दासबोध दशक सतरावा विडिओ सहित



॥ श्रीमत् दासबोध ॥
दश सतरावा : प्रकृतिपुरुष

समास पहिला : देवबळात्कार
॥ श्रीराम ॥

निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा । सकळां पर जो परमात्मा ।
चैतन्य साक्षी ज्ञानात्मा । शड्गुणैश्वरु ॥ १ ॥
मूळ परब्रह्म हे निश्चळ आहे. त्यामध्ये जे चंचळ स्फुरण उत्पन्न होते, तोच आत्मा होय. तो सर्वांहून श्रेष्ठ म्हणून त्यास परमात्मा म्हणतात. चैतन्य, साक्षी, ज्ञानात्मा, षड्गुणेश्वर ही त्याचीच नावे आहेत. (१)

सकळ जगाचा ईश्वरु । म्हणौन नामें जगदेश्वरु ।
तयापासून विस्तारु । विस्तारला ॥ २ ॥
सर्व जगाचा ईश्वर म्हणून त्यास जगदीश्वर म्हणतात. त्याच्यापासून सृष्टीचा हा अफाट विस्तार झाला आहे. (२)

शिवशक्ती जगदेश्वरी । प्रकृतिपुरुष परमेश्वरी ।
मूळमाया गुणेश्वरी । गुणक्षोभिणी ॥ ३ ॥
त्यालाच शिवशक्ती, जगदीश्वरी, प्रकृतिपुरुष, परमेश्वरी, मूळमाया, गुणेश्वरी, गुणक्षोभिणी इत्यादी नावाने ओळखतात. (३)

क्षेत्रज्ञ द्रष्टा कूटस्त साक्षी । अंतरात्मा सर्वसाक्षी ।
सुद्धसत्व महत्तत्त्व परीक्षी । जाणता साधु ॥ ४ ॥
क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कूटस्थ, साक्षी, सर्वलक्षी, अंतरात्मा, शुद्धसत्व, महत्तत्त्व यांची परीक्षा करून जो त्यांना जाणतो, तोच जाणता साधू होय. (४)

ब्रह्मा विष्णु महेश्वरु । नाना पिंडी जीवेश्वरु ।
त्यास भासती प्राणीमात्रु । लहानथोर ॥ ५ ॥
ब्रह्मा, विष्णु, महेश्वर नाना पिंडांच्या ठिकाणी असणारा जीवेश्वर यांकडेच लक्ष ठेवून तो सर्व लहानथोर प्राणिमात्रांना पाहतो. (५)

देहदेउळामधें बैसला । न भजतां मारितो देहाला ।
म्हणौनि त्याच्या भेणें तयाला । भजती लोक ॥ ६ ॥
अंतरात्मा हा देहरूपी देवळात बसलेला असतो. त्याचे भजन केले नाही, तर तो देहाला मारून टाकतो. म्हणून भयाने सर्व लोक त्याला भजतात. (६)

जे वेळेसी भजन चुकले । तें तें तेव्हां पछ्याडिलें ।
आवडीनें भजों लागले । सकळ लोक ॥ ७ ॥
ज्या ज्या वेळी भजनात चूक होते, तेव्हा तेव्हा तो लोकांना छळतो. म्हणून आवडीने सर्व लोक त्याला भजू लागले. (७)

जें जें जेव्हां आक्षेपिले । तें तें तत्काळचि दिधलें ।
त्रैलोक्य भजों लागलें । येणें प्रकरें ॥ ८ ॥
त्याने ज्या ज्या वेळी जे जे अपेक्षिले, त्या त्या वेळी तत्काळ ते दिले गेले. याप्रकारे त्रैलोक्य त्याला भजू लागले. (८)

पांचा विषयांचा नैव्यद्य । जेव्हां पाहिजे तेव्हां सिद्ध ।
ऐसें न करितां सद्य । रोग होती ॥ ९ ॥
पाच विषयभोगांचा नैवेद्य जेव्हा हवा तेव्हा तयारच असतो. असे जर केले नाही तर तत्काळ रोग होतो. (९)

जेणें काळें नैव्यद्य पावेना । तेणें काळें देव राहेना ।
भाग्य वैभव पदार्थ नाना । सांडून जातो ॥ १० ॥
ज्या वेळी नैवेद्य मिळत नाहीसा होतो, त्या वेळी देव तेथे राहात नाही. भाग्य, वैभव, नाना पदार्थ टाकून तो देहत्याग करतो. (१०)

जातो तों कळो देईना । कोणास ठाउकें होयेना ।
देवेंविण अनुमानेना । कोणास देव ॥ ११ ॥
तो जातो, तेव्हा कुणाला कळू देत नाही. कुणाला माहीतही होत नाही. देवाशिवाय देवाचे रहस्य कुणाला कळणार आहे ? (११)

देव पाहावयकारणें । देउळें लागती पाहाणें ।
कोठेंतरी देउळाच्या गुणें । देव प्रगटे ॥ १२ ॥
देव पाहाण्याकरिता देवालयांचा शोध घ्यावा लागतो, तेव्हा कोठेतरी देवळाच्या गुणाने देव प्रगट होतो. (१२)

देउळें म्हणिजे नाना शरीरें । तेथें राहिजें जीवेश्वेरे ।
नान शरीरें नाना प्रकारें । अनंत भेदें ॥ १३ ॥
देवळे म्हणजे नाना शरीरे. त्यातच जीवेश्वर राहातो. नाना प्रकारची नाना शरीरे असतात. त्यात अनंत भेद असतात. (१३)

चालतीं बोलतीं देउळें । त्यामधें राहिजें राउळें ।
जितुकीं देउळें तितुकीं सकळें । कळली पाहिजे ॥ १४ ॥
शरीरे ही चालती-बोलती देवळे असतात. त्यात राया म्हणजे राजा जो अंतरात्मा तो राहात असतो. जितकी म्हणून देवळे आहेत ती सर्व कळली पाहिजेत. (१४)

मछ कूर्म वाराह देउळें । भूगोळ धरिला सर्वकाळें ।
कराळें विक्राळें निर्मळें । कितियेक ॥ १५ ॥
मत्स्य, कूर्म, वराह ही पण देवालयेच आहेत. त्यांनीच हा भूगोल सर्वकाळ सावरून धरला आहे. काही देवळे म्हणजे शरीरे अक्राळ विक्राळ असतात, तर कित्येक निर्मळ असतात. (१५)

कित्येक देऊळीं सौख्य पाहे । भरतां आवघें सिंध आहे ।
परी तें सर्वकाळ न राहे । अशाश्वत ॥ १६ ॥
कित्येक देवळांत-शरीरांत अवघे सौख्य भरून राहिलेले असते. पण तेही सर्वकाळ राहात नाही. ते अशाश्वतच असते. (१६)

अशाश्वताचा मस्तकमणीं । जयाची येवढी करणी ।
दिसेना तरी काय जालें धनी । तयासीच म्हणावें ॥ १७ ॥
अशाश्वताचा मस्तकमणी जो अंतरात्मा त्याची ही सर्व अगाध करणी असते. तो दिसत नसला म्हणून काय झाले ? त्यालाच सर्वांचा धनी म्हणावे लागते. (१७)

उद्‍भवोन्मुख होतां अभेद । विमुख होतां उदंड खेद ।
ऐसा अधोर्ध संवाद । होत जातो ॥ १८ ॥
अंतरात्म्याकडे लक्ष गेल्याने सर्व भेद मावळतो. त्याच्यापासून विमुख होऊन विषयाकडे लक्ष गेले, तर भेद निर्माण होऊन खेद होतो. याप्रमाणे अध म्हणजे विषयाकडे आणि ऊर्ध्व म्हणजे अंतरात्म्याकडे असा खालीवर होण्याचा संवाद, नित्य चालू असतो. (१८)

सकळांचे मूळ दिसेना । भव्य भारी आणी भासेना ।
निमिष्य येक वसेना । येके ठाइं ॥ १९ ॥
सर्वांचे मूळ असून तो अंतरात्मा दिसत नाही. तो भव्य आणि प्रचंड असून तो भासत नाही. त्याची जाणीव होत नाही. तो क्षणभरही एका ठिकाणी राहात नाही. (१९)

ऐसा अगाध परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा ।
तुझी लीळा सर्वोत्तमा । तूंच जाणसी ॥ २० ॥
परमात्मा असा अगाध आहे. त्याचा महिमा कोण जाणू शकेल ? हे सर्वोत्तमा, तुझी लीला फक्त तूच जाणतोस. (२०)

संसारा आलियाचें सार्थक । जेथें नित्यानित्यविवेक ।
येहलोक आणी परलोक । दोनीं साधिले ॥ २१ ॥
या जगात जन्माला आल्याचे सार्थक करावयाचे असेल तर नित्यानित्यविवेक करणे आवश्यक आहे. जेथे असा विवेक केला जातो, तेथेच इहलोक आणि परलोक दोन्ही साधले जातात. (२१)

मननसीळ लोकांपासीं । अखंड देव आहिर्निशीं ।
पाहातां त्यांच्या पूर्वसंचितासी । जोडा नाहीं ॥ २२ ॥
जे मननशील लोक असतात त्यांच्यापाशी देव रात्रंदिवस अखंड असतो. त्यांच्या पूर्वपुण्याईला तोड नाही, असेच दिसून येते. (२२)

अखंड योग म्हणोनि योगी । योग नाहीं तो वियोगी ।
वियोगी तोहि योगी । योगबळें ॥ २३ ॥
अखंड आत्मानुसंधान असल्यामुळे त्यास योगी म्हणतात. जेथे ते नाही तो वियोगी होय. असा वियोगीही अभ्यासाच्या योगाने किंवा सद्गुरुकृपेच्या योगाने अखंड अनुसंधानाचे सामर्थ्य मिळवून योगी होऊ शकतो. (२३)

भल्यांची महिमा ऐसी । जे सन्मार्ग लावी लोकांसी ।
पोहणार असतां बुडतयासी । बुडों नेदावें ॥ २४ ॥
थोरामोठ्यांचा महिमा असा आहे की, ते अनेक लोकांना सन्मार्गास लावतात. पोहता येणाऱ्याने जो बुडतो आहे, त्यास बुडू देऊ नये. (२४)

स्थूळसूक्ष्मतत्वझाडा । पिंडब्रह्मांडाचा निवाडा ।
प्रचित पाहे ऐसा थोडा । भूमंडळीं ॥ २५ ॥
स्थूल-सूक्ष्मांचा विवेक, तत्त्वझाडा, म्हणजे तत्त्वाने तत्त्वाचे निरसन, पिंडब्रह्मांडाचा निवाडा इत्यादींचे ज्ञान असून ज्यास प्रचीतीही आलेली असते. असा माणूस या पृथ्वीतलावर क्वचितच आढळतो. (२५)

वेदांतीचें पंचिकर्ण । अखंड तयाचें विवर्ण ।
महांवाक्यें अंतःकरण । रहस्य पाहे ॥ २६ ॥
जे वेदांतातील पंचीकरण जाणतात व अखंड त्याचे विवरण करतात, तसेच महावाक्याचे रहस्य अंत:करणाने जाणून घेतात, (२६)

ये पृथ्वीमधें विवेकी असती । धन्य तयांची संगती ।
श्रवणमात्रें पावती गती । प्राणीमात्र ॥ २७ ॥
असे जे जगात विवेकी पुरुष आहेत त्यांची संगती धन्य होय. त्यांच्या अध्यात्मनिरूपणाच्या श्रवणमात्रेच प्राणिमात्रांना सद्गती प्राप्त होते. (२७)

सत्संग आणी सत्शास्त्रश्रवण । अखंड होतसे विवर्ण ।
नाना सत्संग आणी उत्तम गुण । परोपकाराचे ॥ २८ ॥
सत्संग आणि सत्शास्त्रांचे श्रवण घडावे. जेथे अध्यात्माचे अखंड विवरण होत असते, अनेक संतांची संगती लाभते, जेथे उत्तम गुण आणि परोपकार होत असतो, (२८)

जे सद्‍कीर्तीचे पुरुष । ते परमेश्वराचे अंश ।
धर्मस्थापनेचा हव्यास । तेथेंचि वसे ॥ २९ ॥
असे जे उत्तम कीर्तीने संपन्न पुरुष असतात, ते परमेश्वराचेच अंश असतात. तेथेच धर्मस्थापनेची उत्कट इच्छा, ध्यास आढळून येतो. (२९)

विशेष सारासार विचार । तेणें होय जग्गोद्धार ।
संगत्यागें निरंतर । होऊन गेले ॥ ३० ॥
विशेष म्हणजे तेथे निरंतर सारासारविचार केला जातो आणि त्यायोगेच जगदुद्धार होत असतो. असे पुरुष निरंतर संगत्याग करून स्वस्वरूप होऊन जातात. (३०)

इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे
देवबळात्कारनाम समास पहिला ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘देवबळात्कारनाम’ समास पहिला समाप्त.


समास दुसरा : शिवशक्तिनिरूपण
॥ श्रीराम ॥

ब्रह्म निर्मळ निश्चळ । जैसें गगन अंतराळ ।
निराकार केवळ । निर्विकारी ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, ब्रह्म हे अवकाशरूपी आकाशासारखे निर्मल आणि निश्चळ असून निराकार आणि केवळ निर्विकारी आहे. (१)

अंतचि नाहीं तें अनंत । शाश्वत आणी सदोदित ।
असंत नव्हे तें संत । सर्वकाळ ॥ २ ॥
त्याला अंतच नसल्याने ते अनंत आहे. ते सदोदित आणि शाश्वत असून असंत म्हणजे नाहीसे नसून सर्वकाळ आहेच आहे. (२)

परब्रह्म तें अविनाश । जैसें आकाश अवकाश ।
न तुटे न फुटे सावकास । जैसें तैसें ॥ ३ ॥
अवकाशमय आकाशाप्रमाणे ब्रह्म हे अविनाशी आहे. ते फुटत नाही, तुटत नाही, जसेच्या तसे शांत असते. (३)

तेथें ज्ञान ना अज्ञान । तेथें स्मरण ना विस्मरण ।
तेथें अखंड निर्गुण । निरावलंबी ॥ ४ ॥
ब्रह्म हे ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडील असते. त्याच्या ठिकाणी स्मरण नसते आणि विस्मरणही नसते. ते अखंड, निर्गुण असून आणि निरालंबी म्हणजे कशावरही अवलंबून नसणारे आहे. (४)

तेथें चंद्र सूर्य ना पावक । नव्हे काळोखें ना प्रकाशक ।
उपाधीवेगळें येक । निरोपाधी ब्रह्म ॥ ५ ॥
तेथे चंद्र, सूर्य अथवा अग्नीही नाही. काळोख नाही आणि प्रकाशही नाही. असे ते उपाधिरहित आहे. (५)

निश्चळीं स्मरण चेतलें । त्यास चैतन्य ऐसें कल्पिलें ।
गुणासमत्वें जालें । गुणसाम्य ऐसें ॥ ६ ॥
निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी स्मरण स्फुरले, त्यालाच चैतन्य( (मूळमाया) असे कल्पिले. त्या मूळमायेत गुणसाम्य असते म्हणजे गुणांचे समानत्व असते. (६)

गगनीं आली अभ्रछ्याया । तैसी जाणिजे मूळमाया ।
उद्‍भव आणी विलया । वेळ नाहीं ॥ ७ ॥
आकाशात अभ्रछाया म्हणजे ढग यावेत, तशी ब्रह्माच्या ठिकाणी मूळमाया जाणावी. अभ्रछाया जशी येते आणि जाते, त्यास वेळ लागत नाही, तसेच मायेचे जाणावे. (७)

निर्गुणीं गुणविकारु । तोचि शड्गुणैश्वरु ।
अर्धनारीनटेश्वरु । तयास म्हणिजे ॥ ८ ॥
निर्गुणाच्या ठिकाणी जो स्मरणरूपी गुणविकार निर्माण झाला, तोच षड्गुणेश्वर होय. त्यालाच अर्धनारीनटेश्वर असेही म्हणतात. (८)

आदिशक्ति शिवशक्ति । मुळीं आहे सर्वशक्ति ।
तेथेऊन पुढें नाना वेक्ती । निर्माण जाल्या ॥ ९ ॥
आदिशक्ती, शिवशक्ती, मूळमायेतच सर्व शक्ती आहे. तेथूनच पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या. (९)

तेथून पुढें शुद्धसत्व । रजतमाचें गूढत्व ।
तयासि म्हणिजे महत्तत्त्व । गुणक्षोभिणी ॥ १० ॥
तेथून पुढे शुद्धसत्व, रजतमाचे गुप्तपणे अस्तित्व असते. त्यालाच महत्तत्त्व किंवा गुणक्षोभिणी म्हणतात. (१०)

मुळीं असेचिना वेक्ती । तेथें कैंची शिवशक्ती ।
ऐसें म्हणाल तरी चित्तीं । सावधान असावें ॥ ११ ॥
मूळमायेत व्यक्तीच नसते, पण तेथे शिवशक्ती कशी असेल असे म्हणाल, तर सावध होऊन ऐका. (११)

ब्रह्मांडावरून पिंड । अथवा पिंडावरून ब्रह्मांड ।
अधोर्ध पाहातां निवाड । कळों येतो ॥ १२ ॥
ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांडाचा असा अधोर्ध्व म्हणजे विषयाकडून आत्म्याकडे याप्रमाणे विचार केला की निवाडा कळून येतो. (१२)

बीज फोडून आणिलें मना । तेथें फळ तों दिसेना ।
वाढत वाढत पुढें नाना । फळें येती ॥ १३ ॥
फळात बी असते. ते जर फोडून पाहिले तर त्यात फळ दिसून येत नाही. पण पुढे ते बीज अंकुरित होऊन वाढत वाढत वृक्ष झाला की त्याला अनेक फळे लागतात. (१३)

फळ फोडितां बीज दिसे । बीज फोडितां फळ नसे ।
तैसा विचार असे । पिंडब्रह्मांडीं ॥ १४ ॥
फळ फोडून पाहिले तर बीज दिसून येते, पण बीज फोडून त्यात मात्र फळ दिसून येत नाही. पिंडब्रह्मांडाचा विचारही असाच आहे. (१४)

नर नारी दोनी भेद । पिंडीं दिसती प्रसिद्ध ।
मुळी नस्तां विशद । होतील कैसीं ॥ १५ ॥
नर आणि नारी हे दोन्ही भेद पिंडात म्हणजे स्थूल देहात स्पष्टपणे दिसतात. मुळात म्हणजे मूळमायेत जर ते नसतील तर पुढे कसे प्रगट होतील ? (१५)

नाना बीजरूप कल्पना । तींत काये येक असेना ।
सूक्ष्म म्हणोनि भासेना । येकायेकीं ॥ १६ ॥
मूळमायेच्या ठिकाणी बीजरूपाने नाना कल्पना असतात. तिच्यामध्ये काय असत नाही ? कल्पना, वासना, सूक्ष्म असतात, म्हणून सहजासहजी कळून येत नाहीत. (१६)

स्थूळाचें मूळ ते वासना । ते वासना आधीं दिसेना ।
स्थूळावेगळें अनुमानेना । सकळ कांहीं ॥ १७ ॥
स्थूलाचे मूळ ही वासना असते. ती वासना आधी दिसत नाही. म्हणून स्थूलाखेरीज आणखी काही असेल, अशी कल्पनाही येत नाही. (१७)

कल्पनेची सृष्टी केली । ऐसीं वेदशास्त्रें बोलिलीं ।
दिसेना म्हणोन मिथ्या केली । न पाहिजेत कीं ॥ १८ ॥
वेदशास्त्रात कल्पनेने सृष्टी केल्याचे वर्णन येते. ते दिसत नाही, म्हणून मिथ्या केली असे समजता कामा नये. (१८)

पडदा येका येका जन्माचा । तेथें विचार कळे कैंचा ।
परंतु गूढत्व हा नेमाचा । ठाव आहे ॥ १९ ॥
जीवाला अनेक जन्म घ्यावे लागतात. एकेका जन्मामुळे एकेक पडदाच जणू उत्पन्न होतो. मग ब्रह्मासंबंधीचा विचार कसा कळणार ? परंतु सिद्धांताच्या गोष्टी नेहमीच गूढ असतात, असा नियमच आहे. (१९)

नाना पुरुषांचे जीव । नाना स्त्रियांचे जीव ।
येकचि परी देहस्वभाव । वेगळाले ॥ २० ॥
नाना पुरुषांचे जीव आणि नाना स्त्रियांचे जीव हे जीवस्वरूपाने एकच असतात. पण देहामुळे देहस्वभाव वेगवेगळे असतात. (२०)

नवरीस नवरी नलगे । ऐसा भेद दिसों लागे ।
पिंडावरून उमगे । ब्रह्मांडबीज ॥ २१ ॥
नवरीला नवरी नको असते. तिला नवरा हवा असतो. असा भेद पिंडावरून दिसू लागतो. त्यावरून ब्रह्मांडातही तो बीजरूपाने असतो हे उमगू लागते. (२१)

नवरीचें मन नवयावरी । नवयाचें मन नवरीवरी ।
ऐसी वासनेची परी । मुळींहून पाहावी ॥ २२ ॥
नवरीचे मन नवऱ्यावर असते. नवऱ्याचे मन नवरीवर असते. ही वासनेची रीतच आहे. ती मुळापासून समजून घ्यावी. (२२)

वासना मुळींची अभेद । देहसमंधें जाला भेद ।
तुटतां देहाच समंध । भेद जेला ॥ २३ ॥
वास्तविक मूळ वासनेमध्ये अभेद असतो. पण स्थूलदेहाच्या संबंधामुळे भेद उत्पन्न होतो. देहाचा संबंध सुटला की भेद जातो. (२३)

नरनारीचें बीजकारण ।शिवशक्तीमधें जाण ।
देह धरितां प्रमाण । कळों आलें ॥ २४ ॥
नरनारींचे बीजकारण शिवशक्तीमध्ये असते. देह धरला की प्रत्यक्ष प्रमाणावरून हे दिसून येते. (२४)

नाना प्रीतीच्या वासना । येकाचें येकास कळेना ।
तिक्षण दृष्टीनें अनुमाना । कांहींसें येतें ॥ २५ ॥
प्रेमाचे सुद्धा अनेक प्रकार असतात. एकाचा उलगडा दुसऱ्यास होत नाही. सुक्ष्म दृष्टीने पाहिले असता काहीशी कल्पना येऊ शकते. (२५)

बाळकास वाढवी जननी । हें तों नव्हे पुरुषाचेनी ।
उपाधी वाढे जयेचेनी । ते हे वनिता ॥ २६॥
आई बालकाला वाढवते. पुरुषाच्याने ही गोष्ट होऊ शकत नाही. स्त्रीमळेच उपाधी वाढते. (२६)

वीट नाहीं कंटाळानाहीं । आलस्य नाहीं त्रास नाहीं ।
इतुकी माया कोठेंचि ना हीं । मातेगेगळी ॥ २७ ॥
मातेला जराही वीट येत नाही, कंटाळा येत नाही, आळस येत नाही अथवा त्रासही वाटत नाही. मातेशिवाय इतके प्रेम कोठेच दिसून येत नाही. (२७)

नाना उपाधी वाढऊं जाणे । नाना मायेनें गोऊं जाणे ।
नाना प्रीती लाऊं जाणे । नाना प्रपंचाची ॥ २८ ॥
स्त्रीमुळेच नाना उपाधी वाढतात. स्त्री प्रेम करून त्या मायेने पुरुषास गुंतवून ठेवते. नाना प्रकारे प्रेम करून प्रपंचाची गोडी लावते. (२८)

पुरुषास स्त्रीचा विश्वास । स्त्रीस पुरुषाचा संतोष ।
परस्परें वासनेस । बांधोन टकिलें ॥ २९॥
पुरुषाला स्त्रीचा विश्वास वाटतो. स्त्रीला पुरुषामुळे संतोष वाटतो. याप्रमाणे परस्परांसंबंधी वासनेने त्यांना बांधून टाकलेले असते. (२९)

ईश्वरें मोठें सूत्र केलें । मनुष्यमात्र गुंतोन राहिलें ।
लोभाचें गुंडाळें केलें । उगवेना ऐसें ॥ ३० ॥
ईश्वराने ही युक्ती करून मनुष्यमात्रास गुंतवून टाकले आहे. लोभाचा असा गुंता केला आहे की, तो काही केल्या उलगडत नाही. (३०)

ऐसी परस्परें आवडी । स्त्रीपुरुषांची माहां गोडी ।
हे मुळींहून चालिली रोकडी । विवेकें पाहावी ॥ ३१ ॥
अशी स्त्री-पुरुषांना परस्परांची अत्यंत आवड असते. परस्परांबद्दल त्यांना अत्यंत गोडी वाटते. ही गोडी मुळापासूनच चालत आली आहे, हे विवेकाने जाणन घ्यावे. (३१)

मुळीं सूक्ष्म निर्माण जालें । पुढें पष्ट दिसोन आलें।
उत्पतीचें कार्य चाले। उभयतांकरितां ॥ ३२ ॥
अगदी मुळात सूक्ष्म भेद निर्माण होतो आणि पुढे स्थूल देहात तो स्पष्ट दिसून येतो. स्त्री आणि पुरुष या उभयतांचेमुळेच उत्पत्तीचे कार्य चालते. (३२)

मुळीं शिवशक्ती खरें । पुढें जालीं वधुवरें ।
चौयासि लक्ष विस्तारें । विस्तारली जे ॥ ३३॥
मुळात जी शिवशक्ती असतात, तीच खरी होत. तीच पुढे वधू-वर होतात. त्यांच्या योगेच चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनींचा अफाट विस्तार होतो. (३३)

येथें शिवशक्तीचें रूप केलें । श्रोतीं मनास पाहिजे आणिलें ।
विवरलियांविण बोलिलें। तें वेर्थ जाणावें ॥ ३४ ॥
याप्रमाणे येथे शिवशक्तीचे रूप वर्णन केले आहे. श्रोत्यांनी ते नीट समजून घेऊन त्याचे मनन करावे. नीट विवरण केल्यावाचून बोलले असता ते व्यर्थच होय, हे जाणून घ्यावे. (३४)

इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे
शिवशक्तिनिरूपणनाम समास दुसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘शिवशक्तीनिरूपणनाम’ समास दुसरा समाप्त.


समास तिसरा : श्रवणनिरूपण
॥ श्रीराम ॥

थांबाथांबा ऐका ऐका । आधींच ग्रंथ सोडूं नका ।
सांगितलें तें ऐका । सावधपणें ॥१ ॥
‘श्रोते हो ! ऐका ऐका ! थोडे थांबा, थांबा ! मी काय सांगतो ते सावधपणे ऐका ! त्यापूर्वीच ग्रंथ बाजूला सारू नका ! (१)

श्रवणामध्यें सार श्रवण । तें हें अध्यात्मनिरूपण ।
सुचित करून अंतःकर्ण । ग्रन्थामधें विवरावें॥ २ ॥
अध्यात्म साधनांत श्रवणाला अग्रक्रम आहे. त्यात अध्यात्मनिरूपणाचे श्रवण हे सारामध्येही सार आहे. म्हणून अंत:करण एकाग्र करून या ग्रंथाचे नीट विवरण करावे. । (२)

श्रवणमननाचा विचार । निजध्यासें साक्षात्कार ।
रोकडा मोक्षाचा उधार । बोलोंचि नये ॥३ ॥
श्रवण, मननाने ब्रह्म विचार ठसवून घेऊन त्याचे निदिध्यासन करण्याने आत्मसाक्षात्कार होतो आणि रोकडा मोक्ष मिळतो. तेथे उधारीचे नाव सुद्धा काढू नका. (३)

नाना रत्नें परीक्षितां । अथवा वजनें करितां ।
उत्तम सोनें पुटीं घालतां । सावधान असावें ॥ ४ ॥
नाना रत्नांची परीक्षा करताना अथवा त्यांचे वजन करताना अथवा उत्तम सोने मुशीत घालताना अत्यंत सावधान असावे लागते. (४)

नाना नाणीं मोजून घेणें । नाना परीक्षा करणें ।
विवेकी मनुष्यासी बोलणें। सावधपणें ॥ ५ ॥
अनेक नाणी मोजून घेताना, नाना पदार्थांची परीक्षा करताना आणि विवेकी मनुष्याशी बोलताना सावध असावे लागते. (५)

जैसें लाखोलीचें धान्य। निवडून वेंचितां होते मान्य ।
सगट मानितां अमान्य । देव क्षोभे ॥ ६ ॥
ज्याप्रमाणे लक्ष धान्य असते, ते निवडून मग अर्पण केले असता ते देवाला मान्य होते. न निवडता एकदम जसेच्या तसे वाहिले तर देव क्षोभतो. (६)

येकांतीं नाजुक कारबार । तेथें असावें अति तत्पर ।
त्याच्या कोटिगुणें विचार । अध्यात्मग्रन्थीं ॥ ७ ॥
एकांतात बसून एखाद्या नाजूक गोष्टीबद्दल गुप्तपणे चर्चा किंवा कार्यभाग करणे असेल तर तेथे अति सावध आणि अति तत्पर असावे लागते. त्याच्यापेक्षा अध्यात्मग्रंथाचा विचार करताना कोटिगुणाने सावध आणि तत्पर असावे लागते. (७)

काहिण्या कथा गोष्टी पवाड । नाना अवतारचरित्रें वाड ।
त्या समस्तांमध्यें जाड । अध्यात्मविद्या ॥ ८ ॥
नाना कहाण्या, कथा, गोष्टी, पोवाडे, नाना अवतारांची उत्तमोत्तम चरित्रे या सर्वांपेक्षाही अध्यात्मविद्या अधिक गहन आहे. (८)

गत गोष्टीस ऐकिलें । तेणें काये हातास आलें ।
म्हणती पुण्य प्राप्त जालें । परी तें दिसेना कीं ॥ ९ ॥
पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकून काय लाभ झाला ? तर म्हणतात की पुण्य प्राप्त झाले. पण ते तर दिसून येत नाही. (९)

तैसें नव्हे अध्यात्मसार । हा प्रचितीचा विचार ।
कळतां अनुमानाचा संव्हार । होत जातो ॥ १० ॥
तशी गोष्ट अध्यात्मसाराची नाही. येथे प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा आहे. अध्यात्मविचार नीट कळला की अनुमानाचा संहार होत जातो. तर्क, कुतर्क, शंका इत्यादी नष्ट होतात. (१०)

मोठे मोठे येऊन गेले । आत्म्याकरितांच वर्तले ।
त्या आत्म्याचा महिमा बोले । ऐसा कवणु ॥ ११ ॥
जगात जे थोर थोर पुरुष जन्माला आले, ते आत्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहिले. त्या आत्म्याचा महिमा वर्जू शकेल असा जगात कोण आहे ? (११)

युगानयुगें येकटा येक । चालवितो तिनी लोक ।
त्या आत्म्याचा विवेक । पाहिलाच पाहावा ॥ १२ ॥
युगानुयुगे जो एकटाच तिन्ही लोक चालवितो, त्या आत्म्याचा विवेक वारंवार करीतच जावा. (१२)

प्राणी आले येऊन गेले । ते जैसे जैसे वर्तले ।
ते वर्तणुकेचें कथन केलें । इछेसारिखें ॥ १३ ॥
जे प्राणी जन्माला आले आणि मरून गेले ते जसजसे वागले त्याप्रमाणे त्यांच्या वागणकीचे वर्णन इच्छेप्रमाणे केले. (१३)

जेथें आत्मा नाहीं दाट । तेथें अवघें सरसपाट ।
अत्म्याविण बापुडें काष्ठ । काये जाणे ॥ १४ ॥
जेथे आत्मा प्रगट किंवा जागृत नसतो, तेथे अवघे असून नसल्यासारखेच होते. आत्म्याविरहित असणोर लाकूड बिचारे काय जाणणार ? (१४)

ऐसें वरिष्ठ आत्मज्ञान । दुसरें नाहीं यासमान ।
सृष्टीमधें विवेकी सज्जन । तेचि हें जाणती ॥ १५ ॥
असे हे आत्मज्ञान सर्वांत वरिष्ठ असून यासारखे श्रेष्ठ दुसरे काहीही नाही. या सृष्टीत जे विवेकी सज्जन असतात तेच ही गोष्ट जाणतात. (१५)

पृथ्वी आणी आप तेज । याचा पृथिवीमध्यें समज ।
अंतरात्मा तत्वबीज । तें वेगळेंचि राहिलें ॥ १६ ॥
पृथ्वी, पाणी, अग्नी हे स्थूलरूप असल्याने त्यांचा उलगडा पृथ्वीवरच प्रत्यक्षपणे होतो. पण अंतरात्मा जो सर्व तत्त्वांचे आदिकारण आहे, तो वेगळाच राहातो. (१६)

वायोपासून पैलिकडे । जो कोणी विवेकें पवाडे ।
जवळीच आत्मा सांपडे । त्या पुरुषासी ॥ १७ ॥
वायूपासून पलीकडे जो कोणी विवेकाने अंतरात्म्याचा शोध घेतो, त्या विवेकी पुरुषाला तो आत्मा स्वत:जवळच सापडतो. (१७)

वायो आकाश गुणमाया । प्रकृतिपुरुष मूळमाया ।
सूक्ष्मरूपें प्रचित येया । कठीण आहे ॥ १८ ॥
वायू, आकाश, गुणमाया, प्रकृतिपुरुषरूपी मूळमाया ही सर्व अत्यंत सूक्ष्म असल्याने त्यांची प्रचीती येणे फार कठीण आहे. (१८)

मायादेवीच्या धांदली । सूक्ष्मी।म् कोण मन घाली ।
समजला त्यची तुटली । संदेहवृत्ती ॥ १९ ॥
मायादेवीच्या धांदलीत, सूक्ष्मात मन एकाग्र करायला कुणाला जमणार ? जो कोणी समजू शकतो, त्याची संदेहवृत्ती नष्ट होते. (१९)

मूळमाया चौथा देह । जाला पाहिजे विदेह ।
देहातीत होऊन राहे । धन्य तो साधु ॥ २० ॥
मूळमाया हा ब्रह्मांडीचा चौथा देह आहे. तो विदेह झाला पाहिजे, म्हणजेच ‘अहं ब्रह्मास्मि’ हे स्फुरणही होता कामा नये. अशा रीतीने जो देहातीत होऊन राहातो तो साधू धन्य होय. (२०)

विचारें ऊर्ध चढती । तयासी च ऊर्धगती ।
येरां सकळां अधोगती । पदार्थज्ञानें ॥ २१ ॥
विचाराने जे ऊर्ध्व चढतात, म्हणजे अंतरात्म्याचा शोध घेतात त्यांनाच ऊर्ध्वगती प्राप्त होते. इतर जे पदार्थाच्या ज्ञानावर समाधान मानतात त्यांना विषयोन्मुख झाल्याने अधोगती प्राप्त होते. (२१)

पदार्थ चांगले दिसती । परी ते सवेंचि नासती ।
अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती । लोक तेणें ॥ २२ ॥
पदार्थ वरवर पाहाता चांगले दिसतात, पण ते स्वत:च नष्ट होतात. त्यामुळे त्यांच्या नादी जे लोक लागतात त्यांची धड ना इहलोक, ना परलोक अशी स्थिती होते. (२२)

याकारळें पदार्थज्ञान । नाना जिनसीचा अनुमान ।
सर्व सांडून निरंजन । धुंडीत जावें । २३ ॥
म्हणूनच पदार्थज्ञान, तसेच नाना जिनसांचे अनुमानिक ज्ञान इत्यादी सर्व सोडून, निरंजन अशा परमात्म्यास धुंडीत जावे. (२३)

अष्टांग योग पिंडदज्ञान । त्याहून थोर तत्वज्ञान ।
त्याहून थोर आत्मज्ञान । तें पाहिलें पाहिजे ॥ २४ ॥
अष्टांग योग, पिंडज्ञान यांहून तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे खरे, पण त्याहूनही आत्मज्ञान अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून ते कसे प्राप्त होईल हे प्रथम पाहिले पाहिजे. (२४)

मूळमायेचे सेवटीं । हरिसंकल्प मुळीं उठी ।
उपासनायोगें इठी । तेथें घातली पाहिजे ॥ २५ ॥
मूळमायेच्याही पलीकडे प्रथम जेथे ‘एकोऽहं बहु स्याम्’ हा हरिसंकल्प उठला, त्या अंतरात्म्याच्या ठिकाणी उपासनेच्या योगे मिठी घातली पाहिजे. (२५)

मन त्यापलिकडे जाण । निखळ ब्रह्म निर्गुण ।
निर्मळ निश्चळ त्याची खूण । गगनासारिखी ॥ २६ ॥
मग त्यापलीकडे निखळ, निर्गुण ब्रह्म असून ते गगनासारखे निर्मळ आणि निश्चळ आहे, हीच त्याची खूण आहे. (२६)

येथून तेथवरी दाटलें । प्राणीमात्रास भेटलें ।
पदार्थमात्रीं लिगटलें । व्यापून आहे ॥ २७ ॥
ते ब्रह्म येथन तेथवर म्हणजे सर्वत्र घनदाट कोंदाटलेले आहे. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणीही ते ओतप्रोत असून पदार्थमात्रास चिकटलेले असून सर्वांस व्यापून राहिले आहे. (२७)

त्याऐसें नाहीं थोर । सूक्ष्माहून सूक्ष्म विचार ।
पिंडब्रह्माचा संव्हार । होतां कळे ॥ २८ ॥
त्याच्याहून थोर काही नाही आणि सूक्ष्माहन ते अतिसूक्ष्म आहे. ते कसे हा विचार पिंड-ब्रह्मांडाचा संहार झाला की कळतो. (२८)

अथवा पिंड ब्रह्मांड असतां । विवेकप्रळये पाहों जातां ।
शाश्वत कोण हें तत्वता । उमजों लागे ॥ २९ ॥
किंवा पिंडब्रह्मांड विद्यमान असताही विवेकप्रलयाने पाहून शाश्वत तत्त्व कोणते, याचा झाडा घेतला असताही ते उमजू लागते. (२९)

करून अवघा तत्वझाडा । सारासाराचा निवाडा ।
सावधपणें ग्रन्थ सोडा । सुखिनावें ॥ ३० ॥
याप्रमाणे सर्व तत्त्वांचा निरास केला असता आणि सारासार-विवेकाने ठाम निवाडा झाला की मग सावधपणे सुखेनैव ग्रंथ बाजूला ठेवलात तरी चालेल. (३०)

इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे
श्रवणनिरूपणनाम समास तिसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘श्रवणनिरूपणनाम’ समास तिसरा समाप्त.


समास चौथा : अनुमाननिरसन
॥ श्रीराम ॥

बहुत जनासी उपाये । वक्तयास पुसतां त्रासों नये ।
बोलतां बोलतां अन्वयें । सांडूं नये ॥ १ ॥
अध्यात्माचे निरूपण ऐकल्याने अनेक लोकांचा फायदा होत असतो. मात्र श्रोत्यांनी जर वक्त्याला काही प्रश्न विचारले, शंका विचारल्या तर त्याने त्रासता कामा नये. तसेच वक्त्याने बोलताना विषयानुक्रम सोडूनही कधी बोलू नये. (१)

श्रोत्यानें आशंका घेतली । तै तत्काळ पाहिजे फेडिली ।
स्वगोष्टीनें सगोष्टी पेंचली । ऐसें न व्हावें ॥ २ ॥
श्रोत्याने जर शंका घेतली तर ती तत्काळ फेडली पाहिजे. तसेच आपल्याच एखाद्या वचनाने आपणच पूर्वी बोललेल्या वचनाला बाधा येत नाही ना, याविषयी वक्त्याने सावध राहिले पाहिजे. (२)

पुढें धरितां मागें पेंचला । मागें धरितां पुढें उडाला ।
ऐसा सांपडतचि गेला । ठाइं ठाइं ॥ ३ ॥
नाहीतर पुढे जे बोलतो, त्यामुळे पूर्वी त्यानेच सांगितलेल्या गोष्टीस विरोध होतो आणि पूर्वी बोललेल्याचे समर्थन करू गेल्याने पुढे बोललेल्या वचनास बाधा येते, असे झाले तर तो मग ठायी ठायी चुकतच जातो आणि पेचात सापडतो. (३)

पोहणारचि गुचक्या खातो । जनास कैसा काढूं पाहातो ।
आशय लोकांच राहातो । ठाइं ठाइं ॥ ४ ॥
पोहणाराच जर स्वत:ला सावरू शकत नसेल तर तो बुडणाऱ्या लोकांना कसा बाहेर काढणार ? त्यामुळे लोकांच्या शंका तशाच राहून जातात. (४)

आपणचि बोलिला संव्हार । आपणचि बोलिजे सर्वसार ।
दुस्तर मायेचा पार । टाकिला पाहिजे ॥ ५ ॥
एकदा आपणच जर संहारासंबंधी बोललो आणि परत आपणच जर सर्व सार असे म्हणू लागलो, तर श्रोत्याचा निश्चय कसा होईल ? अशा निरूपणाने दुस्तर मायेच्या पार कोणीही कसा जाऊ शकेल ? (५)

जें जें सूक्ष्म नाम घ्यावें । त्याचें रूप बिंबऊन द्यावें ।
तरीच वक्ता म्हणवावें । विचारवंत ॥ ६ ॥
निरूपणात जे जे सूक्ष्म असे विचार वक्ता मांडेल, त्याचे स्वरूप श्रोत्यांच्या ठिकाणी बिंबवता आले पाहिजे. तरच त्यास विचारवंत वक्ता असे म्हणता येईल. (६)

ब्रह्म कैसें मूळमाया कैसी । अष्टधाप्रकृती शिवशक्ती कैसी ।
शड्गुणेश्वराची स्थिति कैसी । गुणसाम्याची ॥ ७ ॥
ब्रह्म कसे आहे, मूळमाया कशी आहे, अष्टधा प्रकृती म्हणजे काय, शिवशक्तीचे स्वरूप काय, षड्गुणेश्वराची आणि गुणसाम्याची स्थिती कशी असते ? (७)

अर्धनारीनटेश्वर । प्रकृतिपुरुषाचा विचार ।
गुणक्षोभिणी तदनंतर । त्रिगुण कैसे ॥ ८ ॥
अर्धनारीनटेश्वर कुणास म्हणतात, प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, गुणक्षोभिणी माया कशी असते, त्यानंतर त्रिगुण कसे प्रगट होतात ? (८)

पूर्वकक्ष कोठून कोठवरी । वाच्यांशलक्ष्यांशाची परी ।
सूक्ष्म नाना विचार करी । धन्य तो साधु ॥ ९ ॥
पूर्वपक्ष कोठून कोठेपर्यंत असतो, वाच्यांश म्हणजे काय, लक्ष्यांश म्हणजे काय, याप्रकारे अनेक पारिभाषिक संज्ञांचा, शब्दांचा सूक्ष्म विचार जो जाणतो, तो साधू धन्य होय. (९)

नान पाल्हाळीं पडेना । बोलिलेंचि बोलावेना ।
मौन्यगर्भ अनुमाना । आणून सोडी ॥ १० ॥
असा वक्ता जो असेल तो उगीच नाना पाल्हाळ लावत नाही. एकदा बोललेलेच परत परत बोलत नाही आणि जेथे वाणीला मौन पडते, ते ब्रह्म आपल्या निरूपणाने श्रोत्यांच्या कल्पनेत आणून सोडतो. (१०)

घडी येक विमळ ब्रह्म । घडी येक सर्व ब्रह्म ।
द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म । क्षण येक ॥ ११ ॥
एखादा वक्ता एकदा म्हणतो की, ब्रह्म विमल आहे, तर दुसऱ्याच क्षणी म्हणतो की सर्व ब्रह्मच आहे. तर परत काही वेळाने ब्रह्मच द्रष्टय आहे, साक्षी आहे, त्यालाच सत्ता ब्रह्म असेही म्हणतो. (११)

निश्चळ तेंचि जालें चंचळ । चंचळ तेंचि ब्रह्म केवळ ।
नाना प्रसंगीं खळखळ । निवाडा नाहीं ॥ १२ ॥
कधी म्हणतो की निश्चळ तेच चंचळ झाले, तर कधी म्हणतो की चंचळही केवळ ब्रह्मच आहे. याप्रमाणे निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळी विधाने तो करतो. त्याचा स्वत:चाच कुठल्याही बाबतीत निश्चय झालेला नसतो. (१२)

चळतें आणी निश्चळ । अवघें चैतन्यचि केवळ ।
रूपें वेगळालीं प्रांजळ । कदापी बोलवेना ॥ १३ ॥
चंचळ आणि निश्चळ सर्व केवळ चैतन्यच आहे असे म्हणतो. प्रत्येकाचे स्वरूप स्पष्ट वेगवेगळे करून निश्चितपणे त्याला सांगताच येत नाही. (१३)

उगीच करी गथागोवी । तो लोकांस कैसें उगवी ।
नाना निश्चयें नाना गोवी । पडत जाते ॥ १४ ॥
अशा प्रकारचा गोंधळ ज्याच्या स्वत:च्या विचारातच आहे, तो लोकांचे समाधान कसे करू शकणार ? निरनिराळी मते, निरनिराळी विधाने ऐकल्याने नाना प्रकारचे गोंधळ वाढतच जातात. (१४)

भ्रमास म्हणे परब्रह्म । परब्रह्मास ह्मणे भ्रम ।
ज्ञातेपणाचा संभ्रम । बोलोन दावी ॥ १५ ॥
भ्रमाला तो परब्रह्म म्हणतो आणि परब्रह्माला भ्रम म्हणतो आणि आपल्या ज्ञातेपणाची ऐट बोलून दाखवतो. (१५)

घाली शास्त्रांची दडपण । प्रचितिविण निरूपण ।
पुसों जातां उगाच सीण । अत्यंत मानी ॥ १६ ॥
असा वक्ता आपल्या बोलण्याला शास्त्राधार देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे निरूपण प्रचीतीचे, स्वानुभवाचे नसते. श्रोत्यांनी प्रश्न विचारले की तो त्याला अत्यंत शीण वाटतो. तो त्रासतो. (१६)

ज्ञात्यास आणि पदार्थभिडा । तो काय बोलेल बापुडा ।
सारासाराचा निवाडा । जाला पाहिजे ॥ १७ ॥
तो स्वत:ला ज्ञाता समजतो, पण त्याला पदार्थाची चाड असते, बिदागीची अपेक्षा असते. अशी ज्याची वृत्ती तो बापडा अध्यात्मासंबंधी काय बोलणार ? सार कोणते आणि असार कोणते याचा निवाडा निदान वक्त्यास तरी झाला पाहिजे. (१७)

वैद्य मात्रेची स्तुती करी । मात्रा गुण कांहींच न करी ।
प्रचितिविण तैसी परी । ज्ञानाची जाली ॥ १८ ॥
वैद्य आपल्याच मात्रेची स्तुती करीत असावा आणि मात्रेचा गुण मात्र काहीच दिसून येऊ नये. तशी प्रचीतीशिवाय ज्ञान सांगणाराची स्थिती असते. (१८)

तेथें नाहीं सारासार । तेथें अवघा अंधकार ।
नाना परीक्षेचा विचार । राहिला तेथें ॥ १९ ॥
जेथे सारासारविवेक नसतो, तेथे अवघा अज्ञानरूपी अंधकार भरून राहिलेला असतो. तेथे नाना परीक्षेचा विचार कसा सुचणार ? (१९)

पाप पुण्य स्वर्ग नर्क । विवेक आणि अविवेक ।
सर्वब्रह्मीं काये येक । सांपडलें नाहीं ॥ २० ॥
पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, विवेक आणि अविवेक यांच्यात सर्व ब्रह्मच असे म्हटल्यावर भेदास स्थानच राहात नाही. (२०)

पावन आणि तें पतन । दोनीं मानिलीं तत्समान ।
निश्चये आणि अनुमान । ब्रह्मरूप ॥ २१ ॥
पतित आणि पावन या दोन्हींना एकसमान मानावे लागेल. निश्चय आणि अनुमान दोन्ही ब्रह्मरूप ठरतील. (२१)

ब्रह्मरूप जालें आघवें । तेथें काये निवडावें ।
आवघी साकरचि टाकावें । काये कोठें ॥ २२ ॥
जर सर्व ब्रह्मरूपच असे म्हटले, तर तेथे चांगले आणि वाईट कसे काय निवडावे ? सर्वच साखर असे म्हटल्यावर मग काय टाकावे ? (२२)

तैसें सार आणि असार । अवघा जाला येकंकार ।
तेथें बळावळा अविचार । विचार कैंचा ॥ २३ ॥
याप्रमाणे जेथे सार आणि असार सर्व एकंकार होते, तेथे अविचार बळावतो, मग विचार कसा उरेल ? (२३)

वंद्य निंद्य येक जालें । तेथें काये हाता आलें ।
उन्मत्त द्रव्यें जें भुललें । तें भलतेंच बोले ॥ २४ ॥
वंद्य, निंद्य सर्व एकच झाले तर हाती काय लागणार ? म्हणजे काय लाभ होणार ? उन्मत्त द्रव्य सेवन करून जो भुलतो तो भलतेच बोलू लागतो. (२४)

तैसा अज्ञान भ्रमें भुलला । सर्व ब्रह्म म्हणोन बैसला ।
माहांपापी आणि भला । येकचि मानी ॥ २५ ॥
त्याप्रमाणे अज्ञानरूपी भ्रमाने जो उन्मत्त होऊन भुलतो तो सर्व ब्रह्म असे भलतेच बोलू लागतो आणि महापापी आणि सज्जन यांना एकसारखेच मानू लागतो. (२५)

सर्वसंगपरित्याग । अव्हासवा विषयेभोग ।
दोघे येकचि मानितां मग । काये उरलें ॥ २६ ॥
सर्वसंगपरित्याग म्हणजेच प्रखर वैराग्य आणि मनसोक्त विषयभोग या दोन्हीला जर एकच मानले तर मग काय उरले ? (२६)

भेद ईश्वर करून गेला । त्याच्या वाचेन न वचे मोडिला ।
मुखामधें घांस घातला । तो अपानीं घालावा ॥ २७ ॥
ईश्वरानेच भेद निर्माण केला आहे. तो कुणाच्या बापालाही मोडता येत नाही. अन्नाचा घास हा मुखातच घालावा लागतो. तो गुदद्वारी घालता येईल का ? (२७)

ज्या इंद्रियास जो भोग । तो तो करी येथासांग ।
ईश्वराचें केलें जग । मोडितां उरेना ॥ २८ ॥
ईश्वराने प्रत्येक इंद्रियाचे विषयभोग ठरवून दिले आहेत. ज्या इंद्रियास जो विषयभोग नेमून दिला आहे तोच भोग ते इंद्रिय यथासांग घेऊ शकते. ईश्वराने जगाच्या रहाटीचे जे नियम केलेले आहेत ते मोडून चालावयाचे नाही. तसे केले तर काहीच उरणार नाही. (२८)

अवघी भ्रांतीची भुटाटकी । प्रचितिविण गोष्टी लटकी ।
वेड लागलें जे बटकी । ते भलतेंचि बोले ॥ २९ ॥
सर्व ब्रह्म असे म्हणणे ही अवघी भ्रांतीची भुताटकी आहे. प्रचीतीशिवायचे बोलणे हे खोटे असते. एखाद्या बटकीला वेड लागले म्हणजे ती जसे भलतेच बोलते, तसेच ते समजावे. (२९)

प्रत्ययज्ञाता सावधान । त्याचें ऐकावें निरूपण ।
आत्मसाक्षात्काराची खूण । तत्काळ बाणें ॥ ३० ॥
जो स्वानुभवसंपन्न ज्ञानी वक्ता असतो, त्याचेच निरूपण ऐकावे म्हणजे आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणते. (३०)

वेडें वांकडे जाणावें । आंधळें पाउलीं वोळखावें ।
बाश्कळ बोलणें सांडावें । वमक जैसें ॥ ३१ ॥
एखादा माणूस आंधळा आहे की नाही, हे जसे त्याच्या चालण्यावरून कळते, तसे वेडेवाकडे काय ते नीट जाणून घ्यावे आणि असे बाष्कळ बोलणे वांतीप्रमाणे त्याज्य मानावे, ऐकूच नये. (३१)

इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे
अनुमाननिर्शननाम समास चौथा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘अनुमाननिर्शननाम’ समास चौथा समाप्त.


समास पाचवा : अजपानिरूपण
॥ श्रीराम ॥

येकवीस सहश्र सासें जपा । नेमून गेली ते अजपा ।
विचार पाहातां सोपा । सकळ कांहीं ॥ १ ॥
दिवसरात्र मिळून माणसाचे एकवीस हजार सहाशे श्वास, उच्छ्वास होतात. यालाच अजपा असे म्हणतात. विचार करून पाहिला की, सर्व काही सोपे आहे हे कळून येते. (१)

मुखीं नासिकीं असिजे प्राणें । तयास अखंड येणें जाणें ।
याचा विचार पाहाणें । सूक्ष्मदृष्टीं ॥ २ ॥
मुखात आणि नाकात प्राणवायू असतो. त्याचे येणे-जाणे अखंड चालू असते. सूक्ष्म दृष्टीने याचा विचार पाहिला पाहिजे. (२)

मुळीं पाहातां येक स्वर । त्याचा तार मंद्र घोर ।
त्या घोराहून सूक्ष्म विचार । अजपाचा ॥ ३ ॥
मुळात पाहिले तर स्वर एकच आहे. पण तार स्वर म्हणजे उच्चस्वर टाळूत जाणवणारा, मंद्र म्हणजे मध्य स्वर हृदयात जाणवणारा, घोर म्हणजे खालचा स्वर म्हणजे नाभीजवळ जाणवणारा, असे त्याचे प्रकार आहेत. पण अजपाचा विचार हा घोराहूनही सूक्ष्म आहे. (३)

सरिगमपदनिस । सरिं मात्रुका सायास ।
प्रथम स्वरें मात्रुकांस । म्हणोन पाहवें ॥ ४ ॥
‘सारेगमपधनिसा’ हे सप्तस्वर आहेत. आरोह व अवरोह यांच्या प्रयत्नाने प्रथम सप्तकातील ‘सा’ या प्रथम स्वरापासून आरंभ करून दुसऱ्या सप्तकातील ‘रे’ पर्यंत स्वरमातृका प्रयत्नाने म्हणून पहाव्यात. (४)

परेवाचेहून आर्तें । आणि पश्यंती खालतें ।
स्वराचे जन्मस्थान तें । तेथून उठे ॥ ५ ॥
परा वाचेपासून वर म्हणजे नाभीपासून वर आणि पश्यंतीच्या खाली म्हणजेच हृदयाच्या खाली स्वरांचे जन्मस्थान आहे. तेथून स्वरांची अजपाजपाची सुरुवात होते. (५)

येकांतीं उगेंच बैसावें । तेथें हें समजोन पाहावें ।
अखंड घ्यावें सांडावें । प्रभंजनासी ॥ ६ ॥
एकांतात अगदी शांत बसावे. तेथे हे सर्व नीट समजून घेऊन प्राणवायू अखंड घ्यावा आणि सोडावा. (६)

येकांतीं मौन्य धरून बैसे । सावध पाहातां कैसें भासे ।
सोहं सोहं ऐसे । शब्द होती ॥ ७ ॥
एकांती मौन धरून सावधपणे श्वासोच्छ्वास होत असता लक्षपूर्वक पाहावे. म्हणजे सोऽहं सोऽहं असा शब्द होत असल्याचा भास होतो. (७)

उच्चरेंविण जे शब्द । ते जाणावे सहजशब्द ।
प्रत्ययायेती परंतु नाद । कांहींच नाहीं ॥ ८ ॥
उच्चाराशिवाय जे शब्द त्यांना सहजशब्द म्हणतात. ते अनुभवाला येतात, परंतु नाद, आवाज काहीच नसतो. (८)

ते शब्द सांडून बैसला । तो मौनी म्हणावा भला ।
योगाभ्यासाचा गल्बला । याकारणें ॥ ९ ॥
तो नाद म्हणजे ‘सोऽहं’ हा शब्द आणि त्याचा लक्ष्यार्थ यांचाही लय होऊन जो बसतो, तो साधक खरा मौनी आहे असे म्हणावे. हे साधावे म्हणूनच लोक योगाभ्यासाची खटपट करतात. (९)

येकांतीं मौन्य धरून बैसला । तेणें कोण शब्द जाला ।
सोहं ऐसा भासला । अंतर्यामीं ॥ १० ॥
एकांतात मौन धरून बसल्यावर जो सहज शब्द | ऐकू आला तो अंतर्यामी सोऽहं असाच भासला. (१०)

धरितां सो सांडितां हं । अखंड चाले सोहं सोहं ।
याचा विचार पाहातं बहु । विस्तारला ॥ ११ ॥
श्वास घेताना ‘सो’ आणि सोडताना ‘ऽहं’ असा अखंड सोऽहं सोऽहं शब्द ऐकू येतो. याचा विचार करू लागले की त्यात फार खोल अर्थ भरलेला दिसतो. (११)

देहधारक तितुका प्राणी । श्वेतजौद्विजादिक खाणी ।
स्वासोस्वास नस्तां प्राणी । कैसे जिती ॥ १२ ॥
देहधारक म्हणून जितके प्राणी स्वेदज, उद्भिज्जादिक चारी खाणीत आहेत, ते श्वासोच्छ्वास करूनच जगतात. त्याखेरीज ते जगूच शकत नाहीत. (१२)

ऐसी हे अजपा सकळासी । परंतु कळे जाणत्यासी ।
सहज सांडून सायासी । पडोंच नये ॥ १३ ॥
असा हा श्वासाबरोबर चालणारा अजपाजप सर्वांच्याच ठिकाणी चालू असतो. पण जाणत्यालाच तो कळतो. हे सहज साधन सोडून सायासात पडूच नये. (१३)

सहज देव असतचि असे । सायासें देव फुटे नासे ।
नासिवंत देवास विश्वासे । ऐसा कवणु ॥ १४ ॥
अंतरात्मा हा सहज देव असतच असतो. कृत्रिम देव मूर्ती इत्यादी फुटतात, नाश पावतात. नाशिवंत देवावर विश्वास कोण बरे ठेवील ? (१४)

जगदांतराचें दर्शन । सहज घडे अखंड ध्यान ।
आत्म‍इछेनें जन । सकळ वर्तती ॥ १५ ॥
जगाच्या आणि आपल्याही अंतर्यामी जो अंतरात्मा आहे, त्याच्याशी तादात्म्य पावल्याने मग देवाचे ध्यान, दर्शन अखंडच घडत असते. त्याच्या इच्छेप्रमाणेच सर्वही जण इंद्रिये आदी वागत असतात. (१५)

आत्मयाचें समाधान । घडे तैसेंचि आशन ।
सांडिलें फिटले समर्पण । तयासीच होये ॥ १६ ॥
आत्म्याचे समाधान ज्यायोगे घडेल, असेच भोजन इत्यादी भोग घेतले जातात. सांडते, लवंडते, हरवते तेही शेवटी अंतरात्म्यालाच समर्पण होते. (१६)

अग्नपुरुष पोटीं वसती । तयास अवदानें सकळ देती ।
लोक आज्ञेमधें असती । आत्मयांचे ॥ १७ ॥
प्रत्येक प्राण्याच्या पोटात अग्निपुरुष वास करतो. त्यालाच सर्वजण आहुती देत असतात. अशा रीतीने सर्व लोक अंतरात्म्याचे आज्ञेतच राहातात. (१७)

सहज देवजपध्यानें । सहज चालणें स्तुती स्तवनें ।
सहज घदे तें भगवान्नें । मान्य कीजे ॥ १८ ॥
एकदा असे तादात्म्य झाले की, प्रत्येक क्रिया ही त्याचीच सेवा होते. येथे देहभाव नसल्याने कृत्रिम उपासनेची गरज नसते अशी ही मीपणाविरहित सहज होत असलेली सेवाच प्रभूला मान्य होते. (१८)

सहज समजायाकारणें । नाना हटयोग करणें ।
परंतु येकायेकीं समजणें । घडत नाहीं ॥ १९ ॥
हे सहज साधण्याकरिताच नाना हठयोगादी साधने केली जातात. परंतु ते सहजासहजी समजले असे घडत नाही. (१९)

द्रव्य चुकतें दरिद्र येतें । तळीं लक्ष्मी वरी वर्ततें ।
प्राणी काये करील तें । ठाउकें नाहीं ॥ २० ॥
घरात द्रव्य आहे हे माहीत नसल्याने दारिद्रय भोगावे. एखाद्याच्या घरी तळघरात द्रव्य पुरलेले असते, पण वर तो दरिद्र्यासारखा राहत असतो ! तो तरी काय करणार ? कारण तळी लक्ष्मी आहे, हे त्याला ठाऊकच नसते. (२०)

तळघरामधें उदंड द्रव्य । भिंतीमधें घातलें द्रव्य ।
स्तंभीं तुळवटीं द्रव्य । आपण मधें ॥ २१ ॥
तळघरात उदंड द्रव्य आहे. भिंतीत, स्तंभात तुळ्यांमध्ये सर्वत्र उदंड द्रव्य आहे आणि आपण मध्ये आहोत. (२१)

लक्ष्मीमध्यें करंटा नांदे । त्याचें दरिद्र अधिक सांदे ।
नवल केलें परमानंदें । परमपुरुष ॥ २२ ॥
सर्वत्र लक्ष्मी असून जो असा करंट्यासारखा नांदतो, त्याचे दारिद्र्य अधिकच दु:खदायक होते. परमपुरुष जो परमानंद त्याने केवढे हे नवल केले आहे पहा बरे ! (२२)

येक पाहाती येक खाती । ऐसी विवेकाची गती ।
प्रवृत्ति अथवा निवृत्ती । येणेंचि ज्ञायें ॥ २३ ॥
श्रीमंत माणसे ऐश्वर्य भोगतात, खातात, पितात. दरिद्री, भाग्यहीन माणसे नुसतीच पाहात राहतात. विवेकी पुरुषांची स्थितीही अशीच असते. ते परमानंदाचा उपभोग घेतात आणि अज्ञानी लोक दुःख भोगत असतात. (२३)

अंतरीं वसतां नारायेणें । लक्ष्मीस काये उणें ।
ज्याची लक्ष्मी तो आपणें । बळकट धरावा ॥ २४ ॥
नारायण ज्याच्या अंतरात वास करतो, त्याच्या ऐश्वर्यात कमीपणा कसा असू शकेल ? म्हणून लक्ष्मी ज्याची अंकित आहे, तो नारायण आपण हृदयात बळकट धरावा. (२४)

इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे
अजपानिरूपणनाम समास पांचवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘अजपानिरूपणनाम’ समास पाचवा समाप्त.


समास सहावा : देहात्मनिरूपण
॥ श्रीराम ॥

आत्मा देहाअध्यें असतो । नाना सुखदुखें भोगितो ।
सेवटीं शरीर सांडून जातो । येकायेकीं ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, आत्मा देहात राहतो आणि नाना सुख-दु:खे भोगतो आणि शेवटी एकाएकी शरीर सोडून निघून जातो. (१)

शरीरीं शक्ति तारुण्यपणीं । नाना सुखें भोगी प्राणी ।
अशक्त होतां वृद्धपणीं । दुःखें भोगी ॥ २ ॥
तारुण्यात शरीरात शक्ती असते, तेव्हा प्राणी नाना सुखांचा उपभोग घेतो. वृद्धपणी शरीरातील शक्ती नाहीशी होऊन तो अशक्त होतो आणि दु:ख भोगतो. (२)

मरावेना ऐसी आवडी । हातपाये खोडून प्राण सोडी ।
नाना दुःखें अवघडी । वृद्धपणीं ॥ ३ ॥
आपण मरूच नये अशी त्याची इच्छा असते, पण हातपाय झाडून तो प्राण सोडतो. वृद्धपणी त्याला अनेक दु:खे सोसावी लागतात आणि तो अवघडून जातो. (३)

देहआत्मयांची संगती । कांहींयेक सुख भोगिती ।
चर्फडचर्फडून जाती । देहांतकाळीं ॥ ४ ॥
देह आणि आत्मा यांची संगत झाली की काही सुख भोगायला मिळते हे खरे, पण देहांतकाळी चरफडून प्राणी मरतो. (४)

ऐसा आत्मा दुःखदायेक । येकांचे प्राण घेती येक ।
आणी सेवटीं निरार्थक । कांहींच नाहीं ॥ ५ ॥
देहाचा आत्म्याशी संयोग असा दु:खदायक आहे. लोक स्वार्थासाठी एकमेकांचा प्राण घेतात. पण शेवटी सर्व निरर्थक ठरते. त्याचा काही उपयोग होत नाही. (५)

ऐसा दों दिसांचा भ्रम । त्यास म्हणती परब्रह्म ।
नाना दुःखाचा संभ्रम । मानून घेतला ॥। ६ ॥
असा हा दोन दिवसांचा भ्रम आहे. पण त्यालाच परब्रह्म म्हणतात. नाना दु:खाच्या पसाऱ्याला ते गोड मानून घेतात. (६)

दुःखी होऊन चर्फडून गेले । तेथें कोण समाधान जालें ।
कांहींयेकसुख भोगिलें । तों सवेंचि दुःख ॥ ७ ॥
दु:खी होऊन चरफडून मेले, तेथे कोठले समाधान लाभले ? काही एक सुख भोगतात की नाही, तोपर्यंत सर्वच दुःख प्राप्त होते. (७)

जन्म दारभ्य आठवावें । म्हणिजे अवघें पडेल ठावें ।
नाना दुःख मोजावें । काये म्हणोनी ॥ ८ ॥
जन्मापासूनची आठवण करावी, म्हणजे सर्व काही समजून येईल. जी नाना दु:खे भोगावी लागतात, ती काय म्हणून मोजावीत ? (८)

ऐसी आत्मयाची संगती । नाना दुःखें प्राप्त होती ।
दैन्यवाणे होऊन जाती । प्राणीमात्र ॥ ९ ॥
आत्म्याची संगती अशी आहे. त्याच्यायोगे नाना दुःखे प्राप्त होतात आणि प्राणिमात्र शेवटी दैन्यवाणे होऊन मरून जातात. (९)

कांहीं आनंद कांहीं खेद । जन्मवरी पडिला समंध ।
नाना प्रकरीं विरुद्ध । तडातोडी ॥ १० ॥
देह आणि आत्मा यांचा जन्मापासून संबंध येतो. त्यामुळे त्याला काही आनंद, काही खेद सोसावा लागतो. नाना प्रकारे मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात. ताटातुटी होत असतात. (१०)

निद्राकाळीं ढेकुण पिसा । नाना प्रकारीं वळसा ।
नाना उपायें वळसा । त्यांस होये ॥ ११ ॥
झोपेच्या वेळी ढेकूण आणि पिसवा नाना प्रकारे त्रास देतात. त्यावर उपाय केले की त्यांना त्रास होतो. (११)

भोजनकाळी माश्या येती । नाना पदार्थ उंदीर नेती ।
पुढें त्यांची हि फजिती । मार्जरें करिती ॥१२ ॥
भोजनाच्या वेळी माशा येऊन त्रास देतात. नाना पदार्थ उंदीर पळवतात. पुढे त्यांचीही फजिती मांजरे करतात. (१२)

वा चामवा गोंचिड । गांधेलें कानटें उदंड ।
येकास येक चर्फड । दोहिकडे ॥ १३ ॥
डोक्यातील उवा, त्वचेत घुसणाऱ्या उवा, गोचीड, गांधील, कानटे (एक जातीचा सर्प) उदंड असतात आणि एकामुळे दुसरा एखादा चरफडत असतो. अशी दोन्ही बाजूने चरफड चालू असते. त्यांचा त्रास आपल्याला होतो आणि आपला त्रास त्यांना होतो. (१३)

विंचु सर्प वाग रिसें । सुसरी लांडिगे माणसास माणसें ।
परस्परें सुखसंतोषें । येकहि नाहीं ॥ १४ ॥
विंचू, सर्प, वाघ, अस्वले, सुसरी, लांडगे आणि माणसांना माणसे याप्रमाणे सर्व एकमेकांस त्रास देत असतात. परस्परात प्रेम, सुख, संतोष कोठेही दिसून येत नाही. (१४)

चौयासि लक्ष उत्पत्ती । येकास येक भक्षिती ।
नाना पीडा दुःखणी किती । म्हणौन सांगावें ॥ १५ ॥
चौऱ्याऐंशी लक्ष योनींमध्ये असंख्य जीवांची उत्पत्ती होत असते. त्यांतील कित्येक एक दुसन्यास भक्षण करीत असतात. प्राणिमात्रांना ज्या नाना पीडा आणि दुखणी भोगावी लागतात, त्याचे वर्णन किती म्हणून करावे ? (१५)

ऐसी अंतरात्म्याची करणी । नाना जीव दाटले धरणीं ।
परस्परें संव्हारणी । येकयेकांची ॥ १६ ॥
अंतरात्म्याची करणी ही अशी आहे. या पृथ्वीतलावर अनेक प्रकारच्या जीवांची अगदी दाटी झाली आहे. त्यात सतत परस्परांचा संहार करणे सुरूच असते. (१६)

अखंड रडती । चर्फडिती । विवळविवळों प्राण देती ।
मूर्ख प्राणी त्यास म्हणती । परब्रह्म ॥ १७ ॥
असे प्राणी अखंड रडतात, चरफडतात, विव्हळून प्राण देतात आणि मूर्ख प्राणी त्यास परब्रह्म म्हणतात. (१७)

परब्रह्म जाणार नाहीं । कोणास दुःख देणार नाहीं ।
स्तुती निंदा दोनी नाहीं । परब्रह्मीं ॥ १८ ॥
परब्रह्म कधी जात नाही. ते कोणास कधी दु:ख देत नाही. स्तुती आणि निंदा दोन्हीही परब्रह्माच्या ठिकाणी लागत नाहीत. (१८)

उदंड शिव्या दिधल्या । तितुक्या अंतरात्म्यास लागल्या ।
विचार पाहतां प्रत्यया आल्या । येथातथ्य ॥ १९ ॥
उदंड शिव्या दिल्या, तर त्या अंतरात्म्याला लागतात नाही. विचार करून पाहिले की याचा यथार्थ प्रत्यय येतो. (१९)

धगडीचा बटकीचा लवंडीचा । गधडीचा कुतरीचा वोंगळीचा ।
ऐसा हिशेब सिव्यांचा । किती म्हणोनि सांगावा ॥ २० ॥
धगडीचा, बटकीचा, लवंडीचा, गधडीचा, कुतरीचा, बोंगळीचा (चांडाळणीचा) अशा शिव्या अनेक आहेत. त्यांचा हिशोब किती म्हणन सांगावा ? (२०)

इतुकें परब्रह्मीं लागेना । तेथें कल्पनाचि चालेना ।
तडातोडीचें ज्ञान मानेना । कोणीयेकासी ॥ २१ ॥
यांपैकी काहीच परब्रह्माच्या ठिकाणी लागत नाही. तेथे कुठलीही कल्पना चालू शकत नाही. असंबद्ध ज्ञान कुणालाच मान्य होत नाही. (२१)

सृष्टीमधें सकळ जीव । सकळांस कैचें वैभव ।
याकारणें ठायाठाव । निर्मिला देवें ॥ २२ ॥
सृष्टीमध्येच सर्व जीव असतात. त्यातील सर्वांनाच वैभव कसे प्राप्त होणार ? म्हणनच देवाने योग्य-अयोग्य निर्माण केले आहे. (२२)

उदंड लोक बाजारीचे । जें जें आलें तें तें वेंचे ।
उत्तम तितुके भाग्याचें । लोक घेती ॥ २३ ॥
बाजारात उदंड लोक येतात. बाजारात जे जे विकायला आले असेल ते ते लोक घेतात. भाग्यवान लोक असतात ते मात्र उत्तम तेच घेतात. (२३)

येणें न्यायें अन्न वसन । येणेंचि न्यायें देवतार्चन ।
येणेंचि न्यायें ब्रह्मज्ञान । प्राप्तव्यासारिखें ॥ २४ ॥
याच न्यायाने अन्न-वस्त्रे, देवदेवतार्चन आणि ब्रह्मज्ञान हेही प्रारब्धानुसार प्राप्त होते. (२४)

अवघेच लोक सुखी असती । संसार गोड करून नेती ।
माहाराजे वैभव भोगती । तें करंट्यास कैचें ॥ २५ ॥
सर्वच लोक आपण सुखी आहोत असे मानतात आणि संसार गोड करून घेतात, पण महाराजे जे वैभव भोगतात, ते अभाग्यास कसे प्राप्त होणार ? (२५)

परंतु अंतीं नाना दुःखें । तेथें होतें सगट सारिखें ।
पूर्वीं भोगिलीं नाना सुखें । अंतीं दुःख सोसवेना ॥ २६ ॥
परंतु अंती मात्र सर्वांनाच नाना दु:खे सोसावी लागतात. ती सर्वांना सरसकट सारखीच असतात. ज्यांनी पूर्वी नाना सुखे भोगलेली असतात, त्यांना शेवटी ती दु:खे सोसवत नाहीत. (२६)

कठिण दुःख सोसवेना । प्राण शरीर सोडिना ।
मृत्यदुःख सगट जना । कासाविस करी ॥ २७ ॥
एकीकडे कठीण दु:ख सोसवत नाही आणि एकीकडे वासनेमुळे प्राण शरीर सोडत नाही. याप्रमाणे मृत्युकाळचे दु:ख सरसकट सर्व लोकांना कासावीस करून सोडते. (२७)

नाना अवेवहीन जालें । तैसेंचि पाहिजे वर्तलें ।
प्राणीं अंतकाळीं गेलें । कासाविस हौनी ॥ २८ ॥
काही जणांचे काही अवयव (रोगाने अथवा अपघाताने) निकामी होतात. त्यांना तसेच काम करीत जगावे लागते आणि शेवटी अंतकाळी कासावीस होऊन प्राणी मरतात. (२८)

रूप लावण्य अवघें जातें । शरीरसामर्थ्य अवघें राहातें ।
कोणी नस्तां मरतें । आपदआपदों ॥ २९ ॥
वृद्धपणी रूप आणि लावण्य सर्व जाते, शरीराचे सामर्थ्यही सर्व नष्ट होते आणि जवळ कोणीही नसताना यातना भोगत भोगत माणूस मरतो. (२९)

अंतकाळ दैन्य दीन । सकळिकांस तत्समान ।
ऐसें चंचळ अवलक्षण । दुःखकारी ॥ ३० ॥
अंतकाळ हा सर्वांनाच सारखा दैन्यवाणा असतो. असे हे चंचळाचे म्हणजे अंतरात्म्याचे अवलक्षण फार दु:खदायक आहे. (३०)

भोगून अभोक्ता म्हणती । हे तों अवघीच फजिती ।
लोक उगेच बोलती । पाहिल्याविण ॥ ३१ ॥
आणि तरी लोक त्याला भोगून अभोक्ता असे म्हणतात. खरे तर सर्व फजितीच असते. पण लोक पाहिल्याशिवाय उगीच बोलत असतात. (३१)

अंतकाळ आहे कठिण । शेरीर सोडिना प्राण ।
बराड्यासारिखें लक्षण । अंतकाळीं ॥ ३२ ॥
अंतकाळ फार कठीण असतो. प्राण शरीर सोडत नाही आणि अंतकाळी केविलवाणी, असहाय्य भिकाऱ्यासारखी | अवस्था होते. (३२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
देहात्मनिरूपणनाम समास सहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘देहात्मनिरूपणनाम’ समास सहावा समाप्त.


समास सातवा : जगज्जीवननिरूपण
॥ श्रीराम ॥

मुळीं उदक निवळ असतें । नाना वल्लिमधें जातें ।
संगदोषें तैसें होतें । आंब्ल तिक्षण कडवट ॥ १ ॥
मुळात पाणी स्वच्छ असते. ते अनेक प्रकारच्या वेलींमध्ये शोषले जाते आणि मग संगदोषामुळे ते आंबट, तिखट किंवा कडवट होते. (१)

आत्मा आत्मपणें असतो । देहसंगें विकारतो ।
साभिमानें भरीं भरतो । भलतिकडे ॥ २ ॥
आत्मा हा मुळात आत्मरूपानेच असतो. देहाच्य संगतीने त्याच्या ठिकाणी विकार उत्पन्न होतात आणि देहाचा अभिमान धरून भलत्याच भरीला पडून भलतीकडेच जातो. (२)

बरी संगती सांपडली । जैसी उंसास गोडी आली ।
विषवल्ली फांपावली । घातकी प्राणी ॥ ३ ॥
जर माणसाला उत्तम संगत मिळाली तर उसात पाण्याने गोडी यावी तसे कल्याण होते. पाण्याने विषवल्ली फोफावते, त्याप्रमाणे वाईट संगतीने माणस घातकी बनतो. (३)

अठराभार वनस्पती । गुण सांगावे ते किती ।
नाना देहाचे संगती । आत्मयास होये ॥ ४ ॥
अठराभार वनस्पती आहेत. त्यांतील प्रत्येक वनस्पतीचा गुण वेगवेगळा असतो. त्या गुणांचे वर्णन करणे कसे शक्य आहे ? आत्म्यालाही नाना देहांची संगती लाभते व त्यास अनुसरून गुण त्याच्या ठिकाणी प्रकट होतात. (४)

त्यामधें कोणी भले । ते संतसंगें निघाले ।
देहाभिमान सांडून गेले । विवेकबळें ॥ ५ ॥
त्यामध्ये काही सज्जनांना संतांची संगती लाभते आणि ते विवेकाच्या बळावर देहाभिमान सोडून या भवसागरातून पार होतात. (५)

उदकाचा नाशचि होतो । आत्मा विवेकें निघतो ।
ऐसा आहे प्रत्यय तो । विवेकें पाहा ॥ ६ ॥
उदकाचा तर नाशच होतो, पण विवेकाने अंतरात्मा साऱ्या भ्रमांतून मुक्त होतो. विवेकाने याचा अनुभव घेऊन पहावा. (६)

ज्यास स्वहितचि करणें । त्यास किती म्हणौन सांगणें ।
हें ज्याचें त्यानें समजणें । सकळ कांहीं ॥ ७ ॥
ज्याला स्वहित करावयाचे असेल, त्याला आणखी किती सांगावे ? ज्याचे त्यानेच सर्व काही समजून घेतले पाहिजे. (७)

आपला आपण करी कुडावा । तो आपला मित्र जाणावा ।
आपला नाश करी तो समजावा । वैरी ऐसा ॥ ८ ॥
जो आपला आपण कैवार घेतो, तो आपला आपण मित्र जाणावा. जो आपला आपणच नाश करून घेतो, तो स्वत:चाच वैरी बनतो. (८)

आपले आपण अन्हित करावें । त्यास आडवें कोणें निघावें ।
येकांती जाऊन जीवें । मारी आपणासी ॥ ९ ॥
जो आपले अकल्याण आपणच करून घेतो त्याला कोण अडवू शकणार ? एकांतात जाऊन एखाद्याने आत्मघात करून घ्यावा तसेच हे आहे. (९)

जो आपला आपण घातकी । तो आत्महत्यारा पातकी ।
याकारणें विवेकी । धन्य साधु ॥ १० ॥
जो आपला घात आपणच करून घेतो, तो आत्महत्यारा अत्यंत पातकी आहे असे समजावे. म्हणून जो विवेक करतो तो साधू धन्य होय. (१०)

पुण्य्वंतां सत्संगती । पापिष्टां असत्संगती ।
गति आणि अवगती । संगतीयोगें ॥ ११ ॥
जो पुण्यवान असतो त्याला सत्संगती मिळते, तर अत्यंत पापी माणसाला दुर्जनांची संगत लाभते. जशी संगती लाभते त्याप्रमाणे सद्गती अथवा अधोगती प्राप्त होते. (११)

उत्तम संगती धरावी । आपली आपण चिंता करावी ।
अंतरी बरी विवरावी । बुद्धि जाणत्याची ॥ १२ ॥
उत्तम संगती धरावी आणि आपले स्वत:चे कल्याण कसे होईल याची चिंता करावी. जाणत्या माणसाचा सल्ला घेऊन त्यावर आपण आपल्या अंतर्यामी विचार करावा. (१२)

इहलोक आणि परलोक । जाणता तो सुखदायेक ।
नेणत्याकरितां अविवेक । प्राप्त होतो ॥ १३ ॥
जाणत्या माणसाच्या संगतीने इहलोक आणि परलोक दोन्ही सुखदायक ठरतात. अज्ञानी माणसाची संगत केली की अविवेक प्राप्त होतो. (१३)

जाणता देवाचा अंश । नेणता म्हणिजे तो राक्षस ।
यामधें जें विशेष । तें जाणोन घ्यावें ॥ १४ ॥
जाणता हा देवाचा अंश असतो, तर नेणता म्हणजे राक्षसच समजावा. या दोघांत कोण श्रेष्ठ, कनिष्ठ ते जाणून घ्यावे. (१४)

जाणतां तो सकळां मान्य । नेणता होतो अमान्य ।
जेणेंकरितां होईजे धन्य । तेंचि घ्यावें ॥ १५ ॥
जाणता असतो तो सर्वांना मान्य असतो. नेणता असतो तो लोकांना अमान्य असतो. म्हणून ज्याच्या संगतीने धन्यता लाभत असेल, तेच स्वीकारावे. (१५)

साक्षपी शाहाण्याची संगती । तेणें साक्षपी शाहाणे होती ।
आळसी मूर्खाची संगती । आळसी मूर्ख ॥ १६ ॥
उद्योगी, प्रयत्नशील, शहाण्या माणसाच्या संगतीने लोकही साक्षेपी, शहाणे होतात, तर आळशी आणि मूर्खाची संगती केल्याने करणाराही आळशी आणि मूर्ख बनतो. (१६)

उत्तम संगतीचें फळ सुख । अद्धम संगतीचें फळ दुःख ।
आनंद सांडुनियां शोक । कैसा घावा ॥ १७ ॥
उत्तम संगतीचे फळ सुख असते, अधम संगतीने दु:ख प्राप्त होते. मग आनंद सोडून माणसाने शोक कशाला प्राप्त करून घ्यावा ? (१७)

ऐसें हें प्रगट दिसे । जनामधें उदंड भासे ।
प्राणीमात्र वर्ततसे । उभयेयोगें ॥ १८ ॥
जगात ह्या दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष पहावयास मिळतात. दोन्ही प्रकारची उदंड उदाहरणे आहेत. पण तरी प्राणी मात्र दोन्ही मार्गाचे अवलंबन करताना दिसतात. (१८)

येका योगें सकळ योग । येका योगें सकळ वियोग ।
विवेकयोगें सकळ प्रयोग । करीत जवे ॥ १९ ॥
विवेकी माणसाच्या संगतीने सर्व लाभ होतो, तर अविवेकी माणसाच्या संगतीने सर्व चांगल्या गोष्टींचा वियोग होतो. म्हणून सर्व काही विवेकी माणसाच्या संगतीत राहून करावे. (१९)

अवचितें सांकडींत पडिलें । तरी तेथून पाहिजे निघालें ।
निघोन जातां जालें । परम समाधान ॥ २० ॥
माणूस अचानक जर अडचणीत सापडला, तर तेथून निघणे भागच असते. तसे निघाल्यावर मग परम समाधान प्राप्त होते. (२०)

नाना दुर्जनांचा संग । क्षणक्षणा मनभंग ।
याकारणें कांहीं रंग । राखोन जावें ॥ २१ ॥
अनेक दुर्जनांच्या संगतीत क्षणाक्षणाला मनाविरुद्ध गोष्टी घडतात, मानभंग होतो. म्हणून आपला स्वाभिमान दुखावला जाणार नाही, इतपतच जवळीक करावी. (२१)

शाहाणा येत्‍न त्याच्या गुणें । पाहों जातां काये उणें ।
सुख संतोष भोगणें । नाना श्लाघ्यता ॥ २२ ॥
विवेकाने केलेल्या योग्य, दीर्घ दृष्टीच्या प्रयत्नामुळे काहीही कमी पडत नाही. तर उलट सुख-संतोष प्राप्त होऊन अनेक प्रकारे प्रशंसा केली जाते. (२२)

अतां लोकीं ऐसें आहे । सृष्टीमधें वर्तताहे ।
जो कोणी समजोन पाहे । त्यास घडे ॥ २३ ॥
लोकात आणि सृष्टीत अशीच राहाटी आहे. जो कोणी समजून विवेकाने वागतो, त्याला सुख-संतोष लाभतो. (२३)

बहुरत्न वसुंधरा । जाणजाणों विचार करा ।
समजल्यां प्रत्ययो अंतरा- । माजीं येतो ॥ २४ ॥
‘बहुरत्ना वसुंधरा’ असे म्हटले जाते, ते नीट जाणून घेऊन विचार करावा व त्यातील रहस्य जाणून त्याचा प्रत्यय अंतरात घ्यावा. (२४)

दुर्बळ अणि संपन्न । वेडें आणि वित्पन्न ।
हें अखंड दंडायमान । असतचि असे ॥ २५ ॥
दुर्बल आणि संपन्न, वेडे आणि व्युत्पन्न अशी दोन्ही प्रकारची माणसे जगात असतात. ही जगाची अनुल्लंघनीय राहाटी अशीच चालत आली आहे. (२५)

येक भाग्यपुरुष मोडती । येक नवे भाग्यवंत होती ।
तैसीच विद्या वित्पती । होत जाते ॥ २६ ॥
एखादा भाग्यवान पुरुष निर्धन होतो किंवा नष्ट होतो, तर कुणी एखादा नवीन भाग्यवंत होतो. विद्या आणि व्युत्पत्तीच्या बाबतीतही असेच घडत असते. त्या पण येतात आणि जातात. (२६)

येक भरे येक रितें । रितें मागुतें भरतें ।
भरतेंहि रितें होतें । काळांतरीं ॥ २७ ॥
एक संपन्न तर एक भिकारी दिसतो. प्रयत्नाने भिकारी संपन्न होतात. परंतु ही संपन्नताही कायम टिकणारी नसते. हा चक्रमेनिक्रम, रहाटाच्या गाडग्याप्रमाणे एकदा भरण्याचा आणि एकदा रिकामे होण्याचा क्रम हा या सृष्टीचा नियमच आहे. (२७)

ऐसी हे सृष्टीची चाली । संपत्ति दुपारची साउली ।
वयेसा तरी निघोन गेली । हळुहळु ॥ २८ ॥
अशी या सृष्टीची प्रथाच आहे. दुपारची सावली जशी थोडाच वेळ पायाखाली टिकते, तशीच संपत्तीही थोडा वेळ टिकून नाहीशी होते. आयुष्यातील वर्षेही हळूहळू निघून जात असतात. (२८)

बाळ तारुण्य आपुलें । वृधाप्य प्रचितीस आलें ।
ऐसें जाणोन सार्थक केलें । पाहिजे कोणियेकें ॥ २९ ॥
बालपण, तारुण्य निघून गेले, आता वृद्धावस्थेचा अनुभव येऊ लागला आहे हे जाणून तरी माणसाने आपल्या आयुष्याचे सार्थक केले पाहिजे. (२९)

देह जैसें केलें तैसें होतें । येत्‍न केल्यां कार्ये साधतें ।
तरी मग कष्टावें तें । काय निमित्य ॥ ३० ॥
देहाला जसे वळण लावावे, तसा तो होतो. त्याचे सार्थक करण्याचा प्रयत्न केला तर ते कार्यही साध्य होते. तर मग कष्टी होण्याचे. निराश होण्याचे कारणच काय ? (३०)

इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे
जगजीवननिरूपणनाम समास सातवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘जगज्जीवननिरूपणनाम’ समास सातवा समाप्त.


समास आठवा : तत्त्वनिरसन
॥ श्रीराम ॥

नाभीपासून उन्मेषवृत्ती । तेचि परा जाणिजे श्रोतीं ।
ध्वनिरूप पश्यंती । हृदईं वसे ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, नाभीपाशी जे मूळ स्फुरण होते ती स्फूर्ती म्हणजे परा वाचा होय, हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे. हृदयाच्या ठिकाणी ध्वनिरूपाने असणारी ती पश्यंती वाचा होय. (१)

कंठापासून नाद जाला । मध्यमा वाचा बोलिजे त्याला ।
उच्चर होतां अक्षराला । वैखरी बोलिजे ॥ २ ॥
कंठस्थानी जो नाद उत्पन्न होतो त्याला मध्यमा वाचा म्हणतात आणि मुखावाटे अक्षराचा जो उच्चार होतो तिला वैखरी वाचा असे म्हणतात. (२)

नाभिस्थानीं परा वाचा । तोचि ठाव अंतःकर्णाचा ।
अंतःकर्णपंचकाचा । निवाडा ऐसा ॥ ३ ॥
नाभिस्थानी जेथे पर वाचा असते तेच अंत:करणाचे स्थान समजावे. आता अंत:करणपंचकाचा निवाडा असा आहे. (३)

निर्विकल्प जें स्फुरण । उगेंच असतां आठवण ।
तें जाणावें अंतःकर्ण । जाणतीकळा ॥ ४ ॥
निर्विकल्प म्हणजे मनात काही कल्पना नसता सहजच जे स्फुरण होते तेच अंत:करण होयहे जाणीवमय असते. (४)

अंतःकर्ण आठवलें । पुढें होये नव्हेसें गमलें ।
करूं न करू ऐसें वाटलें । तेंचि मन ॥ ५ ॥
अंत:करणात सहज आठवले तेथे अंत:करणाचा प्रत्यय आला. नंतर एखादी गोष्ट करू की न करू असे वाटले तेच मन होय. (५)

संकल्प विकल्प तेंचि मन । जेणें करितां अनुमान ।
पुढें निश्चयो तो जाण । रूप बुद्धीचें ॥ ६ ॥
मन हे संकल्प-विकल्पात्मक असते. त्यामुळेच कल्पना केली जाते. पुढे जो निश्चय केला जातो ते बुद्धीचे रूप जाणावे. (६)

करीनचि अथवा न करी । ऐसा निश्चयोचि करी ।
तेचि बुद्धि हे अंतरीं । विवेकें जाणावी ॥ ७ ॥
एखादे कार्य करीनच अथवा करणारच नाही असा अंतरात निश्चय जी करते ती बद्धी होय. ती विवेकाने अंत:करणात जाणून घ्यावी. (७)

जे वस्तुचा निश्चये केला । पुढें तेचि चिंतूं लागला ।
तें चित्त बोलिल्या बोला । येथार्थ मानावें ॥ ८ ॥
वस्तूचा जो एकदा निश्चय केला त्याचेच पुढे चिंतन होऊ लागले. चिंतन करणारे ते चित्त होय हे यथार्थ समजून घ्यावे. (८)

पुढें कार्याचा अभिमान धरणें । हें कार्ये तों अगत्य करणें ।
ऐस्या कार्यास प्रवर्तणें । तोचि अहंकारु ॥ ९ ॥
पुढे कार्याचा अभिमान धरून हे कार्य अवश्य केलेच पाहिजे या भावनेने कार्यास प्रवर्तणे तोच अहंकार होय. (९)

ऐसें अंतःकर्णपंचक । पंच वृत्ती मिळोन येक ।
कार्येभागें प्रकारपंचक । वेगळाले ॥ १० ॥
असे हे अंत:करणपंचक आहे. या पाच वृत्ती मिळून एकच अंत:करण असते, पण वेगवेगळ्या कार्यावरून त्याचे पाच प्रकार वेगवेगळे मानले जातात. (१०)

जैक्षे पांचहि प्राण । कार्येभागें वेगळाले जाण ।
नाहीं तरी वायोचें लक्षण । येकचि असे ॥ ११ ॥
जसे पाच प्राणही वेगवेगळ्या कार्यभागामुळे वेगवेगळे गणले जातात, नाही तर वायूचे लक्षण गती हे एकच असते. (११)

सर्वांगीं व्यान नाभी समान । कंठी उदान गुदीं अपान ।
मुखीं नासिकीं प्राण । नेमस्त जाणावा ॥ १२ ॥
सर्वांगी व्यान, नाभीस्थानी समान, कंठाच्या ठिकाणी उदान, गुदस्थानी अपान आणि तोंड आणि नाकाच्या ठिकाणी प्राण असे निश्चितपणे जाणावे. (१२)

बोलिलें हें प्राणपंचक । आतां ज्ञानैंद्रियेंपंचक ।
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा नासिक । ऐसीं हें ज्ञानेंद्रियें ॥ १३ ॥
हे प्राणपंचक सांगितले. आता ज्ञानेंद्रियपंचक ऐकावे. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक असे हे ज्ञानेंद्रियपंचक आहे. (१३)

वाचा पाणी पाद शिस्न गुद । हे कर्मैंद्रियें प्रसिद्ध ।
शब्द स्परुष रूप रस गंध । ऐसें हें विषयपंचक ॥ १४ ॥
वाचा, हात, पाय, शिस्न आणि गद हे कर्मेंद्रियपंचक प्रसिद्धच आहे. आणि शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे हे विषयपंचक होय. (१४)

अंतःकर्ण प्राणपंचक । ज्ञानेंद्रियें कर्मेंद्रिये पंचक ।
पांचवें विषयपंचक । ऐसीं हे पांच पंचकें ॥ १५ ॥
अंत:करणपंचक, प्राणपंचक, ज्ञानेंद्रियपंचक, कर्मेंद्रियपंचक आणि पाचवे विषयपंचक अशी ही पाच पंचके आहेत. (१५)

ऐसें हे पंचविस गुण । मिळोन सूक्ष्म देह जाण ।
याच कर्दम बोलिला श्रवण । केलें पाहिजे ॥ १६ ॥
असे हे पंचवीस गुण मिळून सूक्ष्म देह जाणावा. याचे मिश्रण कसे झाले आहे ते सांगितले जात आहे. ते श्रवण केले पाहिजे. (१६)

अंतःकर्ण व्यान श्रवण वाचा । शब्द विषये आकाशाचा ।
पुढें विस्तार वायोचा । बोलिला असे ॥ १७ ॥
अंत:करण, व्यान, श्रवण, वाचा आणि शब्द हा विषय हे आकाशाचे गुण होत. आता वायूचा विस्तार पुढे सांगितला आहे. (१७)

मन समान त्वचा पाणी । स्पर्श रूप हा पवनीं ।
ऐसे हे अडाखे साधुनी । कोठा करावा ॥ १८ ॥
मन, समान, त्वचा, हात आणि स्पर्श हा विषय हे वायूचे स्वरूप होय. असे हे आडाखे जाणून घेऊन कोष्टक तयार करावे, म्हणजे हे पंचीकरण नीट समजेल. (१८)

बुद्धि उदान नयेन चरण । रूपविषयाचें दर्शन ।
संकेतें बोलिलें मन । घालून पाहिजे ॥ १९ ॥
बुद्धी, उदान, डोळे, पाय आणि रूप विषय हे तेजाचे रूप थोडक्यात सांगितले आहे. मन एकाग्र करून हे जाणून घ्यावे. (१९)

चित्त अपान जिव्हा शिस्न । रसविषये आप जाण ।
पुढें ऐका सावधान । पृथ्वीचें रूप ॥ २० ॥
चित्त, अपान, जीभ, शिस्न आणि रस हा विषय हा जलतत्त्वाचा विस्तार होय. आता सावधान होऊन पृथ्वीचे रूप ऐकावे. (२०)

अहंकार प्राण घ्राण । गुद गंधविषये जाण ।
ऐसे केलें निरूपण । शास्त्रमतें ॥ २१ ॥
अहंकार, प्राण, नाक, गुद आणि गंध हा विषय हे पृथ्वीचे रूप होय. याप्रमाणे शास्त्राधारे हे निरूपण केले आहे. (२१)

ऐसा हा सूक्ष्म देहे । पाहातां होईजे निसंदेहे ।
येथें मन घालून पाहे । त्यासीच हें उमजे ॥ २२ ॥
असा हा सूक्ष्म देह आहे. याचा सूक्ष्म विचार केल्याने साधक नि:संदेह होतो. पण अत्यंत मन लावून जो हे सर्व पाहील त्यालाच हे उमजेल. (२२)

ऐसें सूक्ष्म देहे बोलिलें । पुढें स्थूळ निरोपिलें ।
आकाश पंचगुणें वर्तलें । कैसें स्थुळीं ॥ २३ ॥
अशा प्रकारे सूक्ष्म देहाचे वर्णन केले. आता पुढे स्थूल देहाचे निरूपण केले आहे. स्थूलाच्या ठिकाणी आकाश पाच गुणांनी कसे वर्तत असते, ते ऐकावे. (२३)

काम क्रोध शोक मोहो भये । हा पंचविध आकाशाचा अन्वये ।
पुढें पंचविध वायो । निरोपिला ॥ २४ ॥
काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हा पाच प्रकारचा आकाशाचा अन्वय होय. आता वायूचा पंचविध अन्वय सांगितला आहे. (२४)

चळण वळण प्रासारण । निरोध आणि आकोचन ।
हें पंचविध लक्षण । प्रभंजनाचें ॥ २५ ॥
चलन, वलन, प्रसरण, निरोध आणि आकुंचन हे पंचविध लक्षण वायूचे जाणावेत. (२५)

क्षुधा त्रुषा आलस्य निद्रा मैथुन । हे तेजाचे पंचविध गुण ।
आतां पुढें आपलक्षण । निरोपिलें पाहिजे ॥ २६ ॥
क्षुधा, तृषा, आळस, निद्रा आणि मैथुन हे तेजाचे पंचविध गुण जाणावेत. आता पुढे जलतत्त्वाचे लक्षण सांगितले पाहिजे. (२६)

शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद । हा पंचविध आपाचा भेद ।
पुढें पृथ्वी विशद । केली पाहिजे ॥ २७ ॥
वीर्य, रेत, लाळ, मूत्र आणि घाम हे आपाचे पंचविध भेद आहेत. आता पुढे पृथ्वीचे रूप स्पष्ट केले पाहिजे (२७)

अस्ति मांष त्वचा नाडी रोम । हे पृथ्वीचे पंचविध धर्म ।
ऐसे स्थूळ देहाचें वर्म । बोलिलें असे ॥ २८ ॥
अस्थी, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म आहेत. याप्रमाणे स्थूल देहाचे रहस्य येथे सांगितले आहे. (२८)

पृथ्वी आप तेज वायो आकाश । हे पांचाचे पंचविस ।
ऐसें मिळोन स्थूळ देहास । बोलिजेतें ॥ २९ ॥
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाचांची मिळून पंचवीस तत्त्वे मिळून स्थूलदेह बनतो. (२९)

तिसरा देह कारण अज्ञान । चौथा माहांकारण ज्ञान ।
हे च्यारी देह निर्शितां विज्ञान । परब्रह्म तें ॥ ३० ॥
तिसरा देह कारण हा अज्ञानमय आणि चौथा देह महाकारण हा ज्ञानमय असतो. या चारी देहांचे निरसन केल्यावर विज्ञानमय परब्रह्म तेवढे उरते. (३०)

विचारें चौदेहावेगळें केलें । मीपण तत्वासरिसें गेलें ।
अनन्य आत्मनिवेदन जालें । परब्रह्मीं ॥ ३१ ॥
विचाराने चारी देहांचे निरसन केले की मीपणा तत्त्वांच्या निरसनाबरोबरच नाहीसा होतो आणि परब्रह्माच्या ठिकाणी अनन्य अशा प्रकारे आत्मनिवेदन होते. परब्रह्माशी ऐक्य होते. (३१)

विवेकें चुकला जन्म मृत्य । नरदेहीं साधिलें महत्कृत्य ।
भक्तियोगें कृत्यकृत्य । सार्थक जालें ॥ ३२ ॥
विवेकाने जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होते; नरदेहाच्या योगे आयुष्याचे सार्थक होऊन मुख्य कार्य साधले जाते आणि भक्तीच्या योगाने कृतकृत्यता लाभून नरदेहाचे सार्थक होते. (३२)

इति श्री पंचीकर्ण । केलेंचि करावें विवर्ण ।
लोहाचें जालें सुवर्ण । परिसाचेनयोगें ॥ ३३ ॥
याप्रमाणे या पंचीकरणाचे विवरण वारंवार करावे. म्हणजे परिसाच्या योगाने लोहाचे सवर्ण होऊन जाईल. (३३)

हाहि दृष्टांत घडेना । परिसाचेन परीस करवेना ।
शरण जातां साधुजना । साधुच होइजे ॥ ३४ ॥
पण हाही दृष्टान्त बरोबर नाही. परिसामुळे परीस करता येत नाही. पण साधुजनांना शरण गेल्याने आपणही साधूच होतो. (३४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
तत्वनिरूपणनाम समास आठवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘तत्त्वनिरूपणनाम’ समास आठवा समाप्त.


समास नववा : तनुचतुष्टयनिरूपण
॥ श्रीराम ॥

स्थूळ सूक्ष्म कारण माहाकारण । ऐसे हे चत्वार देह जाण ।
जागृति स्वप्न सुषुप्ति पूर्ण । तुर्या जाणावी ॥ १ ॥
स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे पिंडाचे चार देह जाणून घ्यावेत. पिंडाच्या चार अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि अवस्थांच्या चार या संख्येला पूर्ण करणारी चौथी अवस्था तुर्या होय. (१)

विश्व तैजस प्राज्ञ । प्रत्यगात्मा हे अभिमान ।
नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान । मूर्धनी ते ॥ २ ॥
विश्व, तैजस, प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा हे (अनुक्रमे त्या त्या अवस्थांचे) अभिमानी विभू आहेत. नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि मूर्धा (टाळू) ही अनुक्रमे त्या विभुंची स्थाने आहेत. (२)

स्थूळभोग प्रविक्तभोग । आनंदभोग आनंदावभासभोग ।
ऐसे हे चत्वार भोग । चौंदेहाचे ॥ ३ ॥
स्थूलभोग, उपाधिरहित भोग, आनंद भोग आणि आनंदावभास भोग हे चार भोग (अनुक्रमे) चार देहांचे आहेत. (३)

अकार उकार मकार । अर्धमात्रा तो ईश्वर ।
ऐस्या मात्रा चत्वार । चौंदेहाच्या । । ४ ॥
अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा म्हणजे ईश्वर या चार देहांच्या चार मात्रा आहेत. (४)

तमोगुण रजोगुण । सत्वगुण शुद्धसत्वगुण ।
ऐसे हे चत्वार गुण । चौंदेहाचे ॥ ५ ॥
तमोगुण, रजोगुण, सत्त्वगुण आणि शुद्धसत्त्वगुण असे हे चार देहांचे चार गुण आहेत. (५)

क्रियाशक्ति द्रव्याशक्ती । इछाशक्ति ज्ञानशक्ती ।
ऐशा चत्वार शक्ती । चौंदेहाच्या ॥ ६ ॥
क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती या चार देहांच्या चार शक्ती आहेत. (६)

ऐसीं हे बत्तिस तत्वें । दोहींचीं पन्नास तत्वें ।
अवघीं मिळोन ब्यासि तत्वें । अज्ञान आणी ज्ञान ॥ ७ ॥
अशी ही बत्तीस तत्त्वे आणि स्थूल आणि सूक्ष्म देहांची दोन्हींची मिळून पन्नास तत्त्वे अशी सर्व मिळून ब्याऐंशी तत्त्वे आणि अज्ञान आणि ज्ञान ही दोन मिळून एकूण ८४ चौऱ्याऐंशी तत्त्वे जाणावीत. (७)

ऐसीं हे तत्वें जाणावीं । जाणोन माइक वोळखावीं ।
आपण साक्षी निरसावीं । येणें रितीं ॥ ८ ॥
अशी ही तत्त्वे जाणल्यावर ती मायिक म्हणून ओळखावीत आणि आपण या तत्त्वांचे साक्षी आहोत, हे जाणून त्यांचे निरसन करावे. (८)

साक्षी म्हणिजे ज्ञान । ज्ञानें वोळखावें अज्ञान ।
ज्ञानाज्ञानाचें निर्शन । देहासरिसें ॥ ९ ॥
साक्षी म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाने अज्ञान ओळखावे आणि चारी देहांबरोबर ज्ञान आणि अज्ञानाचेही निरसन करावे. (९)

ब्रह्मांडीं देह कल्पिले । विराट हिरण्यगर्भ बोलिले ।
ते हे विवेकें निर्शले । आत्मज्ञानें ॥ १० ॥
ब्रह्मांडाच्या ठिकाणी ही देहाची कल्पना केली. त्यांना विराट आणि हिरण्यगर्भ असे म्हटले आहे, पण आत्मज्ञानाने, स्वस्वरूपानुभवाने, विवेकाने त्यांचेही निरसन झाले. (१०)

आत्मानात्माविवेक करितां । सारासारविचार पाहतां ।
पंचभूतांची माइक वार्ता । प्रचित आली ॥ ११ ॥
आत्मानात्मविवेक केल्याने आणि सारासारविवेकामुळे सर्व पंचमहाभूते मायिक आहेत, ही प्रचीती आली. (११)

अस्ति मांष त्वचा नाडी रोम । हे पांचहि पृथ्वीचे गुणधर्म ।
प्रत्यक्ष शरीरीं हें वर्म । शोधून पाहावें ॥ १२ ॥
अस्थी, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे सर्व पाचही पृथ्वीचे गुणधर्म आहेत, हे प्रत्यक्ष शरीराचे रहस्य शोधून जाणून घ्यावे. (१२)

शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद । हे आपाचे पंचकभेद ।
तत्वें समजोन विशद । करून घावीं ॥ १३ ॥
वीर्य, रेत, लाळ, मूत्र आणि घाम हे आपाचे पाच भेद, तत्त्वे स्पष्टपणे जाणून घ्यावीत. (१३)

क्षुधा त्रुषा आलस्य निद्रा मैथुन । हे पांचहि तेजाचे गुण ।
या तत्वांचें निरूपण । केलेंचि करावें ॥ १४ ॥
भूक, तहान, आळस, निद्रा आणि मैथुन हे तेजाचे पाच गुण आहेत. या तत्त्वांचेही वारंवार विवरण करावे (१४)

चळण वळण प्रासारण । निरोध आणि आकोचन ।
हें पंचहि वायोचे गुण । श्रोतीं जाणावे ॥ १५ ॥
चलन, वलन, प्रसरण, निरोध आणि आकुंचन हे सर्व वायूचे गुण श्रोत्यांनी जाणावेत. (१५)

काम क्रोध शोक मोहो भये । हा आकाशाचा परिपाये ।
हें विवरल्याविण काये । समजों जाणें ॥ १६ ॥
काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हा आकाशाचा परिवार आहे. हे विवरल्याशिवाय समजून येत नाही. (१६)

असो ऐसें हें स्थूळ शरीर । पंचविस तत्वांचा विस्तार ।
आतां सूक्ष्मदेहाचा विचार । बोलिजेल ॥ १७ ॥
असो. असे हे स्थूलशरीर म्हणजे पंचवीस तत्त्वांचाच विस्तार आहे. आता सूक्ष्मदेहाचा विचार सांगितला जाईल. (१७)

अंतःकर्ण मन बुद्धि चित्त अहंकार । आकाशपंचकाचा विचार ।
पुढें वायो निरोत्तर । होऊन ऐका ॥ १८ ॥
अंत:करण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे आकाशपंचक आहे. आता पुढे वायूचा विचार ऐकावा. (१८)

व्यान समान उदान । प्राण आणी अपान ।
ऐसे हे पांचहि गुण । वायोतत्वाचे ॥ १९ ॥
व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान हे पाचही गुण वायुतत्त्वाचे आहेत. (१९)

श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । हें पांचहि तेजाचे गुण ।
आतां आप सावधान । होऊन ऐका ॥ २० ॥
कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक हे पाचही तेजाचे गुण होत. आता सावधान होऊन आपाचे गुण ऐका. (२०)

वाचा पाणी पाद शिस्न गुद । हे आपाचे गुण विशद ।
आतां पृथ्वी विशद । निरोपिली ॥ २१ ॥
वाचा, हात, पाय, शिस्न आणि गद हे आपाचे प्रसिद्ध गुण आहेत. आता पृथ्वीचे गुण स्पष्ट करून सांगू या. (२१)

शब्द स्पर्श रूप रस गंध । हे पृथ्वीचे गुण विशद ।
ऐसे हे पंचवीस तत्वभेद । सूक्ष्म देहाचे ॥ २२ ॥
शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे स्पष्टपणे पृथ्वीचे गुण आहेत. असे हे सूक्ष्म देहाचे एकूण पंचवीस तत्त्वभेद आहेत. (२२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
तनुचतुष्टयेनाम समास नववा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘तनुचतुष्टयेनाम’ समास नववा समाप्त.


समास दहावा : टोणपसिद्धलक्षण
॥ श्रीराम ॥

आवर्णोदकीं हटकेश्वर । त्यास घडे नमस्कार ।
महिमा अत्यंतचि थोर । तया पाताळलिंगाचा ॥ १ ॥
टोणपसिद्धलक्षण समजा कोणी असे सांगितले की, आवर्णोदकात हाटकेश्वर असून त्या पाताळलिंगाचा महिमा अत्यंत थोर आहे, तरी प्रत्यक्ष तेथे कसे जाता येणार बरे ? म्हणून त्यास फक्त दुरून नमस्कारच घडू शकतो. (१)

परंतु तेथें जाववेना । शरीरें दर्शन घडेना ।
विवेकें आणावें अनुमाना । तया ईश्वरासी ॥ २ ॥
तेथे आपल्याला जाता येत नाही, शरीराने दर्शन घडत नाही, असे झाले तर विचाराने त्या ईश्वरासंबंधी अनुमान करावे. (२)

सातां समुद्रांचे वेडे । उदंड भूमि पैलिकडे ।
सेवटीं तुटले कडे । भूमंडळाचे ॥ ३ ॥
सातासमुद्राच्या वेढ्यापलीकडे उदंड भमी आहे. शेवटी भूमंडळाचे तुटलेले कडे आहेत. (३)

सात समुद्र वोलांडावे । तेथें जाणें कैसें फावे ।
म्हणोन विवेकी असावे । साधुजन ॥ ४ ॥
सात समुद्र ओलांडून तेथे जाणे कसे होईल ? म्हणून साधुजनांनी विवेकानेच त्याचे ज्ञान करून घ्यावे. (४)

जें आपणास नव्हे ठावें । तें जाणतयास पुसावें ।
मनोवेगें तनें फिरावें । हें तों घडेना ॥ ५ ॥
. जे आपल्याला माहीत नसेल, ते जाणत्याला विचारावे, पण शरीराने मनाच्या गतीने फिरावे हे अशक्यच आहे. (५)

जें चर्मदृष्टीस नव्हे ठावें । तें ज्ञानदृष्टीनें पाहावें ।
ब्रह्मांड विवरोन राहावें । समाधानें ॥ ६ ॥
जे चर्मदृष्टीने पाहाता येत नसेल, ते ज्ञानदृष्टीने पहावे. ब्रह्मांडाचे विवरण करून समाधानाने राहावे. (६)

मध्यें आहे भूमीचें चडळ । म्हणौन आकाश आणि पाताळ ।
तें चडळ नस्तां अंतराळ । चहुंकडे ॥ ७ ॥
आकाश आणि पाताळ यांमध्ये हा भूगोलाचा गोळा आहे म्हणून त्यांना वेगळे म्हणायचे. मध्ये हा गोळा नसता तर चहूकडे अंतराळच भरलेले दिसले असते. (७)

तयास परब्रह्म म्हणावें । जें उपाधीवेगळें स्वभावें ।
जेथें दृश्यमायेच्या नांवें । सुन्याकार ॥ ८ ॥
जे स्वाभाविकपणे उपाधिरहित आहे आणि जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार आहे, म्हणून दृश्यमायेचा मागमूसही नाही, त्याला परब्रह्म म्हणावे. (८)

दृष्टीचें देखणें दृश्य । मनाचें देखणें भास ।
मनातीत निराभास । विवेकें जाणावें ॥ ९ ॥
दृष्टीला जे जे दिसते ते दृश्य होय आणि मनाला जे जे दिसते तो भास होय. मनातीत निराभास असे जे ब्रह्म ते विवेकाने जाणून घ्यावे. (९)

दृश्य भास अवघा विघडे । विवेक तेथें पवाडे ।
भूमंडळीं ज्ञाते थोडे । सूक्ष्मदृष्टीचे ॥ १० ॥
दृश्य आणि भास दोन्ही जेथे नष्ट होतात, तेथे विवेकाने जो पोहोचतो, असे सूक्ष्मदृष्टीचे ज्ञाते या भूमंडळावर फार थोडे आहेत. (१०)

वाच्यांश वाचेनें बोलावा । न बोलतां लक्ष्यांश जाणावा ।
निर्गुण अनुभवास आणावा । गुणाचेनयोगें ॥ ११ ॥
वाच्यांश वाचेने बोलावा. न बोलता लक्ष्यांश जाणून घ्यावा आणि अमुक गुण असा असतो हे कळल्यानेच तो गुण जेथे नाही अशा गुणातीताचे आकलन होणे शक्य असते. म्हणून गुणरहित अशा निर्गुणास अनुभवाने जाणावे. (११)

नाना गुणास आहे नाश । निर्गुण तें अविनाश ।
ढोबळ्याहून विशेष । सूक्ष्म देखणें ॥ १२ ॥
अनेक गुण असले तरी ते नाश पावतात. जे निर्गुण आहे ते अविनाशी असते. स्थूल दृष्टीच्या पाहण्यापेक्षा विवेकाचे-सूक्ष्म दृष्टीचे पाहाणे हे श्रेष्ठ होय. (१२)

जें दृष्टीस न पडे ठावें । तें ऐकोन जाणावें ।
श्रवणमननें पडे ठावें । सकळ कांहीं ॥ १३ ॥
जे दृष्टीला दिसू शकत नाही, ते ऐकून जाणून घ्यावे. श्रवण-मनन केल्याने सर्व काही जाणता येते. (१३)

अष्टधेचे जिनस नाना । उदंड पाहातां कळेना ।
अवघें सगट पिटावेना । कोणियेकें ॥ १४ ॥
अष्टधाप्रकृतीचे असंख्य जिन्नस आहेत. ते पाहून त्याचे ज्ञान होत नाही. म्हणून माणसाने, ऐरणीवर सर्व धातू सारखेच समजून पिटल्या जातात, त्याप्रमाणे हे सर्व पदार्थ सारखेच, असे मानू नये. (१४)

सगट सारिखी स्थिती जाली । तेथें परीक्षाच बुडाली ।
चविनटानें कालविलीं । नाना अन्नें ॥ १५ ॥
सर्वांना सरसकट सारखेच मानले तर मग तेथे चांगलेवाईट विनाशी-अविनाशी, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा परीक्षेचे काही काम उरतच नाही. आणि ज्याच्या तोंडाला चव नाही, अशाने सर्व अन्नाचा काला करावा तशी स्थिती होते. (१५)

टोणपा नव्हे गुणग्राहिक । मुर्खास कळेना विवेक ।
विवेक आणि अविवेक । येकचि म्हणती ॥ १६ ॥
मूर्ख असतो तो गुणग्राहक नसतो, त्याला विवेक कळत नाही. असे लोक विवेक आणि अविवेक एकच असे म्हणतात. (१६)

उंच नीच कळेना ज्याला । तेथें अभासचि बुडाला ।
नाना अभ्यासें प्राणियाला । सुटिका कैंची॥ १७ ॥
ज्याला उच्च-नीच असा भेद कळत नाही, त्याला परमार्थाचा अभ्यास करताच येत नाही. इतर नाना विद्यांचा अभ्यास केला तरी त्या माणसाची जन्ममरणचक्रातून सुटका होऊ शकत नाही. (१७)

वेड लागोन जालें वोंगळ । त्यास सारिखेंच वाटे सकळ ।
तें जाणावें बाश्कळ । विवेकी नव्हेती ॥ १८ ॥
एखाद्या माणसाला वेड लागले की त्याला ओंगळ आणि स्वच्छ वगैरे सर्व काही सारखेच वाटू लागते. असे लोक बाष्कळ आहेत, विवेकी नाहीत हे जाणून घ्यावे. (१८)

ज्यास अखंड होतो नाश । त्यासीच म्हणती अविनाश ।
बहुचकीच्या लोकांस । काये म्हणावें ॥ १९ ॥
ज्याचा अखंड नाश होतो, त्यालाच अविनाश म्हणतात. वाचाळ, बहकलेल्या लोकांना काय म्हणावे ? (१९)

ईश्वरें नाना भेद केले । भेदें सकळ सृष्टी चाले ।
आंधळे परीक्षवंत मिळाले । तेथें परीक्षा कैंची ॥ २० ॥
ईश्वरानेच नाना भेद निर्माण केले. भेदाच्या योगे सर्व सृष्टीतील व्यवहार सुरळितपणे चालतात. पण परीक्षा करणाराच जेथे आंधळा असेल, तेथे परीक्षा कशी होणार ? (२०)

जेथें परीक्षेचा अभाव । तो टोणपा समुदाव ।
गुणचि नाहीं गौरव । येईल कैंचें ॥ २१ ॥
जेथे परीक्षेचा अभाव असतो, तो समुदाय टोणप्या लोकांचा आहे, असे जाणावे. गुणच नाही तेथे गुणांचा गौरव कोठून असणार ? (२१)

खरें खोटें येकचि जालें । विवेकानें काय केलें ।
असार सांडून सार घेतलें । साधुजनीं ॥ २२ ॥
जेथे खरे-खोटे यांची सरमिसळ होते. तेथे विवेक काय करतो ? तर साधू लोक विवेक करूनच असार सोडन सार ग्रहण करतात. (२२)

उत्तम वस्तूचि परीक्षा । कैसी घडे नतद्रक्षा ।
दीक्षाहीनापासीं दीक्षा । येईल कैंची ॥ २३ ॥
नतद्रष्ट लोकांना उत्तम वस्तुची पारख कशी होईल ? जो दीक्षाहीन आहे, त्याच्यापाशी दीक्षेचे तेज, सामर्थ्य कसे येणार ? (२३)

आपलेन वोंगळपणें । दिशाकरून शौच्य नेणे ।
वेद शास्त्रें पुराणें । त्यास काये करिती ॥ २४ ॥
एखाद्या अस्वच्छ माणसाने स्वत:च्या ओंगळपणामुळे शौचास जाऊनही नंतर शरीरशुद्धी केली नाही, तर तेथे वेद, शास्त्रे, पुराणे काय करणार ? (२४)

आधीं राखावा आचार । मग पाहावा विचार।
आचारविचारें पैलपार । पाविजेतो ॥ २५॥
आधी आचार शुद्ध राखावा आणि मग विचारशुद्धी पहावी. अशा त-हेने शुद्ध आचार-विचार असेल तर भवसागरातून पार जाता येते. (२५)

जे नेमकास न कळे । तें बश्कळास केवी कळे ।
डोळस ठकती आंधळे । कोण्या कामाचे ॥ २६ ॥
जे नियमनिष्ठ साधक असतात, त्यांनाही परमार्थाचे रहस्य कळत नाही, तेथे बाष्कळ गैरशिस्त लोकांना ते कसे कळणार ? जेथे डोळसही ठकतात, तेथे आंधळे काय कामाचे ? (२६)

पापपुण्य स्वर्ग नर्क । अवघेंच मानिलें येक ।
विवेक आणी अविवेक । काये मानावें ॥ २७ ॥
पाप, पुण्य, स्वर्ग आणि नरक या सर्वाना सारखेच मानले तर मग विवेक आणि अविवेकाची गरज ती काय ? (२७)

अमृत विष येक म्हणती । परी विष घेतां प्राण जाती ।
कुकर्में होते फजिती । सत्कर्में कीर्ति वाढे ॥ २८ ॥
अमृत आणि विष एकच म्हटले तरी विष घेतल्याने प्राण जातात, हे सत्य आहे. कुकर्माच्या योगाने फजिती होते आणि सतकर्माने कीर्ती वाढते. (२८)

इहलोक आणि परलोक । जेथें नाहीं साकल्प विवेक ।
तेथें अवघेच निरार्थक । सकळ कांहीं ॥ २९ ॥
इहलोक असो वा परलोक असो, जेथे सांगोपांग विवेक नसेल, तेथे सर्व काही निरर्थकच ठरते. (२९)

म्हणौन संतसंगेंचि जावें । सत्शास्त्रचि श्रवण करावें ।
उत्तम गुणास अभासावें । नाना प्रयेत्‍नें ॥ ३० ॥
म्हणून माणसाने सत्संगतीतच रहावे. सत्शास्त्रच श्रवण करावे आणि नाना प्रकारे प्रयत्न करून उत्तम गुणांचाच अभ्यास करावा. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
टोणपसिद्धलक्षणनाम समास दहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे टोणपसिद्धलक्षणनाम’ समास दहावा समाप्त.

॥ दशक सतरावा समाप्त ॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: satsangdhara

दासबोध दशक सतरावा