षड्रिपुविवेचन – संत रामदास

श्री रामदास्वामीं विरचित – षड्रिपुविवेचन
षड्रिपुविवेचन – कामनिरूपण

भल्यासी वैर करिती ते साही ओळखा बरें । षड्रिपु कामक्रोधादि मदमत्सर दंभ तो ॥१॥
प्रपंच साहवा वैरी तयांना जिंकितां बरें । भल्यासी लविती वेडा परत्र मार्ग रोविला ॥२॥
काम आरंभिंचा वैरी निष्काम बुडवी सदा । कामना लागली पाठी काम काम करी जनीं ॥३॥
काम उत्पन्न होताहे ते वेळे नावरे जना । कामवेड जडे ज्याला तो प्राणी आत्मघातकी ॥४॥
कित्येक योषितेसाठीं कां तरी मृत्यु पावले । झडाच घालिती नेटें पतंगापरि भस्मती ॥५॥
आपणा राखणें नाहीं शुद्धि नाहीं म्हणोनियां । सभाग्य करंटे होती वेश्येसीं द्रव्य नासिती ॥६॥
कित्येक भोरपी झाले किती गेले उठोनियां । बाटले भ्रष्टके मेले बुडाले कामसेवनीं ॥७॥
व्याधीनें नासती अंगें नासिके झडती जनीं । औषधें दंतही जाती रूपहानीहि होतसे ॥८॥
रूपहानि शक्तिहानि द्रव्यहानि परोपरी । कुलहानि यातिहानि सर्व हानीच होतसे ॥९॥
कित्येक नाशिले भोगें लोकलाजचि सांडिली । शुभा-शुभ नसे तेथें नीचा उचं भ्रष्टती ॥१०॥
कामाचे व्यसनें गेले मातले रतले जनीं । तारुण्य दोंदिसांसाठीं जन्म दुर्लभ नाशिला ॥१॥
विधीनें विषया घ्यावें अविधि नसतां बरें । आश्रमीं न्यायनीतीनें प्रपंच करणें सुखें ॥१२॥
लटकें नासती काया चेटकें तीं परोपरी । जारणा मारणादिकें नाटकें चेटकें बहू ॥१३॥
चेटका देवतें भूतें जन्महानीच होतसे । म्हणोनि काम हा वैरी आकळावा परोपरी ॥१४॥
ऐसा निरूपिला काम क्रोध तो बोलिला पुढें । कोप तो तामसी प्राणी तमोगुणीं अधोगति ॥१५॥
इतिश्री काम हा वैरी जेणें पाडि यलें भवीं । तो राही सकळां ठायीं विवेकें जाणिजे बरें ॥१६॥

॥ कामनिरूपण समाप्त ॥१॥


षड्रिपुविवेचन – कोपनिरूपण

कोपआरोपणा खोटी कोपें कोपचि वाढतो । मोडतो मार्ग न्यायाचा अन्याय प्रबळे बळें ॥१॥
क्रोध हा खेद संपादी जेथें तेथें चहूंकडे । विवेक पाहतां कैंचा शुद्धि तेथें असेचिना ॥२॥
भ्रुकुटी कुटिला गांठी काळिमा वदनीं चढे । कुर्कुरी बुर्बुरी रांगें हस्तपायच चोळितो ॥३॥
कुशब्द वोखटे काढी त्रासकें वचनें वदे । घेतसे बालटें ढालें उणें काढी परोपरी ॥४॥
बोलतां हिसळे थुंका तये ताये उसाळतो । तांबडे जाहले डोळे रागें रागाच फुगला ॥५॥
कँठलल्लाटिंच्या शीरा फुगल्या घाम चालिला । थरथरा कांपतो रागें रूपें भूतचि जाहला ॥६॥
धर्ते लोकांसि झिंजाडी सातांपांचांचि नावरे । कुस्ती लिथाडी पछयाडी मारामारी धबा-धबी ॥७॥
सुटलीं फिटला वस्रें नागवे दिसती जनां । लाज ते अंतरीं नाहीं गांधलें नीट धांवती ॥८॥
अनर्थ मांडला मोठा लाथा बुक्या चपेटिका । कोपरें मारिती शीरीं काष्ट-पावाणअर्गळा ॥९॥
मुसळें मारिती काटया खिडी डांगाच ढेंकळें । डसती झोबतीं अंगानीकुरें लविती कळा ॥१०॥
एकांहीं धरिल्या शेंडया वृषणीं लविती कळा । पाडिलें दांत भोंकाडें मस्तकें फोडिलीं बळें ॥११॥
ताडिले पाडिले पडले रक्तबंबाळ जाहले । घरचीं मारिती हांका हांका बोंबा परोपरी ॥१२॥
दिवाणामाजि ते नेले मारिले दंड पावले । क्रोधें करंटे ते केले क्रोध चांडाळ जाणिजे ॥१३॥
भल्यानें कोप सांडावा शांतीने असत बरें । क्षुल्लकें कोप पाळावा भल्याचें काम तो नव्हे ॥१४॥
इतिश्री क्रोधरिपु । जेणें बहुत जाला दर्पू । त्यांचीं लक्षणें अमूपू । निरूपिलीं साक्षेपें ॥१५॥

॥ क्रोधनिरूपण समाप्त ॥२॥


षड्रिपुविवेचन – मदनिरूपण

क्रोध तो बोलिला मागें मद तो आइका पुढें । मदाचीं गुप्त हीं कामें अंतरींचा कळेचिना ॥१॥
मद हा वोखटा मोठा मद हा खेदकारक । मदानें पद लाधेना मद शोध करी भला ॥२॥
देहाचा मद शक्तीचा द्रव्याचा मद अंतरीं । विद्येचा मद राज्याचा मद रूप बहूविधा ॥३॥
मदानें थोकली विद्या पुढें आणिक होइना । सर्वां माने मना येना आपुले होरटी कडे ॥४॥
कळेना सृष्टि देवाची बहुरत्ना वसुंधरा । मदाला नावडे कांहीं सर्वही तुच्छ होतसे ॥५॥
मदानें भुलला प्राणी विचारें उमजेचिना । पराचें सत्य मानेना विवरेना कदापिही ॥६॥
वेदशास्त्रादि हो चर्चा नीति हो न्याय हो नव्हे । आपणा पाहणें नाहीं विरंचि बोलिला तरी ॥७॥
इतरा कोण तो लेखा संत साधु महंत हो । आपणें न्याय केला तो आपुलें बोलणें बरें ॥८॥
चालणें थोर तें माझें माझा मीच बहु भला । न्यायाची गोष्टि मानेना नीतीनें कोप येतसे ॥९॥
आपणापरतें नाहीं सर्व कांहीं भुमंडळीं । गुणग्राहकता नाहीं पराचें तुच्छ होतसे ॥१०॥
कैसेनी उमजावा तो हेंकाड आंधळें गुरूं । दिसेना नाकळे कांहीं वळिताम न वळे कदा ॥११॥
ऐशाचा संग तो खोटा हित तेथें असेचिना । स्वहित आपुलें नाहीं परहित कसें घडे ॥१२॥
थोर आयुष्य मोलाचें मदें व्यर्थचि नाशिलें । पापी हा उमजों नेदी शेवटीं दूर होतसे ॥१३॥
मारतां मद कैशाचा पुसे कोण तया मदा । पूर्वींच कळला नाहीं तर्‍हेनें जन्म नाशिला ॥१४॥
देहही बळही गेलें द्रव्य गेलें वृथाचि तें । डंब गेल स्तोब गेलें एकला जातसे खळ ॥१५॥
इतिश्री मदरिपु । जेणें वाढविला भवरिपु । तो हा टाकितां साक्षेपू । समाधान पावला ॥१६॥

॥ मदनिरूपण समाप्त ॥३॥


षड्रिपुविवेचन – मत्सरनिरूपण

मद तो तिसरा शत्रू चौथा मत्सर आयका । मत्सरें सत्य मानेना सत्याचें लटकें करी ॥१॥
बर्‍याच ओखटे सांगे मज नाहीं म्हणोनियां । पैशून्य नसते काढी नसत कुंद लावणें ॥२॥
नस्ते नस्ते ढाल घेणें ऐसी हे जाति मत्सरीं । स्वयें आहे करंटाही समर्था निंदितो सदा ॥३॥
टोपणा आपण असे सर्वज्ञा न मनीं कदा । आपणू घातकी आहे पुण्यवंता पडेचिना ॥४॥
कुकर्मी आपण प्राणी सत्कर्मोच्छेदि तो सदा । आपणू चोरटा आहे सकळां चोरटें करी ॥५॥
आपण भ्रष्टला आहे भल्याला भ्रष्ट भावितो । आपणू घातकी मोठा पराला घातकी म्हणे ॥६॥
पोटींचा कपटी मोठा जनाला कपटी म्हणे । आपणा भक्ति ठाकेना हरिभक्ति उच्छेदितो ॥७॥
आपणू नीच कुळिंचा कुळवंत मना न ये । आपणू ठायिंचा लंडी रणशूरासि हांसतो ॥८॥
आपणू भ्याड ठायींचा धारिष्टा कर्कशू म्हणे । आपणू वोंगळू आहे निर्भळा कदमू म्हणे ॥९॥
आपणू लालुची मोठा वैराग्याची उडावणी । करवेना देखवेना ऐसा तो मत्सरू नरू ॥१०॥
आपलें कर्म भोगीतो पराला कर्म लवितो । जें कांहीं आपण नाहीं तें सर्व उडवीतसे ॥११॥
भांडे तोंडची तें वेडें भकाटया करितो जनीं । अखंड सुजना भांडे तंडे तंडे उदंडया ॥१२॥
धीट तोंडाळ तो प्राणी कांहीं केल्या विटेचिना । लंद तो कोटिगा मोठा लाज त्याला असेचिना ॥१३॥
मत्सरें भाग्यही गेलें मत्सरें बुद्धि नासली । भक्ति ना ज्ञान ना कांहीं अत्र ना परही नसे ॥१४॥
पाहतां सख्य तो नाहीं लोधला ताड उद्धटू । मत्सरें लविलें वेडा ज्याचें त्याला कळेचिना ॥१५॥
इतिश्री मत्सररिपु । जाणिजे हा अमूपू । जेणें वेढिला भवसंकल्प्‍ । दु:खसागर ॥१६॥

॥ मत्सरनिरूपण समाप्त ॥४॥


षड्रिपुविवेचन – दंभनिरूपण

दंभ हा पांचवा जाणा महाशत्रू कळेचिना । यालागीं भांडणें लोका एकामेका पडेचिना ॥१॥
दंभ दंभा बरा वाटे यालागीं लोक भांडती । भांडती मरती जाती दंभालागीं निघोनियां ॥२॥
सकळां पाहिजे दंभ परंतु मिळतो कसा । पालागीं चुर्मुरीताती बुडाले दु:खसागरीं ॥३॥
स्वार्थ हा व्यर्थ जाणावा परंतु जन आंधळे । दंभानें आंधळे केलें ऐसा हा दंभतस्करू ॥४॥
शरीर मुख्य जायाचें दंभाची कोण ते कथा । शब्दची ऊमजेना कीं वैर साधी परोपरी ॥५॥
देहाचा दंभ तो खोटा परंतु आवडे जना । विवेक पाहतां नाहीं दु:खी होती म्हणोनियां ॥६॥
ज्ञातया दंभ बाधेना एकाएकीं खडोखडी । उठोनी चालिला योगी दंभ ते कुतरे किती ॥७॥
वैराग्य पाहिजे अंगीं उदास फिरती लिळा । दंभ उड्डाण तें नेटें लोलंगताचि खुंटली ॥८॥
निश्चया दंभ बाधीना निश्चयो पाहिजे बरा । अंतरें अंतरा भेदी तेथें दंभचि नाढळे ॥९॥
तंभ तो चोर जायाचा लालची करिती मुढें । शेवटीं सर्वही जातें प्रेत होतें भुमंडळीं ॥१०॥
मव्याला कासया व्हावें जाणावें पहिलेंचि हो । लावावें कारणीं देहा दंभ कैंचा उरेल तो ॥११॥
अखंड आठवा राम रामाचें ध्यान अंतरीं । तेव्हां वैराग्यचि उठे दंभ लुंठे परोपरी ॥१२॥
मांसाचा मोधळा याचा दंभ तो कोणतो किती । सावधा दंभ बाधीना दुश्चिताला पछाडितो ॥१३॥
नेणतां चोरटें येतें जाणतां पळतें बरें । शून्याचसारखें जाणा कायसें तें तरी मढें ॥१४॥
धन्य वीवेकि तो राजा वैराग्य बळ आगळे । भक्तिनें ओळला साधू दंभ तेथें दिसेचिना ॥१५॥
इतिश्री दंभरिपु । जेणें वाढविला भवसंलल्पू । तयाचें निर्दळण करी जो साक्षेपू । तोचि धन्य ॥१६॥

॥ दंभनिरूपण समाप्त ॥५॥


षड्रिपुविवेचन – प्रपंचनिरूपण

प्रपंच हा महा वैरी परत्र अंतरीं दुरी । अवघा तोचि तो जाला तेणें देव दुरावला ॥१॥
पदार्थीं बैसली बुद्धि शुद्धि नाहीं परत्रिंची । प्रपंच शेवटीं कैचा गेल्या हा देह हातिंचा ॥२॥
देव तो राहिला दूरीं ऐसा वैरी प्रपंच हा । बाळत्वीं छंद मायेचा खेळतां राहिला दुरी ॥३॥
लागला छंद पोरांचा क्षणक्षण चुकावितो । सांगते माय मानेना लिहीना घरीं असे ॥४॥
हाणिती मारिती पोरें रडतो पडतो बहू । सोशितो आपुल्या जीवें खेळासाठीं मुलांकडे ॥५॥
कांहींसा शाहणा झाला शिकविला परोपरी । लोभानें लग्रही केलें वोढला सासर्‍याकडे ॥६॥
नोवरी आवडे जीवीं नटावेंसें मनीं उठे । तारुण्य बाणतां अंगीं कामलोभेंचि भूलला ॥७॥
खेळ तो राहिला मागें काम तो पडला पुढें । मोहिला शक्तिनें प्राणी तिजवांचोनि नावडे ॥८॥
उदंड जाहलीं पोरें खर्च तो वाढला पुढें । उद्वेग लागला जीवा मेळवितां मिळेचिना ॥९॥
उदंड करंटा जाला हिंडे चहुंकडे फिरे । प्रीति ते राहिली मागें अशक्त जाहला बहु ॥१०॥
फिटेना ऋण तें वाढें ताडातोडी चहूंकडे । मिळेना अन्न ना वस्र वार्धक्यें खंगला बहू ॥११॥
कष्टला शेवटीं मेला गेला प्रापंच हातींचा । घातला मागुती जन्मा ऐसा वैरी प्रपंच हा ॥१२॥
जन्मासि घातलें देवें काय येऊनि साधिलें । भुलले चुकले देवा प्रपंच घातकी पहा ॥१३॥
आधींच सर्व जाणावें काय येतें समागमें । निर्वाणीं अंतिचा देवो कोणी एकें चुकों नये ॥१४॥
घर गांव स्थान माझें वाडे शेत मळे गुरें । पुत्र कन्या बंधु माझे सर्व सांडोनि चालिला ॥१५॥
माझें माझें म्हणे वेडा स्वार्थबुद्धि बहूतची । सर्व सांडोनि गेला रे एकाएकीं उठोनियां ॥१६॥
प्रपंचीं भुलला प्राणी व्यर्थ आयुष्य वेंचलें । देव ना धर्म ना कांहीं ऐसा हा साहवा रिपू ॥१७॥
प्रपंचाकारणें कष्टीं सर्वस्वें वेंचला जिवें । कांहींच वेंचलें नाहीं शेवटीं हात झाडिला ॥१८॥
अपेशी सर्वदा जाल मायाजाळेंचि भूलला। आपुलें मानिलें जें जें तें तें सर्वत्र राहिलें ॥१९॥
जाहला खोत पापाचा सर्वांचें पाप घेतलें । यातना भोगणें लागे चूकला शाहणा कसा ॥२०॥
आधींच जाणिजे सर्व विवेकी त्यास बोलिजे । प्रपंज लथिला बा रे वैरी हा सोडिला कसा ॥२१॥
सर्वांस योग साधेना पुण्य ऊदंड पाहिजे । सहस्रांमाजिं तो एक ज्ञान वैराग्य नेटका ॥२२॥
षड्रिपू जिंकिलें जेणें तोचि ज्ञानी  महा भला । दीक्षेनें उद्धरी लोकां वैरागी तो उदासिनू ॥२३॥
इति श्रीप्रपंचरिपू । जेणें वाढविला भवसंकल्पू । जाणिजे हा अमूपू दु:खसागर ॥२४॥

॥ प्रपंचनिरूपण समाप्त ॥६

॥ षड्रिपुविवेचन अनुष्ठुभ् छंद संख्या ॥१०३॥


षड्रिपुविवेचन – संत रामदास