प्रासंगिक कविता – संत रामदास

श्री रामदास्वामीं विरचित – प्रासंगिक कविता

प्रासंगि कविता – रामरूपी भूत

पद.
होतें वैकुंठींचे कोनीं । शिरलें अयोध्याभुवनीं । लागे कौसल्येचे स्तनीं । तेंचि भूत गे माय ॥१॥
जातां कौशिकाराउळीं । अवलोकितां भयंकाळीं । भयंकाळीं । ताटिका ते छळोनि मेली । तेंचि भूतo ॥२॥
मार्गीं जातां वनांतरीं । पाय पडला दगडावरी । पाषाणाची झालीं नारी । तेंचि भूतo॥३॥
जनकाचे अंगणीं गेलें । शिवाचें धनु भंगिलें । वैदेहीअंगीं संचरलें । तेंचि भूतo ॥४॥
जेणें सहस्रार्जुन वधिला । तो हा तत्काळचि भ्याला । धनु देऊनि देह रक्षिला । तेंचि भूतo ॥५॥
पितयाचे भाकेशीं । कैकेयीचे वचनासी । मानुनि गेलें अरण्यासी । भूतo ॥६॥
चौदा संवत्सर तापसी । अखंड हिंडे वनवासी । सांगातें भुजंग पोसी । भूतo ॥७॥
सुग्रीवाचें पालन । वाळीचें निर्दालन । तारी पाण्यावरी पाषाण । भूतo ॥८॥
रक्षी मरणीं बिभीषण । मारी रावन कुंभकर्ण । तोडी अमरांचें बंधन भूतo ॥९॥
वामींगीं स्रियेला धरिलें । धांवुनी शरयुतीरा आलें । तेथें भरतासी भेटलें । भूतo ॥१०॥
सर्वां भूतांचें हदय । नाम त्याचें रामराय । रामदास नित्य गाय । भूतo ॥११॥


प्रासंगिक कविता – आत्मचरित्र

अभंग.
नमो अधिष्ठाता विष्णु मुख्य साधू । तेथूनियां बोधू विधीलागीं ॥१॥
विधीपासूनियां ज्ञान विधिसुता । तेंचि ज्ञान प्राप्त वसिष्ठासी ॥२॥
वसिष्ठें उपदेश केला रामचंद्रा । तोचि महारुदा हनुमंता ॥३॥
हनुमंत कलीमाजीं चिरंजीव । झाले देव सर्व बौद्धरूप ॥४॥
बौद्ध नारायण होऊनी बैसला । उपाय बोलिला व्यासमुनी ॥५॥
व्यास मुनि बोले भविष्यपुराण । जग उद्धरणें कलीमाजीं ॥६॥
कलीमाजीं गोदातीरीं पुण्य क्षेत्र । तेथें वातपुत्र अवतरे ॥७॥
अवतरे अभिधानीं रामदास । कृष्णातीरीं वास जगदुद्धारा ॥८॥
जगदुद्धरासाठीं श्रीरामा सांकडें । केलें वाडेंकोडें भक्तिपंथें ॥९॥
भक्तिपंथें मोठा केला श्रीरामानें । जंबू अभिधान ग्राम तेथें ॥१०॥
तेथे ब्रह्मनिष्ठ अधिष्ठाता पूर्ण । सूर्य नामा जाण द्बिजवर्य ॥११॥
द्बिजवर्य सूर्य जैसा तपोधन । अद्‍भूत विदान झालें तेथें ॥१२॥
झाली रामनवमी मव्य अष्टमीसी । अर्धरात्रीं त्यासी दूत आले ॥१३॥
दूत आले पुढें घालोनी चालिले । महाद्बारा आले भीम जेथें ॥१४॥
भीमदेवालयीं नेऊनी तयांसी । तेथें उभयतांसी देखियेलें ॥१५॥
देखियेलें राजपुत्र सूर्यवंशी । झांपड नेत्रांसी पडे तेव्हां ॥१६॥
पडे तेव्हां जसा दंडवत भूमीं । मग अंतर्धामी बोलविलें ॥१७॥
बोलावूनि माथां ठेवी सव्य पाणी । मंत्र सांगे कर्णीं रामनाम ॥१८॥
नाम सांगुनियां ताम्रमूर्ति रम्य । पटाभिश्रीराम दिधला तया ॥१९॥
तया दिला वर तुज पुत्र होतील । ध्वज उभारतील रामदास्यें ॥२०॥
रामदास्य झालें धन्य वंशोद्धार । बोलेनि सत्वर गैब झाले ॥२१॥
झाला रामनवमीमहोत्सव थोर । मध्यान्हीं सत्वर जन्म झाला ॥२२॥
जन्म झाला झाला देव वंशा आले । उपासना चाले राघवाची ॥२३॥
राघवाची भक्ति सुखाची विश्रांति । पितयाची शांति झाली पुढें ॥२४॥
पुढें ज्येष्ठ बंधु न सांगेचि कांहीं । सुखें देवालयीं निद्रा केली ॥२५॥
निद्रा केली तेथें श्रीरामें उठवूनी । तोचि मंत्र कानीं सांगितला ॥२६॥
सांगितला बोध रामीं रामदास । गुरूच्याही वंशा निरोपिलें ॥२७॥


प्रासंगिक कविता – डफगाणें

भोंवतो डोंगराचा फेर । मध्यें देवाचें शिखर । पुढें मंडप सुंदर । नवखणांचा ॥१॥
चहुं खांबांची रचना । वरत्या चोवीस कमाना । कम कटाव नयना । समाधान ॥२॥
नाना तरु आंबे बनें । दोहींकडे वृंदावनेम । वृंदावनें जगज्जीवनें । वस्ती केली ॥३॥
पुढें उभा कपिवर । पूर्वेकडे लंबोदर । खालीं दाटले दरबार । ठायीं ठायीं ॥४॥
दमामे चौघडे वाजती । धडाके भांडयांचे होती । फौजा भक्तांच्या साजती । ठायीं ठायीं ॥५॥
माहीमरातबे निशाणें । मेघडंबेरें सूर्यपानें । पताका छत्र्या सुखासनें । दिंडया विंझणे कुंचे ॥६॥
काहळें कर्णे बुरुंग बांकें । नानाघ्वनीं गगन झाके । बहू वाद्यांचे धबके । परोपरी ॥७॥
टाळ मृदंग उपांग । ब्रह्मविणे चुटक्या चंग । तानमानें माजे रंग । हरिकथेसी ॥८॥
घंटा घंटा शंख भेरी । डफडीं पांये वाजंतरीं । भाट गर्जती नागरी । परोपरी ॥९॥
उदंड यात्रेकरू आले । रंगीं हरिदास मिळाले । श्रोते वक्ते कथा चाले । भगवंताची ॥१०॥
नाना पुष्पमाळा तुरे । पाहों जातां भडगे रंगपुरे । स्वर्गींचा उतरे । ठायीं ठायीं ॥११॥
गंध सुगंध केशरें । उदंड उधळिती धूसरें । जगदांतरें हरिहरें । वस्ती केली ॥१२॥
दिवटया हिलाल चंद्रज्योति । नळे अरडत ऊठती । बाण हवाया झरकती । गगनामध्यें ॥१३॥
उदंड मनुष्यांचे थाटे । दिसताती लखलखाटे । एकमेकांसी बोभाटें । बोलविती ॥१४॥
उदंड उजळिल्या दीपिका । नामघोष करताळिका । कित्येक म्हणती ऐका ऐका । ऐसे शब्द होती ॥१५॥
खिरापतीची वांटणी । तेथें जाहलीसे दाटणी । पैस नाहीं राजांगणीं । दाटी जाहली ॥१६॥
रंगमाळा निरांजनें । तेथें वस्ती केली मनें । दिवस उबावला सुमनें । कोमाइली ॥१७॥
रथ देवाचा ओढिला । यात्रेकरां निरोप झाला । पुढें जावयाचा गलबला । ठायीं ठायीं ॥१८॥
भक्तजन म्हणती देवा । आतां लोभ असूं द्यावा । धन्य सुकृताचा टेवा । भक्ति तुझी ॥१९॥
दास डोगरीं राहतो । यात्रा देवाची पाहतो । देव भक्तासवें जातो । व्यानरूपेम ॥२०॥


प्रासंगिक कविता – शिवाजी महाराजांस पत्र.

ओव्या
निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधरु । अखंड स्थितींचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥१॥
परोपकाराचिया राशी । उदंड घडती जयासी । तयाचे गुणमहत्वासी । तुळणा कैंची ॥२॥
नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि छत्रपति । शक्ति पृष्ठभागीं ॥३॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥४॥
आचारशील विचारशील । दानशील धर्मशील । सर्वज्ञपणें सुशील । सकळां ठायीं ॥५॥
धीर उदार गंभीर । शूर क्तियेसी तत्पर । सावधपणें नृपवर । तुच्छ केले ॥६॥
तीर्थक्षेत्रें मोडिलीं । ब्राह्मणस्थानें भ्रष्ट झालीं । सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥७॥
देव धर्म गोब्राह्मण । करावया संरक्षण । हदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥८॥
उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक । धूर्व तार्किक सभानायक । तुमच्या ठायीं ॥९॥
या भूमंडळाचें ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाहीं । महाराष्ट्रधर्म राहिला कांहीं । तुम्हां करिताम ॥१०॥
आणिकही धर्मकृत्यें चालती । आश्रित होऊनि कित्येक राहती । धन्य धन्य तुमची कीर्ति । विश्वीम विस्तारली ॥११॥
कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांस धाक सुटले । कित्येकांस आश्रय झाले । शिव कल्याणराजा ॥१२॥
तुमचे देशीं वास्तव्य केलें । परंतु वर्तमान नाहीं घेतलें । ऋणानुबंधें विस्मरण झालें । काय नेणूं ॥१३॥
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति । सांगणें काय तुम्हांप्रति । धर्मस्थापनेची कीर्ति । सांभाळली पाहिजे ॥१४॥
उदंड राजकारण तटलें । तेणें चिंत्त विभागिलें । प्रसंग नसतां लिहले । क्षमा केली पाहिजे ॥१५॥


प्रासंगिक कविता – राजधर्म

नमो मंगळमूर्ति विघ्रहरू । सरस्वतीस नमस्कारू । सद्नुरु संत कुलेश्वरू । दाशरथी ॥१॥
श्रोतीं मानेल तरी घ्यावें । अथवा दाटूनि सांडावें । प्रपंचाकारणें स्वभावें । बोलिलों मी ॥२॥
सावधपणें प्रपंच केला । तेणें सुखचि पावला । दीर्घ प्रयत्ने मांडला । कार्यभाग साधे ॥३॥
आधी मनुष्य ओळखावे । योग्य पाहूनि काम सांगावें । निकामी तरी ठेवावे । एकीकडे ॥४॥
पाहोन समजोन कार्य करणें । तेणें कदापि नये उणें । कार्यकर्त्याच्या गुणें । कार्यभाग होतो ॥५॥
कार्यकर्ता प्रयत्नीं जाड । कांहीएक असला हेकाड । तरी समर्थपणें पाठवाढ । केली पाहिजे ॥६॥
अभर्याद फितवेखोर । यांचा करावा संहार । शोधिला पाहिजे विचार । यथातथ्य ॥७॥
मनुष्य राजी राखणें । हींचि भाग्याचीं लक्षणें । कठीणपणें दुरी धरणें कांहीं एक ॥८॥
समयीं मनुष्य कामा येतें । तयाकारणे सोशिजे तें । न्याय सांडितां मग तें । सहजचि खोटें ॥९॥
न्यायसीमा उल्लंघूं नये । उल्लंघितां होतो अपाय । न्याय नसतां उपाय । होईल कैंचा ॥१०॥
उपाधीस जो कंटाळला । तो भाग्यापासूनि चेवला । समयीं धीर सांडिला । तोही खोटा ॥११॥
संकटीं कंटाळों नये । करावे अत्यंत उपाय । तरी मग पाहतां काय । उणें आहे ॥१२॥
बंध बांधावे नेटके । जेणें करितां चतुर तुके । ताब न होतां फिके । कारभार होती ॥१३॥
धुरेनें युद्धासी जाणें । अशीं नव्हेत कीं राजकारणें । धुराच करोनि सोडणें । कित्येक लोक ॥१४॥
उदंड मुंडे असावी । सर्वही एक न करावीं । वेगळालीं कामेम घ्यावीं । सावधपणें ॥१५॥
मोहरापेटला अभिमाना । मग तो जिवास पाहेना । मोहरे मिळवनि नाना । वरी चपेते करी ॥१६॥
देखोनि व्याघ्राचा चपेटा । मेंढरें पळती बारा वाटा । मस्त जो तो रेडा मोठा । काय करावा ॥१७॥
रायांनीं करावें राजधर्म । क्षत्रीं करावे क्षात्रधर्म । ब्राह्मणीं करावे स्वधर्म । नाना प्रकारें ॥१८॥
तुरंगशस्त्र आणि स्वार । पहिला पाहावा विचार । निवटूं जातां थोर थोर । शत्रु पळती ॥१९॥
ऐसा प्रपंचाचा विवेक । स्वल्प बोलिहों कांहीं एक । एका मनोगते स्वामी सेवक असता बरें ॥२०॥


प्रासंगिक कविता – क्षात्रधर्म

अल्पस्वल्प संसारधर्म । मागां बोलिलों राजधर्म । आतां ऐका क्षात्रधर्म । परम दुर्लभ जो ॥१॥
जयास जिवाचें वाटे भय । त्यानें क्षात्रधर्म करूं नये । कांहीं तरी करूनि उपाय । पोट भरावें ॥२॥
विन्मुखमरणीं नर्क होती । वांचून येतां मोठी फजिती । इहलोक परलोक जाती । पाहाना कां ॥३॥
मारितां मारितां मरावें । तेणें गतीस पावावें । फिरोन येतां भोगावें महद्भाग्य ॥४॥
नजरकरार राखणें । कार्य पाहुनी खतल करणें । तेणें रणशूरांचीं अंत:करणें । चकित होती ॥५॥
जैसा भांडयांचा गलोला। निर्भय भारामध्यें पहिला । तैसा क्षत्री रिचवला । परसैन्यामध्यें ॥६॥
नि:शंकपणें भार फुटती । परवीरांचे तबके तुटती । जैसा बळिया घालूनि घेती । भैरी उठतां ॥७
ऐसे अवघेच उठतां । परदळाची कोण चिंता । हरणें लोळवी चित्ता। देखत जसा ॥८॥
मर्दै तकवा सोडूं नये । म्हणजे प्राप्त होतो जय । कार्यप्रसंग समय ओळखावा ॥९॥
कार्य समजेना अंतरें । ते काय झुंजेल बिचारें । युद्ध करावे खबरदारें । लोक राजी राखतां ॥१०॥
दोन्हीं दळें एकवटें । मिसळताती लखलखाटें । युद्ध करावें खबरदारें । सीमा सांडूनी ॥११॥
देवमात्र उच्छेदिला । जित्यापरीस मृत्यु भला । आपुला स्वधर्म बुडविला । ऐसें समजावें ॥१२॥
मराठा तितका मेळवावा । आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा । येविषयीं न करितां तकवा । पूर्वज हांसती ॥१३॥
मरणहांक तों चुकेना । देह वांचविताम वांचेना । विवेका होऊनि समजाना । काय करावें ॥१४॥
भले कुळवंत म्हणावें । तेंहीं वेगीं हजीर व्हावें । हजीर न होतां कष्टावें लागेल पुढें ॥१५॥
एक जाती दोन जाती पावला । तो कैसा म्हणावा भला । तुम्हां सकळांस कोप आला । तरी क्षमा केला पाहिजे ॥१६॥
देवद्रोही तितुके कुत्ते । मारूनि घालावे परते । देवदास पावती फत्ते । यदर्थीं संशय नाहीं ॥१७॥
देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावा । मुलूखबडबा कां बडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ॥१८॥
विवेक विचार सावधपणें । दीर्घ प्रयत्न केलचि करणें । तुळजावराचेनि गुणें । रामें रावण मारिला ॥१९॥
अहो हे तुळजा भवानी । प्रसिद्ध रामवरदायिनी । रामदास ध्यातो मनीं । यन्निमित्त ॥२०॥


सेवकधर्म – समास १

ऐका प्रपंचविचार । आपली करनी उतरे पार । येथें नाहीं उत्तर । श्रेष्ठाकडे ॥१॥
पूर्वी दरिद्रें पीडिले । ते समर्थ अंगीकारिले । शिकवूनि शिकवूनि शहाणे केले । नाना प्रकारें ॥२॥
पहिला होता नाचार । श्रेष्ठीं वाढवोनि केला थोर । या वचनीं अनादर । होतां बरवें नव्हे ॥३॥
जो आपुलें हित न करी । तो आपुला आपण वैरी । येथें कांहीं कोणावरी । शब्द नाही ॥४॥
श्रेष्ठांचे मनोगत राखेना । बळेंच करी बल्गना । युक्ति प्रयुक्ति नाना । प्रकारें करी ॥५॥
श्रेष्ठांचे केलें मोडावें । आपुलेंचि पुढें प्रतिष्ठावें । तरी मग लागे भ्रष्टावें । वैभवापासूनि ॥६॥
पुढें पुढें काम करी । मागें कांहींच न करी । कार्यातें नसतां उरी । कांहींच पुढें ॥७॥
उगाच गर्वै मेला । मागील दिवस विसरला । स्वार्थचि करूं लागला । म्हणजे गेलें ॥८॥
वडिलंसि बुद्धि शिकवी । युक्तिबळें जाणीव दावी । तया मूर्खासि पदवी । प्राप्त कैंची ॥९॥
जो सदांचा चोरटा । जो सदांचा कळकटा । कठीण शब्दें बारा वाटा । मनुष्यें केलीं ॥१०॥
आपला इतबार राखावा । मग तो सर्व धणी जाणावा । उदंड वैभवाचा हेवा । करूं नये ॥११॥
कार्य करितां कांहीं न मागे । तयाची चिंता प्रभूस लागे । ऐसें जाणूनि विवेक जागे । म्हणिजे बरें ॥१२॥
आपणास जपू लागला । श्रेष्ठांचे मनींचा उतरला । येणें कोण स्वार्थ जाला । विचारावा ॥१३॥
स्वामींनीं जें जें बोलावें । तेंचि सेवकी प्रतिष्ठावें । वेळ चुकवूनि बोलावें । विनीत होऊनि ॥१४॥
श्रेष्ठापुढें शहाणपण । हेंचि केवळ मूर्खपण । मूर्खपणें नागवण । आली घरा ॥१५॥
कळेल तरी सांगूं नये । वडि-लांची बुद्धि शिकवूं नये । नेणपणेचि उपाय । विवेकीं करावा ॥१६॥
पुढें पुढें निघूं नये । आज्ञेवेगळें वर्तूं नये । न मानितां अपाय । नेमस्त आहे ॥१७॥
आधीं वडिलांसी पुसावें । किंवा आपणचि करावें । समय पाहू नि वर्तावें । विवेकी पुरुषें ॥१८॥
आधीं निश्चय करितो । मग उगोचिं पुसतो । इतका विचार करी तो । शहाणा कैंचा ॥१९॥
मी करितों ऐसें पुसणें । तें पुसणें न पुसणें । करूं न करूं हे विचारणें । हे उत्तमोत्तम ॥२०॥
मी शहाणा ऐसें कळलें । तरी स्वतंत्र पाहिजे केलें । स्वतंत्र होतां मिरवले । न शहाणपण ॥२१॥
हें मनींचे मनीं समजावें । प्रकट कासया करावें । घेऊं ये तरी ध्यावें । चातुर्यासी ॥२२॥
न्याय मानील तो न्यायी । न्याय न मानील तो अन्यायी । दगलबाज चिडाई । सुटेल कैसी ॥२३॥
ज्याचे अंतरीं स्वार्थबुद्धि । तेथें कैंची असेल शुद्धि । शुद्धि सांडितां अवधि । दु:खासी होय ॥२४॥
ज्याकरितां प्राणी वाढले । त्यासीच आडवूम लागले । ते कैसे म्हणावे भले । नीतिवंत ॥२५॥
सेवकीं सेवाचि करावी । स्वामी आसूदकीं द्यावी । तरीच पाविजे पदवी । कांहींएक ॥२६॥
समर्थांचें मनोगत । तसैसेंचि वर्तणें उचित । तेथें चुकतां आघात । नेमस्त आहे ॥२७॥
सेवक तोचि अडेना । शब्द भूईस पडेना । काम चुकलें हें घडेना । कदाकाळीं ॥३८॥
उंच अश्व वेळेस अडे । तरी पादच्छेद करणें घडे । ऐसें कळोनियां वेडे । अडोचि लागे ॥२९॥
मनोगत राखतां श्रेष्ठ वोळे । मनोगत चुकतां खवळे । ऐसें जयासी न कळे । तो जाणता कैसा ॥३०॥
स्वामीस जें अवश्य व्हावें । तैसें सेवकें न व्हावें । होऊनि आडवावें । कोण्या विचारें ॥३१॥
आपस्वार्थ उदंड करणें । आणि स्वामिकार्य बुडविणें । ऐसीं नव्हेत की लक्षणें । सेवकाचीं ॥३२॥
सेवकपणाचें मुख्य वर्म । कांहीं नसावें कृत्रिम । कृत्रिम केलिया संभ्रम । कैंचा पुढें ॥३३॥
धनिकाजी जितुका सावधान । सर्वकाळ परिछिन्न । त्यासी चोरितां निदान । बरें नव्हे ॥३४॥
थोडी बहुत लालूच करणें । आणि महत्कृत्य बुडविणें । महत्त्व जातां लजिरवाणें । जनामध्यें ॥३५॥
ऐसे बहुत ऐकिलें । कांहीं दृष्टीस देखिलें । देखत ऐकत चुकलें । तें मनुष्य कैसें ॥३६॥
कार्य करिताम उदंड देतो । चुकतां तो महत्त्व घेतो । ऐसें कळोनि वर्ते तो । प्राणी कैसा ॥३७॥
सेवक विश्वास दाविती । वैरियाकडे मिळोनि जाती । या चांडाळांसी गति । कोठेंचि नाहीं ॥३८॥
सकळ लोक स्वामियाचे । मागें पुढें अवज्ञेचे । सेवक उगेचि मूर्ख नाचे । शब्द बोले ॥३९॥
धूर्तपणें अंतरसाक्षी । नानाप्रकारें परीक्षी । दूरी गेला परी लक्षी । सर्व कांहीं ॥४०॥
म्हणोनि ऐसें न करावें । करणें तें नेमस्त करावें । नानाकारणें धरावें । अंतर प्रभूचें ॥४१॥

इति श्रीसेवकधर्मनिरू-पणं नाम प्रथम समास समाप्त ॥१॥


सेवकधर्म – समास २

सुचित करूनि अंत:करण । आतां करावें राज्यकारण । प्रमाण आणि अप्रमाण । समजलें पाहिजे ॥१॥
अकल म्हणजे कल नाहीं । अन्यायाचा साभिमान नाहीं । न्याय नीति समर्थ पाही । आप्त आणि परावे ॥२॥
किती चुकती चाचू घेती । पदरीं घालितां न घेती । अभ्यास करूनि म्हणती । अभ्यास नाहीं ॥३॥
उदड हासती दुसर्‍यासी । तेचि गुण आपल्यापाशी । अखंड वर्णिती आपल्यासी । समर्थादेखतां ॥४॥
मागील दिवस विसरती । उगेच तालदारी आणिती । अखंड चुकती लालुती लालुवी करिती । परम अन्यायी ॥५॥
आपणा-वेगळें कार्य न व्हावें । अवघें आपणचि असावें । आपल केलें न मोडावें । ऐशी वासना ॥६॥
व्याप आटोप करावा । समर्थ वेळेस आडवावा । आपुला हेका वाढवावा । अत्यादरें ॥७॥
स्वयें आपणासी कळेना । समर्थे सांगितलें ऐकोना । सत्य असलें तरी सातेना । अभिमानें ॥८॥
वैरीयाकडे सख्य लावी । समर्थांचे काम बुडवी । व्यर्थ लालूच उठाठेवी । उदंड करी ॥९॥
इष्ट मित्र शरीरसंबंधी । व्यापकपणें सूत्रें साधी । वैरी वरी हिताळू कुबुद्धि । अंतरी वसे ॥१०॥
आज्ञेप्रमाणें असतां । बहुत दु:ख वाटे चिंत्ता । आपले इच्छेनें वर्ततां । बरें वाटे ॥११॥
आपले अवगुण लपवी । श्रेष्ठांपुढें जाणीव दावी । धीटपणेंचि दटावी । कोणी एकासी ॥१२॥
जें समर्थासी पाहिजे । तें आपणासि न पाहिजे । आपणासी मानले तें कीजे । कांहीं एक ॥१३॥
काम सांगतांचि अडे । मीस करूनि वेळेची दडे । कुकमीं आदरें पवाडे । नाना यत्नें ॥१४॥
समर्था अडानी ताल केला । गर्वे लेखीना कोणाला । काम नासूनि उडाला । एकीकडे ॥१५॥
जें पाहिजे समर्थासी । त्यासी करण वरकनी । त्याची गोष्टी हरी कमी । हळु पाडी ॥१६॥
आपुले ठायीं वोठाणी आणिती । श्रेष्ठांसि मागें तुच्छ करिती । कठीण वेळेसि मिळोनि जाती । सूत्रकडे ॥१७॥
समर्थासी बळेंचि करणें । मर्यादा सांडूनि चालणें । मनाऐसें न होतां करणें । अप्रमाद ॥१८॥
मज वेगळें काम न चाले । ऐसें मागें पुढें बोले । कित्येक लोकचि फोडिले । ते आपणाकडे ॥१९॥
समर्थासि कांहीं कळेना । मी सामगतों ऐकेना । शहाणपण दाखवी जना । नाना प्रकार ॥२०॥
श्रेष्ठ समजोनि न पाहे । मजवेगळें कोण आहे । निकामी मिळवूनी काय हे । गळंगळा अवघा ॥२१॥
अवघें ढाळ भाग्यें चालतें । येरवीं मुख्यास काय कळतें । आम्हां लोकांकरितां बळ तें । सकळ कांही ॥२२॥
आम्हांप्रमाणें काय जाणे । प्रभु होय परी काहीं नेणे । आम्हांवेगळें कोण शहाणे । आहे एथें ॥२३॥
पोटासाठीं सेवा करणें । उगेचि फुगती रिकामें । थोरपण दिधलें कोणें । सेवकांसी ॥२४॥
ऐसे प्रकारींचे लोक । त्यांस कैसा असेल विवेक । मूर्खपणें अविवेक । रक्षिती बळें ॥२५॥
समर्थासि सांडून सेवकजन । सेवकाकडे लविती मन । ते जाणावे परमहीन । नीच काटीचे ॥२६॥
ऐसें नेणतां चुक पडती । जाणते अवघेचि जाणती । निकामी आणि गर्व करिती । मूर्खपणें ॥२७॥
सेवकजनावरी विश्वासिला । तो सेवकीं जेर केला । समर्थ पराधीन झाला । हेंही अपूर्व ॥२८॥
कामाकारणें ठेविले । काम पाहूनी वाढविले । तेही उगेव गर्वें फुगले । कोण्या हिशोबें ॥२९॥
याकारणें बदलीत जाणें । सेवक आज्ञेच्या गुणें । तरीच समर्थपण जाणे । समर्थांसी ॥३०॥
काम नासलें तरी नासावें । परी सेवकाधीन न व्हावें । दास म्हणे स्वभावें । बोलिलों न्याय ॥३१॥
न्याय अन्यायासी मानेना । विवेक अविवेक्या कळेना । पुण्यमार्ग आवडेना । पापी जनासी ॥३२॥
सेवक बहुतांसी असती । परी पाहों नये हे प्रचीति । तया पि हे क्षमा श्रोतीं । केली पाहिजे ॥३३॥

इति श्रीसेवकधर्मनिरूपण नाम द्बितीय समास समाप्त ॥२॥


प्रासंगिक कविता – विठ्ठलरूप राम

एथें उभा कां श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा  ॥१॥
काय केलें धनुष्यबाण । कर कटावरि ठेवून ॥२॥
काय केली सीताबाई । एथें राही रखुमाबाई ॥३॥
काय केलें वानर-दळ । एथें मेळविले गोपाळ ॥४॥
काय केली अयोध्यापुरी । एथें वसविली पंढरी ॥५॥
काय केली शरयू गंगा । एथें आणिली चंद्रभागा ॥६॥
रामदासीं जैसा भाव । तैसा झाला पंढरीराव ॥७॥


प्रासंगिक कविता – मातुश्रीस पत्र

सकल गुणांचा निधि । निर्गुणाची कार्यसिद्धि । विवेकाची दृढबुद्धि । तुझोनि गुणें ॥१॥
तूं भवसिंधूचें तारूं । तूं भक्तांचा आधारू । तूं अनाथाचे अवसरू । वैष्णवी माया ॥२॥
तूं भावार्थाची जननी । तूं विरक्तांस जीवनी । तूं परमार्थाची खाणी । भजनशीळ ॥३॥
तूं सर्व सुखांची मूस । तूं आनंदरत्नांची मांदूस । तुझेनि चुकती सायास । संसारींचे ॥४॥
तूं परमार्थाविषयीं आग्रगण । सद्रुरु दासांचें मंडण । समाधानाची खूण । अंतरीं वसे ॥५॥
सत्संगासी सादर । भक्तिमार्गासी तत्पर । धूर्त कुशळ अति सादर । परोपकारी ॥६॥
श्रीगुरुभजनीं तत्पर । स्वामिकृपा निरंतर । म्हणोनि शुद्ध क्तियेचा उद्धार तुमचे ठायीं ॥७॥
आत्मचर्चेसी मुगुटमणी । अत्यंत सादरता निरूपणीं । बोलणें अमृत वाणी । मृदु चचनीं ॥८॥
विवेकनिधि केवळ । अंतर शुद्ध निर्मळ । ज्ञानदीप प्रबळ । तुमचे ठायीं ॥९॥
क्रियाशुद्धि निर्मळ मन । निरभिमानी परम सज्जन । निरंतर अनुसंधान । अंतरीं वसे ॥१०॥
भावार्थाचें आगरू । प्रबळ शांतीचा सागरू । पाहतां उपमे मेरू । तोही उणा ॥११॥.


प्रासंगिक कविता – श्रेष्ठ यांस पत्र

सकल तीर्थांचें माहेर । सकळ गुणांचें भांडार । सकळ विद्यांचा सागर । स्वरूप तुमचें ॥१॥
तूं धीरपणें मेरू । तूं उदारपणें जळधरू । तूं गंभीरपणें सागरू । पीयूषाचा ॥२॥
तूं पवित्रपणें वैश्वानरू । तूं समर्थपणें ईश्वरू । तूं प्रतापाचा दिनकरू । धगधगायमान ॥३॥
तूं सकळ तीर्थांचें यथ । तूं उंच आकाश । तूं मायेचा मूळपुरूष । सकळकर्ता ॥४॥
तूं विष्णूचें मूलस्थान । तूं योगियांचें घ्यान । तूं वेदशास्रांचें मथन । सार वेदान्ताचें ॥५॥
तूं सकळ सत्तेचा साक्षी । अनंत माया तुझे कुक्षीं । तुमचें निजरूप लक्षी । ऐसा कवणू ॥६॥
झंझा -वायूसि आकळावें । गगन ओलांडूनि जावें । महातेजासि आच्छादावें । कवणे परी ॥७॥
सप्तपाताळां तळवटीं । एकवीस स्वर्गांचें शेवटीं । पवाड करीन ऐशीं पोटीं । हांव कैंची ॥८॥
वसुंधराही एकसरी । घालेनियां मस्तकावरी । अंतरिक्षगमन करी । ऐसा कवणू असे ॥९॥
आवरणोदकांचा अंत । कैसा घ्यावा तो अद्भुत । तुमचे स्वरूपाचा निश्चितार्थ कवण करी ॥१०॥


प्रासंगिक कविता -बाग प्रकरण

प्रसंग निघाला स्वभावें । बागेमध्यें काय लावावें । म्हणूनि घेतलीं नांवें । कांहीं एक ॥१॥
कांटी रामकांटी फुलेंकांटी । नेपती सहमुळी कारमाटी । सावी चिलारी सागरगोटी । हिवर खरै खरमाटी ॥२॥
पांढरफळी करवंदी तरटी । आळवी तोरणी चिंचोरटी । सिकेकाई वाकेरी घोंटी । करंज विळस समुद्रशोक ॥३॥
अव्हाटी बोराटी हिंगणबेटी । विकळी टांकळी वाघांटी । शरे निवडुंग कारवेटी । कांटेशेवरी पामगेरे ॥४॥
निरगुडी येरंड शेवटी । कासवेद कासळी पेसरी । तरवड उन्हाळ्या कुसरी । शिबी तिव्हा अंबोटी ॥५॥
कां तुती काचकुहिरी सराटी । उतरणी गुळवेल चित्रकुटी । कडीची काटली गोमाटी । घोळ घुगरी विरबोटी ॥६॥
भोंस बरू वाळा मोळा । ऊंस कास देवनळा । लव्हे पानि पारोस पिंपळा । गुंज कोळसरे देवपाळा ॥७॥
वेत कळकी चिवारी । ताड माड पायरी पिंपरी । उंबरी अंबरी गंभिरी । अडुळसा मोही भोपळी ॥८॥
साव विसवें सिरस कुड । कोळ कुंभा धावडा मोड । काळकुडा भुता बोकड । कुरडी हिरंडी लोखंडी ॥९॥
विहाळ गिळी टेंभुरणी । अविट एणके सोरकीन्ही । घोळी दालचिनी । कबाबचिनी जे ॥१०॥
निंबारे गोडे निंब । नाना महावृक्ष तळंब । गोरक्षचिंच लातंब । परोपरीचा ॥११॥
गोधनी शेलवंटी भोकरी । मोहे बिब्बा रायबोरी । बेल फणस जांब भरी । चिंच अमसोल अंबोड ॥१२॥
चांफे चंदन रातांजन । पतंग मलागार कांचन । पोपये खेलेले खपान । वट पिंपळ उंबर ॥१३॥
आंबे निंबें साखर -निंबें । रेकण्या खरजूरी तुतें दाळिंबे । तुरडे विडे नारिंगें । शेवे कविट अंजीर सीताफळें ॥१४॥
जांब अननस देवदार । सुरमे खासे मंदार । पांढरे जंगली लाल पुर्रे । उद्वे चित्रकी ॥१५॥
केळीं नारळी पोफळी । आंवळी रायआंवळी जांभळी । कुणकी गगुळी सालफळी । बेलफळी महाळुंगी ॥१६॥
भुईचाफे नागचाफे मोगरे । पारिजातक बटमांगरे । शंखासुर काळे मोगरे । सोनतरवड सोनफुलें ॥१७॥
जाई सखजाई पीतजाई । त्रिविध शेवती मालती जुई । पातळी बकुली अबई । नेवाळी शेतकी चमेली ॥१८॥
सूर्यकमळिणी चंद्र-कमळिणी । जास्वनी हनुमंतजास्वनी । केंशर कुसुंबी कमळिणी । बहुरगं नीळ थाति ॥१९॥
तुळसी काळा त्रिसेंदरी । त्रिसंगी रायचंचु रायपेटारी । गुलखत निगुलचिन कनेरी । नानाविध मखमाली ॥२०॥
काळा वाळा मरवा नाना । कचोरे गवले दवणा । पां च राजगिरे नाना । हळदी करडी गुलटोप ॥२१॥
वांगीं चाकवत मेथी पोकळा । माठ शेपू खोळ बसळा । चवळी चुका वेला सबळा । अंबु जिरे मोहरी ॥२२॥
कांदे मोळकांदे माईनमुळे । लसूण आलें रताळें । कांचन कारिजें माठमुळें । सुरण गाजरें ॥२३॥
भोपळे नानाप्रकारचे । लहान थोर पत्र वेलीचे । गळ्याचे पेढया सांगडीचे । वक्त वर्तुळ लंबायमान ॥२४॥
गंगाफळे काशी-फळें क्षीरसागर । सुगरवे सिंगाडे देवडांगर । दुधे गंगारुढे प्रकार । किनर्‍या रुद्रविण्याचे ॥२५॥
वाळक्या कांकडया चिवडया । कोहाळे सेंदण्या सेदाडया । खरबुजा तरबुजा कलंगडचा । द्राक्षी मिरवेली पानवेली ॥२६॥
दोडक्या पारोशा पडवळ्या । चवळ्या कारल्या तोंडल्या । घेवडया कुहिर्‍या खरसमळ्या । वेली अळु चमकोरे ॥२७॥
अठराभार वनस्पती । नामें सांगवीं किती । अल्प बोलिलों श्रोतीं । क्षमा केली पाहिजे ॥२८॥


कारखाने प्रकरण – समास १

ऐका विटांचा प्रसंग । लांबी रुंदी यथासांग । चौक नेमस्त व्यंग । असोंचि नये ॥१॥
वीट लांबी नऊ तसू । आणि रुंदी सात तसू । उंची जाणिजे तीन तसू । पाठपोट नेमस्त ॥२॥
खाली बरड वरी खडगा । वीट कामा नयेगा । धारेकोरेपाशीं दगा । कामा नये ॥३॥
भूमीपासूनि नीट करावी । कलबुताची कळाशी धरावी । आंतपावेतों नेमस्त भरावी । खिळे मारुनी ॥४॥
खडे खापरी कामा नये । थोडें कमावणें कामा नये । थोडी लीद कामा नये । आणि बहुत ॥५॥
राख कोंडा बुळग्या दाणे । घालूम नये दैन्यवाणें । अथवा कांहीं अधिक उणें । करूंचि नये ॥६॥
घट्ट चिखल कामा नये । पातळ तरी असूंचि नये । दडपितां कळाशी वाहूं नये । नाथर बुजे ॥७॥
खणख णीत वाळवाव्या । झणझणीत भाजाव्या । भट्टया नेमस्त कराव्या । आणि दरी ॥८॥
ओलें सरपण कामा नये । कावळकाटया कामा नये । मोठे ढोण कामा नये । नेमस्त असावे ॥९॥
जाळ घालावा नेमस्त । उमास करूं नये व्यस्त । ठाव असावा प्रशस्त । समान भूमी ॥१०॥
पूजाविधि चुकों नेदावी । भट्टी बरी निवूं द्यावी । वीट हळू उतरावी । टाकूं नये ॥११॥
पहिलेपासून शेवटवरी । अंत:करण बरें विवरी । आळस करील तो वैरी । कामा नये ॥१२॥
कामकर्त्यास गमूम देऊं नये । काम घेतां त्रासूं नये । कठीण शब्द बोलूं नये । क्षणक्षणां ॥१३॥
दिवस उगवल्यावरी येऊं देऊं नये । गमित माणूस कामा नये । आशक्त पोर कामा नये । आणि म्हातारे ॥१४॥
बळकट लोक निवडावे । काम पाहूनि लावावे । सगट मुशारे करावे । हें मूर्खपण ॥१५॥
जेवणापुरतें बसों द्यावें । सवेंचि कामास लावावें । दिवस धारे संभाळावें । क्षणक्षणां ॥१६॥
वेळ गमूंचि नेदावा । खोटा रुका बदलून द्यावा । मुशारा रेवूंचि न द्यावा । तमक खोटा ॥१७॥
हिशेब बरा राखीत जावा । लिहिण्याचा आळस नसावा । मुबदला करीत जावा । उप-सामुग्री ॥१८॥
खिळे कुराडी पायळ्या । पहारा संबळ कुदळ्या । सन फावडे लेरसळ्या । तरफा असाव्या ॥१९॥
नाडे साले काचे दोर । काढवेणे कळके ढोलर । उथाळ्या चाळण्या डाळया थोर । तक्ते बळकट काथवटी ॥२०॥
मांदणे डेरे घागरी । रांजण गाडगीं भारी । पाळीं बहुतां परोपरी । दांडे असावे ॥२१॥
धोंडे गुंडे चिपा चिपरे । खरुस चुना वाळू कंकरे । पाटे वरवंटे बरे । कामगार असावे ॥२२॥
पोशिदे असावे सावधान । हुन्नरबंदी तुफान ॥ दोघांचे एक चित्त मन । कामा नये ॥२३॥
तिकटया सूत्रें ओळंबे । काम पाहूनियां मनुष्य झोबे । तरी मग इमारती खेबडंगे । उभे राहती ॥२४॥


कारखाने प्रकरण – समास २.

यादी इमारतीकारणें । काय काय लागे करणें । श्रीती अवधान देणें । म्हणे वक्ता ॥१॥
द्रव्य पारपत्य खबरदारी । सत्तासामर्थ्य वेट बेगारी । गंवटी पाथरवट लोणारी । बेलदार कोळी ॥२॥
लोहार सुतार कुंभार । कामगार लहान थोर । मांग महार चांभार । नाना याती ॥३॥
घन कुदळी संबळ । कुराळी पारा गुठी गोल । टांक्या हातोडे लोळ । लोह पोलादाचे ॥४॥
विळे पायळे कुराडी । कुराडी । खुरपीं धाप्या धांवा वेडी । खिळे हलके गांघे गाडी । खोरें सनभ पावडी ॥५॥
तर्फा दांडे भुंगाळ्या नाटा । चोपणीं बडवणी धुमस खाटा । चाळण्या पांटया बंधली साठा । नाना प्रकारीचे ॥६॥
सर कोडके कळक चिवे । फळया चांफ चौफळे व्हावे । चवरंग चवक्या पाट करावे । नाना गिलाव्याचे ॥७॥
जातीं शिळा वांटणीं । चाटू डंगारणीं घांटणीं । तस्ते पाळीं लाटणीं । कळक मापें तराजु ॥८॥
कोळसे भटया लांकडे । शिरटी फेस झाडेंझुडें । नाना इमारतींचें सांकडे करतां जाणे ॥९॥
चुना चिरे वाळू कंकरे । पारडया चिपा लहान थोर । धोंडे गुंडे माती नीर । रांजण डेरे घागरी ॥१०॥
मडकीं कुंडालीं गाडगे । परळ वेळण्या मांडण मोघें । विटा चुना खरुस लागे । झेल इमा-रतीसी ॥११॥
गूळ कात हिरडे ताग । उडीद नाचण्या डीक याग । वजन हिशेबें यथासांग । केलें पाहिजे ॥१२॥
तीळ राळे आणि भात । चिकणा माता आरक्त । राख लीद बळग्या मिश्रित । कमावून विटा कराव्या ॥१३॥
तिकोन्या चौकोन्या लहान थोर । भाजून भिज-वन सुंदर । तिकया ओळंबे धरून सूत्र । इमारती कराव्या ॥१४॥
चौकटया मेहरबा ताक-बंदी । विटेबंदी चिरेबंदी । लोहबंदी शिसेबंदी । नीट नेमस्त उभार ॥१५॥
कांचबंदी पांचबंदी । नाना रत्नें सुवर्णबंदी । नाना दर्पणें विचित्र बंदी । नाना चित्रलेखन ॥१६॥
तोंड रचाया बळ कुसरी । चित्रविचित्र वोवरी । कमळें पानें परोपरी । एकाहूनि एक ॥१७॥
कल-बुद लावण्या बळकट । जालंधरें झरोके सोनवट । घोटघोटेनि लखलखाट । सुरु सनाबदाचे ॥१८॥
धाबें देउळें शिखरें । उंच गोपुरें मनोहरें । वापी पोखरणी सरोवरें । हमामें स्थान कारंजी ॥१९॥
गड कोठे महाल मटया । गुप्तद्बारे अंतरशिडया । छत्र्या लादण्याच्या तबकडया । नाना भुयारीं विवरें ॥२०॥
धनधान्यरसखाने । दारूखाने जामदारखाने । नाना अठरा कारखाने । घुमट मशीदी मनोहर ॥२१॥
चित्रशाळा नाटकशाळा । भोजनशाळा होमशाळा । पाठशाळा धर्मशाळा । नाना इमारती ॥२२॥
ओटे चौथरे वृंदावनें । कुंचे दाखटे भुवनें । नानाप्रकारचीं स्थानें । चांदवा पट कोट भडकले ॥२३॥
धरणें सांकू कालवे । नदीतीरी पंथ बांधावे । दीपमाळा चौक बांधावे । हुंडे खानगे मदालसा ॥२४॥
गढया गुंफा कपाटें लेणीं । देवदैत्यमानवकरणीं । समाधींमाझारीं धरणी । कोणे पाहिली ॥२५॥


प्रासंगिक कविता – श्रेष्ठांस पत्र

सकळ तीर्थांचें सार । सत्यस्वरूप निर्विकार । तुमचें चित्त तदाकार । निरंतर ॥१॥
विमल ब्रह्मपरायण । सगुणभक्तिसंरक्षण विशेष वैराग्यलक्षण । तुमचे ठायीं ॥२॥
मुक्त क्तियेचा अनादरु । स्वधर्मकमीं अत्यादरु । आग्रहनिह्रहांचा विचारु । तोहि नसे ॥३॥
नसे कामनेचा लेश । जयंत्या पर्वांचा हव्यास । अंतरीं माने विशेष । हरिकथा निरूपण ॥४॥
तुमचें देह सार्थकाचें । सर्वदा परोपकाराचें । भगवंतें निर्मिलें बहुतांचें । समाधान ॥५॥
तुमचेनि वाग्विलासें । बहु पाखंड नासे । संशयातीस प्रकाशे । विमळवस्तु ॥६॥
सन्मार्गींचा कैपक्षी । अनमार्ग करणें अलक्षी । लोक पावती प्रत्यक्षी समाधान ॥७॥
दक्षता आणि चातुर्यता । व्युत्पन्नता आणि लीनता । उतमगुण सर्वज्ञता । तुमचे ठायीं ॥८॥
तुमचें स्वरूप वर्णवेना । म्हणोनि देहाची वर्णना । युक्त अयुक्त मित्रजना । क्षमा केली पाहिजे ॥९॥


प्रासंगिक कविता – मारुतीची प्रार्थना

फणिवर उठवीला वेग अद्भूत केला । त्रिभुवन जनलोकीं कीर्तिचा घोप केला ।
रघुपति उपकारें दाटले थोरभारे । परम धिर उदारें रक्षिलें सौख्यकारें ॥१॥
सबळ दळ मिळालें युद्ध ऊदंड  झाले । कपिकटक निमालें पाहतां येश गेलें ।
परदळशरघातें कोटिच्या कोटि प्रेतें । अभिनव रणपातें दु:ख बीभीषणातें॥२॥
कपिरिसघनदाटी जाहली थोर दाटी । म्हणवुनि जगजेठी धांवणे चार कोटी ।
मृतविर उठवीले मोकळे सिद्ध झाले । सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ॥३॥
बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणदाता । उठवी मज अनाथा दूर सारूनि व्येथा ।
झडकरि भिमराया तूं करीं दृढ काया । रघुविरभजना या लागवेगेंचि जाया ॥४॥
तुजविण मजलगिं पाहतां कोण आहे । म्हणवुनि मन माझें तूआझि रे वास पाहे ।
मज तुज निरवीलें पाहिले आठवीलें । सकळिक निजदासांलागिं सांभाळवीलें ॥५॥
उचित हित करावें उद्धरावें धरावें । अनुचित न करावें त्वां जनीं येश ध्यावें ।
अघटित घडवावें सेवका सोडवावें । हरिभजन घडावें दु:ख तें वीघडावें ॥६॥
प्रभुवर विरराया जाहली वज्रकाया । परदळ निवदाया दैत्यकूळें कुडाया ।
गिरिवर तुडवाया रम्य वेशें नटाया । तुजचि अलगडाया ठेविलें मुख्य ठाया ॥७॥
बहुत सकळ सांठा भागतों अल्प वांटा । न करित हित कांटा थोर होईल ताठा ।
कृपणपण नसावें भव्य लोकीं दिसावें । अनुदिन करुणेचें चिन्ह पोटीं वसावें ॥८॥
जलधर करुणेचा अंतरामाजिं राहो । तरि तुज करुणा हे कां नये सांग पां हो ।
कठिणहदय झालें काय कारुण्य केलें । न पवसि मज कां रे म्यां तुझें काय केलें ॥९॥
वडिलपण करावें सेवका सांवरावें । अनहित न करावें तूर्त हातीं धरावें ।
निपटचि हटवावें प्रार्थिला शब्दभेदें । कपि घन करुणेचा वोळला राम तेथें ॥१०॥
बहुतचि करुणा ही लोटली देवराया । सहजचि कफ गेलें जाहली दृढ काया ।
परम सुख विलासे सर्वदा दास. नूसे । पवनज तनुतोषें वंदिला सावकाशें ॥११॥


प्रासंगिक कविता – सावधता प्रकरण

एके समयीं आपलें सर्व राज्य स्वामीस अर्पण करावें असें मनांत आणून
त्याप्रंमाणें कागदपत्र केले आणि महाराजांनीं ते स्वामी भिक्षेस आले असतां
त्यांच्या झोळींत टाकलें, त्या वेळीं केलेला बोध
कोणाचा भरंवसा न धरावा । आपुला आपण विचार पहावा ।
तकवा उदंड धरावा । हर एक विषयीं ॥१॥
देहदु:खें कदरों नये । उदंडचि करावे उपाय ।
मग सर्व सुखाला काय । उणें आहे ॥२॥
एकांतीं चाळणा करावी । धारणा उदंड धरावी ।
नाना विचारणा करावी । अरिमित्रांची ॥३॥
प्रयत्नीं चुकों नये । सुखवासी कामा नये ।
सुचावे नाना उपाय । अनेक विषयीं ॥४॥
धुरेनें धीर सोडूं नये । मुख्य प्रसंग चुको नये ।
उद्योगरहित कामा नये । पशू जैसे ॥५॥
उपाधीस कंटाळा । विचाराचा आळस आला ।
म्हणजे जाणावा चेवला । बुद्धीपासूनी ॥६॥
खबरदारी आणी वेगीं । तेणें सामर्थ्य चढे अंगीं ।
नानाप्रसंगें कार्यभागीं । अंतरचि न पडे ॥७॥
कार्यकर्ते दूरी करावे । प्रसंगीं सवेंचि हातीं धरावे ।
परंतु शोधोनि पाहावे । कपटाविषयीं ।
जेथें बहु विचार । तेथें ईश्वरअवतार ।
मागें झाले थोर थोर । धके चपेटे सोसोनी ॥९॥
आपुल्या मनासी रोधावें । परांतर शोधावें ।
क्षणक्षणां सांभाळावें । बदलेल म्हणूनी ॥१०॥
पाहिलेंचि पाहावें । केलेंचि करावें ।
शोधि-लेंचि शोधावें । राज्यकारण ॥११॥
इशारतीचें बोलतां नये । बोलायाचें लिहूं नये ॥
लिहावयाचें सांगू नये । जबाबीनें ॥१२॥


प्रासंगिक कविता – उत्तर

चिरंजीव ते निश्चळ । निश्चळीं जाहलें चंचळ । चंचळीं जाणावा निश्चळ । निश्चळरूपी ॥१॥
सदासर्वदा निश्चळ । निश्चळींच पाहावें सकळ । सकळ पाहतां केवळ । आपणच वस्तु ॥२॥
वस्तुरूप आपण । अधिष्ठानीं पाहतां कोण । पाहतां पाहाणें ज्यालागून । ओचि तो आत्मा ॥३॥
आत्मारामीं आत्मा पहा । जाणूनियां सुखी हा । स्वानंदामृत सेवूनि पहा । निखिल निजरूपा ॥४॥
रूप तेंचि पाहतां सगुण । सगुण तेंचि आपण । आपणापरतें ज्ञान । वेगळें नाही ॥५॥
वेगळेपणें पहावें । मग तें वेगळेंचि जाणावें । मग मिळेना स्वभावें । मुक्त जैसा ॥६॥
म्हणून वेगळें न साहे । न साहे म्हणणेंचि बाह्मे । बाह्याबाह्य तें अबाह्य । जाण बापा ॥७॥
ऐसें जें अधिष्ठान । तेथें जावया जाण । जाण-जाणोनि परिछिन्न । आपणचि ॥८॥
शरण जावें सद्नुरूसी । म्हणजे कळे आपणासी । आपपर नाहीं त्यासी । दास म्हणे ॥९॥


प्रासंगिक कविता – ब्रह्मपिसा

पळा पळा ब्रह्मपिसा येतो जवळी । रामनामें हांक देऊनि डोई खांजोळी ॥धु०॥
वृत्ति शेंडी बंधनेंविण सदा मोकळी । संसाराची धुळी करुनी अंगीं उधळी ॥१॥
प्रपंच उकरडया-वर बैसणें ज्याचें । भोंवता पाळा फिरून पाहे जन अविद्येचे ॥२॥
धांवूनि बैसे उठोनि पळे दृश्य वाटतें अदृश्याचें । राहणें घेतां न चले कोणाचें ॥३॥
औट हात गज नवां ठायीं वितु-ळलें । दहावा ठाव म्हणोनि तेथें ठिगळ दिधळें ॥४॥
ऐसें मन हें चंचल वृत्तींत गुंतलें । परतोनि आलें म्हणऊनि जिवेंचि मारिलें ॥५॥
मीपणाचें शहाणपण जळालें माझें । कोण वाहे देहबुद्धिवस्राचेम ओझें ॥६॥
नलगे आम्हा मानपानाचें ओझें । तुझी शुद्धि घेतां गेलें मीपण माझें ॥७॥
आम्ही जन धन देखोनी वार करितों । आपण ऐसें म्हणउनी समज धरितों ॥८॥
आर्ते भेटों येती त्यांस वेड लवितों । रामीं रामदास ऐसें अबद्ध बोलतों ॥९॥


प्रासंगिक कविता – खंडोबाची आरती

पंचानन हयवाहन सुरभूषणलीला । खंडामंडित दंडित दानव आवलीला ।
मणिमल्ल मर्दूनि धूसर जो पिवळा । विरकंकण बाशिंगें सुभनांच्या माळा ।
जयदेव जयजय मल्हारी । वारीं दुर्जन वारीं निंदक अपहारीं । जयदेव ॥१॥॥धु०॥
सुरवैरीसंहारा वर दे मज देवा । नाना नामीं गाइन मी तुमची सेवा ।
अखंड गुण गावया वाटतसे हेवा । फणिवर शिणला तेथें नर पामर केवा ॥जयo २॥
रघुवीरस्मरणें शंकर हदयीं नीवाला । तो हा मदनांतक अव-तार झाला ।
यालागुनि धांवे आवडिं वर्णीला । रामीं रामदासा जिवलग भेटला ॥३॥


प्रासंगिक कविता २

( शके १५५४ मध्यें पंचवटीस श्रीरामनवमीच्या उत्सवांत श्रीसमर्थ पुराण सांगत असतां म्हणाले कीं, अशोकवनांतील फुलें पांढरीं होतीं; त्यावर बटुरूपानें बसलेल्या मारुतीरायांनीं उत्तर केलें कीं, फुलें तांबडीं होतीं. तेव्हां उभयतांचा बराच वाद झाला; पुढें फुलें तांबडीं कीं पांढरीं हें पाहाण्यासाठीं मारुतिराय स्वतः अशोकवनांत गेले व पाहातात तों फुलें पांढरींच. इतक्यांत बिभीषणाची व त्यांची भेट झाली. आपल्या येण्याचें कारण मारुतीरायांनीं सांगितलें; तेव्हां उभयतांनाहि समर्थांच्या बुद्धिचातुर्याचें मोठें कौतुक वाटलें. अशा प्रज्ञावंत भगवद्भक्ताची भेट व्हावी अशी बिभीषणानीं इच्छा प्रकट केली; श्रीसमर्थ तीर्थयात्रा करीत रामेश्वरीं गेले तेव्हां त्यंस मारुतीनें लंकेंत नेऊन बिभीषणाची ही इच्छा पूर्ण केली. ह्या प्रसंगीं श्रीसमर्थांनीं पुढील अभंग केला अशी प्रसिद्धि आहे. )

अभंग
धन्य हें नगर धन्य बिभीषण । धन्य वरदान समर्थांचें ॥१॥
समर्थांच्या कृपें वर हा पावला । चिरंजीव जाला कल्प एक ॥२॥
कल्प एक वस्ती लंकेमाजीं जाण । मारुति रक्षण जयालागीं ॥३॥
जयालागीं कृपें समर्थ हनुमंता । उपासना स्वतः राघवाची ॥४॥
राघवाचे कृपें भेटी याची जाली । लंकादेवी आली भेटीलागीं ॥५॥
भेटीचा हा लाभ मारुतीच्या संगें । पुष्पाचिया योगें लाभ जाला ॥६॥
लाभाचाहि लाभ मारुतीप्रसंगें । समर्थांचा योग येणेंकरितां ॥७॥
येणें जालें येथें प्रदक्षिणायोगें । समर्थांचा संग म्हणौनियां ॥८॥
म्हणौनियां विनंती ऐका लंकापति । लोभ फार चित्तीं असों द्यावा ॥९॥
असूं द्यावी आतां कृपा दासावरी । दास हा निर्धारीं मनीं चिंती ॥१०॥
मनींचा हा लोभ फार असों द्यावा । लोभायोगें सेवा घडो मज ॥११॥
मज घडो मुक्ति राघवाची भक्ति । उभय पदप्राप्ती म्हणोनियां ॥१२॥
म्हणोनियां धन्य आपणां म्हणवी । दास म्हणे पदवी तुम्हांकरितां ॥१३॥


प्रासंगिक कविता – प्रसंग २

( शके १५५४ ते १५६६ च्या दरम्यान श्रीसमर्थ तीर्थयात्रा करीत पैठणास गेले; तेथे मातोश्री आपल्यासाठीं फार शोकाकुल झाली आहे असें कळतांच ते जांबेस गेले. तेथें मातोश्रींची भेट घेऊन शोकामुळें व वृद्धपणामुळें तिची गेलेली दृष्टि आपला हात फिरवून त्यांनीं पुन्हां सतेज केली. तेव्हां राणाईंनीं त्यांस विचारलें कीं, “ ही भूतचेष्टा तूं कोठें शिकलास ? ” त्यावर समर्थांनीं पुढील पद म्हणून उत्तर दिलें. )

पद
( चाल – अंजनीगीताची )
होतें वैकुंठींचे कोनीं । शिरलें अयोध्याभुवनीं ।
लागे कौसल्येचे स्तनीं । तेंचि भूत गे माय ॥१॥
जातां कौशिकराउळीं । अवलोकिली भयंकाळीं ।
ताटिका ते छळून मेली । तेंचि भूत. ॥ध्रु.॥
मार्गीं जातां वनांतरीं । पाय पडला दगडावरी ।
पाषाणाची जाली नारी । तेंचि भूत. ॥२॥
जनकाचे रंगणीं गेलें । शिवाचें धनु भंगिलें ।
वैदेहीअंगीं संचरलें । तेंचि भूत. ॥३॥
जेणें सहस्रार्जुन वधिला । तोही तात्काळचि भ्याला ।
धनु देऊनि देह रक्षिला । तेंचि भूत. ॥४॥
पितयाचे भाकेसी । कैकयीचे वचनासी ।
पाळूनि गेलें अरण्यासी । तेंचि भूत. ॥५॥
चौदा संवत्सर तापसी । अखंड हिंडे वनवासी ।
सांगातीं भुजंग पोसी । तेंचि भूत. ॥६॥
सुग्रीवाचें पालन । वालीचें निर्दालन । तारी पाण्यावरी पाषाण । तेंचि. ॥७॥
रक्षी भक्त बिभीषण । मारी राव कुंभकर्ण । तोडी अमरांचें बंधन । तेंचि. ॥८॥
वामांगीं स्त्रियेसी धरिलें । धांवूनि शरयूतीरा आलें । तेथें भरतासी भेटलें । तेंचि. ॥९॥
सर्व भूतांचें हृदय । नांव त्याचें रामराय ।
रामदास नित्य गाय । तेंचि भूत गे माय ॥१०॥


प्रासंगिक कविता – प्रसंग ३

( शके १५५६ -५७ चे सुमारास सातार्‍याजवळ माहुली क्षेत्रीं श्रीसमर्थांचा मुक्काम असतां, तुकाराम महाराज त्यांचे भेटीस आले होते. त्या प्रसंगीं आपापलीं चरित्रें परस्परांनीं परस्परांस सांगितलीं. त्यांत पुढील अभंगामध्यें समर्थांनीं आपलें त्रोटक चरित्र वर्णन केलें आहे. )
नमो अधिष्ठाता विष्णु मुख साधु । तेथूनियां बोधु विधीलागीं ॥१॥
विधीपासुनियां ज्ञान विधीसुता । तेंचि ज्ञान प्राप्त वसिष्ठासी ॥२॥
वसिष्ठें उपदेश केला रामचंद्रा । तोचि महारुद्रा हनुमंता ॥३॥
हनुमंत कलीमाजीं चिरंजीव । जाले देव सर्व बौद्धरूप ॥४॥
बौद्ध नारायण होऊनी बैसला । उपाव बोलिला व्यासमुनि ॥५॥
व्यासमुनि बोले भविष्यपुराण । जग उद्धरणें कलीमाजीं ॥६॥
कलीमाजीं गोदातीरीं पुण्यक्षेत्र । तेथें वातपुत्र अवतरे ॥७॥
अवतरे अभिधानी रामदास । कृष्णातीरीं वास जगदुद्धारा ॥८॥
जगदुद्धारासाठीं श्रीरामा सांकडें । केलें वाडेंकोडें भक्तिपंथें ॥९॥
भक्तिपंथें मोठा केला श्रीरामानें । जंबू अभिधानें ग्राम तेथें ॥१०॥
तेथें ब्रह्मनिष्ठ अधिष्ठाता पूर्ण । सूर्यनामा जाण द्विजवर्य ॥११॥
द्विजवर्य सूर्य जैसा तपोधन । अद्भुत विंदान जालें तेथें ॥१२॥
जाली रामनवमी मध्य अष्टमीसी । अर्धरात्रीं त्यासी दूत आले ॥१३॥
दूत आले पुढें घालोनि चालिले । महाद्वारा आले भीम जेथें ॥१४॥
भीमदेवालयीं नेऊनी तयासी । तेथें उभयतांसी देखियेलें ॥१५॥
देखियेलें राजपुत्र सूर्यवंशी । झांपड नेत्रासी पडे तेव्हां ॥१६॥
पडें तेव्हां जैसा दंडवत भूमी । मग अंतर्धामीं बोलाविलें ॥१७॥
बोलावूनि माथां ठेवी सव्य पाणि । मंत्र सांगे कर्णीं रामनाम ॥१८॥
नाम सांगुनियां ताम्रमूर्ति रम्य । पट्टाभिश्रीराम दिधला तया ॥१९॥
तया दिला वर तु पुत्र होतील । ध्वज उभारतील रामदास्यें ॥२०॥
रामदास्य जालें धन्य वंशोद्धार । बोलोनि सत्वर गैब जाले ॥२१॥
जाला रामनवमी महोत्सव थोर । मध्यान्हीं सत्वर जन्मा जाला ॥२२॥
जन्म जाला भला देव वंशा आले । उपासना चाले राघवाची ॥२३॥
राघवाची भक्ति सुखाची विश्रांति । पितयाची शांति जाली पुढें ॥२४॥
पुढें ज्येष्ठ बंधु न सांगेचि कांहीं । सुखें देवालयीं निद्रा केली ॥२५॥
निद्रा केली तेथें श्रीरामें उठवूनी । तोचि मंत्र कानीं सांगितला ॥२६॥
सांगितला बोध रामीरामदासा । गुरुच्याही वंशा निरोपिलें ॥२७॥


प्रासंगिक कविता – प्रसंग ४

( कृष्णातीरीं आल्यावर श्रीसमर्थ चरेगांवाजवळील चंद्रगिरी ऊर्फ चांदोबाच्या डोंगरांतील गुहेंत शके १५६७-६८ मध्यें राहात असत व आसपासच्या प्रांतांत संचार करीत असत. पुढील डफगाण्यांत कोल्हापुरापासून शहापुरापर्यंत असलेल्या मुख्य तीर्थस्थानाचें वर्ण श्रीसमर्थांनीं केलें आहे. )
( डफगाणें )
केला काशी विश्वेश्वर । सेतुबंध रामेश्वर ।
न पाहातां कोल्हापुर । व्यर्थ होय ॥१॥
पूर्वीं होता कोल्हासुर । म्हणोनि नाम कोल्हापुर ।
तेथें लक्ष्मीचा अवतार । तुम्ही पाहातां ॥२॥
तेथें बहुसाल देउळें । तळें रंकाळें पद्माळें ।
जळें वाहाती निर्मळ । ठायीं ठायीं ॥३॥
तेथुनि पाहातां उत्तर । पुढें आहे केसापुर ।
नदी पंचगंगेचें तीर । सुंदर नीर ॥४॥
वरतें जळसेनाचें तळें । तया तळ्यामाजीं कमळें ।
तेथुनि दिसत पन्हाळा । सारा गड ॥५॥
मार्कंडेयाचा डोंगर । त्यावरि थोर रत्नागीर ।
आला हिमाचळाहुनि केदार । भक्तिलागीं ॥६॥
जागा लक्ष्मीचें सिराळें । तेथें निघती नागकुळें ।
श्रावणमासीं मुलेंबाळें । खेळवितीं ॥७॥
ऐका पुढील प्रसंग । आळतें वाहे रामलिंग ।
नरसिंहपुरीं देव धिंग । गुप्त आहे ॥८॥
कराड नगर सांगों काई । तेथें सुंदर तुकाई । कृष्णासंगम ठायीं ठायीं । देवस्थानें ॥९॥
भुलेश्वर धारेश्वर । रुद्रेश्वर चापेश्वर । तेथें महिमा अपार । रघुनाथाचा ॥१०॥
चंद्रगिरीमध्यें गवी । तेथें वास करी कवी । त्याची जागा ते पुरवी । शहापुर ॥११॥


प्रासंगिक कविता – प्रसंग ५

( शके १५७० सर्वधारी नाम संवत्सरीं चाफळास श्रीरामनवमीच्या उत्सवास श्रीसमर्थानीं आरंभ केला. तत्पूर्वीं हा उत्सव मसूर मुक्कामीं होत होता. पुढील डफगाण्यांत चाफळ क्षेत्राचें सृष्टिसौंदर्य, श्रीसमर्थांनीं स्वहस्तें बांधलेलें श्रीरघुपतीचें देवालय आणि श्रीरामनवमीचा उत्सव समारंभ यांचें मोठ्या बहारीचें वर्णन श्रीसमर्थांच्याच जोरदार भाषेंत वाचकांस पाहावयास मिळेल. )
भोंवता डोंगराचा फेरा । मध्यें देवाचें शिखर ।
पुढें मंडप सुंदर । नवखणांचा ॥१॥
चहूंखांबाची रचना । वरत्या चोवीस कमाना ।
काम कटाउ नयना । समाधान ॥२॥
नाना तरुआंबेबनें । दोहींकडे वृंदावनें ।
वृंदावनीं जगजीवनें । वस्ती केली ॥३॥
पुढें उभा कपिवीर । पूर्वेकडे लंबोदर ।
खालें दाटला दर्बार । नाना परी ॥४॥
दमामे चौघडे वाजती । धडके भांड्यांचे गाजती ।
फौजा भक्तांच्या साजती । ठाईं ठाईं ॥५॥
माही मोर्तबें निशाणें । मेघडंब्रें सूर्यपानें ।
दिंड्याछत्र्या सुखासनें । विंजणे कुंचे ॥६॥
काहाळा कर्णे बुरुंग बाके । नाना ध्वनीं गगन झांके ।
बहुत वाद्यांचे धबके । परोपरीं ॥७॥
टाळमृदांगें उपांग । ब्रह्मविणें चुटक्या चंग ।
तानमानें माजे रंग । हरिकथेसी ॥८॥
घांटा घंटा शंख भेरी । डफडीं पावे वाजंतरी ।
भाट वर्जती नातरी । परोपरीं ॥९॥
उदंड यात्रेकरू आले । रंगीं हरिदास मिळाले ।
श्रोतेवक्ते कथा चाले । भगवंताची ॥१०॥
नाना पुष्पमाळा तुरे । पाहों जातां भडस पुरे ।
रंग स्वर्गींचा उतरे । तये ठायीं ॥११॥
गंध सुगंध केशर । उदंड उधळती धूशर ।
जगदांतरें हरिहरें । वस्ति केली ॥१२॥
दिवट्या हिलाल चंद्रज्योती । नळे आर्डत उठती ।
बाण हवाया झर्कती । गगनामध्यें ॥१३॥
उदंड मनुष्यांचीं थाटें । दिसतातीं लखलखाटें ।
येकमेकांसी बोभाटें । बोलावितीं ॥१४॥
उदंड उजळील्या दीपिका । नामघोषें करताळिका ।
कितीयेक ते आइका । ऐका शब्द होती ॥१५॥
क्षीरापतीची वाटणी । तेथें जाहाली दाटणी ।
पैस नाहीं राजांगणीं । दाटी जाली ॥१६॥
रंगमाळा नीरांजनें । तेथें वस्ति केली मनें ।
दिवस उगवतां सुमनें । कोमाईलीं ॥१७॥
रथ देवाचा वोढिला । यात्रेकरां निरोप जाला ।
पुढें जायाचा गल्बला । ठाईं ठाईं ॥१८॥
भक्तजन म्हणती देवा । आतां लोभ असों द्यावा ।
धन्य सुकृताचा ठेवा । भक्ति तुझी ॥१९॥
दास डोंगरीं राहातो । यात्रा देवाची पाहातो ।
देव भक्तांसवें जातो । ध्यानरूपें ॥२०॥


प्रासंगिक कविता – प्रसंग ६

( शके १५७७ सालांत निष्ठावंत शिष्य कोण कोण आहेत याची परीक्षा करण्याच्या हेतूनें श्रीसमर्थांनीं हातांत तलवार घेऊन वेड्याचें सोंग घेतलें; त्या समयीं कल्याण समर्थांच्या कसोटीस परिपूर्ण उतरले; पुढें कल्याणांच्या विनंतीवरून सज्जनगडावर परत येतांना समर्थांनी खालील पद म्हटलें. )
( चाल – धन्य हे प्रदक्षिणा. )
पळा पळा ब्रह्मपिसा येतो जवळीं ।
रामनामें हांक देउनी डोई कांडोळी ॥ध्रु.॥
वृत्तिसेंडी बंधनेंविण सदा मोकळी । संसाराची धुळी करुनि आंगीं उधळी ॥१॥
प्रपंचउकरड्यावरी बैसणें ज्याचें । भोंता पाळा फिरोनी पाहे जन हे अविद्येचे ॥२॥
धाउनि बैसे उठोनि पळे दृश्य वाटतें । अदृश्याचें राहाणें घेतां नचलें कवणाचें ॥३॥
आउट हात गज नवां ठाईं वितुळलें । दाहावा ठाव म्हणऊन तेथें ठिगळ दिधलें ॥४॥
ऐसें मन हें चंचळ निवृत्तीसी गुंतलें । परतुनियां आलें म्हणऊनि जीवेंसि मारिलें ॥५॥
मीपणाचे शाहाणपण जळालें माझें । कोण वाहे देहबुद्धीवस्त्राचें ओझें ॥६॥
नलगे आम्हां मानअपमानाचें ओझें । तुझी शुद्धी घेतां गेलें मीपण माझें ॥७॥
आम्ही जन धन देखुनि वारचि करितों । आपणाऐसे पिसे देखुनि उमज धरितों ॥८॥
आर्तें भेटों येतीं त्यांस वेड लावितों । रामीरामदास ऐसें अबद्ध बोलतो ॥९॥


प्रासंगिक कविता – प्रसंग ७

( सामनगडचा किल्ला ( प्रांत हुक्केरी ) बांधण्याचें काम श्रीशिवछात्रपतींनीं सुरू केलें असतां कामकरी लोकांकडे पाहून इतक्यां लोकांचें पालनपोषण करणारा मी आहें अशी अहंभावाची कल्पना शिवरायांच्या चित्तांत उत्पन्न झाली; त्यावेळीं श्रीसमर्थांनीं तेथें प्रकट होऊन वाटेंतील खडक फोडून त्यांत असलेली सजीव बेडकी शिवरायास दाखविली; आणि या बेडकीचें पोषण कोण करतो म्हणून विचारलें; त्या प्रसंगीं पुढील गोड पद रचिलें आहे. )

पद
( राग – खमाज; ताल – धुमाळी )
आम्ही काय कुणाचें खातों ।
श्रीराम आम्हांला देतो ॥ध्रु.॥
बांधिले घुमट किल्याचे तट । तयाला फुटती पिंपळवट ।
नाहीं विहीर आणी मोट । बुडाला पाणी कोण पाजीतो । तो राम. ॥१॥
पाहा पाहा मातेचिये स्तनीं । चिंतिता मांस – रक्त – मल – घाणी ।
तयांमध्यें विमल दुग्ध आणोनी । कोण निर्मीतो । तो राम. ॥२॥
खडक फोडितां सजिव रोडकी । पाहिली सर्वांनीं बेडकी ।
सिंधु नसतां तिये मुखीं पाणी । कोण पाजीतो । तो राम. ॥३॥
नसतां पाण्याचे बुडबुडे । सदासर्वदा गगन कोरडें ॥
दास म्हणे जीवन चहुंकडे । घालुनी सडे पीक उगवीतो । तो राम. ॥४॥


प्रासंगिक कविता – प्रसंग ८

( शके १५८२ चे सुमारास पौषमासीं श्रीसमर्थ परळीहून चाफळास येत असतां वाटेत पाली येथें खंडोबांच्या जत्रेंत दोघां शाहिरांचा फड पडून दोघे एकमेकांवर चढ करीत होते. समर्थांनीं त्या दोन्ही पक्षांत म्हटलें कीं, आम्ही तुम्हां दोघांवर चढ टाकतों. त्याचें उत्तर तुम्ही दोघेहि मिळून द्या; त्यावेळीं पुढील डफगाणें म्हणून त्या शाहिरांस समर्थांनीं निरुत्तर केले. )
किती पृथ्वीचें वजन । किती अंगुळें गगन ।
सांग सिंधूचें जीवन । किती टांक ॥१॥
वायुसरिसे उडती । सांग अणुरेणु किती ।
लक्ष चौर्‍यांसी उत्पत्ति । रोम किती ॥२॥
किती आकाशींचा वारा । किती पर्जन्याच्या धारा ।
तृण भूमीवरी चतुरा । सांग किती ॥३॥
सर्व सरितांची वाळु । सप्तसागरींची वाळु ।
किती आहे ते हरळू । सांग मज ॥४॥
बीजें वडीं आणि पिंपळीं । किती आहे भूमंडळीं ।
सर्व धान्यांची मोकळी । संख्या सांग ॥५॥
अठरा भार वनस्पती । भूमंडळीं पानें किती ।
फुलें फळें जाती किती । सांग आतां ॥६॥
जें जें पुसिलें म्यां तुज । तें तें सांग आतां मज ।
अनंतर ब्रह्मांडीं बेरीज । किती जाली ॥७॥
सांग माझें डफगाणें । कां तें सोडीं जाणपण ।
देहबुद्धीचें लक्षण । सोडवीन ॥८॥
श्रोतीं व्हावें सावचित । आतां सांगतों गणित ।
सर्व आहे अगणित । सत्यवाचा ॥९॥
रामदासाचे विनोदें । सोडा अहंतेचीं ब्रीदें ।
मग सर्वही स्वानंदें । सुखी राहा ॥१०॥


प्रासंगिक कविता – प्रसंग ९

( भिमाजीबाबा उर्फ भीमस्वामी यांस श्रीसमर्थांचा अनुग्रह शके १५६७ मध्यें झाला होता, आणि त्यांनीं १५९७ मध्यें शिवाजीमहाराजांबरोबर कर्नाटकांत समर्थांच्या आज्ञेवरून जाऊन तंजावरास मठस्थापना केली होती. तंजावरास गेल्यानंतर भीमस्वामींना सद्गुरुचरणांचा वियो दुस्सह झाला म्हणून त्यांनी “ अखंडीत हे वासना भेटि व्हावी । प्रभूपाइंची धूळि माथां पडावी । मनींचे मनीं जाणसी स्वामिराया । किती वाढऊं हा सविस्तार वायां ॥ ” अशा आशयाचें एक शोकबद्ध पत्र श्रीसमर्थांकडे पाठविलें. त्यास उत्तर म्हणून पुढील दोन अभंग व ओंव्या समर्थांनीं लिहिल्या. )
आम्हां तुम्हां मुळीं जाली नाहीं तुटी । तुटीविण भेटि इच्छीतसां ॥१॥
इच्छितसां योग नसतां वियोग । तुम्हां आम्हां योग सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ तुम्ही आम्ही एके स्थळीं । वायां मृगजळीं बुडों नये ॥३॥
बुडों नये आतां सावध असावें । रूप ओळखावें जवळींच ॥४॥
जवळींच आहे नका धरूं दुरी । बाह्य अभ्य़ंतरीं असोनीयां ॥५॥
असोनी सन्निध वियोगाचा खेद । नसोनीयां भेद लावूं नये ॥६॥
लावूं नये भेद मायिकसंबंधीं । रामदासीं बोधीं भेटि जाली ॥७॥

स्वरूपाची भेटि तेथें नाहीं तुटी । वायांचि हिंपुटी होत असां ॥१॥
होतसां हिंपुटी नसतां वियोग । असतां संयोग सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ ऐक्यरूप आलिंगन । तेथें मीतूंपण हारपलें ॥३॥
हारपलें दुःख द्वैताचें पाहातां । सस्वरूप आतां समाधान ॥४॥
समाधान चळे ऐसें न करावें । विवेकें भरावें सस्वरूपीं ॥५॥
सस्वरूपीं नाहीं संयोग वियोग । सर्वकाळ योग सज्जनाचा ॥६॥
सज्जनाचा योग सज्जनासी आहे । विचारूनि पाहें अनुभवें ॥७॥
अनुभवीं जाली आम्हां तुम्हां भेटि । आतां नव्हे तुटी दास म्हणे ॥८॥

ओंव्या –
चित्रकला नाना नाटक । म्हणोनि नामें कर्नाटक ।
तेथें जे रामउपासक । पत्र त्यांसी ॥१॥
तुम्हीं पत्र पाठविलें । वाचुनि आश्चिर्य वाटलें ।
परम समाधान जालें । देव जाणे ॥२॥
प्रवृत्तीसी पाहिजे राजकारण । निवृत्तीसी पाहिजे विवरण ।
जेथें अखंड श्रवण मनन । धन्य तो काळ ॥३॥
आयुष्यासी माप लागलें । ऐसें प्रचीतीसी आलें ।
तरी सार्थक पाहिजे केलें । सारासार विचारें ॥४॥
हें बहुत सुकृतें घडे । परलोक विवेकें जोडे ।
समजतां मूळ खंडें । जन्ममृत्याचें ॥५॥
नवविधाभक्तीचे अंतीं । होत आहे भक्तवत्प्राप्ति ।
सत्य स्वरूपीं सद्गति । तात्काळ होते ॥६॥
हें उमजल्यावीण काय कळे । समजल्यावीण तें न कळे ।
श्रवणमननें निवळें । सकळ कांहीं ॥७॥
सकळ कांहीं जाणोनि केलें । म्हणिजे सार्थकचि जालें ।
नेणतां अनुमानें गेलें । तें निरर्थक ॥८॥
धन्य आत्मज्ञानी नर । सार्थक केला संसार ।
त्यासी आम्हांसी अंतर । कांहींच नाहीं ॥९॥
तत्वनिर्शना उपरी । रायारंका एकचि सरी ।
पुरता विचार चतुरीं । पाहिला पाहिजे ॥१०॥
शब्दद्वारां अर्थ घेणें । विवेकें अर्थरूप होणें ।
सार्थकाचीं हें लक्षणें । जाणती ज्ञानी ॥११॥
विवेकाचें एक सूत्र । सकळांसी मिळोनि एकचि पत्र ।
देहभावना विचित्र । स्मरण होत ॥१२॥
स्मरणाउपरी अवस्था । ते लिहितां नव्हे व्यवस्था ।
बहुत निकट असतां । वियोग जाला ॥१३॥
हें ऋणानुबंधानें केलें । तें ऋणानुबंधावरी गेलें ।
आतां घडेल तें भलें । ऋणानुबंध ॥१४॥
एकी अवस्था दोहींकडे । अनृत लिहिणें न घडे ।
निमिष्यनिमिष्याचे निडें । स्मरण होतें ॥१५॥
तुम्हांसी प्रपंच आहे कांहीं । आम्हांसी तुम्हांवेगळें नाहीं ।
पत्र दरुशण सर्वहि । स्मरणें होतें ॥१६॥
ते सारिखे परस्परें । अंतरा होडती ( ओढती ? ) अंतरें ।
रघुनाथ भक्ताचेनि उपकारें । उपकारीं आहे ॥१७॥
आतां बहुत काय लिहावें । अंतरा अंतर जाणावें ।
तालीक करून पाठवावें । समस्तांसी ॥१८॥


प्रासंगिक कविता – प्रसंग १०

( शके १६०३ माघ वद्य ९ शनिवारीं दोनप्रहरीं श्रीसमर्थ परंधामास गेले. तत्पूर्वीं थोडा वेळ त्यांनीं श्रीरामरायापुढें बसून श्रींची प्रार्थना केली व जें शेवटचें मागणें मागितलें तें पुढील अभंगांत आहे. )
आज्ञेप्रमाणें परमार्थ । केला जाण म्यां यथार्थ ॥१॥
आतां देहाचा कंटाळा । आला असे जी दयाळा ॥२॥
आहे एकचि मागणें । कृपा करोनियां देणें ॥३॥
ज्याची दर्शनाची इच्छा । त्याची पुरवावी आस्था ॥४॥
ऐसें सखया वचन । त्यासी देईन दर्शन ॥५॥
तेरा अक्षरी मंत्राचा । जप करील तो साचा ॥६॥
त्याची संख्या तेरा कोटी । होतां भेटेन मी जगजेठी ॥७॥
भय न धरावें मनीं । बहु बोलिलों म्हणोनी ॥८॥
नलगे आसनीं बैसावें । नलगे अन्नही वर्जावें ॥९॥
येतां जातां धंदा करितां । जपसंख्या मात्र धरितां ॥१०॥
एका तेरा कोटींतचि । पापनाशन जन्मांतरिंची ॥११॥
मग तयासी दर्शन । देउनि मुक्त त्या करीन ॥१२॥
ऐसा वर होतां पूर्ण । दास जाला सुखसंपन्न ॥१३॥


प्रासंगिक कविता – प्रसंग ११

( शके १६०३ मध्यें श्रीसमर्थांनीं आपला अवतार संपविल्यानंतर तीन दिवसांनीं भीमस्वामी तंजावरकर सज्जनगडावर येऊन पोंचले आणि दर्शन झालें नाहीं म्हणून निग्रह करून बसले. तेव्हां समर्थांनीं समाधींतून प्रगट होऊन त्यांस दर्शन दिलें व पुढील अभंग सांगितला. हल्लीं श्री समाधीवर मधोमध जी चीर पडलेली दिसते ती याच वेळची होय, अशी आख्यायिका प्रचलित आहे. )
माझी काया गेली खरें । मी तों आहे सर्वांतरें ।
ऐका स्वहित उतरें । सांगईन ॥१॥
राहा देहाच्या विसरें । वर्तों नका वाइट बरें ।
तेणें भक्तिमुक्तीचीं द्वारें । चोजवतीं ॥२॥
नका करूं वटवट । पाहा माझा ग्रंथपट ।
तेणें सायुज्यतेची वाट । ठाईं पडे ॥३॥
बुद्धि करावी स्वाधीन । मग हें मजूर आहे मन ।
हेंचि करावें साधन । दास म्हणे ॥४॥


प्रासंगिक कविता – संत रामदास समाप्त.