रामदासांची आरती

मानसपूजा – संत रामदास

श्री रामदास्वामीं विरचित – मानसपूजा

मानसपूजा – प्ररण १

॥ श्रीराम समर्थ ॥
संगीत स्थळें पवित्रें । तिकटया वोळंबे सूत्रें । निवती विस्तीर्ण स्वतंत्रें । उपसहित्याचीं ॥१॥
तुलसीवनें वृंदावनें । सुंदर सडे संभार्जनें । ओटे रंगमाळा आसनें । ठांई ठांई ॥२॥
गवाक्षें खिडक्या मोर्‍या । बकदरबार पाहिर्‍या । सोपे माडया ओहर्‍या । ठांई ठांई ॥३॥
ध्वज गोपुरें शिखरें । भुयारें तळघरें विवरें । मंडप राजांगणें गोपुरें । दोखंटे ढाळजा ॥४॥
देवालयें रंगशिळा । चित्रविचित्र दीपमाळा । पोहिया पादुका निर्मळा । आड बावी पुष्करणी ॥५॥
विशाळ तळीं सरोवरें । मध्यें तळपती जळचरें । ब्रह्मकमळें मनोंहरें । नाना रंगें विकासती ॥६॥
गोमुखें पाट कालवे । साधूनि बांधूनि आणावे । स्थळोस्थळीं खळवावे । नळ टांकीं कारंजीं ॥७॥
पुष्पवाटिका वृक्ष वनें । नानाप्रकारचीं धनें । पक्षी श्वापदें गोधनें । ठांई ठांई ॥८॥
सभामंडप चित्रशाळा । स्वयंपाकगृहें भोजनशाळा । सामग्रीगृहें धर्मशाळा । मठ मठया नेटक्या ॥९॥
एकांतगृहें नाटयशाळा । देवगृहें होमशाळा । नाना गृहें नाना शाळा । नाना  प्रकारीं ॥१०॥
ऐसीं स्थळें परोपरी । नाना युक्ती कळाकुसरी । नि: कामबुद्धीं जो करी । धन्य तो साधू ॥११॥
इति श्रीमानसपूजा । मनें पूजावें वैकुंठराजा । साधनें अगत्य आत्मकाजा । करीत जावी ॥१२॥


मानसपूजा – प्रकरण २

॥ श्रीराम समर्थ ॥  ॥
आतां पारिपत्य ऐकावें । उत्तम गुणाचें आघवें । जयांस देखतां मानवे । विश्वलोक ॥१॥
धीर उदार सुंदर । दक्ष व्युत्पन्न चतुर । सकळ प्रयत्नीं तत्पर । अत्यादरें ॥२॥
दूरदृष्टी दीर्घप्रयत्नी । समय प्रसंग जाणे चिन्हीं । नासला फड नेटका वचनीं । बोलोन करिती ॥३॥
जाणती दुसर्‍याचें अंतर । सावधानता निरंतर । नेमस्त न्यायाचें उत्तर । बाष्कळ नाहीं ॥४॥
पवित्र वासनेचे उदास । केवळ भगवंताचे दास सारासारविचारें वास । हदयीं केली ॥५॥
अगाध अव्यग्र धारणा । मिळोनि जाती राजकारणा । कार्यभागाची विचारणा । यथायोग्य योजिती ॥६॥
न्याय नीति मर्यादेचा । स्नानासंध्या पवित्र तेजा । सत्यवादी बहुत ओजा । अन्याय क्षमित ॥७॥
चुकणें विसरणें असेना । मत्सर पैशून्य दिसेना । कोप क्षणिक असेना । निरंतर ॥८॥
हरिकथानिरूपण । तेथें प्रेमळ अंत:करण । पाहों जातां उत्तम लक्षण । उत्तम असे ॥९॥
ऐशा प्रकारचें पारपत्य । करूं जाणती सकळ कृत्य । धन्य धन्य कृतकृत्य । नि:कामतेनें ॥१०॥
ऐसे भले परमार्थी । श्रवण मनन अर्थाअर्थीं । जे परलोकींचे स्वार्थी । परोपकारी ॥११॥
॥ इति श्रीमानस. ॥११॥


मानसपूजा – प्रकरण ३

॥ श्रीराम समर्थ ॥
आतां ऐका स्वयंपाकिणी । बहु नेटक्या सुगरिणी । अचूक जयांची करणी । नेमस्त दीक्षा ॥१॥
शुचिष्मंत बाह्य निर्मळ । साक्षेपपणीं बहु चंचळ । नेमक निष्टंक केवळ । उमा रमा ॥२॥
ज्यांची भगवंतीं आवडी । श्रीहरिभजनाची गोडी । मनापासोनि आवडी । कथाकीर्तनाची ॥३॥
शक्ति युक्ति बुद्धि विशेष । नाहीं आळसाचा लेश । कार्यभागाचा संतोष । अतिशयेंसी ॥४॥
कदा न आवडे अनर्गळ । वस्त्रें पात्रें झडफळ । नेमक करणें ढसाळा । यथातथ्य ॥५॥
गोड स्वादिष्ट रुचिकर । एकहदयतत्पर । न्यूनपूर्णाचा विचार । कदापि न घडे ॥६॥
रोगी अत्यंत खंगलें । तेणें अन्न भक्षिलें । भोजनरुचीनें गेलें । दुखणें तयाचें ॥७॥
तेथें उत्तमचि आघवें । काय घ्यावें काय सांडावें । जेवीत जेवीत जेवें । ऐसें वाटे ॥८॥
उत्तम अन्नें निर्माण केलीं । नेणों अमृतें घोळिलीं । अगत्य पाहि जेत भक्षिलीं । ब्रह्मादिकीं ॥९॥
सुवासेंचि निवती प्रान । तृप्त चक्षु आणि घ्राण । कोठून आणिलें गोडपण । कांहीं कळेना ॥१०॥
भव्य स्वयंपाक उत्तम । भोजनकर्ते सर्वोत्तम । दास म्हणे भोक्ता राम । जगदंतरें ॥११॥
॥ इति श्रीमानस० ॥११॥


मानसपूजा – प्रकरण ४

॥ श्रीराम समर्थ ॥  ॥
लोणचीं रायतीं वळवटे । वडे पापड मेतकुटें । मिरकुटें डांगार-कुटें । मिरे घाटे सांडगे ॥१॥
नाना प्रकारच्या काचर्‍या । सांडयाकुरवडया उसर्‍या । कोशिंबिरीच्या सामोग्रया । नानाजिनसी ॥२॥
सुरण नेटके पचविले । आंबे आंवळे घातले । आलें लिंबें आणिले । घोंस मिर्‍यांचे ॥३॥
कुइर्‍या बेलें माईनमुळें । भोंकरें नेपत्ती सारफळें । कळकें कांकडी सेवकामुळें । सेंदण्या वांगी गाजरें ॥४॥
मेथी चाकवत पोकळा । माठ शेपू बसला । चंचवली चवळा वेळवेळा । चिवळ घोळी चिमकुरा ॥५॥
वांगीं शेंगा पडवळीं । दोडके कारलीं तोंडलीं । केळीं भोंपले कोहाळीं । गंगाफळें काशी-फळें ॥६॥
कणकी सोजी सांजे सपिठें । नाना डाळी धुतलीं मिठें । रवे कण्या पिठी पिठें । शुभ्रवर्णें ॥७॥
बारीक तांदूळ परिमळिक । नाना जिनसींचे अनेक । गूळ साखर राब पाक । तूप तेल मध राब ॥८॥
दूध दहीं दाट साय । ताक लोणी कोण खाय । नान शिखरिणींचे उपाय । आरंभिलें ॥९॥
हिंग जिरे भिरे सुंठी । कोथिंबीर आंवळकाठी । पिकलीं लिंबें सदेठीं । मेथ्या मोहर्‍या हळदी ॥१०॥
द्रोण पानें पत्रावळी । ताटें दुरडया वरोळी । सुपें हरि विचित्र पाळीं । नाना उपसामग्री ॥११॥
॥ इति श्रीमानस०॥११॥


मानसपूजा – प्रकरण ५

॥ श्रीराम समर्थ ॥  ॥
रांजण मांदण डेरे घागरी । कुंडालें मडकीं तोवरी । तवल्या दुधाणीं अडघरीं । मोघे गाडगीं करोळे ॥१॥
ऐसीं नानाजिनसी मडकीं । कामा न येती थोडकीं । लहान थोर अनेकीं । एकचि नांव ॥२॥
हंडे चरव्या तपेलीं पाळीं । काथवढया ताह्मणेम मुदाळीं । तांबे गंधाळें वेळण्या पाळीं । झार्‍या चंबू पंचपात्र्या ॥३॥
धातु कळशा बहुगुणी । पूर्वीं खेळविलें पाणी । गुंडग्या झांकण्या कासरणीं । बहुविधा ॥४॥
विळ्या पळ्या पाटे वरोटे । काहला तवे मोठे मोठे । थावर तेलतवे कढई मोठे । सामोग्रीचे ॥५॥
चुली भाणस आवील । तिसर्‍या थाळी ओतळ । शुभा काष्ठें बहुसाल । पाट चाटू खोरणीं ॥६॥
पोळपाट लाटणीं घाटणीं । परळ वेळण्या दिवेलावणीं । कंदील रोवणीं दिवेलावणीं । सरक्या वाती काकडे ॥७॥
स्वयंपकगृहें बोललीं । सडासंमार्जनें केलीं । सोंवळी वाळूं घातलीं । आणिलीं अग्रोदकें ॥८॥
इकडे सामुग्रया सिद्ध केल्या । तिकडे चुली पेटल्या । अंगें धुवूनी बैसल्या । स्वयंपाकिणी ॥९॥
पात्रें धुवून पाहिली । पुन्हां धुतली धुवविलीं । उदकें गाळूनि घेतलीं । सोंवळ्यामध्यें ॥१०॥
पुढें आरंभ स्वयंपाकाचा । समुदाव स्वयंपाकिणीचा । नैवेद्य मांडला देवाचा । सावकाश ॥११॥
॥ इति श्रीमानस० ॥११॥


मानसपूजा – प्रकरण ६

॥ श्रीराम समर्थ ॥   ॥
इकडे स्वयंपाक चाली लविले । पारपत्य स्नान करोनि आले । देवदर्शन घेऊनि समर्पिले । खाद्य नैवेद्य ॥१॥
तोचि प्रसाद घेवोनि आले । पारपत्य फराळा बैसले । कित्येक ब्राह्मणहि मिळाले । निराश्रयी ॥२॥
इकडे धर्मशाळा असती । तेथें घातल्या पंगती । न्यायनीतीनें वाढती । दीर्घपात्रीं ॥३॥
लवण शारवा कोशिंबिरी । सांशगे पापड मिरघाटे हारी । मेतकुटें नेलचटें परोपरी । नाना काचर्‍या ॥४॥
फेण्या फुग्या गुरवळया वडे । घारगे गुळवे दहिंवडे । लाडू तिळवे मुगवडे । कोडबोळीं अनारसे ॥५॥
उदंड दुधें आणविलीं । तक्रें रुचिकरें करविली । दाट दह्यें सो केलीं । पात्रें भरूनी ॥६॥
ओळी द्रोणांच्या ठेविल्या । नाना रसीं पूर्ण केल्या आई शर्करा घातल्या । नाना सोज्या ॥७॥
थिजलीं आणि विघुरलीं । घृतें उदंद रिचविलीं । उदकें भरोनि ठेविलीं । निर्मळ शीतळ सुवासें ॥८॥
सुंठ भाजली हिंग तळिला । कोथिंबिरी वांटूनि गोळा केला । दधीं तक्रीं कालविला । लवणेंसहित ॥९॥
बारीक परिमळिक पोहे कुटटा उत्तम लाह्यांचा सुंदर कुट्टा । उत्तम दधीं घालून चोखटा । मुदा केल्या ॥१०॥
यथासाहित्य फलाहार केले । चूल भरून विडे घेतले । पुन्हां मागुते प्रवर्तले । कार्यभागासी ॥११॥
॥ इति श्रीमानस० ॥११॥


मानसपूजा – प्रकरण ७

॥ श्रीराम समर्थ ॥  ॥
सकळ शाखा सिद्ध केल्या । निसल्या धुतल्या सांभाळिल्या । पात्रीं भरोनी ठेविल्या । चुलीवरी ॥१॥
पुरणाचे हंडे चढविले । कणीक ढीग भिजविले । सांजे उकडोनि सिद्ध केले । भक्षायाकरणें ॥२॥
कणिक धबधबा कांडिती । शुभ्र कवण मिश्रित करिती । कित्येक पुरणें वांटिती । चमत्कारें ॥३॥
तवे तेलतवे चढविले । एक तेलें एक तुपें भरिले । तप्त होतां सणसणले । असंभाव्य ॥४॥
एक भक्षें लटिती । एक वरणें घाटिती । एक कणिकी मळिती । मांडे पुर्‍या ॥५॥
मांडे रांजणां घातले । तवे तेलतवे भरले । कडकडूं ते लागले । सणसणाटें ॥६॥
वडे तेलवर्‍या सांजवर्‍या । घारगे मांडे गुळवर्‍या पुर्‍या । पोळ्या पुरणपोळ्या झारोळ्या । नानापरी ॥७॥
उखर्‍या रोटया कानवले । धिरडीं वेडण्या कानवले । पात्या आइते खांडव्या केले । दिवे ढोकले उंबरे ॥८॥
कण्या कोथिंबीरी घातल्या । फोडण्या नेमस्त दिधल्या । शाखा शिकल्या उतरल्या । तेलातुपाच्या ॥९॥
नाना क्षीरी सिद्ध केल्या । उदंड दुधें आळिल्या । नाना शर्करा आणिल्या । शोधूनि पात्रीं ॥१०॥
शुभ्र ओदनें सुवासें । सुगंध उठला नानारसें । रुचिर कथिका सावकाशें । स्वयंपाक झाला ॥११॥
॥ इति श्रीमानस० ॥११॥


मानसपूजा – प्रकरण ८

॥ श्रीराम समर्थ ॥  ॥
दुधें तुपें आणविलीं । दव्यें तक्रे आणविलीं । लोणचीं रायतीं काढिलीं । मेतकुटें ॥१॥
नाना काचर्‍या तळिल्या । कोथिंबीर सिद्ध केल्या । नाना शिखरिणी झाल्या । द्रोण पानें पत्रावळी ॥२॥
ब्राह्मण स्नान करोनि आले । एक देवार्चना बैसले । एक ते करूं लागले । वेदघोष ॥३॥
चित्रविचित्र सोवळीं । सुरंग नेसले प्रावर्णें केलीं । कित्येकीं देवार्चनें मांडलीं । ठांई ठांई ॥४॥
एक ध्यानस्थ बैसले । एकीं जप आरंभिले । एक करिते झाले । प्रदक्षिणा नमस्कार ॥५॥
पंचामृतें सांग पूजा । ब्राह्मणीं आरंभिली ओजा । राम त्रैलोक्याचा राजा । अर्पिते झाले ॥६॥
नाना सुगंधिक तेलें । मंगळ स्नान आरंभिलें । अंग पुसोनि नेसविलें । पीत वस्त्र ॥७॥
नान वस्त्रें अलंकार । गंधाक्षता कुंकुम केशर । उटी देवोनि माळा हार । उदंड घातले ॥८॥
उदंड उधळिलीं धूसरें । वाद्यें वाजती मनोहरें । गर्जती जयजयकारें । करताळी नामघोष ॥९॥
धूप आरती आरंभिली । उदंड नीरांजनें चालिलीं । भक्तजनें सुखी केलीं । दानपत्रें ॥१०॥
जितुकीं अन्नें सिद्ध केलीं । तितुकीं देवांपुढे ठेविलीं । उदकें ठेवोनि सोडिलीं । पट्टकूळेम ॥११॥
॥ इति श्रीमानस० ॥११॥


मानसपूजा – संत रामदास समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *