श्री रामदास्वामीं विरचित – लळित

लळित – पदे

॥ रामा तुज ल्याण मागणें । तुज कल्याण मागणें ॥धु०॥ तूं जगजीवन तूं मन- मोहन । कोण आहे तुजविण । रामा० ॥१॥
आम्ही हरिजन तूं जनपावन । बोलती वेद-पुराणें । रामा० ॥२॥
देवही आले भक्त मिळाले । आनंदें तुझे गुणें । रामा० ॥३॥
भक्त सुखी ऋषि सुखी । दास म्हणे तुझें देणें । रामा० ॥४॥
॥ जय हो महाराज गरीब नवाज । बंदकमीना कहना के तूं साहेब तेरीही लाज । हो महाराज० ॥१॥
मैं सेवक बहु सेवा मागूं । इतना है सब काज । हो महाराज० ॥२॥
छत्रपती तुम शेकदार सिब । इतना हमारा अर्ज ॥ हो महाराज० ॥३॥
॥ कपि सकळही प्रयाणकाळीं । प्रेमें वोसंडिती दोहीं डोळीं । नित्य आठवे सुखाची नव्हाळी । म्हणती रामा तुझी सवे लागली । रामा०॥१॥
जो तूं अगोचर ब्रह्मादिकां । ध्यानीं नातुडसी पंचमुखा । तो तूं आम्हाम झालासी निजसखा । प्रेम दिधलें वायुसुता । रामा०॥२॥
तुझ्या ओळगे सुरांसी न लगे हो ठावो । आम्ही वानरें निकट उभीं राहों । न्याहार धरूनि वदन तुझें पाहों हो । परि धाला नाहीं आमुचा भावो । रामा०॥३॥
॥ रामा कृपा बहुत असों देणें । आम्ही धन्य जाहलों तुझें गुणें ॥ध्रु०॥ रामा गोड लागती तुझ्या गोष्टी । हर्षें गदगुल्या होताती पोटीं । जणुं सांपडली चणियाची मुठी । वाटे धरावी तुझी हनुवटी । रामा० ॥१॥
आलिंगोनी सप्रेमें बोले । तुम्हीं मजलगिं हे कष्ट केले । सुखी करोनि सर्व गौरविले । रामदासीं हनुमंत ठेले । रामा० ॥२॥


लळित – पद आणि श्लोक

श्लोक.
सिंहासनावरि रघूत्तम मध्यभागीं । बंधू तिघे परम सुंदर पृष्ठभागीं । वन्हीसुता निकट शोभत वामभागीं । वीलासतो भिम भयानक पूर्वभागीं ॥१॥
कपी सुग्रिवा अंगदा जांबु-वंता । गजा मारुता आणि नैर्रत्यनाथा । समस्तांसि सन्मानिले रामचंद्रें । सुधाउत्तरें तोष-वीलें नरेद्रें ॥२॥
तुरे आणिले घातल्या पुष्पमाळा । कितीएक त्या र्रत्नमाळा सुढाळा । करीं कंकणें मुद्रिका लेववीलें । यथासांग संपूर्ण सर्वांस दीलें ॥३॥
अळंकार चीरें बहू सिद्ध केलीं । असंभाव्य दिव्यांबरें आणवीलीं । बहू भूषणांचे बहू ढीग केले । जगन्नायकें ते कपी गौरवीले ॥४॥ सभामंडपीं फांकल्या रत्नकीळा । समस्तांसि ते जाहली सौख्यवेळा । किती एक सांगीतल्या कानगोष्टी । महावीर आनंदले सर्व सृष्टीं ॥५॥
मुखीं बोलिजे वैद्यराजासि देवें । कपी तूज ऊचित म्यां काय द्यावें । वरू दीधला रामचंद्रें उचीतीं । तुझ्या दर्शनें लोक आरोग्य होती ॥६॥
समस्तांकडे पाहिलें राघवानें । तयांर्साहि रोमांच आलें स्फुराणें । नम-स्कारिल स्वामि देवाधिदेवा । म्हणे राम तो लाभ आतां असावा ॥७॥
असंभाव्य केली स्तुति राघवाची । वदों लागली मंडळी मंडळी प्रेमळांची । कपी बोलती सत्य कारुण्यवाचा । स्तुती ऐकतां राम सिंधू सुखाचा ॥८॥
अजयो नको रे जयवंत हो रे । कापटयकर्मीं सहसा नको रे । निर्वाणचिंता चुकवी अनंता । शरणागता हे बहु धातमाता ॥९॥
स्मरणीया वयं राम न स्मरामि अहो कपे । स्मरणं चेतसो धर्म: तत्‍ चित्तं हारितं मम ॥१०॥
जनीं जाहलीं पूर्ण हे रामनवमी । कृपें तोषला स्वामि हा नित्यनेमीं । यशस्वी दयानंद कल्याणमस्तु । तथास्तु तथास्तु तथास्तु तथास्तु ॥१॥
घडो सर्वदा भक्ति या राघवाची । जळी कामना दु:ख चिंता भवाची । यशस्वी दयानंद कल्याणमस्तु । तथास्तु ० ॥२॥
सदा-सर्वदा चिंतितां देव पावो । सदा वृत्ति दे शुद्ध नि:संग राहो । यशस्वी दयानंद कल्याण-मस्तु । तथास्तु ० ॥३॥
विकल्पाचिया मंदिरीं दीप नाहीं । सदा शुद्ध संकल्प देहात्मगेहीं । यशस्वी दयानंद कल्यानमस्तु । तथास्तु ० ॥४॥


लळित – पदे १ ते १०

॥१॥ कृपाळू रघुवीरें खादलीं भिलटी बोरें । उच्छिष्ट आदरें अंगिकारीं रे ॥ध्रु०॥ वैभवीं नाहीं चाड । देवातें भावचि गोड । पुरवितो कोड । अनन्याचे रे ॥१॥
दुर्लभ ब्रह्मादिकांसी । सुलभ वानरांसी । काय तयापासीं । भावेंवीण रे ॥२॥ रामीं रामदास म्हणे । देव हा दयाळूपणें । उठवितो रणें । वानरांचीं रे ॥३॥

॥२॥ जन्मलचि नाहीं तो मरेल काई । जीणें मरणे दोन्हीं नाहीं रे ॥ध्रु०॥ जनीं जीवन्मुक्त वर्ततात हरिभक्त । सद्रुरुबोधें ते अच्युत रे ॥१॥
जिणें आणि मरणें येणें आणि जाणें । साधू तो अचळ पूर्णपणें रे ॥२॥
सेवितां साधूचे चरण बाधीना दक्षिणायन । रामीं रामदासीं निजखूण रे ॥३॥

॥३॥ रघुवीर सुरवरदानीं । भक्तांचा अभिमानी । योगी मुनिजन ध्यानीं । राहाती समाधानीं ॥धृ०॥ भूषण मंडित माळा । तेजाचा उमाळा । सुंदर सुमनमाळा । भोंवतां मधुकरपाळा ॥१॥
पीतवसन घन साजे । मुरडीव वाक वाजे । वर तोडरी ब्रीद गाजे । कीर्ति विशाळचि माजे ॥२॥
अभिनव कार्मुक पाणी । निगम गाती पुराणीं । विगलित होते वाणी । समजतसे शूळपाणी ॥३॥
राम सकळ जन पाळी । भक्तांला सांभाळी । जन्म-मरण दु:ख टाळी । अगणित सौख्य नव्हाळी ॥४॥
दास म्हणे मज हित । माझें कुळदैवत । जे जन होती रत । ते सकळहि ॥५॥

॥४॥ समर्थाचा गाभा । भीम भयानक उभा । पाहतां सुंदर शोभा । लामचावें मन लोभा ॥धृ०॥ हुंकारे भुभु:कारे । काळ म्हणे अरे बारे । विघ्र तगेना थारे । धन्त हनुमंता रे ॥१॥
दास म्हणे वीर गाढा । घर्षित घनसर दाढा । अभिनव हाचि पवाडा । पाहतां दिसे जोडा ॥२॥

॥५॥रावण सीता दडवी । भीम निशाचर बडवी । अघटित तें घडवी । वर रजनीचर ते रडवी ॥ध्रु०॥
जाउनि सीता शोधी । सकळांचा विरोधी । वानर मोठा क्रोधी । त्रिकुटीं जन रोधी ॥१॥
मोठी आली धाडी । पुच्छानें पछाडी । होती ताडातोडी । कंठीं झोडाझोडी ॥२॥
दैत्यीं केले चाळे । सुरवर बंदीशाळे । त्या रागें उफाळे । वन्हाचे उबाळे ॥३॥
बनीं बनें कडकावी । बळकट शिक्षा लावी । भुजाबळें भडकावी । लंकेतें धडकावी ॥४॥
सीता शोधून गेला । हलकल्लोळ केला । भेटे राघवाला । दास्यत्वें निवाला ॥५॥

॥६॥ एकतालपंचक ॥ वेध लागला रामाचा । सुरवर विश्रामाचा ॥धृ०॥ तेथेम सुर-वर नर किन्नर विद्याधर गंर्धांचा मेळा । तेथें न्यूनें कोकिळा मंजुळकिळ । झुळकी रम्य रसाळा ॥ तेथें गायनकळा रंग आगळा । बाहे अमृतवेळा । तो सुखसोहळा । देखुन डोळा । लाचावें मनमेळा ॥१॥
एकताल मृदांगें श्रुतिउपांगें । गाती नवरसरंगें ॥ एकरंग सुरंगें दाविती संगें । सप्तस्वरांचीं अंगें ॥ एक अनेक रागें आलापयोगें । बिकट ताल सुधांगें ॥ एक झकिट किटकिट थरिक थरिक वाजती चपळांगें ॥२॥
तेथें खणखणखणखण टाळ वाजती । झणझणझणझण यंत्रें ॥ तेथें दणदणदणदण मृदंग मंजुळ । तालबद्ध परतंत्रें ॥ तेथें चणचणचणचण शब्द बोलती । वानी चपळ सत्पात्रें ॥ तेथें घणघणघणघण घंटा वाजती । अनुहातें शूळमंत्रें ॥३॥
तेथें झगझगझगझग झळकति रत्नें । खचित बैसे शोभा ॥ तेथें धगधगधगधग तेज आगळें लावण्याचा गाभा ॥ तेथें घमघमघमघम सुगंध परिमळ । षट्‍पद येति लोभा ॥ पवनतनुज-दासाचें मंडण । निकट राहिला उभा ॥४॥

॥७॥ रामा चाल रे झडकरी । त्रिभुवन हरुषे भारी ॥ध्रु०॥ शरयूनदीतिरीं अयोध्या-पुरी । रमणीय रचिली भारी । तीसीं प्रतिमल्ल सरी ऐसीच दुसरी । नाहीं पृथ्वीवरी ॥ ते वैकुंठ मंदिरीं गमन सुंदरीस । सुंदरीस । त्यामध्यें थोरी ॥ ऐसें जाणोनी श्री कौसल्योदरीं । आनंद सचराचरीं ॥१॥
तेथें ऋषिकूळ सकळ नांदति निर्मळ । उत्साहाचेनि उसळे ॥ तेथें धोत्रें सोज्वळें झेलिती करतळें विभूतीचे गोळे ॥ ते ध्यानीं नाकळे मना नाढळे । तें रूप पाहती डोळे ॥ आणि क्रूर विशाळें वधिलीं ढिसालें । पावोनि यत्नें फळें ॥२॥
तेथें ब्रह्म नंदिनी श्रापबंधिनी । असतं निजपति वचनीं ॥ ते रामा गमनीं ऐकत क्षणीं । हरुषत अंत:करणीं ॥ म्हणे त्या श्रीचरणीं होतां मिळणी । पालटेन पाषाणीं । ऐसें चिंतुनि दिवसरजनीं । पथा पाहतां लोचनीं ॥३॥
तेथें सुरवर नाचति वाद्यें वाजती पुष्पें जमुनि वरुषति ॥ तेथें बंध वातगती नेत दिगंतीं घ्राणा होतसे तृप्ती ॥ तेथें दिशा झळकती । सकळ वनस्पती । पद शुभ बोलती ॥ आला म्हणती राम सीतापती । जयजयकारें गर्जती ॥४॥
तेथें दशरथमानसीं । रामश्रवणशशी । तुंबळ सुखसिंधुसी ॥ तेथें जनकसरितेसि मिळणी कैसी । होताहे गजरेंसि ॥ तेथें भक्तचकोरासी आनंद अहर्निशीं पाहताती उदयासी ॥ ऐसें देखुनी भक्ती नवमीसी । प्रगट रामदासीं ॥५॥
फरफरफरफरफरफर वोढिती कुंजर । धनुष्य आणिलें भूपें । हरहरहरहर अति पण दुष्कर । सुंदर रघुपति रूपें ॥ वरवरवरवर रघुपति वोढित । दशमुख संतापे ॥ करकरकरकर शर करारे । थरथरथरथर भू कंपे ॥६॥

॥८॥ रामें सज्जीलें वितंड परम प्रचंड । रामें उचलिलें त्र्यंबक कौशिकऋषि पुलकांक ॥ रामें ओढिले शिवधन सीतेचें तनुमनु । रामें भंगिलें भवचाप असुरां सुटला कंप ॥१॥
कडकडकडकड भग्र कडाडे । तडतडतडतड फुटे ॥ गडगडगडगड गगन कडाडी । धडधडधड धडक उठे ॥ भडभडभडभड रविरथ चुके । घडघडीत अव्हाटे ॥ खडखडखडखड खचित दिग्गज । चळितकूळाचळ कुटे ॥२॥ दुमदुमदुमदुमदुमित भुगोले । स्वर्ग मृत्यु पाताळें ॥ धुमधुमधुमधुम धुमकट कर्णीं । विधीस बैसले टाळे ॥ हळहळहळहळ अतिकोल्हाळ । हरसी पंचक डोले ॥ खळखळखळखळ उचंबळत । जळसिंधूसी मोहो आंदोळे ॥३॥
धकधकधकधक धकीत धरणी । धराबधिर झाले नयन ॥ चकचकचकचक चकीत निशाचर । करविलें दीर्घ शयन । थकथकथकथक थकीत सुरवर वरुषती पुष्पें तसे ॥ लखलखलखलखलख रत्नमालिका । जनवकालिक लग्र ॥४॥
जयजयजयजय जयति रघुराजबीरा गर्जती जयकारें । धिमधिमधिम-धिम नृपदवदुंदुभि । गगन गर्जलें गजरें । तरतरतरतर मंगळतुरें । विविध वाद्यें सुंदरें । समरसरसरस दासा मानसीं रामसीता वधूवरें ॥५॥

॥९॥ रंगीं नाचतो त्रिपुरारी लीलानाटकधारी । मंदरजावर त्रिपुरसुंदर अर्धनारी नटेश्वर । नाचे शंकर । झुकळ कळाकर । विश्वासी आधार ॥धृ०॥ झुळझुळझुळझुळ शिरीं गंगाजळ । झळझळ मुगुटीं किळ । लळलळलळलळ लळित कुंडलें । भाळीं इंदुज्वाळा । सळसळसळसळ सळकती रसना । वळवळवळिती व्याळ । हळहळहळहळ कंठीं हळाहळ । गायनस्वर मंजुळ ॥१॥
थबथबथबथब गळती सद्या रुंडमाळिका कंठीं । चपचपचपचप हस्तक लवती । दस्तक धरी धूर्जटी । खडखडखडखडखड व्याघ्रांबर गजचर्म परवंटी । भडभडभड-भडभड धूसर उधळत । चित्ताभस्त निजउटी ॥२॥
किणिकणिकणिकणिकणि वाजति किंकिणि । घणघणघणघण खणाणी । झणझणझणझण वाकी चरणीं । दणदणदण धरणी । खण-खणखणखण टाळ उमाळे रुणुझणु वेत्रें पाणी । गुणगुणगुणगुण वर्णिती वाणी । खुणखुणखुण निर्वाणीं ॥३॥
टिमिटिमिटिमिटिमि मृदंग गंभीर डिमिडिमिडिमिडिमि डिमर । धिमि-धिमिधिमिधिमि दुंदुभि गर्जे । झिमिझिमिझिमिझिमि झल्लर । घुमघुमघुमघुम येवजगमकत दुमदुमदुम अंबर । ततथै ततथै धिकिट धिकिट । म्हणती विद्याधर ॥४॥
थरथरथरथर कंपित गमके । गरगरगरगर भ्रमर । सरसरसरसर कंपित चमके । धुरधुरधुरधुर गंभीर । परपरपरपर म्हणती सुरवर । हरहर हरहर शंकर । वरवरवरवर दासा दिधला । तरतरतरतर दस्तुर ॥५॥

॥१०॥ आठवे मनीं आठवे मनीं । आठवे मनीं सदा राम चिंतनीं ॥धृ०॥ मुगुटी किरीटी । वक्रभुकुटी । रम्य गोमटीं । नयनंबुजें ॥१॥
मुकरकुंडलें । क्षण दंडलें तेंज खंडले । मेघदामिनी ॥२॥
बाणली उटी । कास गोमटी । किंकिणी कटीं । क्षूद्र घंटिका ॥३॥
पदक मेखळा । फांकती किळा । रुळती गळा । मुक्तमाळिका ॥४॥ ते सुलक्षणें । रत्नभूषणें । वीरकंकणें । शोभती करीं ॥५॥
रम्य रंगलें । चाप चांगलें । सैन्य भंगलें । त्रिकूटाचळीं ॥६॥
आंदु नेपुरें वांकी गजरें । तीं मनोहरें । पाउलें बरीं ॥७॥ हदय कवळी । मूति सांवळी । दास न्याहळी । कुळदैवत ॥८॥


लळित – पदे ११ ते २०

॥११॥ नवमी करा नवमी करा । नवमी करा भक्ति नवमी करा ॥धृ०॥ अष्टमी परी नवमी बरी । तये दुसरी न पवे सरी ॥१॥
राम प्रगटे भेट हा तुटे ॥ अभेट उमटे तेचि नवमी ॥२॥
शीघ्र नवमी येतसे ऊमीं । रामदास मी अपिली रामीं ॥३॥

॥१२॥ दीनबंधू रे दीनबंधू रे दीनबंधू रे । राम दयासिंधु रे ॥ध्रु०॥ भिलटीफळें भक्तवत्सलें । सर्व सेविलीं दास प्रेमळें ॥१॥
चरणीं उद्धरी दिव्य सुंदरी । शापबंधनें मुक्त जो करी ॥२॥
वेदगर्भ जो शिव चिंतितो । वानरा रिसा गूज सांगतो ॥३॥
राघवांबिजें रावणानुजें । करुनि पावला निजराज्य जें ॥४॥
पंकजाननें दैत्यभंजनें । दास पाळिळे विश्रमोहनें ॥५॥

॥१३॥ मांबुजाननं मांबुजाननं मांबुजाननं मांबु देहि मे ॥ध्रु०॥ योगिरंजनं चाप-भंजनं । जनकजापतिं विश्वमोहनं ॥१॥
निबुधकारणं शोकहारणं । अरिकुलांतकं भयनिवा-रणं ॥२॥
जयकृपालयं दासपालयं । चरणपंकजं देहि मे लयं ॥३॥

॥१४॥ ऐसें ध्यान समान न दिसे राम निरुपमलींळा । सांवळें सुंदर रूप मनोहर शोभति सुमनमाळा ॥ध्रु०॥ मुगुटकिरीटीं कुंडले मंडित गंडस्थळावरी शोभा । केयूरदंड उदंड विभूषण लावण्याचा गाभा ॥१॥
सरळ कुरळ नयन कमळदळश्याम सकोमळ साजे । झळके इंद्रनीळ तळपे रत्नकिळ मुनिजनध्यानीं विराजे ॥२॥
भाळ विशाळ रसाळ विलेपन परिमळ अनिळविलासी । मृगमद केशर धूसर आंगीं हसितवदन सुखरासी ॥३॥
कटितट वेंकट कासे पीतपट मिंरवट उटी सुगंधें । रुळत कल्लोळ सुढाळ माळिका डोलती तेणें छंदें ॥४॥
जडितपदक वीरकंकण किकिणी आंदु नेपुर वाजे । सरळ रिपुकुळ निर्मळ ऐसें वांकी तोडर ब्रीद गाजे ॥५॥
करिं शरचाप विलाप दानवां काळरूप मनिं भासे । दास म्हणे रणकर्कश रामें अंतक तोही त्रासे ॥६॥

॥१५॥ मिरासीचा ठाव मिरासीचा ठाव मिरासीचा ठाव धरा रे । जेथुनि आले तिथेंचि जाउनि मागुति बास करा रे ॥ध्रु०॥ अज्ञानदारिद्य निरसिलें ज्ञानलक्षूतीतें कोण पुसे । आपणचि सर्वही अहंकार गोत्रजघातघेषा तेथ नेतसे । एकपद तेथें विपट नाहीं सर्वही सिद्धी विलसे । ऐसी हे मिरासी टाकियेली थोर मस्तकीं अभिमानपिसें ॥१॥
संतसनका-दिक नारद तुंबर वृत्ती तेही लक्षिली । नागवे उघडे आपदा भोगुनि जीवेसीं सदृढ धरिली । वडिलांची जन्ममृत्युभूमी तेही सर्वकाळ यत्न केली । धिगीधिगी तें जिणें पूर्वजांची वृत्ति असोनि हातीची गेली ॥२॥
एकला मी रामदास वृत्तीलागी होय पिसा । तनु मनु धनु सर्वही अर्पुनी सोडिली जीवित्वआशा । नि:कामता कोणी पाठीसी नादले एकचि थोर कोंवसा । हे वृत्ति रक्षिल माझा राम त्याचा मज भरंवसा ॥३॥

॥१६॥ आलिया अंगेंचि होइजे देव । कोंदाटला ब्रह्मकटाव ॥ध्रु०॥ भवसिंधूचें जळ आटळें । संसाराचें मूळ तुटलें ॥१॥ निजधनाची लाधली ठेवी । रंक पावले राजपदवी ॥२॥
अरे काळाची वेळ चुकली । आनंदाची लुटी फावली ॥३॥
जे मायेनें जन्म दाविला । ते मायेचा ठाव पुसिला ॥४॥
रामदासाचि राम भेटला । थोर संदेह हा तूटला ॥५॥

॥१७॥ वेडिया स्वामीच होउनि राहें हे उपाधी तुज न साहे ॥ध्रु०॥ अरे तुझाचि तूं सकळ । तरी वायांचि कां तळमळ ॥१॥
स्वामी सेवकपण हें वाव । अभिमानाची कैंचा ठाव ॥२॥
अभंगळें जाणसी साचें । काय भूषण सांगाची त्याचें ॥३॥
मीपणाचें मूळ तुटावें । आनंदाचें सुख लुटावें ॥४॥
रामदासचि नांव हें फोला ।तेथें कायसे लागती बोला ॥५॥

॥१८॥ देवाची करणी ऐसी ही ॥ध्रु०॥ पहा दशगुणें आवरनोदकीं । तारियेली धरणी ॥१॥
सुरवर पन्नग निर्मूनियं जग । नांदवी लोक तिन्ही ॥२॥
अंडज जारज स्वेदज उद्भिज । निवडिली खाणी ॥३॥
रात्रीं सुधाकर तारा उगवती । दिवसा तो तरणी ॥४॥
सत्तासूत्रे वर्षत जळधर । पीक पिके धरणीं ॥५॥
आपण तरी स्त्रिये निन निर्गुण । दासा हदयभुवनीं ॥६॥

॥१९॥ गुरु दातारें दातारें । अभिनव कैसें केलें ॥ध्रु०॥
एकचि वचनें न बोलत बोलूनि । मनास विलया नेलें ॥१॥
भूतसंगें कृतनैश्वर ओझें । निजबोधें उतरीलें ॥२॥
दास म्हणे मज मीपणाविरहित । निजपदीं नांदविलें ॥३॥

॥२०॥ भावबळें तरले मानव ॥ध्रु०॥ सारासारविचार विलोकुनि । भव हा निस्तरले ॥१॥
रामनाम निरंतर वाचे । निजपदी स्थिरले ॥२॥
दास म्हणे सुख सागर डोहीं । ऐक्यपणें विरालें ॥३॥


लळित – पदे २१ ते ३०

॥२१॥ देह दंडिसी मुंड मुंडिसी । भंड दाविसी नग्र उघडा ॥ध्रु०॥ भस्मलेपनें तृण आसनें । माळभूषण सोंह हें मूढा ॥१॥
अन्नत्याग रे हदयोग रे फट कायरे हिंडसी वनीं ॥२॥
ऐक सांगतों रामदास तो । ज्ञानयोग रे साधितां बरें ॥३॥

॥२२॥ हें काय तें काय । योग काय भोग काय ॥ध्रु०॥ बाहेर जटाभार काय अंतरीं संसार काय ॥१॥
बाहेर काषाय दंड काय । आंत अवघें मंड काय ॥२॥
बाहेर सात्विक ध्यान काय । आंत मद्यपान काय ॥३॥
रामदास म्हणे पाहे । व्यर्थ भगल करून काय ॥४॥

॥२३॥ मिश्रित सारासार । अरे निवडी तोचि चतुर ॥धृ०॥ ब्रह्मनिरंजन अद्वय सत्य । माया जनपर द्वैत अनित्य ॥१॥
मेळविलें जळ अमृत दोनी । हंस जसा पय घे निवडोनि ॥२॥
पा:खीविण खरे निवडेंना । मूढ कसें जनहित कळेना ॥३॥
दास म्हणे निजकौतुक मोठें । अनुभव बोलती शाब्दिक खोटें ॥४॥

॥२४॥ पळापळा ब्रह्मपिसा येतो जवळी । रामनामें हांक देउनी डोई कांडोळी ॥ध्रु०॥ वृत्तिसेंडी बंधनेविन सदा मोकळी । संसाराची धुळी करूनि आंगीं उधली ॥१॥
प्रपंच- उकरडयावरी बैसणें ज्याचें । भोंवता पाळा फिरोनि पाहे जन हे अविद्येचे ॥२॥
धांडनि बैंसे उठोनि पळे द्रुश्य वाटतें । अदृश्य याचें राहणें घेतां नवचे कवणाचें ॥३॥ आउत हात गन नवा ठाईं उतळले । दहावा ठाव म्हणऊन तेथें ठिगळ दिधलें ॥४॥
ऐसें मन हें चंचळ निवृत्तीसी गुंतलें । परतूनियां आलें म्हणऊनि जीवेंचि मारिलें ॥५॥
मीपणाचें शहाणपण जळालें माझें । कोण वाहे देहबुद्धी वस्रांचं ओझें ॥६॥
नलगे आम्हां मानअपमानाचें ओझें । तुझी शुद्धि घेतां गेलें मीपण माझें ॥७॥
आम्ही जन धन देखुनि विचार करितों । आपण ऐसे पिसे म्हणऊनि उमज धरितों ॥८॥
अर्थें भेटों येती त्यांस वेड लवितों । रामीं रामदास ऐसें अबद्ध बोलतो ॥९॥

॥२५॥ कल्याणधामा । रामा कल्याणधामा ॥धृ०॥ दु:खनिवारण नायक सखा । सुखमूर्ति गुणग्रामा । रामा० ॥१॥
दास उदास करी तव कृपा । अभिनव नामगरिमा । रामा० ॥२॥

॥२६॥ तूं येरे रामा । काय वर्णूं महिमा ॥ध्रृ०॥ सोडविले देव तेतीस कोटी । तेवीं सोडवी आम्हां ॥१॥
राम लक्षुमण भरत शत्रुघन । पुढें उभा हनुमान ॥२॥
दास म्हणे भवबंध निवारीं । राम गुणधामा ॥३॥

॥२७॥ हे राघव देई तुझें भजन ॥धृ०॥ अनुताप त्यावरी भक्तियोग । मानिती हे सज्जन ॥१॥
कीर्तन करावें नामें उद्धरावें । अंतरीं लागो ध्यान ॥२॥
दास म्हणे मन अत्मनिवेदन । सगुण समाधान ॥३॥

॥२८॥ नाम मंगळधाम हरीचें हो । संतसज्जना विश्राम ॥धृ०॥ सकळ धर्म अचळ अर्थकाम । स्मरणें स्वानंदाभिराम ॥१॥
गरळचाळशम शिवमनोरम । दास उदास पूर्णकाम ॥२॥

॥२९॥ संगत साधूची मज जाहली । अक्षय पदवी आली ॥धृ०॥ सर्व मी सर्वात्मा ऐसी । अंतरीं दृढमति झाली । जागृतीसहित अवस्था तुया । स्वरूपीं समूळ विराली ॥१॥
बहुजन्मांची जपतपसंपती । विमळ फळेंसि आली । मी माझें हे सरली ममता । समुळीं भ्रांति निमाली ॥२॥
रामीं अभिन्न दास ऐसी हे जाणीव समूळही गेली । नचळे न ढळे अचळ कृपा हे । श्रीगुरुरायें केली ॥३॥

॥३०॥ अणुपासूनि जगदाकारा । ठाणठकार रघुवीर ॥धृ०॥ रामाकार जाहली वृत्ति । दृश्यादृश्य न ये हातीं ॥१॥
रामीं हारपलें जग । दास म्हणे कैंचें मग ॥२॥


लळित – पदे ३१ ते ४०

॥३१॥ शतशतकरवंशीं अवतरणा । दशमुखकुळसंहरणा । दशशतवदनाग्रजरूप मदना । दशरथनृपनंदन गुनसदना ॥ध्रु०॥ कौसल्यात्मज निजसुखकरणा । कौशिमकमख-पालन शिवस्मरणा । राजीवलोचन जानकीरमणा । भवचिंताहरणा ॥१॥
निजचरणीं अहल्याउद्धरणा । भार्गवीरक्षितीपाळाहरमर्दना । वालीकार्मुकधरणा । अंजनिसुतसेवित तव चरणा ॥२॥
दशदिशाव्यापक गुणसगुणा । आत्माराम समस्ताभरणा । जीवकदंबकपोप-संस्मरणा । रामदास वंदित तव चरणा ॥३॥

॥३२॥ रामा विसरावें मग काससया जियावें । स्वहित दुरी तेव्हां दु:ख पालवीं घ्यावें । रौरव कुंभीपाक अहोरात्र भोगावे । तेधवां कोण सोडी धर्म न पडे ठावें ॥ध्रु०॥ भजनीं कानकोडें राम न म्हणे तोंडें । आदळे दु:ख आंगीं भोग भोगितां रडे । कतृत्व आपुलेंचि कैसे नाठवे एवढें । देवासी बोल ठेवी केवीं स्वसुख जोडे ॥१॥
विषयीं चित्त गोवी हदयस्थ नाठवी । कामक्रोधलोभसंगें त्रास नुपजे जीवीं । ममता दु:ख परी आपणातें वाहवी । विनवी रामदार भवसागर तरवीं ॥२॥

॥३३॥ साजिरें हो रामरूप साजिरें हो ॥ध्रु०॥ रूप प्रगटलें लावण्य लजिलें मानसीं बैसलें ॥१॥
सर्वंगिं सुंदर ठाण मनोहर । दासाचा आधार ॥२॥

॥३४॥ देखिला हो राघव देखिला ॥ध्रु०॥ रूप रामाचें लावण्य साचें । ध्यान विश्रा-माचें ॥१॥
चंचळ मानस वाहे वास । रामीं रामदास ॥२॥

॥३५॥ शरण मी राघवा हो ॥ध्रु०॥ अंतरध्याना गुणनिधाना मज । पहा हो ॥१॥
भजन कांहीं घडत नाहीं । हें साहा हो ॥२॥
रामदास धरून कास । एक भावो ॥३॥

॥३६॥ रे मानवा उगीच आमुची जिणी । आम्हां ध्यानीं भेटिची शिराणी ॥ध्र०॥ नरापरीस वानर भले । जिहीं डोळां राम देखियेलें । ज्यासी रघुराज हितगुज बोले । कोण्या भाग्यें भगवंत भेटले ॥१॥
रामीं मिनले ते असो नीचयाती । त्यांच्या चरणाची वंदीन माती । नित्य नव्हाळी गाऊनि करूं किती । तेणें रघुनाथीं उपजेल प्रीती ॥२॥
रामीं राम-दास म्हणे ऐका करूं । थोर आम्ही तैसाचि भाव धरूं । भक्तिप्रेमाचा दाऊं निर्धारू । तेणें आम्हां भेटेल रघुवीरू ॥३॥

॥३७॥ कैचें घर कैंचें दार । मिथ्या सकळही व्यापार । अंतीं सोइर रघुवीर । कां भुललासी ॥१॥ कोणी नव्हेति रे कोणीचीं । सकळही सांगातीं दैवाचीं । धरीं साई त्या रामाची । कां भुल० ॥२॥
बहु अवघड आहे घाट । कैसी न कळे उरकेल वाट । होंई रघु-वीरजीचा भाट । कां भुल० ॥३॥
फिर माघारां परतोन पाहें । एकधर्मचि होउनि राहे । धन जोडिल न राहे । कां भुल० ॥४॥
ऐंसी करावी बा जोडी । राहे एथें तेथें गोडी । सोडी मिथ्या प्रपंचावोढी । कां भुल० ॥५॥
केव्हां जाईल न कळे श्वास । राहे तें घर पडेल वोस । बे कुडीया उपजेल त्रास । कां भुल० ॥६॥
सावध होईरे बा ऐसा । वोढी जळत घरिंचा वासा । स्मर माझ्या रमाधीशा । कां भुल० ॥७॥
संसार पाण्याचा बुडबुड । याचा नको करूं ओढा । तूं समजेसी ना मूढा । कां भुल० ॥८॥
करीं सीताराम मैंत्र । होईल देह तुझा पवित्र । वरकड भिंतीवरील चित्र । कां भुल० ॥९॥
कां रे बैसलास निश्चळ । करि-शिल अनर्थास मूळ । सांडुनी विश्रांतीचें स्थळ । कां भुल० ॥१०॥
मुख्यं असूं द्यावी दया । नाही तर सर्वही जाईल वायां । मिठी घाली रामपायां । कां भुल० ॥११॥
करिशील डोळ्याचा अंधार । पाहे जनासी निर्वैर । सांडि धनसंपत्तीचें वारें । कां भुल० ॥१२॥
अंगीं धनसंपत्तीचे वारें । खाया मिळतील भुतें पोरें । कामा नयेत रे निर्धारे । कां भुल० ॥१३॥
रामदासाचें जीवन । तूं कां न करीसी साधन । राम तोडिल भवबंधन । कां भुललासी ॥१४॥

॥३८॥ चातुर चातुरसे चटका ॥ध्रु०॥ एकएकगुणपरवडी डारूं । तन मेरी तोरींगचे तटका ॥१॥
सुनत देखत गुण प्रगत लोकनमें । अजब लागे चटका ॥२॥
रामदास साही सब घटव्यापक । आनंदकी घटका ॥३॥

॥३९॥ बाई मी हो मी हो जाहली खरी । खरी गुरुदास । अखिल पदार्थीं उदास ॥ध्रु०॥ इह पर नश्वर जाणुनि हदयीं । आलासे बहु त्रास ॥१॥
नित्यानित्य विवेक विचा-रुनि । सेवितों ब्रह्मरसास ॥२॥ तुर्या उल्लंघुआने उन्मनी सेउनी । स्वस्वरूपीं निजवास ॥३॥
निजतृप्तीसी देउनि तृप्ती । केला अनुभवग्रास ॥४॥
रामदास प्रभु नित्य उदास । सच्चरणीं विश्वास ॥५॥

॥४०॥ आवडतो प्रिय परी गवसेना ॥ध्रु०॥ स्वजनाहुनि प्रिय देह आपुला । तोहि विटे परी आपण दिसेना ॥२॥
श्रीगुरु दास्य अनन्य घडे जरी । अनुभवतंतु कधीं तुटेना ॥३॥


लळित – पदे ४१ ते ४९

॥४१॥ कोण मी मज कळतचि नाहीं । सारासारविचार शोधूनि पाही ॥१॥
नारी म्हणों तरी नरचि भासे । नर म्हणों तरी समूळ विनासे ॥२॥
दास म्हणों तरी रामचि आहे । राम म्हणों तरी नाम न साहे ॥३॥

॥४२॥ आतां तरि जाय जाय जाय । धरी सद्रुरूचे पाय ॥ध्रु०॥ संकल्प विकल्प सोडूनि राहें । दृढ धरुनी पाय पाय पाय ॥१॥
नामस्मरण ज्या मुखीं नाहीं । त्याणें वाचुनी काय काय काय ॥२॥
मानवतनु ही नये मागुती । बरें विचारुनि पाहें पाहें पाहें ॥३॥
आत्मानात्मविचार न करितां । व्यर्थ प्रसवली माय माय माय ॥४॥
सहस्त्र अन्याय जरी त्वां केले । कृपा करील गुरु माय माय माय ॥५॥
रामदास म्हणे नामस्मरणें । भिक्षा मागुनि खाय्र खाय खाय ॥६॥

॥४३॥ अरे नर सारविचार कसा ॥ध्रु०॥ क्षीर नीर एक हंस निवडिती । काय कळे वायसा ॥१॥
माया ब्रह्म एक संत जानती । सारांश घेती तसा ॥२॥
दास म्हणे वंद्य निंद्य वेगळें । कर्मानुसार ठसा ॥३॥

॥४४॥ अरे मन पावन देव धरी । अनहित न करी ॥ध्रु०॥ नित्यानित्यविवेक करावा । बहुजना उद्धरीं ॥१॥
सकळ चराचर कोठुनि जालें । कोठें निमालें तरी ॥२॥ दास म्हणे जरी समजसी तरी । मुळींची सोय धरीं ॥३॥

॥४६॥ भूतकाळीं कर्म केलें वर्तमानीं आलें । त्याचें सुख मानूनियां भोगितो आपुलें ॥ध्रु०॥
सुखदु:खभोग जाला तोचि मागिल ठेवा । आतां दु:ख मानू नको करी राम सेवा ॥१॥
बाईल मेली पोर मेलें द्रव्य नाहीं गांठीं । तळमळ लागली जीवीं कांरे होशी कष्टी ॥२॥
जें जें दु:ख होतें जीवा तेंचि मागिल कर्म । आतां त्याचें सुख मानी स्मर राम नाम ॥३॥
नामाविण राहूं नको असा फजित होशीं । पुन्हां घडे नये बापा नरकामध्यें जाशी ॥४॥
भविष्याचा धोका तुझे हातामध्यें आहे । पळभर विसरूम नको नाहिं कोणी साह्ये ॥५॥
सावध होंई सावध होंई किती सांगूं तुजला । तुजला । परिणाम कठीण मोठा शरण जांई गुरुला ॥६॥
दास म्हणे जालें तें तरी होउनियां गेलें । नको नको म्हणतांहि भोगवितें केलें ॥७॥ भूतकाळीं० ॥

॥४७॥ एकला जगदंतर जाहला । आणीक कोणीव नाहीं तयाला ॥१॥
चारी खाणी चारी वाणी । हालवी बोलवी चालवी त्याला ॥२॥
एक धरी एक त्यागीत आहे । आपण आपण भोगवीत आहे ॥३॥
दस म्हणे हा बहुविध तमासा । पाहिल तो मग होईल तैसा ॥४॥

॥४८॥ ज्या ज्या वेळे जें जें होईल तें तें भोगावें । विवेकाला विसरुनि आपण कष्टी कां व्हावें ॥धृ०॥
एकदां एक वेळ बहु सुखाची गेली । एकदां एक वेळ जीवा बहू षीडा झाली ॥१॥
एकदां मागूं जातां मिळती षड्‍रस पक्कान्नें । एकदां मागूं जातां न मिळे भाजीचें पान ॥२॥
सुकृत दुष्कृत दोन्ही पूर्वदत्ताचें फळ । ऐसें प्राणी जाणेना तो मूर्खचि केवळ ॥३॥
देह दु:खास मूल ऐसें बरवें जाणोन । सुखदु:खाविरहित रामदास आपण ॥४॥
ज्या ज्या० ॥

॥४९॥ घटका गेलीं पळें गेलीं तास वाजे झणाणा । आयुष्याचा नाश होतो राम कांरे म्हणाना ॥१॥ एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले । विषयाच्या संगामुळें चारी प्रहर गेले ॥२॥
रात्र कांहीं झोंप कांही स्त्रीसगें गेली । ऐशी आठा प्रहरांची वासलाद झाली ॥३॥
दास म्हणे तास वाजे सकळां स्मरण देतो । वेळोवेळां राम म्हणा म्हणोनि झणकारितो ॥४॥


लळित – पदे ५० ते ५५

॥५०॥ अंजनीगीत ॥ लंकेहूनि अयोध्ये येतां राम लक्षूमण सीता । हनुमंतें अंजनी माता । दाखविली रामा ॥१॥
चवघें केला नमस्कार । काय बोले रघूवीर । तुझ्या कुमरें आम्हां थोर । उपकार केला ॥२॥
सीताशुद्धी येणें केली । लक्षुमणाची शक्ति हरिली । लंका जाळूनि निर्दाळीली । राक्षससेना ॥३॥
अहिरावण महिरावण ॥ घात करिती आमुच्या प्रारणा । देवीरूपें दोघांजणां । रक्षिलें माते ॥४॥
अठरा पद्में वानरभार । श्रमें युद्ध केलें फार । शिळा सेतू सागर । समाप्त केला ॥५॥
माते तुझ्या उदरीं जाण । हनुमान जन्मल रत्न । एवढें माझें रामायण । याचेनि योगें ॥६॥
ऐकून पुत्राची ही स्तुति । माता तुच्छ मानी चित्तीं । व्यर्थ कां बा रघुपती । वाहसी भार ॥७॥
हा कां माझ्या उदरीं आला । गर्भाहूनि नाहीं गळाला । आपण असतां कष्टविला । श्रीराम माझा ॥८॥
माझिया दुग्धाची प्रौढी । कळिकाळाची नरडी मुरडी । रावणादिक हे बापुडीं । घुंगुरटीं तेथें ॥९॥
असत्य रामा वाटेल बोली । दुग्धधारा सोंडियेली । शौला उदरीं खोचविली । त्रिखंड तेव्हां ॥१०॥
वेणी दंड परताळिला । लंकेलागीं वेढा दिधला । आणुनी रामासी दाखविला । अंजनी मातें ॥११॥
सींता बोले अंजनीसी । कां कोपशी बाळकाशीं । रामें आज्ञा हनुमंतासी । दिधली नव्हती ॥१२॥
आश्चर्य वाटलेंसें रामा । म्हणे माते धन्य महिमा । पादपद्में चवघांजणां । वंदिलें भावें ॥१३॥
अत्यंत जिवलग सख्या । हनुमंत भक्त निका । रामदास-पाठीराखा । महारुद तो ॥१४॥

॥५१॥ गणपति गणराज धुंडिराज महाराज । चिंतामणि मोरेश्वर याविण नाहीं काज ॥ध्रु०॥ अकार उकार मकार तुझी शुंडा अनिवार । ब्रह्मा विष्णु महेश हे तरि तुझेच अवतार ॥१॥
त्रिगुण तूं गुणातीत नामरूपाविरहित । पुरुषनाम प्रकृतींत अंत नाहीं हा ॥२॥
सच्चिनदानंद देवा । आदि अंत तुलचि ठावा । दास म्हणे वरट भावा । कृपादृष्टीं हा ॥३॥

॥५२॥ प्रगट निरंजन प्रगट निरंजन आहे । आगमनिगम संतसमागम सद्रुरुवचनें पाहे ॥ध्रु०॥ आत्मविचारें शास्त्रविचारे गुरुविचारें बोध । मीपण तूंपण शोधूनि पाहतां आपणा आपणा शोध । प्रगट० ॥१॥
जडासि चंचळ चालविताहे चंचळ स्थिर न राहे । प्रचीत आहे शोधूनि पाहे निश्चळ होऊनि राहे ॥२॥
भजनीं भजन आत्मनिवेदन श्रवणमनन साधा । दास म्हणे निजगुज शोधितां होत नसे भवबाधा ॥३॥

॥५३॥ पाहा पाहा या जगांत राम आहे । राम आहे राम आहे राम आहे ॥ध्रु०॥ जग हें अवघें रामच सारा । अंतरीं पाहे करी विचारा ॥१॥
एक सुवर्णीं बहु अळंकारा । तद्बत पाही सर्व पसारा ॥२॥
विना कच्छू नाहीं थारा । रामच रामही घे घे सारा ॥३॥
दास म्हणे हा रामच भरला । भरला उरला बोलच खुंटला ॥४॥

॥५४॥ गुरुदातारें दातारें । अभिनव कैसें कैसें केलें ॥ध्रु०॥ एकचि वचनें न बोलत बोलूनि । मानस विलया नेलें ॥१॥
भूतसंगें कृत नैश्वर ओझें । निजबोधें उतरिलें ॥२॥
दास म्हणे मज मीपणविरहित । निजपदीं नांदविलें ॥३॥

॥५५॥ मिश्रित सारासार । अरे निवडी तोचि चतुर ॥ध्रु०॥ ब्रह्म निरंजन अद्वय सत्य । माया जनपर द्वैत अनित्य ॥१॥
पारखीवीण खरें निवडना । मूढ कसें जनहित कळेना ॥२॥
मेळविलें जळ अमृत दोनी । हंस जसें पय घे निवडोनी ॥३॥
दास म्हणे निज कौतुक मोठें । अनुभव बोलतां शाब्दिक खोटें ॥४॥ एकूण पदें ॥२३१॥


लळित – संत रामदास समाप्त .