श्रीसमर्थ रामदास स्वामीकृत
आत्माराम – विवरण
प्रस्तावना
“आत्माराम दासबोध । माझें स्वरूप स्वतः सिद्ध ।
असता न करावा खेद । भक्तजनी ॥ “
श्रीसमर्थांनी स्वतः असा हा निर्वाणीचा संदेश दिला आहे. आपल्या अंतिम काळांत हा अत्यंत महत्त्वाचा संदेश देणाऱ्या श्रीसमर्थांनी आत्मारामाइतक्याच तोलामोलाचा मनोबोधही लिहिला आहे. श्रीसमर्थांचे असे हे तीन ग्रंथ प्रसिद्धच आहेत. श्रीसमर्थांनी देहरूपानें या जगामधे एकूण त्र्याहत्तर वर्षे वास्तव्य केलें. त्या त्र्याहत्तर वर्षाच्या कालावर्धामधे बारा वर्षाचे बालपण, बारा वर्षे तपःसाधना, बारा वर्षे भारतभ्रमण, चोवीस वर्षे संप्रदायाची उभारणी करणें, राजकारणामधे अष्टावधान ठेवणे, धैर्याचा सल्ला देणे, प्रसंगीं योग्य असें मार्गदर्शन करणें, अशीं अत्यंत महत्त्वाचीं कार्यें केली.
श्रीसमर्थांनी आपल्या एकूण त्र्याहत्तर वर्षांच्या कालावधीमधे छत्तीस हजार ओव्यांची काव्यरचना – काव्यसंपदा निर्माण केली. त्यामधे तत्त्वज्ञानाच्या – वेदान्ताच्या कसोटीवर चमकणारा हा आत्माराम ग्रंथ आहे. नव-रत्नांमधे श्रेष्ठ असणाऱ्या हिऱ्याला अष्टपैलू पाडले की त्यांतील प्रत्येक पैलू स्वतंत्रपणें वेगळ्याच प्रसन्नतेनं चमकत असतो. त्याचप्रमाणें हा आत्माराम ग्रंथ छत्तीस हजार ओव्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटतो, श्रेष्ठ गणला जातो. परमार्थ-मार्गावर वाटचाल करणाऱ्या निःस्पृह साधकांना अशा सद्ग्रंथाचें वाचन आणि मार्गदर्शन असावें.
ह्या आत्माराम ग्रंथाची सुरुवात सद्गुरु आणि सत्शिष्य यांच्या सुखसंवादामधून झाली. सद्गुरूंनी आपल्या सत्शिष्याला सर्वप्रथम त्यागनिरूपण हें प्रकरण समजावून सांगितलें. जीवनामध्ये त्याग कशाला म्हणतात? त्यागाचे स्वरूप काय? त्यागामधून काय प्राप्त होतें; अशा या तिन्ही प्रश्राचे एकच उत्तर दिले आहे. “त्यागांत् शांति निरंतर ” असे हें छोटेसे सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. पहा ! या त्यागामथेंच शांति-समाधान मिळण्याचे सामर्थ्य आहे. साधकाच्या जीवनामध्ये विवेक वैराग्य हे हवेंच, पण त्याहीपेक्षा अंतःस्त्याग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मानवी जीवनामध्यें मानवांच्या ठिकाणीं प्रवृत्ति आणि निवृत्ति अशीं दोन अंगें अनुभवास येतात. पहिलें अंग भोगयुक्त जीवनाचे दिसून येतें; तर दुसरे अंग निवृत्तिप्रधान त्यागमय जीवनाचे असते. भोगी जीवन आणि त्यागी जीवन हे दोन्ही विषय वेगवेगळ्या जीवन पद्धतीने अनुभवावे लागतात. भोगी जीवनामध्ये अनेक विषयांच्या भोगाची आसक्ति अधिकच वाढत असते. त्यामुळे जीवनभर अशांतीचे जीवन जगावे लागते. जीवनांत, ‘सुख पाहाता जवापाडे । दुःख पर्वता येवढें” सुखापेक्षा अधिकाधिक दुःखच भोगावे लागतें. म्हणूनच भोगी जीवन जन्म-मृत्यूच्या दुष्ट चक्रामध्ये चक्राकृति फिरत असतें. त्यागी जीवनामधे जीवनभर शांति असते, समाधान असतें. आणि निःसंग राहून आत्मचिंतन करता येतें. जीवनामध्ये आत्मचिंतन हे अत्यंत महत्त्वाचें आहे. जो साधक सतत आत्मचिंतन करतो त्याला आत्मशांति, आत्मसमाधान प्राप्त होतें. साधुसंत हे आत्मसमाधानी असतात. म्हणूनच त्यांना संत ही पदवी मिळालेली असते.
सत्शिष्यानें अगदी प्रामाणिकपणे आपलें मत सद्गुरूंसमोर सादर केले. महाराज ! ही दिसणारी, भासणारी आणि कधीं न संपणारी माया ! ह्या मायेचे स्वरूप तरी काय? अहो ! अनेक वषें साधन अभ्यास करूनही या मायेचा संग सुटत नाहीं. या मायेचें खरें स्वरूप आकलन होत नाहीं. मायेचा संग सोडण्याचा प्रयत्न करीत असतांना ही माया अधिकच गुंता निर्माण करते. “बहुनाटकी ही माया”‘ या मायेचें खरें स्वरूप आपणच सांगावे अशी शिष्यानें नम्र प्रार्थना केली. सद्गुरुंनी त्या शिष्याचे सर्व म्हणणें ऐकून घेतलें आणि त्याच्या प्रश्नाचें उत्तर देण्यास सुरूवात केली. अरे बाळ ! तुला डोळ्यांनी दिसणारी, मनाला भासणारी आणि जीवनभर कधीं न संपणारी माया – ह्या मायेचें मूळ तुझ्या ठिकाणीं असणाऱ्या अज्ञानांतच आहे. अज्ञान हेंच या मायेचें मूळ आहे बरं ! ही माया देहाला चालविते, ही माया इंद्रियांना हालविते, ही माया वाणीला बोलविते, ही माया मनाला विषयांत गुंतविते. अशी ही बहुरंगी माया झटकन सोडता येत नाहीं. अरे ! या मायेचें हें स्वरूप खरें नाहीं. पण या मायेनें सत्यस्वरूपाला झाकून टाकले आहे. “खोटे तें खोटे चि खोटे” आकाशांत आपल्या प्रखर तेजाने पृथ्वितलावर प्रकाश देणाऱ्या सूर्यावर कधीं कधीं ढगाचे अभ्र आच्छादन येतें. अशा वेळीं सूर्याचा प्रकाश कांहीं काळ पूर्ण लोपला जातो, झाकला जातो. अशीच अवस्था या मायेनें केली आहे. म्हणून या मायेचें खरें स्वरूप समजण्यासाठी ज्ञानसूर्याची आवश्यकता आहे. आपल्याच आत्मस्वरूपाचा यथार्थ ज्ञानबोध झाला म्हणजे अज्ञान-अंधकार नाहींसा होतो. आत्मज्ञान झालेल्या महापुरुषाला या मायेचें खर्रे स्वरूप समजलेलें असतें. म्हणून परमार्थ मार्गावर वाटचाल करणाऱ्या साधकाने सद्गुरूंच्या सान्निध्यांत राहून या मायेचा गुंता सोडवावा. जी माया (या मा सा माया) अरे ! ही माया केव्हां झाली, ही वेगळेपणानें कधीं आली ? अरे ! खरें तर मायाही झालीच नाहीं. पाहा ! जर माया ही झालीच नाहीं; तर या मायेचा गुंता सोडविण्याचे सायास तरी कशाला ?
सत्शिष्याने या ठिकाणीं आपली शंका उपस्थित केली. महाराज ! ही माया अज्ञानामुळे भासते असे आपणच सांगता. आणि ही माया मुळांत झालीच नाहीं असेंही सांगता. पण या परस्पर विरोधी शब्दप्रयोगांमधील खरी वस्तुस्थिति कोणती ती समजून सांगावी. अरे बाळ ! मन-बुद्धीसारख्या जड इंद्रियांना जें दिसते, भासतें ते नश्वर जगत् आपल्याच गाढ अज्ञानामुळें दिसते. ह्या अवस्थेला देहश्रांति, दृष्यभ्रांति, आणि जगत्भ्रांति असें म्हणतात. हा एक मायेचाच भाग समजावा. दुसरा भाग ज्ञानाच्या ठिकाणीं ‘मी’ असें जाणीवरूप, सूक्ष्मभान’असतें, हेंही अज्ञानच समजावे. आपल्या देहापासून, आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या हश्यापासून तें आब्रह्मस्तंबापर्यंत ही सगळी मायाच भरून राहिली आहे. म्हणून माया ही आहेच असें जें तुला सांगितलें तें खरेंच सांगितलें बरं. पण सद्गुरूंच्या सान्निध्यांत साधना करून परतत्त्वाचा स्पर्श झाला कीं ही माया नाहींच नाहीं हेंही खरें आहे. सत्शिष्याला या मायेचें स्वरूप समजलें. आतां या मायेचा संग सोडण्यासाठी कोणता प्रयत्न करावा याचा विचार सुरू झाला.
मानवी जीवनामधे कोणताही संग हा मानवाला बंधनकारकच ठरतो. या बंधनामुळेच मानवी जीवनाचा उत्कर्ष होत नाहीं. गरिबाच्या घरांत असणाऱ्या लहान मुलाच्या पायांत चांदीचे तोडे असतात. तसेच श्रीमंताच्या घरांत असणाऱ्या मुलाच्या पायांत सुवर्णाचे तोडे असतात. त्या लहान मुलाच्या दृष्टीनें ते पायांतील तोडे कशाचे आहेत ही वस्तुस्थिति गौण आहे. पण मुलाच्या दृष्टीनें ते मुलाच्या पायांतील चांदीचे किंवा सुवर्णाचे तोड त्या मुलाला बंधनकारकच वाटतात. तसेच मानवी जीवनामध्ये ज्ञान आणि अज्ञान हे दोन्हीही मानवाला बंधनकारकच असतें. मानवी जीवन बंधमुक्त होण्यासाठी ब्रह्मस्वरूपाचे ज्ञानच झालें पाहिजे. “सद्गुरु अंजन ल्याला । माया भयानक न दिसे त्याला । अभिनपणे आत्मयाला । सर्वत्र पाहे । ” साधकाची अशी अवस्था झाली पाहिजे. ज्ञानप्राप्तीचे गुह्य स्वरूप सद्गुरूंच्या सान्निध्यांत अभ्यासावे लागते. जगांतील कोणतीही गोष्ट शिकल्याशिवाय त्या गोष्टीचें ज्ञान होत नाहीं. एखादी गोष्ट शब्दांनी समजली तरी ती अनुभवांत उतरत नाहीं. म्हणून जाणत्याची संगत धरून वस्तुनिष्ठ ज्ञान किंवा आत्मज्ञान हे समजून घ्या. मनुष्याने आपलें सर्व जीवनच ज्ञानानुभवाच्या उच्च पातळीवर राहून यशस्वी करावें. सदुगुरूच्या सान्निध्यांत राहून ती ब्रह्मावस्था समजून घ्यावी.
अहो ! मानवी जीवनांतील प्रपंच हा अत्यंत (अवघड) कठीण आहे. कारण तो कधीं संपतच नाहीं. याच्या उलट, परमार्थ हा अत्यंत (सोपा) सुलभ वाटतो. जीवनामधे एखादी प्रिय वस्तु जीवनभर धरून बसणे, सांभाळणे अत्यंत कठीण आहे. याच्या उलट, सर्व विषयांचा संग सोडून जीवनभर निःसंग राहणे हें सुखाच (सोपे) वाटते. प्रवृत्तिमार्गामध्ये जीवनभर वासनेचा संग सोडता येत नाहीं, म्हणून त्या वासनेचे बंधन अधिकाधिक वाढतच असतें. निवृत्तिमार्गामध्ये साधन-अभ्यास करून वासनाक्षय झाल्यामुळे बंधमुक्त होता येते. जीवनामधे संग सोडून निःसंग राहावे अशी सद्गुरूंची आज्ञाच आहे. सद्गुरूंनी आपल्या शिष्योत्तमाला सांगितलें. अरे बाळ ! साधना करून तुला जो अनुभव आला तो अनुभवही नाशिवंतामधेच आला बरं. अरे ! तुला जें जें अंतर्हश्य दिसलें, प्रकाश, ज्योत, नाद, बिंदु हा अनुभव आला तो अनुभवही या मायेमध्येच आला. ब्रह्मवस्तु या सर्वांच्या पलीकडे आपल्याच स्वतःसिद्ध अस्तित्वाने निश्चल आहे. अरे ! जे कधींही हालत नाहीं, जें कधीही डोलत नाहीं, जे कधींही बोलत नाहीं, जे कधींही इंद्रियांना अनुभवता येत नाहीं, तें परब्रह्मस्वरूप निश्चल, निर्विकार, निघोट परिपूर्ण आहेच आहे. “बुद्धि जाऊ न पवे जथे । वित्पत्ती काये करील तेथें । सद्गुरु कृपेचे भाते । अंगी बाणले पाहिजे ॥”
त्या ठिकाणीं साधकाच्या बुद्धीची धाव खुंटते. शुद्ध बुद्धीचें कौशल्य, चातुर्य लटके पडते. त्या ठिकाणीं केवळ सद्गुरुकृपेच्या विवेक – वैराग्यरूपी भात्यांचा उपयोग होतो. अखेर हें मानवी जीवन सद्गुरुकृपेनेंच धन्य होतें हेच खरें.
साधनशील असणाऱ्या साधकाने आपली साधना क्रमशः करावी. प्रथम श्रवणापासून सुरुवात करावी; म्हणजे श्रवणाने साधकाचे मन निवळतें. निवळलेल्या मनाला श्रवणाचे मनन करावें, असें वाटत असते. साधनेचा बराच काळ स्थिर होत जगला कीं, मननाचे चिंतन करावेसे वाटत. एकदां आत्मचिंतनाची गोडी लागली की मालकाला आपले हित आणि अनहित समजूं लागतें. आत्मचिंतनामधें सुख आहे असें समजले कीं, साधक त्या आत्मचिंतनाचा ध्यास धरतो. साधकाच्या जीवनांत आत्मतत्त्वाचा निजध्यास सुरू झाला की त्या साधकाला आत्मोपासनेचे गमक अनुभवास येतें. आत्मोपासना ही साधकाची प्राणप्रिय खरी उपासना समजावी. स्वयंप्रकाश असणाऱ्या आत्म्याचें ज्ञान झालें कीं, साधकाचा खरा उत्कर्ष समजावा. साधकाने जीवनभर अन्य कितीही उपासना केल्या तरी त्या आत्मसमाधान देत नाहींत. अहो ! जिथे वृक्ष तिथेच त्या वृक्षाची छाया असते. हाच प्रकार, जिथे साधकाची उपासना चालते तिथेच या मायेचें नाटक अनुभवास येते. साधकाने या मायेचा संग सोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, “माया तोडिता अधिक जडे” अशी ही नाटकी माया साधकाचा राजमार्ग मोकळा करूं देत नाहीं. अशा वेळीं ज्ञानाच्या क्षेत्रामधे प्रवेश करतांना ज्ञानीपुरुषाचे मार्गदर्शन घ्यावें. अशा ज्ञानी सिद्धपुरुषांना सद्गुरु असें म्हणतात. सद्गुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवून साधना करावी असा दंडक आहे. आत्मवस्तु ही जशी नित्य सिद्ध आहे तशी ती तदाकारपणें तिची येणारी अनुभूतीही नित्य सिद्धच आहे. स्वयंप्रकाश असणारा आत्मा हा नित्य असल्यामुळें आत्मज्ञान कधीं उत्पन्न होत नाहीं आणि कधीं नाशही पावत नाहीं. कारण आनंदस्वरूप असणाऱ्या आत्म्याचे ज्ञान हे अमर आहे आणि या विश्वाचे अधिष्ठानही आहे. सत्ता या रूपानें तें या विश्वामध्ये ओतप्रोत भरून व्यापून असतेंच. प्रत्येकाच्या हृदयामध्यें ते सर्वांग व्यापून आहेच आहे. प्रत्येक देहामधे आत्मचैतन्य या स्वरूपानें अनुभवास येतें. तेंच या जगाचें अधिष्ठानही आहे. तोच जगन्नियंता परमेश्वर होय ! त्या दिव्य असणाऱ्या आत्मचैतन्याचा साक्षात्कार म्हणजेच हे आत्मज्ञान होय ! साधकाने जीवनभर आपली साधना करून आत्मज्ञान प्राप्तीपर्यंतचा प्रयत्न करावयाचा असतो. याच्या पुढचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ज्ञानाचें विज्ञान हे सद्गुरुकृपेनेच होऊं शकते.
आपलें आत्मस्वरूप केवळ चिन्मात्र, ज्ञानमात्र, ज्ञप्तिमात्र असेंच आहे. त्याचा स्वानुभव येण्यासाठी आपलें सर्व जीवनच निःसंग असावें लागतें. निःसंग असणाऱ्या साधकाला आपल्या आत्मस्वरूपाचा नित्य आनंद मिळू लागला कीं, “विरंग नाही तोचि रंग । विट नाही तोचि संग । आनंदरूप जो प्रसंग । तोचि घ्यावा । ” साधकाला आत्मानंदाव्यतिरिक्त अन्य काहीही आठवत नाहीं. जिकडे पहावे तिकडे एकच राघवाचे ठाण असा स्वानुभव असतो. या अवस्थेमधे एक आत्मस्वरूपच सर्वव्यापी आहे असा अनुभव येतो. हीच ती आत्मज्ञानाची परमोच्च अवस्था समजावी. या पृश्चितलावर नित्यमुक्त, जीवन्मुक्त आणि विदेहमुक्त असे हे सिद्ध पुरुष या अवस्थेमथेंच राहात असतात. पहा ! केळीच्या पानाच्या टोकावर पावसाच्या पाण्याचा अखेरचा एक थेंब त्या पानाच्या टोकावर बराच वेळ अधरपणें लोंबत असतो. त्या पाण्याच्या थेंबामधे सूर्याची किरणे निळी, पिवळी, हिरवी, सोनेरी अशी चमकत असतात. हें दृश्य दिसायला अतिसुंदर असतें. पण एखादी वाऱ्याची लहर आली, म्हणजे तो अधर असणारा पाण्याचा थेंब पटकन जमिनीवर पडतो आणि मातीमध्ये मुरून जातो. असेंच या नित्यमुक्त जीवन्मुक्ताचे आयुष्य आपल्याच आत्मानंदाशी एकरूप झालेलें असतें. त्याच्या जीवनांतील अखेरचा कांहीं काळ मोठा विलक्षण कीर्तिरूपानें चमकत असतो. अशा सिद्ध पुरुषांचा प्रभाव समाजावर आणि सत्शील साधकांवर होत असतो. इथेंच, “साधकाचे होती सिद्ध” असें पहावयास मिळतें. ‘सद्गुरूहून देव मोठा । जयास वाटे तो करंटा ” सद्गुरु हेच मोक्षदाते असतात. म्हणून सद्गुरूंना मोक्षदाते, मोक्षपाणी असा किताब प्राप्त झालेला असतो. साधकाला शुद्ध ज्ञानाची प्राप्ति करून देणारे हे सद्गुरुच आहेत. आणि त्या शुद्ध ज्ञानामध्ये ज्ञप्तिमात्र असणारे ज्ञानाचे भान तेंही स्वस्वरूपांत विलीन करणारे, इतकेच काय – त्या अतिसूक्ष्म असणाऱ्या ज्ञानाचेही विज्ञान करविणारे सद्गुरूच असतात. सद्गुरु हाच साधकांचा पाठीराखा आहे. सद्गुरु हेच साधकाला मोक्ष देणारे मोक्षदाते आहेत. साधकाने परमार्थाकरितां घर-दार आप्तमंडळी सोडली कीं सर्वप्रथम ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या सद्गुरुपदी अनन्यशरण जाणें हेंच अति उत्तम.
आत्माराम हा ग्रंथ एका सिद्ध पुरुषाची प्रतिभासंपन्न असणारी ही ब्रह्मवाणी आहे. प्रतिभा ही सिद्धपुरुषांवरच सतत प्रसन्न असते. प्रतिभा प्रसन्न झाली म्हणजे सिद्ध पुरुषांच्या हातून अशा सद्ग्रंथाची निर्मिती होते. सिद्ध पुरुषांचे सद्ग्रंथ हे अध्यात्मपर असतात. साधकीय जीवनामधे सत्शील साधकांना अशा सद्ग्रंथाचा फार उपयोग होत असतो. तत्त्वज्ञान किंवा वेदान्त सिद्धान्तपर असणारे ग्रंथ हे सिद्ध पुरुषांनी (रचिलेले) लिहिले असतात. सिद्धपुरुषांना आपुल्या आत्मस्वरूपाची स्वानुभूति आलेली असते. त्या आत्मानुभूतीचा विस्तार म्हणजेच हे सद्ग्रंथ होय ! मानवी जीवनाचा उत्कर्ष होण्यासाठी अशा सिद्ध पुरुषांच्या सद्ग्रंथांचा अभ्यास करावा. साधकाची मनोवृत्ति अभ्यासाने थोडी निवळली कीं, साधकाचे मन शांत होतें. असें शांत झाले मनच बंधमुक्त होण्याचा प्रयत्न करीत असते. श्री समर्थांनी आपल्या आत्माराम ग्रंथाची रचना केली. ही ग्रंथरचना करीत असतांना सत्शिष्याचा आत्मभाव जागृत करण्यासाठीं खूप प्रयत्न केलेला दिसतो. “साधक भावे नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली । सुगमपंथ नेवून घाली । तेथील तेथे । ” श्रीसमर्थांच्या जीवनांतील त्यांची ब्रह्मनिष्ठ अवस्था पाहून जे सत्शिष्य त्यांना अनन्यशरण आले त्यांचा आत्मोद्धार झाला आहे.
श्रीसमर्थांनी आपल्या सद्ग्रंथाचे नांव ‘आत्माराम’ असें ठेवले आहे. याचें कारण पहा ! मानवी जीवनाचा केंद्रबिंदु या देहांत असणारा हा आत्माराम आहे ! साधनशील असणाऱ्या साधकाच्या जीवनांतील साधनेचा केंद्रबिंदु हा आत्माराम आहे ! नित्यमुक्त, जीवन्मुक्त असणाऱ्या सिद्ध पुरुषांच्या जीवनांतील स्वानंदाचा हा आत्माराम आहे ! विदेहमुक्त महापुरुष जीवनभर रममाण असतो. त्याचा केंद्रबिंदु आत्माराम असतो. सिद्ध आपल्या ज्ञानाचें विज्ञान (बंधमुक्त) होण्यासाठी एक क्षण हा आत्मारामच मध्यबिंदू असतो ! माया आणि परब्रह्माच्या मधला चिन्मात्र ज्ञानमात्र असणारा आत्माराम हा मध्यबिंदु शेवटीं ब्रह्मस्वरुपांत एकरूप होतो. हीच ती ब्रह्मावस्था. हेच ते निश्चल निर्विकार परब्रह्मस्वरूप होय !
सत्शील असणाऱ्या साध्यकाने आपल्या जीवनांतील हे अतिकठीण असणारे जन्म-मृत्यूचे कोडे सोडविण्यासाठी, ह्या आत्माराम ग्रंथाचा भावपूर्ण अभ्यास करावा, मनन-चिंतन करावें. तसेंच आपलें अत्यंत महत्त्वाचे मानवी जीवन बंधमुक्त करण्याचा प्रयत्न करावा, हीच सदिच्छा !
जय जय रघुवीर समर्थ !
मारुतीबुवा रामदासी
मु. पो. सज्जनगड, सातारा
दिनांक १२-८-२००५
समास पहिला
त्याग निरूपण
जयास लटिका आळ आला । जो मायागौरीपासूनि जाला ।
जालाचि नाहीं तया अरूपाला । रूप कैंचें ? ॥ १ ॥
ग्रंथारंभी सगुण-निर्गुण गणेशाचे स्मरण करावे अशी परंपरागत पद्धति आहे. त्या पद्धतीनुसार आपण गणेशस्वरूपाचे मनोमन स्मरण करून आत्मारामाच्या लिखाणास सुरुवात करूं या. पहा ! आपण आपल्या अल्पशा बुद्धीने विचार करून या परमात्मस्वरूपावर उगीच आरोप करीत असतो. असा हा उथळ आरोप योग्य नाही. मायारूपी आदिशक्तीचे जे कर्तृत्व आहे ते आपण त्या परमात्मवस्तूवर विनाकारण लादत असतो. परमात्मस्वरूपाला कधीही विकार झाला नाही. जो विकाररहित आहे, तो या विकारमय मायेमध्ये कसा लिप्त होईल बरे ? आपल्या फलकट शब्दांनीं तें परमात्मस्वरूप कधीही विकार पावत नाहीं. अरूप असणाऱ्या ब्रह्मवस्तूला कधीही रूप प्राप्त होत नाहीं.
परमात्मस्वरूप हे केवळ सतस्वरूपाने, आहेपणाच्या अस्तित्वाने आहेच आहे. परमात्मवस्तूला नामही नाही आणि तसें रूपही नाही. जें ‘नामरूपातीत’ आहे तेंच परमात्मस्वरूप सत्य होय ! “जें जें आकाराला येतें । तें तें सवेंचि नासोन जातें । येणे जाणें नाहीं तें । परब्रह्म जाणावें” परमात्मस्वरूप हे अनंत, अनादि, अरूप, अमूर्त असें केवळ सतस्वरूपानेंच आहे. तेंच स्थिर, निश्चल होऊन जाणण्याचा प्रयत्न करावा.
श्रीसमर्थांनी आत्माराम सांगत असतांना सगुणसाकार दृश्य स्वरूपांत असणाऱ्या जड वस्तूला काही काळाची मर्यादा आहे असे स्पष्ट सांगितले. तसाच सगुण-निराकार असणारा स्वयंप्रकाश आत्मा हा पूर्ण व्यापक असून अमर्याद कर्तृत्वाने नटलेला आहे असा अनुभव येतो. अशा चित् चैतन्यमय असणाऱ्या आत्म्याची अंतरीच आत्मप्रचीति येते. निर्गुण, निर्विकार परब्रह्म आपल्याच आहेपणाच्या अस्तित्वाने सर्वव्यापी आहे. हे येकच परब्रह्म या चराचराचा आधार आहे. पहा ! जड-चंचलाच्या संगतीमध्ये राहून आत्मारामाची ओळख करून घ्यावी. आत्मारामाच्या सान्निध्यात असतांना निश्चल परब्रह्म होण्याचा प्रयत्न करावा. असा ह्या आत्माराम ग्रंथाचा मुख्य आशय दिसून येतो.
तेथे स्तवनाचा विचार । न घडे निर्विकारी विकार ।
परी तयास नमस्कार । भावबळे माझा ॥ २ ॥
निर्विकार, स्थिर असणाऱ्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणतेही स्फुरण होत नाही. अशा अतिगुह्य, गुप्त ठिकाणी बाह्य विषयांचा किंवा स्तवनाचा प्रश्नच संभवत नाही. पण हा भवसागर तरून जाण्याकरिता “मानव भावबळें तरले” असे श्री समर्थांचे धन्योद्गार आहेत. संत हे स्वानुभवाने सत्याचाच प्रचार करीत असतात. कोवळ्या अंतःकरणावर सद्भाव प्रगटला म्हणजे सगुणांतून निर्गुणापर्यंत जाता येते. सद्भावाची सांगड ही आनंदस्वरूप असणाऱ्या आत्मानंदापर्यंत पोहोचविते. आत्मानंद आणि ब्रह्मानंद यांच्यामध्ये अतिसूक्ष्म ‘मी’चे भान असते म्हणून त्या अवस्थेला सद्भावयुक्त आनंद असें म्हणतात.
त्या ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य होण्याकरितां आनंदस्वरूप ‘मी’चा संग सोडून निःसंग व्हावे लागते. निःसंगता, निर्विकारता या अवस्थांना मानवी जीवनाचे अंतिम ध्येय सारसर्वस्व सांपडते. या करितांच हे मानवी जीवन विवेकानें समृद्ध असावे लागते. पाण्यात सोडलेली नौका स्वतः तरते आणि सर्व मंडळींना हळूहळू नदीच्या पैलतीरावर नेऊन पोहोचविते. याचप्रमाणे मानवी देहामध्ये असणारा सद्भाव देवा-भक्तांचे ऐक्य घडवून आणतो. सगुणापासून दूर असणारे परब्रह्म, त्या परब्रह्माला श्रद्धेने, भावबळाने नमस्कार करून त्याची जवळीक साधतो.
श्रीसमर्थांच्या सारखा महापुरुष अनुभवाच्या पातळीवर परमात्मस्वरूपच असतो. पण परमात्मतत्त्व समाजाला समजून सांगण्याकरिता त्यांना मानवतेच्या पातळीवर काही क्षण यावेच लागते. सामान्य मनुष्याला पचणारी, रुचणारी भाषा वापरावी लागते. हेच साधुसंतांचे वैशिष्ट्य आहे. श्रीसमर्थ येथे परमात्मस्वरूपाला भावबळे नमस्कार करतात.
जयाचेनि वेदशास्त्रेपुराणें । जयाचेनि नाना निरूपणें ।
जयाचेनि स्वसुखा लाधणें । शब्दी निःशब्द ॥ ३ ॥
ज्याच्या अस्तित्वामुळे हे चराचर विश्व निर्माण झाले, ज्याच्या आधारामुळे हे सर्व जग नियमबद्ध सुसूत्र चालले आहे, याच विश्वामध्ये हे चार वेद, चार उपवेद, सहा शास्त्रे, अवतारादि अठरा पुराणे त्या निर्विकार परमात्म्याचा महिमा सांगत असतात. शेवटी शब्दांच्या ध्वनींतून, आनंदाच्या लहरींतून त्याचा अर्थानुभव येत असतो. निर्विकार परमात्मस्वरूप अनुभवण्यासाठी शब्दांचा आधार घेऊन शेवटी निःशब्द व्हावे लागते. स्वसुख हे आपल्याच प्रयत्नांनी आपल्याच देहांत अनुभवायचे असते. चैतन्य, प्रकाश आणि आनंद हे आपल्याच स्वस्वरूपाचे अंतरंगानुभव आहेत.
जीवनांत स्वसुख अनुभविण्यासाठी अंतःत्यागच उपयोगी पडतो. या ग्रंथाचे हे त्यागनिरूपण प्रकरण चालू आहे. शब्द हा नाशिवंत असतो पण त्याच्या मागे असणारा चैतन्यमय भाव हा निःशब्द स्वरूपाचा अनुभवच असतो. शुद्ध चैतन्यस्वरूप जाणीव म्हणजेच आनंदघन हृदयात्मा होय ! आत्मा देहादिपासून तो चराचराला व्यापून आहे. तोच ईश्वर, तोच प्रथम ओंकार, तोच सगुण निर्विकार परमात्मा होय ! त्या आत्म्याचा अनुभव घेणे, निर्विकार होऊन राहणे हेच आपले अंतिम ध्येय असावें.
चैतन्यमय ज्ञानस्वरूप असणारा ईश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयांत आहेच. जगातील सर्व ज्ञानाचा प्रेरक तो विश्वात्माच आहे. त्यानेच हे वेद प्रगट केले. ह्या वेदांचे शब्द अंतिम प्रमाण मानतात. ऋषींना ध्यानावस्थेमध्ये शब्दध्वनित झाले. त्या शब्दांचा अर्थ ऋषींना समजूं लागला. एक दिव्य तेज स्वयंप्रकाशरूप प्रज्ञा जागी झाली. त्याच प्रज्ञेच्या द्वारा अनंताचा शोध आणि बोधही झाला. तेंच हे निर्विकार परमात्म-स्वरूप समजावें.
जें शब्दांस आकळेना । जें शब्देवीण सहसा कळेना ।
कळलें ऐसेंहि घडेना । जिये स्वरूपी ॥ ४ ॥
परमात्मस्वरूप शब्दांनी आकलन होत नाही. कारण शब्द हा पोकळ असतो, शब्दांचे स्वरूप ध्वनिरूप असते, ध्वनि हा आकाशांत विरून जातो. असा हा फलकट शब्द आत्मवस्तु दाखवू शकत नाही. पण जगांतील प्रत्येक वस्तूचे ज्ञान, शब्दाच्या मुळाशी असणारे शब्दज्ञान आणि शब्दार्थज्ञान समजून घ्यावे लागते. सद्गुरूंच्या सान्निध्यांत राहून परमात्मस्वरूपाचे ज्ञान शब्दार्थानेच समजून घ्यावे लागते. प्रयत्नांनी शब्दार्थाचे ज्ञान झाले तरी तें स्वस्वरूप समजल्याचे खरे समाधान होत नाही. कारण आत्मस्वरूप हे गुप्त आहे तें गुप्तच जाणावें, अनुभवावें असा हा परिपाठ आहे.
एखाद्याने आत्मप्रौढी म्हणून मला तें आत्मस्वरूप समजलें असें सांगितले तरी “म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे । अतर्कास तर्की असा कोण आहे ?” पहा ! जें तर्काला सांपडत नाहीं, जाणिवेला आकलन होत नाही, मनादि सर्व इंद्रिये त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहींत. असे हे आत्मस्वरूप सद्गुरूंच्या कृपेशिवाय प्राप्तही होत नाही. आपले आत्मस्वरूप असे अतिविलक्षण आहे.
जें दृश्यातीत आहे, जे लक्षणातीत आहे, जे अतर्क्य आहे, तेंच आत्मस्वरूप सद्गुरूंच्या कृपेने समजून घेण्याचा प्रयत्न करावा. शेवटी सद्गुरुपदीं अनन्य शरण गेल्याशिवाय खरे समाधान मिळत नाही. “सद्गुरुपदी अनन्यता । तरी तुज कायसी रे चिंता” आपले प्रयत्नशील असणारे सर्व जीवन सद्गुरुपदी समर्पावे हेच अति उत्तम.
ऐसें सदा सर्वत्र संचलें । जे तर्का न वचे अनुमानलें ।
तें जयेचेनि प्राप्त जालें । आपरूप आपणासी ॥ ५ ॥
आपले निजस्वरूप म्हणजेच नित्य आणि सत्य असणारी सद्वस्तु होय ! ती सद्वस्तु सर्व काळ सर्वव्यापी, सर्वत्र सद्रूपाने आहेच आहे.
ती तर्काच्या कसरतीने जाणता येत नाही. त्या ठिकाणी कुशल बुद्धीचे कौशल्यही आखूड – लटके पडते. जी सद्वस्तु इंद्रियांना अगम्य आणि अगोचर आहे ती आपल्या उथळ प्रयत्नांनी कधीही प्राप्त होत नाही. ती वस्तु प्राप्त करून घेण्यासाठी स्वानुभवी जाणत्याचा आधार घ्यावा लागतो. ह्या पृश्चितलावर “जाणता येक आत्माराम’ सत्पुरुषांनी उपासनेच्या बळावर आपुलें निजस्वरूप जाणलेले असते. त्या सद्वस्तूचा स्वानुभव घेतलेला असतो. सद्वस्तूच्या प्राप्तीसाठी सद्गुरुपदीं अनन्यशरण जाणे हीच साधकाची गुणवत्ता समजावी. अमूर्त परमात्मा अंतिम सत्यवस्तु असून ईश्वररूपाने तोच या जगाचे अधिष्ठान आहे. जगांतील प्रत्येक वस्तूला ईश्वर परिपूर्ण व्यापून असतो. ‘मी’ जीव या भावनेने तो या देहाला व्यापून असतो. चैतन्य स्वरूपाने ईश्वर चराचर विश्वाला व्यापून आहे. चैतन्य, प्रकाश आणि आनंद यांच्याही पैलाड असणारें ‘परब्रह्म’ हे चराचराचा आधार आहे. सद्गुरूंच्या कृपेनें ईश्चराधिष्ठित असणारे आपले स्वस्वरूप आकलन होतें. अनुभवास येते.
सद्गुरूंच्या कृपेनें शारदास्वरूप असणारे चिद्चैतन्य उपासकावर प्रसन्न होते. पहा ! आपुलें मूळ चिद्चैतन्य स्वरूप जें शांत आहे, जें दांत आहे, जें सामर्थ्यसंपन्न आहे तेच तें प्राप्त होते. आपल्या देहांत ही चिन्मयस्वरूप असणारी शारदा स्वतःचे स्वरूप जाणून शांत होते. पहा ! आपुल्या शरीराला पाण्याचा स्पर्श झाला म्हणजे पाण्याची थंडगार शीतलता देहासह मनाला जाणवते. त्याच प्रमाणे देहांत असणाऱ्या शुद्ध जाणिवेला स्वस्वरूप स्पर्श झाला म्हणजे देहांतील शारदा-अतिशुद्ध जाणीव शांत समाधानी होते.
नमन तिचीया निजपदां । माया वाग्देवी शारदा ।
जयेचेनि प्रवर्तती संवादा । संत माहानुभाव ॥ ६ ॥
मानवी जीवनामध्ये परा-वाणीच्या ठिकाणी जिचे अस्तित्व आणि प्रभुत्व आहे, ध्वनिरूप असणाऱ्या वैखरी वाणीच्या ठिकाणी जी ज्वलंत असते, तीच ही सरस्वती होय ! कंठाच्या ठिकाणी मृदुमधुर ध्वनिरूपाने चैतन्य निर्माण करणारी शारदा, तिच्या मूळ स्वरूपी माझा नमस्कार असो. ईश्वराची मायारूपी प्रधानशक्ति म्हणजेच शारदा आणि सरस्वती होय ! मानवी जीवनामध्ये कर्तृत्वाचा शुभारंभ या दोन शक्तींच्या आधारानेच होतो. सरस्वतीच्या वक्तृत्वांतून, कर्तृत्वांतून क्रांति घडते. मानवी जीवन सतत क्रांतीच्या उंबरठ्यावरच असावें. सत्पुरुषांनी शारदेच्या मूळ स्वरूपाचा स्वानुभव घेऊनच सुखसंवादाला सुरुवात केलेली असते. ईश्वराचे व्यापकस्वरूप समजून सांगण्याकरितां शारदेच्या अस्तित्वाची आवश्यकता असते. स्वानुभवांचे ज्ञान सांगण्याकरिता सरस्वतीच्या अनेक शब्दांगांचे ज्ञान (वाक्पटुत्व) असावे लागते. शारदा प्रसन्न झाली म्हणजे सर्व शंकांचे निरसन होतें. साधु, संत, महानुभाव सरस्वतीच्या माध्यमांतून सुखसंवाद करीत असतात.
शारदास्वरूप ज्ञानशक्ति म्हणजेच ही सत्रावी जीवन कळा समजावी. तिलाच सविद्या, जाणीव स्फूर्ति असेही म्हणतात. जगांतील सर्व चैतन्यशक्तीमध्ये ही धारणाशक्ति दिसून येते. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ह्या पंचमहाभूतांना ही धारणाशक्ति व्यापून आहेच. सजीवतेमध्ये चैतन्यशक्ति, मनामध्ये संकल्पनाशक्ति, सद्बुद्धीमध्ये विचारशक्ति आणि आत्मीयता, श्रद्धेमध्ये आत्मशक्ति अनुभवास येते. हे चराचर विश्व ईश्वराने निर्माण केले आहे. परमेश्वर हा अनंत शक्तिसंपन्न आहे. तो विश्वकर्ता, विश्वभर्ता, पालनकर्ताही आहेच. ईश्वराच्या ठिकाणी त्याच्या सर्व शक्ति सहजसिद्ध आहेतच. ज्ञानशक्ति आणि क्रियाशक्ति ह्या ईश्चराच्या अंगभूत शक्ति आहेत. ही सरस्वती ज्ञानरूपाने प्रज्ञावंत आहे. तर ही शारदा नादब्रह्म स्वरूपात सदैव आनंदाशी रममाण असते.
आतां वंदीन सद्गुरुस्वामी । जेथें ‘राहिले’ तोचि मी ।
आणी निवारिली निजधामी । पांचहि जेणें ॥ ७ ॥
परमार्थ मार्गाची वाटचाल करीत असतांना सत्शिष्य सद्भावाने सद्गुरुपदाला नमस्कार करतो. सद्गुरु हे स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असतात. तेच ते माझेही स्वरूप आहे असे शिष्याला वाटते. पण सद्गुरूंचे निज स्वरूप आपण स्वतः अनुभवल्याशिवाय त्याचे खरें समाधान मिळत नाही. ज्या क्षणी सद्गुरूंची पूर्ण कृपा होईल त्या क्षणी हा पंचभौतिक दृश्य पसारा असूनही नाहीसा झाल्याचा अनुभव येईल. आपल्या स्वरूपाचा अनुभव आला म्हणजे हा दृश्य पसारा सहज लुप्त, नाहीसा होईल. पहा !
“ज्ञानवह्नी प्रगटे । तेणे दृष्यकेर आटे ।
तदाकारें मूळ तुटे । भिन्नत्वाचे” ॥
उपासनेच्या मार्गाने सद्गुरुपदी स्थिर होण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या स्वस्वरूपाचा अनुभव येतो. “जे सद्गुरूंच्या हृदयीं होतें । तेंचि सापडले अवचिते’ असा हा अनुभव येतो.
देहांत असणारा जीव अज्ञानामुळे अविद्येच्या प्रांतांत वावरतो. ज्या ठिकाणी पंचभूतांचे साम्राज्य चालते त्या ठिकाणी अव्यक्ताकडून व्यक्ताकडे आणि सूक्ष्माकडून स्थूलाकडे धांव असते. आत्मसाक्षात्काराचा प्रांत म्हणजे सद्विद्येचा प्रांत होय. त्या ठिकाणी अतिइंद्रियाचें – चिन्मयाचे साम्राज्य चालते. व्यक्तांतून अव्यक्ताकडे, स्थूलांतून सूक्ष्माकडे, जडांतून चैतन्याकडे जाऊन स्वस्वरूपी लीन व्हायचे असते. जिज्ञासु जीव जेव्हा सद्गुरूला अनन्य शरण जातो, त्या वेळी तो सद्गुरुच होतो. स्वरूपस्पर्शाचा मार्ग हा अज्ञातच असतो. सद्गुरु ज्या स्वरूपामध्ये कायम स्थिर असतात त्याच अवस्थेमध्ये सतशिष्यहि पोचतो. इंद्रियगोचर असणाऱ्या साऱ्या दृश्याचा निरास करूनच आत्मस्वरूपामध्ये उतरावे लागते.
तया निजपदाकडे । आनंदें वृत्ति वावडे ।
पद लाधलियां जडे । तद्रूप होऊनी ॥ ८ ॥
सद्गुरु-कृपेचा स्पर्श झाला म्हणजे आपली सद्वृत्ति आनंदाच्या ऊर्मीबरोबर आपल्या निजपदाकडे झेपावू लागते. आपले स्वरूप आनंदघन आहे. प्रत्येक मनुष्य आनंदाच्या अस्तित्वामुळेच जगतो. मानव हा जीवनभर आनंदाच्या प्राप्तीकरितांच प्रयत्न करीत असतो. आनंद हेच आत्म्याचे मूळ स्वरूप आहे. आनंदस्वरूप असणाऱ्या शुद्ध जाणिवेच्या अस्तित्वावरच वृत्तीचा उदय आणि अस्त होत असतो. सद्गुरूच्या सान्निध्यांत आत्मस्वरूपाचा अभ्यास करीत असतांना शुद्ध वृत्ति स्वरूपाकडे कशी वळवावी याचे ज्ञान होतें.
वृत्तिलयाच्या अभ्यासाने ती शुद्ध वृत्ति स्वरूपाकडे सतत झेपावू लागते. “सवे लावितां सवे पडे । सवे पडतां वस्तु आतुडे । नित्यानित्य विचारें घडे समाधान । ” पहा ! शुद्ध वृत्तीला एकदा आनंदाचा स्पर्श झाला म्हणजे ती वृत्ति आनंदाशी तादात्म्य (तद्रूप) होऊन राहते. परमार्थ मार्गामध्ये आनंदाशी एकरूप होऊन राहणे ही एक आनंदावस्थाच समजावी. अशी अवस्था सद्गुरुकृपेनेंच प्राप्त होते.
पृथ्वितलावर ज्ञानाचे प्रकार दोन आहेत. एक ‘बहुधा ज्ञान’ आणि दुसरे ‘आत्मज्ञान’. मानवी जीवन ह्या दोन्ही प्रकारच्या ज्ञानामध्ये प्रयत्न करीत असते. बहुधा ज्ञान हे वस्तुनिष्ठ ज्ञान असते. कोणतीही वस्तु पाहणारा त्या वस्तूहून वेगळा असतो. असे हे वस्तुनिष्ठ ज्ञान द्वैतभावयुक्त अनुभवास येते. ज्या ठिकाणी द्वैतभाव असतो त्याच ठिकाणी भय, भीति, अज्ञान असते. आत्मज्ञानामध्ये पाहता पाहतां पाहाणारा तद्रूप होऊन राहतो. आत्म्यास जाणणारा आत्म्याहून वेगळा उरत नाही. असे हे आत्मज्ञान द्वैतमुक्त असते. या ज्ञानामध्ये ज्ञाता व ज्ञेय असा भेद राहात नाही. यालाच शुद्ध ज्ञान असे म्हणतात. हीच खरी तद्रूपता आणि हीच खरी विश्रांति होय !
स्वामी कृपेचा लोट आला । मज सरोवरी सामावला ।
पूर्ण जालिया उचंबळला । अनुभव उद्गार ॥ ९ ॥
श्री समर्थ म्हणतात – माझ्या सद्गुरूंच्या कृपेने माझ्या हृदयांत आनंदाचे भरते आले आहे. असा आत्मप्रचीतीचा परमानंद माझ्या हृदयामध्ये भरून उचंबळला आहे. हा सद्गुरुकृपामृताचा लोंढा आल्यामुळे त्यामध्ये माझा ‘मीपणा’ जिथल्या तिथेच विरून गेला. पाण्याचा प्रवाह सखल भागाकडे वहात वहात शेवटी तलावामध्ये जाऊन स्थिर होतो. त्याचप्रमाणे साधन अभ्यास करीत असतांना आपली सूक्ष्म इंद्रियें आत्मस्वरूपाकडे धाव घेत असतात. साधनेचा प्रवास शेवटी स्वस्वरूपाच्या टिकाणी – स्वरूपानंदामध्ये स्थिर होतो. अशा निश्चल अवस्थेलाच सद्गुरुकृपा असे म्हणतात. साधनमार्ग हा आपण केलेला प्रयत्न असतो. त्या साधनेचे अंतिम फल स्वरूपसाक्षात्कार सद्गुरुकृपाप्रसाद होय ! सद्गुरु-कृपेनें शुद्ध जाणीव स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली म्हणजे परमानंदाचा सतत अनुभव येतो. या ठिकाणी देहभाव, देहबुद्धि नाहीशी होते. मीपणाची ऊर्मि आनंदांत विरून जाते. हीच खरी सद्गुरूकृपा समजावी. परतत्त्वामध्ये डुंबून आलेली शुद्ध जाणीव प्रतिभेचे स्वरूप धारण करून स्वानुभवाचे उद्गार बोलू लागते. मग तो स्वानुभवाचा आनंदसागर प्रतिभेच्या रूपाने उचंबळू लागतो. वैखरी वाणीतून जे सहज शब्द बाहेर येतात, तेच परमामृत शब्दब्रह्म होय ! परमार्थ मार्गामध्ये ध्यानधारणेला फारच महत्त्व दिले आहे. ध्यान, धारणा, आत्मप्रचीति ही साधकाच्या जीवनातील तेजस्वी प्राणज्योतच आहे. साधकाची आत्मसाधना ही आत्मोन्नति घडवून आणणारी साधना आहे. साधना जसजशी पक्व होत जाते तसतसा जीव हा स्वरूपाशी तद्रूप होतो. साधनेच्या योगानें जीवाचे अस्तित्व संपले म्हणजे जीव-शिव-स्वरूप-ऐक्य योग साधला जातो. हाच साधकांचा अंतिम प्रवास समजावा. श्री समर्थांचा आत्माराम म्हणजे परमानंदाचे, स्वानुभवाचे हे निवेदन आहे. श्री समर्थांनी येथे स्पष्ट अपरोक्षानुभूति सांगितली. ‘हा तो रोकडा ब्रह्मसाक्षात्कार’ असेही म्हणता येईल.
माझें सद्गुरूकृपेचे बळ । मजमाजीं साठवलें तुंबळ ।
तेणे बळें स्वानंदजळ । हेलाऊं लागे ॥ १० ॥
माझ्या ठिकाणी असणारे, माझ्या सद्गुरुकृपेचे सामर्थ्य, आत्मबळ हे अगाध आहे. आत्मबलाची तुलना कोणत्याही बाह्य वस्तुबरोबर केली जात नाही. आत्मबल, आत्मसामर्थ्य हे परमार्थ मार्गामध्ये आत्मदर्शन होण्याकरितांच उपयोगी पडतें. उपासनेच्या योगाने आपले आत्मबल वाढते ही गोष्ट खरी आहे. पण त्या आत्मबलाबरोबर सद्गुरुकृपेची जोड असेल तर आपले सर्वांग – स्वहृदय आत्मानंदाने तुडुंब भरून ओसंडूं लागते. सद्गुरुकृपेनें ध्यानाचे पर्यवसान समाधीसुखामध्ये होते, अशा वेळी स्वानंदाचा बहर (ऊर्मी) अनावर होतो. अशा प्रसंगी आनंदानुभवाचे उद्गार सहज बाहेर पडतात. हळूहळू सद्गुरुकृपेचा प्रभाव शुद्ध चैतन्यामध्ये वाढत असतो. शेवटी देहामध्ये जीवनभर कार्यरत असणारा ‘मी’ हा शिलकच उरत नाही. आकाशांतून जलवृष्टि होत असतां पाण्याबरोबर पडलेली पाण्याची गार थोड्याच वेळांत पाण्यामध्ये विरून नाहीशी होते. त्याचप्रमाणे देहांत असणारा ‘मी’ उपासनेच्या योगानें स्वरूपामध्ये कायमचा विरून जातो. सूर्यानं आपली पूर्णप्रभा विखुरली म्हणजे पृथ्वितलावरचा अंधःकार नाहींसा होतो. तद्वत् सद्गुरुकृपेनें ज्ञानसूर्याचा आत्मप्रकाश हृदयांत पसरला की आपले सर्व जीवन प्रकाशमय होते, उजळून निघते. ‘सद्गुरुस्वरूप ते संत । आणी देवांस मांडेल कल्पांत । तेथें कैचें उरेल सामर्थ्य । हरिहरांचे’ सद्गुरु म्हणजेच या पृथ्वितलावरचा ज्ञानसूर्य होय ! त्यांच्या कृपेने आपला आनंद उचंबळू लागतो.
आतां नमस्कारीन राम । जो योगियांचे निजधाम ।
विश्रांति पावे विश्राम । जये ठायीं ॥ ११ ॥
सगुण निराकार असणाऱ्या आत्मस्वरूप श्रीरामाला नमस्कार करतो. पहा ! ईश्वर प्राप्तीच्या ध्येयाने प्रयत्नशील असणाऱ्या योग्यांच्या हृदयांत स्वयंप्रकाश आत्मतत्त्व (आत्माराम) विलसत असते. त्याचप्रमाणे त्यांच्या हृदयांत स्वानंदालाही बहर आलेला असतो. अशा अवस्थेमध्ये चैतन्यस्वरूप आत्मारामाशी अत्यंत लीनतेचे, नम्रतेचे नातेंही जडलेलें असते. योगीजन चित्तवृत्तीचा निरोध करून आत्मस्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करीत असतात. चित्तवृत्तीचा-लय स्वरूपाशी एकरूप झाला म्हणजे समाधिसुखाचा अनुभव येतो. योगी हा साधना करीत सविकल्पांतून निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचतो. ‘समाधि’ ‘धि’ म्हणजेच बुद्धि. पारदर्शी असणारी अतिशुद्ध जाणीवस्वरूप बुद्धि आपल्या स्वरूपाशी एकरूप होते, तद्रूप होते यालाच समाधि अवस्था असे म्हणतात. हेच योग्यांचे निजस्वरूप, निजधाम होय ! “युज्यते सः योगी’ दोन वस्तूंचे ऐक्य, जीव-शिवाचे ऐक्य, देवा-भक्तांचे ऐक्य, माया-ब्रह्माचें ऐक्य यालाच योग असे म्हणतात.
श्री समर्थ हे केवलाद्वैत सिद्धांत मानणारे, सांगणारे, अनुभवणारे संत होते. त्यांची ज्ञानप्रधान साधना थोडी वेगळी आगळी दिसून येते. “चालता बोलतां धंदा करितां” सतत आत्मस्वरूपाचें अनुसंधान असणे हीच नित्य टिकणारी आत्मस्थिति म्हणजेच सहजसमाधि होय ! क्रियाशक्ति, इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति जाणून विवेकाने आत्मस्वरूपाकडे जाण्याचा हा सोपा मार्ग आहे. म्हणूनच ज्ञानप्रधान साधना ही सर्वांत उत्तम समजली जाते. सगुण निर्गुण परमात्मस्वरूप अनुभवण्यासाठी ज्ञानमार्ग हा सुलभ वाटतो. बहुमय अशा अनेकपणाने भरलेल्या या जगाच्या, विश्वाच्या मुळाशी एकच एक नित्य, अविनाशी, अनंत, चैतन्य विलसते. त्या अविकारी, निश्चल परमात्मस्वरूपापासूनच हे चराचर विश्व निर्माण झाले. ही विश्वरचना परमात्म्याची सहजलीला आहे. ह्या विश्वाचा रमणीय आविष्कार सहज झाला. याच्या मुळाशी असणाऱ्या शुद्ध संकल्पाला आपल्या स्वरूपाचे थोडे विस्मरण झाले म्हणूनच हा विश्वरचनेचा प्रकार घडला आहे. या विश्वरचनेचा प्रकार विवेकाने जाणून घ्यावा आणि तो विवेकाने सोडावा यालाच ज्ञानमार्ग असे म्हणतात.
जो नांवरूपावेगळा । जो ये मायेहून निराळा ।
जेथें जाणिवेची कळा । सर्वथा न चले ॥ १२ ॥
परमात्मस्वरूप हे नामरूपातीत आहे, तसेच तें गुणातीत आहे आणि ते लक्षणातीतही आहे. मनुष्याच्या ठिकाणी असणारी सामान्य बुद्धि तें आत्मतत्त्व जाणूं शकत नाही. मायेचे बाह्यांग स्वरूप जड, सगुण, साकार असे दिसून येते. बाह्य स्वरूपाला कालमर्यादा, निर्मिती व नाश ही प्रक्रिया निश्चित आहे. तसेंच मायेचे अंतरंग स्वरुप सगुण निराकार पण चंचल, चपल, विकारयुक्त असेच अनुभवाला येते. म्हणूनच परमात्मस्वरूप हे अंतर्बाह्य दृश्यातीत, गुणातीत, लक्षणातीत, कालातीत आहे असे निश्चित ठरते. त्या स्वरूपाच्या ठिकाणी जाणिवेचा अनुभव तोकडा पडतो. ध्याता, ध्येय, ध्यान, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान या त्रिपुटीचे सामर्थ्यही लटके ठरते. शेवटी देहांत असणारी शुद्ध जाणीव हा एक अनुभवाचा प्रांत ठरतो. देहसंग सोडल्याशिवाय स्वर्गसुखाचा खरा आनंद लुटता येत नाही. त्याच प्रमाणे देहामध्ये असणाऱ्या विकारवश जाणिवेचा संबंध तोडल्याशिवाय परमात्म स्वरूपाची अनुभूति येत नाही. “जाणीव म्हणिजे जाणतें चळण । तेंचि वायूचे लक्षण । वायो अंगीं सकळ गुण । सहजचि आहे”.
“जाणतां जाणतां जाणीव जाते । आपुली वृत्ती तद्रूप होते” असा हा परमात्मा स्वतःसिद्ध, स्वयंसिद्ध, आत्मसिद्ध एकमेव आहेच आहे. तोच या विश्वविस्तारित मायादेवीचा मूळ आधारही आहे. पृथ्वितलावर देह धारण करून आलेला प्रत्येक मनुष्य ह्या मायेच्या सहवासांत अल्पसुखाने मोहित झालेला दिसतो. त्याला स्वतःच्या आनंदस्वरूपाची विस्मृति झालेली असते. याला कारण एकच “बहुनाटकी ही माया” असें हे शब्दजाल, विषयजाल असणारे मायेचे स्वरूप भल्या भल्यांना मोहप्रवाहांत ओढून नेते, गुंतविते. परमात्मस्वरूप हा स्वतंत्र अस्तित्वाचा, पूर्णत्वाचा विषय आहे.
जेथें भांबावला तर्क । जेथे पांगुळला विवेक ।
तेथें शब्दांचे कौतुक । केवी घडे ? ॥ १३ ॥
मानवी जीवनामध्ये संकल्प-विकल्प करणारे हे मन अत्यंत चंचल आहे. असे हे चंचल असणारे मन एखाद्या बाह्य वस्तूचा विचार करूं लागले की तर्क आणि कुतर्कही करीत असते. विचारारूढ झालेले मन, बुद्धीच्या साह्याने स्वरूपाकडे जाण्यासाठी अनुबंध साथून अधिकाधिक तर्कच करीत राहते. अशा वेळी अनावश्यक, शुष्क विषयांचा विचार करतांना हे मन भांबावून जाते, गोंधळून जाते. शेवटी संकल्प करणारे हे मन बुचकळ्यात पडले की त्याला काही काळ कांहींच सुचत नाही. देहांत असणारी बुद्धि आणि विवेक आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो; पण तो प्रयत्न योग्य वेळी, योग्य दिशेने झाला नाही तर तो विवेकही पांगुळतो, लंगडा पडतो. आपण जीवनभर जो प्रयत्न करतो तो ‘मी’पणाचा आधार घेऊनच. आपले बोलणे चालणे साधनक्रम हे सर्वकांहीं ‘मी’ च्या आधारानेच होत असल्यामुळे कशामध्येही समाधान मिळत नाही. “बोलणे एक चालणे एक । त्याचे नांव हीन विवेक” बुद्धि आणि विवेक ही देहांतील इंद्रियेच समजली जातात. आपले आत्मस्वरूप हे अतींद्रिय असल्यामुळे त्या ठिकाणी विवेकाची धांव खुंटते. सुखाच्या प्राप्तीचा विचार करीत असतांना अनुमान किंवा विवेक यांना जाणिवेचा आधार घ्यावाच लागतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तर्काला स्थान नाहीं, विवेकाला आश्रय नाहीं आणि शब्दांचे कौशल्यही चालत नाही. असे हे आत्मस्वरूप (रामस्वरूप) निःसंग, निर्विकार, परिपूर्ण व्यापक आहे. अशा ह्या श्रीरामस्वरूपाचे वर्णन करता करतां वैखरी वाणीतून निघणारे शब्दमोती हेही अपुरेच पडतात.
जयालागी योगी उदास । वनवासी फिरती तापस ।
नाना साधनी सायास । जयाकारणे करिती ॥ १४ ॥
परमात्मस्वरूपाची प्राप्ति होण्याकरितां योगीजन रानावनांत साधना करीत असतात. विषयापासून दूर राहून उदास वृत्तीने केली जाणारी साधना याला तपःसाधना असे म्हणतात. योग्यांची योगसाधना उदासवृत्तीचा अवलंब करून निर्जन अशा अरण्यांतच होत असते. योगसाधना ही अत्यंत कष्टदायक आहे. पहा ! शरीराला कष्ट, ज्ञानेंद्रियांना कष्ट, मानसिक कष्ट. विरागी वृत्तीला कष्टदायक ठरणारी साधना म्हणजेच तप होय ! योगीजन हे आत्मप्राप्ति करितांच बारा वर्षे घोर तपःसाधना करीत असतात. निरपेक्ष बुद्धीने रानावनांत राहणे. अनेक विषयांचा संग सोडून निःसंग असणे. अरण्यांत राहून हालअपेष्टा भोगणे. केवळ एका ईश्वराच्या प्राप्तीकरितां सर्वस्वाचा त्याग करणे. मानवी जीवनामध्ये ही गोष्ट सहसा सुलभ नाही. अहो ! जगातील सर्व वस्तूंचा संग सोडता येईल पण आपल्या ठिकाणी असणारा “मी” याचा संग सोडणे अतिकठीण आहे. योगी आपल्या उदासवृत्तीने, वैराग्याच्या धारणेने आणि आत्मबलाने आत्मस्वरूप प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. योग्यांचे आत्मबल निग्रहाने अधिक वाढत असते. इंद्रियांचा निग्रह हट्टाने होत असतो. चित्तवृत्तीचा निरोध विरक्तीच्या जोरावर करीत असतात. या सर्वांच्या मागचे मोठे सूत्र म्हणजे अंतर्बाह्य विषयांचा त्याग. परमार्थ साधनेंतील अत्यंत कष्टदायक साधना म्हणजेच योगसाधना होय ! मानवी जीवनामध्ये उदास वृत्ति असणे, तापसी वृत्तीचे अनुकरण करणे, आणि मुळांतच वैराग्यवृत्ति असणे ही धगधगत्या ज्ञानप्रधान ज्ञानाग्नीचीच संगति म्हणावी लागेल.
ऐसा सर्वात्मा श्रीराम । सगुण निर्गुण पूर्णकाम ।
उपमाच नाहीं निरोपम । रूप जयाचें ॥ १५ ॥
पहा ! सर्वांच्या हृदयामध्ये असणारा श्रीराम हा (आत्मा) कार्य दृष्ट्या सगुण, निराकार ब्रह्मच समजावा. तसा आत्मदृष्टीने तद्रूप होऊन पाहिले तर तो सगुणातीत, निर्गुणातीत, परिपूर्ण ब्रह्मस्वरूपच आहे असा अनुभव येतो. त्याचे स्वरूप परिपूर्ण असल्यामुळे तो उपमारहित आहे. कोणतीही उपमा दिली तर ती अपूर्णच असते, सापेक्ष असते. सगुण आणि निर्गुण अशी ही दोन्ही अंगें अन्योन्य सापेक्षच असतात. जेथें ही सापेक्षतेची कामनाच नाही, तेंच तें परिपूर्ण असते. स्वानुभवाच्या दृष्टीने तीन अवस्था अनुभवाला येतात. जागृतीमध्ये दृश्याचा व पदार्थाचा अनुभव येतो. स्वप्नामध्ये मिथ्या विषयांचा व वृथा चैतन्याचा अनुभव येतो. ज्ञानामध्ये सरसरत्या चैतन्याचा, स्वतःसिद्ध स्वयंप्रकाशाचा आणि स्वानंदस्वरूप आत्म्याचा अनुभव येतो. पहा ! तुर्यावस्थेमध्ये स्वयंप्रकाश आत्म्याचे आणि अनात्म्याचेही सूक्ष्म भान असते. मायाब्रह्माचे सतत टिकणारे द्वैतानुसंधान म्हणजे तुर्यावस्था होय ! आपल्या घरामध्ये उंबरठ्यावर ठेवलेला दिवा जसा आंत आणि बाहेर दोन्हीकडे प्रकाश देतो तशीच ही तुर्यावस्था समजावी. अशा अवस्थेमध्ये इंद्रियगोचर जे जे आहे ते भगवंताचे मूर्तस्वरूप समजावें. जें अतींद्रिय आहे. ते अमूर्त समजावें. मूर्त आणि अमूर्त, दृश्य आणि अदृश्य ही परमात्म्याचीच रूपे आहेत. ब्रह्म मात्र एकमेव अद्वितीय आहे हेच खरें. आत्मस्वरूप अमूर्त, असीम आणि अनंत असल्यामुळे तर्काची, कल्पनेची झेप तेथपर्यंत जात नाही. ज्याला आत्मस्वरूपाचा साक्षात् स्वानुभव येतो त्यालाच तें “ब्रह्म’ प्रसन्न असते. म्हणूनच ते ब्रह्म असीम आणि निरूपम आहे.
आतां वंदीन संत सज्जन श्रोते । जे कृपाळू भावाचे भोक्ते ।
माझी वचनें पराकृतें । सांगेन तयापासीं ॥ १६ ॥
आतां दक्ष असणाऱ्या श्रोत्यांना भावयुक्त नमस्कार. तसेच भाविक सज्जनांना प्रेमपूर्वक नमस्कार. त्याच प्रमाणे संतसाधु मंडळींना श्रद्धायुक्त नमस्कार करतो. जे अत्यंत दयाळु, कृपाळु, स्नेहाळु आहेत. जे माझ्या अंतःकरणांतील स्वच्छ, निर्मळ, कोमल भाव जाणू शकतात. ही माझी मराठीतील उत्स्फूर्त आलेली प्राकृत वचनें श्रवण करतात. प्रतिभेच्या माध्यमांतून परावाचेपासून स्फुरलेली ही शब्दरत्ने आहेत. हे माझे स्वानुभवाचे सहजोद्गार आहेत. या ठिकाणी अनुभवी संतसज्जन व भावदर्शी श्रद्धावान श्रोतेजन असावेत. परमार्थ मार्गाची वाटचाल करीत असतां मला आलेला स्वानुभव संतसज्जनांना सांगणे यांतच माझें हित आहे. संतसज्जनांचा अनुभव अध्यात्माशी जवळीक साधणारा असतो. त्यांचे आध्यात्मिक सद्ग्रंथ आत्मज्ञानासंबंधीचे सद्विचार प्रगट करणारे असतात. साधुसंत हेच सत्शील, सज्जन, ब्रह्मस्वरूप असतात. संत हे स्वानुभवाने नित्यतृप्त असल्यामुळे त्यांचेजवळ शांति-समाधान असतेच. पहा ! संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ । नाना संतोषाचे मूळ । ते हे संत जाणावे । ” मानवी जीवनामध्ये ‘आत्मानंद’ ही एक फार मोठी महत्त्वाची अवस्था गणली जाते. जीवनांत विषयानंद, सुखानंद, पदार्थानंद असे क्षणिक आनंदाचे प्रकार येतात आणि जातात. एवढ्याने मानवी जीवन सुखी होत नाही. आनंदासाठी, समाधानासाठी सत्पुरुषांच्या सान्निध्यांतच राहावे लागते. संतांच्या हृदयांत नित्य नवा आत्मानंद बहरलेला असतो. आनंदाचे स्थळ, सुखाचे माहेर, समाधानाचे ठिकाण म्हणजेच आत्मानंदांत रममाण असणारे संतसाधु होय !
तयांचे वर्णावें स्वरूप । तरी ते स्वरूपाचेचि बाप ।
जें वेदांसि सांगवेना रूप । तें जयांचेनि प्रगटें ॥ १७ ॥
अहो ! संतसज्जनांचे वर्णन किती म्हणून करावें ! संतसज्जन हे पराकोटीचे प्रयत्नवादी असतात. त्यांची तपःसाधना ही अत्यंत प्रयत्नांनी यशस्वी झालेली असते. ज्यांनी ज्ञानसाधना करून आपुले स्वस्वरूप जाणले आहे. जे देहसंग सोडून सतत स्वस्वरूपाशी तादात्म्य झाले आहेत तेच संत जाणावे. पहा ! ब्रह्मस्वरूप हे वेदांना जाणता आलें नाही. तसेच तें सुस्पष्ट सांगताही आले नाही. शेवटी “न इति न इति” असे म्हणून वेद इथेच स्थिरावले, स्तब्ध झाले. ही अतिगुह्य असणारी ब्रह्मवस्तु संतसज्जनांनी स्वतः अनुभवली. ह्या ब्रह्मवस्तूचे स्वानुभवी ज्ञान वाणीने प्रगट केले. इतकेच काय त्या गुह्य ज्ञानाचे स्वरूप गुरु-शिष्यांच्या परंपरेतून प्रवाहित केले. आजही ती गुरूशिष्यपरंपरा सांप्रदायाचे स्वरूपांत गुह्यज्ञान संपन्न आहे.
हा इंद्रियगोचर दृश्य पसारा संतसज्जनांना बाधक ठरत नाही. कारण त्यांची आत्मदृष्टि स्वरूपी स्थिर झालेली असते. पक्व झालेली ज्ञानदृष्टि सतत आत्मानंदांत रममाण असते. संत हे दृश्य जगांत वावरत असतात पण ते कमलपत्राप्रमाणेच. कमलपत्र हे पाण्यात राहून पाण्यापासून अलिप्त असते. तद्वत् हे संतसज्जन या दृश्य जगांत अलिप्त होऊन वावरत असतात. संतांनी विवेक-वैराग्याच्या बलावर सर्वस्वाचा संग सोडलेला असतो. निःसंग असणारे संत स्वरूपानुसंधानांत एकरूप झालेले असतात. ते ब्रह्मस्वरूप झालेले असतात. किंबहुना ते आत्मस्वरूपाहूनही थोर, श्रेष्ठ असतात. संतांचे स्वरूप शब्दांनी वर्णन करता येत नाही. असे हे संतसज्जन आत्मश्रीमंतीने श्रेष्ठ असतात.
आतां शिष्या सावधान । ऐक सांगतो गुह्य ज्ञान ।
जेणें तुझें समाधान । आंगीं बाणे ॥ १८ ॥
श्रीसमर्थांनी आपल्या शिष्याला सावध होण्याची सूचना दिली. आतां मी जें तुला गुह्यज्ञान सांगणार आहे तें नीट सावथ होऊन ऐक. ह्या गुह्य ज्ञानाचा उपदेश करीत असतांना अत्यंत सावध रहा ! सर्व इंद्रियांचे कान करून श्रवण कर ! “मनाच्या तोडून ओढी । श्रवणी बैसावे आवडी । सावधपणे घडीने घडी । काळ सार्थक करावा ॥ ” श्रवणापरतें सुलभ अन्य साधन नाही असे संतांचे मत आहे. निष्काम कर्माने जशी चित्तशुद्धि होते त्याचप्रमाणे श्रवण-मननाने मनःशांति लाभते. शांत असणारे मनच गुह्य ज्ञानाचा अनुभव घेऊ शकते. शुद्ध मनाची सावधानता ही समाधानास कारणीभूत असते. बाह्य विषयांचा संग सोडून ज्ञानेंद्रिये आत्मचिंतनाकडे वळली म्हणजे आत्मसुखाचा अनुभव येऊ लागतो.
आत्म्याची गुह्यानुभूति आम्याचे ज्ञानच करून देते. आत्मा जसा अतींद्रिय आहे तसेच त्याचे ज्ञानही अतींद्रिय असते. केवळ आहेपणाचें शांत अस्तित्व भान म्हणजेच आपले आत्मस्वरूप होय ! ते अतिगुप्त, अतिगूढ आहे. सद्गुरु तेच तें गुह्यज्ञान पुनःपुन्हा समजावून सांगत असतात. वेदवेदांताचा विषय जितका शांतपणे श्रवण होईल तितकाच तो अंतःकरणांत स्थिर राहतो. परमार्थामध्ये आत्मतत्त्वाचा स्वानुभव असणे हीच परमार्थाची उन्नति, ध्येयपूर्ति समजावी. सद्गुरु म्हणजे संत. अशा सद्गुरूंची कृपा संपादन करणे हीच परमार्थाची यशस्वी वाटचाल होय ! परमार्थ मार्गामध्ये गुरु-शिष्यांचा संबंध शुद्ध प्रेमादराचा असतो, आत्मियतेचा असतो. म्हणूनच ज्ञानज्योतीने ज्ञानज्योत प्रज्वलित होत असते हेच खरें.
तुवा आशंका नाही घेतली । परंतु मज तुझी चिंता लागली ।
कां जें तुझी भ्रांति फिटली । नाहींच अद्यापी ॥ १९ ॥
आईला शुद्ध प्रेमापोटी आपल्या लहान बालकाची एकसारखी आठवण होत असते. त्याचप्रमाणे श्री सद्गुरूला आपल्या शिष्योत्तमाची काळजी वाटत असते. याचे कारण आपण केलेला उपदेश तो योग्यपणे पालन करतो की नाही, त्याची साधन उपासना योग्य मार्गाने चालली आहे का ? त्याच्या ठिकाणी असणारे अज्ञान कमी झाले आहे का ? त्याच्यापाशी असणारा भ्रम नांवाचा बुद्धिदोष नाहीसा झाला का ? इत्यादि इत्यादि विचार सहज सुरू झाले. पण शिष्याने यांतील कोणतीच शंका घेतलेली नव्हती. सद्गुरूंनी एकदां शिष्याचा स्वीकार केला म्हणजे त्या शिष्याची सर्व जबाबदारी सद्गुरूंवर असते. याचे कारण जोपर्यंत शिष्याचा भ्रम, भ्रांति कमी होत नाही तोपर्यंत सद्गुरूला त्याची काळजी, चिंता असतेच, सद्गुरुच्या सान्निध्यात असणाऱ्या शिष्याला आपल्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाची जाणीवही नसते. त्याच्या ठिकाणी ज्ञानाची असणारी खोटी-चुकीची समजूत घट्ट झालेली असते. पण आपण अज्ञानी आहोत याची जाणीव नसणे, काहीही प्रयत्न न करतां अज्ञानीपणांत निवांत जगणे अशी ही दोन्ही लक्षणे अज्ञानाचीच आहेत. ‘मना कल्पना कल्पिता कल्पकोटी । नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥ ” साधकांनी हे महत्त्वाचे सूत्र ध्यानात ठेवावे.
सद्गुरूला शिष्याच्या ठिकाणी असणारे अज्ञान पाहवत नाही. म्हणून पुनःपुन्हां ज्ञानोपदेश करीत असतात. अज्ञान नष्ट करण्याकरिता ज्ञानोपदेश हाच योग्य उपाय आहे. सद्गुरूंच्या सान्निध्यात असणारा शिष्यही विवेक-वैराग्याने संपन्न असावा लागतो.
दासबोधीचे समासीं । निर्मूळ केलें मीपणासी ।
तया निरूपणेहि वृत्तीसी । पालट दिसेना ॥ २० ॥
श्रीसमर्थांनी येथे जुन्या दासबोधाचा संदर्भ दिला आहे. एकवीस समासीच्या तेराव्या समासामध्ये हा विषय मांडलेला दिसतो. मनुष्याच्या ठिकाणी असणारा ‘मीपणा’ हा किती निराधार आहे याचे वर्णन केले आहे. मानवी जीवनामध्ये मी आणि माझें ही गोष्ट कुणाचीही सुटलेली नाही. मनुष्य जीवनांतील पूर्व परंपरेने आलेला हा मोठा दोषच आहे. पहा ! तुला उत्तम मार्गदर्शन केले असतां तुझ्या वृत्तीमध्ये अजूनही बदल झालेला दिसत नाही. ‘टाकीनें खपली फोडिली । ते मागुते नाहीं जडली । मनुष्याची कुबुद्धि झाडिली । तरी ते पुन्हां लागे ॥ ‘ तुझे सर्व दोष काढले होते तरी ते पुन्हां जडले आहेत. त्यामुळे तुझ्या वृत्तीमध्ये बदल झालेला दिसून येत नाही. मनुष्याच्या ठिकाणी (अंगी) अज्ञान असल्यामुळे अभिमान, गर्व, ताठा येऊन जडतो. ज्या ठिकाणी मीपणा असतो त्या ठिकाणी स्वार्थाचे अनेक वृत्तितरंग उटत असतात. वृत्तीचे गुणदोष – भाव जसे असतील त्याप्रमाणे देहबुद्धि कमीअधिक बळकट होत असते. देहबुद्धीमुळेच आपल्या स्वस्वरूपाची आत्मविस्मृति होत असते. अविद्येतून वासना, कामना, भावना, कल्पना उठत असतात. मीपणाची अतिसूक्ष्म जाणीव असते. त्याप्रमाणे वृत्तितरंगही अतिसूक्ष्म असतात. अंतरंगामध्ये उत्तम बदल होणे, पालट होणे हेच परमार्थाचे मुख्य लक्षण समजावें. साधकाला परमार्थ हा जितका सुलभ वाटतो तितकाच तो अति कठीणही आहे.
म्हणोनि न पुसतां सांगणे । घडलें शिष्या तुजकारणे ।
आतां तरी सोये धरणें । श्रवणमननाची ॥ २१ ॥
तूं मला काहीही विचारलें नाहींस हे अगदी खरे आहे. पण तूं न विचारतांच तुला काही हृद्गत सांगावे असे मला वाटले. परमार्थ मार्गाची वाटचाल करणाया शिष्याला सुलभ साधना सांगावी. त्याला योग्य असें मार्गदर्शन करून त्याचे समाधान करावें. “घार हिंडते आकाशी । चित्त तिचे पिलापाशीं” अशीच सद्गुरूंची अवस्था झालेली असते. आत्मानंदांत नित्य तृप्त असणारे सद्गुरु आपल्या जवळचे ज्ञान अनेकांना देण्यास उत्सुक असतात. ज्ञान संपादन करणारा साधकच अत्यंत सावध, साक्षेपी, दक्ष असा असावा लागतो. साधकाला श्रवण आणि श्रवणाचे मनन ह्या दोन्ही उपासना प्राणप्रिय असाव्या लागतात. श्रवणाने मनःशांति होते आणि मननाने चित्तस्थैर्याचा मार्ग सांपडतो. कोणत्याही विषयाचे मूळ अंतःकरणांत आंत असते. त्या विषयाचा होणारा परिणाम बाहेर दिसून येतो.
श्रवण, मनन, निजध्यास अशा साधनक्रमाने वाटचाल करणाऱ्या साधकाला आपले स्वहित कळते. सद्गुरूंनी सांगितलेली साधना करणारे साधक गुरुभक्त गणले जातात. साधकानें अखंड श्रवण केलें तर कळत न कळत त्याचे मन त्या विषयाचे मनन करीत असते. त्या मननांतूनच अखेर निजध्यास सुरू होतो. सतत असणाऱ्या निजध्यासाचे पर्यवसान आत्मदर्शनामध्ये घडते. आत्मदर्शनानेच साधकाची ध्येयपूर्ति साधली जाते. साधकानें परमार्थामध्ये पाऊल टाकले की सतत तत्त्वज्ञानाचें श्रवण करावें. श्रवणाचा परिणाम शेवटी नराचा नारायण होण्यापर्यंत होऊ शकतो.
चातकपक्षी वरीचा वरी । चंचू पसरून थेंबुटाधरी ।
जीवन सकळहि अव्हेरी । भूमंडळींचें ॥ २२ ॥
परमार्थ मार्गावर वाटचाल करणाऱ्या शिष्याला आत्महिताचें मार्गदर्शन करीत असतां चातक पक्ष्याचा दृष्टांत दिला आहे. चातक पक्ष्याचे सर्व जीवन कसे असते. जीवन जगण्यासाठी त्याचा प्रयत्न किती मोलाचा असतो. चातक पक्षी पृथ्वीतलावरचे साचलेले पाणी कधीही पीत नाही. ज्या पाण्याला पृथ्वीचा जडस्पर्श झाला आहे तें पाणी कायमचे वर्ज्य करतो. ज्यावेळी वर्षाऋतु सुरू होतो त्याचवेळी चातक पक्ष्याचे सारे लक्ष आकाशाकडे लागलेले असते. जलवर्षा – पाऊस सुरू झाला म्हणजे सर्व इंद्रियांचे लक्ष डोळ्यांमध्ये एकवटून तो आकाशाकडे पहात असतो. आकाशांतून येणारे पाण्याचे थेंब वरच्या वर अलगद आपल्या चोचीमध्ये झेलून आपली तहान भागवत असतो. पहा ! हे पक्षीकुल देहबुद्धीचे साधे जीवन जगण्याकरितां हा केवढा प्रयत्न करतो. चातक पक्षी निसर्गाचे सर्व नियम पालन करून आपलें जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करीत असतो.
चारी खाणींचे अनंत प्राणी आपआपल्या जीवन पद्धतीनुसार निसर्गाचे सर्व नियम पाळतात. म्हणूनच ब्रह्मांडाच्या पोकळीतील सर्व क्रिया कर्माचे, निसर्गाचे, चलित प्रवाह सुरळीत चालले आहेत. यामध्ये मनुष्य जीवनाचा प्रवाह आगळा वेगळा दिसतो. मानवी जीवनामध्ये बुद्धीचे कौशल्य आहेच आहे. पण त्याचबरोबर विवेक-वैराग्याने या देहबुद्धीचा संग सोडताही येतो. चौऱ्यांशी लक्ष भोगयोनीमध्ये फिरत असतां मनुष्य योनीच श्रेष्ठ कां मानली आहे ? इथेच साधन अभ्यास करून चिरशांति मिळविता येते. साधना कशी करावी याचे उत्तम मार्गदर्शन पुढे सांगितले आहे.
तैसा शब्दवरुषाव होतां । असों नेदावी वेग्रता ।
श्रवणपुटीं सामावितां । मनन करावें ॥ २३ ॥
सद्गुरूच्या मुखातून बाहेर येणारे शब्दब्रह्मरूपी ज्ञानामृत एकाग्र मनाने श्रवण करावे. एकाग्र असणारे मनच श्रवणेंद्रियांच्या द्वारे आंत आलेल्या शब्दब्रह्माची स्मृति ठेवत असते. श्रवणाच्या वेळी आपली स्मृति जागृत असणे अतिदक्ष असणे यालाच श्रवण असे म्हणतात. जें मन बाह्य विषयांत आसक्त असते त्याला मनाची भटकंती-व्यग्रता असे म्हणतात. अशा चंचल चपल मनाला विवेकाने आवरावे. सद्गुरुच्या मुखांतून येणारा प्रत्येक शब्द अंतःकरणांत साठवून ठेवावा. त्या श्रवण शब्दांची स्मृति समुद्रासारखी असावी. याचे कारण श्रवणाच्या वेळी मनन करता येत नाही. मनाच्या स्वभावानुसार मन हे एकावेळी एकाच विषयाचे स्मरण ठेवीत असते. वेदान्त विषयाचे श्रवण करीत असतां आपले मन अत्यंत सावध असावें. सावध असणारे मनच ब्रह्मतत्त्वाचे मनन-चिंतन करूं लागते. मनाच्या बाहेर असणाऱ्या, सर्व ओढी थांबल्या म्हणजे शांत झालेलें मनच मननांत स्थिर होते. मन सावध असतांना त्या मनाने केलेले मनन शेवटी मनाला समाधान देत असते. हे जाणून हेतुपूर्वक केलेल्या चिंतनाला मनन असे म्हणतात. शुद्ध मननाने श्रवण केलेले ज्ञान आत्मसात होते. कोणत्याही विषयाचा गुंता सावध असणाऱ्या मनालाच सोडवितां येतो. परमार्थामध्ये सुरुवातीपासून ते अखेरच्या अंतिम टप्प्यापर्यंत मनाला आवरणे हाच महत्त्वाचा विषय आहे. “या मनाचिये संगती । भले भले येती – जाती । क्षणभर नाहीं विश्रांती । हें कैचे जीवन । ” म्हणून मानवी जीवनाचा प्रवास अत्यंत सावध, साक्षेपी राहून करावा.
लागवेग जाणोन शब्दाचा । आवांका पाहावा मनाचा ।
शब्दाआंतील गर्भाचा । सांटावा घ्यावा ॥ २४ ॥
सद्गुरु हे स्वतः सद्हेतूने सन्मार्गाचे मार्गदर्शन करीत असतात. ते सांगत असतांना त्यांच्या बोलण्याचा उद्देश काय असावा, त्यांच्या बोलण्यांतील शब्दफेक कशी आहे, शब्दांच्या गतीनुसार त्या शब्दांचा उद्देश त्यांतील भाव ओळखावा. कोणत्या गुणाचा संग धरून तो शब्द मुखांतून बाहेर पडला आहे, मुखांतून बाहेर आलेला शब्द कोणता अर्थ दर्शवितो, शब्दार्थ, भावार्थ, की लक्ष्यार्थ ? त्या शब्दांना रज, तम, सत्त्व यांपैकी कोणत्या गुणाचे अधिष्ठान आहे हेही जाणले पाहिजे. सद्गुरु हे मार्गदर्शन करीत असतांना त्यांच्या अंतर्मनांत कोणता भाव आहे हे जाणून घ्यावें. सद्गुरूंच्या मनांतील सद्भाव जाणून त्यानुसार अतितत्पर असतो तोच गुरुभक्त जाणावा. प्रत्येक शब्दामध्ये गर्भितार्थ हा असतोच. तो जाणून घेण्यासाठी निष्काम गुरुसेवा करावी.
पहा ! संतांच्या ब्रह्मवाणीचा अर्थ कसा लावावा याबद्दल समर्थांनी महत्त्वाची सूचना दिली आहे. स्वानुभवाचा प्रांत हा अतींद्रिय असल्यामुळे शब्दांची भाषा त्या ठिकाणी पोचूं शकत नाही. इंद्रियगोचर दृश्य जगाचे वर्णन करण्यास आपली शाब्दिक भाषा अतितत्पर असते. संतांच्या शब्दांचा गर्भितार्थ लावतांना आपण त्यांच्या स्वरूपानुभवाचा संदर्भ सोडूं नये. आत्मसाक्षात्काराचे एक स्वतंत्र सर्वांगपरिपूर्ण तत्त्वज्ञान आहे, याची अखंड स्मृति असावी. महापुरुषांच्या ग्रंथांतील विधानांचा लक्ष्यार्थ आकलन करतांना त्यांची स्वरूपानुभूति तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमि ध्यानात ठेवावी. त्यांच्या मनांत असणारा आत्मभाव त्यांच्या मुखातून, वाक्यांतून बाहेर पडतो. तोच भाव जाणून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सत्शिष्याने सावध राहून ही तत्परता साधावी हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.
अरे तूं कोण कोणाचा । कोठून आलासी कैंचा ।
ऐसा विचार पूर्वीचा । घेई बापा ॥ २५ ॥
सद्गुरूंनी आपल्या शिष्याला काही प्रश्न विचारले. अरे बाळा ! तूं कोण आहेस ? तुझ्या जीवनाची पूर्व पीठिका कशी काय आहे ? तुझे पूर्वीचे कुळ, मूळ तुला काही माहीत आहे का ? तूं कोणाचा कोण आहेस यासंबंधी तुला काही आठवते का ? तूं तुझ्या जीवनाकडे कधी मागे वळून पाहिले आहेस का ? तूं कोठून आलास याची कल्पना आहे का ? तूं कसा आलास, तुझा प्रवास कसा झाला याचे स्मरण आहे का ? हे पहा ! तूं एकदां कुठे तरी शांत निवांत असा बैस आणि तूं तुझा दीर्घकाळ चाललेला भूतकाळचा प्रवास आठव म्हणजे तुला कळेल, सर्वप्रथम स्वस्वरूप विस्मृतीमुळे तूं प्रवाहपतीत होऊन येथें आला आहेस. कार्यकारण भाव निर्माण झाला म्हणजे सुखदुःखाच्या प्रवासाला सुरुवात होते. मुळांत स्वस्वरूपाचे विस्मरण हेच जीवांश निर्मितीला कारण ठरले. स्वानंदापासून घसरलेली स्थिति म्हणजेच तुझा हा जन्मजन्मांतरीचा प्रवास होय !
आतां गुरु-शिष्यांची प्रश्नोत्तरे सुरू झाली. १) प्रश्न – अरे तूं कोण आहेस ? उत्तर – मी सगुण निराकार जीवेश्वर आहे.
२) प्रश्न – अरे तूं कोणाचा कोण आहेस ? उत्तर – मी अजन्मा असूनही माझ्या विस्मृतीमुळे अनेक मातापित्यांच्या प्रेमात गुंतलों आहे.
३) प्रश्न – तूं कोठून आला आहेस बरं ! उत्तर – माझ्या ठिकाणी असणाऱ्या वासनेच्या संगतीमुळे मी पुनरपी येथे आलो आहे.
४) प्रश्न – तूं या ठिकाणी कसा आला आहेस ? उत्तर – आईच्या उदरांतून गर्भवासाचे प्रवास करीत करीत संकोचित अशा योनीवाटेच यावे लागले.
मानवी जीवन हे ज्ञानप्रधान आहे. आपण येथे कां आलों, याचा विचार करीत असतांना आपले अज्ञान हेच कारणीभूत आहे असे दिसून येते. “सोऽहं आत्मा स्वानंदघन । अजन्मा तो तूंचि जाण । हेंचि साधूचे वचन । सदृढ धरावें साधकानें” आपल्या मूळ स्वरूपापासून कधीही ढळू नये. सद्गुरुपदी अनन्य असणे हेच अति उत्तम होय !
अरे तां जन्मांतर घेतलें । काय मानितोसि आपुलें ।
ऐसें तुवां विचारिलें । पाहिजे आतां ॥ २६ ॥
अरे बाळ ! आतापर्यंत तूं अनेक जन्म घेतले आहेस. प्रत्येक जन्मांत तुला तुझे स्वतःचे काय आहे असे वाटले. प्रत्येक जन्मामध्ये तुला कशाचा आणि कुणाचा मोह झाल्यामुळे तूं हा अनेक जन्मांचा प्रदीर्घ प्रवास करीत आला आहेस. तुझ्या मनाला कशाची गोडी आवडी लागल्यामुळे तूं इतका जन्म-मरणाच्या अधीन झाला आहेस ? तूं तुझ्या मनाला कधी विचारले आहेस का ? आपल्या सर्व जीवनाचा प्रवास कशाकरितां चालला आहे, ह्या प्रवासांतून सुखाची प्राप्ति होणार की दुःख भोगावे लागणार ? याचा विचार केला आहेस का ? अशा सर्व प्रश्नांची मालिका तुझ्या बुद्धीसमोर कधी आणली आहेस का ? पहा ! अंधत्व असणाऱ्या मनुष्याला बाहेरचा मार्ग दिसत नाही. म्हणूनच तो सतत काठीचा आधार घेऊन आपला प्रवास करीत असतो. परमेश्वराने तुला सर्व इंद्रियांनी संपन्न असणारे शरीर दिले आहे. तरी पण तूं तुझ्या जीवनाचा प्रवास यशस्वी कां करीत नाहीस ? अरे ! तुझ्या ठिकाणी असणारे गाढ अज्ञान हे तुझ्या अनेक जन्माला कारण ठरले आहे. या ठिकाणी तुझे कोणीही नाही. केवळ अज्ञानामुळेच तुला भ्रम निर्माण झाला आहे. “येथें तुझें कांहींच नाहीं । भुलला आहेसी कांई । चुकोनि आलासि जाई । जेथीच्या तेथें । ”
प्रत्येक मनुष्याच्या जीवनाला काही इतिहास असतो. प्रत्येकाला भूत, भविष्य आणि वर्तमानकाळ हा अनुक्रमें असतोच. वर्तमान काळांत येण्यापूर्वी प्रत्येकाने अनेकदां जन्म घेतलेला असतो. प्रत्येक जन्मामध्ये स्वतःच्या देहाला आपलेपणाचा भाव ठेवूनच देहावर प्रेम ठेवतो. देहाबरोबर व्यक्ति आणि बाह्य वस्तुवरही आपलेपणाचा भाव आपुल्या मनात असतो. पहा ! व्यक्तीशी आणि वस्तूशी घनिष्ठ संबंध आला म्हणजे सुख-दुःखाचे द्वंद्व – धक्के सहन करावे लागतात. या जगांत आपले म्हणता येईल असे काहीही नाही. जे आपलें नाहीं त्याचा जाणून संग सोडावा हेच उत्तम.
येथें तुझें कांहीच नाहीं । भुलला आहेस काई ।
चुकोनी आलासी, जाई । जेथीचा तेथें ॥ २७ ॥
अरे ! या ठिकाणी तुझे कोणीही नाही. वस्तु आणि वास्तु म्हणून किंवा आप्त म्हणूनही कोणी नाही. तुझे अनेक जन्मांचे प्रवास केवळ मनाच्या, वासनेच्या संगदोषामुळेच घडत आहेत. तुझ्या चंचल मनाला ही एक मोठी भूल पडलेली दिसते. विषयासक्त असणारे मन आणि अनेक विषयांचा संग घडविणारी ही वासना तुला सुखदुःखाचा प्रवास घडवीत आहे. तूं केवळ क्षणिक सुखाला भुलून हे जन्मदुःखाचे आघात सोसत आहेस. तुझ्या विचारांची दिशा चुकली आहे. तुझा आतांपर्यंत झालेला प्रवासही चुकीचा झालेला दिसतो. या जगामध्ये आपल्या मालकीचें असें कांहीही नाही. केवळ अविवेकाने ग्रासलेल्या जीवाला हे माझें तें माझें असे वाटत असते. शेवटी वरवर वाटणाऱ्या भासणाऱ्या मोहांत जीव हा गुंतून राहतो. अज्ञानामुळे अज्ञानांतच गुंतून राहणे यालाच एक प्रकारची भूल असे म्हणतात. वास्तविक जीवाचें मूळ स्थान हे निराळेच आहे. तुला जीवाच्या उगमस्थानाची विस्मृति झाल्यामुळेच या जगांत पुनःपुन्हां यावे लागते आणि परत जावें लागते. या जगांत येण्याचा प्रवास हा अतिकठीण असतो. प्रत्येकाला सहन करावा लागतो. पण परत जातांना त्याहूनही अतिकठिण दुःखदायक यमयातना भोगाव्या लागतात. अज्ञानांत रमलेल्या जीवाला अशा प्रवासाचा कधीही कंटाळा येत नाही. “कैंची माता कैंचा पिता । कैंची बहिण कैचा भ्राता । कैंची सुहृदें कैंची वनिता । पुत्र कळत्रादिक ॥ १ ॥ हे तूं जाण भावेची । अवघीं सोइरी सुखाची । हे तुझ्या सुखदुःखाची । सांगाती नव्हेती” हे सर्वही विचारांत घेऊन आपल्या जीवनाचा प्रवास सुखद केला पाहिजे.
तूं समर्थाचें लेकरूं । अभिमानाने घेतला संसारु ।
अभिमान टाकितां, पैलपारु । पावशील बापा ॥ २८ ॥
अरे तूं सर्वशक्तिमान असणाऱ्या ईश्वराचा अंशावतार आहेस. तुझा जन्म क्रमेण ब्रह्मांशापासूनच झाला आहे. अंश हा अल्पज्ञ असतो आणि अंशी हा व्यापक सर्वज्ञ असतो. अंश-अंशीचें (मूळ) अंतिम स्वरूप ब्रह्मस्वरूपामध्येच आहे. तुझें मूळ स्वरूप अत्यंत तेजस्वी असतांना देहाहंकृतीचा अभिमान उगीच घेतला आहेस. या देहाभिमानामुळेच तुला हा जन्म-मरणरूपी भवसागर प्राप्त झाला आहे. तूं विचार करून पाहिलेंस तर “जीव हा ईश्वराचा अंशु । तो परब्रह्मी करी प्रवेशु” पण ह्या अभिमानाचे प्रस्थ फारच वाढले आहे. देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुलाभिमान, देशाभिमान, धर्माभिमान, ज्ञानाभिमान, मोक्षाभिमान असे हे आठ प्रकारचे अभिमान आहेत. जोपर्यंत या अभिमानाचे स्वरूप समजत नाही तोपर्यंत जन्म-मृत्यूच्या येरझारा सुटत नाहीत. तुझ्या ठिकाणी हा मिथ्याच जडलेला ‘मी’, ‘माझे’ पणाचा अभिमान सोडल्याशिवाय जीवनाचे पैलतीर सांपडणार नाही.
एकोऽहं, ओंकार-स्वरूपांतून निर्माण झालेली विश्वरचना ही अमूर्तस्वरूप आणि मूर्तस्वरूप अशा दोन प्रकारांनी व्यापून आहे. अमूर्त असणारे शुद्ध ईशचैतन्य हे तुझें मूळ स्वरूप आहे. तूं मात्र अविचाराने मूर्त स्वरूप असणाऱ्या नाशिवंत देहाचा अभिमान धरला आहेस. पहा ! एका सेकंदाला काळच म्हणतात आणि एका युगाचाही एक काळच गणला जातो. जीव हा अनेक जन्मांमध्ये या देहाचा सारथी असतो. तर ईश्वर हा असंख्य काळांतील असंख्य जीवांचा पालक असतो. जीव हा कालआधीन असतो. आणि काल हा ईश्वराच्या आधीन असतो. हे सृष्टिचक्र – कालचक्र मोठे विलक्षण आहे. तूं विचार करून अभिमान सोडण्याचा प्रयत्न करशील तर या भवबंधनांतून पैलपार जाशील. “काय ते येथेंचि पाहावे | काय ते येथचि शोधावें” विवेकाने देहाभिमान (अहंकार) नाहीसा झाला, म्हणजे जीवावरील कालाचे स्वामित्व संपते. इतकेच काय, मानवी जीवनामध्ये प्रयत्न केला तर हा जीव बंधमुक्तही होऊ शकतो.
ईश्चरापासून जालासी । परी तूं तयासी चुकलासी ।
म्हणोनी हे दुःख भोगिसी । वेगळेपणे उत्कट ॥ २९ ॥
बाबारे ! तूं ईथरापासून झाला आहेस. तुझें मूळ या पिंडब्रह्मांडाच्या आदिकारणामध्येच आहे. तूं त्या आदिकारणाला विसरल्यामुळेच तुला ही जीवावस्था प्राप्त झाली आहे. “मी जीव मज बंधन” हा भाव तुझ्या ठिकाणी जागृत असल्यामुळे तुला सुखदुःखाचे भोग सहन करावे लागतात. जीवनामध्ये सुख आणि दुःख, स्मृति आणि विस्मृति, जन्म आणि मृत्यु, ज्ञान आणि अज्ञान हे घटक कळत-नकळत भोगावेच लागतात. स्वस्वरूपाची स्मृति अचूकपणे न समजल्यामुळे हा दीर्घ काळाचा प्रवास करावा लागत आहे. मानवी जीवनामध्ये अचूक यत्न करवेना, म्हणून जे केले ते योग्य होईना. “यत्न तो देव जाणावा यत्नेवीण दरिद्रता” जीवनामध्ये यशस्वी प्रयत्न नसेल तर जीवन कवडी मोलाचे ठरते. अज्ञानी, बद्ध जीवाला तीव्र (कठीण) दुःखें भोगावींच लागतात.
सत्पुरुषांचे मत असें निश्चित झालेले आहे. जीव हा ईश्वराला विसरल्यामुळे त्याला हे जन्ममरणाचे तीव्र दुःख भोगावे लागते. बद्ध जीवाला साधन-उपासना आवडत नाही. ज्ञानसाधना करावी असे वाटत नाही. अल्पशः प्रयत्नांनी नित्य मुक्तीचे सुख मिळत नाही. ऋषितुल्य जीवन जगावे अशी आवड निर्माण होत नाही. अशा जन्मदरिद्री, जीवनदरिद्री जीवाला करंटेपणाचे जीवन सोडवत नाही. अशा सर्व अवगुणांच्या संगतीमध्ये रमणाऱ्या जीवाला जीवनभर दुःखच भोगावे लागते. मृगजळाच्या वृथा आशेने धावणाऱ्या मृगाला कधीही पिण्याचे पाणी मिळत नाही. मृगाची ही मिथ्याच हाव आणि त्याची व्यर्थच धांव असते. तद्वत् या जीवाची अवस्था झाली आहे.
त्यागिसी सकळ वैभवाला । आणि विश्वाससी माझिया बोला ।
तरी मी घालीन रे तुजला । जेथील तेथें ॥ ३० ॥
अरे बाळ ! माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून परमार्थाची वाटचाल करशील तर तुझें जीवन सुखी होईल. हे पहा ! तुला क्षणिक वाटणारें सुख हे प्रापंचिक सुख आहे. दिसणारा, भासणारा, हा भौतिक पसारा काही काळ टिकत असतो. अशा क्षणभंगुर सुखांति दुःखाचाच अनुभव येत असतो. मुळांत अंतःकरणांतच त्यागवृत्ति असावी लागते. त्याच्या अभ्यासानेच भोगासक्ति कमी होत असते. मनोवृत्तीला जडलेला विषयसंग कमी झाला म्हणजे अंतःकरणवृत्ति निजस्वरूपाकडे वळू लागते. बाळ ! माझ्या मुखांतून सहज आलेल्या शब्दब्रह्मावर विश्वास ठेवशील, तर तुला तुझें निजपद प्राप्त करून देईन. जीवनामध्ये कोणतीही गोष्ट सहज सुलभ प्राप्त होत नाही. परमार्थ-मार्गातील काही नियम कांहीं पथ्थे पाळावींच लागतील. सद्गुरूंनी सांगितलेले नियम जो सांभाळतो, पालन करतो त्याच्यावर गुरुकृपा होते. मानवी जीवनामध्ये कोणतीही गोष्ट यशस्वी होण्यासाठी ध्येयनिष्ठ व्हावें लागते. कोणतेही ध्येय साध्य होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आपल्या अंतःकरणांत असणारी अतिसूक्ष्म जाणीव त्या ध्येयाशी समरस झाली पाहिजे. ध्येयनिष्ठा टिकण्यासाठी प्रपंचामधील संगति, संतति आणि संपत्ति यांचा संग सोडावा लागतो. आपले आत्मदर्शन हा प्रांत फारच अज्ञात आहे. अशा अज्ञात प्रांताबद्दल आपल्याला कांहींच माहिती नसते. परमसुखासाठी अशा अज्ञान प्रांतामध्ये प्रवेश करावयाचा असेल तर जाणत्याची संगति धरावी. ज्यांनी त्या ब्रह्मसुखाचा अनुभव घेतला आहे त्यांना शरण जावें. आत्मदर्शनासाठी अंतःकरणांत तळमळ असावी लागते. ज्यांच्या अंतःकरणांत आत्मदर्शनाची तळमळ लागली आहे. अशा साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी श्रीसमर्थांच्यासारखे महापुरुष सदैव उभेच आहेत.
तुझें अढळपद गेलें । तुज मायेने वेढां लाविलें ।
तें जरी तुझें तुज दिधलें । तरी मज काय देसी ॥ ३१ ॥
अरे ! तुझे स्वस्वरूप म्हणजेच हे अढळपद होय ! तुला तुझ्या आत्मस्वरूपाचे विस्मरण झाल्यामुळे तुला अशी हीन-दीन अवस्था प्राप्त झाली आहे. अज्ञानरूपी भ्रांतीने तुझ्या ठिकाणचे स्वरूपज्ञान झाकून टाकलेले दिसते. आकाशांत ढगांचे आच्छादन आले म्हणजे सूर्यबिंब दिसत नाही. त्याचप्रमाणे तुझ्या ज्ञानस्वरूप प्रज्ञेवर अज्ञानरूपी भ्रांतीचे आवरण आले आहे, अशी ही नटनाटकी माया अनेक प्रकाराने तुला भुलवीत आहे. शरीर बलाने अति उन्मत्त असणारा गजराज (हत्ती) पाण्याच्या सरोवरामध्ये जातो. सरोवराच्या मध्यभागी असणाऱ्या कमळाच्या वेलीमध्ये पाय अडकून तो हत्ती गुंतून पडतो. तद्वत् ज्ञानस्वरूप असणारे तुझें चित्चैतन्य या वासनेच्या गुंत्यामध्ये अडकले आहे. तुला स्वतःला हा अविचाराचा गुंता सोडविता येणार नाही. कुठेतरी जाणत्याचे मार्गदर्शन घ्यावेच लागेल. जाणत्याच्या संगतीमध्ये राहून हा अविचाराचा पडदा दूर केला पाहिजे.
बाबारे ! हे तुझें स्वस्वरूप अढळपद तुला प्राप्त करून दिले तर तूं मला काय देशील ? पहा ! विचारांची देवाण-घेवाण ही व्यवहाराने पूर्ण होत असते. चित्चैतन्यस्वरूप असणारे तुझें आत्मस्वरूप तुला प्राप्त करून दिले तर व्यवहार माध्यम म्हणून तूं मला काय देशील बरं ! व्यवहारामध्ये कोणतीही वस्तु घेतली की त्या वस्तूचे दाम मोजावेंच लागते. जगांतील सर्व व्यवहार अशाच पद्धतीने चालत असतो. परमार्थ मार्गामध्ये ज्ञानदानाचा जो प्रकार घडतो तो अशाच पद्धतीचा असतो. एका बाजूला सर्वज्ञ असणारा ईश्चर असतो. तर दुसऱ्या बाजूला नष्ट होणारे नश्वर दृश्य असते. तुला सद्गुरूंच्याकडून ईश्वरप्राप्ति करून घ्यावयाची असेल तर नश्वराचा, दृश्याचा त्यागच केला पाहिजे. ज्या नाशिवंताचा तुला काहीही उपयोग नाही ते नाशिवंत तेवढेच द्यावें असें सद्गुरूंचे सांगणे आहे.
जितुकें काहीं नासोन जाईल । जें अशाश्वत असेल ।
तुजसमागमें न येईल । तितुकेंच द्यावें मज ॥ ३२ ॥
आपुल्या डोळ्यांना दिसणारे, भासणारे आणि असणारे सर्व कांहीं नष्ट होणार आहे. जें परिवर्तनशील आहे ते सतत लोप पावत असते. “यद्दृष्टं तंनष्टं” – दिसे भासतें तें सारे विश्व नाशिवंत हा सिद्धान्त येथें लागू पडतो. आपल्या जीवनामध्ये थोडे मागे वळून पाहिले तर सर्वकाही अशाश्वत आहे असेच दिसून येते. या जगांत चिरकाल टिकणारे असे काहीच दिसत नाही. आतापर्यंत आपण मिळविण्याचा खूप प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे जे मिळविले आहे तें टिकविण्याचाही प्रयत्न करीत आहोत. पण अंती यांतील काहीही आपणाबरोबर येत नाही. शेवटी घेऊनही जाता येत नाही. “येथील येथें अवघेचि राहतें । ऐसें प्रत्यया येतें । डोळे झाकणी करावी ते । कायें निमित्त’ प्रत्येक मनुष्याला असा हा उघडा दृश्यानुभव येत असतो. अंतकाळी आपल्या समोर मृत्यु येऊन उभा राहिला तरी आपली विषयासक्ति देहासक्ति सुटत नाही. बाबारे ! आतां याच क्षणी नाशिवंताचा संग सोडून दे. जें नाशिवंत आहे तेवढेच मला द्यावे असे सद्गुरूचे मागणे आहे.
या विश्वामध्ये दोनच वस्तु अनुभवाला येतात. प्रथम आत्मवस्तु आहे, म्हणूनच या चराचराचा अनुभव येतो. आत्मवस्तु ही ज्ञानप्रधान असल्यामुळे तिच्यावर उर्वरित जीवनाचा भार अवलंबून असतो. दुसरी अनात्मवस्तु ही दृश्यस्वरूपांत जड असून सतत परिवर्तन होणारी आहे. मनुष्याचे जीवन बुद्धिजीवी असल्यामुळे त्यांना अनात्मवस्तूचा मोह टाळता येत नाही. शेवटी बुद्धि कर्मानुसारिणी. बुद्धीनेच आत्मवस्तु कोणती आणि अनात्मवस्तु कोणती याचा निवाडा करता येतो. बुद्धीला योग्य वळण लावले तर ती आत्मवस्तुकडे वळविता येते. “बुद्धीने सर्वही होते । बुद्धिदाता नारायणु” सबुद्धीच्या साह्याने आत्मवस्तु जाणून घ्यावी आणि आपले सर्व जीवनच उत्कर्षमय बनवावें असा संतांचा उपदेश आहे.
मजहि तें कार्य करावें । परी तुजपासून टाकवावें ।
तुंवां टाकिलें तरी न्यावें । तुज समागमें ॥ ३३ ॥
बाबारे ! तुझ्या ठिकाणी असणारा अशाश्वताचा मोहपसारा सुटावा म्हणूनच हा प्रयत्न. हा अशाश्वत असणारा दृश्यपसारा तुला अधिकाधिक मोहांतच गुंतवीत आहे. तुला ह्या अज्ञान भ्रांतीमधून बाहेर काढावें एवढाच माझा सद्हेतु बरं ! तुझ्या ठिकाणी असणारे अज्ञानदोष हे घेऊन मला तरी ते काय करायचे ? अरे ! तुझे हे अज्ञानदोष तूं टाकावेस, सोडावेस एवढीच माझी सदिच्छा आहे. माझ्या आज्ञेप्रमाणे तूं हे सर्व दोष सोडशील, तर तुला ज्ञानमार्गाने माझ्या बरोबर घेऊन जाईन. ज्ञानमार्गाचा अभ्यास जितका कठीण आहे, तितकाच तो सुलभही आहे. सद्गुरूंच्या सान्निध्यांत केलेली ज्ञानसाधना ही साधकाला समाधानाची प्राप्ति करून देते. खरं तर आपल्या जीवनाचे रहस्य समाधानामध्येच सामावलेले आहे. जीवनामध्ये समाधानाच्या प्राप्तीकरितांच हा भलामोटा खटाटोप असतो. तूं हे अज्ञानदारिद्र्य सोडशील तर तुला मी माझ्याबरोबर स्वस्वरूपी घेऊन जाईन.
आपल्याला रामेश्वरला जायचे असेल, तर ज्यांनी रामेश्वर पाहिले आहे त्यांचेबरोबर जाणे हेच योग्य. रामेश्वर देवस्थान एकच असले तरी जाण्याचे मार्ग अनेक आहेत. मार्गातील सुलभ मार्ग कोणता आहे तो जाणत्याला माहीत असतो. असा हा प्रकार परमार्थ मार्गामध्येही आहेच. ज्यांनी साधन अभ्यास करून आपुलें आत्मस्वरूप जाणले आहे त्यांची संगति धरावी. येथेच देहबुद्धि सोडून आत्मबुद्धीमध्ये प्रवेश करावयाचा असतो. स्थूलांतून सूक्ष्मांत प्रवेश करतांना सद्गुरूंचे सान्निध्य असावे लागते. सद्गुरु स्वतः त्या अवस्थेतून गेलेले असतात. सद्गुरूंनी अतिगुह्य ज्ञानाचा मार्ग अनुभवलेला असतो. सद्गुरु जी ज्ञानसाधना सांगतील तीच साधना शिष्याने करावी. पहा ! शिष्याच्या अंतःकरणांत ज्ञानप्राप्तीची तळमळ जेवढी असेल तेवढेच आत्मसमाधान मिळणार हेच खरे.
अरे भूषण भिक्षेचे सांडिलें । आणि राजपद प्राप्त जालें ।
तरी तुझें काये गेलें । सांग बापा ॥ ३४ ॥
उदरनिर्वाहाकरितां भिक्षा मागून सजविलेलें जीवन हे परावलंबीच समजावें. कारण भिक्षेमध्ये मोठेपणा, संपन्नता, भूषण हा विषयच नाही. केवळ भिक्षेवरच ज्याचे जीवन आहे तो दरिद्रीच समजावा. असें घरोघरी भिक्षा मागून जगलेले जीवन घालवून तुला श्रीमंती प्राप्त करून दिली, तर तुझें काय जाईल सांग ? यामध्ये तुझें नुकसान नसून तुझा उत्कर्षच आहे. भिक्षा, दारिद्र्य आणि श्रीमंती हे वेगवेगळे विषय आहेत. भिक्षा ही निर्भयपणे मागता येते. दारिद्र्य हे संकोचित, भित्रेपणाने भोगावें लागते. श्रीमंतीमध्ये अभिमान, ताठा वाढलेला असतो. मानवी जीवनामध्ये अन्नाचे दारिद्र्य, धनसंपत्तीचे दारिद्र्य, अज्ञानदारिद्र्य, जन्ममरणरूपी दारिद्र्य असे हे मानवी जन्मापासून मृत्युपर्यंत दारिद्र्य दुःखानेच भरलेले आहे. पहा ! अशा प्रकारची सर्व दारिद्र्ये घालवून जर तुला आत्मसाम्राज्य प्राप्त करून दिले तर तुझें काय जाईल. अरे ! आत्मसाम्राज्याच्या प्राप्तीसाठी अनेक वर्षे तपःसाधना करावी लागते असें हे तुझें आत्मधन तुला सहजच प्राप्त करून देईन. आतां तुझ्याकडून प्रामाणिकपणे आत्मसम्मतीच हवी आहे.
जीव हा अशाश्वत वस्तूपासून सुखाची इच्छा करीत असतो. जीव जोपर्यंत बाह्य विषयांतून सुखाची इच्छा करतो तोपर्यंत तो भिकारीच असतो. जीवाबरोबर ज्ञानेंद्रियांची दृष्टि बाहेरच्या विषयांकडेच जात असते. जीव हा वासनेच्या माध्यमांतून बाह्य विषयसुखाची भीकच मागत असतो. देहधारी मनुष्य जसा दरिद्री, भिकारी असतो त्याचप्रमाणे जीवही असंख्य जन्मांपासून भिकारीच असतो. प्रत्येकानें आपलें पाठीमागचे जन्मदारिद्र्य आठवावें. अरे ! अनेक जन्मींचें तुझें दारिद्र्य घालवून तुला आत्मसाम्राज्य देणार आहे. त्या राज्यपदाचा तूं स्वीकार करून सुखी हो.
नाशिवंत तितुकेंचि देसी । तरी पद प्राप्त निश्चयेसीं ।
त्यामध्ये लालुच करिसी । तरी स्वहित न घडे ॥ ३५ ॥
अरे बाळ ! तुझ्याजवळ जे नाशिवंत म्हणून आहे ते सर्वही मला देऊन टाक. नाशिवंत देतांना अंतःकरणापासून सर्वार्पण भावाने मला दे. त्यामध्ये थोडीहि आसक्ति, मोह ठेवू नकोस. नाशिवंत देत असतांना त्याच्या ठिकाणी असणारा प्रेमभाव आणि त्याची सूक्ष्म स्मृतीही देऊन मोकळा हो. तुझ्या ठिकाणी असणारी नाशिवंताची मोहस्मृति पूर्ण नाहींशी झाली पाहिजे. थोडी जरी आसक्ति उरली तर तुझें फार मोठे नुकसान होईल. ज्या क्षणी तुझ्या ठिकाणचा मोह नाहीसा होईल त्याच क्षणी तुझें स्वयंप्रकाश असणारे आत्मस्वरूप जागृत होईल. तुला आत्मस्वरूपाचा स्थिर, निश्चल स्वानुभव आला, की तुझें जीवन धन्य झाले असे समज. अरे, परमार्थामध्ये जे सत्य नियम आहेत त्या नियमांनुसार शिष्याकडून काहीही घेतले जात नाही. तसेच गुरूकडून तुला काहीही दिले जात नाही. केवळ तुझा भ्रम दूर करणे एवढेच काम. तुझ्या ज्ञानसूर्यावर अनेक काळ आलेलें अभ्राच्छादन काढणे हे माझें कर्तव्यच आहे.
आपले आत्मस्वरूप समजण्यासाठी अंतःकरण अतिशय शुद्ध, पवित्र, निर्मळ असावे लागते. अंतःकरणांत अखंड साधनास्मृति चालू असेल तर वासनांचा क्षय होतो. वासना क्षय होणे हेच समाधानाचें मर्म आहे. आपल्या आत्मकल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग करणे हीच निःसंग साधना योग्य. असा हा गुरु-शिष्यांचा संवाद साधकांना मार्गदर्शक ठरतो. सुखसंवादामधून साधनेंतील अडथळे दूर होतात. विचारांचा गुंता आपोआप मोकळा होतो; म्हणून साधकांनी सत्संगतीमध्ये राहावें. सत्संगतीमध्येच साधकाचा उत्कर्ष होत असतो.
तो शिष्य म्हणे जी दिधलें । स्वामी म्हणती पद लाधलें ।
आतां तूं आपुलें । कांहीं मानूं नको ॥ ३६ ॥
सद्गुरूंनी शिष्यास असे सांगितले होते की, जे नाशिवंत आहे तें जाणून मला देऊन टाक. शिष्याने त्या गोष्टीचा विचार किंवा चिंतन न करतां उथळ शब्दांनी उत्तर दिले. ‘महाराज, याच क्षणी मी माझें सर्वकाही आपल्या चरणी अर्पण केले आहे. आता माझ्या जवळ काहीही नाही’ असेंच वरपंगपणे सांगितले. शिष्याच्या बोलण्यांतील भाव पाहून सद्गुरूंना आश्चर्य वाटले. सद्गुरूंनी त्याच्या अंतःकरणांतील ठकभाव जाणून त्याला उत्तर दिले. ‘अरे, ज्याक्षणी तू सर्व अर्पण केलें आहेस त्याच क्षणी तुला तुझें निजपद, स्वरूपप्राप्तीहि झाली आहे. आतां ‘मी’ आणि ‘माझे’ हा विषयच राहिला नाही. आतां यापुढे या दृश्य जगांतील तुझे असे काहीही नाही हे ध्यानांन ठेव. अरे, या दृश्यजगामध्येच तूं आणि तुझें शरीर हे उभे आहेच की. त्या शरीराचा आणि त्यांतील देहबुद्धीचाही संग सोडला पाहिजे. मी आणि माझें हे मोहाचें वर्तुळ फारच गुंतागुंतीचे आहे. तुझ्या ठिकाणी असणारा ‘मी’ या ‘मी’चे मूळ जगतउत्पत्तीला कारण असणाऱ्या एकोऽहं संकल्पांतच आहे.
जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या वासनांचा पूर्ण क्षय होणे यालाच त्याग किंवा विरक्ति असे म्हणतात. विवेक-वैराग्यांतूनच आत्मज्ञानाचा उदय होतो. आपल्या आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानानेच अज्ञान, भ्रम, भ्रांति हे नाहीसे होतात. आपल्या निजस्वरूपाची प्राप्ति झाली म्हणजे कोणत्याही वस्तूबद्दल ममत्व राहात नाही. मानवी जीवनाचे खरें सार त्यागांतच दिसून येते. ‘त्यागांत शांति निरंतरम्’ हे गीतेचे सूत्र अगदी बरोबर आहे. म्हणून वेदान्तसार गीता आपल्या डोळ्यासमोर आणावी.
इतुकें स्वामी बोलिलें । आज्ञा घेऊन निघाले ।
तंव शिष्ये विनविलें । विनीत होउनी ॥ ३७ ॥
स्वामीजींनी नित्याप्रमाणे स्नानसंध्या, जपानुष्ठान, उपासनादि उपक्रम आटोपला. प्रवासाला निघण्याची तयारी केली. स्वामींनी आपल्या हातांत कुबडी, कमंडलू घेतला. काखेत झोळी घातली, पायांत खडावा घातल्या. बाहेर निघतांना शिष्याला जवळ बोलावून घेतले. बाबारे ! आतां मी पुढच्या प्रवासाला निघालों बरं ! तुझ्या इच्छेप्रमाणे मार्गदर्शन ठीक झाले ना ? तुझी अजून काही शंका उरली आहे का ? इतके विचारल्यानंतर शिष्यांने अतिनम्र होऊन विनंती केली, ‘महाराज, आपण पुन्हां केव्हां येणार ? मी आपल्या येण्याची वाट पाहात आहे. मला आपल्या उपस्थितीचा फार मोठा आधार वाटतो. आपण अवश्य यावे’ अशी शिष्याने विनंती केली.
शिष्याला जोपर्यंत दृश्यस्वरूपाचे प्रेम असते तोपर्यंत त्याला बाहेरून मिळणाऱ्या मार्गदर्शनाची जरुरी असते. म्हणून दृश्यवस्तूवर असणारे प्रेम सुटले पाहिजे. सद्गुरूंच्या देहावर, शब्दांवर, त्यांच्या सात्त्विक सद्गुणांवर श्रद्धा ठेवून खरे समाधान होत नाही. आपल्या हृदयांत असणाऱ्या आत्मारामाचे स्वरूप समजले, उमजलें म्हणजे खरे समाधान होते. स्वतः त्यागमय राहून हृदयस्थ आत्म्याचा शोध आणि बोध करून घेणे हेच साधकीय जीवन समजावें.
आतां पुढिलीये समासीं । संवाद होईल उभयतांसी ।
तेणे स्वानंदसिंधुसि । भरितें दाटे बळें ॥ ३८ ॥
या ग्रंथांतील पुढचा समास माया निरूपण असा आहे. पुढच्या समासामध्ये गुरु-शिष्यांचा सुखसंवाद होईल तो लक्षपूर्वक ऐका. माया कशाला म्हणतात ? मायेचे नेमके स्वरूप कोणते ? मायेचे स्वरूप कुठून कुठपर्यंत ? माया ही कोणत्या प्रयत्नांनी नाहीशी होईल ? माया ही कधी नष्ट होते का ? माया ही कुणाला बाधक ठरते ? मायेनेच माया जाणावी म्हणजे काय ? असे एक ना अनेक प्रश्न या सुखसंवादामध्ये आहेत. शिष्याने अनेक प्रश्न विचारले आहेत. सद्गुरूंनी त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे. असा हा गुरु-शिष्यांमध्ये झालेला सुखसंवाद हेच आत्माराम ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. हृदयस्थ असणारा स्वयंप्रकाश ‘आत्माराम’ हा केन्द्रबिंदु ठेवून या ग्रंथाचे लिखाण केले आहे.
इतिश्री आत्माराम । रामदासी पूर्णकाम ।
ऐका सावध, वर्म । सांगिजेल ॥ ३९ ॥
आत्माराम हा ग्रंथ रामदासी, मुमुक्षु, साधक, ईश्वराचे भक्त यांच्याकरतां सांगितला आहे. या ग्रंथाचा अभ्यास नित्य मनन, चिंतन, निजध्यासन अशा पद्धतीने करावा. अंतरंगांत जसा अभ्यास वाढेल तशीच मनःशांतीही लाभेल. आत्माराम ग्रंथाच्या अभ्यासाने आत्मस्वरूपाचा अनुभवही येईल. अत्यंत गूढ असणारा अध्यात्माचा विषय श्रीसमर्थांनी अतिसुलभ करून सांगितला आहे. आत्मारामाच्या पुढच्या समासामध्ये आत्मसाक्षात्काराचे मर्म सांगणार आहेत. तो साक्षात्काराचा विषय अत्यंत सावध होऊन श्रवण करावा.
समास दुसरा
माया निरूपण
जय जय जी सच्चिदानंदा । जय जय जी आनंदकंदा ।
जय जय जी निजबोधा । परमपुरुषा ॥ १ ॥
ब्रह्मनिष्ठ असणाया सद्गुरूला सच्चिदानंद, आनंदकंद, निजबोधा, परमपुरुषा असा गौरवपर शब्दप्रयोग वापरतात. कारण त्यांना या वरील अवस्थांचा स्पर्श झालेला असतो. ज्यांना आपुल्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला आहे, अशा महापुरुषांना सद्गुरु असे म्हणतात. पाठीमागच्या समासामध्ये सद्गुरु आणि शिष्य या दोघांमध्ये सुखसंवाद झाला आहे. पण तो संबाद शिष्योत्तमाच्या डोक्यावरून गेलेला दिसतो. त्यावेळी शिष्याचे पूर्ण समाधान झालेले दिसत नाही. आतां सुखसंवादाकरितां पुढचा समास सुरू झाला आहे. शिष्य अत्यंत प्रेमाने, उत्साहाने सद्गुरूंची स्तुति करूं लागला. ‘महाराज, आपण सत्, चित्, आनंदस्वरूप आहात. आपल्या ठिकाणी आनंदच रममाण होण्यासाठी आला आहे. आपण निजस्वरूपांत समरस असणारे महापुरुष आहांत. महाराज, आपला त्रिवार जयजयकार असो !’ शिष्य आनंदाने पुनःपुन्हां जयजयकार करूं लागला.
सद्गुरूंच्या सान्निध्यात असणारे सर्वच शिष्य हे शिष्योत्तम असत नाहीत. कांहीं शिष्य पोटार्थी, कांही शिष्य सेवार्थी, काही शिष्य भावार्थी, कांहीं शिष्य द्रव्यार्थी, कांहीं थोडेच शिष्य परमार्थी असतात. समर्थ म्हणतात, परमार्थ मार्गामध्ये आलेला शिष्य कसा असावा. “शिष्य पाहिजे धारिष्टाचा । शिष्य पाहिजे दृढव्रताचा । शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा । पुण्यसील ||१|| शिष्य पाहिजे प्रज्ञावंत । शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त । शिष्य पाहिजे नीतिवंत । मर्यादेचा । अहो ! जो शिष्य प्रज्ञावंत असतो तो सद्गुरूंच्या मनांतील सद्भाव जाणून अभ्यास करीत असतो. अशाच शिष्योत्तमाचा परमार्थ उत्तम होतो. “येथे पाहिजे जातीचे । येऱ्या गबाळ्याचे काम नोहे । ” पहा ! परमार्थाकरितां शुद्ध बुद्धि, विवेक-वैराग्य आणि सत्संगति अशा तीन गोष्टी एकत्र असाव्यात म्हणजे साधकाचा परमार्थ यशस्वी होतो.
अनंत ब्रह्मांडाऐसी ढिसाळे । मायेनें रचिली विशाळे ।
तें तुमचे कृपेचेनि बळें । विरती स्वानंदडोहीं ॥ २ ॥
ईश्वर अनंतरूपाने नटलेला आहे. त्याचे अर्धनारी नटेश्वर असे स्वरूप त्याची ही माया. ह्या मूळ मायेने या प्रचंड अशा ब्रह्मांडाचा विस्तार मांडला आहे. ह्या मायेने अशी असंख्य ब्रह्मांडे निर्माण केली आणि मोडली. येका येका ब्रह्मांडाचा विस्तार अगणित आकाराचा आणि अगणित काळाचा आहे. सामान्य जीवाला ह्या ब्रह्मांडाचा विस्तार समजणे, उमजणे कठीण आहे. न जाणतां त्याचा संग सोडणे हेही अतिकठीण आहे. पण सद्गुरुकृपामृताच्या सामर्थ्यापुढे ह्या दृश्य ब्रह्मांडाचा पसारा नगण्यच वाटतो. पहा ! मातीचा भला मोठा ढेकूळ पाण्यात टाकला की तो ढेकूळ जसा पाण्यात विरघळून जातो, नष्ट होतो त्याचप्रमाणे या ब्रह्मांडाची अवस्था होते. सद्गुरूंची कृपा झाली की ह्या ब्रह्मांडाचा दृश्य पसारा क्षणार्धात विरून नाहीसा होतो.
परमात्मा अनंत सामर्थ्यांनी संपन्न आहे. परमात्म्याची शक्तीही अनंत काळाची आहे. या मायावी शक्तीची निर्मितीही अनंत अशीच दिसून येते. मायेनें दृश्य स्वरूपांत निर्माण केलेली असंख्य रूपें दिसतात. दिसणे, भासणे, फसविणे हे त्या मायेचें चपल स्वरूप आहे. चालू विश्व स्थल कालाने मापले तर ते अगणितच आहे. अज्ञान दृष्टीला दिसणारे जे आहे ते सर्व नष्ट होत असते. ज्ञानदृष्टि आणि अज्ञानदृष्टि यांमधला फार मोठा फरक तो हाच. जें विश्व निर्माणच झालेले नाहीं तें विश्व अज्ञान दृष्टीला सत्य वाटत असते. पण ज्ञानदृष्टि जागृत झाली की एका आनंदाशिवाय अन्य कशाचाही अनुभव येत नाही. हे विश्व आनंदांत विरून गेलेले असते. सामान्य मनुष्याला हे जग दिसतें, भासते हा एक दृष्टिदोषच समजावा.
आतां स्वामीनें जें कांहीं इच्छलें । तें पाहिजे अंगिकारिलें ।
शरणागता आपुलें । समर्थे उपेक्षू नये ॥ ३ ॥
आतां मागच्या विषयाचे सूत्र घेऊन गुरु-शिष्यांचा संवाद सुरू झाला. सद्गुरूंच्या समोर शिष्य अतिनम्र होऊन बोलू लागला. महाराज ! आपण मला ज्या गोष्टी सोडावयास सांगितल्या त्या गोष्टी मी सोडावयास तयार आहे. ज्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मला देऊन टाक असेही सांगितले होते. आता त्या सर्व दृश्यजात वस्तु, मोहजात वस्तु, मी, माझे हे सर्वही आपल्या चरणी अर्पण करतो, त्याचा स्वीकार करावा. सर्व संग सोडून मी आपल्या चरणी आलो आहे. आतां शिष्य म्हणून माझा स्वीकार करावा. महाराज ! मी हीन, दीन, म्हणून आपणास शरण आलों आहे माझी उपेक्षा करूं नका. “शरणांगताची वाहे चिंता । तो एक सद्गुरु दाता । जैसे बाळक वाढवी माता । नाना यत्ने करूनिया ॥ ‘ महाराज ! आपण समर्थ आहांत, आपण दयाळू, कृपाळु, स्नेहाळु आहांत. माझ्या मनुष्य जीवनाचे सार्थक करा.
परमार्थामध्ये गुरु-शिष्यांचे नाते कसे असावें ? गो-वत्साप्रमाणे, पक्षिणी-पिलाप्रमाणे. लहान वासराला गायीशिवाय अन्य काही दिसत नाही, आठवतही नाही. लहान पिलाचे प्रेम पक्षिणीशिवाय अन्य कोठेच नसते. अशी शिष्याची अवस्था झाली पाहिजे. चातक पक्ष्याप्रमाणे जीवनाचे ध्येय निश्चित ठरलेले असावें. सद्गुरूंच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानामृताकडेच सर्व लक्ष असावें. सद्गुरू हे शिष्याच्या मनाची समूळ अवस्था बदलून त्याला उन्मन करण्याचा उपाय शोधीत असतात. सद्गुरु हा आपला एकमेव आधार आहे अशी भावना ठेवावी म्हणजे जीवनाचे कल्याण होते.
नाशिवंत काये म्यां टाकावें । तें मज स्वामीने सांगावें ।
मज दातारें करावें । आपणाऐंसें ॥ ४ ॥
महाराज ! आपण मला नाशिवंत सोडावयास सांगितले आहे. पण नाशिवंतामध्ये काय काय येते त्याची कल्पना द्यावी आणि त्यांतील मी नेमके काय सोडायचे तेही सांगावें. आपण जे सांगाल तें मी त्वरित सोडावयास तयार आहे. आपण माझ्यावरती सर्व प्रकारचे सात्त्विक संस्कार करून मला आपल्यासारखें सुखी करावें. महाराज ! आपण ब्रह्मज्ञानी आहांत, औदार्याने संपन्न आहांत, मला आपणासारखें करा. “जें त्रैलोकी नाहीं दान । तेंचि करिती संतसज्जन । तयां संतांचे महिमान । काय म्हणौनि वर्णावें’ संत हे सुखसंपन्न, आनंदसंपन्न, ज्ञानसंपन्न असतात. शिष्य श्रवणीं कवळ भरी उद्गार वचनें. अशी ही संतांची महान ख्याति आहे. महाराज ! मी माझ्या सर्व जीवनाचा भार आपल्यावर सोपविला आहे. आता माझ्यावर तत्त्वज्ञानाचे, वेदान्ताचे संस्कार करून माझा उद्धार करावा.
परमार्थामध्ये प्रवेश करतांना बाह्यांग विषयांचा संग सोडावयाचा असतो. आपल्या आप्त मंडळींसह घरदार, जमीन-जुमला, पैसाअडका, लौकिक व्यवहार सोडावा लागतो. हा प्राथमिक वैराग्याचा एक भाग आहे. साधारण बारा वर्षे उपासनेचा काळ झाल्यावर साधकाने अंतरंगांत शिरावें. सद्गुरूंच्या सानिध्यात साधना करीत असतांना आपला अहंकार, मीपणा, कर्तेपणाचा अभिमान सोडला पाहिजे. आपल्या ठिकाणी असणारे षडविकार, वासना, कामना, भावना यांचे वेग आवरावेत. बाह्य त्यागाहून अंतर्त्याग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. परमार्थाची वाटचाल करणाऱ्या साधकाच्या ठिकाणी अंतर्बाह्य वैराग्य असावे. सद्गुरूंच्या सान्निध्यांत आत्मारामाची उपासना करावी हेच अति उत्तम.
ऐकोन शिष्याचे बोलणें । स्वामी म्हणती सावध होणे ।
अवधान देऊन घेणें । आनंदपद ॥ ५ ॥
स्वामींनी शांतपणे शिष्याचे बोलणे ऐकून घेतले. त्याच्या अंतःकरणांत असणारी तळमळ जवळून पाहिली. त्याच्या विचार शक्तीचा झालेला विकास थोडासा प्रगतशील दिसला. हे पाहून स्वामींनी त्या शिष्यावर वेदान्ताचे संस्कार करण्यास सुरुवात केली. अरे बाळ ! ज्यासाठी माझ्याकडे आला आहेस तें तुझें स्वरूप सांगतों नीट ऐक. शांत बसल्यानंतर तुला आंत काय दिसते. अनंत उठणाऱ्या कल्पना रंगाचा प्रवाह दिसतो. त्या कल्पना तरंगाच्या मुळाशी काय असावें बरे ! शुद्ध जाणीव आहे असे वाटते. आतां त्या शुद्ध जाणिवेच्या ठिकाणी स्थिर राहण्याचा प्रयत्न कर. अरे ! “गोशृंगावरी मोहरी । मन निश्चळ होय तववरी । दोन्ही कुळास उद्धरी । तो योगेश्वर जाणावा । ” बाळ, गायीच्या शिंगावर मोहरीचा कण क्षणभर राहतो तेवढा वेळ तु तुझें मन स्थिर कर. अरे, त्या ठिकाणी जो शांत निश्चल अनुभव येईल तेच तुझें स्वस्वरूप आहे. तुझें स्वानंदस्वरूप अत्यंत जवळ आहे. अरे इतकेच काय, तें तूंच आहेस. आतां ज्ञानदृष्टि अंतर्मुख करून स्वरूपाचा स्वानंदानुभव घे. हृदयस्थ असणारा आत्मा हा आनंदघन आहे. हा अंतरात्मा स्वयंप्रकाशीही आहे. ह्या प्रकाशमय आत्म्याच्या सान्निध्यांतच तुझे सर्व व्यवहार होत असतात. हे तुझें आनंदपद अमरपद जाणून घे. अरे जीवनामध्ये सावध होणे आणि लक्षपूर्वक अवधान देणे या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एवढ्या जरी तूं सांभाळल्यास तरी तूं धन्य होशील.
शिष्या बहू मन घाली । आतां बाष्कळता राहिली ।
येथें वृत्ति चंचल केली । तरी बुडसी संदेहसागरीं ॥ ६ ॥
अरे बाळ ! आतां तुला ब्रह्मोपदेश करण्यास सुरुवात करतो. तूं अगदी एकाग्र मनाने श्रवण कर. आतां या निरूपणाचे फार मोठे महत्त्व आहे ते ओळख. ह्या श्रवण मननाच्या वेळी तुझें मन इतरत्र भटकू देऊ नकोस. जर तुझें मन भटकू लागले तर तुझें फार मोठे नुकसान होईल. तुझें निःसंशय, निःसंदेह असें समाधान होणार नाहीं. तूं पुन्हां शंकाकुशंकारूपी मोहसागरांत बुडून जाशील. शेवटी ना अलीकडे ना पलीकडे अशी त्रिशंकूसारखी अवस्था होईल. तूं तुझ्या ठिकाणी असणारी उत्शृंखलता सोडून दे. अरे ! ‘मनाच्या तोडून ओढी । श्रवणी बैंसावें आवडी । सावधपणे घडीने घडी । काळ सार्थक करावा । ” अशा प्रकारे सर्व प्रथम बाहेरच्या विषयांत गुंतलेल्या मनाला आंत आणावें. नंतर आंतील विषय सोडण्यासाठी आत्मानुसंधानासारखें प्रभावी साधन करावें. आत्मानुसंधानाने हा दृश्य पसारा असून नसल्यासारखा होतो. अशी ही सद्गुरु सान्निध्यांतील उत्तम उपासना आहे ती तूं कर.
या ठिकाणी मनाची भूमिका मांडली आहे. आपले मन एकावेळी एकाच विषयाचे चिंतन करीत असते. जोपर्यंत मनाला बाहेरच्या विषयांत रस, गोडी आहे तोपर्यंत त्याला आंत गोडी वाटत नाही. मनाच्या स्वभावानुसार हे मन एकाच विषयाच्या भोवती सतत घोटाळत असते. त्या मनाला त्या विषयांतच गोडी वाटत असते. पण पहा, अग्नीमध्ये हात किंवा पाय पोळला, भाजला म्हणजे तो हात-पाय पुन्हां अग्नीमध्ये घालावा असे वाटत नाही. त्याच प्रमाणे त्रिविश्व तापाने होरपळून निघालेल्या मनाला बाह्य विषयांत सुख वाटत नाही. मन एकदां आत्मानंदाशी रमू लागलें – की त्या मनाला हा बाह्य विषय पसारा नकोसा वाटतो. म्हणूनच सद्गुरूंनी दिलेल्या आत्मोपासनेमध्येच राहून आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे.
अग्निसंगे लोहो पिटे । तेणें तयाचा मळ तुटे ।
मग परिसेसी झगटतां पालटे । लोखंडपण तयाचें ॥ ७ ॥
लोखंडाच्या कारखान्यामध्ये लोखंड तापविण्याकरितां प्रखर अशी अग्नीची भट्टी असते. त्या प्रखर अग्नीच्या भट्टीमध्ये लोखंडाचा गोळा तापवतात. लोखंडाचा गोळा तापवून लालबुंद झाला की तो गोळा बाहेर काढून घणाने पिटतात. त्या लोखंडाच्या गोळ्यांतून कच्च्या लोखंडाच्या ठिणग्या, माती, मळ बाहेर पडतो असा तीन-चार वेळा त्या लोखंडावर अग्निसंस्कार केला की, तें लोखंड उत्तम दर्जाचे गणले जाते. असें संस्कारयुक्त लोखंड परिसाचे जबळ ठेवलें की परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते. परिसाच्या स्पर्शाने तयार झालेले सोने उत्तम असते. पहा ! हे रूपक आणि हा दृष्टांत गुरु-शिष्याचे नाते समजण्याकरितांच दिला आहे. सद्गुरूंना परिसाची उपमा दिली आहे. शिष्य हा लोखंडाप्रमाणे मंदबुद्धीचा असतो. शिष्याच्या सामान्य बुद्धीवर तत्त्वज्ञानाचे, वेदान्ताचे संस्कार करावे लागतात. सद्गुरूंनी अनेक वेळा संस्कार केल्यावर शिष्याची प्रज्ञा थोडीशी जागी होते.
सामान्य जड कठीण असणाऱ्या लोखंडाचे रूपांतर सुवर्णामध्ये करण्याचे सामर्थ्य परिसामध्ये आहे त्याच प्रमाणे सामान्य बुद्धीच्या साधकाला प्रज्ञावंत करण्याचे सामर्थ्य सद्गुरूंच्या ठिकाणी असते.
तयाचा मळ झडेना । आणि अभ्यांतर कळेना ।
तरी ते सहसा पालटेना । मृत्तिकारूपें ॥ ८ ॥
लोखंडाचा गोळा अग्नीच्या भट्टीमध्ये घालूनही त्याचा गंज गेला नाही तर ते लोखंडच समजावें. लोखंडामध्ये जोपर्यंत मातीचा मळ आहे तोपर्यंत त्याचे सोने होत नाही. लोखंडाची अंतर्बाह्य शुद्धता झाल्याशिवाय त्याचे सुवर्णात रूपांतर होत नाही. दगडा-मातीच्या खाणीतूनच लोखंडाची निर्मिती झालेली असते. लोखंडाच्या मुळांतील गुणदोष गेल्याशिवाय त्याचे रूपांतर होत नाही. रूपांतर होण्यासाठी संस्काराची जरुरी असते. जगांतील प्रत्येक वस्तु ही निर्माण झालेली असते. त्या निर्माण झालेल्या वस्तूवर कोणता ना कोणता संस्कार करावाच लागतो. संस्कार केल्याशिवाय ती वस्तु वापरता येत नाही. कच्च्या मातीचे रूपांतर भाजलेल्या घटामध्ये होईल त्यावेळी तो घट वापरता येतो. त्याचप्रमाणे परमार्थ मार्गामध्येही शुद्ध संस्काराचे महत्त्व आहेच. परमार्थ करीत असतांना आपली शुद्ध बुद्धि पारदर्शक झाल्याशिवाय खरे समाधान होत नाही. परमार्थ साधना ही केवळ समाधानाच्या प्राप्तीकरितांच असते. जगांत निर्माण झालेल्या बाह्य वस्तूंमध्ये सुवर्णधातु हा अत्यंत मोलाचा मानला जातो. तसेच परमार्थामध्ये अनेक साधना करून त्या साधनेचे फळ ‘समाधान’ हे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते
म्हणउन नाशिवंत तितुका मळ । तुंवां तजावा अमंगळ ।
तो गेलियां तंच ‘केवळ’ । आहेस बापा ॥ ९ ॥
बाबारे ! जें जें निर्माण झालेले आहे ते सर्वच नाशिवंत आहे. हा ब्याऐंशी तत्त्वांचा जगतपसारा हाही नाशिवंतामध्येच आला. तूंही या नाशिवंतामध्येच आलास. दिसणारे, भासणारे हे सर्वच मायेमध्ये आले. माया ही अनादि अशी मलीनच आहे. मलीन असणाऱ्या वस्तूंचा संग सोडल्याशिवाय तुझे निजस्वरूप तुला आकलन होणार नाही. आत्मदर्शनाकरितां निःसंग होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. “संग तितुका नाशिवंत । सांडूनि राहावे निवांत । एकपणाचाही अंत । झालिया समाधान” शेवटी ‘मी’ आनंदघन आहे हे भान देखील सोडले पाहिजे. अरे ! या परमसुखाचें मूळ त्यागांतच आहे. सद्गुरूंनी जें जें सोडायला सांगितले ते सर्व सोडल्यानंतरच तुझें समाधान होईल. त्यागांतच शांति, समाधान आणि तुझें स्वस्वरूप अनुभवास येईल.
संत सत्पुरुषांचा सिद्धान्त असाच आहे. निर्मळ -निश्चळ आत्मदर्शन म्हणजेच आपुल्या स्वस्वरूपाचे दर्शन होय ! सद्गुरूंच्या कृपेनें अज्ञान आवरण संपले की जिकडे पहावे तिकडे आपले स्वरूपच व्यापून आहे असा स्वानुभव येतो.
तरी नाशिवंत ते तूं जाण माया । माईक जाये विलया ।
ते मायेचा विचार प्राणसखया । ऐक सांगतों ॥ १० ॥
अरे बाळ ! आतापर्यंत ह्या मायेचें खूप वर्णन करून सांगितले आहे. जें जें नाशिवंत दिसत आहे ते सर्व मायेचेंच स्वरूप बरं ! ही माया अनादि अनंत काळाची आहे. मायेचे स्वरूप सतत बदलत असते. माया ही नित्यनवा आविर्भाव दाखवीत असते. नित्य परिवर्तनशील असणारी, दिसणारी, भासणारी हीच माया होय ! मायेच्या कक्षेमध्ये जे जे आहे त्याला उत्पत्ति आणि नाश हा ठरलेलाच असतो. “दिसेल तें नासेल । येईल तें जाईल’ असा हा विश्वव्यापी एकच एक सिद्धान्त आहे.
हे प्राणसख्या ! माया ही ईश्वराची शक्तीच आहे. मायेचा विस्तार विश्वभर पसरलेला दिसतो. हे दृष्य विश्वाच्या कानाकोपऱ्यांत पसरलेले आहे. जिथे दृश्य तिथे माया, जिथे माया तिथें दृश्य. असे हे दृश्यमायेचे समीकरण दिसून येते. ह्या मायेचें स्वरूप आकलन होण्यासाठी सद्ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो. तसेच आपल्या आत्मस्वरूपाचा स्वानुभव घेण्यासाठी सद्गुरूला शरण जावे लागते. सद्गुरूच्या सान्निध्यांतच स्वानुभवाची सूक्ष्म दृष्टि प्राप्त होते.
‘अहं’ ऐसें जें स्फुरण । तेंचि मायेचें लक्षण ।
तये मायेपासून त्रिगुण । गुणापासून भूते ॥ ११ ॥
“एक परब्रह्म संचलें । कदापि नाहीं विकारले” अशा निर्गुण परब्रह्माच्या ठिकाणी एकोऽहं संकल्प उठला. त्या स्फुरणरूप प्रथम संकल्पामध्ये एक ओतप्रोत ब्रह्मानंदच स्थिर होता. काही काळ गेल्यानंतर त्या ठिकाणी हलकेंच या ‘मी’ चे भान प्रगट झाले. या ‘मी’ चे भान म्हणजेच ही मूळमाया होय ! आपण तिला प्रकृतिपुरुष अर्धनारी नटेश्वर अशा नावांनी ओळखतो. त्या मूळमायेपासून गुणमाया, गुणापासून पंचभूतें निर्माण झाली. ह्या मायेच्या विस्ताराला अष्टधाप्रकृति असेंही म्हणतात. एका निश्चल, अशा परब्रह्माच्या ठिकाणी सहज निर्माण झालेले आनंदब्रह्म पुढे मायेच्या स्वरूपांत कार्यरत कसें झालें तें पाहूया. ही मूळमाया चैतन्यासह चौदा नांवांनी ओळखली जाते. मूळमाया, गुणमाया, ईश्वर, प्रकृतिपुरुष, अर्धनारीनटेश्वर, शिवशक्ति, अंतरात्मा, शुद्धसत्त्व, गुणक्षोभिणी, सत्त्व, रज, तम, जीव, शिव. अशा ह्या चौदा नावांचा व्याप आणि विस्तार पाहिला तर हे चराचर विश्व मायेनेंच व्यापले आहे असे दिसून येते.
पृथ्वी आप तेज वायो आकाश । सृष्टी रचिली सावकाश ।
येथें दृश्य आणि अदृश्य । सकळ माया ॥ १२ ॥
ही पंचभूतात्मक सृष्टि ह्या पंचवीस समतत्त्वांनी व्यापून आहे. “येक येक भूतांपोटीं । पंचभूतांची राहाटी । सर्वकळे सूक्ष्म दृष्टी । घालून पाहाता” प्रत्येक भूत पांच तत्त्वांच्या मिश्रणाने पूर्ण होते. प्रत्येक भुताला स्वतंत्र अस्तित्त्व नसून ते पंचतत्त्वांच्या आश्रयानेच उभारले आहे. प्रत्येक तत्त्वाचे परीक्षण व निरीक्षण करूं गेल्यास त्याचे स्वरूपमूल्य समजतें. सूक्ष्म विचार केल्यावर असे दिसून येईल, की पंचभूतांचा पसारा म्हणजेच मायेचें स्थूल स्वरूप होय ! म्हणून विश्वरूप विश्वंभर सगळी माया. आपण यांतील काय घ्यावयाचे आणि काय सोडायचे एवढेच पहावें. कडू काय आहे आणि गोड काय आहे हे निवडून घ्यावे. या विश्वामध्ये विश्वव्याप्त सगळी मायाच अनुभवास येते. ह्या मायेचा सूत्रधार परमात्मा ह्या विश्वाला व्यापूनच राहतो.
परमात्म्याच्या ठिकाणी अशा अनंत शक्ति वास करतात. त्यांपैकी एक महान शक्ति त्या वेगवेगळ्या वस्तूला रूप देऊन साकार करते. त्या बलशाली शक्तीलाच ईश्वराची माया असेही म्हणतात. परमात्मस्वरूप अविनाशी आहे हे अगदी खरे. परंतु त्याच्यांतूनच ही माया जें जें आकारास आणते तें सर्वही नाशिवंत समजावें. अनुभवास येणाया व्यक्त विश्वाचे बीज मायेमध्येच असतें. दिसणाऱ्या आणि भासणाया मायेला क्रमाक्रमाने व्यक्त स्वरूप प्राप्त झाले आहे.
येक माया दो ठायी वाटली । प्रकृति आणि पुरुष जाली ।
जैसी दोदिसांची बोली । येकचि परवा ॥ १३ ॥
माया ही एक ना अनेक रूपाने अनुभवास येते. मायेचे स्वरूप बहुरूपी, बहुनाटकी असेंच सिद्ध होते. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान किंवा ध्याता, ध्येय, ध्यान अशा त्रिपुटीच्या माध्यमांतून ही मायाच अनुभवाला येते. ‘अहं’ संकल्पांतच ही जाणीवरूप त्रिपुटी उदयास आली. त्यामुळे या त्रिपुटीचा विस्तार जगभर पसरलेला दिसतो. बद्ध जीवांचे अज्ञान, साधकांची ज्ञानोपासना, आणि योग्यांची योगसाधना हे सर्व कांहीं मायेचेंच रूप समजावें. कर्मयोग्यांचे कर्मतृप्तीचे साधन देखील ही मायाच आहे. साधकाची भावसमाधि, सहजसमाधि, सविकल्पसमाथि, संप्रज्ञातसमाधि अशा समाधीचे प्रकारही मायेच्या कक्षेमध्येच येतात. अहो ! विश्वरूप विश्वंभर अवधी माया असे त्या मायेचे स्वरूप आहे. “माया टाकिता कैची टाकावी । माया झाडिता कैची झाडावी” माया ही झटकन टाकता येत नाही. तशीच ती दूर लोटता येत नाही. ह्या मायेचा गुंता सोडविणे अति कठीण आहे. जोपर्यंत आपल्या स्वरूपाचा वेगळेपणाने अनुभव येतो तोपर्यंत ह्या मायेचा प्रांत आहे. पहा ! स्वतःच्या शुद्ध जाणिवेचे आत्मसमर्पण, स्वबलीदान स्वस्वरूपांत झाले की, ह्या मायेचा प्रांत संपतो, मायेचा संगही सुटतो.
माया सच्चिदानंद । माया आनंदाचा कंद ।
माया हेचि निजबोध । शब्दरूपें ॥ १५ ॥
साधनशील असणाया ज्ञानयोग्यांना जो आनंदाचा अनुभव येतो त्या आनंदामध्ये ही त्रिपुटी असतेच. बहुधाज्ञान हे एक मायेचें विशाल स्वरूप समजावे. आपण आनंदाचा गाभा असे म्हणतो तो आनंदही कमी अधिक प्रमाणांत ऊर्म्यात्मक स्वरूपाचा असतो. “आनंदाचा अनुभव । हाही वृत्तीचाचि भाव” असा भासणारा आनंद हा मायामय पदार्थ वस्तूचा असतो. माया ही जाणीवमय असल्यामुळे ती शब्दांनी ओळखली जाते. ईश्वराचे वर्णन करीत असतांना तो सच्चिदानंद आहे, तो आनंदकंद आहे आणि निजबोध आहे असे म्हणतात. त्याचे वर्णन करतांना वापरलेले शब्द हे मायेचेंच स्वरूप आहे.
परमात्म स्वरूप हे अनंत आहे. अनंत असणाऱ्या परमात्म स्वरूपाचे ज्ञान प्रथम शब्दांनीच होत असते. कारण शब्द हा ध्वनि स्वरूपाने मूळ संकल्पांतच होता. ते शब्दब्रह्म ध्वनिरूपाने आजपर्यंत चालत आले आहे. सद्गुरूंच्या मुखांतून शब्दब्रह्माचा अनुग्रह होतो. त्या शब्दध्वनीमध्ये ब्रह्ममय होण्याचे सामर्थ्यही असते. सद्गुरूंनी प्राप्त करून दिलेला आनंद अथवा साधना करून प्राप्त झालेला आनंद हा मायेमध्येच आला.
आत्मा ब्रह्म आणि स्वरूप । हेहि मायेचेंचि रूप ।
रूप आणि अरूप । सकळ माया ॥ १६ ॥
आत्माराम आणि त्या आत्म्याचे चितचैतन्य स्वरूप शबल ब्रह्म हेही मायेमध्येच आले. आत्मवुद्धीच्या साह्यानेच हा ज्ञानचक्षु ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करीत असतो. ज्ञानदृष्टीला जें जें दिसतें तें अनुभवामध्ये येते. “चर्मचक्षु ज्ञानचक्षु । हा तो अवघाचि पूर्वपक्षु । निर्गुण ठाईचा अलक्षु । लक्षवेना” म्हणून मायेची कक्षा कुठून कुठपर्यंत ही जाणून घ्यावी. पूर्वपक्ष कोणता आणि सिद्धान्त कोणता हे समजून घ्यावें. जें अनुभवता येते तें सर्वही पूर्वपक्षामध्येच येते. जें त्रिकालाबाधित सत्य आहे, नित्य निश्चल आहे, तें एकच एक परब्रह्म सिद्धान्त समजावा. पूर्वपक्ष म्हणजे झाले आणि सिद्धान्त म्हणजे निमाले. प्रथम संकल्पांतून जे निर्माण झाले ते सर्व मायामय समजावें. सगुण साकार आणि सगुण निराकार ही देखील मायाच समजावी.
जीवेश्वर हा देहांत राहून देहाचा सांभाळ करतो. ईश्वर ह्या ब्रह्मांडाचा अधिकाधिक व्याप वाढवितो. परमात्मा चराचर विश्वाला व्यापून राहतो. परब्रह्म हे केवळ आहेपणाच्या अस्तित्वानेच ह्या चराचराला आधार आहे. वरील तीनही प्रकार क्रमाक्रमाने ह्या मायेच्या वर्तुळामध्येच येतात. ह्या मायेचा प्रांत इतका विशाल, विस्तीर्ण आणि अति सूक्ष्म अनुभवास येतो.
जीव शिव आणि ईश्वर । हाहि मायेचाचि विस्तार ।
विश्वरूप विश्वंभर । अवघी माया ॥ १७ ॥
उपाधीच्या दृष्टीने विचार केला तर जीवाची उपाधि काही मर्यादित दिसते. देह आणि त्या देहाच्या तत्संबंधींची उपाधि ही जीवाची आहे. उपाधीने व्यापून असणे हेच जीवेश्वराचे खरे स्वरूप समजावें. म्हणूनच जीवाला देहबुद्धीच्या माध्यमांतून जडलेला वासनेचा संग जीवास बंधमुक्त होऊ देत नाही. शिवरूपी चैतन्य विश्वाला व्यापून आहे. विश्वाच्या व्यापांत गुंतलेली शिवशक्ति विश्वउपाधीमध्येच गुंतून आहे. विश्वाचा विश्वव्यापी निसर्गोपक्रम सतत अशांतच असतो. ईश्वराने निर्माण केलेलें ब्रह्मांड आणि त्याची मायारूपी शक्ति ही सतत कार्यरत आहे. पहा ! जीवाची उपाधी वेगळी, शिवाचा व्याप आगळा. आणि ईश्वर हा विश्वाला व्यापून असल्यामुळे त्याचे कार्यक्षेत्र हे निराळंच. एकंदर विश्वव्यापी विश्वंभर हा मायेचाच पसारा आहे.
माया म्हणजे ईश्वराची अभिन्न असणारी शक्ति. ईश्वराने मायेच्याद्वारा विश्वरचनेचा प्रयत्न केला. विश्वांतील प्रत्येक घटनेला संकल्पानुरूप दिशा देतो त्यास विश्वंभर असे म्हणतात. एकाच चैतन्याला जीव, शिव, ईश्वर, मूळमाया असेही म्हणतात.
माया मनास चाळक । माया बुधीस व्यापक ।
माया येकी अनेक । ऐसें बोलणें ॥ १८ ॥
जीवाचें दास्यत्व करणारे हे मन अत्यंत चंचल आहे. अशा चंचल मनाला संकल्प-विकल्प करण्याची स्फूर्ति ही मायाच देत असते. मनुष्याच्या ठिकाणी मनाच्या माध्यमांतून अष्टसृष्टि निर्माण करण्याचे धाडस ही मायाच करीत असते. अष्टसृष्टि ह्या स्वप्नवत् मनाच्या ठिकाणीच दिसत असतात. “संकल्प विकल्पाची सृष्टी । जाली मनाचिये पोटी । ते मनचि मिथ्या शेवटीं । साक्षी कवणू ?” पहा ! कल्पनासृष्टि, शब्दसृष्टि, प्रत्यक्षसृष्टि, चित्रलेपसृष्टि, स्वप्नसृष्टि, गंधर्वसृष्टि, चरसृष्टि, दृष्टिबंधनसृष्टि अशा ह्या मनाच्या दुर्बलतेमुळेच मनाला अप्टसृष्टि दिसतात व भासतात. कोणत्याही उपक्रमाचा निश्चय ही बुद्धीच करीत असते. बुद्धीला प्रतिभेचे स्वरूप प्राप्त करून देणारी शक्ति ही मायामयच आहे. ही माया अनेक प्रकाराने मनाला आणि बुद्धीला चाळवीत असते. इंद्रियांना कार्यप्रवृत्त करणारी ही माया अनेक रूपांनी प्रगट होऊन सतत कार्यरत राहते.
ह्या विश्वामध्ये सचेतन आणि अचेतन असे दोन विभाग आहेत. या दोन्हींमध्ये शक्तीचे सामर्थ्य दिसून येते. जिथें चैतन्य असते तिथे ही शक्ति असतेच म्हणून विश्वव्यापी असणारी चैतन्यशक्ति ही मायामय समजावी. शक्तीच्या आविर्भावामुळेच चैतन्याचा अनुभव अधिक येतो. जडचैतन्याचा विलास म्हणजेच ही माया होय !
माया देहास चालवी । माया शब्दास बोलवी ।
माया दृश्यास दाखवी । नेत्री रिघोनियां ॥ १९ ॥
जीवाच्या ठिकाणी असणारे शबल चैतन्य या देहाला व्यापून आहे. चैतन्यरूप अंतःकरणाच्या समवेत असणारी ही चार इंद्रिये सतत कार्यरत आहेत. अंतःकरण आहे म्हणून मन, बुद्धि, चित्त, अहंकार ही कार्यान्वित दिसतात. जीवाचे शबल चैतन्य या देहाला नखशिखांत व्यापून आहे. तेंच मायारूपी चैतन्य या देहाला चालवीत असते. तेंच देहांतील चैतन्य वाणीद्वारा बोलवीत असते. त्याच शब्दांना शब्दब्रह्म अशी उपमाही दिली आहे. माया चैतन्यरूपाने डोळ्यांमध्ये राहून बाहेरचा दृश्यपसारा पाहात असते. देहांतील शबल चैतन्य या देहाचे सर्व व्यवहार करीत असते. “जीव हा चैतन्याचा अंशु” जीवाचे सर्वच व्यवहार या मायेच्या प्रांतामध्येच होत असतात. आपुलें सर्व जीवन मायामय आहे. हेच या मायेचे खरे स्वरूप समजावें.
मानवाच्या जीवनांतील सर्व हालचाली ह्या जीवनशक्तीच्या आधारानेच होत असतात. ही जीवनशक्ति मनुष्य जीवनाचे प्रधान अंग आहे. ज्या मायावी शक्तीने हे विश्व निर्माण केले तीच मायाशक्ती या देहामध्ये राहून पायाने चालते, मुखाने बोलते, डोळ्याने पाहते.
मायेनेंचि माया चाले । मायेनेंचि माया बोले ।
मायेनेंचि माया हाले । वायोरूपें ॥ २० ॥
मानवी देहाचे सर्व विधि आणि त्याचे सर्व व्यापार ही मायाच करीत असते. चैतन्यरूप मायेच्या प्रेरणेनेच चालण्याची क्रिया होते. मायोपाधीच्या आज्ञेनेंच बोलण्याचे धैर्य येते. या मायेच्या अस्तित्वामुळेच देहाची सर्व हालचाल होत असते. चैतन्यशक्तीमध्ये चैतन्य अधिक चलित वायूचा गुणधर्म असतो. शुद्ध चैतन्यामध्ये वायूचा समावेश झाला म्हणजे ती चैतन्यशक्ति कार्यान्वित होत असते. शुद्ध चैतन्य हा शुद्ध ज्ञानाचा विषय आहे. आणि केवळ शक्ति हा केवळ मायेचा प्रांत आहे. म्हणून चैतन्यशक्तीचा आद्यंत प्रांत हा मायेमध्येच येतो.
विश्व निर्माण करणाऱ्या परमात्म स्वरूपाला मुळांतच दोन अंगें आहेत. एक चित्चैतन्य सचेतन आणि दुसरे अचित् अचेतन. पहिले चित्चैतन्य असणारे अंग चिद्रूप ज्ञानप्रधान, आनंदस्वरूप असें आहे. दुसरे अचित् अचेतन असणारें जडात्मक अंग अज्ञानरूप मायेचे आहे. चैतन्य अधिक शक्ति, एकूण चैतन्यशक्ति हे मायेचेंच स्वरूप समजावें. मूळमाया ही आकाश आच्छादनाप्रमाणे सर्वव्यापी आहे. गुणमाया ही आकाशांत सहज वाहणाऱ्या वायूप्रमाणे भासते. मूळमायेपासून ते गणमायेपर्यंत हा सगळा मायेचाच प्रांत आहे. मूळमाया जगत्जननी म्हणजेच ही शारदा. त्या शारदेपासून चारी वाणी, चारी खाणी निर्माण झाल्या. म्हणून सर्व प्राण्यांमध्ये प्राणरूपाने शक्ति प्रगट झाली. चैतन्यशक्तीच्या रूपाने सर्वत्र हालन-चलन, बोलणे-चालणे, हिंडणेफिरणे होऊ लागले. हे सर्वकाही ही मायाच घडवून आणते.
तों शिष्य म्हणे जी ताता । माया चाले स्वरूपसत्ता ।
अरे ! सत्ता तेचि तत्त्वतां । माया जाण ॥ २१ ॥
शिष्याने काळवेळ पाहून योग्य वेळी आपली शंका उपस्थित केली. शिष्य म्हणतो, ‘महाराज ! आपण असे म्हणतां की, या मायेला मायेचाच आधार आहे. ही मायाच मायेला चालवीत असते. आपण सांगता तें खरें, की शास्त्रवचन खरे ? शास्त्रवचनानुसार या मायेला स्वरूपसत्तेचा आधार आहे असे स्पष्ट दिसते. कारण आपले स्वरूप हे शाश्वत आहे आणि माया ही परिवर्तनीय अशाश्वत आहे. अशा ह्या दोन वस्तूंची सांगड कशी जुळवावयाची हे आपणच सांगा. ‘सद्गुरूंनी स्वानुभवाच्या आधारें मायेचें स्पष्टीकरण केले. अरे बाबा ! सत्ता म्हणजे काय ? सांग पाहूं. अरे ! ही सत्ता म्हणजेच आहेपणाचें अस्तित्व. आहेपणाचे अस्तित्व ही एक शक्तीच आहे. स्थिर असणाऱ्या शक्तीचा अनुभव कुणाला आला, तो कुणी जाणला ? अरे ! जो अनुभव आला ती एक शुद्ध चैतन्यमय शक्तीच बरं ! अशी ती अतिसूक्ष्म असणारी स्वरूपसत्ताही मायाच होय !
परमात्म स्वरूपाला जेव्हां स्वतःचें ज्ञान झाले त्याच वेळी त्या ज्ञानामध्ये अतिसूक्ष्म असे ‘मी’चेही भान झाले. ते अतिसूक्ष्म असें भान म्हणजेच ही स्वरूपसत्ता होय ! तीच ही इथपासून स्वरूपसत्तेपर्यंतची सर्व मायाच समजावी. परब्रह्म एकच एक आहे. पण ही माया मात्र अनेक रूपाने प्रगट झालेली अनुभवास येते.
तरी मायेने स्वइछ्या असावें । आणि स्वरूपसत्तेने नसावें ।
मनास आले तैसें करावें । हे केवी घडे ? ॥ २२ ॥
सद्गुरूंनी पाठीमागच्या ओवीमध्ये या मायेच्या स्वरूपाचा उघड खुलासा केला होता. तो मायेचा खुलासा शिष्यरायास समजलेला दिसत नाही. अहो ! थोडेसें जरी अनवधान झाले तरी पूर्वपक्ष कोणता आणि सिद्धान्त कोणता हे कळत नाही. या करितांच चातक पक्ष्याप्रमाणे अतिदक्ष असावे लागते. परमार्थाची वाटचाल ही सावध, साक्षेपी, दक्ष असणाऱ्या साधकास सुखाची ठरते. पण शिष्याने या ठिकाणी पुन्हां विचारांचा गोंधळ सुरू केला आहे. शिष्य म्हणतो, महाराज ! ही माया स्वतः कशीही वागली तरी चालेल असाच अर्थ निष्पन्न होतो. ह्या मायेनें स्वरूपाच्या सत्तेने न चालता मनाला येईल तसे वागणे योग्य नाही. या मायेचा हा स्वैर धुडकूस बरा नाही. आपल्या बोलण्याचा सूर मायेच्या बाजूनेच दिसतो आहे. वास्तविक परमात्म स्वरूप हे अद्वयच आहे. त्याचे स्वरूप एकमेवाद्वितीय असेंच अबाधित असले पाहिजे. स्वरूपाच्या ठिकाणी होणारे ‘मी’ हे भान शुद्ध जाणिवेच्या ठिकाणींच निर्माण झाले. मग जीव, शिव, गुणमाया, ईश्वर ही संकल्पना स्वतंत्र असूं शकत नाही. परमात्म्याहून मायेला स्वतंत्रपण आले तर द्वैत हे अंतिम मानावे लागेल. शिष्याने असा हा मोठा आक्षेप घेतला आहे.
खऱ्यावरी लटिकें चौताळलें । लटिकें मर्यादेने राहिलें ।
तें तुवां गर्भांधाने देखिलें । हे अघटीत वार्ता ॥ २३ ॥
या विश्वामध्ये खरे आणि खोटे, सत्य आणि असत्य, ब्रह्म आणि माया, असे हे दोनच प्रकार दिसून येतात. आपुली शुद्ध बुद्धि थोडी शांत करून प्रतिभेच्या भूमिकेतून पाहावे. परब्रह्म हे त्रिकाली सत्यच आहे तेंच ते सत्य मानावें. जीवनामध्ये सत्याची संगति समाधान देत असते. सत्य हेच मानवी जीवनामध्ये सार आहे. पण सत्य असणाऱ्या ब्रह्म वस्तूवर असत्य असणाऱ्या खोट्या मायेने आक्रमण केले ही गोष्ट बरोबर नाही. येथे सांगणारा आणि ऐकणारा दोघेही क्षणमात्र असंबद्ध असावेत असे वाटते. माया ही कितीही विशाल पसरली तरी ती परब्रह्मावर आच्छादन करूं शकत नाही. पण अर्धपांडित्य प्राप्त झालेल्या शिष्याने अशी ही खोटीच वार्ता सांगितली. अहो ! ज्याला मुळांतच ज्ञानचक्षूचा अनुभव नाही अशा चर्मचक्षूंनी युक्त असणाऱ्या जन्मांधाला काय म्हणावे ? कारण जो जन्ममरणाच्या परंपरेत अडकला आहे तो जन्मांधच काय त्याला गर्भांधच समजावें.
जो जन्मापासून आंधळा आहे त्याने काहीही पाहिलेले नसतें. चर्मचक्षूशिवाय समोरील दृश्य पाहणे शक्यच नाही. अशी ही गोष्ट जन्मांधाने पाहिली असे म्हणणे योग्य आहे का ? पहा ! ब्रह्म आणि माया, सत्य आणि असत्य खरे आणि खोटें, कधीही एक मानू नये, जीवनामध्ये एक विचार करून पहा म्हणजे कळेल.
तैसी माया हे नाथिली । आणि स्वरूपसत्तेने चालिली ।
ते तुंवां गर्भांधाने देखिली । हे वार्ता सांगसी ॥ २४ ॥
बाबारे ! तुझे विचार अजूनही पक्व झालेले दिसत नाहीत. मायेच्या बाबतीत तुझी त्रिशंकूसारखी अवस्था झालेली दिसते. अरे ! जी माया झालीच नाहीं ती सत्य आहे असेही म्हणतोस. जें परब्रह्म सत्य आहे, त्या ब्रह्मस्वरूपावर ही खोटी माया चौताळली असेंही सांगतोस. इतकेच काय, ही माया स्वरूपाहून भिन्न नाही अशीही शंका घेतोस. एकंदर तुझ्या या असंबद्ध विचाराला काय म्हणावें बरं ! अरे ! अज्ञान अंधःकारामध्ये जन्म-मरणाच्या चक्रांत अडकलेल्या गर्भांधानें या गोष्टी सांगाव्यात ! आतां तुझ्या ह्या अज्ञान दृष्टीची आणि भ्रांत विचारांची कीव येते. पहा ! मायेचे स्वरूप नेमके कोणते हे अजूनही तुला समजलेले नाही. याचे कारण सद्गुरुपदीं सर्वार्पणभाव ठेवून कुठेच शरणागती पत्करलेली नाहीस. अरे ! या विचारांचा जटिल, कटिल गुंता, जीवनांतील प्रामाणिकपणा आणि जीवन्मुक्तीचें गुह्यज्ञान हे सद्गुरूंच्याकडूनच समजून घ्यावे लागते.
सद्गुरूंनी शिष्याला जन्मांध असे म्हटले आहे याचे कारण इंद्रियांना गोचर असणारे बाह्य जगाचे ज्ञान हे जीवाला बंधनच समजावें. आपला जन्म आणि आपला मृत्यु हा कशामुळे होतो हे ज्यांना कळत नाही त्यांना जन्मांध असे म्हटले आहे. जीवनामध्ये ज्ञानदृष्टीचा ज्ञानोदय होत नाही तोपर्यंत सर्वच जीव जन्मांध आहेत असे समजावे.
जें जालेंचि नाहीं सर्वथा । तयावरी निर्गुणाची सत्ता ।
ऐसे हैं ज्ञातेपणे बोलतां । तुज लाज नाहीं ॥ २५ ॥
काही वेळेला मनुष्याच्या मनावरील विचारांचा ताबा सुटला की तो माणूस चहूबाजूंनी भांबावून जातो. अशा वेळी त्याचे मन थोडे स्वैरभैर होऊन काहींच्या काही विचार करूं लागते. ह्या शिष्याची अशीच स्वैर अवस्था झालेली दिसते. शिष्य म्हणतो, अहो महाराज, ही दिसणारी, भासणारी माया कधी उत्पन्नच झाली नाही. अहो ! जी उत्पन्नच झाली नाही ती ह्या ब्रह्मस्वरूपाच्या अधीन कशी असेल ? त्या ब्रह्मस्वरूपाची सत्ता अशा नश्वर फसव्या मायेवर कशी असूं शकेल ? शिष्य असे एक ना अनेक असंबद्ध प्रश्न विचारूं लागला. हे पहा ! या मायेचा हा फार मोठा विलक्षण प्रभाव दिसून येतो. दोन नद्यांच्या संगमावर पाण्याच्या प्रवाहांत भला मोठा भोवरा फिरत राहतो. त्या पाण्याच्या भोवऱ्यामध्ये एखादा माणूस अडकला म्हणजे तो पाण्याच्या गतीने फिरतच राहतो. त्याला त्या भोवऱ्यातून बाहेर पडणें अति कठीण जाते. तीच अवस्था ह्या शिष्याची झाली आहे. आतांपर्यंत अनेकदां माया-ब्रह्माचे स्वरूप नीट सांगूनही त्याचा भ्रम जात नाही. शिष्याची ही भूमिका पाहून सद्गुरूंनी आपले शब्दब्रह्म जागृत केले. अरे मूर्खा ! आतापर्यंत इतकें सांगूनही तुला या मायेचें स्वरूप समजले नाही, तू एकसारख्या ज्ञातेपणाच्या गप्पा मारतोस याची तुला लाज वाटत नाहीं ? सद्गुरूंनी सौम्य शब्दांत त्याची अज्ञानधुंदी जागृत केली.
आत्माराम हा ग्रंथ गुरुशिष्यांच्या संवादांतून उगम पावला आहे. सद्गुरु हे ब्रह्मज्ञानी आहेत आणि शिष्य हा अज्ञानी आहे. अशा अज्ञानी शिष्याने त्याच्या अज्ञान भूमिकेतून बऱ्याच शंका घेतल्या आहेत. अज्ञान हे शक्तिप्रधान असल्यामुळे त्यामध्ये आढेवेढे फारच असतात. अशा अज्ञानी शिष्याचे समाधान करणे अतिकठीण असते. शिष्याच्या विचारांचा दृष्टिकोन विश्वाच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेला असतो. तर सद्गुरूंचा अनुभव आत्मसाक्षात्काराच्या स्वानुभवावर अधिष्ठित असतो. गुरु-शिष्यांच्या स्वानुभवामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. आता या विचाराचे निराकरण पुढे होईल.
सकळ माया ऐसेंहि म्हणतां । आणि जालीच नाहीं ऐसेंहि सांगता ।
तरी म्यां काय करावें आतां । सांगा स्वामी ॥ २६ ॥
सद्गुरूंनी आपल्या शब्दांचे उग्र स्वरूप दाखविल्यानंतर शिष्य सावध झाला. शिष्य अगतिक होऊन हात जोडून म्हणाला, महाराज ! आपण मला मार्गदर्शन करतांना (ओवी क्र. १६-१७ मध्ये) हे सर्व कांहीं मायामय आहे असे सांगितले. आता काही काळ लोटल्यानंतर ही माया झालीच नाही असेही सांगता. आता तुमच्या ह्या दुधारी शब्द शस्त्राचा घाव भीतिदायक वाटतो. आपल्या शब्दब्रह्मांतील काय खरें मानावे आणि काय खोटे ठरवावें, हे मलाही समजत नाही. माझ्या सामान्य बुद्धीला (हे कोडे) हा विहंगमी विचार पेलत नाही, तरी आतां मी काय करावे हे आपणच सांगावें. आपण हे समजून सांगितले तरच मला समजेल. अन्यथा माझे सर्व जीवन ह्या संदेह सागरांत बुडून जाईल. माझ्या जीवनामध्ये मा प्रवृत्ति मार्गातील सुख, ना निवृत्ति मार्गातील आनंद, असे व्यर्थ जिणे होईल. आतां आपणच कृपा करा !
सद्ग्रंथांचा चिंतनशील अभ्यास करीत असतांना स्वप्रचीति प्रधान स्वस्वरूपाचे वर्णन आणि ग्रंथांच्या वाचनाने बुद्धिप्रधान स्वरूपाचे विवेचन यांमध्ये थोडा फरक दिसतो. अंतरंगांतील स्वरूपानुभव ओलावा आणि बाह्यांग प्रदर्शनांतील शब्दफुलोरा यामध्ये जितका फरक तितकाच फरक अनुभवामध्येही आहेच. परमार्थ मार्गातील साधनशील साधकाला स्वस्वरूपाचा अनुभव आला की, तो साधक बुद्धीच्या बळावर स्वरूपाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन थबकतो. त्यांना पुढे जाण्यासाठी स्वबलीदानाची प्रक्रिया समजलेली नसते. हा सूक्ष्म फरक समजण्यासाठी सद्गुरूला शरण जावें.
अरे ! मनास जें जें अनुभविलें । तें तें माईक नाथिलें ।
तितुके तुवां टाकिलें । पाहिजे स्वानुभवें ॥ २७ ॥
अरे बाळ ! हे मन अत्यंत चंचळ, चपळ आहे. या मनाला बाह्य विषयामध्ये फारच गोडी वाटत असते. बाहेरचे सर्व विषय हे बहुरंगी, बहुसंगी असल्यामुळे ते फसवे आहेत बरं ! डोळ्यांना दिसणारे, मनाला भासणारे पदार्थादि सर्वच विषय मनाला मोह पाडणारे आहेत. अशा नाट्यमय मायेचा संग सोडला पाहिजे. अरे ! या चंचल मनाला विषय विषापासून खूप दूर ठेवले पाहिजे. हे आकर्षित विषयच मनाला पुन्हा पुन्हां विषयांत गुंतवीत असतात. विषय हे अत्यंत लबाड, दगलबाज आहेत. अरे ! या चंचल मनाला विवेकाने आवरावें. बांधलेल्या मर्कटाची दोरी आपल्या हातांत धरावी. त्याचप्रमाणे मर्कटरूप मनाला विवेकाच्या साह्याने आपल्या ताब्यात ठेवावें. अरे ! जेवढे विषय आहेत ते सर्व जाणून सोडून दे. जाणून सोडलेले विषय मनाला पुन्हां आकर्षित करीत नाहीत. आतां जें मायिक आहे ते सोडून दे एवढेच सांगतो.
बाह्य दृश्याचे ज्ञान करून देणारे हे मनच आहे. पंचज्ञानेंद्रियांचा आणि दृश्य जगाचा संबंध मनामुळेच जोडता येतो. मनामुळेच ह्या जगाचे ज्ञान जाणीवरूप जीवाला समजतें. जीव हा मनाच्या साह्यानेच बाह्य विषयामध्ये कार्यप्रवृत्त होतो. इंद्रियांनी पाहिलेल्या विषयांची प्रतिमा मन आंत तयार करीत असते. मनाने आंत तयार केलेली प्रतिमा हा एक चिंतनाचा विषय होतो. जन्मोजन्मी हाच विषय आणि हेच विषयचिंतन असा परिपाठ होऊन राहतो. प्रतिजन्मी आत्मघात अशी ही आपल्या मागची परंपरा सुटत नाही. मनाने कल्पिलेल्या जगाचा त्यागच सत्य म्हणावा लागेल. निर्माण झालेले सर्वच जाणून सोडावे असे सद्गुरूंनी सांगितले.
सकळहि माया परी नाथिलीं । स्वरूपी तो नाही राहिली ।
येवं आहे नाहीं हे बोली । माया जाण ॥ २८ ॥
प्रभावशील असणाऱ्या मायेचे जितकें वर्णन करावे तितकें थोडेच आहे. कारण लटक्या मायेचे वर्णन करतांना लटक्या, तुटक्या शब्दांचाच वापर करावा लागतो. मायेच्या कक्षेमध्ये असणारी ही भाषाही फाटकी तुटकीच समजावी. अहो ! तुटक्या शब्दांनी, फाटक्या भाषेनें कधीं मनाचे समाधान झाले आहे का ? कधीही नाहीं ! अनेक शब्द एकत्र जुळवून तयार केलेली भाषा ही व्यवहार समजण्याकरितांच असते. अशा शब्दांनी कधीही ब्रह्माचे ज्ञान होत नाही. शब्द हे प्राथमिक मायेमध्येच आले. स्वस्वरूपाच्या ठिकाणी शब्द, भाषा, जाणीव, जाणणे ह्या त्रिपुटीचा काहीही संबंध नाही. परब्रह्माच्या ठिकाणी आहेपणाची शुद्ध जाणीव आणि नाहीपणाचें गाढ अज्ञान हे दोन्हीही नाही. वरील दोन्ही प्रकार हे मायेमध्येच आले आहेत. पहा ! आतापर्यंत तुला जें जें सांगत आलों तें ध्यानात ठेव. अरे ! परमार्थ जर इतका सोपा असता तर तो सर्वांनी केला असता. सर्वच जनता उद्धरून गेली असती आणि हे जग-जगत् माणसावाचून ओसाड पडले असते; पण परमेश्वराला ह्या जगाचा व्याप वाढवावयाचा आहे हेच खरें. ही माया अनिर्वचनीय आहे. तिचे स्वरूप शब्दांनी सांगता येत नाही.
स्वस्वरूपाचा अनुभव असणे ही एक देहातीत अवस्थाच आहे आणि स्वस्वरूपाचा अनुभव नसणे ही देखील एक देहाची अवस्थाच आहे. केवळ आहेपणा हे जिवंतपणाचे लक्षण आहे आणि काहीच नाही हे मर्त्यपणाचे लक्षण आहे. सत्पुरुषांना स्वरूपसाक्षात्कार झाला की ते केवळ आहेपणाच्या अस्तित्वानेच असतात आणि सामान्य माणसें भ्रांतिस्वरूप असणाया मायेच्या सत्तेने चालतात. ह्या जगाची उत्पत्ति मायेमुळेच झाली. ह्या जगाचा उत्कर्ष मायेमुळेच झाला आणि या जगाचा अंत-कल्पांत मायेमुळेच होणार आहे. हा उभारलेला अवडंबर पसारा आहे बरं !
येवं सांगतो ते ऐकावें । माईक मायेने जाणावें ।
आतां मनन करावें । सावध होऊनी ॥ २९ ॥
अरे बाळ ! आता मी जे सांगतो तें लक्ष देऊन ऐक. तुझ्या मनांत असणाया असंख्य विषयांचे चिंतन, व्यग्रता सोडून दे. अत्यंत सावध होऊन, एकाग्र मनाने श्रवण कर ! पहा ! ही माया मायिक आहे हे निश्चित. माया सोडण्याचा प्रयत्न केला तर ती अधिक मागे लागते. डोळे बंद करून बसल्यानंतर ती मनःचक्षूला अधिकच दिसू लागते. डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला तर ती परिवर्तनशील आहे असे वाटते. एवंच ह्या मायेचे स्वरूप निश्चित असे नाही म्हणून ती अनिर्वचनीय आहे असे म्हणावे लागते. एखाद्या वस्तूचे रूप-स्वरूप सांगितले नाही तर ते कळतही नाही. म्हणूनच तुला मायेचे स्वरूप स्पष्टपणे सांगितले. आतां यांतून काय घ्यावयाचे आणि काय सोडावयाचे हे तूंच ठरव. हा दृश्यमायेचा ढोबळ गुंता सूक्ष्म असणाऱ्या जाणिवेनेंच सोडवावा लागतो. ज्या अतिशुद्ध बुद्धीने हा गुंता सोडवशील ती शुद्ध बुद्धीही स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर कर ! स्वस्वरूप म्हणजेच मानवी जीवनांतील अंतिम सुखाचे स्थान आहे. जीवनांतील सुखाची तळमळ इथें स्वरूपाच्या ठिकाणी शांत होते.
जगामध्ये जन्मतः कोणीच ज्ञानी नसतो. प्रत्येक जण प्रयत्न करून, अभ्यासानें, अनुभवाने शहाणा होतो. सर्वसामान्य माणूस अज्ञानदशेच्या अल्प सुखांतच आपले जीवन व्यतीत करतो; पण अशा अल्पसुखाने कायमचे दुःखमुक्त होता येत नाही. दुःखमुक्तीचा उपाय बुद्धिप्रामाण्य प्रयत्नामध्येच आहे. शुद्ध बुद्धीच्या साह्याने आत्मानात्म विवेक करावा लागतो. यामध्येच नित्य काय, अनित्य काय याचा निवाडा होतो. मग अनित्याचा संग सोडून नित्य असणाऱ्या स्वयंप्रकाश आत्म्याचें अनुसंधान ठेवावे लागते. जीवनांत सातत्याने मनन, चिंतन केले तर आत्मानुसंधान टिकते. मानवी जीवनांत सतत आत्मानुसंधान असणे, टिकवणे, सांभाळणे यालाच खरी सावधानता म्हणतात. म्हणून सावध, साक्षेपी, दक्ष तोच खरा साधक समजावा.
मायेकरितां माया दिसे । मायेकरितां माया नासे ।
मायेकरितां लाभ असे । परमार्थस्वरूपाचा ॥ ३० ॥
आकाशांत सूर्य असतो म्हणूनच जगभर प्रकाशाची व्यापकता दिसून येते. देहामध्ये मन या नांवाचे इंद्रिय आहे म्हणूनच विषयांचे चिंतन करता येते. शरीरामध्ये आत्मा असतो म्हणूनच मनादि सर्व इंद्रियें कार्यरत असतात. कारखान्यामध्ये मुख्य गति निर्माण करणारे इंजिन (पॉवर) चालू असते म्हणून सर्व कारखाना सातत्याने चालू राहतो. याचप्रमाणे ही माया सर्वत्र कार्यरत आहे. ह्या मायेचे स्वरूप खूपच व्यापक दिसून येते. मूळ माया ज्या सत्यसंकल्पांत उगम पावली तोच संकल्प सर्वत्र कार्यरत आहे. त्या शुद्ध संकल्पामुळेच ही माया दिसते, भासते, वाढते आणि मोडते. ही सर्व घडामोड ह्या मायेमुळेच होत असते. मानवी जीवनाचे अधःपतन ह्या मायेच्या आहारी गेल्यामुळेच होत असते. मानवी जीवनाचा उत्कर्षही ह्या मायेच्या स्फूर्तिरूप साह्यानेच होत असतो. जीवनामध्ये सुख आणि दुःख, बंधन आणि मुक्तता ह्या सर्वाला कारण ही मायाच आहे. परमार्थ मार्गामध्ये यशप्राप्ति मायेच्या साह्यानेच करून घेता येते. माया म्हणजेच हा चराचर जगतपसारा होय ! या ठिकाणी काय धरावे आणि सोडावे हे आपणच ठरवावयाचे आहे. ह्या विश्वाच्या प्रत्येक अंगामध्ये प्रगतशीलता दिसून येते. चार खाणीमध्ये मानव हाच अत्यंत प्रगतशील दिसून येतो. मानवी जीव हा अल्पज्ञ असला तरी तो प्रयत्नांनी सर्वज्ञ होऊ शकतो. असे हे सामर्थ्य फक्त मानवांमध्येच दिसून येते. सद्गुरु आणि सत्शिष्य हा प्रकार मानवी जीवनांतच आढळतो. सद्गुण, सद्वृत्ति, सदुपासना, सद्विचार हेही मानवामध्येच दिसून येतात. बौद्धिक पातळीवर एकत्र येऊन जी विचारांची देवाण-घेवाण होते त्याला परमार्थ असे म्हणतात. सद्गुरूंनी आपल्या शिष्याला ‘प्रज्ञानंब्रह्म’ असा उपदेश केला तर तोही मायेमध्येच येतो. पण त्या ब्रह्मोपदेशाने शिष्याचे जीवन धन्य होऊन जाते. अकस्मात आत्मलाभ होतो.
माया भवसिंधूचे तारूं । माया पाववी पैलपारू ।
मायेवीण उद्धारू । प्राणीयास नाहीं ॥ ३१ ॥
भूतलावर एखाद्या महानदीला पाण्याचा पूर आला म्हणजे लाकडाच्या नौकेचा उपयोग केला जातो. लाकडाच्या नौकेतन पलीकडच्या तीरावर जाता येते. महानदीच्या पलीकडे जाण्यासाठी ही परंपरागत बाह्य साधने उपलब्ध असतात. पण हा मायारूपी भवसागर तरून जाणे अत्यंत कठीण आहे. अहो ! ह्या भवसागरांत पाणी नाहीं, पाण्याचा ओलावा नाही, सुखही नाही, समाधान तर नाहीच नाही. असा हा शुष्क असणारा भवसागर तरून जाण्यासाठी चैतन्यमय असणाऱ्या जाणिवेचाच उपयोग करावा लागतो. ही मूळमाया आणि परब्रह्म यांच्यामध्ये सेतुस्वरूप असणारी ही जाणीवच तारूं आहे. आपल्याला ब्रह्मस्वरूप व्हायचे असेल तर पारदर्शी शुद्ध जाणिवेच्या माध्यमांतूनच ब्रह्मस्वरूप होता येते. ह्या भवसागरांतून पैलाड जाण्यासाठी मायेचाच उपयोग होतो. कारण ह्या मायेचा उगम स्वानंदसंकल्परूप हुंकारांतूनच झाला आहे. ही शुद्धस्वरूप जाणीवच स्वरूपापर्यंत येते. आणि आपण स्वतः कमी कमी होत जाते. ज्ञानस्वरूप असणारी शुद्ध जाणीव चिन्मात्र, ज्ञानमात्र, ज्ञप्तिमात्र ही स्वस्वरूपांत विरून जाते. साधकाचा उद्धार करणारी ही ज्ञानस्वरूप मायाच आहे. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ह्या त्रिपुटीचा लय स्वरूपांत होतो. तिथेच ही माया स्वस्वरूपांत लीन होते. हा भीतिदायक असणारा भवसागर नाहीसा होतो. साधनशील साधकाने अत्यंत सावध असावे अशी सद्गुरूंची आज्ञा.
मायेकरितां देव आणि भक्त । मायेकरितां ज्ञाते विरक्त ।
मायेकरितां जीवनमुक्त । होती स्वानुभवें ॥ ३२ ॥
मूळमायेच्या अस्तित्वामुळेच ब्रह्मादिदेव आणि देवता तत्सम ह्रीं पंचभूतें निर्माण झाली. ह्या ब्रह्मादि-देवांच्या सामर्थ्यामुळेच असंख्य भक्तगण निर्माण झाले. सामर्थ्यसंपन्न असणारे देव आणि सामान्य असणारे असंख्य भक्त यांच्यामध्ये एक भक्तिसंप्रदाय सुरू झाला. पण केवळ भक्तीच्या माध्यमांतून समाधान होईना म्हणून काही साधक विरक्त झाले. विरक्तीच्या साह्याने अभ्यास करून काही विद्वान झाले. त्याचप्रमाणे कांहीं ज्ञाते पुरुष ज्ञानसंपन्न झाले; तर कांहीं विरक्त निःसंगच राहिले. जीवनामध्ये विद्वान असणे, ज्ञानसंपन्न असणे हा मायेचाच ज्ञानविलास आहे. आत्मज्ञानामध्ये ‘मी’ आनंदरूप आहे हे भानही मायेचाच प्रांत आहे. जीवन्मुक्तीच्या पातळीवर जीवनभर स्वरूपाशी तादात्म्य असणारे तपस्वी हे देह असेपर्यंत मायेच्या आधारानेच वावरत असतात. प्रारब्धाने मिळालेला देह असेपर्यंत हा मायेचाच संग आहे बरं ! म्हणून देहसंग आणि निःसंग हाही मायेचाच प्रांत समजावा. ब्रह्माबस्था ही संगनिःसंगातीत आहे. त्या ठिकाणी अनुभव, अनुभविता असें कांहींच उरत नाहीं, राहात नाही.
पहा ! या मायेचे स्वरूप स्वाभाविकच द्वैतामध्ये येते. आपल्या स्वस्वरूपाची विस्मृति म्हणजेच ही माया समजावी. ही माया जीवाला स्वरूपापासून अज्ञातच ठेवते. जीवाचें विशाल कार्यक्षेत्र म्हणजेच ही माया होय ! पहा ! जड, चंचळ, प्रकाश अंधकार, ज्ञान-अज्ञान, माया-ब्रह्म हे जाणून घेण्यासाटींच मानवी देहाची निर्मिती झाली आहे. मनुष्याने आपल्या विवेकाचा योग्य उपयोग करून शुद्ध, बिमळ काय तेच शोधून घ्यावे.
मायेकरितां वेदश्रुति । मायेकरितां नाना वित्पत्ति ।
मायेकरितां होती । मूढ ते विवेकी ॥ ३३ ॥
प्राचीन युगामध्ये जाणत्या ऋषि-मुनींना वेद श्रुतीचें ज्ञान झाले. त्या ज्ञानाचा अनुभव घेऊन ऋषींनी अनेक ग्रंथ निर्माण केले. जाणत्या मंडळींना तत्त्वज्ञानाचा, वेदान्ताचा अभ्यास शिकविला. कांहीं शास्त्री पंडित उत्स्फूर्त अशी शास्त्रव्युत्पत्ति शिकवू लागले. काही सामान्य तत्त्ववेत्ते नित्य अभ्यासाने हळूहळू विवेकी झाले. शहाण्या मंडळींच्या सहवासांत राहणारी मूढ माणसे हळूहळू शहाणी झाली. ह्या सर्व मंडळींना मायेचाच आश्रय आहे. ही माया आहे म्हणूनच सर्व काही घडते. निर्माण झालेले सर्व काही या मायेमध्येच आलें बरं ! सामान्य माणसें अभ्यासाने मोठी होतात. आत्मानात्म विवेक करूनच मायेचा गुंता सोडवितात. आपल्या देहापासून ते चराचर विश्व हा सर्व मायेचाच प्रांत आहे. अहोरात्र आत्मचिंतनांत बसलेल्या ऋषींना ह्या विश्वरचनेचे ज्ञान झाले. विश्वरचनेच्या मुळाशी असणाऱ्या चित्शक्तीचें मूळ सांपडले. त्या निश्चल परब्रह्म स्वरूपाचा स्थिर स्वानुभव आल्यानंतर ब्रह्माचे एकमेव स्थान समजले. आतां मायेचा प्रांत कोठून कुठपर्यंत आहे हाही समजला.
माया परमार्थाचें अंजन । मायेकरितां जोडे निधान ।
मायेकरितां सावधान । साधक स्वरूपी ॥ ३४ ॥
परमार्थाची वाटचाल करण्यासाठी ज्ञानदृष्टि असावी लागते. सद्गुरूंच्या कृपेने ही ज्ञानदृष्टि उघडली की यालाच सद्गुरु-कृपांजन असेंही म्हणतात. सद्गुरुकृपेने आपली ज्ञानदृष्टि, आत्मदृष्टि स्वस्वरूपाकडे पाहू लागते. परमार्थाचा खरा मार्ग ज्ञानदृष्टीने आत्मस्वरूपाकडे जाणे असाच आहे. असे हे ज्ञानांजन सद्गुरुकडूनच मिळते. “सद्गुरु अंजन ल्याला । माया भयानक न दिसे त्याला । अभिन्नपणे आत्मयाला । सर्वत्र पाहे ॥ ” सद्गुरुकृपेनें या चराचर विश्वामध्ये एक आत्मस्वरूपच दिसू लागते. अशा अभिन्न अनुभवामुळेच आपले जीवन कृतार्थ होते. ज्ञानदृष्टीनेच आत्मस्वरूपाची आत्मधनाची प्राप्ति होते. साधक उपासनेला बसला म्हणजे अत्यंत सावध होऊन स्वरूपापर्यंत जातो. त्याचबरोबर सद्गुरूकृपांजन असेल तर त्याला स्वस्वरूपाचा स्पर्शही होतो, स्वस्वरूपाची प्राप्ति होणे हीच सद्गुरुकृपा समजावी. हेच सद्गुरु-कृपांजन जाणावें.
स्वस्वरूपाचा आनंद हा आपल्या मालकीचा आत्मठेवा आहे. स्वरूपाची विस्मृति हेच अज्ञान आणि स्वरूपाची स्मृति हेच ज्ञान होय ! विस्मृतीचा जोर असणे हा मायेचा प्रभाव समजावा. विस्मृतीला बाजूला सारून आपली स्वरूपस्थिती अखंड टिकविणे यालाच साधना म्हणतात. यालाच सद्गुरु कृपादृष्टि, सद्गुरुकृपांजन असेही म्हणतात. अशी ज्ञानदृष्टि प्राप्त होण्यासाठी प्रत्येकाने सद्गुरूला शरण जावें.
मायेकरितां स्वहित घडे । मायेकरितां भ्रांती उडे ।
मायेकरितां विघडे । प्रपंचभान ॥ ३५ ॥
परमार्थामध्ये साधनशील असणाऱ्या साधकाचे आमकल्याण ह्या मायेमुळेच होत असते. साधन करणाऱ्या साधकाची नामसाधना, ज्ञानसाधना, योगसाधना ह्या साधना मायेच्या आश्रयानेच होत असतात. माया देहाला चालविते, माया वाणीला बोलविते, माया मनाला कार्यप्रवृत्त करते. मानवी जीवनातील सर्व व्यवहार मायेचा आश्रय घेऊनच होत असतो. साधकाची ज्ञानसाधना योग्य दिशेने चालली तर साधकाला आत्मधनाची प्राप्ति होते. साधकाच्या उर्वरित जीवनाचे कल्याणच होते. विवेकाने प्रयत्न केला तर भ्रम, भ्रांति, अज्ञान हेही नाहीसे होते. प्रपंचांत असणारी आसक्ति कमी झाली म्हणजे ज्ञानदृष्टि जागृत होते. पण हा सर्वही मायेचाच प्रांत आहे. जोपर्यंत ही शुद्ध जाणीव स्वस्वरूपांत पूर्ण विरत नाही तोपर्यंत ही जाणीव मायामयच समजावी. जाणीवरूप असणारी मूळ माया हेही मोठेच बंधन समजावें. व्यवहारांत कांहीं कमीअधिक अपराध घडला म्हणजे कायद्याने त्याचे हात दोरीने बांधतात, कधी लोखंडाच्या साखळीने बांधतात, तर श्रीमंत गुन्हेगारास सोन्याच्या साखळीने बांधतात. एवंच कमी-अधिक प्रमाणांत बंधन हे स्वीकारावेच लागते. जीवाने देह धारण केल्यापासून ते जीवन्मुक्तावस्था प्राप्त होईपर्यंतचा मधला सर्व जीवनक्रम हा मायेमध्येच येतो.
माणसाच्या मनांत जगाबद्दल आणि आपल्या जीवनाबद्दल अनेक समज गैरसमज असतात. मनुष्याला प्रथमतः प्रपंच खरा वाटतो; कारण प्रपंच हा अल्पसुखाने भरलेला दिसतो. नंतर परमार्थ साधना सुरू केली म्हणजे प्रपंच मिथ्या ठरतो. साधना करीत असतांना काही काळ सुखाचा अनुभव येऊ लागला म्हणजे उपासना ही उपाधीच वाटू लागते. क्रमाक्रमाने हा मायेचा मायामय प्रांत अनुभवास येतो. ‘एक परब्रह्म’ हेच नित्य सत्य आहे. अन्य सर्वकांहीं मायामय आहे असा अनुभव येतो.
मायेवीण ज्ञान कैचें । माया जीवन सकळ जीवांचें ।
मायेवीण साधकांचे । कार्य न चलें ॥ ३६ ॥
साधकाच्या देहामध्ये चैतन्यशक्ति नसेल तर साधकाला ज्ञान कसे होईल ? देहामध्ये चित्चैतन्य हेच ज्ञानाचे अधिष्ठान आहे. सर्व जीवांचे जीवन म्हणजेच ही ईश्वराची माया समजावी. प्राणिमात्रांचा सर्व जीवन व्यवहार हा चैतन्यमय असणाऱ्या जाणिवेवर अवलंबून असतो. मनुष्य मात्र जाणिवेच्या आधाराने जगतो, जगामध्ये वावरतो आणि स्वप्रयत्नांनी तरून जाण्याचा प्रयत्न करतो. साधकाने सर्वसंग सोडून उपासना चालू केली, तर ती उपासनाही जाणिवेच्या माध्यमांतूनच करावी लागते. ह्या मायेमधूनच आपली उत्पत्ति झाली. जीवनभर ह्या मायेचाच संग जडलेला असतो आणि शेवटी नित्यमुक्तीचा मार्गही या मायेचा आश्रय घेऊनच शोधावा लागतो. ही मायामय शुद्ध जाणीवच आपल्या स्वस्वरूपापर्यंत पोचविण्याचे सतकार्य करीत असते. साधकांचे बुद्धिजीवी साधन हेही मायेमध्येच आले. ज्ञानियांचे नित्य टिकणारे आत्मानुसंधान हे देखील मायेमध्येच होतें. योगियांचा साधनशील ध्यानयोग हाही मायेमध्येच येतो.
देहामध्ये असणारी बुद्धि ही स्वतः जड आहे. पण चैतन्याचे प्रतिबिंब बुद्धिमध्ये प्रकाशित झाले म्हणजे बुद्धि चित्शक्तीचा शोध करूं लागते. देहामधील चित्शक्ति ही ज्ञानस्वरूप आहे. साधकाच्या ठिकाणी हा जिवंतपणा, चैतन्यशक्ति आणि आत्म्याचे चित्चैतन्यस्वरूप ज्ञान असते. म्हणून साधक जीवनमुक्तीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. स्वाभाविक अंतर्बाह्य जो प्रयत्न होतो तो मायेचा प्रांत समजावा. मनुष्याने जीवनभर ज्ञानगंगेमध्ये स्नानच करीत राहणे बरे नाही. जीवनामध्ये केव्हां ना केव्हातरी गंगास्नान झाल्यावर गंगेच्या पैलतीरावर जाणे हेच योग्य, साधनशील साधकाने सर्वसंगपरित्याग करून ‘ब्रह्मस्वरूप’ होण्याचा प्रयत्न करावा.
मायेवीण परमार्थ जोडे । हें ऐसे कईंच न घडे ।
मायेवीण सहसा नातुडे । गुज योगियांचें ॥ ३७ ॥
माया आहे म्हणून विवेकाने माया-ब्रह्माची सांगड अनुभवास येते. जाणिवेच्या साह्याने मायेचा प्रांत कोणता हा समजू शकतो. मायेशिवाय मनुष्याला परमार्थाचे ज्ञान होणे शक्य नाही. विश्वातील सर्व जीव हे चित्शक्तीमुळेच देहात्मयोग साधून जिवंत राहतात. उपाधीचा व्याप वाढविणे हा जिवाचा सहज स्वभाव आहे. जिवाच्या ठिकाणी असणारी वैराग्य वृत्ति कधी कधी परमार्थाचा विचार करीत असते. परमार्थाची वाटचाल करणाया योगीजनांना मायेच्या साह्यानेच गुह्यज्ञानाचा स्वानुभव येतो. साधनशील साधकाने ईश्वराभिमुख होऊन आत्मसाधना केली तर त्याचे आत्मकल्याण होईल यात शंकाच नाही. साधकाचा ज्ञानमार्ग हा मायेचाच प्रांत आहे आणि योगियांचा योगमार्ग हा गुप्त असला, तरी तो जाणिवेच्या साह्यानेच होत असतो. योग्यांच्या योगबलामुळे त्यांचे ठिकाणी विलक्षण असे तंतुबल असते. योगी आपुल्या शुद्ध जाणिवेला देहाच्या ऊर्ध्वभागी ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिर करीत असतात. परमार्थ मार्गातील योगसाधना जितकी सोपी वाटते तितकीच ती कठीण आहे. कलीयुगामध्ये अशी ही योगसाधना थोडी अप्राप्यही वाटते. पण योगायोगाने मायेची कृपा झालीच तर तो मार्ग सुलभही होऊ शकेल.
माया योगियांची माउली । जेथील तेथे नेऊन घाली ।
कृपाळुपणे नाथिली । आपण होये ॥ ३८ ॥
या मायेच्या ठिकाणी मातृभाव आहे म्हणून मायेला माउली अशा गोड शब्दांनी गौरविली आहे. ही माया-माउली अत्यंत दयाळू, कृपाळु, स्नेहाळु आहे. या मायेचे किती गुणवर्णन करावे, किती किती उपकार मानावेत ! योगीजनांच्या साधनेंतील माया-ब्रह्माचा ऐक्यभाव साधून देणारी ही उत्तम साधिकाच म्हणावी लागेल. मायेच्या कृपेमुळेच योग्यांना स्वस्वरूपप्राप्तीपर्यंत जाता येते. साधनशील असणाऱ्या योग्यांच्या ठिकाणी असणारी ही माया स्वार्थहित असते. कारण ही माया योगीजनांना आपल्या स्वस्वरूपापर्यंत जेधील तेथे नेऊन पोचविते. आणि स्वतः आपण त्याच ठिकाणी विरून जाते, नाहीशी होते. या माया-माउलीचे साधकांवर फार मोठे उपकारच आहेत. प्रयत्नशील, साधनशील, साधकाच्या हितासाठी ही माया स्वतःचे विशाल कर्तृत्व सोडते, स्वतःचे सुखद भोगतृत्व विसरते आणि स्वतःचे आनंदरूप अस्तित्व संपविते. अशी ही माया साधकांची, योगीजनांची मायमाउलीच समजावी.
मनुष्याच्या ठिकाणी जाणीवरूप विशाल तलाव आहे. त्या तलावामध्ये मनरूपी चंचल भोंवरा सतत फिरत असतो. त्या भोवऱ्याच्या ठिकाणी असंख्य वृत्तींचा उदय आणि अस्त होत असतो. असंख्य वृत्तींचा उदयास्त म्हणजेच ही मायानदी होय ! साधकाचा साधन अभ्यास करून हा जाणीवरूप तलाव शांत झाला, स्थिर झाला की माया स्वतःही शांत होते. पहा ! अद्वैत सिद्धांतानुसार ही माया झालीच नाही. पण विचारहीन अज्ञानी जीवांना मायेचा विस्तार दिसतो-भासतो. साधकांना ही माया दयाळु, कृपाळु, स्नेहाळु अशी अनुभवास येते. तर नित्यमुक्त, जीवन्मुक्त, विदेहमुक्त अशा सिद्धांना ही माया झालीच नाही असा स्वानुभव असतो.
सकळ मायेचे स्वरूप जालें । त्यांत तुझेहि स्वरूप आलें ।
हे इतुकेंहि आपुलें । नको मानूं सर्वथा ॥ ३९ ॥
अरे ! आतापर्यंत या मायेचें खूप खूप वर्णन तुला सांगितले. मायेचे अनेक आकर्षक पैलू डोळ्यांना दिसतात, जाणिवेला भासतात. “सकळ आबाळ गोबळा’ असे ह्या मायेचे स्वरूप आहे. बाळ ! ह्या मायेमध्येच तुझेंही स्वरूप आलें बरं ! अरे ! या मायेचे अनेक प्रकार तुला समजावून सांगितले आहेत. हे पहा ! आतां विचार करून सर्वस्वाचा त्याग कर. यांतील कांहीही आपुलें असें मानूं नकोस. ही माया जितक्या प्रकाराने जाणवते तितुके सर्व प्रकार तुला समजावून सांगितले आहेत. या मायेचा संग कसा सोडावा ही युक्तीही सांगितली आहे. मायेचा गुंता सोडवत बसण्यापेक्षा तिचा त्याग करणे हेही सांगितले आहे. अरे ! कोणतीही जड वस्तु सतत हातामध्ये घट्ट धरून बसणे फार कठीण आहे. ही गोष्ट आपल्या शरीराला अथवा मनादि इंद्रियांना कठीण वाटते. दुसरा प्रकार, कोणतीही जड वस्तु हातांतून सोडून स्वस्थ बसणे हे अतिसुलभ असते. पहा ! घट्ट धरून बसणे आणि सहज सोडून बसणे हा फरक जाणून घ्यावा. मानवी जीवनामध्ये भोगवृत्तीपेक्षा त्यागवृत्तीच सुखद आहे.
विश्वामध्ये दृश्य आणि अदृश्य रूपाने या मायेचाच विस्तार जाणवतो. त्यामध्ये ईथराची अमूर्त ज्ञानमय शक्ति वावरत असते. जीवाच्या ठिकाणी त्या शक्तीचा प्रभाव जाणवतो. जाणीवरूप शबलमाया जीवाला सामर्थ्य पुरवते, म्हणून जीवाची जीवावस्था अधिक बळकट होते. वासनेच्या संगतीमुळेच जीवाचा अधोमुख प्रवास चालू असतो. विवेकाने निःसंग होतांच जीवाचा ऊर्ध्वमुख प्रवास सुरू होतो. मानवी जीवनामध्ये, “अधोमुखें भेद वाढतो । ऊर्ध्वमुखें भेद तुटतो । निःसंगपणे निर्गुणी तो । महायोगी” अरे ! सर्वसंगपरित्याग हेच मानवी जीवनाचें सार आहे. हे सर्व नीट समजून घे आणि तसा प्रयत्न कर.
आतां सांगतों तुज खूण । तुवां नाशिवंत केलें मदार्पण ।
आतां करिसी आळकेपण । तरी मज शब्द नाहीं ॥ ४० ॥
अरे ! आतां एक वर्म सांगतो ते नीट ऐक. पूर्वी नाशिवंताचा उपदेश करीत असतांना हे सर्व नाशिवंत मिथ्या आहे असे तुला पटले होते. त्यावेळी तूं जर नाशिवंत मला देशील तर मी तुला तुझे स्वरूप प्राप्त करून देईन असे म्हणालो होतो. अशा त्या महत्त्वाच्या गंभीर प्रसंगी तुझ्याजवळ असणारे सर्व नाशिवंत मला दिले आहेस. आतां पुन्हां जर त्या नाशिवंतामध्ये तुझा मोह असेल, आशाळपणा असेल तर तूं फसशील बरं ! आतां तुझे हित झाले नाही तर हा दोष माझा नाही, हा दोष तुझाच आहे. आता माझ्यावर उगीच शब्ददोष ठेवू नकोस. तुझ्या स्वभावांतील दोष म्हणून तुझा ठक स्वभाव मला माहीत आहे. तुझ्या आत्मकल्याणाकरितां तुला सावधगिरीचा हा अंतिम ईशारा देत आहे.
ह्या दृष्यमायेची वासनात्मक मुळे अतिखोल मूळमायेंत पोहोचलेली असतात. या देहांत असणारा जीवेश्वर, हृदयेश्वर त्यामध्ये गुंतलेला असतो. या हृदयेश्वराला स्वतःच्या ठिकाणी असणारे अज्ञानाचे कवाड खोलून बंधमुक्त होतां येत नाही. हा सर्वही दोष जिवांश सांभाळणाऱ्या शिष्याचा आहे. सद्गुरु हे निर्भय, निवांत, ब्रह्मस्वरूप असतात, त्यांना गुणदोष लागत नाहीत.
संग तितुका नाशिवंत । निःसंग शब्द अशाश्वत ।
म्हणोनी संगनिःसंगातीत । होउनी राहे ॥ ४१ ॥
कोणताही संग म्हटला की त्या ठिकाणी संबंध, संसर्ग आणि आसक्ति अशा तीन गोष्टी असतात. ह्या तीनही गोष्टी नाशिवंतामध्येच येतात. मन आहे म्हणून मायेचा संबंध जडतो. चित्त आहे म्हणून विषयांचा संसर्ग घडतो. जीवेश्वर आहे म्हणून विषयांची आसक्ति वाढते. कोणताही संग हा मायेच्या प्रांगणांतच जडतो, घडतो आणि वाढतो. म्हणून जितुका जितुका संग तितुका तो नाशिवंतच समजावा. पहा ! संग सोडल्यानंतर निःसंग हा अनुभव कुणाला समजला, कुणी जाणला. निःसंग हा अनुभव शुद्ध जाणिवेलाच येतो. शबल जाणीव विषयांतून सुटली निःसंग झाली. शुद्ध जाणीव निःसंग राहिली असें हे कुणाला समजले. पहा ! अतिशुद्ध असणाऱ्या निःसंग अशा ह्या दोन्ही अवस्था मायेमध्येच आल्या. आसक्ति आणि अनासक्ति, भोगप्रवृत्ति आणि वैराग्यवृति, मायावी शब्दब्रह्म आणि चित्चैतन्य ज्ञानब्रह्म हा कमी अधिक प्रमाणांत मायेचाच प्रांत आहे.
संग किंवा निःसंग या दोन्ही अवस्थांना भाव आणि सद्भाव जडलेला असतो. त्या दोन्ही अवस्थांना थोडीफार पार्श्वभूमि असते. असणे आणि नसणे हा सूक्ष्म भावही विरून गेला की स्वस्वरूपानुभव येतो. अरे बाळ ! संगनिःसंगातीत, केवळ आहेपणाच्या अस्तित्वानेच जे परब्रह्म आहे तेच तुझें स्वस्वरूप होय ! अरे ! अशा विमळ परब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन रहा.
आतां पुढील निरूपण । आदरें करावें श्रवण ।
संगातीत होईजेल ते खूण । सांगिजेल पुढें ॥ ४२ ॥
अरे ! आतापर्यंत तत्त्वज्ञानाची प्रक्रिया सांगून झाली. त्याचप्रमाणे वेदान्ताची उभारणी, संव्हारणीही सांगितली आहेच. आतां यापुढे संग सोडून संगातीत कसे व्हावयाचे याचे मार्गदर्शन करणार आहे. सद्गुरुपदी आदर ठेवून श्रवण करशील तर तुझें आत्महित होईल. साधनशील साधकाला बुद्धीच्या साह्याने शब्दज्ञान, अर्थज्ञान, तत्त्वज्ञान, आत्मज्ञानही झालेले असते; पण मिळवलेल्या ज्ञानाचा संग कसा सोडावा ही युक्ति समजलेली नसते. ती युक्ति समजून घेण्यासाठी सद्गुरुपदी अनन्य असावे लागते. आतां पुढचे निरूपण संगातीत कसे व्हावयाचे याचे मार्गदर्शन होईल. आत्माराम हा ग्रंथ गुरुशिष्यांचा आध्यात्मिक संवाद आहे. सद्गुरूंनी शिष्याच्या अनेक शंकांचे निरसन करून त्याला स्वानुभवापर्यंत आणला आहे. आतां ज्ञान-अज्ञान हे सर्व सोडून संगातीत होण्याचा मार्ग सांगतील. साधकाने प्रामाणिक श्रवणशील होऊन आपले जीवन धन्य करावें.
इति श्रीआत्माराम । रामदासी विश्रामधाम ।
योगी पावती विश्राम । जये ठाई ॥ ४३ ॥
परमार्थ मार्गातील वाटचाल करणाऱ्या मुमुक्षूचे, रामदासी साधकांचे हे विश्रांतिस्थान आहे. योगीजन जीवनभर योगसाधना करून शेवटी आत्मारामाच्या ठिकाणी विश्रांति पावतात. आपल्या सर्वांचे उगमस्थान म्हणजेच हा आत्माराम होय ! शेवटी सर्वांना ह्या आत्मारामाच्या ठिकाणींच विश्रांति मिळत असते. म्हणून समर्थानी आत्मारामाची उपासना सांगितली आहे. ‘आत्माराम उपासना । तेणे पावले निरंजना । निःसंदेहे अनुमाना । ठावची नाही’ साधकांनी ह्या आत्माराम ग्रंथाचा चिंतनशील, मननशील अभ्यास करावा. अभ्यास करूनच आपले उर्वरित जीवन यशस्वी करावें. असा हा आत्माराम ग्रंथाचा दुसरा समास पूर्ण झाला.
समास तिसरा
ब्रह्म निरूपण
संग तितुका नाशिवंत । सांडून राहावें निवांत ।
येकपणाचाहि अंत । जालियां समाधान ॥ १ ॥
जीवाचे ठिकाणी मनादि इंद्रिये आहेत म्हणून मी आणि माझें हा द्वैतभाव दिसून येतो. प्रथम ‘मी’ पणाची जाणीव असल्यामुळेच माझेपणाही अधिक वाढत असतो. माझेपणाचा विस्तार खूप वाढला, की इंद्रियांची बहिर्मुखता सहजच वाढते. बाह्य विषय हे नाशिवंत आहेत. या बाह्य विषयांचा संगही नाशिवंतच असतो. बाह्य विषयांचा संग इंद्रियनिग्रह करून सोडता येतो. पण अंतरंगांत असणारा मीपणाचा अति सूक्ष्म संग सोडणे अति कठीण आहे. अंतर्बाह्य जो जो संग आहे. तो सर्व नाशिवंतच समजावा. मानवी जीवनामध्ये हे सर्वसंग सोडण्याचा प्रयत्न करावा. संग म्हणजे काय आणि निःसंग कशाला म्हणतात याचा उलगडा मागच्या समासांत झाला आहे. मी निःसंग आहे हे भानही आपुल्या स्वस्वरूपांत विरून गेले पाहिजे. एकपणा, आनंदाचें भान – स्मृति जिथें संपेल तिथे आपले स्वस्वरूप आहे. अशा स्वस्वरूपांत एकरूप होऊन जाणे हेच खरें समाधान होय ! शुद्ध जाणिवेचा लय स्वस्वरूपांत झाला, की जीवनाचा संग सुटतो. निःसंग हा अनुभवही नाहीसा होतो.
साधकाने ज्या जाणिवेचा आधार घेऊन जीवनभर साधना केली त्या जाणिवेचा अंत स्वरूपांत झाला पाहिजे. “शिष्या एकांती बैसावें । स्वरूपी विश्रांतीस जावे’ ‘मी’ चा अंत झाला म्हणजे साधकाला विश्रांति मिळते, साधक निवांत होतो, कृतार्थही होतो.
एकपणाचा उमस । काढितां, त्रिपुटी सावकास ।
होत आहे, म्हणोनी ध्यास । एकपणाचा नसो ॥ २ ॥
‘अहं, स्फुरण म्हणजे शुद्ध जाणिवेचा उमस, उगम होय ! त्या स्फूर्तीच्या ठिकाणी ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान अशी त्रिपुटी उत्पन्न होते. तीन गोष्टींचा समुच्चय म्हणजे तीन गुणांचे अस्तित्व समजावें. त्रिपुटीमध्ये कळत नकळत सूक्ष्म अज्ञान असतेच. अत्यंत सूक्ष्म असणारे अज्ञान तरतमभावाने ज्ञानमय असले तरी ते बंधनाला कारणीभूत ठरते. हे सूक्ष्म अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला तर अज्ञान अधिकच येऊन जडते. उपाय करूं गेल्यास त्या ठिकाणी अपायच ठरतो. काही प्रसंगी चुकीच्या औषधाने रोग बळावतो, तोच प्रकार येथे जाणवतो. मीपणा काढण्याचा प्रयत्न केला तर तो अधिकच वाढत असतो. ‘अहं’ या संकल्पाला बहुस्याम होण्याची गति आवडत असते. शेवटी ‘अहं’ स्फूर्तीचा आवेग (उमसा) थांबला पाहिजे. ‘मी निःसंग आहे’, या सूक्ष्म जाणिवेमध्ये अहंचे स्फुरण असते. अशा अहंच्या स्फुरणामध्येच तूं चेही सुप्त भान असते. मला आसक्ति नाहीं हे भानही अज्ञानच दर्शविते. आनंदाच्या अनुभवाबरोबर हा आनंद अखंड असावा अशी आनंदस्मृति असते. तसाच आनंदाबरोबर सूक्ष्म असा ध्यासही असतो. तो ध्यास, ते चिंतन सुटले पाहिजे. साधक हा अखंड आनंदस्वरूप असणाऱ्या त्रिपुटीमध्येच थांबला तर तो स्वरूपाहून दूरच राहतो. म्हणून एकपणाच्या ठिकाणी ध्यासही नसावा.
तो मी आत्मा ऐसा हेतु । हे नाशिवंत टाकी तूं ।
उन्मनी अवस्थेचा प्रांतु । तें स्वरूप तुझें ॥ ३ ॥
अरे ! साधन अभ्यास करून तुला जो अनुभव आला तो सिद्धस्वरूपाचा नाही. स्वानंदघन आत्मा तो ‘मी’ च आहे असा तुझा अनुभव, जाणीवरूप हेतु हा नाशिवंतामध्येच येतो. वृत्तिरूप अनुभव किंवा जाणीवरूप हेतु हा अति सूक्ष्म मायेचाच प्रांत आहे. वरील जें नाशिवंत आहे ते जाणून सोडावें. साधकाला चार प्रकारचे अनुभव येत असतात. जागृतीमध्ये मनाला बाह्य विषयाचा अनुभव येत असतो. स्वप्नामध्ये स्वप्नजागृतीत, मनोकल्पित, क्षणभंगुर विषयांचा अनुभव येतो. सुषुप्तीमध्ये गाढ अशा अज्ञान सुखाचा नकळत अनुभव असतो. चौथ्या तुर्यारूप अवस्थेमध्ये मी आनंदस्वरूप आत्माच आहे असा अनुभव येतो. या अनुभवाच्या ठिकाणी त्रिपुटी जाणवत असते. जिथे त्रिपुटी आहे तिथें अति सूक्ष्म जाणीव असतेच. जिथे जाणीव आहे तिथें पूर्णत्वाचे भान असते. त्या शुद्ध जाणिवेंत ज्ञान, भान आणि नकळत अज्ञानही असतेच. अरे ! जिथें मनाचे उन्मन होतें तोच स्वरूपाचा, पूर्णत्वाचा प्रांत समज. तेंच तुझें स्वस्वरूप होय ! जीवाचें जीवत्व जाऊन त्याला स्वरूपामध्ये ब्रह्मत्व प्राप्त होते. इथेच मी-तू हा भाव स्वस्वरूपांत विरून जातो.
मी देह आहे ही जाणीव आणि मी आत्माच आहे ही जाणीव ह्या दोन्ही वृत्तिमयच आहेत. देहबुद्धीच्या स्मृतीमथें मन देहाला व्यापून असते. आत्मबुद्धीमध्ये मन विश्वाला व्यापून असते. शेवटी ‘मनाचा थारा तुटला । म्हणिजे भवसिंधु आटला’ अशी ही अवस्था प्राप्त झाली पाहिजे. संग आणि निःसंग, अज्ञान आणि ज्ञान या अवस्थांचा संग सोडावा. कारण उन्मनी अवस्था हे तुझें खरें स्वरूप आहे.
ऐसा जो अनुभव जाला । तोहि नाशिवंतामध्ये आला ।
अनुभवावेगळा राहिला । तो तूं आत्मा ॥ ४ ॥
साधक आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी ज्ञानमार्गाची उपासना करीत असतो. ज्ञानमार्गाच्या उपासनेमधून वाटचाल करणाऱ्या साधकाला ‘रोकडा आत्मसाक्षात्कार’ होत असतो. साधकाला साक्षात्कार झाला म्हणजे साधक आत्मानंदांत रममाण होतो. अशा साधकाला निरतिशय शांतीचा अनुभव येऊ लागतो. साधकाच्या साधकीय जीवनांतील ही परमोच्च अवस्था म्हणावी लागेल. साधकाची ही उपासना आनंदासाठी, शांति-समाधानासाठी असते. एकदां तें परमसुख मिळाले की, साधकाचा साधनीय प्रवास संपतो. जिथे साधन प्रवास संपतो तिथेच शांति, समाधान, आनंदानुभव असतो. असा हा निरतिशय आनंद नाशिवंतामध्येच आला. जोपर्यंत या अति शुद्ध आनंदरूप जाणिवेचे आत्मबलिदान स्वस्वरूपांत होत नाही, तोपर्यंत नाशिवंताचा संग असतोच. साधकाच्या ठिकाणी ज्ञानाचा संग असणे ही परमोच्च स्थिति समजावी. उत्तम साधकाच्या ठिकाणी निःसंगपणाचा भावही नसणे याला बंधमुक्त मोक्ष असे म्हणावें.
साधकीय जीवनामध्ये अनुभवाची खोली अतिशय सूक्ष्म असते. अनुभवामध्ये अनुभव घेणारा सूक्ष्म मी उरतच नाही. परमात्मस्वरूपावर ही उत्कृष्ट अनुभवाची मर्यादा लादणे योग्य नाही. आपले स्वस्वरूप हे अनुभवातीत आहे हेच खरे.
हेहि न घडे बोलणे । आतां पाऱ्हेरा किती देणे ।
वेद शास्त्रे पुराणें । तेंहि नासोनि जाती ॥ ५ ॥
अरे बाळ ! अनुभवातीत असणाऱ्या आत्मारामाबद्दल शब्दांनी किती सांगावें ! आतापर्यंत शब्दांनी खूप वर्णन करून सांगितले आहे. आतां तो शब्दपाल्हाळ पुरे झाला. अरे ! चार वेद, चार उपवेद, षड्शास्त्रे आणि अठरा पुराणे ही त्या आत्मारामाच्या वर्णनाकरितांच अस्तित्वात आली. पण वेदांना त्या आत्मस्वरूपाचे यथार्थ वर्णन करता आले नाही. सहस्र मुखांचा शेष तोही मंदावला, शांत झाला. सत्ययुगांतील जाणत्या ऋषींजवळ अपार अशी शब्दसंपत्ति होती. पण त्या जाणत्या ऋषींना शब्दांच्या माध्यमांतून आत्मस्वरूपाचे वर्णन करतां आलें नाहीं. पहा ! शब्दरत्नांनी या आत्मस्वरूपाचे वर्णन करता येत नाही हे अगदी सत्य आहे. पण शब्दांनी त्या आत्मस्वरूपाच्या भोवतालच्या अवस्था वर्णन केल्याशिवाय ते आत्मस्वरूप आकलनही होत नाही. शब्दरत्ने, शब्दब्रह्म हे एक मोठेच माध्यम आहे.
पृथ्वितलावर रोज सकाळी सूर्य पूर्वेला उगवतो. आपणास उगवत्या सूर्याचे दर्शन हवे असेल तर प्रथम पूर्व दिशा कोणती याचे ज्ञान करून घेतले पाहिजे. पूर्व दिशेचे ज्ञान झाले की, पूर्व दिशेकडे सन्मुख असणाऱ्या उगवत्या सूर्याचे दर्शन होते. हाच न्याय परमार्थामथेही वापरता येतो. पहा ! शब्दज्ञान, तत्त्वज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान हे गुरुकडून समजून घेणे आवश्यक आहे. सद्गुरूंच्या सान्निध्यांत शब्दांनी शब्दब्रह्माचा अर्थ कळतो. शब्दार्थाने सुखाचा अनुभव येतो. निरतिशय सुखाचा अनुभव घेतां घेतां आत्मस्वरूपाची प्रचीति येते.
ग्रंथमात्र जितुका बोलिला । आत्मा त्यावेगळा राहिला ।
ये मायेचा स्पर्श जाला । नाहींच तयासी ॥ ६ ॥
अध्यात्म ग्रंथामध्ये वेदान्ताच्या अनेक प्रक्रिया मांडलेल्या आहेत. त्या वेगवेगळ्या प्रक्रियांतून आत्मारामाचे स्वरूप कसे आहे हे सांगितलेलें दिसते. सद्ग्रंथामध्ये आत्मारामाचे यथार्थ स्वरूप वर्णन केलेले आहेच. पण आत्मारामाचा स्वानुभव (स्वरूप) त्याहून भिन्न असतो. येथे, ‘पुस्तकज्ञाने निश्चय धरणे । तरी गुरू कासया करणे’ अहो ! वेदान्त, सिद्धान्त आणि धादान्त ह्या तीन प्रचीति घेऊनच आपला परमार्थ यशस्वी करता येतो. पुस्तकांतील वेदान्ताचा अनुभव याला शास्त्रप्रचीति असे म्हणतात. सद्गुरूंच्या मुखांतून सहज आलेले शब्दब्रह्म यास गुरुप्रचीति असे म्हणतात. ज्यांनी बारा बारा वर्षे तपःसाधना करून स्वतः स्वरूपानुभव घेतला आहे त्याला आत्मप्रचीति असे म्हणतात. अध्यात्मग्रंथ तसेच सद्गुरु हे त्या आत्मस्वरूपाचे खूप वर्णन करून सांगतात. सद्गुरु हे स्वतः दिशा निर्देश करून लक्षवेधही करवितात. झाडाच्या फांदीचा लक्षवेध करून द्वितीयेची चंद्रकोर दाखवीत असतात. पण हे आत्मस्वरूप या सर्वांच्या पलीकडे आहे हेच खरे. सांगण्याच्या, ऐकण्याच्या, पाहण्याच्या, अनुभवाच्या पलीकडे आत्मस्वरूप आहे. त्या ठिकाणी या मायेचा यत्किंचितही स्पर्श होत नाही. परमार्थाची वाटचाल करीत असतांना ग्रंथांच्या साह्याने समजलेला वेदान्त यामथें सद्ग्रंथ हेच गुरुजन असतात. सद्ग्रंथ हे आपुल्या परमार्थ मार्गातील सांगाती आहेत. आपुलें आत्मस्वरूप या सर्वांहून वेगळंच आहे.
स्वरूप निर्मळ आणि निघोट । स्वरूप सेवटाचा सेवट ।
जिकडे पहावे तिकडे नीट । सन्मुखचि आहे ॥ ७ ॥
आपुले आत्मस्वरूप निर्मळ, निश्चळ, परिपूर्ण भरलेले आहे. हे स्वस्वरूप म्हणजे आत्मस्वरूप म्हणजेच परमात्मस्वरूप होय ! या स्वरूपाच्या ठिकाणी मलयुक्त मायेचा संबंधही नाही. स्वरूप हे घनदाट-ओतप्रोत व्यापून असल्यामुळे त्या स्वरूपाचा हा अंतिम टप्पा आहे. स्वस्वरूप हे उभारणी / संव्हारणीच्या दृष्टीने किंवा अन्वयव्यतिरेकाच्या दृष्टीने विचार केला तर हा शेवटाचा शेवटच दिसून येतो. साधकाला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला म्हणजे जिकडे पाहावे तिकडे आपले आत्मस्वरूपच अनुभवास येते. अहं स्फुरणरूप मायेचा पूर्ण निरास झाला म्हणजे एका ब्रह्मस्वरूपाहून अन्य काहीही दिसत नाहीं, उरतही नाही. या परिपूर्ण अवस्थेलाच ब्रह्मावस्था असे म्हणतात. साधना करून सिद्ध झालेल्या सिद्धांच्या ब्रह्ममय दृष्टीला सर्वत्र ब्रह्मच दिसत असते. ‘जिकडे तिकडे जेथे जेथें । विन्मुख होता सन्मुखची तें । सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या’ अशी ही देहातीत झालेली अवस्था असते. ज्ञानदृष्टीला जिकडे पाहावे तिकडे सन्मुख ब्रह्मस्वरूपच दिसत असते. पुढे, मागे, डावीकडे उजवीकडे, वरती, खाली, दशदिशा तें ब्रह्मच व्यापून आहे असा अनुभव असतो. तें ब्रह्मस्वरूप आपल्या समोर स्थिर उभेच आहे असा निश्चल अनुभव असतो.
आत्मस्वरूपाचे वर्णन करीत असतांना भीड हा विषयच नाही. येथे माया आणि ब्रह्म सांगत असतांना एक घाव दोन तुकडे अशीच धारणा असावी. सोन्याचा कस लावूनच शुद्ध सोने पाहावे. त्याचप्रमाणे वेदान्ताचा कीस काढून ब्रह्मावस्था अनुभवावी. ‘एक परब्रह्म संचलें’ अशी धारणा धरूनच परमार्थ करावा.
जें बहु दुरीचा दुरी । जें निकटचि जवळी अंतरीं ।
दुरी आणि अभ्यांतरीं । संदेहचि नाहीं ॥ ८ ॥
या विश्वामध्ये दोनच पक्ष अनुभवास येतात. पहिला, सहज उत्पन्न झालेला दृश्य मायेचा हा पूर्व पक्ष होय ! दुसरा, चराचराला व्यापून असणारा ब्रह्मस्वरूपाचा हा सिद्धान्तपक्ष होय ! या मायेचा प्रांत सामान्य जागृतीने कार्यप्रवृत्त असतो, म्हणून त्या ठिकाणी अज्ञान असते. अज्ञानी मनुष्याला त्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव कधीही येत नाही. सामान्य मनुष्याने अनेक जन्म ओलांडले तरी तें आत्मस्वरूप दूरच राहते. अज्ञानी जीवाला अखेरपर्यंत ब्रह्मप्राप्ति होत नाही हेच खरे. शेवटी पूर्वपक्षांतर्गत वावरणाऱ्या अज्ञानी जीवाला अतिजवळ (सन्निध) असणारे ब्रह्म अज्ञानामुळे दूरच राहते. काही साधक-सिद्धपुरुष सिद्धान्त-पक्षाचा अभ्यास करून आपल्या आत्मस्वरूपांत रममाण असतात. अशा सिद्धपुरुषांना आपुलें आत्मस्वरूप अतिजवळ, अतिनिकट असते. आपल्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला की, तो स्वानुभवाचा स्वसंग कधींच सुटत नाही. जीवनामध्ये सर्वसंगपरित्याग झाल्यानंतर आत्मस्वरूपाचा संग जडला म्हणजे दूर आणि जवळ हा द्वैतभाव विरून जातो. जिथे वेगळेपणा असतो तिथें दूर आणि जवळ हा भेदभाव जाणवतो. पण सद्गुरु कृपेनें जीवभाव आत्मस्वरूपांत विरून गेला की, भेदच उरत नाही. ‘नदी मिळाली सागरी । ते निवडावे कोणेपरी’ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भेदही उरत नाही, संदेहही उरत नाही.
आपण आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यावर आपले अस्तित्व स्वस्वरूपांत विरून जाते, मुरून जाते. स्वानुभवाने अंतर्बाह्य भेद संपला की दुरी-जवळीचे अंतरही संपते. मग, आपण ठाईंचा एकला अशी आत्मप्रचीति असते.
जें संकळांपरीस मोठे । जेथें हें सकळहि आटे ।
अकस्मात येकसरे तुटे । मूळ मायेचें ॥ ९ ॥
एकोऽहं, अहं संकल्पांतच मायेची उत्पत्ति झाली. अशी ही माया अनंत कालापासून चालत आली आहे. यापुढेही अनंत काळ टिकणार आहे असे दिसते. मायेच्या पसाऱ्यामध्ये सर्वांत मोठे आणि व्यापक आकाशच आहे. आकाशाच्या उदरांत परिवर्तनशील असणारी माया भूतमात्रांचा समावेश करून घेते. आकाशाच्या पोकळीमध्ये उत्पन्न झालेली प्रत्येक बस्तु आकाशाच्या उदरांतच नष्ट होते. पहा ! आपले आत्मस्वरूप म्हणजेच ब्रह्मवस्तु होय ! ब्रह्माहून दुसरे काहीही मोठे नाहीं, व्यापक नाही. तीच ही ब्रह्मवस्तु होय ! ब्रह्मवस्तूच्या अस्तित्वामध्ये अशी असंख्य ब्रह्मांडे निर्माण झाली, असंख्य ब्रह्मांडे नष्टही होतील. जें जें उत्पन्न झाले आहे ते कल्पांताच्या वेळी नष्टही होणार आहेच. ह्या ब्रह्मवस्तूपासूनच ही चराचर माया उत्पन्न झाली. शेवटी हे चराचर विश्च या ब्रह्मवस्तूमध्येच विलीन होईल. ‘जेथून सर्वही प्रगटे । सकळही जेथें आटे’ जेथून वस्तूची उत्पत्ति होते त्यामध्येच ती वस्तु नष्टही होते. जगांतील हा एक महत्त्वाचा सिद्धान्त आहे.
साधनशील असणाऱ्या ब्रह्मनिष्ठांना हा मायेचा पसारा वरवर दिसतो इतकेंच. त्या मायेचा संबंध साधनशील जीवनाशी नसतो. ज्यांचे अखंड स्वरूपानुसंधान असते त्यांना ही माया असून नसल्यासारखीच. ‘गोशृंगावरी मोहरी । मन निश्चल होई तववरी’ गाईच्या शिंगावर मोहरीचा कण जितका वेळ स्थिर होतो तितक्याच वेळांत ही माया स्वस्वरूपांत अंतर्धान पावते. त्या मायेचें मूळ स्वरूपच नष्ट होते. ब्रह्मनिष्ठ पुरुषांचा असा हा ज्वलंत अनुभव असतो.
जें सकळांहून मृद कोवळे । जें सकळांहून अत्यंत जवळें ।
जें सकळांमध्ये, परी निराळे । अलिप्तपणे ॥ १० ॥
आत्मस्वरूप सर्वांहून अतिशय सूक्ष्म आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अतिसूक्ष्म असणारे चिद् हे अत्यंत मृदु, कोवळे, लुसलुसीतच असते. त्या ठिकाणी असणारा निरतिशयानंद हवाहवासा वाटत असतो. साधक आपल्या स्वरूपांत रसमाण झाला की, तो जगाबरोबर स्वतःलाही विसरून जातो. स्वरूपाच्या ठिकाणी असणारा स्वयंप्रकाश स्वतःसह चराचराला प्रकाशीत असतो. साधकाला आपुलें आत्मस्वरूप हेच अत्यंत जवळचे आहे असा अनुभव असतो. आत्मस्वरूप चराचराला व्यापून आहेच पण ते अत्यंत मृदु जाणवते. जड असणाऱ्या पृथ्वीमध्ये आप तत्त्व हे मृदु आहे पण त्या आप तत्त्वाहूनही आत्मतत्त्व मृदु, नाजुक आहे. आकाश हे चौभूतांना परिपूर्ण व्यापून आहे पण आत्मस्वरूप या सर्वांना व्यापून आहे अशी आत्मप्रचीति येते. आत्मस्वरूप म्हणजेच या विश्वाचें मूळ अधिष्ठान समजावे. या विश्वाला धारण करून त्याचे पोषणही करणारी ही अतींद्रिय सत्ता म्हणजेच आत्मस्वरूप होय !
आत्मस्वरूप जिकडे तिकडे आहे, सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे आणि सर्वांतर्यामी आहे. अहो ! हे स्वरूप सर्वव्यापी असून सर्वांहून निराळे आहे. ते कशामध्येही लिप्त होत नाही. पाण्याच्या सरोवरामध्ये कमलकंद असतात. पाण्यामध्ये कमळाच्या वेलींचे वेष्टण पसरलेले असते. पण पाण्यावरच तरंगत असणारी कमळाची पाने पाण्यावर अलिप्त असतात. कमळपत्र पाण्यापासून अलिप्त राहू शकते. त्याचप्रमाणे आत्मस्वरूप मायेच्या पसायापासून अलिप्त आहे. ‘माया चळे, ब्रह्म चळेना’ आत्मस्वरूप निर्मळ, निश्चल, निर्विकार, सदोदित ओतप्रोत आहेच आहे.
जें हाले ना चाले । जें बोले ना डोले ।
आवगें आपणचि संचलें । येकलें येकटचि तें ॥ ११ ॥
आत्मस्वरूप निःसंग निर्विकार असल्यामुळे तें स्थिर, निश्चल आहे. स्वरूप कधीही हालत नाही, ते कधीही चालत नाही. स्वरूप कधीही बोलत नाही, तसे तें डोलतही नाही. स्वरूप हे निष्कंप असल्यामुळे ते कधीही विकार पावत नाही. निर्विकार असणारे स्वरूप स्वतःसिद्ध एकटें एकच परिपूर्ण संचलेले आहे. त्या ठिकाणी कोणताही भाव नाहीं, अभावही नाही आणि विकारही नाही. आत्मस्वरूप सर्वदेशी, सर्वव्यापी, सर्वत्र ओतप्रोत भरून आहे. आत्मस्वरूप कुठे आहे आणि ते कुठे नाही याचा तर्क करणे अति कठीणच. तें स्वरूप तकनिं अनुमानले जात नाही. ‘धरूं जाता धरितां नये । टाकू जाता टाकिता न ये । जेथे तेथे आहेच आहे | परब्रह्म तें’ सर्वदेशी असणाऱ्या आत्मवस्तूमध्ये कधीही क्रिया प्रतिक्रिया असत नाही. आत्मस्वरूप म्हणजे निरुपाधिक अतिशय सूक्ष्म असें निःशब्द मौनच होय !
पहा ! एकदेशीय वस्तूमध्ये सतत बदल होत असतो. त्या ठिकाणी परिवर्तन झाल्याचा अनुभव येतो. बदलणाऱ्या वस्तूचे वर्णन करता येते. वर्णन म्हटले की नाम, रूप हे सर्वच आपल्या समोर उभे राहते. मी आणि तूं नसेल तर भाषेचा प्रश्नच संभवत नाही. जिथे शब्दच निःशब्द होतो तेंच आपले आत्मस्वरूप होय !
जें आकाशासबाह्य भरलें । आणि आकाश जेथें मुरालें ।
आकाश मुरोनिया उरलें । येकजिनसी आपण ॥ १२ ॥
मूळमाया, गुणमाया आणि आकाशादि पंचभूतें ही क्रमशः निर्माण झाली. या पंचभूतांमध्ये आकाश हे प्रथम निर्माण झाल्यामुळे तें चारी भूतांना व्यापून आहे. आकाश हे चराचर विश्वाला व्यापून असल्यामुळे त्याची व्यापकता पूर्ण असल्याचे जाणवते. आकाशाचे मूळ अधिष्ठान गुणमाया, मूळमाया हेच आहे. मूळ संकल्प असणाऱ्या मूळमायेला मूळ आधार या ब्रह्मस्वरूपाचा आहे. ते आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप सर्वांमध्ये बृहद, व्यापक परिपूर्ण आहे हे निश्चित. आत्मस्वरूपाने आकाशादि चराचराला अंतर्बाह्य व्यापले आहे. आकाशाला खं ब्रह्म असेंही म्हणतात. पण त्या खं ब्रह्मालाही या आत्मस्वरूपाने व्यापलें आहे. आत्मस्वरूपाने त्या आकाशतत्त्वाची चाळण केली आहे. त्यामुळे हे आकाशतत्त्व अंतिम आत्मस्वरूपामध्ये विरून जाते, मुरून जाते. उभारणी-संव्हारणीच्या नियमानुसार विश्वाच्या प्रलयकाळी हे आत्मस्वरूप या विश्वाला आपल्यांतच सामावून घेते, शोषून घेते. या ब्रह्मस्वरूपाचा अनंतपणा अनंतच आहे, यांत शंकाच नाही. या अनंतामध्येच चराचराचा लय होतो. शेवटी श्रुतीचा सिद्धान्त असाच आहे. ‘येक परब्रह्म संचलें’ अन्य काहीही झालेच नाही.
ब्रह्मस्वरूप अतींद्रिय असल्यामुळे तें सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आहे. आत्मस्वरूप आकाशाहून देखील मोठे, व्यापक, बृहद् असल्यामुळे आकाश आत्मस्वरूपांत विरून जाते. पाण्यामध्ये मातीचे ढेकूळ विरून जाते त्याचप्रमाणे हे चराचर विश्व आत्मस्वरूपांत विरून जातें, विलीन होते.
जे चळे ना ढळे । अग्निमध्ये न जळे ।
जें चळत्यामध्ये, परी न कळे । उदकी बुडेना ॥ १३ ॥
आत्मस्वरूप चरावर विश्वाला परिपूर्ण व्यापून आहे. आकाशाच्या पोकळीमध्ये वायूचा संचार होत असतो. परिणामी वायु हा कधी कधी स्थानभ्रष्टही होतो. पण आत्मस्वरूप कधीच चळत, ढळत नाही. अग्नीमध्ये सर्व प्राणिजात, वस्तुजात जळून नाश पावतात. पण निर्विकार, निःसंग असणारें आत्मस्वरूप अग्नीमध्ये कधीही जळत नाही. या विश्वामध्ये प्रत्येक वस्तु ही परिवर्तनशील असते. आत्मस्वरूप त्या चलित वस्तूमध्ये असूनही ते चळल्याचे दिसत नाही. उदकामध्ये असूनही त्या उदकांत कधीं बुडत नाही. पंचभूतें, क्रमाक्रमाने प्रत्येक भूत एक एक भूतामध्ये मिश्रित आहेत. प्रत्येक महाभूत एक अष्टमांश रूपाने प्रत्येक भुतामध्ये जाणवते. ‘येक येक भूतांपोटीं । पंचभूतांची राहाटी । सर्व कळे सूक्ष्मदृष्टी । घालून पहातां’ पंचभूते ही परिवर्तनशील आहेत. आत्मस्वरूप निश्चल असल्यामुळे ते कशामध्येही लिप्त होत नाही. ते सर्वांमध्ये असून कशामध्येही नाहीं हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. आत्मस्वरूप प्रत्येक वस्तूमध्ये असून त्याच्या गुणधर्मापासून ते अलिप्त राहते. त्याचप्रमाणे विश्वाच्या अंतर्बाह्य राहून ते सर्वांहून अलिप्त असते हेच त्याच्या अलिप्तपणाचे कौशल्य आहे. विश्वामध्ये काही प्रचंड घडामोडी होत असतात पण त्यांचा आत्मस्वरूपावर यत्किंचितही परिणाम होत नाही. याचे कारण आत्मस्वरूप निष्कंप, निर्विकार, निश्चल स्वरूपाने आहेच आहे.
जयास कोणीच नेईना । चोरूं जातां चोरवेना ।
कल्पांत जाला तरी वेंचेना । अणुमात्र ॥ १४ ॥
आत्मस्वरूप अव्यक्त असल्यामुळे ते कोणालाही घेऊन जातां येत नाही. तें चोरून न्यावे म्हटले तरी सहज चोरता येत नाही. ज्या वस्तूला आकार आहे ती वस्तु सहज घेऊन जाता येते. अशी स्थूल वस्तु कुटिल विचाराने चोरून नेता येते. पण आत्मस्वरूपाला धरता येत नाहीं, सोडता येत नाही, घेता येत नाही, नेता येत नाही, तें दिसत नाही, प्रत्यक्ष असतही नाही. असे हे आत्मस्वरूप या सर्वांहून विलक्षण आहे. अनंत काळापासून चालत आलेला विश्वाचा विश्वपसारा कमी अधिक प्रमाणांत परिवर्तित होत असतो. त्यामध्ये काही प्राणी, कांहीं जीव, कांहीं वस्तु नाश पावतात आणि त्या पुन्हां जन्माला येतात. अनंत काळाचे अंती केव्हातरी या विश्वाचा कल्पान्तही होत असतो. या विश्वाचा कल्पान्त झाला तरी आत्मस्वरूप जसेच्या तसेंच असते. आत्मस्वरूपामध्ये यत्किंचित बदल होत नाही. पहा ! जें अजर आहे, जें अमर आहे, जें अनंत आहे, जें अनादि आहे तेच आत्मस्वरूप होय !
आत्मस्वरूप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही. तें कोणापासून हिरावून घेता येत नाही, आत्मस्वरूप दुसऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये विरत नाही, जिरतही नाही. तें विश्वामध्ये असून विश्वाहून अलिप्त असते. आत्मस्वरूपाला कोणताच गुणधर्म चिकटत नाहीं आणि कोणतीच उपमाही देता येत नाही. आत्मस्वरूप असे नित्य निष्कलंक आहे.
जें ज्ञानचक्षी लक्षिलें नव जाये । जेथे आकार भस्मोनी जाये ।
सांगितलें तें साकार होये । म्हणोनि सांगणे न घडे ॥ १५ ॥
ज्ञानमार्गाची उपासना करीत असतां ज्ञानदृष्टीने आत्मतत्त्वाचा अनुभव घेता येतो. कारण आत्मतत्त्व, परमात्मतत्व हे ज्ञानानुभवाच्या कक्षेमध्येच येते. ‘चर्मचक्षु ज्ञानचक्षु । हा तो अवघाच पूर्वपक्षु । निर्गुण ठाईचा अलक्षु । लक्षवेना’ चर्मचक्षूंना बाहेरचे दृष्य पदार्थ दिसतात. ज्ञानदृष्टीला आत्मतत्त्वाचे ज्ञान ज्ञात होते. पण ज्ञानदृष्टीला आत्मस्वरूपाचा यथार्थ ज्ञानबोध कधीच होत नाही. कारण ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही अतिसूक्ष्म त्रिपुटी असते. त्रिपुटीच्या अस्तित्वामुळे आत्मस्वरूपाचा बोध कधीच होत नाही. आत्मस्वरूपांत एकरूप होण्यासाठी ज्ञानाचाही संग सोडावा लागतो. भोग आणि त्याग, ज्ञान आणि अज्ञान, संग आणि निःसंग, साकार आणि निराकार ह्या सर्व भावावस्था, ज्ञानावस्था सोडाव्या लागतात. या सर्व अवस्थांच्या पलीकडे तें आत्मस्वरूप आहे. विवेक वैराग्याच्या बळावर ज्ञानदृष्टीने विश्वाचा सर्व दृष्यादृष्य पसारा ओलांडल्यावर आत्मस्वरूपापर्यंत पोहोचता येते. शेवटी आत्मस्वरूपापर्यंत पोहोचतांच विवेकानें ज्ञानविज्ञानासह स्वतःचे आत्मबलिदान आत्मस्वरूपांत करावे लागते. अशी ही आत्मबलिदानाची अवस्था बोलण्याची, सांगण्याची, ऐकण्याची, पाहण्याची मुळीच नाही. आत्मस्वरूपाबद्दल कांहींच सांगता येत नाही. या ठिकाणी वाणीचें, मनाचे, बुद्धीचे, ज्ञानाचे मौनच योग्य !
ऐसें जरी न बोलावें । तरी म्यां काये करावें ।
न बोलतां कळावें । तुज कैसें ? ॥ १६ ॥
अरे ! आत्मस्वरूपासंबंधी पुन्हा पुन्हां किती बोलावें हेच कळत नाही. शब्दांची कितीही कसरत केली तरी त्यांतून कांहींच निष्पन्न होत नाही. जोपर्यंत तुला शब्दांचा गर्भितार्थ समजत नाही, तोपर्यंत माझ्या शब्दांचा वर्षाव फोलच समज. शब्दज्ञान हे प्राथमिक स्वरूपाचें आहे हे अगदी खरें. पण आत्मस्वरूपाचे वर्णन शब्दांनी सांगितले तरच तुला समजेल ना ! अरे ! आळस हा प्रयत्नवादाचा शत्रु आहे बरं ! आळस सोडून शब्दांच्या माध्यमांतून तुला समजून सांगणे हे माझें कर्तव्य आहे. अरे ! कोणतीही गोष्ट बोलता बोलतां समजू लागते. नंतर समजतां समजतां अनुभवास येते. पहा ! पाण्याच्या तलावामध्ये पोहण्याचा प्रयत्न केला तर हलके हलके पोहायला येऊ लागते. हाच प्रकार परमार्थ मार्गामध्येही लागू आहेच. कोणतीही गोष्ट ‘केल्याने होत आहे रे । आधी केलेच पाहिजे’ साधकाने सतत प्रयत्नशील असावे हेच खरे.
सद्गुरूंनी शब्दांचे माध्यम वापरून उपासनेचे धडे दिले पाहिजेत. सत्शिष्याने त्याचा अभ्यास करून स्वतःचे हित साधले पाहिजे. कोणतीही गोष्ट एकांगी यशस्वी होत नाही. सद्गुरु आणि सत्शिष्य या दोघांच्या प्रयत्नांनी परमार्थ-मार्गाची वाटचाल यशस्वी होते. पहा ! उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंच्यामध्ये खूप उष्णता वाढली म्हणजे पाऊस सुरू होतो. त्याचप्रमाणे सत्शिष्य त्रिविध-तापाने पोळलेला असला आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरु प्रसन्न झालेले असतील तर अशा वेळी ‘गुरुशिष्या एकची पद’ अशी ज्ञानावस्था अनुभवास येते. असा हा गुरुशिष्यांचा समतोल परमार्थ शांतपणे यशस्वी होतो.
अरे बोलणे तितुकें व्यर्थ जातें । परी बोलता बोलतां अनुभवा येते ।
अनुभव सोडितां, तें । आपणचि होईजे ॥ १७ ॥
अरे बाळ ! शब्दज्ञान कितीही संपादन केले तरी तें साली-टरफलांच्या संग्रहाप्रमाणे सगळे व्यर्थच. अमृतमय गोड असणाऱ्या उसाचा रसमय गर न खाता केवळ चोइट्याच चघळल्या तर समाधान होईल का ? ‘ऊंस डोंगा परी रस नाही डोंगा’ ऊस हा वरवर ओबडधोबड दिसतो पण त्यांतील रस हा अमृताची गोडी घेऊन असतो. त्याचप्रमाणे शब्दज्ञान हे वरवर उथळ दिसते पण त्याचा गर्भितार्थ आनंदाने भरलेला असतो. आत्मस्वरूप हे समजून सांगण्यासाठी हा शब्दपाल्हाळ सांगावा लागतो. शांत असणाऱ्या अंतःकरणांत शब्दब्रह्माचा ध्वनि शिरला की, साधकाची प्रज्ञा जागृत होते. साधकाला हलकेच आत्मानुभव येऊ लागतो. आत्मानंदामध्ये रममाण असणाऱ्या साधकाला आपल्या स्वस्वरूपाची ओळख होते. सद्गुरूंच्या सान्निध्यात काही काळ हा स्वानुभव स्थिर झाला म्हणजे शांति, समाधान मिळते. ‘मी’ आनंदस्वरूप आहे हे सूक्ष्मभान अतिशुद्ध जाणिवेची स्मृतीच असते. साधकाला अंती-मती हेच मोठे बंधन असते. असा हा आत्मानंद सोडणे कठीण असते. साधकाला स्वतःच्या देहासह सर्व जगाचा मोह, आसक्ति सोडता येते, फक्त आपला ‘मी’ हा सोडता येत नाही. जीवनामध्ये हे आनंद, स्वानंद सोडल्याशिवाय आत्मस्वरूपाची प्राप्ति होत नाही. आत्मस्वरूप समजावून देतांना श्रुतीची वेदान्ती भाषाच वापराबी लागते. मोजक्या शब्दांत नेमके सांगणारी श्रुतीची भाषा आहे. पहा ! “ब्रह्म” हा शब्द उच्चारला की एकवीस स्वर्ग, सप्तपाताळ, चराचरादि विश्वपसारा या दोन शब्दांमध्ये सामावतो. म्हणून जितके अधिकाधिक दूर व्यापक आहे आणि जितकें अत्यंत जवळ आहे तेच आत्मस्वरूप होय ! सद्गुरुकृपेला पात्र होऊन या आत्मस्वरूपाची प्राप्ति करून घ्यावी.
मायारूप मूळ तयाचें । शोधीन म्हणतां समाधान कैचें ।
‘मज लाभ जाला’ या सुखाचें । मूळ तुटे ॥ १८ ॥
‘मी’ आत्मस्वरूप आहे अशी शुद्ध स्मृति ही देखील मायेच्या प्रांतामध्येच आली. प्रत्येक देहामध्ये ‘मी’ या स्मृतीचा अनुभव तीन प्रकारांनी येतो. शुद्ध जाणीव असते, जाणण्याची वस्तु जाणिवेत असते, जाणणारा जागृत असतो. अशी ही त्रिपुटी जागृत असते. जिथे एका स्मृतीहून अधिक स्मृति आठवतात त्या ठिकाणी जाणीव कुणाचीतरी अनुभूति घेत असते. हीच ती त्रिपुटीयुक्त गोंडस मूळमाया समजावी. या मूळमायेचे स्वरूप समजून घेतल्याशिवाय सोडता येत नाही. स्वतः ‘मी’ च्या अस्तित्वाने तिचा संग सोडण्याचा प्रयत्न केला तर अधिकच गुंता वाढत असतो. आत्मबुद्धीच्या ठिकाणी ‘मी’ चें स्फुरण असते हे अगदी खरे आहे. पण ते स्फुरण अंतर्बाह्य स्मृतिरूपाने अनुभवास येत असते. जी एक शुद्ध जाणीव स्वतःचे मूळ स्वरूप शोधण्यासाठी हृदयांत आंत आंत जाते. अशी शुद्ध जाणीव आनंदाशीं तद्रूप झाली की, एकच आनंद उरतो. ‘मी’ आनंदघन आहे ही आनंदस्मृति आत्मस्वरूपांत विरून गेली की या सुखाचें मूळच नाहींसें होतें. साधकानें ‘मी’ चा संग सुटेपर्यंत त्यागयुक्त साधना करावी आणि आपुलें जीवन धन्य करावें.
‘अहंब्रह्मास्मि’ हा गाथा । आला देहबुधीचिया माथा ।
देहबुधीने परमार्था । कानकोंडे होईजे ॥ १९ ॥
“मी ब्रह्म आहे” असा व्यर्थ अभिमान वाढल्यामुळे देहबुद्धि अधिकच जागृत होते. देहबुद्धि जागी झाली म्हणजे ती शुद्ध परमार्थामध्ये मोठा अडथळाच आणते. देहबुद्धि, जीवबुद्धि आणि आत्मबुद्धि ह्या तीनही बुद्धींच्या अवस्था साधकाच्या जीवनांत अनुभवाला येतात. देहबुद्धि ही सतत देहाशीच समरस असल्यामुळे त्या ठिकाणी ज्ञानाचा अभावच असतो. जीवबुद्धि ही मनाच्या, वासनेच्या माध्यमांतून सतत विषयांशी समरस असते. त्यामुळे जीवनामध्ये सुख, शांति अथवा समाधान हे कधीच मिळत नाही. आत्मबुद्धीच्या ठिकाणी विचार करण्याचे सामर्थ्य असते पण देहांत असणारा मीपणा स्वतःची टिमकी वाजवीत असतो. अशामुळे ही आत्मबुद्धि खऱ्या सुखापासून वंचित असते. जीवेश्वर हा स्थूलदेह, सूक्ष्मदेह आणि कारणदेह या तीनही देहांशी समरस असतो. परंतु विश्वेश्वर हा ज्ञानप्रधान असल्यामुळे तो महाकारण देहाला व्यापून असतो. असे हे चैतन्यमय असणारे ज्ञान देहास व्यापून असले काय, किंवा विश्वाला व्यापून असले काय सारखेच. एकूण अशी ही ज्ञानाची ऊर्मि शुद्ध परमार्थाला अडथळाच आणते.
ज्ञानरूप अहंस्मृति जागी आहे तोपर्यंत या मीपणाचे ओझें साधकाच्या डोक्यावर असतेच. “माथा प्रपंचाचे ओझें । घेवून म्हणे माझें माझें” जीवनामध्ये आपल्या डोक्यावर अज्ञानाचे ओझें असतेंच असते. त्याचप्रमाणे ज्ञानाचा अहंकार वाढला म्हणजे कळत नकळत आपल्या डोक्यावर ज्ञानाचेही ओझेंच वाटते. म्हणून साधकाने साधन करीत असतांना अज्ञानाबरोबर मी ज्ञानी आहे हा वृथा अभिमान सोडला पाहिजे. परमार्थ हा कुठेतरी कसातरी, करण्यांत कांहींच अर्थ नाही. असा हा कानकोंडा लाजीरवाणा परमार्थ कधीच यशस्वी होत नाहीं.
देहबुधी हे टाकावी । हेहि मायेची उठाठेवी ।
म्हणोनी काय अंगीकारावी ? । अंगीकारूं नये ॥ २० ॥
देहबुद्धि सोडावी असें ज्या जाणिवेला वाटते ती जाणीव मायेच्या प्रांतामध्येच असते. एखाद्या चांगल्या गोष्टीकरितां आपण प्रयत्नशील उपाय शोधून काढतो. पण तो उपाय करीत असतांना परिणामी अपायच ठरतो. तशी देहबुद्धि काय किंवा आत्मबुद्धि काय दोहीकडे कमी अधिक प्रमाणांत अज्ञान हे असतेच. मनुष्याच्या जीवनात जन्मापासून ज्ञानोदय होईपर्यंत अनेक प्रकारच्या वृत्त्यात्मक ऊर्मि उठतच असतात. अशा वेळी काय घ्यावे आणि काय टाकावें हे ठरविले पाहिजे. कोणत्या गोष्टींचा अंगीकार करावा आणि कोणत्या गोष्टीचा अंगीकार करूं नये हे विवेकाने ठरवावें. परमार्थ करीत असतांना अत्यंत दक्ष असले पाहिजे. अहो ! समाधानाकरितां देहबुद्धि तर टाकावीच. इतकेच काय, जीवनामध्ये चिरशांती मिळणार असेल तर आत्मबुद्धीही सोडावी. शेवटी देहबुद्धि काय किंवा आत्मबुद्धि काय आत्मसमाधानाकरितां सर्वच सोडावे लागते.
देहामध्ये अज्ञानरूपी स्फुरण हा एक मायेचाच प्रकार आहे. तो देहबुद्धीला चिकटून असतो. देहबुद्धि म्हणजेच जीवनाचे सर्वस्व असें मानूं नये. कारण देहबुद्धीला आत्मसुखाचा लाभ कधीच होत नाही. देहामध्ये ज्ञानरूपी स्फुरण हा एक मायेचाच गोंडस प्रकार आहे. ज्ञानस्वरूप असणारी माया साधकाला अनेक प्रकाराने सुख अथवा आनंद देत असते. परमार्थ करणाऱ्या साधकानें मायेचें खरूप जाणून या मायेचा संग सोडावा हेच उत्तम.
मायेच्या बळें ब्रह्मज्ञान । मायेकरितां समाधान ।
मायाचि गोंवी, आणि बंधन । तोडी, तेहि माया ॥ २१ ॥
विचारप्रधान असणाऱ्या चैतन्यरूप मायेच्या सामर्थ्यामुळेच जिवाला ब्रह्मज्ञान होऊ शकते. मी आनंदरूप आहे अशी आत्मसुखाची जाणीव असते ही सुद्धा मायाच समजावी. मायेच्या माध्यमातून जिवाला शांति-विश्रांतीही मिळत असते. परमार्थामध्ये साधनशील साधकाला क्षणभर अनुभवास येणारा आनंद किंवा भावसमाधि ही देखील मायाच समजावी. ज्ञानप्रधान असणाऱ्या चैतन्यरूप मायेच्या सामर्थ्यामुळेच जिवाला परमसुखाची प्राप्ति होते. ‘मी’ आनंदरूप आहे असा सतत असणारा अनुभव हाही मायेमध्येच येतो. या आनंदरूप ‘मी’ चे भान सतत असणे हेच बंधनाला कारणीभूत ठरते. साधकाला आत्मज्ञानाची प्राप्ति झाली की तो साधक सतत आत्मानंदामध्येच राहतो. आनंदाचें सतत असणारे भान हे मोठे बंधनच आहे. अत्यंत सूक्ष्म असा आनंदाचा काळ अनुभवाला येतो, तोपर्यंत, या गोंडस मायेचें बंधन आहेच. पण आत्मज्ञानी पुरुष विवेक-वैराग्याच्या बळावर त्या अतिसूक्ष्म मायेचाही त्याग करतो. साधक हा सद्गुरूच्या कृपेने त्या आनंदरूप असणाऱ्या ‘मी’ चाही त्याग करून ज्ञानाचे विज्ञान होतो. अशा वेळी ही मायाच अतिसूक्ष्म जाणिवेला ब्रह्मस्वरूपाच्या महाद्वारापर्यंत नेऊन सोडते आणि आपण त्या स्वरूपांत विलीन होते. जिवाला बंधनांत अडकवणारी आणि जिवाला बंधनांतून सोडविणारी ही मायाच आहे. अशी ही सामर्थ्यसंपन्न असणारी बहुनाटकी ही माया ! या चैतन्यरूप मायेच्या ठिकाणी कर्तृत्वशक्ति आहे. ही माया आपल्या कर्तृत्वाने जिवाला बंधनांत टाकते आणि जिवाला बंधमुक्तही करते.
माया आपणास आपण गोंवी । आपणास आपण वेढां लावी ।
प्राणी दुखवती जीवीं । अभिमाने करूनि ॥ २२ ॥
एकोऽहं संकल्पाच्या ठिकाणी जे प्रथम अहं स्फुरण निर्माण झाले तीच मूळमाया होय ! ही मूळमाया प्रकृति-पुरुप अर्धनारी-नटेश्वर या रूपाने ज्ञानप्रधान आहे. ज्ञानप्रधान असणारे आत्मतत्त्व हे नित्यसुखांत, आनंदांत असते. जोपर्यंत ज्ञानस्वरूपांत विकल्प उठला नव्हता तोपर्यंत ही माया आनंदाशी समरस होती. पण ज्ञानस्वरूपाच्या ठिकाणी ‘मी’ चे भान जागृत झाल्याबरोबर ही शुद्ध जाणीव विकाराशी समरस होऊ लागली. मनुष्याची शुद्ध जाणीव विकारवश झाली की, ती विकल्पामध्येच अडकते. ही जाणीवरूप माया स्वतःला विषयांच्या गोडीमध्येच गुंतविते. ही माया विषयरूप विषयांच्या फेऱ्यांत स्वतःलाच स्वतः अडकवून, गुंतवून घेते. कारण विषय हे प्रथम गोड वाटतात पण परिणामी – अंती दुःखद असतात. अशा विषयांत गुंतलेल्या जाणिवेला विषयांच्या वर्तुळांतच फिरावे लागते. पहा ! ब्रह्मांश असणारा आत्मा विकारवश झाल्यामुळे त्याला जीवांश होऊन दुःख भोगावे लागते. जिवाच्या ठिकाणी मी कर्ता, मी भोक्ता हा अभिमान असतो म्हणून जिवाला सतत दुःखांतच राहावे लागते. उन्हाळ्यामध्ये वाळवंटात पडलेला दगडाचा गोटा उष्णतेने खूप तापून-भाजून निघतो. त्याचप्रमाणे बद्ध असलेल्या जिवाला अभिमानामुळे अनेक विषयांच्या मालिकेमध्ये दुःखच दुःख भोगावे लागते.
प्रत्येक जिवाच्या ठिकाणी चितशक्तीचा अंश असतोच. पण हा जीव विषयांच्या अधीन होऊन स्वतःला विसरतो इतकेच काय बद्ध जीव हा विषयांत गोडी मानून स्वतःला विषय बंधनात अडकवून घेतो. जिवाचा हाच दुःखरूप संसृति संसार होय !
जैसा सारीपाट खेळती । सारी येकाच्या मागोन आणिती ।
खेळों बैसतां बांटून घेती । आपुल्याला ॥ २३ ॥
मानवी जीवनामध्ये मनाला थोडासा (विरंगुळा) बदल म्हणून काही खेळ खेळण्याची पद्धति आहे. कांहीं खेळाडू मंडळी आपसांत सोंगट्यांचा खेळ मांडत असतात. खेळासाठी सोंगट्यांचा गट दुसऱ्या कोणाकडून तरी मागून आणतात. खेळायला सुरुवात होण्यापूर्वी या सर्व सोंगट्या प्रत्येक जण आपआपसांत वाटून घेतात. ह्या सोंगट्या माझ्या आहेत, त्या सोंगट्या तुझ्या आहेत अशी सोंगट्यांची रीतसर वाटणी करतात. पण हे मानवी जीवनाला कितपत योग्य वाटते आणि कितपत अयोग्य वाटते हे पाहावें. अरे ! “तुझे तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा कोण विचार । आतां भगवंत साचार । धरी दृढ भावार्थबळे” अरे ! आपले शरीर आपल्या मालकीचे असूनही त्याच्यावर आपला ताबा राहात नाही, मात्र खेळासाठी मागून आणलेल्या लाकडी सोंगट्यांचा अभिमान उगीच धरत असता. पहा ! जिवाला देहबुद्धीच्या ठिकाणचा किंवा तत्सम जड वस्तूच्या ठिकाणचा अभिमान हा असतोच. त्या अभिमानामुळेच ही देहबुद्धि अधिकच बळकट होत असते. देहबुद्धीच्या अधीन होऊन आपले जीवन कधीही सुखी होत नाही. जीवनामध्ये अभिमानाचे स्थान जड देहामधील जाणिवेमध्येच असते. मनुष्याला तो अभिमान कधीही स्वस्थ बसू देत नाही. मनुष्याचे सर्व जीवन मी आणि माझें यामध्येच गुंतलेले असते. जोपर्यंत मी आणि माझे हा वृथा देहभाव संपत नाही तोपर्यंत जिवाला हा व्यर्थ सीणच आहे.
नसताचि अभिमान माथां । सारी मरतां परम वेथा ।
डाव येतां सुखस्वार्था । दोघेहि पडिले ॥ २४ ॥
सोंगट्यांचा खेळ खेळण्यासाठी दुसऱ्याकडून सोंगट्या आणलेल्या असतात. त्या सोंगट्या आपल्या नाही हे पुरेपूर माहीत असते. पण त्या सोंगट्यांचा उगीच अभिमान धरतात. खेळ खेळत असतांना आपलें बुद्धिबळ कमी पडले की सोंगटी चुकीच्या जागेवर ठेवली जाते. अशा वेळी ती सोंगटी निकामी-मृतवत् होत असते. नंतर त्या खेळामध्ये हलकेच अपयश येते. सोंगटी मेली की खेळाडूला फार मोठे दुःख होत असते. ह्या खेळामधील सोंगट्या खोट्या, हा खेळही खोटा, या सोंगटीचे मरण हेही खोटेंच. इतके सर्व खोटे असतांना सोंगटी मेल्याचे दुःखच मनाला सारखें जाणवत असते. अरे ! “खोटें तें खोटेंचि खोटें । खऱ्याशी तगेना ते बालटे’ शेवटी अशा या खोट्या सोंगट्यांच्या खेळामध्ये खेळाचा डाव आपल्यासारखा होतो त्यावेळी उगीचच स्वार्थी लोक स्वार्थाने सुखी होतात. डाव जिंकला म्हणजे फारच हर्षानंद होत असतो. अरे ! या विश्वरचनेच्या मानाने हे मानवी जीवन किती क्षणभंगुर आहे बरं ! पण मानवाला मी आणि माझें याचा फार मोठा अभिमान असतो. जोपर्यंत शरीरांत शक्ति आहे, बुद्धीमध्ये विचार करण्याचे सामर्थ्य आहे तोपर्यंतच आत्महित साधता येते. अशा सोंगट्यांच्या खेळाने किंवा आकाशांत पतंग उडविण्याच्या त्याच्या खेळाने स्वहित होत नाही. मानवी जीवनामध्ये योग्य काय आणि अयोग्य काय हे वेळीच जाणून घ्यावे. मानवी जीवन हे अत्यंत मोलाचे आहे याची जाणीव ठेवावी.
फांसवास दे दे म्हणती । येक ते चिरडी येती ।
क्रोधां पेटल्या घेती । जीव येकमेकाचा ॥ २५ ॥
खेळाला सुरुवात होण्यापूर्वी एक सांकेतिक प्रकार असतो. एका हस्तिदंती तुकड्याला फांसा असे म्हणतात. खेळणारी मंडळी तो हस्तिदंती फांसा हाताने ऊर्ध्व उडवून देतात. तो फांसा जमिनीवर उलट किंवा सुलट पडतो. फांसा पडला की प्रथम डाव कुणाचा याची ओळख पटते. अशा वेळी हे खेळाडू त्या निर्जीव फांशाकडे आपणास यश मिळावे म्हणून ‘यश दे दे’ अशी मागणी मागत असतात. खेळाच्या ओघामध्ये कोणाकडे काय मागावे किंवा याचना करावी हेही कळत नाही. असा हा हस्तिदंत फांशाचा गमतीदार प्रसंग आहे. सोंगट्यांचा खेळ सुरू झाला म्हणजे काहीजण कुरबूर करूं लागतात. काही लोक मध्येच तक्रार करून संतप्त होतात. दोन खेळाडूंमध्ये भांडण सुरू होते. भांडणाच्या आवेशांत एकमेकाचा जीव घेण्यापर्यंत झोंबाझोंबी होते. अशा असंतुष्ट असणाऱ्या खेळाडूंच्या मनावरचा, देहावरचा ताबा सुटतो. दोघांना अविचारामुळे क्रोधयुक्त चीड आलेली असते. खेळाच्या सस्नेह विचारांतून हे माझें, हे तुझें असे द्विधा विचार सुरू होतात. त्यांतूनच थोडी चढाओढ, ईर्ष्या सुरू होते. मनाला विरंगुळा म्हणून जो खेळ सुरू केला होता त्या खेळाची परिणती भांडणांत झाली. सुखाकरितां मांडलेला खेळ शेवटी अभिमानामुळे दुःखच निर्माण करतो. “सुख सुख म्हणतां हे दुःख ठाकोनी आलें । भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले” असे हे मानवी जीवन अभिमानामुळे, अविचारामुळे दुःखी कष्टी होत असते. जीवनामध्ये अविचाराचें फळ दुःख हे ठरलेलेंच आहे.
तैशा कन्या पुत्र आणि नारी । वांटून घेतल्या सारी ।
अभिमान वाहाती शिरीं । देहपांग प्रपंचाचा ॥ २६ ॥
प्रपंचामध्ये सुख मिळेल अशा हेतूने प्रत्येक जण प्रपंचाचा स्वीकार करीत असतो. प्रपंच म्हटला की नरनारी, कन्या-पुत्र, नातु-पणतु अशी सर्वच जबाबदारी आली. प्रपंच करीत असतांना विषयसुखांतून वंशविस्तार वाढतो, त्याचप्रमाणे अभिमानही वाढत असतो. माझी कन्या, माझा पुत्र, माझी पत्नी, माझा दूत असा आप्तभाव जागा होतो. मी आणि माझे हे भान पूर्वी सोंगट्यांच्या खेळामध्येही होतेच. आतां तोच प्रकार प्रपंचामध्येही सुरू झाला. सर्वप्रथम बायकोबरोबर प्रेमाचे नाते असते. नंतर कन्या पुत्रांबरोबर रक्ताचे नाते जडते. जोपर्यंत देहबुद्धि आहे तोपर्यंत मी आणि माझे हा अभिमान असतो. पुढे हे माझे आहे आणि तें तुझे आहे असे दोन विभागच पडतात. सोंगट्या वाटून घेतल्यानंतर ह्या माझ्या, त्या तुझ्या अशी वाटणी होत असते. त्याचप्रमाणे हा कन्यापुत्रांचा परिवार माझा आहे. तो कन्यापुत्रांचा परिवार तुझा आहे असा अभिमान वाढतच असतो.
प्रपंच करीत असतांना वयोमानानुसार कधीतरी वृद्धावस्था येतच असते. वृद्धावस्था आली की जीवन (देहपांग) पराधीन होत असते. जीवनामध्ये पराधीनता, ताबेदारी ही अत्यंत कष्टदायक अवस्था आहे. जीवनामध्ये मी आणि माझे हे दुःखाला कारण आहे याची जाणीव ठेवावी.
येवं इतुकी वेढा लाविली । ते माया खेळे येकली ।
ते मायेनेच वारिली । पाहिजे माया ॥ २७ ॥
विश्वव्यापक असणारा परमात्मा अनंतरूपाने नटलेला आहे. त्या अनंत रूपाने नटलेल्या परमात्म्याची ही मायाशक्ति अनंतच आहे. विश्वरूपाने विश्व व्यापून असणारी ही माया विश्वांतील सर्व जीवांना आपल्यांतच रमवीत असते. जोपर्यंत बद्ध जीवाला आत्मस्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत जीव हा मायेच्या दृष्य प्रांगणांतच बहिर्मुख असतो. बहिर्मुख असणाऱ्या जीवाला ही गोंडस माया दृष्याच्या जंजाळांत गुंतवीत असते. पृथ्वितलावरचा प्रत्येक विषय जीवाला आवडतो, याचे कारण मायेचे सौंदर्य हे अत्यंत गोंडस, लाघवी आहे. जोपर्यंत जीवाला जीवपण आहे तोपर्यंत जीवाला मायेचा खेळ दिसणार आणि भासणार. अशी ही अनंत व्यापून असणारी माया आपल्याच लटक्या सामर्थ्याने जीवाला भूल पाडीत असते. जीवाला आपले अज्ञान जाणवू लागले की, आपल्या ठिकाणी कर्तृत्व नाही याची जाणीव होते. आपण विचारहीन, विवेकहीन लंगडे आहोत अशी समज येते. अशा वेळी जीव हा अंतर्मुख होऊन स्वतःचें मूळस्थान शोधू लागतो. जीवाचें मूळ स्वरूप आनंदरूप आहे. त्या आनंदाची प्राप्ति होण्याकरितां शुद्ध जाणिवेचा संग धरावा लागतो. दिसणाऱ्या – भासणाऱ्या शबल मायेचा संग सोडण्यासाठी शुद्ध जाणिवेचा संग उपयोगी पडतो. दुःखमुक्त होण्याकरितां सुखाचा मार्ग शोधावा लागतो. मायेचा संग सोडण्याकरितां मायेचे मूळस्वरूप शोधले पाहिजे. मायेचे मूळस्फुरण आनंदरूप असणाऱ्या अहं संकल्पांतच आहे. आपण साधन अभ्यास करून आनंदाशी समरस झालो म्हणजे विश्वरूप मायेचा संग सुटतो. सुखाच्या प्राप्तीने शबल मायेचा निरास होतो. काट्यानेच काटा काढावा लागतो. मायेच्या एका अतिशुद्ध आविष्काराने मायेचा दुसरा शबल आविष्कार नाहींसा करता येतो.
ते माया तोडितां आधिक जडे । म्हणोनी धरिती ते वेडे ।
धरितां सोडितां ते नातुडे । वर्म कळल्यावाचुनि ॥ २८ ॥
सर्वप्रथम मायेचें ममत्व हे जाणून सोडावे लागते. ह्या मायेचा पूर्णपणे निरास करण्याचा प्रयत्न केला तर ही माया अधिकच जवळ येऊन चिकटते. अशा प्रकारची बहुनाटकी ही माया. “देहबुद्धि धरूनी चित्तीं । मुक्त ब्रह्मादिक नव्हेती” जोपर्यंत देहबुद्धि जागी आहे तोपर्यंत मायेचा संग सोडणे कठीण आहे. प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण बरोबर आहे. पण जीवनभर प्रयत्नच करीत राहिलात तर शेवटीं तो प्रयत्नच मोठा अडथळा ठरतो. ज्या शुद्ध जाणिवेने मायेचा संग सोडण्याचा प्रयत्न केला जातो, ती शुद्ध जाणीवच अहंतेचे स्वरूप धारण करून पुढे पुढे सरसावत असते. परब्रह्म आणि मूळमाया या दोन्हींच्या मध्येच या अहंतेचा मोठाच अडथळा आहे. जे पुरुष प्रयत्न न करतां अज्ञानांतच राहतात ते अगदी वेडेच समजावेत. त्यांना मायेचे खरे स्वरूप कधीच समजत नाही. परंतु जाणते पुरुष असतात ते मायेचे स्वरूप जाणून सोडण्याचा प्रयत्न करतात. पण त्या जाणत्या पुरुषांना मायात्यागाचें वर्म कळल्याशिवाय ते उगीच प्रयत्न करीत असतात. शेवटी असे हे जाणते पुरुषही वेडेच समजावेत. त्या मूळमायेचें वर्म कळल्याशिवाय तिचा त्याग करता येत नाही. ‘माया हेची वर्म जाण’ ह्या मायेचे रहस्य (गुज) समजले की मायेचा संग सोडता येतो. पहा ! “विहंगमी फळाशी गाठी पडे”-अशा अचूक प्रयत्नांनी मायेचा निरास कसा करता येईल याचे मर्म पुढील दोन ओव्यांमध्ये सांगितले आहे.
जैसें चक्रविहूचे उगवणें । बाहेर येउनी आंत जाणे ।
कां भीतरी जाउनी येणें । अकस्मात बाहेरी ॥ २९ ॥
चक्रव्यूह म्हणजे युद्धभूमीवर चक्राकृति, वर्तुळाकार उभा केलेला भव्य असा सैन्याचा समूह होय ! शत्रुपक्षाच्या चक्रव्यूह सैन्यामध्ये कुठून आंत प्रवेश करावयाचा याचे ज्ञान असावे लागते. आपल्या पराक्रमाने आंत प्रवेश करून शत्रुपक्षाच्या सैन्यांना जिंकत आंत जायचे असते. अत्यंत शूर, पराक्रमी, मुत्सद्दी असणारा चक्रव्यूहाचा सरसेनापति व्यूहाच्या मध्यभागी असतो. त्या सेनापतीशी द्वंद्र करून त्याला जिंकून चक्रव्यूहाचा भंग करावयाचा असतो. चक्रव्यूह तोडून आंत जाणे आणि चक्रव्यूह फोडून बाहेर येणे यालाच पराक्रम असे म्हणतात. असा पराक्रम अत्यंत जलद गतीने करावयाचा असतो. कुरुक्षेत्रावर कौरवांनी असाच चक्रव्यूह रचला होता. त्या चक्रव्यूहाचे भेदन अभिमन्यूनें केले होते. असा हा पराक्रम अत्यंत जलद गतीने मोठ्या कौशल्याने करावयाचा असतो. आकाशांत वीज चमकून जाते त्याच गतीने चक्रव्यूह तोडायचा, फोडायचा असतो.
अशाचप्रकारे या मायेचा गुंतगुंता जाणोनी सोडायचा असतो. ही माया लटकी आहे, ही माया नाटकी आहे, ही माया फसवी आहे. ज्याच्या ठिकाणी विवेक-वैराग्य असेल त्याला या मायेचा संग त्वरित सोडता येतो. मायेचें अंतिम अस्तित्व ‘मी’ हे सूक्ष्म भान जाणून तें वैराग्यानेच सोडायचे असते. मायेचा संग प्रखर वैराग्यानेच सोडता येतो. “प्रखर वैराग्य उदासीन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान” स्वरूपानुभवाच्या अंतिम क्षणाला हे प्रखर वैराग्यच उपयोगी पडते, त्यागानेच मायेचा निरास करता येतो. म्हणून त्याग हेच मानवी जीवनाचे खरे सार आहे.
कां त्या कोवाडीयांच्या कडीया । गुंतगुंतोनी उगवाव्या ।
तैसी जाण हे माया । गुंतोनी उगवावी ॥ ३० ॥
बहुरूपी, बहुगुणी असणारी मंडळी आपल्या बुद्धीचा उपयोग करून समाजामध्ये बहुरूपी नाटके काढीत असतात. काही हुशार मंडळी शाब्दिक कोडी तयार करून ती कोडी सोडविण्यासाठी बुद्धिकौशल्याचा उपयोग करीत असतात. अशा प्रकारचे एक तिसरे कोडे आहे. कांहीं कुटिल मंडळी लोखंडाच्या कड्यांचे एक वर्तुळ चक्र घेऊन फिरत असतात. त्या गोल वर्तुळांतील लोखंडी कड्या एक कडी दुसरीतून सोडवावयाची असते. आपण कितीही प्रयत्न केला तरी त्यांतील कडी बाहेर काढता येत नाही. कारण त्या कड्यांचा खूपच गुंता असतो तो सहज सोडवता येत नाही. ज्याला त्या वर्तुळामध्ये लोखंडी कड्या बसविण्याचे ज्ञान आहे त्यालाच त्या कड्या सोडविताही येतात. म्हणून लोखंडी कड्यांचा गुंता एकीत एक गुंतविता आला पाहिजे. आपल्या बुद्धिकौशल्याने ज्या कड्या बसविता येतात त्या कड्या पुन्हां सोडविताही येतात. म्हणूनच मानवी बुद्धीच्या ठिकाणी कौशल्य, युक्ति, चातुर्य हे असावेच लागते.
समर्थ म्हणतात, या मायेची अनेक रूपें, अनेक अंगे आहेत. मायेच्या सर्व अंगांचा जवळून अनुभव असावा लागतो. ही माया किती सुख देणारी आहे आणि ती किती दुःख देणारी आहे याचा अनुभवच असावा लागतो. ही माया मिथ्या आहे अशी प्रचीति आली म्हणजे आपल्या मनाची तशी तयारी होत असते. अशा बहुनाटकी मायेचा संग शुद्धबुद्धीच्या कौशल्याने सोडता येतो. त्याचप्रमाणे विवेकवैराग्याने मायेचा निरासही करता येतो. अहो ! जी माया झालीच नाही, तिचा संग सोडणे अत्यंत सुलभ आहे. “अरे जे जालेची नाही । त्याची वार्ता पुससी काही” असा हा आपला ठाम निश्चय झाला की माया ही नाहींच नाही. जी माया नाहीच ती धरता येत नाही हे निश्चित. जी माया धरता येत नाही, ती माया सोडावी कशी याबद्दलचा प्रश्नच उरत नाही. पहा ! या ठिकाणी मायेचा निरास करण्याचे जें वर्म आहे ते स्पष्ट केले आहे. आतां माया त्यागाचें जें गमक आहे ते सहजच कळून येईल.
माया झाडितां कैसी झाडावी । तोडून कैसी टाकावी ।
येथे विचारें पाहावी । नाथिलीच हे ॥ ३१ ॥
आकाशाच्या पोकळीमध्ये सतत वाहात असणारा वायु हा डोळ्यांनी दिसत नाही, आणि हातांनी धरता येत नाही. प्रयत्न करूनही ज्याला धरता येत नाही त्याला सोडण्याची क्रिया (प्रक्रिया) कशी घडेल सांगा ! कोणती तरी वस्तु हातांत असल्याशिवाय ती झटकून टाकता येत नाही. माया तोडायची म्हटले तरी कठीण आहे. तलवारीसारख्या दुधारी शस्त्राने आकाशावर कितीही घाव घातले तरी आकाश कधीही तोडले जात नाही. तशी ही माया कोणत्याही स्थूल क्रियेने सोडता किंवा तोडता येत नाही. ह्या अति दगलबाज फसव्या मायेचे स्वरूप जाणून घेतल्यावर माया नांवाची वस्तूच नाही असा अनुभव येईल. “अरे ! जे जालेचि नाही । त्याची वार्ता पुसशी काही” ह्या मायेचा असाच निष्कर्ष निघतो. ‘या मा सा माया’ जिला यत्किंचितही अस्तित्व नाही अशा मायेचा विचार तरी कसा करावयाचा ?
आपण सर्व विषयांचा संग सोडून झोपेत हृदयगुंफेमध्ये गाढ विश्रांति घेतो. त्यावेळी आपल्या दृष्टीने हे जग अस्तित्वात नसल्याचा अनुभव येतो. त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या सान्निध्यांत साधन अभ्यास करून ज्ञानोदय प्रकाशित झाला, आपण देहसंग सोडून सतत आत्मानंदांत रममाण होऊ लागलों की ह्या जगाचा विसर पडतो. जग हे नाहींच असा अनुभव असतो. गाढ झोपेत आणि स्वरूप साक्षात्कारानंतर ही माया नाही असा निश्चित अनुभव असतो. म्हणजे ही लटकी माया नाहीं हेच खरें. पहा ! विचाराने, विवेकाने या मायेचा संग सोडावा. खरे तर जाणत्या पुरुषांना ही माया नाहींच असा अनुभव असतो. म्हणूनच साधकांनी जाणत्यांच्या संगतीमध्ये राहून साधन अभ्यास करावा. ही माया कशी मिथ्या आहे, हे जाणून घ्यावें. ‘खोटें तें खोटे चि खोटें” माया नांवाचा पदार्थ किंवा वस्तु अशी कांहींच नाही असाच निष्कर्ष निघतो.
बहू नाटकी हे माया । मीपणे न जाये विलया ।
विवेकें पाहातां देही या । ठावोचि नाहीं ॥ ३२ ॥
ह्या मायेचे स्वरूप बहुरूपी, बहुप्रतापी, बहुसंगी, बहुरंगी, बहुसोंगी, बहुढोंगी, बहुलटकी, बहुनाटकी असेंच दिसून येते. मायेचा आविर्भाव वेगवेगळ्या स्वरूपांत अनुभवाला येतो. माया ही परिवर्तनशील आहे. अनंत असणाऱ्या काळाच्या उदरांत स्वच्छंदाने स्वैरपणाने वावरत असते. आपल्या जाणिवेच्या आधाराने मायेचा संग सोडण्याचा प्रयत्न केला तर ‘मी’ पणाच्या अस्तित्वामुळे तिचा संग सुटता सुटत नाही. पाण्याच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली वस्तु पाण्याच्या भोवऱ्यांतच गरगर फिरत राहते. त्या वस्तूला भोवऱ्याच्या बाहेर पडण्याची संधीच सांपडत नाही. तद्वत मीपणाच्या संगतीमध्ये अडकलेल्या उपासकाला त्या ‘मी’ मधून बाहेर निघता येत नाही. पहा ! पन्नास किलो वजनाच्या स्थूल देहामध्ये अस्तित्वरूप चैतन्य असते. ज्ञानप्रधान असणाऱ्या चैतन्याला जड देहाचा संग सोडवत नाही. म्हणूनच लटक्या मायेचा संग सोडता सुटत नाही आणि तोडता तुटतही नाही. काही मंडळी नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी जातात. त्यामध्ये काही मंडळी त्या नाटकाच्या प्रयोगाशी अतिसमरस होऊन तो नाट्यप्रयोग पाहात असतात; तर काही मंडळी केवळ साक्षीरूपाने त्रयस्थासारखे जाऊन बसतात. त्यांना त्या नाटकी प्रयोगाचे शुभ-अशुभ, खरे-खोटें याची खंतही वाटत नाही. कारण ह्या मायेचें मर्म समजलेले असते. खोट्या मायेचा हा खरा नाटकी प्रयोग करून दाखविणे म्हणजेच नाटक होय !
सत्संगतीमध्ये राहून विवेकाचा उपयोग केला तर मायेचा संग सोडता येतो. साधनशील साधक विवेकाने आपल्या देहाचा संग सोडतो. जड चैतन्याचा संग सुटल्यानंतर साधक आपल्या स्वरूपाशी तद्रूप होतो. जो साधक अथवा सिद्ध आपल्या स्वस्वरूपाशी एकरूप होतो त्याच वेळी या मायेचे अस्तित्व स्वरूपांत लय पावते. “देहभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे” अशा प्रकारे ज्ञानखड्गाचा उपयोग करून या मायेचा निरास करता येतो.
वर्म हेचि माया माईक । याचा करावा विवेक ।
विवेक केलिया, अनेक । येकी मुरे ॥ ३३ ॥
माया ही मिथ्या आहे, काल्पनिक आहे आणि भासमान आहे. जाणत्या पुरुषांना ही माया क्षणभंगुर आहे असा अनुभव असतो. हेच या मायेचें वर्म आणि मर्म समजावें. विवेकी पुरुष सतत अभ्यासाने ज्ञानविज्ञान अवस्थेच्या पलीकडे निश्चलावस्थेमध्ये रममाण असतात. अशा अवस्थेमध्ये या मायेचा पूर्ण निरास झालेला असतो. आत्मनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ पुरुषाला अनेक रूपांनी असणारी माया ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन झाल्याचा अनुभव असतो. ब्रह्मनिष्ठ पुरुषाला एका परब्रह्माशिवाय अन्य काहीही दिसत नाहीं, भासतही नाही. यास ब्रह्मावस्था असें म्हणतात. “एक परब्रह्म संचले । कदापी नाही विकारले” असा हा सिद्धपुरुषांचा स्वानुभव असतो.
अहो ! जे काही निर्माणच झाले नाही त्याचा विचार करणे हे अज्ञानाचे लक्षण समजावें. ‘अज्ञानेतरी देवाधीदेवा । पाविजेत नाही” असा हा ज्ञानी पुरुषांचा सिद्धान्त आहे. म्हणून पारमार्थिक मंडळींनी वेदान्त, सिद्धान्त आणि धादान्त याची प्रचीतीच घ्यावी. साधकाच्या जीवनांतील हा अभ्यासाचा मुगुटमणी समजावा. पहा ! साधन अभ्यास करीत असतांना आत्मप्रचीति हा साधकाच्या जीवनांतील परमपुरुषार्थच म्हणावा लागेल.
येकी अनेक आटलें । येकपण अनेकासवे गेलें ।
उपरी जे निःसंग उरलें । तेंचि स्वरूप तुझें ॥ ३४ ॥
पृथ्वितलावरच्या सर्व नद्यांचे पाणी ओघानेच समुद्राकडे जाऊन समुद्रात एकरूप होते. शेवटी नदीच्या पाण्याला समुद्रामध्ये वेगळे अस्तित्व किंवा वेगळी रुची राहात नाही. त्याचप्रमाणे मायेचे अनेक गुणधर्म, अनेक प्रवाह, अनेक तर्कवितर्क, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान; ध्याता, ध्येय, ध्यान अशा अति सूक्ष्म त्रिपुटीचाही अंत या ब्रह्मस्वरूपात होत असतो. “एक परब्रह्म संचले” अखेर केवल ब्रह्मस्वरूपाचेंच ज्ञान आणि भान उरते. हीच ब्रह्मावस्था, हेच ब्रह्मस्वरूप होय ! या अवस्थेला एकमेवाद्वितीय अवस्था असे म्हणतात. अनेक रूपांनी असणारी, दिसणारी, भासणारी ही माया ब्रह्मस्वरूपात विलीन होते. साधनशील साधकाला स्वतः अभ्यास करीत असतांना अशाच प्रकारे येकी अनेक आटले असा स्वानुभव असतो. पहा ! सूर्याच्या उष्णतेने समुद्रातील पाण्याची वाफ – बाष्प तयार होते. बाष्प हवेच्या गतीनुसार आकाशाच्या पोकळीमध्ये अणुरेणूमध्ये व्यापून असते. हवेतील थंडपणा हा पाण्याचा गुणधर्म आहे. त्याचप्रमाणे ब्रह्म हे आपल्याच अस्तित्वानें या ब्रह्मांडाला व्यापून आहे. “ब्रह्म ब्रह्मांडी कालवलें” असे हे अगदी खरे आहे. समर्थ म्हणतात, “नभी वावरे जो अणुरेणु काही । रिता ठाव या राघवेवीण नाही” असा हा मनाच्या श्लोकांतील सिद्धान्त आत्मारामामध्ये अनुभवाला येतो. वरती दिलेले दृष्टांत हे केवळ या ओवीतील ब्रह्मभाव समजून घेण्यासाठीच दिले आहेत. संबंधरहित, निःसंग, निर्विकार हेच आपले स्वरूप होय !
तुझें स्वरूप तुजचि न कळे । तें जया साधनें आकळे ।
तें साधन ऐक, सोहळे । भोगिसी स्वानंदाचे ॥ ३५ ॥
साधकाच्या ठिकाणी जोपर्यंत ‘मी’ हा भाव जागृत असतो तोपर्यंत त्याला आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होत नाही. आपले आत्मस्वरूप निर्मल, निश्चल असल्यामुळे त्या ठिकाणी कोणताच भाव-अभाव संभवत नाही. मानवी जीवनामध्ये आपल्या स्वरूपाचे अज्ञान हेच सर्व दुःखांचे कारण आहे. जिथें कार्य कारण भाव जागृत असतो तिथेच विचारभ्रष्ट झाल्याचा अनुभव येतो. जीवनामध्ये स्वानंदसुख हवे असेल तर त्यासाठी निष्काम उपासना आणि निःसंग साधना ही केली पाहिजे. विवेक वैराग्याने केलेली निःसंग साधन उपासना स्वरूपापर्यंत पोहचविते. म्हणून, “विवेक आणि वैराग्य । हेचि जाणिजे महद्भाग्य” परमार्थी जीवनामध्ये विवेकवैराग्याला अत्यंत महत्त्व दिले आहे. जिद्दीचा साधक हा विवेक वैराग्यानेच भवसागराचे पैलतीर गाठू शकतो.
“उपासकांसी सूचना । उपासना उपासना” उपासकांनी आपली उपासना चालू असतांना तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने अंगी बुद्धिचातुर्य वाढते आणि ब्यांशी तत्त्वांचा अभ्यास होतो. तसाच सत्यासत्याचा निवाडा करता येतो. अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासाने आत्मतत्त्वाचा शोध घेता येतो. ‘मी’ कोण आणि देव कोण हे समजून घेण्यासाठी अध्यात्मशास्त्रच उपयोगी पडते. सर्व साधनांचे सार म्हणजेच अध्यात्मशास्त्राचा स्वानुभव घेणे. पहा ! साधकाच्या साधनशील जीवनांतील साधनेचा अंतिम टप्पा म्हणजेच स्वात्मप्रचीति होय !
इति श्री आत्माराम । सांगेल पुढील साधनवर्म ।
जेणे भिन्नत्वाचा भ्रम । तुटोन जायें ॥ ३६ ॥
आत्माराम ग्रंथाचा हा तिसरा समास सांगून झाला. त्यांतील शेवटच्या ओवीमध्ये पुढच्या साधनाचे महत्त्व सांगेन असा धीरही दिला आहे. जेणे करून अज्ञान-भ्रम दूर होईल असा साधन उपाय सांगतील. मी देह आहे ही भावना सुटल्याशिवाय अज्ञान नष्ट होणार नाही. वास्तविक मी आत्मस्वरूप असतांना मला त्याचा विसर का पडला ? अशा विस्मृतीमुळेच आत्मस्वरूपापासून भिन्न झालो आहोत. कोणतीही खोटी समजून ही अज्ञानाचे कारण आहे. आतां खोटा समज दूर करण्याकरितांच काही साधने सांगितली आहेत. कोणत्याही बाह्यांग साधनांनी अज्ञान नाहीसे होत नाही. भ्रम, भ्रांति, अज्ञान नष्ट होण्याकरितां अंतरंगांतील साधनांचा उपाय करावा लागतो. पहा ! आपली शुद्ध जाणीव स्वयंप्रकाश असणाऱ्या आत्म्याच्या सन्निध स्थिर करणे यास अंतरंग साधना असे म्हणतात. काही प्रगतशील साधक आत्मोपासना, ब्रह्मोपासना करून साधकाचे सिद्ध झाले. हेच या आत्माराम ग्रंथाचे रहस्य आणि वैशिष्ट्य समजावें.
समास चौथा
साधन निरूपण
जें सकळ साधनांचे सार । जेणे पाविजे पैलपार ।
जेणें साधनें अपार । साधक ते सीध जाले ॥ १ ॥
भारतामध्ये धार्मिक पद्धतीचे अनेक संप्रदाय दिसून येतात. प्रत्येक संप्रदायाची उपासना वेगवेगळ्या पद्धतीची अनुभवास येते. उपासनेच्या पद्धतीनुसार उपासनेची ध्येयेही बदलतच असतात. एकदा ध्येय बदलले की त्या ध्येयानुसार त्या साधकाच्या जीवनावर सुखाचा किंवा असुखाचा परिणाम अनुभवास येतो. श्रीसमर्थांनी ह्या सर्व साधनांचा सांगोपांग विचार करून त्या साधनांचे सार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक संप्रदाय तशी अनेक साधने असतात हे अगदी खरे आहे; पण त्या सर्व साधनसमूहाचे सार (मर्म) एकच साधन सांगितले. आपुलें सर्व जीवन तीन गुणांनी अनुभवास येते, रजोगुण, तमोगुण, सत्त्वगुण. आपुल्या शरीरांत जो गुण प्रबळ असतो त्याचप्रमाणे उपासनाही होत असते. प्रत्येक गुणाचा परिणाम व त्याचा अनुभव वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवास येत असतो. परमार्थमार्ग हा उपासनेच्या अनेक अंगांनी संपन्न असतो असे दिसून येते. जे साधक शास्त्रसंमत साधनेच्या आधारानेच आपली सात्त्विक उपासना करतात ते साधक हा भवसागर निश्चित तरून जातात. आजपर्यंत असे असंख्य साधक उद्धरून गेले आहेत. तेंच साधन आतां सांगणार आहे.
तें हे जाण रे श्रवण । करावें अध्यात्मनिरूपण ।
मनन करितां समाधान । निजध्यासें पावती ॥ २ ॥
परमेश्वराने दिलेल्या श्रवणेंद्रियांनी अध्यात्म श्रवण करावे अशी पूर्वापार पद्धति आहे. अध्यात्म श्रवण करीत असतांना कानाचाही कान असणारी अतिशुद्ध जाणीव आंतमध्ये जागृत असावी लागते. अध्यात्म श्रवण करीत असतांना शुद्ध जाणिवेला काही क्षण आत्मसान्निध्य लाभत असतें तेंच खरें श्रवण होय ! ज्या ठिकाणी एकाग्र मनाने श्रवण, मनन होते यालाच परमार्थ असे म्हणतात. सत्संगतीमध्ये श्रवण, मनन, चिंतन ही साधना अत्यंत महत्त्वाची सांगितली आहे. संतांच्या सान्निध्यांत श्रवण-मननादि साधना सहज होत असते. साधक हा स्वतंत्र चिंतन करूं लागला की, त्याचा विवेक जागृत होतो. विवेकाने नित्य काय, अनित्य काय याचा निवाडा करता येतो. देह अनित्य, आत्मा – नित्य ही गोष्ट आत्मप्रचितीला आली म्हणजे खरे समाधान होते. जीवनामध्ये सर्व साधनांचे सार हे आत्मसमाधान आहे. पहा ! परमार्थाची वाटचाल श्रवणाने सुरू होते आणि परमार्थाचा राजमार्ग अनेक साधनांद्वारे समाधिसुखापर्यंत जाऊन पोहोचतो.
अध्यात्म श्रवणाचा परिणाम सहजच मननांत होतो. शुद्ध मनाने बाह्य विषयांचा संग सोडला की तें मन सुखाकरितां आंतच मनन करूं लागते. एकदेशीय असणारे मन विषयांचा संग सोडून आत्मचिंतनांतच रमूं लागतं. आत्मचिंतन करता करतां सहजच समाधिसुखाचा लाभ होतो. क्षणमात्र किंबहुना दीर्घकाळ टिकणारा आत्मानुभव महत्त्वाचा असतो. श्रीसमर्थांनी श्रवणभक्तीला फार महत्त्व दिले आहे. “मनाच्या तोडून ओढी । श्रवणी बैसावें आवडी” श्रवणभक्ति ही सर्व साधनांचे सार आहे म्हणून श्रवण करावें.
संगत सज्जन महानुभावीं । परमार्थ चर्चा करीत जावी ।
हईगई सर्वथा न करावी । ज्ञातेपणे करूनी ॥ ३ ॥
ज्यांनी परमार्थ-मार्गामध्ये बारा-बारा वर्षे साधन अभ्यास केला, स्वप्रयत्नांनी आपुल्या चंचल मनाला शांत स्वरूपामध्ये स्थिर केलें, अशा महापुरुषांनाच संत, साधु, सज्जन असे म्हणतात. ज्यांना आनंदरूप परमात्मस्वरूपाचा यथार्थ बोध झाला आहे, जे नित्य स्वरूपानुसंधानांत रममाण असतात त्यांना महापुरुष, महानुभवी असे म्हटले जाते. अशा संतसज्जनांच्या सान्निध्यांत कांहीं सुखसंवाद, कांहीं परमार्थ चर्चा करीत जावी अशी पद्धति आहे. महापुरुषांच्या सान्निध्यांत बसून आपल्या अडीअडचणी विचाराव्यात. वेदान्ताचा अभ्यास करणाऱ्या साधकाने स्वतः सिद्धान्त कसा अनुभवावा हे संतांच्या जवळ विचारावे. मुळांतच साधकाच्या ठिकाणी सद्भाव, सद्विचार, सदुपासना, सद्विवेक, सत्संगति ही सातत्याने असावी. सत्पुरुषाच्या संगतीमध्ये बराच काळ अभ्यास केला तर शुद्ध परमार्थ आकलन होतो. पण आतां आपणास खूप काही समजले आहे, असा दांभिकपणा शिरला, तर साधक धोक्यांत येण्याची शक्यता असते. महापुरुषाच्या सान्निध्यांत थोडा जरी आळस केला तरी साधकाचे मोठेच नुकसान होते. “आळसाचे संरक्षण । परमार्थाची बुडवण” जीवनामध्ये असे ज्ञातेपणाचें, मीपणाचें आवरण हे अत्यंत धोक्याचे समजावें. मी स्वतः कोणी तरी आहे, मला सर्व काही समजले आहे, आतां कांही करण्याची आवश्यकता नाही असा हा मूढभाव सोडून द्यावा. साधकाची साधना थोडीशी ढिली पडली की त्या साधकाची प्रगति खुंटते. मग तो साधक परमार्थामध्ये फारसा प्रगत होत नाही.
परमार्थ उठाठेवी करितां । लाभचि आहे तत्त्वतां ।
दिवसेंदिवस शुधता । वृत्तीस होये नीच नवी ॥ ४ ॥
परमार्थमार्गाची वाटचाल करीत असतांना प्रयत्नवादाला अत्यंत महत्त्व दिले आहे. पहा ! “यत्न तो देव जाणावा” असे हे अत्यंत महत्त्वाचे सूत्र साधकाच्या स्मृतीमध्ये असावेंच. साधकाने आपल्या जीवनामध्ये तत्त्वचिंतन, आत्मचिंतन, ज्ञानयोग, ध्यानयोग अशा प्रकारची अतिउन्नत साधनाही केली पाहिजे. साधकीय जीवनामध्ये साधनेचा व्यासंग सतत असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मानवी जीवनामध्ये सुख अथवा दुःख, फायदा अथवा तोटा हा त्वरित समजला पाहिजे. आपुल्या मनोवृत्तीचा स्वभाव सहजगत्या बहिर्मुख असतो हे अगदी खरे आहे. म्हणूनच विषयांत रमणाऱ्या मनोवृत्तीला सुखाचा क्षण कधीच सांपडत नाही. कारण जगांतील सर्व विषय ह्या सुख-दुःखाला कारणीभूत असतात. म्हणून साधकाने सातत्याने साधन अभ्यास करावा. साधन करीत असतांना कधींना कधी चित्तवृत्ति शांत होते. शांत असणाऱ्या मनोवृत्तीला आत्मसुखाचा क्षण सांपडतो. साधनशील असणाऱ्या साधकाची चित्तवृत्ति दृश्य पदार्थाचा संग सोडून आत्मसुखामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करीत असते. अभ्यासाने, आत्मचिंतनाने आपले मन जितकें हलके होईल तितकें तें ऊर्ध्व आत्मस्वरूपाकडे धाव घेत असते. मनोवृत्तीला पारदर्शकता प्राप्त होते, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अतिशुद्ध झालेले मनच साधनेचा एकएक टप्पा ओलांडून स्वरूपसुखापर्यंत पोहोचू शकते. अतिसूक्ष्म झालेल्या मनाला शुद्ध मन असे म्हणतात. पारदर्शी झालेल्या शुद्ध मनाने केलेली साधना परमसुखाचा क्षण प्राप्त करून देते.
श्रवण आणि मनन । या ऐसें नाहीं साधन ।
म्हणोनी हे नित्य नूतन । केले पाहिजे ॥ ५ ॥
साधकाने आपल्या जीवनांत श्रवण नांवाचे साधन श्रवणेंद्रियांनी (कानांनी) करावयाचे असते. श्रवणेंद्रिय हे सतत जागृत असावें लागते. कानाचाही कान अशी आंतमध्ये असणारी शुद्ध जाणीव स्थिर आणि सावध असेल तर श्रवण उत्तम घडते. श्रवण केलेला विषय जाणिवेला समजला की त्याचा अर्थही मनामध्ये ठसतो. सत्पुरुषांच्या सान्निध्यांत वेदान्ताचे श्रवण घडले तर साधकाचे जीवन धन्य होते. अशा श्रवणाचा परिणाम सहजच चित्तशुद्धीमध्ये होतो. “श्रवणें घडे चित्तशुद्धी । श्रवणे होये दृढबुद्धि । श्रवणे तुटे उपाधि । अभिमानाची । १ । श्रवणे प्रबोध वाढे । श्रवणे प्रज्ञा चढे । श्रवणे विषयांचे ओढे । तुटोनिया जाती” श्रवण हे सातत्याने घडले तर साधकाचा अभिमान कमी होतो, प्रबोध शक्तीच्या साह्याने त्याची प्रज्ञाही जागृत होते. साधकाची प्रज्ञा जागी झाली म्हणजे विषयांची ओढ कमी होत जाते. प्रज्ञा ही परतत्त्वाशी एकरूप होण्यासाठीच श्रवण भक्ति सतत करावी.
कोणताही उपदेश एकाग्र मनानें श्रवण केला तर त्याचा परिणाम मननांत, चिंतनांत होतो. अंतःकरणांत उदय पावलेल्या वृत्तीचा जो विषय आहे त्याचे पुनःपुन्हां स्मरण करणे हा मनाचा सहज स्वभाव आहे. मनामध्ये जो विषय असतो त्याचे अखंड स्मरण ठेवणे याला ‘स्मृतिमनन’ असे म्हणतात. श्रवण म्हणजे ऐकलेल्या विषयाची स्मृति ठेवणे आणि मनन म्हणजे त्याच विषयाचा वारंवार विचार करणे. परमार्थ-मार्गामध्ये ही दोन्ही साधने अत्यंत महत्त्वाची आहेत. कोणतीही गोष्ट ऐकल्याशिवाय कळत नाही. ऐकलेल्या गोष्टीचे मनन-चिंतन केल्याशिवाय त्या गोष्टीचा गुंता सुटत नाही. “विचारें ऊर्ध्व चढती । तयासीच ऊर्ध्व गती । येरा सकळां अधोगती । पदार्थ ज्ञान । ‘ साधकांनी श्रवण आणि मनन या दोन्ही साधना सर्वार्पण भावाने स्वीकाराव्यात. अशा सत्शील साधकाचे जीवन कधीतरी धन्यच होईल.
जैसें ग्रंथीं बोलिलें । तैसेचि स्वयें पाहिजे जालें ।
येथे क्रियेच्या माथां आलें । निश्चितार्थे ॥ ६ ॥
परमार्थामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण ज्या सांप्रदायाचा स्वीकार करतो, त्या सांप्रदायाचा एक प्रधान ग्रंथ असतो. त्या मुख्य ग्रंथांतील तत्त्वज्ञानाची, वेदान्ताची जी पठडी असेल त्या पठडीचा स्वीकार करावा लागतो. त्याच पद्धतीचा आचार, विचार, वाचन, मनन, चिंतन करावे असा दंडकही आहे. आपल्या सांप्रदायाचा जो एक अंतिम सिद्धान्त असतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनांतील उपासना ठरवावी. म्हणजे तदनुसार तत्कथनम्, तत्मननम्, तत्चिंतनम् हे अनुभवास येते. साधकाच्या जीवनामध्ये “एकचि संत एकच पंथ । एकचि ग्रंथ एकचि महंत । एकचि विचार तोही ज्वलंत । असला पाहिजे” साधकाच्या दृष्टीसमोर असे तेजस्वी विचार असावे लागतात. परमार्थाचा अंतर्बाह्य पसारा आपुल्या क्रियेवर अवलंबून असतो. साथकानें स्वतः क्रिया करून करवावी असाच दंडक आहे. “आधीं तें करावें कर्म । कर्मयोगें उपासना । उपासका सांपडे ज्ञान । ज्ञाने मोक्षची पावती” कर्मउपासना आणि ज्ञान, श्रवण-मनन आणि निजध्यास अशा तीन प्रकारच्या साधनेतून समाधान मिळविले पाहिजे. साधन अभ्यास करून निश्चित काय साधायचे असेल तर ते समाधान.
जे ग्रंथीं जो विचार । वृत्ती होये तदाकार ।
म्हणोनी निरूपण सार । भक्ति ज्ञान वैराग्य ॥ ७ ॥
परमार्थमार्गामध्ये अनेक संप्रदाय दिसून येतात. त्याचप्रमाणे त्या त्या सांप्रदायाचे अनेक सद्ग्रंथही उपलब्ध आहेत. आध्यात्मिक ग्रंथामध्ये जे विषय प्रतिपादन केलेले असतात ते वेदान्त विचाराचे, आत्मस्वरूपासंबंधींचे विचार असतात. अशा सविषयांचा विचार करीत असतांना आपुली वृत्ति सहजच वेदान्त विषयाशी एकरूप होते. पहा ! मन, बुद्धि, चित्त, जीवात्मा, परमात्मा याचे स्वरूप आणि त्यांचे कार्य ऐकतांना आपली मनोवृत्ति त्या विषयांशी तदाकार होऊ लागते. आपल्या चंचल मनाचा हा सहज स्वभाव आहे. आध्यात्मिक ग्रंथांतील विचारांशी तदाकार होणे ही मनाच्या स्थिरतेची पहिली पायरी आहे. त्याच विचारांचे मनन, चिंतन करून आपल्या स्वभावांत चित्त स्थिर करून अधिकाधिक शांतता संपादन करणे ही दुसरी पायरी आहे. साधकाने आपले सर्व जीवनच अंतर्बाह्य बदलणे ही खरी प्रक्रिया आहे. साधक हा सतत अभ्यासाने ज्ञानवैराग्य संपन्न झाला की तो परमार्थाचा अधिकारी होतो.
परमेश्वराची भक्ति ही नवविधा प्रकाराने केली जाते. ज्याचें अंतःकरण मृदु, कोमळ, प्रेमळ असते त्याच्या कडूनच परमेश्वराची भक्ति घडते. भक्तीला उत्तम अशी सद्भावाची जोड असावी लागते. ज्ञानसंपादन करण्यासाठी शुद्ध बुद्धि (प्रज्ञा) असावी लागते. शेवटी प्रज्ञा प्रयत्नांनी परतत्त्वाशी समरस होते. साधकाचा परतत्त्वाशी स्पर्श झाला म्हणजे साधक हा सिद्ध होतो, कृतार्थ होतो. पहा ! वैराग्य हे साधकाच्या पारमार्थिक जीवनाचे सारच म्हणावे लागेल. मानवी जीवन धन्य व्हावे असे वाटत असेल तर “त्यागात् शांति निरंतरम्’ हे सूत्र स्वीकारले पाहिजे. सर्वसंगपरित्याग हाच अंती कैवल्यपद प्राप्त करून देतो. विवेक-वैराग्यानेच ज्ञानाचे विज्ञान होते. अखेर साधनसंपत्तीचाही त्याग घडला की मोक्ष साधकाच्या सन्निधच असतो.
तो शिष्य म्हणे स्वामी सर्वज्ञा । सत्य करावी प्रतिज्ञा ।
नाशिवंत घेऊन, साधनां । वरपडे न करावें ॥ ८ ॥
सद्गुरूंच्या सान्निध्यात राहणाऱ्या शिष्योत्तमाने सद्गुरूंच्या समोर आपले विचार प्रगट केले. महाराज ! आपण माझ्या जीवनांतील भूत, भविष्य, वर्तमान हे सर्व काही जाणत आहांत. काही दिवसांपूर्वी आपण माझ्याकडून जें नाशिवंत मागितलें तें सर्व काही नाशिवंत मी तुमच्या पदी अर्पण केले आहे. आतां नाशिवंत म्हणून माझ्याकडे कांहीही उरलेले नाही. महाराज ! आपण पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली ब्रह्मवाणी सत्य करून दाखवावी अशी विनंती करतो. आपण केलेला सत्संकल्प, सत्यप्रतिज्ञा आतां यशस्वी कराल अशी खात्री वाटते. मी माझ्याकडून आपणास सर्व नाशिवंत दिले आहे. आपण त्या नाशिवंताचा स्वीकारही केला आहे. आता पुन्हां साधनेचा खटाटोप सांगून मला या उपासनेच्या कर्मकचाट्यांत अडकवू नका. आतां मी आपल्या समोर हात जोडून नम्रपणे उभा आहे. सद्गुरूंनी मागणी केल्याप्रमाणे शिष्योत्तमाला त्या नाशिवंताचा मथितार्थ, गर्भितार्थ समजलेला नव्हता. जीवनामध्ये नाशिवंत हे केव्हा सुरू होते आणि तें कुठपर्यंत असते याचे वर्म शिष्याला समजले नव्हते. आता यापुढे गुरूशिष्यांचा संवाद सुरु होईल. नाशिवंत कशाला म्हणतात ही गोष्ट सद्गुरु शिष्याला समजावून सांगतात.
साधक जोपर्यंत साधना करीत असतो तोपर्यंत त्याची साधनेची उमेद जोरात असते. साधनकाळांत त्या साधकाचा सूक्ष्म ‘मी’ जागृत असल्यामुळे त्याचे ज्ञान विज्ञान होत नाही. साधकाच्या ठिकाणी ‘मी’ हा ज्ञानांकुर जागा असतो तोपर्यंत त्याचे खरें समाधान होत नाही. म्हणून सद्गुरुपदी अनन्यशरण असावे हेच खरें.
अरे शिष्या चीत द्यावें । नाशिवंत तूंवां वोळखावें ।
साधन न लगे करावें । प्रतिज्ञाच आहे ॥ ९ ॥
सद्गुरु आपल्या शिष्याला अत्यंत प्रेमादराने उपदेश करतात. अरे बाळ ! मी तुला जे काही सांगणार आहे त्या गोष्टीकडे अत्यंत सावध होऊन लक्ष दे. पहा ! या जगामध्ये दोनच वस्तूंचा अनुभव येतो. जी अनात्म वस्तु आहे ती जड रूपाने चर्मचक्षूला दिसत असते. दिसणारी वस्तु ही नाशिवंत असते असा सर्वांचाच अनुभव आहे. यास सगुण साकार जड असे म्हणतात. या जगामध्ये जी कर्तृत्वप्रधान सगुण निराकार शक्ति आहे ती अव्यक्त रूपाने सर्वत्र व्यापून आहे. या ज्ञानप्रधान शक्तीचा शोध आणि बोध सद्गुरुकृपेने होऊ शकतो. जड आणि चंचल, अशाश्वत आणि शाश्वत, अनात्मा आणि अंतरात्मा. साधकाने या गोष्टीचा उलगडा करून घेतल्याशिवाय हा विचारांचा गुंता सुटणार नाही. आपण बद्ध कसे आहोत ही गोष्ट समजली म्हणजे त्यांतून सुटण्याचा मार्ग सांपडतो. विवेक विचाराने अज्ञान निवृत्ति झाली की सहज ज्ञानोदय होतो; पण त्या आनंदरूप ज्ञानस्मृतीमध्ये जे ‘मी’ हे भान जाणवत असते तें सुटता सुटत नाही. साधकाला स्वतःच्या प्रयत्नांनी बाहेरचे सर्व कांहीं सोडता येते पण हा ‘मी मात्र सोडता येत नाही. सद्गुरूंच्या सानिध्यांतच हा ‘मी’ स्वस्वरूपांत विरून जाऊ शकतो. शिष्योत्तमाने आपल्या सद्गुरुपदी सर्व काही देऊन टाकले होते, फक्त ‘मी’ तेवढाच शिल्लक ठेवला होता. सद्गुरूंची प्रतिज्ञाच होती, तूं जर मला सर्वस्व दिलेस तर तुला स्वरूपप्राप्ति करून देईन. नंतर तुला साधन अभ्यास करण्याची आवश्यकताच भासणार नाही.
प्रतिज्ञा करावी प्रमाण । ऐसें बोलतो हा कोण ।
नाशिवंत केलें मदार्पण । त्याहिमध्ये तो आला ॥ १० ॥
सद्गुरूंनी आपल्या शिष्याला एक सहज प्रश्न केला. बाबारे ! तूं एकदां सोडून दोनदां मला म्हणाला आहेस, ‘महाराज ! आपण आपली प्रतिज्ञा खरी करावी. बाळ, हा तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे. पण जो प्रश्न विचारला आहेस तो प्रश्न विचारणारा तूं कोण आहेस बरं ? अरे, तूं जर तुझे सर्वस्व मला दिले आहेस तर हा देणारा तुझा ‘मी’ तुझ्या ठिकाणी शिल्लकच कसा उरला ? जे नाशिवंत आहे ते मला अर्पण केल्यानंतर तूंही त्यामध्येच आला आहेस. तूं अजूनही तुझ्या जवळ काहीतरी शिल्लक ठेवले आहेस हे निश्चित. प्रत्येक मनुष्याजवळ शुद्ध आणि अशुद्ध अशा दोन वृत्ति, दोन मनें आणि दोन ‘मी’ असतात. स्थूल शरीराचा अभिमान सांभाळून कार्यरत असणारा मी बाह्यांग स्वरूपाचा उथळ असतो. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ति (गाढ झोप) ह्या तिन्ही अवस्था व्यापून असणारा ‘मी’ वासनेचा आधार घेऊनच वावरत असतो. अशा उथळ मीला आपण काय दिले, काय घेतले आणि काय राहिले याचा विचारच उमगत नाही. यालाच देहबुद्धीने बद्ध झालेला ‘मी’ म्हणावे लागेल. जीवनामध्ये ज्ञातेपणाने जो सर्व व्यवहार करतो तो आंतील दुसरा मी असतो. हा दुसरा मी आपल्या शुद्ध जाणिवेबरोबर कार्यरत असतो. हा मी कधीं कथीं सुवर्णधातूसारखा प्रिय सुखदही वाटत असतो. मनुष्याला सुख देणारा, आनंद घेणारा मी सोडवत नाही. मानवी मनाचा हा एक दोषच दिसून येतो. आपल्या जवळ असणारी उत्तम वस्तु दुसऱ्याला द्यावी असें वाटत नाही. हाच प्रकार देहांत असणाऱ्या ‘मी’ संबंधींचा असतो. विचारी साधकाने आपल्या जवळचे सर्वस्व दिले तर सद्गुरु त्या साधकाला स्वस्वरूप प्राप्त करून देत असतात. अरे बाळ ! “अनंतहस्ते कमलावरानें । देता किती घेशील दो कराने” साधकाने आपुलें प्रत्येक पाऊल विवेक-विचाराने टाकले पाहिजे. यापुढे गुरू-शिष्यांचा सुखसंवाद होईल तो पाहूया !
तूं म्हणसी जे दिधलें । तरी देयास कोण उरलें ।
जे उरलें तें झुरलें । मजकडे ॥ ११ ॥
अरे बाळ ! मी सर्वस्व दिले आहे अशी उगीचच वल्गना का करतोस ? पहा ! मी तुला काय मागितले आहे हे अद्यापि तुझ्या लक्षांतच आलेले नाही. जी वस्तु दिली तर ती हाताने घेताही येत नाही. अरे ! तुझ्या ठिकाणी जे चित्चैतन्य वास करून आहे त्या चैतन्यामध्ये असणारा ‘मी’ त्या ‘मी’ची मागणी आहे. पहा ! तुझ्या ठिकाणचा मी तुला हाताने देता येणार नाही आणि सद्गुरुकृपेनें प्राप्त होणारें आत्मधन हाताने स्वीकारताही येणार नाही. असा हा गुरुशिष्यांचा पारमार्थिक आत्मधनाचा गुप्त व्यवहार अव्यक्तरूपानेच होत असतो. जोपर्यंत तूं मला सर्वस्व दिले असे म्हणतोस तोपर्यंत देणारा जो तूं आहेस तो तुझ्या जवळच शिल्लक आहे. माझ्या सांगण्याप्रमाणे तुझ्या जवळ असणारा ‘मी’ तो माझ्याकडे येऊन माझ्या स्वरूपांत विरून गेला पाहिजे.
कोणतीहि वस्तु देण्याच्या आणि घेण्याच्या माध्यमाला त्रिपुटी असते. कोणत्याही त्रिपुटीला तीन अंगें असतातच. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी ज्ञानामध्ये जिरली की ज्ञान पूर्ण होते. त्याचप्रमाणे देणारा घेणाऱ्यामध्ये विलीन झाला की देण्या-घेण्याची प्रक्रिया पूर्ण होते. परमार्थाची वाटचाल ही द्वैतांतून अद्वैताकडे होत असते. त्या ठिकाणी देणारा जो ‘मी’ तो शिल्लकच उरत नाही.
तूं नाशिवंतामध्ये आलासी । आपणांस कां रे चोरिसी ।
नाशिवंत देतां चकचकीसी । फट रे पढतमूर्खा ! ॥ १२ ॥
सद्गुरु आपल्या शिष्याला अत्यंत प्रेमाने समजावून सांगतात. बाबारे, तूं आणि तुझ्या देहांत असणाऱ्या अहं स्फुरणासह ‘मी’चे भान हे सर्व काही नाशिवंतामध्येच आलें बरं ! अरे, तुझ्या ठिकाणी असणारा ‘मी’ हा अजूनही तूं लपवून ठेवला आहेस. अरे, हे ध्यानांत ठेव, “उदंड गुप्तरूपें करावें । तें आत्मयासी पडे ठावे” आत्मा हा सर्वसाक्षी असल्यामुळे तूं तुझा ‘मी’ कितीही चोरून लपवून ठेवलास तर त्यामध्ये तुझेंच नुकसान आहे. आतां तुझ्याजवळ असणारे नाशिवंत देतांना कचरतोस का बरें ! अरे, शहाण्या मनुष्याने आपला सरळ मार्ग सोडून मूढासारखे आड मार्गाने जाणे हे बरे नाही. श्रीसमर्थांनी अशा फसव्या शिष्याचा ‘फट रे पढतमूर्खा ! म्हणून त्याचा धिक्कारच केला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, “शिष्य पाहिजे धारिष्टाचा । शिष्य पाहिजे दृढव्रताचा । शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा । पुण्यशील” परमार्थमार्गामध्ये येऱ्या गबाळ्याचे काम नाहीं. पहा ! फट रे पढतमूर्खा हा येक परमाई मार्गातील शाब्दिक फटकाराच म्हणावा लागेल.
मानवी जीवनाचा प्रवास शरीर, मन आणि बुद्धि यांच्या समवेत होतो. आपल्या जीवनाची कार्यधुरा घेणारा हा जीवोऽहं अहंकार ‘मी’च्या स्वरूपांत अनुभवास येतो. पण ही बुद्धि आणि अहंकार सोडण्याचे धाडस मानवाला होत नाही. मानवाच्या ठिकाणी अहंकार अथवा ‘मी’ हा देण्याची जी वैराग्यवृत्ति हवी ती नसते. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या सान्निथ्यांत राहणारा शिष्य कधी कधी सहजच फसतो.
शिष्य विचारून बोले । स्वामी कांहींच नाही उरलें ।
अरे ‘नाही’ बोलणेही आलें । नाशिवंतामध्ये ॥ १३ ॥
स्वामींनी शिष्यावर थोडा शब्दांचा भडीमार सुरू केल्यावर शिष्य विचार करू लागला. आपण सर्व दिले असतांना आपले अजून काय चुकते हे शिष्यालाही उमजेना. शिष्याने पुन्हा एकदां शांत बसून विचार केला आणि नंतर उत्तर दिले. ‘महाराज ! मी आपल्या चरणी सर्वकाही अर्पण केले आहे. आता माझ्याजवळ काहीही उरले नाही.’ स्वामींनी शिष्योत्तमाला आपल्या जवळ बोलाविलें. अरे ! माझ्याजवळ काहीही नाही असे (‘नाही’ हे) बोलणारा कोण बरं ! नाही हे उद्गार कुठून आले ? अरे ! आहे आणि नाही हे दोन्ही शब्द जेथून उगम पावतात त्या जाणिवेच्या ठिकाणी अतिसूक्ष्म असणारा ‘मी’चा फुंज (स्मृति) हाही नाशिवंतामध्येच आला. नाशिवंताची मर्यादा कुठून कुठपर्यंत आहे हे नीट समजून घे. उगीचच धटिंगणासारखी बेजबाबदार उत्तरे देऊ नकोस. अरे ! सद्गुरूंनी सांगितल्याबरोबर ज्या शिष्याला समजतें, उमगतें तो प्रथम शिष्य समजावा. ज्याला दोन-चार वेळा समजावून सांगितल्यानंतर थोडेफार समजू लागते तो दुसऱ्या क्रमांकाचा शिष्य समजावा. अरें ! तुला कितीतरी समजावून सांगितले तरी अजूनही तुझें अज्ञान नाहीसे होत नाही. ज्याला पुनःपुन्हां सांगूनही समजत नाहीं तो तिसऱ्या क्रमांकामध्ये बसतो. म्हणून बद्ध, मुमुक्ष आणि पढतमूर्ख यांमध्ये तुझा तिसरा क्रमांक लागतो असे समज.
आपण एखादी अत्यंत प्राणप्रिय महत्त्वाची वस्तु आणून ठेवली की, ती वस्तु त्या ठिकाणी आहे असा शब्दप्रयोग करतो. किंवा ती वस्तु त्या ठिकाणाहून कोणीतरी नेली, की त्या ठिकाणी ती वस्तु नाही असा शब्दप्रयोग करतो. म्हणून ती वस्तु त्या ठिकाणी आहे हा शब्दप्रयोग आणि ती वस्तु त्या ठिकाणी नाही हा शब्दप्रयोग आपले अस्तित्वच सिद्ध करतो. म्हणून ‘हे आहे’ आणि ‘हे नाही’ असे हे दोन्ही शब्दप्रयोग नाशिवंतामध्येच आले.
आहे म्हणतां द्या कांहीं । नाहीं शब्द गेला तोहि ।
नाहीं नाही म्हणतां कांहीं । उपजलें की ! ॥ १४ ॥
अरे ! तुला अनेकदा सांगितले आहे, अजून तुझ्या जवळ काही शिल्लक असेल तर ते वेळीच मला देऊन टाक. सर्व दिल्यावर आपल्या जवळ कांहींच उरले नाही असा तुझा भाव दिसतो. पण आतां माझ्याजवळ काहीही नाही असे म्हणण्याची पद्धतीच आहे. आतां काहीही नाही किंवा आता काहीच उरलें नाहीं असा दोनदां केलेला शब्दप्रयोग शून्यत्व दर्शवितो. पहा ! शब्दांच्या द्विरुक्तीमध्येच त्या शब्दार्थाच्या अस्तित्वाचा अनुभव जाणवतो. शब्द हा फोल असतो त्या शब्दाचा अर्थभाव, गर्भार्थ, अनुभव हा प्रचितीचा असतो. मनुष्य हा आपल्या जवळ असणारे सर्व काही देऊन टाकतो. पण मनुष्याला अत्यंत प्राणप्रिय असणारा त्याचा आवडता ‘मी’ तो देत नाही. सद्गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये असणारे सूक्ष्म अंतर ते हेच समजावें. मी सर्व दिले आहे, आतां माझ्याजवळ काहीच नाही. दिले आहे आणि काहीच नाही. आहे आणि नाही या दोन शब्दांचे मुळाशी असणारे अतिसूक्ष्म अस्तित्वभान हेच त्या गोंडस ‘मी’चे स्वरूप होय ! सद्गुरूंच्या सान्निध्यांत स्वतःच्या ‘मी’चे बलिदान स्वस्वरूपांत करणारा शिष्य सहजच उद्धरून जातो. नाशिवंत असणारे नाहीसे झाले की अविनाश असणारें आत्मस्वरूप प्रचीतीस येते. साधक हा सद्गुरूच्या सान्निध्यांत स्वस्वरूप दर्शनाने पावन होतो, उद्धरून जातो. “पिपिलीकामार्गे हळुहळु घडे । विहंगमें फळाशी गांठी पडे । साधक मननी पवाडे । म्हणिजे बरें’ भूमीवरून वाटचाल करणाऱ्या मुंगीचा प्रवास आणि आकाशमार्गाने जाणाऱ्या पक्ष्याचा प्रवास यांमध्ये महदंतर असते. भूमीवरून प्रवास करीत असतांना त्या प्रवासाचे अंतर खूप वाटते आणि प्रवासाची गति ही प्रमाणांतच असते. पण तोच प्रवास आकाशमार्गाने करीत असतांना तो प्रवास जवळचा वाटतो आणि जलदगतीने होतो. साधकाने अशा ज्ञानमार्गाचा स्वीकार करून याच जन्मी येणेचि काळें उद्धरून जावें हाच परम-पुरुषार्थ होय !
येथे सुन्याचा निरास जाला । आत्मा सदोदित संचला ।
पाहों जातां साधकाला । ठावचि नाहीं ॥ १५ ॥
आत्माराम ग्रंथाचे माध्यम घेऊन दीर्घकाळ चालू असलेला श्रीगुरु-शिष्यांचा संवाद आतां संपत आला. सद्गुरूंनी अत्यंत महत्त्वाचा केलेला सदुपदेश शिष्योत्तमाला नीट समजला आहे. त्याच्या ठिकाणी असणारे अज्ञानदारिद्र्य दूर झाल्यामुळे मानवी जीवनामध्ये असणारे शून्यत्व हे मिथ्या आहे याची खात्री पटली. अंधार संपला की प्रकाश हा असतोच. अज्ञान ओसरतांच स्वयंप्रकाश आत्म्याची ज्ञानज्योत प्रकाशू लागते. साधकाच्या ठिकाणी स्वयंप्रकाश आत्म्याचे ज्ञान विलसूं लागले की साधकाचे ‘मी’ हे स्वतंत्र अस्तित्व राहात नाही. त्याच्या ठिकाणी असणारी अपरा प्रकृति, मन, बुद्धि आणि अहंकार अशा अष्टधा प्रकृतीचा निरास होतो. यामध्ये स्थूल आणि सूक्ष्म देहाचे भान कमी होते. त्याचप्रमाणे अविद्यात्मक असणारा कारणदेह त्या अज्ञानाचाही निरास होतो. पण अतिसूक्ष्म असणारा ‘मीपणा’ हा अंशमात्र असतोच. स्वयंप्रकाश असणाऱ्या आत्मतेजानेंच तीनही देहांचा निरास होतो. आपण आपल्या आत्मतेजानेंच सतत प्रकाशित करतो. साधकाला आत्मज्ञान झाल्यामुळे तो तिन्ही अवस्था ओलांडून ज्ञानावस्थेची वाटचाल करीत असतो. आत्मस्वरूप हे साक्षीरूपाने विश्वाला व्यापून असतेच. साधक त्या आत्मस्वरूपाशी समरस झाला, ऐक्य पावला की तो साधकावस्थेतून सिद्धावस्थेत पोहोचतो. मानवी जीवनामध्ये प्रवासाची सतत वाटचाल केली तर प्रवासाचे ठरलेलें अंतर कमी होते. त्याचप्रमाणे ज्ञानोत्तर साधनेचा सतत अभ्यास केला तर समाधान हे अंतःकरणांत स्थिरच राहते.
अभिन्नज्ञाता तोचि मान्य । साधक साध्य होतां धन्य ।
वेगळेपणे वृत्तिसून्य । पावती प्राणी ॥ १६ ॥
ज्या महापुरुषाला परमोच्च अशा परतत्त्वाचा स्पर्श झाला आहे, जो आपल्या स्वस्वरूपाशी एकरूप असतो, त्यालाच अभिन्नज्ञाता असे म्हणतात. परतत्त्वाशी समरस झालेला महापुरुष सर्व साधकांचा प्राणप्रिय आधार असतो. अनेक साधक त्यांच्या संगतीमध्ये राहून स्वतः उद्धरून गेले आहेत. साधकाने आपल्या जीवनामध्ये स्वरूप प्राप्तीचे ध्येय गाठलें की तो साधक कृतार्थ होतो. कोणताहि ज्ञाता हा ज्ञेयस्वरूप वस्तूशी तदाकार झाला की त्याला ज्ञाता असे म्हणतात. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी जिथे विरून जाते त्यालाच अभिन्नज्ञाता असे म्हणतात. ज्ञानमार्गाची उपासना करीत असतांना सुखस्वरूप असणाऱ्या ज्ञानाचा संग जडतो. साधकाला प्रचितीचे ज्ञान असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकदां शुद्ध ज्ञानाचा अनुभव आला की तो आनंद सतत असावा अशीच सदिच्छा असते. साधकाचा ज्ञानसंग साधकाला सतत समाधान देत असतो. मानवी जीवनामध्ये ज्ञानावस्था प्राप्त होण्यासाठी ज्ञानमार्गाची उपासना हीच श्रेष्ठ उपासना आहे. परमार्थामध्ये अभिन्न आणि भिन्न अशा दोन अवस्था वेगवेगळ्या आहेत. आनंदाशी समरस असणे, याला अभिन्न ज्ञाता असे म्हणतात. जो इंद्रियांच्या समवेत विषयांशी सलगी करतो तो सतत भिन्नच वरपडा राहतो. जिथे अज्ञान असते तिथेच द्वैतभाव जाणवतो. द्वैत विचारानेच वृत्तीमध्ये अज्ञान अंधःकार दाटून राहतो. अज्ञान हेच मनुष्याला जन्म-मरणाच्या परंपरेत अडकविते. म्हणून मानवी जीवनामध्ये ज्ञान आणि अज्ञान, अभिन्न आणि भिन्न हे समजून घ्यावे. त्यांतील जे उत्तमोत्तम आहे, साधकाला समाधान देणारे आहे, त्याचाच स्वीकार करावा.
वेगळेपणे पाहों जातां । मोक्ष न जोडे सर्वथा ।
‘आत्माहि दिसेसा नाहीं’ । मतावरपडे होती प्राणी ॥ १७ ॥
प्रत्येक साधक आपल्या कुवतीप्रमाणे साधन अभ्यास करीत असतो. प्रत्येकाला साधनेतील अनुभव कळत न कळत येतच असतात. आपणास आत्मज्ञान व्हावे अशी प्रत्येकाची तळमळही असतेच. बराच काळ उपासना स्थिर झाली म्हणजे आत्मानुभव येऊ लागतो. पण ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान अशा त्रिपुटीचा गोंडस अनुभव साधकाला पुढे जाऊ देत नाही. साधकाच्या जाणिवेला या आनंदाचा स्पर्श झाला की साधकाला या आनंदाचाच मोह पडतो. साधक या आनंदांतच रमण्याचा प्रयत्न करतो. साधकाच्या जीवनांत “आनंदाचा अनुभव । हाही वृत्तीचाचि भाव” मी आनंदांत आहे हे आनंदाचे अतिसूक्ष्म भानहि आत्मस्वरूपाहून वेगळे असते. जोपर्यंत आपला ‘मी’ स्वस्वरूपांत पूर्ण विलीन होत नाही, तोपर्यंत हा वेगळेपणा असतोच. अशा वेगळेपणामुळेच साधकाला अत्यंत जवळ असणारा मोक्ष सहज प्राप्त होत नाही. पहा ! त्रिपुटीमध्ये सांपडलेला साधक ज्ञातेपणाच्या स्मृतीमध्येच अडकला जातो. आत्मा हा दिसणारा पदार्थ नाही. किंवा त्याला वेगळे राहून अनुभवता येत नाही. ज्यांना आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होत नाही, असे साधक पाखंडी मतास पुष्टी देत राहतात. मनादि इंद्रिये अनात्मवस्तूंचे ज्ञान करून देणारी साधने आहेत. प्रत्येक इंद्रियाला त्याच्या क्षेत्रामध्ये सामर्थ्य असते. पण आत्मस्वरूप सर्व इंद्रियांच्या पलीकडे असल्यामुळे त्या ठिकाणी इंद्रियांची धांव खुंटते. अतींद्रिय असणारी आत्मवस्तु इंद्रियांना दिसत नाही. मन व वृद्धि ही दोन्ही इंद्रिये जड असल्यामुळे या दोघांना आत्माच प्रकाश देतो. मनाचे आणि बुद्धीचे आत्मसमाधान झाले नाहीं की, ही दोन्ही इंद्रिये बाह्य मताकडे झुकतात. मग कधीं शून्यवाद तर कधी संशयवाद घट्ट धरून स्वतःच्या आत्महिताची हानि करून घेतात.
आपुलिया डोळां जें देखिलें । तें पंचभूतांमध्ये आलें ।
ऐसें जाणोनी दृढ धरिलें । ते नाडले प्राणी ॥ १८ ॥
आपुल्या चर्मचक्षूंना आणि ज्ञानचक्षूंना जे दिसते, भासतें तें सर्व काही निर्माण झालेले आहे, जे निर्माण झाले आहे ते सर्वच पंचभूतांमध्ये येते. शेवटी जे दिसते आणि भासतें तें सारे विश्वच नाशिवंत समजावें. साधन करणाऱ्या साधकाने अशा नाशिवंताचा अभ्यास करून त्याचाच ध्यास धरला तर त्याची नकळत फसवणूकच होते. “पाण्यांतील म्हैसीची साटी । करणे हे बुद्धीच खोटी । शोधिल्यावीण हिंपुटी । कासया व्हावे । ” पाण्याच्या तलावांत बसलेल्या म्हैसीचा व्यापार, तलावाच्या किनाऱ्यावर बसून करणारा व्यापारी सहजच फसला जातो. कारण त्या म्हैसीचा शोध न करता अंदाजाने केलेला व्यापार तोट्यामध्ये येतो. त्याचप्रमाणे साधन करणाऱ्या साधकाने न जाणतां शेंकडों साधने केली तरी त्यामध्ये त्याचे समाधान होणार नाही. साधनशील साधकाची साधना चालू असतांना त्याच्या साधनेमध्ये कथीं प्रकाश, तर कधी चंद्रज्योति दिसतात. कधी नाद, बिंदु, प्रणव, कधी ओंकार दिसू लागतो. साधक हा अशा अंतर्दृश्याला ब्रह्म समजून तेथेंच थांबतो. पहा ! ज्ञानदृष्टीला जे दिसतें तें सर्व काही अनुभवामध्येच येते. अनुभवाच्या ठिकाणी त्रिपुटी ही असतेच. अनुभवाच्या पातळीवर असणारे कोणतेही ज्ञान हे पंचभूतामध्येच येते. डोळ्यांनी पाहिलेले बाह्य-दृश्य असो किंवा ज्ञानदृष्टीने पाहिलेलें आत्मदृश्य असो हे सर्व मायेच्या पसाऱ्यामध्येच आले. जीवनभर साधन करणाऱ्या साधकाची शेवटी अशी फसगत होते.
जो पंचभूतांचा दास । तयास मायेमध्ये वास ।
भोगी नीच नव्या सावकास । पुनरावृत्ती ॥ १९ ॥
ज्यांना हे पंचभूतात्मक विश्व सत्य वाटते. जो जीवनभर ह्या पंचभूतांचा दास होऊन सेवा करतो, त्याला संगदोषामुळे जीवनभर या दृश्य मायेमध्येच राहावे लागते. विकारमय असणारी ही माया जिवाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. मानवी जीवनामध्ये जीवनभर संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण अशा असत्क्रिया घडत असल्यामुळे मनुष्याला सुख-दुःखाचे भोग भोगावेच लागतात. प्रारब्धवशात आत्मविस्मृति झाली म्हणजे मानवी जीवनच विस्कळित होते. वासनेमुळे मनादि चैतन्याला नीच, नव्या जन्म-मरणाच्या परंपराही भोगाव्या लागतात. पहा ! वासना म्हणजे, संकल्प-विकल्प करणाऱ्या मनाला सतत विषयांतच रमविणारी ती वासना होय ! अशा वासनेमुळेच बद्ध जीवाला जन्म-मरणाच्या कठीण यातना भोगाव्या लागतात. विषयवासनेत गुंतलेला जीव कालचक्राच्या आधीनच असतो. वासना तृप्त होण्यासाठी जीवाची मोठीच धडपड चालू असते. पण वासना तृप्त होण्याचा जो सुलभ मार्ग आहे, तोच सांपडत नाही. चुकीच्या प्रयत्नामुळे मानवाला ह्या जन्म-मृत्यूच्या परंपरेत पुनःपुन्हां अडकावे लागते. जोपर्यंत जीवाला जीवपण आहे तोपर्यंत ही वासना जीवाला सोडून राहात नाही. पहा पाण्याचे द्रवत्व, हा पाण्याचा अंगभूत गुणधर्म आहे. त्याचप्रमाणे जिवाच्या ठिकाणी असणारी वासना ही जीवावस्थेचा अंगभूत असणारा दोषच आहे.
तो शिष्ये विनंती केली । म्हणे आशंका उद्भवली ।
पंचभूतांची सेवा केली । बहुतेकी ॥ २० ॥
आंधळा माणूस काठीच्या आधारानेच आपुल्या जीवनाची वाटचाल करीत असतो. त्याचप्रमाणे साधकाने आपुलें साधकीय जीवन सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचा आधार घेऊन यशस्वी करावें. सद्गुरूंच्या सान्निध्यांत साधना करणाऱ्या साधकाला सहज एक शंका उत्पन्न झाली. त्या साधकाने सद्गुरूंना विनंतीपूर्वक प्रश्न विचारला, महाराज, या पृथ्वितलावर जे ऋषिमुनी, जपी-तपी, साधुसंत होऊन गेले त्यांमध्ये बहुतेकांनी या पंचभूतांची कमी-अधिक सेवा केली आहे. या संत मंडळींनी पंचभूतांमध्ये राहूनच पंचभूतांची सेवा केली, हे अगदी खरें आहे. कोणी पाण्यामध्ये उभे राहून सूर्याची उपासना केली. कोणी दगडाचे टाळ वाजवून भगवंताचें भजन केले. तर कोणी लेखणीचा उपयोग करून तत्त्वज्ञानासारखे ग्रंथ लिहिले. कोणी वेदांचा अभ्यास करून वेदान्त, सिद्धान्ताचे ग्रंथ तयार केले. अशा प्रकारे प्रत्येकाने मधून-मधून पंचभूतांचा आधार घेऊनच स्व-पर उद्धाराचे कार्य केले आहे. जो कोणी पंचभूतांमध्ये वास करून राहतो त्याला पंचभूतांचें दास्यत्व पत्करावे लागते.
सकळ सृष्टीमध्ये जन । साधु संत आणि सज्जन ।
करिती भूतांचे भजन । धातुपाषाणमूर्ति ॥ २१ ॥
या पृथ्वितलावर वेगवेगळ्या समाजांतील असंख्य माणसे आहेत. तसेच साधु-संत, महानुभवी, संन्यासी आणि यतिराज असे अनेक महापुरुषही दिसून येतात. प्रत्येकाचा परमार्थपंथ आणि त्यांची उपासना पद्धति वेगवेगळ्या स्वरूपाची असते. पहा ! कोणी सूर्याची उपासना करतात. कोणी चंद्राची उपासना करतात. कोणी दगडाच्या मूर्तीची पूजा करतात. कोणी शंकराच्या पिंडीवर सहस्र कुंभांचा अभिषेक करतात; तर कोणी सद्गुरूंच्या समाधीवर सहस्र तुलसी, लक्षबिल्वदल वाहून पूजा बांधतात. तर कोणी पंचधातूंच्या मूर्तीची यथासांग पूजा करतात. प्रत्येक जण आपल्या उपासनेमध्ये किंवा ध्यानधारणेमध्ये अशा पाषाण मूर्तीचा अवलंब घेत असतात. परमेश्वरावर असणारे शुद्ध प्रेम हे डोळस असते. अशा शुद्ध प्रेमांतून उपासकाचे अष्टसात्त्विकभाव जागृत होतात. शेवटी उपासना करणारा उपासक कांहीं काळ देहभाव सोडून आत्मानंदांत रममाण होतो.
जे कोणी नित्यमुक्त जाले । तेही धातुपूजन केलें ।
तरी ते पुनरावृत्ती पावले किंवा नाहीं ? ॥ २२ ॥
भूतकाळामध्ये अनेक महापुरुष नित्यमुक्त होऊन गेले. त्यांची जीवनपद्धति सामान्य माणसासारखीच दिसत असे. पहा ! राजा जनक, शुकमुनि, सनकादि मुनि, वसिष्ठमुनि हे महापुरुष नित्यमुक्तीचा अनुभव घेत होते. असा अद्वैतानुभव घेत असतांना त्यांची जीवनपद्धति सुसूत्र चालू होती. देहादिक प्रपंच सांभाळून उत्तम असणारी “सहजावस्था” आपल्या स्वस्वरूपाचें अनुसंधान ठेवता येते. हे महापुरुष देहाने धातूच्या मूर्तीची पूजा करीत असतांना; किंवा पाषाणमय समाधीची पूजा करीत असतांना आत्मानुसंधान ठेवत होते. आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी अतिदक्ष असणाऱ्या महापुरुषाला नित्यमुक्त असे म्हणतात. अशा महापुरुषाने आपल्या जीवनांत कांहीं सत्कर्मे केली तर ती कमें त्याला बाधक ठरत नाहीत. पाण्यांतील कमलपत्राप्रमाणे हे महापुरुष सर्वांतून अलिप्त असतात. सत्शिष्याने श्रीगुरूंना विचारलेला प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सामान्य मनुष्याला बद्ध कोण आणि सिद्ध कोण या दोघांतील फरकच कळत नाही. जोपर्यंत हा प्रश्न बुद्धीच्या पातळीवर सोडविला जात नाही तोपर्यंत बद्ध आणि सिद्ध एकसारखेच वाटतात. राजहंस पक्षी दूध आणि पाणी याचा निवाडा करतो, त्याचप्रमाणे नित्यमुक्तांची जीवनावस्था आणि त्यांची जीवनगति, अंतीगति, अंतीमति गति कोणती याचा बोध श्रीसद्गुरु सांगतील.
ऐसा शिष्याचा अंतर्भाव । जाणोनि आनंदला गुरुराव ।
म्हणे सीघ्रचि हा अनुभव । पावेल आतां ॥ २३ ॥
सद्गुरूंनी आपल्या शिष्यांच्या मनांतील सद्भाव ओळखला. शिष्याच्या विचारामध्ये खूप परिवर्तन झाले आहे हे पाहून सद्गुरूंना आनंद वाटला. आपल्या विचारामध्ये आत्मविश्वास संपादन केलेल्या या शिष्याला आतां स्वरूपाचा अनुभव येईल असा सद्भावही प्रगट केला. आतापर्यंत दीर्घकाळ श्रीगुरु-शिष्यांचा सुखसंवाद चालूच होता. शिष्याच्या ठिकाणी असणारे पाखंडी मत खोडून काढण्यासाठी सद्गुरूंना खूप प्रयत्न करावे लागले. पहा ! सुवर्णाचे लोखंड होण्यास फार काळ लागत नाही. सुवर्णाला मातीचा संग जडला की सुवर्णाची माती होते. पण लोखंडाचे सुवर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो. परमार्थामध्ये प्रथम सामान्य मनुष्याला भक्तिमार्ग दाखवावा लागतो. त्याला तत्त्वज्ञानाचे धडे शिकवावे लागतात. परमार्थ मार्ग दृढ झाला म्हणजे त्याला वेदान्ताच्या पटावर माया-ब्रह्म, जड, चंचळ आणि निश्चळ याचा बोध करावा लागतो. सद्गुरूंना एक साधक तयार करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. खूप प्रयत्न केल्यानंतर या शिष्याची तयारी झालेली दिसते.
ऐसें विचारूनिया मनीं । कृपादृष्टी न्याहाळुनी ।
शिष्याप्रती सुवचनीं । स्वामी बोलते जाले ॥ २४ ॥
सद्गुरूंनी आपल्या अमृतदृष्टीने शिष्याकडे पाहिले. थोडावेळ ज्ञानदृष्टि स्थिर करून शिष्याचा भविष्यकाळ न्याहाळून पाहिला. प्रत्येक साधकाचा भूत, भविष्य आणि वर्तमानकाळ हा वेगवेगळ्या अवस्थांनी परिवर्तन झालेला असतो. मनुष्याला त्रिविध-तापाचे चटके बसल्याशिवाय त्याला परमेघराची आठवण होत नाही. साधक हा संग सोडून परमार्थाकरिता बाहेर पडतो त्यावेळी तो त्रिविध तापाने पोळलेला असतो. अशा साधनशील शिष्याला सद्गुरु अत्यंत प्रेमाने बोध करतात. सद्गुरूंच्या सान्निध्यांत मधुरशब्द आणि कृपादृष्टि ही अत्यंत महत्त्वाची असते. सद्गुरूंचे शब्द ब्रह्म हे अमृतमोलाचे असतात. तसेच सद्गुरूंच्या कृपादृष्टीमधून नित्यमुक्तीचे सामर्थ्य प्राप्त होते. सद्गुरूंनी आपल्या शिष्याला जवळ बोलावून अतिशय गोड आवाजांत अत्यंत महत्त्वाचा सदुपदेश केला. जीव-शिव, पिंड-ब्रह्मांड, मायाब्रह्म यांचा विस्तार सांगितला. श्रीसद्गुरु आतां शिष्याबरोबर बोलू लागले. सद्गुरूंनी तत्त्वज्ञानाचा, वेदान्ताचा एक-एक प्रश्न उकलून सांगण्यास सुरुवात केली.
प्राणी देह सोडून जाती । परी वासनात्मक शरीरें उरती ।
तेणे पुनरावृत्ती भोगिती । वासना उरलिया ॥ २५ ॥
सद्गुरूंनी आपल्या शिष्योत्तमाला उपदेश करण्यास सुरुवात केली. अरे ! पृथ्वीतलावर असंख्य माणसे जन्माला येतात, काहीकाळ वावरतात, आणि शेवटी देह सोडून निघून जातात. कालचक्राप्रमाणे मनुष्याला जन्म आणि मृत्यु हा असतोच. प्रत्येक मनुष्य स्थूल देह सोडून जातो पण त्याचा वासनात्मक सूक्ष्म देह हा वास करून असतोच. ह्या वासनेचे मूळ स्वरूप जाणिवेतच आहे. “वासना मुळीची अभेद । देहसंबंधे झाला भेद | तुटता देहाचा संबंध । भेद गेला । ” या चंचल मनाला विषयांत रमविणारी ही वासना मुळांतच जीवाच्या ठिकाणी असते. ही जीवावस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत ही वासना जिवाला पुनःपुन्हां देह धारणा करावयास लावते. जीव आणि वासना यांचे अतूट नाते असल्यामुळे दोघेही नवीन जन्म घेण्यास उत्सुक असतात. मनुष्याच्या ठिकाणी वासना असल्यामुळे मनुष्याला प्रतिजन्मी आत्मघात हा ठरलेलाच असतो. वासनात्मक असणारा सूक्ष्म देह हा स्थूल देहाचा आधार असतो. स्थूलापेक्षां सूक्ष्मामध्ये अधिकच सामर्थ्य असते. स्थूलदेहामध्ये वासना तृप्त झाल्या नाहीत तर सूक्ष्म देहामध्ये नवीनच वासनांचा उदय होतो. पहा ! एका जोंधळ्याच्या कणसांतून हजारों दाणे तयार होतात. त्याचप्रमाणे जिवाच्या ठिकाणी हजारों वासनात्मक – वृत्ति उदय पावतात. मनुष्याच्या देहांत जिवाचे अस्तित्व आहेच. जोपर्यंत जीवावस्था आहे तोपर्यंत, जीवाच्या ठिकाणी जोपर्यंत वासना आहेत तोपर्यंत त्याला पुनर्जन्म आहे हे निश्चितच.
मूळ या स्थूळदेहाचें । लिंगदेह वासनात्मक साचें ।
राहाणे तया लिंगदेहाचें । अज्ञानदेहीं ॥ २६ ॥
या स्थूळदेहाचे मूळ अस्तित्व वासनात्मक असणाऱ्या लिंगदेहामध्येच आहे. वासनात्मक असणारा हा लिंगदेह कारण देहामध्ये वास करून राहतो. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ति अशा तीन देहांना कारणरूप असणारे हे गाढ अज्ञानच आहे. या अज्ञानाच्या ठिकाणी हा लिंगदेह सुप्तरूपानें वास करून असतो. मानवाच्या अज्ञानग्रंथी या लिंगदेहामध्येच असतात. “जब न सुटे ही लिंग बेडी । तब न चुके चौऱ्यांशी बांधवडी” साधकाला ही जन्म-मरणाची परंपरा टाळण्यासाटीं लिंगदेहाचा संग सोडावा लागतो. पहिल्या तीनही देहांमध्ये अज्ञानरूपी वासनेचा संग असतोच. मनुष्य-देहामधील बद्ध आणि मुमुक्षु हे या तीनही देहाच्या अधीनच असतात. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी असणारी अज्ञानग्रंथी सुटत नाही.
सूर्याच्या प्रकाशामुळे पृथ्वितलावरचा अंधकार नाहीसा होतो. त्याचप्रमाणे साधकाच्या साधनेतून साधकाचा ज्ञानोदय झाला की अज्ञान अंधकार नाहीसा होतो. पाहा ! एक अग्नीची ठिणगी प्रचंड असणाऱ्या कापसाच्या ढिगाला भरम करून टाकते. तशीच ही वासना, हा लिंगदेह, हे अज्ञान या आत्मज्ञानाच्या स्वयंप्रकाशानेच नष्ट होतात. या करितांच साधकाने कारणदेहाच्या ठिकाणी असणाला लिंगदेह आणि वासना यांचा निरास करण्याचा प्रयत्न करावा.
कारणदेह तोचि अज्ञान । आणि ‘तो मी आत्मा’ ऐसे ज्ञान ।
तया नांव महाकारण – । देह बोलिजे ॥ २७ ॥
सद्गुरूंनी जागृत, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन देहांचा विस्तार सांगून वासनात्मक असणाऱ्या लिंगदेहाचे कर्तृत्व पटवून दिले. लिंगदेहामुळेच मनुष्य जीवनाची पुनरपी गतायात चालू होते. मनुष्याच्या ठिकाणी असणारे गाढ अज्ञान हे कारण देहामध्येच असते. अज्ञान हेच मनुष्य जीवनाचे कारण आहे. कार्यकारणभाव म्हणजेच ही देहउपाधी आणि जगतउपाधी होय ! या दोन्ही उपाधींचा संग सोडण्यासाठी महाकारण देह असतो. ‘मी’ आनंदस्वरूप आत्माच आहे असे ज्ञान होते. आत्मज्ञानाच्या स्वयंप्रकाशानेच अज्ञान अंधकार नाहीसा होतो. पहा ! अज्ञानांत ‘मी’चे भान नसते, पण ज्ञानामध्ये ‘मी’चे परिपूर्ण ज्ञान असते. मनुष्य जीवनामध्ये स्वयंप्रकाश आत्म्याचे यथार्थ ज्ञान असणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. म्हणूनच श्री समर्थांनी आत्मारामाची उपासना सांगितली. आत्मारामाच्या उपासनेने साधक समाधानी होतो. साधक हा सतत आत्मानंदांत राहू लागला की, मी आत्मानंदांत आहे असे असणारे अतिसूक्ष्म ज्ञान हे तुर्यावस्थेचे लक्षण समजावे. साधकाच्या ठिकाणी ही अतिउच्च असणारी तुर्यावस्था द्वैतज्ञानाचा ब्रह्मात्मानुभव घेत असते.
तरी मनाचा थारा तुटला । म्हणिजे भवसिंधु आटला ।
प्राणी निश्चितार्थे सुटला । पुनरावृत्तीपासुनी ॥ २८ ॥
संकल्प, विकल्प करणाऱ्या मनाचा खरा आधार हा जीवात्माच आहे. हे मन जीवनभर जीवात्म्याचे दास्यत्व करीत असते. जोपर्यंत जीवात्म्याचे कार्य चालू आहे तोपर्यंत या मनाला जीवात्म्याचा मोठाच आधार असतो. मग संकल्प करणारे हे मन निराधार केव्हां होतें. पहा ! एखादा साधक आपुली साधना करीत आत्मस्वरूपापर्यंत पोहोचला की त्याचे मन निराधार होते. मग आत्मस्वरूपांत सतत रमणाऱ्या साधकाचा देहभाव जीवभाव संपलेला असतो. साधकाचा जीवभाव सुटला की त्याचें मन कार्यरत राहात नाही. अशा चंचल मनाचा सर्व बाजूंनी आधार तुटला की तें मन आत्मस्वरूपी एकरूप होतें. बाहेरचे दृश्य पाहणारें मनच आत्मस्वरूपांत विरून गेल्यामुळे हा दिसणारा, भासणारा दृश्य पसारा नाहीसा होतो. इतकेच काय, हा जन्ममरणरूपी भवसागर सहजच आटून जातो.
साधनशील साधकावर सद्गुरूंची कृपा झाली, साधकाला आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाले की साधक जन्म-मरणाच्या परंपरेतून सुटला जातो. कोणतेही भाजलेले बीज मातीमध्ये पेरले, त्याला खूप पाणी घातले तरी ते बीज पुन्हां उगवत नाही. त्या बीजाला पुन्हां अंकुर फुटत नाही. त्याचप्रमाणे आत्मस्वरूपांत एकरूप झालेल्या मनांत पुन्हा कल्पनातरंग उठत नाहीत. जीवाच्या ठिकाणची जीवावस्थाच संपल्यामुळे कोणतीच कल्पना उठत नाही. मनोनाश झालेल्या दिव्य अवस्थेला उन्मनी अवस्था म्हणतात. चराचर असणाऱ्या विश्वाचे दृश्यस्वरूप अंतर्धान पावते. अशा वेळी ज्ञानमय असणारे परमात्मस्वरूप नित्य विलसत राहते. या ठिकाणी स्थल, काल, अवस्थादि काहींच उरत नाही. तसेंच जन्म-मरणाचे संसृतिचक्रहि नाहींच नाही.
हेचि जाण भक्तीचें फळ । जेणें तुटे संसारमूळ ।
निःसंग आणि निर्मळ । आत्मा होईजें स्वयें ॥ २९ ॥
सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून साधक जीवनभर साधना करीत असतो. त्या जीवनभर केलेल्या साधनेचे फळ शेवटी प्राप्त होत असते. साधकाच्या जीवनामध्ये कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग आणि योगमार्ग असे हे उपासनेचे चार मार्ग आहेत. साधकानें जीवनभर ज्या मार्गाने उपासना केली असेल त्या मार्गाची फळप्राप्ति होत असते. भगवंताच्या भक्तीने भगवतस्वरूपाचे ज्ञान होतेच. पण शेवटी “अंती मती गती” या न्यायाने जन्म-मरणाचे संसृतिचक्रहि नाहींसें होतें. पहा ! जीवनभर केलेल्या निष्काम भक्तीचे फळ म्हणजे जीवनाला मिळालेली पूर्ण विश्रांतीची विश्रांति होय ! अशी ही तुर्यातीत अवस्था प्राप्त होणे हेच भक्तीचे खरे फळ समजावें. भक्तीने संसाराचे मूळ जें अज्ञान तें नाहींसें होतेंच. त्याचबरोबर मायारहित, बंधनरहित आपुलें आत्मस्वरूप आपणच आहोत असा साक्षात्कारही होतो. भक्तीच्या ओलाव्यामध्येच आपली आत्मस्मृति अखंड जागृत असते. निःसंग आणि निर्मळ असणारे आपुलें आत्मस्वरूप भक्तीच्या अथवा ज्ञानाच्या माध्यमांतून प्राप्त होत असते.
संगातीत म्हणिजे मोक्ष । तेथे कैंचें देखणे लक्ष ।
लक्ष आणि अलक्ष । या दोहीस ठाव नाहीं ॥ ३० ॥
सद्गुरूंनी आपल्या शिष्याला अनेक प्रकाराने परमार्थ समजावून सांगितला. त्याच्या साधनेमध्ये येणारे अडथळे दूर केले. शिष्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन त्याचे समाधानही केले. आतां आत्मनिवेदन भक्ति ही किती महत्त्वाची आहे हे सांगतात. जीवनभर एक लक्ष साधून केलेल्या साधनेचे अंतिम फळ म्हणजेच आत्मनिवेदन होय ! हे आत्मनिवेदन कसे असते, हे कसे प्राप्त करावयाचे, त्याचा अनुभवातीत अनुभव कसा असतो याचे गमक सांगतात. अरे ! आपुल्या जाणीवरूप ज्ञानेंद्रियांनी बाहेरच्या वस्तूचा अवलंब (आधार) घेतला तर त्याला आसक्तियुक्त संग असे म्हणतात. तसेच देहांतील शुद्ध जाणिवेने सतत ज्ञानस्वरूप असणाऱ्या आत्म्याचा अवलंब (आधार) घेऊन आत्मानुसंधान ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यास संगनिःसंग असे म्हणतात. पण जीवनांती तसेच साधनांती सर्वसंगपरित्याग करून संगनिःसंगातीत होणे याला मोक्ष असे म्हणतात. पहा ! आत्मानुसंधान हे एकच एक लक्ष उरले की, त्या स्मृतीला चिन्मात्र, ज्ञानमात्र, ज्ञप्तिमात्र असे म्हणतात. अशी ही अतिसूक्ष्म स्मृति स्वरूपामध्ये विरून गेली की यालाच मोक्ष असे म्हणतात. हीच सायुज्यमुक्ति हेच कैवल्यपद समजावें. या ठिकाणी लक्ष आणि अलक्ष या दोन्हीसही वावच नाही. परब्रह्माला गुण नाही म्हणून तें निर्गुण. परब्रह्माला आकार नाही म्हणून ते निराकार. परब्रह्माला संग नाहीं म्हणून ते निःसंग. परब्रह्माला कोणताहि अवलंब नाही म्हणून तें निरावलंबी. साधकाने जीवनभर निःसंग राहून केलेल्या साधनेचे अंतिम फळ म्हणजेच हा मोक्ष होय !
आत्मा म्हणोनी देखणीयास मीठी । घालूं जातां मोक्षाची तुटी ।
म्हणोनिया उठाउठी । आत्मनिवेदन करावें ॥ ३१ ॥
कृष्णा नदीतून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला वेडीवाकडी वळणे घेऊनच प्रवास करावा असे वाटते. अशाच प्रकारचा प्रवास साधकाच्या जीवनामध्ये दिसून येतो. साधकाला साधनेंतील विषय कितीही समजावून सांगितले तरी ते विषय पुनःपुन्हां पुढे येत असतात. अशा प्रकारचा हा विषय ओवी नंबर १८ मध्ये येऊन गेला असतांना तो या ठिकाणी पुन्हां डोकावतो आहे. साधक साधना करीत असतांना अंतर्दृश्यालाच आत्मा म्हणून तो तेथेच थांबतो. अंतर्दृश्य म्हणजेच स्वप्नामध्ये स्वप्ननगरीत दिसणारा एक गोंडस देखावा. अशा अंतर्दृश्य देखाव्याला पाहात जीवनभर ती तशीच साधना करीत राहतो. शेवटी अशा भ्रमरूप अल्प साधनेतून आत्मस्वरूपाची प्राप्ति होत नाही. साधकानें बंध आणि मोक्ष हा विषय समजून घेतला पाहिजे. मोक्षप्राप्तीकरितां तातडीने आत्मनिवेदन करून घेतले पाहिजे. पहा ! बंधनापासून मोक्ष हा खूपच दूर आहे. अतिदूर आणि अतिनिकट असणारी आत्मवस्तु प्राप्त करण्याकरितां खूपच प्रयत्न करावा लागतो. म्हणून साधकाची साधना मोजकी आणि नेमकी असावी लागते. जाणून केलेल्या नेमक्या साधनेतून अलक्ष असणारी ब्रह्मवस्तु लक्षिली जाते. आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सतत एकच लक्ष असणे हीच महत्त्वाची साधना समजावी.
प्राप्त जालें अद्वैतज्ञान । अभिन्नपणे जे विज्ञान ।
तेचि जाण आत्मनिवेदन । जे मीतूंपण नाहीं ॥ ३२ ॥
जगांतले कोणतेही अतिप्रगत असणारे ज्ञान संपादन केले तरी तें अनुभवाच्या पातळीवर द्वैतामध्येच येते. स्थूळ किंवा सूक्ष्म असणारी कोणतीही वस्तु ही इंद्रियगोचर असल्यामुळे त्या ठिकाणी मीपणाचा भाव असतोच. याच्या उलट असणारे अद्वैत ज्ञान, हे अतींद्रिय असल्यामुळे त्या ठिकाणी मी आणि तूं हा भावच नसतो. अहंब्रह्मास्मि ही अभिन्नावस्था म्हणजेच ज्ञानस्वरूप ब्रह्मावस्था होय ! असें अद्वैतज्ञान असणाऱ्या महापुरुषाला ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मस्वरूप, ब्रह्मलीन असे म्हणतात. परमार्थ मार्गातील अशी अवस्था अंतिम समजली जाते. साधकाच्या जीवनामध्ये अतिसूक्ष्म ‘मी’पणा असणे ही ज्ञानाची अवस्था समजतात. आणि साधनेच्या अंतिम काळांत हा ‘मी’पणा स्वस्वरूपांत मुरून गेला की, त्याला ज्ञानाचे विज्ञान – ब्रह्मस्वरूप असे म्हणतात. परमार्थामध्ये या अभिन्नतेला विज्ञान असेही म्हणतात. ज्या ठिकाणी मी आणि तूं हे कांहींच उरत नाही याला आत्मनिवेदन म्हणतात. चैतन्यरूप स्वयंप्रकाश असणारा आत्मा अजर, अमर, ज्ञानघन असून, तो त्रिकालज्ञहि आहेच. अशा अमर असणाऱ्या आत्म्याला आपले ज्ञानसंपन्न अस्तित्व ब्रह्मस्वरूपांत एकरूप करावे लागते.
ऐसी स्थिती जया पुरुषाची । तया पुनरावृत्ती कैंची ।
जाणोनि भक्ति केली, दासाची । आवडी देवास अत्यंत ॥ ३३ ॥
ज्या महापुरुषाला ही आत्मनिवेदन, आत्मस्थिति प्राप्त झाली आहे तोच ब्रह्मनिष्ठ जाणावा. अशा ब्रह्मनिष्ठ महापुरुषाला जन्ममृत्यूची परंपरा लागत नाही. मानवी जीवनामध्ये निष्ठा ही अत्यंत महत्त्वाची आहे. जीवनाचा मूळ आधार या निष्ठेवरच अवलंबून असतो. मातृनिष्ठा, ध्येयनिष्ठा आत्मनिष्ठा, अशा ह्या तीन निष्ठा अनुभवून सोडावयाच्या असतात. मानवी जीवनाचे इतिकर्तव्य हे ब्रह्मनिष्ठेच्या प्राप्तीनेच पूर्ण होतें. परमेश्वराची भक्ति ही जाणून केली की, तो परमेश्वराचा जाणता भक्त होतो. असा ज्ञानी भक्त परमेश्वराला अत्यंत आवडतो. देव-भक्तांचे नातें भक्तिप्रधान, ज्ञानप्रधान असेंच असते. जगामध्ये परमेश्वराचे अस्तित्व आहे म्हणूनच भक्त, सद्भक्त तयार होतात. भक्तांनी नवविधा भक्तीच्या माध्यमांतून देवाचे वैभव वाढविलें आहे. म्हणून प्रसंगी देव हा भक्तांचा कैवारी आहे असे दिसून येते.
मानवी जीवनामध्ये संपूर्ण आत्मनिवेदन ही ज्ञानाची उत्तम अवस्था असल्यामुळे त्या अवस्थेलाच मोक्ष असे म्हणतात. आत्मनिवेदन आणि मोक्षप्राप्ति हे दोन्ही शब्दप्रयोग एकाच ब्रह्मनिष्ठ अवस्थेला आहेत. आनंदस्वरूप, स्वयंप्रकाश, असणाऱ्या आत्म्याचे स्वतंत्र स्वतःसिद्ध असणारे अस्तित्व जिथे संपते त्या एकरूप ब्रह्मस्वरूपाला मोक्ष असे म्हणतात.
पूर्वी दासत्व होतें केलें । त्याचे स्वामीत्व प्राप्त जालें ।
आणि तयाचे महत्त्व रक्षिलें । तरी थोर उपकार कीं ॥ ३४ ॥
सहस्रामध्ये एखादा तरुण परमेश्वराच्या प्राप्तीकरितां आपलें घरदार, आई-वडील, आप्तमंडळी सोडून बाहेर पडतो. उपासना करण्याच्या दृष्टीने टाकळीसारखें पवित्र स्थान शोधून काढतो. त्या ठिकाणी बारा वर्षे स्थिर राहून उपासनादि साधना करतो. दास्यभक्तीचे प्रेम म्हणून राममूर्तीची पूजा-अर्चाही करीत असतो. परमार्थामध्ये प्रगत असणाऱ्या प्रभुरामासारख्या सद्गुरूंचे दास्यत्वही स्वीकारतो. सद्गुरूंच्या पदस्पर्श स्थानाच्या सान्निध्यांत योग्य साधना केल्यामुळे प्रज्ञाही जागृत होते. प्रज्ञेला परतत्त्वाचा स्पर्श झाला की, साधक स्वतःच सिद्ध होतो. परमार्थाची वाटचाल प्रथम दास्यत्वांतून सुरू होते आणि सिद्धावस्था प्राप्त झाल्यावर ती पूर्णत्व पावते. असा सिद्ध पुरुष प्रसंगी भारतभ्रमण करतो. समाजउन्नतीसाठी प्रबोधनही करतो. अतितीव्र प्रजेंतून प्रतिभा जागृत झाल्यावर ३६ हजार ओव्यांची काव्यरचना करून सांप्रदायाची प्रतिष्ठा वाढवितो. समाजामध्ये सत्शील राहून समाजकारण, राजकारण आणि धर्मकारण करतो. पहा ! दास्यत्वांतून असा एखादा महापुरुष निर्माण होतो. आपल्या प्राप्त काळामध्ये अनेकांवर उपकार करतो. तशीच कृतज्ञताही व्यक्त करतो.
आतां असो हे बोलणें । नाशिवंताचा विचार घेणें ।
आणि मजपासी सांगणे । अनुभव आपला ॥ ३५ ॥
अरे बाळ ! आतांपर्यंत तुझा आणि माझा खूपच सुखसंवाद झाला आहे. तुझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन तुझें समाधान केले आहे. आता यापुढे तुझा हा शब्दपाल्हाळ थोडा बाजूला ठेव. तूं या नाशिवंताचा कधी विचार केला आहेस का ? आतापर्यंत ह्या नाशिवंताचा विचार केला नसेल तर तो विचार अत्यंत तातडीने कर. अरे ! हे दिसणारे, भासणारे नाशिवंत तूं जाणून सोडले आहेस का ? हे तूंच तुझ्या शुद्ध अंतःकरणांत न्याहाळून पाहा. आजपर्यंत तूं केलेला अभ्यास, त्या अभ्यासातून तुला स्वतःला आलेला स्वानुभव, याचा नीट तौलनिक निवाडा करून पहा. तुला आलेला जो अनुभव तो मला मोजक्या शब्दांत सांग.
कोणताहि विचार करण्याचे मोठेच सामर्थ्य हे मनुष्याच्या अंगी आहे. विवेक विचाराने या दृष्यांतील जी असाध्यवस्तु तीही शोधून साध्य करता येते. इतकेच काय ह्या दृश्याचा निरास करून अदृष्य असणाचा आत्मस्वरूपी एकरूप होण्याचा मार्गही सांपडतो. अरे ! विवेकाने या नाशिवंताचा निरास कर आणि आपुल्या आत्मस्वरूपामध्ये एकरूप होऊन रहा.
आतां पुढिलीये समासीं । शिष्य सांगेल अनुभवासी ।
दृढ करूनिया तयासी । सांगती स्वामी ॥ ३६ ॥
साधनारूपी अभ्यास करणाऱ्या शिष्याला आपल्या साधनेमध्ये कोणते अनुभव आले. आतापर्यंत आलेल्या सर्व अनुभवांचा तपशील कसा आहे, जें कांहीं समजले आहे तें सर्वकाही शिष्य पुढच्या समासामध्ये सांगणार आहे. त्याच्या अनुभवाचा जो तपशील असेल तो बरोबर आहे का ? याचा विचार करून श्रीस्वामीजी त्याला पुढचा अभ्यास सांगतील.
साधकाच्या साधनेतील आत्मस्वरूपाचा प्रांत हा अज्ञातच असतो. त्या ठिकाणी येणारे अनुभव खरे किती आणि भ्रामक किती याचा सहजपणे अंदाज येत नाही. म्हणून साधकाच्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकता, सत्शीलता असावी लागते. साधकाच्या साधनेमध्ये जे अनुभव येतात, ते अनुभव प्रामाणिकपणे सद्गुरूंना सांगणे हेच साधकाच्या हिताचे ठरते. सद्गुरूंनी आत्मोद्धाराकरितां सांगितलेलें साधन आणि शिष्याला त्या साधनेंतून आलेला अनुभव, अशा या दोन्हींची प्रचीति जुळली म्हणजे शिष्य आनंदी (खुष) होतो.
इति श्रीआत्माराम । रामदासी पूर्णकाम ।
ऐका सावध वर्म । आत्मज्ञानाचें ॥ ३७ ॥
आतापर्यंत या आत्माराम ग्रंथाचा हा चौथा समास सांगून झाला. स्वरूपसांप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या रामदासी मंडळींचे समाधान होईल असे वाटते. या ग्रंथामध्ये आत्मज्ञानाच्या प्राप्तीचे मर्म सांगितले आहे. पहा ! आत्मविद्या ही अतिगूढ असल्यामुळे ती ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या सान्निध्यांतच अभ्यासावी. साधकाचा परमार्थ मार्ग हा रोकड्या प्रचितीचा राजमार्ग आहे. या करितां विवेकी आणि विरागी वृत्तीचा साधक असावा लागतो. हे सर्वही आपणाचपाशी अशी साधकाची धारणा असली पाहिजे.
आतां पुढच्या समासामध्ये आत्मज्ञानाचे वर्म सांगण्यात येईल तें लक्षपूर्वक ऐकावे. यापुढे श्रीसद्गुरु आपला स्वानुभवही सांगतील. जेणे करून सद्शिष्याचे पूर्ण समाधान होईल असें मार्गदर्शनही करतील.
समास पांचवा
स्वानुभव निरूपण
जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा । आम्हां अनाथांचिया माहेरा ।
सार्थक जालें जी दातारा । तुमच्या कृपाकटाक्षे ॥ १ ॥
साधनशील असणारा सत्शिष्य सद्गुरूंच्या कृपेनें कृतार्थ होतो. आत्मस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव आल्यामुळे तो शिष्य समाधान व्यक्त करूं लागतो. सत्शिष्य हा आनंदाच्या भरात म्हणतो, ‘अहो स्वामीमहाराज ! आपला त्रिवार जयजयकार असो ! आपण ह्या भूतलावरचे परमेश्वरच आहांत. आमच्यासारख्या अनाथांचे हे माहेरच म्हणावे लागेल. आपल्या ठिकाणी खूप औदार्य आहेच; तसेच ज्ञानदान करण्याचे सामर्थ्यही आहे आपली कृपादृष्टि, करुणादृष्टि, प्रेमदृष्टि असल्यामुळे मी कृतकृत्य झालो आहे. आपण माझ्या विश्रांतीचे आश्रयस्थान आहांत”. सत्शिष्याचे हे धन्योद्गार ऐकून श्रीगुरूंना अतीव समाधान झाले. सद्गुरूंनी पदोपदी मार्गदर्शन केल्यामुळे शिष्याची आत्मसाधना योग्य दिशेने यशस्वी झाली होती. श्रीगुरू-शिष्यांचे हे आत्मवत् नाते ज्ञानदानांतून वाढले होते. एका स्वयंभू अमर ज्ञानज्योतीमधून दुसरी ज्ञानज्योत प्रज्वलित झाली होती. याला शुद्ध ज्ञानाची ज्वलंत परंपरा असे म्हणतात. हजारों वर्षापासून ही चालत आलेली सांप्रदायिक ज्ञानाची परंपरा अधिकाधिक प्रज्वलित होत आली आहे.
सद्गुरूंना सर्वच जीवांविषयीं दया, करुणा, प्रेम हे असतेच. मनुष्याच्या ठिकाणी दुःख निर्माण करणारे गाढ अज्ञान हे असतेंच, म्हणून ते अज्ञान नाहीसे करण्याकरितां ज्ञानदानाची आवश्यकता असते. असे हे अतिशुद्ध असणारे आत्मज्ञान संतच देऊ शकतात. एखाद्या स्वच्छ भांड्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवलें की थोड्याच वेळांत ते पाणी स्थिर होते. अशा स्थिर झालेल्या पाण्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब किंवा आपुले प्रतिबिंब जसेच्या तसे दिसू लागते. असाच प्रकार गुरु-शिष्यांच्या ज्ञानदानाचाही दिसून येतो. पहा ! ज्ञानदान करणारा गुरु ब्रह्मनिष्ठ असावा लागतो तर ज्ञान संपादन करणारा शिष्य निःसंग, निर्मळ मनाचा आणि शुद्ध ज्ञानाचा भुकेला असावा लागतो. सद्गुरूंच्या मुखांतून ज्ञानाचा वर्षाव होत असताना सत्शिष्य हा सतत सावध, साक्षेपी आणि दक्ष असल्यामुळे त्याचे पूर्ण समाधान झालेले असते.
या मनाचेनि संगति । जन्म घेतले पुनरावृत्ती ।
माया माईक असोन, भ्रांती । वरपडा जालो होतो ॥ २ ॥
साधकाला आपलें भूतकाळांतील जे बंधनकारक जीवन होतें तें आठवले. अज्ञानामुळे ह्या मनाच्या संगतीमध्ये अनेक जन्म घेतले आणि सोडले. अनेकदां जन्म-मृत्यूच्या कठीण यातनाही सहन केल्या याची आठवण झाली. ही दिसणारी भासणारी नाटकी माया प्रत्येक मनुष्याला भुलवीत असते. या मायेचे स्वरूप मिथ्या आहे असे समजले असतांहि मी या मायेच्या मोहाने भुललो होतो. अहो ! “बहुनाटकी ही माया” ह्या मायेचें नाटक भल्याभल्यांना फसवीत असते. माया ही मुळांत नाहीच पण गैरसमजुतीमुळे मी या मायेच्या बंधनात अडकलो होतो. मनुष्य-देहामध्ये अंतःकरण पंचकाचा समूह म्हणजेच ही ज्ञानेंद्रियें होत ! त्यामध्ये मन, बुद्धि, चित्त, अहंकार अशी ही चार इंद्रिये मिळून अंतःकरणाचे अस्तित्व सिद्ध होते. अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे हे मन सतत बाह्य विषयांत फिरत असते. चैतन्यरूप असणाऱ्या जीवाचा आणि स्थूल असणाऱ्या बाह्य विषयाचा संबंध जोडणारे हे मन सतत कार्यरत असते. देहांतील कार्यकारणभाव हा केवळ या मनामुळेच निर्माण होतो. कधी कधी मोठमोठ्या विचारवंतांना, महंतांना, साधकांना या चंचल असणाऱ्या मनासमोर अपयश पत्करावे लागते. जीवनामध्ये भ्रम, भ्रांति आणि अज्ञान हे सारें मनाच्या दुबळेपणामुळेच जाणवत असते. शेवटी मनाच्या अधीन असणारे जीवन जन्म-मृत्यूच्या दुष्ट चक्रांत अडकलेले असते.
जी मी मानवी किंकर । येकायेकी जालों विश्वंभर ।
संदेह तुटला थोर । यातायातीचा ॥ ३ ॥
महाराज ! माझ्यासारख्या सामान्य जीवाने आपले किती उपकार मानावेत ! आपला जितका गौरव करावा तितका तो अपुराच वाटतो. कारण भूतकाळामध्ये मी एक सामान्यांतील सामान्य मनुष्य होतो; पण आज आपल्या कृपेने मी पूर्ण समाधानी झालो आहे. अनेक जन्मांच्या शेवटी आज माझे आत्मस्वरूप मला समजल्यामुळे मी कृतार्थ झालों आहे. मी ह्या जन्म-मरणाच्या परंपरेतून सुटल्यामुळे चिंतामुक्त झालों आहे. मानवी जीवनामधील देह बुद्धि आणि आत्मबुद्धि यांमध्ये महदंतर दिसून येते. देहबुद्धि ही जीवनभर उपाधि वाढवीत असते. तर आत्मवृद्धि ही उपाधीचा व्याप जाणूनच उपाधीचा संग सोडते. कोणतीहि गोष्ट धरण्यांत आसक्ति असते. तीच गोष्ट सोडण्यासाठी त्याग असावा लागतो. देहबुद्धि ही जीवनभर विषयांचा संग्रह करून विषयांच्या अल्पसुखामध्ये रहाते. आत्मबुद्धि ही सर्व विषयांचा संग सोडून सतत आत्मानंदांत स्थिर असते. म्हणून साधकानें संग, असंग आणि निःसंग या तिन्ही अवस्था जाणून घेतल्या पाहिजेत. परमार्थ हा जाणून केला तर अत्यंत सुखाचा ठरतो.
ज्याला मी देहच आहे असे वाटतें तो जीव जीवनभर बद्धच असतो. ज्याला मी आत्मस्वरूपी ब्रह्मांश आहे अशी प्रचीति येते त्यावेळी तो बंधमुक्त होतो. मानवी जीवनामध्ये केव्हां तरी बंधमुक्त झाले पाहिजे. साधकानें बंधमुक्त होण्यासाठी साधन चतुष्टयाची उपासना, साधना करावी.
मी संसारीहून सुटलों । पैलपार पावलों ।
मीच सकळ विस्तारलों । सर्वांभूतीं ॥ ४ ॥
स्वामीमहाराज ! आपल्या ज्ञानामृत कृपेचा वर्षाव होतांच मी या जन्म-मृत्यूच्या संसृति-चक्रांतून बाहेर पडलो. आतां मी कर्ता, मी भोक्ता या वृथा संकल्पनांतूनही मोकळा झालो. हा दृश्यरूपी भवसागर ओलांडून पैलतीरावर पोहोचलो. आत्मस्वरूपामध्ये स्थिर झाल्यावर मीच सर्वव्यापी भरून आहे असा अनुभवही आला. अशी ही एकमेव आत्मानुभूति आपल्याच कृपेनें प्राप्त झाली आहे.
सत्त्वशील असणाऱ्या मनुष्याला आत्मज्ञान झाले की, त्याचा अहंकाररूपी ‘मी’ हळूहळू नाहीसा होतो. त्याचा तो अहंकार नाहींसा झाला म्हणजे जगाचे खरेपण हलकेच अंतर्धान पावते. बाहेरच्या विषयांतून सुख मिळविण्याची, जी धडपड ती पूर्ण थांबते. जीवात्मा हा एकदां आत्मसुखाने सुखस्वरूप झाला की त्याला हे बाहेरचे जग अगदीच मिथ्या वाटू लागते. याहून अधिक म्हणजे या विश्वामध्ये एक आत्मस्वरूपच व्यापून आहे असा अनुभव असतो. या ठिकाणी आपणही विश्वव्यापी आहोत असा प्रत्यय येतो. मानवी जीवनांतील हाच मोठा दिव्य अनुभव समजावा.
मी करून अकर्ता । मी परेहून पर्ता ।
मजमध्ये वार्ता । मीपणाची नाहीं ॥ ५ ॥
सद्गुरुनाथा ! आपल्या समोर मी सर्व कर्मे करीत असतो. पण त्या कर्माचा परिणाम माझ्या ज्ञानेंद्रियांवर यत्किंचितही होत नाही. देहाने होणारी सर्वही कर्मे सहजगत्या होत असतात. नित्य मुक्त असणाऱ्या महापुरुषाला ही कर्मे कधीही बाधक ठरत नाहीत. यांचे कारण त्यांचा देहसंग सुटलेला असतो. घरामध्ये असणारा पंखा विजेचा करंट चालू असतांना गतीने फिरत असतो. पण अकस्मात विजेचा करंट बंद झाला, तरी तो पंखा थोडा वेळ फिरतच राहतो; त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी देहबुद्धि असतांना ही कर्मे मी जाणून करीत होतो. पण आतां माझी देहबुद्धि नष्ट होऊन त्या ठिकाणी आत्मबुद्धि जागृत झाल्यामुळे ही कर्मे सहज होत असतात. परावाणीच्या ठिकाणी ‘आहेपणा’चे स्मरण सहज असते. आता मी त्या मीपणाच्या स्मरणापलीकडे आत्मस्वरूपी स्थिर झाला आहे. माझ्या ठिकाणी ‘मीपणा’चा स्पर्शही उरला नाही. मला आलेला हा दिव्य स्वात्मानुभव मी कोणत्या शब्दांनी वर्णन करूं ? माझ्या ठिकाणी असणाऱ्या चार वाणी – परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी ह्या कुंठित झाल्या आहेत. मीपणाची स्मृति आत्मस्वरूपांत एकरूप झाली आहे.
परावाणी ही स्फुरणरूप असते. त्या स्फुरणामध्येच शारदारूपी शब्दब्रह्माचें आस्तित्व जाणवते. एकोऽहं संकल्पामध्ये या सर्व सृष्टीचे आदिबीज स्फुरणरूपाने होतेच. तेंच या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. विश्वाला साक्षीरूपाने पाहण्याची स्मृति महापुरुषांच्या ठिकाणी असते. हे समजण्याकरितांच सत्संग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. सद्गुरूंच्या कृपेने कृतार्थ झालेला सत्शिष्य अपरोक्षानुभूतीपर्यंत जाऊन पोचतो.
ऐसें जें निजबीज । गाळीव मीपणाचा फुंज ।
तो मुरालियां सहज । सीधचि आदिअंती ॥ ६ ॥
साधकाच्या ठिकाणी जे अतिशुद्ध असणारे स्मरण आपल्याच ज्ञानस्वरूप मीचे ज्ञप्तिमात्र भान होय ! देहांत असणारा हा ‘मी’ ज्ञानप्रधान असतो. या ज्ञानामध्ये मीचे सूक्ष्म भान असणे यास ज्ञानगंड अहं असें म्हणतात. असा हा ‘मी’ जीवनभर आपला मित्र म्हणून सांगाती असतो. प्रसंगी तोच ‘मी अंती शत्रू म्हणून कार्यरत होतो. पहा ! आत्मस्वरूपामध्ये हा ‘मी’ अखंड स्मृतिरूपाने असतोच शेवटीं अतिसूक्ष्म असणाऱ्या ‘मी’च्या प्रयत्नानेच आपुलें आत्मस्वरूप अनुभवाला येते. मी ब्रह्मच आहे या सूक्ष्म स्मृतीमधील ‘मी’ हा भाव ब्रह्मस्वरूपात विरून गेला की, केवळ ब्रह्मच उरते. आपला ‘मी’ हा परमात्मस्वरूपांत विरून, जिरून गेला म्हणजे जें राहते तेंच ब्रह्मस्वरूप होय ! जगाच्या आदि आणि अंती जें व्यापून असते त्याला परमात्मस्वरूप असे म्हणतात.
साधकाच्या जीवनांतील साधन प्रवास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामध्ये जीवनभर जाणून केलेली साधना ही फार मोठी तारेवरची कसरतच समजावी. किंबहुना अग्नीच्या गोलाकृतीमधून पैलाड जाण्याचा जो प्रयत्न त्याला ‘मृत्युगोल’ असे म्हणतात. साधकाच्या साधनेचा अंतिम टप्पा म्हणजेच स्वतःच्या ‘मी’चे आत्मबलिदानच होय.
ऐसा शिष्याचा संकल्पु । जाणोनि बोले भवरिपु ।
संसारसर्प भग्नदर्पु । केला जेणें ॥ ७ ॥
सद्गुरूंच्या कृपेनें सतूशिष्याला ज्ञानानुभव आला होता. साधन काळांत अभ्यास करीत असतांना काही दिव्यानुभूतीही आली होती. आपुल्या आत्मस्वरूपाचा बोधही झाला होता. यांतूनच प्राप्त झाली अभंग शांति. तो सद्गुरूंना सांगू लागला. सत्शिष्याने आपला स्वरूपनिश्चय हळुवारपणे सद्गुरुपदी निवेदन केला. सद्गुरूंनी शिष्योत्तमाचे स्वानुभव बोल शांतपणे ऐकून घेतले. सद्गुरूंनी आपल्या ज्ञानखड्गाने अज्ञान नष्ट करून मृत्यूवर विजय संपादन केलेला असतो. म्हणून त्यांना भवरिपु, मृत्यूचे शत्रु असेहि म्हणतात.
जीवनामथें या जन्म-मरणरूपी संसृतिचक्राचे मूळ सूत्र या अहंमधून सुरू होते. या अहंमुळेच कर्तेपणाचा अभिमान वाटत असतो. शिष्योत्तमाने हे दृश्य मिथ्या असे जाणून सोडलें, कर्तेपणाचा जो मोह होता तो जाणून दूर केला. या अभिमानाचा आधार असणारा ‘मी’ तो साधना करून स्वरूपामध्ये विलीन केला. आता या ठिकाणी केवळ ब्रह्मानुभवच उरला होता. त्यामुळे येथे ‘गुरुशिष्यां एकचिपद’ अशी अवस्था झाली होती.
जें स्वामीच्या हृदईं होतें । तें शिष्यासी बाणलें अवचीतें ।
जैसे सामर्थे परीसातें । लाहो आंगी बाणे ॥ ८ ॥
श्री स्वामी महाराजांच्या हृदयांत जो आत्मस्वरूपाचा दिव्यानुभव सतत विलसत होता, तोच तो स्वानुभव स्वामींच्या कृपेने शिष्याच्या हृदयांत विलसूं लागला. अहो ! या सत्संगतीचा केवढा मोठा परिणाम आहे ! महापुरुषाच्या संगतीने, त्यांच्या पदस्पर्शाने, त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने सामान्य मनुष्य कृतार्थ होतो, सिद्ध होतो. ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या सद्गुरूंच्या सान्निध्यांत आत्मसाधना करणाऱ्या सत्शिष्याला अकस्मात आपले आत्मधन प्राप्त होते. सद्गुरूंच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण केले की सद्गुरूंच्या कृपेचा वर्षाव होत असतो.
परिस नावाचा जडधातु हा सामर्थ्यवान असतो. परिसाच्या संगतीमध्ये लोखंडाचा तुकडा आला की परिसस्पर्शाने त्या लोखंडाचें सुवर्ण होते. निसर्गामध्ये निर्माण झालेल्या परीस नांवाच्या जडधातूमध्ये इतके सामर्थ्य आहे. तर याच्या अनंतपटीने आत्मचैतन्यामध्ये सामर्थ्य आहेच. शेवटी सद्गुरूंच्या सान्निध्यांत ज्वलंत असणाऱ्या ज्ञानज्योतींतून दुसरी ज्ञानज्योत प्रज्ज्वलित होते. पहा ! “बाळकास वाढवी जननी । हे तो नव्हे की पुरुषाचेनी’ या न्यायाने सद्गुरु माउली आपल्या शिष्याला ज्ञानामृत पाजून शिष्य परंपरा वाढवीत असते. जगामध्ये मातृभाव आणि पुत्रभाव ही वंश परंपरा असते. यामध्ये आसक्तियुक्त शुद्ध प्रेमभाव असतोच. पण याच्या उलट श्रीगुरु-शिष्यांची ही ज्ञानपरंपरा त्यागमय जीवनाचा भाव उदित करते. त्यागामध्येच निरतिशय असणाऱ्या चिरशांतीचा अनुभव येतो.
स्वामीपरीसाचा स्पर्श होतां । शिष्य परीसचि जाला तत्वतां ।
गुरुशिष्याची ऐक्यता । जाली स्वानुभवें ॥ ९ ॥
गुरु-शिष्यांचे व्यवहारांतील नातें हैं लौकिकदृष्ट्या जेवढ्यास तेवढे असते. लौकिक विद्येची देवाण-घेवाण यामधून हे नाते जोडलेले असते. यामध्ये श्रीगुरूंचे ज्ञान हे श्रेष्ठ असते. पण काही काळ लोटला की, कथीं शिष्याचे ज्ञान श्रेष्ठ असा फरकही जाणवतो. याचे कारण या दृश्य जगांत लौकिक विद्येमध्ये सतत परिवर्तन होत असते. पहा ! बदल होणे हा दृश्य जगाचा नियमच आहे. जड असणाचा परिसाच्या स्पर्शाने सामान्य असणाऱ्या लोखंडाचे सुवर्ण होते. परिवर्तनशील असणाऱ्या या दृश्य जगामध्ये लोखंडाचे सुवर्ण होणे. ही एक मोठी चमत्कृती होय ! या दृश्य जगामध्ये अशी किमया कधीही होत नाही.
सद्गुरु आणि सत्शिष्य यांच्या अध्यात्म विद्येमधील हा अतूट भाव ऐक्य पावलेला असतो. अध्यात्मामध्ये श्रीगुरु हे ब्रह्मनिष्ठ असल्यामुळे त्यांच्या ब्रह्मानुभवामध्ये अगाध सामर्थ्यामध्ये कधीच बदल होत नाही. अशा ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या सद्गुरूंच्या सान्निध्यांत सत्शिष्य हा ब्रह्मनिष्ठच होत असतो. “गुरुशिष्यां एकचि पद” असा हा स्वानुभव असतो. या ठिकाणी अतिसूक्ष्म असणारा भेदही नष्ट होतो असा स्वानुभव.
गुज स्वामीच्या हृदईचें । शिष्यास वर्म तयाचें ।
प्राप्त जालें योगीयांचें । निजबीज ॥ १० ॥
सदगुरूंनी जीवनभर अभ्यास करून आपल्या स्वस्वरूपाचा दिव्यानुभव घेतला. त्या ठिकाणी अनुभवातीत विलसणारा अद्वितीय ब्रह्मभाव स्थिर झाला. अशा ब्रह्मनिष्ठ ब्रह्मावस्थेलाच कैवल्यपद असे म्हणतात. पहा ! संगतीचा परिणाम फार मोठा विलक्षण असतो. कोणतीही वस्तु मातीच्या सान्निध्यात ठेवली तर ती वस्तु मातीमोलाची ठरते. अत्यंत मृदु असणाऱ्या लोण्याच्या गोळ्यामध्ये उकडलेला बटाटा घातला तर लोण्याच्या संगतीनें बटाट्याला मृदुत्व प्राप्त होते. हीच गोष्ट गुरु-शिष्यांच्या जीवनांत घडते.
ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या सद्गुरूंच्या सान्निध्यांत सत्शिष्याला सहज तो ब्रह्मभाव, ब्रह्मावस्था प्राप्त होते. याचे कारण संगतीचा परिणाम जडावर होतोच. पण त्याहीपेक्षां चैतन्यावर तत्क्षणी होतो. पाण्याचा ‘थेंबुटा सागरी मिळाला । गंगेसरिता संगम जाला’ याचप्रमाणे सत्शिष्य सद्गुरु-स्वरूपच होतो. सत्शिष्याला वेगळे अस्तित्वच उरत नाही. सद्गुरूच्या ठिकाणी स्थिर असणारे निजबीज, गुह्यज्ञान, गुज आत्मस्वरूपाची निश्चल स्मृति सत्शिष्याला प्राप्त झाली. पहा ! अमृताची गोडी ही इंद्रियांना गोड वाटते म्हणून अमृताच्या गोडीचे वर्णन करता येते. पण तपःसाधना करून प्राप्त केलेला ज्ञानामृताचा दिव्यानुभव शब्दांनी वर्णन करता येत नाही. तो त्याच अतिगुह्य ठिकाणी अनुभवायचा असतो. “ब्रह्म होऊनी अनुभवावें” हीच सद्गुरूच्या सान्निध्यांतील ‘कैवल्यपद” कृपा होय ! सत्शिष्याला ही सद्गुरुकृपा लाभली तो पूर्ण समाधानी झाला.
बहुतां जन्मांच्या सेवटीं । जाली स्वरूपेसी भेटी ।
येका भावार्थासाठी । परब्रह्म जोडले ॥ ११ ॥
सत्शिष्याला आपल्या समाधानी जीवनाचा अत्यंत आनंद झाला होता. आतापर्यंत कळत नकळत अनेक जन्म घेतले. त्याचप्रमाणे जन्म-मृत्यूचे कारण न समजल्यामुळे न कळत अनेकदां देह सोडले. पण सद्गुरूनाथांच्या कृपेने या जन्मीं जन्म-मृत्यूचे वर्म समजल्यामुळे आतां बंधमुक्त झालो आहे. माझें आत्मस्वरूप समजल्यामुळे आतां मी सतत आत्मस्वरूपामध्ये रममाण झालो आहे. आपल्या जीवनांत आपली आत्मनिष्ठा, आपला सद्भाव हा ब्रह्मस्वरूपापर्यंत पोचवितो हेच खरे. परमेथराला एक सद्भावच अत्यंत प्रिय असतो. पहा ! “मानव भावबळें तरले” या न्यायाने साधकाने आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं सद्भाव ठेवला तर त्याचे कल्याणच होते. साधकानें घरदार आप्तमंडळींचा संग सोडल्यावर त्याच्या अंतःकरणामध्ये एकच निष्ठा असावी लागते. ती साधनशील साधननिष्ठा, सद्गुरुपदी अतिलीन गुरुनिष्ठा, जीवनभर एक आत्मनिष्ठा, शेवटीं ब्रह्मस्वरूपाची प्राप्ति होण्यासाठी स्वतःच्या ‘मी’चे आत्मबलिदान करण्याची त्यागनिष्ठा असावी लागते. जीवनामध्ये इतकें सर्व जमले की “येका भावार्थासाठी । परब्रह्म जोडले” असा अनुभव येतो.
मानवी जीवनामध्ये आत्मस्वरूपाबद्दलचे अज्ञान हेच सर्व दुःखाचें कारण आहे. देहबुद्धीचे सामान्य जीवन खरे वाटते. पण देहांत असणारा आत्मा हा खरा आहे याची खात्री होत नाही. म्हणून प्रत्येक मनुष्य जन्मतः ज्ञानांधच असतो. जीवनभरही तो डोळे असून अंधळाच राहतो. पण साधन अभ्यास करून ज्ञानचक्षु जागृत झाला, की त्याची निष्ठाही डोळस होते. साधकाच्या ठिकाणी असणारी आत्मनिष्ठा ही साधकाचा उद्धार करते. प्रत्येक मनुष्याने आपली आत्मनिष्ठा स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करून जीवन्मुक्तीचा स्वानंद अनुभवावा.
जो वेदशास्त्रांचा गर्भ । निर्गुण परमात्मा स्वयंभ ।
तयाचा येकसरां लाभ । जाला सद्भावें ॥ १२ ॥
परमात्मस्वरूप हे वेदांचे सारभूत तत्त्व आहे. ह्या षड्शास्त्रांचा विस्तारही तदंतर्गतच अनुभवास येतो. परमात्मा गुणातीत अतींद्रिय असल्यामुळे तो स्वतः सिद्ध परिपूर्ण आहेच. परमात्म्याला कोणीही निर्माण केलेले नाही. त्याच्या अस्तित्वाचा अनुभव आला म्हणजे आपले सर्व जीवनच धन्य होतें, कृतार्थ होते. स्वयंप्रकाश असणारा आत्मा हा सर्वांतर्यामी ज्ञानस्वरूप आहे. परमेश्वराने या चराचर विश्वाची निर्मिति केली. इतकेच काय, तो परमात्मा स्वतः या विश्वामध्ये गुप्त रूपाने व्यापूनही आहेच. मनुष्याला आत्मज्ञान मिळविण्यासाठी आपला मीपणा सोडावा लागतो. आत्मस्वरूपाने मी ब्रह्मच आहे असा सद्भाव टिकवण्यासाठी प्रयत्नही करावा लागतो. आपल्या अंतर्यामी सद्भाव टिकू लागला की, ज्ञानस्वरूप असणारा आत्मा सतत विलसत राहतो.
मानवी जीवनामध्ये भाव, अभाव आणि सद्भाव हे गुण जीवनमूल्याचे आहेत. जीवनामध्ये सामान्य असणारा सुखभाव वाढविला तर त्यांतून ऐहिक सुखाचा लाभ होतो. जीवनभर अभावच वाढत राहिला तर करंटेपणा ठाकून येतो. प्रयत्नशील जीवनामध्ये सद्भाव जागृत झाला तर परमात्मस्वरूपाची प्राप्ति होते.
जें ब्रह्मादिकांचे माहेर । अनंत सुखाचे भांडार ।
जेणे हा दुर्गम संसार । सुखरूप होये ॥ १३ ॥
असे हे सच्चिदानंदघन परमात्मस्वरूप चराचर विश्वाचा आधारच आहे. अहो ! ब्रह्मादिदेवांचे हे आश्रयस्थान तसेच माहेरही समजले जाते. ह्या तीनही देवांना परमात्मस्वरूपाचा मोठा आधार आहे. परमात्म्याच्या अनंतानंत असणाऱ्या प्रांगणांतच ब्रह्मादिदेव हे उत्पत्ति, स्थिति आणि त्याचा लय ह्या कार्याचा व्याप – आटोप करीत असतात. मानवी जीवांना अतिकठीण असणारा हा संसृतीचा महासागर अनुभवावा लागतो. पण साधनशील असणाऱ्या साधकांना सद्गुरुकृपेचा स्वानंद मिळाला म्हणजे हा कठीण असणारा भवसागर सुखाचा ठरतो. ज्या ठिकाणी अनंत सुख आहे अशा आत्मस्वरूपाचा कधीही विसर पडूं नये. आत्मानुसंधान टिकविण्यासाठी सद्गुरूंच्या सान्निध्यांत राहावें. साधकाच्या अंतःकरणांत सद्भाव जागृत झाला, की त्याला सतत आत्मदर्शन होते. आत्मदर्शन झालेल्या साधकाला आपल्या आत्मसुखाचें भांडार किंवा आत्मनिधि सांपडला असे समजावें. परमात्मस्वरूप अनिर्वचनीय आहे हे अगदी खरे आहे. पण त्याचे स्वरूप समजण्यासाठी परमानंद ही त्याच्या जवळची खूण सांगितली आहे.
या विश्वामध्ये जें जें निर्माण झाले आहे ते सर्व काही अंतयुक्तच आहे. अंत पावणाऱ्या साऱ्याच वस्तु, खाणी-वाणी जीवनभर सुखदुःखाचे द्वंद्व सहन करीत असतात. ज्या वस्तूला अंत नाही, अशी एकच वस्तु आहे, तो म्हणजेच आनंद. पहा ! आनंदस्वरूप असणारा आत्मा हा अमर आहे म्हणून तो अंतरहित अनंत आहे.
ऐसें जयास ज्ञान जालें । तयाचे बंधन तुटलें ।
येरां नसोनीच जडलें । सदृढ अविवेके ॥ १४ ॥
ज्या पुरुषाला आपुल्या आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाले आहे, ज्याची सर्व इंद्रिये आत्मस्वरूपाकडे अंतर्मुख झाली आहेत, संकल्प – विकल्प करणारे मन बुद्धीच्या सान्निध्यांत रमते, शुद्ध बुद्धि विषयांचा संग सोडून आत्मस्वरूपाकडे वाटचाल करते, विषयाचे चिंतन करणारे चित्त सतत आत्मचिंतनांत रममाण असते अशा ह्या सर्व इंद्रियांचा सूत्रधार – चालक हा स्वयंप्रकाश आत्माच आहे. ज्याला आत्मस्वरूपाचें ज्ञान झाले आहे तोच बंधमुक्त असतो. ज्याला जन्म-मृत्यूचे बंधनच नाहीं तोच बंधमुक्त समजावा.
स्वयंप्रकाश असणारा आत्मा हा अजर, अमर आणि अनंतस्वरूप आहेच. पण ज्यांना या आत्मस्वरूपाचा स्वानुभव नाही असे सामान्य लोक अज्ञानाच्या खोल गर्तेमध्ये अडकलेले असतात. ज्ञानस्वरूप असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानदारिद्र्य हें नाहींच. पण भ्रमामुळे, भ्रांतीमुळे हे अविवेकी लोक या गाढ अज्ञान अंधःकारामध्ये अडकले आहेत. जगामध्ये दोनच घटक अनुभवाला येतात. प्रवृत्ति आणि निवृत्ति, सुखरूप आणि दुःखरूप, ज्ञान आणि अज्ञान, बंधमुक्त आणि बंधयुक्त. मनुष्याच्या जीवनांत अविवेकाचा संग जडतो. अविवेकामुळेच ह्या सुखदुःखाच्या सर्व मालिका अनुभवाव्या लागतात. पहा ! या अज्ञानाच्या उदरांत अविवेकाची मालिकाच उदय पावते. अविवेकामुळे भ्रम निर्माण होतो. त्याचेमधूनच भ्रांति डोकावत असते. नकळत जन्म-मृत्यूची दीर्घ परंपराही प्राप्त होत असते.
संदेह हेंचि बंधन । निशेष तुटला तेंचि ज्ञान ।
निःसंदेही समाधान । होय आपैसें ॥ १५ ॥
जीवनामध्ये सतत संशय असणे हे एक दुबळेपणाचे लक्षण समजावें. संशयाचे जीवन हे अत्यंत निकृष्ट समजले जाते. चालत्याबोलत्या जीवनाला संशय हा बाधक ठरतो. “संशयाचे ज्ञान खोटें । संशयाचे वैराग्य पोरटें । संशयाचे भजन ओखटें । निर्फळ होय । ” जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचा संशय बळावला की तो सहज काढता येत नाही. संशय हा जीवनाला बंधनकारकच ठरतो. समर्थ म्हणतात, “व्यर्थ संशयाचे जिणें । व्यर्थ संशयाचे धरणे । व्यर्थ संशयाचें करणें । सर्व कांहीं” जीवनामध्ये संकल्प करणारे हे मन संशयाने दुबळे झाले की त्या दुबळ्या मनाने केलेला दुबळा संकल्प त्या मनाला बंधनकारक टरतो. परमार्थी मन हे संशयरहित असावे लागते. मनाचा मोठेपणा, मनाचा सरळपणा आणि मनाची प्रामाणिकता हीच परमार्थाला उपयोगी पडते. व्यवहारांतील दृश्य वस्तूचे ज्ञान असो, किंवा परमाथांतील आत्मज्ञान असो त्या ठिकाणी मन-बुद्धीचा सरळपणा असेल तरच त्या त्या ज्ञानाचें अंतिम समाधान मिळते. म्हणून संशयरहित ज्ञान असणे हेच अति उत्तम होय !
देहांत आनंदस्वरूप असणारा आत्मा हाच एक अमर आहे. या आत्म्याच्या ठिकाणी निरंतर असणारे स्वरूपज्ञान हेही अमर आहे. साधकाला अमर असणाऱ्या आत्म्याचे ज्ञान झाले की, साधक समाधानी होतो. ज्ञानामध्ये ज्ञाता हा स्वतःच ज्ञान शोधीत असतो. त्यामुळे त्याचा शुद्ध भाव निःसंशय होतो. अशा अवस्थेमध्ये त्याचे स्वतःचे शुद्ध ज्ञान अधिकच पारदर्शी होते. साधक हा निःसंशयी झाला की आत्मज्ञान प्राप्तीमुळे तो पूर्ण समाधानी होतो. जो स्वतः संशयरहित असतो तोच सद्गुरुकृपेनें बंधमुक्त होतो.
प्राणीयास माया सुटेना । अभिमाने त्रिपुटी तुटेना ।
वृत्ति स्वरूपी फुटेना । स्फूर्तिरूपे ॥ १६ ॥
सामान्य मनुष्याला ही माया सहज सोडता येत नाही. कारण या मायेचा गुंता फार मोठा विलक्षण वाटतो. एखाद्या पाण्याच्या सरोवरामध्ये कमळाच्या वेलीचा खूप मोठा गुंता (वेष्टन) पसरलेला असतो. हत्तीसारखा मोठा प्राणी पाणी पिण्याच्या मोहाने पाण्यांत उतरतो. हत्ती हा सहजच पाण्यातील चिखलामध्ये कमळवेलीच्या वेष्टनामध्ये अडकला जातो; तदवत् सामान्य मनुष्याची अवस्था होत असते. मनुष्याचे बाह्य दृश्यावरील प्रेम सुटत नाही. मनादि वासनांची धांव आवरता येत नाही. देहाभिमान असल्यामुळे मीपणाची त्रिपुटी कांही केल्या हटत नाही. मी कर्ता, मी भोक्ता या विचारांच्या मोहाने वासनासमूह वाढतच असतो. कर्ता, कर्म, क्रिया; भोक्ता, भोग्य आणि भोग यांमध्ये असणारा मीपणा हा अधिकच बळावला जातो. या सर्व अनर्थ परंपरेचे कारण या देहांत असणारा ‘मी’ हाच भाव होय ! मनुष्याच्या ठिकाणी असणारा ‘मी’ हा अति निकृष्ट भाव मनुष्याला आत्मसुखाकडे वळू देत नाही.
आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी प्रत्येक क्षणाला असंख्य वृत्ति उठत असतात. उदय पावणाऱ्या वृत्तींची धांव ही बहिर्मुख विषयाकडेच असते. याचे कारण निसर्गाच्या सान्निध्यांत वावरणाऱ्या चैतन्याला निसर्गाचं आकर्षण अधिकच असते. मनोवृत्तीचा स्वभावही असाच असतो. सामान्य मनुष्याची वृत्ति काही केल्या स्वस्वरूपाकडे वळत नाही. बाह्यांग उपासना कितीही केली तरी अंतःस्फूर्ति स्वरूपाकडे झेपावत नाही. मनुष्याच्या ठिकाणी वैराग्यभाव नसेल तर त्याची आत्मस्फूर्ति – आत्मभाव कदापि जागृत होत नाही.
जे मायाजाळी पडिलें । तें ईश्वरासी चुकले ।
ते प्राणी सांपडले । वासनाबंधनीं ॥ १७ ॥
जगामध्ये दिसणारे भासणारे हे सर्वही दृश्य मायामय आहे. आपल्या मनासह सर्व ज्ञानेंद्रिये ही बाह्य विषयांतच रमलेली असतात. जीवाला या विषयांतच सुख वाटत असल्यामुळे त्याला देहबुद्धीचा संग सोडवत नाही. देहबुद्धीमध्ये वावरत असणाऱ्या जीवाचे तोंड अधोमुख असते. जीव हा अहंममतारूपी मायेच्या जाळ्यांत सांपडल्यामुळे तो ईश्वरापासून दूर पडला आहे. परमेश्वराच्या सन्मुख असणे ही गोष्ट अत्यंत भाग्याची समजावी. पण जीव हा ईश्चरापासून विन्मुख असल्यामुळे त्याला जीवावस्था प्राप्त झाली आहे. जीव हा नवनव्या वासनांच्या बंधनांनी अधिकच बद्ध झालेला दिसतो. जो आपल्या आमसुखापासून च्युत झाला तोच पतीत समजावा. जीव हा वासनेच्या बंधनांत सांपडला की, त्याला त्यांतून सुटता येत नाही. मनाला सतत विषयांत रमविणारी ही वासना पुढे जीवाला जन्म-मृत्यूच्या चक्रांत अडकवीत असते.
जीवनामध्ये आत्मा आणि अनात्मा असे दोन घटक दिसून येतात. जीव हा अनात्म वस्तूमध्ये गुंतला म्हणजे तो आत्मसुखाला पारखा होतो. आत्मसुखाला वंचित झालेला जीव हा जीवनभर बापडाच राहतो. वासना ही जीवनभर कुठे असते ? ती जीवनामध्ये काय काय करते ? त्या वासनेचा जीवनाला किती उपयोग होतो ? पहा ! ‘वासना मुळीची अभेद’ ही वासना जीवाच्या ठिकाणीच असते, राहते. या वासनेमुळेच जीवाला जीवावस्था प्राप्त झाली आहे. ही वासना ह्या जीवाला जीवनभर विषयांतच रमवीत असते. सामान्य जीवनामध्ये विषयांतून मिळणाऱ्या विषयसुखाचा कनिष्ठ भास देऊन जन्म-मृत्यूच्या परंपरेत अडकवीत असते.
जयाचे दैव उदेलें । तयास ज्ञान प्राप्त जालें ।
तयाचे बंधन तुटलें । निःसंगपणे ॥ १८ ॥
एखादा दरिद्री मनुष्य खूप प्रयत्नशील असतो, पण त्याचे दारिद्र्य लवकर संपत नाही. त्याने पूर्वजन्मी धनदान, द्रव्यदान केल्याचे चांगले कर्म केले असल्यामुळे या जन्मीं अचानक धनप्राप्ति होत असते. त्या धनप्राप्तीचा परिणाम त्याच्या सर्वांग जीवनावर समाधानकारक ठरतो. त्या नंतर त्याचे उर्वरित जीवन यशस्वी होते. असाच प्रकार साधकाच्या परमार्थी जीवनामध्येही अनुभवाला येतो. साधक हा जीवनभर मोठ्या चिकाटीने साधना करीत असतो. साधनेचे अनेक प्रकार करूनही समाधानाची प्राप्ति होत नाही. जोपर्यंत ‘मी’ कर्ता, ‘मी’ भोक्ता ही धारणा असते तोपर्यंत आत्मतृप्ति होत नाही. पण साधकाच्या जीवनामध्ये असा एखादा विलक्षण क्षण येतो. साधक हा सद्गुरुपदी अनन्य शरण जातो. ज्या क्षणी तो आपुले सर्वस्व श्रीगुरूंना अर्पण करतो त्या क्षणी त्याचे दैव उदयास येते. त्याच्या ठिकाणी असणारे अज्ञान नष्ट होऊन त्याची ज्ञानज्योत प्रकाशित होते. त्याला आपल्या आत्मस्वरूपाचा निश्चल बोध होतो. काही क्षणांतच होणारा बदल हा श्रीगुरुकृपेनेच होऊ शकतो.
परमार्थामध्ये आत्मज्ञानाची प्राप्ति होणे यालाच यशस्वी जीवन असे म्हणतात. मनुष्याने जीवनभर ज्ञानप्राप्तीसाठी उत्तम प्रयत्न करावा. त्या प्रयत्नामध्ये त्याचे शील उत्तम असेल तर दैव आणि विधिघटना ह्या एकत्र येतात. अशी ही दुहेरी पूर्वपुण्याई उदयास आली की साधकावर गुरुकृपा, आत्मकृपा होत असते. साधकावर स्वयंप्रकाश असणाऱ्या आत्म्याची आत्मकृपा झाली की त्याची वासना बंधने तुटून जातात. ज्याच्या सर्व वासना नष्ट झालेल्या आहेत तोच निःसंगपणे आत्मानंदांत रममाण असतो. जो साधक आपुल्याच आत्मानंदामध्ये स्थिर असतो तोच तो बंधमुक्त होतो.
सर्वसाक्षी तुर्या अवस्था । तयेचाहि तूं जाणता ।
म्हणोनी तुज निःसंगता । सहजचि आली ॥ १९ ॥
सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणांत तीन अवस्था अनुभवास येतात. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ति. मनुष्याला जागृतीमध्ये बाह्य विषयांचे ज्ञान असते. अशा वेळी ज्ञाता त्या बाह्य विषयाशी तादात्म्य असल्यामुळे त्याला स्वतःची विस्मृति असते. याला सामान्य जागृति असे म्हणतात. स्वप्नामध्ये देहांतील जाणीव हदयगुंफेमध्ये सुप्त असते. मन हे अर्धजागृत राहून स्वप्नांतील विषयाशी कर्मरत होऊन क्षणिक सुखाचा किंवा दुःखाचा अनुभव घेत असते. स्वप्नावस्था म्हणजे ही एक भ्रांतिमय क्षणिक अवस्था असते. स्वप्नामधून जागृत झाल्यावर स्वप्न हे भ्रामकच आहे असे वाटते. सुषुप्तीमध्ये गाढ अज्ञानच असते. स्थूल देह आणि देहांत असणारी सर्व ज्ञानेंद्रिये विश्रांति घेत असतात. जीवात्मा हा हृदयगुंफेत सुप्तावस्थेमध्ये असतो. अशा वेळी या जीवात्म्याला देहाचा, जगाचा आणि स्वतःच्या ज्ञानाचा विसर पडतो. मनुष्याच्या जीवनांतील हीच ती गाढ अज्ञान अवस्था होय. जीवनामध्ये मूढपणे स्वतःला विसरणे हेच अज्ञान समजावें. ज्ञानरूपाने स्वतःच्या शुद्ध जाणिवेला जाणून घेणे यालाच ज्ञान असे म्हणावें.
पहा ! या तिन्ही अवस्थांना जाणणारी एक ज्ञानप्रधान अशी तुर्यावस्था आहे. ती अतिशुद्ध जाणीव सर्वच जाणते म्हणून तिला सर्वसाक्षिणी तुर्यावस्था असे म्हणतात. “जाणे ब्रह्म जाणे माया । ती एक जाणावी तुर्या’ ह्या चारी अवस्थांना जाणणारी तूंच ज्ञानप्रधान असल्यामुळे तुझ्या स्वरूपाला निःसंगता प्राप्त झाली आहे. आतां तूं संगनिःसंगातीत झाल्यामुळे तुझ्या ठिकाणी कसलेच बंधन उरलें नाहीं.
आपणासी तूं जाणसी । तरी तूही नव्हेसी ।
तूंपणाची कायेसी । मात स्वरूपीं ॥ २० ॥
साधकाला आपुल्या आत्मस्वरूपाचा ज्ञानबोध झाला की साधक सतत आत्मानंदामध्येच रमू लागतो. त्या आत्मानंदामध्ये अतिसूक्ष्म असणारे मी हे स्वतःचे भान असतेच. त्याच भानामध्ये गाळीव मीपणाचा फुंज हा असतोच. ज्या ठिकाणी मी हे भान असते त्याच मी आणि तूं ह्या दोन्ही स्मृति परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाहीत. परमात्मस्वरूप हे स्वतःसिद्ध परिपूर्ण आहेच आहे. ब्रह्मस्वरूपाचा आणि या मायेचा यत्किंचितही संबंध नाहीं.
जागृत, स्वप्न आणि सुषुप्ति ह्या तीन अवस्थांमध्ये ‘मी’ हे भान जाणवत असते. ह्या अवस्थांमध्येच हे अज्ञान वावरत असते. यामध्ये अज्ञानाच्या सर्व अवस्था जाणवत असतात. तुर्यावस्था ही ज्ञानप्रधान चौथी अवस्था समजली जाते. अशा ज्ञानामध्ये मी ज्ञानी आहे, मला सर्वकाही ज्ञात आहे असे वाटत असते. पण ही ज्ञानावस्था अंती परिपूर्ण असत नाही. जीवनामध्ये ज्ञान आणि अज्ञान ही दोन्ही सापेक्षच असतात. शुद्ध ज्ञान हे आपल्या ज्ञानप्रभावाने अज्ञानास नाहींसें – निवृत्त करतें. अज्ञान मावळून गेल्यानंतर एक ज्ञानावस्थाच शिल्लक उरते. पहा ! सूर्य आणि चंद्र आकाशात एकाच वेळी प्रकाश देत असतील तर सूर्यप्रकाशापुढे चंद्रप्रकाश गौण वाटतो, फिका होतो, लोपूनही जातो. याचप्रमाणे निःसंग निर्विकार असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आपला ज्ञानानुभव ‘मी’ ब्रह्मस्वरूपांत विरून जातो. मातीचे ढेकूळ पाण्यात टाकले की, तें पाण्यामध्ये विरघळून जाते. अशाच प्रकारे हा ज्ञानस्वरूप असणारा मी शेवटी या ब्रह्मस्वरूपांत विरून जातो.
जाणता आणि वस्तु । दोनी निमाल्यां उर्वरीतु ।
तूंपणाची मातु । सहजचि वाव ॥ २१ ॥
ज्ञानस्वरूप असणारा ज्ञाता परमात्म वस्तूच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील असतो. ज्ञाता हा आपल्या ज्ञानाचे अस्तित्व सोडून ज्ञेयाशी एकरूप होतो. या ठिकाणी मी आणि तूं, ज्ञान आणि अज्ञान या स्मृति ब्रह्मस्वरूपामध्ये विराम पावतात. इथेच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता पूर्ण होते. मी आनंदस्वरूप आहे या ज्ञानामध्ये अज्ञान थोडेतरी, असते म्हणूनच वेगळेपणा असतो. ज्या क्षणी हे वेगळे भान ब्रह्मस्वरूपांत विरून जाते त्या क्षणी ज्ञाता पूर्ण ज्ञेयस्वरूप होतो. या ठिकाणी मीपण हेही जाते, तूंपण हेही जाते आणि केवळ स्वरूपच शिल्लक उरते. तेच ब्रह्मस्वरूप होय ! श्री समर्थ म्हणतात, ‘जाणतां जाणतां जाणीव जाते | आपली वृत्ति तदरूप होते । आत्मनिवेदन भक्ति ते । ऐसी आहे.” जीवनामध्ये आत्मनिवेदन होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहा ! ब्रह्मस्वरूप हे एकमेवाद्वितीय असल्यामुळे त्या ठिकाणी ज्ञान, अज्ञान यांचा संबंधच संभवत नाही. कर्ता, कर्म आणि क्रिया ही ज्ञानाबरोबर विराम पावतात. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी ब्रह्मस्वरूप होते. ज्ञानस्वरूप असणाऱ्या ज्ञात्याच्या ठिकाणी किंचित द्वैत हे असतेच. पण ब्रह्मस्वरूपामध्ये यत्किंचितही द्वैत खपत नाही. म्हणून ब्रह्मस्वरूप ही अखेरची स्थिति होय !
आतां असो शब्दपाल्हाळ । तुझें तुटलें जन्ममूळ ।
कां जें नाशिवंत सकळ । मदार्पण केलें ॥ २२ ॥
सद्गुरूंनी आपल्या सत्शिष्याला अत्यंत आदराने सूचित केले. अरे बाळ ! बस् आतां पुरे झाला तुझा हा शब्द पाल्हाळ. अरे आतांपर्यंत तुझें आणि माझे अनेकदा सुखसंवाद झाले आहेत. मी असे अनेक विषय तुला समजावून सांगितले आहेत. आतां तुझ्या सर्व शंकांचे निरसन झाले आहेच. तुझ्या ठिकाणी जे नाशिवंत होते तें सर्वही तूं मला अर्पण केले आहेस. आतां तुझ्या ठिकाणी असणाऱ्या सर्व वासना, आसक्ति नष्ट झाल्या, संपल्या आहेत. अरे ! त्याग हेच सर्व जीवनाचे सार आहे बरं ! मानव हा त्यागानेंच बंधमुक्त होऊ शकतो. अतिसामान्य असणाऱ्या वासनेमुळे मानव जन्मोजन्मी जन्ममृत्यूच्या बंधनांत सांपडतो. आतां तं हे सर्व जाणून मला अर्पण केल्यामुळे तुझ्या जन्माचे मूळच नाहीसे झाले आहे. जीवन जगत असतांना पुनर्जन्माचे कारण असणारी वासना संपली तर मानव नित्यमुक्त, जीवन्मुक्त, विदेहमुक्त होतो. अरे बाळ ! आतां तुझी सर्व बंधनें तुटून गेली असल्यामुळे तूं मुक्त झाला आहेस.
साधकाला आपल्या साधकीय जीवनामध्ये सद्रूप, चिद्रूप आणि तद्रूप अशा तिन्ही अवस्थांचा अभ्यास असावा लागतो. साधकाला साधनकाळांत आपल्या सत्शील जीवनाशी समरस होता आले पाहिजे. देहबुद्धि सोडून आत्मबुद्धीशी एकरूप झाल्यावर स्वानंद अनुभवता येतो. देहामध्ये स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप असणाऱ्या अमर आत्म्याचे ज्ञानेश्वर्य प्राप्त झाले की, जीवनामध्ये शांति समाधान मिळते. जिथें शांति-समाधान असते तिथें वासनाबंधन रहात नाही. साधकाला साधन-काळांत सदूरूप, चिद्रूप यांचा संग सोडून परमात्मस्वरूपाशी तद्रूप होता आले पाहिजे. जो साधक ब्रह्मस्वरूपी तद्रूप होतो, लीन होतो, तोच अंती मुक्त होतो.
जें जें जाणोनि टाकिलें । तें तें नाशिवंत राहिलें ।
तुझें तुज प्राप्त जालें । अक्षईपद ॥ २३ ॥
अरे ! जें जें आब्रह्मस्तंबपर्यंत तूं जाणले आहेस ते सर्व काही नाशिवंतच आहे. जीवनामध्ये एखादी वस्तु जाणून सोडली की त्या वस्तूचे महत्त्व राहात नाही. त्या वस्तूबद्दलचा मोहही कमी होतो. नाशिवंतामध्ये असणारे जे दोष ते तुला समजल्यामुळे तूं तें सर्व नाशिवंत जाणून सोडले आहेस. मानवी जीवनामध्ये “जाणता एक अंतरात्मा” – त्या अंतरात्म्याच्या ठिकाणी असणारा सूक्ष्म ‘मी’ तोही जाणून सोडला आहेस. आतां तुझे अक्षईपद तुला प्राप्त झाले आहे. ज्याला कधीही (त्रिकाली) क्षय नाहीं तेंच अक्षई असते. असे हे एकच परब्रह्म अक्षई आहे. या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जाणणे, नेणे किंवा ज्ञान, अज्ञान हे कांहींच संभवत नाही. असे हे तुझें अक्षई पद ब्रह्मस्वरूप तुला प्राप्त झाले आहे. “क्षयेचि नाहीं जो अक्षई । व्यापकपणे सर्वांठाई । तेथे हेत संदेह नाहीं । निर्विकारी” परब्रह्माला कधीही क्षय नाही म्हणून तें अक्षय असते. व्यापकपणाने सर्व ठिकाणी ते भरून आहे. अशा त्या निर्विकार स्वरूपांत हेतु आणि संदेह असत नाहीत. संगत्याग हाच एक त्याच्या ओळखीचा आहे. वृत्तिशून्य अवस्था आली म्हणजे त्याचा तदाकारपणाने अनुभव येतो.
सद्गुरूंनी आपल्या सतृशिष्याला योग्य असें मार्गदर्शन केल्यामुळे शिष्य अक्षयपदी स्थिर झाला. सद्गुरूंनी प्रथम आत्मानात्म – विवेक सांगितला. त्यानंतर नित्यानित्य – विवेकही समजून सांगितला. ज्ञानप्राप्तीनंतर त्या ज्ञानाचा संग कसा सोडायचा हेही सांगितले. साधनेंतून प्राप्त झालेल्या ज्ञानाचे विज्ञान होणे म्हणजेच ब्रह्मस्वरूप होय !
ऐसें बोले मोक्षपाणी । ऐकोन शिष्य लोटांगणीं ।
निःसंदेह स्वरूपमिळणीं । दोघे येकचि जाले ॥ २४ ॥
ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या सद्गुरुच्या हातांत मोक्ष देण्याचे सामर्थ्य असते. म्हणूनच सद्गुरूंना मोक्षपाणी असा गौरवपर किताब आहे. आतां याच न्यायाने अनन्य शरण आलेल्या सत्शिष्याला सद्गुरुकृपेचा स्वानुभव प्राप्त झाला. असे हे स्वानुभवसिद्ध सद्गुरु शिष्यासमवेत बोलू लागले. अरे बाळा ! माझ्या जवळ असणारे अतिगुह्य स्वरूपज्ञान तुला पूर्ण दिले आहे. आतां तुला प्राप्त झालेली निजस्थिति आणि निजतृप्ति पाहून मी प्रसन्न झालो आहे. “अनंतहस्तें कमलावरानें । देता किती घेशील दो कराने” मोक्षपाणी सद्गुरु प्रसन्न झाल्यावर जीवन धन्य होते हे सत्शिष्याला समजले. सत्शिष्याने अनन्य होऊन न-मनःपूर्वक सद्गुरु चरणांवर लोटांगण घातले. या ठिकाणी श्रीगुरुत्व आणि शिष्यत्व ही सापेक्ष असणारी उपाधि पूर्णपणे संपली होती.
दोघेही स्वस्वरूपी एकरूप झाले होते. आता या ठिकाणी दोघांचाही स्वानुभव निःसंदिग्धपणे एकच ठरला. “गुरुशिष्या एकचिपद । तेथें नाहीं भेदाभेद” अशी एकरूपता प्राप्त झाली. श्रीसद्गुरु आणि सत्शिष्य या दोघांचाही आत्मभाव ब्रह्मस्वरूपांत विरून गेला होता. “नदी मिळाली सागरी । ती निवडावी कोणेपरी” नदी सागराला जाऊन मिळाली की तिचे अस्तित्व वेगळे राहात नाही. याचप्रमाणे सत्शिष्य हा सद्गुरूंच्या कृपेनें ब्रह्मस्वरूपी एकरूप होतो यांत शंकाच नाही.
ऐसा कृपाळु स्वामीराव । आदिपुरुष देवाधिदेव ।
शिष्यास निजपदी ठाव । ऐक्यरुपें दिधला ॥ २५ ॥
श्रीस्वामी महाराज हे अत्यंत दयाळु, कृपाळू, स्नेहाळु, कनवाळू असे असतात. त्यांना या विद्यांतील देवांचाही देव असे साक्षात् सद्धिदानंदस्वरूप ईश्वरच समजावेत. त्यांच्या अगाध कृपेनेंच सत्शिष्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सिद्धस्थान मिळाले आहे. सत्शिष्याला प्राप्त झालेलें गुह्यज्ञान, निजस्थिति, निजतृप्ति, आत्मस्वरूप ह्या एकाच मालिकेतील पूर्णावस्था आहेत. अशी ही पूर्णावस्था सद्गुरूंच्या कृपेनेंच प्राप्त झाली आहे. पहा ! निश्चल निर्विकार परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जो एकोऽहं आदिसंकल्प उठला तोच आनंदस्वरूप आदिपुरुष होय ! सद्गुरुस्वरूप असणाऱ्या आदिपुरुषाची कृपा सत्शिष्यांवर होत असते.
पृथ्वितलावरील सर्व अवतारादि देवांचे मूळ स्थान हा आदिपुरुष ईश्वरच होय ! म्हणून सिद्ध पुरुषांना अवतारी असे म्हणतात. १) सामान्य अवतार, २) अंशावतार, ३) पूर्णावतार, ४) शक्तिरूप तीन देव – ब्रह्मा, विष्णु, महेश, ५) आदिपुरुष ईश्वर, ६) माया ब्रह्माची संधी. त्या पलीकडे निश्चल, निर्विकार परब्रह्मस्वरूप आहे. परब्रह्माच्या ठिकाणी जो एकोहं आदिसंकल्प उठला तोच आदिपुरुष सहजच प्रकृतीच्या साह्याने विश्वव्यापी विश्वंभर झालेला आहे. म्हणून श्रीसमर्थ म्हणतात. अरे ! त्या विश्वंभरास संसार चुकेना की. त्या आदिपुरुषालाही (विश्वंभराला) कल्पांती क्रमाने आपले स्थान सोडून परब्रह्म स्वरूपात एकरूप व्हावें लागते. या विश्वामध्ये ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या सद्गुरूंच्या ठिकाणी अनंत असें सामर्थ्य असते. त्या सामर्थ्यसंपन्न सद्गुरूंच्या सान्निध्यांत प्रयत्नशील असणारा साधक नराचा नारायण होतो. तो नारायणही अंती आपल्या त्यागमय निष्ठेचा उपयोग करून ब्रह्मस्वरूपांत विरून जातो. परमार्थ मार्गातील श्रीगुरु-शिष्यांचा हा यशस्वी प्रवास समजावा.
जो शिष्य स्वामीस शरण गेला । आणि संदेहावेगळा जाला ।
तेणें जन्म सार्थक केला । जो देवांसी दुल्लभु ॥ २६ ॥
साधक हा जीवनभर आपली साधना प्रामाणिकपणे करीत असतो. त्या साधनेंतून त्याच्या सत्शील विचारांचा राजमार्ग मोकळा होतो. साधकाच्या अंतःकरणांत सतत असे वाटत असते, आपला मीपणा कमी झाला पाहिजे. हा मीपणा कमी होण्यासाठी आपण सद्गुरूला शरण जाणे हाच एक सद्उपाय आहे. सत्शिष्याने सद्विचार करून सद्गुरुपदी शरणांगती स्वीकारण्याचे ठरविले. सद्गुरुपदी अनन्यभाव ठेवून शरण जाण्याची पद्धति आहे. सत्शिष्याने सद्विचार करून आपला सर्वार्पणभाव सद्गुरुपदी अर्पण करून अनन्यशरणागती स्वीकारली. या शरणागतीमध्येच मीपणा नष्ट होण्याचे मोठे सामर्थ्य आहे. आकाशातून पडलेली पाण्याची गार थोड्याच वेळांत पाण्यामध्ये विरघळून जाते. त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या सान्निध्यांत सत्शिष्याचा ‘मी’ हा भाव आणि सूक्ष्म असणारा संदेह नाहीसा झाला. “मोक्षश्रिया अलंकृत । ऐसे हे संत श्रीमंत । जीव दरिद्री असंख्यात । नृपती केले” पहा ! साधकाचा अतिसूक्ष्म संशय, संदेह मावळून गेल्यामुळे साधकाचें जीवन धन्य जाले. कृतार्थ झाले. “संदेहरहित साधन । हेचि सत्शिष्याचें लक्षण | अंतर्बाह्य समाधान । चळेना ऐसे ॥ ” सत्शिष्याने आपले एकच लक्ष ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केल्यामुळे त्याच्या जन्माचे सार्थक झालें.
पहा ! ब्रह्मादिदेव हे कर्माने बांधलेले असतात. त्यांना स्वतंत्र साधन अभ्यास करून ब्रह्मस्वरूप होता येत नाही. देवादिकांना ह्या विश्वरचनेतील दिलेल्या कामाव्यतिरिक्त कांहींच करता येत नाही. कारण आदिपुरुषाने ‘ईश्चराने घालून दिलेले नियम हे देवांना तंतोतंत पाळावे लागतात. या जगांतील हाच एक सत्य न्याय समजावा. जगामध्ये चौऱ्यांशी लक्ष जीवयोनी आहेत, त्यांमध्ये फक्त मनुष्य देहामधील साधकांना साधना करून विदेहमुक्त होण्याची संधी मिळाली आहे. “नर तोचि नारायण होतो” असा हा परमार्थ मार्गातील एक अति उत्तम राजमार्ग आहे.
ग्रंथ संपतां स्तुतिउत्तरें । बोलताती अपारें ।
परी अर्थासी कारण, येरें । येरा चाड नाहीं ॥ २७ ॥
ग्रंथरचनेच्या पद्धतीनुसार सद्ग्रंथांची रचना तत्त्वज्ञानाच्या पठडीमध्ये साचेबंध पूर्ण केलेली असते. त्यामुळे असे हे सद्ग्रंथ, अभ्यासू, चिंतनशील असणाऱ्या वाचकांना अतिशय आवडतात. पौराणिक ग्रंथांमध्ये आणि स्तोत्रपाठादि ग्रंथांमध्ये त्या त्या ग्रंथांची फलश्रुति शेवटी दिलेली असते. ती फलश्रुति मोठी आकर्षक शब्दरसाळ असल्यामुळे सामान्य वाचकांना व श्रोत्यांना मोह पाडत असते. म्हणून सामान्य वाचकांना व श्रोत्यांना असे हे पौराणिक ग्रंथ खूपच आवडतात. अशा सामान्य वाचकांना सद्ग्रंथांचा गर्भितार्थ तत्त्वज्ञानाचा भाग सहज समजत नाही. ग्रंथांतील तत्त्वज्ञान समजण्यासाठी असे सद्ग्रंथ पुनःपुन्हां चिंतनशील वृत्तीने वाचावे लागतात. “ग्रंथांचे करावे स्तवन । स्तवनाचें कायें प्रयोजन । येथे प्रत्ययास कारण । प्रत्यो पाहावा” कोणत्याही ग्रंथाच्या वाचनानंतर त्याचे चिंतन झाले पाहिजे. मनन-चिंतन आणि निजध्यास करून त्या अतिश्रेष्ठ असणाऱ्या आत्मतत्त्वाचा बोध झाला की श्रोत्या-वक्त्यांना खरे समाधान होते.
प्रत्येक मनुष्य जीवनभर स्वतःच्या आत्महितासाठी प्रयत्न करीत असतो. पण देहादिकाचा मोह किंवा संग सोडल्याशिवाय आत्महित होत नाही. कोणताही ग्रंथ वाचतांना बुद्धीच्या पातळीवर स्थिर होऊनच त्या ग्रंथांतील मर्म शोधून काढावे लागते. त्या अतिश्रेष्ठ असणाऱ्या आत्मतत्त्वाचा स्वानुभव घेण्यासाठी प्रयत्नच करावा लागतो. या विश्वामध्ये नित्य असणारा आदिपुरुष हाच एक सर्वश्रेष्ठ आहे. त्या आदिपुरुषाचा, परमेश्वराचा शोध घेऊन त्या ठिकाणी स्थिर राहण्याचा प्रयत्न केला तर मानवी जीवन धन्य होते.
इति श्री आत्माराम । रामदासी पूर्णकाम ।
निःसंदेह जालें अंतर्याम । सद्गुरुचरणीं ॥ २८ ॥
आत्माराम हा सद्ग्रंथ सत्चिदानंदस्वरूप असणारा स्वयंप्रकाश “आत्मा” हा केंद्रबिंदु ठेवून या ग्रंथाची रचना केली आहे. यामध्ये सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्या सुखसंवादांतून तत्त्वज्ञानाची, वेदान्ताची मांडणी केल्याचे दिसून येते. सत्शिष्याने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन त्याला अधिकाधिक वेदान्ताचे मार्गदर्शनही केले आहे. साधकाने सतत सावध, साक्षेपी आणि दक्ष असणे हे अत्यंत हिताचें आहे. कारण सद्गुरूंच्या मुखांतून आलेला महत्त्वाचा शब्द “लाग-वेग जाणोनी शब्दाचा । आवांका पहावा मनाचा | शब्दाआंतील गर्भाचा । सांटावा घ्यावा ॥ ” सद्गुरूंच्या मुखांतून आलेला प्रत्येक शब्द, त्या शब्दाचा वेग, त्या शब्दाचा भाव आणि त्या शब्दाचा गर्भितार्थ झटकन समजला पाहिजे. असा अत्यंत सावध असणारा सशिष्य सद्गुरूंच्या कृपेला सुपात्र ठरतो. परमार्थ-मार्गातील साधक-बाधक हा विचार केला तर या ठिकाणी असे दिसून येते, सद्गुरूंच्या सान्निध्यांत प्रयत्नशील असणारा सत्शिष्यच सद्गुरुकृपेनें ब्रह्मस्वरूप होतो.
या आत्माराम ग्रंथामध्ये अशी ही वेदान्ताची सुसूत्र मांडणी करून श्री समर्थ अत्यंत यशस्वी झाले आहेत. सिद्धान्त आणि धादान्त सांगणारा हा एकमेव सद्ग्रंथ आहे. श्रीसमर्थभक्तांनी या आत्माराम ग्रंथाचा अभ्यास करून आपले स्वहित साधावें. श्री समर्थ सांप्रदायामध्ये प्रयत्नशील असणाऱ्या साधकांची आत्मकामना पूर्ण करणारा, साधनशील साधकाला आत्मसाक्षात्कार करवून त्याला निःसंदेह बनविणारा, साधकाच्या त्यागमय जीवनांत अंतिम-प्रसंगी ज्ञानाचे विज्ञान घडवून आणणारा हा एक महान ग्रंथ आहे. या आत्माराम ग्रंथाचा अभ्यास करणाऱ्या सर्व रामदासी साधकांवर, भक्तांवर श्रीसमर्थ सदैव प्रसन्न राहोत अशी सदिच्छा.
माझी काया आणि वाणी । गेली म्हणाल अंतःकरणी ।
परी मी आहे जगज्जिवनी । निरंतर ॥ १ ॥
नका करू खटपट । पाहा माझा ग्रंथ नीट ।
तेणे सायुज्यतेची वाट । गवसेल की ॥ २ ॥
आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतःसिद्ध ।
असता न करावा खेद । भक्तजनी ॥ ३ ॥
ref: satsangdhara
View Comments
खूपच छान आहे वाचून आनंद झाला जय जय रघुवीर समर्थ