मानपंचक – संत रामदास

श्री रामदास्वामीं विरचित – मानपंच

मानपंचक – मान प्रथम

राम विश्राम देवांचा । राम भक्तांसी आश्रयो ।
राम योगी मुनी ध्यानीं । राम रक्षी रुसीकुळा ॥१॥
राम व्यातो चंद्रमौळी । राम राम सदा जपे ।
रामकथा ऐकतां हे । रामरूप निरंतरीं ॥२॥
पार्वती पुसतां सांगे । राम जप अत्यादरे ।
सुंदरें दोनी अक्षरें । निवालों अंतरीं सुखें ॥३॥
नाळिलें पोळिले वीषें । कर्कशे काळिमा चढे ।
उपाय बहुधा केले । रामनामेंचि सुटीका ॥४॥
सव्य अपसव्य या नामें । तरले सुटले बहु ।
अंतकाळीं सर्व काळिं । सुटीका सकळै जना ॥५॥
कीर्ति या रघुनाथाची । पाहातां तुळणा नसे ।
येकबाणी येकवचनी । येकपत्नी च धार्मिकु ॥६॥
राज्य या रघुनाथाचें । कळी काळासी नातुडे ।
बहु वृष्टी अनावृष्टी । हें कदा न घडे जनीं ॥७॥
उद्बग पाहातां नाहिं । चिंता मात्र नसे जनीं ।
व्याधी नाहिं रोग नाहिं । लोक आरोग्य नांदती ॥८॥
युव्य नाहिंच आयोव्या । राग ना मछरु नसे ।
बंद निर्बंदे ही नाहिं । दंड दोष कदा नसे ॥९॥
कुरूपी पाहातां नाहिं । जरा मृत्य असेचिना ।
आदरु सकळै लोका । सख्यप्रीती परस्परें ॥१०॥
बोलणें सत्य न्यायाचें । अन्याय सहसा नसे ।
अनेक वर्तती काया । येक जीव परस्परें ॥११॥
दरिद्री धुंडितां नाहीं । मूर्ख हा तो असेचिना ।
परोपकार तो मोठा । सर्वत्र लोकसंग्रहो ॥१२॥
अद्भूत पीकती भूमी । वृक्ष देती सदा फळें ।
अखंड दुभती धेनु । आरोग्यें वाहाती जळें ॥१३॥
जळजें स्वापदें पक्षी । नाना जीव भूमंडळीं ।
आनंदरूप बोभाती । नाना स्वर परस्परें ॥१४॥
नद्या सरोवरें बावी । डोलती नूतनें बनें ।
फळती फुलती झाडें । सुगंध वनवाटिका ॥१५॥
उदंड वसती ग्रामें । नगरें पुरें चि पट्टणें ।
तीर्थे क्षत्रें नाना स्छानें । शिवाल्यें गोपुरें बरीं ॥१६॥
मठ मढया पर्णशाळा । रुसीआश्रम साजिरे ।
वेदशास्रधर्मचर्चा । स्नानसंव्या तपोनिधी ॥७॥
चढता वाढता प्रेमा । सुखानंद उचंबळे ।
संतोष समस्पै लोकां । रामराज्य भुमंडळीं ॥१८॥
हरीदास नाचती रंगीं । गायनें कीर्तनें बरीं ।
रागरंग तानमानें । टाळबधें विराजती ॥१९॥
प्रबंद कविता छेंदे । धोटी मुद्रा परोपरीं ।
आन्वय जाड दृष्टांतें । गद्यें पद्यें चि औघडें ॥२०॥
नाना युक्ती नाना बुधी । नाना विद्या नाना कळा ।
नाना संगीतसामर्थ्यें । नाना वाद्यें परोपरीं ॥२१॥
संमार्जनें रंगमाळा । पुष्पमाळा बहुविधा ।
केशरें धुशरें गंधें । सुगंधें करताळिका ॥२२॥
सर्व हि तोषले तोषें । नाम नामघोषेंची गर्जती ।
पुरेना दिन ना रात्रीं । यात्रा पर्वें हरीकथा ॥२३॥
दीपीका चंद्रजोती त्या । आर्त्या नीरांजनें जनें ।
रामराजा दयासिंधु । वोळला सेवकांवरी ॥२४॥
रामदासीं ब्रह्मज्ञान । सारासार विचारणा ।
धर्मस्थापनेसाठी । कर्मकांड उपासना ॥२५॥

इति श्री मानपंचक सारासारविवेकनाम मान प्रथम ॥१॥


मानपंचक – मान द्वितीय

उपासना वोळखावी । कोण तो देव तो कसा ।
करावें भजन तें कसें । कैसी आहे प्रसन्नता ॥१॥
उपासना वोळखिली । देव तो अंतरीं वसे ।
भजावें वोळखावें तें । बुधीयोगें प्रसन्नता ॥२॥
रायासीं वोळखी होता । सेना हि वोळखी धरी ।
मुख्य सामर्थ्य रायाचें । सेनेमधें विभागलें ॥३॥
सेवकें सांडिला राजा । सेविल्या पादरें प्रजा ।
तेणें सामर्थ्य हि गेलें । पराधेन विटंबना ॥४॥
जनीं जनार्दन आहे । परंतु सज्जनीं वसे ।
जना आणी सज्जनाला । येकची करितां नये ॥५॥
जगामधें जगदात्मा । स्वामी सेवक वर्तवी ।
स्वामी सुखासनामधें । सेवकें वाहाती सदा ॥६॥
आदीक धारणा जेथें । नित्यानित्य विचारणा ।
तो स्वामी उधरी बधा । बधें बध सुटेचिना ॥७॥
वैद्य तो वांचवी रोग्या । रोग्या रोगी न वांचवी ।
तारकु बुडत्या तारी । बुडतें तारकु नव्हे ॥८॥
ज्ञातया ज्ञान मागावें । अज्ञाना मागतां नये ।
सभाग्या सेवितां भाग्य । अभाग्या सेवितां नये ॥९॥
मोक्ष देतो प्रचीतीनें । तयासी तुळणा नसे ।
मुख्य तो सद्रुरु जाणा । यातना चुकवी जनीं ॥१०॥
जो वंद्य सर्व ही लोकां । तयासी वंदितां बरें ।
निंद्य तें वंदितां खोटें । समान करिसी मुढें ॥११॥
देव दैत्य भले पाहीं । संतासंत भुमंडळीं ।
अमृत विष हें एक । कदापी मानितां नये ॥१२॥
देवनामें माहा पापी । तरले उद्धरले किती ।
दैंत्यनाम जपे ऐसा । येक ही नाडळे जनीं ॥१३॥
भेदाभेदक्तिया देहीं । लागली हे सुटेचिना ।
जेथील विषयो तेथें । विपरीत करितां नये ॥१४॥
मुखेंची सेवितां आन्नें । आपानीं घालितां नये ।
अन्याय करिती तैसा । समान मानिती जनीं ॥१५॥
विंचु सर्प दुखदाता । अंतरात्माच वर्तवी ।
परंतु हीत तें घ्यावें । समान वर्ततां नये ॥१६॥
त्यागात्यागें देहे चाले । समान करितां पडे ।
अभागी उमजेना तो । पाषांडी राक्षसी क्रिया ॥१७॥
समान देखणें आत्मा । समान करणें दया ।
वंद्य निंद्य विचारावें । हे मुख्य जाणती कळा ॥१८॥
अन्नदाता प्राणदाता । बुधीदाता भुमंडळीं ।
तारकु मारकु येकु । ऐसें हें घडतें जनीं ॥१९॥
सुख तें आवडे लोकां । दुख तें नलगे कदा ।
पुण्य तें आदरें घ्यावें । पाप तें दुरी त्यागणें ॥२०॥
सद्‍बुधी अंगीकारावी । कुबुद्धी आत्मघातकी ।
अन्मार्ग चुकवावा तो । सन्माग हीतकारकु ॥२१॥
यातीभ्रष्ट क्तियाभ्रष्ट । सर्वभ्रष्ट अनर्गळु ।
पाहातां पातकी दोषी । तो संग नर्क भोगवी ॥२२॥
खरें खोटें समानत्वें । मानिती लोक ते कसे ।
गभाध वर्तती जैसे । तैसे ते आत्मघातकी ॥२३॥
कुसंग पातकें लाभे । सत्संगें पुण्यसंग्रहो ।
जाणता पाहिजे ज्ञाता । तो रक्षी धर्मस्थापना ॥२४॥
देह्यानें रक्षणें क्रीया । देह्यातीत विचारणा ।
शब्दें ची शब्द बोलावा । शब्दातीत विवंचना ॥२५॥

इति श्री मानपंचक सारासारविवेक मान ॥२॥


मानपंचक – मान तृतीय

अधीं तें करावें कर्म । कर्ममार्गें उपासना ।
उपासकां सांपडे ज्ञान । ज्ञानें मोक्षचि पावणें ॥१॥
कर्म तें करावें कैसें । कर्मफळ तें कोणतें ।
विव्योत्त कर्म कर्णें । कर्मफळ उपासना ॥२॥
उपासक देव धुंडाळि । सत्संगें देव सांपडे ।
देवाचा लागता छेंद । वैराग्य सहजीं घडे ॥३॥
वैराग्यें त्यागीतां सर्वैं । देव आपण येकला ।
देवाचें लागतां व्यान । आपणासी ठाव ची नसे ॥४॥
अभेद भक्ती ते ऐसी । आत्मनिवेदनी स्छिति ।
वृत्ती ते बधता मोठी । निवृत्ती मोक्ष बोलिजे ॥५॥
आकाशासारिखें ब्रह्म । तेथें संकल्प उठीला ।
ईश्वरु बोलिजे त्याला । सीवशक्तीच आष्टधा ॥६॥
भावनेसारिखीं नावें । उदंड ठेविलीं तया ।
निश्चळीं चंबळ आत्मा । मूळ मायेसी बोलिजे ॥७॥
पंचीकर्ण मूळमाया । माहांकारण बोलिजे ।
माहांकारण ब्रह्मांडीं । मूळ प्रकुतीं जाणिजे ॥८॥
निर्शितां अष्ट ही काया । मूळ प्रकुर्ति निरसते ।
सर्वज्ञ जाणता ज्ञानी । अष्टदेह्यामधें वसे ॥९॥
निश्चळीं घालितां ज्ञान । विज्ञान होतसे पुढें ।
मनास जन्मनी लागे । वृत्ती निवृत्ती होतसे ॥१०॥
परेहूनि जो पर्ता । परात्पर ची बोलिजे ।
उन्मेष ते परा वाचा । वाचातीत निरंजनु ॥११॥
निश्चळू तो चळेना कीं । चंचळ होत जातसे ।
उत्पत्ती स्छीती संव्हारु । चंचळासी पुन्हपुन्हा ॥१२॥
कितेकां कितेक खातें । येकयेकांसी झोंबतें ।
येक तें चर्फडी प्राणी । येक तें क्तूर घातकी ॥१३॥
यासी संदेह तों नाहीं । पाहातां दिसतें जनीं ।
प्रतक्षा प्रमाण काये । होत जातें क्षणक्षणा ॥१४॥
नित्यानित्यविवेकानें । शोधितां अंतरीं कळे ।
क्षराक्षर विवंचावें । निर्गुण वेगळें असे ॥१५॥
क्षरींच लागलें कर्म । अक्षरीं ज्ञान बोलिजे ।
आलक्षीं लवितां लक्ष । स्वयें आलक्ष होईजे ॥१६॥
विकारें आकार जाला । विकारें ची विकारला ।
निर्गुण निर्विकारी तो । निर्विकारें ची संचला ॥१७॥
निर्मळीं मळ लागेना । लवितां निर्मळीं मळु ।
निसंगीं संग लागेना । संग निसंग होतसे ॥१८॥
कर्म तें जड जाणावें । ज्ञान तें जाणती कळा ।
जाणते नेणते कांहिं । निर्गुणीं पाहातां नसे ॥१९॥
वाच्यांश शब्द जाणावा । लक्षांश जाणती कळा ।
कळाची विकळा होती । आपेंआप निवारतां ॥२०॥
आपणा शोधितां तत्त्वें । तत्त्वें भूतें विकारलीं ।
दृश्यभास विवंचावा । निराभासीं असेचिना ॥२१॥
भासला भास तो भासु । दृश्याला दृश्य दिसतें ।
दृश्यभास मुळीं नाहिं । मधेंची होत जातसे ॥१२॥
गगनीं पाहातां जैसें । आभाळ वितुळे जुळे ।
निश्चळीं पाहातां तैसें । चंचळ होत जातसे ॥१३॥
पिंड ब्रह्मांडीचे देहे । निर्शितां काय उरलें ।
विवरावें विचारावें । प्रत्ययो पाहातां कळे ॥२४॥
पावकु शुध कर्पूरें । येकची होत जातसे ।
देव भक्त अंतरात्मा । येकची होत जातसे ॥२५॥

मान ॥३॥


मानपंचक – मान चतुर्थ

कांस या रघुनाथाची । धरितां सुख पावलों ।
इतर कष्टती प्राणी । थोर संसारसांकडीं ॥१॥
सांकडीं तोडिलीं माझीं । राघवें करुणाळयें ।
पुर्वींच तुटली माया । दुख शोक विसंचला ॥२॥
सेवकु मानवीयांचे । कष्टती बहुतांपरीं ।
सेविला देव देवांचा । तेणें मी धन्य जाहालों ॥३॥
नीच हे मानवी प्रानी । नीचाश्रय कामा नये ।
महत्कीर्ति श्रीरामाची । फावला महदाश्रयो ॥४॥
विबुधां आश्रय ज्याच्या । पावले बंदमोचने ।
सेवकु मारुती ऐसा । त्याचा मी म्हणती जनीं ॥५॥
निवाला सीव ज्या नामें । ज्या नामें वाल्मीक रुसी ।
जें नाम सकळां तारी । तें नाम मज अंतरीं ॥६॥
कुळ या जगदीशाचें । धन्य वौंश भुमंडळिं ।
आपली वाटती सवैं । धन्य तुं गा रघोत्तमा ॥७॥
देव हा सर्व अंतरात्मा । वात हा त्याजपासुनि ।
वातसुत हनुमंतु । रामसेवक हा जनीं ॥८॥
वन्ही हा जानकीपीता । सूर्य हा वौंशभूषणु ।
भुमी हे सीतेची माता । आजा आपोनारायणु ॥९॥
सीच तो राघवा व्यातो । राम व्यातो सदासीवा ।
सख्यत्वें चालती दोघे । प्रसीध ठाउकें जनीं ॥१०॥
विरंची सुत विष्णूचा । पुराणें सांगती बहु ।
शारदा नाती देवांची । गणेश मित्रकुमरु ॥११॥
शक्ती ते शक्ती सीवाची । सीवशक्ती समागमें ।
औंश जे चंद्रमौळीचे । ते सर्व प्रभुचे राखे ॥१२॥
येकची अंश विष्णूचे । देवमात्र भुमंडळीं ।
येकांशें चालती सर्वै । यालागी सर्व येकची ॥१३॥
चंद्र तो लक्षुमीबंधु । मंगळ मेहुणा नभीं ।
शरीरसमंधें सर्वै । त्रैलोक्यची उपासना ॥१४॥
ऐकती येकमेकांचें । येकमेकांसी पाहाती ।
जन्मले जीव ते सर्वै । येक देवची वर्तवी ॥१५॥
स्वगींचे देव इंद्रादि । मृत्यलोकीं समस्तही ।
पाताळीं पंन्नगादीक । सर्वत्र पाहातां सखे ॥१६॥
रामउपासना ऐसी । ब्रह्मांडव्यापिनी पाहा ।
राम कर्ता राम भोक्ता । रामरूप वसुंधरा ॥१७॥
कर्ता तो सर्व भोक्ता तो । प्रचीत पाहातां खरें ।
शरीरसंमधासाठीं । दुख संतोष पाहाणे ॥१८॥
नित्य दर्शन देवाचें । चालताम बोलतां घडे ।
नाना लघु देहेधारी । भूमी पाहोन चालणें ॥१९॥
विषयो जाहाला देवो । नाना सुख विळासवी ।
नाना सुखें देव कर्ता । त्रासकें शरीरें धरी ॥२०॥
भुजंगें डंखितां देव । देव जाला धन्वंतरी ।
तारिता भारिता देव । बोंलती ते येणें रिती ॥२१॥
येकासी येक तारीतो । ज्ञान होये भुमंडळीं ।
येकासी येक मारीतो । नाना देहीं भरोनियां ॥२२॥
शत्रु मित्र देव जाला । सुखदुखें परोपरीं ।
येकासी हांसवी देवो । येकासी रडवीतसे ॥२३॥
येकासी भाग्य दे देवो । येकासी करंटें करी ।
सर्व कर्तव्यता तेथें । येथें शब्दची खुंटला ॥२४॥
शब्दज्ञान सरों आलें । ज्ञान सर्वत्र संचलें ।
जाणती जाणते ज्ञानी । मौन्यगर्भविचारणा ॥२५॥

इति श्री मानपंचक सारासारउपासनानिरूपण मान चतुर्थ ॥४॥


मानपंचक – मान पंचम

जयासी दु:ख सांगावें । तयापाशीं दुणें वसे ।
दुणें हि तें चतुर्गुणें । बहुगुणें सरोचिना ॥१॥
त्रैलोक्य व्यापिलें दुखें । ज्याचें त्याचें परोपरीं ।
उगेंची अनुमानेना । सांगतां सांगतां कळे ॥२॥
दु:ख जाणे पराव्याचें । ऐसा तो विरुळा गुणी ।
ऐकतां ऐकतां ऐके । तेणेंची आवडी दुणी ॥३॥
ऐकतां अंतरीं घेतां । क्षणक्षणा विचारितां ।
हळु हळु हळु होतें । पावतें सुख संगती ॥४॥
दु:ख वांटून तें घ्यावे । काढावें ऐसीयापरी ।
देहे दु खें रोगव्याधी । औषधें परतें करी ॥५॥
सदबुधी सांगणें लोकां । जेणें ते सुख पावती ।
प्रसंग राखणें आधीं । सोसावें बहुतांपरी ॥६॥
न्याय अन्याय सोसावा । सोसीतां हि विटों नये ।
न्युन्य पशुन्य झांकावें । तेणें तें प्रस्तावां पडे ॥७॥
चुकतें मागुतें येतें । येतें जातें पुन्हपुन्हा ।
क्षमून हितकर्ता जो । तोची गंभीरे जाणता ॥८॥
नेणता उमजे जेथें । जाणतां तोची बोलिजे ।
नैराश ने घतां सांगे । निववी दंदनापरी ॥९॥
सांगणें नीती न्यायाचें । मानावें बहुतांपरीं ।
सर्वत्र मान्य तो ज्ञाता । प्रत्यय बोलतो खरें ॥१०॥
न्याय अन्याय तो जाणे । अन्याय न करी कदा ।
नीती न्यायें मिळो जाणे । तोची तो लोकसंग्रही ॥११॥
मछरु ने दखे दृष्टी । न पदे कातर्‍यामव्यें ।
जाणते लोक नीसीचे । तेथें ची वास तो करी ॥१२॥
मनेंची पारखी लोकां । परंतु नोबले कदा ।
जाणते मिळती तेथें । नेणते वास पाहाती ॥१३॥
जाणत्या नेणत्या लोकां । प्रसंगें वर्तवी जगीं ।
सामान्य तो नव्हे कांहीं । सर्वांसी पाहिजे सदा ॥१४॥
प्रबोध जाणीजे ऐसा । आधीं प्रपंच शोधणें ।
आरत्र मानतां लोकां । परत्र सहजी घडे ॥१५॥
अंतरें निवउं जाणे । जाणे जयातयापरी ।
धरावें अंतरें लोकां । बाह्याकारें धरेतिना ॥१६॥
मनुष्यें राखतां राजी । दैवतें बहु माणसें ।
सुखची पावती जेथें । तेथें ते धांवती सदा ॥१७॥
श्रेष्ठें जो तोची जाणावा । बहुतां मानतां मनीं ।
सकळांसी मिळों जाणे । बहुतांसी बहुतांपरीं ॥१८॥
तोची तो अंश देवाचा । मिळाला जगदांतरें ।
नैराश तापसी ज्ञानी । सर्वांसी पाहिजे सदा ॥१९॥
हिंडतां हिंडतां लोकी । आवडे नित्य नूतनु ।
पुण्यात्मा सुकृती धमीं । भक्तराज भुमंडळीं ॥२०॥
कर्म उपासना राखे । राखे वैराग्य आदरें ।
ज्ञान तें प्रत्ययें राखे । नित्यानित्यविचारणा ॥२१॥
काळ तो नेटका घाली । हरीकथानिरूपणें ।
विचारें प्रत्यया आणीं । धूर्त ताकींक तीक्षणु ॥२२॥
प्रबोध लागतां लोकीं । नेमस्त सुटीका घडे ।
पावनु तोची तो येकु । बद्ध लोकांसी सोडवी ॥२३॥
बंधनें तोडिलीं रामें । योगधामें दयाळुवें ।
बुद्धीयोग प्रयोगानें । मुक्त भक्त ततक्षणीं ॥२४॥
धन्य हा देव देवांचा । राम त्रैलोक्यनायकु ।
रामदास म्हणे त्याचा । अनन्य शरणांगतु ॥२५॥

इति श्रीमानपंचक सारासारविवेकनिरूपणनाम मान पांचवें ॥ छंदसंख्या ॥१२५॥


मानपंचक – संत रामदास समाप्त .