पंचसमासी – संत रामदास

श्री रामदासस्वामीं विरचित – पंचसमासी

पंचमासी – समास १

॥ श्रीराम समर्थ ॥
गणेश शारदा सद्नुरु । संत सज्जन कुळेश्वरु । माझा सर्वहि रघुवीरु । सन्दुरुरूपें ॥१॥
माझें आराघ्य दैवत । परम गुह्य गुह्यातीत । गुह्यपणाची मात न चले जेथें ॥२॥
जें स्पर्शलें नाहीं वेदवाणीं । जे वर्णवेना सहस्रफणीं । जेथें अनुभवाची कडसणी । आटोनि गेली ॥३॥
जें शब्दासी अचाज । जें नि: शब्दाचें निजबीज । जें शंकराचें निजगूज । समाधिशोभा ॥४॥
जो वेदाचा । सायुज्यमुक्तीचा ठाव । भावनेचा अभाव । अभावेंसहित ॥५॥
जो शब्द बाहेर पडे । तें त्या शब्दापलीकडे । जें अनुभवितां मोडे । धांव मनाची ॥६॥
असें तेंचि आदिअंत । माझें आराध्यदवैत । जेथें सर्व मनोरथ । पूर्ण होती ॥७॥
जें सारांचे निजसार । जें आनंदाचें भांडार । जें मोक्षाचें बिढार । जन्म-भूमि ॥८॥
जें निर्विकल्प तरूचें फळ । अनुभवें पिकलें रसाळ । तया रसाचे गळाळ । घेती स्वानुभवी ॥९॥
झालिया रसाचे विभागी । अमरत्व जडे अंगीं । संगातीत महायोगी । होइजे स्वयें ॥१०॥
ऐसा जो कां परमपुरुष । निर्विकल्प निराभास । शुद्ध बुद्ध स्वयंप्रकाश । आत्मारामू ॥११॥
ऐशा जी सद्रुरु रामा । अगाध तुमचा महिमा । ऐक्यरूपें अंतर्तामा । मूळपुरुषा ॥१२॥
तुझ्या कृपेचे उजेडें । तुटे संसारसांकडें । दृश्य मायेचें मढें । भस्मोनि जाय ॥१३॥
तुझे कृपेचा प्रकाश । करी अज्ञानाचा नाश । भाविक भोगिती सावकाश । अक्षयी पद ॥१४॥
क्षयचि नाहीं कल्पांतीं । एक स्वयें आदिअंतीं । ऐसें सुख कृपामूर्ति । प्रकट कीजे ॥१५॥
जें साधनाचें निजसाध्य । निगमागमप्रतिपाद्य । योगेश्वरांचें सद्य । विश्रांति-स्थळ ॥१६॥
जें सकळ श्रमाचें सार्थक । जें भाविका मोक्षदायक । तुमच्या हदयीं अलौ-किक । परम गुह्य ॥१७॥
जें महावस्तूचें साधन । जें अद्वैतबोधाचें अंजन । जेणें पावती समाधान । महायोगी ॥१८॥
जेथें दु:खाचा दुष्काळ । निखळ सुखचि अळुमाळ । जें निर्मळ आणि निश्चळ । तेंचि तें अवघें ॥१९॥
ऐसें जें महा अगाध । योगेश्वराचें स्वत:सिद्ध । आत्मज्ञान परम शुद्ध । पाषांडावेगळें ॥२०॥
नाना मतें मतांतरें । सृष्टींत चाललीं अपारें । तयांमध्यें ज्ञान खरें । वेदांतमतें ॥२१॥
जें शास्त्रबाह्य घडलें । संता महंता बिघडलें । तें ज्ञानचि परी पडिलें । पाषांडमतीं ॥२२॥
असो सर्व प्रकारें शुद्ध । जें सर्वांमध्यें प्रसिद्ध । तया ज्ञानाचा प्रबोध । मज दीना करावा ॥२३॥
दुस्तर भवसागरू । स्वामी बुडत्याचें तारूं । मज दीनासी पैलारू । पाववावें ॥२४॥
ऐशीं करुणावचनें । बोलला म्लानवदनें । ऐकोन स्वामी आश्वासनें । बुझाविते झाले ॥२५॥
आतां प्राप्तीचा समयो । होईल अज्ञा-नाचा लयो । मोक्ष साधनाचा जयो । होय श्रवणें ॥२६॥
पुढील समासीं पूर्ण । ऐसें आहे निरूपन । श्रोतीं करावें श्रवण । सावध होवोनी ॥२७॥ इति श्री० ॥


पंचसमासी – समास २

॥ श्रीराम समर्थ ॥
सर्वांगाचे करोनि कान । तुम्हीं व्हावें सावधान । पहिले अध्यायीं प्रश्र । शिष्यें केला ॥१॥
तया प्रश्राचें उत्तर । आतां ऐका तत्पर । सांगिजेल सविस्तर । येच क्षणीं ॥२॥
जेणें निरसे हें अज्ञान । तया नांव ब्रह्मज्ञान । तया ज्ञानाचें लक्षण । ऐसें असे ॥३॥
स्वरूपीं सावधपण । हेंचि ज्ञानाचें लक्षन । ब्रह्मीं पडे विस्मरण । हे अज्ञानदशा ॥४॥
स्वरूपीं भुली पडतां । बहु लागे मोहममता । तेणें गुणें देहअहंता । दृढ होय ॥५॥
माझी माता माझा पिता । माझा पुत्र माझी कांता । माझा बंधू माझी सुता । जामात माझे ॥६॥
माझें घर माझा संसार । माझी जन्मभूमि सार । माझे सोयरे अपार । शेत वाडे पशू ॥७॥
माझें सपंत्ति । माझें वैभव माझी संतति । सर्वांचा अभिमान चित्तीं । दृढ झाला ॥८॥
ऐसें माझें माझें म्हणतां । अभिमानानें ओझें वाहतां । आयुष्य वेंचलें अवचितां । मरोन गेला ॥९॥
गोवून संसारीं वासना । अभिमानें भोगी यातना । विषयीं गुंतला चुकेना । जन्ममृत्यु ओझें ॥१०॥
नश्वर जाणोनि म्हणे माझें । व्यथचि अभिमानें फुंजे । माथां प्रपंचाचें ओझें । कुटुंबकाबाडी ॥११॥
जें जयाचें मनोगत । तया होय तेंचि प्राप्त । म्हणोनि विषयीं सक्त । तया स्वहित नाहीं ॥१२॥
चुकोनि आत्मज्ञान । धरिलें विषयीं ज्ञान । याला म्हणिजे अज्ञान । नेमस्त शिष्या ॥१३॥
आतां हें अज्ञान । तया निरसी तें ज्ञान । तया ज्ञानाचें लक्षण । ऐक सांगतों ॥१४॥
मी आत्मा ऐसें जाणिजे । तया नांव ज्ञान बोलिजे । हें ज्ञान सहज बोलिजे । अज्ञान कैंचें ॥१५॥
आत्मा पवावयाची खूण । आधीं पाहावें मी कोण । आपणासी पहांता पूर्ण । समाधान बाणे ॥१६॥
देह माझें जो जाणतो । तरी देहावेगळाचि तो । धनी गुरु माझे म्हणतो । तो गुरु नव्हे ॥१७॥
सर्व पदार्थ धनी जाणे । तरी तो पदार्थ होऊं नेणें । तैसा आत्मा सकळ जाणे । तो तया वेगळा ॥१८॥
मी कोण ऐसें पाहतां । देहाची मायिक वार्ता । आपण आपला शोध घेतां । आपण मिथ्या ॥१९॥
देहीं शोधितां मीपण उडे । मार्ग लागला आणिकीकडे । मूळासी जातां बापुडें । तो कोठें नाहीं ॥२०॥
देहसंगें वृत्ति मळे । शुद्ध ज्ञान तें झांकोळे । आपणा नेणतां आरंबळे । जीव दु:खें ॥२१॥
आपली शुद्धि घेवों जातां । आपण आत्माचि तत्त्वतां । बंधनचि नाहीं मुक्तता । होईल कैंची ॥२२॥
जन्म मृत्यु मायिक भ्रांति । हें आलें आत्मप्रचीती । अजन्मा तो आदिअंतीं । आपणचि आहे ॥२३॥
अनुभ-वितां आत्मस्थिती । मुळीं नाहीं पुनरावृत्ति । या नांव सायुज्यमुक्ति । जाण शिष्या ॥२४॥
जेथें शिणली वेदवाणी । तो तूं आत्मा पूर्णपणीं । सायुज्यमुक्तीचा धनी । तूंचि एक ॥२५॥
ऐकोनि शिष्य आनंदला । म्हणे जन्म सार्थक जाहला । माझा संशय फेडिला । सद्रुरुरायें ॥२६॥
नमस्कारोनि पुढती । बोलतां झाला स्वामीप्रती । हेंचि दृढ माझे चित्तीं । बैसवा स्वामी ॥२७॥
पुढिलिये समासीं । दृढ होईल शिष्यासी । श्रोतीं सावध कथेसी । अवधान द्यावें ॥२८॥ इति श्री०॥


पंचसमासी – समास ३

॥ श्रीराम समर्थ ॥
मागिले अध्यायीं निरूपण । निरोपिलें आत्मज्ञान । तेंचि आतां दृढीकरण । केलें पाहिजे ॥१॥
जें ब्रह्मादिकां दुर्लक्ष । तें मानवांसी सुलभ । ऐसा हा अलभ्य लाभ । सद्‍गुरुवचनें ॥२॥
परी हें बाणलें पाहिजे अंगीं । तरी होइजे धन्य जगीं । जेणें समाधान योगी । महानुभावां ॥३॥
जें समाधान उत्कट । अंगीं बाणतां संकट । कां जें प्रपंचासि निकट । संबंध आहे ॥४॥
बहुतां दिसांची भ्रांति । देहबुद्धीची संगति । आणि भगंवताची प्राप्ति । सांप्रत झाली ॥५॥
अनंत जन्मींचा काट जडला । अभ्यासचि पडोनि गेला । तो तितुकाहि झाडिला । पाहिजे कीं ॥६॥
सकळ सृष्टीचा दंडक । लोभें व्यापक एकेक । तयामध्यें हा विवेक । आठवेल कैंचा ॥७॥
आपुला संसार करितां । जीव सर्वकाळ दुश्चिता । तेणें गुणें भगवंता । अंतर पडे ॥८॥
क्षणभरहि प्राण्यास । माया घेवूं नेदी उमस । मिथ्या लोभासाठीं आयुष्य । व्यर्थ गेलें ॥९॥
उपाय होतां दिसेना । प्रपंची गुंतली वासना । तेणें गुणें समाधाना । अंतर पडे ॥१०॥
अनंत जन्मीं अभ्यास । तोचि आतां निजध्यास । लागला असे जगदीश । केंवी जोडे ॥११॥
मळीन वस्त्र धुतां धुतां । तेणेचि तें पावे शुद्धता । कैसा साधक तो भगवंता । साधनें पावे ॥१२॥
साधनेंवीण ब्रह्मज्ञान । तेणें बुडे समाधान । अंगीं जडे देहाभिंमान । वाचाळपणें ॥१३॥
शब्दज्ञान हातां आलें । मी सिद्ध ऐसें कल्पिलें । बळेंचि धारिष्ट धारिलें । सिद्धपणाचें ॥१४॥
तें धारिष्ट अंतीं उडे । प्राणी महासंशयीं पडे । शेखीं जन्म मृत्यु घडे । भोगणें संशयें ॥१५॥
म्हणोनि जाणते पुरुषीं । सांडूं नये साधनासी । भांडूं नये आपणासी । सिद्धपणें सर्वथा ॥१६॥
जो सिद्धाचाहि सिद्ध । ज्ञानवैराग्यप्रसिद्ध । सामर्थ्यसिंधु अगाध । कैलासराणा ॥१७॥
तो सिद्ध करी साधन । सर्वकाळ रामचिंतन । ध्यान धारणा अनुष्ठान । चुकों नेदी ॥१८॥
ऐसे अपार महामती । झाले ते साधन करिती । तरी तेथें मानव । बापुडे किंकर ॥१९॥
राज्यपदाचे गुणें । रासभारूढ होणें । हें लोकीं लजिरवाणें । निपटचि झालें ॥२०॥
मी सिद्ध ऐसें कल्पुनी । नित्यनेम न धरी मनीं । तत्पर अशनशयनीं । आत्महत्यारी ॥२१॥
ज्ञानें भाव पालटला । देवाचा पाषाण झाला । ज्ञानें संत सज्जनाला । भौतिक भावी ॥२२॥
जप कोणाचा करावा । नेम कोणाचा धरावा । सर्वात्मा भजावा । कोण सद्रुरु ॥२३॥
स्वयें धर्म न करिती । पुढिलां वेड लविती । भेदला गेला नाहीं म्हणती । वाचाळ ज्ञानी ॥२४॥
सहज सोडूनि उपाधि । तें तय नेमस्त बाधी । म्हणोनि भजनविधी । चुकों न द्यावा ॥२५॥
बिढार नाहीं भक्तीचें । तेथें समाधान कैंचें । भिंतीवरील भस्माचें । झालेपण ॥२६॥
भक्तीवीण जें ज्ञान । तेंचि सोलीव अज्ञान । तेणें कांहीं समाधान । होणार नाहीं ॥२७॥
समाधानीं जो आगळा । तेथें भक्तीचा जिव्हाळा । जैसीते गृहाची कळ । आंगण सांगे ॥२८॥
भक्तीवीण देव जोडे । ऐसें कल्पांतीं न घडे । भक्तीकरितां साधक जडे । भगवंतीं ॥२९॥
आतां भक्ति ते कैसी । दृढ व्हावया ज्ञानासी । हेंचि पुढिले समासीं । बोलिजेल ॥३०॥ इति श्री० ॥


पंचसमासी – समास ४

॥ श्रीराम समर्थ ॥
मागां बोलिलें निरूपण । केलें पाहिजे साधन । तया साधनाचें लक्षण । ऐसें असे ॥१॥
व्हावया ज्ञानाची प्राप्ति । आधीं केली पाहिजे भक्ति । भक्ति घडलिया मुक्ति । पाठी लागे ॥२॥
मोक्षभुवन अतिसुंदर । आनंदरूप मनोहर । तेथें जावया विचार । ऐक बापा ॥३॥
तेथें नऊ पायर्‍या उत्तम । ऐक पायरी प्रथम । जी चढतां तुटे श्रम । नि:शेष जीवांचा ॥४॥
तें तूं गा श्रवण । करावें नित्यनिरूपण तया निरूपणाची खूण । ऐसी असे ॥५॥
सज्जन आणि कृपाळू । ज्यास ज्ञान परिमळू । तया संगतीनें मळू । तुटे अज्ञानाचा ॥६॥
अद्वैतचर्चा अखंड । जेथें नाहीं पाषांद । तये संगतीनें बंड । नुरे मीपणाचें ॥७॥
श्रवण करावे ते ग्रंथ । जेथें बोलिला परमार्थ । शृंगार-श्रवणीं अनर्थ । नेमस्त आहे ॥८॥
म्हणोनि तें त्यजावें । जेथें नाना युक्तिलाघवें । भक्ति ज्ञान वैराग्य भावें । घ्यावें आदरें ॥९॥
नाना कथा चमत्कार । नवरसिक अपार । तें त्यजूनिया सार । अद्वैत घ्यावें ॥१०॥
श्रवण केल्याचें फळ । क्रिया पालटे तत्काळ । तेणें करितां प्रांजळ । आत्मज्ञान होय ॥११॥
सगुण सर्वोत्तमाचें ध्यान । करावें गुणानुवादन । हरिकथानिरूपण । करीत जावें ॥१२॥
या नांव दुसरी भक्ति । ऐक तिसरीची स्थिति । सर्वकाळ आदरें चित्तीं । नाम असावें ॥१३॥
चवथी पादसेवन । पांचवी असे अर्चन । सकळांचें करावें पूजन । विधीप्रमाणें ॥१४॥
सकळवंदन सहावी । दास्यत्व ही सातवी आतां ऐका आठवी । भक्ति कैशी ॥१५॥
सखा देवचि मानावा । अख्मड तोचि आठवावा । भार आभार घालावा । तयावरी ॥१६॥
नववी ते अद्वैत जाण । करावें आत्मनिवेदन । विचार घेतां अभिन्न । मुळींच आहे ॥१७॥
हें नवविध भजन । सायुज्यमुक्तिसाधन । तेणेंकरितां शुद्ध ज्ञान । प्राण्यास होय ॥१८॥
शुद्ध ज्ञानाचे बळेम । अंतरीं वैराग्य प्रबळे । तेणें लिंगदेह मोकळें । होय वासनेसी ॥१९॥
लागे स्वरूपानुसंधान । नाठवे देहाभिमान । विश्रांतीतें देखे मन । तद्रूप होय ॥२०॥
आदिपुरुष एकला । नाहीं द्वैताचा गलबला । संगत्यागें अवलंबिला । शुद्ध एकांत ॥२१॥
तेथें मन पांगुळलें । आपणास विसरलें । आपणास भुलोन गेलें । स्वरूपबोधें ॥२२॥
मी कोण हें नकळे । अवघा आत्मा प्रबळे । तेणें बळें मन मावळे । कर्पूरन्यायें ॥२३॥
तेथें शब्द कुंठित झाला । अनुभव अनुभवीं निमाला । आतां असो हा गलबला । कोणीं करावा ॥२४॥
वाटे एकांतासी जावें । पुन: हें अनुभवावें । उगें निवांत असावें । कल्पकोटी ॥२५॥
नमो वक्तृत्त्वउपाधि । पांगुळली स्वरूपीं बुद्धि । लागली सहज समाधी । हेतुरहित ॥२६॥
गुरु शिष्य एक झाले । अनुभवबोधीं बुडाले । त्यांचे शुद्धीस जे गेले । तया तीच गति ॥२७॥
तुटला स्मसारबंधू । आटोनि गेला भवसिंधू । बुडाला बोधीं प्रबोधू । विवेकबळें ॥२८॥
ज्ञानाग्नि प्रगट झाला । मायाकर्पूर जळाला । विवेकें अविवेक ग्रासिला । तये ठायीं ॥२९॥
झालें साधनाचें फळ । चुकलें जन्माचें मूळ । निष्कलंक आणि निर्मळ । तोचि आत्मा ॥३०॥
दृढ बाणली आत्मस्थिति । मिथ्यत्वें मुरडली वृत्ति । सांगिजेल वर्तनगति । पुढील समासीं ॥३१॥ इति श्री० ॥


पंचसमासी – समास ५

॥ श्रीराम समर्थ ॥
आतां शिष्या सावधान । मागील कथानुसंधान । झालिया आत्मनिवेदन । आली वृत्ति मिथ्यत्वें ॥१॥
धन पाहोनि लोभी आलें । परी मन तेथेंचि बैसलें । शरीरप्रकृतिं । भ्रांतापरी ॥२॥
कार्य करी प्रपंचाचें । ध्यान लागलें धनाचें । अंतर गुंतलें तयाचें । द्रव्याकडे ॥३॥
ऐसें परम झालें मन । ध्यानीं आठवे धन । पिसें लागलें स्वप्र । तैसेंचि देखे ॥४॥
तो ज्ञाता समाधानीं । प्रारब्धयोगें वर्ते जनीं । परी अनु-संधान मनीं । वेगळेंची ॥५॥
वृत्ति गुंतली स्वानुभवें । जनीं तेंचि भासे आघवें । सबाह्य व्यापिलें देवें । ब्रह्मांड अवघें ॥६॥
वृत्ति मुळाकडे पाहे । त्यास राम दिसताहे । स्तब्ध होवोनियां राहे । रामचि दिसे ॥७॥
मन मुरडे आटे । तंव मार्गीं राम भेटे । मागें पुढें प्रगटे । रामचि अवघा ॥८॥
दाही दिशा अवलेकितां । रामचि भासे तत्त्वतां । वदन चुकवूं जातां । सन्मुख राम ॥९॥
राम झालिया सन्मुख । कल्पांतीं नव्हे विन्मुख । नेत्र झांकितां अधिक । रामचि दिसे ॥१०॥
मग विसरोनि पाहिलें । तंव तें रामचि झालें । जीव सर्वस्वें वेधिले । संपूर्ण रामें ॥११॥
मग आपणा पाहे । तंव रामचि झाला आहे । उभय-साक्षी जो राहे । तोचि राम ॥१२॥
रामेंविन सर्वथा कांहीं । अणुमात्र रितें नाहीं । दृश्य द्रष्टा दर्शन तेंही । रामचि भासे ॥१३॥
प्रपंच सारिला मानसें । दृढ लागलें रामपिसें । देह वर्ते भ्रमिष्ट जैसें । पिशाचवत्‍ ॥१४॥
रामरूपीं वेधलें मन । तेणें राहे कुलभिमान । पूर्व दशेचें लक्षण । पालटोनि गेलें ॥१५॥
धरूनि रामरूपीं आवडी । प्रपंच गेला ताडातोडीं । माया राहे बापुडी । न चले कांहीं ॥१६॥
प्रत्यक्ष जन प्रगटला । दृश्य पदार्थ बोधिला । असतच नाहींसा झाला । सद्रुरुप्रतापें ॥१७॥
ऐसें नाहीं हेंगे तेंगे । ऐसें तैसें पुढें मागें । पूर्वस्थिति बोलणें लागे । ऐसिया परी ॥१८॥
स्वरूप बोलिलें नव जाये । बोलिल्यावीण हातां नये । म्हणोनि शब्द उपाये । रचिला देवें ॥१९॥
शब्दाचे उदरीं अगाध । सांठवला नीतिबोध । अर्थ पहातां स्वानंद । तुंबळे बळें ॥२०॥
शब्दमथन शब्दें केलें । अर्थ नवनीत प्रगटलें । मथनकर्त्यासी भक्षिलें । त्या नवनीतें ॥२१॥
प्रपंचतक्राअंतरीं । नवनीत वास्तव्य करी । तक्र आटोनि पात्रभरी । नवनीत झालें ॥२२॥
अवघें नवनीत दाटलें । तेणें बळें पात्र फुटलें । नवनीतें संपूर्ण झालें । ब्रह्मांड अवघें ॥२३॥
तेथेंहि दाटलें उदंड । तेणें उतटलें ब्रह्मांड । सकळ लोपोनि उदंड । तेंचि तें झालें ॥२४॥
नवनीत प्राप्त व्हावयासी । जातां तयासि तेंचि ग्रासी । सकळ पदार्थमात्रासी । नवनीतें सेविलें ॥२५॥
सेविलें आपणा आपण । हे अनुभवाची खूण । ग्रंथ झाला संपूर्ण । पंचसमासी ॥२६॥
सद्रुरूसी जातां शरण । शीघ्र तुटे जन्ममरण । सर्व मनोरथ पूर्ण । होती वचनमात्रें ॥२७॥
देह नासे क्षणांतरीं जाणोनि सार्थक करी । तो एक धन्य संसारीं । सत्संगेंचि ॥२८॥
उपजला प्राणी तो नासे । आपणा तो मार्ग असे । म्हणोनि दृढ विश्वासें । सद्रुरुपाय धरावे ॥२९॥
चालवीत असतां आश्रम । जे होइजे आत्माराम । ऐसा हा सत्यमागम । महिमा कोटिगुणें ॥३०॥
श्रोतीं सावध होणें । अंतकाळीं लागे जाणें । येथील राहाती सजणें । आणि संपत्ति ॥३१॥
बहु जन्मांचे शेवटीं । नरदेह पुण्यकोटी । म्हणोनि भगवंता भेटी । होती सत्संगें ॥३२॥
ऐशी खूण सकळांस । सांगोनि गेला रामदास । सत्संगे जगदीश । नेमें भेटे ॥३३॥
अरुख बोबडी वाणी । भावें पूजिला कोंदडपाणि । न्यून पूर्ण संतजनीं । क्षमा केली पाहिजे ॥३४॥
॥ पंचसमासी ग्रंथ संपूर्ण ॥ ओवीसंख्या ॥१५०॥


पंचसमासी -संत रामदास समाप्त .