संत नामदेव

संत नामदेव गाथा मुक्ताबाईची-समाधी

संत नामदेव गाथा मुक्ताबाईची-समाधी अभंग १ ते १९


तेथोनि वैष्णव आले नेवाशासी । सहसमुदायेंसी देवराव ॥१॥
म्हाळसेलागीं पूजा केली असे निगुतीं । राहिले दहा रात्रीं ह्रषिकेशी ॥२॥
येथोनि चलावें पुढती शारंगधरा । जावें टोकेश्वरा स्नानालागीं ॥३॥
चहूं युगा आदि स्थळ पुरातन । आले नारायण गोदातीरीं ॥४॥
नामा म्हणे येथें रहावें ह्रषिकेशी । विजयादशमीशीं सिद्ध होऊं ॥५॥


देव म्हणे राहणें न घडेचि येथें । जावे आतां पुढतें उद्योगासी ॥१॥
निवृत्तिराज म्हणे शुद्ध प्रतिपदा । जाऊं जी गोविंदा प्रतिष्ठाना ॥२॥
अनादि जें स्थळ दाविलें नारायणें । मन प्रतिष्ठाना येते जहाले ॥३॥
चक्रतीर्थीं पोहा म्हणती आला थोर । वैष्णवांचे भार उतरले ॥४॥
नामा म्हणे हरी सहज आली वाट । आपेगांव कोठें सांगा स्वामी ॥५॥


मायभूमि पाहूं यांची आम्हीं डोळां । चलावें गोपाळा सहजासहज ॥१॥
भक्त त्र्यंबकपंत मूळ पुरुष आदि । तयाची समाधि आपेगांवीं ॥२॥
आपेगांवीं आले देव ऋषीश्वर । उतरले भार वैष्णवांचे ॥३॥
धन्य यांचें कुळ धन्य यांचा वंश । धन्य यांचें कुशीं योगिराज ॥४॥
नामा म्हणे आम्हां दाविलें नारायणें । जालीं चौघीजणें याचि क्षेत्रीं ॥५॥


निवृत्ति मुक्ताईनें पाहुनि स्थळ डोळां । आलासे उमाळा ओसंडोनी ॥१॥
तात आणि माता गेलीसे येथून । तेव्हां आम्ही लहान पांडुरंगा ॥२॥
निवृत्ति ज्ञानेश्वर कोरान्नाचें अन्न । सांभाळी सोपान मजलागीं ॥३॥
तुझ्या योगें हरि क्रमियेलें काळा । फुटलासे मेळा तापसांचा ॥४॥
नामा म्हणे यांचें कळविविलें मन । करी समाधान पांडुरंग ॥५॥


पाहिली गे माय पूर्वभूमि आपुली । बहुत सन्मानिली वैष्णवांनीं ॥१॥
चैत्रमास शिवरात्र उत्सव आगळा । जावें पां वेरुळा घृष्णेश्वरा ॥२॥
दशमीचे दिवशीं निघाले बाहेर । उठावले भार वैष्णवांचे ॥३॥
वेरूळ नगर असे पुरातन । विश्वकर्मा यानें कीर्ति केली ॥४॥
अगाध तें पुण्य बोलताती ऋषि । जावें वेरुळासी नामा म्हणे ॥५॥


मुक्ताई उदासी जाली असे फार । आत्मा हें शरीर रक्षूं नये ॥१॥
त्यागिले आहार अन्नपाणी सकळीं । निवृत्तिराज तळमळी मनामाजीं ॥२॥
गंधर्वा सुरगण उठले सहमेळा । गेले ते वेरूळा अवघेजण ॥३॥
वेरुळाचा महिमा सांगे ह्रषिकेशी । जवा आगळी काशी म्हणोनियां ॥४॥
वेरुळाची यात्रा केली यथासांग । मग पांडुरंग विघते जाले ॥५॥
चालिले श्रीरंग वैष्णवांचे भार । पाहावें तापीतीर नामा म्हणे ॥६॥


निवृत्तिराज म्हणे आतां पंढारिनाथा । मुक्ताईला जपा अवघेजण ॥१॥
वेधली चित्तवृत्ति स्वरूपीं निमग्न । नाहीं देहभान मुक्ताईला ॥२॥
अवघेजण जपती जपे नारायण । चालती घेऊन मध्यभागीं ॥३॥
निवृत्तिराजें धरिली मुक्ताई हातीं । सांभाळित जाती निशिदिनीं ॥४॥
पदोपदीं जपे निवृत्तिराज करें । आणिक ऋषीश्वर सांभाळिती ॥५॥
नामा म्हणे देवा जातां तातडीनें । पुढें स्थळ कोण नेमियेलें ॥६॥


तापीचिये तीरीं महत्‌ग्राम थोर । असे सोमेश्वर पुरातन ॥१॥
वद्य वैशाख मास दशमी निर्मळ । उष्णकाळ फार तापतसे ॥२॥
तेथें परशुरामें मारियेला बाण । पाह्ती पुरातन पश्चिमेस ॥३॥
पाहिलें माय आम्हीं तापीतीर । उतरले भार वैष्णवांचे ॥४॥
धन्य तापीतीर दिसे मनोहर । दोही थडी भार पताकांचे ॥५॥
नामा म्हणे हरी आवडीचें स्थळ । कण्हेर कमळ उदय जाला ॥६॥


फुलले अनेक तरुवर तेथ । दुर्वा दर्भ आंत डंवरले ॥१॥
करंज जांभळी लागली एक थाटी । वरी बहु दाटी तरुवरांची ॥२॥
अमृतफळें अपार विस्तारले फार । त्यामाजीं मयूर टाहो देती ॥३॥
कंठ कोकिळा त्या सुस्वर गायन । तरुवर सुमनें परिमळते ॥४॥
पारिजातकांची दाटी थाटी जाली भारी । आंत मैलागिरी डुल्लताती ॥५॥
नामा म्हणे देवा भला हा एकांत । मार्कडेयें तप केलें ॥६॥

१०
सोनियाचीं झाडें अनेक कर्दळी । त्यांत रानकेळी फोंफावल्या ॥१॥
सिताफळी भरित अवघी तापीथडी । दाट दिसती गाढी रामफळें ॥२॥
तापीतीरीं ऋषि आणि शारंगधर । पाठीमागें भार वैष्णवांचे ॥३॥
धन्य महत्‌‍नगर धन्य सोमेश्वर । धन्य तापीतीर योगियांचें ॥४॥
उष्णकाळीं छाया आवडती फार । म्हणती ऋषीश्वर रम्य स्थळ ॥५॥
नामा म्हणे देवा रंगलें अंतःकरण । उतरती विमानें गंधर्वांची ॥६॥

११
उदित कमळें नानावर्ण सुंदर । फुलले तरुवर नानारूपें ॥१॥
श्वेतपीतरक्त भ्रमर रुणझुण । होताती श्रवण वैष्णवांसी ॥२॥
गुंजाराव भ्रमती रत्नकीळा फांकती । मनोहर दिसती सुरवरांला ॥३॥
तरुवर गगनीं अंकृरले भारी । विजा तैं कोंदल्या बहुतांपरी ॥४॥
गंधर्व गायनें आलापित सुस्वरीं । केलें स्पष्ट नयनीं गुह्म गौप्य ॥५॥
नामा म्हणे देवा मन जालें स्थिर । पडियेला विसर अविद्येचा ॥६॥

१२
निवृत्तीनें एकांत केला मुक्ताईशीं । गमन कोणे दिवशीं आरंभिलें ॥१॥
मुक्ताई म्हणे जावें यावें कोठें । अवघें निघोट स्वरूप स्वामी ॥२॥
गर्जतां गगन कडाडली वीज । स्वरूपीं सहज मिळयेली ॥३॥
मावळला दीप ज्योत कोठें होती । सहजा सामावती निरंजनीं ॥४॥
नामा म्हणे हरि जाईल पाहतां । ऐसें माझे चित्ता कळों आलें ॥५॥

१३
आमुच्या स्वस्थानीं नाहीं पां अंधार । अवघीं चराचर प्रकाशत्वें ॥१॥
उदयु आणि अस्तु नाहीं स्वरूपासी । ऐसें मुनि ऋषि जाणताती ॥२॥
आम्हीं कधीं आलों स्वरूप सोडोन । जावें पालटोन जेथिल तेथें ॥३॥
अंतर बाहेर स्वामीचें स्वरूप । स्वयें नंदादीप उजळिला ॥४॥
वद्य वैशाखमासीं दशमीचे दिवशीं । गेले ते स्नानासी तापीतीरीं ॥५॥
नामा म्हणे गोविंदा मनोहर पद्‌‍मनाभा । अंकुरला गाभा विराटाचा ॥६॥

१४
टाळ विणे मृदंग सुस्वर गायन । कोंदलें गगन दाही दिशा ॥१॥
प्रळयींच्याअ विजा वर्षती अपार । जाला धुंधकार दाही दिशा ॥२॥
करोनियां स्नान वैसले बाहेर । म्हणती अंधकार फार जाला ॥३॥
झंझाट सुटला वारा कापूं लागे धरा । नभचि अंतरा कालवलें ॥४॥
नामा म्हणे देवा जाली कैसी गती । पडलीसे भ्रांति अवघ्या जनां ॥५॥

१५
निवृत्तिराज म्हणे प्रळयींचा वारा । सुटला शारंगधरा ऐसें वाटे ॥१॥
हालतें गगन डोलती विमानें । गेलें देहभान अवघियांचें ॥२॥
अवघियांचे डोळे झांकले एकट । माध्यान्हीं अभूट वळुनि आलें ॥३॥
निवृत्ति पांडुरंग राही रखुमाई । धरा म्हणती घाई मुक्ताईला ॥४॥
नामा म्हणे केशवा जाहला उबाळा । कांहीं केल्या डोळा उघडों नेदी ॥५॥

१६
ऋषि म्हणती हरि पातलेसें विघ्न । आतां कैसे प्राण वांचतील ॥१॥
कोणाचिया शुद्धि नाहींचिया कोणा । म्हणती नारायना मृत्यु आला ॥२॥
कडाडली वीज निरंजनीं जेव्हां । मुक्ताई तेव्हां गुप्त जाली ॥३॥
वैकुंठीं लक्ष घंटा वाजती एकघाई । जाली मुक्ताई स्वरूपाकार ॥४॥
एक प्रहर जाला प्रकाश त्रिभुवनीं । जेव्हां निरंजनीं गुप्त जाली ॥५॥
गेलें निवारूनी आकाश अभूट । नामा म्हणे कोठें मुक्ताबाई ॥६॥

१७
उघडिल्या दिशा उघडिलें गगन । पाहिलें वदन भास्कराचें ॥१॥
निवृत्तिराजातें कळवळा वाटे भारी । आतां आम्हां हरि आज्ञा द्यावी ॥२॥
जयजयकारें टाळयाअ पिटिती सकळ । नाचती गोपाळ तापीतीरीं ॥३॥
सकळांचे चित्तीं येतो कळवळा । मुक्ताई डोळां पाहिली नाहीं ॥४॥
नानापरि खेद करिती योगेश्वर लाविती पदर डोळियांसी ॥५॥
नामा म्हणे देवा कैसें आतां कांहीं । आम्हां मुक्ताई बोलली नाहीं ॥६॥

१८
ज्ञानेश्वर तुम्हीं निरविलें सोपान । केली बोळवण पांडुरंगा ॥१॥
तो आम्ही उत्सव पाहिलासे डोळां । चांगोबाचा सोहळा दाविला हरी ॥२॥
होती ऐसी नाहीं जाली मुक्ताई । संत तया ठायीं स्फुंदताती ॥३॥
रम्य स्थळ म्हणोनि राहिले एक मास । युगा ऐसे दिवस ऋमियेले ॥४॥
अर्ध मास वैशाख अर्ध मास ज्येष्ठ । फार होती कष्ट निवृत्तिराजा ॥५॥
मुक्ताई मुक्त केली केशवराजा । नामा म्हणे पूजा तापीतीरा ॥६॥

१९
पूजियेली तापी पूजिला सोमेश्वर । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥
कांहीं कोणावरी नाहीं पडलें ओझें । कष्टी निवृत्तिराज होत असे ॥२॥
आली गेली कैसी आम्हां कळलें नाहीं । कोठें मुक्ताई विसर्जिली ॥३॥
नामा म्हणे देवा उठवा ऋषीश्वरा । निवृत्तीचें करा समाधान ॥४॥

“संत नामदेव गाथा” मुक्ताबाईची-समाधी एकूण १९ अभंग समाप्त

“संत नामदेव गाथा मुक्ताबाईची-समाधी”


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *