं होती । वृथा रावणें चोरिली हे वदंती । रमा सागरांतूनि नेली हरीनें । तयाचेपरी जानकी राघवानें ॥१०४॥
पुढें जानकी रामअंकीं विराजे । रमा आदिनारायणा जेविं साजे । असंभाव्य तो वाद्यकल्लोळ गाजे । कपीवाहिनीमाजिं आनंद माजे ॥१०५॥
जनाच्या मनाकारणें धीर केला । कृपेचा कृपासागरा पूर आला । कृपादृष्टिनें पाहिलें जानकीला । पुढें शीघ्र आलिंगिलें त्या सितेला ॥१०६॥
म्हणे दास हे श्र्लोक रामायणाचे । जरी अल्प सोपेचि नाना गुणांचे । कितीएक पाल्हाळ टाकोनि मागें । कथा चालिली ते पुढें लागवेगें ॥१०७॥


युद्धकान्ड – प्रसंग अकरावा

प्रतापें दिनेशू तपाचा हुताशू । विरांमाजिं ईशू सुरांचा सुरेशू । मुनींचा महेशू महादेव धीशू । सदांचा उदासू वनारण्यवासू ॥१॥
पिनाकी शुळी बोलिजे रुद्रवाणी । जटाभार पंचाननू शूळपाणी । हरू शैलजावल्लभू भक्तपाळू । धराधार मृत्युंजयो तो कृपाळू ॥२॥
महादेव शंभू गिरीजाविलासी । सुवर्णाचळामाजिं कैलासवासी । विराजे रुपें गौर कर्पूर जैसा । दिसे धाम ढौळा सदाशीव तैसा ॥३॥
विषें कंठ काळा दिसे चंद्रमौळीं । फणीधारकू वन्हि साजे कपाळीं । असंभाव्य भोळा गळां रुंडमाळा । पहा मस्तकीं ओघ जाती खळाळा ॥४॥
वसे भस्म अंगीं प्रभू वीतरागी । उदासीन तो सर्व सामर्थ्य त्यागी । विधी शक्र हे सर्व ध्याती जयाला । महादेव तो वर्णितो राघवाला ॥५॥
म्हणे धन्य रामा विरा पूर्णकामा । असंभाव्य सीमा कळेना महीमा । महा थोर अद्‍भूत सामर्थ्य केलें । प्रतापेंचि ब्रह्मादिकां सोडवीलें ॥६॥
प्रसन्न तया रावणालगिं आम्ही । विरंचीवरें मातला पापकर्मीं । ऋषी देव माझे बहू कष्टवीले । समर्था तुवां सर्वही सोडवीले ॥७॥
अखंडीत घेतों तुझें नाम वाणीं । पुजा अंतरामाजिं कोदंडपाणी । बहू काळ होतें बहू आर्त पोटीं । प्रसंगेंचि ये जाहली थोर भेटी ॥८॥
अकस्मात हा भेटिचा लाभ जाला । मनामाजिं अद्‍भूत आनंद जाला । सुराकारणें संकटीं पावलासी । मनोभावना राहिली तूजपाशीं ॥९॥
भविष्योत्तरें बोलिलीं वाल्मिकानें । पहातों चरित्रें तुझीं आवडीनें । विषे पोळला प्राण माझा निवाला । निजध्यास तो लागला पार्वतीला ॥१०॥
समस्तां मनीं लागला ध्यास राम । तुझें रूप ध्यातों सदा योगधामा । बहूसाल हें बोलणें काय देवा । अखंडीत हा लोभ आतां असावा ॥११॥
प्रतीउत्तरें राम बोले महेशा । उदाराधिशा सुंदरा देवधीशा । समर्था प्रभू लोकपाळा नृपाळा । लिळें जाळिशी पाळिशी या भुगोळा ॥१२॥
तुझा योग होतामचि आनंद जाला । पुढें देखता प्राण माझा निवाला । दयासागरा सर्व सांभाळ केला । सुखानंद हेलावला तृप्त जाला ॥१३॥
पुढें बोलता जाहला तो विरंची । म्हणे आजि हे धन्य वेळा सुखाची । तुझा योग होतां घडी अमृताची । बहू स्तूति केली रघूनायकाची ॥१४॥
किती बंधनें पावलों पूर्व पापें । बहू दीस ओसंडिलें मायबापें । बहू कष्ट केलेसि देवाधिदेवा । कृपाळूपणें शीघ्र केला कुडावा ॥१५॥
तुम्हां वेगळे सर्वही दीन झाले । त्रिकूटाचळीं बंदिशाळे मिळाले । दिनासारिखे जाहले दैन्यवाणे । प्रभू आमुचें दु:ख तें कोंण जाणे ॥१६॥
बहू कष्टवीलें तया रावणानें । घडीनें घडी त्रासिलें दुर्जनानें । उमे हानि येतां मनामाजिं चिंता । समस्तांस कोणी नसे सोडवीता ॥१७॥
बहू ओखटी वेळ येऊन गेली । कृपासागरा धांवणी शीघ्र केली । सुतालगिं झेंपावला व्याघ्र तैसा । जगज्जनका तूं समस्तांस तैसा ॥१८॥
स्तुती उत्तरें बाळकू काय जाणे । बरें ओखटें सर्व कांहींच नेणे । मुलें खेळतां मायबापांस चिंता । तयाचेपरी बोलताहे विधाता ॥१९॥
बहू स्तूति केली तया ब्रह्मयानें । कृपाळूपणें वारिलें राघवानें । प्रसंगें विधीचें समाधान केलें । मनीं दु:ख मागील तें सर्व गेलें ॥२०॥
पुढें बोलता जाहला वज्रपाणी । सदा सर्वदा गाइजे जो पुराणीं । तया सुकृताचा बरा काळ आला । प्रभू रामचंद्रा तुझा योग झाला ॥२१॥
बहूतांपरी राघवा ऐकलासी । पुरी पूरली लोचनांची असोसी । पुढें पाहतां देखतां रूप तूझें । जगन्नायका धन्य हें भाग्य माझें ॥२२॥
उणे कोटि कंदर्प हें रूप साजे । सदा सर्वदा योगिध्यानीं विराजे । मुनी शोधिती भक्त कोटयानुकोटी । बहू साधनेंही नव्हे शीघ्र भेटी ॥२३॥
कितीएक योगी उदासीन जाले । गिरीकंदरीं तूज शोधीत गेले । तयां अंतरीं भेटसी अल्प कांहीं । जनीं आमुच्या सुकृता पार नाहीं ॥२४॥
म्हणे इंद्र तो स्वामि देवाधिदेवा । जनीं सेवका आपुलासा म्हणावा । घडेना मला भक्तिभावार्थ नाहीं । प्रभू सांगिजे जी मुखें कार्य कांही ॥२५॥
म्हणे राम गा वज्रपाणी प्रसंगें । रथू मातली धाडिला लागवेगें । तुवां कार्य तें सर्व पूर्वींच केलें | रथारूढ होऊनियां येश आलें ॥२६॥
पुन्हां मागुतें एक आतां करावेम । निमाले कपी ऋक्ष त्यां ऊठवावें । सुधामेघ पाडूनियां लागवेगीं । महावीर ते ऊठवी ये प्रसंगीं  ॥२७॥
मुखें बोलतां जाहला चक्रपाणी । तयें थोर संतोषला वज्रपाणी । प्रसंगीं तये थोर आनंद जाला । नमस्कार केला रघूनायकाला ॥२८॥
जळेशास आज्ञापिलें तेचि काळीं । महा मेघ ते चालिले अंतराळीं । असंभाव्य ते जाहली मेघवृष्टी । तिणें भीजली सर्व ते प्रेतसृष्टी ॥२९॥
कपी रीस ते सर्व आले निमाले । नमस्कारिला राम सैन्यीं मिळाले । कळेना कळा कोण या राघवाची । मनीं कल्पितां हांव पूरे मनाची ॥३०॥
निमाले कपी पावले दिव्य देही । मिळाला रिसां वानरांचा समूहो । सुवेळाचळामाजिं ते भार आले । क्षमारूप तैसेचि सवैं मिळाले ॥३१॥
मिळाले बहू देव कोटयानुकोटी । असंभाव्य दोहीं दळांमाजिं दाटी । मुखें बोलती देव त्या राघवाला । स्तुतीउत्तरीं तोषवीती दयाळा ॥३२॥
प्रसंगोंचि आज्ञा समस्तांस द्यावी । पुन्हां मागुती सर्व चिंता असावी । तुम्ही हो अयोध्यापुरीमाजिं जावें । विलासें बहू राज्य सूखें करावें ॥३३॥
प्रतीउत्तरीं राम बोले समस्तां । म्हणे हो बरें जाइजे शीघ्र आतां । समस्तीं तुम्हीं भूवनामाजिं जावें । विलासें बहू राज्य सूखें करावें ॥३४॥
मुखें बोलतां राम ते देव तोषे । करीं पीटिती टाळिका नामघोषें । नमस्कार केला रघूनायकाला । समस्तां मनीं थोर आनंद जाला ॥३५॥
रवी पावकें काल नैरृत्यनाथें । जळाढयें धनाढयें रघूनायकातें । गुरू अंगिरा देव गंधर्व तेहि । बहू बोलते जाहले सर्व कांहीं ॥३६॥
ऋषी देव गंधर्व सर्वै मिळाले । स्तुतीउत्तरें बोलती शीघ्र जाले । समस्तांसि सन्मानिलें राघवानें । गुणां किन्नरादीक गाती पुराणें ॥३७॥
निरोपेचि त्या चालिल्या देवकोडी । पुढें शीघ्र बीभीषणू हात जोडी । समर्था मला थोर आतां करावें । घडी एक लंकापुरीमाजिं जावेम ॥३८॥
धरावें मनामाजिं देवाधिदेवें । जनीं सेवकालगिं कांहीं घडावें । करावें समर्थें जिणें श्लाघ्य माझें । घडावें महाद्भाग्य हें दास्य तूझें ॥३९॥
प्रतीउत्तरीं राम बोले तयासी । म्हणे धन्य बीभीषणा गूणराशी । प्रसंगें सखा बंधु तूं जोडलासी । पुरेना तुझ संगतीची असोसी ॥४०॥
प्रितीच्या सुखालगिं कैसें वदावें । गुणाच्या गुणाला किती आठवावें । बहूसाल तूं राखिला स्नेहवादू । जनांमाजिं तूं धन्य साधू अगाधू ॥४१॥
स्नेहाळा तुवां आजि ऐसें करावें । पुरीमाजिं त्वां सुग्रिवालगिं न्यावें । विलासें बहूतांपरी सूख द्यावें । कपी ऋक्ष घेऊनि वेगें उठावें ॥४२॥
सखा सुग्रिवासारिखा कोण आहे । मनामाजिं बीभीषणा तूंच पाहे । जिवेंशीं सखा आमुचा साह्य झाला । असंभाव्य हा वीरमेळा मिळाला ॥४३॥
जनीं मैत्रिकी राखिली सुग्रिवानें । बहूसाल हा कष्टला जीव प्राणें । स्वयें देखिलें सांगणें काय तुम्हां । कपी पूजितां पावलें सर्व आम्हां ॥४४॥
पुढें शीघ्र बीभीषणें तेचि काळीं । अती आदरें ठेविलें वाक्य भाळीं । करीं घेतलें प्रीतिनें सुग्रिवाला । म्हणे आजिचा काळ हा धन्य जाला ॥४५॥
समर्था गुणें तूं सखा जोडलासी । तुझा योग हा पार नाहीं सुखासी । कपी ऋक्ष घेऊनि तैसा निघाला । पुढें शीघ्र लंकापुरीमाजिं गेला ॥४६॥
जळें निर्भळें सर्व अभ्यंग केलें । अळंकार चीरें कपी तोषवीले । बहूतांपरींचीं सुगंधें फुलेलें । समस्तांसि नाना रसें तृप्त केलें ॥४७॥
रिसां वानरांला पुजा सांग जाली । बहूसाल बीभीषणें स्तूति केली । महावीर विश्रांति पावून तेथें । निघालें पुढें सर्वही राम जेंथें ॥४८॥
सुगंधीं बहू घातल्या पुष्पमाळा । अनीळें सुखें वास नेला भुगोळा । प्रभूला नमस्कार साष्टांग केले । मिळाले कपी ऋक्ष सूखें निवाले ॥४९॥
सभेमाजिं आली बहूसाल शोभा । पुढें राहिला हात जोडोनि ऊभा । प्रसंगी तये राम बीभीषणाला । सुधाउत्तरीं बोलतां शीघ्र जाला ॥५०॥
म्हणे गा विरा त्वां पुरीमाजिं जावें । ध्रुवाचे परी राज्य तेथें करावें । शशी सूर्य तारागणें अंतराळीं । असावें सुखें भोगिजे सर्व काळीं ॥५१॥
पुढें बोलिलें शीघ्र नैरृत्यनाथें । म्हणे वासना पूरवावी समर्थें । प्रभू बोलतां चित्त माझें न राहे । पहावी अयोध्यापुरी वासना हे ॥५२॥
पुरीमाजिं भद्रासनीं तूं नृपाळा । महोत्साह उत्साह पाहेन डोळां । उदारा प्रभू सौख्य पाहेन संगें । निरोपेंचि मी शीघ्र येईन मागें ॥५३॥
सवे घेतलें वीर बीभीषणाला । रघूराज तो वानरेंशीं निघाला । असंभाव्य तो वाद्यकल्लोळ जाला । पुढें सिद्ध केलें महा पुष्पकाल ॥५४॥
नसे तूळणा रत्नमंडीत याना । महीतुल्य त्या आणवीलें विमाना । तयारूढ तो जाहला राम वेगीं । कपी वीर ते आपुल्याला  विभागीं ॥५५॥
विमानावरी रामराजा विराजे । वरी बैसले ते कपी रीस राजे । सुमित्रासूत बैसला सव्यभागीं । जगन्मात सीता तया वामभागीं ॥५६॥
विमानावरी वाजती घंट माळा । खडे घोष हेलावती मुक्तमाळा । समुद्रोदकीं पूर्ण तारूंच जैसें । नभामाजिं तें चालिलें भव्य तैसें ॥५७॥
पुढें चालतां चालतां लागवेगीं । सितेलगिं ते राम सांगे प्रसंगीं । रणामंडळीं आट राक्षेसकूळा । त्रिकूटाचळू दाखवीली सुवेळा ॥५८॥
असंभाव्य पालणिला सेतु जेथें । स्वयें वास दर्भासनीं योग तेथें । स्त्रिया रत्नमंडीत नानाविलासी । समुदातिरीं भटेला तोयराशी ॥५९॥
बळें आगळा वीर वाळी निमाला । दिलें राज्य तेथें कपी सुग्रिवाला । अकस्मात जाली हनूमंत भेटी । तटाकें नद्या दाखवी वीरजेठी ॥६०॥
जटायू पुढें पावला स्वर्गलोकीं । जनस्थान हें रम्य गोदातटाकीं । पुढें चालतां राम राजाधिराजें । तया राहवीलें ऋषी भारद्वाजें ॥६१॥
कपींचीं दळें भूतळीं दाटि जाली । तया भारद्बाजें बहू स्तूति केली । पुढें धाडिले मारुतीलगिं देवें । म्हणे गा विरा भ्रातया भेटवावें ॥६२॥
प्रभू बोलतां वीर तैसा निघाला । तया गूहकानें नमस्कार केला । स्तुती बोलतां तो सभाचार सांगे । नंदीग्राम तो पावला लागवेगें ॥६३॥
कपी देखिला भव्य रामानुजानें । नमस्कार केला तया बांधवानें । कपी भेटला बैसला स्वस्थ जाला । समाचार साकल्य सांगे तयाला ॥६४॥
म्हणे मारुती बांधवाच्या वियोगें ।  पळें भासती तीं किती काळयूगें । महद्भाग्य आलसि येणें प्रसंगीं । रघूनाथ तो भेटवी लागवेगीं ॥६५॥
उदासीन तो बंधु त्या राघवाचा । वदे मारुतीलगिं कारुण्यवाचा । बहू कष्टलों काळ गेला दुखाचा । कधीं राम भेटेल सिंधू सुखाचा ॥६६॥
वृक्षा संपदा राज्य हें काय कीजे । उदासीन या राघवाला नमींजे । पदें भोगिजे तें भदें बाधिजेतें । दिसेंदीस आयुष्य हें व्यर्थ जातें ॥६७॥
कितीएक ते भाग्य भोगून गेले । पुन्हां भागुती मृत्युपंथें निमाले । कितीएक साधू उदासीन जाले । महीमंडळीं लोक सूखें निवाले ॥६८॥
भले जाणती संपदा दु:ख दाती । स्वहीतापरी त्रास होतो नियंती । हरादीक ते तापसी याच लागीं । सदासर्वदा फीरती वीतरागी ॥६९॥
म्हणोनी मला राघवेंवीण कांहीं । सदा सर्वदा वैभवें चाड नाहीं । मला भेटवीं राम आत्मा जगाचा । वदे मारुतीलगिं तो दीन वाचा ॥७०॥
म्हणे मारुती धन्य गा धन्य साधू । महाशक्ति वीरक्ति बोधें अगाधू । नव्हे साधनें भेटि ब्रह्मादिकांला । तुम्हांलगिं भेटीस तो राम आला ॥७१॥
नमस्कार केला तया मारुतीनेम । रजें डौरलें भाळ माहाविरानें । प्रिती लागली अंतरीं ते ढळेना । म्हणे धन्य गा धन्य लीला कळेना ॥७२॥
तया देखतां चित्त सूखें निवालें । मनामाजिं तें थोर आश्चर्य केलें । म्हणे वीर सद्‍भूत वैराग्य कैसें । महाभाग्य हें मानिलें तृण जैसें ॥७३॥
पुढें वीर रामानुजें काय केलें । पुरीमाजिं शत्रूघना पाठवीलें । समस्तां वसिष्टांदिकां जाणवीलें । असंभाव्य तें सैन्य पालाणवीलें ॥७४॥
म्हणे वीर तो राम येईल आतां । सुखी जाहली मुख्य माता समस्तां । प्रसंगें तये थोर आनंद जाला । पुरीमाजिं तो लोक सर्वे मिळाला ॥७५॥
पुढें शीघ्र पालणिले दिव्य घोडे । महीमंडळीं त्यांस नाहींत जोडे । असंभाव्य तीं हिंसती दिव्य घोडीं । उफाळे तयां धांवतां भूमि थोडी ॥७६॥
मुठाळी झुली पाखरा मुक्तमाळा । बहू रत्नमंडीत भासे उफाळा । अळंकार भांगार भंडीत केले । बहूभार शृंगारिले सिद्ध जाले ॥७७॥
गिरीसारिखी चंड वाडें अपारें । बहू मातलीं कुंजरें थोरथोरें । पताका मुली रम्य दिव्यांबरांच्या । बहू रंग लावण्य नानापरींच्या ॥७८॥
महामस्त ते हस्ति भारें निघाले । त्वरे चालतां भव्य सर्वांग डोले । भुमी हाणतां अंदु वाजे खणाणा । बळें वाजती चंड घंटा घणाणा ॥७९॥
हयारूढ ते वीर कीतीक जाले । धडाडीत सेना असंभाव्य चाले । शिबीका बहूसाल सूखासनातें । पताका निशाणें फडाडीत वातें ॥८०॥
महावीर शत्रूघनू लागवेगीं । सुमंतू प्रधानू तया पृष्टभागीं । बहू वाद्य तो घोष गेला दिगंता । ऋषीराज वासिष्ठ त्या मुख्य माता ॥८१॥
पदीं चालिला मुख्य तो योगिबंधु । सवें घेतला मारुती वीर्यसिंधु । महावीर दोघे पुढें शीघ्र आले । असंभाव्य ते भार मागें उदेले ॥८२॥
पुढें राम तेथूनि वेगीं निघाला । महापुष्पकारूढ होऊनि आला । त्वरें पावतां पावतां नंदिग्रामा । कपी वीर तो दाखवी शीघ्र व्योमा ॥८३॥
असंभाव्य तें तेज हेलावताहे । म्हणे गा कपी काय हें येत आहे । तया सांगतो मारुती राम आला । नभामाजिं तो पुष्पकारूड जाला ॥८४॥
पुढें रामभ्राता नमस्कार घाली । सुखाची असंभाव्य ते वेळ आली । तया देखतां सौख्य अद्‍भूत जालें । वरी पाहतां यान सन्नीध आलें ॥८५॥
पुढें देखिला भव्य तो रामयोगी । असंभाव्य सेना तया पृष्ठभागीं । त्वरें चालतां धांवतो रामभ्राता । नव्हे धीर त्या भेटिचा काळ येतां ॥८६॥
बहू रम्य लावण्य कामावतारी । महा वीर दोघे रुपें योगधारी । तया देखतां रोम अंगीं थरारी । मुखें पाहतां सर्व सेना थरारी ॥८७॥
रुपें सारिखे वीर दोघे मिळाले । सुखाचे बहू कंप रोमांच आले । पदीं ठेविला मस्तकू बांधवानें । तया ऊठवीलें त्वरें राघवानें ॥८८॥
स्फुरद्रूप आलिंगनीं वीर गात्रीं । जळें लोटलीं रम्य राजीवनेत्रीं । तया रामरामानुजां भेटि जाली । प्रसंगीं तये सृष्टि सूखें निवाली ॥८९॥
सुमित्रासुता भेटला वीतरागी । नमस्कारिली जानकी ते प्रसंगीं । खुणा दावितां रामराजाधिराजें । कपीनाथ आलिंगिला योगिराजें ॥९०॥
पुढें भेटिचा लाभ नैरृत्यनाथा । पदीं ठेविला शीघ्र येऊनि माथा । तयालगिं रामानुजें ऊठवीलें । समस्तां विरां राघवें भेटवीलें ॥९१॥
प्रितीं भेटला अंगदा जांबुवंता । प्रसंगें कपी थोर थोरां समस्तां । स्तुतीउत्तरीं बोलती एकमेकां । स्नेहे लागला सौख्य जालें अनेकां ॥९२॥
प्रितीनें तया गूहका भक्तराजा । कृपाळूपणें भेटला रामराजा । नमस्कार केला समस्तां विराला । तयां अंतरीं थोर आनंद जाला ॥९३॥
पुढें सर्वही पुष्पकारूढ जाले । दळेंशी महावीर तैसे निघाले । अयोध्यापुरी देखतां सौख्य जालें । प्रसंगें रघूनायकें दाखवीलें ॥९४॥
रुढाच्या मनासारिखें वर्तताहे । महीमंडळीं यान येऊनि राहे । भुमीं ऊतरे रामबंधू सितेशी । कपीनाथ सुग्रीव बीभीषणेंशी ॥९५॥
कपी रीस ते भार कोतयानुकोटी । दिसेना भुमी जाहली थोर दाटी । समर्थें विमानासि त्या पाठवीलें । कुबेरासि भेटावया शीघ्र गेएल ॥९६॥
असंभाव्य तो वाद्यकल्लोळ जाला । कपी पाहतां भार अद्‍भूत आला । रजें व्योम आच्छादिलें सर्व कांहीं । विरां कुंजरां घोडियां मीति नाहीं ॥९७॥
कपी सर्व चाकाटले पाहताती । गिरीचे परी भार अद्‍भूत येती । कपीभार ते देखिल राजभारें । पहाया दळें लोटलीं तीं अपारें ॥९८॥
खुणा दाविती एकमेकांस तेथें । मुखें बोलती राहिला राम येथें । महा वीर ते मुख्य धांवोनि गेले । कपीभार त्यांमाजिं वेगीं मिळाले ॥९९॥
रघूनायकालगिं शत्रूघनामें । नमस्कार केला तया मंत्रियानें । उभा वर्ग ते भेटले राघवाला । तया मानसीं थोर आनंद जाला ॥१००॥
सुमित्रासुता आणि त्या जानकीला । महावीर तींहीं नमस्कार केला । प्रसंगीं समस्तां सिते भेटि जाली । सुखाची नदी अंतरामाजिं आली ॥१०१॥
सुमंतू समर्था म्हणे पैल पाहे । ऋषी जन्ननी मंडळी येत आहे । तयें सांगतां राम तो सिद्ध जाला । पदीं चालतां तो पुढें शीघ्र गेला ॥१०२॥
पुढें देखिला तो ऋषी ब्रह्मनिष्ठ । कुळा रक्षिता तो कुळामाजिं श्रेष्ठ । रघूनाथ तेथें नमस्कार घाली । स्तुतीउत्तरें आदरें भेटि जाली ॥१०३॥
प्रसंगें नमस्कारली मुख्य माता । बहू सौख्य जालें तयां भेटि होतां । समस्तां जणींला नमस्कार केले । तया देखतां प्राण त्यांचे निवाले ॥१०४॥
समस्तांस तो भेटला राम जैसा । यथासांग तो वीर सौमित्र तैसा । नमस्कार घाली बहू स्तूति केली । तया देखतां मंडळी ते निवाली ॥१०५॥
सितासुंदरीनें नमस्कार केले । असंभाव्य ते लोक तेथें मिळाले । स्तुतीउत्तरें एकमेकांस जालीं । प्रसंगीं तये अंतरें तीं निवालीं ॥१०६॥
समस्तां समस्तां जणां भेटि जाली । पहाया सुखें लोकमांदी मिळाली पुरीमाजिं तो थोर आनंद जाला । सुखें बोलती हो सुखें राम आला ॥१०७॥
सुखें पाहतां मुख्य माता मिळाल्या । सवें सुंदरा त्या असंभाव्य आल्या । वधूंची बहू दाटणी थोर जाली । सिता सुंदरी शीघ्र तेथें मिळाली ॥१०८॥
नमस्कारिलें नम्र होऊनि श्रेष्ठां । प्रसंगेचि भेटी वरिष्ठां वरिष्ठां । धडाडां नभीं वाजती चंड भेरी । बहू वारितां जाहली दाटि थोरी ॥१०९॥
महा वैभवाची कथा राघवाची । जुनी सौख्यदातीच ब्रह्मादिकांची । पुढें रामऊपासकें रामदासें । पुरी वर्णिली रम्य नाना विलासें ॥११०॥


युद्धकान्ड – प्रसंग बारावा

पुढें चालिली ते असंभाव्य सेना । रजें मातलें व्योम पूढें दिसेना । कितीएक ते भार सन्मूख आले । समर्थास तींहीं नमस्कार केले ॥१॥
दळें राहिलीं दूरि वेष्टीत पाळा । कपीचक्र एकीकडे चंड मेळा । तया मध्यमागीं ऋषी बंधु माता । महावीर ते मुख चत्वारि कांता ॥२॥
उभा राहिला राम तो राजभारें । गृहें निर्मिलीं अंबरांचीं अपारें । सभामंडपीं धर्मशाळा विशाळा । गृहें रम्य अंतर्गृहें चित्रशाळा ॥३॥
बहूसाल दिव्यांबरें थोरथोरें । सुचित्रें विचित्रें अमोल्यें अपारें । कितीएक त्या लविल्या स्तंभवोळी । प्रभा रत्नमंडीत तेजें झळाळी ॥४॥
बहू रत्नमाळा बहू मुक्तमाळा । बहू लागले घोंस नक्षत्रमाळा । कितीएक जाळीवरी अंतराळीं । कितीएक मुक्तें निराळीं निराळीं ॥५॥
सुढाळा किळा मंडपीं ढाळ देती । विशाळा थळामाजिं त्या दिव्य ज्योती । सुवर्णासनें दिव्य नानापरींचीं । कितीएक सिंहासनें कूसरीचीं ॥६॥
बहू ते फुलारे बहूतांपरींचे । वरी घोंस हेलावती माणकांचे । निळे पाच गोमेद इत्यादिकांचे बहू रंग नानापदी कांचनाचे ॥७॥
नभामाजिं त्या दिव्य नक्षत्रमाळा । तयाचे परी शोभती मुक्तमाळा । विराजे तया मंडपा मध्यभागीं । ऋषी राम माता सखे बंधुवर्गीं ॥८॥
असंभाव्य ते संपदा वैभवाची । मुखें सर्व बोलावया शक्ति कैंची । वरी पाहतां उंच आकाशपंथें । असंभाव्य तें भव्य लावण्य तेथें ॥९॥
समूदाय तो बैसला स्वस्थ जाला । वधूमेळ अंतर्गृहामाजिं गेला । ऋषी राम माता सखे बंधुवर्गीं । स्नेहें उत्तरें बोलिजे ते प्रसंगीं ॥१०॥
कितीएक तो काळ गेला वियोगें । असंभाव्य तें सौंख्य संयोगयोगें । सरेना मुखें बोलतां मोह माया । निवालीं मुखें पाहतां सर्व काया ॥११॥
कपीनाथ बीभीषणाला भुफळें । रहाया गृहें दीधलीं तीं विशाळें । तयांमाजिं ते सर्वही स्वस्थ जाले । समर्थें बहू सोहळे दाखवीले ॥१२॥
पुढें मंगलस्नान तेणेंचि काळें । बहूसाल ते चालिले एक वेळे । कितीएक ते हाटकाचे तटाकीं । जळें ठेविलां सेवकें ग्रामलोकीं ॥१३॥
असंभाव्य तीं सिद्ध केलीं फुलेलें । बहूतांपरींचीं सुगंधेल तेलें । किती चौकिया चौक गंगाळपात्रें । विशाळें पवित्रें सुचित्रें विचित्रें ॥१४॥
सुगंधें रसें चोखण्या कालवील्या । यथासांग सामग्रिया सिद्ध केल्या । बहू आंत पोटीं उभा भर्त बंधु । करी प्रार्थना राम कारुण्यसिंधु ॥१५॥
प्रभू बोलता जाहला शीघ्र काळें । किजे मंगळस्नान या लोकपाळें । अयोध्यापुरीमाजिं त्या सर्व लोकां । विरें सर्व संकेत केला अनेकां ॥१६॥
समस्तांसि तात्काळ अभ्यंग जालें । महा लोक ते सर्व सूखें निवाले । कितीएक सामग्रिया सिद्ध केल्या । कपीनाथ भीभीषणा पाठवील्या ॥१७॥
पुन्हां राम बोले वरिष्ठां वरिष्ठां । किजे मंगळस्नान हो सर्व श्रेष्ठां । पुढें जन्ननीलगिं देवाधिदेवें । म्हणे मंगळस्नान तुम्हीं करावें ॥१८॥
समस्तीं यथासांग अभ्यंग केलें । पुन्हां देव तो भ्रातयालगिं बोले । सखे बोलती स्वामि देवाधिदवा । तुम्हीं साग अभ्यंग आधीं करावा ॥१९॥
बहूतांपरी प्रार्थिलें बांधवासी । कितीएक ते सिद्ध जाले विलासी । उभी मंडळी कूशळां नापितांची । तिहीं मांडिली सांग सेवा प्रभूची ॥२०॥
समश्र क्रमें जाहली त्या प्रसंगीं । नखें काढिली नीळरंगी तरंगी । जटाजूट ते मोकळे केश केले । स्नेहे घालितां दिव्य चक्षू निवाले ॥२१॥
पुढें दर्पणीं पाहिलें रूप रामें । प्रसंगीं तये कोटिकंदर्पधामें । कळा बाणली भव्य लावण्य गात्रीं । असंभाव्य सौंदर्य राजीवनेत्रीं ॥२२॥
जळें पादप्रक्षालना सिद्ध जालीं । पदीं लागतां स्वर्गगंगा निवाली । पदांगुष्ट भागीरथी ओघ आला । जनें मज्जनें लोक निर्दोष केला ॥२३॥
पुढें तीर्थ वंदूनि बंधूजनानें । निवाले पवित्रोदकें तीर्थ पानें । बहू लविलें लोचना आवडीनें । मनीं मानिलें सौख्य या बांधवानें ॥२४॥
बहूसाल आयुष्य हो अल्पकोडी । घडावी सदा सर्वदा भक्तिजोडी । सुगंधें फुलेलें चबाबीत माथां । महामस्तकीं मर्दिती लोकनाथा ॥२५॥
बहू मर्दना सांग नानापरीची । लिळें काढिली ते मळी निर्मळाची । जळें निर्मळें घालिती उष्ण धारा । मुखें बोलती तोय आणीक सारा ॥२६॥
शिरीं घालिती तोय नेटें घळाळां । नद्या वाहती उष्ण बोधें खळाळां । सुगंधेंचि दोहीं तिरीं पंक जाला । असंभाव्य तो भृंग तेथें मिळाला ॥२७॥
यथासांग अभ्यंग केलें भुपाळें । पुढें रम्य दिव्यांबरें शीघ्र काळें । महा तेज पुंजाळ तें लागवेगीं । विरें वल्कलें त्यागिलीं ते प्रसंगीं ॥२८॥
प्रसंगीं तये रत्नमंडीत मानें । पुढें पादुका ठेविल्या बांधवानें । वसिष्ठासि रामें नमस्कार केला । महावीर तो बैसला स्वस्थ जाला ॥२९॥
बहू कस्तुरी केशरें तेचि काळीं । ऋषी राम वीलेपवी गंध भाळीं । बहू भूषणें रत्नमंडीत रामें । अमूल्यें सुखें घेतलीं पूर्णकामें ॥३०॥
उटी घेतली घातल्या पुष्पमाळा । बहूतांपरींच्या बहू रत्नमाळा । महामस्तकीं हेम मूगूट साजे । असंभाव्य तो तेजकल्लोळ माजे ॥३१॥
वरी कीरटी कुंडलें वैजयंती । अलंकार नानापरी ढाळ देती । चिरें सुंदरें घातला भव्य धाटा । कटीं किंकिणी नागरा क्षुद्र घंटा ॥३२॥
वरी कंकणें मुद्रिका चापपाणी । ब्रिदें घातलीं अंदु वांकी झणाणी । महीमंडळीं सर्वही एक जाले । रघूनायका भव्य लावण्य आलें ॥३३॥
पहातां नसे तूळणाही तुळायां । विराजे बहू भूषणें दिव्य काया । ऋषी राजबंधू सखे आणि माता । सुखें पाहती राम हा सौख्यदाता ॥३४॥
प्रितीनें मुखें बोलतां राम जाला । म्हणे स्नान कीजे तया बांधवाला । स्नेहें उत्तरें बोलतां शीघ्र तैसें । किजे मंगळस्नान नाना विलासें ॥३५॥
जटाजूट ते मोकळे सर्व केले । मळें त्यागिले भव्य सुस्नात जाले । सुगंधें उटी घेतली पुष्पमाळा । अलंकार दिव्यांबरें रत्नमाळा ॥३६॥
प्रसंगें समस्तांसि अभ्यंग जालें । सभोंतें सखे आप्त सर्वै मिळाले । अळंकार दिव्यांबरें दिव्य माता । सुखें राघवा पाहती त्या समस्तां ॥३७॥
फळें खाद्य नैवेद्य नानापरींचे । फळाहार ते आणिले कूसरीचे । बहूतांपरींचे बहू उंच मेवे । म्हणे राम सर्वांस ते पाठवावे ॥३८॥
समस्तांसि ऊदंड ते पाठवीले । फळें सेवितां लोक संतुष्ट जाले । स्वइच्छा स्वयें सोसिलें अल्प कांहीं । जनीं सेवितां तूळणा त्यांसि नाहीं ॥३९॥
जळें निर्मळें आच्मनें शुद्ध केलीं । समस्तांसि पानें बहू पाठवीलीं । विडे घेतले सर्वही स्वस्थ जाले । असंभाव्य ते पाकही सिद्ध जाले ॥४०॥
पुढें मंडळी सेवकांची मिळाली । विशाळें स्थळें सर्वही सिद्ध केलीं । बहू चित्रशाळा बहू होमशाळा । सडे शिंपिले घातल्या रंगमाळा ॥४१॥
बहू रत्नमंडीत मोठीं अचाटें । दुकांठीं बहू मांडिलीं दिव्य ताटें । कितीएक तीं बत्तिसा वाटियांचीं । कितीएक विस्तीर्ण नानापरींचीं ॥४२॥
असंभाव्य तीं रम्य चित्रें विचित्रें । बहूतांपरींचीं बहू तोयपात्रें । बहू आसनें दिव्य नानापरींचीं । असंभाव्य ती घातलीं कूसरीचीं ॥४३॥
बहूवर्ण दिव्यांबरें पटटकूळें । बहूरंग नानापरींचीं दुकूळें । असंभाव्य तीं सोंवळीं सिद्ध केलीं । कितीएक दिव्यांबरें आणवीलीं ॥४४॥
पुढें भोजना सर्वही सिद्ध जाले । कितीएक ते लक्षकोटी मिळाले । मिळाली ऋषीमंडळी ब्राह्मणांची । बहू दिव्य मार्तंड जैसे विरंची ॥४५॥
वयें धाकुटे थोर कोटयानुकोटी । स्थळें रुंधिलीं जाहली थोर दाटी । बहूसाल संतोषले थोर तोषें । असंभाव्य ते गर्जती नामघोषें ॥४६॥
बहूसाल गंधाक्षता पुष्पमाळा । बरीं धौतपात्रें दिल्या रत्नमाळा । चिरें सुंदरें रम्य यज्ञोपवीतें । धनें चंदनें दीधलीं ब्राह्मणांतें ॥४७॥
पुढें वाढिते जाहले शीघ्र काळीं । बहू दाटल्या त्या असंभाव्य ओळी । महा मंडपीं बैसला रामराजा । ऋषी मुख्य बंधू सखे आप्त वोजा ॥४८॥
पुढें रत्नझार्‍या बहूसाल चंबू । सुवासी तयांमाजिं संपूर्ण अबू । स्थळें सर्वही सिद्ध पूर्वींच केली । असंभाव्य अन्नें बहू आणवीलीं ॥४९॥
कपीनाथ सुग्रीव बीभीषणाला । बहू धाडिलीं दिव्य अन्नें तयांला । रसें पूर्ण त्या कावडी लक्ष कोटी । पथामाजिं नेतां असंभाव्य दाटी ॥५०॥
पुढें वाढिते जाहले पात्रधारी । असंभाव्य ते चालिले एकहारी । रुची रायतीं लोणचीम रम्य वोळीं । बहू स्वाद शाखावळी शीघ्र काळीं ॥५१॥
बहू वाढिला ओदनू तो सुवासें । वरानें क्षिरी शर्करा पंच भक्षें । कितीएक आणीक नानापरींची । बहू वाढिलीं भिन्नभिन्नां रुचींची ॥५२॥
सुगंधे तुपें वाढिती ते खळाळा । पयें घालिती थोर नेटें घळाळां । पुढें दिव्य नाना रसें पूर्ण पात्रें । सभा शोभली भव्य राजीवनेत्रें ॥५३॥
बहूसाल संतोष नाना सुवासें । ऋषीमंडळी गर्जती नामघोषें । पुढें सवे ओगारिती सावकाशें । सुखें जेविती सर्व नानाविलासें ॥५४॥
गिरीसारिखा ओदनू शुभ्र वर्णें । बहू भक्षिलीं भक्ष संपूर्ण पूर्णें । कथा मागुती सांगतो एकमेकां । अस्मभाव्य ते तृप्त जाली अनेकां ॥५५॥
कढी वर्पिती आवडीनें फरारां । ऋषी जेविती ढेंकरीती डरारां । पुरे हो पुरे अन्न ऊदंड झालें । बहू भोजनें कंठमर्याद आले ॥५६॥
पुढें शीघ्र दध्योदनें लागवेगीं । पुन्हां वाढिते जाहले ते प्रसंगीं । ऋषी राम बंधू सखे सर्व माता । मुखें बोलती सर्वही तृप्ति आतां ॥५७॥
सुवासें रुचीचीं असंभाव्य तक्रे । कदाही कधीं नेणिजे स्वाद शक्रें । सुखें सेविती जेविती लोक इच्छा । यथासांग संपूर्न जाले स्वइच्छा ॥५८॥
यथासांग तीं भोजनें सर्व जालीं । खळाळें बरीं आच्मनें शुद्ध केलीं । सुपारी विडे दीधले कर्पुराचे । बहू चूर्ण तें शुद्ध मुक्ताफळाचें ॥५९॥
सुवासी चतुर्भाग मागून घेती । सुखी जाहल्या सर्वही वेदमूर्ती । बहूसाल मंत्राक्षता मंत्रघोषें । मुखें बोलती सर्वही विप्र तोषें ॥६०॥
कपी रीस ते सर्वही तृप्त जाले । बहू भक्षिलें अन्न सूखें निवाले । गिरीसारिखीं राहिलीं सर्व अन्नें । विडे घ्यावया धाडिलीं त्यांसि पानें ॥६१॥
यथासांग सर्वस्व संतृप्ति जाली । सभामंडपीं मंडळी ते मिळाली । पुढें ब्राह्मणीं मांडिली धर्मचर्चा । मुखें बोलती धन्य दीनू सुवाचा ॥६२॥
पुढें दीन तो चालिला अस्तमाना । नभायासि आली असंभाव्य सेना । कितीएक तीं दीवटयांचीं अचाटें । सभामंडपीं चाललीं दाट थाटें ॥६३॥
प्रसंगी तये वादकल्लोळ याळा । दुरस्ता बहू लोक सूखें मिळाला । विराजे सभेमाजिं तो रामराजा । पुढें चालिल्या त्या बळावंत फौजा ॥६४॥
झणाणीत वीणे मनोरम्य नादें । दणाणीत मुंर्दुग गंभीर शब्दें । अलापें कळा दाविती रागमाळा । सुरें सुस्वरें माजली रंगवेळा ॥६५॥
बहू ताळ कल्लोळ वाजे खणाणा । विणे वाजती तंतुनादें झणाणा । बहू गीत संगीत तें कूसरीचीं । भले जाणती ते घडी अमृताची ॥६६॥
असंभाव्य तो नृत्यकल्लोळ जाला । सुखें पाहतां शुद्धि नाहीं जनांला । गुणीं रातले मातले गायनानें । तदाकार ते वस्ति केली मनानें ॥६७॥
अळंकार चीरें पुढें ढीग केले । बळावंत ते सर्व संतुष्ट जाले । विसर्जी सभा तो पुढें रामराजा । निरोपेंचि गेल्या बहु लोकफौजा ॥६८॥
समस्तीं घडी एक विश्रांति केली । अकस्मात प्राभात ते प्राप्त जाली । पुढें सारिते जाहले नित्य नेमें । महावीर ते आपुलाल्या स्वधर्में ॥६९॥
सभे बैसिजे स्वामि देवाधिदेवें । म्हणे आजि वेगीं अयोध्येसि जावें । पुरी सर्व शृंगारमंडीत केली । असंभाव्य ते सर्व सेना निघाली ॥७०॥
महीमंडळीं मुख्य आधीं पुराणीं । सुखें बोलिजे ते रवी वंशखाणी । अयोष्यापुरी धन्य ही पुण्यराशी । किती राहिले तापसी तीर्थवासी ॥७१॥
मनीं संत योगी सदा वीतरागी । उदासीन साधू पराचे विभागी । ऋषीमंडळी सात्विकाम सज्जनांची । महा योगि व्युत्पन्न विद्वज्जनांची ॥७२॥
कितीएक ते मंडळी प्रेमळांची । कितीएक ते ब्राह्मणां सूशिळांची । मनस्वी किती ते यती ब्रह्मचारी । बहुतांपरींचे बहु वेषधारी ॥७३॥
सदा सर्वदा योग ध्यानस्थ जाले । कितीएक ते काळ घेऊनि गेले । भुयारें मठया त्या बहुतांपरींच्या । नदीचे तिरीं पर्णशाळा मठाच्चा ॥७४॥
प्रभू देव हा सर्व ब्रह्मादिकांचा । जया वर्णितां शीणल्या वेदवाचा । स्वयें वास जेथें जगन्नायकाचा । महीमा वदे कोण त्या हो स्थळाचा ॥७५॥
कितीएक ते राहिले भक्त ज्ञानी । कृपाळू बहू मुख्य नामाभिधानी । बहू सुकृती सूर्य जैसे तपाचे । सदा धर्मचर्चा अखंडीत वाचे ॥७६॥
नदी चालिली भव्य ते पूर्णतोया । जनांलगिं आधार आली उपाया । शिवाल्यें बहू बांधिलीं थोरथोरें । ध्वजा दउळें शीखरें तीं अपारें ॥७७॥
तडागें जळें निर्मळें कूप बावी । सदा सर्वदा राहिजे मानुभावीं । स्थळें निर्मळें निर्मिलीं पावनानें । कितीएक कल्पतरूंचीं उद्यानें ॥७८॥
कितीएक त्या लागल्या वृक्षजाती । वनें वाटिका जीवनें पुष्पजाती । अयोध्यापुरी रम्य लावण्य नांवें । महारम्य विस्तीर्ण ते वीस गांवें ॥७९॥
गृहें बांधिलीं तीं असंभाव्य उंची । कितीएक तीं पंच सप्तां खणांचीं । सजे चौक दामोदरें थोरथोरें । विशाळें विचित्रें गवाक्षें अपारें ॥८०॥
बिदी हाट बाजार चौबार कुंचे । असंभाव्य ते भव्य नानापरीचे । कितीएक तीं सारखीं दीसताती । महा धूर्त तेही बळें भ्रांत होती ॥८१॥
गृहें गोपुरांचीं बहू दाट खेटा । हुदे माडिया ऊपरा त्या अचाटा । महद्भाग्य श्रीमंत ते लोक तेथें । सदा सर्वदा दाटणी थोर पंथें ॥८२॥
पुरीमाजिंचे लोक आरोग्य भारी । मुलें लेंकरें थोरले आणि नारी । करंटें तयांमाजिं कोणीच नाहीं । नसे द्वेष ना मत्सरू सर्व कांहीं ॥८३॥
सदानंद उद्वेग नाहीं जनांला । नव्हे वृद्ध ना मृत्यु नाहीं तयांला । कुरूपी महामूर्ख तेथें असेना । सुखाचें जिणें दैन्यवाणें दिसेना ॥८४॥
पुरीमाजिं ते सर्वही लोक कैसे । सुवर्णाचळीं नांदती देव जैसे । प्रतापी बळाचे सदा सत्य वाचे । पुरीमाजिं लावण्यदेहे जनांचे ॥८५॥
बहू नीतिन्यायें विवेकें उपायें । कदाही तया बाधिजे ना अपायें । बहूतां धनांचे उदारा मनांचे । विशेषा गुणांचे गुणी सज्जनांचे ॥८६॥
पुरीमाजिं त्या सर्व चातुर्य मोठें । कदाही मनीं नावडे त्यांसि खोटें । विलासे वसे राम आणीक विद्या । कळा सर्व साधारणा सर्व साध्या ॥८७॥
अळंकार दिव्यांबरें सर्व लोकां । सदा प्रीतिनें बोलती एकमेकां । महा वैभवाचे बहू सुकृताचे । पुरीमाजिं ते लोक नानागुणांचे ॥८८॥
पुरीमाजिं ते दाटणी मंदिरांची । रिकामी भुमी ते रहायासी कैंची । तया मध्यमागीं असंभाव्य तेथें । महा भूवनें उंच आकाशपंथें ॥८९॥
गृहें गोपुरें निर्मिलीं कांचनाचीं । बहूसाल विश्रांतिदातीं मनाचीं । महारत्नमंडीत तीं थोरथोरं । किती धाकटीं भव्य मोठीं अपारें ॥९०॥
भुमा बांधल्या पांचबंदी विशाळा । मनोरम्य त्या रेखिल्या चित्रशाळा । कितीएक दारे लघू थोरथोरें । स्थळें दिव्य ती पाहतां सौख्यकारें ॥९१॥
किती अन्नशाळा किती वस्रशाळा । कितीएक विस्तीर्ण त्या होमशाळा । किती नाटयशाळा बहू रत्नशाळा । कितीएक त्या धर्मशाळा विशाळा ॥९२॥
गृहें रम्य अंतर्गृहे हाटकाचीं । बहू हासल्या पूतळ्या नाटकांची ।भुयारें घरें वीवरें गुप्त द्वारें । स्थळें भव्य बैसावया थोरथोरें ॥९३॥
सभामंडपीं ते असंभाव्य शोभा । बहू शोभतो हेमकल्लोळ गाभा । फुलारे बहू लविले माणिकांचे । कितीएक ते घास मुक्ताफळांचे ॥९४॥
महीमंडळी तेज पुंजाळ जालें । असंभाव्य तें सर्व लावण्य आलें । विशाळा स्थळां निर्मिल्या भव्य भिंती । निळे पाच गोमेद ते ढाळ देती ॥९५॥
बहू रत्न पुंजाळलें ज्वाळ जैसे । असंभाव्य हारी उभे स्तंभ जैसे । विशाळें स्थळें निर्मिलीं जाड कैशीं । सुवर्णाचळामाजिं विस्तीर्ण जैशीं ॥९६॥
विचित्रा कळा कूसरी लेखनाच्या । बहूरत्नमंडीत त्या कांचनाच्या । सभामंडपीं फांकल्या रत्नकीळा । दिसे रंग तेथें निराळा निराळा ॥९७॥
कितीएक तीं फांकलीं दिव्य कीर्णें । बहूतांपरींचीं बहू रंग वर्णें। कितीएक हेलावती हेमपर्णें । कितीएक हेलावती हेमपर्णें । कितीएक घंटावळी त्या सुवर्णें ॥९८॥
स्थळें शोभती रम्य बैसावयाची । बहूसाल तीं भिन्नभिन्नां परींचीं । कितीएक तीं रत्नमंडीत यानें । कितीएक सिंहासनें तीं विमानें ॥९९॥
बहू बैसका दिव्य रभ्यांबरांच्या । विचित्रा बहूरंग नानापरींच्या । वरी लोंबती घोंस मुक्ताफळांचे । कितीएक मुक्तावळी जाळियाचे ॥१००॥
कितीएक रत्नावली रम्य कैशा । कितीएक मुक्तावळी शुक्र जैशा । प्रभेंचे बहू घोंस हेलावताती । बहूतांपरींच्या बहू रत्नजाती ॥१०१॥
स्थळें निर्मिली रम्य विस्तीर्ण नाना । कितीएक बैसावया सर्व सेना । कितीएक विस्तीर्ण राजांगणें ते । भुमी पाचबंदी महा रम्य तेथें ॥१०२॥
हुडे कोठ माडया सजे मोठमोठे । उभे राहिले भव्य ब्रह्मांड वाटे । असंभाव्य चर्या लघू पंथ हारी । नभा भासवी रूप नाना विकारी ॥१०३॥
झरोके कितीएक त्या गुप्त वाटा । किती ऊपर्‍या अंतराळीं अचाटा । कितीएक त्या भक्ति संखारसाच्या । कितीएक त्या उंच तेरा खणांच्या ॥१०४॥
वरी रत्नकळ् साचिया रम्य ओळी । रवीकीर्ण तैसा कळा अंतराळीं । वरी लागल्या सर्व नक्षत्रमाळा । मनीं भासती फांकती दिव्य कीळा ॥१०५॥
रवीवंशिंचे सर्वविख्यात राजे । तयांच्या प्रतापें विधीगोळ गाजे । करी कोण संख्या तया वैभवाची । उणी वर्णितां बुद्धि ब्रह्मादिकांची ॥१०६॥
किती कोण लेखा मला मानवाला । मतीमंद मी काय वंर्णू तयाला । म्हणे दास त्या अल्पशा भक्तिभावें । प्रभू बोबडया उत्तरीं तोषवावें ॥१०७॥


युद्धकान्ड – प्रसंग तेरावा

पुरी वर्णिली हो यथासांग येथें । परी पाहतां दीसतें अल्प तेथें । मनीं संशयो श्रोतयां प्राप्त जाला । प्रतीउत्तरें काय दील्हीं तयांला ॥१॥
अयोध्यापुरी स्वर्गलोकासि गेली । पुढें ओस होतांचि ते मग्र जाली । असेना जना राहणें वस्ति जेथें । खडे माणिकें कोण ठेवील तेथें ॥२॥
पुरें पटटणें ओस होती कितीकें । पुढें पाहतां दीसती सर्व टेकें । युगें लोटतांही वसे अल्प कांहीं । असंभाव्य हें तूं विचारूनि पाही ॥३॥
असो तूटला संशयो श्रोतयांचा । पुढें राहिला ओघ जातां कथेचा । अयोध्यापुरा चालिले वीर जेठी । निघाले स्वयेंभार कोटयानुकोटी ॥४॥
ऋषी राम ते चालिले नीज भारें । दळें चालिलीं पृष्ठभागीं अपारें । शिब्री का पुढें चालती दिव्य हारीं । सखे लोक बंधू मधें रावणारी ॥५॥
पुढें दाटले भार माहारथांचे । दळीं घोष जाले गजां घोडियांचे । गिरीतुल्य सेना रिसांवानरांचीं । बहू दाटि राक्षेस लंकापतीची ॥६॥
पुरीं पावतां रुंधल्या सर्व वाटा । असंभाव्य तो जाहला दाट खेटा । शतांचीं शतें धांवती वेत्रधारी । दळें माजलीं कोण कोणास वारी ॥७॥
कितीएक ग्रामस्थ मध्येंचि गेले । कितीएक ते चूकले भ्रांत जाले । अयोध्यापुरीमाजिं ऊभीं अचाटें । गृहें गोपुरें पाहती दाट थाटें ॥८॥
करीं रत्नताटें कितीएक हारीं । असंभाव्य त्या चालिल्या दिव्य नारी । बहूसाल नीरांजनें लक्ष कोटी । पुरींतूनि येतां पुढें थोर दाटी ॥९॥
रुपें राजसा सुंदरा त्या प्रितीनें रघूनाथ ओंवाळिती आवडीनें । मनामाजिं ते लागलीसे अवस्था । सुखें पाहती एकपत्नीव्रतस्था ॥१०॥
करीती बहू सुंदरा अक्षवाणें । कितीएक ओवाळिती लिंबलोणें । असंभाव्य थावे तया नायकांचे । मुखें गर्जती भाट वेताळ वाचें ॥११॥
पताका निशाणें बहू रंग वर्णें । महा तेज पुंजाळ मोतडपर्णें । वरी दाटलीं तीं असंभाव्य छत्रें । भ्रमों लागलीं दिव्य छत्रें विचित्रें ॥१२॥
पहा हो पहा पैल तो राम आला । असंभाव्य हा वीरमेळा मिळाला । दिसेना पुढें पाहतां गर्द जाला । समस्तीं करें ताळिकाघोष केला ॥१३॥
पुढें सर्वही भूवनामाजिं गेले । महावीर ते बैसले स्वस्थ जाले । पुरीमाजिं आनंद सर्वांस जाला । उभें राहिलें भाग्य हें राम आला ॥१४॥
ऋषी सांगती हे बरी शुद्ध वेळा । त्वरें बैस भद्रासनीं तूं नृपाळा । समस्तांसि आनंद राज्याभिषेकें । ऋषी अक्षता टाकिती मंत्रघोषें ॥१५॥
विधीयुक्त भदासनीं रामराजा । यथायोग्य संपादिली सांग पूजा । कितीएक पुष्पांजळी वाहताती । सदानंद आनंद सूखें पहाती ॥१६॥
असंभाव्य नानापरी दान केलें । बहूतांपरी याचकां तोषवीलें । गिरीचेपरी शर्कराढीग केले । कितेकीं समस्तांसि ते पाठवीले ॥१७॥
नभीं दाटलीं मे बडंब्रें अपारें । कितीएक तीं चामरें थोरथोरें । असंभाव्य हेलावती रत्नपुच्छें । बहू डोलती जन्मतें शक्र तुच्छें ॥१८॥
सुचित्रें विचित्रें रवीतेजपात्रें । असंभाव्य तीं दाटलीं भाव्य छत्रें । विशाळा पताका सतेजें निशाणें । वरी सर्व आच्छादिलें व्योम तेणें ॥१९॥
असंभाव्य ते दाटली भीमसेना । प्रसंगें । प्रसंगें विरीं घाव केला निशाणा । महादिव्य सिंहासनीं रामराजा । पहाया भ्रमों लागल्या वीर फौजा ॥२०॥
वरी रामराजा गुढी उभवीली । गजेबी सुखें लोकमांदी मिळाली । झडा घालिती राम पाहावयाला । समस्तां मनीं थोर आनंद जाला ॥२१॥
पुरीमाजिं तीं वैभवाचीं अचाटें । दुताळीं तिताळीं उभीं लोकथाटें । खुणा दाविती सांगती एकमेकां । बहूवीध तो राम वेधी अनेकां ॥२२॥
दमामे धमामे दडाडां धडाडां । बहू वाजवी चंड भेरी भडाडां । तुतारे नगोर बहू शंक शृंगें । किती चौघडे ढोल कर्णे बुरंगें ॥२३॥
तुरें गंभिरें तीं बहू गर्जताती । कितीएक पांवे मुखीं घोष वाती । नफेर्‍या बहू दुंदुभी घोष जाला । असंभाव्य तो वाद्यमेळा मिळाला ॥२४॥
कितीएक ते चौघडे वाजताती । कितीएक ते बागडे नाचताती । कितीएक ते मागुते मेळ आले । कितीएक ते वेषधारी मिळाले ॥२५॥
कितीएक थोंबे कुळावंत गाती । हरीदास ते कीर्तनीं गर्जताती । कितेकी गुणीं नाचणी नृत्यरंगें । अलापें कळा रागरंगें तंरगें ॥२६॥
कितीएक वाखाणिती भाट ब्रीदें । कितीएक ते छंद नाना विनोदें । दिंडीगान तें मांडिलें वासुदेवीं । बहू कनिर्‍या लाधले लोक जीवीं ॥२७॥
कितीएक ते भैरवाचे मिळाले । कमाचे कितीएक घेऊनि आले । कितीएक ते नाचताती धबाबां । सुखें डोलती वाजवीती खबाबां ॥२८॥
कितीएक ते गारुडी नाचताती । गळे फूगळे घागर्‍या लोळ घेती । कितीएक ते लोक नाना गुणाचें । ब्रिदे अंकुशें लविले भार कुंचे ॥२९॥
कितीएक ते भोंवतीं भेद नाना । भ्रमों लागले पाय भूमीं स्थिरेना । कितीएक ते टीपर्‍या खेळताती । मिळाले समेळे बहू वाजताती ॥३०॥
घनें सुस्वरें नाद कल्होळ जाला । बहूतांपरींचा बहू लोक आला । महद्‍भूत ते माजली रंगवेळा । दणाणी मही नाद गेला भुगोळा ॥३१॥
निशी प्राप्त जाली असंभाव्य दाटी । बहू दीवटया लक्ष कोटयानुकोटी । कितीएक ते उंच नेले उमाळे । नळें जाळितां घोष तैसे उफाळे ॥३२॥
सरारां फुलें धांवती अंतराळीं । कडाडीत घोषें निराळीं निराळीं । भुरारां हवाया कितीएक वेळां । बळें पाहती ऊर्ध्व नक्षत्रमाळा ॥३३॥
बहू औषधें दिव्य नानापरींचीं । कितीएक तेजाळ तीं कूसरीचीं । घडीनें घडी तेजपुंजाळ होती । उजेडेंचि ते लोक लोकां पहाती ॥३४॥
पुढें ऊठिला राम तो ते प्रसंगीं । प्रभू चालिला भूवनामाजिं वेगीं । रामस्तांसि आरोगणा सांग केली । विडे कर्पुरे घेतले तृप्ति झाली ॥३५॥
गृहें दीधलीं रम्य दिव्यांबरांचीं । दळें स्वस्थ जालीं रिसांवानरांचीं । कपी वीर राक्षेस सूखें निघाले । सुषुप्तीचिया भूवनामाजिं गेले ॥३६॥
सुवर्णाचिया मंचकीं मृदु शुय्या । वरी सूमनें सेज त्या देवराया । स भामंडपीं ते निशी अर्ध केली । प्रभूनें यथासांग विश्रांति केली ॥३७॥
निजेले ऋषी राव तो बंधु माता । यथायोग्य विश्रांति जाली समस्तां । कितीएक त्या वीरफौंजा समस्ती । असंभाव्य तो वाद्यकल्लोळ वस्ती ॥३८॥
प्रभातींचि ऊठोनियां नित्य नेमें । किजे स्नानसंध्यादिकें सांग कर्में । कितीएक दानें कितीकां परींचीं । धनें कांचनें भव्य नानापरींचीं ॥३९॥
अळंकार मुक्ताफळें मुक्तमाळा । कितीएक दिव्यांबरें रत्नमाळा । कितीएक धोत्रें कितीएक पात्रें । दिलीं ब्राह्मणां दान राजीवनेत्रें ॥४०॥
कितीएक कोटयावधी गोधनांचीं । कितीएक लक्षावधी कुंजरांचीं । बळाचें बहू अश्व ते पारखीले । धनेंशीं द्विजां ब्राह्मणां दान केले ॥४१॥
ऋषीं बांधवीं सारिलीं स्नानदानें । यथायोग्य उंचासनें स्थानमानें । सभेमाजिं तो बैसला रामराजा । निघाल्या कपी रीस राक्षेस फौजा ॥४२॥
कपीनाथ तो अंगदू जांबुवंतु । कुमूदू गजू वीनतू वीर्यवंतू । महावीर लंकापती मारुती तो । सुमूखू द्विवीदू कपी केसरी तो ॥४३॥
प्रमाथी गवायू निळू हेमकूटू । सुषेणू नळू मैंद मोठा अचाटू । कपी क्रोधन ऋषभू आणि शर्मू । गवाक्षू दधीमूख स्वेदू शराभू ॥४४॥
कपी रीस राक्षेस कोटयानुकोटी । असंभाव्य ते चालिले रामभेटी । समस्तीं प्रभूला नमस्कार केले । पुढें सर्वही हात जोडूनि ठेले ॥४५॥
समस्तीं विरीं रामगूणागराला । बहू प्रार्थिलें त्या दयासागराला । समस्तांसि देवें निरोपासि द्यावें । म्हणे राम तो शीघ्र जेऊनि जावें ॥४६॥
नमस्कार केले तया विश्ववंद्या । पुढें शीघ्र संपादिली स्नानसंध्या । असंभाव्य तीं दिव्य अन्नें सुवासें । बहू पंगती घातल्या सावकाशें ॥४७॥
ऋषी राम ते सर्वही बंधुवर्गीं । कितीएक ते बैसले आप्तवर्गीं । ऋषी राम ते सर्वही बंधुवर्गीं । कितीएक ते बेसले आप्तर्गीं । प्रभा फांकली दिव्य रत्नीं अनर्घी । कपी रीस ते बैसले जेविं स्वर्गीं ॥४८॥
हरी ऋक्ष राक्षेस सर्वे मिळाले । असंभाव्य ते भोजनालगिं आले । बहू पाकनिष्पत्ति नानापरींची । पक्कानें रसाळें कळाकूसरीचीं ॥४९॥
जगज्जननी जानकी वाढिताहे । सुवासें महा सौख्य तें होत आहे । यथासांग संपूर्ण तें अन्न जालें । पुढें शींघ्र तें शर्करा आज्य आलें ॥५०॥
पयादीक नाना रसें पूर्ण पात्रें । त्वरें घेतले ग्रास राजीवनेत्रें । समस्तांसि आज्ञापिलें देवधीशें । कपी सर्वही गर्जती नामघोषें ॥५१॥
तयां जेवितां भक्ष्य जालें । पुन्हां मागुती खाद्य ऊदंड आलें । घृतें वाढितां वाढितां ओघ गेले । असंभाव्य नानापरी तृप्त केले ॥५२॥
अपेक्षी तया मागती सर्व शाका । किती एक ते आणवीती कथीका । क्षिरी लोणचीं रायतीं भात भक्षें । खुणा दाविती मागती एक लक्षें ॥५३॥
जळें शीतळें सर्वही सेविताती । पुन्हां मागुते वीर ते जेविताती । समस्तांसि तीं सांग संपूर्ण जालीं । पुढें शीघ्र दध्योदनें आणवीलीं ॥५४॥बहू जेवितां जेविताम एक मध्यें । प्रतापें मुखें बोलती श्र्लोक गद्यें । मनीं भासती अर्थ नानापरींचे । मुखें रामनामें महात्दोष वांचे ॥५५॥
समस्तांसि तें सर्व संपूर्ण जालें । महा तृप्तिनें लोक सूखें निवाले । वरी आच्मनें शुद्ध केलीं खळाळां । कितीएक ते तोय घेती घळाळां ॥५६॥
सभामंडपीं सर्वही स्वस्थ झाले । सुगंधी विडे शीघ्र ते आणवीले । समस्तांसि संपूर्ण गंधें सुवासें । कपी पूजिले सर्व नाना विलासें ॥५७॥
समस्तीं विडे घेतले पीतवर्णें । सुतारी बरी कर्पुरू मुक्तचूर्णें । बहू वेळ लौंगा सुवासें खदीरें । किती जाति कंकोळ नाना प्रकारें ॥५८॥
अळंकार चीरें बहू सिद्ध केलीं । असंभाव्य दिव्यांबरें आणवीलीं । बहू भूषणांचे बहू ढीग केले । जगज्जन्नकें ते कपी गौरवीले ॥५९॥
तुरे लविले घातल्या पुषमाळा । कितीएक त्या रत्नमाळा सुढाळा । करीं कंकणें मुद्रिका लेववील्या । यथासांग संर्वाग संपूर्ण केल्या ॥६०॥
सभामंडपीं फांकल्या रत्नमाळा । समस्तांसि ते जाहली सौखवेळा । कितीएक सांगीतल्या गुप्तगोष्टी । महावीर आनंदले सर्व पोटीं ॥६१॥
स्तुती उत्तरीं सर्व लावण्यखाणी । मुखें बोलिला राम कारुण्यवाणी । तुम्हीं कष्ट केले जिवीं सर्व भावें । तुम्हांलगिं म्यां काय उत्तीर्ण व्हावें ॥६२॥
कपी सुग्रिवा अंगदा जांबुवंता। गुजां मारुता आणि नैरृत्यनाथा । समस्तांसि सन्मानिलें रामचंद्रें । सुधाउत्तरीं तोषवीलें नरेंद्रें ॥६३॥
मुखें बोलिजे वैद्यराजासि देवें । कवी तूज ऊचीत म्यां काय द्यावें । वरू दीधला रामचंद्रें उचीती । तुझ्या दर्शनें लोक आरोग्य होती ॥६४॥
समस्तांकडे पाहिलें राघवानें । तयां सर्व रोमांच आले फुराणें । नमस्कारिलें स्वामि देवाधिदेवा । म्हणे राम तो लोभ आतां असावा ॥६५॥
असंभाव्य केली स्तुती राघवाची । वदों लागली मंडळी राघवाची । कपी बोलती सर्व कारुण्यवाचा । स्तुती ऐकतों राम सिंधु सुखाचा ॥६६॥
गिरीकंदरामाजिं आम्हीं असावें । नरां देखतां वानरीं शीघ्र जावें । समर्थें सवें लविसी मर्कटाला । महा सूकृतें पार नाहीं सुखाला ॥६७॥
प्रभू बोलणें चालणें काय जाणें । बरें वोखटें सर्व कांहींच नेणे । बहुतांपरी चालवीलें दयाळें । तुम्हां योग्य हें आमुचें तोंड काळें ॥६८॥
कृपाळूपणें राघवें थोर केलें । बरें वोखटें सर्व साहून नेलें । बहू देखिलें सौख्य नानापरींचें । प्रभूच्या पदालगिं हें प्राप्त कैंचें ॥६९॥
सभाग्याचिया संगतीनें असावेम । बहूतांपरींचें बहू सौख्य घ्यावें । तयासारिखें सर्व आम्हांसि जालें । महा वैभवें चित्त सूखें निवालें ॥७०॥
नव्हे भेटि नानापरी योगयोगें । नव्हे भेटि नानापरी भोगत्यागें । नव्हे भेटि ब्रह्मांदिकां शीघ्रकाळें । त्रिकूटाचळी दाखवीलें भुपाळें ॥७१॥
कपी रीस ते बोलती दैन्यवाणें । कृपासागरू जीविंचा भाव जाणे । तयांच्या शिणें देव तो शीणताहे । बहूतांपरी राम संबोखिताहे ॥७२॥
सवें लागली राघवाची सुटेना । प्रिती गुंतली तोडितांही सुटेना । बहू दीस गेले सुखाचेनि योगें । अकस्मात तें दु:ख जालें वियोगें प्रभूसंगतीची सवे दृढ केली  । अकस्मात कां सर्व छेदूनि नेली । तयां बोलता जाहला रावणारी । तुम्हां भेटि देईन कृष्णावतारीं ॥७४॥
दयाळासि तींहीं नमस्कार केले । प्रभू सव्य घालूनि तैसे निघाले । समस्तीं समस्तांसि वंदूनि वेगीं । पुढें नीघते जाहले ते प्रसंगीं ॥७५॥
मनें वीकले भक्तपाळें भुपाळें । मनामाजिं ते खंति केली दयाळें । जनीं सेवकांलगि देखोनि ऊणें । बहू कष्ट घेऊनियां सौख्य देणें ॥७६॥
मनीं भावना भक्तलोकांसि जैशी । तयासारिखी देवरायासि तैशी । जनीं सेवकांकारणें जन्म घेणें । महाद्भाग्य सांडोनियां नीच होणें ॥७७॥
पडे सांकडेम सर्वदां सेवकांचें । दिनानाथ हें ब्रीद विख्यात साचें । मनामाजिं ते जैशि जैशि अपेक्षा । करीना कदा राम त्याची उपेक्षा ॥७८॥
असंभाव्य अन्याय तो आठवीना । बहू चूकतां देव कांहीं शिणेना । तया मानसीं लागली प्रेममाया । करी सेवकालगिं नाना उपायां ॥७९॥
सदा सर्वदा देव हा साभिमानी । कृपा भाकितां शीघ्र पावे निदानीं । तया अंतरीं थोर लहान नाहीं । परी पाविजे दृढ भावार्थ कांहीं ॥८०॥
तया अंतरीं भाव होईल जैसा । तयालगिं तो देव पावेल तैसा । यदर्थीं कदा संशयोही असेना । अभावेम तरी देव तो पालटेना ॥८१॥
कितीएक अन्याय कोटयानुकोटी । भ्रमें होय नानापरी बुद्धि खोटी । परी पाहतां लोभ त्याचा असेना । कृपासागरू तो कदा वोसरेना ॥८२॥
कृपाळूपणें देव राजाधिराजें । शिरीं वाहिजे सर्वही भक्त ओझें । जनीं दास देखोनियां दैन्यबाणा । मनामाजिं वोसावतो देवराणा ॥८३॥
बहूसाल हें बोलणें काय कीती । स्वयें जाणिजे ज्या असे स्वप्रचीती अयोध्यापुरीमाजिं तो रामराजा । कृपाळू सुखें राहिला भक्तकाजा ॥८४॥
कपी रीस गेले स्थळ जेथजेथें । प्रितीं मारुती राहिला राम तेथें । रघूनाथ सीता तया बंधुवर्गीं । उभें राहिजे सेवकें पूर्वभागीं ॥८५॥
समस्तांसि पूजूनि नाना विलासें । नमस्कारिलें सर्व दासानुदासें । उदासीन श्रोतीं कदाही न कीजे । बहू भेद भाषा क्षमा सर्व कीजे ॥८६॥
मनामाजिं ऊपासना रामध्यानीं । जनीं दास तो नीववी ब्रह्मज्ञानी । अखंडीत त्या राघवाच्या प्रतापें । विवेकें विचारें समाधान सोपें ॥८७॥
पदीं लागतां निर्गुणी भक्त जाले । बहू संग नीसंग होऊनि गेले । विवेकें बरें पाहतां ध्येय ध्याता । विचारें बरें शोधितां ज्ञेय ज्ञाता ॥८८॥
विवंचूनि तो साधकू साध्य जाला । असंभाव्य तो ब्रह्मबोधें बुडाला । पुसावें कळेना तरी सज्जनाला । धरूनी त्यजावें विदेहीपणाला ॥८९॥
असे हेम जनीं प्राप्त तेणें धरावें । अनिर्वाच्य तें वाच्य कैसें वदावें । सदा नित्य नीरूपणीं वीवरावें । नुरावें परी कीर्तिरूपें पुरावें ॥९०॥
असो जाणत्याला कळे सर्व कांहीं । जनी नेणता त्यासि कांहींच नाहीं । नसे ज्ञान त्यां सर्वही व्यर्थ गेलें । जळो पांचभौतीक हे काय जालें ॥९१॥
असो ही कथा बोलिली राघवाची । जनी सर्वदा ऐकती धन्य त्यांची । सुखें ऐकतां ते महा दोष जाती । दुखें नाससी लोक ते धन्य होती ॥९२॥
चरित्रें बरीं उत्तमें राघवाचीं । असंभाव्य विस्तारलीं पावनाचीं । कितीएक ते पाहती कोटि होती । जनीं एक एकाक्षरें दोष जाती ॥९३॥
शतांची शतें पूर्ण आरंभ संधीं । कळाया कथा हेतु संकेतसिद्धी । पुढें बोलिलें तें बरें वीवरावें । बुजायास हें गद्य पोटीं धरावें ॥९४॥
मुळारंभ ते स्तूति नाना परींची । गिरी वर्णिता जाहली सागराची । पहीले शतीं भेटि बीभीषणाची । पुढें शेवटीं शेज दर्भासनाची ॥९५॥
द्बितीयीं शतीं राम क्रोधासि आला । कथेलगिं तेथूनि आरंभ झाला । बळें सिंधु पालणिला शूक गेला । अपेक्षा मनीं शृंग पाहावयाला ॥९६॥
तृतीयीं शतीं शृंग पाहो निघाले । रिपूलगिं तो शिष्ट जावूनि बोले । बहू वीर राक्षेस युद्धीं निमाले । कपी सर्वही नागपाशीं निजेले ॥९७॥
रणें दाखवीलीं तये जानकीला । तये वीरशीं तो प्रहस्तू निमाला । प्रसंगेंचि मंदोदरी नीति सांगे । निघाला दशग्रीव तो लागवेगें ॥९८॥
चतुर्थीं शतीं युद्ध त्या रावणानें । रघूनायकें सोडिला जीवदानें । पुढें कुंभकर्णासि संहार केला । समूदाय तो कूमरांचा निमाला ॥९९॥
कितीएक ते वीर माहोदरेशीं । प्रतापें रणामाजिं ते प्रेतराशी । पुढें इंद्रजीतें कपी भग्र केले । महावीर ते बाणजाळीं निमाले ॥१००॥
शता पंचमालगिं आरंभ जाला । कपी वीर द्रोणाचळालगिं गेला । महावीर ते ऊठले स्वस्थ जाले । त्रिकूटाचळू सर्व जाळूं निघाले ॥१०१॥
कपी क्षोमले काळ युद्धा निघाले । कितीएक राक्षेस युद्धीं निमाले । नभींहूनि तो रावणी वीर आला । समस्तांसि भेदूनियां शीघ्र गेला ॥१०२॥
सहावें शतीं रावणू दु:ख सांगे । त्रिकूटाचळीं रावणी लागवेगें । पुन्हां इंद्रजीतू रणामाजिं आला । विरीं वानरीं होम तो भग्र केला ॥१०३॥
शतीं सातवें त्या विरें इंद्रजीतें । असंभाव्य केलीं रणामाजिं प्रेतें । सुमित्रासुतें मारिलें बाणघातें । यथासांग तो वन्हि सूलोचनेतें ॥१०४॥
शतीं आठवे वीर घायाळ जाळे । कितीएक राक्षेस युद्धीं निमाले । सुमित्रासुता रावणें घात केला । गिरी द्रोण आणूनियां स्वस्थ जाला ॥१०५॥
नवामाजिं रामासि सौमित्र सांगे । बळें भंगिला होम तो लागवेगें । रघूनायकें थोर संग्राम केला । रणामाजिं तो मुख्य शत्रू निमाला ॥१०६॥
दहावेम शतीं शोक अंत:पुराचा । प्रसंगें महोत्साव बीभीषणाचा । रघूनायकें जानकी आणवीली । समस्तां सुरां राघवा भेटि जाली ॥१०७॥
शंती ऐक एकादशी राघवाची । असंभाव्य ते स्तूति ब्रह्मादिकांची । महापुष्पकारूढ होऊनि गेले । पुढें भ्रातया भेटले स्वस्थ जाले ॥१०८॥
पुढें द्वादशीं मंदिरें त्या विरांचीं । यथायोग्य मानें समस्तां जणांचीं । पुजा भोजनें सांग सर्वांसि जालीं । पुरी वर्णितां मानसें तीं निवालीं ॥१०९॥
शतीं अष्टपंचीं पुरीमाजिं गेले । रघूराज भद्रासनीं बैसवीले । महोत्साव उत्साव नानापरीचा । समूदाय तो बोळवीला कपींचा ॥११०॥
करी राज्य तो राम नाना विलासी । जनांमाजिं ऊपासना रामदासी । यथासांग तेरा शतें श्लोक झाले । गुणी ऐकतां सर्व सूखें निवाले ॥१११॥

॥ युद्धकांड एकूण श्लोकसंख्या ॥१३६२॥ रामायण एकूण श्लोकसंख्या ॥१४६३॥


युद्धकान्ड – संत साहित्य समाप्त .

View Comments