श्री रामदासस्वामीं विरचित – स्फुट श्लोक
स्फुट श्लोक – श्लोक १ ते २
( प्रमाणिका वृत्त )
१
सुरेंद्रें चंद्रसेकरु । अखंड ध्यातसे हरु ।
जनासि सांगतो खुणा । श्री राम राम हें म्हणा ॥१॥
महेश पार्वतीप्रती । विशेष गूज सांगती ।
सलाभ होतसे दुणा । श्री राम राम हें म्हणा ॥२॥
विषें बहुत जाळिलें । विशेष आंग पोळलें ।
प्रचीत माझया मना । श्री राम राम हें म्हणा ॥३॥
विशाळ व्याळ वेस्त कीं । नदी खळाळ मस्तकीं ।
ऋषीभविष्यकारणा । श्री राम राम हें म्हणा ॥४॥
बहुत प्रेम पाहिले । परंतु सर्व राहिले ।
विबुधपक्षरक्षणा । श्री राम राम हें म्हणा ॥५॥
अपाय होत चूकला । उपाय हा भला भला ।
नसे जयासि तूळणा । श्री राम राम हें म्हणा ॥६॥
विरामधें विरोत्तमु । विशेष हा रघोत्तमु ।
सकाम काळ आंकणा । श्री राम राम हें म्हणा ॥७॥
बहुत पाहिले खरें । परंतु दोनि आक्षरें ।
चुकेल येमयातना । श्री राम राम हें म्हणा ॥८॥
मनीं धरूनि साक्षपें । अखंड नाम हें जपें ।
मनांतरीं क्षणक्षणा । श्री राम राम हें म्हणा ॥९॥
देहे धरूनि वानरी । अखंड दास्य मी करीं ।
विमुक्त राज्य रावणा । श्री राम राम हें म्हणा ॥१०॥
२
नमु गणेश शारदा । प्रबंदयोगिणी सदा ।
अनंत गुण लाघवी । प्रसंन्न होतसे कवी ॥१॥
मृगांकमौळिचा मनीं । अखंड ध्यान चितनीं ।
तया रुपाकडे मना । बहुत भाव भावना ॥२॥
अभंग ठाण बाणलें । गुणी धनुष्य ताणलें ।
सपीछय तें सणाणिलें । भुमंडळीं दणाणिलें ॥३॥
रघुविरा धरा मनीं । त्यजून काम कामिणी ।
पथी सगुण गामिनी । तडक मेघदामिणी ॥४॥
सुवर्णरत्नभूषणीं विराजत्तो विभूषणीं ।
समर्थं राम देखिला । मयंक रंक शंकला ॥५॥
भुगुटकीरटीं बरी । हिरेकण्या परोपरीं ।
अनेक सार कुसरी । सरी नसेल दूसरी ॥६॥
विशाळ भाळ साजिरें । प्रचंड दंडलें बरें ।
सुगंध गंध लेपनी । सुरंग ते विलेपनी ॥७॥
धगधगीत कुंडलें । सतेज तेज दंडलें ।
रसाळ मुख सुख हो । महंत पावले मोहो ॥८॥
अनेक बीक नासिकीं । रुपें रसाल तें फिकीं ।
सुवास वास दाटला । बहुत भृंग लोटला ॥९॥
कृपावलोकनी भले । विशाळ नेत्र शोभले ।
सुवस्ति घेतली सुखें । नये चि बोलतां मुखें ॥१०॥
हिरे सुढाळ ते किती । विशेष दंतपंगती ।
परोपरी मनोहरें । मधुर मृद उत्तरें ॥११॥
प्रचंड दंड दंडलें । वितंड दैत्य खंडलें ।
विरश्रिया घडी घडी । धनुष्य बाण भातडी ॥१२॥
सुगंध बाणली उटी । विशेष कास गोमटी ।
सुढाळ माळ साजिरी । विभूषणें परोपरीं ॥१३॥
बिदावळी पदीं वसे । विशेष दूसरा नसे ।
विबुधबंद तोडिले । अनंत जीव सोडिले ॥१४॥
श्रीराम शामसुंदरु । समागमें फणीवरु ।
विराजते सिता सती । समोर दास मारुती ॥१५॥
स्फुट श्लोक – श्लोक ३ ते ४
३
श्रीराम भक्तमूळ रे । प्रसन्न सानकूळ रे ।
समर्थ तो तया गुणें । समस्त होय ठेंगणें ॥१॥
प्रपंच संचितां हरी । विसंचितां बरोबरीं ।
दयाळ तो परोपरी । विशाळ सेवकां करी ॥२॥
समस्त ही पदें पदें । प्रभुपदें चि वीशदें ।
विचार सार जोडला । सदृश्यभास मोडला ॥३॥
तदुपरी विवंचना । विचार आणितां मना ।
मनास ठाव नाडळे । विशेष हेत ही गळे ॥४॥
विवेक हा भला भला । उदंड राम देखिला ।
पदीं अनन्य मीळणी । उरी नसे दुजेपणी ॥५॥
विचार सार सारसा । करील कोण फारसा ।
बळें बळें चि नीवळे । कळे कळे चि आकळे ॥६॥
४
वितंड रूप साजिरें । प्रचंड दंडलें बरें ।
धगधगीत सिंधुरें । गुणी समस्त किंकरें ॥१॥
अनेक छेंद दाखवी । प्रबंद बंद तो कवी ।
कवी जनास तोषवी । विरंग रंग रोषवी ॥२॥
सदा करीकथा बरी। मृदांग टाळ झल्लरी ।
रबाब वाजवी बळें । कामाच सारमंडळें ॥३॥
पदी प्रबंद साजिरे । रसाल शब्द गोजिरे ।
तयामधें मनु भरे । प्रचंड आर्थ वीवरे ॥४॥
कविप्रबंद पाहिजे । कवित्व जाड लहिजे ।
पवाड वाड उत्तरें । सखोल तें मनोहरें ॥५॥
मृदें कठीण भेदकें । अभेद भेद छेदकें ।
लघु विशाळ वेंकटे । मधुर थोर तीखटें ॥६॥
प्रसंग संग राखणें । कवित्वरंग चाखणें ।
सलक्षणें विलक्षणें । प्रबोध धूर्त तीक्षणें ॥७॥
अनेक शब्दभेद हा । प्रवीण हो बरें पाहा ।
अतर्क्य तर्कितां नये । निरूपणें प्रचीत ये ॥८॥
विळासवासिनी गिरा । सरस्वती मनीं धरा ।
विचार सार पाहानें । निवेदनें चि राहाणें ॥९॥
अनेक भास भासतो । परंतु सर्व नासतो ।
प्रचीत आपुल्या मना । चळेल देहभावना ॥१०॥
उपाय तो अपाय रे । भुतें भजोन काय रे ।
भजा अनंत व्यापका । चतुर हो चळों नका ॥११॥
भुतें समस्त वाव रे । प्रकुर्तिचा स्वभाव रे ।
अनंत संत वोळखा । मुळाकडे चुकों नका ॥१२॥
अनन्य देव भाविजे । तरी तयास पाविजे ।
नुरेल तो भला भला । निसंग तोचि पावला ॥१३॥
दिसे शरीर तों सवे । दिसोन काय तें नव्हे ।
असोनि वेगळावला । अखंड येक लाभला ॥१४॥
जयास लाभ तों नसे । अभक्त भक्त वीलसे ।
न बोलतां च बोलणें । न चालतां च चालणें ॥१५॥
स्फुट श्लोक – श्लोक ५
५
विधीभुगोळ पाहिला । कवी रिझोनि राहिला ।
अनंत लाघवी भला । बहुत खेळ खेळला ॥१॥
कविप्रबंद साजिरे । मधुर शब्द गोजिरे ।
सगुण तो मनीं धरा । अनंत गण वीवरा ॥२॥
कळोन ना कळे मना । गळीत देहभावना ।
लळीत होतसे जना । मिळोनि जा निरंजना ॥३॥
अनंत संत शोधितां । सतंत संत बोधितां ।
अभेद भक्त नाडळे । विचार पाहातां कळे ॥४॥
पाहाल आपअपणा । राहाल जीविच्या खुणा ।
निसंग तो मनीं धरे । तरीच जन्म वोसरे ॥५॥
नसोन दास देखिला । जिवांत राम रेखिला ।
नुरेल तो भला भला । अलप्त होय दादुला ॥६॥
मही किकाल पावकु । प्रभंजनु उपावकु ।
नभास भास नाडळे । भुतांस वास तो कळे ॥७॥
तुटे फुटेल तें नव्हे । रचे खचेल तें नव्हे ।
नसे वसेल तें नव्हे । असे दिसेल तें नव्हे ॥८॥
उदास अंतराळसें । उदंड साळमाळसें ।
गुणारहीत टाळसें । दुजें नसे विटाळसें ॥९॥
गुणी गुणास नाडळे । भुतीं भुतांस नातळे ।
अतर्क्य तें कसें कळे । निरूपणेंचि नीवळे ॥१०॥
भले भले मधें पडा । असार सार नीवडा ।
चळेचिना ढळेचिना । कळेचिना टळेचिना ॥११॥
चहाय हाय हाय रे । उदास हा उपाय रे ।
आहा जना आहा जना । पुसाचिना माहाजना ॥१२॥
स्फुट श्लोक – श्लोक ६
६
प्रचीत सप्रचीत रे । सुचीत सावचीत रे ।
तुलचि तूं न भावसी । तरी प्रचीत पावसी ॥१॥
समस्त संग सोडितां । प्रशस्त वस्त जोडितां ।
उरोन पाहासी किती । नुरोन राहासी रिती ॥२॥
विकारवंत जाणसी । खुणेसि खुण बाणसी ।
तुझीच तूज भावना । विचार येउं दे मना ॥३॥
समस्त संग सोडणें । परंतु हेत जोडणें ।
मनास वृत्ति नाडळे । तरीच पाहातां कळे ॥४॥
मनें मनासि जाणिजे । मनें खुणेसि बाणिजे ।
मनें मनासि कल्पना । पुसोन घे विकल्पना ॥५॥
उदास दृश्य वास तो । मनास भास भासतो ।
निसंग तो निरंजनी । मनास होय जन्मनी ॥६॥
न बोलणें न चालणें । न देखणें न चाखणें ।
न जाणतां न बाणतां । विकारवंत नेणतां ॥७॥।
विकारवंत लक्षितो । विवेक त्यास भक्षितो ।
अनंत संत वीवळा । विशाळ पंथ नीवळा ॥८॥
विकारवंत हेत रे । अहेत तो अहेत रे ।
गुणें गुणासि वारिलें । मनें मनासि सारिलें ॥९॥
बळेंचि वारिलें गुणा । पाहावयासि निर्गुणा ।
गुणात हेत वारला । अभेद भक्त थोरला ॥१०॥
विचार घे तदुपरीं । नसेल दुसरी सरी ।
विवंचना परोपरीं । अनंत हेत वीवरीं ॥११॥
विवेक हा पळेंपळु । उदास दास वीकळु ।
हरी पतीतपावनु । निरंजनी निरंजनु ॥१२॥
स्फुट श्लोक – श्लोक ७ ते १०
७
आलेख जागतो जनीं । निजों नका निरंजनीं । बहुत चोर वागतो । उदास दास सांगतो ॥१॥
मनें मनीं झकाल रे । नका नका ठकाल रे । पडेल काळ काळ रे । घडेल हाल हाल रे ॥२॥
गुणी असोनि गूज रे । कळेचिना च तूज रे । तयांत वागणें घडे । म्हणोनि सांगणें पडे ॥३॥
चराचरीं अनंत रे । निरोपिताति संत रे । पाहा पाहा बरें पाहा । नसोनियां सुकें राहा ॥४॥
प्रमाण जाण जाण रे । खुणे विशेष बाण रे । बरा विचार पावसी । तरीच तूज फावसी ॥५॥
८
अखंड सावधान रे । प्रयोग प्रेत्न मान रे । प्रसंग हा तुफान रे । नकोचि वेवधान रे ॥१॥
मनीं धरूनि धारणा । करा बरी विचारणा । प्रेत्न मूळ कारणा । अतर्क्ये ते विचारणा ॥२॥
बहु विंधी विधान हो । परंतु सावधान हो । प्रमाण जाण उत्तरें । प्रत्योत्तरें निरोत्तरें ॥३॥क
आहो जना आहो जना । मनें मना विवंचना । आरत्र हो परत्र हो । प्रचीत पाववी मोहो ॥४॥
म्हणे उदास दास हा । बरें पाहा बरें पाहा । करील प्रेत्न जीतुका । तयास लाभ तीतुका ॥५॥
९
सुगंध गौल्य साजिरीं । फळें रसाल तें बरीं । जयांत त्यास मान्यता । वृथा पदार्थ तो रिता ॥१॥
बहुत खाद्य घातलें । पुढें तयास ठेविलें । जयांत त्यास मान्यता । वृथा पदार्थ तो रिता ॥२॥
सुवर्णरत्नभूषणें । परोपरीं विभूषणें । जयांत त्यास मान्यता । वृथा पदार्थ तो रिता ॥३॥
सुवास द्रव्य खाद्य हो । बहु प्रकार गद्य हो । जयांत त्यास मान्यता । वृथा पदार्थ तो रिता ॥४॥
गुणी गुणास पाहिजे । आगुण ते न पाहिजे । जयांत त्यास मान्यता । वृथा पदार्थ तो रिता ॥५॥
अखंड राग रंग तो । विचार सार संग तो । समस्त मान्य पूरता । वृथा पदार्थ तो रिता ॥६॥
वदोनि काय फारसें । जना प्रत्यक्ष हें दिसे । हरीकथेसि मान्यता । वृथा पदार्थ तो रिता ॥७॥
सगुण तो भला भला । सगुण दास बोलिला । विशेष धन्य पूरता । वृथां पदार्थ तो रिता ॥८॥
१०
करील व्याप तो भला । बहुत भाग्य लाधला । नसेल व्याप तो हळु । पडेल रे पळेंपळु ॥१॥
आरत्र हो परत्र हो । विचित्र काळसूत्र हो । अखंड सावधानता । सभाग्य तो नव्हे रिता ॥२॥
अनेक भाव भावना । सदा मनीं विवंचना । विशेष धारणा धरीं । उदंड चाळणा करीं ॥३॥
सखोल तो कळेंचिना । कदा लिळा तुळेचिना । परांतरासि जाणता । दिस जनास नेणता ॥४॥
कवी म्हणे बहु बरें । करील देव तें खरें । बरी धरूनु वासना । धरा मनीं उपासना ॥१५॥
स्फुट श्लोक – श्लोक ११ ते १५
११
श्री राम राम राम रे । समर्थ योगधाम रे । दयाल तो दया करी । कवी जनासि वीवरी ॥१॥
कदापि जें घडेचिना । जनासि सांपडेचिना । करी तयापुढें दया । अपाय जाय वीलया ॥२॥
धनुष्यबाणधारकु । हरी जनासि तारकु । प्रचंड ध्यान तें धरा । मनांतरींच वीबरा ॥३॥
अखंड पार्वतीपति । रघोत्तमासि चिंतिती । प्रचीत बाणली मना । उपाय सूचला जना ॥४॥
जसा तसाचि काळ हो । मनीं धरा दयाळ हो । तुम्हांसि तो दया करु । अनन्य भाव वीवरु ॥५॥
१२
महंत हो नका नका । बहुत वैभवें धका । उदास दास तापसी । फिरे लिळा जसी तसी ॥१॥
विचार सार वीवरु । नव्हे विवेकु रुबरु । नरु नव्हे खरा खरु । किती सिणेल पामरु ॥२॥
प्रसंग हा तडतडी । करा विवेक तांतडी । सुचीत व्हा घडी घडी । प्रबोध घ्या खडाखडी ॥३॥
पाहा पाहा बरें बरें । करील देव तें खरें । अहंमती अनावरें । विवेकहीण पामरें ॥४॥
करील तो करील रे । तुम्हांसि काय बोल रे । उरों नका म्हणे कवी । उदास दास सीकवी ॥५॥
१३
अनंत हेत अंतरीं । उकावती मनांतरीं । अहेत हेत तो बरा । विचार सारसा धरा ॥१॥
कळेचिना कसें करुं । विशेष काय तें धरुं । अशेष तें विशेष रे । उरों नये चि लेश रे ॥२॥
विवेक पाहातां मुरे । विवंचितां नुरे नुरे । नुरेल तो उरेल रे । उरेल तो नुरेल रे ॥३॥
बहुत मेळ मात्रुका । विचार पाहातां फिका । असेल तो नसेल रे । नसेल तो असेल रे ॥४॥
अनन्यया नव्हे नव्हे । नव्हेचि तो नव्हे नव्हे । चढेचिना पढेचिना । घडेचिना दडेचिना ॥५॥
१४
भुतें भुतासि भाविती । भुतें भुतासि दाविती । भुतें भता विवंचिती । भुतें भुतासि विछिती ॥१॥
भुतासि भावितां लये । अनंत भावितां नये । भुतें भुतांसि जाणती । भुतें खुणेसि बाणती ॥२॥
भुतें समस्त वोळखा । उगाच संशयो नका । भुतें करूनि वावरे । पुढें कसा उपाव रे ॥३॥
भुतें चि अंतवंत रे । भुतें असंत संत रे । भुतांत शब्द तीतुका । भुतें चि हो नका नका ॥४॥
समस्त बोलती खरें । परंतु सार वीवरे । अनन्य भाव तो कसा । प्रचीतिनें जसा तसा ॥५॥
१५
अनेक साधना करुं । अनेक धारणा धरुं । उरेल जीवभाव तो । नुरेक देव तो चि तो ॥१॥
करील सर्व मीपणें । धरील तें दुजेपणें । उपाय रे भला भला । परंतु हेत चूकला ॥२॥
चूकोनियां चुका पडे । घडोन भक्त वीघडे । अनन्य हो अनन्य हो । अनन्य होत धन्य हो ॥३॥
अनन्यता नसे तुला । तरीच देव चूकला । विभक्त भक्त तुं कसा । अहंपणें जसा तसा ॥४॥
कळोन ही कळेचिना । वलोन ही वळेचिना । कसें करूं कसें करूं । मनें मनासि वीवरूं ॥५॥
विवंचना घडी घडी । विचार कोण नीवडी । विवेक पूरता असे । तयास सर्व वीलसे ॥६॥
गुणें गुणासि खंडिजे । मनें मनासिं दंडिजे । नव्हेचि अंतवंत रे । अनंत तो अनंत रे ॥७॥
न बोलतांचि जाणता । खुणे खुणेसि बाणता । मिळेल कोण तो गुणी । कळेचिना क्षणी क्षणी ॥८॥
उगा उगा उगाचि रे । नव्हेचि वाउगाचि रे । नका नका वदों नका । विवेक होतसे फिका ॥९॥
अनन्य भावितां धुरे । नुरोनि दास उधरे । नसोन पावला खुणा । म्हणाल तें सुखें म्हणा ॥१०॥
स्फुट श्लोक – श्लोक १६ ते १७
१६
कितेक जीव जन्मती । कितेक मृत्य पावती । कितेक होत जातसे । मना प्रचीत येतसे ॥१॥
कितेक वृक्ष वाढती । कितेक वृक्ष मोडती । कितेक पाहातां रचे । कितेक मागुतें खचे ॥२॥
पुरें कितेक पट्टणें । कळे समस्त आट्टणें । कितेक होत दाटणी । स्थळें न येत वांटणी ॥३॥
रुणानबंद तों घडे । पुन्हा सवें चि वीघडे । कितेक काल तों वसे । सवें चि सर्व नीरसे ॥४॥
कितेक देश लागला । कितेक देश भंगला । कितेक नृपती भले । परंतु मृत्य पावले ॥५॥
कितेक उत्पती स्थिती । कितेक पावती गती । तुम्ही समस्त देखता । कठीण काळ धाकता ॥६॥
जना प्रतक्ष हें दिसे । तयासि संशयो नसे । रचेल तें खचेल रे । दिसेल नीरसेल रे ॥७॥
दिसेल भास तो भ्रमु । भ्रमें जनासि विभ्रमु । असार सार तें पाहा । कळोनिया सुखें रहा ॥८॥
स्वहित जाणतां खरें । न जाणतां नव्हे बरें । क्षराक्षरासि वीवरा । विचार हा बरा करा ॥९॥
असार सार वाड रे । क्षिरा निरा निवाड रे । करील राजहंस तो । जनामधें विशेष तो ॥१०॥
भुतें भुतासि पाहाती । भुतें भुतांत राहाती । भुतां सबाहे अंतरीं । विचार सार तो धरीं ॥११॥
अरे अनन्य भक्त हो । जना अतीत मुक्त हो । स धन्य धन्य धन्य रे । विचार सार मान्य रे ॥१२॥
१७
कदा कळहोचि लागला । भुतीं कळहो विभागला । अनंत पंथ आगमी । कळहो उदंड नीगमी ॥१॥
प्रकृतिचा कळहो उठो । जनीं प्रकुर्ति वोहटें । प्रकुर्तिमूळ भांडणे । कळहो उदंड मीपणें ॥२॥
कळहो अनादि हा असे । विवंचितां चि नीरसे । अहंमती विरोचिना । तरी कळहो सरेचिना ॥३॥
अभेद भक्तिचा ठसा । अनन्य भाव तो कसा । निवेदनेंचि वोळखा । अहंपणें झकों नका ॥४॥
विकारलेश जों उरे । अहंपणें भरीं भरे। तयासि पाहातां बरें । विरोन रहातां खरें ॥५॥
कदापि वीवरेचिना । तरी मनु थिरेचिना । अहंपणेंचि पातकी । उरेल तोचि घातकी ॥६॥
उरेल तो अभक्त रे । नुरेल तोचि भक्त रे । उगारला अहंपणें । तयासि काय सांगणें ॥७॥
बरें कळेल तें करा । परंतु हेत वीवरा । अहेत तो अहेत रे । धरूनि काय हेत रे ॥८॥
अनन्य भाव ही तरे । उरेल तो पतीत रे । प्रतक्ष वेगळा पडे । अहंपणेंचि नीवडे ॥९॥
धरून पक्ष काय रे । उपाय तो अपाय रे । तुम्ही तुम्हांस वीवरा । स्वहित तें मनीं धरा ॥१०॥
जनीं उदंड पाहिलें । कळहो करीत राहिलें । अनन्य देव भेटला । कळहो तयास तूटला ॥११॥
कळहो करील शब्द रे । अनंत तो निशब्द रे । तुम्ही अनंत कां न व्हा । वेवादतां अव्हासव्हा ॥१२॥
अनंत ब्रह्म तें असे । तयास पक्ष ही नसे । संत संत संत रे । निवांत रे निवांत रे ॥१३॥
स्वयें चि तो चि होइजे । पदीं मिळोनि जाइजे । उरेल तो कळहो करु । उदंड पक्ष ही धरु ॥१४॥
उदंड हो बरें बरें । तुम्ही म्हणाल तें खरें । कळेल तें सुखें करा । धराल तें सुखें धरा ॥१५॥
उडेल तो पडेल रे । पडेल तो रडेल रे । उडेचिना पडेचिना । रडेचिना दडेचिना ॥१६॥
वितंड वाद घालणें । वितंड शब्द बोलणें । वितंड बंड ही नुरे । उरेल तें चि तें नुरे ॥१७॥
अनेक शब्दभावना । किती करूं विवंचना । जनी म्हणेल जें जसें । तयांसि मानिजे तसें ॥१८॥
हितार्थ सांगणें घडे । विवंचिता तिढा पडे । जना प्रचीत नावडे । कुळाभिमान तो जडे ॥१९॥
अनन्यता परोपरीं । उदास दास वीवरी । कळहो जनासि वाटला । मनु बळें उचाटला ॥२०॥
स्फुट श्लोक – श्लोक १८ ते २०
१८
परीक्षवंत तो मिळे । तयास वोळखी कळे । बहुत लोक नेणता । करील काय जाणता ॥१॥
असत्य तें चि सत्य रे । प्रचीत ते असत्य रे । स्वधर्म तो अधर्म रे । अधर्म युगधर्म रे ॥२॥
नसे च न्याय पाहातां । तयांत सीन राहातां । न ये चि आणि नायके । अहंपणें वृक्षा झके ॥३॥
आढंच साभिमानसा । आमानसा गुमानसा । प्रचीत वाउगी करी । बळें चि ते भरे भरीं ॥४॥
उगाच पक्ष घेतला । बळें चि वाद घातला । येथार्थ अर्थ वेर्थ रे । अनर्थ रे अनर्थ रे ॥५॥
करील काय तो भला । बहुकचीत येकला । विभक्त चोर फारसे । कचित साहुकारसे ॥६॥
सुधा परंतु वायसां । घडेल भोग कायसा । विवेकहीण त्या जना । घडे कसी विवंचना ॥७॥
प्रचीत न्याय वीलसे । दुराभिमान त्या नसे । विचार सार वीवरी । जनासि धन्य तो करी ॥८॥
प्रचीत सत्य सत्य रे । असत्य तें असत्य रे । निवेदनीं टळेचिना । बरी लिळा कळेचिना ॥९॥
विशेष संतसंग तो । विरंगे रंग भंगतो । अनन्य हो मनीं धरा । विचारणा बरी करा ॥१०॥
१९
अचाट वाट उगमु । विहंगमु विहंगमु । विवेक येक सुगमु । घडेल उत्तमोत्तमु ॥१॥
उकावतां पळेंपळु । उफाळतां चि वीमळु । मुळींहुनी उठावला । बळेंचि ऊर्ध पावला ॥२॥
विवंचितो विचक्षणु । विशाळ धूर्त तीक्षणु । शरु नभांत संचरे । विवेक निर्गुणीं भरे ॥३॥
भरें भरें बहु भरें । पुरे पुरे सिमा पुरे । नुरे नुरे अनु नुरे । नुरोनि संत वावरे ॥४॥
अनन्य तो अनन्य रे । अनन्य धन्य धन्य रे । अभेद भक्त तो भला । निवेदला निवेदला ॥५॥
२०
बहुत स्वप्रीचे सखे । परंतु कोण वोळखे । विशेष प्रीति संपदा । खरी नव्हे चि ते कदा ॥१॥
कितेक नम्र बोलती । कितेक मृद चालती । कितेक लोक वैभवें । कितेक वोढती जिवें ॥२॥।
कितेक प्रीतिची मनें । कितेक भव्य भोजनें । कितेक वस्र भूषणें । परोपरीं विभूषणें ॥३॥
गुणें विशेष सुंदरा । दिसे बरी वसुंधरा । बहुत वर्तमानसें । मनीं गमे गुमानसें ॥४॥
कितेक सौख्य देखिलें । कितेक सौख्य चाखिलें । कितेक आठवे मना । बरी करा विवंचना ॥५॥
कितेक स्वप्रीच्या धना । मनीं धरूनि वेधना । बहुत लोक लोधले । धरूनि वेध खेदले ॥६॥
प्रपंच हा विसंचरे । तया परीच संचरे । भुलों नका भुलों नका । क्षणीक सर्व वोळखा ॥७॥
विचित्र भास भासतो । विंवचितां उदास तो । मनास बुधि सांगणें । जनास काय सांगणें ॥८॥
उगीच लागली सवे । विचार सारसा नव्हे । बनव्हे नव्हे नव्हे चि रे । सवे सवे सवे चि रे ॥९॥
उदास दास उत्तरें । म्हणे स्वरूप तें खरें । समस्त संग वाव रे । स्वभाव तो स्वभाव रे ॥१०॥
स्फुट श्लोक – श्लोक २१ ते २५
अचेतनीं सचेतनीं । समस्तही जनीं वनीम । अखंड तो पुरातनु । निसंग तो निरंजनु ॥१॥
२७
पाहा कितेक निर्मळें । भुतें भुतांसि वर्मिलें । अनेक रूप रंग हो । प्रकुर्ती पाववी मोहो ॥१॥
२८
विचार सार शोधितां । प्रबोध बोध बोधितां । अखंड खंडता नसे । स्वयें प्रचीत वीलसे ॥१॥
बरी विवंचितां तनु । दिसे प्रभंजनु मनु । परंतु येक रूप हो । जनास पाववी मोहो ॥२॥
बहुत वात मातला । जनीं समस्त रातला । अनेक सृष्टि चाळकु । अनंत जीवपाळकु ॥३॥
मनांत जाणती कळा । चळे अखंड चंचळा । जनासि पाळितो सदा । सतत हेत सर्वदा ॥४॥
सहेत वात येक रे । पुढें मिळे अनेक रे । परंतु सार तो चि तो । भला जनीं बुझेल तो ॥५॥
चळेल तो चि चाळकु । पळेल तो चि पाळकु । करील तो विकारला । विकारवंत हारला ॥६॥
अखंड देव निर्मळु । तयास काय रे मळु । अचंचळासि चंचळु । म्हणेल कोण तो खळु ॥७॥
गुणारहि त निर्गुणा । चुकोन सांगती खुणा । बळें चि गुण लविती । सगुण ब्रह्म भाविती ॥८॥
समस्त कार्य मूळ हें । विकारलें समूह हें । अनंत निर्विकार तो । नव्हे चि रे विकार तो ॥९॥
अखंड येत जातसे । अख्मड होत जातसे । अख्मड जे विकारली । नये कदापि थारली ॥१०॥
अतर्क तर्क वेचिना । अलक्ष लक्ष वेचिना । अनंत तो अनंत रे । प्रपंच अंतवंत रे ॥११॥
चळेचिना चि तो चळे । निरोपिताति आंधळे । उगेंचि शब्द वाउगे । वदोनि मूर्ख तें फुगे ॥१२॥
कदा न येचि प्रत्ययो । तयास काय तो जयो । पतीत तो चि पातकी । विनाप्रचीत घातकी ॥१३॥
नसे प्रचीत तें सुणें । उगोंचि काय भुंकणें । स्वयें प्रतीत तो वरु । उगाचि सिंतरु खरु ॥१४॥
निरंजना म्हणे करी । बळें चि गुण थावरी । अलीप्त त्यास भावना । करी म्हणेल तो उणा ॥१५॥
प्रचीत पुसतां कळे । चुकोन वेर्थ चावळे । मनु चहुंकडे पळे । कितेक लोक आंधळे ॥१६॥
उदास दास राहातो । प्रतीत सत्य पाहातो । कळेल त्या सुखें कळो । वळेल त्या सुखें वळो ॥१७॥
२९
देश काळ वर्तमान । सर्व ही अवेवधान । कोणतें विधी विधान । सावधान सावधान ॥१॥
मनास लागली सवे । विधी विधान तें नव्हे । चुकोन हेत जातसे । जनांस घात होतसे ॥२॥
उदंड धंड दंडिलें । उगेंचि मुंड मुंडिलें । अनेक मत्त वेष हो । रिपूसि ही न हो न हो ॥३॥
शरीरवेष पालटे । परोपरीं नटे नटे । परंतु काय साधिलें । अगम्य कोण शोधिलें ॥४॥
उदंड हो नका नका । समस्त ही पडे चुका । ग्रहेंचि पाहातां वरी । परंतु कोण अंतरीं ॥५॥
बहु गृहांतरीं गृहें । शरीर नाम निग्रहें । परंतु कोण निगृही । उदंड मत्त अगृही ॥६॥
तया प्रभुसि नेणता । उगेचि वेर्थ सीणता । प्रसंग मान जाणिजे । तरी खुणेसि बाणिजे ॥७॥
शरीर मात्र तें भलें । तयांत कोण शोभलें । न जाणतां नव्हे भलें । सिणोन काय उगलें ॥८॥
समस्त देहधारकु । समस्त सौख्यकारकु । बहु तनूंत येकला । परोपरीं विभागला ॥९॥
कितेक ते भले भले । तयामधेंच गुंतलें । विचा र सार जागवा । तुम्ही तुम्हास उगवा ॥१०॥
कितेक दृश्य जुळलें । विचारितां वितुळलें । अलक्ष लक्षितां नये । अनन्यता मनोजये ॥११॥
समस्त मान मानिसी । तरी जनास मानसी । अलीकडे पलीकडे । विभक्त भक्त नावडे ॥१२॥
३०
विना प्रचीत मर्गळा । तयास वेद अगळा । स्वयेंचि जो भुपाळ कां । तयास द्वारपाळ कां ॥१॥
कितेक लोक आळिले । कितेक द्बार पाळिले । तयास ही नका नका । उठेल काय सेवका ॥२॥
भ्रमें भुलेल चोर तो । तथा हारामखोर तो । तयास हाल हाल रे । झडेल बाल बाल रे ॥३॥
अनेक भास नावरी । मदार ठेविला सिरीं । घबाड अर्थ जातसे । भलास भूस खातसे ॥४॥
आभास भूस भासलें । विचारितां विनासलें । विशेष मानवा रसु । भुसास खाय तो भुसु ॥५॥
अनेक देश हिंडतां । अनेक भास धुंडितां । सुशब्द तो अनेक रे । परंतु अर्थ येक रे ॥६॥
विचारितां विवंचना । विधी शरीर भावना । विचार पाहातां नसे । देहे विदेह नीरसे ॥७॥
निरास पंचभूतिकां । प्रप्मच हा दिसे फिका । तयांत सर्व आटलें । परंतु दृश्य लोटलें ॥८॥
विधी विधान वर्ततां । जनामधें प्रवर्ततां । विचार सार अंतरीं । विधी नसे तदंतरीं ॥९॥
विधी विधान तो गुणा । घडेल कोण निर्गुणा । गुणांत गोविला गळ । विवेक पंथ मोकळा ॥१०॥
स्फुट श्लोक – श्लोक ३१ ते ३५
३१
तनास भेटलीं तनें । मनास चुकली मनें । चुकी चुकी बहु चुकी । परस्परें चुकामुकी ॥१॥
मढयास भेटलें मढें । करील काय बापुडें । मनें मनाचिया खुणा । बुझेल लोभ त्या दुणा ॥२॥
उगेंचि वेचलें वये । मनास भेटतां नये । मनें मनास राखणें । सुखें सुखास चाखणें ॥३॥
न संगतांच जाणणें । खुणेसि खुण बाणणें । प्रसंग मान पुरतें । कदापि तें नव्हे रितें ॥४॥
विकल्प दुरी तों कळे । अखंड न्याय नीवळे । प्रमाण खुण जाणतो । नव्हे चि अप्रमाण तो ॥५॥
प्रसंग धारणा धरे । मनें मनांत वीवरे । कदा भरीं भरेचिना । महत्त्व तें सरेचिना ॥६॥
क्षमा बहुत साहाणें । आढया तिढयांत राहाणे । जनामधें विटेचिना । बरेपणें तुटेचिना ॥७॥
भरीं भरेल दुसरें । जना कळेल तें खरें । भलचि तो भला भला । बहु जनास मानला ॥८॥
खरें चि तें सदा खरें । बरें चि तें बहु बरें । समस्त लोक जाणती । भले प्रमाण बाणती ॥९॥
प्रमाण तो भला भला । बहु जनांत शोभला । भले चि मानिती तया । विमूढ जाय वीलया ॥१०॥
बहु जनांत सीकती । तया गुणें चि वीकती । परंतु सीकतां नये । तयास लावणें नये ॥११॥
परांतरास राखणें । आचुक सुख चाखणें । परंतु संग तो मिळे । तरी जनास नीवळे ॥१२॥
३२
अंतरींच सावधान । उत्तरीं अवेवधान । सांवरी प्रसंगमान । यावरी विधी विधान ॥१॥
प्रयत्न पुरता करी । सदा विचार वीवरी । चतुर तो परोपरीं । तया सरी मनोहरी ॥२॥
३३
विवीध वर्म लोचनीं । कदा नसो वसे जनीं । दु:खास लागतां ढकां । पुरे पुरे नका नका ॥१॥
बहु प्रकार बोलणें । बहु प्रकार चालणें । मनास लागतां ढका । पुरे पुरे नका नका ॥२॥
परांतरास राखणें । समस्त मुख चाखणें । कदापि अंतरा पडे । परीच सख्य वीघडे ॥३॥
गुणी मिळले पुरता । वदेल मौन्य देवता । तयापरी परांतरें । चुकोन राहाती खरें ॥४॥
प्रवीण जे माहां भले । भले भले चि गुंतले । कवीस बोबडी वळे । पाहा चतुर चावळे ॥५॥
३४
तनें झिजेल त्या मनें । मनें झिजेल त्या तनें । तनें मनें विशेषता । झिजेल तोचि पुरता ॥१॥
मनें प्रसंग वीवरी । तनें प्रसंग जो करी । तनें मनें चुकेचिना । तया उणीव येचिना ॥२॥
मनें बहुत चंचळें । विशेष गुण आडळे । प्रचीत मानली मना । तरीच आवडे जना ॥३॥
रुपें विशेषता दिसे । परंतु गुण तों नसे । तयास मानितीलसे । सुभा समस्त वीलसे ॥४॥
पडेल पाभळें बळें । गुणीस मोल आगळें । तगेल रंग तो खरा । बरें चतुर वीवरा ॥५॥
रुपें रसाळ तो गुणी । तयास आवडी दुणी । रुपें गुणें विशेषता । करील तोचि पुरता ॥६॥
विशेष वेष साजिरा । उदंड गुण तो बरा । प्रचीतिनें खराखरा । चढेल कोण दुसरा ॥७॥
उदास दास तो धरी । परोपरीं क्तिया करी । गुणें गुणी गुणाथिला । भला भला भला भला ॥८॥
प्रताप सूर्यसा तपे । तयास कोण रे जपे । अनंत गुण उत्तमा । कदा कळेचिना सिमा ॥९॥
करील न्याहाल सेवका । समर्थ वीसरों नका । विशेष हा रघोत्तमु । भजेल उत्तमोत्तमु ॥१०॥
३५
चकोर चातकें दुखी । चतुर ही बहु दुखी । मना मना मिळेचिना । विशेष तें कळेचिना ॥१॥
गुणाविषीं भला भला । परंतु हंस येकला । विशेष तो कळेचिना । विहंगमीं मिळेचिना ॥२॥
गुणी गुणास जाणती । गुणी खुणेसि बाणती । उगाचि लोक आडळे । गुणी विशेष नाडळे ॥३॥
गुणासि गुणग्राहिकें । न मीळतां दिसे फिकें । विशेष वस्तु केंढली । सुवस्तिही नव्हे भली ॥४॥
विशेष पेंठ पाहाणें । तयेमधें चि राहाणें । तरीच सुख पाविजे । अनंत गुण भाविजे ॥५॥
स्फुट श्लोक – श्लोक ३६ ते ४०
३६
मनें मनासिं मीळणी । तयासि मानिती गुणी । परांतरासवें भरे । प्रसंग मान वीवरे ॥१॥
फुटेल वेगळाचि तो । सदा मिळेल तो चि तो । फुटेचिना तुटेचिना । मिळोन वेगळेचिना ॥२॥
तदंश तो चि बोलिजे । प्रसंग मान जो भिजे । रिझेल त्यापरी रिझो । झिजेल त्यापरी झिजो ॥३॥
विभक्त दीसती खरें । परंतु येक अंतरें । अनन्य येकि धारणा । मिळों न जाये कारणा ॥४॥
मिळोन जाय अंतरा । तदंश तो चि तो खरा । विचार येक धारणा । मिळोन जाये कारणा ॥५॥
३७
गडीत औघडी असे । परीघ रीघती कसे । कजा कजा कलेचिना । मनांत घालवी मना ॥१॥
जनांत चाळणा घडे । तयापरीचि वावडे । शरीर पाहातां घडे । उपाधि योग वीघडे ॥२॥
बरी विचारणा सखी । परांतरास पारखी । समस्त हेत नीरखी । तयास नाडळे मखी ॥३॥
अखंड सावधानता । मनीं विधी विधानता । समस्त धारणा धरी । सदा विचारणा करी ॥४॥
प्रसंग चाळणा घडे । खटयाल लोक तो दडे । सदा उणें हळु पडे । पदोपदीं च सांपडे ॥५॥
३८
प्रसंग रंग भंगवी । सदा सभा विरंगवी । तया नराकडे कवी । पदोपदींच सांपडे ॥१॥
तुकेल तो चुकेल रे । चुकेल तो चुकेल र । तुकेचिना चुकेचिना । चुकेचिना तुकेचिना ॥२॥
नसोन मान जातसे । वसोन मान होतसे । प्रसंग संग पावती । तुकें तुकें बळावती ॥३॥
समस्त व्योम वीवळे । तरी जनांत नीवळे । अधीर्ध गुप्त होतसे । पदीं मिळोन जातसे ॥४॥
अखंड गुप्त पंथ हा । चतुर हो पाहा पाहा । मनें मनासि मीळणी । गुणास जाणती गुणी ॥५॥
३९
विना प्रचीत ते तुला । फळेल कायरे मुला । उगाच सीण वाउगा । बळेंच होतसे दगा ॥१॥
खरेचि द्रव्य ते खरें । प्रचीत औषधें बरें । खराचि निंश्चयो खरा । धरा विवेक वीवरा ॥२॥
जनीं जनाचिये परी । विचार सार अंतरीं । बहुत दाटले खडे । परीस त्यामधें दडे ॥३॥
परीक्षवंत जाणती । खुणेसि खुण बाणती । मनें मनास मीळणी । गुणास जाणती गुणी ॥४॥
विचार सार तो धरे । परांतरांसि वीवरे । कवी म्हणे भला भला । विवेक त्यास लाभला ॥१५॥
४०
कळा कळाचि वीकळा । समर्थ जाणती कळा । कळेल त्या सुखें कळो । वळेल त्या सुखें वळो ॥१॥
गुणीच गोविले गुणी । विशेष राजकारणी । बहुत रंग रंगिणी । तरंगिणी तरंगिणी ॥२॥
कितेक व्यापिलें दिसे । रहित तें किती असे ।बबरा विचार हा करा । मनांतरींच वीवरा ॥३॥
मिळेल जाणता कधीं । शरीर हें निरावधी । प्रसंग हा कठीणसा । वदोन काय सीणसा ॥४॥
मना मनासि मीळणी । करील दक्ष तो गुणी । उगे राहा उगे राहा । न बोलतांच हें पाहा ॥५॥
स्फुट श्लोक – श्लोक ४१ ते ४३
४१
हळु हळुच बोलणें । हळु हळुच चालणें । विचारणें अबोलणें । अबोलणेचि बोलणें ॥१॥
उदास बोलणें करी । मनास दास वीवरी । जनास हें बळें कळे । जरी मनांत नीवळे ॥२॥
४२
जिवामधील जाणती । कळाचि ते सरस्वती । मनांतरीं वसे सदा । प्रसन्न रूप शारदा ॥१॥
कळा कळा चि वीकळा । समर्थ जाणती कळा । अचंचळा चि चंचळा । निचंचळा दुचंचळा ॥२॥
अनेक सौख्यदायेका । अनेक लोकनायेका । अनेक धारणा धरी । अनेक चाळणा करी ॥३॥
अनेक पंथ चालवी । अनेक मत्त हालवी । निशब्द खूण पालवी । मनें मनास मालवी ॥४॥
उरेचिना सरेचिना । पुरेचिना धरेचिना । असेचिना नसेचिना । वसेचिना दिसेचिना ॥५॥
अगम्य गम्य गम्य रे । प्रणम्य नम्य नम्य रे । असो जसी तसी असो । मदांतरींच वीलसो ॥६॥
चतुर जाणते जनीं । करा विचारणा मनीं । सरस्वतीस वोळखा । उगे भरीं भरों नका ॥७॥
कसी कसी कितेकसी । पाहाचनास कोणती । आहाच पाहातां नये । विचारितां प्रचीत ये ॥८॥
प्रचीति ये तिची तिला । उगाचि काये गल्बला । दुभाग भासतो पाहा । समस्त व्यापिनी माहां ॥९॥
असेल तें सुखें असो । नसेल तें सुखें नसो । कळेल त्या सुखें कळो । वकेल त्या सुखें वळो ॥१०॥
उदास दास बोलणें । उदास दास चालणें । उदास याचिकारणे । नव्हे मनासि पारणें ॥११॥
गणेश वेश पूजिती । गणांतरी सरस्वती । जना उफारटें दिसे । परंतु सत्य हें असे ॥१२॥
उफारटें सुफारटें । नटे विचार नीवटे । नसोन शारदा वदा । उगेचि सीणता सदा ॥१३॥
आहो जना म्हणे कवि । तुम्हांस कोण सीकवी । बहुत गुंतले दिसा । करा विचार नीरसा ॥१४॥
तुम्हास कोण बोलवी । तुम्हास कोण चालवी । तुम्हास कोण हालवी । समस्त ही लव्हालवी ॥१५॥
जनामधें प्रभंजनु । प्रभंजनामधें मनु । मनांतरींच शारदा । समस्त जाणते सदा ॥१६॥
खडेच सार भूतळीं । पियूषसार ते जळीं । रवीच सार पावकीं । जनास हा उपाव कीं ॥१७॥
प्रभंजनांत जाणती । कळाचि ते सरस्वती । नभांत ब्रह्म सार हो । करा बरा विचार हो ॥१८॥
तनूंत मानवी तनु । तयांत सार आननु । सिरांत सार लोचनु । सुलोचनीं प्रभंजनु ॥१९॥
प्रभंजनांत वासना । विचार येऊं द्या मना । समस्त जाणती कळा । बरे चतुर नीवळा ॥२०॥
किती करूं विवंचना । हरीजनासि सूचना ॥ समीर सर्व सार हो । तयांत ही विचार हो ॥२१॥
विचाररूप जाणणें । खुणेसि खुण बाणणें । स्वभाव चालिला बळें । वदोन काये पाबळें ॥२२॥
मनास मानला जये । जनास कां कळो नये । वडील कोण माईका । कदापिही वदो नका ॥२३॥
समस्त स्वप्र वोसरे । तरीच जागतें खरें । कळावयास बोलणें । विशेष तें अबोलणें ॥२४॥
सगुण भक्ति वाळली । उपासना कलोळली । शरीर भावना भरे । जना समस्त हे खरें ॥२५॥
४३
धिरे धिरे म्हणे कवी । विशेष जन्म मानवी । तयांतही बहु तनु । विचारणा तनुमनु ॥१॥
बहु मिळोनि भांडता । उगेचि वेर्थ तंडता । तनुगुणे चि वोळखा । उगे भरीं भरों नका ॥२॥
बरा करा शमु दमु । गुणें समस्त कर्दमु । भरा भरा भरीं भरा । भरोनि सर्व वीवरा ॥३॥
भुतीं भुतें विळासती । गुणी गुणांत भासती । तयापरीच तीसरें । प्रचीतिनें खरें खरें ॥४॥
अगाध हा रघोत्तमु । न बोलवे पराक्रमु । कठीण काळ वीशमु । भ्रमुचि पाववी भ्रमु ॥५॥
प्रताप या रघोत्तमा । करील कोण रे सिमा । हिणे विळास पावती । सुखें सुखें बळावती ॥६॥
उदंड देव ही पाहा । समर्थ येक राम हा । बसमस्त देव तीं भुतें । सदा रघोत्तमीं रतें ॥७॥
विशेष आंगिची कळा । कदा कळेचिना लिळा । अनाम्य नाम्यधारकां । अनंत सुखकारकां ॥८॥
स्फुट श्लोक – श्लोक ४४ ते ४६
४४
कदा चुकेचिनापदा । जनांस लाधली सदा । उव्यासि धाक सोडिला । समर्थ राम जोडिला ॥१॥
उदंड जन्नकु फिरे । तयामधें चि वीवरे । पाहावयासि आग्रजा । विशेष स्फुरती भुजा ॥२॥
अखंड प्रीतिच्या गुणा । कदा न सोसवे जना । प्रभु सदा परोपरीं । उदास दुसरी सरी ॥३॥
अनुज सेवकापरी । बहु मनु तयावरी । मनोगतें चि बोलणें । मनोगतें चि चालणें ॥४॥
जिवीं जिवाचिया खुणा । बुझेल तो चि शाहाणा । प्रचीत बोलणें घडे । बरा विचार सांपडे ॥५॥
करूनि सर्व बावळा । उगावलाच फावला । मनें मनु बुझावला । जनास राम फावला ॥६॥
४५
प्रसंग हा कठीण हो । बहुत पावले मोहो । परंतु येत्न पाहाती । सुखें चि ते चि राहाती ॥१॥
विवेक पाहाणें बरा । बरा विचार तो करा । उपासकांसि सुचना । उपासना उपासना ॥२॥
४६
श्रीकृष्ण देव नाटकु । जनांत सींतरु ठकु । तयास बैसला धका । मनुष्य नेति गोपिका ॥१॥
भुपाळ ही भले भले । जनीं उदंड जाहाले । हरासकाळ सेवटीं । विसंचितां लुटालुटी ॥२॥
समाग्य रावणादिकां । बहु कठीण काळ कां । महीवरी परोपरी । उदंड हे भरोवरी ॥३॥
भरे सवेंचि मागुतें । उगेंचि होतसे रितें । कदापि नावरे जना । बरी करा विवंचना ॥४॥
नदी भरोन वोहरे । तळें भरोन तें फुटे । तयापरीच संपदा । जनीं न निश्चळे कदा ॥५॥
बहुत भोगिती जयें । भले न पाहाती तये । ठकी ठकून जातसे । सुरंग भंग होतसे ॥६॥
बहुत चाखती चवी । सुरेंद्र दैत्य मानवी । म्हणे कवी नका नका । समस्त पावले धका ॥७॥
स्फुट श्लोक – श्लोक ४७ ते ५०
४७
रुणानुबंद तों घडे । पुढें समस्त वीघडे । पशु मनुष्य संपदा । घडोन वीघडे सदा ॥१॥
भरोंव लागतां भरे । भरे कदापि नावरे । सवें चि वोसरे सरे । सरें चि तें कदा नुरे ॥२॥
बरीच वेळ लागतां । घडोन ये न भागतां । उगाच काळ विषमु । पराक्तमुच तो श्रमु ॥३॥
बराचि काळ तो बरा । न मागतांचि ये घरा । बळेंचि लोक बोलती । सुखें सुखी कल्लोळती ॥४॥
उदास राहातां गती । भले विवेक सांगती । घडेल तें सुखें घडो । पडेल तें सुखें पडो ॥५॥
४८
बहुगळा रसागळा । विशेष रंग आगळा । कळा कळा चि कोकिळा । पशु स्वरें चि वीकळा ॥१॥
श्रीकृष्ण विष्णु माधवें । मुरेंद्र चंद्र यादवें । जनासि ब्रह्म बोधिलें । प्रकुर्तीमान शोधिलें ॥२॥
प्रचीत सद्य प्रत्ययो । स्वीहत गद्य हो जयो । विचार धन्य धन्य रे । विवेक विश्वमान्य रे ॥३॥
प्रशस्त मस्त हस्तसे । बहुत खस्त वेस्तसे । असंख्य संखितां नये । रवीकुळोद्भंवा जये ॥४॥
नव्हे जनासि गद्य रे । नव्हे चि गद्य पद्य रे । स्वरूप तें चि सद्य रे । प्रशम्तसें प्रपद्य रे ॥५॥
४९
नसोन जाणती कळ । कळा समस्त वीकळा । परांतरासि नेणवे । तयासि काय जाणवे ॥१॥
परामतरासि जाणता । नसेल तो मुळीं रिता । सिकोन काय सीकलें । विकोन काये वीकलें ॥२॥
भला भला विचक्षणु । प्रवीण योग्य तीक्षणु । खुणावितां खुणावला । मनें खुणेसि पावला ॥३॥
बहुत धूर्त तो भला । खुणेसि तूर्त पावला । न सागतां जया कळे । निरोआपतां चि नीवळे ॥४॥
अखंड हेत पालटे । कळेचिना मनु विटे । सुरंग ना विरंगसे । उगेचि रंग भंगसे ॥५॥
५०
बहुत जाणती कळा । कळाचि होत वीकळा । कळोन ही कळेचिना । वळोन ही वळेचिना ॥१॥
स्फुट श्लोक – श्लोक ५१ ते ५३
५१
प्रसन्न मुख सुंदरा । तुझेन हे वसुंधरा । धराधरें फणीवरे । तुलचि भाविलें खरे ॥१॥
कळेचिना तुझी कळा । श्रुती चतुर वीकळा । अनंत भाविनी लिळा । अगम्य तूचि नीवळा ॥२॥
तुझेनि सर्व बोलणें । तुझेनि सर्व चालणें । nतुझेनि योग धारणें । तुझेनि राजकारणें ॥३॥
तुझेनि नांव रूप हो । तुझें दिसे स्वरूप हो । विधी भुगोळचाळके । अनंत लोकपाळके ॥४॥
तुझीच चालते सता । बुझेले तोचि फुगता । तुझी करूनि आस तो । फिरे उदास दास तो ॥५॥
५२
प्रमाण बाण सोडिला । गिरी कठोर फोडिला । आराम रामतीर्थ हो । उदास पावले मोहो ॥१॥
बळ मळीत निर्मळे । वरी जळें सुसीतळें । सतंत वोघ वाहाती । कितेक लोक पाहाती ॥२॥
तरुवरी फळें फुलें । बहु निबीद दाटलें । रसाल वृक्ष डोलती । अनेक जीव बोलती ॥३॥
सदा अनानिळ सीतळु । सुखावळा पळेंपळु । स्वयें करील धन्य तो । भला जनासि मान्य तो ॥४॥
कितेक जीव जन्मले । तयामधें भले भले । धने समस्त वेचलें । विसंचितां विसंचलें ॥५॥
५३
वदे उदंड उत्तरे । परंतु कोणतें खरें । उगेचि वाउगेंचि तें । फटेल येर पोर तें ॥१॥
विनोदिया भरें भरें । उदंड उंच उत्तरें । तुरंग हस्त आणितो । मुखें जना नवाजितो ॥२॥
परंतु तें नव्हे खरें । उगीच पोच उत्तरें । विचार पाहातां कळे । भुलेनि जाति बावळे ॥३॥
धनेंचि निर्मितो कसा । दिसे बरा धणी तसा । पाहा पाहा बरें पाहा । भ्रमादिला प्रपंच हा ॥४॥
भ्रमासि भुलणें घडे । भलें चि वेसनीं पडे । विवेक शुध पाहिजे । तरीच देव लहिजे ॥५॥
उगीच चाकरी करी । अव्हा सव्हा भरे भरीं । धण्याकडे न पाहाणें । उगेचि वेर्थ राहाणें ॥६॥
उगाचि लौंद येरसा । निसंगळु गयाळसा । धणी निशाण चुकला । उदंड त्यास बुकला ॥७॥
धण्यासमागमें असे । मनोगत चि वीलसे । कदापि तो चुकेचिना । बहु जनीं तुकेचिना ॥८॥
धणी उरेल येकला । तरी अखंड टीकला । कुडी गळेल बापुडी । मनची जाये तांतडी ॥९॥
धन्यासी वेगळा नसे । जना धणीचसा दिसे । अभेद भक्त जाणिजे । खुणेसि खुण बाणिजे ॥१०॥
उदंड देव ते भले । उदंड भक्त शोभले । विवेक भक्त ता भला । येथार्थ वाक्य शोभला ॥११॥
स्फुट श्लोक – श्लोक ५४ ते ५७
५४
बहुत तान लागली । तनु विशेप भागली । सुरंग तो विरंगला । प्रसंग रंग भंगला ॥१॥
कठीण वेळ पातली । तुन विशेष श्रांतली । तगबगीतसे मना । कराल भेटि जीवना ॥२॥
सुगंध नीर गारसें । दिसेल काय फारसें । घळाळ वोतितां बरे । नये मनास दुसरें ॥३॥
कळकळीत हा पळु । कवी बहुत वीकळु । कळवळोनि पोकला । दयाळ राम वोळला ॥४॥
५५
त्रिकांद वेद बोलिला । उदंड अर्थ चालिला । बुझेल तो भला भला । जनीं महंत शोभला ॥१॥
देह्यासि कर्म लागलें । विध्योक्त चालतां भलें । बहुत कर्म शोभलें । भले तयास लाभलें ॥२॥
प्रमीत शौच्य आच्यनें । विध्योक्त स्नान तर्पणें । त्रिकाळ सांग मार्जनें । दिनेषु वन्हि पूजनें ॥३॥
स्वधर्म कर्म सांग ते । नसे कदापि वेग तें । चुकों नये चुकों नये । चुकीस प्रत्यवाय ये ॥४॥
रवहा स्वधा परोपरीं । अखंड शास्र वीवरी । सुसीळ न्यायवंत तो । बहु जनासि मान्य तो ॥५॥
प्रयोग याग वेदिका । प्रसंग जाणता निका । येथाविधी परायणु । समर्थ तोचि ब्राह्मणु ॥६॥
येजन याजनादिके । आधेन ते आध्यापकें । स्वदान हो पतिग्रहो । विशेष नेम निग्रहो ॥७॥
उदंड शास्र संमती । बहु पुराण वीत्पती । पाहातसे श्रृती स्मृती । आचुक धारणा धृती ॥८॥
सुमंत्र येंत्र जे जया । विषुध आगमी क्तिया । कितेक वायु धारणा । अगत्य कार्य कारणा ॥९॥
अपार कर्ममार्ग हा । घडेचिना च सांग हा । कचाट कर्म सूचना । पुढें असे उपासना ॥१०॥
स्वधर्म चूकतां जनु । हरी पतीतपावनु । दुजा जनीं असेचिना । म्हणोनियां उपासना ॥११॥
उदंड देव देवता । जनीं बुझेल पुरता । रुणानबद जीकडे । भजेल लोक तीकडे ॥१२॥
उदंड देव ते जना । उदंड भक्त पूजनीं । विधी विधान वेगळें । महात्म चालिलें बळें ॥१३॥
अनेक मंत्र देवता । अनेक भक्र भाविता । स्वयेंच वेद बोलिला । म्हणोन लोक चालिला ॥१४॥
जयास जें चि पाहिजे । तयास तें चि वाहिजे । फळें फुलें परोपरीं । नवेद्य खाद्य कुसरी ॥५॥
सुगंध गंध लेपनें । बहुविधा विलेपनें । तिथीच वार वांटले । जया तया विभागले ॥१६॥
जयास जे सदा प्रिती । बहुत लोक नौसिती । भुमंडळीं परोपरीं । विधी विधान कुप्तरी ॥१७॥
अनेक देव पूजनें । अनेक मंत्र सुमनें । अनेक नाम चिंतनें । अनेक तें उपोषणें ॥१८॥
भुमंडळीं भले भले । बहुत देव स्थापिले । किती म्हणोन बोलणें । विधी विधान चालणें ॥१९॥
उदंड वाम सव्य हा । विचार आगंमी पाहा । द्बितीय कांड बोलिलें । उपासकां निरोपिलें ॥२०॥
समस्त देव ते मुळीं । बहुविधा भुमंडळीं । परंतु वासना लिळा । स्वभाव जाणती कळा ॥२१॥
समस्त ही मनोगतीं । रुपें समीर वर्तती । विचित्र देव भावना । तयापरीच कल्पना ॥२२॥
बहुत सुक्षमें रुपें । स्थुळें धरून साक्षपें । देहे कदा दिसेचिना । कितेक दाविती जना ॥२३॥
बहुविधा परोपरीं । प्रचीत चालते खरी । उपाय कामना पुरे । जनांत देव वावरे ॥२४॥
कितेक स्वप्न देखती । कितेक देव भाविती । कितेक लागती सळें । उदंड मागती बळें ॥२५॥
न पावतांच यातना । परोपरीं बहु जना । कितेक देव धांवती । मनोगतें चि पावनें ॥२६॥
कितेक ते भले भले । कितेक साक्ष पावले । पदोपदींच चालणें । पदोपदींच बोलणें ॥२७
प्रत्यक्ष देव रक्षिती । प्रत्यक्ष देव भक्षिती । प्रतक्ष देव ते किती । उभाउभी करामती ॥३८॥
बहु जनीं प्रसन्नता । प्रतक्ष चालते सता । चुकों नये चुकों नये । चुकावितां महद्भये ॥२९॥
कळे तया उदंड हें । म्हणोन ज्ञानकांड हें । समूळ सर्व जाणणें । तयास ज्ञानसें म्हणें ॥३०॥
भजन तें बहुविधा । तयांत मुख्य नौविधा । तयांस हे निवेदनी । जनीं पतीतपावनी ॥३१॥
प्रचीतिनेंचि सुटिका । प्रबोध सांपडे निका । प्रपंच होतसे फिका । निशब्द गुज हें शिका ॥३२॥
विचार सार पाहातां । विवंचनेंत राहातां । पुढें समस्तही कळे । विशुद्ध बोध नीवळे ॥३३॥
विचार तत्व बोधितां । चतुर्य वाक्य शोधितां । सदृश्यत्वेंचि जातसे । भुतीक वेथ होतसे ॥३४॥
देहेसमंध आष्टधा । कळे विचार पष्टधा । तनुचतुष्टनिर्शनें । अगम्य होत दर्शनें ॥३५॥
अचंचळीच चंचळा । बळें बळावली बळा । मुळींच कल्पना दिसे । विचारतांच नीरसे ॥३६॥
द्विधा तनुचतुष्ट ही । ब्रह्मांड पिंड आष्ट ही । शरीर निर्शनांतरें । उरेल काये तें खरें ॥३७॥
अनंत तें अपार तें । अलक्ष थोर सार तें । मनासि होय उन्मनी । अनन्य तो निरंजनीं ॥३८॥
निशब्द शब्द खुंटला । वेवाद वाद तुटला । निवृत्ति वृत्तिसुन्य हो । नुरे चि पाप पुण्य हो ॥३९॥
तुटोनि मोक्ष बंधने । अभेद भेद साधनें । न सीध रे न बध रे । विभक्त भक्त उधरे ॥४०॥
५६
अहो जना म्हणे कवी । श्रीमंत हो पाहा गवी । समस्त लोक ते खवी । अखंड धारणा नवी ॥१॥
५७
दाटले उदंड भार । रावणा गुमान फार । सांडिला सुधा विचार । गर्व फार मांडिला ॥१॥
भार भार राजभार । भार दाटले अपार । चालिले कत्तार सार । घोर मार होतसे ॥२॥
दिसती तुरंगभार । भार भार ते अपार । बोलती बहुत फार । कारबार नासिला ॥३॥
चालिलें तुफान मान । फुटलें अचाट रान । नावरेचि युव्यमान । प्राणहाणी होतसे ॥४॥
च्याप वोढिलें करार । बाण सोडिले सरार । पिछय वाजती भरार । आरपार होतसे ॥५॥
थार फाड थाड फाड । युध्य होतसे भडाड । वाड वाड तें निवाड । ताड ताड तोडिती ॥६॥
सुटले अचाट हुंब । तुटले तडक तुंब । दाटले नसे विलंब । तुंब तुंब तुंबले ॥७॥
कोण कोण कोण कोण । येक घालिताति घोण । येक ते बहु मिळोन । वीर धीर सीरती ॥८॥
हाय हाय हाय हाय । मांडला बहु उपाय । वाजती अचाट घाय । राय राय पाडिले ॥९॥
फुटतां तडक हांक । सुटतो विरासीं धाक । बोलताति राख राख । ठाक ठाके होतसे ॥१०॥
स्फुट श्लोक – श्लोक ५८
( प्रमाणिका वृत्त )
तनु वितंड चंडसी । प्रचंड शुंड दंडसी । सुरंग रंग रेखिला । घवघवीत देखिला ॥१॥
नमु गणेश तो गुणी । विराजतो विभूषनीं । जनासि सौख्यकारकु । विशाळ विघ्रहारकु ॥२॥
जनांत सुमती मती । नमुन ते सरस्वती । महंत संत श्रोतयां । वंदोनिया गुणाळया ॥३॥
समस्त ही मनीं धरा । कथा करीनसें करा । लाहानसा कवी नवा । रघोत्तमासि वनिवा ॥४॥
श्रीराम राम राम हा । समर्थ पूर्णकाम हा । प्रतापकीर्ण फांकलें । प्रचंड तेज झांकलें ॥५॥
प्रिती करूनि आदरें । भजोनियां दसासीरें । पुजून देव शंकरु । उदंड साधिला वरु ॥६॥
तया वरेंचि मातला । अधर्म कर्म रातला । मुमंडळीं नव्हे भला । बहुत लोक पीडिला ॥७॥
स्वधर्म सांडिला सळें । अधर्म माडिला बळें । पिडावलीं रुसीकुळें । कितेक शोधिलीं मुळें ॥८॥
समस्त देव ते भले । परंतु बंद पावले । बहु प्रहांसि निग्रहो । ग्रहासि भेटला ग्रहो ॥९॥
उदासली वसुंधरा । बहु भिती निशाचरा । अनीत्य फारसी वसे । कदापि न्याय तो नसे ॥१०॥
नरेंद्र हो फणेंद्र हो । विधी सुरेंद्र चंद्र हो । वरुण वात्त पावकु । कुबेर येम धार्मिकु ॥११॥
प्रचेंड दंड दंडिका । सटी गणेश चंडिका । समस्त ही विरोघली । बहु बळें निरोधली ॥१२॥
समीर लेटितो खडे । वरुण घालितो सडे । मयंक साउली धरी । मळीण पावकु हरी ॥१३॥
विधी विधीस धाकतो । सुरेद्र बाग राखतो । करावयास निग्रहो । भुभंदळासि निग्रहो ॥१४॥
अखंड चाकरी करी । सदा वरुची भादरी । सटी आरंधळी दळी । गणेश गाढवें वळी ॥१५॥
परोपरीं विटंबणा । वदेल कोण रावणा । उदंड देव पीडिले । मदें पदासि खंडिले ॥१६॥
बहु कठीण काळ हो । समस्त पावले मोहो । हिणादिनाचियापरी । सदा गळीत अंतरीं ॥१७॥
समस्त केंश लांबले । कितेक वेस्त लोंबले । नखेंचि योग साधले । समस्त देव गादले ॥१८॥
निशाचरें बहु वसे । कठीण वर्तमानसें । म्हणोनि राम पावला । बहु बळें उठावला ॥१९॥
निमीत्य मात्र ते सिता । विबुधपक्ष पुरता । समर्थ तो भला भला । कुढावयासि पावला ॥२०॥
अचाट तीं कपीदळें । असंख्य चालिलीं बळें । करूनि सख्य पाहिलें । परंतु सर्व राहिलें ॥२१॥
इरूनियां कुळांगना । बहुत गर्व रावणा । विचार नाइके भला । प्रचंड राम कोपला ॥२२॥
प्रभु म्हणे हरेश्वरा । त्रिकुट पालथा करा । उठावलीं कपीदळें । पुरीस वेढिलें बळें ॥२३॥
कपी विशाळ ते गिरी । गिरीच घेतले करीं । उठावले भुजाबळें । बळें बळेचि तुंबळें ॥२४॥
बहुत दाटले हुडे । हुडा चि मेहुडे । तया परीच ते कपी । वितंद चंड साक्षपी ॥२५॥
निशाचरांसि घातलें । बळेंचि दुर्ग घेतलें । असंख्य जुत्पती किती । हुडां हुडांचि गर्जती ॥२६॥
बळें कपी बळावले । उदंड दैत्य पावले । विरा विरांसि तांतडी । बळावळी धडाधडी ॥२७॥
कपी कितेक कोपले । रवी मयंक लोपके । तडकसें तडाडिलें । नभीं गिरी घडाडिले ॥२८॥
त्रिकुट तो तडांडिला । तडक वाजला भला । कडाडिलें खडाडिलें । बहु हुडे घडाडिले ॥२९॥
त्रिकुट घेतला बळें । अचाट चालिलीं दळें । असंख्य वीर जातसे । धुळार गर्द होतसे ॥३०॥
थटाट मारिती शिरें । कितेक हाणती करें । नि:कट हो धबाधबी । रुधिरसें थबाथबी ॥३१॥
करें करासि देहुडया । पदो पदीं आढया तिढया । मुखें मुखासि तोडिती । धरूनि केंश वोढिती ॥३२॥
बहु उकावले बळा । गळयासि लविती कळा । धडें धडासि ठेलिती । विरासि वीर रेलिती ॥३३॥
पडोनियां उफाळती । बळें बळी धुमाळिती । बुकालिताति नीकुरें । मुहुप लात कोंपरें ॥३४॥
बसोनियां उरावती । नखे शिखा परोपरीं । कितेक वीर झोंबती । किती अडोन लोपती ॥३५॥
बहुत धीट ते हटी । कित्तेक ते लटापटी । परस्परें चि नीकुरें । धरूनि मोडिती शिरें ॥३६॥
कितेक वीर पाडिले । कित्तेक ते पछ्याडिले । बळेंचि पोट फाडिती । निशाचरा विभांडिती ॥३७॥
कित्तेक दैत्य झोडिले । कित्तेक हस्त मोडिले । पदीं धरूनि वोढिती । बळें भुमीस पाडिती ॥३८॥
कपी चपेट सूटले । कित्तेक दैत्य आटले । झपेटिती लपेटिती । पिटून कूटकूटिती ॥३९॥
पुरीमधें कल्लकळी । तडक हाक वाजली । आचात धुंद माजली । विशेष बोंब गाजली ॥४०॥
त्रिकूटिचे भले भले । वितंड वीर क्षोभले । प्रचंड चालिलीं दळें । दळें दळेंचि तुंबळेम ॥४१॥
बळागले भले भले । तुरंगभार चालिले । मना कळेचिना गती । तुफानसे उफाळती ॥४२॥
सुरंग रंग साजिरे । तुरंग रंगले बरे । समस्त हस्त तोलती । आढाल डाल डोलती ॥४३॥
कितेक हस्त मस्तसे । बहुत खस्त वेस्तसे । प्रंचड दंत हाणती । महीतळास खाणती ॥४४॥
पथीं पथींच ते रथी । रथींच रथींच सारथी । तुरंग ते तडाडिले । रंणागणीं घडाडिले ॥४५॥
तुरें तुरें बहुवसें । विशेष घोष कर्कशें । अचाट भाट चालती । ब्रिदें पवाड बोलती ॥४६॥
उन्मत्त मत्त ठांइचें । रथी तुरंग पांइचे । समस्त ही उठावले । रणांगणासि पावले ॥४७॥
कडक चालिलीं सळें । थडक जाहाली वळें । विरांसि वीर हाणती । परस्परें खणाणिती ॥४८॥
गदा पटीस तोमरें । दुधार मारिती भरें । बहु खणाण सुटले । अनेक घोंष उठीले ॥४९॥
असंख्य हस्त मातले । बळेंच रान घेंतलें । चपेटिती लपेटिती । कपीकुळां झपेटिती ॥५०॥
रथारुढीं निशाचरीं । कपीसि त्रासिलें शरीं । विशेष राउतीं बळें । विदारिलीं कपीकुळें ॥५१॥
समस्त हस्त सुटले । अभंग भार फुटले । बळें करूनि चीरडा । रणांगणीं पखारडा ॥५२॥
कितेक भार चिंबती । कितेक वीर हुंबती । अचाट दाटलीं रणेम । दिसेतिनात कीरणें ॥५३॥
अनेक भार वावरे । समोर मार नावरे । कितेक वीर भेदिती । परस्परें चि छेदिती ॥५४॥
मध्यें चि येक खंडिले । कितेक तें उलंडिले । परोपरीं कळीवरें । तुटोनि भेदिलीं भरें ॥५५॥
कठीण मार नावरे । वीरांत वीर वावरे । वीरश्रिया भरीं भरे । देहासि लागले झरे ॥५६॥
घसास तोडिती बळें । भसास टोंचिती शुळें । थडाड थाड तोडिते । वीरांसि वीर पाडिती ॥५७॥
कितेक वीर नीखुरें । भडाड मारिती भरें । तडाड तूटती शिरें । उलंडलीं कळीवरें ॥५८॥
कत्तार मार होतसे । रुधिरपूर जातसे । नभीं उफाळति शिरें । रीसें गळीत वानरें ॥५९॥
रणांगणीं मदोन्मतीं । रथीं विशेष राउतीं । मनीं धरूनि आक्रमु । बळें चि भंगिली चेमु ॥६०॥
कडक निकटें कटें । तुरंग हस्त श:कटें । कत्तार मार मारिले । रिपू समस्त हारिले ॥६१॥
भुजाबळें चि राउतीं । कपीदळें चि तीं रितीं । करूनि खस्त पाडिलीं । किती रिसें विदारिलीं ॥६२॥
बहुत आट वानरां । जयो दिसे निशाचरां । प्रचंड वीर कोपले । कितेक ते उठावले ॥६३॥
कपीकळोळ चालिला । विधीभुगोळ हालिला । चपेट मारिती बळें । लपेटिताति लांगुळें ॥६४॥
कितेक टाकिती शिळा । कितेक झोंकिती शुळा । गदा तडक फुटले । फणाण बाण सुटले ॥६५॥
किराण ठाण नेटकें । धरूनि खर्व खेटकें । फडाड हाणती बळें । बळें चि मोडिती दळें ॥६६॥
कडक वाजती भरें । परस्परें चि नीकुरें । भले भले उठावले । वीरांसि वीर पावले ॥६७॥
पुढील भार भंगती । कितेक वीर लंघती । सवेंचि उठती बळी । बळें चि फोडिनी फळी ॥६८॥
बळें चि भार लटिले । कितेक दैत्य आटले । विरश्रिया भले भले । भले भले चि तुंबले ॥६९॥
शिळा बहुत सीखरें । कितेक तें तरुवरें । बळें उठावले कपी । अचाट धीट साक्षपी ॥७०॥
हये हयास ताडिती । गजें गजा पछयाडिती । रथें रथासि मोएइती । निशाचरासि झोडिती ॥७१॥
बहुत वेळ भांडले । रिपु कितेक खंडले । सुरांसि त्रासिती बळी । जलंडले भुमंडळीं ॥७२॥
वितंड मेघवर्ण तो । बलाढय कुंभकर्ण तो । दळेंचि गीळितो सळें । परंतु मारिला बळें ॥७३॥
प्रधान ही भले भले । रणीं बहुत भांडले । परंतु येश नाडळे । देह्याभिमान तो गळे ॥७४॥
सुरेंद्र जिंकिला रणीं । प्रसीध राम रावणी । बहुत वेळ भांडळे । पुढें रणीं उलंडले ॥७५॥
अनुजसुत आक्रमी । प्रधानही पराक्रमी । सखे समस्त मारिले । रणांगणीं विदारिले ॥७६॥
सुरां कळेचिना गती । भुमंडळासि भंगिती । बहुत सुर विक्रमी । उलंडले पराक्रमी ॥७७॥
बहु बळाढय दैत्य हो । परंतु पावले मोहो । कपी तुफान सुटले । असंख्य सैन्य आटलें ॥७८॥
अभंग भार भंगले । कितेक वीर रंगले । शरीर खस्त खंगलें । विरंगलें विरंगलें ॥७९॥
अखंड वानरा जयो । निशाचरां घडे क्षयो । मनीं धरूनि साक्षपु । अचाट कोपला रिपु ॥८०॥
उदंड देखिलें उणें । मनीं धरूनि रावणें । बहु बळें उठावला । रणांगणासि पावला ॥८२॥
रथारुढें निशाचरें । बहुत नीकुरें भरें । असंख्य बाण सोडिले । रिपु कितेक मोडिले ॥८३॥
कितेक वीर बापुडे । पळोनि राघवाकडे । विशेष मंदली गती । रघोत्तमासि बोलती ॥८४॥
प्रसंग हा नव्हे भला । कृतांत काळ कोपला । बहुत त्रासलों जिवीं । प्रभु दिनासि वांचवी ॥८५॥
उणीव देखत क्षणीं । उठावला ततक्षणीं । विरश्रिया भुजाबळें । असंख्य भंगिलीं दळें ॥८६॥
रणांगणीं निशाचरें । करूनि खस्त गज्जरें । कितेक तें भयातुरें । विलेकिलीं दशाशिरें ॥८७॥
अधीक कोपला हटी । पुढें रथास नेहटी । उदंड सोडिली सिमा । धिकारिलें रघोत्तमा ॥८८॥
समस्त मानिलें उणें । गिळीन काळसें म्हणे । खिळीन हे वसुमती । मनुष्य राम तें किती ॥८९॥
मनीं धरूनियां पणु । समोर राम रावणु । हटें हटावली हटी । किलाल चोसटी सटी ॥९०॥
अनेक वाजती तुरें । कितेक होत आतुरें । कठोर मांडलें पुरे । नभासि दाटलें धुरें ॥९१॥
सणाण विंधिती शरें । परस्परें चि नीखुरें । घुमघुमी घुमारलें । नमीं धुरें धुमारलें ॥९२॥
नभासि दाटली रजें । चणाणिताति नारजें । अचाट युध्य माजलें । कठोर थोर गाजलें ॥९३॥
अमेद मौष पुरतें । रणांत नाचती भुतें । सिरें धरूनियां पदें । गिदे कितेक स्वापदें ॥९४॥
वितंड कोपला ईशु । अचाट घोंष कर्कशु । धनुष्य वाइलें गुणा । गमे वधील रावणा ॥९५॥
तडक वाजला बळें । दंणाणिलीं भुमंडळें । कडक उठीला रणीं । भयें थरारिला फणी ॥९६॥
करकरीत कर्करी । गरगरीत गर्गरी । थरथरीत थर्थरी । भरभरीत भर्भरी ॥९७॥
कडक कडाडिलें । खडखड खडाडिलें । गडगड गडाडिलें । धडधड धडाडिलें ॥९८॥
तडतड तडाडिलें । थडथड थडाडिलें । दडदड दडाडिलें । धडधड धडाडिलें ॥९९॥
कडाडिलें खडाडिलें । गडाडिलें पडाडिलें । तडाडिलें थडाडिलें । द्डाडिलें धडाडिलें ॥१००॥
विशेष आट वानरां । जयो दिसे निशाचरां । अचाट दाटलीं दळें । नीशंख तोडिती बळें ॥१॥
कृतांत काळ कोपला । भुजाबळें उठावला । उदंड भार भेदिले । रिपु समस्त छेदिले ॥२॥
पुन्हा सवें चि नीखुरें । समस्त छेदिलीं शरें । बळें भेदिली कुपी । अचाट गर्जले कपी ॥३॥
रणीं वधूनि रावणा । विभीछेता रणांगणा । बळें धडाडिला नभीं । विशाळ देवदुंदुभी ॥४॥
निरोध बंद सुटले । समस्त देव भेटले । मृदोत्तरेंचि उत्तरें । बहुस्तुती परस्परें ॥५॥
समस्त देव हरुषले । कुशमभार वरुषले । जयो जयो सितापती । सुखें बहुत गर्जती ॥६॥
महेश कीर्ति बोळती । प्रताप जीव तो किती । चुकोनी नेणता कवी । रघोत्तमासि वीनवी ॥७॥
बळें कृतांत काळ तुं । प्रभु दिना दयाळ तुं । मनीं धरूनियां मोहो । तुझाचि साभिमान हो ॥८॥
बिभीषणास त्रीकुटीं । बळेंचि स्थापिला पटीं । सुखावला बिभीषणु । अखंड रामचींतनु ॥९॥
विराजमान जानकी । धगधगीत पावकीं । रघोत्तमासि भेटली । वियोग वेळ तुटली ॥१०॥
कितेक स्वर्गगायेका । मिळोन आष्ट नायेका । विणे धरूनि तुंबरें । आळाप होतसे भरें ॥११॥
अनेक वाद्यकुसरी । बहुकळा परोपरीं । गुणी उदंड गातसे । घनें घमंड होतसे ॥१२॥
कितेक भांट दाटले । अचाट दाट थाटले । जिवीं सुखावले सुखें । कडक बोलिती मुखें ॥१३॥
अनेक बंद तोडिले । समस्त देव सोडिलें । प्रचीतिनें पाहा पाहा । प्रभु समर्थ राम हा ॥१४॥
निरोप दीधला सुरां । समागमेंचि वानरां । रिसांसहित घेतलें । सपुष्पकांत घातलें ॥१५॥
बहुत आर्त हो तया । विशेष भेटि भ्रातया । समस्त लोक भेटले । माहांसुखें सुखावले ॥१६॥
अनेक वीरकट्ट तो । प्रभुसी राजपट्ट तो । अचाट गर्द माजला । विधीभुगोळ गाजला ॥१७॥
अनेक मंत्रघोंष तो । अनेक वाद्यघोंष तो । अनेक नामघोंष तो । अनेक सर्व घोंष तो ॥१८॥
गणील कोण वैभवा । उल्हास वाटतो जिवा । पहा जयाचिया मनें । समर्थ इंद्रभुवनें ॥१९॥
सुखें उभारिली गुढी । बहु जनासि आवडी । अखंड राज्य हा करु । कवी जनासि वीवरु ॥२०॥
बहुत भव्य भोजनें । अनेक वस्रभूषणें । कपीरिसासि गौरवी । श्रीरामदास तो कवी ॥२१॥
समर्थ हे उपासना । जनांत आणिती मना । रघोत्तमा उपासिती । सखेचि तेचि वाटती ॥२२॥
शरीर वीकिलें गुणीं । अनन्य भाव निर्गुनीं । जना उपासने गुणें । कळोनि मोक्ष पावणें ॥२३॥
घवघवीतसे कवी । कवी कवीच लाघवी । परोपरीं भले भले । प्रबंद बंद साधले ॥२४॥
विरक्त भक्त जाणते । अगम्य खूण बाणते । शरीर त्या घरीं पडो । मनांत राम सांपडो ॥२५॥
स्फुट श्लोक – भागवत १
( प्रमाणिका वृत्त. )
हरीजनकजन्ननी । प्रसुत कौंसभुवनीं । श्रीकृष्ण जन्मला गुणी । करी जनासि मोहनी ॥१॥
कितेक बंद मोचनें । तयासि काय बंधनें । करूनि पंथ मोकळा । श्रीकृष्ण जाये गोकुळा ॥२॥
रिपु म्हणे चला चला । प्रसुतकाळ सुचला । विशेष कौंस तो हटी । पदीं धरूनि आपटी ॥३॥
बळेंचि हस्त पीळिला । तडक वाजला भला । म्हणे रिपु तुझा रिपु । श्रीकृष्ण गोकुळाधिपु ॥४॥
मनांत कौंस खोचला । अपाय सुचला भला । उपाय कोण तो भटो । जिवांत काजळी तुटो ॥५॥
भटु वदे नृपापुढें । उकावला चढोवढें । बळें चि पैज सारितों । तुझा रिपु विदारितों ॥६॥
बळें चि लवितो कळी । खटयाळ भटमाभळी । उपाव्य चालवी कुळा । म्हणोनि वंद्य गोकुळा ॥७॥
बळाढय सुभटु भटु । भटें चि मांडिला हटु । बसोनि नीट नीकटु । प्रशस्त वाचितो पटु ॥८॥
हटें हटेंचि उधटें । कुटीळ कामलंपटें । उपायसा प्रयोजिला । मुलास घात योजिला ॥९॥
बहु मिळोनि सुंदरी । मुखें म्हणे हरी हरी । तुम्हांस वोखटी परी । कुमार हा मुळावरी ॥१०॥
बहु मिळोनियां वधु । कराल बाळका वधु । तरीच वौंश सावधु । येथार्थ सांगतों विधु ॥११॥
अनेक घात घातकी । वदे पतीत पातकी । शिणे मनांत बाळकु । समस्त चित्तचाळकु ॥१२॥
हळुच कृष्णनाटकें । चरित्र मांडिलें ठकें । उगाचि थोर मारकां । भटासि बैसला धका ॥१३॥
पदार्थमात्र चालवी । भटासि पाद्य घालवी । हरीलिळा कळेचिना । अचेतना सचेतना ॥१४॥
मिळोनियां भले भले । अचाट पाट चालिले । बहु करूनि तांतडी । भटावरी धडाधडी ॥१५॥
भटु भटु बळागळा । खिळी कितेक आगळा । उठावलीं सळें सळें । लोहो कितेक मुसळें ॥१६॥
साहाण खोड लाटणी । कितेक खुंट दाटणी । इळ्या पळ्या परोपरीं । उकावलीं भटावरी ॥१७॥
समस्त ही चढोवढी । इळे कुठार पावडी । पाल्हाण तंग तोबरे । लगाम जेरबंद रे ॥१८॥
बहु करीतसे टिका । म्हणोनि वाट कष्टिका । करून चोप चोपणी । कठीण मार खोरणी ॥१९॥
सदेव पाट हालिले । समस्त देव चालिले । बळावली कुटाकुटी । भटु बहुत हिंपुटी ॥२०॥
चरांट दोर सांकळ्या । कडया कितेक मोकळ्या । वाहाण खेटरें सळें । भटासि मारिती बळें ॥२१॥
कितेक मार कोरडे । भटासि लागतां रडे । बहु चुकावितां दडे । उठोनि चांचरी पडे ॥२२॥
बळें चि हस्त मोडिले । कितेक दंत पाडिले । फुटोन रक्त येतसे । रडोनि तोंड घेतसे ॥२३॥
बहुत पुष्टी कंदली । शरीरशक्ति मंदली । विटंबणा परोपरीं । किती क्षतें उरावती ॥२४॥
बहुतसी तडातडी । विशेष होये तांतडी । चरांट खुंट मोडिती । बळें भटासि झोडिती ॥२५॥
कितेक पातळा इटा । कितेक कातळा निटा । खडे कितेक खापरें । बहु पुजा परस्परें ॥२६॥
बळें शुभा धबाबिती । कितेक ढेंक लागती । धुळी मुखांत मृत्तिका । पुरे पुरे नका नका ॥२७॥
हरीचरित्र हें भले । बहु जनांत शोभलें । हरील दुष्टदंडणा । करील जन्मखंडणा ॥२८॥
श्रीकृष्ण देव द्रोहिला । जिहीं नर्हीं दुराविला । तया खळास हे गती । बळें चि येम तांडिती ॥२९॥
उदास दास तो कवी । बहु जनास सीकवी । उणें कदा वदों नका । न मानितां घडे धका ॥३०॥
स्फुट श्लोक – भागवत २
विषें भरूनियां स्तना । कुटिल धात पूतना । हरीस होय माउसी । बळें चि सोखिली कसी ॥१॥
रीठा सकट पाडिलें । तरु धरून मोडिले । भुजंग रूप ताणिला । दुजा फणी पलणिला ॥२॥
त्रुणासुरांसि मारिलें । कगा बगासि चीरिले । पदीं धरूनि धनुका । गडयांस वांटितो सखा ॥३॥
धरूनि देव गीळिला । मुखीं भुगोळ दाविला । रसाळ बाळ लाघवी । लिळा कळेचिना कवी ॥४॥
मनुष्य बापुडें किती । विधी सुरेंद्र नेणती । तिहीं प्रचीत पाहिली । उपाय शक्ति राहिली ॥५॥
गुरें समस्त वांसुरें । बहु प्रकार लेंकुरें । परोपरीं तनें मनें । खिलार सार गोधनें ॥६॥
चतुर चोरटा विधी । प्रसंग तो निरावधी । समस्तही ही परोपरीं । स्वयेंचि जाहाला हरी ॥७॥
परेश हा परात्परु । विधी तयास तश्करु । अनेक लोक रंजिला । वरीष्ट गर्व भंजिला ॥८॥
सुरेंद्र मेघ वोळले । कडकसें कलोळलें । बळें विजा झकाकिती । नभीं दिशा लखाखिती ॥९॥
गडदसें परोपरीं । अचाट गर्जना करी । कितेक त्या घबाबिल्या । सिळा भुमी धबाबिल्या ॥१०॥
धुधाट वात सुटला । गमे भुगोळ फुटला । श्रीकृष्ण नाथ गोकुळीं । गिरी धरी करांगुळीं ॥११॥
समागमेंचि गोकुळीं । बळेंचि वोणचा गिळी । कितेक मल्ल मारिलें । बहु रिपु विदारिले ॥१२॥