पंचमान – संत रामदास

श्री रामदास्वामीं विरचित – पंचमान

पंचमान – मान १

( अनुष्टुभ् छंद. )

गणाथा गणाधीशा । गणेशा गणनायेका
गणेंद्रा गंभीरा गुणा । गणपती गजानना ॥१॥
पद्माक्षी पद्मवदना । निगमागमनायेका ।
दायका सकळा विद्या । गायका नमिली मनीं ॥२॥
राघवा राजसा रामा । रामचंद्रा रघोत्तमा ।
रत्नविभूषणा देवा । रम्यराजीवलोचना ॥३॥
कामरूपा कळारूपा । कूठस्ता कमलाकरा ।
केशवा कमळाकांता । कारणा कमळानना ॥४॥
परेशा पार्वतीकांता । पावना परमेश्वेरा ।
पापविध्वांसना देवा । पाव पावकलोचना ॥५॥
मांर्तडमंडळा देवा । तेजोरासी प्रकाशका ।
तुझेनी वर्तती सर्वै । श्रीरामकुळभूषणा ॥६॥
जीवनें उत्पत्ति  स्थिति । जीवनें जीव वांचती ।
तुझेन सवहि तीर्थे । धन्य आपोनारायणा ॥७॥
जठरान्नी समस्तां लोकां । वांचवी सर्वभक्षकु ।
सर्वत्र ब्राह्मणा पूजा । मुख्य देव हुताशनु ॥८॥
वर्तवी सकळै लोकां । प्राणरूप जगत्रंई ।
म्हणोनि धन्य तो वायु । चालवी जगडंबरू ॥९॥
निर्मळा निश्चळानंता । निर्गुणा गुणव्यापका ।
निसंगा नित्य निकामा । निर्धूत परमेश्वरा ॥१०॥
गणेश शारदा देवी । सिधा बुधीच मूशकू ।
नाना फणी मणीधर्ता । या ध्यानें मूर्ख तो भला ॥११॥
ईश्वरु गिरजा गंगा । वीरंणा स्वामिकार्तिकु ।
सर्पकुळें नंदी बस्वा । या ध्यानें सुखसंपदा ॥१२॥
सर्वात्मा शेषशाई तो । श्रीहरी गरुडध्वजु ।
वैकुंठभुवनीं नांदे । या ध्यानें धारणा घडे ॥१३॥
गाइत्री सावित्री ब्रह्मा । इंद्रदेव रुसी मुनी ।
गंधर्वनारदादीक । या ध्यानें वैभवीं रती ॥१४॥
मछ कूर्म वर्‍हा तो । लक्षुमी नृसींह वामनु ।
भार्गव भार फेडीतो । या ध्यानें पुण्यसंग्रही ॥१५॥
वसीष्ठ ब्रह्मयोगी तो । राम सोमीत्र जानकी ।
भीम बिभीषणु मीत्रु । या ध्यानें बंदमोजने ॥१६॥
श्रीकृष्ण गोपिका सवैं । गाई गोपाळ वांसुरें ।
वेणुनादीं क्रिडाछेंदीं । या ध्यानें उत्तमां गती ॥१७॥
बोध्य कलंकी पुढें आहे । पुराणें सांगती लिळा ।
मल्लारी भैरवो देवो । या ध्यानें दंडणा खळां ॥१८॥
तुळजा काळिका लक्षुमी । कामाक्षी बनशंकरी ।
चंडिका रेणुका माता । या ध्यानें मनकामना ॥१९॥
बारा लिंगें विष्णुमूर्ति । नाना देव भुमंडळीं ।
सीवशक्ती बहुरूपा । या ध्यानें श्रीहरी सुखी ॥२०॥
गंगा भागीरथी कृष्णा । कावेरी मनकर्णिका ।
नर्मदा गंडिका नद्या । या ध्यानेची पवित्रता ॥२१॥
तीर्थें क्षेत्रें झरे टांकीं । कूप बावी सरोवरें ।
नाना पुण्यभुमी श्रेष्ठा । आटणें धर्मवासना ॥२२॥
खंडे द्बीपे सप्तसिंधु । भुयेरीं देउळें स्छळें ।
नान बनें वनारण्यें । या ध्यानें वृत्ति वावरे ॥२३॥
कपाटें वीवरें गुंफा । पावनें गिरिकंदरें ।
या ध्यानें तापसी होणें । दिशा दिग्गज दिग्‍पती ॥२४॥
रवी शशी ग्रह तारा । ढग मेघ विद्युल्लता ।
भुमी आपोनळो वायो । या घ्यानें तर्क नीवळे ॥२५॥

मान ॥१॥


पंचमान – मान २

वायोमधें देव नाना । वायोरूपेंची देवता ।
त्रैलोक्य चालवी वायो । वायोस्तुनि न बोलवे ॥१॥
निश्चळा वेगळा वायु । चंचळा  वर्तवी सदा ।
देव तो हाची जाणवा । सर्व देह्यांतरीं वसे ॥२॥
येकांगें पाहातां वायो । येकांगें पाहातां हरी ।
चंचळत्वें जग्गजोती । आत्मा त्यासीच बोलीजे ॥३॥
सर्वात्मा सर्व अंतरात्मा । सर्वसाक्षी सर्वोत्तमु ।
सर्वकर्ता सर्वभोक्ता । सर्वत्र देहधारकु ॥४॥
बहु देही बहु लीळा । बहु रूपी बहु कळा ।
बहु रंगी बहु संगी । बहु गुण बहु बहु ॥५॥
जगदीश जगदात्मा । जाणता जगजीवनु ।
जुनाट जजरी काया । धरी त्यागी परोपरीं ॥६॥
चालवितो दिसेना कीं । शरीरें चालती खरें ।
क्तीयेनें प्रत्यया येतें । रूप तें पाहातां नये ॥७॥
देहे हा आस्तीमौंशाचा । त्यामधें प्राण वासना ।
वासना जाणते सर्वै । प्राण देह्यास चेतवी ॥८॥
प्राण तों चेतना देहीं । प्राण जातां घडेचिना ।
तया प्राणांतरीं वर्ते । जाणती जगज्जोती हे ॥९॥
सुषुप्ती आवस्तेमघें । प्राण तो येत जातसे ।
परंतु नेणवे कांहिं । वेगळी जाणती कळा ॥१०॥
देह्यांतीं टाकितां देहो । मन प्राण समागमें ।
येक तें निवडेना कीम । तथापी भेदही कळे ॥११॥
कळे त्याला कळे सर्वैं । कळेना त्या कळेचिना ।
म्हणोनि सांडीजे हेंका । प्रत्ययो पाहाणें बरा ॥१२॥
आंडजा जारजा खाणी । स्वेतजा उत्बीजादीका ।
नाना देह्यांतरीं वर्ते । द्रष्टा पाहे परस्परें ॥१३॥
नाना परादिका वाणी । नाना देश भाषा रीती ।
नाना क्षत्रीं नाना स्थानीं । येकला नट नाटकु ॥१४॥
ज्ञानघनु ची सर्वज्ञु । कांहीं येक पुरातनु ।
नाना विद्या कळा जाती । दक्ष धूर्त विचक्षणु ॥१५॥
गुरु तो शिष्य तो जाला । शिष्य तोची पुढें गुरु ।
देव तो भक्त तो ज्ञानी । सर्व तो जगदांतरें ॥१६॥
थोर तो धाकुटा मोठा । सर्वत्र वैश्वानरु ।
तथा बीजाकारे पाणी । येकहि भेदहि दिसे ॥१७॥
बहु भाग्य सभागी तो । अभागी अल्पवैभवें ।
भाग्यांशें पाहातां येकु । थोडया भाग्यें न मानिती ॥१८॥
जाणणें म्हणिजे ज्ञान । ज्ञानें सर्वत्र वर्तती ।
परंतु येक तो ज्ञानी । येक तो ज्ञानसाधकु ॥१९॥
कीतेक देवतें भूतें । कीतेक ब्रह्मयोगिणी ।
कीतेक हरीहरादिक । सर्वत्र जाणती कळा ॥२०॥
कल्पना कामनारूपें । वायोरूप विराजती ।
कीतेक घुमती आंगीं । प्रचात रोकडी जनीं ॥२१॥
आपलाल्या साभिमाने । मीपणें वाद घालिती ।
शरीरभावना भिन्न । भिन्नें क्षत्रे परोपरीं ॥२२॥
वास घे वासना देवो । स्थुळेंवीण खातां नये ।
म्हणोनी ब्राह्मणा द्यावें । विप्रमुखें संत्रुप्तता ॥२३॥
निर्वैर सर्वभूतांसीं । वर्तणें न घडे कदा ।
उगेंची वेर्थ बोलावें । चालणें न घडे कदा ॥२४॥
नेणताम नुमजे कांहीं । तारुणी मकरध्वजु ।
वृधाप्य आदळे आंगीं । दु:ख ब्रह्मांड कोसळे ॥२५॥
मागील कोण तो जन्म । माता पिता कळेचिना ।
कन्या पुत्र वधु कोण । कोण ते जन्मभूमिका ॥२६॥
मागील नाठवे आतां । आतांचें नाठवे पुढें ।
येकाकी येकलें  जावें । मायाजाळें भ्रमे जनु ॥२७॥
संचितासारिखे येती । प्राणी हे भोग भोगिती ।
भोगणें पुर्वीचा ठेवा । म्हणोनि पुण्य पाहिजे ॥२८॥
पुण्यमार्गें भले जाती । पापीष्टें पाप संचिती ।
पापयोगें माहां दुखें । पापयोगें दरीद्रता ॥२९॥
पातकी दैन्यवाणा तो । निंद्रा द्वेष वसे मनीं ।
न्याय अन्याय तो नेणे । मातला मदमछरें ॥३०॥
देव धर्म क्तिया नेणें । भ्रष्ट चांडाळ दुर्जनु ।
कुकर्मी घातकी दोषी । या लोका येमयातना ॥३१॥

इति श्रीपंचमाने स्वल्पसंकेते अंतरात्माविवरण नाम मान दुसरें ॥२॥


पंचमान – मान ३

धन्य ते योगीये साधु । पावले परमेश्वरा ।
आपुलें हीत तें केलें । तरले तारिले जना ॥१॥
सत्कर्में शोभती वेष । बोलणें मधुरा गिरा ।
पुण्यात्मे सुकृती न्याई । योजिती धर्मस्छापना ॥२॥
विशाळा पावना बुधी । विशाळा सुखकारकी ।
परोपकारणी काया । परत्र लोंकसंग्रहीं ॥३॥
यातना सेवका नाहिं । ते तवं ईश्वरी तनु ।
उपायें सोडवी लोकां । तो संग सुकृतें घडे ॥४॥
सन्मार्ग साधनालागी । संग तों पाहिजे बरा ।
सत्संग शोधितां नाहिं । सत्संग हीतकारकु ॥५॥
कुसंगें नासती प्राणी । सत्संगें पावती पदा ।
यांत मानेल तें घ्यावें । सर्वज्ञ जाणते तुम्ही ॥६॥
संसार पाहिला डोळां । रंग वोरंग होतसे ।
हांसती रुदती प्राणी । सुखदु:खें परोपरीं ॥७॥
देखिलें चाखिलें मागें । जन्मदारभ्य आठवे ।
निशेष राहिल्या शक्ती । रोग व्याधी विटंबणा ॥८॥
दैन्यवाणा देहे जातो । ते काळीं हीत नाकळे ।
म्हणोनि धन्य ते साधु । मायात्यागेंची सुटले ॥९॥
संपती संतती विद्या । शक्ती सामर्थें जातसे ।
दक्ष ते जाणती आधीं । बावळीं भुलली मदें ॥१०॥
राहिला कोण ये लोकीं । संहार रावणादिकां ।
इतरां कोण तो लेखा । नेणती मूढ माणसें ॥११॥
मधेंची झांकिली काया । येतां जातां दिगांबरी ।
जाणती तापसी योगी । संगत्यागें सदा सुखी ॥१२॥
मी मोठा मी मोठा वाटे । न शोधितां वसुंघेरा ।
चालिला गर्व कोणाचा । काळ हा घसरी जना ॥१३॥
पाहाता रंक ते राजे । राजे रंक पुन्हपुन्हा ।
भर्वसा कोण मानावा । हाणी मृत्य समागमें ॥१४॥
लाभ तो येक जाणावा । परमात्मा परमेश्वेरु ।
भक्तीनें आपुला कीजे । विचक्षणें चुकों नये ॥१५॥
चुकतां मुख्य देवासी । चुकेना येम यातना ।
म्हणोनि सद्नुरु कीजे । न कीजे आवलक्षणु ॥१६॥
शाक्त मुक्त अनाचारी । मंत्र येंत्र करामती ।
नाटकी चेटकी भोंदु । तो गुरु न मने मना ॥१७॥
कर्मठु नित्य संदेही । ज्ञानहीण तमोगुणी ।
अवैरागी माहांडंभी । तो गुरु न मने मना ॥१८॥
तीर्थें व्रतें तपें दानें । बहुधाशास्रनिश्चंई ।
प्रत्ययो नाडले जेथें । तो गुरु न मने मना ॥१९॥
असार कोण तें नेणे । सार तें तों कळेचिना ।
सर्व सार वदे लोकां । तो गुरु न मने मना ॥२०॥
कर्ता कोण तो नेणे । नेणे चंचळ निश्चळु ।
त्रिगुण कोण तें नेणें । तो गुरु न मने मना ॥२१॥
निष्ठाहीण अविश्वासी । वेसनी परधातकु ।
भ्रमिष्ट आळसी मंदु । तो शिष्य न पवे पदा ॥२२॥
लालची तामसी वेडा । नष्ट भ्रष्ट बहुचुकु ।
प्रज्ञाहीण प्रेत्नहीण । तो शिष्य न पवे पदा ॥२३॥
सुखवासी गोडग्रासी । निकामीच निसंगळु ।
कदापी धारणा नाहिं । तो शिष्य न पवे पदा ॥२४॥
विवरेना विचारीना । श्रवणीं मननीं कदा ।
प्रत्यय पाहिल्यावीण । तो शिष्य न पवे पदा ॥२५॥
तत्वज्ञानें ब्रह्मज्ञानें । पिंडब्रह्मांडनायेकु ।
विवेकें चोजवीना जो । तो शिष्य न पवे पदा ॥२६॥
इति श्रीपंचमाने स्वल्प संकेते ॥ गरुशिष्यलक्षण नाम ॥३॥


पंचमान – मान ४

भाविकें सात्विकें भोळीं । त्या नामस्मरणे रती ।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥१॥
मंत्र येंत्र जप ध्यानें । भाविकें तोषती मनीं ।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥२॥
तीर्थें व्रतें तपें दानें । भाविकां सुख होतसे ।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥३॥
होम याग पुन्हश्चर्णें । स्वप्रनिष्टां स्वभाविकां ।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥४॥
देखणी आसनें मुद्रा । जप होम विधी पुजा ।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥५॥
भाविकां प्रतिमापूजा । पुराणें माहात्में शुभें ।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥६॥
भाविकांला फलश्रुती । चमत्कारेंची निश्चयो ।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥७॥
पिंगळे पाली सींकोटीं । ग्रह मुहूर्त भाविकां।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥८॥
राजसें तामसें कर्में । नाना नवस भाविकां ।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥९॥
दंडणा कामना यात्रा । भाविकास उपोषणें ।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥१०॥
भाविकें घालिती डांका । भोग राहाण गोंघळ ।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥११॥
भाविकां आगमी निष्ठा । शडचेक्र योगधारणा ।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥१२॥
तीथीं पर्व माहोछाई । भावीकें जाव लविती ।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥१३॥
मालीदेकौळकांकाले । भावीकें गळ टोंचिती ।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥१४॥
नाना नेम क्रिया निष्ठा । भावीकां बहु साधनें ।
विवेकी जाणते घेती । सारासारविचारणा ॥१५॥
शोधितां आष्टही काया । पींडब्रह्मांडनायकु ।
तुटला थोर संदेहो । धोका येमजातनेचा ॥१६॥
हें वर्म जाणती ज्ञानी । तत्वज्ञ जाणते जनीं ।
पंचीकर्ण माहांवाक्यें । सारासारविचारणा ॥१७॥
दक्ष ते पावती खुणें । बावळीं भुललीं मदें ।
सोहं हंसा विचारावें । त्रिवीधा बंदमोचनें ॥१८॥
ब्रह्मास्मी ब्रह्महमास्मी । अहं ब्रह्म विशेषता ।
येदर्थींच प्रवेशावें । आत्मनिवेदनी क्तिया ॥१९॥
जाणतां चुकती जन्म । जाणतां पद पावणें
जाणतां सर्वहि सिधी । जाणणेंची विशेष हें ॥२०॥
नेणतां वेर्थ कष्टावें । नेणतां तामसी क्रिया ।
नेणतां निर्पळी विद्या । नेणणें सर्व घातकी ॥२१॥
आयुष्य वेचलें वांयां । तपें दानें तीर्थाटणें ।
देखणी आसनें मुद्रा । शडचक्त योगधारणा ॥२२॥
धोती पोथी भुजंगी ते । अष्टांग योगसाधनें ।
गोरांजनें धूम्रपानें । पंचाग्री हीमसाधने ॥२३॥
उदास तापसी काया । अन्नवस्रविवर्जिता ।
उपोशनी पुन्हश्चर्णीं । निरोधी हटनिग्रही ॥२४॥
निरोधें गादती काया । निरोधें कर वाळती ।
निरोधें सुकती गात्रें । निरोध भ्रमकारकु ॥२५॥
निरोधी प्राण रोधीतो । निरोधी भूतसंग्रही ।
निरोधी आगमी क्रोधी । निरोध परघातकु ॥२६॥

श्लोक
शैवशाक्तागमाद्या य अन्य च बहवो मता: ।
अपभ्रंशसमास्पे‍ऽपि जीवानां भ्रांतचेतसाम् ॥१॥
चित्त हें मैळलें काटें । चित्तशुधी घडेचिना ।
म्हणोनि चित्त शोधाया । नित्यानित्य विवेकु हा ॥२७॥
नित्यानित्यविवेकानें । चुकती येमयातना ।
प्रत्ययो पाहाणें आतां । रोकडा ब्रह्मनिश्चयो ॥२८॥
मी कोण हें चि शोधावें । मायातीत निरंजनु ।
नीसंग होईजे येणें । ज्ञानें मुक्ती सायोज्यता ॥२९॥

इति श्रीपंचमाने स्वल्पसंकेते सारआसारविवेक मान ॥४॥


पंचमान – मान ५

ज्ञानेंची चुकती जन्म । ज्ञानेंची सुटीका घडे ।
ज्ञानेंची पाविजे मुख्या । निर्गुणा परमेश्वेरा ॥१॥
ज्ञानेंची ज्ञान शोधावें । ज्ञानें आज्ञान त्यागणें ।
ज्ञानेंची पाविजे मुख्या । निर्गुणा परमेश्वेरा ॥२॥
ज्ञानेंची चालती कर्में । ज्ञानमार्ग उपासना ।
ज्ञानेंची पाविजे मुख्या । निर्गुणा परमेश्वेरा ॥३॥
ज्ञानेंची प्रत्ययो येतो । ज्ञानें संदेह तुटती ।
ज्ञानेंची पाविजे मुख्या । निर्गुणा परमेश्वेरा ॥४॥
ज्ञानेंची वेद वेदांतीं । ज्ञानेंची सुटीका घडे ।
ज्ञानेंची पाविजे मुख्या । निर्गुणा परमेश्वेरा ॥५॥
ज्ञानेंची सर्वही सिधी । ज्ञानेंची सकळै कळा ।
ज्ञानेंची तिक्षणा बुधी । नित्यानित्य विवेक हा ॥६॥
ज्ञानेंची धारणा धृती । ज्ञानेंची सर्वसाधनें ।
ज्ञानेंची पाविजे मुख्या । निर्गुणा परमेश्वेरा ॥७॥
सर्वारंभ तो ज्ञानें । ज्ञानें त्रैलोक्य चालतें ।
परंतु मुख्य तो ज्ञानी । परत्र पाववी जना ॥८॥
जेथुनी सर्वही जालें । पुन्हा तेथेंची आटलें ।
सीधांत तोची जाणावा । जेथें दृश्यची नाडले ॥९॥
चंचळीं जाणणें मोठें । निश्चळीं निश्चयात्मकु ।
आद्यंत येक तो देवो । तो देव ज्ञानसाधकु ॥१०॥
बरें पाहें आपणाला । शोधीतां नाडळे नसे ।
येक तो आडळे देवो । नित्य शाश्वत संचला ॥११॥
असत्य पाहातां नाहिं । सत्य सर्वत्र संचलें ।
पदार्थेंवीण जें कांहिं । कदाकाळीं चळेचिना ॥१२॥
तें ब्रह्म जाणिजे संतीं । जेथें विकार नाडळे ।
निर्गुण निर्विकारी जें । नित्य नूतन तेंची तें ॥१३॥
चैतन्य चेतवितें तें । जाणते साक्ष बोलीजे ।
जाणावें चेतवावें तें । तेंची हें पाहातां नसे ॥१४॥
या देह्याचेनी जें नावें । तें नांवं देहे तंवरी ।
नासतां सर्वहि देहो । ग्रामो नास्ति कुतो सीमा ॥१५॥
अंत:करण जाणतें तें । प्राण चैतन्य बोलीजे ।
जडांश चेतवीतो तो । मुख्य प्राण देहे धरी ॥१६॥
प्राण तों चालती काया । प्राण तों चेतना घडे ।
प्राण तों जाणणें सर्वै । प्राण जातां घडेचिना ॥१७॥
पंचभूतीक हे काया । शोधितां पांच पंचके ।
कर्णपंचक तें जाणे । प्राणपंचक चेतवी ॥१८॥
प्रचीत पाहाती ज्ञानी । प्रचीतीवेगळीं मुढें ।
तत्वार्थ प्रत्यया आणी । धन्य तो ज्ञानसाधकु ॥१९॥
तत्वार्थ शोधितां आतां । प्रचीत रोकडी घडे ।
मोक्ष तो हाची जाणावा । तत्वबंदविमोचनें ॥२०॥
वाच्यांश सांडणे मागे । लक्षांश पाहाणें बरा ।
आत्मनिवेदनी भक्ती । कृत्याकृत्यची होईजे ॥२१॥
हें ज्ञान रामकृपेनें । धन्य रामउपासना ।
रामदास्य घडे ज्याला । ते सर्वत्र रामदास हो ॥२२॥
येकसेंबतींसां श्लोकीं । साधकें पाहाणें बरें ।
आव्यात्म शोधणें सर्वै । दासबोधीं समाप्यते ॥२३॥
इति श्रीपंचमागे स्वल्पसंकेते सारासारविचारनिरूपणनाम मान पांचवें ॥५॥१३२॥
॥ येकूण संख्या ॥५३०॥


पंचमान – संत रामदास समाप्त