रामदासांची आरती

सप्तशती – संत रामदास

श्री स्वामी समर्थ सप्तशती

स्वामी मर्थ सप्तशती – अध्याय पहिला

श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरुभ्यो नम: ।
ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा । ऊँ नमो सर्व सिध्दाय स्वाहा ।
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ ध्यानम्‍ ॥
अजानुबाहु विशाल नेत्रम्‍ । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम्‍ ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम्‍ । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥
श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती । अनेक पाहा लीला करिती । गाणगापुरी राहती । भक्तोध्दारा कारणे ॥१॥
अवतार कार्य पूर्ण होत । गाणगापुराहुनी निघत । श्रीशैल पर्वती येत । महास्वामी अवधारा ॥२॥
स्वामी गुहेत वसलेले आहेत व दोन बाजूला दोन वाघ बसलेले आहेत आणि त्याच्या समोर काही भक्त बसले आहेत.
मल्लिकार्जुनाते पाहोनी । स्वामी जाती कर्दळीवनी । तीनशे वर्षे तप करोनी । पुन्हा उठती अवधारा ॥३॥
अरण्यात एक ग्रामस्थ । होता वृक्षाची फांदी तोडत । कुर्‍हाड हातातून सुटत । पडे एका वारुळावरी ॥४॥
वारुळात श्री गुरुनाथ । होते पाहा समाधिस्थ । कुर्‍हाड मांडीवरी पडत । जागृत ऐसे होती ते ॥५॥
भिल्लासी देवोनी आशीर्वचन करिती तेथोनी प्रयाण । हिमालयात जावोन । काही काळ राहती ॥६॥
हिमालयात स्वामी समर्थ । योग्यांसी दर्शन देत । राहती एका गुहेत । नवल तेथे वर्तले ॥७॥
योग्यांसवे चर्चा करीत । बैसले होते स्वामी समर्थ । दोन वाघ येवोनी तेथ । श्रवणालागी बैसले ॥८॥
समर्थ म्हणती वाघांप्रत । काहो प्रकांड पंडित । गजावरी बैसोनी फिरत । जयपत्रे घेत होता ना ॥९॥
श्रोते व्हावे सावधान । आठवावे गुरुचरित्र आख्यान । दोन ब्राह्मण येवोन । चर्चा केली गुरुसवे ॥१०॥
ते ब्राह्मण पुढील जन्मात । वाघरुपे जन्म घॆत । तेची पुन्हा समर्थांप्रत । येवोनी गुहेत मिळती ते ॥११॥
वाघांसी पूर्वजन्म आठवत । मनुष्यवाणी बोलू लागत । म्हणती त्रिविक्रम यतीप्रत । छळले होते आम्ही हो ॥१२॥
आम्ही बैसलो पालखीत । त्रिविक्रम यतीसी चालवीत । नेले गाणगापुरात । वाद करण्या लागोनी ॥१३॥
नृसिंह सरस्वती समर्थ । पुरती आमुची जिरवीत । तो जन्म आमुचा जव संपत । ब्रह्मसमंध जाहलो ॥१४॥
अनेक शतके यातना भोगीत। होतो आम्ही त्या योनीत । वाघ जन्म पुढे मिळत । हिमालया माझारी ॥१५॥
आम्हा घडले दर्शन । क्षमा करा आम्हा लागोन । तुम्ही नृसिंह सरस्वती भगवान ।  ओळखिले आम्ही तुम्हासी ॥१६॥
ऐसे म्हणोनी वाघ । समर्थ चरणावरी लोळत । सद्‍गती त्या देत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥१७॥
म्हणती पुढील जन्मात । पंडित व्हाल काशीत ।तेथे दर्शन मिळत । ऐसे सांगती तयांना ॥१८॥
हिमालय पर्वतात । एक योगी तप करीत। दत्त दर्शन व्हावे म्हणत । उग्र तपस्या करीतसे ॥१९॥
परी न होई दर्शन । उबगे तो जिवा लागोन । गंगेत करण्या आत्मार्पण । सिध्द पाहा तो जाहला ॥२०॥
तव आकाशवाणी होत । दत्त म्हणे मी समिपत । आहे एका गुहेत । जेथे येवोनी भेटावे ॥२१॥
ऐकोनी आकाशवाणी । योगी तृप्त झाला मनी । अरण्यात जावोनी । गुहा पाहा तो शोधीतसे ॥२२॥
तव एका गुहेत । बैसले दिसती स्वामी समर्थ । योगी साष्टांग दंडवत । करोनी नमन करीतसे ॥२३॥
तीन शिरे सहा हात । आकाशवर्ण रुप दिसत । समाधी योग्यासी लागत । तृप्त पाहा तो होत असे ॥२४॥
काही काळ हिमालयात । जड मूढ जीवा उध्दरीत । कधी प्रकट कधी गुप्त ।स्वामी समर्थ अवधारा ॥२५॥
छेलाखेडा ग्रामात । दिव्य ज्योत प्रकटत । श्री स्वामी समर्थ । प्रकट होती तेथवरी ॥२६॥
आठ वर्षांचे रुपात । स्वामी तेथे प्रकट होत । अनेक लीला दावीत । भक्तोध्दारा कारणे ॥२७॥
श्री स्वामी समर्थ । हिमालयी जव संचार करीत । चंचलभारती म्हणत । लोक तेव्हा स्वामींना ॥२८॥
हरिव्दारात एक ब्राह्मण । पुरे स्वामींसी आपण कोण । अति गर्वे करोन । पुसो लगे स्वामींना ॥२९॥
स्वामी म्हणती तयासी । सांगतो तुझ्या वृत्तांतासी । तू व्याध होतासी । मारिले अनेक जीवांना ॥३०॥
दरोडे घातले अनेक । पापे केली अनेक ।तुझी पाप वृत्ती न जात । मारिले गाईसी काल तू ॥३१॥
ऐसे ऐकोनी वचन । थरथरा कापे ब्राह्मण । होई पश्चात्ताप पूर्ण । त्या ब्राह्मणा त्या वेळी ॥३२॥
स्वामी तीर्थ देती । गाय जिवंत करिती । व्दिजा सन्मार्गा लाविती । ऐसा दयाळ श्रीगुरु ॥३३॥
एके दिनी एक भक्त । स्वामींसी आपुले घरी नेत । स्वामी तयाते दाखवीत ।  एक सर्प गृहामाजी ॥३४॥
पाहोनी सर्प तेथवरी । मारावयासी धावती सारी । स्वामी म्हणती सत्वरी । मारु नका म्हणोनिया ॥३५॥
सर्पासी त्या उचलीत । आणि भक्ताते सांगत । हा तुझा बाप असत । सर्प योनी माझारी ॥३६॥
तुझे संरक्षण करीत । आहे हा येथप्रत । ऐसे भक्ता सांगत  । समर्थ स्वामी तेथवरी ॥३७॥
सर्प पायी लागत । मुक्ती द्या म्हणूनी प्रार्थित । तव त्यासही मुक्त । केला पाहा स्वामींनी ॥३८॥
असता स्वामी हिमालयात । नवल असे वर्तत । पारधी गोळ्या झाडत । पाहूनी कळप हरिणांचा ॥३९॥
परी गोळ्या न लागत । सर्व हरिणे बागडत । येती चरत चरत । स्वामी जवळी तेधवा ॥४०॥
हरिणांचे कळपात । बैसले दिसती स्वामी समर्था । पाहोनी शिकारी चिडत । गोळ्या झाडू लागले ॥४१॥
परी समर्थ हसत । हरिणेही तेथे खेळत । सर्व गोळ्या व्यर्थ । होऊनी जाती तेथवरी ॥४२॥
जो समर्थांचा अंकित । मृत्यू त्यासी काय करीत । दोन खडे समर्थ फेकीत । लक्षोनिया पारध्यांना ॥४३॥
तव ते होती स्तंभित । भूमीसी चिकटोनी जात । मग स्वामीसी शरण येत । दया करा म्हणोनिया ॥४४॥
स्वामी म्हणती तयांसी । आचरा अहिंसा व्रतासी । तेणे सद्‍गती तुम्हांसी । प्राप्त होईल निश्चये ॥४५॥
असो शिकारी गेले । स्वामी कळपापाशी आले । सर्व हरिणा म्हणाले । उध्दार होईल तुमचा हो ॥४६॥
पुढील जन्मात मनुष्यत्व । प्राप्त होईल तुम्हाप्रत । आणि माझे दर्शनार्थ । याल तुम्ही निश्चये ॥४७॥
ऐसे म्हणोनी कळपाप्रत । आनंदाने जा म्हणत । स्वामीही आपुल्या गुहेत । ध्यानस्थ पाहा जाहले ॥४८॥
काही काळ हिमालयात । गुप्तरुपे तप करीत । तेथोनिया मग निघत । दक्षिण दिशेसी श्री स्वामी ॥४९॥
अनेक तीर्थे सिध्द करीत ।  स्वामी येती व्दारकेत । पाहूनी वेरावळ सोमनाथ । नाथव्दारा पाहिले ॥५०॥
तया नारायण सरोवरात । जलावरी स्वामी बैसत । भक्त होती विस्मित  । पाहोनी लीला स्वामींची ॥५१॥
तैसेची अबू पर्वतावर । समर्थ  स्वामी दिगंबर । काही काळ लोकोध्दार । करीत तेथे राहिले ॥५२॥
अनेक तीर्थस्थाने पाहत । मंगळवेढयासी येवोनी राहत । ग्रामासमीप अरण्यात । होते राहिले श्री स्वामी ॥५३॥
देव मामलेदार नामे भक्त । ध्यानी स्वामीसी पाहत । मानसपूजा करीत । प्रतिदिनी नित्य स्वामींची ॥५४॥
एकदा असता ध्यान करीत । शालीग्राम त्यासी देत । ठेवी पूजेत नित्य । ऐसे सांगती तयाला ॥५५॥
देव मामलेदार मनी म्हणत । कोण हे योगी समर्थ । ध्यानी मजला दिसत । पूजा माझी स्वीकारिती ॥५६॥
ऐसे मनी चिंतीत । तव स्वामी प्रकट होत । मंगळवेढयासी यावे म्हणत । शालीग्रामाते घेवोनिया ॥५७॥
मंगळवेढयासी जाई भक्त । ध्यान करी अरण्यात । शालीग्राम आणला का ध्वनी येत । नेत्र उघडोनी पाहतसे ॥५८॥
पाहता स्वामी समर्थांसी । मिठी घाली चरणांसी । म्हणे दत्तप्रभू आपण येथी । अरण्यात राहता का ॥५९॥
चला मजसवे म्हणत । दत्तप्रभू उत्तर देत । अक्कलकोटी राहीन म्हणत । काही काळानंतर मी ॥६०॥
देव मामलेदार ध्यानस्थ बसलेले आहेत. त्याच्या समोर स्वामी समर्थ प्रगट होऊन त्यांना शाळीग्राम देत आहेत.
पूर्वजन्मींचा तव योगमार्ग । तोचि दिधला तुजप्रत । तू राही आनंदात । सदैव जवळी मी तुझ्या ॥६१॥
ऐसे सांगोनी स्वामी समर्थ । तेथेची पाहा होती गुप्त । देव मामलेदार विस्मित ।होवोनी जाती तेधवा ॥६२॥
जनी नामे विठ्ठल भक्त । राही मंगळवेढयात । एकादशीस वारी करीत । पंढपुरा जातसे ॥६३॥
जनाबाई वृध्द झाली । परी वारी न सोडली । विठ्ठलरखुमाऊली । अंतरी सदा ध्यातसे ॥६४॥
एकदा आषाढ वारीसी । जनी चालली पंढपुरासी । वादळ वर्षा मार्गासी । अति पाहा होतसे ॥६५॥
जनी म्हणे  विठ्ठलासी । आवरी वादळ हृषीकेशी । कैसे यावे पंढरपुरासी । म्हणोनिया प्रार्थितसे ॥६६॥
ऐसी प्रार्थना करीत ।तव प्रकटले स्वामी समर्थ । म्हणती जने चराचरात । पाहे विठ्ठल भरलेला ॥६७॥
ऐसे म्हणोनी वरदहस्त । जनाबाईंच्या शिरी ठेवीत । तात्काळ समाधी लागत । ऐसी लीला स्वामींची ॥६८॥
श्री समर्थ सप्तशती ग्रंथ । समर्थांचे लीलामृत । श्रवण पठणे भाग्यवंत । भक्त पाहा होतसे ॥६९॥
अडली कामे पूर्ण होत । पूर्ण होती मनोरथ । कृपा करी स्वामी समर्थ । पठण करिता ग्रंथाचे ॥७०॥
॥ अध्याय पहिला ॥  ॥ ओवी संख्या ७०॥
स्वामी जंगलात उभे आहेत आणि त्यांच्या अवती भवती खूप साप आहेत
त्यांच्या बरोबर भक्त आहे आणि त्या भक्ताने एक साप उचलला आहे.
घराच्या दरवाज्यात त्याची बायको उभी आहे. साप उचललेला भक्त पागोटे झटकतो तेव्हा
सोन्याचा साप बाहेर पडतो. हे दृश्य त्याची बायको आश्चर्याने पहात आहे .


स्वामी समर्थ सप्तशती – अध्याय दुसरा

श्री गणेशाय नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ।
चिंतोपंत टोळ सोलापुरात । मामलेदार म्हणूनी काम करीत । कारकून त्यांचा असत । सातार्‍याचा रहिवासी ॥१॥
रजा घेऊनी घरी जात । माघारी असे परत येत। पंढरपुरासी वाटॆत । दर्शनासी थांबला ॥२॥
ते  काळी पंढपुरात । गोपाळ्बुवा महासिध्द । नामे एक अवधूत । राहत होते तेथवरी ॥३॥
विठ्ठल दर्शन करोन । सिध्द दर्शना जाई कारकून । गोपाळसिध्द त्या पाहोन । वदले पाहा काय ते ॥४॥
अहो तुमचे मामलेदार । त्यांसी कळवा समाचार । लिहून घ्या सविस्तर । पत्र तुमच्या साहेबांना ॥५॥
येत्या काही वर्षांत । श्री दत्तात्रेय अवधूत । येवोनी तुम्हा भेटत । सेवा त्यांची करा हो ॥६॥
ऐसे करिती भाकीत  । पंढपुरी गोपाळसिध्द । कारकून येवोनी सांगत । चिंतोपंत टोळांना ॥७॥
असो स्वामी समर्थ । मंगळवेढयासी होते राहत । लीला करिती अनंत । लोकोध्दारा कारणे ॥८॥
नित्य राहती अरण्यात । क्कचित येती ग्रामात ।व्दादश वर्षे मंगळवेढयात । ऐसे राहिले श्री स्वामी ॥९॥
भाग्यवंता दर्शन देत । लोक दत्तावधूत म्हणत । दिगंबर स्वामीही म्हणत । काही लोक तयांना ॥१०॥
बाळकृष्ण नामे सिध्द । होते मंगळवेढयासी राहत । नित्य जाती अरण्यात । दर्शन घ्यावया स्वामींचे ॥११॥
येता बाळकृष्ण भक्त । स्वामी कटॆवरी ठेविती हात । विठ्ठलरुपे दर्शन देत । आपुल्या प्रिय भक्तासी ॥१२॥
श्री स्वामी समर्थ । बाळकृष्णासी सिध्द करीत । अनेक लीला करीत । भक्तोध्दारा कारणे ॥१३॥
एका ब्राह्मणा घरी जात । वांझ गाय दुग्धवती करीत । ब्राह्मण होई विस्मित । पाहोनी लीला स्वामींची ॥१४॥
बसाप्पा तेली भक्त । दर्शना जाई अरण्यात । कंटक शयनी श्री समर्थ । पाहोनी विस्मित होत असे ॥१५॥
मनापासोनी भक्ती करीत । अरण्यी स्वामीसी सेवीत । लीला पाहे अद्‍भुत । श्री स्वामी समर्थांच्या ॥१६॥
बसाप्पा आणि स्वामी समर्थ । फिरत असती अरण्यात । असंख्य सर्प दिसत । पाहोनी भक्त भीत असे ॥१७॥
स्वामी बसाप्पाते सांगत । हवे तितुके घॆ म्हणत । पागोटॆ सर्पावरी टाकत । एक उचलोनी घेत असे ॥१८॥
आता घरी जा म्हणती । तो जाई गृहाप्रती । पागोटॆ झटके खालती । सुवर्ण लगड पडत असे ॥१९॥
गेले त्याचे दारिद्रय । तो झाला श्रीमंत । ऐसे महात्म अद्‍भुत । श्री स्वामी समर्थांचे ॥२०॥
बसाप्पा तेली सद‍भक्त । अक्कलकोट वारी करीत । कृतज्ञतेने सांगत । महिमा स्वामी समर्थांचा ॥२१॥
एक स्त्री वांझ असत । वय पासष्ट वर्षे असत । बसाप्पा तीते म्हणत ।सेवी स्वामी समर्थांसी ॥२२॥
नित्य घेई स्वामी दर्शन । दर्शनावीण न घे अन्न । होईल तुझी इच्छा पूर्ण । प्रसन्न होता श्री स्वामी ॥२३॥
ऐकोनि बसाप्पाची मात । वृध्द स्त्री व्रत घेत । स्वामी दर्शनासी अरण्यात । नित्य पाहा ती जातसे ॥२४॥
कधी कधी स्वामी समर्थ । वृध्द स्त्रीची परीक्षा पाहत । दोन दोन दिवस होती गुप्त । कोठे न मिळती तियेलागी ॥२५॥
ऐशा परीक्षा अवस्थेत । दोन दोन दिवस उपाशी राहत । परी न व्रत सोडीत । ऐसी निष्ठा तियेची ॥२६॥
दोन वर्षे व्रत करीत । स्वामी समर्थ प्रसन्न होत । शिरस वृक्ष दावीत । खा म्हणती चीक याचा ॥२७॥
स्वामी आज्ञेप्रमाण । करी चीक सेवन । एक वर्षात पुत्रनिधान । लाभले  पाहा तियेसी ॥२८॥
बाबाजी भटाच्या विहिरीस । समर्थकृपे पाणी लागत । यवन भक्ता सिध्द करीत । अवलिया ख्याती होतसे ॥२९॥
मंगळवेढा अरण्यात । नदीकिनारी असती समर्थ । आणखी दोन महासिध्द । प्रकट तेथे जाहले ॥३०॥
तिघेही पर्वत चढत । एकमेकाश्सी बोलत । परी  न कोणा कळत । संभाषण तया तिघांचे ॥३१॥
‘का रडतो का ’ एक म्हणे । ‘हाका का मारतो ’ दुजा म्हणे । ‘ असे का करतो ’ तिजा म्हणे ।गूढ भाषा सिध्दांची ॥३२॥
लीला विग्रही समर्थ । मंगळवेढयाहुनी निघत । पंढपुरासी येत । दर्शन द्याया भक्तांना ॥३३॥
तेथूनी मोहोळासी येत । भीमा नदी वाटॆत ।महापुरात प्रवेशत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥३४॥
महापुरात चालती समर्थ । पाणी गुढघाभर होत । लोक होऊनी विस्मित । अद्‍भूत प्रकार पाहताती ॥३५॥
गवे स्वामी मोहोळात । ते समय़ी होते राहत । स्वामी समर्थांसी सेवीत । अति भक्ती करोनिया ॥३६॥
तेथूनी स्वामी निघत । सोलापुरासी पोचत । दत्त दिगंबर अवधूत । दत्त मंदिरी बैसती ॥३७॥
चिंतोपंत टोळ दत्तभक्त । येती दत्त दर्शनार्थ । पाहूनी स्वामी समर्थ । मनी म्हाणती अवधारा ॥३८॥
हे कोणी सिध्दपुरुष दिसती । ऐसे टोळ मनी म्हणती । तात्काळ समर्थ उत्तर देती । तुला उचापती करीत । कशाला ॥३९॥
आम्ही असो सिध्द बुध्द । यात तुझे काय जात ।उगाच उचापती करीत । कशासी येथे आहेस तू ॥४०॥
टोळ मनी म्हणत । हे मनकवडे असावेत । मनींचे सर्व जाणत ।ऐसे म्हणती मनामाजी ॥४१॥
आम्ही असू मनकवडे । अथवा असू पूर्ण वेडे । तुझ्या बापाचे काय जाते । म्हणोनी रागे भरताती ॥४२॥
पाहूनी जाणिले अंतर । टोळ करिती नमस्कार । म्हणती तू दत्त दिगंबर । समजूनी मजला आले हो ॥४३॥
पंढरपुरी गोपाळ अवधूत । ते भविष्य सांगत । श्री समर्थ दत्तावधूत । भेटती काही वर्षांनी ॥४४॥
ते भविष्य खरे जाहले । म्हणोनी हे चरण भेटलो । घरी चला ऐसे विनविले । श्री स्वामींसी तेधवा ॥४५॥
स्वामी त्याचे घरी जात । काही दिन तेथे राहत । परी येता मनात ।उठून कुठेही जाती ते ॥४६॥
स्वामींसी घेऊन सांगात । टोळ अक्कलकोटी जाऊ पाहत । परी स्वामी होती गुप्त । कोठे गेले कळेना ॥४७॥
गुप्त होऊनी वाटॆत । हुमणाबादी प्रकटत । माणिकप्रभू तेथे असत । महासिध्द अवधारा ॥४८॥
आपुल्या आसनी बैसवीत । प्रभू सर्वां सांगत । हे असती दत्तावधूत । जगद्‍गुरु सर्व विश्वाचे ॥४९॥
हुमणाबादेहुनी निघत । अंबेजोगाईसी जात । योगेश्वरीसी पाहत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥५०॥
तेथेची समीप अरण्यात ।दत्तपहाड गुहा असत । गुहेत राहती श्री दत्त । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥५१॥
काही दिवस समाधिस्थ । तेथे राहती श्री समर्थ । तेथूनी चळांबे गावी येत । लीला विग्रही श्री स्वामी ॥५२॥
तेथे रामदासी मठात । स्वामी समर्थ होते राहत । लीला करिती अद्‍भुत । श्रोते तुम्ही अवधारा ॥५३॥
स्वामी असती निद्रिस्थ । बुवा मठासी टाळे लावीत । बाहेर निघोनी जात । कोंडोनिया स्वामींना ॥५४॥
काही क्षणांनंतर । तो जाई नदीवर । स्वामींसी पाहे तेथवर ।  मुलांसवे खेळताना ॥५५॥
आश्चर्य त्यासी वाटत । धावत येई मठात । कुलूप पाहोनी निश्चिंत ।होवोनी उघडी मठाते ॥५६॥
परी स्वामी समर्थ । झाले  तेथूनी गुप्त । हे पाहूनी विस्मित । रामदासी होतसे ॥५७॥
ऐसे परी फिरत फिरत । प्रज्ञापुरी स्वामी येत । अक्कलकोट स्वामी समर्थ । म्हणोनी कीर्ती होतसे ॥५८॥
राहोनी अक्कलकोटात । तीनशे सिध्द निर्मित। केवळ वीस वर्षांत । अगाध महिमा जयांचा ॥५९॥
कोटयावधी जना उध्दरिले । लक्षावधी चमत्कार केले । अद्‍भुत सामर्थ्य दाविले । महास्वामींनी तेथवरी ॥६०॥
समस्त पृथ्वीचा कागद केला । सप्त सागर शाई आणिला । सरस्वती बैसे लिखाणाला । तरी लीला संपेना ॥६१॥
ऐशा लीला अनंत । येथे पाहू संक्षिप्त । श्री समर्थ लीलामृत । अगाध जाणा आहे हो ॥६२॥
ऊँ निरंजनाय विद्‍महे । अवधूताय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात ॥६३॥
सर्व देवी देवता स्वरुपाय । महादत्त अवधूताय । प्रज्ञापूर निवासाय । नमन माझे तुजलागी ॥६४॥
हे चरित्र संक्षिप्त । तुझे तू निर्माण करीत । तव चरणी लीन होत ।  म्हणोनी मी सर्वदा ॥६५॥
श्री समर्थ वाड्मय मूर्ती । ऐसी होवो ग्रंथ ख्याती । श्रवण पठणे सन्मती ।प्राप्त होवो भक्तांना ॥६६॥
हे दत्तात्रेया गुरुवर्या । मजवरती करी तू दया । सद्‍भक्तासी सदया । अन्नवस्त्राते देई तू ॥६७॥
तैसेचि देई सद्‍गुण । देई सद्‍गुरु दर्शन । करुणामय ज्यांचे जीवन । लोकोध्दारार्थ अवतरले ॥६८॥
ऊँ दिगंबराय विद्‍महे ।अवधूताय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात ॥६९॥
असो श्री स्वामी समर्थ । येवोनी राहती प्रज्ञापुरात । अनेक जना उध्दरीत । नाना लीला करोनिया ॥७०॥
॥ अध्याय दुसरा ॥
॥ ओवी संख्या ७०॥


स्वामी समर्थ सप्तशती – अध्याय तिसरा

श्री गणेशाय नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा: ॥
दत्तात्रेयो हरि कृष्णो ।मुकुंदो आनंददायका । मुनी दिगंबरो बालो । सर्वज्ञो ज्ञानसागरा ॥१॥
दिगंबर मुने बाला । समर्था विश्व स्वामीने । परहंसा महाशून्या । महेश्वासा महानिधे ॥२॥
ऊँ हंस हंसाय विद्‍महे । परमहंसाय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात्‍ ॥३॥
ऊँ शून्य शून्याय विद्‍महे । परमशून्याय धिमही तन्नो परब्रह्म प्रचोदयात्‍ ॥४॥
ऊँ दत्तात्रेयाय विद्‍महे । योगीश्वराय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात्‍ ॥५॥
ऊँ स्वामी समर्थाय विद्‍महे । परम अवधूताय धिमही । तन्नो महादत्त प्रचोदयात्‍ ॥६॥
खंडोबाचे देवळात । राहू लागले स्वामी समर्थ । अलिखान घेऊनी जात । चोळाप्पा घरी स्वामींना ॥७॥
चोळाप्पा स्वामी भक्त । त्याचे घरी समर्थ राहत । अनेक लीला करीत । निष्ठा पाहती भक्ताची ॥८॥
सिध्द अन्न गाईसी  घालिती । कडधान्ये गुरांना चारिती । घरात शौचास बैसती । ऐसे छळती तयालागी ॥९॥
विविध प्रकारे छळती  नित्य । वरी शिवीगाळ करीत । वस्तू  वाटूनी टाकीत । ऐसे छळती भक्तासी ॥१०॥
मालोजीराजे प्रतिवर्षी । गाणगापुरी जाऊनी सेवा करिती । स्वप्नी नृसिंह सरस्वती । म्हणती पाहा काय ते ॥११॥
मी आलो तुझ्या गावात । तू का येसी गाणगापुरात । राजसी विश्वास होत । समर्थ दत्त म्हणोनिया ॥१२॥
एक मोठे वडाचे झाड आहे आणि झाडाखाली स्वामी समर्थ बसलेले आहेत.
येऊनी चोळाप्पाचे घरी । राजा दत्ताचे पाय धरी । म्हणे गुरुदत्त अवतारी । आपणा मी ओळखिले ॥१३॥
तैपासोनी समर्थ । कधी कधी जाती राजवाडयात । राजासही त्रास देत। विविध प्रकारे करोनिया ॥१४॥
सुवर्ण अलंकार विहिरीत टाकावे । क्रोधे राजासी मरावे । वाडयातील स्त्री – पुरुषांशी छळावे । ऐसे करिती श्री स्वामी ॥१५॥
परी निष्ठावान भक्त । आपुली निष्ठा न सोडीत । सर्व त्रास साहित । श्री गुरुकृपे कारणे ॥१६॥
कधी राहती राजवाडयात । कधी वटवृक्ष स्थानात । कधी चोळाप्पाचे घरात । ऐसे राहती श्री स्वामी ॥१७॥
काशीपासोनी रामेश्वरपर्यंत ।दुरदुरोनी लोक येत । गर्दी जव वाढू लागन । वटवृक्ष स्थानी राहिले ॥१८॥
समर्थ होता क्रोधित । थरथरा कापती भक्त । एकेका चोपुनी काढीत । ऐसा क्रोध स्वामींचा ॥१९॥
मालोजीराजे भोसले । स्वामी सेवा करु लागले । एकदा भेटीसी आले । अंबारीत बैसोनिया ॥२०॥
स्वामी जवळी जावोन । केला दंडवत प्रणाम । दिली श्रीमुखात ठेवून । पागोटे उडाले दूर ते ॥२१॥
घातल्या शिव्या भरपूर । दिले हाकलोनी सत्वर । ऐसे राजे पैशास शेर। बाजाराता विकतो मी ॥२२॥
पाहोनी उग्र अवतार । भक्त पळाले दूरवर । ऐसा स्वामींचा व्यवहार । अक्कलकोटी चालतसे ॥२३॥
नृसिंहवाडीचे भक्तगण । आले दर्शना कारण । चरणी घालोनी लोटांगण । पुसती स्वामीलागी ते ॥२४॥
स्वामी आपण कोण । कोठूनी झाले आगमन । स्वामीही प्रसन्नवदन । वदती पाहा काय ते ॥२५॥
‘मूळपुरुष वडाचे झाड ’ । ‘दत्तनगर’ देती उत्तर । ऐकोनी जयजयकार । भक्त करिती तेधवा ॥२६॥
तैसेची एका भक्ता सांगत । मी नृसिंहभान असत । काश्यप गोत्र माझे म्हणत । मीन राशी आमुची ॥२७॥
ऐशा लीला करीत । अक्कलकोटी राहती समर्थ । त्यांचे चरित्र अद्‍भुत । संक्षिप्त रुपे पाहतसो ॥२८॥
एकदा कलकत्याहून । दर्शना येती भक्त दोन । एक पारशी एक युरोपियन । दर्शन घेती स्वामींचे ॥२९॥
काली रुपात दर्शन । देती समर्थ तयालागोन । आश्चर्यचकित होवोन । जाती पाहा दोघे ते ॥३०॥
म्हणती समर्थ निराकार । देवी देवता रुपाकार । पूर्णब्रह्म परात्पर । अक्कलकोटी राहिले ॥३१॥
होऊनी अत्यंत प्रभावित । राहती सेवा करीत । पाहूनी स्वामी प्रसन्न चित्त । पुसती पाहा काय ते ॥३२॥
स्वामी आपण कोण । येणे झाले कोठून । स्वामी समर्थ प्रसन्न । वदती पाहा काय ते ॥३३॥
मूळपुरुष मी निराकार । दत्तात्रेय दिगंबर । अवधूतरुपे संचार । करीत असतो भूवरी ॥३४॥
कर्दळी वनातून सांप्रप्त । निघालो पाहा फिरत फिरत । बगाल कलकत्ता पाहत । बद्रीकेदार पाहिले  ॥३५॥
तेथूनी पाहिले हरिव्दार । अयोध्या व्दरका पंढरपुर । हुमणाबाद बेगमपूर । पाहोनी येथे आलो मी ॥३६॥
तेव्हापासून अक्कलकोटात । आहे पाहा येथे राहत । दत्तावधूत स्वामी समर्थ । ऐसे म्हणती मजलागी ॥३७॥
ऐकोनी ऐसा वृत्तान्त । जयजयकार करिती भक्त । म्हणती दत्त साक्षात । येऊनी येथे राहिला ॥३८॥
गाणगापुरातील भक्त । अक्कलकोटी दर्शना येत । तयासी म्हणती स्वामी समर्थ । नृसिंह सरस्वती मी असे ॥३९॥
मी श्रीपाद श्रीवल्लभ । होतो कुरवपुरी राहत । नृसिंह सरस्वती रुपात । गाणगापुरात मी होतो ॥४०॥
कर्दळीवनात मीच गेलो । तेथूनी पुन्हा परतलो । सांप्रत येथे राहिलो । जगदोध्दारा कारणे ॥४१॥
ऐसे ऐकोनी वचन । भक्त पावती समाधान । म्हणती गुरु दयाळ पूर्ण । पुन्हा पाहा प्रकटले ॥४२॥
गाणगापुरात काही भक्त । होते अनुष्ठान करीत । तयासी स्वप्नी श्री दत्त । सांगती पाहा काय ते ॥४३॥
अक्कलकोटी सांप्रत । समर्थरुपे मी राहत । जावोनी सेवा त्वरित । श्री स्वामी समर्थाते ॥४४॥
ऐसे आदेश होत । सेवकांसी गाणगापुरात । गाणगापुराहूनी नित्य । लोक येवो लागले ॥४५॥
गिरनार पर्वती एक भक्त । दत्त दर्शनार्थ तप करीत । त्यासी दृष्टांत होत । श्रोते तुम्ही अवधारा ॥४६॥
दत्त तयासी सांगत । जावे अक्कलकोटात । स्वामी समर्थ रुपात । सांप्रत आहे मी तेथे ॥४७॥
ऐसे होती दृष्टांत । तपस्वी आणि योग्यांप्रत । अक्कलकोटी महिमा वाढत । श्री स्वामी समर्थांचा ॥४८॥
दूरदुरोनी तडी तापसी । येती स्वामी दर्शनासी । पूर्ण परब्रह्म दत्तात्रेयासी । पाहोनी तृप्त होती ते ॥४९॥
ठाकूरदास गाणगापुरात । श्री दत्ताची सेवा करीत । त्यासी दृष्टांत होत। अक्कलकोटी आहे मी ॥५०॥
म्हणोनी अक्कलकोटी येत । स्वामी दर्शन करण्या जात । परी मनामाजी म्हणत  । पाहू सामर्थ्य स्वामींचे ॥५१॥
दत्त पादुका गाणगापुरी । वहावया त्यावरी कस्तुरी । ती घेऊनी बरोबरी । अक्कलकोटी पोचले ॥५२॥
करिता समर्थांसी वंदन । ‘ हमारा कस्तुरी लाव ’ म्हणोन । केले स्वामींनी आज्ञापन । भक्त विस्मित होत असे  ॥५३॥
हेची दत्तात्रेय समर्थ । खूण त्यासी पटत । तात्काळ कस्तुरी अर्पित । श्री स्वामींसी तेधवा ॥५४॥
ऐसे स्वामी समर्थ । लीला करिती अनंत । नित्य नूतन महिमा होत । अक्कलकोटा माझारी ॥५५॥
गोविंदराव गाणगापुरात । होते पादुका सेवा करीत । त्यांसी दृष्टांत होत । श्रोते पाहा काय तो ॥५६॥
गाणगापूर गर्भ मंदिरात । जेथे निर्गुण पादुका असत । श्री स्वामी सम्रर्थ । बैसले तेथे पाहे तो ॥५७॥
स्वामी तयासी म्हणत । हे माझेची स्थान असत । परी सदेहाने सांप्रत । अक्कलकोटी आहे मी ॥५८॥
पाहोनी ऐसा दृष्टांत । गोविंदराव अक्कलकोटी येत । श्री स्वामींसी निवेदीत । दृष्टांत सारा तेथवरी ॥५९॥
तव म्हणती स्वामी समर्थ । पूर्वी होतो गाणगापुरात । तैसेची गिरनार पर्वतात । होतो आम्ही जाण पा ॥६०॥
माहूरगड अबू पर्वत । मेरु पठार हिम पर्वत । औदुंबर नृसिंहवाडीत । होतो पूर्वी अवधारा ॥६१॥
तैसेची कर्दळीवनात । श्रीशैल सुब्रमण्य स्थानात । आणि निलगिरी पर्वतात । पूर्वी राहिलो होतो मी ॥६२॥
ऐसे सांगती समर्थ । विस्मित होती भक्त ।म्हणती श्रीपाद श्रीवल्लभ । पुन्हा ऐसे प्रकटले ॥६३॥
अजानुबाहू भव्य शरीर । टोपी शोभे मुकुटाकार । अवधूत दत्त दिगंबर । लोकोध्दारा प्रकटले ॥६४॥
योगी तपस्वी संन्यासी । दुरोनी येती दर्शनासी । ब्रह्मप्राप्ती तयांसी । स्वामीकृपे होत असे ॥६५॥
सीताराम नामे भक्त । होते योगसाधना करीत । परी समाधी न लागत । येती दर्शना कारणे  ॥६६॥
स्वामी कृपादृष्टी करीत । योग्यासी समाधी लागत । आठ तासपर्यंतस । समाधी त्यांसी लागतसे ॥६७॥
ऐसा महिमा अगाध । वर्णिता थकती वेद । स्वामी समर्थ श्री दत्त अक्कलकोटी राहिले  ॥६८॥
म्हणोनिया दत्तगिरी । श्री गुरुचरित्र विस्तारी । समर्थ स्वामी अवतारी । अक्कलकोटी राहिले ॥६९॥
हा ग्रंथ नव्हे अमृत । श्री स्वामींची वाड्मय मूर्त । पठणे दर्शन साक्षात । श्री स्वामींचे होत असे ॥७०॥
॥ अध्याय तिसरा ॥
॥ओवी संख्या ७०॥
स्वामी एका शिळेवर बसलेले  आहेत. उजव्या हाताला साईबाबा व डाव्या हाताला गजानन महाराज बसले आहेत .


स्वामी समर्थ सप्तशती – अध्याय चौथा

श्री गणेशाय नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ॥
राहोनी अक्कलकोटात । असंख्य सिध्द निर्मित । ऐसा महिमा अद्‍भुत । श्री स्वामी समर्थांचा ॥१॥
असता स्वामी मोगलाईत । एका मुलासी  योग देत । आणि शिर्डीसी पाठवीत । योगसाधना करावया ॥२॥
तेची श्री साई समर्थ । म्हणूनी पाहा होती प्रसिध्द । श्री गुरु स्वामी समर्थ । ऐसा महिमा तयांचा ॥३॥
श्री स्वामी समर्थ । प्रज्ञापुरी राहो लागत । शिष्य आनंदनाथ । म्हणोनी होते तेथवरी ॥४॥
तयांसी म्हणती समर्थ । शिर्डीसी जावोनी पाहा म्हणत । गुप्त खुणा सांगत । योगमार्गींच्या तयालागी ॥५॥
शिर्डीसी जाती आनंदनाथ । प्रेमे साई त्यांसी भेटत । आपुल्या आसनी बैसवीत । करिती गोष्टी त्यांसवे ॥६॥
समर्थांचे सारे निरोप । साईंसी आनंदनाथ देत । आणि ग्रामस्थांसी सांगत । श्रोते तुम्ही अवधारा ॥७॥
श्री साईबाबा योगीपुरुष । देवाचे लेकरु असत । वसती तुमच्या गावात । भाग्य उदेले तुमचे हो ॥८॥
हा आहे हिरा प्रखर । तेजे दिपेल जगदांतर । तुम्ही सेवा सत्वर । ऐसे सांगती लोकांना ॥९॥
ऐसे ग्रामस्था सांगोन । आनंदनाथ करिती प्रयाण । ते साईबाबा भगवान । आज जाहले जगताचे ॥१०॥
ऐसे महासमर्थ । असती पहा स्वामी समर्थ । त्यांच्या लीला अद्‍भुत । कोणी कैशा वर्णाव्या ॥११॥
जगदोध्दारा कारण । केले सिध्द निर्माण । ऐसे अगाध महिमान । असे स्वामी समर्थांचे ॥१२॥
शेगावीचे गजानन । येती समर्थांसी शरण । योग शिकवा म्हणून । प्रार्थना करिती समर्थांची ॥१३॥
समर्थ म्हणती गणूप्रत । येथे गर्दी खूप असत । तू जाई देव मामलेदारांप्रत । शिकवील सारे तुजला तो ॥१४॥
ऐसे तया सांगती । काही योगक्रिया दाविती । आणि पाठवून देती । सटाण्यासी तेधवा ॥१५॥
देव मालेदार महासिध्द । गजानन आले तेथ । राहोनी त्यांच्य़ा सहवासात । शिकले योगसाधना ते ॥१६॥
तीन मास राहोनी तेथ । मग आले अक्कलकोटात । वंदूनी श्री स्वामी समर्थ । सेवा करीत राहिले ते ॥१७॥
स्वामी गजाननासी म्हणत । जावोनी राही शेगावात । नाव नाही गाव नसत । अवधूत होऊनी राही तू ॥१८॥
ते गजानन महाराज शेगावात । आज जाहले प्रसिध्द । स्वामी समर्थ लोकोध्दारार्थ । ऐसे निर्मिती सिध्द ते ॥१९॥
ऐसे स्वामी समर्थ । प्रज्ञापुरी होते राहत । अनेक सिध्द निर्मित । जगदोध्दारा कारणे ॥२०॥
श्रीकृष्ण सरस्वती सिध्द । कोल्हापुरी असती प्रसिध्द । गुरु त्यांचे स्वामी समर्थ । ऐका नवल ती कथा ॥२१॥
ते राहती कोल्हापुरात । परी अंतरी तळमळत । कैसा होईल मोक्ष प्राप्त । साफल्य होईल जन्माचे ॥२२॥
मंगळसुळीचा खंडोबा दैवत । ते त्यांचे कुलदैवत । त्याचे यात्रेसी जात । उपाशी राहती तेथे ते ॥२३॥
खंडोबा होऊनी प्रसन्न । त्यार्ते देई वरदान । म्हणे दत्तात्रेय भगवान । प्रज्ञापुरी पाहे तू ॥२४॥
त्यासी जाई शरण । ते करतील दया पूर्ण । श्री अवधूत निरंजन । होवोनिया राहसी तू ॥२५॥
असो श्रीकृष्ण सरस्वती । अक्कलकोटी येवोनी राहती । स्वामीकृपा करिती । सिध्दावस्था पावले ते ॥२६॥
ऐसे स्वामी समर्थ । राहती लीला करीत । जगदोध्दारार्थ श्री दत्त । प्रज्ञापुरी राहिला ॥२७॥
सय्यद नामे भक्त । येई स्वामी दर्शनार्थ । अक्कलकोटी येवोनी पुसत । ‘ अक्कलकोट स्वामी कहाँ है ’ ॥२८॥
क्रोधे स्वामी म्हणत । अक्कलकोटमे स्वामी असत । यहाँ क्या देखत । ऐसे म्हणती तयाला ॥२९॥
ऐसे म्हणता अकस्मात । समाधी त्यासी लागत । आठ तास समाधित । बुडोनिया राहे तो ॥३०॥
मैंदर्गीचा जमादार । अलिखान भक्त थोर । भेटविला त्यासी ईश्वर । सिध्द केले तयांना ॥३१॥
अनेक हिंदूंना सिध्द केले । पारशी ख्रिश्चनही आले । शरण स्वामी समर्थांना ॥३२॥
सिध्द निर्मिले अनेक । असंख्य निर्मिले साधक । अनेक  केले मुक्त । कृपाप्रसादे करोनिया ॥३३॥
वेंगुर्ल्याचे आनंदनाथ । मुंबईचे स्वामीसुत । पुण्याचे जंगलीनाथ । ऐसे शिष्य समर्थांचे ॥३४॥
काळ्बुवा नामे पुण्यात ।होते एक सिध्द राहत ।  वेडयासारखे वागत । मारिती दगड लोकांना ॥३५॥
काही समर्थ भक्त । जाती त्यांचे दर्शनार्थ । त्यांसी बैसवोनी समीपत । सांगती गोष्टी समर्थांच्या ॥३६॥
म्हणती श्री स्वामी समर्थ । ते दत्तप्रभू साक्षात । मी त्यांचा सेवक असत । ऐसे म्हणती भक्तांना ॥३७॥
त्यांनी मला केले सिध्द । आणि पाठविले पुण्यात । लोक उपद्रव टाळण्याप्रत । वेडा होऊनी राहिलो ॥३८॥
शंकर महाराज प्रसिध्द । समाधी असे पुण्यात । तेही समर्थांचे शिष्य । कथा त्यांची अवधारा ॥३९॥
शिकारीस जाती अरण्यात । एका पाडसा पाहत । गोळ्या त्यावरी झाडत । परी ते पळोनी जात असे ॥४०॥
त्यासी शोधीत । थोडे आणखी पुढे जात । एका शिळेवरी दिसत । स्वामी समर्थ बसलेले ॥४१॥
मांडीवरी पाडस असत । पाहूनी शंकर क्रोध येत । म्हणे शिकार मजप्रत । द्यावी म्हणूनी सांगतसे ॥४२॥
त्यासी म्हणती समर्थ । ‘ का मारिसी जीवांप्रत ’ । ‘ जरी तू नाही निर्मित ’ । ‘का मारिसी तयांना ’ ॥४३॥
शंकरासी क्रोध येत । झाडी गोळ्या बहुत । परी त्या आरपार जात । काही न होई समर्थांना ॥४४॥
पाहोनी हा चमत्कार । मनात भ्याला शंकर । हा नर नव्हे ईश्वर ।ऐसे म्हणे मनामाजी ॥४५॥
करी साष्टांग नमस्कार । म्हणे मी आपुला चाकर । आपण साक्षात ईश्वर । क्षमा करावी मजलागी ॥४६॥
हेची शंकर महाराज । म्हणूनी होती पुढे प्रसिध्द । एकशे चाळीस वय असत । समाधी घॆती तेव्हा ते ॥४७॥
ऐसा दत्त दिगंबर । लीलाविग्राही अवतार । त्यांच्या लीला समग्र । कोणी कैशा वर्णाव्या ॥४८॥
वामनबुवा दत्तभक्त । होते पुण्यामाजी राहत । अंतरी सदा तळमळत । सद्‍गुरु भेटी कारणे ॥४९॥
ऐसे असता तळमळत । एक तेजस्वी व्दिज येत । म्हणे ‘जा ’ अक्कलकोटात । दत्त तेथे राहिला ॥५०॥
ऐसे ब्राह्मण म्हणत । आणि तेथेची होई गुप्त । वामनबुवा चकित । होऊनी पाहा जातसे ॥५१॥
परी विश्वास न होत । कारण असे पंडित । बुध्दिवादी बहुत । विश्वास मनाचा होईना ॥५२॥
शेवटी करोनी मनोबळ । म्हणे पाहू एक वेळ । ब्राह्मणाच्या गुरुचे खेळ । जावोनी एकदा पाहावे ॥५३॥
ऐसा अविश्वास करोन । अक्कलकोटी येवोन । घेई समर्थ दर्शन । वामन पंडित तेधवा ॥५४॥
का रे चेष्टा केलीस । आमच्या ब्राह्मणावरी अविश्वास । ऐसे म्हणोनी वामनास । खूण दाविली स्वामींनी ॥५५॥
वामनबुवा नमस्कार करीत । म्हणे मी अज्ञानी असत । आज काल  समाजात । दत्त कोठे दिसेना ॥५६॥
कोण सत्या काय असत्य । हे न काही कळोन येत । गावोगावी अनेक सिध्द । दीक्षा देण्या बैसले ॥५७॥
म्हणौनी थोडी थट्टा केली । परी ती अंगासी आली । आपण दत्तात्रेय माऊली । क्षमा करावी म्हणत असे ॥५८॥
मज दीक्षा द्या म्हणत । स्वामी म्हणती तयाप्रत । राही सेवा करीत । ब्रह्मनिष्ठा होशील तू ॥५९॥
समर्थांची सेवा करीत । वामन काही दिवस राहत । तेथून मग गाणगापुरात । जाई सेवा करावया ॥६०॥
गाणगापुरी जावोन । केले गुरुचरित्र पारायण । सप्ताह होता पूर्ण । दृष्टांत होई तयालागी ॥६१॥
दत्तात्रेय भगवान । रात्री स्वप्नी येवोन । सांगती वामना लागोन । श्रोते तुम्ही अवधारा ॥६२॥
स्वप्नी सांगती श्री दत्त । मीच आहे अक्कलकोटात । स्वामी समर्थ रुपात । भक्तोध्दारा आलो मी ॥६३॥
ऐसा दृष्टांत होत । वामन अक्कलकोटासी येत । म्हणे श्री स्वामी समर्थ । साक्षात दत्त असती हो ॥६४॥
ऐसे लोकां सांगत । राहती सेवा करीत । ब्रह्मनिष्ठा वामनबुवा होत । समर्थकृपे करोनिया ॥६५॥
ऐसा महिमा अपार । तो लीलेचा सागर । त्यातील काही लहर। येथे आपण पाहतसो ॥६६॥
सरस्वती सोनार । समर्थांचा कृपाकर । लाभता जाहली सत्वर । परहंस योगिनी ती ॥६७॥
स्वामी होता क्रोधित । सरस्वतीसी आणिती भक्त । स्वामी शांत त्वरित । तीसी पाहता होती ते ॥६८॥
नाना रेखी पंडित । त्रिकालज्ञानी असत । ते म्हणती स्वामी समर्थ । सहस्र वर्षांचे असती हो ॥६९॥
शके दहाशे एकाहत्तर । स्वामींचे जन्म संवत्सर । ऐसा अगाध अपार । महिमा स्वामी समर्थांचा ॥७०॥
॥ अध्याय चौथा ॥  ॥ ओवी संख्या ७०॥


स्वामी समर्थ सप्तशती – अध्याय पाचवा

श्री गणेशाय नम: ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ॥
ब्रह्मनिष्ठा वामन ।स्वामी आज्ञे करोन । बडोद्यात राहोन । लोककल्याण करिती ते ॥१॥
वृध्दापकाळ आला । देह व्याधिग्रस्त झाला । वामनरावांच्या दु:खाला । पारावार राहिना ॥२॥
भक्त सेवा करीत । म्हणोनी मनी  दु:खित । म्हणती जीणे व्यर्था । लोकांसी त्रास होत असे ॥३॥
मनी विचार करीत । जलात व्हावे समाधिस्थ । प्राणायाम कुंभक । साध्य होता केलेला ॥४॥
एके रात्री उठत । समीप सुरसागर असत । समाधी घेण्यास उतरत । जलामाजी तेधवा ॥५॥
प्राणायाम करो लागत । नवल वर्तले तेथ । प्रकटले स्वामी समर्थ । भक्त रक्षण्या कारणे ॥६॥
स्वामी समर्थ प्रकटत । हातासी त्याच्या धरीत । जलाबाहेर ओढीत । देती श्रीमुखात ठेवूनिया ॥७॥
दिला बुक्क्यांचा मार । शिव्या घातल्या भरपूर । म्हणती प्रारब्धाचा भार । चुकवू का तू पाहसी ॥८॥
जरी आत्ता चुकविसी । तरी पुढील जन्मात भोगसी । म्हणून कधी प्रारब्धासी । चूकवू नये अवधारा ॥९॥
ऐसे सांगोनी तयासी । आणून सोडिले गृहासी । दर्शन दिले सर्वांसी  । घरातील लोकांना ॥१०॥
आणि झाले गुप्त । ऐसे स्वामी समर्थ । तयांचा महिमा अगाध । कोणी कैसा वर्णावा ॥११॥
एक भक्त पाण्यात बुडत आहे व स्वामी त्याला बाहेर ओढून काढता आहेत.
ते रात्री झोप लागली । वामनाची व्याधी गेली । कृपा करिता गुरुमाऊली । अशक्य सांगा काय ते ॥१२॥
वामन होऊनी ठणठणीत । अक्कलकोटी दर्शना येत । सर्वां सांगे वृत्तांत । कैसे प्रकटले श्री स्वामी ॥१३॥
एक वृध्द स्त्री पुत्रासहित । होती  स्वामी सेवा करीत । पुत्र अंधा असत । म्हणोनी सेवा करीत असे ॥१४॥
काही दिवस गेल्यावर । पुसे स्वामींसी उपचार । स्वामी करुणासागर । म्हणती पाहा काय ते ॥१५॥
आमुची परीक्षा पाहण्यासी । पाच ब्राह्मण येत असती । तेव्हा याच्या नेत्रासी । दृष्टी देऊ आम्ही हो ॥१६॥
असो चार दिवस जाती । पाच पंडित येती । म्हणती स्वामींची प्रचिती । पाहावयासी आलो हो ॥१७॥
ऐसे लोकां सांगत । स्वामी समोर बैसत । स्वामी उगेची असत । काही न बोलती तयालागी ॥१८॥
ते स्वामींसी म्हणत । सांगा वेद शास्त्रार्थ । तुमची कीर्ती महासिध्द । म्हणोनी आम्ही ऐकिली ॥१९॥
श्री स्वामी नवल करीत । अंध मुला जवळ बोलावीत । माळ त्याच्या गळा घालीत । कृपा हस्त शिरी ठेविती ॥२०॥
तात्काळ अंधासी दृष्टी येत । स्वामी म्हणती तयाप्रत । यांच्या मनातील शास्त्रार्थ । उत्तरासह सांगे तू ॥२१॥
ऐसे ऐकता वचन । मुलगा उभा राहोन । सांगे मनातील वचन । वेद वाक्यांसहित जे ॥२२॥
सांगे उपनिषद भागवत । पंडिता मनातील श्लोक। ब्राह्मण चरण धरीत । श्री स्वामींचे तेधवा ॥२३॥
ऐसा महिमा अगाध । वर्णो न शके शेष वेद । तो पुराणपुरुष स्वयंभू । अक्कलकोटी राहिला ॥२४॥
अंधांसी नेत्र देत । मुक्यांसी वाचा देत । पांगळ्या चालाया लावत । ऐसा महिमा श्री गुरुंचा ॥२५॥
ऐशा लीला अगाध । करिती स्वामी समर्थ । ते दत्तप्रभू साक्षात । प्रज्ञापुरी राहिले ॥२६॥
नारायण भट नामे भक्त । जाई तिरुपती दर्शनार्थ । तेथे स्वामी समर्थ । दर्शन देती तयालागी ॥२७॥
अक्कलकोटी येवोन । तो सांगे वर्तमान । तिरुपतीस स्वामी दर्शन । झाले म्हणोनी सांगे तो ॥२८॥
भक्त पुसती स्वामींसी । केव्हा गेला तिरुपतीसी । स्वामी म्हणती तयासी । गेलो होतो म्हणोनिया ॥२९॥
सर्वा आश्चर्य वाटत । स्वामी सर्वत्र फिरत । अक्कलकोटीही असत । नवल वाटे सर्वांते ॥३०॥
तुकोजीराव होळकर । जाती अबू पर्वतावर । स्वामी समर्थ गुरुवर । दर्शन देती तयांना ॥३१॥
म्हणे केव्हा आलात । ऐसे पुसे स्वामीप्रत । आलो आत्ताच म्हणत । समर्थ स्वामी तयांना ॥३२॥
होळकर येती प्रज्ञापुरात । तेथे लोकांसी सांगत । अबू पर्वती भेटत । समर्थ स्वामी म्हणोनिया ॥३३॥
लोक तयांसी म्हणत । स्वामी येथेची असत । ऐकोनी विस्मय बहुत । तुकोजीसी वाटला ॥३४॥
ऐसा महिमा अमित । येथे वर्णिला संक्षिप्त । श्री स्वामी समर्थ । अगाध महिमा जयाचा ॥३५॥
एक ब्राह्माण गोदावरीच्या तीरावर ध्यान करीत बसला आहे व समोर ज्योतीमध्ये स्वामी प्रगट झाले आहेत .
बाबा घोलप पंचवटीत । सात्त्विक ब्राह्मण होते राहत । यज्ञ दान तप करीत । अहंकार रहित होते ते ॥३६॥
व्हावा ईश्वर साक्षात्कार । ऐसे तळमळे अंतर । करिती साधू सत्कार । परि तळमळ जाईना ॥३७॥
एके दिनी ब्राह्ममुहूर्ती । गंगेवरी स्नाना जाती । स्नान करोनी काठावरती । जप करीत बैसले ते ॥३८॥
समोर काही अंतरावर । दिसे ज्योत प्रखर । हा काय प्रकार । म्हणोनी बाबा पाहती ॥३९॥
ज्योत येई पुढयात । त्यातूनी प्रकटती स्वामी समर्थ । प्रखर तेजाने दिपत । डोळे बाबा घोलपांचे ॥४०॥
अजानुबाहू भव्य मूर्ती । किरणे सर्वत्र फाकती । दिव्य तेजाने  झळकती । नयन त्या यति राजांचे ॥४१॥
घोलप करिती नमस्कार । म्हणती आपण ईश्वर । करण्या माझा उध्दार । येथे आपण आलासा ॥४२॥
होय म्हणती स्वामी समर्थ । आलो दर्शन देण्याप्रत । तुझ्या तपाचे फळ देत । आहे याची क्षणामाजी ॥४३॥
मी अक्कलकोटी सांप्रत । आहे सदेहाने राहत । तू येई दर्शनाप्रत । ऐसे सांगती तयालागी ॥४४॥
ऐसे म्हणोनी गुप्त । होती पाहा स्वामी समर्थ । बाबा घोलप विस्मित । झाले पाहा तेधवा ॥४५॥
असो काही दिवसांनंतर । घोलप जाती प्रज्ञापूर । पाहता दत्त दिगंबर । समाधी लागे तयांना ॥४६॥
लोकांसी बाबा सांगत । हे असती भगवान दत्त । गोदावरी किनारी प्रकटत । दर्शन देण्या मजलागी ॥४७॥
नाशिकात बाबा घोलप । मठ आहे पंचवटीत । ऐसे श्री स्वामी समर्थ । अगाध महिमा तयांचा ॥४८॥
लोकोध्दारा कारण । करिती सिध्द निर्माण । तो जगत्‍पालक नारायण । जगदोध्दारा कष्टतसे ॥४९॥
तीनशेहून अधिक ।  निर्माण करिती सिध्द । त्याव्दारे जन उध्दरीत । ऐसा महिमा तयांचा ॥५०॥
नृसिंह सरस्वती आळंदीचे । श्रीकृष्ण सरस्वती कोल्हापूरचे । रामानंद बीडकर  पुण्याचे । समर्थ शिष्य असती हो ॥५१॥
शिर्डीचे साइनाथ । नाशिकचे बाबा घोलप । पुण्याचे शंकरनाथ । शिष्य असती समर्थांचे ॥५२॥
अलवणीबुवा भारतीबुवा । कृष्णगिरी रामपुरीबुवा । स्वामीसुत स्वामीकुमरबुवा । शिष्य असती समर्थ्यांचे ॥५३॥
दत्तगिरी नामे भक्त । जन्म नृसिंहवाडीत । गुरुदर्शना तळमळत । त्यांसी दृष्टात होत असे ॥५४॥
स्वप्नी म्हणती श्री दत्त । मी आहे अक्कलकोटात । येवोनी मजला भेट। ऐसे सांगती तयालागी ॥५५॥
दत्तगिरी ये प्रज्ञापुरी । पाहे मूर्ती गोजिरी । अजानुबाहू चमत्कारी । पाहुनी वंदन करीतसे ॥५६॥
समाधी दिवस सात । त्यासी लावूनी देत । कर्नाटका पाठवीत । लोकोध्दार करावया ॥५७॥
वेंगुर्ल्याचे आनंदनाथ । त्यासी स्वामी सिध्द करीत।  पादुका त्यांसी देत । वेंगुर्ल्यासी पाठाविले ॥५८॥
अलवणीबुवा नामे भक्त । असे बडोद्यात राहत । एके दिनी अकस्मात । दिव्य रुपाते पाहतसे ॥५९॥
कटीवरी ठेवूनी हात । स्वामी समोर प्रकटत । बुवा राहती पाहत । अजानुबाहू समर्थांते ॥६०॥
करुनी स्वामींसी नमस्कार । स्तुती केली अपार । संस्कृतात काव्य सुंदर । करोनी स्तुती करीतसे ॥६१॥
नंतर पुसती तयांसी । आपण कोठील रहिवासी । अंतर न पडो चरणांसी । म्हणोनिया पुसतसे ॥६२॥
मी जाणे आपण ईश्वर । परी सदेह कोठे राहणार । कृपा करोनी सत्वर । सांगा मजसी दयाघना ॥६३॥
ऐसे प्रश्न संस्कृतात । बुवा समर्थांसी पुसत । समर्थ संस्कृत भाषेत । उत्तर देती तयांना ॥६४॥
राहे भक्तांच्या हृदयात । तैसेची सर्व तीर्थात । परी सदेह सांप्रत  । अक्कलकोटी राहतसे ॥६५॥
इतुके बोलूनी समर्थ । तेथेची पाहा होती गुप्त । अलवणीबुवा मनी म्हणत । दत्त नयनी पाहिला ॥६६॥
अलवणीबुवा अक्कलकोटात । कालांतरे येवोनी राहत । सर्व भक्ता सांगत । अनुभव दत्तदर्शनाचा ॥६७॥
ऐसे स्वामी समर्थ । शिष्य निर्माण करीत । असंख्य शिष्य निर्मित । लोकोध्दारा कारणे ॥६८॥
राहोनिय़ा चराचरात । सद्‍भक्ताते दर्शन देत । श्री गुरु स्वामी समर्थ । अपार महिमा तयांचा ॥६९॥
म्हणोनिया दत्तगिरी । श्री गुरुचरित्र विस्तारी । दत्त दिगंबर अवतारी । अक्कलकोटी राहिला ॥७०॥
॥ अध्याय पाचवा ॥  ॥ ओवी संख्या ७०॥
स्वामींनी एका भक्ताला कार्तिक स्वामींच्या रुपात दर्शन दिले .


स्वामी समर्थ सप्तशती – अध्याय सहावा

श्री गणेशाय नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ।
राहोनिया चराचरात । भक्तांचा उध्दार करीत । ऐसा श्री स्वामी समर्थ । अक्कलकोटी राहिला ॥१॥
लीला विग्रही समर्थ । लीला करिती अनंत । जना सन्मार्गा लावीत । अनेक लीला करोनिया ॥२॥
रामशास्त्री नामे भक्त । होता पाहा सेवा करीत । अक्कलकोटी राहत । स्वामी सेवा करीत असे ॥३॥
गावातील ग्रामस्थ । निघाले कार्तिकस्वामी यात्रेस । तूही चल म्हणती यास । यात्रा करोनी येऊ या ॥४॥
तो म्हणे स्वामी समर्थ । तेच असती प्रत्यक्ष दत्त । त्यांसी सोडूनी व्यर्थ । जत्रा पाहावया का जावे ॥५॥
ऐसे म्हणोनी रामशास्त्री । राहिले स्वामी सेवेसी । असो कार्तिक पौर्णिमेसी । विचित्र प्रकार पाहतसे ॥६॥
समर्थांकडे असे पाहत । प्रकाश पडे अकस्मात । स्वामी रुप धरीत । कार्तिककुमार स्वामींचे ॥७॥
पाहोनी करी नमस्कार । रामशास्त्री वारंवार । म्हणे तू दत्त दिगंबर । सर्व रुपे तुझी देवा ॥८॥
माझा स्वामी समर्थ । सर्व देव राहती त्यात । ऐसे म्हणून लोकांप्रत । रामशास्त्री सांगतसे ॥९॥
एक गरीब भक्त । येई समर्थ दर्शनाप्रत । दारिद्रये गांजलो बहुत । म्हणोनी  प्रार्थी स्वामींना ॥१०॥
राहिला सेवा करीत । झाडणे सारवण करीत । त्रिकाल नमस्कार करीत । ऐसा राहे तेथवरी ॥११॥
एके दिवशी अकस्मात । उठोनी जाती स्वामी समर्थ । त्यांचे पाठी हा गृहस्थ । आपणही जात असे ॥१२॥
हाडकांच्या ढिगार्‍यावर । जाऊनी बैसती दत्त दिगंबर । हात जोडूनी समोर । भक्त उभा राहतसे ॥१३॥
काही हाडे उचलोन । ‘ घे ’ म्हणती तया लागोन । भक्त प्रसाद समजोन । सारी हाडे घेत असे ॥१४॥
फडक्यात हाडे बांधून । ठेवी खांद्यावरी टाकोन । पुन्हा हात जोडोन पाहत । उभा राहे तेथवरी ॥१५॥
समर्थ आज्ञा करीत । ‘जा’ आपुल्या घरी म्हणत । घरी जावोनी पाहत ।  सुवर्ण झाली हाडे ती ॥१६॥
गेले त्याचे दारिद्रय । तो झाला श्रीमंत । ऐसा महिमा अगाध । श्री स्वामी समर्थांचा ॥१७॥
कुणा रामाचे रुपात । कुणा शिव कृष्ण दत्त रुपात । कुणा देवी विठ्ठल रुपात । दर्शन दिधले स्वामींनी ॥१८॥
कुणा गणेश दिसत । कुणा दुर्गा रुपात । कुणा हनुमान रुपात । दर्शन दिधले स्वामींना ॥१९॥
कोडॅक नामे अमेरिकेत । प्रसिध्द फोटो कंपनी असत । त्या कंपनीने मुंबईत । स्टुडिओ एक काढला ॥२०॥
स्टुडिओ मालक मनी म्हणत । सिध्दांचा देश भारत । सिध्दाचा फोटो प्रथम काढावा म्हणत । कॅमेर्‍याने आपुल्या ॥२१॥
म्हणोनी चौकशी करीत । कळे त्यांसी अक्कलकोटात । असती साक्षात दत्त । स्वामी समर्थ नावाने ॥२२॥
तो येई अक्कलकोटात । स्वामींचा फोटो काढीत । धुवोनी मग आणीत । दावी फोटो स्वामींना ॥२३॥
स्वामी फोटो पाहत । एका भक्तासी दावीत ।  तो भक्त म्हणे सुंदर । फोटो आहे दत्ताचा ॥२४॥
तो दुसर्‍यासी देत । त्यासी देवी दिसत । तिसर्‍यासी कृष्ण दिसत । त्याच फोटो माझारी ॥२५॥
कुणा राम कुणा कृष्ण । कुणा देवी कुणा दत्त । कुणा विठोबा दुर्गा दिसत ।एकाच फोटो माझारी ॥२६॥
फोटोग्राफर चिडत । हा तमाशा काय म्हणत । फोटो काढूनी घेत । हातातूनी तो भक्तांच्या ॥२७॥
पुन्हा फोटो समर्थांसी देत । समर्थं फोटो त्यासी दावीत । ‘मी असा आहे का ’ पुसत । फोटो दावूनी तयालागी ॥२८॥
फोटोत दिसे माकड । पाहोनी सर्व दिग्‍मूढ । म्हणती ही  अवघड । लीला स्वामी समर्थांची ॥२९॥
ऐशा लीला करीत । भक्ता सन्मार्गी लावीत । श्री स्वामी समर्थ । अक्कलकोटी राहिले ॥३०॥
तयांच्या लीला अनंत । येथे पाहतो संक्षिप्त । श्री गुरुचरित्र अनंत । कोणी कैसे वर्णावे ॥३१॥
हाडाचे सोने करीत । सर्पाचे सोने करीत । भक्त इच्छा पुरवीत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥३२॥
भक्तकामकल्पद्रुम । ऐसे ज्याचे महिमान । तो दत्त दयाळू पूर्ण । अक्कलकोटी राहिला ॥३३॥
हाडाच्या ढिगार्‍यावर स्वामी बसलेले आहेत व एका भक्ताला हाडे देत आहेत.
घराबाहेर दरवाज्यात बायको उभी आहे आणि भक्त हाडे दाखवत आहेत, ती सर्व हाडे सोन्याची झाली आहेत.
रामानंद बीडकर । समर्थांचे शिष्य थोर । तयांसी दत्त साक्षात्कार । समर्थकृपे होत असे ॥३४॥
सिध्द तयांसी करीत । करी लोककल्याण म्हणत । नर्मदाकिनारी देत । दर्शन रामानंदासी ॥३५॥
स्वामी भक्त बाळाप्पा । स्वामीसुत स्वामीकुमार क्रुष्णाप्पा । मैंदर्गीचा सिध्दाप्पा ।ऐसे भक्त समर्थांचे ॥३६॥
गोपाळबुवा केळकर ।तैसेची सिध्द जांभेकर । सुरतकर बरडकर । सिध्द शिष्य समर्थांचे ॥३७॥
सच्चिदानंद स्वामीकुमार । सिध्दाबाई चेंबूरकर । सीताराम दिगंबर । सिध्द शिष्या समर्थांचे ॥३८॥
रामचंद्र भेंडे नामे भक्त । असे मुंबईत राहत । शिवभक्ती करीत । अखंड शिवासी ध्यातसे ॥३९॥
नित्य करी शिवध्यान । तेणे शिव झाले प्रसन्न । शिव म्हणे सावधान । सांगेन गुज तुजलागी ॥४०॥
अक्कलकोटी सांप्रत । सदेहाने मी राहत । तुझी वाट पाहत । आहे तेथे बैसलेले ॥४१॥
शिव आदेशानुसार । अक्कलकोटी जाई सत्वर । स्वामी समर्थ श्री शंकर । पाहोनी तृप्त होतसे ॥४२॥
क्षणात विष्णू रुपांत । श्री स्वामी दिसो लागत । पुन्हा ब्रह्म स्वरुपात । दिले दर्शन स्वामींनी ॥४३॥
प्रथम भेटीत तीण रुपांत । त्यासी स्वामी दर्शन देत । रामचंद्र विस्मित होत । पाहोनी रुपे समर्थांची ॥४४॥
कळवळूनी प्रार्थना करीत । निज स्वरुप दावा म्हणत । हासोनी स्वामी समर्थ । म्हणती ‘ लो हम आ गये ’ ॥४५॥
ऐसे म्हणोनी स्वामी समर्थ । पुन्हा निजरुप धारण करीत । रामचंद्र होई सिध्द । समर्थ कृपे करोनिया ॥४६॥
तात महाराज म्हणून । नंतर ते होती प्रसिध्द । मठ करिती  मुंबईत । ऐसे कार्य समर्थांचे ॥४७॥
नृसिंह सरस्वती साधक । योगासाधना करिती बहुत ।हठयोगा ते आचरीत । धौती बस्ती इत्यादी ॥४८॥
परी समाधी न लागत  । वासुदेव मयं जगत । ऐसा अनुभव कोण देत । म्हणोनी चिंता करिती ते ॥४९॥
स्वामी कीर्ती ऐकोन । करिती प्रज्ञापुरि प्रयाण । स्वामींसी नमन करोन । क्षणभर उभे राहती ते ॥५०॥
आज्ञाचक्र भे्दन । श्लोक म्हणती गुरु आपण । साधक होती समाधिमग्र । अद्‍भुत लीला स्वामींची ॥५१॥
अष्टौप्रहर समाधित । स्वामी नृसिंह सरस्वती राहत । ऐसी लीला अद्‍भुत । श्री दत्त स्वामी समर्थांची ॥५२॥
हरिभाऊ नामे भक्त । मुंबईसी  होता राहत । समर्थांसी नवस करीत । कर्ज आपुले फिटावे ॥५३॥
कर्ज फिटता दर्शना येत । स्वामी समर्था नमस्कारीत । स्वामी तयाते म्हणत । सुत व्हावे माझा तू ॥५४॥
ते मग संन्यास घेत । स्वामीसुत नाम घेत । मठ स्थापिती मुंबईत । लोकोध्दारा कारणे ॥५५॥
स्वामीसुतांची कीर्ती होत । हजारो लोका उध्दरीत । भक्तिमार्गाते लावीत । ऐसा महिमा स्वामींचा ॥५६॥
नाना पारशी नामक । होता मुंबईत राहत । नेत्र जाती अकस्मात । काही त्यासी दिसेना ॥५७॥
स्वामीसुतांचे दर्शनार्थ । भक्तजन त्यांसी नेत । डोळयांस लावीती हात । श्री स्वामीसुत तेधवा ॥५८॥
तात्काळ दिसो लागत । लोक होती चकित । पारशी लोक बहुत । येवो लागले दर्शना ॥५९॥
श्री स्वामी समर्थ । ईश्वर असती साक्षात  । ऐसे पारशी भक्त । म्हणू लागले तेधवा ॥६०॥
मुंबईहून असंख्य भक्त । अक्कलकोटी येऊ लागत । स्वामी त्यांसी सांगत । स्वामीसुत मीच असे ॥६१॥
घ्यावे स्वामीसुतांचे दर्शन । त्या रुपे मुंबईत जाण । मी राहे अनमान । मनी काही आणू नका ॥६२॥
मुंबईहूनी प्रज्ञापुरात ।येता कोणी दर्शनार्थ । स्वामीसुतांची सेवा करीत । राहा म्हणोनी सांगती त्या ॥६३॥
जो स्वामीसुतांसी सेवीत । त्यांच्याअ मनोकामना पूर्ण होत । ऐसे स्वामी समर्थ । स्वये सांगती लोकांना ॥६४॥
ऐसे श्री स्वामीसुत । जव अवतार समाप्ती करीत । स्वामी समर्थ दु: खित । होती पाहा तेधवा ॥६५॥
गुरु आधी शिष्य गेला । बापा आधी पुत्र गेला । श्री स्वामीचा कळवळा । स्वामीसुतावरी ऐसा हो ॥६६॥
असो स्वामीसुतानंतर । मुंबईत राहिले स्वामीकुमार । स्वामी कार्य निरंतर । पुढे त्यांनी चालविले ॥६७॥
स्वामीसुतांचे अनुज । श्री स्वामींचा कीर्तिध्वज । मुंबईत उभारिती सहज । ऐसा महिमा तयांचा ॥६८॥
ऐसे स्वामी समर्थ । लोकोध्दारा तळमळत । त्यांचे चरित्र संक्षिप्त । येथे तुम्हा सांगतसे ॥६९॥
हा ग्रंथ नव्हे कल्पवृक्ष । भक्त इच्छा पुरवीत । श्री स्वामी समर्थ । राहे शब्दी भरोनिया ॥७०॥
॥ अध्याय सहावा ॥  ॥ ओवी संख्या ७० ॥
स्वामी  बसलेले आहेत व समोर साधू बसला आहे . बाजूला मोठे वडाचे झाड. झाडातून चमकदार सोन्याचे बिंदू दिसत आहेत व स्वामी हाताने ते बिंदू त्याला दाखवत आहेत.


स्वामी समर्थ सप्तशती – अध्याय सातवा

श्री गणेशाय नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ॥
संतती संपत्ती आरोग्य । विद्या ज्ञान वैराग्य । आत्मज्ञान  आणि योग । सर्वही मिळे भक्तांना ॥१॥
अंधाशी नेत्र मिळत । दरिद्री होई श्रीमंत । व्याधी निवारण होत । समर्थकृपे करोनिया ॥२॥
असो प्रज्ञापुरात । स्वामी समर्थ होते राहत । नित्य लीला करीत । उध्दाराया भक्तांसी ॥३॥
नास्तिका आस्तिक करीत । अभक्ता मार्गा लावीत । दृष्टा सज्जन बनवीत । ऐसा महिमा तयांचा ॥४॥
गर्विष्ठासी तडाखे देत । आणि मार्गावरी आणीत । अहंकार दवडूनी देवत्व । दिले कीत्येक भक्तांना ॥५॥
एक साधू  किमयागार । नित्य सुवर्ण करी तयार । दर्शना लोक थोर थोर । नित्य जाती तयाच्या ॥६॥
आढयतेने बोले नित्य । म्हणे मी रसायन सिध्द । जो तांब्याचे सुवर्ण करीत । खरा सिध्द म्हणा त्यासी ॥७॥
जो किमया करु शकत । त्यासीच म्हणावे खरा नाथ । इतर भोंदू असत  । म्हणोनी लोका सांगतसे ॥८॥
मच्छिंद्र आणि गोरक्ष । जालंदर आणि दत्त । सारे किमया करीत ।म्हणोनी मोठे होते ते ॥९॥
मीच एक सांप्रत । सोने निर्माण करीत । नाथांनंतर सिध्द । एकची पाहा मी असे ॥१०॥
ऐसे लोका सांगत । चिमलीतून सोने काढीत । लोक जयजयकार करीत । होते पाहा तयाचा ॥११॥
पक्कान्नांच्या पंगती उठत । अनेक त्याते मानीत । म्हणोनी गर्व होत । सिध्द स्वत: सी म्हणत असे ॥१२॥
घोडा गाडी वैभव । संपत्ती विपुल वैभव । सुखोपभोग सर्व । जवळी असती तयाच्या ॥१३॥
म्हणोनिया माजत । म्हणे मीच एक सिध्द । मजविण या जगात । सिध्द कोणी असेना ॥१४॥
रात्रीच्या अंधारात । गर्वाने तारे चमकत । सूर्योदय जव होत । पळोनिया जाती ते ॥१५॥
सिंह न दिसे जोवरी । जंबुक गर्जती अपारी । पाहता सिंहाते सत्वरी । पळोनिया जाती ते ॥१६॥
कोणी न भेटे सव्वाशेर । म्हणोनी गर्जे किमयागार । परी स्वामी ईश्वर  । सारे काही जाणतसे ॥१७॥
किमयागार नाशिकात । होता पाहा तेव्हा राहत । लोकांसमोर वल्गना करीत । मोठा सिध्द म्हणोनिया ॥१८॥
नाशिकात बाबा घोलप । होते कपालेश्वर मंदिरात । वामनबुवा ब्रह्मनिष्ठा । येती दर्शना तयांच्या ॥१९॥
बाबा घोलप वामन ब्रह्मनिष्ठा । उभयता असती बोलत । विषय किमयागाराचा निघत । कैसा गर्विष्ठ तो असे ॥२०॥
जावे पाहावे तयास । ऐसे वाटे मनास । म्हणूनी निघाले दर्शनास । त्याच वेळी तेधवा ॥२१॥
बाबा आणि वामन । तैसेची काही भक्तजन । जावोनी घेती दर्शन । किमयागार साधूचे ॥२२॥
साधू म्हणे तयालागोन । आम्ही तयार करितो सोने । आम्हासम बलवान । नाही पाहा कोणीही ॥२३॥
मच्छिंद्र गोरक्ष आणि दत्त । हेही होते किमया करीत । ज्यासी किमया न येत । साधू त्यासी म्हणो नये ॥२४॥
तव वामन ब्रह्मनिष्ठ । तया किमयागारासी म्हणत । तुमचे बोलणे समजत । नाही पाहा आम्हासी ॥२५॥
वैराग्य आणि ज्ञान । शांती आणि समाधान । हे साधूचे लक्षण । ऐसे आम्हा वाटते ॥२६॥
ऐसे ऐकता वचन । साधू जाई खवळोन । म्हणे तुमचा गुरु कोण । काय नाव तयाचे हो॥२७॥
वामन ब्रह्मनिष्ठ म्हणत । अक्कलकोटचे स्वामी समर्थ । तेची आमुची गुरु असत । ऐसे म्हणती तयांना ॥२८॥
समर्थ नाव ऐकोन । साधू जाई खवळोन । समर्थांसी दूषण । देवोनी भक्ता पुसत असे ॥२९॥
हे कैसे स्वामी समर्थ । ते का नाही किमया करत । जरी ते सोने निर्मित । तरीच आम्ही मानू तया ॥३०॥
तव म्हणती समर्थ भक्त । ते नाही किमया करत । परी त्यांची कृपा होत । जग सुवर्ण दिसत असे ॥३१॥
ते सर्पाचे सोने करीत । हाडांचेही सोने करीत । मातीचे सोने करीत । ऐसा महिमा तयांचा ॥३२॥
ऐकोनी ऐसे वचन । साधू विस्मित होवोन । म्हणे तुमचे भाषण । सत्य का मी मानावे ॥३३॥
जरी ते समर्थ  असत । मज चमत्कार दावीत । तेव्हाच तुमचे सत्य । मानेन जाणा निर्धार ॥३४॥
ना तरी या दुनियेत । किती तरी ढोंगी असत । आणि त्यांचेही भक्त । प्रचार करिती तयांचा ॥३५॥
ऐसे म्हणोनी किमयागार । देई समर्थ भक्ता उत्तर । असो तेथूनी सर्व । परतले आपुल्या स्थानासी ॥३६॥
आपुले स्थानी परतोन । सर्व एकत्र बैसोन । स्वामी समर्था लागोन । प्रार्थना करिती सर्वही ॥३७॥
हे अवधूता दत्ता । सच्चिदानंद स्वामी समर्था । दावी आपुली सत्ता । तया किमयागारासी ॥३८॥
ऐसे सर्वही प्रार्थून । झाले पाहा निद्राधीन । इकडे काय वर्तमान । घडले पाहा काय ते ॥३९॥
प्रभातकाळी उठोन । चारी बाजूस पडदे लावून । किमया करण्या लागोन । साधू पाहा तो बैसला ॥४०॥
सोने न होता झाले कोळसे । पाहोनी साधूस लागले पिसे । म्हणे हे ऐसे कैसे । झाले मजला कळेना ॥४१॥
विचार करी मनात । निंदिले स्वामी समर्थ । जरी असती सिध्द । चमत्कार दावा म्हटले मी ॥४२॥
तात्काळ माणसे पाठवीत । समर्थ भक्ता पाचारीत । म्हणे मी अपराधी असत । सच्चा स्वामी तुमचा हो ॥४३॥
तेणे केली मज शिक्षा । गेली माझी सर्व विद्या । किमया न ये मज आता । सोने काही होईना ॥४४॥
ऐसे पश्चात्तापे म्हणेन । धरी वामनाचे चरण । म्हणे मज गुरुदर्शन । सांगा केव्हा होईल ते ॥४५॥
आता होईल जव दर्शन । तेव्हा अन्नग्रहण करेन । ऐसे म्हणोनी प्रयाण । अक्कलकोटासी तो करे ॥४६॥
प्रज्ञापुरी येऊन । घेई स्वामी दर्शन ।  ‘माजलास का रे ’म्हणोन । स्वामी पुसती तयालागी ॥४७॥
काय झाले किमयेचे । कोळसे झाले सोन्याचे । चमत्कार कसले पाहायचे । ऐसे म्हणती तयाला ॥४८॥
‘ क्या देखता है इधर ’ । ‘ देख रे देख उधर ’ । ऐसे ऐकोनी उद्‍गार । साधू पाहो लागला ॥४९॥
कडुनिंबाच्या वृक्षातून । पाणी वाहे सुवर्णवर्ण । तैसेची वृक्ष संपूर्ण । सुवर्णाचा दिसत असे ॥५०॥
पाणी पडे जमिनीवर । ती भूमी होई सुवर्ण  । साधू होई कंपायमान । पाहोनी लीला स्वामींची ॥५१॥
ऐसे होता अकस्मात । समाधी त्यासी लागत । समाधी माजी पाहत । हिरण्यगर्भ श्री स्वामी ॥५२॥
संपूर्ण विश्व हिरण्यमय । स्वामी समर्थ हिरण्यमय । हे विश्व सर्व चिन्मय । ऐसे ज्ञान होत असे ॥५३॥
चार तासांनंतर । पुन्हा येई भानावर । करी साष्टांग नमस्कार । समर्थांसी तेधवा ॥५४॥
म्हणे मी अज्ञान । पडलो मायेत गुंतोन । परी तू गुरु दयाळ पूर्ण । ओढोनी माते काढिले ॥५५॥
काही सेवा न करता । उध्दार केला माझा आता । ऐसे करुणाकर्ता । समर्थ एकची आपण हो ॥५६॥
काही सेवा नाही केली । निंदा परी बहु केली । दूषणे आपणा दिली । तरी माते उध्दरिले ॥५७॥
न कळे ही काय करुणा । कैसे आपण दयाघना । ऐसे म्हणोनी चरणा । घट्ट साधू धरीतसे ॥५८॥
दत्तगुरु स्वामी समर्था । पूर्ण परब्रह्म अवधूता । काय वर्णू तुझी सत्ता । धन्य माते उध्दरिले ॥५९॥
ऐसे पुन्हा पुन्हा म्हणत । परमानंदे डोले चित्त । निंदकासीही उध्दरीत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥६०॥
सद्य: सिध्द समागमा । ऐसा वेद वर्णे महिमा । दत्तगुरु तू निष्कामा । उध्दरीले आज मजलागी ॥६१॥
नाही काही सेवा केली । निंदा मात्र बहू केली । परी तू दयाळ माऊली । उध्दार माझा केला तू ॥६२॥
हे दत्तगुरु स्वामी समर्था । सांगा आज्ञा काय आता । यापुढे प्रतिक्षण चित्ता । राहो ध्यान चरणांचे ॥६३॥
ऐसे ऐकोनी नम्र वचन । स्वामी समर्थ दयाघन । बोलले जे गंभीर वचन । श्रोते तुम्ही अवधारा ॥६४॥
माहूरगडी जावोनी । राहा म्हणती दत्तमुनी । मृगचर्म आणि कफनी । देती तया साधूला ॥६५॥
साधू माहूरगडा जात । तेथे दर्शन देती समर्थ । साधूचा उध्दार होत । स्वामी क्रृपे करोनिया ॥६६॥
निंदकाही करिती सिध्द । ऐसी कधी न ऐकली मात । परी स्वामी समर्थ । अगाध लीला त्यांची हो ॥६७॥
जो त्यांसी शरण गेला । त्यासी सिध्दपदी बैसविला । ऐसा महिमा आगळा । श्री स्वामी  समर्थांचा हो ॥६८॥
निंदकासीही उध्दरीत । सद्‍भक्ता ज्ञान देत ।मूढा विव्दान करीत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥६९॥
ऐसा स्वामी समर्थ । भक्ताजना उध्दरीत । ते सर्व जन भाग्यवंत । पाहिले ज्यांनी डोळ्याने ॥७०॥
॥ अध्याय सातवा ॥  ॥ ओवी संख्या ७०॥
स्वामी थोडे उच्च आसनावर बसले आहेत. त्यांच्या बाजूला श्री साईबाबा , श्री गजानन महाराज, श्री कृष्ण सरस्वती, श्री गोंदवलेकर महाराज, श्री शंकर महाराज, श्री काळबुवा , श्री रामकृष्ण परमहंस, श्री बिडकर महाराज असे शिष्य बसलेले आहेत.


स्वामी समर्थ सप्तशती – अध्याय आठवा

श्री गणेशाय नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ।
श्री ब्रह्मचैतन्य । गोंदवलेकर महाराज । नववे वर्षी घेत । आशीर्वाद समर्थांचा ॥१॥
रामकृष्ण परमहंस । स्वामी दर्शन देती त्यांस । ब्रह्मचारी लोकनाथांस । सिध्दपदी बैसविले ॥२॥
विष्णुबुवा ब्रह्मचारी ।वृत्ती ब्रह्मतदाकारी । श्री समर्थ लीलाधारी । नाना लीला करिती ते ॥३॥
काळबुवा पुण्यात । साटम सावंतवाडीत । रांगोळी महाराज वेंगुर्ल्यात । ऐसे शिष्य तयांचे हो ॥४॥
ताजुद्दीनबाबा नागपुरात । साईबाबा शिर्डीत । सीतारामबाबा खर्डीत । ऐसे शिष्य तयांचे हो ॥५॥
ऐसा स्वामी समर्थ । सदैव राही लीला करीत । तयांचे चरित्र अद्‍भुत । कोणी कैसे वर्णावे ॥६॥
गोविंदराव नामे भक्त । असे व्याधीने पीडित । गाणगापुरी सेवा करीत । होता पाहा तेधवा ॥७॥
त्यासी दृष्टांत होत । जावे अक्कलकोटात । स्वामी समर्थ श्री दत्त । कलियुगी पाहा अवतरले ॥८॥
ऐसा होई दृष्टांत । मग येई अक्कलकोटात । कृपा स्वामींची होत । व्याधी जाई निघोनिया ॥९॥
मल्हारराव गायकवाड । बडोद्याचा राजा असत । श्री स्वामीसी विनवीत । यावे बडोद्यासी म्हणोनिया ॥१०॥
स्वामी काही न बोलत । राजा दानधर्म करीत । सुवर्ण रौप्य अर्पित । प्रसन्न करण्या स्वामींसी ॥११॥
प्रयन्त करी बहुत । परी स्वामी न जात । निराश होऊनी परतत । बडोद्यासी माघारा ॥१२॥
जाऊनी दरबार भरवीत । विडा तेथे ठेवीत । म्हणे जो कोणी स्वामींसी आणीत । त्यासी जहागीर देईन मी ॥१३॥
एक विडा उचलीत । म्हणे मी स्वामींसी आणीत । ऐसे म्हणोनी येत। अक्कलकोटा माझारी ॥१४॥
येऊनी अक्कलकोटात । स्वामीसी धन अर्पित । सेवका अन्नदान करीत । प्रसन्न करण्या स्वामींना ॥१५॥
मग हळूच पुसत । चला म्हणे बडोद्यात । स्वामी काही  न बोलत । उगेच राहती बैसोनिया ॥१६॥
एक महिना राहत । प्रयत्न करी बहुत । अंति निराश होत  । जाई परतोनी माघारा ॥१७॥
ऐसे अनेक दरबारी । करिती अक्कलकोटी वारी । बडोद्यास न्यावे अंतरी । हेतू धरोनी येती ते ॥१८॥
प्रतिवर्षी प्रयत्न करीत । विडा उचलोनी येत । अंति निराश होत । ऐसे पाहा होतसे ॥१९॥
राजा दरबार भरवीत । आणि विडा ठेवीत । सर्व दरबार्‍यांसी म्हणत । श्रोते तुम्ही अवधारा ॥२०॥
स्वामी समर्थ भगवान । येथे आणावे म्हणोन । बहुत वर्षे प्रयत्न करोन । निराश आम्ही जाहलो ॥२१॥
जो कोणी समर्थांस । घेऊन येईल बडोद्यास । मोठी जहागिरी त्यास । देऊ आम्ही निश्चये ॥२२॥
ऐसे जाहीर करत । तात्यासाहेब उठत । मी आणतो समर्थांस । म्हणोनी विडा उचलला ॥२३॥
राजासी आनंद होत । द्रव्य देई बहुत । अक्कलकोटासी पाठवीत । लव्याजम्यासहित हो ॥२४॥
तात्यासाहेब अक्कलकोटासी येत । सेवकासी अन्न वस्त्र देत । चोळाप्पासी द्रव्य देत । सुंदराबाईसी तैसेची ॥२५॥
सेवका ऐसे वश करीत । सर्व सेवक स्वामींसी म्हणत । तात्यासाहेब खरा भक्त । जाऊ आपण बडोद्याला ॥२६॥
करावया स्वामीसी प्रसन्न । नित्य करी अन्नदान । गरिबांसी वस्त्रदान । स्वामी हस्ते करीत असे ॥२७॥
चार मास ऐसे चालत । परी स्वामी न काही बोलत । म्हणोनी चोळाप्पासी म्हणत । तात्यासाहेब अवधारा ॥२८॥
स्वामींसी घेऊनी सांगात । जर बडोद्यासी तुम्ही चलत । जहागिरी देईन तुम्हाप्रत । दहा हजार रुपयांची ॥२९॥
ऐकोनी ऐसी मात । चोळाप्पासी लोभ सुटत । येवोनिया स्वामीप्रत । हात जोडोनी विनवितो ॥३०॥
स्वामी तुम्ही बडोदा चलत । मज मोठी जहागिरी मिळत । ऐकोनी स्वामी म्हणत । नाही भक्ती तेथवरी ॥३१॥
भक्ती नसता भगवंत । कैसा जाईल तेथ । ऐकोनी निराश होत । तात्यासाहेब  तेथवरी ॥३२॥
तात्या आणि सर्व भक्त । बैसोनी विचार करीत । श्री स्वामींसी बडोद्यास । न्यावे कैसे उचलोनी ॥३३॥
सर्व मिळोनी ठरवीत । स्पेशल ट्रेन करावी म्हणत । स्वामींसी घालोनी मेण्यात । ट्रेनमध्ये ठेवावे ॥३४॥
ऐसे करिता अकस्मात । स्वामी काही करु न शकत । ट्रेन सरळ थांबत । बडोद्यासी जाऊनिया ॥३५॥
ऐसा विचार ठरवत । भाडयाने रेल्वे ठरवत । स्वामींनी बैसावे मेण्यात । म्हणोनी प्रार्थिती स्वामींना ॥३६॥
स्वामी चला राजवाड्यात । चला स्वामी खास बागेत । स्वामींनी बसावे मेण्यात । म्हणोनी पाहा ते विनविती ॥३७॥
परी स्वामी टाळत । न बैसती पालखीत । ऐसे चार दिवस जात । काय करावे कळेना ॥३८॥
एकदा बैसता पालखीत । नेऊ रेल्वे स्टेशनात । ऐसा विचार करीत । सेवक तेथे बैसले ॥३९॥
चोळाप्पा स्वामींसी विनवीत । बाळाप्पाही स्वामींसी म्हणत । सुंदराबाईही सांगत । बसा पालखीत म्हणोनिया ॥४०॥
ऐसे गेले चार दिवस । काय आले समर्थ मनास । जाऊनी बसले पालखीत । भक्त उचलती  पालखी ॥४१॥
पालखी उचलोनी त्वरित । पळत रेल्वे स्टेशन गाठत । स्टेशन जव जवळ येत । मेणा हलका लागतसे ॥४२॥
म्हणूनी भूमिवरी ठेवीत । पडदा उघडोनी पाहत । स्वामी अदृश्य होत  । पाहोनी विस्मय सर्वांना ॥४३॥
अदृश्य होऊनी समर्थ  । कोठे गेले न कळत । म्हणोनी सर्व दु:ख करीत । काय करावे कळेना ॥४४॥
एक पोस्टमन इतक्यात । जेऊर गावाहूनी येत । तो सांगे सेवकाप्रत । स्वामी तिकडे आहे ती ॥४५॥
येथोनी दोन मैलांवर । जेऊर गावच्या वाटॆवर । समर्थ एका शिळेवर । बैसलेले पाहिले मी ॥४६॥
ऐसे भक्ता सांगत । भक्त जाती धावत । पाहोनी स्वामींसी तेथ । क्षमा मागती सर्वही ॥४७॥
बैसवोनिया पालखीत । अक्कलकोटासी आणीत । तात्यासाहेब बडोद्यास । निराश होवोनी जातसे ॥४८॥
अनेक ऐसे प्रयत्न करीत । परी स्वामी बडोद्यास न जात । ऐसा स्वामी समर्थ । राजासही मानीना ॥४९॥
दरबारी यशवंतराव । त्यासी पाठवी मल्हारराव । बडोद्यासी चलावे । म्हणोनी प्रार्थी स्वामींना ॥५०॥
त्यासी पाहता क्रोधित । होती समर्थ अकस्मात । ‘बेड्या ठोका ’ म्हणत । समर्थ तेव्हा जोराने ॥५१॥
तिसरे दिवशी हूकूम येत । जाई बडोद्यासी परत । ‘ बेड्या हाती पडत । शिक्षा त्यासी होतसे ॥५२॥
ऐसा स्वामी समर्थ । सद्‍भक्ता हवे ते देत । मग्रुरा दंड करीत । ऐसा महिमा तयाचा ॥५३॥
वटवृक्ष नव्हे कल्पवृक्ष । आजही तेथे साक्ष देत । परब्रम्ह दत्त प्रत्यक्ष । अक्कलकोटात राहिला ॥५४॥
दत्तात्रेयाचे दर्शनार्थ । एक साधू तप करीत । द्त्त तयासी सांगत । अक्कलकोटात आहे मी ॥५५॥
ऐसा आदेश होता प्राप्त । साधू निघाला चालत । बहुत प्रवास करीत । अक्कलकोटी पोचला ॥५६॥
येता साधू दर्शनार्थ । स्वामी उभे राहत । तीन शिरे सहा हात । दर्शन देती तयाला ॥५७॥
पूर्णब्रह्म दत्तात्रेय । ऐसे स्वामींचे स्वरुप होय । साधू होई तन्मय । पाहोनी लीला स्वामींची ॥५८॥
जन्मांध सूरदास भक्त । होता व्दारकेत राहत । श्री स्वामी समर्थ । दर्शन देती तयालागी ॥५९॥
तयासी दिव्यदृष्टी देत । मीच कृष्ण म्हणोनी सांगत । सदेहाने सांप्रत । अक्कलकोटी आहे मी ॥६०॥
भुर्‍याबुवा व्दारकेत । द्त्त दर्शनार्थ तप करीत । स्वामी समर्थ दर्शन देत । एके दिनी तयालागी  ॥६१॥
मस्तकी वरदहस्त ठेवीत । बुवा होती समाधिस्थ । ऐसी लीला अद्‍भुत । करिती समर्थ श्री स्वामी ॥६२॥
भुर्‍याबुवा गुजराथेत । समर्थांचा प्रचार करीत । लोक येती दर्शनार्थ । दूरदुरोनी स्वामीच्या ॥६३॥
ऐसा स्वामी समर्थ । ज्या जे हवे ते ते देत । कल्पवृक्ष तेथे असत । अक्कलकोटा माझारी ॥६४॥
कुलकर्णी नामे दत्तभक्त । उदरव्यथेने असे पीडित । गाणगापुरी मास सात । सेवा करीत राहिला ॥६५॥
त्यासी होई दृष्टांत । जरी परब्रह्म भेटत । व्याधी जाईल निश्वित । परब्रह्माच्या दर्शनाने ॥६६॥
होऊनिया जागृत । म्हणे परब्रह्म कोठे राहत । जे योग्यांसीही न भेटत । मजला कैसे भेटावे ॥६७॥
पुन्हा दृष्टांत होत । अक्कलकोटा जावे म्हणत । तेथे परब्रह्म साक्षात । स्वामी रुपे राहतसे ॥६८॥
अक्कलकोटा येई भक्त । पाहे परब्रह्म साक्षात । तत्‍क्षणी होई व्याधी मुक्त । ऐसा महिमा स्वामींचा ॥६९॥
त्याच्या लीला अनंत । कथा त्यांच्या अनंत । महिमा त्यांचा अनंत । कोणी कैसा वर्णावा ॥७०॥
॥ अध्याय आठवा ॥
॥ओवी संख्या ७०॥
स्वामी एका हत्तीसमोर उभे आहेत व रागाने हत्तीकडे पहात आहेत व रागाने हात वारे करीत आहेत.


स्वामी समर्थ सप्तशती – अध्याय नववा

श्री गणेशाय नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ।
श्री स्वामी समर्थ । अक्कलकोटामाजी राहत । अनेक लीला करीत । भक्तोध्दारा कारणे ॥१॥
एकदा काही भक्त । स्वामींसी सोलापुरा नेत । लोक जमती अमित । स्वामी दर्शना कारणे ॥२॥
राजा धावूनी येत । सिंहासनी स्वामींसी बैसवीत । गुढया तोरणे उभारीत । स्वागत करण्या स्वामींचे ॥३॥
सिंहासनी स्वामी समर्थ । दर्शना लोटला जनसागर । हे पाहोनी एक नर । वैषम्याने बोलतसे ॥४॥
सोडोनिया सिध्देश्वर । हे का भजती गुरुवर ।ऐसे म्हणोनी दुरुत्तर । करु लागला तेधवा ॥५॥
ऐसी निंदा करीत । आला स्वामी होते तेथ । तेथील प्रकार अद्‍भुत । पाहोनी विस्मित होतसे ॥६॥
सिंहासनी शिवपार्वती । बैसली दिसे तयाप्रती  । होऊनी विस्मित चित्ती । साष्टांग नमन करीतसे ॥७॥
समर्थांसी करुनी नमन । म्हणे दिले आपणा दूषण । प्रायश्चित्त मजलागोन । द्यावे आपण म्हणतसे ॥८॥
स्वामी तयासी म्हणत । पश्चाताप श्रेष्ठ प्रायश्चित्त । तू आमुचा असती भक्त । आनंदाने राहे तू ॥९॥
सोलापुरातील भक्त । श्री स्वामींसी विनवीत । सिध्देश्वर मंदिरालगत । तलाव मोठा आहे हो ॥१०॥
परी त्या तलावात । पाणी एक थेंब नसत । कृपा करावी गुरुनाथ । ऐसे म्हणती स्वामींना ॥११॥
श्री स्वामी समर्थ । त्या तलावापासी जात । कृपाकटाक्षे पाहत । तलावासी तेथवरी ॥१२॥
ते रात्री अकस्मात । मुसळधार वर्षा होत । तलाव भरोनी वाहत । ऐसा महिमा स्वामींचा ॥१३॥
एक शिल्पकार भक्त । स्वामीसी नित्य नमस्कारीत । एके दिनी त्यासी पुसत । काय हवे तुजलागी ॥१४॥
तो म्हणे मल्हारी मार्तंड । असे माझे कुलदैवत । त्याचे दर्शन जरी होत । कृतार्थ आपण होत असे ॥१५॥
ऐसे ऐकोनी वचन । स्वामी म्हणती तयालागोन । होईल तुझी इच्छा पूर्ण । दर्शन होईल देवाचे ॥१६॥
ऐसे म्हणोनी स्वामी समर्थ । म्हाळसाकांत रुप धरीत । भक्तासी समाधी लागत । पाहोनी रुप शंकराचे ॥१७॥
मुकुंद नामे ब्राह्मण । येई समर्थांसी शरण । स्वामी म्हणती धरी मौन । उगाच राहे पडोनिया ॥१८॥
ऐसे तया सांगत । सोलापुरासी पाठवीत । तो मौनीबाबा सिध्द । म्हणोनी ख्याती पावतसे ॥१९॥
एकदा अक्कलकोटात । हत्ती झाला उन्मत । लोक पळो लागत । पाहोनी उग्र हत्तीते ॥२०॥
राजा आज्ञा देत । गोळ्या घाला त्वरित । परी स्वामी म्हणत । मारु नका गजराजासी ॥२१॥
हत्ती समोर स्वामी जात । शिव्या त्यासी घालीत । ‘माजलास का रे म्हणत ’ । ‘विसरलास का पूर्वजन्माते ’ ॥२२॥
ऐसे म्हणता समर्थ । हत्तीसी पूर्वजन्म आठ्वत । घळघळा अश्रू वाहत । नेत्रांतून त्या हत्तीच्या ॥२३॥
चरणावरी ठेवूनी शिर । हत्ती करी नमस्कार । पाहोनी अद्‍भुत प्रकार । विस्मित सारे जन होती ॥२४॥
ऐसा स्वामी समर्थ । सत्ता सर्वत्र चालवीत । तो प्रत्यक्ष दत्त । अक्कलकोटी राहिल ॥२५॥
रामानंद बीडकर । मारुती उपासना करीत । स्वप्नी मारुती सांगत । अक्कलकोट स्वामींते पाहावे ॥२६॥
अक्कलकोटी श्री दत्त । सदेहाने असती राहत । ऐसा होता दृष्टांत । अक्कलकोटासी येती ते ॥२७॥
करिता समर्थांचे दर्शन । शिव्या देती तयालागोन । देवतांची नावे घेऊन । शिव्या समर्थ देताती ॥२८॥
मग होऊनी शांत ।  काम तुझे झाले म्हणत । ऐसी कृपा होत । बीडकरांवरी श्री गुरुची ॥२९॥
पुन्हा जव दर्शना जात । ‘आमका पेड लगाया ’ म्हणत । हास्यविनोद करीत । अति प्रसन्न श्री स्वामी ॥३०॥
रामानंद बीडकर भक्त । एके दिनी दर्शना जात । पाहोनी स्वामी निद्रिस्थ । चरण चुरो लागले ॥३१॥
तव तेथे अकस्मात । एक सर्प बाहेर पडत । फुत्कार करी जोरात । भक्तावरी तेधवा ॥३२॥
त्याकडे करोनी दुर्लक्ष । बीडकर पाय चेपीत । स्वामी तेव्हा उठत । शिव्या देती तयांना ॥३३॥
शिव्या देवोनी बहुत । देती एक मुस्कटात । बीड्कर बेशुध्द पडत । तये वेळी तेधवा ॥३४॥
सदानंद स्वामी भक्त । स्वामींसी हुक्का देत । तो होता तेथ । सावरीतसे भक्ताला ॥३५॥
चार तास समाधिस्थ । रामानंद बीडकर राहत । ऐसी क्रृपा अद्‍भुत । श्री स्वामी समर्थांची ॥३६॥
रामानंदासी स्वामी समर्थ । नर्मदा प्रदक्षिणा करी म्हणत । न यावे प्रज्ञापुरात । ऐसे सांगती तयालागी ॥३७॥
नर्मदा प्रदक्षिणेसी जात । नदीकिनार्‍याने चालत । गुहा दिसे मार्गात । म्हणोनी आत जाती ते ॥३८॥
आत एक ऋषी असत । बैसले दिसती ध्यानस्थ । जय जय श्री गुरु समर्थ । म्हणोनी वंदन करिताती ॥३९॥
ऋषी म्हणती  भक्ताप्रत । अक्कलकोटी स्वामी समर्थ । त्यांचा तू अससी भक्त । म्हणोनी भेटलो तुजलागी ॥४०॥
ऐसे म्हणोनी कंद देत । न लागे जेणे भूक। आठ दिवसापर्यत ।ऐसा प्रभाव कंदाचा ॥४१॥
तया नर्मदा परिसरात । सिध्द ऋषी अनेक राहत । तयांची दर्शने होत । रामानंद बीडकरांना ॥४२॥
नर्मदा दर्शन देत । गुरुपुत्र म्हणूनी वाखाणीत । ऐसे अनुभव येत । रामानंद बीडकरांना ॥४३॥
ऐसा सद्‍गुरु समर्थ । सद्‍भक्तासी सिध्द करीत । अनेक उध्दरिले भक्त ।आत्मज्ञान देवोनिया ॥४४॥
श्रीपाद भट नामे ब्राह्मण ।असे दशग्रंथी आपण । अक्कलकोटासी येवोन । सेवा करीत राहिला ॥४५॥
त्यासी स्वामी म्हणत । तू जाई वाराणसीत । विश्वेश्वर दर्शनार्थ । जाऊन तेथवरी ॥४६॥
आज्ञेप्रमाणे ब्राह्मण  । जाई वाराणसीसी निघून । नित्य करी गंगास्नान । सेवी  विश्वनाथासी ॥४७॥
ऐसे करी नित्य । शिवावरी करी अभिषेक । एके दिनी अद्‍भुत । वर्तले पाहा काय ते ॥४८॥
श्री स्वामी समर्थ । विश्वनाथ मंदिरी प्रकटत । भक्त होई विस्मित । पाहूनी स्वामींसी तेथवरी ॥४९॥
म्हणे कधी आलात । अक्कलकोट केव्हा सोडलेत । आत्ताच आलो स्वामी म्हणत । तुज भेटाया कारणे ॥५०॥
पंडे पुजारी विस्मित । म्हणती हे कोणी सिध्द । अजानुबाहू अवतारी दिसत । भाग्य आमुचे म्हणताती ॥५१॥
असो भक्ता समवेत । श्री स्वामी वाराणसीत । राहो तेथे लागत । अपार महिमा होत असे ॥५२॥
महिमा होई अमित । दूरदुरोनी लोक येत । योगी सिध्द येत । दर्शना लागी स्वामींच्या ॥५३॥
हे राहती हिमालयात । ऐसे काही योगी म्हणत । हम्पी विरुपाक्ष स्थानात । ऐसे काही म्हणत ।पाहुनी रुप स्वामींचे ॥५५॥
साधू सिध्द योगी । नाना वार्तालाप करिती । हे महासिध्द यती । म्हणूनी सारे म्हणताती ॥५६॥
हे अजर अमर सिध्द । वायुवेगे सर्वत्र फिरत । कधी गिरनार पर्वतात । आबू माजी कधी दिसती ॥५७॥
कधी राहती हिमालयात । कधी सह्याद्री पर्वतात । हे अवतारी त्रैमूर्ती दत्त । सर्वत्र वास जयांचा ॥५८॥
हे साक्षात विश्वनाथ । प्रकटले आज वाराणसीत । आम्हा दर्शन देत । भाग्य आमुचे म्हणताती ॥५९॥
स्वामी तेज अद्‍भुत । म्हणोनी सर्व वाखाणीत । सिंहासनी बैसवीत। श्री स्वामींसी तेधवा ॥६०॥
ऐसे वेदचर्चा करो लागत । ज्ञान स्वामींसी पुसत । श्रीपाद भटासी सांगत । ज्ञान देई यांना तू ॥६१॥
ऐसे दिवस अनेक । स्वामी राहती वाराणसीत । काही लोक होते दुष्ट । त्यांसी महिमा साहेना ॥६२॥
मद्य मांसाची पात्रे भरुन । ठेविली स्वामींपुढे आणोन । तव अन्नपूर्णा प्रकट होवोन । म्हणे तेथील सर्वांना ॥६३॥
हे साक्षात परब्रह्म । करतील तुमचे कल्याण । परी यांसी छळता जाण । महापाप लागतसे ॥६४॥
ऐसे म्हणून स्पर्श करीत । मांसाची फळे होत । मद्याचे जल होत ।ऐसा प्रभाव स्वामींचा ॥६५॥
तया वाराणसीत । स्वामी महिमा होई अमित । श्रीपाद भटासी सांगत । अक्कलकोटासी ‘जा ’ म्हणती ॥६६॥
तू ‘जा’ अक्कलकोटात । मी जातो हिमालयात । ऐसे म्हणोनी गुप्त । होती पाहा तेथवरी ॥६७॥
श्रीपाद भट येई अक्कलकोटात । पाहे तेथे स्वामी समर्थ । सर्व भक्तांसी सांगत । वृत्तांत वाराणसीचा हो ॥६८॥
सर्व भक्त त्याते म्हणत । स्वामी येथेची असत । कुठेही गेले नसत । ऐसे म्हणती तयाला ॥६९॥
भक्त होई विस्मित । दोन रुपे स्वामी राहत । अगाध महिमा म्हणत । साष्टांग नमन करीतसे ॥७०॥
॥ अध्याय नववा ॥  ॥ ओवी संख्या ७०॥
स्वामी गुहेत बसलेले आहेत व दोन बाजूला दोन वाघ बसलेले आहेत आणि त्याच्या समोर काही भक्त बसले आहेत.


स्वामी समर्थ सप्तशती – अध्याय दहावा

श्री गणेशाय नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ।
श्री समर्थ सप्तशती ग्रंथ । समर्थ इच्छे निर्माण होत । त्याचा तोची करीत । अक्षरब्रह्म तो असे ॥१॥
मी येथे निमित्त । ही त्याची लीला असत । हा ग्रंथ नव्हे अमृत्र । भरोनिया वाढले ॥२॥
ही दत्ताची वाडमय मूर्ती । प्रकटली असे येथप्रताई । अजानुबाहू दत्तमूर्ती ।  राहे व्यापूनी ग्रंथाते ॥३॥
श्रवण पठणे परमार्थ । लाभे भक्तांसी निश्चित । साधका आत्मज्ञान प्राप्त । समर्थकृपे होत असे ॥४॥
समर्था या कलियुगात । तूची एक महासमर्थ । दिव्य अनुभव भक्तांप्रत । मिळावे तुझ्या करुणेने ॥५॥
ऊँ श्री स्वामी समर्थ । जे सप्तशती वाचीत । सारथी होऊनी तयाप्रत । निजात्म सुख तू दावावे ॥६॥
तू आदि अंतरहित । परब्रह्म तू साक्षात । अवधूत निरंजन दत्त । विविध रुपे राहसी तू ॥७॥
हे विश्व तव स्वरुप । तू ब्रह्माण्डाच्या अतीत । अजानुबाहू समर्थ । दत्तात्रेया गुरुवर्या ॥८॥
या ग्रंथाच्या अक्षराअक्षरांत । परब्रह्म श्री स्वामी समर्थ । व्यापोनी राहो प्रार्थित । श्री दत्त परब्रह्मासी ॥९॥
पठणे पुरवावे मनोरथ । प्रगती व्हावी अध्यात्मात । कुंडलिनी व्हावी जागृत । केवळ पठणे ग्रंथाच्या ॥१०॥
जो योगसाधना करीत । सोऽहम्‍ ध्याने आरधित । त्या सर्वा मार्ग प्राप्त । व्हावा ग्रंथ पठणाने ॥११॥
हा ग्रंथ नव्हे सद्‍गुरु । ऐसी व्हावी ख्याती थोरु । स्वामी समर्थ क्रृपासागरु । वरदान देती ग्रंथाते ॥१२॥
परब्रह्म प्रकाशमार्ग । तो हा सप्तशती ग्रंथ । पठणे मार्ग मिळत । सद्‍भक्तासी निश्चये ॥१३॥
परब्रह्म स्वामी समर्थ । ग्रंथासी वरदान देत । हा ग्रंथ नव्हे मी साक्षात । ऐसे माना भाविक हो ॥१४॥
केवळ लोकोध्दारार्थ । समर्थ ग्रंथ लिहवीत । परमार्थी प्रगती होत । ग्रंथ पठणे निश्चये ॥१५॥
नित्य करावे ग्रंथपठण । तैसेची करावे सोऽहम्‍ ध्यान । आणि मानस पूजन । नित्य करावे समर्थाचे॥१६॥
तयाचा प्रपंच परमार्थ । मी स्वये सिध्द करीत ।ऐसे ग्रंथ  महात्म । स्वये समर्थ सांगतसे ॥१७॥
ऐसे ऐकोनी वचन । द्त्त संतोष पावोन । म्हणे मज अपेक्षेहून । बहुत दिधले ईश्वरा ॥१८॥
असो स्वामी समर्थ । तया प्रज्ञापुरात । अनेक लीला करीत ।  चराचरी रहोनिया ॥१९॥
गिरनारहून येती सिध्द । हिमालयातून योगी येत । म्हणती स्वामी राहत । हिमालया माझारी ॥२०॥
कोणी म्हणती गिरनारी । समर्थ राहती तेथवरी । ऐसे लोक नाना परी बोलत राहती सर्वदा ॥२१॥
एकाच वेळी रुपे अनंत । घेऊनी स्वामी फिरत । भक्ता सर्वत्र भेटत । सर्वात्मक ते श्री स्वामी ॥२२॥
कधी काशीत प्रकटत । रामेश्वराही असत । अबू गिरनारीही राहत। एकाच वेळी श्री स्वामी ॥२३॥
सहस्ररुपे धरोन । करिती लोकांचे कल्याण । श्री स्वामी समर्थ भगवान । करुणासागर जगताचे ॥२४॥
कधी गुप्त कधी प्रकट। कधी आकाशवाणी बोलत । कधी मलंग पठाण वेषात । फिरे दत्त महास्वामी ॥२५॥
आजही सदेह रुपात । स्वामी राहती फिरत । या विश्वाचे ते विश्वनाथ । चिंता करिता विश्वाची ॥२६॥
ऐसा स्वामी समर्थ । चराचरी भरोनी राहत । परी काही स्थाने असत । सिध्दपीठ त्या देवाची ॥२७॥
नृसिंहवाडी गाणगापूर । तैसेची ते औदुंबर । अक्कलकोट अबू गिरनार । सिध्दपीठ असती ही ॥२८॥
ऐसी काही स्थाने असत । परी भक्त हृदयी राहत । निर्मल मने आठवीत । समर्थ जवळी राहतसे ॥२९॥
म्हणोनी सद्‍भक्तांनी । चिंता वाहावी गुरुचरणी । मानसपूजा करोनी । स्मरण करावे दत्ताचे ॥३०॥
ते राम ते कृष्ण । दत्त दिगंबर नारायण । ते साक्षात परब्रह्म । ऐसे स्व्ररुप समर्थांचे ॥३१॥
सर्व रुपे त्यांची असत । काली दुर्गाही तेची असत । मनी होऊनी निश्चित । भजावे स्वामी समर्थांना ॥३२॥
नित्य करावे पूजन । सोऽहम्‍ मंत्रे करावे ध्यान । हेची उत्तम साधन । मोक्षमार्गाते पावाया ॥३३॥
एक प्रहर ध्यान करीत । बारा वर्षांत होई सिध्द ।ऐसे स्वामी समर्थ । स्वये मजला सांगितले ॥३४॥
श्री स्वामी समर्थ । विश्वावरी कृपा करीत । मार्ग परमार्थ दावीत । लोकोध्दारा कारणे ॥३५॥
एक भक्त दर्शनार्थ । दुरोनी येई चालत । पाहोनिया स्वामीप्रत । अति विस्मित होतसे ॥३६॥
म्हणे हिमालयात । स्वामी मजला दर्शन देत । ऐसे म्हणोनी एकटक । पाहत राहे स्वामींना ॥३७॥
त्यासी समाधी लागत । तटस्थ होऊनी तो जात । वैकुंठ दर्शन होत  । समाधित तयालागी ॥३८॥
जागृत होऊनी भक्त । सर्व लोकांसी सांगत । अहो तया वैकुंठात । पाहिले मी स्वामींना ॥३९॥
दिव्य सिंहासन असत । रत्ने जडली असंख्यात । लक्ष्मी देवदेवता दिसत । वेष्ठोनिया स्वामींना ॥४०॥
दिव्य सिंहासन असत । रत्न जडली असंख्यात । लक्ष्मी पायाशी बैसत । ऐसा महिमा स्वामींचा ॥४१॥
गरुड आणि हनुमंत । गणपती आणि अनेक सिध्द । स्वामी चरणाते सेवीत ।ऐसा महिमा स्वामींचा ॥४२॥
अणिमादि अष्टसिध्दी । चवरी घेऊनी हाती । सेवा स्वामींची करिती । ऐसा महिमा स्वामींचा ॥४३॥
ब्रह्मज्ञान आत्मज्ञान । समाधी आणि योगज्ञान । कायाकल्पाचेही ज्ञान  । समर्थकृपे मिळतसे ॥४४॥
नाना विद्या नाना कला । समर्थ चरणी राहिल्या । म्हणोनी त्यांच्या सेवकाला । उणे पडेना काहीही ॥४५॥
कल्पवृक्ष कामधेनू चिंतामणी । लक्ष्मी भरे जेथे पाणी । सर्व देव हात जोडोनी । चरणी तिष्टती सर्वदा ॥४६॥
ऐसे ब्राह्मण सांगत । परमानंदे नमन करीत । ऐसा स्वामी समर्थ । अक्कलकोटी राहिला ॥४७॥
स्वामी लीला सहचर । भाग्य त्यांचे अपार । स्वनयने पाहिला परमेश्वर । सांगाती ते राहिले ॥४८॥
चोळाप्पा स्वामींचा महाभक्त । अनेक लीला त्यासी दावीत । त्याचेसाठीच येत । अक्कलकोटात श्री स्वामी ॥४९॥
राहती त्याचे घरात । त्याचे मुलांसवे निजत । ऐसा भक्त  भाग्यवंत । घरी ठेविले ईश्वर ॥५०॥
स्वामीसुत श्रेष्ठ भक्त ।स्वामींसी एकात्म पावत ।  स्वामी पताका नेत । दर्यापार विदेशासी ॥५१॥
सुंदराबाई सेवक  । स्वामींसी ठेवी मुठीत । ती निजा म्हणता स्वामी निजत । ऐसा धाक तियेचा ॥५२॥
बाळाप्पा प्रेमळ भक्त । राही सदैव जप करीत । श्री स्वामी समर्थ । मंत्र त्याने  निर्मिला ॥५३॥
सदानंद साधू असत । हुक्का देती समर्थाप्रत । चरण संवाहन करीत । सारी रात्र राहतसे ॥५४॥
कानफाटया नाथ । श्री स्वामींची सेवा करीत । चिंतोपंत टोळ असत । लीला सहचर स्वामींचे ॥५५॥
भुजंगा चपरासी असत । श्रीपाद भट पूजा करीत । अक्कलकोटचे राजे असत । लीला सहचर स्वामींचे ॥५६॥
गवे स्वामी आणिक । स्वामींचे सांगाती असत । अवधूतबुवा असत । सेवा करिती स्वामींची ॥५७॥
शेषाचार्य अग्रिहोत्री ।  स्वामींसी तपकीर देती । असे बहू सात्विक मूर्ती । लीला सहचर स्वामींची ॥५८॥
स्वामी बहू मानीत । हास्यविनोदही करीत । शेषाचार्य प्रिय असत । सदा स्वामी समर्थांसी॥५९॥
जव स्वामी कोपत । राजाही पुढे जावो न शकत। परी शेषाचार्य जात । चरण धरती स्वामींचे ॥६०॥
नरसप्पा सुतार । तोही एक लीला सहचर । त्याचे घरी वारंवार । जावोनी राहती श्री स्वामी ॥६१॥
कलौ श्रीपाद श्रीवल्लभ । तेची एक स्वामी समर्थ । कर्दळीवनातूनी निघत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥६३॥
कोणी पुसता म्हणत । मी असे श्री दत्त । नॄसिंहभान नाम असत । ऐसे सांगती तयालागी ॥६४॥
कधी म्हणती दत्तनगर । मूळपुरुष वडाचे झाड । आकाशात  पतितं तोयं । ऐसे म्हणती कधी कधी ॥६५॥
ऐसा स्वामी समर्थ । सदेह परब्रह्म दत्त । अक्कलकोटी राहत । भक्तोध्दारा कारणे ॥६६॥।
त्याच्या लीला अनंत । कथा त्याच्या अनंत । चमत्कार त्याचे अनंत । कोणी कैसे वर्णावे ॥६७॥
समर्थ सप्तशती ग्रंथ । दावी लीला संकेत । दत्तावधूत आपुले चित्त । समर्थ कोणी वाहतसे ॥६८॥
स्वस्ती समर्थ सप्तशती । श्री स्वामींची वाड्मय मूर्ती । अक्षररुपे त्रैमूर्ती । साकार येथे होत असे ॥६९॥
समर्थ सप्तशती ग्रंथ । येथे पाहा पूर्ण होत । भाविकांचे मनोरथ । पूर्ण  होती निश्चये ॥७०॥
॥ अध्याय दहावा ॥
॥ ओवी संख्या ७०॥
॥श्री स्वामी समर्थ सप्तशती ग्रंथ समाप्त ॥
॥ एकूण ओवी संख्या ७००॥

 


सप्तशती – संत रामदास समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *