संत रामदास – अभंग भाग १
संत रामदास अभंग – १
राम गावा राम ध्यावा । राम जीवींचा विसांवा ॥१॥
कल्याणाचें जें कल्याण । रघुरायाचें गुणगान ॥२॥
मंगळाचें जें मंगळ । राम कौसल्येचा बाळ ॥३॥
राम कैवल्याचा दानी । रामदासा अभिमानी ॥४॥
संत रामदास अभंग – २
छत्रसुखासनीं अयोध्येचा राजा । नांदतसे माझा मायबाप ॥१॥
माझा मायबाप त्रैलोकीं समर्थ । सर्व मनोरथ पूर्ण करी ॥२॥
पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा । नाथ अनाथांचा स्वामी माझा ॥३॥
स्वामी माझा राम योगियां विश्राम । सांपडलें वर्म थोर भाग्यें ॥४॥
थोर भाग्य ज्यांचें राम त्यांचे कुळीं । संकटीं सांभाळी भावबळें ॥५॥
भावबळें जेणें धरिला अंतरीं । तया क्षणभरी विसंबेना ॥६॥
विसंबेना कद आपुल्या दासासीं । रामीं रामदासीं कुळस्वामी ॥७॥
संत रामदास अभंग – ३
रत्नजडित सिंहासन । वरी शोभे रघुनंदन ॥१॥
वामांगीं ते सीताबाई । जगज्जननी माझे आई ॥२॥
पश्चाद्भगीं लक्षुमण । पुढें अंजनीनंदन ॥३॥
भरत शत्रुघन भाई । चौरे ढाळिती दोन्ही बाहीं ॥४॥
नळ नीळ जांबूवंत । अंगद सुग्रीव बिभीषण भक्त ॥५॥
देहबुद्धी नेणों कांहीं । दास अंकित रामापायीं ॥६॥
संत रामदास अभंग – ४
एक घाय दोन खंड । ऐसें बोलावें रोकड ॥१॥
जेणें उठती संशय । तें बोलणें कामा नये ॥२॥
बहविधा झालें ठावें । सत्य कोणीही जाणावें ॥३॥
रामी रामदास म्हणे । एक निश्चयें बोलणें ॥४॥
संत रामदास अभंग – ५
तोंवरी तोंवरी डगमगीना कदा । देहाची आपद झाली नाहीं ॥१॥
तोंवरी तोंवरी परमार्थ स्वयंभ । जंव पोटीं लोभ आला नाहीं ॥२॥
तोंवरी तोंवरी अत्यंत सद्भाव । विशेषें वैभव आलें नाहीं ॥३॥
तोंवरी तोंवरी सांगे निरभिमान । देहाशीं अभिमान झाला नाहीं ॥४॥
तोंवरी तोंवरी धीरत्वाची मात । प्रपंची आघात झाला नाहीं ॥५॥
रामदास म्हणे अवघेची गाबाळी । ऐसा विरळा बळी धैर्यवंत ॥६॥
संत रामदास अभंग – ६
प्रपंच त्यागियेला बुद्धि । जडली परमार्था उपाधी ॥१॥
मन होई सावचित्त । त्याग करणें उचित ॥२॥
संप्रदाय समुदाव । तेणें जडे अहंभाव ॥३॥
रामदास म्हणे नेम । भिक्षा मागणें उत्तम ॥४॥
संत रामदास अभंग – ७
प्रपंच केला तडातोडी । पडली परमार्थजीवडी ॥१॥
सावधान व्हावें जीवा । त्याग केलाची करावा ॥२॥
काम क्रोध राग द्वेष । अंगीं जडले विशेष ॥३॥
रामदासें बरें केलें । अवघें जाणुनी त्यागिलें ॥४॥
संत रामदास अभंग – ८
नको ओळखीचे जन । अंगीं वाजे अभिमान ॥१॥
आतां तेथें जावें मना । जेथें कोणी ओळखेना ॥२॥
लोक म्हणती कोण काय । पुसतांही सांगों नये ॥३॥
रामदास म्हणे पाही । जेथें कांहीं चिंता नाहीं ॥४॥
संत रामदास अभंग – ९
तुम्हां आम्हां मुळीं झाली नाहीं तुटी । तुटीवीण भेटी इच्छीतसां ॥१॥
इच्छीतसां योग नसतां वियोग । तुम्हां आम्हां योग सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ तुम्ही आम्ही एक स्थळीं । वायां मृगजळीं बुडों नका ॥३॥
बुडों नका आतां सावध असावें । रूप ओळखावें जवळीमच ॥४॥
जवळींच आहे नका धरूं दूरीं । बाह्य अभ्यंतरीं असोनियां ॥५॥
असोनि सन्निध वियोगाचा खेद । नसोनियां भेद लावूं नये ॥६॥
लावूं नये भेद मायिक संबंधीं । रामदास बोधीं भेटी झाली ॥७॥
संत रामदास अभंग – १०
अनंताचा अंत पाहावया गेलें । तेणें विसरलों आपणासी ॥१॥
आपणा आपण पाहतां दिसेना । रूप गवसेना दोहीकडे ॥२॥
दोहीकडी देव आपणचि आहे । संग हा न साहे माझा मज ॥३॥
माझा मज भार जाहला बहुत । देखतां देखत कळों आलें ॥४॥
कळों आलें भार देखतां विचार । पुढें सारासारविचारणा ॥५॥
विचारणा झाली रामीं रामदासीं । सर्वही संगासी मुक्त केलें ॥६॥
मुक्त केलें मोक्षा मुक्तीची उपेक्षा । तुटली अपेक्षा कोणी एक ॥७॥
संत रामदास अभंग – ११
शाहणे म्हणवितां ब्रह्मज्ञानेंवीण । संसाराचा शीण करोनीयां ॥१॥
करोनि संसार रात्रंदिवस धंदा । कैसे हो गोविंदा चुकलेती ॥२॥
चुकलेती वायां तुम्ही कां बंधुहो । अंतरीं संदेही जन्मवरी ॥३॥
जन्मवरी ओझें वाहिलें वाउगें । व्यर्थ कामरंगें रंगोनिया ॥४॥
रंगोनिया कामीं अंतरावें रामीं । दास म्हणे ऊमीं कामा नये ॥५॥
संत रामदास अभंग – १२
ज्ञान झालें भक्तजना । सांडूं नये उपासना ॥१॥
ऐका साराचेंहि सार । मुख्य सांगतों विचार ॥२॥
हेंचि सर्वांचे कल्यान । मानूं नये अप्रमाण ॥३॥
दास म्हणे अनुभवलें । भजन भगवंताचें भलें ॥४॥
संत रामदास अभंग – १३
प्रवृत्ति सासुरें निवृत्ति माहेर । तेथें निरंतर मन माझें ॥१॥
माझे मनीं सदा माहेर तुटेंना । सासुरें सुटेना काय करूं ॥२॥
काय करूं मज लागला लौकिक । तेणें हा विवेक दुरी जाय ॥३॥
दुरी जाय हित मजचि देखतां । प्रयत्न करूं जाताम होत नाहीं ॥४॥
होत नाहीं यत्न संतसंगाविण । रामदास खुण सांगतसे ॥५॥
संत रामदास अभंग – १४
ओळखतां ज्ञान ओळखी मोडली । भेटी हे जोडली आपणासी ॥१॥
आपणासी भेटी झाली बहुतां दिसां । तुटला वळस मीपणाचा ॥२॥
मीपणाचा भाव भावें केला वाव । दास म्हणे देव प्रगटला ॥३॥
संत रामदास अभंग – १५
दिसतें नासेल सर्वत्र जाणती । या बोला वित्पत्ति काय काज ॥१॥
कार्य कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ॥२॥
शाश्वतासी येणें जाणेंचि न घडे । साकार हें मोंडे दास म्हणे ॥३॥
संत रामदास अभंग – १६
मन हें विवेकें विशाल करावें । मग आठवावें परब्रह्म ॥१॥
परब्रह्म मनीं तरीच नीवळे । जरी बोधें गळे अहंकर ॥२॥
अहंकार गळे संतांचे संगतीं । मग आदि अंतीं समाधान ॥३॥
समाधान घडे स्वस्वरूपीं राहतां । विवेक पाहतां नि:संगाचा ॥४॥
नि:संगाचा संग दृढ तो धरावा । संसार तरावा दास म्हणे ॥५॥
संत रामदास अभंग – १७
आम्हीं सावधान गावें । तुम्हीं सावध ऐकावें ॥१॥
सकळ सृष्टीचा गोसावी । त्याची ओळख पुसावी ॥२॥
स्वयें बोलिला सर्वेशु । ज्ञानेंविण अवघे पशु ॥३॥
दास म्हणे नाहीं ज्ञान । तया नरकीं पतन ॥४॥
संत रामदास अभंग – १८
जेणें ज्ञान हें नेणवें । पशु तयासि म्हणावें ॥१॥
जेणें केलें चराचर । कोण विश्वासि आधार ॥२॥
ब्रह्मादिकांचा निर्मिता । कोण आहे त्यापरता ॥३॥
अनंत ब्रह्मांडांच्या माळा । विचित्र भगवंताची कळा ॥४॥
रामदासाचा विवेक । सर्वां घटीं देव एक ॥५॥
संत रामदास अभंग – १९
देह आरोग्य चालतें । भाग्य नाहीं न्यापरतें ॥१॥
लाहो घ्यावा हरिभक्तीचा । नाहीं भंवसा देहाचा ॥२॥
देह आहे क्षणभुंगर । तुम्ही जाणतां विचार ॥३॥
रामीं रामदास म्हणे । अकस्मात लागे जाणें ॥४॥
संत रामदास अभंग – २०
ज्याचेनि जितासी त्यासि चुकलासी । व्यर्थचि झालसि भूमिभार ॥१॥
भूमिभार जिणें तुझें गुरुविणें । वचनें प्रमाणें जाण बापा ॥२॥
जाणें तूं हे गति गुरुविण नाहीं । पडसी प्रवाहीं मायाजाळीं ॥३॥
मायाजाळीं वायां गुंतलसि मूढा । जन्मवरी वोढा तडातोडी ॥४॥
कांहीं तडातोडीं कांहीं तडातोडीं । कांहीं देव जोडीं । आयुष्याची घडी ऐसी वेची ॥५॥
ऐशी वेची बापा आपुली वयसा । दास म्हणे ऐशा काळी घाली ॥६॥
संत रामदास अभंग – २१
काय करितें हें मन । साक्ष आपुला आपण ॥१॥
काय वासना म्हणते । आपणास साक्ष येते ॥२॥
मन असे बरगळ । केल्या होतसे विव्हळ ॥३॥
सोडीना हें संसारिक । कांहीं पाहावा विवेक ॥४॥
दास म्हणे सावधान । पदरीं बांधलें मरण ॥५॥
संत रामदास अभंग – २२
करुनि अकर्ते होऊनियां गेले । तेणे पंथें चाले तोचि धन्य ॥१॥
तोचि धन्य जनीं पूर्ण साधनांनीं । जनीं आणि वनीं सारिखाचि ॥२॥
सारिखाचि जेथें जेथें पालटेना । नये अनुमाना कोणी एक ॥३॥
कोणीएक लोक देहासी पाहाती । अंतरींची गति कोण जाणे ॥४॥
कोण जाणे काय सांगतां मनींचे । जनासि जनासें कळतसे ॥५॥
कळत असे परि अंतर शोधावें । मनासि बोधावें दास म्हणे ॥६॥
संत रामदास अभंग – २३
तुम्ही आम्ही करूं देवाच निश्चय । जया नाहीं लय तोचि देव ॥१॥
देव हा अमर नित्य निरंतर । व्यापूनि अंतर देव आहे ॥२॥
ज्ञान देहीं वसे तया देव दिसे । अंतरीं प्रकाशे ज्ञानदृष्टीं ॥३॥
ज्ञान देहीं होतां पाविजे अनंता । हा शब्द तत्त्वतां दास म्हणे ॥४॥
संत रामदास अभंग – २४
बोलवेन तें बोलावें । चालवेना तेथें जावें ॥१॥
नवल स्वरूपाच्य योगें । जीवपणाचे वियोगें ॥२॥
वाट नाहीं तेथें जावें । जाणवेना तें जाणांवें ॥३॥
रामदासीं दृढबुद्धि । होतां सहज समाधी ॥४॥
संत रामदास अभंग – २५
गेलों वस्तूशीं भेटाया । तिकडे ब्रह्म इकडे माया ॥१॥
दोहींमध्यें सांपडलों । मीच ब्रह्म ऐसें बोलों ॥२॥
वस्तु निर्मळ निश्चळ । माया चंचळ चपळ ॥३॥
रामीं रामदास म्हणे । अवघें मनाचें करणें ॥४॥
संत रामदास अभंग – २६
॥ प्रश्न॥नमो वागेश्वरी शारदा सुंदरी । श्रोता प्रश्र करी वक्तवासी ॥१॥
वक्तयासी पुसे जीव हा कवण । शिवाचें लक्षण सांगा मज ॥२॥
सांगा मज आत्मा कैसा तो परमात्मा । बोलिजे अनात्मा कवण तो ॥३॥
कोणता प्रपंच कोणें केला संच । मागुता विसंच कोण करी ॥४॥
कोण ते अविद्या सांगावी ते विद्या । कैसें आहे आद्या स्वरूप तें ॥५॥
स्वरूपीं ती माया कैशी मूळमाय । इशीं चाळवाया कोण आहे ॥६॥
आहे कैसें शून्य कैसें तें चैतन्य । समाधान्य अन्य कवण तें ॥७॥
कवण जन्मला कवणा मृत्यु आला । बद्ध मुक्त झाला कवण तो ॥८॥
कवण जाणता कवणाची सत्ता । मोक्षही तत्त्वता कोण सांगा ॥९॥
सांगा आम्हां खूण सगुण निर्गुण । पंचवीस प्रश्र दास करी ॥१०॥
संत रामदास अभंग – २७
॥ उत्तर ॥ नमो देवमाता नमो त्या अनंता । सांगों प्रश्र आतं श्रोतयांचें ॥१॥
श्रोतयांचा प्रश्र जीव तो अज्ञान । जया सर्वज्ञान तोचि शिव ॥२॥
शिवापर आत्मा त्यापर-परमात्मा । बोलिजे अनात्मा । अनिर्वाच्य ॥३॥
वाचा हा प्रपंच मायिक जाणावा । घडी मोडी देवापासोनियां ॥४॥
विषय अविद्या त्याग तो सुविद्या । निर्विकल्प आद्या स्वस्वरूप ॥५॥
कल्पना हे माया सत्त्व मूळमाया । इशीं चाळवाया चैतन्य तें ॥६॥
नकार तें शून्य व्यापक चैतन्य । ईश्वर अनन्य समाधान ॥७॥
जीव हा जन्मला जिवा मृत्यु आला । बद्ध मुक्त झाला तोचि जीव ॥८॥
ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता । मोक्ष हा तत्त्वतं ईश्वरचि ॥९॥
ईश्वर निर्गुन चेतवी सगुण । हेचि ब्रह्मखूण दास म्हणे ॥१०॥
दास म्हणे सर्व मायचेचें करणें । रूप सर्व जाणे अनुभवी ॥११॥
संत रामदास अभंग – २८
॥ प्रश्न ॥ संतसंगें तुज काय प्राप्त झालें । सांग पां वहिलें मजपाशीं ॥१॥
मज पाशीं सांग कोण मंत्र तूज । काय आहे गूज अंतरींचें ॥२॥
अंतरींचें गुज काय समाधान । मंत्र जप ध्यान कैसें आहे ॥३॥
कैसें आवाहन कैसें आवाहन कैसें विसर्जन । कैसें पिंडज्ञान सांगे मज ॥४॥
सांग मज कोण तुझी उपासना मुद्रा ते आसना सांगें मज ॥५॥
सांग पंचीकरण चित्त-चतुष्टय । कैसें तें अद्वय जीव शिव ॥६॥
जीव शिव ऐक्य झाले कोणे रीतीं । सांग मजप्रती अष्टदेह ॥७॥
अष्टदेह पिंडब्रह्मांडरचना । तत्त्वविवंचना सांगें मज ॥८॥
सांग मज भक्ति कैशी ते विरक्ति । सायुज्यता मुक्ति कवण ते ॥९॥
कोण तें साधन कोण तें बंधन । ऐसे केले प्रश्र रामदासें ॥१०॥
संत रामदास अभंग – २९
॥ उत्तर ॥ संतसंगें मज काय प्राप्त झालें । सांगतों वहिलें तुजपाशीं ॥१॥
मंत्र हा तारक रामनाम एक । गूज हरादिक चिंतिताती ॥२॥
ज्ञान समाधान सगुणाचें ध्यान । निर्गुणीं अभिन्न आपणचि ॥३॥
दृश्य आवाहन दृश्य विसर्जन । तेथें पिंडज्ञान आढळेना ॥४॥
उपासना हरि मुद्रा अगोचरी । सिद्धासनावरी समाधान ॥५॥
पंचीकरण पिंडब्रह्मांड आव-रण । साक्षी तो आपण एकलाची ॥६॥
जीव शिव ऐक्य झालें येणें रीतीं । प्रकृतीच्य अंती द्वैत कैचें ॥७॥
अष्टदेह स्थूळ सूक्ष्म कारण । चौथा देह जाण महाकारण ॥८॥
विराट हिरण्य आणि अव्याकृति । आठवा प्रकृति मूळमाया ॥९॥
एक तत्त्व जाण त्याचें नांव भक्ति । जाणावी विरक्ति संगत्याग ॥१०॥
सायुज्यता मुक्ति तेंचि तें अचळ । साधनांचें मूळ गुरुदास्य ॥११॥
गुरुदास्यें चुके संसारयातना । जाणतील खुणा अनुभवी ॥१२॥
अनुभवेंवीण होय सर्व शीण । निरसले प्रश्र दास म्हणे ॥१३॥
संत रामदास अभंग – ३०
अहो सद्रुरूची कृपा । तेणें दाखवी स्वरूपा ॥१॥
तो हा गुरु परब्रह्म । जेणें केलें स्वयें ब्रह्म ॥२॥
धरा सद्नुरुचरण । जेणें चुके जन्ममरण ॥३॥
अहो सद्रुरु तोचि देव । दास म्हणे धरा पाव ॥४॥
संत रामदास अभंग – ३१
शिरीं आहे रामराज । औषधाचें कोण काज ॥१॥
जो जो प्रयत्न रामावीण । तो तो दु:खासी कारण ॥२॥
शंकराचें हळाहळ । जेणें केलें सुशीतळ ॥३॥
आम्हां तोचि तो रक्षित । रामदासीं नाहीं चिंता ॥४॥
संत रामदास अभंग – ३२
अंतरीं गुरुवचन । बाह्य नापिका वपन ॥१॥
अतर्बाह्य शुद्ध झालों । राम-दर्शनें निवालों ॥२॥
मन मुंडिल्या उन्मन झालें । शिर मुंडिल्या काय केलें ॥३॥
दासें तीर्थविधि केला । रामीं पिंड समर्पिला ॥४॥
संत रामदास अभंग – ३३
माझे मनीं सर्व सुख व्हावें तुज । म्हणोनियां गूज सांगतसें ॥१॥
सांग-तसें हित त्वां जीवीं धरावें । भजन करावें राघवाचें ॥२॥
राघवाचें प्रेम जें करी विश्राम । येर सर्व श्रम जाण बापा ॥३॥
जाण बा वचन हें माझें प्रमाण । वासहसें आण राघवाची ॥४॥
राघवाची भक्ति ते माझी विश्रांति । असों द्यावी चित्तीं दास म्हणे ॥५॥
संत रामदास अभंग – ३४
ज्याचें नाम घेशी तेंचि तूं आहेसी । पाहे आपणापासीं शोधोनियां ॥१॥
शोधितां शोधितां मीपणाची नाहीं । मीपणाचें पाहीं मूळ बरें ॥२॥
मूळ बरें पाह नसोनियां राहा । आम्हां तैसे आम्हां सर्वगत ॥३॥
सर्वगत आत्मा तोचि तो परमात्मा । दास अहमात्मा सांगतसे ॥४॥
संत रामदास अभंग – ३५
जो कां भगवंताचा दास । तेणें असावें उदास ॥१॥
काय देतिल तेंचि ध्यावें । कोणा कांही न मागावें ॥२॥
आशा कोणाची न करावी । बुद्धि भगवंतीं लावावी ॥३॥
सदा श्रवणमननें । आणि इंद्रियदमनें ॥४॥
नानापरी बोधूनि जीवां । आपुला परमार्थ साधावा ॥५॥
रामदासीं पूर्णकाम । बुद्धि दिली हे श्रीराम ॥६॥
संत रामदास अभंग – ३६
बोलवेना तें बोलावें । चालवेना तेथ जावें ॥१॥
नवल स्वरूपाच्या योंगें । जीवपणाचे वियोगें ॥२॥
वाट नाहीं तेथें जावें । जाणवेना तें जाणावें ॥३॥
नसोनियां भेटी घ्यावी । तुटी असोनि पाडावी ॥४॥
रामदासीं दृढबुद्धि । होतां सहज समाधि ॥५॥
॥ भजन ॥ रघुपि राघव राजाराम । पतीतपावन सीताराम ॥