अन्वयव्यतिरेक – संत रामदास

श्री रामदास्वामीं विरचित – अन्वयव्यतिरे

अन्वयव्यतिरेक – प्रथम: समास:

श्रीगणेशाय नम: ॥ जय जयाजी लंबोदरा । सर्वसिद्धिगुणसागरा । सकळ विद्यार्ण-वगरा । आदिपुरुषा ॥१॥
सर्व कर्तृत्वासी आरंभ । आदिमूर्ती मूळारंभ । उपावहीन निरावलंब । स्वरूप तुझें ॥२॥
ऐक्यभावें नमन । करूं निजध्यासें नमन । हें म्हणतांचि नमन । माझें तुज ॥३॥
सर्वमंगल मंगला मूर्ती । वर्णजननी मूळस्फूर्ती । सर्वाक्षरीं वर्तती । व्यापकापणें ॥४॥
जी वेदमाता गायत्री । त्रिपदा सावित्री । ब्रह्मदुहिता धात्री । हंसवाहिनी ॥५॥
सकळपरा संजीवनी । अर्धमात्रा षड्‍गुणी । प्रणवात्मक चतुर्थ वाणी । नमन माझें ॥६॥
आतां वंदीन देवाधिदेवो । सर्वश्रेष्ठ स्वामीरावो । तया निजपदीं ठावो । निवामज मज ॥७॥
जें जें करावें स्तवन । तें तें स्वामीरावोचि जाण । स्वामीरावो अधिष्ठान । तेचि ते गमावे ॥८॥
नमस्कारूनि स्वामीचें चरण । मग केलें कृपावलोकन । तेणें आलें समाधान पूर्ण । अभयकरें ॥९॥
स्वामीकृपेचा लोट आला । तो माझे हदयीं सामावला । येर्‍हवीं मज मंदमतीला । योग्यता कैंची ॥१०॥
आतां वंदीन कुल-दैवत । लीलविग्रही रघुनाथ । जो असे प्रतिपाळित । आपल्या भक्तां ॥११॥
सकल कुलासी पालक । सर्व शरीरांस चालक । ब्रह्मादिकांचा जनक । देवैकनाथ ॥१२॥
आत्माराम सकलांचा । देवदानव मानवांचा । तोचि श्रीराम आमुचा । कुलस्वामी ॥१३॥
आत्माराम सर्व देहीं । तोचि माझिये निजहदयीं । सीता प्रकृति पुरुष पाही । राम झाला ॥१४॥
तंव शिष्यें विनविलें । जी आतांचि हें बोलिलें । प्रकृति ऐसें नाम ठेविलें । कोण्या पदार्थासी ॥१५॥
आणि पुरुष तो कवण । तयाचें स्वरूप किंलक्षण । सगुण किंवा निर्गुण । निश्चयेंसी ॥१६॥
माया ईश्वर अनिर्वाच्य । सृष्टिउद्भव निर्वाच्य । कोणें केला विसंच । मागुता स्वामी ॥१७॥
जीव तो कवण । तयासी कैसें जन्ममरण । आणि सायुज्यमुक्तीचें ज्ञान । मज निरूपावेम ॥१८॥
ऐसें शिष्यें विनविलें । धरिलीं सदृढ पाउलें । सद्नदित होतां आले । अश्रपात दु:खें ॥१९॥
बहुत भोगिल्या पुनरावृत्ती । त्रिविधतापांची विपती । चुकवूनि सायुज्यमुक्ती । दिधली पाहिजे ॥२०॥
ऐसीं करुणेचीं वचनें । भगवज-पंचाननें । ऐकोनि कृपावलोकनें । अभय दिधलें ॥२१॥
व्यतिरेक अन्वय हे दोनी । अष्ट देहांची उभवणी । त्यासि बोलिजे वचनीं । अन्वय ऐसें ॥२२॥
उद्भवाचा संहार । ज्ञानप्रलय निरंतर । त्यासि बोलिजे साचार । व्यतिरेक ऐसें ॥२३॥
गुरुशिष्यांचा संवाद । पंचीकरण महावाक्यबोध । जेणें तुटे भवबंध । श्रवणमात्रें ॥२४॥
तेंचि पुढें निरूपण । अन्वयाचें लक्षण । सांगितलें तरी सावधान । होई आतां ॥२५॥
इतिश्री अन्वय । केलचि करूं निश्चय । प्रतीतीनें सांपडे सोय । स्वस्वरूपाची ॥२६॥
इति श्रीमद्रामदास-विरचिते अन्वयव्यतिरेके प्रथम: समास: ॥१॥


अन्वयव्यतिरेक – द्वितीय: समास:

॥श्रीराम समर्थ ॥
मुळीं ब्रह्म निराकार । निराभास परात्पर । निर्गुण वस्तु निराधार । असतचि असे ॥१॥
जेथें जाणणें ना नेणणें । जेथें उपजणें ना मरणें । तेथें येणें ना जाणें । असेचिना  ॥२॥
उपाधिविणें जें आकाश । तेंचि ब्रह्म निराभास । तये निराभासीं मूळमायेस । जन्म जाहला ॥३॥
अरे जें मुळीं जालेंचि नाहीं । त्याची वार्ता सांगो कायी । प्रबोधनिमित्त कांहीं । बोलणें लागे ॥४॥
मुळीं ब्रह्म निराकार । तेथें स्फूर्तिरूपें अहंकार । तो पंचभूतांचा विस्तार । ज्ञानदशकीं बोलिला ॥५॥
अहं ब्रह्मास्मि ऐसें स्फुरण । महावाक्यचतुष्टय जाण । हरिसंकल्प हें प्रमाण । बोलिलें अन्वयीं ॥६॥
तें स्फुरण जाणीवरूप । जाणीवेआंगीं वायुस्वरूप । ऐसे हे दोनी प्रकार एकरूप । असती सदा ॥७॥
जाणीवरूप स्फुरण जाले । त्यातें अनिर्वाच्य बोलिलें । त्यातें ईश्वर ऐसें नाम ठेविलें । मायागुणें ॥८॥
जोंवर असतेपण मूळमायेसी । तंववरी साक्षित्व ब्रह्मासी । जाणीव ईश्वर तयासी । नांव पडिलें ॥९॥
मूळ प्रकृति महाकारण देह सर्वेश्वराचें जाण त्यांत पंचभूतें जाण । सूक्ष्म असती ॥१०॥
वायु प्रकृति जाणीव पुरुष । दोनी मिळोनि अंतरात्मा विशेष । तोचि सकळांचा ईश । मायागुणें ॥११॥
सृष्टयादिक इच्छा जाली । तेचि अव्याकृती बोलिली । गुणत्रयातें प्रसवली । म्हणोनि गुणक्षोभिणी । बोलिजे ॥१२॥
ऐसा हा दुसरा देह । कारण सर्वेश्वराचा नि:संदेह । तेथूनि हिरण्यगर्भ देवतामय । निर्माण जालें ॥१३॥
सत्त्वगुणीं पंचक । रजोगुणीं पंचदशक । तमोगुणीं पंचभूतिक । तन्मात्रा जाला ॥१४॥
ऐसे पंचवीस प्रकार । मिळोनि हिरण्यगर्भ साचार । तिसरा देह निरंतर । बारा पाहों ॥१५॥
भूतें जडत्वा पावलीं । तेव्हां देवीं शरीरें धरिलीं । त्यासी विराटकाया बोलिली । ईश्वराची ॥१६॥
पुढें चत्वारी खाणी जाली । कर्त्यानें निर्माण केली । पुढें पंचीकरणें बोली । सावध ऐका ॥१७॥
ऐसे देह चत्वार । सर्वेश्वराचे साचार । त्यांचे निराभासी सार । अनिर्वाच्य असे ॥१८॥
मूळमाया अव्याकृती । हिरण्यगर्भ देवतामय असती । चौथे विराट हे जड स्थिती । ब्रह्मांडाची ॥१९॥
महाकारणरूप ज्ञान । कारणरूप अज्ञान । लिंगदेह वासनात्मक जाण । वायु असे ॥२०॥
ज्ञान अज्ञान वासनात्मक । तिन्ही मिळोनी रूप एक । प्रकृतिपुरुषांचे अंशक । असती तेथें ॥२१॥
अंत:करण मन बुद्धि चित्त अहंकार । आकाशपंचकाचा विचार । मूळपुरुषाचे अंश हे निर्धार । पांचहि एक ॥२२॥
एक अंतरात्म्याचिया । असती पांचहि क्रिया । म्हणोनि आकाश तया । म्हणिजेत असे ॥२३॥
प्राण अपान व्यान उदान समान । हे मूळ वायूचे अंश जाण । पांचहि नांवें भिन्न जाण । क्रियापरत्वें ॥२४॥
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । हें तेजपंचक ज्ञानेंद्रिय जाण । कर्मेंद्रियपंचक सांगेन । सावध ऐका ॥२५॥
वाचा पाणी पाद । शिश्र आणि गुद । हे आपांश प्रसिद्ध । ओळखणें ॥२६॥
शब्द स्पर्श रूप रस गंध । हे पंच विषय पृथ्वीचे विशद । ये सोष्टीचा संवाद । प्रांजळ ऐका ॥२७॥
ऐसीं हीं पांच पंचकें । तीन असती क्रियारूपकें । दोन्ही प्रचीतीसी ओळखे । अंत:करण प्राण ॥२८॥
अंत:करण जाणीवरूप । प्राणवायु मायारूप । दोन्ही मिळोनि एक । अंतरात्मा तो ॥२९॥
निखिल जाणीव ब्रह्मांश । जीव बोलिजे तयास । मायायोगें विशेष । अंतरात्मा म्हणती ॥३०॥
तिन्ही पंचकें क्रियारूप । दोन्ही जिन्नस मायास्वरूप । पांचहि मिळोनि लिंगदेहरूप । सूक्ष्म असे ॥३१॥
अंत:करणपंचक जाणतें । प्राणपंचक चेतवितें । इंद्रियद्वारें भरोनि करवितें । विषयक्रिया ॥३२॥
जड चंचळ निश्चळ । त्रिपुटीयोगें क्रिया सबळ । वियोग होतां केवळ । कर्तृत्व कैंचें ॥३३॥
दशेंद्रियें स्थूळीं असती । क्रियारूपें सूक्ष्मीं वर्तती । देहात्मयोगें उठाती । नाना क्रिया ॥३४॥
सूर्य सूर्यकांत आणि कापूस । चौथा अग्नि होय दृश्य । म्हणऊनि कर्तृत्व विशेष । संयोगाचें ॥३५॥
तैसें अंत:करण निश्चळ । प्राणयोगें चंचळ । इंद्रिययोगें केवळ । कर्तृत्व भासे ॥३६॥
असो हे कथा । स्थूळदेहाची व्यवस्था । निरूपण कीजेल आतां । अवधान द्यावें ॥३७॥
अस्थि मांस त्वचा नाडी राम । हे पृथिवीचे गुण सुगम । प्रत्यक्ष शरीरीं वर्म । प्रचीत पाहतां ॥३८॥
लाळ मूत्र शुक्र शोणित स्वेद । हे आपांश प्रसिद्ध । अग्निगुण विशद । सावध ऐका ॥३९॥
क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन । हे अग्रीचे अंश जाण । या तत्त्वाचें विवरण । केलेंचि करावें ॥४०॥
चळण वळण आकुंचन । प्रसारण आणि निरोधन । हे वायूचे विशेष गुण । प्रसिद्ध असती ॥४१॥
काम क्रोध शोक मोह भय । हें आकाश नि:संशय । ये गोष्टीचा प्रत्यय । सावध ऐका ॥४२॥
आकाशादि आपपर्यंत । चारी पंचकें जीं असत । ते देहात्मयोगें वर्तत । जडदेहीं ॥४३॥
देह आत्म्याची संगती । तोंवरी चारी पंचकें दिसती । वियोग होतां प्रचीती । एक उरे ॥४४॥
म्हणोनि पृथ्वी अधिष्ठान स्थूलदेहाचें । अंतरात्मा अधिष्ठान लिंगदेहाचें । देहात्मयोगें त्रेताळीसाचें । कर्तृत्व उठे ॥४५॥
तें कर्तृत्व म्हणसी कैसें । चित्त ठेवून ऐक अंमळसें । परी हे प्रचीति विश्वासें । अंतरीं धरी ॥४६॥
तरी अंत:करणपंचक । चत्वारी क्रिया जाणीव एक । तैसेंचि प्राणपंचक । त्याचिसारखें ॥४७॥
इंद्रियदशक विषयपंचक । देहात्मयोगें क्रियारूपक । पंचदश अंशक । क्रियालिंगीं ॥४८॥
स्थूळी चार पंचकें । लिंगींचीं तेवीस नेमकें । दोनीहि मिळोनि विवेकें । त्रेताळीस जालीं ॥४९॥
म्हणोनि जाणीव वायु लिंगदेह । जीव अंतरात्मा नि:संदेह । वायुनिरासें होय । जीव ब्रह्म ॥५०॥
स्थूळ देह पृथ्वीरूपक लिंगदेह वायु वासनात्मक । कारण महाकारणाचें कौतुक । याचमध्यें ॥५१॥
सूक्ष्म कारण महाकारण । दोन्ही मिळोनि एक सान । ऐसे दोन्ही देह जाण । प्रचीतिरूप ॥५२॥
ऐसेचि देहद्वय ईश्वराचे । असे प्रचीतिरूपाचे । विराट हिरण्यगर्भ साचे । निश्चयात्मक ॥५३॥
तरी तो निश्चय केला कैसा । तुज निरोपिजेल ऐसा । अनुमान भ्रमाचा वळसा । सांडूनि द्यावा ॥५४॥
विराट जद पृथ्वीरूप । जितुकें दृश्याचें कौतुक । आप अग्रि द्वय एक । तिन्ही भूतें ॥५५॥
तिन्ही भूतें दृश्य जड । वायु आकाशें चंचळ अजड । प्रकृति अव्याकृति हा पवाड । दोन्हीचमध्यें ॥५६॥
भूतें दैवतें देवा देव । वायुचक्रीं असती सर्व । कार्यामुळें अवेव । दाखविती ॥५७॥
आकाश अंत:करण जाणीव । तोहि वायूचा स्वभाव । आकाश वायू निरावेव । एकचि रूप ॥५८॥
मूळप्रकृति अव्याकृती । हिरणगर्भ देवतामय असती । तिन्ही मिळोनी प्रचीति । द्वयभूतिक ॥५९॥
त्रय भूतें अधिष्ठान विराटाचें । द्बयभूतें अधिष्ठान हिरण्यगर्भाचें । गुणसाम्य गुणक्षोभिणीचें । तचि रूप ॥६०॥
म्हणोनी ईश्वरीं देह । द्बय असती नि:संदेह । तिन्ही भूतें अविद्यामय । द्वयें मायेचीं ॥६१॥
देहद्वयाचें बंधन । जीवासि म्हणती विवेकी जन । तैसेंचि सर्वेश्वरीं जाण । तत्प्रकारेंचि ॥६२॥
ऐसीं पिंडीं दोन ब्रह्मांडीं दोन । चत्वारी देह प्रचीति प्रमाण । यावेगळें अनुमानज्ञान । बोलोंचि नये ॥६३॥
इतिश्री अन्वय । केलचि करूं निश्चय । प्रचीतीनें सांपडे सोय । स्वरूपाची ॥६४॥
इति द्वितीय: समास: ॥२॥


अन्वयव्यतिरेक – तृतीय: समास:

॥ श्रीराम समर्थ ॥ ॥
चत्वारी देहांचिया । असती बत्तीस क्रिया । तेहि सांगों यथान्वया । प्रचीतीनें ॥१॥
जागृति स्वप्र सुषुप्ती तुर्या । चत्वारी अवस्था चौं देहांचिया । विवरोनी पाहतां संशया । वेगळें होईजे ॥२॥
उत्पत्ति स्थिति संहार । सर्वसाक्षिणी निरंतर । ऐशा अवस्था चत्वार । ईश्वराच्या ॥३॥
विश्व तैजस प्राज्ञ । प्रत्यगात्मा अभिमान । चौं देहांचे चारी जाण । ब्रह्मा विष्णु त्रिनयन । चौथा सर्वेश्वर ॥४॥
नेत्रस्थान कंठस्थान । हदयस्थान मूर्धिनस्थान । कैलास सत्यलोक वैकुंठस्थान । चौथें निरावलंब ॥५॥
स्थूलभोग प्रविविक्तभोग । आनंदभोग आनंदावभासभोग । ऐसे हे चत्वार भोग । चौदेहांचे ॥६॥
स्थूळशरीरीं जें भोगिजे । त्यासि स्थूळभोग बोलिजे । स्वप्रभोक्तृत्व घडलें जें । त्यासि प्रविविक्तभोग म्हणिजे ॥७॥
सुषुप्तीमध्यें जो भोग । त्यासि म्हणावें आनंदभोग । तिहीं भोगांचा साक्षित्वयोग । आनंदावभास भोग तो ॥८॥
अकार उकार मकार । अर्धमात्रा निर्धार । चारी मात्रा विस्तार । चौं देहाचा ॥९॥
रजोगुण सत्वगुण । तमोगुण शुद्धसत्वगुन । ऐसे चत्वार गुण । चौं देहांचे ॥१०॥
क्रियाशक्ति इच्छाशक्ति । द्रव्यशक्ति ज्ञानशक्ति । ऐशा चत्वार शक्ती । असती उभयतां ॥११॥
परा पश्यंती मध्यमा वैखरी । चौं देहांच्या वाचा चारी । ईश्वरीं म्हणती वेद चारी । परी ते काल्पनिक ॥१२॥
ते काल्पनिक म्हणसी कैसे । तरी स्थिरचित्तें ऐक अंमळसें । प्रचीतीनें विश्वासें । हदयीं धरी ॥१३॥
स्वरूपीं परारूप स्फुरण । तेंचि प्रणवरूण जाण । यामध्यें मात्रा एकावन्न । त्या तत्पदनत्वें ॥१४॥
वेद म्हणिजे प्रत्यक्ष वैखरी । वैखरी जडशरीरीं । नाद ध्वनी म्हणसी जरी । तेही तरी देहात्मयोगें ॥१५॥
मुळीं जडदेह कैंचा । उच्चार व्हावया शब्दाचा । अथवा विचार नादध्वनींचा । तोहि नसे ॥१६॥
पुढें विराट स्थूलदेह जाहलें । ब्रह्मयानें शरीर धरिलें । तेव्हां सर्वहि प्रगटलें । मातृकाजात ॥१७॥
ओंम् पिंडीं परा प्रणव । तोचि वायूचा स्वभाव । देह योगें सावेव । मात्रा उठती ॥१८॥
परेपासोनी पश्यंती मध्यमा । ध्वनी नादाचा महिमा । कंठीं आले जन्मा । षोडश स्वर ॥१९॥
तो प्रणवनाद मुखासि आला । अक्षराचा उच्चार जाला । पंचतीस मातृका तयाला । म्हणती बीज ॥२०॥
आदिबीज प्रणव । षोडष स्वर शाखा पल्लव । पंचतीस फळें सावेव । भववृक्ष हा ॥२१॥
ऐसिया बावन्न मात्रामात्रें । तेथुनी जालीं वेदशास्त्रें । पुढें ऋषिसुखें पवित्रें । पुराणें जालीं ॥२२॥
अशा ह्या बत्तीस क्रिया । दों देहांच्या त्रेताळीस क्रिया । ऐसिया मिळोनियां पंचाहत्तर क्रिया । वेगळया दोनी ॥२३॥
ज्ञान अज्ञान या दोन । सत्याहत्तरी जाल्या मिळोन । देहात्मयोगे जाण । कर्तृत्व उठे ॥२४॥
सातांची सत्या-हत्तरी ऐसी । त्यांत त्याची प्रचीति ऐसी । विचारूनियां मानसीं । जाण तुजसी निरो-पिली ॥२५॥
नामरूप क्रिया । सांगीतल्या यथान्वया । आत्मशास्त्रगुरुप्रत्यया । निश्चय केला ॥२६॥
इतकें जाणोनि निरास करणें । तरेच स्वसुख लाधणें । म्हणोनि आधीं विवरणेम । ग्रंथांतरीं ॥२७॥
इति तृतीय: समास: ॥३॥ इति अन्वय: समाप्त: ॥ अन्वय ओवीसंख्या ॥११८॥


अन्वयव्यतिरेक – चतुर्थ: समास:

॥ श्रीराम समर्थ ॥
ऐसा हा अन्वय जाला । स्वल्प संकेतें बोलिला । न्यून पूर्ण क्षमा केला । पाहिजे संतीं ॥१॥
पुढें व्यतिरेक निरूपण । निरोपिजेल जाण । येथें श्रोतीं सावधपण । अर्थ पाहावा ॥२॥
व्यतिरेक ऐसें म्हणिजे । अन्वयेंचि ओळ-खिजे । येथें मूळमाया न साजे । येथें शब्द कैंचा ॥३॥
दोरीचा सर्प जालचि नाहीं । तेथें अन्वय कैंचा कांहीं । संसार तो मुळींच नाहीं । म्हणूनिया ॥४॥
स्वरूपीं कांहीं जालें असतें । तरी तयासी संहारिजेतें । पूर्णीं कांहीं जालेंचि नाहीं तें । काय मारावें ॥५॥
नसोनि जालेंसें वाटलें । म्हणोनि उद्भवासि बोलिलें । नसतें अज्ञान देखिलें । अन्वयें येथ ॥६॥
जें लटिकें उद्भवलें । तयापरी संहारिलें । तयासी नांव ठेविलें । व्यतिरेक ऐसें ॥७॥
उद्भवासी पंचप्रळय बोलिले । शास्त्रीं असे निरोपिलें । तेंहि पाहिजे परिसविलें । स्वानुभवेंसी ॥८॥
पिंडीं दोन्ही ब्राह्मांडी दोन्ही । पांचवा जाणिजे ज्ञातेजनीं । हीच कथा मुळींहुनी । सावध ऐका ॥९॥
प्राणी जेव्हां निजेला । तेव्हां जागृतीव्यापार राहिला । स्वप्र अथवा सुषुप्ती त्याला । प्राप्त होय ॥१०॥
यासि बोलिजे निद्राप्रळय । जागृतीचा होतो क्षय । पुढें देहांतसमय । म्हणिजे मृत्यु ॥११॥
देह आत्मयाचे संगती । सुटतां होय मृती । प्राप्ती तो मृत्युप्रळय श्रोतीं । पिंडीं ओळखावा ॥१२॥
जोंवरी अज्ञान न नासे । तोंवरी जन्ममृत्यु न निरसे । म्हणोनी स्वरूपज्ञाना ऐसें । सार नाहीं ॥१३॥
चत्वारी युगें सहस्त्र होती । ब्रह्मयाची निद्रा प्राप्ती । तोचि लघुप्रळय श्रोतीं । ब्रह्मांडीं ओळखावा ॥१४॥
चत्वारी खाणी नासती । पंचभूतें तैसींचि असती । ब्रह्मयाची उठतां संसृती । खाणीस होय ॥१५॥
ऐसा लघुप्रळय । ब्रह्मांडींचा नि:संशय । तिहीं देवांचें वेंचे वय । तो महाप्रळय बोलिजे ॥१६॥
शत वर्षें मेघ जाती । तेणें प्राणी मृत्यु पावती । वायुचक्रीं असती । देह सांडोनी ॥१७॥
शत वर्षें मेघ गेले । तेणें प्राणी मृत्यु पावले । पायुचक्रीं वास्तव्य केलें । देह सोडोनियां ॥१८॥
बारा कळीं सूर्यमंडळ । किरणापाससाव निघती ज्वाळ । शत संवत्सर हा भूगोळ । दहान होय ॥१९॥
शंभर वर्षें मेघ नाहीं । पृथ्वी शुष्क जाली सर्वही । सूर्य जाळी तेही । पाताळपंर्यत ॥२०॥
शेषाच्या फणा पोळल्या । त्या हळहळोनि गरळा वमिल्या । तेणें अग्रीनें जाळिल्या । पाताळव्यक्ती ॥२१॥
शेषकूर्म जळाले । मेरूचे कदे कोसळले । तेव्हाम देवीं सांडिले । स्थूल देह ॥२२॥
पृथिवी अवघी तप्त जाली । जळोनी विरी सांपडली । आवरणोदकीं कालविली । तियेची रक्षा ॥२३॥
स्वर्ग मृत्यु पाताळ । तिहीं लोकींचीं शरीरें सकळ । नासोनि उरलीं केवळ । लिंगरूपें प्रभजनीं ॥२४॥
त्यावरी महावृष्टि जाली । मेघीं गर्जना मांडिली । नाना-परींची उठली । ध्वनी विद्युल्लतांची ॥२५॥
पर्वतांतून पडती गारा । असंभाव्य सुटतो वारा । निबिड तया अंधकारा । तया उपमा कैंची ॥२६॥
नद्या समुद्र एकवटले । आवरणवेढे मोकळे जाले । उदकरूप जालिया खवळे । प्रळयपावक ॥२७॥
समुद्रींचा वडवानळ । शिवनेत्रींचा नेत्रानळ । सूर्य आणि विद्युल्लतेचा मेळ । आणि वनाग्नि ॥२८॥
अग्नि मात्र एक झाले । तेणें उदक शोषिलें । तया वन्हीस झडपिलें । प्रळयवातें ॥२९॥
तो जैसा दीप मावळला । तैसा प्रळयाग्नि विझाला । पुढें निखिल वायु उरला । आकाशपंथें ॥३०॥
जोंवरी आस्तिक्य वायूसी तोंवरी आकाशत्व ब्रह्मासी । तया वायूचे विनाशीं । नभत्व कैंचें ॥३१॥
सूक्ष्म भूतें त्रिगुण भूतें त्रिगुण । महत्तत्व मूळमाया जाण । वायूरूपें विवरण । करूनि पाहावें ॥३२॥
तो वायु जेव्हां विराला । तेव्हां नाश झाला त्रिगुणांला । महत्तत्त्व मूळमायेला । तयाचिसरिसा ॥३३॥
मूळमायेचेनि गुणें । ईश्वर ब्रह्मासी म्हणणें । तिचा नाश होतां कोणें । ईश्वर म्हणावें ॥३४॥
जोंवरी मायेसी असतेपण । तोंवरी ईश्वरीं जाणपण । तिच्या निरासीं पूर्ण । जाणीव कैंची ॥३५॥
द्रष्टा साक्षी सत्ता । हे गुण मायेचिकरितां । जाणीव ईश्वर तत्त्वतां । तियेसीचि म्हणिजे ॥३६॥
ब्रह्म ऐसें जें म्हणणें । तेंहि तियेच्या गुणें । ते जाणीव नसतां कोणें । शब्द बोलावा ॥३७॥
म्हणूनि जें अनिर्वाच्य । तेथें कैंचें नाम निर्वाच्य । ऐसेंहि बोलणें आहाच । कैंचें तेथें ॥३८॥
ऐसे हे प्रळय चारी । निरोपिले अवधारी । पुढें पांचव्याची परी । सावध ऐका ॥३९॥
परी ज्ञानेविण लया गेले । ते मागुती उद्भवले । याकारणें निरसिलें । पाहिजे अज्ञान ॥४०॥
म्हणोनि ज्ञानप्रळय श्रेष्ठ । चहूं प्रळयांहूनि वरिष्ठ । येणें चुकें अरिष्ट । जन्ममृत्यूंचें ॥४१॥
तेंचि पुढें निरूपण । पंच प्रळयांचें लक्षण । स्वामीविरहित कोण । पावूं शके ॥४२॥
इति श्री व्यतिरेक । याचा करावा निश्चय विवेक । स्वामिकृपें निश्चयात्मक । मोक्ष होय ॥४३॥
इति चतुर्थ: समास: ॥४॥


अन्वयव्यतिरेक – पंचम: समास:

॥ श्रीराम समर्थ ॥
तंव स्वामी म्हणती शिष्यातें । आतां परिस एकचित्तें । साधन नाहीं श्रवणापरतें । श्रेष्ठ जनीं ॥१॥
तें श्रवणासाधन कोणतें । जनीं असती बहुत मतें । त्यांत थोर अध्यात्मनिरूपण तें । मोक्षदातें ॥२॥
मायाब्रह्म आळखावें । अध्यात्म तयासा म्हणावें । अन्वयव्यतिरेकाचें जाणावें । रूप आधीं ॥३॥
ईश्वर नांव कोणासी । पडिलें कोण्या कार्यासी । जीवत्व परमात्मयासी । काय निमित्त ॥४॥
आपण कोण देव कोण । कैसी त्याची ओळखण । विचारावें त्या नां व ज्ञान । मनन बोलिजे ॥५॥
स्वरूपीं सदा सावधपण । त्या नांव निदिध्यासन । तुटतां द्वैतानुसंधान । साक्षात्कार तो ॥६॥
ऐसें चत्वार ऐक्य होतां । तेव्हांचि होय सायुज्यता । नुसतें शब्दज्ञान बोलतां । मोक्ष कैसा ॥७॥
बोलूनि शब्दज्ञान । क्रिया घडेना तत्प्रमाण । तरी तें जाण विपरीत ज्ञान । निश्चेंयसीं ॥८॥
ज्ञान बोलतां वाटे सोपे । परी आचरल्यावीण होती सोपे । शब्द क्रिया एकरूपें । असतां बरें ॥९॥
जसें मुखें ज्ञान बोले । तैसी स्वयें क्रिया चाले । तयाचीं वंदीन पाउलें । साष्टांगभावें ॥१०॥
तया नांव श्रवण साधन । तुवां करावें तेंचि जाण । तंव शिष्ये केला प्रश्र । करुणावचनें ॥११॥
म्हणे स्वामी सर्वेश्वरा । माया निरसोनि मोहरा । जीवत्वा करीं विश्वंभरा । पूर्ण ब्रह्म ॥१२॥
देखोनि शिष्याचा आदरू । बोलते झाले सद्नुरु । करूनि कृपा अभयंकरू । संप्रदायक्रमें ॥१३॥
अरे तूं कोण कोठूनि आलासी । तुझे नांव कोण निश्चयेंसि । ग्राम कोण कोण देशीं । वस्ती तुझी ॥१४॥
पुढां जाणें कोठवरी । स्थूळ सूक्ष्म कारण शरीरीं । किंवा महाकारण अवधारी । मिरासी तुझी ॥१५॥
विराट हिरण्यगर्भं अव्याकृती । किंवा मुळींची मूळप्रकृती । पुरुष ऐसा म्हणती । तो तुझा काय ॥१६॥
प्रकृति आणि पुरुष । या दोनींस जेथें निरास । तेथें पुसते विशेष । निवांत झाले ॥१७॥
ऐसे ऐकोनि वचन । शिष्य जाला सावधान । करूनि स्वामीस नमन । बोलता जाला ॥१८॥
म्हणे समर्थ कृपा करोनी । अन्वय सांगीतला मुळींहूनी । तेथूनि येथवरी येउनी । भ्रांत जाले ॥१९॥
येथवरी आलें हे कळे । मूळासी जावें हें नकळे । जीव स्वरूपीं मिळे । ऐसे करावें ॥२०॥
जाणणें नेणणें मिश्रित जालें । त्यासी रजोगुण ऐसें सांगीतलें । त्याचिये गुणें नरदेहा आलें । विपरीत ज्ञान ॥२१॥
आताम मार्गीं चालवावें । जेथील तेथें नेऊन घालावें । जन्मभूमीसी ठेवावें । अमर करोनी ॥२२॥
इतिश्री व्यतिरेक । केलचि करावा विवेक । स्वामीकृप समर्थ एक । सेवकावरी ॥२३॥
इति पंचम: समास: ॥५॥


अन्वयव्यतिरेक – षष्ठ: समास:

॥ श्रीराम समर्थ ॥ ॥
तंव स्वामी म्हणती बहु बरें । श्रवण कीजे अत्यादरें । प्रज्ञावंता निर्धारें । धारणा धरी ॥१॥
तूं नव्हेसी स्थूल शरीर । ऐसा पाहे पां विचार । तूं स्वरूप निर्विकार । महावाक्यार्थ बोलिजे ॥२॥
महावाक्यें तत्त्वमसि । तें ब्रह्म तूं आहेसी । म्हणून तूं नव्हेसी । स्थूल देह ॥३॥
जड पांचभौतिक शरीर । पंचविसांचा निर्धार । येथें बत्तीस क्रिया निरंतर । अंतरात्म्याचिया ॥४॥
तेणें जेव्हां देह सोडिलें । एक पंचक उरलें । तें जडत्व भासलें । पृथ्वीरूपें ॥५॥
ऐसें मागें निरूपण । सांगीतलें जाण म्हणोनि स्थूल देह आपण । नव्हेसी सत्य ॥६॥
जागृति विश्वेश्वर रजोगुण । क्रियाशक्ति वैखरी वचन । अकार मात्रा स्थूल प्रयोग जाण । जन्मस्थान ॥७॥
या अष्टहि क्रिया असती स्थूल देहाचिया । ऐसें म्हणती परी यया । देहात्मयोगें ॥८॥
देह आत्म्याची संगती । अष्ट क्रिया उठती । बियोग होतां प्रचीती । एक उरे ॥९॥
जें स्थान स्थूल शरीर । नव्हेसी तूं स्वरूप निर्विकार । तूंचि पाहे विचार । ज्ञानदृष्टी ॥१०॥
चर्मदृष्टीनें देखिलें । तें जडभूत निरसिलें । त्रयभूतें आकारिलें । दृष्टी देखणें ॥११॥
यत्‍ दृष्टं तन्नष्टं हें वचन । श्रुती बोलली हें प्रमाण । म्हणोनि स्थूल देह आपण । नव्हेसी सत्य ॥१२॥
तूं तरी ऐसें म्हणासी । स्थूलदेहाचे निरासीं । स्वस्वरूप सत्य निश्चयेंसी । ऐसें असे ॥१३॥
तरी लिंगदेहाचा विचारू । सांगेन धरी निर्धारू । तेंचि स्वरूप प्रांजळ करूं । स्वामीचेनि प्रतापें ॥१४॥
इति श्री व्यतिरेक । ज्ञानप्रळय निश्चयात्मक । पुढें कथेचें कौतुक । सावध ऐका ॥१५॥
इति षष्ठ: समास: ॥६॥


अन्वयव्यतिरेक – सप्तमः समासः

॥ श्रीराम समर्थ ॥ ॥
ऐके प्राज्ञा प्रबळा । तूं लिंगदेहावेगळा । अससी निश्चळा स्वस्वरूप स्वयें ॥१॥
लिंगदेहाच्या पंचकाचें । तूम नव्हेसी स्वस्वरूप साचें । वासनात्मक वायूचें । अधिष्ठान असे ॥२॥
अंत:करणपंचक प्राणपंचक । इंद्रियदशक विषयपंचक । इतुकें मिळोनि देह लिंग एक । तूं नव्हेसी ॥३॥
जड चंचळ निश्चळ । तीनहि योगें कर्तृत्व प्रबळ । वियोग होतां निवळ । वस्तूचि तूं ॥४॥
विषयकर्तृत्व इंद्रिय जड । प्राणपंचक अंत:करण जाड । इतुकें मिळोनी कैवाड । लिंगदेह बोलिजे ॥५॥
दश इंद्रियें स्थूळीं असती । परी सूक्ष्मरूपें लिंगीं वर्तती । हे मागें उपपत्ति । सांगितली तुज ॥६॥
प्राण प्रकृतीचा अंश । बायु बोलिजे तयास । अंत:करण पुरुष विशेष । आत्मरूपें ॥७॥
प्रकृतियोगें पुरुष जाण माव । माया निरसितां तोचि निरावेव । असा व्यतिरेंक अनुभव । निवळोनि पाहातां ॥८॥
तैसाचि पिंडीं अंतरात्मा । अवघा त्याचा कर्तृत्वमहिमा । विद्या कळा गुणसीमा । कोणें करावी ॥९॥
जोंवरी चंचळत्व प्राणासी । तांवरी जाणपण अंत: करणासी । तया चंचळाचे विनाशीं । तेंचि ब्रह्म ॥१०॥
कोणी एक प्राणी दोघेजण । एक अंध त्यासी करचरण । परी नि:कारण । नेत्रेंवीण झाला ॥११॥
दुसरा डोळस असे । पाद पाणी मुळींच नसे । चंचळत्वाचें पिसें । जसें तेथ ॥१२॥
अंध डोळस स्कंधीं घेऊन । उभयतां करिती मार्ग गमन । एका अंधत्व एका चळण । आरंभिलें ॥१३॥
निश्चळपण जाणे । प्राण चंचळ परी न जाणे । उभयतां मिळोनि करणें । सर्व कांहीं ॥१४॥
तेथें वीस क्रिया उठती । मागें सांगितल्या तुजप्रती । आणीक अष्टधा असती । त्या सावध ऐका ॥१५॥
लिंगदेह अवस्था प्रश्र । इच्छाशक्ती सत्वगुण । उकार मात्रा प्रविविक्त भोग जाण । मध्यमा वाचा ॥१६॥
कंठस्थान अभिमान तैजसु । क्रिया अष्टक जाणिजेसु । देहात्मयोगें आभासु । उठतसे ॥१७॥
संगती देह आत्मयाची । प्रतिमा दिसे आव्हाची । वियोगें राहे प्रचीतीची । एक क्रिया ॥१८॥
राहिला तैजस अभिमान । विष्णूचा अंश जाण । ऐसें लिंगदेहाचें विवरण । करूनि पाहिलें ॥१९॥
तेहतीस तत्त्वें मिळोन । लिंगदेह म्हणिजेत जाण । तूं तयासी विलक्षण । स्वरूपें सत्य ॥२०॥
तंव शिष्यें विनविलें । देहद्वय निरसिलें । कारण महाकारण राहिलें । कोणे स्थळीं ॥२१॥
स्थूळ जड लिंग चंचळ । देहद्वया वेगळ । लिंगनिरासीं तात्काळ । राहिलें कोठें ॥२२॥
ऐसें ऐकूनि विज्ञापन । स्वामी देती प्रतिवचन । म्हणती तुवां प्रश्र । उत्तम केला ॥२३॥
कारण महाकाग्णाचें स्थळ । लिंगदेहा-मध्यें प्रबळ । त्याच्या विनाशीं केवळ । देहद्वय कैचें ॥२४॥
कारण म्हणजे अज्ञान । महा-कारणरूपी ज्ञान । ज्ञान अज्ञानासी अधिष्ठान । लिंगदेह असे ॥२५॥
कारण महाकारणाचिया । असती षोदश क्तिया । त्याहि निरसोनी यथान्वया । प्रचितीनें ॥२६॥
इति श्रीव्यतिरेक-निरूपण । देहद्वयाचें निरसन । ज्ञानप्रळयो जाण । यासी बोलिजे ॥१७॥
इति सप्तम: समाप्त : ॥७॥


अन्वयव्यतिरेक – अष्टम: समास:

॥ श्रीराम समर्थ ॥
तूं नव्हेसी कारण । तयाचें रूप अज्ञान । अज्ञानयोगें जाण । जीवित्व तुज ॥१॥
अविद्यायोगें जीवित्वदशा । आली असे परमपुरुषा । म्हणूनि अज्ञाननिरासा । वीण मोक्ष नाहीं ॥२॥
स्वरूपासी नेणिजे । त्या नांव अज्ञान बोलिजे । आपुलें निजरूप वळखिजे । त्या नांव ज्ञान ॥३॥
ज्ञानाज्ञान जेथूनि जालें । पुन्हां तेथेंचि निमालें । कारणमहाकारणावेगळें । स्वरूप तुझें ॥४॥
याकारणें देहाचिया । असती अष्ट क्रिया । त्याही ओळखोनि सांडाव्या । सांगणें आतां ॥५॥
सुषुप्ती अवस्था प्राज्ञ अभिमान । आनंद भोग तमोगुण । मकार मात्रा हदयस्थान । द्रव्यशक्ती ॥६॥
पश्यंती वाचा आठवी । कारण क्रिया जाणावीं । इतक्या न लागती नरावेवीं । सत्यस्वरूप तूं ॥७॥
क्रियासहित अज्ञान । तूं नव्हेसी जाण । अथवा म्हणती महाकारण । तूं त्यावेगळा ॥८॥
महाकारणरूप ज्ञान । जें स्वरूपाचें अनु-संधान । तरी तूं त्या विलक्षण । सहजचि अससी ॥९॥
अनुभव आणि अनुभविता । दोन जाले प्रत्यक्ष पाहंता । म्हणोनियां सर्वथा । ज्ञानावेगळाचि तूं ॥१०॥
महा कारण देह । अष्टक्रिया नि:संदेह । तोचि आतां अभिप्राय । सावध ऐका ॥११॥
तूं या अवस्था प्रत्यगात्मा अभिमान । ज्ञानशक्ति शुद्धसत्वगुण । परा वाचा मूघ्रिस्थान । अर्धमातृका ॥१२॥
आनंदावभास भोग । अष्टक हे समयोग । ज्ञानात्मक अंतरंग । एकरूप ॥१३॥
तूं ज्ञानाज्ञानावेगळा । जन्मकर्मानिराळा । सकळीं असोनि सकळा । सारिखा नव्हेसी ॥१४॥
तूं बाह्य व्यापक । तूं अनेकीं एक । एकपण अलैलिक । न साहे तुज ॥१५॥
तूं वर्णव्यक्तिरहित । अवद्येसी विद्येसी विनिर्मुक्त । नाशवंतीं शाश्वत । स्वरूप तुझें ॥१६॥
तूं स्थूळ ना सूक्ष्म । ज्ञानाज्ञाना मनोधर्म । तुझ्या स्वरूपाचें वर्म । सद्नुरु कृपा ॥१७॥
समर्थ स्वामीकृपेवीण । नकळे नकळे स्वरूपज्ञान । तेचि आतां परिसीन । करूं आतां ॥१८॥
तंव शिष्य म्हणे स्वामी । चौ देहांवेगळा स्वरूप मी । देहीं असे जीव नामी । तो किलक्षण ॥१९॥
तंव स्वामी म्हणती ऐक आतां । स्थूळदेह जड तत्त्वतां । त्याचे स्वरूप पाहो जातां । केवळ पृथ्वी ॥२०॥
दुसरा लिंगदेह चंचळ । तें चंचळीं असे निश्चळ । तो ब्रह्मांश केवळ । जीव बोलिजे ॥२१॥
विषयक्रिया इंद्रिय जड स्वरूप । प्राण चंचळ वायु मायास्वरूप । त्या वायूमध्यें जाणीव अमूप । तो जीव ब्रह्मांश ॥२२॥
ते जाणीव अमूप । जाणिवेचें निश्चळ रूप । दृष्याभासा अमूप । अनंत ब्रह्मांडव्यापिनी ॥२३॥
निश्चळपण तें न मोडे । चंचळ वायु त्रैलोक्य थोकडें । वायु तें किती बापुडें । चैतन्यापुढें ॥२४॥
वायु कठिणासी आडतो । जाणिवेनें पर्वत फुटतो । फुटे म्हणावें तरी तो । छेदहि नाहीं ॥२५॥
जो त्रैलोक्याचें दर्पण । सकल बिंब अणुप्रमाण । सर्वसाक्षी केवळ जाणीवेवीन । असेचिना ॥२६॥
दर्पण स्थूळोंहूनि न हाले । परी सर्वही तेथेचि बिंबलें । बिंबलें परी नसे निघालें । दर्पणामध्यें ॥२७॥
पिंडीं तुया ब्रह्मांडीं सर्वसाक्षिणी । अनिर्वाच्या ईश्वरत्व जयेचोनि । पिंडीं असे अभिमानी । प्रत्यगात्मा तो ॥२८॥
अंतरात्मा जीवरूप । जाणिवे आंगीं वायु आरोप । अनंत नामांचा अरूप । तयासीच म्हणावें ॥२९॥
तूं म्हणसी तेथें कैंची जाणीव । तूं ऐक याचा अभिप्राव । ईश्वरी महाकारण देहीं सर्व । साक्षिणी अवस्था ॥३०॥
अर्धनारीनटेश्वर । प्रकृतिपुरुषाचा निर्धार । निवळ पाहतां विचार । दोन्ही एकची ॥३१॥
वायु मायेचे चळण । तोंवरी ईश्वरा जाणपण । तें निरसितां मिथ्या भान । जाणीव कैंची ॥३२॥
ती जाणीव जेथें विराली । तेथें अनिर्वाच्य बोलिली । श्रुतीसी मौन्यमुद्रा पडली । तियेसमयीं ॥३३॥
जोंवरी असतेपण मायेसी । तोंवरी ईश्वरत्व ब्रह्मासी । हरिपंकल्प जाणिवेसी । अधि-ष्ठान आहे ॥३४॥
अहं ब्रह्मास्मि ऐसें स्फुरण । तेंचि प्रकृतीचें लक्षण । सबळ ब्रह्म जाणीव साक्षपण । त्यासीच बोलिजे ॥३५॥
जोंवरी सत्यत्व प्रकृति वायूसी । तोंवरी जाणीव सबळ ब्रह्मासी । तये मायेच्या विनाशीं । तेंचि अनिर्वाच्य ॥३६॥
म्हणोनि पिंडीं जाणीव-लक्षण । तो ब्रह्मांश अंत: करण अज्ञान । अज्ञानयोगे जीवित्वलक्षण । ब्रह्मांशासी ॥३७॥
म्हणोनि जाणीव पुरुषाचा अंश । प्राणप्मचक मायेचा विलास । उभययोगें विशेष । अंतरात्मा तो ॥३८॥
येथें प्रश्र हा फिटला । विचार पाहतां प्रत्ययो आला । पुढें समजोनि बोला । कोणी तरी ॥३९॥
तंव शिष्य मोक्षपाणी । विचारें झाला ब्रह्मज्ञानी । तो देहाच्या प्रयाणीं । कोठें मिळाला ॥४०॥
ऐसें ऐकोनियां वचन । स्वामी म्हणती सावधान । देहीं असतां ब्रह्म पूर्ण । जावें वेगें ॥४१॥
ब्रह्म एक आपण एक । ऐसी असतां वेगळीक । तरी जावयाचा विवेक । करूं येता सुखें ॥४२॥
ज्ञानियाचा देह पडिला । तेथें वायु निघाला । तोहि वित-ळोनि गेला । जेंथिचा तेथें ॥४३॥
जोंवरी आस्तिक्य वायूसी । तोंवरी जाणीव अंत:करणासी । तया प्राणियाच्या निरासीं । जाणीव मालवे ॥४४॥
दिवा होता सोकल्या घटीं । विझाला तो घटस्फोटीं । तैसी जालो गोष्टी । आत्मयाची ॥४५॥
पदार्थीं असावें उदास । सकल विषयीं पूर्ण त्रास । यावरी ब्रह्म ज्यास । ब्रह्मचि करी ॥४६॥
आकाशीं आकाश मिळालें । हें बोलणेंचि अप्रमाण झालें । तैसें स्वरूपी स्वरूप आलें । राहावया ॥४७॥
तेथें गंधर्वनगर आलें । तें तेथेंचि विरालें । तैसें जाणिवेसी जालें । नवल मोठें ॥४८॥
जेणें स्वरूपनिश्चय कंला । तोचि पाहतां ब्रह्म जाला । तेथें द्वैताचा गलबला । गेला विरोनी ॥४९॥
हेंचि सद्नगुरू चे झालेपण । देहीं असोनि ब्रह्म पूर्ण । समर्थ स्वामीस उपमान । द्यावया कैंचें ॥५०॥
शिष्याची जाली तन्मयता । अमृतवचनीं ऐक्यता । मग चरणीं ठेविला माथा । साष्टांगभावें ॥५१॥
पुढें भागुती विनविलें । जीवत्व हें धन्य झालें । ईश्वर कैसे लया गेले । सांगा स्वामी ॥५२॥
तेचि पुढें कथा । ईश्वराची अनिर्वाच्यता । निरोपिजेल श्रोता । अव-धान द्यावेम ॥५३॥
इतिश्री व्यतिरेक । ज्ञानप्रळयो निश्चयात्मक । स्वामीकृपा समर्थ एक । सेवकावरी ॥५४॥
इति अष्टम: समास: ॥८॥


अन्वयव्यतिरेक – नवम: समास:

॥ श्रीराम समर्थ ॥
विराट देह ईश्वराचे । असे जड पंचभूतांचे । सत्त्वस्वरूप नव्हे साचें । दृश्य म्हणूनि ॥१॥
पृथिवी आप अनळ । तिनी भूतें दृश्य सकळ । दोनी भूतें केवळ । भासरूप ॥२॥
शरीरांतचि स्पर्शे । परी नेत्रासी न दिसे । द्वयभूतांसी मनोभासें । ऐसें बोलिजे ॥३॥
त्रयभूत अधिष्ठान विराटाचें । अंश प्रचीतरूपाचे । द्वयभूत सूक्ष्माचें । कर्तृत्व असे ॥४॥
विराट जड देह ईश्वराचा । ब्रह्मा अभिंमानी तेथींचा । उत्पत्ति अवस्था अकार मात्रेचा । प्रचीत पाहतां ॥५॥
इतुकें ज्याचें करणें । म्हणोनि स्वरूप न कळे पूर्णपणें । हिरण्यगर्भ सावधपणें । सांगतों ऐक ॥६॥
हिरण्यगर्भ ईश्वराचा लिंगदेह । सूक्ष्म पंचभूतांचा नि:संदेह । त्यामध्यें प्रचीत पाहे । असे द्वयभूतांचा ॥७॥
वायु आकाश हे दोन । हिरण्यगर्भाचें अधिष्ठान । आकाशपंचक सांगेन । सावध ऐका ॥८॥
अंत: करण विष्णु मन चंद्रमा । बुद्धि ब्रह्मा चित्त नारायणनामा । रुद्रअहंकार तुम्हां । सांगों पुढें ॥९॥
नाग कूर्म क्रकश । देवदत्त धनंजय विशेष । हे पंचप्राण अंश । प्रभंजनाचे ॥१०॥
श्रोत्र दिशा त्वचा अनिळ । चक्षु सूर्य जिव्हा जळ । घ्राण अश्र्विनीदेव सकळ । विचार पाहावा ॥११॥
वाचा वन्हि पाणी सुरपति । पाद उपेंद्र शिश्न प्रजापति । गुद इंद्रिय नैरृति । असे निरोपिली ॥१२॥
शब्द स्पर्श रूप रस । गंध पृथ्वीचा अंश । या पंचमात्रा विषयविलास । उभयतां असती ॥१३॥
ऐसे पंचवीस प्रकार । मिळोनि हिरण्यगर्भ साचार । येथें मातृका उकार । अभिमानी विष्णु ॥१४॥
स्थिति अवस्था प्रतिपाळणें । विष्णु अवतार घेणें । धर्मरक्षणाकारणें । म्हणूनियां ॥१५॥
स्वरूप निर्गुण निर्विकार । तेथें कैसा हो विकार । म्हनूनियां तो प्रकार । वेगळाचि असे ॥१६॥
अव्याकृति मूळप्रकृति । तेथें जाऊनि बसली वृत्ति । तेचि व्हावया निवृत्ति । पुढें परिसावें ॥१७॥
इतिश्री व्यतिरेक । ज्ञानप्रळयो निश्चयात्मक । स्वामी कृपा समर्थ एक । सेवकावरी ॥१८॥
इति नवम: समास: ॥९॥


अन्वयव्यतिरेक – दशम: समास:

॥ श्रीराम समर्थ ॥
अव्याकृति कारणदेह । ईश्वराचे नि:संदेह । तूं नव्हे परमात्मा अक्रिय । निश्चयेंसी ॥१॥
महत्तत्त्व गुणक्षोभिणी । अष्टधा प्रकृति त्रिगुणी । पंचभूतें ज्या-पासुनी । प्रगट जाहली ॥२॥
इच्छा सृष्टयादिक कर्माची । तेही दशा अव्याकृतीची । तेथें अवस्था प्रळयाची । शास्त्रीं बोलिली ॥३॥
अभिमानी त्रिनयन । महाकारण मात्रा तमोगुण । जें केवळ विस्मरण । स्वरूपाचें ॥४॥
स्वरूप विसरलेपणें । जियेसी लागे जडत्व येणें । त्यासी स्वरूप निर्गुणें । कैसें म्हणावें ॥५॥
पृथ्वीपासोनि महत्तत्त्ववरी । प्रळयो द्वय अवधारी । तें स्वरूप निर्धारीं । कैसें म्हणावें ॥६॥
म्हणूनि अव्याकृतीवगेळा । आत्मा जन्मकर्मानिराळा । तेचि कथा प्रांजळ प्रबळा । सावध ऐका ॥७॥
जे मुळींची मूळप्रकृति । ईश्वराची ज्ञान-शक्ति । तोचि महाकारण व्यक्ति । वेगळा आत्मा ॥८॥
अहंब्रह्मास्मि ऐसें ज्ञान । महाकारण-देहाचेम लक्षन । अर्धमात्रा शुद्धसत्वगुन । ईश्वर अभिमानी ॥९॥
सर्वसाक्षी अवस्था । प्रत्यक्ष पाहा विचारितां । निर्गुणावेगळें अनुभवितां । अनिर्वाच्य तें ॥१०॥
म्हणून अष्टदेहां -वेगळा । तूं ब्रह्म अनिर्वाच्य निर्भळा । महावाक्यार्थ अवलीळा । बोलिला असे ॥११॥
सोहं हंसा तत्त्वमसी । तूं ब्रह्म तें आहसी । अष्टदेहांच्या निरासीं । अनिर्वाच्य ॥१२॥
चत्वार देह जिवाचे । असती चारी ईश्वराचे । निरसितां स्वरूप उभयतांचें । अनिर्वाच्य ॥१३॥
तंव शिष्य म्हणे स्वामी समर्था । प्रकृतिपुरुषांची अभिन्नता निरूपिली तत्त्वतां । स्वमुखेंसी ॥१४॥
ईश्वर माया एकरूपता । ऐसें आपणचि सांगतां । मागुती असें म्हणतां । प्रकृतिवेगळा ॥१५॥
आणिक एक पुसत । पंचम प्रकार नासत । ऐसा बोलिला निश्चतार्थ । शास्त्रसिद्धांतीं ॥१६॥
या चहूंवेगळें पांचवे । नास्तिक शून्य तयातें म्हणावें । आणि स्वामी बोलिलें स्वभावें । चुतर्थ देहातात ॥१७॥
ऐसी सूक्ष्म आशंका । पाहतां प्रश्र केला निका । सावध होऊनि ऐका । विचार याचा ॥१८॥
पुरुष प्रकृति एक होय । ऐसा नियमचि आहे । परि हें सांगू नये । साधकासी ॥१९॥
त्यासी प्रत्यक्ष माया हे । झाली ऐसी वाटली आहे । म्हणूनि सांगणें होय । मायेवेगळा देव ॥२०॥
माया ब्रह्म एक म्हणतां । बुडेल सत्य स्वरूपाची वार्ता । ब्रह्मज्ञान स्वरूपसत्ता । कोण पुसे ॥२१॥
माया ब्रह्म एक जालें । तरीं संतसंगें काय केलें । वेदशास्त्रीं साधन बोलिलें । माया निरसाव याकारणें ॥२२॥
रज्जूचा सर्प नाहीं झाला । भ्रमें झालासा वाटला । म्हणूनियां अज्ञान्याला । ज्ञानदीप पाहिजे ॥२३॥
तैसी माया मुळीं जाहालीच नाहीं । केवळ वस्तूचि असे पाही । हरिसंकल्प तोही । समूळ मिथ्या ॥२४॥
जैसी माया नाथिली । तैसी ईश्वरत्व हे बोली । ऐसी अनिर्वाच्य खोली । जाणतीं स्वानुभवी ॥२५॥
मायेचें खरेपण वाट लें । म्हणूनि ईश्वरसाक्षी म्हणितलें । जाणीव इच्छा बोलिलें । बहुतां प्रकारे ॥२६॥
वायु प्रकृति जाणीव ईश्वर । असा प्रबोधकार । साक्षी सत्ता निर्धार । तयासी म्हणिजे ॥२७॥
ते माया निरसितां । निरसे साक्षी जाणतां । अनुभव आणि अनु-भविता । दोन्ही नाहीं ॥२८॥
प्रकृति आणि पुरुष । दोन्ही मायेचा विलास । ते निरसितां द्वयभास । अनिर्वाच्य ॥२९॥
ऐसी एकी आशका । फिटली आतां दुजी ऐका । सावध होऊनि विवेका । अवलोकावें ॥३०॥
इतिश्री व्यतिरेक । ज्ञानप्रळय निश्चयात्मक । स्वामी-कृपा समर्थ एक । सेवकावरी ॥३१॥
इति दशम: समास: ॥१०॥


अन्वयव्यतिरेक – एकादश: समास:

॥श्रीराम समर्थ ॥
स्थूळ सूक्ष्म कारण । आणि अविद्यात्मक अज्ञान । सत्यत्व तोंवरी महाकारण । चवथें ज्ञान साक्षी ॥१॥
विपरीत ज्ञान अज्ञान । निरसितां हें मिथ्या भान । चवथें तेंचि निर्गुण । अनिर्वाच्य ॥२॥
विराट हिरण्य महत्तत्त्व । तोंवरी मूळ प्रकृति साक्षित्व । अविद्यात्मक निरसीत । अनिर्वाच्य ॥३॥
जागृति स्वप्र सुषुप्ती । अविद्यामय असती । निर-सितां देहत्रय प्रचीति । तुया अनिर्वाच्य ॥४॥
सत्यत्वें सर्वसाक्षी निरंतर । निरसितां त्रय अविद्याव्यवहार । चवथें अनिर्वाच्य ॥५॥
विश्व तैजस प्राज्ञ । प्रत्य- गात्मा सत्यत्वें अभिधान । त्रय निरसितां अज्ञान । चवथें अनिर्वाच्य ॥६॥
रज सत्व तमो-गुण । चवथा शुद्धसत्व जाण । निरसितां तेथींचें भाषण । चतुर्थ अनिर्वाच्य ॥७॥
अकार उकार मकार । अर्धमात्रा ॐकार । निरसितां तिन्ही प्रकार । पुढें अनिर्वाच्य ॥८॥
जोंवरी अविद्यात्रयकर्तृत्व । तोंवरी माया ईश्वरत्व । निरसितां त्रयकर्तृत्व । ईश्वर अनिर्वाच्य ॥९॥
जेव्हां द्वैत नासलें । तेव्हांच एकपण विरालें । उपरी बोलणें खुंटलें । निवांत होय ॥१०॥
पृथिवी आप तेज पवन । तोंवरी आत्मयास आकाशपण । जड चंचळ नासतां पूर्ण । अनिर्वाच्य ॥११॥
दृश्यभास आटलें । उर्वरित जें उरलें । त्यासि नांव नाहीं म्हणितलें । महापुरुषीं ॥१२॥
सकल आशंकानिवृत्ति । कल्पनामात्र नासती । तेथें नामरूपस्थिती । कोणें बोलावी ॥१३॥
निवृत्ति विज्ञान उन्मनी । हेचि मायेची करणी । ते मुळींच नसतां वदनीं । कसें वदावें ॥१४॥
आत्मनिवदन नववी भक्ति । हेहि मायेची उत्पत्ति । ते मुळीं जालीच नव्हती । तरी हेहि कैंची ॥१५॥
दुजेवीण अनुभव । अनुभवचि समूळ वाव । येथें नसे नास्तिक्यभाव । म्हणोनियां ॥१६॥
आस्तिक नास्तिक हे दोन्ही । न घडे मायानिरसनीं । तेथें शब्दाची कडसणी । निरसोनि गेली ॥१७॥
दिवस ना रजनी । संध्यारागहि नसोनी । ऐसिये निर्वाणीं । शब्द कैंचा ॥१८॥
वैखरी मध्यमा पश्यंती । म्हणोनि परा ऐसें म्हणती । उठती जेथें तिनी वृत्ती । तेथें काय म्हणावें ॥१९॥
शब्द मौन्य दोनी । उद्भवती जेथूनी । ते मुळींच नसतां वाणी । कैसें वदावें ॥२०॥
जें जें वाचें बोलावें । जें जें मनीं अनुभवावें । हीं दोनी स्वभावें । जेथूनि जालीं ॥२१॥
तें मुळीं जालेंचि नाहीं । म्हणूनि अनिर्वाच्य पाहीं । ऐसें सांगण तेंही । निवांत जालें ॥२२॥
असीं स्वामींचीं वचनें । ते ऐकोनि परम निर्वाणें । सच्छिष्य तियेचि खुणे । पावतां झाला ॥२३॥
काया वाचा मनोभावें । साष्टांगें नमिलें शिष्यदेवें । मग उचलेनि देवादिदेवें । आलिंगन दीधलें ॥२४॥
ऐसा अनुग्रहो केला । उभयतां आनंद जाला । तो मज मंदमतीला । बोलवेल कैंचा ॥२५॥
परी स्वामीचे कृपागुणें । वाटे ब्रह्मांड ठेंगणें । म्हणोनि हें वचनें । निरोपिलें ॥२६॥
आधीं अन्वय बोलिला । उपरी व्यतिरेक निरोपिला । येथींचा विचार पाहिला । पाहिजे संतीं ॥२७॥
जाणत नेणत बोलिलें । चुकत वाकत आठवलें । न्यू पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रेष्ठीं ॥२८॥
स्वामी कृपा समर्थ सार । सीताराम हे अक्षर । वंदूनियां अत्यादरें । नमस्कार घाली ॥२९॥
इति श्रीव्यतिरेक । ज्ञानप्रळय निश्चयात्मक । स्वामी कृपा समर्थ एक । सेवकावरी ॥३०॥
इति एकादश: समास: ॥११॥

व्यतिरेक ओवीसंख्या ॥२४१॥ अन्वयव्यतिरेक ओवीसंख्या ॥३५९॥


अन्वयव्यतिरेक – संत रामदास समाप्त .