स्फुट श्लोक

पंचक – संत रामदास

पंचक – भक्तिपर अभंगपंचक

॥१॥
भक्ति नलगे भाव नलगे । देव नलगे आम्हांसी ॥१॥
आम्ही पोटाचे पाइक ॥ आम्हा नलगे आणि ॥२॥
आम्ही खाऊं ज्यांची रोटी । त्यांची कीर्ति करूं मोठी ॥३॥
रामीं रामदा म्हणे । ऐशीं मूर्खाचीं लक्षणें ॥४॥

॥२॥
आम्हां अन्न झालें पुरे । अन्नावीण काय नुरे ॥१॥
पोटभरी मिळे अन्न । आम्हां तेंचि ब्रह्मज्ञान ॥२॥
अन्नावांचून दुसरा । देव आहे कोण खरा ॥३॥
भगवंताची नाहीं गोडी । काय म्हणे ते बापुडीं ॥४॥
रामीं रामदास म्हणे । मूर्ख बोले दैन्यवाणें ॥५॥

॥३॥
अन्न व्हावें पोटभरी । मग ते ज्ञानचर्चा करी ॥१॥
ऐसें बोलती अज्ञान । ज्यांसि नाहीं समाधान ॥२॥
आधीं अन्न तें पाहिजे । मग व्यानस्थ राहिजे ॥३॥
अन्नावीन तळमळ । अन्न करितें सकळ ॥४॥
कैंचा राम कैंचा दास । अवघे पोटाचे सायास ॥५॥

॥४॥
अन्न देणार श्रीहरी । तोचि प्रतिपाळ करी ॥१॥
ज्या देवाचे आज्ञेवरी । मेघ वर्षती अंबरी ॥२॥
तयासि चुकलीं बापुडीं । अन्न अन्न करिती वेडीं ॥३॥
रामदास म्हणे ऐक । आदि अंती देव एक ॥४॥

॥५॥
देव तारी देव मारी । देव सर्व कांहीं करी ॥१॥
अन्नोदक देवें केलें । सर्व तेणेंचि निर्मिले ॥२॥
तयासि चुकलीं बापुडीं । अन्न अन्न करिती वेडीं ॥३॥
रामदास म्हणे ऐक । देव त्रैलोक्यनायक ॥४॥

॥६॥
देव घालितो संसारी । देव सर्व कांहीं करी ॥१॥
लक्ष चौर्‍यांशीं हिंडतां । तेथें देव सांभाळिता ॥२॥
तयासि चुकलीं बापुडीं । अन्न अन्न करिती वेडीं ॥३॥
दास म्हणे ही अंतर । देव कृपेचा सागर ॥४॥
॥७॥
देव एका भाग्य देतो । एका भीकेसि लवितो ॥१॥
न कळे भगवंताचे करणें । राव रंक ततक्षणें ॥२॥
तयासि चुकलीं बापुडीं । अन्न अन्न करिती वेडीं ॥३॥
रामदास म्हणे पाही । देवावीण कांहीं नाहीम ॥४॥

॥८॥
माया लाविली माईक । आदि अंतीं देव एक ॥१॥
देव संकटीं पावता । देव अंतीं सोडविता ॥२॥
तयासि चुकलीं बापुडीं । अन्न अन्न करिती वेडीं ॥३॥
रामदास नवल परी । देव सर्वांचे अंतरी ॥४॥

॥९॥
क्षुधा लागतांचि अन्न । तृषा लागतां जीवन ॥१॥
निद्रा लागतां शयन । आळस येतां चुके मन ॥२॥
मळभूत्र संपादणें । शौच आचमन करणें ॥३॥
खानें लागे नानापरी । सर्वकाळ भरोवरी ॥४॥
अवघा धंदाचि लागला । दिवसंदिवस काळ गेला ॥५॥
रामीं रामदास म्हणे । देह सुरवाडा करणें ॥६॥

॥१०॥
हात धुणें पाय धुणें । नाना उपचार करणें ॥१॥
सर्वकाळ लोभासंगें । करणें लागे हो अव्यंगें ॥२॥
वस्रें अलंकार पाहतां । पुढती घालितां काढितां ॥३॥
सदा इंद्रिय गळतां । त्यासि करावी शुद्धता ॥४॥
अवधा धंदाचि लागला । दिवसेंदिवस काळ गेला ॥५॥
रामदास म्हणे हित । कैसें घडावें स्वहित ॥६॥

॥११॥
शीतकाळींच हुताश । उष्णकाळीं वारावास ॥१॥
आले पर्जन्याचे दिवस । केले घराचे सायास ॥२॥
नाना व्याधींचीं औषधें । पथ्य करावें निरोधें ॥३॥
विषयी मनासि आदर । करणें लागे निरंतर ॥४॥
अवघा धंदाची लागला । दिवसेंदिवस काळ गेला ॥५॥
दास म्हणे सांगो किती । ऐसी देहाची संगति ॥६॥

॥१२॥
धनाधान्याचें संचित । करणें लागे सावचित ॥१॥
अर्थाजातो एकला रे । कलह करावे आदरें ॥२॥
नाना पशूंतें पाळावीं । नाना कृत्यें सांभाळावीं ॥३॥
सार विचार जतन । करणें लागे सावधान ॥४॥
अवघा धंदाची लागला । दिवसेंदिवस काळ गेला ॥५॥
रामदास म्हणे देवा । जीव किती हा घालावा ॥६॥

॥१३॥
पोटधंदा जन्मवरी । करूं जातां नाहीं पुरी ॥१॥
करितां संसारीं सायास । नाहीं क्षणाचा अवकाश ॥२॥
अन्न निर्माण कराया । सर्वकाळ पीडी काया ॥३॥
काम करिताम दिवस थोडा । ऐसा कष्टा नाहीं जोडा ॥४॥
अवघा धंदाचि लागला । दिवसेंदिवस काळ गेला ॥५॥
दास म्हणे सावधान । झालें सदृढ बंधन ॥६॥

॥१४॥
शिंक जांभई खोकला । तितुका काळ व्यर्थ गेला ॥१॥
आतां ऐसें न करावें । नाम जीवीं तें धरावें ॥२॥
श्वास उच्छ्‍वास निघतो । तितुका काळ व्यर्थ जातो ॥३॥
पात्या पातें नलगत । तितुकें वय व्यर्थ जात ॥४॥
लागे अवचित उचकी । तितुकें वय काळ लेखी ॥५॥
म्हणे रामीं रामदास । होतो आयुष्याचा नाश ॥६॥

॥अभंगसंख्या ॥७०॥


पंचक – कलियुगपंचक

॥१॥
आलें भगवंताच्या मना ।
तेथें कोणाचें चालेना ॥१॥
जैसा कलिराजा आला ।
धर्म अवघाचि बुडाला ॥२॥
नीति मर्यादा उडाली ।
भक्ति देवाची चुकली ॥३॥
दास म्हणे पाप झालें ।
पुण्य अवघेंचि बुडालें ॥४॥

॥२॥
विप्रीं सांडिला आचार ।
क्षेत्रीं सांडिला विचार ॥१॥
मेघवृष्टि मंदावली ।
पिकें भूमीनें सांडिलीं ॥२॥
बहुवृष्टि अनावृष्टि ।
दास म्हणे केली सृष्टि ॥३॥

॥३॥
लोक दोष आचरती ।
तेणें दोषें भस्म होती ॥१॥
जनी दोष जाहले फार ।
तेणें होतसे संहार ॥२॥
रामदास म्हणे बळी ।
दिसेंदिसें पापें कळीं ॥३॥

॥४॥
नाहीं पापाचा कंटाळा ।
येतो हव्यास आगळा ॥१॥
जना सुबुद्धि नावडे ।
मन धांवे पापाकडे ॥२॥
रामीं रामदास म्हणे ।
पुण्य उणें पाप दुणें ॥३॥

॥५॥
पुण्यक्षेत्रें तीं मोडावीं ।
आणि ब्राह्मण्यें पीडावीं ॥१॥
पुण्यवंत ते मरावे ।
पापी चिरंजीव व्हावे ॥२॥
रामदास म्हणे वाड ।
विघ्रें येती धर्मा आड ॥३॥

॥६॥
लोक मिणधेचि चालती ।
त्यांसि होताती विपत्ति ॥१॥
धर्मप्रवृत्ति बुडावी ।
शास्रमर्यादा उडावी ॥२॥
रामदास म्हणे देवें ।
बौद्ध होऊनी बैसावें ॥३॥

॥ अभंगसंख्या ॥१९॥


पंचक – मूर्खपणपंचक

॥१॥
येथें काय रे वाजतें ।
कोठें काय गजबजतें ॥१॥
उगा करिती कोल्हाळ ।
माझे उठलें कपाळ ॥२॥
हांका मारूनि वरडती ।
टाळ अवघेचि कूटिती ॥३॥
कोठें कैंचे आले लुटे ।
वायां झाले टाळकुटे ॥४॥
वेडीं संसार सांडिला ।
व्यर्थ गलबला मांडिला ॥५॥
दास म्हणे या मूर्खाला ।
हरिकथेचा कंटाळा ॥६॥

॥२॥
हरिकथेचा आला राग ।
खेळ होतां घाली त्याग ॥१॥
ऐसे प्रकारचे जन ।
नाहीं देवाचें भजन ॥२॥
कळावंताचें तों गाणें ।
ऐकतांचि जीव माने ॥३॥
करिती लग्राचा उत्सव ।
नाहीं देव महोत्सव ॥४॥
भूतदया नाहीं पोटीं ।
खाती लोभावीं चोरटीं ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
देव धर्म कोण जाणे ॥६॥

॥३॥
स्वार्थ केला जन्मवरी ।
लोभें राहिला श्रीहरी ॥१॥
धन धान्य अहर्निशीं ।
गाई महिषी घोडे दासी ॥२॥
शेत वाडे घर ठावो ।
प्राणी जीवीं धरी हावो ॥३॥
माता पिता बहिणी भ्राता ।
कन्या पुत्र आणि कांता ॥४॥
व्याही जावई आपुले ।
इष्ट मित्र सुखी केले ॥५॥
दास म्हणे हो शेवटीं ।
प्राप्त झाली मसणवटी ॥६॥

॥४॥
जन्मवरी शीण केला ।
अंतकाळीं व्यर्थ गेला ॥१॥
काया स्मशानीं घातली ।
कन्या पुत्र मुरडलीं ॥२॥
घर वाडा तो राहिला ।
प्राणी जातसे एकला ॥३॥
धन्य धान्य तें राहिलें ।
प्राणी चर्फडित गेले ॥४॥
इष्ट मित्र आणि सांगाती ।
आपुलाले घरा जाती ॥५॥
दास म्हणे प्राणी मेले ।
कांहीं पुण्य नाहीं केलें ॥६॥

॥५॥
दैन्यवाणा झाला प्राणी ।
चंद्री लागली नयनीं ॥१॥
म्हणती उचला उचला ।
आतां भूमीभार झाला ॥२॥
घोर लागला अमूप ।
प्राणी झाला प्रेतरूप ॥३॥
दांतखीळ बसली वाणी ।
ताठा भरला करचरणीं ॥४॥
डोळे विक्ताळ दसिती ।
झांका झांका मुलें भीती ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
अवधीं सुखाची पीसून नें ॥६॥

॥६॥
एक म्हणती कां पळावें ।
एक म्हणती कां बैसावें ॥१॥
लोक बोलती मत्सरें ।
काय मानावें तें खरें ॥२॥
एक म्हणती काम सोडावें ।
एक म्हणती कां मोडावें ॥३॥
दास म्हणे हो तत्त्वता ।
जान अवघी बाष्कळता ॥४॥

॥७॥
नाहीं ज्ञानावा विचार ।
केला अज्ञानें संचार ॥१॥
मना आलें तें बोलती ।
चालों नये तें चालती ॥२॥
अवघा स्वधर्म बुडाळा ।
देह प्रपंचीं लविला ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
अविद्येंचीं हीं लक्षणें ॥४॥

॥८॥
स्रान नाही संध्या नाहीं ।
देव नाहीं धर्म नाहीम ॥१॥
उगाच बसुनियां घरीं ।
सज्जनाची निंदा करी ॥२॥
तीर्थ नाहीं क्षेत्र नाहीं ।
दान नाहीं पुण्य नाहीं ॥३॥
तप नाहीं शास्र नाहीं ।
मंत्र नाहीं गायत्री नाहीं ॥४॥
पोटीं नाहीं निस्पृहता ।
नाहीं विधेनें पूरता ॥५॥
रामदास सांगे खुणें ।
पापी सर्वापरी उणे ॥६॥

॥९॥
कपटी कुटिळ आळसी ।
घरीं मिळेना खायासी ॥१॥
उगाच धरितसे ताठा ।
पापी हरिद्री करंटा ॥२॥
पोरें म्हणती काय खावें ।
स्रिया म्हणती कोठें जावें ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
अवघीं हासतीं पीसुनें ॥४॥

॥१०॥
स्वयें आचरावें पाप ।
विशेष निंदा वज्रलेप ॥१॥
निद्रा मत्सर टवाळी ।
मायवापाशीं ढवाळी ॥२॥
अनाचारी परद्वारीं ।
मना आलें तेंचि करी ॥३॥
रामीं राम-दास म्हणे ।
असे जितांचि मरणें ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥५३॥


पंचक – भ्रांतिपंचक

॥१॥
गळा बांधिला पाषाण ।
आत्मलिंग जाणे कोण ॥१॥
जिवाशिवाचें स्वरूप ।
कोण जाणे कैसें रूप ॥२॥
लिंग चुकलें स्वयंभ ।
धरी पाषाणाचा लाभ ॥३॥
रामीं राम-दास म्हणे ।
भेद जाणती शाहाणे ॥४॥

॥२॥
पृथ्वी अवघी लिंगाकार ।
अवघा लिंगाचा विस्तार ॥१॥
आतां कोठें ठेवूं भाव ।
जेथें तेथें महादेव ॥२॥
अवघा देव विस्तारला ।
ऐसें देवचि बोलिला ॥३॥
राम-दासा विसरला ।
अवघा देवचि भरला ॥४॥

॥३॥
एकविस स्वर्ग विस्तारला ।
देव संपुष्टीं घातला ॥१॥
केलें देवासी बंधन ।
तेंचि पावला आपण ॥२॥
देव ठाईंचा अनंत ।
त्यासि म्हणती अंतवंत ॥३॥
रामदास म्हणे भावें ।
जैसें द्यावें तैसें घ्यावें ॥४॥

॥४॥
अंत नाहीं तो अनंत ।
त्यासि दोरी करी भ्रांत ॥१॥
ऐसें जनाचें करणें ।
कैसा संसार तरणें ॥२॥
देव व्यापक अर्वांसी ।
त्यासि म्हणती एकदेशी ॥३॥
रामदासीं देव पूर्ण ।
त्यासि म्हणती अपूर्ण ॥४॥

॥५॥
देव पाषान भाविला ।
तोचि अंतरीं दाविला ॥१॥
जैसा भाव असे जेथें ।
तैसा देव वसे तेथें ॥२॥
दृश्य बांधोनियां गळा ।
देव जाहला निराळा ॥३॥
दास म्हणे भावातीत ।
होतां प्रगत अनंत ॥४॥

॥६॥
अवघे पाषाण मांडिले ।
कोण म्हणती आपुलाले ॥१॥
सर्व घटीं देव एक ।
भेदें भाविला अनेक ॥२॥
देव निर्भळ निश्चळ ।
पाहती पाषाणाची खोळ ॥३॥
राम-दासाचें अंतर ।
देवापासीं निरंतर ॥४॥

॥७॥
धान्य अवघेंचि टाकिती ।
बळ देखतां तोंडीं माती ॥१॥
देव सर्वाचें अंतरीं ।
सोडूं जातां तैसी परी ॥२॥
तूप सांडूनि आपण ।
खाऊं पाहे सांठवण ॥३॥
दास म्हणे ते राउळा ।
सोडून पूजिती देउळा ॥४॥

॥८॥
सांठवणेवीण धान्य ।
धान्येंवीण सांठवण ॥१॥
एकावीण एक काय ।
कामा नये वायां जाय ॥२॥
ज्ञानेंवीन उपासन ।
उपासनेवीण ज्ञान ॥३॥
रामीं रामदासा-वीण ।
करी नुस्तेंचि भजन ॥४॥

॥ अभंगासंख्या ॥३२॥


पंचक – अभिभानपंचक

॥१॥
संसाराचें दु:ख आलें ।
गाणें अवघेंचि बुडालें ॥१॥
आतां आठवेना कांहीं ।
पडिलों चिंतेच्या प्रवाहीं ॥२॥
गाणें नाचणें सुखा़चें ।
जिणें जहालें दु:खाचें ॥३॥
म्हणे रामीं रामदास ।
कोण करितो सायास ॥४॥

॥२॥
नाना प्रकारींचें गाणें ।
मीच बाळपणीं जाणें ॥१॥
काय जाहले कळेना ।
एतेंही आठवेना ॥२॥
मज पाठांतर होतें ।
तितुकें कोणासी नव्हतें ॥३॥
रामदास म्हणे आतां ।
जीव जहाले दुश्चिता ॥४॥

॥३॥
वोढवलें पूर्वपाप ।
नानाप्रकारें संताप ॥१॥
तेणें शुद्धीच उडाली ।
नीति अवघीच बुडाली ॥२॥
केली क्तिया ते कळेना ।
मन विवेकें वळेना ॥३॥
भरीं भरलेंसे मन ।
अवघे तेंचि तें कारण ॥४॥
झोंबें विकल्पाचें श्वान ।
देहबुद्धि घेत रान ॥५॥
रामीं राम-दास म्हणे ।
अवघीं झालीं कुलक्षणें ॥६॥

॥४॥
सांत पांच गांववाट ।
अवघा एकचि चौहाट ॥१॥
तेथें कोणेकडे जावें ।
अवघी वाटचि स्वभाव ॥२॥
कोण दिसेना वेळेसी ।
वाट पुसावी कोणासी ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
तैसें संशय बोलणें ॥४॥

॥अभंगसंख्या ॥१८॥


पंचक – उन्मत्तपंचक

॥१॥
रामीं विसरला प्राणी ।
कामलोभें केली हानी ॥१॥
कामधेनु मोकलिली ।
घरीं गाढवी बांधिली ॥२॥
उपटुनी कल्पतरू ।
केला शेराचा आदरू ॥३॥
सांडूनियां चिंतामणि ।
वेंची दहिंवराचें पाणी ॥४॥
गेलें हातींचें निधान ।
केलें कवडीचें साधन ॥५॥
परिस रागें हुंडारिला ।
हाती पाषाण घेतला ॥६॥
सार अमृत सांडिले ।
दैन्यवाणें कांजी प्याले ॥७॥
सोनें सांडुनी आदरें ।
वेचूं लागला खापरें ॥८॥
रत्न सांडूनियां खडे ।
गेले म्हणून दु:खें रडे ॥९॥
केली साखर परती ।
सुखें तोंडीं घाली माती ॥१०॥
म्हणे रामीं रामदास ।
तोडीं संसाराची आस ॥११॥

॥२॥
शांति माता मारिली ।
भ्रांति तेथें प्रतिष्ठिली ॥१॥
ऐसे लोक कलियुगीचे ।
भय न धरिती पापाचें ॥२॥
विवेकगुरु तो मारिला ।
तेथें क्रोध प्रतिष्ठिला ॥३॥
नीतिअमृत सांडिलें ।
असत्यमद्यपान केलें ॥४॥
दया बहिण संहारिली ।
निंदाभातंगी पाळिली ॥५॥
पुत्रविचार दवडिला ।
दासीपुत्र प्रतिष्ठिला ॥६॥
सत्य ब्राह्मण मारिला ।
दोषी धीवर पाळिला ॥७॥
ज्ञान पक्कान्न सांडिलें ।
माष अज्ञान सेविलें ॥८॥
भक्ति लक्ष्मी त्यागिली ।
अभक्ति अवदसा घेतली ॥९॥
मित्र विश्वास सोडिला ।
शत्रु विकल्प जोडिला ॥१०॥
भेदचोरटे पाळिले ।
अभेदराजे दुराविले ॥११॥
रामी रामदास म्हणे ।
जळो अभक्तांचें जिणें ॥१२॥

॥३॥
जेणें संसारीं घातिलें ।
पापी त्यासी विसरले ॥१॥
श्रीसी सांडोनियां दारा ।
भजे दासीच्या डिगरा ॥२॥
मायबापें दुरावलीं ।
चोरें आपुली मानिलीं ॥३॥
फोडोनियां शालिग्राम ।
वेश्या सेवितां अधम ॥४॥
रामीं रामदास म्हणे ।
जळी अभक्तांचें जिणें ॥५॥

॥४॥
ज्याच्या उदरासी आला ।
त्यासी फिरोनि पडला ॥१॥
तोचि जाणावा चांडाळा ।
देवब्राह्मणाचा काळ ॥२॥
झाला स्रियेसी लंपटु ।
मायबापांसी उद्धटु ॥३॥
भय पापाचें न धरी ।
सज्जनाची निंदा करी ॥४॥
नेणे माय कीं मावशी ।
कोणें सांगावें तयासी ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
यम केला त्याकारणें ॥६॥

॥५॥
प्राणी संसारासी आला ।
परि तो देवासी चूकला ॥१॥
तगे तोचि तो अज्ञान ।
नेणे भगवंताचें ज्ञान ॥२॥
देह आपुला मानिला ।
देखी सांडोनियां गेला ॥३॥
जें जें कांहीं अशाश्वत ।
तें तें मानिलें शाश्वत ॥४॥
देवीं ब्राह्मणीं अभाव ।
तेथें वर्णांगाचा भाव ॥५॥
रामदासाचें स्वहित ।
जेणें मानिलें अनहित ॥६॥

॥ अभंगसंख्या ॥४०॥


पंचक – आळसपंचक

॥१॥
श्रोतीं व्हावें सावधान ।
मना आलें तें गाईन ॥१॥
ताल जाती एकीकडे ।
माझें गाणें भलतीकडे ॥२॥
शेंडा मूळ तें नकळे ।
माझें गाणोंचि मोकळें ॥३॥
रामीं राम-दास म्हणे ।
जेणें गुंतती शहाणे ॥४॥

॥२॥
राग मूर्छना कळेना ।
ताळ धृपद वळेना ॥१॥
त्यावेगळें सर्व ठावें ।
श्रोतीं सावधान व्हावें ॥२॥
अर्थप्रबंधविचार ।
नकळे नाहीं पाठांतर ॥३॥
भक्तिज्ञानाचा विश्वास ।
नाहीं म्हणे रामदास ॥४॥

॥३॥
निरूपणीं जागवेना ।
काम क्तोध त्यागवेना ॥१॥
इतुक्यावेगळें साधन ।
सांगा अवघेंची करीन ॥२॥
आतां करवेना अभ्यास ।
तोडवेना आशापाश ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
रामनाम उच्चारणें ॥४॥

॥३॥
निरूपणीं जागवेना ।
काम क्तोध त्यागवेना ॥१॥
इतुक्यावेगळें साधन ।
सांगा अवघेंची करीन ॥२॥
आतां करवेना अभ्यास ।
तोडवेना आशापाश ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
रामनाम उच्चारणें ॥४॥

॥४॥
आम्ही देवाचे आळशी ।
कांहीं नकळे आम्हामशीं ॥१॥
गोड गोड हो जेवणें ।
आठ दिवसां एक नाहाणें ॥२॥
मऊ पलंग सुषुप्ती ।
निद्रा पाहिजे पूरती ॥३॥
दास म्हणे लोभाविणें ।
करूं साक्षेप भांडणें ॥४॥

॥५॥
आम्ही भगवंताचे भोळे ।
बाह्य अंतरीं मोकळे ॥१॥
क्रोध आला तो साह-वेना ।
उणें उत्तर पहावेना ॥२॥
आम्हां बोलो सके कोण ।
बोलासाठीं वेंचृं प्राण ॥३॥
दास म्हणे नीचोत्तरीं ।
दु:ख वाहूं जन्मवरी ॥४॥

॥६॥
आम्ही भगवंताचीं वेडीं ।
नेणों बोलाची परवडी ॥१॥
आम्हां घ्यावें ऐसें कळे ।
फिरोनि द्यावें हें नकळे ॥२॥
घ्यावें एकाचें बुडवावें ।
तेथें वाईटपण द्यावें ॥३॥
ज्याचे तोंडावरी द्यावें ।
तेणें फिरोनि पडावें ॥४॥
दास म्हणे सांगों किती ।
लोक पाठींच लागती ॥५॥

॥७॥
पहा कलियुगाचे जन ।
कैसे अवघेच दुर्जन ॥१॥
आप्त म्हणे मारूं जातां ।
त्यास वाटे परम व्यथा ॥२॥
पाय देतां मानेवरी ।
सुखें डोळोचे वटारी ॥३॥
रामदास म्हणे मूर्ख ।
नेणे पराव्याचें दु:ख ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥२९॥


पंचक – बंधनपंचक

॥१॥
सर्वकाळ शेंडा मूळा ।
येत जातसे मुंगळा ॥१॥
तैशा कां कारसी येरझारा ।
शरण जावें रघुवीरा ॥२॥
हातीं धरूनियां सूत ।
खालीं वरती येत जात ॥३॥
दास म्हणे जळावरी ।
जैसी फिरती कीं भिगोरी ॥४॥

॥२॥
पायीं लाउनियां दोरी ।
भोंगा बांधिला लेंकुरीं ॥१॥
तैसे पावसी बंधन ।
मग तुजला सोडील कोण ॥२॥
एक धरोनि वानर ।
हिंडविती दारोदार ॥३॥
रामदास म्हणे पाहे ।
रीस धापा देत आहे ॥४॥

॥३॥
नको करूं अभिमान ।
होणार तें देवाधीन ॥१॥
बहु द्रव्यानेम भुलले ।
काळें सर्वहि ग्रासिले ॥२॥
जे म्हणती मी शक्त ।
तेणें जाहले आसक्त ॥३॥
रामदास सांगे वाट ।
कैसा होईल शेवट ॥४॥

॥४॥
डोळां अज्ञान झांपडी ।
पायीं देहबुद्धि बेडी ॥१॥
असे अज्ञान पशुजना ।
जुंपियेले संसारघाणा ॥२॥
खांदीं ओझें विषयाचें ।
पाठीं फटके सुखदु:खाचे ॥३॥
रामीं राम दास म्हणे ।
व्यर्थ गेलें त्याचें जिणें ॥४॥

॥५॥
आलें संसाराचें ज्ञान ।
तेणें झालें समाधान ॥१॥
सकळ साराचेंहि सार ।
ऐसा माझा हा संसार ॥२॥
कैंचा देव कैंचा धर्म ।
तीर्थयात्रा कैंचा भ्रम ॥३॥
कैंचें ज्ञान कैंचें ध्यान ।
अन्न हेंचि समाधान ॥४॥
व्यर्थ गेला रे लैकिकीं ।
येणें पोट भरेना कीं ॥५॥
रामीं रामदास भले ।
आम्हां सौख्य हो मानलेम ॥६॥

॥६॥
कल्पनेचे बरोबरी ।
मन सर्वकाळ करी ॥१॥
स्वप्र सत्यचि वाटले ।
दृढ जीवेंसीं धरिलें ॥२॥
अवघा माईक विचारा ।
नाना मंदिर सुंदर ॥३॥
तोचि मानिला साचार ।
दिव्यांबर मनोहर ॥४॥
जीव सुखें सुखावला ।
थोर आनंद मानिला ॥५॥
रामदास म्हणे मंद ।
लिंगदेहाचा आनंद ॥६॥

॥७॥
कांहीं कळेना विचार ।
अवघा झाला शून्याकार ॥१॥
उमजेना संसारिक ।
आठवेना परलोक ॥२॥
अंध विचारीं पडियेले ।
अंधकारीं सांपडले ॥३॥
मायाजाळें गुंडाळले ।
वासनेनें वेटाळिले ॥४॥
कामक्रोधें जाजावले ।
मदमत्सरें पीडिले ॥५॥
रामीं रामदास म्हने ।
अज्ञानाचीं हीं लक्षणें ॥६॥

॥८॥
अंध अंधारीं बैसले ।
त्यांसि हातें पालविलें ॥१॥
त्यांसि कळेना कळेना ।
त्यांचि वृत्ति निवळेना ।
॥२॥ संतसंगाचें बोलणें संसारिक काय जाणे ॥३॥
म्हणे रामीं रामदास ।
केला नसता अभ्यास ॥४॥

॥९॥
केला संसार अभ्यास ।
झाला आयुष्याचा नाश ॥१॥
सदा उठतां बसतां ।
रामाविण केली चिंता ॥२॥
नाहीं साक्षेपांचा वेग ।
उगाच मांडिला उद्योग ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
ऐसे जीतचि मरणें ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥४२॥


पंचक – पराधीनपंचक

॥१॥
मुंगसाचे कानीं बाळी ।
मुंगुस हिंडे आळोआळीं ॥१॥
तरी तें पाळिलें जाणावें ।
पराधीनचि स्वभावें ॥२॥
वेडें आलेंसे पाहुणें ।
परि तें जगाचें मेहुणें ॥३॥
कार्यकर्ता कीर्तिव्मत ।
त्यासी जाणती समस्त ॥४॥
कार्यकर्ता तो झांकेना ।
वेध लावी विश्वजना ॥५॥
दास म्हणे कुटुंबाचा ।
तोचि पुरुष देवाचा ॥६॥

॥२॥
निज सलगीचें जाणेना ।
पुढें कोणासी मानेना ॥१॥
आळसी निकामी माणुस ।
पुढें होत कासावीस ॥२॥
उगेंच नाचतें ।
कोण पुसतें तयातें ॥३॥
आपणास अवकाळिलें ।
ज्याचें त्यास कळों आलें ॥४॥
आधिं कष्टावें रगडावें ।
कार्य बहुतांचें करावें ॥५॥
बहुतांसी मिळों जाणे ।
त्यासि मानिती शहाणे ॥६॥
बहुत मानला तो ल्याख ।
वरकड जाणावे नल्याख ॥७॥
आहे प्रगट उपाट ।
दास म्हणे सांगों काय ॥८॥

॥३॥
कष्ट करितां मनीं विटे ।
तरि तो कळेल शेवटें ॥१॥
कष्टें उदंड आटोपावें ।
तरि मग पुढें सुखी व्हावें ॥२॥
असतां परधन वेडें ।
काय निवेल बापुडें ॥३॥
शहाणे उदंड कष्टती ।
वडिल उपकारें दाटती ॥४॥
बहुत रखिले लैकिक ।
त्यांचें जिणे अलैकिक ॥५॥
ज्यास त्यास पाहिजे तो ।
जनीं वाटपास येतो ॥६॥
मनोगत जाणे सूत्रें ।
जेथें तेथें जगभित्रें ॥७॥
न सांगतां काम करी ।
ज्ञान उदंड विवरी ॥८॥
स्तुति कोणाची न करी ।
प्राणिमात्रा लोभ करी ॥९॥
कदा विश्वास मोडेना ।
कोणी माणूस तोडीना ॥१०॥
जनीं बहुतचि साहतो ।
कीर्तिरूपेंचि राहतो ॥११॥
दास म्हणे नव्हे दु:खी ।
आपण सुखी लोक सुखी ॥१२॥

॥४॥
आळसें पिंडाचें पालन ।
परि अवघें नागवण ॥१॥
देह केलें तैसें होतें ।
वंचले जें करीना तें ॥२॥
शक्ति आहे तों करावें ।
विश्व कीर्तीनें भरावें ॥३॥
पुण्यवंत तो साक्षेपी ।
आळशी महालोकीं पापी ॥४॥
आपलाची घात करी ।
सदा कठोर वैखरी ॥५॥
माणुस राजी राखों नेंणें ।
त्यासि न मानिती शहाणे ॥६॥
गुणें माणुस भोगतें ।
अवगुणें थितें जातें ॥७॥
दास म्हणे भला भला ।
जेथें तेथें पवाडा केला ॥८॥

॥५॥
सुंदर आळसाची बाईल ।
पुढें काल रे खाईल ॥१॥
ज्याचे वडिल आळसी ।
कोणें शिकवावें तयासी ॥२॥
घरीं खाया ना जेवाया ।
नाहीं लेया ना नेसाया ॥३॥
पत्नी उदंडची खाती ।
आळसी उपवासी मरती ॥४॥
दास म्हणे सांगों काय ।
होता प्रगट उपाय ॥५॥

॥६॥
ऐसें कैसें रे भजन ।
करिताती मूर्ख जन ॥१॥
गधडयासी नमन केलें ।
तेणें थोबाड फोडिलें ॥२॥
उंच नीच सारिखेची ।
दास म्हणे होत छी छी ॥३॥

॥ अभंगसंख्या ॥४२॥


पंचक – मलिनपंचक

॥१॥
महादर्पण खतलें ।
तेणें मुख आच्छादिलें ॥१॥
तैसी वृत्ति हे मळिन ।
होतां बुडे समाधान ॥२॥
धातुवरी आला मळ ।
तेणें लोपलें निर्भळ ॥३॥
शेतीं न जातां आडत ।
तेणें आच्छादलें शेत ॥४॥
मुखें न होतां उच्चार ।
तेणें बुडे पाठांतर ॥५॥
नाहीं दीपाचा विचार ।
दास म्हणे अंधकार ॥६॥

॥२॥
आत्मज्ञानी आहे भला ।
आणि संशय उठला ॥१॥
त्यासि नामचि कारण ।
नामें शोकनिवारण ॥२॥
नानादेश केले जनीं ।
अनुताप आला मनीं ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
जया स्वहित करणें ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥१०॥


पंचक – प्रस्ताविकपंचक

॥१॥
डोळे चिरींव चांगले ।
वृद्धपणीं सरक्या झाले ॥१॥
ओले मातीचा भरंवसा ।
काय मानीसी माणसा ॥२॥
मुख रसाळ चांगलें ।
पुढें अवघें सुर्कुतलें ॥३॥
रम्य नासीक सरळें ।
सर्वकाळ पाणी गळे ॥४॥
कर्ण भूषणें सुंदर ।
पुढें जाहालीं बधिर ॥५॥
बरवी दंताची पंगती ।
परी ती उन्मळूनी पडती ॥६॥
बरवे कर आणि चरण ।
परि ते झाले निष्कारण ॥७॥
अंगकांति होती बरी ।
झाली चिरगुटाचे परी ॥८॥
केश होताती पांढरे ।
लाळ गळतां ना धरे ॥९॥
बहुसाल होतें बळ ।
पुढें जाहलें निर्बळ ॥१०॥
देह होतें जें निर्भळ ।
तेंचि झालें अभंगळ ॥११॥
सर्व तारुण्यें चांगला ।
प्राणी दीनरूप झाला ॥१२॥
रामीं रामदास म्हणे ।
आतां सावधान होणें ॥१३॥

॥२॥
थोटे पांगुळे बधिर ।
आतां तरी होती नर ॥१॥
नाहीं देहाचा भरंवसा ।
शरण जावें जगदीशा ॥२॥
कोड कुश्चळ सर्वांगीं ।
एक झाले क्षयरोगी ॥३॥
एक प्राणी अंध होती ।
एका समंध लागती ॥४॥
नाना रोगांचे उमाळे ।
काय होईल न कळे ॥५॥
रामदास म्हने भावें ।
वेगीं सार्थक करावें ॥६॥

॥३॥
वेगीं व्हावें सावधान ।
ऐसें आहे वृद्धपण ॥१॥
डोळे जाती कान जाती ।
दांत अवघेची पडती ॥२॥
हात गेले पाय गेले ।
देह पाझर्म लागलें ॥३॥
दास म्हणे शक्ति गेली ।
मती अवघीच खुंटली ॥४॥

॥४॥
ऐसें आहे सर्व कांहीं ।
चिरंजीव कांहीं नाहीं ॥१॥
युक्ति जाते बुद्धि जाते ।
क्तिया तेही पालटते ॥२॥
धीर विचार बुडाला ।
होता विवेक तोही गेला ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
वृद्धपणाचीं लक्षणें ॥४॥

॥५॥
अंतीं एकलेंचि जावें ।
म्हणोनि राघवीं भजावें ॥१॥
मातापिता बंधूजन ।
कन्या पुत्रही सोडून ॥२॥
जन्मवरी केला भार ।
शेखीं सोडूनी जोजार ॥३॥
म्हणे रामीं रामदास ।
सर्व सांडुनियां आस ॥४॥

॥६॥
काळ जातो क्षणक्षणा ।
मूळ येईल मरणा ॥१॥
कांहीं धांवाधांव करी ।
जंव तो काळ आहे दुरी ॥२॥
देह आहे जाइजणें ।
भुललासी कवण्या गुणें ॥३॥
मायाजाळीं गुंतले मन ।
परि हें दु:खाचें कारण ॥४॥
सत्य वाटतें सकळ ।
परी जातां नाहीं वेळ ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
आतां सावधान होणें ॥६॥

॥७॥
झालें देह हो गलित ।
आलें संसार लंछित ॥१॥
सावधान सावधान ।
पुढें नाहीं व्यवधान ॥२॥
आतां मन आटोपावचें ।
आपुल्या विजधामा जावें ॥३॥
राहे देवाचें स्मरण ।
रामीं रामदास म्हणे ॥४॥

॥८॥
पुण्य पहावया कारणें ।
देव धाडी बोलावणें ॥१॥
वाट चांगली धरावी ।
पुण्यसामोग्री करावी ॥२॥
वाट वेच नाहीं जाया ।
पुढें सुख कैंचें तया ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
बुद्धिवंत ते शहाणे ॥४॥

॥९॥
अंतकाळ येतयेतां ।
पुढे नये चूकवितां ॥१॥
अकस्मात लागे जावें ।
कांहीं पुण्य आचरावें ॥२॥
पुण्यावीण जातां प्राणी ।
घडे यमाची जाचणी ॥३॥
रामदास म्हणे जना ।
कठीण यमाची यातना ॥४॥

॥१०॥
अभक्त भोगीत यातना ।
देव राखे भक्तजना ॥१॥
देव भक्त दोन्ही एक ।
यम देवाचा सेवक ॥२॥
भक्तें देव केला सखा ।
तोचि त्याचा पाठीराखा ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
भक्ति करा याकारणें ॥४॥

॥११॥
लक्ष्मी आहे रे चंचळ ।
इस जातां नाहीं वेळ ॥१॥
सत्य मानावें उत्तर ।
देव नित्य निरंतर ॥२॥
नाना वैभव समस्त ।
येंती जाती अकस्मात ॥३॥
म्हणे रामीं रामदास ।
काय देहाचा विश्वास ॥४॥

॥१२॥
नाना व्यथा उद्भवती ।
प्राणी अकस्मात जाती ॥१॥
मृत्यु बांधला पदरीं ।
होती आयुष्याची भरी ॥२॥
काळ लागला सन्निधी ।
एक घडी लागों नेदी ॥३॥
राम-दास म्हणे खुणें ।
भेद जाणती शहाणे ॥४॥

॥१३॥
नदी मर्यादा सांडिती ।
उष्णकाळीं वोस होती ॥१॥
तैसा तारुण्याचा भर ।
सवेंचि होतसे उतार ॥२॥
भाग्य चढों लागे वेगें ।
सवेंचि प्राणी भीक मागे ॥३॥
रम दास म्हणे काळ ।
दानीं दिवस पर्वकाळ ॥४॥

॥१४॥
पुरें पट्टणें वसती ।
एक वेळे वोस होती ॥१॥
तैसें वैभव सकळ ।
येतां जात नाहीं वेळ ॥२॥
बहु सृष्टीचीं रचना ।
होय जाय क्षणक्षणा ॥३॥
दास म्हणे सांगों किती ।
आले गेले चक्रवतीं ॥४॥

॥१५॥
सेवकासी भाग्य चढे ।
त्याचे अधीन होणें पडे ॥१॥
देव करील तैसें व्हावें ।
काय करील तें पहावें ॥२॥
वर्तमान घडे जैसें ।
उगेंच व्हावें लागे तैसें ॥३॥
दास म्हणे वेळ कैंसी ।
राज्य जाहलें कलीसी ॥४॥

॥१६॥
काम क्रोध खवळले ।
मद मत्सर मातले ॥१॥
त्यांचे अधीन लागे होणें ।
ऐसें केलें नारायणें ॥२॥
लोभ दंभ अनावर ।
जहाला गर्व अहंकार ॥३॥
दास म्हणे सांगों किती ।
पडली ऐशांची संगति ॥४॥

॥१७॥
ऐसें कैंसें रे सोंवळें ।
शिवतां होतसे ओंवळें ॥१॥
स्नानसंध्या टिळे माळा ।
पोटीं क्रोधाचा उमाळ ॥२॥
नित्य दंडीतोसी देह ।
तरी फिटेना संदेह ॥३॥
बाह्य केली झळफळ ।
देहबुद्धीचा विटाळ ॥४॥
नित्यनेम खटाटोप ।
मनीं विषयाचा जप ॥५॥
रामदासीं दृढभाव ।
तेणेंविण सर्व वाव ॥६॥

॥१८॥
देह विटाळाचा गोळा ।
कैंसा होतसे सोंवळा ॥१॥
तुज कळेना विचारू ।
ऐसेंयासि काय करूं ॥२॥
दृढ केला अभिमान ।
तेणें साधणें बंधन ॥३॥
रामदासीं स्वामीविण ।
केला तितका होय शीण ॥४॥

॥१९॥
गेला संदेहाचा मळ ।
तेणें नि:संग निर्मळ ॥१॥
बाह्य गंगाजळस्रान ।
चित्तशुद्धि ब्रह्मज्ञान ॥२॥
सर्वकाळ कर्मनिष्ठ ।
सर्वसाक्षित्वें वरिष्ठ ॥३॥
रामदासीं स्नानसंध्या ।
सुत करी माता वंध्या ॥४॥

॥२०॥
सर्वकाळ संतृप्तता ।
तृप्त केली लोलंगता ॥१॥
फळ जाहलें तर्पणीं ।
संसारासी पडिलें पाणी ॥२॥
देवराव तृप्त केले ।
भावें आत्म निवेदिलें ॥३॥
रामदासाचे तर्पणीं ।
सर्व केलें रामार्पणीं ॥४॥

॥२१॥
अनित्याचा भ्रम गेला ।
शुद्ध नित्य नेम केला ॥१॥
नित्यानित्य हा विचार ।
केला स्वधर्म आचार ॥२॥
देहबुद्धि अनंर्गळ ।
बोधें फिटला विटाळ ॥३॥
रामदासीं ज्ञान झालें ।
आणि स्वधर्म रक्षिले ॥४॥

॥अभंगसंख्या ॥९९॥


पंचक – वेडसरपंचक

॥१॥
पडसादासीं करी वाद ।
खळाळाशीं तो विवाद ॥१॥
तेथें चालेना मीपण ।
शीण पावावा आपण ॥२॥
सावधानासवें जावें ।
प्रतिबिंबेंसीं भांडावें ॥३॥
रामदास म्हणे भावें ।
समुद्रासीं गडगडावें ॥४॥

॥२॥
संत बोलले बहुविध ।
तेथें कैंचें म्हणूं सिद्ध ॥१॥
कोणें कोणासीं भाडावें ।
कोण्या पंथासीं मोडावें ॥२॥
बहु यात्रा पृथ्वीवरी ।
बहु शब्द नानापरी ॥३॥
नाना सैन्य नाना पुरें ।
दास म्हणे ते उत्तरें ॥४॥

॥३॥
मया अविद्येचें बंड ।
नानाप्रकारीं थोंतांड ॥१॥
अवघें सांडूनियां द्यावें ।
एक भगवंता पहावें ॥२॥
पंचभूतांचा मेळावा ।
दृश्य पदार्थ अघवा ॥३॥
म्हणे रामीं रामदास ।
दृश्य भासे मनोभास ॥४॥

॥४॥
आमचे वंशीं कैंचा राम ।
एक पिंडींचें नि:काम ॥१॥
रामदास्य आलें हातां ।
अवघा वंश धन्य आतां ॥२॥
बापें केली उपासना ।
आम्ही लाधलों त्या धना ॥३॥
बंधु अभिलावा टेंकला ।
वाट घेउनि भिन्न झाला ॥४॥
पोर सकळां संकोचलें ।
एक सुखा उधळले ॥५॥
रामीं रामदासीं स्थिति ।
पाहिली वडिलांची रीति ॥६॥

॥५॥
माजीं बांधावा भोंपळा ।
तैशी बांधों नये शिळा ॥१॥
सारासार निवडावें ।
तैसें जाणोनियां ध्यावें ॥२॥
रत्न खडे येर खडे ।
सगट देतां प्राणी रडे ॥३॥
एका ठायीं सोनें लाख ।
लाख देता मारी हांक ॥४॥
मनुष्य गोड घांस घेतें ।
कडु अवघें सांडितें ॥५॥
दास म्हणे भक्तिसारा ।
नको अभक्ता गव्हारा ॥६॥

॥६॥
गगन आडतचि नाहीं ।
तैसें निरंजन पाहीं ॥१॥
चंचल गुणें सगुणें ।
विकार आड तो पावणें ॥२॥
सारासारनिवड नाहीं ।
प्रत्ययानें पाहें कांहीं ॥३॥
कडु विख आणि वावडें ।
तया लिगडोनि पडे वेडें ॥४॥
तैसें संसाराचें सुख ।
आदि अंतीं अवघें दु:ख ॥५॥
सुखासारिखे दिसतें ।
उदंड दु:ख आहे तेथें ॥६॥
दास म्हणे हा वेळसा ।
कोणें सोसावा गळसा ॥७॥

॥७॥
भगवंताचे भक्तिसाठी ।
थोर करावी आटाआटी ॥१॥
स्वेदबिंदु आले जाण ।
तेंचि भागिर्थीचें स्रान ॥२॥
वोळंगता देवराव ।
सहज होंतसे उपाव ॥३॥
सकळ लोकांचें भाषण ।
देवासाठीं संभाषण ॥४॥
जें हरवलें सांडलें ।
देवावीण कोठें गेलें ॥५॥
जठराग्नीस अवदान ।
लोक म्हणती भोजन ॥६॥
एकवीस सहस्र जप ।
होतो करितां साक्षेप ॥७॥
दास म्हणे मोठें चोज ।
देवीं सहजीं सहज ॥८॥

॥८॥
माजीं बांधावा भोंपळा ।
तैसी बांधों नये शिळा ॥१॥
घेऊं नये तेंचि घ्यावें ।
येर अवघेंचि सांडावें ॥२॥
विषवल्ली अमरवल्ली ।
अवघी देवेंचि निर्मिली ॥३॥
अवघी सृष्टीची लगत ।
करूं नये कीं झगट ॥४॥
अवघेंची केलें देवें ।
जें जें माने तेंचि घ्यावें ॥५॥
अवघें सगत सारिखेंचि ।
वाट मोडे साधनाची ॥६॥
दास म्हणे हरिजन ।
धन्य जाणे तो सज्जन ॥७॥

॥९॥
वेधें भेदावें अंतर ।
भक्ति घडे तदनंतर ॥१॥
मनासारिखें चालावें ।
हेतु जाणोनी बोलावें ॥२॥
जनीं आवडीचे जन ।
तेचि होते हो सज्जन ॥३॥
बरें परीक्षावें जना ।
अवघे सगट पिटवेना ॥४॥
दास म्हणे निवडावें ।
लोक जाणोनियां घ्यावें ॥५॥

॥१०॥
यथातथ्य आठवेना ।
कांहीं हीत तें घडेना ॥१॥
कांता ज्याचे बंदिखाना ।
नव महिने पतना ॥२॥
बारा वर्षे बाळपण ।
आंगीं होतें मूर्खपण ॥३॥
पुढें तारुण्याचे भरें ।
आलें कामाचें विखारें ॥४॥
पुढें आलें वृद्धपण ।
सवें पातलें मरण ॥५॥
दास म्हणे रात्रंदिवस ।
नाही मराया अवकाश ॥६॥

॥११॥
देवें जन्मासि घातलें ।
नाना सुख दाखविलें ॥१॥
त्यासि कैसें विसरावें ।
पुढें कैसेनि तरावें ॥२॥
कुळ समूळ सांभाळिलें ।
नानाप्रकारीं पाळिलें ॥३॥
दास म्हणे देवावीण ।
दुजा सांभाळितो कोण ॥४॥

॥१२॥
रात्रंदिवस दुश्चित ।
चारी घटका सावचित्त ॥१॥
होऊन कीतींनें बैसावें ।
भावें भगवंतासि गावें ॥२॥
सदा संप्तारकथन ।
क्षण एक सावधान ॥३॥
दास म्हणे वारंवार ।
बहुसाल खबरदार ॥४॥

॥१३॥
रात्रंदिवस गव्हार ।
फिरतसे दारोदार ॥१॥
आपलें मन आटोपावें ।
नाहीं तरी फजित व्हावें ॥२॥
कल्पनेचें भरोवरीं ।
करूं नये तेंचि करी ॥३॥
दास म्हणे हें वाढोळ ।
आटोपिना तो चांडाळ ॥४॥

॥१४॥
काय करितें हें मन ।
साक्ष आपुला आपण ॥११॥
हित आपुलें करावें ।
नाहीं वीर्यलोका जावें ॥२॥
काय वासना म्हणते ।
आपणास साक्ष येते ॥३॥
मन असे बरगळ ।
केल्या होतसे होतसे विव्हळ ॥४॥
सांडिना हें संसारिक ।
कांहीं पाहावे विवेंक ॥५॥
दास म्हणे सावधान ।
पदरीं बांधलें मरण ॥६॥

॥ अभंगसंख्या ॥७५॥


पंचक – क्षोभपंचक

॥१॥
करितां सांभाळ आपुला ।
दु:खें जीव भांबावला ॥१॥
पाहों जातां सारासार ।
कांहीं कळेना विचार ॥२॥
लोभें वृत्ति लांचावली ।
क्षोभें वृत्ति जाजावली ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
कोण उपाय करणें ॥४॥
॥२॥
संग स्वार्थाचा धरिला ।
तेणें काम बळावला ॥१॥
थोरपणें हे मातले ।
तेणें अव्हाटीं घातलें ॥२॥
कामाभागें आला क्तोध ।
क्रोधें केला बहू खेद ॥३॥
लोभ दंभाचें कारण ।
मोहें केलें विस्मरण ॥४॥
कामीं लांचावलें मन ।
झालें बुद्धीचें पतन ॥५॥
दास म्हणे हो सकळ ।
अवघे अविद्येचें मूळ ॥६॥
॥३॥
गेला प्रपंच हातींचा ।
लेश नाहीं परमार्थाचा ॥१॥
दोहींकडे अंतरलों ।
थोरपणें भांबावलों ॥२॥
गेली अवघी निस्पृहता ।
नाहीं स्वार्थही पूरता ॥३॥
पूर्ण झाली नाहीं आस ।
इकडें बुडाला अभ्यास ॥४॥
दास म्हणे क्तोधें केलें ।
अवघें लाजिरवाणें झालें ॥५॥
॥४॥
उगमीं विषें कालवलें ।
तेंचि प्रवाहीं पडलें ॥१॥
आतां कोणेकडं जावें ।
कोण्या प्रकारें असावें ॥२॥
होता भूषणाचा ठावो ।
तेथें जहाला अभावो ॥३॥
मूळ अंतरीं तें वेडें ।
जहालें अवघेंचि वांकडें ॥४॥
छाया शांतीची नावडे ।
क्रोधवणवा आवडे ॥५॥
रामदास म्हणे जल्प ।
झाला अंतरीं विकल्प ॥६॥
॥५॥
सन्निपाताचें लक्षण ।
अवघें झालें कुलक्षण ॥१॥
जन कोणीच नावडे ।
प्राणी विकल्पें वावडे ॥२॥
आसवाची बडबडी ।
होऊं पाहे देशोधडी ॥३॥
प्राणी क्रोधें पिसाळलें ।
त्यास कोण म्हणे भलें ॥४॥
मना आलें तें करावें ।
बळेंचि अव्हाटीं भरावें ॥५॥
रामदास म्हणे खरें ।
ज्याचें त्यासी वाटे बरें ॥६॥
॥६॥
अधिक बोलॅचि नेदिती ।
धरूनि जीभचि कापिती ॥१॥
तेथें चालेना कीं ताठा ।
पोटासाठीं देशवटा ॥२॥
हात पाय ते कापिती ।
कर्ण नासिक छेदिती ॥३॥
नानाप्रकारीं यातना ।
अवघें श्रत आहे जना ॥४॥
दास म्हणे सेवाचोर ।
साहेबाचे हरामखोर ॥५॥

॥अभंगसंख्या ॥३२॥


पंचक – वोसणपंचक

॥१॥
वोसणारे वोसणरे ।
वोसणारे राग वोसणरे ॥१॥
आढळेना आढळेना ।
आढ-ळेना संत आढळेना ॥२॥
उमजेना उमजेना ।
उमजेना पंथ उमजेना ॥३॥
कोण जाणे कोण जाणे ।
कोण जपि रामदास जाणे ॥४॥

॥२॥
चालवेना चालवेना ।
उमजेना पंथ उमजेना ॥१॥
दु:ख वाटे दु:ख वाटे ।
दु:ख वाटे देहबुद्धि लोटे ॥२॥
सुख नाहीं सुख नाहीं ।
सुख नाहीं भवसुख नाहीं ॥३॥
जड जातो जड जातो ।
जड जातो सत्य जड जातो ॥४॥
धरवेना धरवेना ।
रामदास म्हणे पण करवेना ॥५॥

॥३॥
संतापलें संतापलें  ।
संतापलें मन संतापलें ॥१॥
झिजलागे झिजलागे ।
झिज-लागे देह झिजलागे ॥२॥
सोसवेना सोसवेना ।
सोसवेना शीण सोसवेना ॥३॥
धीर नाहीं धीर नाहीं ।
दास म्हणे अंतर पाहीं ॥४॥

॥४॥
त्यागवेना त्यागवेना ।
त्यागवेना भाग्य त्यागवेना ॥१॥
बुद्धि नाहीं बुद्धि नाहीं ।
बुद्धि नाहीं देहबुद्धि नाहीं ॥२॥
धरवेना सोडवेना ।
तोडवेना मन वोढवेना ॥३॥
दास म्हणे दास म्हणे ।
पोटिंचा निश्चय कोण जाणे ॥४

॥५॥
मोकल रे मोकल रे ।
मोकल रे मना मोकल रे ॥१॥
योग्य नाहीं योग्य नाहीं ।
त्याग नाहीं वीतराग नाहीं ॥२॥
भक्ति नाहीं मुक्ति नाहीं ।
देव नाहीं सानुकूळ नाहीं ॥३॥
जप नाहीं तप नाहीं ।
गुण नाहीं निर्गुण नाहीं ॥४॥
ज्ञान नाहीं ध्यान नाहीं ।
लय नाहीं साधन नाहीं ॥५॥
शम नाहीं दम नाहीं ।
बाह्यांतरीं मन नाहीं ॥६॥
इष्ट नाहीं मित्र नाहीं ।
धारिष्ठ नाहीं वरिष्ठ नाहीं ॥७॥
दान नाहीं पुण्य नाहीं ।
कर्म नाहीं स्वधर्म नाही ॥८॥
तीर्थ नाहीं व्रत नाहीं ।
शांति नाहीं विश्रांति नाहीं ॥९॥
न्याय नाहीं नीति नाही ।
दास म्हणे कांहींच नाहीं ॥१०॥

॥६॥
साधिल रे साधिल रे ।
साधिल रे भाव साधिल रे ॥१॥
काम आहे क्रोध आहे ।
मद आहे मत्सर आहे ॥२॥
लोभ आहे दंभ आहे ।
क्षोभ आहे क्षेम आहे ॥३॥
भेद आहे खेद आहे ।
वाद आहे उच्छेद आहे ॥४॥
पाप आहे दोष आहे ।
अंतरीं पहातां द्वेष आहे ॥५॥
अर्थ आहे स्वार्थ आहे ।
मान्य तें करणें अर्थ आहे ॥६॥
जाणवेना जाण वेंना ।
दास म्हणे खूण सांगवेना ॥७॥

॥ अभंगसंख्या ॥३४॥


पंचक – वैराग्यपंचक

॥१॥
प्रपंच सांडुनियां बुद्धि ।
जडली परमार्थ उपाधि ॥१॥
मना होईं सावचित ।
त्याग करणें हा उचित ॥२॥
संप्रदाय समुदाव ।
तेणें जडे अहंभाव ॥३॥
रामदास म्हणे नेम ।
भिक्षा मागणें उत्तम ॥४॥

॥२॥
प्रपंच केला ताडातोडी ।
जडली परमार्थाची बेडी ॥१॥
सावधान होईं जीवा ।
त्याग केलचि करावा ॥२॥
काम क्रोध राग द्वेष ।
अंगीं जडले विशेष ॥३॥
रामदासें बरें केलें ।
अवघें जाणोनी त्यागिलें ॥४॥

॥३॥
कोण कैंचा रे भिकारी ।
भीक मागे दारोदारीं ॥१॥
ऐसें म्हणे तेथें जावें ।
सुखें वैराग्यें फिरावें ॥२॥
आहे ब्राह्मण विदेशी ।
नाहीं ठाऊक आम्हांसी ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
कोण आहे कोण जाणे ॥४॥

॥४॥
नका ओळखीचे जन ।
अंगीं वाजे अभिमान ॥१॥
आतां तेथें जावें मना ।
जेथें कोणी वोळखीना ॥२॥
लोक म्हणती कोण काये ।
पुसों जातां सांगो नये ॥३॥
रामदास म्हणे पाही ।
तेथें कांहीं चिंता नाहीं ॥४॥

॥५॥
देह जावो अथवा राहो ।
रामें फेडिला संदेहो ॥१॥
रामालागीं देशवटा ।
संसाराच्या बारा वाटा ॥२॥
जीवालागीं आदि अंतीं ।
एक रामाची संगति ॥३॥
रामदासीं रामरावी ।
नाहीं आणिक उपावो ॥४॥

॥६॥
सांज वोसरतां सात ।
वायां करावा आकांत ॥१॥
तैसीं सखीं जीवलगें ।
जाती एकमेकांमागें ॥२॥
चार दिवस यात्रा भरे ।
सवेंचि मागुती वोसरे ॥३॥
पूर्ण होतां महोत्सवो ।
फुटे अवघा समुदावो ॥४॥
बहुत वराडी मिळाले ।
जैसे आले तैसे गेले ॥५॥
एक येती एक जाती ।
नाना कौतुक पाहाती ॥६॥
बंधु बहिणी माता पिता ।
कन्या पुत्र आणि कांता ॥७॥
ऋणानुबंधाचें कारण ।
वायां शोक नि:कारण ॥८॥
एक बहुसाल जिती ।
एक वेळ वरी जाती ॥९॥
बहु झाले दासदासी ।
नाना पशू गाई महिषी ॥१०॥
धन धान्याचें संचित ।
कांहीं होत कांहीं जात ॥११॥
रामीं रामदास म्हणे ।
संसारासी येणें जाणें ॥१२॥

॥७॥
कोणी पुत्र कामां नये ।
मित्र करी तो उपाये ॥१॥
कैंचें आपुलें परावें ।
अवघें ऋणानुबंधें घ्यावें ॥२॥
जीवलगाचिये परी ।
मातेहुनी लोभ करी ॥३॥
आहे कोण जाणे कैची ।
परी ते जीवाचे जीवींची ॥४॥
जीवलग जीव घेती ।
त्यासि परावीं रक्षिती ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
न कळे देवाचें करणें ॥६॥

॥८॥
जे जे संसारासी आले ।
ते ते तितुकेही एकले ॥१॥
वायां आपुलीं मानिलीं ।
शेखीं दुरी दुरावलीं ॥२॥
सखीं सांडूनियाम देशीं ।
मृत्यु पावलीं विदेशीं ॥३॥
खाती व्याघ्र आणि लांडगे ।
तेथें कैंचीं जीवलगें ॥४॥
जीवलग जीव घेती ।
त्यासि परावीं रक्षिती ॥५॥
राभीं रामदास म्हणे ।
अवघीं जाणावीं पिशुनें ॥६॥

॥९॥
देह बहुतांचें खाजें ।
मुर्ख म्हणे माझें माझे ॥१॥
विंचु विखारें अजगर ।
नाना श्वापदें अपार ॥२॥
नाना पक्षी गीध काक ।
श्वान मार्जार जंबुक ॥३॥
लाव लासी भुत खेत ।
सांगों जातां असंख्यात ॥४॥
किती सांगो वारंवार ।
जीव जीवाचा आहार ॥५॥
म्हणे रामीं रामदास ।
कैंचा देहाचा विश्वास ॥६॥

॥१०॥
घात करूनि आपुला ।
काय रडसी पुढिला ॥१॥
बहु मोलाचें आयुष्य ।
विषयलोभें केला नाश ॥२॥
नाहीं ओळखिलें सत्या ।
तेणें होते आत्महत्या ॥३॥
नरदेहाची संगति ।
गेली गेली हातोहातीं ॥४॥
नाहीं देहाचा भरंवसा ।
गेली गेलीरे वयसा ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
भुलूं नको मूर्खपणें ॥६॥

॥११॥
कोणें कोणासी रडावें ।
एकामागें एकें जावें ॥१॥
एक वेळ गेली माता ।
एक वेळ गेली पिता ॥२॥
द्रव्य दारा जाती पुत्र ।
जीवलगें आणि मित्र ॥३॥
प्राणी संसारासी आला ।
तितुका मृत्युपंथें गेला ॥४॥
पूर्वज गेले देवापासीं ।
तेचि वाट आपणासी ॥५॥
रामदास म्हणे लोक ।
करी गेलियांचा शोक ॥६॥

॥१२॥
ज्याचें होतें तेणें नेलें ।
तेथें तुझें काय गेलें ॥१॥
वेगीं होई सावधान ।
करी देवाचें भजन ॥२॥
गति नकळे होणाराची ।
हे तंव इच्छा भगवंताची ॥३॥
पूर्वसंचिताचीं फळें ।
येती दु:खाचे होलाळे ॥४॥
पूर्वीं केलें जें संचित ।
तें गें भोगावेम निश्चित ॥५॥
दास म्हणे पूर्व रेखा ।
प्राप्त न टळे ब्रह्मादिकां ॥६॥

॥१३॥
वाटे संसार दुस्तर ।
होती दु:खाचे डोंगर ॥१॥
तरी श्रवण करावें ।
तेणें दु:ख विसरावें ॥२॥
पुढें काय करूं आतां ।
वाटे संसाराची चिंत्ता ॥३॥
येतां उभंड भरेना ।
मायाजाळ आवरेना ॥४॥
दुरी जाउनी विवेक ।
आणि आदळतो शोक ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
दु:ख जीवें धरी उणें ॥६॥

॥१४॥
काम क्रोध मद मत्सर ।
जरि झाले अनावर ॥१॥
त्यांसि करावें साधन ।
सदा श्रवण मनन ॥२॥
बोला ऐसें चालवेना ।
जीवभ्रांति हालवेना ॥३॥
दृढ लौकिक सांडेना ।
ज्ञान विवेक मांडेना ॥४॥
पोटीं विकल्प सुटेना ।
नष्ट संदेह तुटेना ॥५॥
दास म्हणे निर्बुजलें ।
मन संसारीं बुडालें ॥६॥

अभंगसंख्या ॥८०॥


पंचक – संशयपंचक

॥१॥
गेलों काशी विश्वेश्वरा ।
सेतुबंध रामेश्वरा ॥१॥
तरी संशय तुटेना ।
पुर्ण गुण पालटेना ॥२॥
भागीरथी गोदावरी ।
केली कृष्णा आणि कावेरी ॥३॥
राम अयोध्येचा पति ।
केली कृष्णद्वारावती ॥४॥
बद्रि ओढया जगन्नाथ ।
केला स्वामी त्रिमल्लनाथ ॥५॥
मातापूर तुळजापूर ।
सप्तश्रृंगी कोल्हापूर ॥६॥
केली पंढरी नरहरी ।
शंभू पाहिला शीखरीम ॥७॥
मोरेश्वर भुलेश्वर ।
ज्वालामुखी हरेश्वर ॥८॥
सिद्ध मैराळ मारुती ।
देव केले नेणों किती ॥९॥
बारा लिंगें या वेगळीं ।
तीर्थे केलीं भूमंडळीं ॥१०॥
रामदास म्हणे भावें ।
तरी हें मन पालटावें ॥११॥

॥२॥
तेणें संशय तुटती ।
पूर्व गुण पालटती ॥१॥
एक उपासना धरी ।
भक्ति भावें त्याची करी ॥२॥
सर्व नेश्वर जाणून ।
वृत्ति करी उदासीन ॥३॥
सत्य वस्तु तें ध्यानें साचार ।
त्याचा करावा विचार ॥४॥
त्यागुनियां अनर्गळ ।
सदा असावें निर्मळ ॥५॥
ध्यानें आवरानें मन ।
आणि इंद्रियदमन ॥६॥
अखंड वाचें रामनाम ।
स्नान संध्या नित्यनेम ॥७॥
दास म्हणे सर्व भाव ।
जेथें भाव तेथें देव ॥८॥

॥३॥

मुख्य पूजा परंपार ।
एकाहूनि एक थोर ॥१॥
आतां कोठें ठेऊं भाव ।
जेथें तेथें महादेव ॥२॥
माझे कुळीचें दैवत ।
पाहों जातां असंख्यात ॥३॥
राम कृष्ण महादेव ।
बनशंकरी खंडेराव ॥४॥
माता सटवाई आपण ।
स्वामी लक्ष्मी नारायण ॥५॥
वीर बैसविला देव्हारा ।
माझी माता एकवीरा ॥६॥
माय राणी पांडुरंग ।
मुंजा नरसिंग झोटिंग ॥७॥
महालक्ष्मी रवळिया ।
कुळदैवत मोरया ॥८॥
मातापुरीची यमाई ।
सप्तशृंगीं चंडाबाई ॥९॥
तुळजापुरीं तुकाबाई ।
घाटमाथाची नवलाई ॥१०॥
दंडपाणी जोगेश्वरी ।
माता कामाक्षी कावेरी ॥११॥
ह्मैसबाई नारायण ।
आग्या वेताळ कारण ॥१२॥
मुंजा जोगिणी मांगिणी ।
बहुसाल मानविणी ॥१३॥
धोपेश्वर कोपेश्वर ।
सिद्धेश्वर सोमेश्वर ॥१४॥
सात पांच रंगनाथ ।
व्यंकटेश वैजनाथ ॥१५॥
अन्नपूर्णा शालिग्राम ।
हयग्रीव मेवश्याम ॥१६॥
परशुराम कोटेश्वर ।
नाना शक्ती परमेश्वर ॥१७॥
महिकावती भोगावती ।
आमुच्या देव्हारां बैसती ॥१८॥
रानदेवी नारायण ।
ह्मैसासुर मल्लिकार्जुन ॥१९॥
अग्निसारिखें दैवत ।
आणि मुख्य प्राणनाथ ॥२०॥
देव तांबडे अनेक ।
बहुसाल केला टाक ॥२१॥
लांबे देव ते नर्मदे ।
देव दाटले नुसदे ॥२२॥
सोमकांत सूर्यकांत ।
नाग आणि चक्रांकित ॥२३॥
औटहात मृत्तिकापूजन ।
नाना देवांचें लेखन ॥२४॥
डाउ पूजावे अनंत ।
गौरी आणि कपोईत ॥२५॥
रामदासीं देव एक ।
येरे सर्वही माईक ॥२६॥

॥४॥
भाव धरी संतापायीं ।
तेणें देव पडे ठायीं ॥१॥
नाना देवांचें भजन ।
तेणें नोहे समाधान ॥२॥
सकळ देवांमध्यें सार ।
आहे अनंत अपार ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
अवघे देव केलें जेणें ॥४॥

॥५॥
आतां कोणा शरण जावें ।
सत्य कोणाचें मानावें ॥१॥
नाना पंथ नाना मतें ।
भूमंडळीं असंख्यातें ॥२॥
जपी तपी नाना हटी ।
मंत्रावळी लक्ष कोटी ॥३॥
एक मुद्रा हे लविती ।
एक आसन घालिती ॥४॥
एक दाविती देखणी ।
एक अनस्यूतध्वनि ॥५॥
एक नासाग्रीं लक्षिती ।
एक हदयीं दाविती ॥६॥
पिंडज्ञानी तत्त्वज्ञानी ।
योगाभ्यासी सिद्ध ज्ञानी ॥७॥
पंचाक्षरी धूम्रपानी ।
गोरांजन उपोषणी ॥८॥
दुग्धाहारी निराहारी ।
फळाहारी पर्णाहारी ॥९॥
एक औषधीप्रयोग ।
एक देती धातुमार्ग ॥१०॥
एक विभूती लविती ।
एका प्रिया द्वारावती ॥११॥
दंडधारी जटाधारी एक बाळब्रह्मचारी ॥१२॥
मौनी नग्र दिगंबर ।
पंचाक्षरी योगेश्वर ॥१३॥
एक जोशी आणि वैदिक ।
एक पंडित पुरा.णिक ॥१४॥
साधु संत मुनीश्वर ।
ऋषीश्वर कवीश्वर ॥१५॥
गाती हरिदास बागडे ।
नृत्य करिती देवापुढें ॥१६॥
एक म्हणती अवघे वाव ।
एक म्हणती अवघे देव ॥१७॥
एक कळोंचि नेदिती ।
एक दाटुनि सांगती ॥१८॥
एक कर्मींच तप्तर ।
एक कर्मीं अनादर ॥१९॥
एक मानिती सगुण ।
एक मानिती पाषाण ॥२०॥
एके केला सर्व त्याग ।
एक म्हणती राजयोग ॥२१॥
रामदास सांगे खूण ।
भक्तिवीणें सर्व शीण ॥२२॥

॥६॥
शरण जावें संतजना ।
सत्य मानावें निर्गुण ॥१॥
नानामतीं काय चाड ।
करणें सत्याचा निवाड ॥२॥
ज्ञान भक्तीसी जाणावें ।
भक्त तयासी म्हणावें ॥३॥
रामीं रामदास सांगे ।
सर्वकाळ संतसंगें ॥४॥

॥७॥
संत कैसेनी जाणावे ।
साधु कैसे ओळखावे ॥१॥
बहुत गोसावी असती ।
भले अवघेचि दीसती ॥२॥
एक संसारीं गुंतले ।
एकें वेष पालटिले ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
कैसीं संतांची लक्षणें ॥४॥

॥८॥
तेचि जाणावे सज्जन ।
जयां शुद्ध ब्रह्मज्ञान ॥१॥
जवंवरी देहाची संगति ।
तंववरी सगुणीं भजती ॥२॥
जाणोनियां सारासार ।
सदा श्रवणीं तप्तर ॥३॥
बाह्यत्याग संपादणे ।
अंतरत्याग निरूपणें ॥४॥
कर्म करिती आवडीं ।
फळाशेची नाहीं गोडी ॥५॥
शांति क्षमा आणि दया ।
सर्वसख्य मानी जया ॥६॥
हरिकथानिरूपण ।
सदा श्रवन मनन ॥७॥
बोलासारिखें चालणें ।
तींच संतांचीं लक्षणें ॥८॥
एकनिष्ठ उपासना ।
अति तत्पर भजना ॥९॥
स्वार्थ सांडुनियां देणें ।
नित्य तेंचि संपादणें ॥१०॥
म्हणे रामीं राम-दास ।
जया नाहीं आशापाश ॥११॥

॥ अभंगसंख्या ॥९०॥


पंचक – नीतिपंचक

॥१॥
कामक्रोधें खवळला ।
तेणें सन्निपात झाला ॥१॥
त्यास औषध करावें ।
पोटी वैराग्य धरावें ॥२॥
कुपथ्य अवज्ञेचें झालें ।
मग तें पुढें उफाळलें ॥३॥
मर्यादेनें निर्बुजलें ।
वारें अभिमानें घेतलें ॥४॥
दडपणाचा घाम आला ।
प्राणी उठोनि पळाला ॥५॥
रामदास म्हणे भले ।
लोक म्हणती पिसाळले ॥६॥

॥२॥
झालें होऊनियां गेलें ।
आतां कैसें होय भलें ॥१॥
यासि सांगतों साधन ।
जेथें होय समाधान ॥२॥
दिवसेंदिवस व्यथा सरे ।
अंगीं आरोग्यता भरे ॥३॥
अनुताप दुरी गेले ।
कांही किंचित उरले ॥४॥
व्यथा हरली विशेष ।
अल्पमात्र उरला दोष ॥५॥
रामदास म्हणे जन्मवरी ।
पुढें विकार नानापरी ॥६॥

॥३॥
मर्यादेचे वाटे जावें ।
अनीति अव्हाटे त्यजावें ॥१॥
एक राम आहे खरा ।
तिकडे गुरुपरंपरा ॥२॥
एकाकडे आहे जन ।
एकाकडे ते सज्जन ॥३॥
पुढें विवेकें वर्तावें ।
मागें मूल सांभाळावें ॥४॥
उदंड झाले समुदाये ।
तरी आदि सोडूं नये ॥५॥
रामीं राम-दास म्हणे ।
जनीं मान्य तें बोलणें ॥६॥

॥४॥
अभक्तांसी निंदी जन ।
गुरूद्रोहीया सज्जन ॥१॥
याकारणें वाटे जावें ।
लागे अवघेंचि करावें ॥२॥
सगुण भजतां ज्ञान मोडे ।
ज्ञानें सगुण आवडे ॥३॥
कमे होतसे उपाये ।
कर्मठपण कामा नये ॥४॥
शब्दें होय समाधान ।
कामा नये शब्दज्ञान ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
किती सांगों मी लक्षणें ॥६॥

॥५॥
धरितां देवासीं अभाव ।
तोंडघशीं पाडी देव ॥१॥
याकारणें वाटें जावें ।
लागे अवघेत्ति रक्षावें ॥२॥
आहे देवासी उपाये ।
गुरुक्षोम कामा नयो ॥३॥
होतां क्रिया अमंगळ ।
त्यासि निंदिती सकळ ॥४॥
एक वैराग्य त्यागितां ।
अंगीं वाटे लोलंगता ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
सर्व नीतीनें करणें ॥६॥

अभंगसंख्या ॥३०॥


पंचक – उपासनापंचक

॥१॥
ज्ञातेपण आधीं सांडी ।
जाणत्या नावडे पाषांडी ॥१॥
देव पतितपावन ।
त्यासि करी अभिमान ॥२॥
ध्रुव प्रल्हाद आपुले ।
भक्त जेणें उद्धरिले ॥३॥
बहुसाल भूमंडळीं ।
तारी भक्तांची मंडळी ॥४॥
जड मूढ सांगों किती ।
ज्यांचि नामें असंख्याती ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
अंतकाळीं सोडवणें ॥६॥

॥२॥
पूजा देवाची प्रतिमा ।
त्याचा न कळे महिमा ॥१॥
देव भक्तांचा विश्राम ।
त्यासि नेणे तो अधम ॥२॥
नाना स्थानें भूमंडळीं ।
कोणीं सांगावीं आगळीं ॥३॥
ज्याचे चरणींचे उदकें  ।
धन्य होती विश्वलोकें ॥४॥
ज्याचीं चरित्रें ऐकतां ।
जनीं होय सार्थकता ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
धन्य होईल स्मरणें ॥६॥

॥३॥
देव भक्तांचा कैवारी ।
रक्षितसे नानापरी ॥१॥
काय स्तंभीं प्रगटला ।
तेणें प्रर्‍हाद रक्षिला ॥२॥
तये द्रौपदीकारणें ।
वस्र दिल्हीं नारायणें ॥३॥
महासंकटीं रक्षिलें ।
गजेंद्रासी सोडवीलें ॥४॥
कूर्मरूपे धरिली धरा ।
झाला वराह दुसरा ॥५॥
जाणे दासाचें अंतर ।
लाखा जोहरी वीवर ॥६॥


पंचक – भक्तिपंचक

॥१॥
सोडी संसाराची आस ।
धरी भक्तीचा हव्यास ॥१॥
दु:खमूळ हा संसार ।
तयांमध्यें भक्ति सार ॥२॥
ग्रंथ पहातां लक्ष कोटी ।
जेथें तेथें भक्ति मोठी ॥३॥
जन्मा आलियाचें फळ ।
दास म्हणे तें सकळ ॥४॥

॥२॥
राम दासाचा कैवारी ।
सेवकांचा अंगीकारी ॥१॥
अंगीकारिले वानर ।
त्यांची ख्याति झाली थोर ॥२॥
स्वये निजधामा जाणें ।
राज्य कीजे बिभीषणें ॥३॥
भक्ता उणें देखे जेथें ।
स्वयें धांव घाली तेथें ॥४॥
तया वैर केलें साहे ।
परी भक्तांचें न साहे ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
निजभक्तांचेनि गुणें ॥६॥

॥३॥
भक्ति रामाची करावी ।
वंशावळी उद्धरावी ॥१॥
तन मन आणि धन ।
सर्व लैकिक सोडून ॥२॥
पांचा पंचकाचे भरें ।
सर्वकाळ अत्यादरें ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
दृढ भक्तीचेनि गुणें ॥४॥

॥४॥
अरे मनुष्यें काय द्यावें ।
एक रघुवीरा मागावें ॥१॥
उपमन्यें धांवा केला ।
क्षीरसिंधु त्या दधिला ॥२॥
धरु शरण चक्रपाणी ।
अढळ शोभा तारांगणीं ॥३॥
राम म्हणतां वदनीं ।
गणिका बैसलीं विमानीं ॥४॥
बाळ मित्र निष्कांचन ।
त्याचें दरिद्र विच्छिन्न ॥५॥
कुब्जा खंगली म्हातारी ।
केली लावण्यसुंदरी ॥६॥
शुकमिषें रामवाणी ।
म्हणतां पावन कुंटिणी ॥७॥
शरणागत निंशाचर ।
राज्य देऊनी अमर ॥८॥
होता बंधूनें गांजिला ।
तो सुग्रीव राजा केला ॥९॥
तया अंबऋषीकारणें ।
दहा जन्म येणें जाणें ॥१०॥
रामदासीं रामराव ।
निजपदीं दिधला ठाव ॥११॥

॥५॥
शिरीं आहे रामराज ।
औषधांचें कोण काज ॥१॥
जो प्रयत्न रामावीण ।
तो तो दु:खासी कारण ॥२॥
शंकराचें हळाहळ ।
जेणें केलें सुशीतळ ॥३॥
आम्हां तोचि तो रक्षिता ।
रामदासीं नाहीं चिंता ॥४॥

॥६॥
विषे शंकरा जाळिलें ।
ज्याच्या नामें शीतळ झालें ॥१॥
रामनामाची औषधी ।
जेणें तुटे भवव्याधि ॥२॥
शिवें केली काशीपुरी ।
विश्व नामें मुक्त करी ॥३॥
रामनामें पुरे कोड ।
न मनें त्यासि घाली होड ॥४॥
रामदासीं दृढ भाव ।
संदेहासि केली भाव ॥५॥

॥७॥
दास आपुले मानावे ।
माझे गुण पालटावे ॥१॥
काम क्रोध मद मत्सर ।
माझे ठायीं तिरस्कार ॥२॥
राग द्वेष लोभ दंभ ।
नांदे अंतरीं स्वयंभ ॥३॥
रामदास म्हणे आतां ।
देवा तुझे गुन गातां ॥४॥

॥८॥
धन्य धन्य ते वानर ।
जवळी राम निरंतर ॥१॥
ब्रह्मादिकां नातुडे ध्यानीं ।
राम वानरगोठणीं ॥२॥
वेद श्रुति नेणे महिमा ।
तो गुज सांगे प्लवंगमा ॥३॥
वानरवेष धरी देव ।
भाग्यें लाधला केशव ॥४॥
दास म्हणे ते देवाचे ।
आवडते रघुनाथांचे ॥५॥

॥९॥
ताळ वाजे मंद मंद ।
मुखीं हरिनाम छंद ॥१॥
फडके ताळी ऐके वेळे ।
घोषे नाचे हें आगळें ॥२॥
रंगीं हरिनाम मातले ।
नामघोषें आनंदले ॥३॥
उभे हरिदास रंगणी ।
रामदास लोटांगणीं ॥४॥

॥१०॥
राज्य आलें रघुनाथाचें ।
भाग्य उदेलें भक्तांचें ॥१॥
कल्पतरू चिंतामणी ।
कामधेनूची दुभणी ॥२॥
परिस जहाले पाषाण ।
अंगीकार करी कोण ॥३॥
नाना रत्नांचे डोंगर ।
अमृताचें सरोवर ॥४॥
पृथ्वी अवघी स्वर्णमय ।
कोणीकडे न्यावें काय ॥५॥
ब्रह्मादिकांचे कैवारी ।
रामदासाचे अंतरीं ॥६॥

॥११॥
एकादशी नव्हे व्रत ।
वैकुंठींचा महापंथ ॥१॥
परी रुक्मांगदाऐसा ।
व्हावा निश्चय मानसा ॥२॥
एकादशी उपोषणें ।
विष्णुलोकीं ठाव घेणें ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
काय प्रत्यक्ष प्रमाणें ॥४॥

॥१२॥
रुक्मांगद होता नर ।
आम्ही काय आहों खर ॥१०॥
देव भक्तवेळाईत ।
राव रंक नाहीं तेथ ॥२॥
तेणें नेला अवघा गांवू ।
आम्ही स्वयें तसे जावूं ॥३॥
रामीं रामदासीं काज ।
धरा एकामेकां लाज ॥४॥

॥१३॥
ज्यासी हरीची प्राप्ति व्हावी ।
तेणें हरिदिनी करावी ॥१॥
एकादशी त्यजिल्या अन्न ।
प्राप्त वैकुंठभुवन ॥२॥
रामीं रामदास म्हणे ।
हरिजागर उपोषणें ॥३॥

॥१४॥
एकादशीच्या अन्नाखालीं ।
भय पातकें लपालीं ॥१॥
कां जीं संतीं अव्हे-रिलीं ।
म्हणूनि तेथें थारावलीं ॥२॥
म्हणे रामीं रामदास ।
घडे अंगीकारी त्यास ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
रामकृपेचेनि गुणें ॥४॥

॥१६॥
जेथूनिया प्रबळता ।
केली तेथेंचि अहंता ॥१॥
तरी ते सर्वही जाणार ।
पुढें घातचि होणार ॥२॥
होताहे भवाचा भार ।
झाली वृत्ति अनावर ॥३॥
दास म्हणे एका-कार ।
पडे देवासी कातर ॥४॥

॥१७॥
सकळ कळा हातीं आल्या ।
रिद्धिसिद्धिही वोळल्या ॥१॥
तरि आदि सांडूं नये ।
देवा भक्तांचा उपाये ॥२॥
मनोसिद्धि वाचासिद्धि ।
जाहली उदंड उपाधी ॥३॥
दास म्हणे राज्य झालें ।
इंद्रपद हाता आलें ॥४॥

॥१८॥
आत्मज्ञानपारंगत ।
झाला बोलका महंत ॥१॥
गुरुपद हाता आलें ।
भूमंडळीं सत्ता चाले ॥२॥
दास म्हणे ज्ञान झालें ।
सर्व मिथ्यासें कळलें ॥३॥

॥१९॥
ज्ञान झालें भक्तजना ।
सांडूं नये उपासना ॥१॥
एका साराचेंहि सार ।
सर्व सांगतों विचार ॥२॥
हेंचि सर्वांचें कल्याण ।
मानूं नये अप्रमाण ॥३॥
दास म्हणे अनु-भवलें ।
भजन भगवंताचें भलें ॥४॥

॥२०॥
देव असतां पाठीराखा ।
त्रैलोक्याचा कोण लेखा ॥१॥
नाना उद्योग वाढती ।
नाना चिंता उद्भवती ॥२॥
स्वस्थ वाटेना अंतरीं ।
नाना व्यवधान करी ॥३॥
रामदास म्हणे भावें ।
भजन देवाचें करावें ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥९०॥


पंचक – कथापंचक

॥१॥
धन्य धन्य तें नगर ।
जेथें कथा निरंतर ॥१॥
गुण गाती भगवंताचे ।
तेचि मानावे दैवाचे ॥२॥
स्वयें बोले जगजीवन ।
थोर कलियुगीं कीर्तन ॥३॥
रामदास म्हणे भले ।
हरिभक्तीं उद्धरले ॥४॥
॥२॥
रामनामावीणें कांहीं ।
अंतीं सोडवण नाहीं ॥१॥
गंगातीरीं योगेश्वर ।
अथवा प्रपंचीं ईश्वर ॥२॥
थोरपणें धरितां तांठा ।
तरि तो नागवे करंटा ॥३॥
बहुत पूजिलीं दैवते ।
योग याग नाना मतें ॥४॥
धोती पोती हो भुजंगी ।
लोकीं कर्म करिता योगी  ॥५॥
विनवी रामीं रामदास ।
नाना साधनीं सायास ॥६॥
॥३॥
सकळ साधनांचें फळ ।
रामनामचि केवळ ॥१॥
जप तप अनुष्ठान ।
अंतीं नामचि प्रमाण ॥२॥
नाना मंत्र मंत्रावळी ।
सोडवीना अंतकाळीं ॥३॥
महापातकी पतित ।
नामें तारिले अनंत ॥४॥
नाम साराचेंहि सार ।
नाम सकळांसी आधार ॥५॥
दास म्हणे सांगो किती ।
नामावीण नाहीं गति ॥६॥

॥ अभंगसंख्या ॥१६॥


पंचक – निष्ठापंचक

॥१॥
ब्रीद आपुलें राखावें ।
आम्हां भक्तां सांभाळावें ॥१॥
बहु नाहीं वाडाचार ।
आतां एकचि निर्धार ॥२॥
एथें कांहीं नाहीं व्यस्त ।
आतां बोलतों नेमस्त ॥३॥
रामदास म्हणे एक ।
आतां धरावा नेमक ॥४॥

॥२॥
नेणों भक्ति नेणों भाव ।
आम्ही नेणों दुजा देव ॥१॥
राघवाचे शरणागत ।
आहों रामनामांकित ॥२॥
मुखीं रामनामावळी ।
काळ घालूं पायांतळीं ॥३॥
रामदासीं रामनाम ।
बाधूं नेणे काळ काम ॥४॥

॥३॥
राम अनाथांचा नाथ ।
आम्हां कैवारी समर्थ ॥१॥
वनीं शिला मुक्त केली ।
गणिका विभानीं वाहिली ॥२॥
राम दीनांचा दयाळ ।
देव सोडिले सकळ ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
आतां आम्हां काय उणें ॥४॥

॥४॥
भूत भविष्याचें ज्ञान ।
जयां अमृतभोजन ॥१॥
रे या देवांचा कैवारी ।
तोचि आमुचा सहाकारी ॥२॥
कल्पतरु चिंतामणि ।
कामधेनूचीं दुभणीं ॥३॥
नाना रत्नांचे डोंगर ।
दिव्य भोग निरंतर ॥४॥
रामदासाची आवडी ।
अवघे देव तेहतिस कोडी ॥५॥

॥ अभंगसंख्या ॥१७॥


पंचक – शिकवणपंचक

॥१॥
काम क्रोध आवरावे ।
मद मत्सर वारावे ॥१॥
सांडोनियां कुलक्षणें ।
शुद्ध धरावीं लक्षणें ॥२॥
लोभदंभांसी लुटावें ।
मीपणासी आटेपावें ॥३॥
विवेक वैराग्य विश्वास ।
धरणें म्हणे रामदास ॥४॥

॥२॥
हो कां मुमुक्षु अथवा मुक्त ।
आहे विशेष आसक्त ॥१॥
विवेक वैराग्यसंग्रह ।
करणें लागे यावद्देह ॥२॥
रामीं रामदास म्हणे ।
शांति ज्याच्या दृढपणें ॥३॥

॥३॥
मना तूंचि शिकविसी ।
शेखीं तूंचि नायकसी ॥१॥
काय सूचसि पाहेरा ।
शरण जावें रघुवीरा ॥२॥
कांति साचाचियें परी ।
करिसी शब्द भरोवरीं ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
जळो बहिर्मुखाचें जिणें ॥४॥

॥४॥
खोडी वाउगीच वाळी ।
एक राम नामावळी ॥१॥
प्रेम सोडी देहबुद्धि ।
मांडी श्रवणीं सभाधि ॥२॥
रामीं रामदास म्हणे ।
अकस्मात लागे जाणें ॥३॥

॥५॥
ईश्वरासी कानकोंडें ।
अंती जाईल कोण्या तोंडें ॥१॥
लाजे हरीच्या रंगणीं ।
जावयासि लोटांगणीं ॥२॥
धर्म न करी दुराचारी ।
नागविलें राजद्वारीं ॥३॥
ना दे फुटका कवडा ।
चोरें घातला दरवडा ॥४॥
म्हणे रामीं रामदास ।
प्रानी नागवला सुखास ॥५॥

॥६॥
पूर्व भूमिका सोडिली ।
जीव झाला दिशाभुली ॥१॥
ऐसें भ्रमाचें लक्षण ।
भुले आपणा आपण ॥२॥
द्रव्य आपण ठेविलें ।
त्याचें तयासि चुकलें ॥३॥
रामदास म्हणे घरीं ।
वाट चुकले अंधारीं ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥२३॥


पंचक – निश्चयपंचक

॥१॥
देह चिरकाळ राहो ।
अथवा शीघ्रकाळ जावो ॥१॥
आम्हीं वस्ती केली रामीं ।
नाहीं आस्था देहधामीं ॥२॥
देहा होऊं उत्तम भोग ।
अथवा पडो दु:खयोग ॥३॥
रामीं रामदास मानिला ।
देह दु:खावेगळा झाला ॥४॥

॥२॥
आम्ही मोक्षलक्ष्मीवंत ।
भवदारिद्य कैंचें तेथ ॥१॥
श्रीपतीचे परिजन ।
आम्ही स्वानंदसंपन्न ॥२॥
समाधान तें सभाग्य ।
असमाधान तें अभाग्य ॥३॥
रामीं रामदासीं देव ।
सख्यासहित स्वानुभव ॥४॥

॥३॥
मोक्षश्री ते आम्हांपाशीं ।
द्रव्यसिद्धि जिच्या दासी ॥१॥
आम्ही परमार्थ-संपन्न ।
अर्थ काय परिच्छिन्न ॥२॥
रामीं रामदास्यभाग्य ।
चढतें वाढतें वैराग्य ॥३॥

॥४॥
समर्थाचे दरिद्री सुत ।
त्यांचे करणे विपरींत ॥१॥
परी समर्थ लक्षण ।
सर्व काळ समाधान ॥२॥
समर्थाच्या विद्येलागीं ।
मधुकरी मागे जगीं ॥३॥
तैसें रामीं गमदासी ।
ब्रह्मविद्येच्या सायासीं ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥१५॥


पंचक – अलिप्तपंचक

॥१॥
सृष्टी दृष्टीसी नाणावी ।
आत्मप्रचित जाणावी ॥१॥
दृष्यविरहित देखणें ।
ड्रुष्य मुरे दृष्यपणें ॥२॥
सृष्टी वेगळा निवांत ।
देव भक्तांचा एकांत ॥३॥
राम अनुभवासि आला ।
दासविवाद खुंटला ॥४॥

॥२॥
मायेभोवतें भोवावें ।
तरि तिनें कुरवाळावें ॥१॥
संत एकटा एकला ।
एकपणाही मुकला ॥२॥
त्यासि माया असोनि नाहीं ।
आपपर नेणें कांहीं ॥३॥
रामीं रामदास गाय ।
व्यालीं नाहीं चाटिल काय ॥४॥

॥३॥
होता वृक्षाच्या डहाळीं ।
पक्षी गेला अंतराळीं ॥१॥
तैसा माया वोलंडिली ।
वृत्ती स्वरूपीं राहिली ॥२॥
खेळकर सूत्र सोडी ।
गेली आकाशी वावडी ॥३॥
भूमंडळीं होता आला ।
ढीग आकाशी उडाला ॥४॥
केलें सिद्धीचें साधना ।
पाय वेधला गगना ॥५॥
रामीं रामदास म्हणें ।
पहे दृष्टीं तारांगणे ॥६॥

॥४॥
दृश्य सांडूनियां मागें ।
वृत्ति गेली लागवेगें ॥१॥
माया सांडूनि चंचळ ।
झाला स्वरूपीं निश्चळ ॥२॥
कांहीं भासची नाढळे ।
वृत्ति निर्गुणीं निवळे ॥३॥
चराचर तें सांडिलें ।
बहुविध वोलंडिलें ॥४॥
अवघें एकचि निर्गुण ।
पाहे वृत्तीतें आपण ॥५॥
रामदास सांगे खूण ।
वृत्ति चातुर्यलक्षण ॥६॥
॥ अभंगसंख्या ॥२०॥


पंचक – ज्ञानपंचक

॥१॥
आम्ही समाधान गावें ।
तुम्हीं सावध ऐकावें ॥१॥
सकळ सृष्टीचा गोसावी ।
त्याची ओळख पुसावी ॥२॥
स्वयें बोलिला सर्वेशु ।
ज्ञानेविण अवघे पशु ॥३॥
दास म्हणे नाहीं ज्ञान ।
तया नरकों पतन ॥४॥

॥२॥
ज्ञानेंवीण जी जी कला ।
ती ती जाणावी अवकळा ॥१॥
ऐसें भगवंत बोलिला ।
चित्त द्यावे त्याचे बोला ॥२॥
एक ज्ञानचि सार्थक ।
सर्व कर्म निरर्थक ॥३॥
दास म्हणे ज्ञानेंविण ।
प्राणी  जन्मला पाषाण ॥४॥

॥३॥
जेणें ज्ञान हें नेणवे ।
पशु तयासि म्हणावें ॥१॥
जेणें केलें चराचर ।
कोण विश्वासि आधार ॥२॥
ब्रह्मादिकांचा निर्भिता ।
कोण आहे त्यापरता ॥३॥
अनंत ब्रह्मांडाच्या माळा ।
विचित्र भगवंताची कळा ॥४॥
रामदासाचा विवेक ।
सर्वाघटीं देव एक ॥५॥

॥ अभंगसंख्या ॥१३॥


पंचक – ध्यानपंचक

॥१॥
व्यान लागलें रामाचें ।
दु:ख हरले जन्माचें ॥१॥
रामपदांबुजावरी ।
वृत्ति गुंतली मधुकरी ॥२॥
तनु मेघश्याममेळें ।
चित्त चातक निवालें ॥३॥
रामचंद्र नाम एकीं ।
चक्षू चकोर जहाले सुखी ॥४॥
कीर्ति सुगंध तरुवरी ।
कुजे कोकिळ वैखरी ॥५॥
रामीं रामदास स्वामी ।
प्रगटले अंतर्यामीं ॥६॥

॥२॥
मुगुटकिरीट कुंडले ।
तेज रत्नांचें फांकलें ॥१॥
ऐसा राम माझे मनीं ।
सदा आठवे चिंतनीं ॥२॥
कीर्तिमुखें बाहुवटें ।
दंडीं शोभती गोमटे ॥३॥
जडित रत्नांचीं भूषणें ।
दशांगुलीं वीरकुंकणें ॥४॥
कांसे शोभे सोनसळा ।
कटीं सुवर्णमेखला ॥५॥
चरणीं नेपुरांचें मेळे ।
वांकी गर्जती खळाळें ॥६॥
राम सर्वांगीं सुंदर ।
चरणीं ब्रीदाचा तोडर ॥७॥
सुगंधपरिमळ दुसरे ।
झेंपावती मधुकरें ॥८॥
गळां पुष्पांचीया माळा ।
वामें शोभे भूमिबाळा ॥९॥
स्वयंभ सुवर्णाची कास ।
पुढें उभा रामदास ॥१०॥

॥३॥
धनुष्य बाण काय केलें ।
कां कर कटावरि ठेविले ॥१॥
हा कां धरिला अबोला ।
दिसे वेष पालटिला ॥२॥
किलकिलाट वानरांचे ।
थवे दिसतना तयांचे ॥३॥
पंढरीसी जहालें येणें ।
एक्या हनुमंताकारणे ॥४॥
दिसे हनुमंत एकला ।
सैन्यामधुनी फुटला ॥५॥
रामीं रामदास भाव ।
तैसा होय पंढरीराव ॥६॥

॥४॥
जहाले अजन्माचे पोटीं ।
मिथ्या म्हणतां फोडी घांटी ॥१॥
नवल नवल सावज ।
काय सांगों मी हें चोजें ॥२॥
तयासि मारूं जातां पाहे ।
जीवा हानि होत आहे ॥३॥
रामीं रामदासवर्म ।
काळेना तयाचें हो कर्म ॥४॥

॥५॥
आत्मारामाविण रितें ।
स्थान नाहीं अनुसरतें ॥१॥
पहातां मन बुद्धि लोचन ।
रामेंविण न दिसे आन ॥२॥
सवडी नाहीं तीर्थगमना ।
रामें रोधिलें त्रिभुवना ॥३॥
रामदासीं तीर्थ भेटी ।
तीर्थ रामेहूनि उठी ॥४॥

॥६॥
रूप रामाचें पाहतां ।
मग कैंची रे भिन्नता ॥१॥
दृश्यअदृश्यावेगळा ।
राम जीवींचा जिव्हाळा ॥२॥
वेगळीक पहातां कांहीं ।
हें तों मुळींच रे नाहीं ॥३॥
रामदासीं राम होणें ।
तेथें कैंचें रे देखणें ॥४॥

॥७॥
वेळे पाऊस पडेना ।
नासकवणी उघडेना ॥१॥
ऐसें कुळवाडीयांचें भंड ।
दु:ख जहालें उदंड ॥२॥
बहूपरी आलें शेत ।
रेडयापाडयाचें आऊत ॥३॥
कांहीं केल्यानें पिकेना ।
धान्य वेळेसी विकेना ॥४॥
फाळा लविला उदंड ।
अवघे जाहलें थोतांड ॥५॥
वारीम रोगांचीं वाजती ।
नाना आभाळें फिरती ॥६॥
टोळ पक्षी मूषकादिक ।
खाती श्वापदें आणिक ॥७॥
दावेदारांची यातना ।
चोरराचोरा राहवेना ॥८॥
नित्य पोटाचे मजूर ।
वेठिखालीं निघे उर ॥९॥
घर खोपट मोडकें ।
एक पटकूर फाटकें ॥१०॥
बहू रोगें गुरे गेलीं ।
धारणीनें मुलें मेलीं ॥११॥
सर्व संसार बुडाला ।
दास म्हणे जोगी झाला ॥१२॥

॥८॥
वड पिंपळ वाढले ।
बहूसाल विस्तारले ॥१॥
तरी ते जाणावे निष्फळ ।
त्यांचें खातां नये फळ ॥२॥
नाना वृक्ष फळेंविण ।
परि ते जाणा नि:कारण ॥३॥
रामदास म्हणे विचार ।
नसतां तसे होती नर ॥४॥

॥९॥
चित्त देउनि ऐकारे ।
पोहणार पडिला धारे ॥१॥
मन मुळ्याच्या शेवटें ।
वाहे जीवन उफराटें ॥२॥
उगमासी संगम झाला ।
रामदासीं शब्द निघाला ॥३॥

॥१०॥
बरें चांगलें आणि गोड ।
ऐकतांचि पुरे कोड ॥१॥
अभिमानापैलीकडे ।
मन बुद्धीसी नातुडे ॥२॥
रामदास म्हणे साचें ॥
मूळस्थान या जन्माचें ॥३॥

॥ अभंगसंख्या ॥५६॥


पंचक – सख्यपंचक

॥१॥
एक लक्ष दिनमणी ।
तृप्त होतसे कमळिणी ॥१॥
तैसा देव आहे दूरी ।
परि तो भक्तांचे अंतरीं ॥२॥
दोन लक्ष निशापति ।
जेणें चकोर तृप्त होती ॥३॥
रामदास म्हणे घन ।
देता चातका जीवन ॥४॥

॥२॥
बाळक जाणेना मातेसी ।
तिचें मन तयापासीं ॥१॥
तैसा देव हा दयाळ ।
करी भक्तांचा सांभाळ ॥२॥
धेनु वत्साचेनि लागें ।
धांवे त्याच्या मागें मागें ॥३॥
पक्षी घेतसे गगन ।
पिल्यांपासीं त्याचें मन ॥४॥
मत्स्य आठवितां पाळी ।
कूर्म दृष्टीनें सांभाळी ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
मायाजाळाचीं लक्षणें ॥६॥

॥३॥
बाळपणीं लोभ करी ।
माता नाहीं जन्मवरी ॥१॥
तैसा देव हा दयाळ ।
दास-पाळ सर्वकाळ ॥२॥
मनासारिखें न होतां ।
बाळकासी मारी माता ॥३॥
दास म्हणे सांगों किती ।
बाप लेंकासि मारिती ॥४॥

॥४॥
मायबापें सांभाळिती ।
लोभाकारणें पाळिती ॥१॥
तैसा नव्हे देवराव ।
त्याचा कृपाळू स्वभाव ॥२॥
चंद्रसूर्य मावळती ।
घन आकाशीं होरपळती ॥३॥
रामीं रामदासीं भाव ।
केली संसाराची वाव ॥४॥

॥५॥
एक सहस्र कोटीवरी ।
जहाली अन्यायाची परी ॥१॥
तरी देव उपेक्षिना ।
कधीं निष्ठुर होईना ॥२॥
शरणागत भांबावले ।
भजन देवाचें चुकलें ॥३॥
रामीं राम-दास म्हणे ।
सर्वगुणें भक्तिउणें ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥२२॥


पंचक – ध्यानपंचक

॥१॥
व्यान लागलें रामाचें ।
दु:ख हरले जन्माचें ॥१॥
रामपदांबुजावरी ।
वृत्ति गुंतली मधुकरी ॥२॥
तनु मेघश्याममेळें ।
चित्त चातक निवालें ॥३॥
रामचंद्र नाम एकीं ।
चक्षू चकोर जहाले सुखी ॥४॥
कीर्ति सुगंध तरुवरी ।
कुजे कोकिळ वैखरी ॥५॥
रामीं रामदास स्वामी ।
प्रगटले अंतर्यामीं ॥६॥

॥२॥
मुगुटकिरीट कुंडले ।
तेज रत्नांचें फांकलें ॥१॥
ऐसा राम माझे मनीं ।
सदा आठवे चिंतनीं ॥२॥
कीर्तिमुखें बाहुवटें ।
दंडीं शोभती गोमटे ॥३॥
जडित रत्नांचीं भूषणें ।
दशांगुलीं वीरकुंकणें ॥४॥
कांसे शोभे सोनसळा ।
कटीं सुवर्णमेखला ॥५॥
चरणीं नेपुरांचें मेळे ।
वांकी गर्जती खळाळें ॥६॥
राम सर्वांगीं सुंदर ।
चरणीं ब्रीदाचा तोडर ॥७॥
सुगंधपरिमळ दुसरे ।
झेंपावती मधुकरें ॥८॥
गळां पुष्पांचीया माळा ।
वामें शोभे भूमिबाळा ॥९॥
स्वयंभ सुवर्णाची कास ।
पुढें उभा रामदास ॥१०॥

॥३॥
धनुष्य बाण काय केलें ।
कां कर कटावरि ठेविले ॥१॥
हा कां धरिला अबोला ।
दिसे वेष पालटिला ॥२॥
किलकिलाट वानरांचे ।
थवे दिसतना तयांचे ॥३॥
पंढरीसी जहालें येणें ।
एक्या हनुमंताकारणे ॥४॥
दिसे हनुमंत एकला ।
सैन्यामधुनी फुटला ॥५॥
रामीं रामदास भाव ।
तैसा होय पंढरीराव ॥६॥

॥४॥
जहाले अजन्माचे पोटीं ।
मिथ्या म्हणतां फोडी घांटी ॥१॥
नवल नवल सावज ।
काय सांगों मी हें चोजें ॥२॥
तयासि मारूं जातां पाहे ।
जीवा हानि होत आहे ॥३॥
रामीं रामदासवर्म ।
काळेना तयाचें हो कर्म ॥४॥

॥५॥
आत्मारामाविण रितें ।
स्थान नाहीं अनुसरतें ॥१॥
पहातां मन बुद्धि लोचन ।
रामेंविण न दिसे आन ॥२॥
सवडी नाहीं तीर्थगमना ।
रामें रोधिलें त्रिभुवना ॥३॥
रामदासीं तीर्थ भेटी ।
तीर्थ रामेहूनि उठी ॥४॥

॥६॥
रूप रामाचें पाहतां ।
मग कैंची रे भिन्नता ॥१॥
दृश्यअदृश्यावेगळा ।
राम जीवींचा जिव्हाळा ॥२॥
वेगळीक पहातां कांहीं ।
हें तों मुळींच रे नाहीं ॥३॥
रामदासीं राम होणें ।
तेथें कैंचें रे देखणें ॥४॥

॥७॥
वेळे पाऊस पडेना ।
नासकवणी उघडेना ॥१॥
ऐसें कुळवाडीयांचें भंड ।
दु:ख जहालें उदंड ॥२॥
बहूपरी आलें शेत ।
रेडयापाडयाचें आऊत ॥३॥
कांहीं केल्यानें पिकेना ।
धान्य वेळेसी विकेना ॥४॥
फाळा लविला उदंड ।
अवघे जाहलें थोतांड ॥५॥
वारीम रोगांचीं वाजती ।
नाना आभाळें फिरती ॥६॥
टोळ पक्षी मूषकादिक ।
खाती श्वापदें आणिक ॥७॥
दावेदारांची यातना ।
चोरराचोरा राहवेना ॥८॥
नित्य पोटाचे मजूर ।
वेठिखालीं निघे उर ॥९॥
घर खोपट मोडकें ।
एक पटकूर फाटकें ॥१०॥
बहू रोगें गुरे गेलीं ।
धारणीनें मुलें मेलीं ॥११॥
सर्व संसार बुडाला ।
दास म्हणे जोगी झाला ॥१२॥

॥८॥
वड पिंपळ वाढले ।
बहूसाल विस्तारले ॥१॥
तरी ते जाणावे निष्फळ ।
त्यांचें खातां नये फळ ॥२॥
नाना वृक्ष फळेंविण ।
परि ते जाणा नि:कारण ॥३॥
रामदास म्हणे विचार ।
नसतां तसे होती नर ॥४॥

॥९॥
चित्त देउनि ऐकारे ।
पोहणार पडिला धारे ॥१॥
मन मुळ्याच्या शेवटें ।
वाहे जीवन उफराटें ॥२॥
उगमासी संगम झाला ।
रामदासीं शब्द निघाला ॥३॥

॥१०॥
बरें चांगलें आणि गोड ।
ऐकतांचि पुरे कोड ॥१॥
अभिमानापैलीकडे ।
मन बुद्धीसी नातुडे ॥२॥
रामदास म्हणे साचें ॥
मूळस्थान या जन्माचें ॥३॥

॥ अभंगसंख्या ॥५६॥


पंचक – सख्यपंचक

॥१॥
एक लक्ष दिनमणी ।
तृप्त होतसे कमळिणी ॥१॥
तैसा देव आहे दूरी ।
परि तो भक्तांचे अंतरीं ॥२॥
दोन लक्ष निशापति ।
जेणें चकोर तृप्त होती ॥३॥
रामदास म्हणे घन ।
देता चातका जीवन ॥४॥

॥२॥
बाळक जाणेना मातेसी ।
तिचें मन तयापासीं ॥१॥
तैसा देव हा दयाळ ।
करी भक्तांचा सांभाळ ॥२॥
धेनु वत्साचेनि लागें ।
धांवे त्याच्या मागें मागें ॥३॥
पक्षी घेतसे गगन ।
पिल्यांपासीं त्याचें मन ॥४॥
मत्स्य आठवितां पाळी ।
कूर्म दृष्टीनें सांभाळी ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
मायाजाळाचीं लक्षणें ॥६॥

॥३॥
बाळपणीं लोभ करी ।
माता नाहीं जन्मवरी ॥१॥
तैसा देव हा दयाळ ।
दास-पाळ सर्वकाळ ॥२॥
मनासारिखें न होतां ।
बाळकासी मारी माता ॥३॥
दास म्हणे सांगों किती ।
बाप लेंकासि मारिती ॥४॥

॥४॥
मायबापें सांभाळिती ।
लोभाकारणें पाळिती ॥१॥
तैसा नव्हे देवराव ।
त्याचा कृपाळू स्वभाव ॥२॥
चंद्रसूर्य मावळती ।
घन आकाशीं होरपळती ॥३॥
रामीं रामदासीं भाव ।
केली संसाराची वाव ॥४॥

॥५॥
एक सहस्र कोटीवरी ।
जहाली अन्यायाची परी ॥१॥
तरी देव उपेक्षिना ।
कधीं निष्ठुर होईना ॥२॥
शरणागत भांबावले ।
भजन देवाचें चुकलें ॥३॥
रामीं राम-दास म्हणे ।
सर्वगुणें भक्तिउणें ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥२२॥


पंचक – संवादपंचक

॥१॥
तुज कैसें पाहुं देवा ।
तुझी कैसी करूं सेवा ॥१॥
बहू देव पाहुनि आलों ।
बहूरूपीं भांबावलों ॥२॥
किती देवळें मोडती ।
किती देव भंगोनि जाती ॥३॥
बहुतांच्या बोले गेलों ।
तेणें बहुत कष्ठलों ॥४॥
रामीं रामदास म्हणे ।
ऐशीं जनांचीं लक्षणें ॥५॥

॥२॥
देव म्हणे मी जात नाहीं ।
आतां चिंता न करी कांहीं ॥१॥
मन पहावा संतां-पाशीं ।
सेवीं जाण त्या भक्तांसी ॥२॥
मज जाणावें विचारें ।
सगुणाचे भजनद्वारें ॥३॥
देव म्हणतो दासासी ।
रे मी आहें तुजपासीं ॥४॥

॥३॥
माझीं ब्रीदें कां विसरतां ।
आणि व्यर्थ कां चेष्टतां ॥१॥
भक्तवत्सल दीना-नाथ ।
तुम्हां आधार समर्थ ॥२॥
भय दाखवी अनिवारी ।
तोचि सर्व चिंता करी ॥३॥
दासासमीप राहतो ।
योगक्षेमही वाहतों ॥४॥

॥४॥
मज गांजिलें तें साहे ।
परि भक्तांचें न साहे ॥१॥
माझा भक्ता शीण व्हावा ।
मग मजसीं त्यांसी दावा ॥२॥
मज अवतार घेणें ।
माझ्या भक्तांचे कारणें ॥३॥
निज दासांसी पाळावें ।
दुर्जनासी निर्दाळावें ॥४॥

॥५॥
आतां बोलावें तें किती ।
मनीं पाहावी प्रचीति ॥१॥
तुम्हा संकटाचे वेळे ।
काय झांकितों मी डोळे ॥२॥
सेवकाचा साभिमान ।
समर्थाचें हें लक्षण ॥३॥
देव म्हणे दास जनीं ।
चिंता न धरावी मनीं ॥४॥

॥६॥
रे मी भक्तांचा कोवसा ।
मनीं धरावा भरंवसा ॥१॥
समर्थाचीये सेवका ।
काय करवेल रंका ॥२॥
कोप येतांचि ते घडीं ।
घेईन काळाची नरडी ॥३॥
दास सांभा-ळावे सदा ।
मज आणिक नाहीं धंदा ॥४॥

॥७॥
काय गावा रे गांव ।
आम्हां नाहीं सर्व ठाव ॥१॥
बोधमृदंग फूटका ।
ताळ द्वैताचा तूटका ॥२॥
दास वेडे हो बागडे ।
नृत्य करिती देवापुढें ॥३॥
रामभेटींचा समय ।
रामदासीम सांगता नये ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥२९॥


पंचक – अर्थसार्थपंचक

॥१॥
पक्षी श्वापद किडा मुंगी ।
पराधीन जिणें जगीं ॥१॥
तैसा नव्हे नरदेही ।
करा भक्तीचा लवलाहो ॥२॥
नीच योनी चारी खाणी ।
अवघे पराधीन प्राणी ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
ज्ञान ध्यान पशु नेणें ॥४॥
॥२॥
पापपुण्य समता घडे ।
तरिच नरदेह जोडे ॥१॥
याचें सार्थक करावें ।
आपणासी उद्धरावें ॥२॥
बहुजन्मांचे शेवटीं ।
नरदेह पुण्यकोटी ॥३॥
रामदास म्हणे आतां ।
पुंढतीं न लागे मागुता ॥४॥
॥३॥
देहआरोग्य चालतें ।
भाग्य नाहीं त्यापरतें ॥१॥
लाहो घ्यावा हरिभक्तीचा ।
नाहीं भरंवसा देहाचा ॥२॥
देह आहे क्षणभंगुर ।
तुम्ही जाणतां विचार ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
अकस्मात लागे जाणें ॥४॥
॥४॥
देशकाळ वर्तमान ।
असे अवघाचि अनुमान ॥१॥
भक्ति करावी देवाची ।
घडि जातसे सोन्याची ॥२॥
काळ वेळची पहातो ।
सदा सन्निध राहातो ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
देहा आहे जाईजणें ॥४॥
॥५॥
पुढें होणार कळेना ।
समाधान आकळेना ॥१॥
मना सावधान व्हावें ।
भजन देवाचें करावें ॥२॥
ऋणानुबंधाचें कारण ।
कोठें येईल मरण ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
भजनें अमरचि होणें ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥२०॥


पंचक – सुंदरपंचक

॥१॥
म्हणे मी एक चांगला ।
शब्द ठेवी पुढिल्याला ॥१॥
नाक नाहीं कान नाहीं ।
जिव्हा नाहीं डोळे नाहीं ॥२॥
हात लुले पाय लुले ।
अवघे दांत उन्भळले ॥३॥
अवगुणी कुलक्षणी ।
दास म्हणे केली हानि ॥४॥

॥२॥
ज्ञानाविण निर्नासिक ।
नये संतांचे सन्मुख ॥१॥
असो इंद्रियें सकळ ।
काय करावी निर्फळ ॥२॥
नाहीं कथानिरूपण ।
हेची बधिर श्रवण ॥३॥
नाहीं देवाचें वर्णन ।
तगे तेंचि मुकेपण ॥४॥
नाहीं पाहिलें देवासी ।
अंध म्हणावें तयासी ॥५॥
नाहीं उपकारीं लविले ।
अहो तेचि हात लुले ॥६॥
नाहीं केलें तीर्थाटण ।
व्यर्थ गेले ते चरण ॥७॥
नाहीं काया झिजविली ।
प्रेतरूपची उरली ॥८॥
नाहीं देवाचें चिंतन ।
मन हिंडे जैसें श्र्वान ॥९॥
नाहीं परमार्थ बोलणें ।
जिव्हा नाहीं तेणें गुणें ॥१०॥
दास म्हणे भक्तीविण ।
अवघें देहीं कुलक्षण ॥११॥

॥३॥
अवघा डोंगर जळाला ।
आहाळोनी काळा झाला ॥१॥
तरी तेथें बहू रंग ।
तैसें अवघें हें जग ॥२॥
दुर्जनासी बरें केलें ।
नाना प्रकारें रक्षिलें ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
जिणें वोवाळिलें सुणें ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥१९॥

 


पंचक – व्यर्थपंचक

॥१॥
आतां सांभाळा आपुला ।
पाहूं जातां काळ गेला ॥१॥
आतां हित कोण वेळे ।
पुढें होणार नकळे ॥२॥
देहालागीं नानापरी ।
कष्ट केले जन्मवरी ॥३॥
केले देहाचें भजन ।
परी देह झाला क्षीण ॥४॥
देहालागीं जीवेंभावें ।
वय वेंचलें आवघें ॥५॥
म्हणे रामीं रामदास ।
केला आयुष्याचा नाश ॥६॥
॥२॥
वय झालें वाताहात ।
अविचारें केला घात ॥१॥
देव नाहीं ओळखिला ।
पुढें विषय देखिला ॥२॥
बाळपण मूर्खपण ।
कांहीं नेणे हो आपण ॥३॥
होता तारुण्याचा भार ।
पुढें झाला कामातुर ॥४॥
वृद्धपणीं संकोचित ।
देह जहाला गलित ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
जन्म गेले मूर्खपणें ॥६॥
॥३॥
देहालागीं कष्ट केले ।
परि ते अवघे व्यर्थ गेले ॥१॥
देह देवाचे कारणीं ।
होतां देव होय ऋणी ॥२॥
प्राणी लोभें गुंडाळला ।
पुढें अंतकाळ आला ॥३॥
जे जे कांहीं कष्ट केले ।
ते ते अवघे व्यर्थ गेले ॥४॥
नानापरी सांभाळिली ।
पुढें काया हे जाळिली ॥५॥
दास म्हणे मूर्खपण ।
पुढें जन्मासी कारण ॥६॥
॥४॥
शत वर्षांची मर्यादा ।
तितुका व्यर्थ गेला धंदा ॥१॥
देह संसारीं गोविला ।
नाहीं देव आठविला ॥२॥
काया वाचा मनोभावें ।
अवघें प्रपंचीं लावावें ॥३॥
नीच सेवकाचे परी ।
सेवा केली जन्मवरी ॥४॥
दास म्हणे विषयबेडी ।
अंतकाळीं कोण सोडी ॥५॥
॥५॥
देव संसारीं घालितो ।
अंतकाळीं सोडवितो ॥१॥
तया देवासी चुकले ।
प्राणी लोभें भांबावले ॥२॥
केलें जेणें चराचर  ।
देव विश्वासी आधार ॥३॥
देव जीवाचें जीवन ।
देव बंधविमोचन ॥४॥
देव सर्वांचे अंतरीं ।
सांभाळितो निरंतरी ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
जयाचेनी धन होणें ॥६॥

॥ अभंगसंख्या ॥२३॥


पंचक – होळीपंचक

॥१॥
अवघेचि बोंबलती ।
होळीभोंवतें भोंवतीं ॥१॥
माया होळी प्रज्जवळली ।
सृष्टि वेढारें लविली ॥२॥
ज्याकारणें गुंडाळती ।
तेंचि वाचें उच्चारिती ॥३॥
होळीमध्यें खोजें आहे ।
तें तूं विचारूनि पाहे ॥४॥
खाजें खातां सुख होये ।
परी कठीण हाता नये ॥५॥
खोल दृष्टीनें पाहिलें ।
खाजें त्याच्या हाता आलें ॥६॥
एक उडी घालूं जाती ।
लंडी चुकोनी पडती ॥७॥
एक देहाचे पांगले ।
तेचि आगीं हुर्पळले ॥८॥
उडी अवध्यांचीच पडे ।
परि तें हातास न चढे ॥९॥
एकें थोर धीर केला ।
खाजें घेऊनि पळाला ॥१०॥
एक आपणची खाती ।
एक सकळांतें वाटिती ॥११॥
एक घेउनी पळाले ।
तंव त्यावरि पडे जाळें ॥१२॥
रामीं रामदास होळी ।
केली संसाराची धुळी ॥१३॥
॥२॥
अझुनी कायरे दुश्चिता ।
सावधान होईं आतां ॥१॥
नागविलें योनिद्वारें ।
म्हणूनि बोंबलती पोरें ॥२॥
सकळ नाडीयेलें वोजें ।
अवघी एक बोंब गाजे ॥३॥
धुळी टाकिली मस्तकीं ।
कोणी दाद देईना कीं ॥४॥
राडी ऐसे नर्क होती ।
म्हणोनि प्रत्यक्ष दाविती ॥५॥
झोबी लोंबी हो घेउनी ।
जाती टाकिती नेउनी ॥६॥
नेघे नेघे म्हणती बळी ।
बळें घालिती पाताळीं ॥७॥
धरुनी अकस्मात नेती ।
अवघीं कौतुकें पहाती ॥८॥
तेथें असेना मर्यादा ।
थोर करिती आपदा ॥९॥
घरोघरीं फेरे करिती ।
तैशा होती पुनरावृत्ति ॥१०॥

॥ अभंगसंख्या ॥२३॥


पंचक – वादपंचक

॥१॥
व्यान विषयाचें तुटावें ।
म्हणुनि हरिकथे जावें ॥१॥
ऐसी हेचि कथा गावी ।
तरि तें धांवणें नागवी ॥२॥
विषयांसीं कंटाळले ।
म्हणुनी हरिकथे आले ॥३॥
विषयध्यान सांडावया ।
आलों कीर्तनाच्या ठायां ॥४॥
काम कोध मजपासीं ।
म्हणोनि आलों हरि-कथेनी ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
वाद सांडा निरूपणें ॥६॥
॥२॥
हरिकथा निरूपणें ।
तेणें लागलें भांडणें ॥१॥
अमृताचें विष झालें ।
हें तों प्रचीतीसी आलें ॥२॥
चिंतामणी चिंता करी ।
परिस जाहला भिकारी ॥३॥
आनंदानें दुखविलें ।
काम क्रोधें नागविलें ॥४॥
कल्पतरूचा फणसा ।
एकाएकीं भरला कैसा ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
हानि घ ली निरूपणें ॥६॥॥ अभंगसंख्या ॥१२॥


पंचक – भ्रमपंचक

॥१॥
झाला स्वरूपीं निश्चय ।
तरी कां वाटतसे भय ॥१॥
ऐसें भ्रमाचें लक्षण ।
भुले आपण आपण ॥२॥
क्षण एक निराभास ।
क्षण एक मी माणूस ॥३॥
रामीं राम-दास म्हणे ।
देहबुद्धीचेनी गुणें ॥४॥
॥२॥
छाया देखोनि आपुली ।
जीव झाला दिशाभुली ॥१॥
ऐसें भ्रमाचें लक्षण ।
भुले आपणा आपण ॥२॥
मुखें बोलतां उत्तर ।
तेथें जालें प्रत्युत्तर ॥३॥
डोळां घालितां आंगोळी ।
एकाचीं तीं दोन जालीं ॥४॥
पोटीं आपण कल्पिलें ।
तेंच आलेंसें वाटलें ॥५॥
दास म्हणे हे उपाधि ।
शंका धरितां अधिक बाधी ॥६॥
॥३॥
पोते आहे खांद्यावरी ।
गेलें म्हणोनि हांका मारी ॥१॥
ऐसें भ्रमाचें लक्षण ।
भुले आपणा आपण ॥२॥
नेणोनियां जना पुसे ।
पाहों जातां हातीं असे ॥३॥
शोक जाहला विकल ।
पाहों जातां कंठीं माळ ॥४॥
वस्तु बांधोनि पदरीं ।
पुसतसे दारोदारीं ॥५॥
रामदास म्हणे जना ।
जवळी असोनि कळेना ॥६॥
॥४॥
कांहीं दिसे अकस्मात ।
तेथें आलें वाटे भूत ॥१॥
वायां पडावें संदेहीं ।
मुळीं तेथें कांहीं नाहीं ॥२॥
पुढें देखतां अंधारें ।
तेथें आलेम वाटभरें ॥३॥
झाडझुडूप देखिले ।
जीवीं वाटे कोणी आलें ॥४॥
पुढें रोविलासे झेंडा ।
भ्रांत्या म्हणे कोण उभा ॥५॥
रामदास सांगे खूण ।
भितो आपणा आपण ॥६॥
॥५॥
वाजे पाऊल आपुलें ।
म्हणे मागें कोण आलें ॥१॥
कोण धांवतसे आड ।
पाहों जातां झालें झाड ॥२॥
भावितसे अभ्यंतरीं ।
कोण चाले बरोबरी ॥३॥
शब्दपडसाद ऊठिला ।
म्हणे कोणी रे बोलिला ॥४॥
रामीं रामदास म्हणे ।
ऐसीं शंकेची लक्षणें ॥५॥
॥६॥
आला आला रे बागुला ।
म्हणतां शंका धरी मूल ॥१॥
परी ते शाहाणे जाणती ।
तैसी माया हे मानिती ॥२॥
मृगें म्हणती मृगजळ ।
अवघे दाटलें तुंबळ ॥३॥
पाहो जातां दृष्टीचें बंधन ।
मूर्खा होय समाधान ॥४॥
पाहे स्वप्रींची संपत्ति ।
सत्य मानी मंदमती ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
ऐसीं मूर्खाचीं लक्षणें ॥६॥॥ अभंगसंख्या ॥३३॥

—————————————————————————————————————————————————————————————————————————————————–

पंचक – झटपणीपंचक

॥१॥
पांचां भूतांची झडपणी ।
जाली जीवांसी जाचणी ॥१॥
पूर्व स्मरण राहिलें ।
प्राणी आंगीं घुमारिलें ॥२॥
बाधा जाहली अंतरीं ।
मन आळचि तें करी ॥३॥
बोलों जातां सारासार ।
त्यासी कळेना विचार ॥४॥
जड देहची भावना ।
संतजन ओळखेना ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
सत्य बोलावें शहाणें ॥६॥

॥२॥
आले संत पंचाक्षरी ।
शब्द मारिती अंतरीं ॥१॥
पोटीं प्रस्ताव घालिती ।
अनुतापें पोळ विती ॥२॥
दु:खमूळ हा संसार ।
विवेकाचे फोकें मार ॥३॥
धिक्काराचा धूर देती ।
तेणें होतसे विपत्ति ॥४॥
संसाराची रक्षा भली ।
त्याचे आंगीं बाणविली ॥५॥
दास म्हणे निगुती ।
प्राणीयांसी बोलविती ॥६॥

॥३॥
कोण कोठील आहेसी ।
आम्हां सांग निश्चयेंसी ॥१॥
स्थूळ सूक्ष्म कारण ।
सांग तुझें कोण स्थान ॥२॥
पिडब्रह्मांडरचना ।
अष्टदेहविवंचना ॥३॥
पिंडज्ञान तुझें स्थूळ ।
किंवा तत्त्वांचा पाल्हाळ ॥४॥
सांग मायेचें अरण्य ।
किंवा तुझें ब्रह्मारण्य ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
आतां बोलावें स्मरणें ॥६॥

॥४॥
चहूं निगमींचीं बीजें ।
कानीं फुंकिलीं सहजें ॥१॥
तेणें प्राणी उमजला ।
पाहे विचार आपुला ॥२॥
नित्यानित्य सारासार ।
केला विवेक विचार ॥३॥
संत असतां दाविलें ।
आंत अनंत भाविलें ॥४॥
नाना साधनीं सायासीं ।
दृढ केलें निश्चयेंसीं ॥५॥
दास म्हणे निरूपणी ।
केली भूतांची झाडणी ॥६॥

 

 

 

॥५॥
कांहीं एक उमजलें ।
पुन्हां संदेहीं पडलें ॥१॥
म्हणे मज खाया देणें ।
मागें संदेह सांडणें ॥२॥
आलें मीपणासरिसें ।
त्याच विषयें संतोषे ॥३॥
येणेंआनष्ठेसी मांडिलें ।
मग आम्हीं सांडविलें ॥४॥
देहबुद्धीचें अज्ञान ।
मागें संशयाचें आन ॥५॥
रामदासीं उमजलें ।
भूतापासूनि सोडिलें ॥६॥

॥६॥
पंचभूतांचें अज्ञान ।
गेलें नि:शेष निघोन ॥१॥
म्हणे येथें कोण आलें ।
जन कासया मिळाले ॥२॥
मी तों आहें सावधान ।
मज कां केलें बंधन ॥३॥
पूर्व स्मरण मजला ।
भूत लागलें जनाला ॥४॥
मी तो वस्तु केवळ ।
वायां मिळाले सकळ ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
संतकृपेचेनी गुणें ॥६॥

॥ अभंगसंख्या ॥३६॥


पंचक – गंधपंचक

॥१॥
पांचांमध्यें जें पाहिलें ।
पाहे तैसेंचि वहिलें ॥१॥
तीं अक्षरीं उच्चार ।
त्यासी माझा नमस्कार ॥२॥
सातां जनाचें शेवटीं ।
आट करितां होती भेटी ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
नवांमाजीं पहिल्या गुणें ॥४॥
॥२॥
पहिल्या गुणें दुसर्‍या पक्षा ।
तेणें लक्षावें अलक्षा ॥१॥
देवाजवळीं चुकला ।
भक्तिभेद भांबावला ॥२॥
पुढें सांपडतां धन ।
वायां करावें साधन ॥३॥
रामदास म्हणे सार ।
येथें पाहिजे विचार ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥८॥

——————————————————————————————————————————————————————————————————————————————————-

पंचक – संतपंचक

॥१॥
मूर्ति त्रिलोकीं सांवळी ।
दृष्टि विश्वाची चुकली ॥१॥
भाग्यें आले संतजन ।
जालें देवाचें दर्शन ॥२॥
देवजवळी अंतरीं ।
भेटी नाहीं जन्मवरी ॥३॥
रामदासीं योग जाला ।
देहीं देव प्रगटला ॥४॥
॥२॥
जन्मोजन्मींचा सांगात ।
भेटी झाली अकस्मात ॥१॥
आतां सांडितां सुटेना ।
संतु प्रीतीचा तुटेना ॥२॥
सदा नित्य निरंतरीं ।
देह सबाह्य अंतरीं ॥३॥
त्याग करितां संयोग ।
नव्हे कल्पांतीं वियोग ॥४॥
॥३॥
देव अभक्ता चोरला ।
आम्हां भक्तां सांपडला ॥१॥
भेटी जाली सावकाश ।
भक्ता न लागती सायास ॥२॥
पडे विवेकवेत्रपाणि ।
वरी दृष्टीची दाटणी ॥३॥
रामदासाचें अंतर ।
देवापाशीं निरंतर ॥४॥
॥४॥
भेटी देईना जनासी ।
पाठी लागे सज्जनासी ॥१॥
ऐसें प्रीतीचें लक्षण ।
भेटीवीण नाहीं क्षीण ॥२॥
नसे साधन सायासीं ।
तो हा आम्हां अनायासीं ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
संग संगाचेनी गुणें ॥४॥
॥५॥
देव आम्हांसी जोडिला ।
संतसंगें सांपडला ॥१॥
कडाकपाटीं शीखरीं ।
धुंडिताती नानापरी ॥२॥
नाना शास्रीं धांडोळिती ।
जयाकारणें कष्टती ॥३॥
रामदास म्हणे भावें ।
वेगीं संतां शरण जावें ॥४॥
॥६॥
ब्रह्मादिकांसी दुर्लक्ष ।
देव भक्तांसी सुलभ ॥१॥
थोरपणें आकळेना ।
जाणपणासी कळेना ॥२॥
नाहीं योगाची आटणी ।
नाहीं तपीं तीर्थाटणीं ॥३॥
दास म्हणे साधूवीण ।
नाना साधनांचा शीण ॥४॥॥ अभंगसंख्या ॥२४॥

————————————————————————————————————————————————————–

पंचक – स्फुट

॥१॥
त्याचे पाय हो नमावे ।
त्याचें कीर्तन हो ऐकावें ॥१॥
दुजियासी सांगे कथा ।
आपण वर्ते त्याची पथा ॥२॥
कीर्तनाचें न करी मोल ।
जैसे अमृताचे बोल ॥३॥
सन्मानितां नाहीं सुख ।
अपमानितां नाहीं दु:ख ॥४॥
किंचित् दिलें दातयानें ।
तेंहि घेत आनंदानें ॥५॥
ऐस आहे हरिदास ।
लटकें न वदे रामदास ॥६॥
॥२॥
वाणी शुद्ध करी नामीं ।
चित्त शुद्ध होय प्रेमीं ॥१॥
नित्य शुद्ध होय नामीं ।
वसतांही कामीं धामीं ॥२॥
कर्ण शुद्ध करी कीर्तन ।
प्राण शुद्ध सुमन ॥३॥
त्वचा शुद्ध करी रज ।
मस्तक नमितां पदांत्रुज ॥४॥
करशुद्धि राम पूजितां ।
पादशुद्धि देउळी जातां ॥५॥
नेमें लिंग करी शुद्ध ।
अंतर निर्मळ करी गुद ॥६॥
रामापायीं रहाताम बुद्धि ।
रामदासा सकळ शुद्धी ॥७॥
॥३॥
माझें सर्व जावें देवानें रहावें ।
देवासी पहावें भक्तपणें ॥१॥
भक्तपणें मज देवची जोडला ।
अभ्यास मोडला सर्व कांहीं ॥२॥
सर्व कांहीं जावेओ एक देव राहो ।
माझा आर्त भावो ऐसा आहे ॥३॥
जो हेत अंतरीं देव तैसा झाला ।
हा दीन पाहिला कोणी एक ॥४॥
कोणी एक पुण्य जे होतें संचलें ।
दास म्हणे झालें समाधान ॥५॥
॥४॥
दीनाचा दयाळू कीर्ति ऐकियेली ।
म्हणूनी पाहिली वाट तूझी ॥१॥
अनाथाचा नाथ होथील कैवारी ।
म्हणोनियां हरीं बोभाईलें ॥२॥
तुजविण कोण जाणे हे अंतर ।
कोणासी जोजार घालूं माझा ॥३॥
दास म्हणे आम्ही दीनाहूनी दीन ।
करावें पालन दुर्बळाचें ॥४॥
॥५॥
आम्हां पतितांची सांड केली जरी ।
आमचा कैवारी कोण आहे ॥१॥
आम्हीं भरवंसा कोणाचा धरावा ।
सांगावें केशवा दयानिधे ॥२॥
तुजविण आम्हां नाहीं त्रिभुवनीं ।
धांवे चक्रपाणि दीनबंधो ॥३॥
पतितपावन ब्रीद हें बांधिलें ।
तारावें वहिलें दासालागीं ॥४॥
॥६॥
पळशी तूं तरी नाम कोठें नेशी ।
आम्ही अहर्निशीं नाम घोकूं ॥१॥
आम्हांपासोनियां जातां नये तुज ।
तें हें वर्म बीज नाम जपूं ॥२॥
देवा आम्हां तुझें नाम हो पाहिजे ।
मग भेटी सहजें सहजें देणें लागे ॥३॥
भोळे भक्त आम्ही चुकलोचि कर्म ।
सांपडलें वर्म रामदासा ॥४॥
॥७॥
गजेंद्र सावज पडला पानवडीं ।
रामें तेथें उडी टाकियेली ॥१॥
प्रल्हाद गांजितां कोण सहाकारी ।
स्वयेंची मुरारि प्रगटला ॥२॥
क्षत्रियें ब्राह्मणें गांजिलीं बापडीं ।
रामें तेथें उडी घाडियेली ॥३॥
तेहतीस कोटी देव पडिले बांदोडीं ।
रामें तेथें उडी टाकियेली ॥४॥
दासापायीं पडली देहबुद्धि बेडी ।
रामें तेथें उडी टाकियेली ॥५॥
रामदास म्हणे नका करूं शीण ।
रामें भक्त कोण उपक्षिले ॥६॥
॥८॥
तुजविण देव मज कोणी नाहीं ।
माझी चिंता कांहीं असों द्यावी ॥१॥
वैराग्यें अनिष्ट अभावें वरिष्ठ ।
माझे मनीं नष्ट संदेहता ॥२॥
विवेकें सांडिलें ज्ञानें ओसंडिलें ।
चित्त हें लागलें तुझे पायीं ॥३॥
तुझें नाम वाचें उच्चारीत असें ।
अंतरीं विश्वास धरीयेला ॥४॥
रामदास म्हणे मी तुझें अज्ञान ।
माझें समाधान करी देवा ॥५॥
॥९॥
श्वानाचिया पुत्रें कल्होळ मांडिला ।
कलहो लागला एकसरां ॥१॥
भुंकितां गुरगुरी वासितोचि तोंड ।
वरती थोबाड करूनियां ॥२॥
एक ते भुंकती एक ते रडती ।
दास म्हणे गति निंदकांची ॥३॥
॥१०॥
मेरूचिया माथां ठेवूनियां पाव ।
जात असे राव कैलासींचा ॥१॥
कैलासींचा राव एक देव क्षोभला ।
देशधडी केला लंकानाथ ॥२॥
लंकेच्या चोहाटीं मांडियेला खेळ ।
अग्रीचा कल्लोळ घरोघरीं ॥३॥
जाळीयेलीं घरें सुंदर मंदिरे ।
पावला कैवारें जानकीच्या ॥४॥
जानकीचा शोक दुरी दुराविला ।
यशवंत झाला रामदास ॥५॥
॥११॥
जाणावा तो नर देवची साचार ।
वाचें निरंतर राम राम ॥१॥
सगुणीं सद्भाव नाहीं ज्ञानगर्व ।
तयालागीं सर्व सारीखची ॥२॥
निंदका वंदका सगट सांभाळीं ।
मन सर्व काळीं पालटेना ॥३॥
पालटेना मन परस्रीकांचनीं ।
निववी वचनीं पुढिल्यासी ॥४॥
पुढिल्यासि तोचि सुख देत आहे ।
उपकारीं देह लावीतसे ॥५॥
लावीतसे देह रामभजनास ।
रामीं रामदास हरिभक्त ॥६॥
॥१२॥
भक्तपणें रामनामाचा अव्हेर ।
करी तो गव्हार मुक्त नव्हे ॥१॥
मुक्त नव्हे काय स्वयें शूलपाणि ।
रामनाम वाणी उच्चारीतो ॥२॥
राम म्हणे शिव तेथें किती देव ।
बापुडे मानव देहधारी ॥३॥
देहधारी नर धन्य ते संसारीं ।
वाचे निरंतरीम रामनाम ॥४॥
रामनाम वाचें स्वरूप अभ्यंतरीं ।
धन्य तो संसारीं दास म्हणे ॥५॥
॥१३॥
मी खरा पतित तूं खरा पावन ।
आतां अनमान करूं नको ॥१॥
आतां कांहीं मज चिंता तीही नसे ।
तुझें नाम कैंसें वाचे येई ॥२॥
समथे घेतला नामासाठीं भार ।
मज उपकार कासयाचा ॥३॥
रामदास म्हणे तुझें तुज उणें ।
सोयरीम पिशूनें हांसतील ॥४॥
॥१४॥
पतितपावना जानकीजीवना ।
वेगीं माझ्या मना पालटावें ॥१॥
मिथ्या शब्दज्ञानें तुज अंतरलों ।
संदेहीं पडलों मीपणाच्या ॥२॥
सदा खळखळ निर्गुणाची घडे ।
सगुण नातुडे ज्ञानगवै ॥३॥
रामदास म्हणे ऐसा मी पतीत ।
मीपणें अनंत आतुडेना ॥४॥
॥१५॥
टाळ धरूं कथा करूं ।
रामालागीं हांका मारूं ॥१॥
ये रे रामा ये रे रामा ।
तुझी आवड लागो आम्हां ॥२॥
तुजविण गाईल कोण ।
ऊठ सांडिलें मीतूंपण ॥३॥
राम-दास पाहे वास ।
भेटी द्यावी सावकाश ॥४॥
॥१६॥
रामभक्तिवीण आन नाहीं सार ।
साराचें हें सार राम एक ॥१॥
कल्पना-विस्तारू होतसे सन्वरू ।
आम्हां कल्पतरू चाड नाहीं ॥२॥
कामनेलागोन विटलेंसे मन ।
तेथें चाड कोण कामधेनु ॥३॥
चिंता नाहीं मनीं राम गातां गुणीं ।
तेथें चिंतामणि कोण पुसे ॥४॥
कदा नाही नाश स्वरूप सुंदर ।
तेथें आम्हां हिरे चाड नाहीं ॥५॥
रामदास म्हणे रामभक्तीवीण ।
जाणावें तें उणें सर्व कांहीं ॥६॥
॥१७॥
सीतापति राम पतितपावन ।
गाती भक्तजन आवडीनें ॥१॥
राघवाच्या गुणा न दिसे तूळणा ।
कैलासींचा राणा लांचावला ॥२॥
देवांचें मंडण भक्तांचें भूषण ।
धर्म संरक्षण राम एक ॥३॥
रामदास म्हणे धन्य त्यांचें जिणें ।
कथानिरूपणें जन्म गेला ॥४॥
॥१८॥
आम्हीं देखिला विठोबा ।
आनंदें विटेवरी उभा ॥१॥
तेथें दृश्याची जे दाटी ।
तेचि रुक्मिणी गोमटी ॥२॥
रामीं रामदास म्हणे ।
जो ओळखे तोचि धन्य ॥३॥
॥१९॥
लांचावोनि भक्तिलोभा ।
असे वाळवंटीं उभा ॥१॥
पदकीं इंद्रनीलशोभा ।
प्रभे शोभा उजळती ॥२॥
भक्त पुंडलिकें गोविला ।
जाऊं नेदी भांबाविला ॥३॥
विटे नीट असे ठाकला ।
भीमातीर वाळुवंटी ॥४॥
भाग्य पुंडलिकाचें ।
उभें दैवत त्रिलोकींचें ॥५॥
कीं जें तारूं भवसागरीं ।
भीमातीरीं विनटलें ॥६॥
एकें पुंडलिकें करुनी जोडी ।
आम्हांसी दिधली कल्पकोडी ॥७॥
तुटलीं संसारसांकडीं ।
रामदास म्हणतसे ॥८॥
॥२०॥
जीवन्मुक्त प्राणी होऊनियां गेले ।
तेणें पंथें चाले तोचि धन्य ॥१॥
जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी ।
नि:संदेह मनीं सर्वकाळ ॥२॥
मिथ्या देहभान प्रारब्ध अधीन ।
राखे पूर्णपण समाधानीं ॥३॥
आवडीनें करी कर्म उपासना ।
सर्व काळ ध्यानारूढ मन ॥४॥
पदार्थाची हानि हाता नये कोणी ।
जयाची करणी बोला ऐसी ॥५॥
धन्य पैं ते दास संसारीं उदास ।
तयां रामदास नमस्कारी ॥६॥
॥२१॥
संसार देखिला तरी पाहे सार ।
वायां येरेझार पाडूं नको ॥१॥
पाडूं नको दु:खसागरीं आपणा ।
म्हणे नारायणा ओळखावें ॥२॥
वेगीं आप आपणासीं ।
संसारीं सुटशीं दास म्हणे ॥३॥
॥२२॥
विचारें संसार होतो देशधडी ।
सोनियाची घडी जात असे ॥१॥
डावा तास गेला मोक्षपंथा जातां ।
विवेकें तत्त्वतां याशीं नांवें ॥२॥
सदा श्रीरामाचं भजन करितां ।
दास म्हणे चिंता दूर होय ॥३॥॥ अभंगसंख्या ॥१०५॥

एकूण अभंगसंख्या ॥१९५६॥

———————————————————————————————————————————————————————————-

पंचक – संत रामदास समाप्त 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *