अंतर्भाव – संत रामदास

श्री रामदास्वामीं विरचित – अंतर्भाव

अंतर्भाव – समास १

॥ श्रीराम समर्थ ॥
जय जय सद्रुरु समर्था । जय जय पूर्ण मनोरथा । चरणीं ठेवोनि माथा । प्रार्थीतसें ॥१॥
मी ये संसारीं गुंतला । स्वामीपदीं वियोग झाला । तेणें गुणें आळा आला । जीवपणाचा ॥२॥
इच्छाबंधनीं गुंतलें । तेणें गुणें अंतरलों । आतां येथूनि सुटलों । पाहिजे दातारा ॥३॥
प्रपंचीं संसारउद्वेगें । क्षणोक्षणा मन भंगे । कुळाभिमानें डगे । समाधानासी ॥४॥
जेणें समाधान चळे । विवे उठोनि पळे । बळेंचि वृत्ति ढांसळे । संगदोषें ॥५॥
स्वामी प्रपंचाचे गुणें । परमार्था आणिलें उणें । ईश्वरआज्ञेप्रमाणें । क्रिया न घडे ॥६॥
दु:ख शोका आला चित्तीं । समाधान करावें किती । विक्षेप होतां चित्तवृत्ति । दंडगें लागे ॥७॥
प्रपंचें केलें कासाविस । घेऊंच नेदी उमस । तेणें गुणें उपजे त्रास । संसाराचा ॥८॥
आतां पुरे हा संसार । झाले दु: खाचे डोंगर । अंतरसाक्ष विचार । सर्व जाणती ॥९॥
तरी आतां काय करावें । कोणे समाधानें असावें । मज दातारें सांगावें । कृपा करोनी ॥१०॥
ऐशी शिष्याची करुणा । ऐकोनि बोले गुरुराणा । केली पाहिजे विचारणा । पुढिले अध्याचीं ॥११॥
इति श्रीअंतर्भाव । जन्ममृत्यू समूळ वाव । रामदासीं सद्‍गुरुराव । प्रसन्न झाले ॥१२॥१॥


अंतर्भाव – समास २

॥ श्रीराम समर्थ ॥
ऐक शिष्या सावध । सिद्ध असतां निजबोध । मायिक हा देहसंबंध । तुज बाधी ॥१॥
बद्धकें कर्में केलीं । तीं पाहिजेत भोगिलीं । देहबुद्धि दृढ झाली । म्हणोनियां ॥२॥
मागें जें जें संचित केलें । तें तें पाहिजे भोगिलें । क्षुद्रें शेत जरी टाकिलें । तरी बाकी सुटेना ॥३॥
हा तों देहबुद्धीचा भाव । स्वस्वरूपीं समूळ वाव । परंतु प्राप्तीचा उपाव । सुचला पाहिजे ॥४॥
स्वस्वरूप लंकापुरी । सुवर्णविटा त्या दुरी । देहबुद्धीच्या सागरीं । तरलें पाहिजे ॥५॥
विषयमोळ्या वाहों सांडी । त्यास कोण म्हणे काबाडी । तैसी पदार्था गोडी । सांडितां आत्मा ॥६॥
देहबुद्धीचें लक्षण । दिसेंदिस होतां क्षीण । तदुपरी बाणे खुण । आत्मयाची ॥७॥
सर्वात्मा असें बोलतां । अंगीं बाणेना सर्वथा । साधनेंविण ज्ञानवार्ता । बोलों नये ॥८॥
दसर्‍याचें सोनें वांटलें । तेणें काय हातासी आलें । रायें विनोदें आलें । सुखासना ॥९॥
तैसें शब्दें ब्रह्मज्ञान । बोलतां नये समाधान । म्हणोनि आधीं साधन । केलें पाहिजे ॥१०॥
शब्दीं जेवितां तृप्ति झाली । हें तों वार्ता नाहीं ऐकली । पाक-निष्पत्ति पाहिजे केली । साक्षेपें स्वयें ॥११॥
कांहीं तरी एक कारण । कैसें घडे यत्नेंविण । ब्रह्मज्ञान परम कठीण । साधनावांचूनि ॥१२॥
शिष्य म्हणे जी सद्‍-गुरु । साधन मी काय करूं । तेणें पाविजे पैलपारू । मह्ज़दु:खाचा ॥१३॥
आतां पुढील समासीं । स्वामी सांगती साधनासी । सावध श्रोतीं कथेसी । अवधान द्यावें ॥१४॥
इति श्रीअंतर्भाव० ॥२॥


अंतर्भाव – समास ३

॥ श्रीराम समर्थ ॥
प्राप्त झालें ब्रह्मज्ञान । बाणलें पाहिजे पूर्ण । म्हणोनि हें निरू पण । सावध ऐका ॥१॥
कांहींच नेणें तो बद्ध । समूळ क्रिया अबद्ध । भाव वाढविला शुद्ध । मुमुक्षु जाणावा ॥२॥
कर्में त्यजोनि बाधक । शुद्ध वर्ते तो साधक । क्रिया पालटे विवेक । निष्कलंक तेव्हां ॥३॥
तये क्रियेचें लक्षण । आधीं स्वधर्मरक्षण । पुढें अद्वैतश्रवण । केलें पाहिजे ॥४॥
नित्यनेम दृढ चित्तीं । तेणें शुद्ध चित्तवृत्ति । होवोनि भगवंतीं । भाग फुटे ॥५॥
नित्यनेमें भ्रांति फिटे । नित्यनेमें संदेह तुटे । नित्यनेमें लिगटे । सामाधान अंगीं ॥६॥
नित्यनेमें अतंर शुद्ध । नित्यनेमें वाढे बोध । नित्यनेमें बहु खेद । प्रपंची तुटती ॥७॥
नित्यनेमें सत्व चढे । नित्यनेमें शांति वाढे । नित्यनेमें थारा मोडे । देहबुद्धीचा ॥८॥
नित्यनेमें दृढभाव । नित्यनेमें भेटे देव । नित्यनेमें पुसे ठाव । अविद्येचा ॥९॥
नित्यनेम करूं कोण । ऐसा शिष्यें केला प्रश्र । केलें पाहिजे श्रवण । प्रत्ययाचें ॥१०॥
मानसपूजा जप ध्यान । एकाग्र करोनियां मन । त्रिकाळ घ्यावें दर्शन । मारुती सूर्याचें ॥११॥
हरि-कथानिरूपण । प्रत्यहीं करावें श्रवन । निरूपणीं ऊणखूण । केएले पाहिजे ॥१२॥
संकटीं श्रवण न घडे । बळात्कारें अंतर पडे । तरी अंतरस्थिति मोडे । ऐसें न कीजे ॥१३॥
अंत-रींच पांच नामें । म्हणत जावीं नित्यनेमें । ऐसें वर्ततां श्रमें । बाधिजेना ॥१४॥
ऐसी साध-काची स्थिति । साधकें रहावें या रीती । साधनेंवीण ज्ञानप्राप्ति । होणार नाहीं ॥१५॥
तंव शिष्य म्हणे जी ताता । जन्म गेले साधन करितां । कोणे वेळे पावों आतां । समाधान ॥१६॥
कैसें येईल सिद्धपण । केव्हां आतुडेल समाधान । मुक्तदशा सुलक्षण । मज केवीं प्राप्त ॥१७॥
आतां याचें प्रत्युत्तर । श्रोतीं व्हावें सादर । ऐका पुढें सविस्तर । आदरें करोनी ॥१८॥


अंतर्भाव – समास ४

॥ श्रीराम समर्थ ॥
सिद्ध होऊन बैसला । दृष्टीं नाणी साधनाला । सादर अशन शयनाला । अत्यादरें ॥१॥
ऐसा असे विषयासक्त । अत्यंत विषयीं आसक्त । सिद्धपणें आपण घात । तेणें केला ॥२॥
जो सिद्धांचा मस्तकमणी । महासतापसी शूलपाणि । तोहि आसक्त श्रवणीं । जपध्यानपूजेसी ॥३॥
अखंड वाचें रामनाम । अनुष्ठान हेंच परम । ज्ञान वैराग्यसंपन्नकाम । सामर्थ्यसिंधू ॥४॥
तोहि म्हणे मी साधक । तेथें मानव पुढें रंक । बापुडे सिद्धपणाचें कौतुक । केवीं घडे ॥५॥
म्हणोनि साधनाशीं जो सिद्ध । तोचि ज्ञाता परम शुद्ध । येर ते जाणावे अबद्ध । अप्रमाण ॥६॥
साधनेंवीण बाष्कळता । तीच जाणावी बद्धता । तेणें अनर्गळता । आसक्तरूपें ॥७॥
मन सुखावलें जिकडे । अंग टाकिलें तिकडे । साधन उपाय नावडे । अंतरापासोनी ॥८॥
चित्तीं विषयाची आस । साधन म्हणतां उपजे त्रास । नेम धरितां कासावीस । परम वाटे ॥९॥
दृढ देहाची आसक्ति । तेथें कैंची विरक्ति । विरक्तीवीण भक्ति । केवीं घडे ॥१०॥
ऐक शिष्यटिळका । नेम नाहीं साधका । तयालागीं धोका । नेमस्त आहे ॥११॥
तंव शिष्य म्हणती । अंतीं मति तीचि गति । ऐसें सर्वत्र बोलती । मी काय करूं ॥१२॥
अंतीं कोण अनुसंधान । कोठें ठेवावें मन । कैसें करावें साधन । अंतसमयाचें ॥१३॥
समय येईल कैसा । हा न कळे भरंवसा । प्राप्त कोण दशा । हें शोत नाहीं ॥१४॥
आशंका घेतली मनें । बोलतों करुणावचनें । याचें उत्तर शोतेजनें । सावध ऐकावें ॥१५॥
इति श्रीअंतर्भाव०॥४॥


अंतर्भाव – समास ५

॥ श्रीराम समर्थ ॥
ऐक शिष्या सावधान । एकाग्र करोनि मन । पुससी अनु-संधान । अंतसमयींचें ॥१॥
अंत कोणास झाला । कोण मृत्यु पावला । हा तुवां विचारा केला । पाहिजे आतां ॥२॥
अंत आत्मयाच्या माथां । हें तों न घडे सर्वथा । स्वरूपीं मर- णाची वार्ता । बोलोंच नये ॥३॥
स्वरूपीं अंत नाहीं । येथें पाहणेम नलगे कांहीं । मृग-जळाचे डोहीं । बुडों नको ॥४॥
आतां मृत्यु देहास घडे । अचेतन बापुडें । शवास मृत्यु न घडे । कदा कल्पांतीं ॥५॥
आतां मृत्यु कोठें आहे । बरें शोधूनि पाहे । शिष्य विस्मित होवोनि राहें । एक क्षण निवांत ॥६॥
मग पाहे स्वामीकडे । म्हणे हा देह कैसा पडे । चालवितां कोणीकडे । निघोनि गेला ॥७॥
देह चालवितो कोण । हें मज सांगा खूण । एक म्हणती हा प्रान । पंचधारूपें ॥८॥
प्राणाची कोण चालवितां । येरू म्हणे स्वरूपसत्ता । सत्तारूपें तत्त्वतां । वाया जाण ॥९॥
मायेची मायिक स्थिति । ऐसें सर्वत्र बोलती । माया पाहतां आदिअंतीं । कोठें नाहीं ॥१०॥
अज्ञानास भ्रांति आली । तेणें दृष्टि तरळली । तेणें गुणें आढळली । नसतीच माया ॥११॥
शिष्या होई सावचित । मायेचा जो शुद्ध प्रांत । तोचि चौंदेहांचा अंत । सद्रुरुबोधें ॥१२॥
चार देहांच्या अंतीं । उरे शुद्धस्वरूप- स्थिति । तेणें गुणें तुझी प्राप्ति ।तुजला झाली ॥१३॥
जन्मलचि नाहीं अनंत । तयासी कैंचा येईल अंत । आदि निवांत । तोचि तूं अवघा ॥१४॥
स्वामी म्हणती शिष्यासी । आतां संदेह धरिसी । तरी श्रीमुखावरी खासी । निश्चयेंसी ॥१५॥
देहबुद्धीचेनि बळें । शुद्धज्ञान झांकोळे । भ्रांति हदयीं प्रबळे । स्मदेहरूप ॥१६॥
म्हणोनि देहातीत जें सुख । त्याचा करावा विवेक । तेणें गुणें अविवेक । बाधूं न शके ॥१७॥
तुटलें संशयाचें मूळ । देहचि मिथ्या समूळ । तयासि अंत हें केवळ । मूर्खपण ॥१८॥
जे जन्मलेंचि नाहीं । त्याची मृत्यु कैंचा काई । मृगजळाच्या डोहीं। बुडों नको ॥१९॥
मनाचा करोनियां जयो । स्वरू-पाचा करावा निश्चयो । दृढनिश्चयें अंतसमयो । होवोनि गेला ॥२०॥
आदि करोनि देह- बुद्धि । देह टाकिला प्रारब्धीं । आपण देहाचा संबंधी । मुळींच नाहीं ॥२१॥
असतें करोनि वाव । नसत्याचा पुसोनि ठाव । देहातीत अंतर्भाव । असो खुणेनें ॥२२॥
हें समाधान उत्तम । असतेपणाचें जें वर्म । देहबुद्धीचें कर्म । तुटे जेणें ॥२३॥
आतां तुटली आशंका । मार्ग फुटला विवेका । अद्वैतबोधें रंका । राज्यपद ॥२४॥
तंव शिष्यें आक्षेपिलें । आतां स्वामी दृढ झालें । तरी हें ऐसेंच बाणलें । पाहिजे कीं ॥२५॥
निरूपणीं वृत्ति गळे । शुद्धज्ञान तें प्रबळे । उठेनि जातां मावळे । वृत्ति मागुती ॥२६॥
सांगा यासी काय करूं । मज सर्वथा नसे धीरू । ऐका सावध विचारू । पुढील अव्यायी ॥२७॥
इति श्रीअंतर्भाव० ॥

 


अंतर्भाव – समास ६॥ श्रीराम समर्थ ॥
शिष्या परम गुह्यज्ञान । जेणें घडे समाधान । ऐसें मागें निरूपण । केलें तुज ॥१॥
तें निरूपण पाहतां । अभ्यंतरीं तृप्त होतां । आशंकेसी सर्वथा । उरी नाहीं ॥२॥
आतां असो तें प्रस्तुत । देहास मांडतां अंत । तेव्हां साधकें निश्चित । काय करावें ॥३॥
निरालंबीं चित्त न्यावें । तरी राहेना स्वभावें । ऐक्यतेच्या नांवें । शून्याकार ॥४॥
निरावलंबींचें साधन । देह असतां सावधान । केलें पाहिजे समाधान । सत्संगें विवेकें ॥५॥
अनुसंधान अंतकाळीं । कैसें राहे तें निर्मळीं । अनुसंधानभिसें जवळी । मीपण उठे ॥६॥
ऐसें स्वरूपानुसंधान । अंतकाळीं न घडे जाण । आतां करावें ध्यान । सगुण मूर्तीचें ॥७॥
ध्यानासी कारण चित्त । तेचि झालिया दुश्चित । कैसें घडे सावचित्त । ध्यान अंतीं ॥८॥
आतां करावें रामचिंतन । वासना करी प्रपंचध्यान । प्रपंचीं गुंतलें मन । तें सुटलें पाहिजे ॥९॥
पडोनि कूपाअंतरीं । प्राणी नाना विचार करी । परी तें न घडे जोंवरी । बाहेर न ये ॥१०॥
तैसें मन हें गुंतलें । वासनाविषयीं नेलें । वरी वरी नाम स्मरलें । याचें कोण काम ॥११॥
तरी आतां काय करावें । कोणते उपायें तरावें । तेंचि आतां स्वभावें । सांगा स्वामी ॥१२॥
दीनदयाळ गुरुराव । पूर्वीच रचिला उपाव । अंतीं चळे अंतर्भाव । म्हणोनियां ॥१३॥
तरी त्या उपायाची खूण । केलें पाहिजे श्रवण । उपाय रविला कोण । सद्रुरुनाथें ॥१४॥
ऐका उपायाचें वर्म । दृढ लविला नित्यनेम । हेंचि उपायवर्म । समयीं अंतींच्या ॥१५॥
पूर्वी पढला अभ्यास । तोचि अतीं निजध्यास । म्हणोनियां सावकाश । नेम करावा ॥१६॥
जयासी ठांईची सवे । तयास नलगे सांगावें । म्हणोनि नित्यनेमासी जीवें । विसंबों नये ॥१७॥
नित्यनेम पूर्वीं कथिला । पुन: पाहिजे ऐकिला । जो मातें निरोपिला । तोचि आतां ॥१८॥
एकाग्र करोनियां मन । अंतरीं करावें ध्यान । सर्व सांग पूजाविधानं । प्रत्यहीं कीजे ॥१९॥
नित्य नेमिला जो जप । त्रिकाळ दर्शन साक्षेप आदित्य मारुतीचें रूप । अवलोकावें ॥२०॥
हरिकथानिरूपण । प्रत्यहीं करावें श्रवन । हीच जाणावी खूण । नित्यनेमाची ॥२१॥
अशक्त होवोनि प्राणी पडे । नित्यनेम त्यास न घडे । तेणें बळेंचि नेमाकडे । चित्त न्यावें ॥२२॥
नित्यनेमाचा अभ्यास । तोचि लागे निजव्यास । चुकतां कासावीस । अंतसमयीं ॥२३॥
अहा देवा जप राहिला । मारुती नाहीं देखिला । प्राणी योगभ्रष्ट झाला । निजध्यासें ॥२४॥
ऐसें नित्यनेमें कोडें । मन लागे देवाकडे । अंतकाळीं बळें घडे । निजध्यास ॥२५॥
खुंटतां अंतर पडे । अंतरींच जप घडे । स्वामी आधींच सांकडे । फेडीत गेले ॥२६॥
जें वाल्मीकासी आधार । जें शतकोटींचें सार । उमे सहित शंकर । जपे जया ॥२७॥
जेणें धन्य काशीपुरी । प्राणिमात्रासी उद्धरी । अंतकाळीं पृथ्वीवरी । उच्चार जयाचा ॥२८॥
तेंचि अंतरीं धरावें । तेणें संकटीं तरावें । कैलासपती सदाशिवें । उपाव केला ॥२९॥
इति श्रीअंतर्भाव समाप्त: ॥ ओंवीसंख्या ॥१५५॥


अंतर्भाव – संत रामदास समाप्त.