दासबोध दशक तेरावा विडिओ सहित



॥ श्रीमत् दासबोध ॥
॥ दशक तेरावा : नापरूप

समास पहिला : आत्मानात्मविवेक
॥ श्रीराम ॥

आत्मानात्मविवेक करावा । करून बरा विवरावा ।
ववरोन सदृढ धरावा । जीवामधें ॥ १ ॥
माणसाने आत्मानात्मविवेक करावा. त्याचे वारंवार विवरण, चिंतन, मनन, निदिध्यासन करावे आणि तो आपल्या अंत:करणामध्ये दृढपणे धारण करावा. (१)

आत्मा कोण अनात्मा कोण । त्याचें करावें विवरण ।
तेंचि आतां निरूपण । सावध ऐका ॥ २ ॥
आत्मा कोण, अनात्मा कोण याचे विवरण करावे. ते कसे करावे, यासंबंधीचे निरूपण श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. (२)

च्यारि खाणी च्यारि वाणी । चौयासि लक्ष जीवप्राणी ।
संख्या बोलिली पुराणीं । वर्तती आतां ॥ ३ ॥
चार खाणी, चार वाणी यांसह चौऱ्यांशी लक्ष जीव योनीतील असंख्य जीव या पृथ्वीतलावर वावरत आहेत, असे पुराणात वर्णिले आहे. (३)

नाना प्रकारीचीं शरीरें । सृष्टींत दिसती अपारें ।
तयामधें निर्धारें । आत्मा कवणु ॥ ४ ॥
याप्रमाणे या सृष्टीमध्ये नाना प्रकारची अपार शरीरे आहेत. त्यांमध्ये आत्मा कोण हा निर्धार केला पाहिजे. (४)

दृष्टीमधें पाहातो । श्रवणामध्यें ऐकतो ।
रसनेमध्यें स्वाद घेतो । प्रत्यक्ष आतां ॥५ ॥
जो डोळ्यांमध्ये राहून पाहातो, कानांच्या द्वारे ऐकतो, जिभेच्या द्वारे स्वाद घेतो, हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते. (५)

घ्राणामधें वास घेतो । सर्वांगी तो स्पर्शतो ।
वाचेमधें बोलवितो । जाणोनि शब्द ॥ ६॥
नाकाने जो वास घेतो, सर्वांगाने जो स्पर्श करतो, शब्द जाणून जो वाचेच्या द्वारे बोलवितो. (६)

सावधान आणि चंचळ । चहुंकडे चळवळ ।
येकलाचि चालवी सकळ । इंद्रियेंद्वारा ॥ ७ ॥
असा सावधान असूनही जो चंचल असतो आणि चहूकडे जो एकला एक इंद्रियद्वारा सर्व चलनवलन करवितो, (७)

पाये चालवी हात हालवी । भृकुटी पालवी डोळा घालवी ।
संकेतखुणा बोलवी । तोचि आत्मा ॥ ८ ॥
पायांनी चालवतो, हात हालवतो, भुवया ताणतो, डोळे मिचकावतो, संकेताने खुणा करतो तोच आत्मा (८)

धिटाई लाजवी खाजवी । खोंकवी वोकवी थुंकवी ।
अन्न जेऊन उदक सेवी । तोचि आत्मा ॥ ९ ॥
जो धीट होतो, लाजतो, खाजवतो, खोकतो, ओकतो, धुंकवतो, अन्न जेवून जो पाणी पितो, तो आत्माच जाणावा. (९)

मळमूत्रत्याग करी । शरीरमात्र सावरी ।
प्रवृत्ति निवृत्ति विवरी । तोचि आत्मा ॥ १० ॥
जो मळमूत्र त्याग करतो, शरीरमात्राचे रक्षण करतो. प्रवत्ती-निवत्ती म्हणजे काय याचे विवरण करतो, तो आत्माच होय. (१०)

ऐके देखे हुंगे चाखे । नाना प्रकारें वोळखे ।
संतोष पावे आणी धाके । तोचि आत्मा ॥ ११ ॥
जो ऐकतो, पाहतो, हंगतो, चाखतो, नाना प्रकारे पदार्थ ओळखतो, कधी संतोष पावतो, तर कधी भितो. तो आत्माच जाणावा. (११)

आनंद विनोद उदेग चिंता । काया छ्याया माया ममता ।
जीवित्वें पावे नाना वेथा । तोचि आत्मा ॥ १२ ॥
आनंद, विनोद, उद्वेग, चिंता, कायाछाया म्हणजेच बुद्ध्यवच्छिन्न प्रतिबिंब म्हणजेच जीवपणा, तसेच मायाममता अशा नाना व्यथा जो जीवित्वामुळे म्हणजे लघुत्व, कर्तेपणा, मीपणा यांच्यामुळे भोगतो, तोही आत्माच जाणावा. (१२)

पदार्थाची आस्था धरी । जनीं वाईट बरें करी ।
आपल्यां राखे पराव्यां मारी । तोचि आत्मा ॥ १३ ॥
पदार्थाविषयी आसक्ती धरतो, जगात बरे अथवा वाईट करतो, आपले असतील त्यांचा सांभाळ करतो, परके असतील त्यांना मारतो, तो आत्माच जाणावा. (१३)

युध्ये होतां दोहीकडे । नाना शरीरीं वावडे ।
परस्परें पाडी पडे । तोचि आत्मा ॥ १४ ॥
ज्या वेळी एखादे युद्ध सुरू होते, तेव्हा दोन्ही बाजूकडे अनेक शरीरांत आत्माच वावरतो. तोच परस्परांना पाडतो आणि स्वतः पडतोही. (१४)

तो येतो जातो देहीं वर्ततो । हासतो रडतो प्रस्तावतो ।
समर्थ करंटा होतो । व्यापासारिखा ॥ १५
तो आत्मा देहात येतो, देहातून जातो, देहात राहून तोच सर्व क्रिया करतो. तोच हसतो, रडतो, पस्तावतो. ज्याप्रमाणे व्याप असेल, त्याप्रमाणे समर्थ अथवा भाग्यहीनही तोच बनतो. (१५)

होतो लंडी होतो बळकट । होतो विद्यावंत होतो धट ।
न्यायेवंत होतो उत्धट । तोचि आत्मा ॥ १६ ॥
तोच भ्याड होतो, बळकट होतो, विद्यावंत होतो अथवा दांडगट होतो. कधी न्यायवंत तर कधी उद्धट होतो, तो आत्माच जाणावा.. (१६)

धीर उदार आणि कृपेण । वेडा आणि विचक्षण ।
उछक आणि सहिष्ण । तोचि आत्मा ॥ १७ ॥
धीर, उदार अथवा कंजूष, वेडा अथवा चतुर, उच्छृखल आणि सहनशीलही आत्माच होतो. (१७)

विद्या कुविद्या दोहिकडे । आनंदरूप वावडे ।
जेथें तेथें सर्वांकडे । तोचि आत्मा ॥ १८ ॥
विद्या अथवा कुविद्या दोन्हीकडे आनंदरूपाने तोच वावरतो. जेथे तेथे सर्वत्र तो आत्माच सर्व काही (१८)

निजे उठे बैसे चाले । धावे धावडी डोले तोले ।
सोइरे धायेरे केले । तोचि आत्मा ॥ १९ ॥
जो निजतो, उठतो, बसतो किंवा चालतो, धावतो, लगबग करतो, डोलतो, तोलतो, सोयरे वा धायरे करतो. तोही आत्माच होय. (१९)

पोथी वाची अर्थ सांगे । ताळ धरी गाऊं लागे ।
वाद वेवाद वाउगे । तोचि आत्मा ॥ २० ॥
जो पोथी वाचतो, अर्थ सांगतो, ताल धरतो, गाऊ लागतो, उगीचच वादविवाद करतो, तो आत्मा असे जाणावे. (२०)

आत्मा नस्तां देहांतरीं । मग तें प्रेत सचराचरीं ।
देहसंगें आत्मा करीं । सर्व कांहीं ॥ २१ ॥
जर देहात आत्मा नसेल, तर तो देह चराचरात प्रेत बनते. देहाच्या संगतीनेच आत्मा सर्व काही करीत असतो. (२१)

येकेंविण येक काये । कामा नये वायां जाये ।
म्हणोनि हा उपाये । देहयोगें ॥ २२ ॥
देह अनित्य आत्मा नित्य । हाचि विवेक नित्यानित्य ।
अवघें सूक्ष्माचें कृत्य । जाणती ज्ञानी ॥ २३ ॥
एका-शिवाय दुसऱ्याचा काहीही उपयोग नाही. वाया जातो. म्हणून देहामुळेच आत्मा उपयुक्त ठरतो. देह अनित्य आहे, तर आत्मा हा नित्य आहे, असा विवेक करणे यालाच नित्यानित्यविवेक म्हणतात. हा विवेक करण्याचे काम फार सूक्ष्म आहे. (२२-२३)

पिंडी देहधर्ता जीव । ब्रह्मांडीं देहधर्ता शिव ।
ईश्वरतनुचतुष्टये सर्व । ईश्वर धर्ता ॥ २४ ॥
पिंडाच्या ठिकाणी देह धारण करणारास जीव म्हणतात तर ब्रह्मांडात देह धारण करणारा शिव होय. ब्रह्मांडातील विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूलप्रकृती हे सर्व चार देह ईश्वर धारण करतो. (२४)

त्रिगुणापर्ता जो ईश्वर । अर्धनारीनटेश्वर ।
सकळ सृष्टीचा विस्तार । तेथून जाला ॥ २५ ॥
त्रिगुणातीत जो ईश्वर म्हणजेच मूळमाया होय. यालाच अर्धनारीनटेश्वर म्हणतात. त्याच्यापासूनच सर्व सृष्टीचा विस्तार झाला आहे. (२५)

बरवें विचारून पाहीं । स्त्री पुरुष तेथें नाहीं ।
चंचळरूप येतें कांहीं । प्रत्ययासी ॥ २६ ॥
नीट विचार करून पाहिले असता तेथे स्त्री-पुरुष असे काहीही नाही. फक्त चंचलत्व म्हणजे वायूच्या रूपाचा अनुभव तेवढा येतो. (२६)

मुळींहून सेंवटवरी । ब्रह्मादि पिप्लीका देहधारी ।
नित्यानित्य विवेक चतुरीं । जाणिजे ऐसा ॥ २७ ॥
मुळापासून शेवटपर्यंत ब्रह्मादिकांपासून मुंगीपर्यंत सर्व देहधारी आहेत. असा हा नित्यानित्यविवेक चतुर पुरुषांनी जाणून घ्यावा. (२७)

जड तितुकें अनित्य । आणि सूक्ष्म तितुकें नित्य ।
याहिमध्यें नित्यानित्य । पुढें निरोपिलें ॥ २८ ॥
जड तितके अनित्य आणि सूक्ष्म तितके नित्य, याहीपेक्षा अधिक सखोल विचार पुढे केला जाईल. (२८)

स्थूळ सूक्ष्म वोलांडिलें । कारण माहाकाराण सांडिलें ।
विराट हिरण्यगर्भ खंडिलें । विवेकानें ॥ २९ ॥
अव्याकृत मूळप्रकृती। तेथें जाऊन बैसली वृत्ती ।
तें वृत्ति व्हावया निवृत्ति । निरूपण ऐका ॥ ३० ॥
स्थूल, सूक्ष्म ओलांडून जावे, कारण महाकारण देहाचा त्याग केला आणि विवेकाने विराट आणि हिरण्यगर्भाचे खंडण केले की, अव्याकृत जी मूळ प्रकृती तेथे वृत्ती स्थिर होते. ती वृत्ती जाऊन वृत्तिरहित स्थिती होण्यासाठी पुढील निरूपण ऐकावे. (२९-३०)

आत्मानात्माविवेक बोलिला । चंचळात्मा प्रत्यया आला ।
पुढिले समासीं निरोपिला । सारासार विचार ॥ ३१ ॥
या समासात आत्मानात्मविचार सांगितला. आणि चंचलात्मा अनुभवास आला आहे. पुढील समासात सारासारविचार स्पष्ट करून सांगितला आहे. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आत्मानात्माविवेकनाम समास पहिला ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘आत्मानात्मविवेकनाम’ समास पहिला समाप्त.


समास दुसरा : सारासारनिरूपण
॥ श्रीराम ॥

ऐका सारासार विचार । उभारलें जगडंबर ।
त्यांत कोण सार कोण असार । विवेकें वोळखावा ॥ १ ॥
आता सारासारविचार म्हणजे काय ते ऐका. हा विश्वाचा जो अफाट पसारा आहे, त्यात सार कोणते आणि असार कोणते हे विवेकाने ओळखावे. (१)

दिसेल तें नासेल । आणि येईल तें जाईल ।
जें असतचि असेल । तेंचि सार ॥ २ ॥
जे दिसते ते नाश पावते. जे येते ते जाते. जे नेहमी जसेच्या तसे राहाते तेच सार होय. (२)

मागां आत्मानात्माविवेक बोलिला । अनात्मा वोळखोन सांडिला ।
आत्मा जाणतां लागला । मुळींचा मूळतंतु ॥ ३ ॥
मागे आत्मानात्मविवेकासंबंधी बोलणे झाले आहे. अनात्मा कोण हे ओळखून त्याचा त्याग केला. आत्मा कोण हे विवरण करीत असता मूळमायेच्या आरंभापर्यंत धागा हाती आला. (३)

मुळीं जे राहिली वृत्ति । जाली पाहिले निवृत्ति ।
सारासार विचार श्रोतीं । बरा पाहावा ॥ ४॥
मूळ मायेच्या ठिकाणी जी वृत्ती शिल्लक असते, तीही जाऊन वृत्तिरहित झाले पाहिजे. यासाठी श्रोत्यांनी सारासारविवेक चांगल्या प्रकारे करावा. (४)

नित्यानित्य विवेक केला । आत्मा नित्यसा निवडिला ।
निवृतीरूपें हेत उरला । निराकारीं ॥५ ॥
नित्यानित्यविवेक केल्यावर आत्मा नित्य आहे, अशी निवड केली. पण चंचल आत्म्याला पाहिल्यावर निराकाराबद्दलची आशा अजून शिल्लक राहिली. (५)

हेत म्हणिजे तो चंचळ । निर्गुण म्हणिजे निश्चळ ।
सारासारविचारें चंचळ । होऊन जातें ॥ ६॥
आशा ही चंचळ असते. निर्गुण परब्रह्म हे निश्चळ असते. सारासारविचाराने ते चंचल होते आणि नष्ट होते. (६)

चळे म्हणोनि तें चंचळ । न चळे म्हणोनि निश्चळ ।
निश्चळीं उडे चंचळ । निश्चयेसीं ॥ ७ ॥
चळते म्हणूनच त्यास चंचळ म्हणतात आणि चळत नाही म्हणून आत्म्यास निश्चळ म्हणतात. निश्चळाच्या ठिकाणी चंचळ नष्ट होते, हे निश्चयपूर्वक जाणून घ्यावे. (७)

ज्ञान आणि उपासना । दोनी येकचि पाहाना ।
उपासनेकरितां जना । जगोद्धार ॥ ८ ॥
ज्ञान आणि उपासना दोन्ही एकच आहेत. पण उपासनेच्या योगानेच जगाचा उद्धार होतो. (८)

द्रष्टा साक्षी जाणता । ज्ञानधन चैतन्यसत्ता ।
ज्ञान देवचि तत्वता । बरें पाहा ॥ ९ ॥
द्रष्टा, साक्षी, जाणता, ज्ञानघन, चैतन्यसत्ता, ज्ञान, देव ही सर्व एकाच अंतरात्म्याची नावे आहेत, हे समजून घ्यावे. (९)

त्या ज्ञानाचें विज्ञान होतें । शोधून पाहा बहुत मतें ।
चंचळ अवघें नासतें । येणें प्रकारें ॥ १० ॥
त्या ज्ञानाचेच पुढे विज्ञान होते. निरनिराळ्या मतांचा शोध घेतला, तर जे चंचळ असते ते नष्ट होते, असेच सर्वांचे मत असल्याचे दिसून येते. (१०)

नासिवंत नासेल किं नासेना । ऐसा अनुमानचि आहे मना ।
तरी तो पुरुष सहसा ज्ञाना । अधिकार नव्हे ॥ ११ ॥
ज्या पुरुषाच्या मनात जे नाशिवंत आहे, ते नाश पावेल की नाही, अशा प्रकारचा संशय असतो, तो पुरुष सहसा ज्ञानाधिकारी नसतो. (११)

नित्य निश्चये केला । संदेह उरतचि गेला ।
तरी तो जाणावा वाहावला । माहा मृगजळीं ॥ १२ ॥
नित्य निश्चय तर करीत असतो, पण एकीकडे मनातील संदेहही नष्ट होत नाही, असे ज्याच्या बाबतीत घडते, तो मायेच्या महामृगजळात वाहात गेला म्हणून समजावे. (१२)

क्षयेचि नाहीं जो अक्षई । व्यापकपणें सर्वां ठाईं ।
तेथे हेत संदेह नाहीं । निर्विकारीं ॥ १३ ॥
ज्याला क्षयच नाही असे अक्षय परब्रह्म सर्वांच्या ठायी व्यापकपणे ओतप्रोत भरून राहिलेले असते. त्या निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी हेतु अथवा संदेह हे विकार असूच शकत नाहीत. (१३)

जें उदंड घनदाट । आद्य मध्य सेवट ।
अचळ अढळ अतुट । जैसें तैसें ॥ १४ ॥
जे उदंड घनदाट असून आदि, मध्ये आणि शेवटी अचळ, अढळ, अतूट जसेच्या तसेच असते. (१४)

पाहातां जैसें गगन । गगनाहून तें सघन ।
जनचि नाहीं निरंजन । सदोदित ॥ १५ ॥
जे गगनासारखे वाटते, पण गगनाहूनही ओतप्रोत घनदाट आणि सूक्ष्म असते, जेथे काही जन्मलेच नाही असे सदोदित निरंजन असते. (१५)

चर्मचक्षु ज्ञानचक्षु । हा तों अवघाच पूर्वपक्षु ।
निर्गुण ठाईंचा अलक्षु । लक्षवेना ॥ १६ ॥
निरर्थक असते, असे निर्गुण परब्रह्मकी जे सहजच अल ज्याच्यासंबंधी चर्मचक्षु , ज्ञानचक्षु इत्यादी बालणेह असल्याने दुजेपणाने जाणता येत नाही. (१६)

संगत्यागेंविण कांहीं । परब्रह्म होणार नाहीं ।
संगत्याग करून पाहीं । मौन्यगर्भा ॥ १७ ॥
संगत्यागाशिवाय परब्रह्माशी ऐक्य होऊ शकत नाही. म्हणून मीपणाचा त्याग जेव्हा होतो, जेथे स्फुरणादी सर्व वाणी नष्ट होतात. (१७)

निर्शतां अवघेंचि निर्शलें । चंचळ तितुकें निघोन गेलें।
निश्चळ परब्रह्म उरलें । तेंचि सार ॥ १८ ॥
तत्त्वांचे निरसन करता करता सर्वाचेच निरसन होते. चंचळ जितके असते, ते सर्व लय पावते आणि निश्चळ परब्रह्म तेवढे उरते. तेच सार होय. (१८)

आठवा देह मूळ माया । निर्शोन गेल्या अष्टकाया ।
साधु सांगती उपाया । कृपाळुपणें ॥ १९॥
पिंड-ब्रह्मांडाच्या मिळून आठ देहांचे विवेकाने निरसन होऊन आठवा देह जी मूळ माया तीही लय पावावी, म्हणून साधू लोक कृपाळूपणे उपाय सांगतात. (१९)

सोहं हंसा तत्वमसी । तें ब्रह्म तूं आहेसी ।
विचार पाहातां स्थिति ऐसी । सहजचि होते ॥ २० ॥
सोहं, ‘हंसा’, ‘तत्त्वमसि’ ही महावाक्ये निर्देश करतात की ते ब्रह्मच तू आहेस. या महावाक्यांचा उपदेश संत करतात आणि त्यांच्या अर्थाचे निरंतर अनुसंधान केल्याने सहजच त्या परब्रह्माशी ऐक्य होते. (२०)

साधक असोन ब्रह्म उरलें। तेथें वृत्तिसुन्य जालें।
सारासार विचारिलें । येणें प्रकारें ॥ २१ ॥
साधक वेगळा राहून जर ब्रह्म पाहू गेला, तर वृत्तीच्या अंती त्याला शून्यत्वाचीच प्राप्ती होईल. असा धोका असल्याने सारासारविचार अत्यंत दक्षतेने केला पाहिजे. (२१)

तें तापेना ना निवेना । उजळेना ना काळवंडेना ।
डहुळेना ना निवळेना । परब्रह्म तें ॥२२ ॥
जे तापत नाही, निवत नाही, उजळत नाही, काळवंडत नाही, डहुळत नाही, निवळत नाही, ते परब्रह्म होय.(२२)

दिसेना ना भासेना । उपजेना ना नासेना ।
तें येना ना जाईना । परब्रह्म तें ॥ २३ ॥
जे दिसत नाही, भासत नाही, जे उपजत नाही, नाश पावत नाही, जे येत नाही, जात नाही, ते परब्रह्म असे जाणावे. (२३)

तें भिजेना ना वाळेना । तें विझेना ना जळेना।
जयास कोणीच नेईना । परब्रह्म तें ॥२४ ॥
जे भिजत नाही, वाळत नाही, जे विझत नाही, जळत नाही, ज्याला कोणी नेऊ शकत नाही, ते परब्रह्म होय. (२४)

जें सन्मुखचि चहुंकडे । जेथें दृश्य भास उडे ।
धन्य साधु तो पवाडे । निर्विकारीं ॥ २५ ॥
ते परबा चहूकडे सन्मुखच असते. जेथे दृश्य सृष्टीचा भास नाहीसा होतो, अशा निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी जो साधू प्रतिष्ठित होतो, तो धन्य होय. (२५)

निर्विकल्पीं कल्पनातीत । तोचि वोळखावा संत ।
येर अवघेचि असंत । भ्रमरूप ॥ २६ ॥
निर्विकल्पत्वाच्या जाणिवेशिवाय जो निर्विकल्पी मुरून जाईल, ऐक्य पावेल, त्यालाच संत म्हणून ओळखावा. जे असे ऐक्य पावत नाहीत, ते सर्व भ्रमरूप असंत आहेत, असे जाणावे. (२६)

खोटें सांडून खरें घ्यावें । तरीच परीक्षवंत म्हणावें
असार सांडून सार घ्यावें । परब्रह्म तें ॥ २७ ॥
खोटे सोडून खरे जो घेतो त्यालाच पारखी म्हणतात. म्हणून असार सोडून सार असे जे परब्रह्म ते घ्यावे. (२७)

जाणतां जाणतां जाणीव जाते । आपली वृत्ति तद्‌रूप होते ।
आत्मनिवेदन भक्ति ते । ऐसी आहे॥ २८ ॥
त्या परब्रह्मास जाणता जाणता जाणीव जाऊन आपली वृत्ती तद्रूप होते. यालाच आत्मनिवेदन भक्ती असे म्हणतात, हे जाणून घ्यावे. (२८)

वाच्यांशें भक्ति मुक्ति बोलावी । लक्ष्यांशें तद्‌रूपता विवरावी ।
विवरतां हेतु नुरावी । ते तद्रूपता ॥ २९॥
शब्दांच्या योगे भक्ती-मुक्तीचे वर्णन करावे. अर्थातर पाहून तद्रूपता कशी साधता येईल ते विवरावे आणि विवरता विवरता जाणीवही उरू नये. यालाच तद्रूपता असे म्हणतात. (२९)

सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप । सस्वरूप म्हणिजे आपलें रूप ।
आपलें रूप म्हणिजे अरूप । तत्वनिर्शनाउपरी ॥ ३० ॥
जाणीव विवरता विवरताना मीपणाचाही सहज लय होतो. सद्रूप, चिद्रूप आणि तद्रूप तसेच स्वस्वरूप हेच आपले खरे रूप होय. तत्त्वनिरसन केल्यावर अरूप हेच आपले रूप होय, असा साक्षात अनुभव येतो. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सारासारनिरूपणनाम समास दुसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सारासारनिरूपणनाम’ समास दुसरा समाप्त.


समास तिसरा : उभारणीनिरूपण
॥ श्रीराम ॥

ब्रह्म घन आणि पोकळ । आकाशाहून विशाळ ।
निर्मळ आणि निश्चळ । निर्विकारी ॥ १ ॥
ब्रह्म हे घन, पोकळ भासणारे, आकाशाहून विशाल, निर्मळ, निश्चळ आणि निर्विकारी आहे. (१)

ऐसेंचि असतां कित्येक काळ । तेथें आरंभला भूगोळ ।
तया भूगोळांचे मूळ । सावध ऐका ॥ २ ॥
असे ते असता दीर्घकाळ लोटला आणि मग या भूगोलाच्या निर्मितीचा आरंभ झाला. त्या भूगोलाचे मूळ काय आहे ते सावधपणे ऐका. (२)

परब्रह्म असतां निश्चळ । तेथें संकल्प उठिला चंचळ ।
तयास बोलिजे केवळ । आदिनारायेण ॥ ३ ॥
असे ते परब्रह्म निश्चळ असताना तेथे ‘बहु स्याम्’ हा चंचळ संकल्प उठला, त्यालाच केवळ आदि नारायण म्हणतात. (३)

मूळमाया जगदेश्वर । त्यासीच म्हणिजे शड्गुणैश्वर ।
अष्टधा प्रकृतीचा विचार । तेथें पाहा ॥ ४ ॥
यालाच मूळमाया, जगदीश्वर, षड्गुणेश्वर, म्हणतात. तेथे अष्टधा प्रकृती कशी उत्पन्न झाली, तो विचार आता पहा.. (४)

ऐलिकडे गुणक्षोभिणी । तेथें जन्म घेतला त्रिगुणीं ।
मूळ वोंकाराची मांडणी । तेथून जाणावी ॥ ५ ॥
या मूळ मायेतूनच गुणक्षोभिणी माया उत्पन्न झाली. तिच्यापासूनच त्रिगुणांनी जन्म घेतला. मूळ ओंकार तेथूनच उत्पन्न झाला. (५)

अकर उकार मकार । तिनी मिळोन वोंकार ।
पुढें पंचभूतांचा विस्तार । विस्तारला ॥ ६ ॥
अकार, उकार, मकार तिन्ही मिळून ओंकार झाला. यानंतर पंचभूतांचा प्रचंड विस्तार झाला. (६)

आकाश म्हणिजेतें अंतरात्म्यासी । तयापासून जन्म वायोसी ।
वायोपासून तेजासी । जन्म जाला ॥ ७ ॥
अंतरात्म्यालाच आकाश म्हणतात. त्यापासून वायूचा जन्म झाला. वायूपासून तेज उत्पन्न झाले. (७)

वायोचा कातरा घसवटे । तेणें उष्णें वन्हि पेटे ।
सूर्यबिंब तें प्रगटे । तये ठाईं ॥ ८ ॥
वायूमध्ये घर्षण होऊन उष्ण अग्नी प्रगट झाला. त्यातून सूर्यबिंब प्रगट झाले. (८)

वारा वाजतो सीतळ । तेथें निर्माण जालें जळ ।
तें जळ आळोन भूगोळ । निर्माण जाला ॥ ९ ॥
नंतर थंड वारा वाहू लागला. तेथे जळ निर्माण झाले. ते जळ आळून भूगोल म्हणजे पृथ्वी निर्माण झाली. (९)

त्याअ भूगोळाचे पोटीं । अनंत बीजांचिया कोटी ।
पृथ्वी पाण्या होता भेटी । अंकुर निघती ॥ १० ॥
त्या भूगोलाच्या पोटात नाना प्रकारची अनंत बीजे निर्माण झाली. आणि पृथ्वी व पाणी यांच्या मदतीने त्या बीजांतून अंकुर निघाले. (१०)

पृथ्वी वल्ली नाना रंग । पत्रें पुष्पांचे तरंग ।
नाना स्वाद ते मग । फळें जाली ॥ ११॥
पृथ्वीवर नाना रंगांच्या नाना वेली, पाने, फुले यांची निर्मिती झाली. मग अनेक प्रकारची चव असलेली अनेक फळे उत्पन्न झाली. (११)

पत्रें पुष्पें फळें मुळें । नाना वर्ण नाना रसाळें।
नाना धान्यें अन्नें केवळें । तेथून जालीं ॥ १२॥
पाने, फुले, फळे, मुळे, नाना वर्णाची, नाना प्रकारच्या रसांनी युक्त अशी नाना अन्नधान्ये वगैरे सर्व पृथ्वी व जलाच्या संयोगानेच निर्माण झाली. (१२)

अन्नापासून जालें रेत । रेतापासून प्राणी निपजत ।
ऐसी हे रोकडी प्रचित । उत्पत्तीची ॥ १३ ॥
अन्नापासून वीर्य झाले आणि त्यापासून प्राणी उत्पन्न झाले. याप्रकारे या उपत्तीची रोकडी प्रचीती सर्वांना येते. (१३)

अंडज जारज श्वेतज उद्वीज । पृथ्वी पाणी सकळांचे बीज ।
ऐसें हें नवल चोज । सृष्टिरचनेचें ॥ १४ ॥
अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज या सर्वांची उत्पत्ती पृथ्वी आणि जल तत्त्वामुळे झाली. हे या सृष्टिरचनेचे मोठे नवल आहे. (१४)

च्यारि खाणी च्यारि वाणी । चौयासि लक्ष जीवयोनी ।
निर्माण झाले लोक तिनी । पिंडब्रह्मांड ॥ १५ ॥
चार खाणी, चार वाणी, चौऱ्यांशी लक्ष जीवयोनी, तसेच पिंड व ब्रह्मांड, तसेच तिन्ही लोक यांची याप्रमाणे उत्पत्ती झाली. (१५)

मुळीं अष्टधा प्रकृती । अवघे पाण्यापासून जन्मती ।
पाणी नस्तां मरती । सकळ प्राणी ॥ १६ ॥
मूळची ही अष्टधा प्रकृती. सर्व प्राणी पाण्यापासून जन्मतात. पाणी नसेल तर कोणीही जिवंत राहू शकणार नाही. (१६)

नव्हे अनुमानाचें बोलणें । याचा बरा प्रत्ययें घेणें ।
वेदशास्त्रें पुराणें । प्रत्ययें घ्यावीं ॥ १७ ॥
हे बोलणे अनुमानाचे नाही. याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा. वेद-शास्त्र-पुराणे ही अनुभवाने जाणून घ्यावीत. (१७)

जें आपल्या प्रत्यया येना । तें अनुमानिक घ्यावेना ।
प्रत्ययाविण सकळ जना । वेवसाये नाहीं ॥ १८॥
जे आपल्या अनुभवाला येत नसेल, अशा काल्पनिक गोष्टींचा कधी स्वीकार करू नये. अनुभवाशिवाय सर्व लोकांना प्रपंचात अथवा परमार्थातही दुसरा आधार (१८)

वेवसाये प्रवृत्ती निवृत्ती । दोहिंकडे पाहिजे प्रचिती ।
प्रचितीविण अनुमानें असती। ते विवेकहीन ॥ १९ ॥
व्यवसाय प्रपंचाचा असो वा परमार्थाचा असो, दोन्हीकडे प्रचीती असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रचीतीखेरीज जे लोक केवळ अनुमानावर विसंबून राहतात, ते विवेकहीन असतात. (१९)

ऐसा सृष्टिरचनेचा विचार । संकळित बोलिला प्रकार ।
आतां विस्ताराचा संहार । तोहि ऐका ॥ २० ॥
असा हा सृष्टिरचनेसंबंधीचा विचार येथे संकलित करून सांगितला आहे. आता या विस्ताराचा संहार कसा होतो, तेही ऐका. (२०)

मुळापासून सेवटवरी । अवघा आत्मारामचि करी ।
करी आणि विवरी । येथायोग्य ॥ २१ ॥
मुळापासून शेवटापर्यंत सर्व काही आत्मारामच करत असतो. तोच करतो आणि तोच यथायोग्य विवरणही करतो. (२१)

पुढेंसंव्हार निरोपिला । श्रोतीं पाहिजे ऐकिला ।
इतुक्याउपरी जाला । समास पूर्ण ॥ २२ ॥
पुढील समासात संहाराचे वर्णन केले आहे. ते श्रोत्यांनी ऐकले पाहिजे. इतक्यावर हा समास येथे पूर्ण झाला आहे. (२२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
उभारणिनिरूपणनाम समास तिसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘उभारणीनिरूपणनाम’ समास तिसरा समाप्त.


समास चौथा : प्रलयनिरूपण
॥ श्रीराम ॥

पृथ्वीस होईल अंत । भूतांस मांडेल कल्पांत ।
ऐसा समाचार साध्यंत । शास्त्रीं निरोपिला ॥ १ ॥
पृथ्वीचा अंत होईल, सर्व भूते कल्पांताच्या वेळी नाश पावतील, असे शास्त्रांत सविस्तर वर्णन केले आहे. (१)

शत वरुषें अनावृष्टि । तेणें जळेल हे सृष्टि ।
पर्वत माती ऐसी पृष्ठी । भूमीची तरके ॥ २ ॥
शंभर वर्षे अनावृष्टी होईल. पाऊसच न पडल्याने ही सर्व सृष्टी जळून जाईल. पर्वत मावतील अशा पृथ्वी तडकून मोठमोठ्या भेगा पडतील. (२)

बारा कळीं सूर्यमंडळा । किर्णापासून निघती ज्वाळा ।
शत वरुषें भूगोळा । दहन होये ॥ ३ ॥
सूर्य बारा कलांनी तापू लागेल. त्यामुळे त्याच्या किरणांतून ज्वाला निघून शंभर वर्षे भूगोल जळत राहील. (३)

सिंधुरवर्ण वसुंधरा । ज्वाळा लागती फणिवरा ।
तो आहाळोन सरारां । विष वमी ॥ ४ ॥
पृथ्वी जळत असता शेंदरी रंगाच्या ज्वाळा उत्पन्न होऊन त्या शेषापर्यंत पोहोचतील. तेव्हा पोळल्याने कळवळून तो भयंकर विष ओकू लागेल. (४)

त्या विषाच्या ज्वाळा निघती । तेणें पाताळें जळती ।
माहापावकें भस्म होती। पाताळ लोक ॥ ५ ॥
त्या विषापासून ज्वाळा निघून त्यामुळे पाताळ जळू लागेल. त्या महाअग्ने सर्व पाताळलोक जळून भस्म होतील. (५)

तेथें माहाभूतें खवळती । प्रळयेवात सुटती ।
प्रळयेपावक वाढती। चहूंकडे ॥ ६ ॥
त्यामुळे पंचमहाभूते खवळतील आणि प्रलयकालचा वारा वाहू लागून त्यामुळे चहूकडे प्रलयाग्नी पसरेल. (६)

तेथें अक्रा रुद्र खवळले । बारा सूर्य कडकडिले ।
पावकमात्र येकवटले । प्रळयेकाळीं ॥ ७ ॥
त्या वेळी अकरा रुद्र खवळतील, बारा सूर्य कडाडतील, प्रलयकाळी सर्व अग्नी एकवटतील. (७)

वायो विजांचे तडाखे । तेणें पृथ्वी अवघी तरखे ।
कठिणत्व अवघेंचि फांके । चहुंकडे ॥ ८ ॥
वारा आणि वीज यांच्या तडाख्याने अवघी पृथ्वी तडकेल. तिचे कठिणत्व चहूंकडे पसरेल. (८)

तेथें मेरूची कोण गणना । कोण सांभाळिल कोणा ।
चंद्र सूर्य तारांगणा । मूस जाली ॥ ९ ॥
तेथे मेरूची काय कथा? तेथे कोण कोणाला सांभाळू शकेल? चंद्र, सूर्य, तारांगण सर्व वितळून एकवटतील. (९)

पृथ्वीनें विरी सांडिली । अवघी धगधगायेमान जाली ।
ब्रह्मांडभटी जळोन गेली । येकसरां ॥ १० ॥
सारी पृथ्वी काठिण्य सोडून धगधगायमान होऊन ब्रह्मांडभर झालेल्या वह्नीच्या भट्टीत एकाच वेळी जळून जाईल. (१०)

जळोनि विरी सांडिली । विशेष माहावृष्टी जाली ॥
तेणें पृथ्वी विराली। जळामधें ॥ ११ ॥
जलानेही सत्त्व सोडले की, विशेष महावृष्टी होऊन त्या जलात पृथ्वी विरून जाईल. (११)

भाजला चुना जळीं विरे । तैसा पृथ्वीस धीर न धरे ।
विरी सांडुनिया त्वरें । जळीं मिळाली ॥ १२ ॥
भाजलेला चुना जसा त्वरित पाण्यात विरून जातो, तसा पृथ्वीलाही धीर धरवत नाही आणि सत्त्व सोडून ती त्वरेने जलात विरून जाते. (१२)

शेष कूर्म वार्‍हाव गेला । पृथ्वीचा आधार तुटला ।
सत्व सांडून जळाला । मिळोन गेली ॥ १३॥
शेष, कूर्म, वराह सर्व नष्ट झाल्याने पृथ्वीचा आधार नाहीसा होऊन ती सत्त्व सोडून पाण्यात मिसळून जाते. (१३)

तेथें प्रळयेमेघ उचलले । कठिण घोषें गर्जिनले ।
अखंड विजा कडकडिले । ध्वनि घोष ॥१४ ॥
तेथे प्रलयमेघ उत्पन्न होऊन मोठमोठ्याने गर्जना करू लागतात. त्यात अखंड विजा मोठमोठ्याने आवाज करीत कडाडू लागतात. (१४)

पर्वतप्राये पडती गारा । पर्वत उडती ऐसा वारा ।
निबिड तया अंधकारा। उपमाचि नाहीं ॥ १५ ॥
पर्वतासारख्या मोठमोठ्या गारा पडू लागतात, पर्वतही उडून जातील अशा वेगाने वारा वाहू लागतो आणि इतका घनदाट अंधकार पसरतो की, त्याला उपमाच देता येत नाही. (१५)

सिंधु नद्या एकवटल्या । नेणो नभींहून रिचवल्या ।
संधिच नाहीं धारा मिळाल्या । अखंड पाणी ॥ १६ ॥
मोठमोठ्या नद्या आणि समुद्र एक होतात. आकाशातून जलधारा अशा वाहू लागतात की, आकाशातूनच रिचवल्याप्रमाणे दोन धारांमध्ये जराही पोकळी राहात नाही. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होते. (१६)

तेथें मछ मूर्म सर्प पडती । पर्वतासारिखे दिसती ।
गर्जना होतां मिसळती । जळांत जळें ॥ १७ ॥
तेथे पर्वतासारखे मत्स्य, कर्म, सर्प वगैरे पाण्यात पडले आणि घनगर्जना झाली की, सर्व पाणी एक होते. (१७)

सप्त सिंधु आवर्णीं गेले । आवर्णवेडे मोकळे जाले ।
जळरूप जालियां खवळले । प्रळयेपावक ॥ १८ ॥
सप्तसमुद्र सर्व एक झाले, समुद्राने मर्यादा सोडली, जेव्हा सर्व जलरूप झाले, तेव्हा प्रलयाग्नी खवळले. (१८)

ब्रह्मांडाऐसा तप्त लोहो । शोषी जळाचा समूहो ।
तैसे जळास जालें पाहो । अपूर्व मोठें॥ १९ ॥
ब्रह्मांडाएवढा तापलेल्या लोखंडाचा गोळा होऊन त्याने सर्व जलसमूह शोषून टाकले. त्याप्रमाणे जलाच्या ठिकाणीही मोठे अपूर्व घडले. (१९)

तेणें आटोन गेलें पाणी । असंभाव्य माजला वन्ही ।
तया वन्हीस केली झडपणी । प्रळयवातें ॥ २० ॥
सर्व पाणी आटून गेले आणि प्रलयाग्नी असंभाव्य असा माजला. त्या अग्नीला नंतर प्रलयवाताने झडपले. (२०)

दीपास पालव घातला । तैसा प्रळयेपावक विझाला ।
पुढें वायो प्रबळला । असंभाव्य ॥ २१ ॥
दिव्याला पदराने वारा घातल्यावर तो विझावा, तसा प्रलयवाताने प्रलयाग्नी विझून गेला आणि पुढे प्रलयवातच असंभाव्य असा खवळला. (२१)

उदंड पोकळी थोडा वारा । तेणें वितळोन गेला सारा ।
पंचभूतांचा पसारा । आटोपला ॥ २२ ॥
पण आकाशाची पोकळी इतकी विशाल आणि त्या मानाने तो प्रलयवात अगदीच थोडा. त्यामुळे त्या पोकळीत तो सर्व वितळून गेला. याप्रमाणे पंचमहाभूतांचा सर्व पसारा नष्ट झाला. (२२)

महद्भूात मूळमाया। विस्मरणें वितुळे काया ।
पदार्थमात्र राहावया । ठाव नाहीं॥ २३ ॥
महद्भूत जी मूळ माया तीही ‘बहु स्याम्’ या स्मरणाचेही विस्मरण झाल्याने स्वप्नाप्रमाणेच नष्ट झाली. त्यामुळे पदार्थमात्रास ठावच राहिला नाही. (२३)

दृश्य हलकालोळें नेलें । जड चंचळ वितुळलें ।
याउपरी शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २४ ॥
सर्व दृश्य सृष्टी हलकल्लोळाने नाहीशी झाली. जड चंचळ मूळ माया वितळून गेली. याप्रमाणे नंतर केवळ शाश्वत परब्रह्म उरले. (२४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
प्रळयेनाम समास चौथा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘प्रलयनाम’ समास चौथा समाप्त.


समास पाचवा : कहाणीनिरूपण
॥ श्रीराम ॥

कोणी येक दोघे जण । पृथ्वी फिरती उदासीन ।
काळक्रमणें लागून । कथा आरंभिली ॥ १ ॥
कुणी दोघे मित्र पृथ्वीवर अनासक्तपणे हिंडत होते. वेळ चांगल्या प्रकारे जावा, म्हणून त्यांनी कथा सांगायला आरंभ केला. (१)

श्रोता पुसे वक्तयासी । काहाणी सांगा जी बरवीसी ।
वक्ता म्हणे श्रोतयासी । सावध ऐकें ॥ २ ॥
हे ऐकून श्रोता वक्त्यास म्हणाला की, एखादी छानशी गोष्ट सांगा ना ! तेव्हा वक्ता श्रोत्याला म्हणाला की, कहाणी सांगतो. तू सावधपणे ऐक. (२)

येकें स्त्रीपुरुषें होतीं । उभयेतांमधें बहु प्रीति ।
येकरूपेंचि वर्तती । भिन्न नाहीं ॥ ३ ॥
एक स्त्री आणि एक पुरुष यांचे जोडपे होते. त्या उभयतांमध्ये अत्यंत प्रीती होती. त्यांच्यात जराही भिन्नत्व नव्हते. दोघे अगदी एकमताने एकरूप असल्यासारखी वागत असत. (३)

ऐसा कांहीं येक काळ लोटला । तयांस येक पुत्र जाला ।
कार्यकर्ता आणि भला । सर्वविषीं ॥ ४ ॥
असा काही काळ लोटला तेव्हा त्यांना (जाणीवरूप विष्णू) एक पुत्र झाला. तो सर्व बाबतीत चांगला असून, मोठा कार्यकर्ता होता. (४)

पुढें त्यासहि जाला कुमर । तो पित्याहून आतुर ।
कांहीं तदर्ध चतुर । व्यापकपणें ॥ ५ ॥
पुढे त्या पुत्रालाही एक कुमार (ब्रह्मदेव) झाला. तो पित्यापेक्षाही उतावळ्या स्वभावाचा आणि व्यापकपणे पित्यापेक्षा अर्धचतुर होता. (५)

तेणें व्याप उदंड केला । बहुत कन्यापुत्र व्याला ।
उदंड लोक संचिला । नाना प्रकारें ॥ ६ ॥
त्याने व्याप खूप वाढवला आणि अनेक कन्यापुत्रांना जन्म दिला. याप्रमाणे नाना प्रकारचे असंख्य लोक निर्माण झाले. (६)

त्याचा पुत्र जेष्ठ । तो अज्ञान आणि रागिट ।
अथवा चुकता नीट । संव्हार करी ॥ ७ ॥
त्याचा सर्वांत ज्येष्ठ पुत्र (शंकर) अत्यंत अज्ञानी आणि रागीट होता. कुणाचे जरा काही चुकले की, तो संहार करी. (७)

पिता उगाच बैसला । लेकें बहुत व्याप केला ।
सर्वज्ञ जाणता भला । जेष्ठ पुत्र ॥ ८ ॥
पिता (मूळ पुरुष) स्वस्थ बसून राहिला होता. त्याच्या लेकाने (म्हणजे विष्णूने) खूप व्याप वाढवला. तो ज्येष्ठ पुत्र चांगला जाणता आणि सर्वज्ञ होता. (८)

नातु त्याचें अर्ध जाणें । पणतु तो कांहींच नेणे ।
चुकतां संव्हारणें । माहा क्रोधी ॥ ९ ॥
नातू होता तो अर्धेच जाणत होता, तर पणतू काहीच जाणत नव्हता. तो महाक्रोधी होता आणि कुणी चुकले की त्याचा संहार करी. (९)

लेक सकळांचे पाळण करी । नातु मेळवी वरिचावरी ।
पणतु चुकल्यां संव्हार करी । अकस्मात ॥ १० ॥
सर्वांचे पालन-पोषण करीत असे. नातू वारंवार प्रजा वाढवी. तर पणतू कुणी चुकले असता अकस्मात संहार करी. (१०)

नेमस्तपणें वंश वाढला । विस्तार उदंडचि जाला ।
ऐसा बहुत काळ गेला । आनंदरूप ॥ ११ ॥
याप्रमाणे नियमितपणे वंश वाढत गेला आणि प्रचंड विस्तार झाला. प्रथम बराच काळ मोठ्या आनंदात गेला. (११)

विस्तार वाढला गणवेना । वडिलांस कोणीच मानिना ।
परस्परें किंत मना । बहुत पडिला ॥ १२ ॥
विस्तार इतका वाढला की, मोजदाद करणे अशक्य झाले. पुढे वडिलांना कुणी मानेनासे झाले. सर्वांच्या मनात परस्परांबद्दल संशय वाढू लागला. (१२)

उदंड घरकळ्हो लागला । तेणें कित्येक संव्हार जाला ।
विपट पडिलें थोर थोरांला । बेबंद जालें ॥ १३ ॥
उदंड गृहकलह सुरू होऊन त्यामुळे कित्येकांचा संहार झाला. थोरामोठ्यांतही वितुष्ट आले आणि बेबंदशाही माजली. (१३)

नेणपणें भरी भरले । मग ते अवघेच संव्हारले ।
जैसे यादव निमाले । उन्मत्तपणें ॥ १४ ॥
अज्ञानाच्या भराने ते उन्मत्त झाले आणि मग सर्वांचाच, यादव जसे उन्मत्तपणे एकमेकांशी भांडून मेले, त्याप्रमाणे संहार झाला. (१४)

बाप लेक नातु पणतु । सकळांचा जाला निपातु ।
कन्या पुत्र हेतु मातु । अणुमात्र नाहीं ॥ १५ ॥
बाप, लेक, नातू, पणतू सगळ्यांचा संहार झाला. आणि कन्या, पुत्र, पणतू, नातू यांपैकीही कोणी शिल्लक उरले नाही. (१५)

ऐसी काहाणी जो विवरला । तो जन्मापासून सुटला ।
श्रोता वक्ता धन्य जाला । प्रचितीनें ॥ १६ ॥
अशा या कहाणीचे जो विवरण करील तो जन्ममरणचक्रातून सुटेल. याची प्रचीती घेतल्याने श्रोता आणि वक्ता दोघेही धन्य झाले. (१६)

ऐसी काहाणी अपूर्व जे ते । उदंड वेळ होत जाते ।
इतकें बोलोन गोसावी ते । निवांत जाले ॥ १७ ॥
अशी ही अपूर्व कहाणी नित्य होत-जात असते. इतके बोलून श्रीगुरू निवांत झाले. (१७)

आमची काहाणी सरो । तुमचे अंतरीं भरो ।
ऐसें बोलणें विवरो । कोणीतरी ॥ १८ ॥
आमची कहाणी सरो आणि तुमचे अंतरांत भरून राहो. असे बोलून वक्ता म्हणतो की, या कहाणीचे कुणीतरी मनन करावे. (१८)

चुकत वांकत आठवलें । एतुकें संकळित बोलिलें ।
न्यूनपूर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ १९ ॥
चुकत-माकत जेवढे आठवले तेवढे संकलित करून येथे सांगितले. त्यात अधिक उणे काही झाले असेल, तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे. (१९)

ऐसी काहाणी निरंतर । विवेकें ऐकती जे नर ।
दास म्हणे जग्गोधार । तेचि आरिती ॥ २० ॥
अशी ही कहाणी जे नर निरंतर विचारपूर्वक ऐकतील रामदास म्हणतात की, ते जगदुद्धार करतील. (२०)

त्या जगोद्धाराचें लक्षण । केले पाहिजे विवरण ।
सार निवडावें निरूपण । यास बोलिजे ॥ २१ ॥
तो जगदुद्धार कसा होईल, ते लक्षण ऐका. या कहाणीचे विवरण करून त्यातून सार निवडावे. यालाच निरूपण म्हणतात. (२१)

निरूपणीं प्रत्ययें विवरावें । नाना तत्वकोडें उकलावें ।
समजतां समजतां व्हावें । निःसंदेह ॥ २२ ॥
निरूपण लक्षपूर्वक ऐकावे. त्याची आपल्या अनुभवाशी सांगड घालून ते नीट समजून घ्यावे. म्हणजे त्यातील अनेक तत्त्वांचा उलगडा होईल आणि समजता समजता स्वानुभव येऊन श्रोता नि:संदेह होईल.(२२)

विवरोन पाहातां अष्ट देह । पुढें सहजचि निःसंदेह ।
अखंड निरूपणें राहे । समाधान ॥ २३ ॥
पिंडाचे चार आणि ब्रह्मांडाचे चार मिळून जे अष्ट देह आहेत, त्यांचे विवरण करून पाहिले पाहिजे. साहजिकच श्रोता नि:संदेह होतो. मात्र, अखंड निरूपण करीत राहिल्यानेच शाश्वत समाधान प्राप्त होते. (२३)

तत्वांचा गल्बला जेथें । निवांत कैचें असेल तेथें ।
याकारणें गुल्लिपरतें । कोणीयेकें असावें ॥ २४ ॥
जेथे तत्त्वांचा गलबला असेल, तेथे निवांतपणा कसा असेल? म्हणून या घोटाळ्यापासून कोणी एकाने नेहमी अलिप्त असावे. (२४)

ऐसा सूक्ष्म संवाद । केलाचि करावा विशद ।
पुढिले समासीं लघुबोध । सावध ऐका ॥ २५ ॥
असा हा सूक्ष्म संवाद पुन्हा पुन्हा स्पष्ट करून समजून घ्यावा. आता पुढील समासात लघुबोध सांगितला जाईल. तो श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावा. (२५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कहाणीनिरूपणनाम समास पांचवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘कहाणीनिरूपणनाम’ समास पाचवा समाप्त.


समास सहावा : सृष्टिक्रमनिरूपण
॥ श्रीराम ॥

जें बोलिजेती पंचतत्वें । त्यांची अभ्यासाया नावें ।
तदुपरी स्वानुभवें । रूपीं जाणावीं ॥ १ ॥
ज्यांना पंचतत्त्वे म्हणतात, त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची नावे आधी ऐका आणि त्यानंतर स्वानुभवाने त्यांचे रूप जाणून घ्या. (१)

यामधें शाश्वत कोण । आणी अशाश्वत कोण ।
ऐसें करावें विवरण । प्रत्ययाचें ॥ २ ॥
नंतर यामध्ये शाश्वत कोणते, अशाश्वत कोणते हे अनुभव घेऊन विवरण करून जाणून घ्यावे. (२)

पंचभूतांचा विचार । नांवरूप सारासार ।
तोचि बोलिला निर्धार । सावध अईका ॥ ३ ॥
पंचभूतांच्या नावा-रूपासंबंधी जो विचार त्यालाच सारासारविचार म्हणतात. त्यासंबंधीचा निर्धार आता सावधपणे ऐका. (३)

पृथ्वी आप तेज वायो आकाश । नावें बोलिलीं सावकास ।
आतां रूपाचा विश्वास । श्रवणें धरावा ॥ ४ ॥
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशी या पंचमहाभूतांची नावे आहेत. आता रूपाचा विश्वास श्रवणाच्या योगे धरावा. (४)

पृथ्वी म्हणिजे ते धरणी । आप म्हणिजे तें पाणी ।
तेज म्हणिजे अग्नि तरणी । सतेजादिक ॥ ५ ॥
पृथ्वी म्हणजे जमीन, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, सूर्य इत्यादी सतेज पदार्थ होत. (५)

वायो म्हणिजे तो वारा । आकाश म्हणिजे पैस सारा ।
आतां शाश्वत तें विचारा । आपले मनीं॥ ६ ॥
वायू म्हणजे वारा, आकाश म्हणजे सारी जागा. आता आपल्या मनात शाश्वत काय याचा विचार करावा. (६)

येक शीत चांचपावें। म्हणिजे वर्म पडे ठावें ।
तैसें थोड्या अनुभवें । बहुत जाणावे ॥ ७ ॥
भाताचे एक शीत चाचपले, तरी सबंध भात कच्चा की पक्का याची परीक्षा होते. त्याप्रमाणे थोड्याशा अनुभवाने बरेच काही जाणून घ्यावे. (७)

पृथ्वी रचतें आणि खचतें । हें तों प्रत्ययास येतें ।
नाना रचना होत जाते । सृष्टिमधें ॥ ८ ॥
पृथ्वी रचते आणि खचते हे तर आपल्या अनुभवास येतच असते. या सृष्टीमध्ये नाना रचना होतात आणि जातात. (८)

म्हणौन रचतें तें खचतें । आप तें हि आटोन जाते ।
तेज हि प्रगटोन विझतें । वारें हि राहे ॥९ ॥
म्हणून जे रचते ते खचते हे जाणून घ्यावे. पाणीही आटून जाते. तेजही प्रगटते आणि कालांतराने विझून जाते. वाराही लय पावतो. (९)

अवकाश नाममात्र आहे । तें हि विचारिता न राहे ।
एवं पंचभूतिक राहे । हें तों घडेना ॥ १० ॥
अवकाश हे नाममात्रच असते. जास्त विचार केल्यास तेही राहात नाही. म्हणजेच पांचभौतिक असते, ते राहात नाही, हे जाणावे. (१०)

ऐसा पांचा भूतांचा हा विस्तार । नासिवंत हा निर्धार ।
शाश्वत आत्मा निराकार । सत्य जाणावा ॥ ११ ॥
याप्रमाणे पंचमहाभूतांचा हा जो विस्तार आहे, तो सर्व नाशिवंत आहे, असा निर्धार झाला. फक्त निराकार आत्मा तेवढा सत्य, शाश्वत आहे, हे जाणून घ्यावे.(११)

तो आत्मा कोणास कळेना । ज्ञानेंविण आकळेना ।
म्हणोनियां संतजना । विचारावें ॥ १२ ॥
तो आत्मा कुणालाही कळून येत नाही. ज्ञानानेच त्याला जाणता येते. म्हणूनच संतजनांना त्यासंबंधी विचारावे. (१२)

विचारितां सज्जनांसी । ते म्हणती कीं अविनासी ।
जन्म मृत्यु आत्मयासी । बोलोंच नये ॥ १३ ॥
सज्जनांना विचारले की. ते म्हणतात की, आत्मा हा अविनाशी आहे. आत्म्याला जन्म-मृत्यू आहेत, असे बोलूसुद्धा नये. (१३)

निराकारीं भासे आकर । आणी आकारीं भासे निराकार ।
निराकार आणी आकार । विवेकें वोळखावा ॥ १४ ॥
निराकाराच्या (आत्म्याच्या) ठिकाणी (जगाचा) आकाराचा भास होतो आणि आकाराच्या ठिकाणी निराकार भासते. म्हणून निराकार आणि आकार कोणते ते विवेकाने ओळखावे. (१४)

निराकार जाणावा नित्य । आकार जाणावा अनित्य ।
यास बोलिजे नित्यानित्य । विचारणा ॥ १५ ॥
निराकार जे असते ते नित्य आणि आकार असतो ते अनित्य हे जाणून घ्यावे. यालाच नित्यानित्यविचारणा असे म्हणतात. (१५)

सारीं भासे असार । आणि असारीं भासे सार ।
सारासार विचार । शोधून पाहावा ॥ १६ ॥
सार जे असते ते असार भासते आणि असार असते ते सार भासते. म्हणून सारासारविचाराने सार काय ते शोधून पाहावे. (१६)

पंचभूतिक तें माइक । परंतु भासे अनेक ।
आणि आत्मा येक । व्यापून असे ॥ १७ ॥
पांचभौतिक जे जे असते ते ते मायिक असते आणि ते अनेक रूपांत भासते. आणि आत्मा एकच असून, तो सर्वांना व्यापून असतो. (१७)

चहुं भूतांमधें गगन । तैसें गगनीं असे सघन ।
नेहटून पाहतां अभिन्न । गगन आणि वस्तु ॥ १८ ॥
चारी महाभूतांमध्ये गगन व्याप्त असते. तसे गगनात सूक्ष्म ब्रह्म व्याप्त असते. नीट विचारपूर्वक पाहिले असता गगन आणि आत्मवस्तू अभिन्न आहेत, हे कळून येते. (१८)

उपाधीयोगेंचि आकाश । उपाधी नस्तां निराभास ।
निराभास तें अविनाश । तैसें गगन ॥ १९ ॥
उपाधीयोगेच त्याला आकाश म्हणावे लागते. (एक भूत म्हणून गणावे लागते.) उपाधी नसेल, तर ते निराभास जाणावे. जे निराभास असते ते अविनाशी असते. तसेच गगन जाणावे (१९)

आतां असो हे विवंचना । परंतु जें पाहातां नासेना ।
तें गे तेंचि अनुमाना । विवेकें आणावें ॥ २० ॥
आता ही विवंचना राहू दे. परंतु जे पाहिले असता नाश पावत नाही, तेच विवेकाने अनुमानात आणावे. (२०)

परमात्मा तो निराकार । जाणिजे हा विचार सार ।
आणी आपण कोण हा विचार । पाहिला पाहिजे ॥ २१ ॥
परमात्मा हा निराकार असून त्याला जाणणे, हेच सर्व विचाराचे सार आहे. याखेरीज आपण कोण हा विचारही केला पाहिजे. (२१)

देहास अंत येतां । वायो जातो तत्वता ।
हें लटिकें म्हणाल तरी आतां । स्वासोस्वास धारावा ॥ २२ ॥
देहाचा जेव्हा अंत होतो, तेव्हा तत्त्वतः त्यातून वायू निघून जातो. हे जर खोटे म्हणत असाल, तर श्वासोच्छ्वास कोंडून धरून पाहावा. (२२)

स्वास कोंडतां देह पडे । देह पडतां म्हणती मडें ।
मड्यास कर्तुत्व न घडे । कदाकाळीं ॥ २३ ॥
श्वास कोंडला गेला की देह पडतो. असा देह पडला की त्याला मढे म्हणतात आणि मढ्याला कधीही कर्तृत्व नसते. (२३)

देहावेगळा वायो न करी । वायोवेगळा देह न करी ।
विचार पाहातां कांहींच न करी । येकावेगळें येक ॥ २४ ॥
देहावेगळा वायू काही करू शकत नाही आणि वायुवेगळा देहही काही करू शकत नाही. विचार करून पाहिले असता कळून येते की, एकाशिवाय दुसरा काहीच करू शकत नाही. (२४)

उगेंच पाहातं मनुष्य दिसे । विचार घेतां कांहीं नसे ।
अभेदभक्तीचें लक्षण ऐसें । वोळखावें ॥ २५ ॥
उगीच वरवर पाहता मनुष्य दिसतो, पण विचार करता स्वरूपाशिवाय इतर काहीच राहात नाही. अभेदभक्तीचे लक्षण हे असे ओळखावे. (२५)

कर्ता आपण ऐसे म्हणावें । तरी आपलें इछेसारिखें व्हावें ।
इछेसारिखें न होतां मानावें । अवघेंच वाव ॥ २६ ॥
आपण कर्ता असे म्हणावे, तर मग आपल्या इच्छेप्रमाणे कार्य व्हावयास हवे. पण तसे ते होतेच असे नाही. कार्य इच्छेसारखे होत नसेल, तर आपण कर्ता हे म्हणणेच व्यर्थ ठरते. (२६)

म्हणोन कर्ता नव्हे किं आपण । तेथें भोक्ता कैंचा कोण ।
हें विचाराचें लक्षण । अविचारें न घडे ॥ २७ ॥
म्हणून आपण कर्ता नव्हे, हे स्पष्ट अनुभवास येते. आपण जर कर्ता नाही तर मग आपण भोक्ता तरी कसे अस् शकणार? याप्रमाणे सूक्ष्मपणे विचार केला तर या गोष्टी कळतात. अविचाराने हे कळत नाही. (२७)

अविचार आणि विचार । जैसा प्रकाश अंधकार ।
विकार आणि निर्विकार । येक नव्हे कीं ॥ २८ ॥
अविचार आणि विचार यांत अंधकार आणि प्रकाशासारखे अंतर आहे. एक असेल, तेथे दुसरे असू शकत नाही. त्याप्रमाणेच विकार आणि निर्विकार एक असू शकत नाही. (२८)

जेथें नाहीं विवंचना । तेथें कांहींच चालेना ।
खरें तेंचि अनुमाना । कदा न ये ॥ २९ ॥
जेथे सूक्ष्म विवंचना केली जात नाही, तेथे काहीच उपाय चालत नाही. खरे जे निर्विकल्प ब्रह्म त्याची कल्पना तेथे येऊ शकत नाही. (२९)

प्रत्ययास बोलिजे न्याये । अप्रत्यये तो अन्याये ।
जात्यांधास परीक्षा काये । नाना रत्नाची ॥ ३० ॥
स्वात्मानुभवास जर न्याय असे म्हटले तर तो अनुभव न येणे यास अन्याय म्हणावे लागते. जो जन्मांध आहे, त्याला नाना रत्नांची पारख कशी करता येईल.? (३०)

म्हणोन ज्ञाता धन्य धन्य । जो निर्गुणेंसी अनन्य ।
आत्मनिवेदनें मान्य । परम पुरुष ॥ ३१ ॥
म्हणून निर्गुणाशी अनन्य असणारा ज्ञाता पुरुष खरोखरच धन्य होय. आत्मनिवेदन झाल्याने तो श्रेष्ठ पुरुष म्हणून सर्वांना मान्य होतो. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
लघुबोधनाम समास सहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘लघुबोधनाम’ समास सहावा समाप्त.


समास सातवा : प्रत्यय विवरण
॥ श्रीराम ॥

निर्मळ आभास निराभास । तयास दृष्टांत आकाश ।
आकाश म्हणिजे अवकाश । पसरला पैस ॥ १ ॥
निर्मळ, निश्चळ, निराभास अशा परब्रह्मास फक्त आकाशाचा दृष्टांत देता येतो. आकाश म्हणजे ऐसपैस पसरलेले अवकाश होय. (१)

आधीं पैस मग पदार्थ । प्रत्यये पाहातां यथार्थ ।
प्रत्ययेंविण पाहातां वेर्थ । सकळ कांहीं ॥ २ ॥
आधी पोकळी असते, मग तेथे पदार्थ निर्माण होतो, असा यथार्थ अनुभव आपल्याला येत असतो. अनुभवाशिवाय जे काही असेल, ते सर्व व्यर्थ समजावे. (२)

ब्रह्म म्हणिजे तें निश्चळ । आत्मा म्हणिजे तो चंचळ ।
तयास दृष्टांत केवळ । वायो जाणावा ॥ ३ ॥
परब्रह्म हे निश्चळ आहे, तर आत्मा हा चंचळ आहे. त्याला योग्य दृष्टांत वायूचा जाणावा. (३)

घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा । घटबिंब दृष्टांत आत्म्याचा ।
विवरतां अर्थ दोहींचा । भिन्न आहे ॥ ४ ॥
ब्रह्माला घटाकाशाचा दृष्टांत देतात, तर आत्म्याला घटबिंबाचा दृष्टांत देतात. या दोन्ही दृष्टांतांच्या अर्थाचे विवरण केले की दोन्ही भिन्न आहेत हे कळते (घटातील आकाश निश्चल असते आणि घटात पाणी भरल्यावर त्या घटातील पाण्यात जे आकाश प्रतिबिंबित होते ते पाण्याच्या उपाधीमुळे चंचल भासते. तसे परब्रह्म ते निश्चल असते आणि बुद्धीत प्रतिबिंबित जे चैतन्य तोच चंचल असा जीवात्मा होय.) (४)

भूत म्हणिजे जितुकें जालें । जालें तितुके निमालें ।
चंचळ आलें आणी गेलें । ऐसें जाणावें ॥ ५ ॥
भूत म्हणजे जे उत्पन्न झाले ते. जे जे उत्पन्न होते, ते ते नष्ट होते. चंचळही येते आणि जाते हे जाणून घ्यावे. (५)

अविद्या जड आत्मा चंचळ । जड कर्पूर आत्मा अनळ ।
दोनी जळोन तत्काळ । विझोन जाती ॥ ६ ॥
अविद्या ही जड आहे, तर आत्मा चेतन असला तरी चंचळ आहे. जड अविद्या ही कापरासारखी आहे, तर चेतन आत्मा अग्नीसारखा आहे. दोन्ही जळून तत्काळ विझून जातात. (६)

ब्रह्म आकाश निश्चळ जाती । आत्मा वायो चंचळ जाती ।
परीक्षवंत परीक्षिती । खरें किं खोटें ॥ ७ ॥
ब्रह्म आणि आकाश हे निश्चळ स्वभावाचे आहेत, तर आत्मा आणि वायू हे चंचळ आहेत. परीक्षवंत परीक्षा करून काय खरे, काय खोटे हे अचूक जाणतात. (७)

जड अनेक आत्मा येक । ऐसा आतानात्माविवेक ।
जगा वर्तविता जगन्नायेक । तयास म्हणावें ॥ ८ ॥
जड किंवा स्थूल पदार्थ अनेक आहेत. आत्मा एक आहे. असा हा आत्मानात्मविवेक आहे. तो आत्माच सर्व जगाचा चालक आहे. म्हणून त्यालाच जगन्नायक म्हणावे. (८)

जड अनात्मा चेतवी आत्मा । सर्वीं वर्ते सर्वात्मा ।
अवघा मिळोन चंचळात्मा । निश्चळ नव्हे ॥ ९ ॥
जड अनात्म वस्तूला आत्मा चेतवितो. सर्वांना जो प्रेरणा देतो त्याला सर्वात्मा म्हणतात. आणि सर्वांचा मिळून जो अंतरात्मा त्यालाच चंचळात्मा म्हणतात. तो म्हणजे निश्चल परब्रह्म नव्हे. (९)

निश्चळ तें परब्रह्म । जेथें नाहीं दृश्यभ्रम ।
विमळ ब्रह्म तें निभ्रम । जैसें तैसें ॥ १० ॥
परब्रह्म निश्चळ असते. तेथे दृश्यभ्रम नसतो. विमळ ब्रह्म हे भ्रमरहित, जसेच्या तसेच असते. (१०)

आधी आत्मानात्माविवेक थोर । मग सारासारविचार ।
सारासारविचारें संव्हार । प्रकृतीचा ॥ ११ ॥
आधी थोर असा आत्मानात्मविवेक करावा. नंतर सारासारविचार करावा. सारासारविवेकाने असार अशा प्रकृतीचा संहार होतो. (११)

विचारें प्रकृती संव्हारे । दृश्य अस्तांच वोसरे ।
अंतरात्मा निर्गुणीं संचरे । अध्यात्मश्रवणें ॥ १२ ॥
केवळ विचारानेही प्रकृतीचा संहार होतो आणि दृश्य जगत दिसत असूनही नसल्यासारखे होते. अध्यात्मश्रवणाने अंतरात्मा निर्गणात प्रवेश करतो. त्याच्याशी तादात्म्य पावतो. (१२)

चढता अर्थ लागला । तरी अंतरात्मा चढतचि गेला ।
उतरल्या अर्थें उतरला । भूमंडळीं ॥ १३ ॥
जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनतो. उन्नती करणारा अर्थ लागला, तर अंतरात्म्याची आध्यात्मिक उन्नती होते. उतरता अर्थ लागला तर अंतरात्माही भूमंडळी उतरतो म्हणजे दृश्य जगताशी तादात्म्य पावतो. (१३)

अर्थासारिखा आत्मा होतो । जिकडे नेला तिकडे जातो ।
अनुमानें संदेहीं पडतो । कांहींयेक ॥ १४ ॥
जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनतो. त्याला जिकडे न्यावे तिकडे तो जातो. अनुमानाने तो काही वेळा संदेहात पडतो. (१४)

निसंदेह अर्थ चालिला। तरी आत्मा निसंदेहचि जाला ।
अनुमान-अर्थें जाला । अनुमानरूपी ॥ १५
नि:संदेह अर्थ लागला तर अंतरात्मा नि:संदेही होतो. आनुमानिक अर्थ लागला, तर तो अनुमानरूप होतो. (१५)

नवरसिक अर्थ चाले । श्रोते तद्रूपचि जाले ।
चाटपणें होऊन गेले । चाटचि अवघे ॥ १६ ॥
अध्यात्मनिरूपणात किंवा कथेत नवरसात्मक वर्णन असेल, तर श्रोते त्या वर्णनाशी तद्रूप होतात. चावटपणाचे वर्णन असेल, तर ते ऐकून श्रोतेही सर्व चावट होऊन जातात. (१६)

जैसा जैसा घडे संग । तैसे गुह्यराचे रंग ।
याकारणें उत्तम मार्ग । पाहोन धरावा ॥ १७ ॥
जसा संग घडतो तसे सरड्याचे रंग बदलत असतात. अंतरात्म्याचेही तसेच आहे. म्हणून माणसाने विचारपूर्वक उत्तम मार्गच धरावा. (१७)

उत्तम अन्नें बोलत गेले । तरी मन अन्नाकारचि जालें ।
लावण्य वनितेचें वर्णिलें । तरी मन तेथेंचि बैसे ॥ १८ ॥
उत्तम अन्नाविषयी बोलणे चालू असेल तर माणसाचे मन अन्नाकारच होते. स्त्रीच्या लावण्याचे वर्णन चालू असेल, तर मन तेथेच तादात्म्य पावते. (१८)

पदार्थवर्णन अवघें । किती म्हणोन सांगावें ।
परंतु अंतरीं समजावें । होये किं नव्हे ॥ १९ ॥
याप्रमाणे ज्या पदार्थाचे वर्णन करावे तेथे मन तादात्म्य पावते. त्याचे किती म्हणून वर्णन करणार? पण प्रत्येकाने आपल्या मनाशीच विचार करावा की, असे होते की नाही? (१९)

जें जें देखिलें आणी ऐकिलें । तें अंतरीं दृढ बैसलें ।
हित अन्हित परीक्षिलें । परीक्षवंतीं ॥ २० ॥
जे जे माणूस पाहातो किंवा ऐकतो ते ते त्याच्या अंतरी सुदृढ होऊन बसते. म्हणून काय केल्याने हित होईल आणि काय केल्याने अनहित होईल, याची परीक्षा करून परीक्षावंताने ज्यायोगे हित होईल ते करावे. (२०)

याकारणें सर्व सांडावें । येक देवास धुंडावें ।
तरीचवर्म पडे ठावें । कांहींयेक ॥ २१ ॥
म्हणून माणसाने इतर सर्व काही सोडून द्यावे आणि फक्त एका देवाचा शोध घ्यावा. म्हणजे त्याला यातील रहस्य थोडेफार कळून येईल. (२१)

नाना सुखें देवें केलीं । लोकें तयास चुकलीं ।
ऐसीं चुकतां च गेलीं । जन्मवरी ॥ २२ ॥
अनेक प्रकारची सुखे देवानेच उत्पन्न केली आहेत, पण लोकांना देवाचाच विसर पडतो. ही त्यांच्याकडून चूक होत असते. अशी चूक करीतच त्यांचा जन्म वाया जातो. (२२)

सर्व सांडून शोधा मजला । ऐसें देवचि बोलिला ।
लोकीं शब्द अमान्य केला । भगवंताचा ॥ २३ ॥
सर्व सोडून मला शोधा’ असे प्रत्यक्ष भगवंतांनीच सांगितले आहे. पण लोकांनी भगवंतांचाही शब्द मानला नाही. (२३)

म्हणोन नाना दुःखें भोगिती । सर्वकाळ कष्टी होती ।
मनीं सुखचि इछिती । परी तें कैंचें ॥ २४ ॥
म्हणूनच त्यांना नाना प्रकारचे दु:ख सोसावे लागते आणि त्यामुळे ते सर्वकाळ कष्टी होतात. मनात तर त्यांना सुखाचीच इच्छा असते, पण ते कसे मिळणार? (२४)

उदंड सुख जया लागलें । वेडें तयास चुकलें ।
सुख सुख म्हणताच मेलें । दुःख भोगितां ॥ २५ ॥
ज्या भगवंतापाशी उदंड सुख आहे. त्या भगवंताला वेडे लोक विसरतात. त्यामुळे सुख, सुख असे म्हणत असता दुःख भोगून मरून जातात. (२५)

शाहाण्यानें ऐसें न करावें । सुख होये तेंचि करावें ।
देवासी धुंडित जावें । ब्रह्मांडापरतें ॥ २६ ॥
म्हणून शहाण्या माणसाने असे चुकू नये. ज्यायोगे सुख होईल तेच करावे. ब्रह्मांडाच्याही पलीकडे जाऊन देवाला धुंडावे. . (२६)

मुख्य देवचि ठाईं पडिला । मग काये उणें तयाला ।
लोक वेडे विवेकाला । सांडून जाती ॥ २७ ॥
मुख्य देवाचीच एकदा प्राप्ती झाली की, मग त्याला सुखाला काय उणे पडणार आहे? वेडे लोक विवेकाला सोडून वागतात. (२७)

विवेकाचें फळ तें सुख । अविवेकाचें फळ तें दुःख ।
यांत मानेल तें अवश्यक । केलें पाहिजे ॥ २८ ॥
. विवेकाचे फळ ते सुख होय आणि अविवेकाचे फळ ते दु:ख होय. यांपैकी ज्याला जे हवे असेल ते मिळावे म्हणून जे करणे आवश्यक आहे, ते त्याने केले पाहिजे. (२८)

कर्तयासी वोळखावें । यास विवेक म्हणावें
विवेक सांडितां व्हावें । परम दुःखी ॥ २९ ॥
मुख्य कर्ता कोण हे ओळखणे यालाच विवेक म्हणतात. तो विवेक केला नाही, तर परम दु:खी व्हावे लागते. (२९)

आतां असो हें बोलणें । कर्त्यास वोळखणें ।
आपलें हित विचक्षणें । चुकों नये ॥ ३० ॥
असो. आता हे बोलणे राहू दे. विचारवंताने मुख्य कर्त्यास ओळखावे व आपले हित साधावे. यात चूक करू नये (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
प्रत्यय विवरणनाम समास सातवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘प्रत्ययेविवरणनाम’ समास सातवा समाप्त.


समास आठवा : कर्ता निरूपण
॥ श्रीराम ॥

श्रोता म्हणे वक्तयासी । कोण कर्ता निश्चयेंसीं ।
सलळ सृष्टि ब्रह्मांडासी । कोणें केलें ॥ १ ॥
श्रोत्याने वक्त्याला असा प्रश्न केला की, या सर्व सृष्टीला, ब्रह्मांडाला कोणी केले? या सर्वांचा कर्ता कोण हे निश्चयपूर्वक सांगावे. (१)

तव बोलिला सभानायेक । जे बोलिके येकाहून येक ।
या बोलण्याचे कौतुक । श्रोतीं सादर ऐकावें ॥ २ ॥
हे ऐकून त्या सभेत बसलेले एकाहून एक हुशार लोक त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुढे सरसावले. त्यांच्या बोलण्याचे कौतुक श्रोत्यांनी सादर ऐकावे. (२)

येक म्हणती कर्ता देव । येक म्हणती कोण देव ।
आपुलाला अभिप्राव । बोलते जाले ॥ ३ ॥
एक म्हणाला की, देव कर्ता आहे. त्यावर दुसरा कोणी विचारू लागला की, कोणता देव? यावर प्रत्येकजण आपापला अभिप्राय व्यक्त करू लागले. (३)

उत्तम मध्यम कनिष्ठ । भावर्थें बोलती पष्ट ।
आपुलाली उपासना श्रेष्ठ । मानिती जनीं ॥ ४ ॥
त्यांत उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे सर्व प्रकारचे लोक होते. ते आपापला भावार्थ स्पष्ट शब्दांत सांगू लागले. या जगात ज्याची जी उपासना असेल, तीच त्याला श्रेष्ठ वाटत असते. (४)

कोणीयेक ऐसें म्हणती । कर्ता देव मंगळमूर्ती ।
येक म्हणती सरस्वती । सर्व करी ॥ ५ ॥
कोणी म्हणू लागले की, मंगलमूर्ती गणेश हाच कर्ता देव आहे. तर दुसरा कुणी म्हणू लागला, सरस्वतीच सर्व काही करते. (५)

येक म्हणती कर्ता भैरव । येक म्हणती खंडेराव ।
येक म्हणती बीरेदेव । येक म्हणती भगवती ॥ ६
कुणी भैरव, तर कुणी खंडेराव, तर कुणी बीरदेव, तर कुणी भगवती कर्ता आहे, असे म्हणू लागले. (६)

येक म्हणती नरहरी । येक म्हणती बनशंकरी ।
येक म्हणती सर्व करी । नारायेणु ॥ ७ ॥
कुणी म्हणू लागले की, नरहरी कर्ता आहे, तर कुणी बनशंकरी सर्व करते म्हणू लागले, तर कुणी नारायण सर्व करतो असे म्हणाले. (७)

येक म्हणती श्रीराम कर्ता । येक म्हणती श्रीकृष्ण कर्ता ।
येक म्हणती भगवंत कर्ता । केशवराज ॥ ८ ॥
एक म्हणू लागले की, श्रीराम कर्ता आहे, कोणी श्रीकृष्ण कर्ता, तर दुसरे कुणी भगवंत कर्ता अथवा केशवराज कर्ता, असे म्हणू लागले. (८)

येक म्हणती पांडुरंग । येक म्हणती श्रीरंग ।
येक म्हणती झोटींग । सर्व करी ॥ ९ ॥
कुणी पांडुरंग तर कुणी श्रीरंग, तर आणखी कुणी झोटींग सर्व करतो, असे म्हणू लागले. (९)

येक म्हणती मुंज्या कर्ता । येक म्हणती सूर्य कर्ता ।
येक म्हणती अग्न कर्ता । सकळ कांहीं ॥ १० ॥
कुणी मुंज्या, तर कुणी सूर्य, तर कुणी अग्नीला सर्वांचा कर्ता म्हणू लागले. (१०)

येक म्हणती लक्ष्मी करी । येक म्हणती मारुती करी ।
येक म्हणती धरत्री करी । सर्व कांही ॥ ११ ॥
कुणी म्हणाले की, लक्ष्मीने सर्व केले, तर कुणी म्हणाले की, मारुतीने सर्व केले. तर कुणी पृथ्वीने सर्व काही केले, असे मत व्यक्त केले. (११)

येक म्हणती तुकाई । येक म्हणती येमाई ।
येक म्हणती सटवाई । सर्वकरी । १२ ॥
कुणी तुकाईला, तर कुणी यमाईला, तर कुणी सटवाईला कर्ता ठरवले. (१२)

येक म्हणती भार्गव कर्ता । येक म्हणती वामन कर्ता ।
येक म्हणती परमात्मा कर्ता । येकचि आहे ॥ १३ ॥
एक म्हणू लागला भार्गव कर्ता, तर दुसरा म्हणू लागला की, वामन कर्ता. तर आणखी कुणी परमात्मा कर्ता असे म्हणू लागला. (१३)

येक म्हणती विरणा कर्ता । येक म्हणती बस्वंणा कर्ता ।
येक म्हणती रेवंणा कर्ता । सर्व कांहीं ॥ १४ ॥
एक म्हणू लागला वीरण्णा कर्ता, दुसरा म्हणू लागला की बसवण्णा कर्ता, तर आणखी कुणी रेवण्णाला कर्ता ठरविले. (१४)

येक म्हणती रवळया कर्ता । येक म्हणती स्वामी कार्तिक कर्ता ।
येक म्हणती वेंकटेश कर्ता । सर्व कांहीं ॥ १५ ॥
कुणी रवळनाथाला कर्ता ठरवले, तर कुणी कार्तिक स्वामीला कर्ता मानले, तर कुणी व्यंकटेशाने सर्व काही केले, असे प्रतिपादन केले. (१५)

येक म्हणती गुरु कर्ता । येक म्हणती दत्त कर्ता ।
येक म्हणती मुख्य कर्ता । वोढ्या जगन्नथ ॥ १६ ॥
कुणी गुरूंना तर कुणी दत्तांना तर कुणी ओढ्या जगन्नाथाला कर्ता ठरविले. (१६)

येक म्हणती ब्रह्मा कर्ता । येक म्हणती विष्णु कर्ता ।
येक म्हणती महेश कर्ता । निश्चयेंसीं ॥ १७ ॥
एक म्हणू लागले की, ब्रह्मा कर्ता, दुसरे म्हणू लागले की विष्णू कर्ता, तर आणखी कुणी म्हणू लागले की, महेशच निश्चयपूर्वक कर्ता आहे. (१७)

येक म्हणती प्रजन्य कर्ता । येक म्हणती वायो कर्ता ।
येक म्हणती करून अकर्ता । निर्गुण देव ॥ १८ ॥
कुणी पर्जन्याला, तर कुणी वायूला कर्ता ठरवले. कुणी निर्गुण देवच करून अकर्ता आहे, असे म्हणू लागले. (१८)

येक म्हणती माया करी । येक म्हणती जीव करी ।
येक म्हणती सर्व करी । प्रारब्धयोग ॥ १९ ॥
कुणी माया सर्व करते म्हणू लागले, तर कुणी जीव सर्व करतो असे म्हणू लागले, तर कुणी प्रारब्धयोगच सर्व करतो, असे म्हणू लागले. (१९)

येक म्हणती प्रेत्नी करी । येक म्हणती स्वभाव करी ।
येक म्हणती कोण करी । कोण जाणे ॥ २० ॥
कुणी प्रयत्नाला तर कुणी स्वभावाला कर्ता ठरवले. तर कुणी म्हणू लागले की, कोण कर्ता आहे कोण जाणे. (२०)

ऐसा कर्त्याचा विचार । पुसतां भरला बजार ।
आतां कोणाचें उत्तर । खरें मानावें ॥ २१ ॥
याप्रमाणे कर्त्यासंबंधी प्रश्न विचारला असता जणू बाजारच भरला. आता कुणाचे उत्तर खरे मानावे? (२१)

जेहिं जो देव मानिला । कर्ता म्हणती तयाला ।
ऐसा लोकांचा गल्बला । वोसरेना ॥ २२ ॥
ज्यांनी जो देव मानला, त्यांनी त्याला कर्ता ठरविले. असा लोकांचा गलबला झाला, तो काही केल्या थांबेना. (२२)

आपुलाल्या साभिमानें निश्चयेचि केला मनें ।
याचा विचार पाहाणें । घडेचिना ॥ २३ ॥
प्रत्येकाने आपापल्या दैवतांच्या अभिमानाने मनाने तोच कर्ता म्हणून निश्चय केला. पण यावर जास्त सखोल विचार कुणी करीनाच. (२३)

बहु लोकांचा बहु विचार । अवघा राहों द्या बाजार ।
परंतु याचा विचार । ऐसा आहे ॥ २४ ॥
याप्रमाणे अनेक लोकांनी अनेक विचार मांडले. पण हा अवघा बाजार आता राहू दे. परंतु यासंबंधी खरा विचार असा आहे. (२४)

श्रोतीं व्हावें सावधान । निश्चयें तोडावा अनुमान ।
प्रत्यये मानावा प्रमाण । जाणते पुरुषीं ॥ २५ ॥
श्रोत्यांनी आता सावधान व्हावे आणि कर्ता कोण हे निश्चयपूर्वक जाणून अनुमानाचा त्याग करावा. जाणत्या पुरुषांनी अनुभव हाच प्रमाणभूत मानावा. (२५)

जें जें कर्तयानें केलें । तें तें त्याउपरी जालें ।
कर्त्यापूर्वीं आडळलें । न पाहिजे कीं ॥ २६ ॥
कर्ता जे जे करतो, ते त्याच्यानंतर उत्पन्न झालेले असते. ते कर्त्याच्या पूर्वी आढळून येता कामा नये. (२६)

केलें तें पंचभूतिक । आणि पंचभूतिक ब्रह्मादिक ।
तरी भूतांशें पंचभूतिक । केलें तें घडेना ॥ २७ ॥
जे केलेले आहे ते सर्व पांचभौतिक आहे. आणि ब्रह्मादि देवही पांचभौतिकच आहेत. ते भूतांश आहेत तेव्हा त्यांनी पांचभौतिक निर्माण केले, असे होऊ शकत नाही. (२७)

पंचभूतांस वेगळें करावें । मग कर्त्यास वोळखावें ।
पंचभूतिक तें स्वभावें । कर्त्यांस आलें ॥ २८ ॥
पंचमहाभूतांना वेगळे करून काला ओळखले पाहिजे. पांचभौतिकापासून जे झालेले असते, त्या कार्यात पंचमहाभूते स्वाभाविकपणेच असतात. (२८)

पंचभूतांवेगळें निर्गुण । तेथें नाहीं कर्तेपण ।
निर्विकारास विकार कोण । लाऊं शके ॥ २९
पंचमहाभूतांपेक्षा निर्गुण वेगळे आहे, पण निर्गुणाच्या ठिकाणी कर्तेपण असु शकत नाही. निर्विकारास विकार कोण लावू शकेल? (२९)

निर्गुणास कर्तव्य न घडे । सगुण जाल्यांत सांपडे ।
आतां कर्तव्यता कोणेकडे । बरें पाहा ॥ ३०
निर्गुणाच्या ठिकाणी कर्तृत्व नसते आणि सगुण तर झालेल्यांत समाविष्ट होते. मग आता कर्तृत्व कोणाकडे जाते पहा बरे. (३०)

लटिक्याचा कर्ता कोण । हें पुसणेंचि अप्रमाण ।
म्हणोनि हेंचि प्रमाण । जें स्वभावेंचि जालें ॥ ३१ ॥
जे आभासात्मक आहे. त्याचा कर्ता कोण हे विचारणेच अयोग्य आहे. म्हणन हेच प्रमाण मानावे लागते की ते आपोआप झाले. (३१)

येक सगुण येक निर्गुण । कोठें लाऊं कर्तेपण ।
या अर्थाचें विवरण । बरें पाहा ॥ ३२ ॥
एक सगुण आणि एक निर्गुण यांपैकी कुणाहीकडे कर्तेपण लावता येत नाही. या अर्थाचे आता स्पष्टीकरण पहा. (३२)

सगुणें सगुण केलें । तरी तें पूर्वींच आहे जालें ।
निर्गुणास कर्तव्य लाविलें । नवचे कीं कदा ॥ ३३ ॥
सगुणाने सगुण केले असे म्हणता येत नाही. कारण ते तर पूर्वीच झालेले आहे. आणि निर्गुणाच्या ठिकाणी कधीही कर्तृत्व मानता येत नाही. (३३)

येथें कर्ताचि दिसेना । प्रत्यये आणावा अनुमाना ।
दृश्य सत्यत्वें असेना । म्हणोनियां ॥ ३४ ॥
येथे कुणी कर्ताच दिसत नाही. म्हणून अनुभवाने अनुमान करून हे जाणून घ्यावे की दृश्य हे सत्यच नाही. (३४)

केलें तें अवघेंच लटिकें । तरी कर्ता हें बोलणेंचि फिकें ।
वक्ता म्हणे रे विवेकें । बरें पाहा ॥ ३५ ॥
जे केले असे म्हटले जात आहे, ते सर्वच मिथ्या आहे. म्हणून त्याचा कर्ता या बोलण्याला अर्थच उरत नाही. वक्ता म्हणतो की, जरा नीट विचार करून पहा बरे. (३५)

बरें पाहाता प्रत्यये आला । तरी कां करावा गल्बला ।
प्रचित आलियां आपणाला । अंतर्यामीं ॥ ३६ ॥
नीट विचार करून पाहिल्यावर प्रत्यय येतो, मग उगीच गलबला कशाला करावा? आपल्याला अंतर्यामी प्रचीती येते. (३६)

आतां असो हें बोलणें । विवेकी तोचि हें जाणे ।
पूर्वपक्ष लागे उडवणें । येरवीं अनुर्वाच ॥ ३७ ॥
असो. आता हे बोलणे राहू दे. पूर्वपक्ष लटिका असतो. त्याचे खंडन करावेच लागते. अन्यथा हे सर्व अनिर्वचनीय आहे, हे विवेकी जाणतो. (३७)

तंव श्रोता करी प्रस्न । देहीं सुखदुःखभोक्ता कोण ।
पुढें हेंचि निरूपण । बोलिलें असे ॥३८ ॥
यावर श्रोत्याने प्रश्न केला की, देहामध्ये सुखदु:खभोक्ता कोण असतो? तेव्हा याचे निरूपण पुढल्या समासात केले आहे, असे समर्थ सांगतात. (३८)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कर्तानिरूपणनाम समास आठवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘कर्तानिरूपणनाम’ समास आठवा समाप्त.


समास नववा : आत्माविवरण
॥ श्रीराम ॥

आत्मयास शेरीरयोगें । उद्वेग चिंता करणें लागे ।
शरीरयोगें आत्मा जगे । हें तों पगटचि आहे ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, आत्म्याला शरीराच्या योगाने उद्वेग, चिंता करावी लागते. शरीराच्या योगानेच आत्मा जगतो हे तर उघडच आहे. (१)

देह अन्नचि खायेना । तरी आत्मा कदापि जगेना ।
अत्म्याविण चेतना । देहास कैंची ॥ २ ॥
देहाने जर अन्न खाल्ले नाही, तर आत्मा कधीही जगू शकत नाही. आणि आत्मा नसेल तर देहाच्या ठिकाणी चेतना राहू शकत नाही. (२)

हें येकावेगळें येक । करूं जातां निरार्थक ।
उभयेयोगें कोणीयेक । कार्य चाले ॥ ३ ॥
देह आणि आत्मा यांना वेगळे करावे म्हटले, तर ते निरर्थक ठरते. या दोन्हींच्या सहकार्यानेच काही एक कार्य घडते. (३)

देहाला नाहीं चेतना । अत्म्यास पदार्थ उचलेना ।
स्वप्नभोजनें भरेना । पोट कांहीं ॥ ४ ॥
देहाला चेतना नाही आणि आत्म्याला पदार्थ उचलता येत नाही. स्वप्नभोजनाने काही कोणाचे पोट भरत नाही. (४)

आत्मा स्वप्नावस्थेंत जातो । परंतु देहामध्यें हि असतो ।
निदसुरेपणें खाजवितो । चमत्कार पाहा॥ ५ ॥
आत्मा स्वप्नावस्थेत जातो, पण त्याच वेळी देहामध्येही असतो आणि अर्धवट झोपेत तो खाजवतोही. हा केवढा चमत्कार आहे पहा बरे. (५)

अन्नरसें वाढे शरीर । शरीरप्रमाणें विचार ।
वृद्धपणीं तदनंतर । दोनी लाहानाळती ॥ ६ ॥
अन्नरसाने शरीराची वाढ होते आणि शरीराबरोबरच विचारही वाढतो. वृद्धावस्थेत नंतर शरीर आणि विचार दोन्ही क्षीण होतात. (६)

उत्तम द्रव्य देह खातो । देहयोगें आत्मा भुलतो ।
विस्मरणें शुद्धि सांडितो । सकळ कांहीं ॥ ७ ॥
देहाने उन्मत्त द्रव्याचे सेवन केले की देहाच्या योगाने आत्माही भुलतो आणि विस्मरणामुळे त्याला कशाचीही शुद्धी राहात नाही. (७)

देहानें घेतलें वीष । आत्मा जाये सावकास ।
वाढणें मोडणें आत्मयास । नेमस्त आहे ॥ ८ ॥
देहाने विष घेतले, तर यथावकाश आत्मा देह सोडून जातो. वाढ आणि क्षय हे देहाच्या योगे आत्म्यालाही निश्चितपणे भोगावे लागतात. (८)

वाढणें मोडणें जाणें येणें । सुख दुःख देहाचेनि गुणें ।
नान प्रकारें भोगणें । आत्मयास घडे ॥ ९ ॥
वाढणे, मोडणे, जाणे, येणे आणि देहाच्या योगाने सुख-दु:खही नाना प्रकारे आत्म्याला भोगावे लागते. (९)

वारुळ म्हणिजे पोकळ । मुंग्यांचे मार्गचि सकळ ।
तैसेंचि हें केवळ । शरीर जाणावें ॥ १० ॥
वारूळ म्हणजे पोकळ. मुंग्यांचे मार्ग पोकळच असतात. तसेच केवळ हे शरीर जाणावे (१०)

शरीरीं नाडीच खेटा । नाडीमध्यें पोकळ वाटा ।
लाहान थोर सगटा। दाटल्या नाडी ॥११ ॥
शरीरात नाड्यांचा गुंताडा असतो. त्या नाड्यांमध्ये पोकळ वाटा असतात. लहान-थोर सरसकट नाड्यांची दाटी झालेली आहे. (११)

प्राणी अन्नोदक घेतो । त्याचा अन्नरस होतो ।
त्यास वायो प्रवर्ततो । स्वासोस्वासें ॥ १२ ॥
प्राणी अन्नोदक घेतो, त्याचाच अन्नरस होतो. त्याला वायू श्वासोच्छवासाच्या योगे प्रवर्तवितो. (१२)

नाडीद्वारां धांवे जीवन । जीवनामधें खेळे पवन ।
त्या पवनासरिसा जाण । आत्माहि विवरे ॥ १३ ॥
नाड्यांच्या द्वारे अन्नरस सर्व शरीरभर पसरतो. त्या जीवनामध्ये वायू खेळत असतो आणि वायूप्रमाणेच आत्माही सर्वत्र विचरत असतो. (१३)

तृषेनें शोकलें शरीर । आत्म्यास कळे हा विचार ।
मग उठवून शरीर । चालवी उदकाकडे ॥ १४ ॥
जर तहानेने शरीर सुकले तर हा विचार आत्म्याला कळतो. तो मग शरीरास उठवून उदकाकडे चालवितो. (१४)

उदक मागे शब्द बोलवी । मार्ग पाहोन शरीर चालवी ।
शरीर अवघें च हालवी । प्रसंगानुसार ॥ १५ ॥
शब्द बोलवून उदक मागतो. मार्ग पाहून शरीरास चालवतो. प्रसंगानुसार सर्व शरीराची आवश्यक हालचाल तो करतो. (१५)

क्षुधा लागते ऐसें जाणतो । मग देहाला उठवितो ।
आच्यावाच्या बोलवितो । ज्यासी त्यासी ॥ १६ ॥
भूक लागली तर ते जाणून आत्माच देहाला उठवितो आणि ज्याला-त्याला अर्वाच्य बोलायला लावतो. (१६)

बायेकांत म्हणे जालें जालें । देह सोवळें करून आणिलें ।
पायांत भरून चालविलें । तांतडीं तांतडीं ॥ १७ ॥
बायकोच्या शरीरातील जीवात्मा म्हणतो की झाले, झाले, जेवण तयार आहे. मग तो जीवात्मा देहाला सोवळे करून आणतो. तोच पायांत भरून त्यास भराभर भराभर चालवितो. (१७)

त्यासी पात्रावरी बैसविलें । नेत्रीं भरोन पात्र पाहिलें।
हाताकरवीं आरंभिलें । आपोशन ॥ १८ ॥
तोच पानावर आणून बसवितो. त्याच्या नेत्रांत भरून भोजनपात्र पाहतो आणि हाताकडून आपोष्णी घ्यावयास लावतो. (१८)

हाताकरवीं ग्रास उचलवी । मुखी जाऊन मुख पसरवी ।
दातांकरवीं चाववी । नेटें नेटें ॥ १९॥
तोच हाताकडून घास उचलवितो, मुखात जाऊन मुख पसरवितो, आणि दातांकडून नीटपणे अन्न चाववितो. (१९)

आपण जिव्हेमधें खेळे । पाहातो परिमळसोहळे ।
केंस काडी खडा कळे । तत्काळ थुंकी ॥ २० ॥
तो जीवात्माच जिव्हेमध्ये खेळून स्वाद घेतो. नाकाने सुवासाचे सुख भोगवितो. जर कदाचित अन्नात केस, काडी, खडा असल्याचे कळून आले की, तो तत्काळ थुंकतो. (२०)

आळणी कळतां मीठ मागे । बायलेसि म्हणे आगे कांगे ।
डोळे ताऊन पाहों लागे । रागें रागें ॥ २१ ॥
पदार्थ अळणी झाला असेल, तर त्याला कळते व तो लगेच मीठ मागतो आणि बायकोला ‘अगे का गे’ असे म्हणून रागारागाने तिच्याकडे डोळे वटारून पाहू लागतो. (२१)

गोडी लागतांच आनंदे । गोड नस्तां परम खेदे ।
वांकडी गोष्टी अंतरीं भेदे । आत्मयासी ॥ २२ ॥
पदार्थ गोड लागला की, त्याला आनंद होतो. गोड नसेल, तर त्याला फार खेद होतो. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही, तर त्याला अंतर्यामी फार क्लेश होतात. (२२)

नाना अन्नचि गोडी । नाना रसें स्वाद निवडी ।
तिखट लागतां मस्तक झाडी । आणी खोंकी ॥ २३ ॥
नाना प्रकारच्या अन्नाची त्याला आवड असते. अनेक प्रकारच्या रसांचा स्वाद घेऊन तो आवडनिवड करतो. पदार्थ तिखट असेल, तर तो मस्तक झाडतो आणि ठसका लागल्यामुळे खोकू लागतो. (२३)

मिरपुडी घातली फार । कायसें करितें खापर ।
जिव्हेकरवीं कठिणोत्तर । बोलवी रागें ॥ २४ ॥
फार मिरपूड घातली आहेस’ ‘काय खापरासारखा पदार्थ करतेस’ असे तो जिव्हेच्या द्वारे रागाने कठोर शब्द बोलवितो. (२४)

आज्य उदंड जेविला । सवेंच ता।म्ब्या उचलिला ।
घळघळां घेऊं लागला। सावकास॥ २५ ॥
तुपातील पक्वान्न फार खाल्ल्याने त्याला खूप तहान लागते म्हणून तो स्वत:च हाताकडून तांब्या उचलवून घटाघटा पाणी पिऊ लागतो. (२५)

देहीं सुखदुःखभोक्ता । तो येक आत्माचि पाहातां ।
आत्म्याविण देह वृथा । मडें होये ॥ २६ ॥
देहात सुखदु:खभोक्ता एक आत्माच असतो, आत्मा नसेल तर देहाचा काही उपयोग नाही. त्याचे मढे होते. (२६)

मनाच्या अनंत वृत्ति । जाणणें तेचि आत्मस्थिति ।
त्रैलोकीं जितुक्या वेक्ती । तदांतरीं आत्मा ॥ २७ ॥
मनाच्या अनंत वृत्ती जी जाणते ती जाणीव म्हणजे आत्मा होय. त्रैलोक्यात जितक्या व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींच्या अंतर्यामी आत्मा असतो. (२७)

जगामध्यें जगदात्मा । विश्वामधें विश्वात्मा ।
सर्व चालवी सर्वात्मा । नाना रूपें ॥ २८ ॥
जगामध्ये त्याला जगदात्मा म्हणतात. विश्वामध्ये त्याला विश्वात्मा म्हणतात. जो सर्वांना चालवितो, त्याला सर्वात्मा म्हणतात. अशी नाना रूपे तो घेतो. (२८)

हुंगे चाखे ऐके देखें । मृद कठिण वोळखे ।
शीत उष्ण ठाउकें । तत्काळ होये ॥ २९ ॥
तोच हुंगतो, चाखतो, ऐकतो, पाहतो, मृदु-कठीण ओळखतो, शीत आणि उष्ण त्याला तत्काळ उमजते. (२९)

सावधपणें लाघवी । बहुत करी उठाठेवी ।
या धूर्ताच्या उगवी । धूर्तचि करी ॥ ३० ॥
सावधपणाने आणि चपळतेने तो अनेक उठाठेवी करतो. या धूर्त आत्म्याची परीक्षा धूर्तच करू शकतो. (३०)

वायोसरिसा परिमळ येतो । परि तो परिमळ वितळोन जातो ।
वायो धुळी घेउनी येतो । परी ते हि जाये ॥ ३१ ॥
वाऱ्याबरोबर सुगंध येतो, पण थोड्या वेळाने तो वितळून जातो. कधी कधी वाऱ्याबरोबर धूळही येते, पण तीही नंतर जाते. (३१)

शीत उष्ण वायोसरिसें । सुवासें अथवा कुवासें ।
असिजे परी सावकासें । तगणें न घडे ॥ ३२ ॥
वाऱ्याबरोबर शीत, उष्ण, सुवास, दुर्गंध इत्यादी येतात, पण यथावकाश ते नाहीसे होतात. टिकून राहू शकत नाहीत. (३२)

वायोसरिसे रोग येती । वायोसरिसी भूतें धांवती ।
धूर आणी धुकटें येती । वायोसवें ॥ ३३ ॥
वाऱ्याबरोबर रोग (जंतू) येतात. वायूबरोबर भूते धावतात. धूर आणि धुके इत्यादीही वाऱ्याबरोबर येतात. (३३)

वायोसवें कांहींच जगेना । आत्म्यासवें वायो तगेना ।
आत्म्याची चपळता जाणा । अधिक आहे ॥ ३४ ॥
वायूबरोबर येणारे काहीच टिकून राहात नाही. आत्म्याबरोबर वायू बरोबरी करू शकत नाही. वायूपेक्षा आत्म्याची चपळता अधिक आहे. (३४)

वायो कठिणास आडतो । आत्मा कठिण भेदून जातो ।
कठिण पाहों तरी तो । छेदेहिना ॥ ३५ ॥
कठीण पदार्थ मध्ये आला, तर वायू अडतो. पण आत्मा कठीण पदार्थास भेदून पलीकडे जातो. आत्म्याचा कठीणपणा पाहू गेले तर तो इतका कठीण आहे की, तो छेदलाही जात नाही. (३५)

वायो झडझडां वाजे । आत्मा कांहींच न वाजे ।
मोनेंचि अंतरीं समजे । विवरोन पाहातां ॥ ३६ ॥
वायू झडझडा वाजतो. आत्मा जराही आवाज करीत नाही. मौन राहून अंतर्यामी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे अनुसंधान करणाऱ्यास तो कळून येतो. (३६)

शरीरास बरें केलें । तें आत्मयास पावलें ।
शरीरयोगें जालें । समाधान ॥ ३७ ॥
शरीरास सुख दिले तर ते आत्म्याला पावते. शरीराच्या योगेचे त्याला समाधान लाभते. (३७)

देहावेगळे उपाये नाना । करितां आत्मयास पावेना ।
समाधान पावे वासना । देहाचेनि ॥ ३८ ॥
देहाशिवाय अनेक उपाय केले, तरी आत्म्यास पावत नाहीत. आत्म्याची जी वासना असेल, ती देहाच्या माध्यमाद्वारेच समाधान पावते. (३८)

देहआत्मयाचें कौतुक । पाहों जातां हें अनेक ।
देहावेगळी आडणुक । आत्मयास होये ॥ ३९ ॥
देह आणि आत्मा यांच्या संयोगाचे कौतुक पाहू लागले तर अनेक प्रकारे ते दिसून येते. देह नसेल, तर सर्व बाजूने आत्म्याची अडवणूक होते. (३९)

येक असतां उदंड घडे । वेगळें पाहातां कांहींच न घडे ।
विवेकें त्रिलोकीं पवाडे । देहात्मयोगें ॥ ४० ॥
दोन्ही एकत्र असतात, तेव्हा उदंड कार्य घडते. ते वेगळे झाले, तर काहीच घडू शकत नाही. दोन्ही असतील तर विवेकाच्या बळावर त्रैलोक्याचा ठाव घेता येतो. (४०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आत्मविवरणनाम समास नवावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘आत्मविवरणनाम’ समास नववा समाप्त.


समास दहावा : शिकवणनिरूपण
॥ श्रीराम ॥

पालेमाळा सुमनमाळा । फळमाळा बीजमाळा ।
पाषाणमाळा कवडेमाळा । सुत्रें चालती ॥ १ ॥
झाडाची पाने, फुले, फळे, बीजे, यांच्या, त्याचप्रमाणे पाषाण, कवड्या इत्यादींच्या माळा करतात. त्यात दोरी ओवलेली असते. (१)

स्फटिकमाळा मोहरेमाळा । काष्ठमाळा गंधमाळा ।
धातुमाळा रत्नेमाळा । जाळ्या वोलि चांदोवे ॥ २ ॥
परी हें तंतूनें चालतें। तंतू नस्तां विष्कळीत होतें।
तैसें म्हणों आत्मयातें। तरी साहित्य न पडे ॥ ३ ॥
याखेरीज स्फटिकांच्या माळा, मोहरांच्या माळा, काष्ठमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा, तसेच जाळ्या, ओळी आणि चांदवे, इत्यादी सर्वांमध्ये दोरा ओवलेला असतो. म्हणून ते एकत्रित राहातात. तंतू नसेल, तर सर्व विस्कळित होऊन जाते. आत्म्याला त्या तंतूप्रमाणे म्हणावे, तर हा दृष्टांत योग्य नव्हे. (२-३)

तंतूस मणी वोविला। तंतूमध्येंचि राहिला ।
आत्मा सर्वांगीं व्यापला । पाहाना कां॥ ४ ॥
सर्व मण्यांमधून तंतू ओवलेला असतो, पण तो फक्त मध्यभागीच राहतो. आत्म्याचे तसे नाही. तो तर सर्वांगी व्यापून असतो. पहा ना. (४)

आत्मा चपळ सहजगुणें । दोरी काये चळों जाणे ।
म्हणोन दृष्टांत देणें । साहित्य न घडे ॥ ५ ॥
आत्मा स्वाभाविकपणे चपळ असतो. दोरी काही चळून हालचाल करू शकत नाही. म्हणून हा दृष्टांत योग्य नव्हे. (५)

नाना वल्लींत जळांश । उसांमध्यें दाटला रस ।
परी तो रस आणी बाकस । येक नव्हे ॥ ६ ॥
नाना वेलीत जलांश असतो. उसामध्येही रस दाटून भरलेला असतो. पण तो रस आणि चोयट्या एक नव्हेत. (६)

देही आत्मा देह अनात्मा । त्याहून पर तो परमात्मा ।
निरंजनास उपमा । असेचिना ॥ ७ ॥
आत्मा देहांत राहणारा आहे, पण देह अनात्मा आहे. परमात्मा हा त्याहूनही पलीकडे आहे. त्या निरंजन परमात्म्यास देण्यास योग्य उपमाच नाही. (७)

रायापासून रंकवरी । अवघ्या मनुष्यांचियां हारी ।
सगट समान सरी । कैसी करावी ॥ ८ ॥
राजापासून रंकापर्यंत अवघे सर्व मनुष्यमात्रच आहेत. पण म्हणून सर्वांना सरसकट एकसारखे लेखता येत नाही. (८)

देव दानव मानव । नीच योनी हीन जीव ।
पापी सुकृति अभिप्राव । उदंड आहे ॥ ९ ॥
देव, दानव, मानव, नीच योनी, हीन जीव, पापी आणि पुण्यवान असे उदंड प्रकार आहेत. त्यांचा अभिप्राय वेगवेगळा आहे. (९)

येकांशें जग चाले । परी सामर्थ्य वेगळालें ।
येकासंगे मुक्त केलें । येकासंगें रवरव ॥ १० ॥
भगवंताच्या एकांशाने जग चालते. ईश्वराचा काही अंश जगास व्यापून आहे. हे खरे असले, तरी प्रत्येक व्यक्ती, पदार्थ यांचे सामर्थ्य वेगवेगळे आहे. एखाद्याच्या संगतीने मुक्त होता येते, तर दुसऱ्या एखाद्याच्या संगतीमुळे रौरव नरक प्राप्त होतो. (१०)

साकर माती पृथ्वी होये । परी ते माती खातां न ये ।
गरळ आप नव्हे काये । परी तें खोटें ॥ ११ ॥
साखर आणि माती दोन्ही पृथ्वीतत्त्वाचीच रूपे आहेत. पण म्हणून माती खाता येत नाही. विषातही जलतत्त्वच असत नाही का? पण तो सारखेपणा खोटा आहे. (११)

पुण्यात्मा आणी पापात्मा । दोहिंकडे अंतरात्मा ।
साधु भोंदु सीमा । सांडूंच नये ॥ १२ ॥
पुण्यात्मा आणि पापात्मा यांच्यामध्ये अंतरात्मा एकच आहे. पण म्हणून साधू आणि भोंदू ही सीमा ओलांडू नये. (१२)

अंतर येक तों खरें । परी सांगातें घेऊं न येती माहारे ।
पंडित आणि चाटें पोरें । येक कैसीं ॥ १३ ॥
सर्वांचा अंतरात्मा एक आहे. हे खरे असले तरी महारास बरोबर घेऊन जेवणे योग्य नव्हे. विद्वान आणि वात्रट पोरे यांना समान कसे लेखता येईल? (१३)

मनुष्य आणि गधडे । राजहंस आणि कोंबडें ।
राजे आणि माकडें । एक कैसीं ॥ १४ ॥
मनुष्य आणि गाढव, राजहंस आणि कोंबडा, राजे आणि माकडे यांना एक कसे म्हणावे? (१४)

भागीरथीचें जळ आप । मोरी संवदणी तेंहि आप ।
कुश्चिळ उदक अल्प । सेववेना ॥ १५ ॥
भागीरथीचे जल तेही पाणी आणि मोरीतील किंवा डबक्यातील पाणी तेही पाणीच, पण म्हणून घाणेरडे पाणी थोडेसुद्धा सेवन करता येत नाही. (१५)

याकारणें आचारशुद्ध । त्याउपरी विचारशुद्ध ।
वीतरागी आणि सुबुद्ध । ऐसा पाहिजे ॥ १६ ॥
म्हणून माणसाचा आचार शुद्ध हवा, त्यापेक्षाही विचार शुद्ध हवेत आणि तो अनासक्त आणि सुबुद्ध असाच असायला हवा. (१६)

शूरांहून मानिलें लंडी । तरी युद्धप्रसंगीं नरकाडी ।
श्रीमंत सांडून बराडी । सेविता कैसें ॥ १७ ॥
समजा, एखाद्या भित्र्या माणसाला शूरापेक्षा अधिक श्रेष्ठ मानले, तर युद्धाच्या प्रसंगी फजितीच होईल. श्रीमंतांची सेवा करायची सोडून दरिद्री माणसाची सेवा करणे कसे योग्य ठरेल? (१७)

येका उदकें सकळ जालें । परी पाहोन पाहिजे सेविलें ।
सगट अवघेंच घेतलें । तरी तें मूर्खपण ॥ १८॥
एका उदकामुळेच सर्व काही उत्पन्न होते. पण म्हणून योग्य, अयोग्य पाहूनच त्या वस्तूचे सेवन केले पाहिजे. सरसकट सर्वच घेणे हा मूर्खपणा आहे. (१८)

जीवनाचेंच जालें अन्न । अन्नाचें जालें वमन ।
परी वमनाचें भोजन । करितां न ये ॥ १९॥
पाण्याचेच अन्न होते. पण त्या अन्नाची ओक झाली, तर त्या ओकीचे भोजन करताच येत नाही. (१९)

तैसें निंद्य सोडूनद्यावें । वंद्य तें हृदईं धरावें ।
सत्कीर्तीनें भरावें। भूमंडळ ॥ २० ॥
त्याप्रमाणेच जे निंद्य आहे, ते सोडून द्यावे. जे वंद्य असेल, ते हृदयात धारण करावे आणि सत्कीर्तीने भूमंडळ भरून टाकावे. (२०)

उत्तमांसि उत्तम माने। कनिष्ठांस तें न माने ।
म्हणौन करंटे देवानें । करून ठेवले ॥ २१ ॥
उत्तम लोकांना उत्तमच आवडते. कनिष्ठांना उत्तम मान्य होत नाही. म्हणूनच देवाने त्यांना भाग्यहीन करून ठेवलेले असते. (२१)

सांडा अवघें करंटपण । धरावें उत्तम लक्षण ।
हरिकथा पुराण श्रवण । नीति न्याये ॥२२ ॥
म्हणून श्रीसमर्थ सर्वांना सांगत आहेत की, लोकांनी सर्व करंटेपणा सोडून द्यावा आणि उत्तम लक्षणे आत्मसात करावीत. त्यांनी हरिकथा, पुराणे यांचे श्रवण करावे आणि नीति-न्यायाने वागावे. (२२)

वर्तयाचाविवेक । राजी राखणें सकळ लोक ।
हळुहळु पुण्यलोक। करीत जावे॥ २३ ॥
विचारपूर्वक वागून सर्व लोकांना राजी राखावे आणि हळूहळू त्यांना पुण्याच्या मार्गाकडे वळवावे. (२३)

मुलाचे चालीनें चालावें । मुलाच्या मनोगतें बोलावें ।
तैसें जनास सिकवावें । हळुहळु ॥ २४ ॥
मुलाशी वागताना जसे आपण मुलाच्या चालीने चालतो, त्याचे मनोगत ओळखून बोलतो, त्याप्रमाणेच लोकांचे मनोगत जाणून त्यांच्या कलाकलाने घेऊन त्यांना हळूहळू शिकवावे. (२४)

मुख्य मनोगत राखणें । हेंचि चातुर्याचीं लक्षणें ।
चतुर तो चतुरांग जाणें । इतर तीं वेडीं ॥ २५ ॥
लोकांचे मनोगत राखणे हेच चातुर्याचे लक्षण आहे. जो चतुर असतो, तो चतुराचे हे अंग जाणतो. इतर लोक वेडेच असतात. (२५)

वेड्यास वेडें म्हणों नये । वर्म कदापि बोलों नये।
तरीच घडे दिग्विजये । निस्पृहासी ॥ २६॥
पण वेड्या माणसाला कधीही वेडे म्हणू नये. चारचौघांमध्ये एखाद्याचे वर्म कधी बोलू नये. असे वागले, तरच निःस्पृह माणसाला यश प्राप्त होते.(२६)

उदंड स्थळीं उदंड प्रसंग । जाणोनि करणें येथासांग ।
प्राणिमात्राचा अंतरंग । होऊन जावें ॥ २७ ॥
अनेक स्थळी निरनिराळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्या वेळी वेळप्रसंग ओळखून त्या प्रसंगास अनुसरून यथायोग्य आचरण करावे लागते. म्हणून प्राणिमात्रांच्या अंतरंगाशी एकरूप होऊन जावे. (२७)

मनोगत राखोन जातां । परस्परें होये अवस्ता ।
मनोगत तोडितां वेवस्तां । बरी नाहीं ॥ २८ ॥
याप्रमाणे मनोगत राखून जरी ती व्यक्ती दूर गेली, तरी लोकांना परतभेटीची उत्कंठा लागून राहते. मनोगत राखले नाही, तर लोकसंग्रह होऊ शकत नाही. (२८)

याकारणें मनोगत । राखेल तो मोठा महंत ।
मनोगत राखतां समस्त । वोढोन येती ॥ २९ ॥
म्हणून जो मनोगत राखतो, तोच श्रेष्ठ महंत जाणावा. लोकांचे मनोगत राखले की, समस्त लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. (२९)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
शिकवणनिरूपणनाम समास दहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सिकवणनिरूपणनाम’ समास दहावा समाप्त.

॥ दशक तेरावा समाप्त ॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: satsangdhara

दासबोध दशक तेरावा – dasbodh समाप्त

View Comments

  • मनाचे श्लोक शाळेत असताना आमच्या नित्यपाठात असत. आजही देवपूजेनंतर रोज कांही ओळींचे उच्चारण होते. पण मी दासबोध कधीच हाती धरला नव्हता. तो आज गुगल, डेलिहंटमुळे वाचनात आला. आता याची पारायणं करेन.