रामदासांची आरती

पंचीकरणादी अभंग – संत रामदास

पंचीकरणादी अभंग

पंचीकरणादी अभंग – १ ते ५


पंचीरणादी अभंग :- १
ओवीचे आरंभी वंदू विनायक । बुद्धिदाता एक लोकांमध्यें ॥१॥
लोकांमध्यें बुद्धीवीण कामा नये । बुद्धीचा उपाये र्वत्रांसी ॥२॥
सर्वत्रांसी बुद्धी देतो गणनाथ । करितो सनाथ अनाथासी ॥३॥
अनाथा नाथाचा नाथ केला जनीं । तो हा धरा ध्यानीं लंबोदर ॥४॥
लंबोदर विद्यावैभवें पुरता । दास म्हणे माता सरस्वती ॥५॥

पंचीकरणादी अभंग :-२
नमूं योगेश्वरी शारदा सुंदरी । श्रोता प्रश्न करीं वक्तयासी ॥१॥
वक्तयासी पुसे जीव हा कवण । शिवाचें लक्षण सांगा मज ॥२॥
सांगा मज आत्मा कैंचा परमात्मा । बोलिजे अनात्मा तो कवण ॥३॥
कवण प्रपंच कोणें केला संच । मागुता विसंच कोण करी ॥४॥
कोण तें अविद्या सांगिजोजी विद्या । कैसें आहे आद्यस्वरूप तें ॥५॥
स्वरूप ते माया कैसी मूळमाया । ईसी चालावया कोण आहे ॥६॥
आहे कैसें शून्य कोण तें चैतन्य । समाधान अनन्य तें कवण ॥७॥
कवण जाणता कवणाची सत्ता । मोक्ष हा तत्वता कोण सांगा ॥८॥
सांगा ब्रह्मखूण सगुण निर्गुण । पंचवीस प्रश्न दासें केले ॥९॥

पंचीकरणादी अभंग :-३
नमूं वेदमाता नमूं त्या अनंता । प्रश्न सांगों आतां श्रोतयाचे ॥१॥
श्रोतयाचे प्रश्न जीव हा अज्ञान । जया सर्व ज्ञान तोचि शिव ॥२॥
शिवापर आत्मा त्यापर परमात्म । बोलिजे अनात्मा अनिर्वाच्य ॥३॥
वाच्य हा प्रपंच माई जाणावा । घडामोडी देवापासुनीयां ॥४॥
विषय अविद्या त्यागावी ते विद्या । निर्विकल्प आद्या तेचि रूप ॥५॥
कल्पना हे माया सत्व मूळमाया । इसी चाळावया चैतन्यचि ॥६॥
नकार तें शून्य व्यापक चैतन्य । ईश्वर अनन्य समाधान ॥७॥
जीव हा जन्मला जीवा मृत्यु आला । बद्ध मुक्त जाला तोहि जीव ॥८॥
ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता । मोक्ष हा तत्वता ईश्वरची ॥९॥
ईश्वर निर्गुण ईश्वर सगुण । हेचि ब्रह्मखूण दास म्हणे ॥१०॥

पंचीकरणादी अभंग :-४
सत्य राम एक सर्वहि माईक । जाणावा विवेक योगियांचा ॥१॥
योगियांचा देव तया नाहिं खेव । जेथें जीवशिव ऐक्यरूप ॥२॥
ऐक्यरूप जेथें हें पिंडब्रह्माडं । तें ब्रह्म अखंड निराकार ॥३॥
निराकार ब्रह्म बोलताती श्रुती । आदि मध्य अंतीं सारिखेंची ॥४॥
सारिखेंची ब्रह्म नभाचीये परी । बाह्य अभ्यंतरी कोंदाटले ॥५॥
कोदाटलें परी पाहतां दिसेना । साधुविण येना अनुभावा ॥६॥
अनुभवा येतां तें ब्रह्म निश्चळ । जाय तळमळ संसाराची ॥७॥
संसाराचें दुःख सर्वहि विसरे । जरी मन भरे स्वस्वरूप ॥८॥
स्वस्वरूपीं नाहीं सुख आणि दुःख । धन्य हा विवेक जयापाशीं ॥९॥
जयापाशीं ज्ञन पूर्व समाधान । त्याची आठवण दास करी ॥१०॥

पंचीकरणादी अभंग :- ५
मन हें विवेकें विशाळ करावें । मग आठवावें परब्रह्म ॥१॥
जयापाशीं ज्ञान पूर्व समाधान । त्याची आठवण गळे अहंकार ॥२॥
अहंकार गळे संतांचे संगतीं । मग आदि अंतीं समाधान ॥३॥
समाधान घडे स्वरूपीं राहतां । विवेक पाहतां निःसंगाचा ॥४॥
निःसंगाचा संग दृढ तो धरावा । संसार तरावा दास म्हणे ॥५॥


पंचीकरणादी अभंग – ६ ते १०

पंचीकरणादी अभंग :- ६
तुम्ही आम्ही करूं देवाचा निश्चय । जया नाहिं लय तोचि देव ॥१॥
देव हा अमर नित्य निरंतर । व्यापूनि अंतर देव राहे ॥२॥
देव राहे सदा सबाह्य अंतरीं । जीवा क्षणभरी विसंबेना ॥३॥
परी विसंबेना जीवासि नेणवे । म्हणोनियां धांवे नानामतीं ॥४॥
नानामतीं देव पाहतां दिसेना । जंव तें वसेना ज्ञान देहीं ॥५॥
ज्ञान देहीं वसे तया देव दिसे । अंतरीं प्रकाश ज्ञानदृष्टि ॥६॥
ज्ञानदृष्टि होतां पाविजे अनंता । हा शब्द तत्वतां दास म्हणे ॥७॥

पंचीकरणादी अभंग :- ७
रात्रंदिवस मन राघवीं असावें । चिंतन नसावें कांचनाचें ॥१॥
कांचनाचें ध्यान परस्त्रीचिंतन । जन्मासी कारण हींच दोन्ही ॥२॥
दोन्ही नको धरूं निंदा नको करूं । तेणें हा संसारू तरसील ॥३॥
तरसील भवसागरीं बुडतां । सत्यचि अनंताचेनि नामें ॥४॥
नामरूपातीत जाणा तो अनंत । दास म्हणे संतसंग धरा ॥५॥

पंचीकरणादी अभंग :- ८
ब्रह्मा विष्णु रूद्र जयाचे अवतार । तोचि देव थोर जाण बापां ॥१॥
जाण बापा देव देहासी निर्मिता । तो देव तत्वतां ठाईं पाडीं ॥२॥
ठाईं पाडी देव साधूचे संगती । दास म्हणे गती पावसील ॥३॥

पंचीकरणादी अभंग :- ९
चंदना संगती चंदनचि होती । होय काळी माती कस्तुरिका ॥१॥
कस्तुरिका होय कस्तुरीच्या योगे । साधूचेनि संगें साधुजन ॥२॥
साधुजन होती संगति धरितां । मिळणी मिळतां गंगाजळी ॥३॥
जेवितां अमृत अमर होइजे । अचळ पाविजे साधुसंगें ॥४॥
साधुसंगें देव आपणचि होय लक्षण अद्वय बाणलिया ॥५॥
बाणलिया तया निःसंगाचा संग । होइजे निःसंग आपणचि ॥६॥
आपणचि ध्यानीं बैसला आसनीं जनीं आणि वनं देव भासे ॥७॥
देव भासे तेणें आपण भुलला । तेणें गुणें जाला देव अंगें ॥८॥
देवाचे संगती देवचि होईजे । चतुर्भुज राजे वैकुंठीचे ॥९॥
वैकुंठींचे राजे ध्यानी अहर्निशीं । वंदिती साधूसि दास म्हणे ॥१०॥

पंचीकरणादी अभंग :-१०
दुर्जनसंगती कदा धरूं नये । घडती अपाये बहुविध ॥१॥
बहुविध जाले अपाय बहुतां । तेचि सांगों आतां सावकाश ॥२॥
कुसंग हे माया धरितां संगती । गेले अधोगती नेणों किती ॥३॥
चांडाळा संगती होइजे चांडाळ । होय पुण्यशीळ साधुसंगें ॥४॥
कुरूंदासंगती झिजला चंदन । कुसंगें जीवन नासतसे ॥५॥
खाराचे संगती नासे मुक्ताफळ । होतसे तात्काळ कळाहीन ॥६॥
लाखेच्या संगती सोनें होय उणें । दुग्ध हें लवणें नासतसे ॥७॥
दुर्जनसंगती सज्जन ढांसळे । क्रोध हा प्रबळे अकस्मात ॥८॥
दास म्हणे संग त्यागीं दुर्जनाचा । धरा सज्जनाचा आदरेंसी ॥९॥


पंचीकरणादी अभंग – ११ ते १५

पंचीकरणादी अभंग :- ११
साधुसंगें साधु भोंदुसंगें भोंदु । वादुसंगें वादु होत असे ॥१॥
होत असे लाभ भल्याचे संगतीं । जाय अधोगती दुष्टसंगें ॥२॥
दुष्टसंगें नष्ट जाला महापापी । होतसे निःपापी साधुसंगें ॥३॥
संग जया जैसा लाभ तया तैसा । होतसे आपैसा अनायासें ॥४॥
अनायासें गति चुके अधोगती । धरितां संगती सज्जनाची ॥५॥
सज्जनाची कृपा जयालागीं होय । तयालागीं सोय परत्रींची ॥६॥
परत्रींची सोय भक्तिचे उपायें । चुकती अपाये दास म्हणे ॥७॥

पंचीकरणादी अभंग :- १२
दुर्जनाचे संगें होय मनोभंग । सज्जनाचा योग सुख करी ॥१॥
सुख करी संग संत सज्जनाचा । संताप मनाचा दुरीं ठाके ॥२॥
दुरी ठाकें दुःख होय सर्व सुख । पाहों जातां शोक आढळेना ॥३॥
आढळेना लाभ तेथें कैंचा क्षोम । अलभ्याचा लाभ संतसंगें ॥४॥
संतसंगें सुख रामीरामदासीं । देहसंबंधासी उरी नाहीं ॥५॥

पंचीकरणादी अभंग :- १३
साधु आणि भक्त व्युत्पन्न विरक्त । तपोनिधि शांत अपूर्व तो ॥१॥
अपूर्व तो जनीं शुद्ध समाधानी । जनाचे मिळणी मिळूं जाणे ॥२॥
मिळों जाय जना निर्मळ वासना । अंतरीं असेना निंदाद्वेष ॥३॥
निंदा द्वेष नसे मनीं लय असे । तेथें कृपा वसे सर्वकाळ ॥४॥
सर्वकाळ जेणें सार्थकीं लाविला । वंश उद्धरिला नामघोषें ॥५॥
नामघोष वाचे उच्चारी सर्वदा । संताच्या संवादा वाटेकरी ॥६॥
वाटेकरी जाला सायुज्यमुक्तीचा । धन्य तो दैवाचा दास म्हणे ॥७॥

पंचीकरणादी अभंग :- १४
ऐसा कोण संत जो दावी अनंत । संदेहाचा घात करूं जाणे ॥१॥
करूं जाणे साधकांचें समाधान । जया भिन्नाभिन्न आढळेना ॥२॥
आढळेना जया आपुलें पारिखें । ऐक्यरूपें सुखें सुखावले ॥३॥
सुखावला ज्याचे संगती साधक । साधु तोचि एक धन्य जगीं ॥४॥
धन्य तेचि जगीं जे गुण बोलिले । दास म्हणे जाले पुरूष तेचि ॥५॥

पंचीकरणादी अभंग :- १५
संतांचेनि संगें देव पाठी लागे । सांडऊं जातां मागें सांडवेना ॥१॥
सांडवेना सदा देव समागमीं । बाह्य अंतर्यामीं सारिखाचि ॥२॥
सारिखाचि कडे कपाट शिखरीं । गृहीं वनांतरीं सारिखाचि ॥३॥
सारिखाचि तीर्थीं सारिखाचि क्षेत्रीं । दिवस आणि रात्रीं सारिखाचि ॥४॥
सारिखाचि अंत नाहीं तो अनंत । रामदासांकित मावळला ॥५॥


पंचीकरणादी अभंग – १६ ते २०

पंचीकरणादी अभंग :- १६
दिसे तें नासल सर्वत्र जाणत । या बोला व्युत्पत्ती काय काज ॥१॥
कार्य कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ॥२॥
शाश्वतासी येणें जाणेंचि न घडे । साकार हें मोडे दास म्हणे ॥३॥

पंचीकरणादी अभंग :- १७
निर्गुणस्वरूपीं मूळमाया जाली । तिच्या पोटीं आली गुणमाया ॥१॥
गुणमायेपोटीं जाला सत्वगुण । सत्वीं रजोगुण उद्धवला ॥२॥
उद्धवला रजोगुणीं तमोगुण । तमोगुणीं जाण व्योम जालें ॥३॥
व्योमापोटीं वायु वायुपोटीं तेज । तेजीं तें सहज आप जालें ॥४॥
आपासूनियां भूमंडळ होणें । शात्रींचीं वचनें दास म्हणे ॥५॥

पंचीकरणादी अभंग :- १८
मायेचें स्वरूप ब्रह्मीं उद्भवलें । तिच्या पोटा आलें महत्तत्व ॥१॥
महत्तत्वीं सत्व सत्वीं रजोगुण । तिजा तमोगुण रजापोटीं ॥२॥
पोटीं पंचभूतें तमाचिया आलीं । दास म्हणे जाली सृष्टि ऐसी ॥३॥

पंचीकरणादी अभंग :- १९
शून्यापासूनियां जन्म आकाशासी । आकाश वायूसि प्रसवले ॥१॥
प्रसवला वायु तया तेज जालें । तेजाचिया आलें पाटआप ॥२॥
अपापासुनियां सृष्टि ते जन्मली । ऐसी विस्तारली माया देवी ॥३॥
मायादेवी वेळे शून्याकडे पळें । ते काळीं खवळे पंचभूत ॥४॥
जें जें जया व्यालें तें तेणें भक्षिलें । अंतीं तें उरलें शून्य एक ॥५॥
शून्याचें स्वरूप पाहतां कांहीं नाहीं । तें शून्य सर्वही जेथें आटे ॥६॥
आहे हें आटलें त्याचें शून्य जालें । शून्यहि विरालें जे स्वरूपीं ॥७॥
स्वरूप पाहातां काळ वेळ गेली । निजठेवी लाधलीं प्राणियासी ॥८॥
प्राणीयाचें हित आहे संतांपायीं । वेगीं शरण जायीं आलियातें ॥९॥
आलिया रे संतसंगें मुक्त होसी । रामीरामदासीं हेंचि वर्म ॥१०॥

पंचीकरणादी अभंग :- २०
पृथ्वीतळीं व्याळ व्याळातळीं जळ । त्यातळीं अनळ सत्य जाण ॥१॥
सत्य जाण तयातळीं तो अनिळ । त्यतळीं पोकळ व्योम आहे ॥२॥
व्योमातळीं अहंकार तो केवळ । तेणें ब्रह्मगोळ धरियेला ॥३॥
धरियेला पुढे महतत्व असे । सप्तावरण ऐसें निरोपिलें ॥४॥
दशगुणीं थोराहुनी थोर एक । हे सप्तकंचुक दास म्हणे ॥५॥


पंचीकरणादी अभंग – २१ ते २५

पंचीकरणादी अभंग -२१
अनावृष्टि धरा शत संवत्सर । तेणें जीवमात्र संहारती ॥१॥
संहारती कोणी नसे भूमंडळीं । सूर्य बारा कळीं तपईल ॥२॥
तपईल तेणें जळेल धरणी । काद्रवेयाची फणी पोळईल ॥३॥
पोळईल तेणें विषांचें हळाळ । मार्तंडाचे ज्वाळ एक होती ॥४॥
होती गिरिशृंगें सर्व भस्मरूप । तयालागीं आप बुडवील ॥५॥
बुडवील धरा जळचि निखळ । तयासि अनिळ शोषूं पाही ॥६॥
विझविता होय वायू त्या वन्हीसी । विश्रांती वायूसि नभापोटीं ॥८॥
नभापोटीं चारी भूतें मावळलीं । नभाकार जाली वृत्ति तेव्हां ॥९॥
वृत्ति नभें ऐसा नटला अन्वय । पांचवा प्रळय दास म्हणे ॥१०॥

पंचीकरणादी अभंग – २२
म्हणे हें जाणावें आकाशासारिखें । मायाही ओळखे वायू ऐसी ॥१॥
वायूऐसी माया चंचल चपळ । ब्रह्म तें निश्चळ निराकार ॥२॥
निराकार ब्रह्म नाहीं आकारलें । रूप विस्तारिलें मायादेवी ॥३॥
मायादेवी जाली नांव आणि रूप । शुद्ध चित्स्वरूप वेगळेंचि ॥४॥
वेगळेंचि परि आहे सर्वांठायीं । रिता ठाव नाहीं तयाविण ॥५॥
तयाविण ज्ञान तेंचि तें अज्ञान । नाहीं समाधान ब्रह्माविण ॥६॥
ब्रह्माविण भक्ती तेंचि पें अभक्ती । रामदासी मुक्ती ब्रह्मज्ञान ॥७॥

पंचीकरणादी अभंग – २३
ब्रह्म हें निर्गुण मुळीं निराकार । तेथें चराचर कैसें जालें ॥१॥
जालें निराकारीं अहंतास्फुरण । एकीं एकपण प्रकटलें ॥२॥
प्रगटलें वै सें आकार नसतां । निर्गुण अहंता कोणें केली ॥३॥
कोणीं नाहीं केली सर्वहि मायिक । निर्गुण तें एक जैसें तैसें ॥४॥
जैसें तैसें सर्व मायिक रचिलें । निराकारीं जालें कोणेपरी ॥५॥
परी हीं नाथिलीं साच मानूं नये । नाहीं त्यासि काय पुससील ॥६॥
पुससील काय वांझेचीं लेंकरें । मृगजळपूरें भांबावसी ॥७॥
भांबावसी काय मूळाकडे पाहीं । मूळीं तेथें कांहीं जालें नाहीं ॥८॥
नाहीं कां म्हणतां प्रत्यक्ष दिसेतं । सत्यत्वें भासतें चराचर ॥९॥
चराचर सत्य हें केविं घडेल । अंधारीं बुडेल रविबिंब ॥१०॥
बिंब साहें मनीं दिसतें लोचनीं । तें कैंसें वचनीं मिथ्या होय ॥११॥
मिथ्या होय स्वप्न जागृती आलिया । तेंचि निजलिया सत्य वाटे ॥१२॥
सत्य वाटे मिथ्या मिथ्या वाटे सत्य । ऐसें आहे कृत्य अविद्येचे ॥१३॥
अविद्येचें कृत्य तुम्हीच सांगतां । मागुते म्हणतां जालें नाहीं ॥१४॥
नाहीं जालें कांहीं दृष्टीचें बंधन । तैसें हें अज्ञान बाधतसे ॥१५॥
बाधतसे परि सर्वथा नाथिलें । कांहीं जालें नाहीं ज्ञानियासि ॥१६॥
ज्ञानियासी दृश्य दिसतें कीं नाहीं । देहींच विदेही कैसे जाले ॥१७॥
जाली विदेहित अदेहींच असतां । दिसते पाहातां परि मिथ्या ॥१८॥
मिथ्य हे सकळ मज कां वाटेना । संशय तुटेना अंतरींचा ॥१९॥
अंतरीचा स्म्शय तुटे संतसंगें । कृपेचेनि योगें दास म्हणे ॥२०॥

पंचीकरणादी अभंग – २४
दश हे काशाचे कोणें उभारिले । मज निरोपिलें पाहिजे हें ॥१॥
पाहिजे हे दश भुज पंचकाचे । उभारिले साचे मायादेवी ॥२॥
मायादेवी कोण कैसी ओळखावी । जाणोनि त्यागावी ज्ञानबोधें ॥३॥
परी हे मायेची मिथ्या ओळखावी । आणि ती त्यागावी कोणेपरी ॥४॥
ज्ञानबोधें माया जाणोनि त्यागिली । परी नाहीं गेली काय कीजे ॥५॥
कीजे निरूपण संताचे संगती । तेणें शुद्ध मति होत असे ॥६॥
होत असे परि तैसीच असेना । निश्चळ वसेना मनामध्यें ॥७॥
मनामध्यें सदा विवेक धरावा । निश्चय करावा येणें रिती ॥८॥
रिती विवेकाची पाहतां घडीची । जातसे सवेंचि निधोनियां ॥९॥
निघोनियां जाय विवेक आघवा । तो संग त्यगावा साधकानें ॥१०॥
साधकानें संग कोणाचा त्यागावा । दृढ तो धरावा कोण संग ॥११॥
संग हा आदरें धरीं सज्जनाचा । त्यागीं दुर्जनाचा दास म्हणे ॥१२॥

पंचीकरणादी अभंग – २५
कुमारीच्या पोटा ब्रह्मचारी आला । विचारिता जाला बाप तिचा ॥१॥
बापचि पुरूष ते तो मायाराणी । शब्द विचक्षणीं विचारावा ॥२॥
विचारितां होय नातुहि जामातु । प्रपिताहि मातु मिथ्या नाहे ॥३॥
मिथ्या नव्हे कदा हा देहसंबंधु । विस्तारे विविधु सोयरीक ॥४॥
सोइरे संबंधु नाहीं त्यानिर्गुणा । शाश्वताच्या खुणा दास म्हणे ॥५॥


पंचीकरणादी अभंग – २६ ते ३०

पंचीकरणादी अभंग –  २६
हिरियाच्या पोटीं मांदुसाच्या कोटी । सुवर्णाच्या ताटीं काचखडे ॥१॥
काचखडे हेमीं तैसें दृश्य रामीं । स्वरूपविश्रामीं भ्रम माया ॥२॥
माया हे असार स्वरूप तें सार । पाहिला निर्धार रामदासीं ॥३॥

पंचीकरणादी अभंग –  २७
ताकहि पांढरें दूधहि पांढरें । चवी जेवणारें जाणिजे ते ॥१॥
जाणिजेते चवी गुळा साखरेची । पाहा तो तेथेंचि भेद आहे ॥२॥
भेद आहे तैसा अभेदाचे परी । जाणिजे चतुरीं दासी म्हणे ॥३॥

पंचीकरणादी अभंग –  २८
वृक्षाविण छाया गुणाविण माया । बिंबाविण वाया प्रतिबिंब ॥१॥
प्रतिबिंब भासे सिंधुविण लहरी । सोन्याविण परी अळंकार ॥२॥
अळंकार कृत्य कृर्त्याविणें केंवी । कैंची गथागोंवी निर्गुणाची ॥३॥
निर्गुणासि गुण हेंचि मूर्खपण । दृश्याविण खुण दृष्टांताची ॥४॥
दृष्टांताची खुण परब्रह्मीं घडे । वेद मौन्य पडे कासयासी ॥५॥
कासयासी तेव्हां अद्वैत पाहावें । द्वैतचि स्वभावे ब्रह्म जालें ॥६॥
जालें परब्रह्म अत्यंत सुगम । ब्रह्म आणि भ्रम एकरूप ॥७॥
एकरू पाहे दूध आणि ताक । हंसेविण काक बोलताती ॥८॥
बोलताति सर्व ब्रह्म ऐसें बंड । सर्वही थोतांड सत्य जाणा ॥९॥
सत्य जाणा ब्रह्म । निर्मळ निश्चळ । मायेचा विटाळ जेथें नाहीं ॥१०॥
जेथें नाहीं गुण त्या नांव निर्गुण । गुरूमुखें खुण ठाईं पडे ॥११॥
ठाईं पाडी सत्य शाश्वत स्वरूप । मग आपेंआप बुजसील ॥१२॥
बुजसील साच धरितां विश्वास । ओवी रामदास सांगतसे ॥१३॥

पंचीकरणादी अभंग –  २९
रत्पारखिया रत्नचि परीक्षी । अलक्षातें लक्षी ऐसा नाहीं ॥१॥
ऐसा नाहीं कोणा देवाचा पारखा । आपली ओळखी ठाई पाडी ॥२॥
ठाइ पाडी निज स्वरूप आपुलें । असोनि चोरिलें जवळीच ॥३॥
जवळी ना दुरी पाताळी ना वरी । सबाह्य अभ्यंतरीं कोंदलेंचि ॥४॥
कोंदलेंचि असे परि तें न दिसे । जवळीच कैसें आढळेना ॥५॥
आढळेना अंगीं असोनी सर्वांगीं । जयालागीं योगी धुंडिताती ॥६॥
धुंडिताति कडीकपाटीं शिखरीं । समागमें हरीं चोजवेना ॥७॥
चोजवेना एका सद्गुरूवांचुनी । न्सिह्चय हा मनीं पाविजेतो ॥८॥
पाविजे निश्चयो दृढ स्वरूपाचा । तिहीं प्रतीतींचा एक भाव ॥९॥
ऐक्यभाव भक्ति रामीरामदासीं । विभक्ति विश्वासी दुरी ठेली ॥१०॥

पंचीकरणादी अभंग –  ३०
बाह्य नारिकेळ भीतरीं नरोटी । तैशापरि दृष्टी स्वस्वरूपीं ॥१॥
स्वस्वरूपीं माया जैसी द्रुमीं छाय़ा । कां ते भासे वायां मृगजळ ॥२॥
मृगजळ भासे मार्तंडाकरितां । स्वरूपीं पाहातां बिंब नाहीं ॥३॥
नाहीं जेथें बिंब कैंचें प्रतिबिंब । एकचि स्वयंभ स्वस्वरूपीं ॥४॥
स्वस्वरूपीं भास नाथिला आभास । धरिजे विश्वास दास म्हणे ॥५॥


पंचीकरणादी अभंग – ३१ ते ३५

पंचीकरणादी अभंग – ३१
जडत्व कठिण ते ते पृथ्वी जाण । मृदु ओलेपण असे आप ॥१॥
आप नाना रस धातु नानारस । उष्णता तैजस तेंचि तेज ॥२॥
वायु स्तब्ध चळ आकाश निश्चळ । माईक सकळ दास म्हणे ॥३॥

पंचीकरणादी अभंग – ३२
पृथ्वी आणि तेज वायु आणि आकाश । पांचांचे हे ऐसे पंचवीस ॥१॥
अस्थि मांस त्वचा नाडी आणि रोम । पाचांचें हें वर्म सागईन ॥२॥
शुक्लित शेणित लाळ आणि मूत्र । स्वदेहीं निश्चित पंचतत्त्वें ॥३॥
क्षुधा तृषा जाण आळस शयन । पांचवें मैथुन तेताचेंचि ॥४॥
चळण वळण आणि प्रसरण वायुनिरोधन आकुंचन ॥५॥
काम क्रोध शोक मोह आणि भये । स्थूळदेहाचिये पंचवीस ॥६॥
पंचवीस तत्त्वीं स्थूळदेह वर्तत । ऐकें सावचित्त लिंगदेह ॥७॥
अंतःकरण मन बुद्धि आणि चित्त । पांचवा निश्चित अहंकार ॥८॥
प्राण आणि अपान व्यान आणि उदान । समानही जाण पांच वायु ॥९॥
चक्षु श्रोत्र जिव्हा आणि घ्राण त्वचा । अंश हा तेजाचा ज्ञानेंद्रियें ॥१०॥
वाचा आणि पाद शिश्न आणि गुद । पांच ही प्रसिद्ध कर्मेंद्रियें ॥११॥
शब्द स्पर्श रूप रस आणि गंध । पांचहि प्रसिद्ध विषय हे ॥१२॥
ऐसे पंचवीस लिंगदेहीं असे । ऐसी पंचवीसें तत्वें जालीं ॥१३॥

पंचीकरणादी अभंग – ३३
काम क्रोध शोक मोह आणि भय पंचधा अन्वय आकाशाचा ॥१॥
धावण चळण आणि आकुंचन । वायुप्रसरण निरोधन ॥२॥
चक्षु श्रोत्र जिव्हा मैथुन आळस तेजाचे हे अंश पंचविध ॥३॥
लाळ मूत्र शुक्र रक्त आणि मज्जा । आप जाण वोजा पंचविध ॥४॥
अस्थि त्वचा मांस नाडी रोम अंश । दास म्हणे वास देहातीत ॥५॥

पंचीकरणादी अभंग – ३४
अंतःकरण मन बुद्धि आणि चित्त । पुढें सावचित्त अहंकार ॥१॥
व्यान तो समान उदान तो प्राण । पांचवा अपान वायु जाण ॥२॥
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा आणि घ्राण । तेजाचेहि गुण पंचविधा ॥३॥
वाचा आणि पाद शिश्न आणि गुद । आपाचे प्रसिद्ध पांच गुण ॥४॥
शब्द स्पर्श रूप रस आणि गंध । पृथ्वीचे हे विशद दास म्हणे ॥५॥

पंचीकरणादी अभंग – ३५
विष्णु चंद्र ब्रह्मा नारायण रूद्र । आकाशाचे थोर अंश पाहें ॥१॥
ब्रह्मांडीं व्याप लोकांक वरूण । रूद्र वायू जाण चाळक तो ॥२॥
दिशा वायु रवि वरूणाचा हेत । अश्विनी दैवत तेजअंश ॥३॥
वन्हि इंद्र तिजा जाणावा उपेंद्र । ब्रह्मा आणि सार नैरृती तो ॥४॥
शब्द स्पर्श रूप रस आणि गंध । तन्मात्रा विशद दास म्हणे ॥५॥


पंचीकरणादी अभंग – ३६ ते ४०

पंचीकरणादी अभंग –  ३६
विष्णु चंद्र जाण ब्रह्मा नारायण । पार्वतीरमण सदाशिव ॥१॥
दिशा वायु सूर्य ज्ञानेंद्रियान्वयें । वरूण निश्चयें अरूण तो ॥२॥
तोचि इंद्र वह्नि वामन प्रजापती । पांचवा नैरृती गुरू स्थानीं ॥३॥
स्थानीं वायु एक विषयहि एक । जाहालें कौतुक विषयांचें ॥४॥
सूक्श्मीं तो सूक्ष्म एक आत्माराम । रामदासीं वर्म सांपडलें ॥५॥

पंचीकरणादी अभंग –  ३७
भूपंचकाचे पंचवीस गुण । त्याचें स्थळ जाण उभारलें ॥१॥
उभारलें स्थूळ पांचापंचकांचें । तेंचि तूं हें साचें घडे केवीं ॥२॥
घडे केंवि द्रष्टा दृश्य एकरूप । द्रष्ट्याचें स्वरूप वेगळेंचि ॥३॥
वेगळेंचि जाण अस्थि मास त्वचा । विस्तार भूतांचा जाणताहे ॥४॥
जाणताहे द्रष्टा स्थूळाचा जाणता । विदेही तत्वतां दास म्हणे ॥५॥

पंचीकरणादी अभंग –  ३८
कर्णमनादिक सूक्ष्म पंचक । याचा साक्षी एक तूंचि जाण ॥१॥
जाण पंच प्राण साक्षी विलक्षण । विषयांचा जाण तूंचि एक ॥२॥
तूंच एक साक्षी दशइंद्रियांचा । पांचा पंचकांचा लिंगदेह ॥३॥
लिंगदेह दृष्य द्रष्टा तूंचि एक । बोलिला विवेक सूक्ष्माचा ॥४॥
सूक्ष्माचा तो साक्षी सूक्षमावेगळा । दास अवलीळा देहातीत ॥५॥

पंचीकरणादी अभंग – ३९
देहद्वयसाक्षी नेणे आपणासी । कारण तयासे बोलिजेतें ॥१॥
देहद्वय जाणे आपणासी नेणे । पुसों जातां म्हणे कळेना कीं ॥२॥
कळेना कीं मज माझेंचि स्वरूप । जाला साक्षरूप सहजचि ॥३॥
सहजचि जाला करणांचा साक्षी । स्वयें नेणण्यासि जाणताहे ॥४॥
जाणताहे सूक्ष्म स्थूळासि कारण । साक्षी विलक्षण दास म्हणे ॥५॥

पंचीकरणादी अभंग – ४०
विदेहासि कैंचें देहाचें बंधन । बोलिलें अज्ञान निरसावया ॥१॥
निरसोनि माया वांझेची कुमारी । मृगजळपूरीं उतरावें ॥२॥
उतरावें विष स्वप्नींच्या सर्पाचें । आणि निःसंगाचें संगदुःख ॥३॥
मग दुःख तुटे अजन्माचा जन्म । नाथिलाचि भ्रम बाधितसे ॥४॥
बाधितसे भ्रम संतसंगेंविण । रामदासीं खूण साधुसंगें ॥५॥


पंचीकरणादी अभंग – ४१ ते ४५

पंचीकरणादी अभंग –  ४१
स्वरूप सांडोनि देह मीच भावी । तो जीव रौरवीं बुडवील ॥१॥
पचवील नरकीं देहाचें संबंधें । सज्जनाच्या बोधें सांडवलें ॥२॥
सांडोनि विवेक भेद महावाक्य । जीवशिवऐक्य जयाचेनि ॥३॥
जयाचेनि तुटे संसारबंधन । तयाचें वचन दृढ धरा ॥४॥
दृढ धरा मनीं अहंब्रह्म ऐसें । सांगतो विश्वासें रामदास ॥५॥

पंचीकरणादी अभंग –  ४२
मुक्त निःसंदेहो बाधतो संदेहो । संदेहाचा देहो कामा न ये ॥१॥
कामा न ये चित्त दुश्चित सर्वदा । लागती आपदा संशयाच्या ॥२॥
संशयाच्या संगें समाधान भंगें । खेद आंगीं लागे अकस्मात ॥३॥
अकस्मात सुखीं दुःख कालवलें । साधकासि नेलें संदेहानें ॥४॥
संदेहाचा घात होय एकसरा । दास म्हणे करा निरूपण ॥५॥

पंचीकरणादी अभंग –  ४३
चारी देह पिंडीं चत्वार ब्रह्मांडीं । अष्ट देह प्रौढी बोलिजेल ॥१॥
बालिजेल श्रोतां सावधान व्हावें । दुश्चित नसावें निरूपणीं ॥२॥
निरूपणीं अष्ट देह ते कवण । स्थळीं लिंग जाण कारण तो ॥३॥
चौथा देह जाण तो महाकारक । पांचवें लक्षण विराटाचें ॥४॥
हिरण्यगर्भ हे आणि अव्याकृत । आठवीं निश्चित मूळमाया ॥५॥
जन्म अष्ट देहीं साक्ष तो विदेही । रामदासा नाहीं जन्ममृत्यु ॥६॥

पंचीकरणादी अभंग –  ४४
मीच ब्रह्म ऐसा अभिमान धरी । जाणावा चतुरीं चौथा देह ॥१॥
चौथा देह आणि सर्व साक्षी अवस्था । ऐसी हे अवस्था चौदेहांची ॥२॥
चौदेहांची गांठी सुटतां सुटली । विवेकें तुडली देहबुद्धी ॥३॥
देहबुद्धी नाहीं स्वरूपीं पाहतां । चौथा देह आतां कोठें आहे ॥४॥
कोठें आहे अहंब्रह्म ऐसा हेत । देहीं देहातीत रामदास ॥५॥

पंचीकरणादी अभंग –  ४५
कल्पनेचे पोटीं अष्टविधा सृष्टी । तेचि आतां गोष्टी सांगईन ॥१॥
सांगईन गोष्टी एक काल्पनिक । दुजी ती शाब्दिक शब्दसृष्टी ॥२॥
शब्दसृष्टी दुजी तिजी ती प्रत्यक्ष । चौथी जाण लक्ष चित्रलेप ॥३॥
चित्रलेप चौथी पांचवी स्वप्नींची । सृष्टी गंधर्वाची सहावी ते ॥४॥
सहावी ती सृष्टी गंधर्वनगर । सातवी नवज्वर सृष्टि जाणा ॥५॥
सृष्टि जाणा दृष्टिबंधन आठवीं । सर्वही मानवी काल्पनिक ॥६॥
काल्पनिक अष्ट सृष्टींचें स्वरूप । शुद्ध सत्स्वरूप निर्विकल्प ॥७॥
निर्विकल्प देह कल्पनेरहित । जाणिजे स्वहित तेंचि बापा ॥८॥
तेंचि बापा तुझें संतांचे संगती । चुके अधोगती दास म्हणे ॥९॥


पंचीकरणादी अभंग – ४६ ते ५२

पंचीकरणादी अभंग – ४६
पांचहि प्रळय सांगईन आतां । जाणिजे तत्वतां दोन्हों पिंडीं ॥१॥
दोनी पिंडी दोनी ब्रह्मांडप्रळय । पांचवा अन्वय विवेकाचा ॥२॥
विवेकाचा पंथ विवेकें जाणावा । योगियांचा ठेवा निरूपण ॥३॥
निरूपणी निद्राप्रळय बोलिला । दुजा मृत्यु जाला प्राणियासी ॥४॥
प्राणियासी पिडी हे दोनी प्रळयो । ब्रह्मा निद्रा क्षयो ब्रह्मराचा ॥५॥
ब्रह्मयाचा क्षयो तो ब्रह्मप्रळयें । व्यतिरेकान्वयो विवेकाचा ॥६॥
विवेकाचा अर्थ माईक सर्वही । स्वस्वरूपीं नाहीं चराचर ॥७॥
चराचर मूर्ति मायिक प्रसिद्ध । हा विवेक सिद्ध सज्जनाचा ॥८॥
सज्जनाचा भाव सर्व दृश्य वाव । दृश्यातीत देव जैसा तैसा ॥९॥
जैसा देव आहे तैसा ओळखावा । प्रळय पांचवा दास म्हणे ॥१०॥

पंचीकरणादी अभंग – ४७
कण सांडोनियां घेऊं नये भूस । गर्भेविण फणस घेऊं नये ॥१॥
घेऊं नये नारिकेळाची नरोटी । सालपटें खोटीं डाळिंबाची ॥२॥
डाळिंबाची त्वचा चवड उंसाचा । स्तंभ कर्दळीचा कामा न ये ॥३॥
खातां न ये नाना फळांची आटोळी । अहो हे वाचाळी वाउगीच ॥४॥
वाउगें सांडोनि सा तेंचि घ्ययावें । येर तें सांडावें मिथ्याभूत ॥५॥
मिथ्याभूत जें जें तत्व दृष्टी पडे । म्हणोनियां घडे त्याग त्याचा ॥६॥
त्याग त्याचा कीजे तें मनीं कल्पावें । मग अनुभवें जाणिजेल ॥७॥
जाणिजेल सार त्यागितां असार । बोलावा विस्तार कासयासी ॥८॥
कासयासी आतां धरावा संदोहो । कल्पनेचा देहो नाशिवंत ॥९॥
नाशिवंत आहे नांव आणि रूप । पाहें आपेंआप दास म्हणे ॥१०॥

पंचीकरणादी अभंग – ४८
खोटें निवडितां खरें नाणें ठरे । तेसेंचि विस्तारें तत्त्वज्ञान ॥१॥
तत्त्वज्ञान खोटे जाणोनि सांडावें । मग ओळखावें परब्रह्म ॥२॥
परब्रह्म वरवें संतसंगें कळे । विवेकें निवळे मार्ग कांहीं ॥३॥
मार्ग कांहीं कळे पईक्षा जाणतां । दिशाभुली होतां वाट चुके ॥४॥
वाट चुके मीन ऐसें न करावे । सार्थक करावे दास म्हणें ॥५॥

पंचीकरणादी अभंग – ४९
जें जें कांहीं दिसें तें तें सर्व नासे । अविनाश असें आत्मरूप ॥१॥
आत्मरूपीं दृष्टि घालितां निवळे । आपेंआप कळे मिथ्या माया ॥२॥
मिथ्या माया वाटे साचाचे सारिखी । स्वरूपा ओळखी जंव नाहीं ॥३॥
जंव नाहीं जाली संदेहा निवृत्ती । तंव हे प्रचीती जाणवेना ॥४॥
जाणवेना मनी निश्चयावांचुनी । निश्चयो श्रवणीं दास म्हणे ॥५॥

पंचीकरणादी अभंग – ५०
देहबुय्द्धि बहु काळाची जुनाट । नवी आहे वाट सार्थकाची ॥१॥
सार्थकाची वाट भ्रांतीनें लोपली । जवळी चुकली असोनियां ॥२॥
असोनियां देव जवळी चुकला । प्राणी भांबावला मायाजाळें ॥३॥
मायाजाळ दृश्य तुटे एकसरें । जरि मनीं धरे स्वस्वरूप ॥४॥
स्वस्वरूपनिश्चयें समाधान होय । रामदासीं सोय स्वरूपाची ॥५॥

पंचीकरणादी अभंग – ५१
योगियांचा देव मज सांपडला । थोर लाभ जाला एकाएकीं ॥१॥
एकाएकीं देव त्रैलोक्यनायक । देखिला सन्मुख चहूंकडे ॥२॥
देशधडी नित्य निरंतर । व्यापूनी अंतर समागमें ॥३॥
समागम मज रामाचा जोडला । वियोग हा केला देशधडी ॥४॥
देशधडी केला वियोग । रामदासीं योग सर्वकाळ ॥५॥

पंचीकरणादी अभंग – ५२
जेथें जावें तेथें राम समागमीं । आतां कासया मी खंती करूं ॥१॥
खंती करूं ज्याची तो समागमेंचि । पाहातां सुखाची घडी होय ॥२॥
अहो देव खरा भूमंडळवासी । जातां दिगंसाती सारिखाचि ॥३॥
सारिखाचि जनीं वनीं वनांतरी । तो गिरिकंदरी सारिखाचि ॥४॥
सारिखाचि देव कदा पालटेना । राहे त्रिभुवना व्यापुनियां ॥५॥
व्यापुनीया दासासन्निद्यचि वसे । विचार वलसे रामदासीं ॥६॥


पंचीकरणादी अभंग – संत रामदास समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *