संत नामदेव

संत नामदेव गाथा द्रोणपर्व-ह्माळसेन-कथा

संत नामदेव गाथा द्रोणपर्व-ह्माळसेन-कथा अभंग १ ते २८२

तयेवेळीं तो ह्माळसेनू । श्रीकृष्णासी नमस्कारानू । पां-डवासी वंदनू । मग सकळिका रायांसी ॥१॥
मग रायासी स्वधर्में । तेणें आलिंगिलें अनुक्रमें । संतोषोनी राया धर्में । बैसविला ॥२॥
बंदीजन पवाडे पढती । अगाध ब्रीदें वाखाणिती । सकळ परिवा-रासहिती । ह्माळसेनाचा ॥३॥
धन्य धन्य अर्जुना़चें झालें । पूर्व-पुण्य फळासी आलें । एकाहून एक झाले । अधिकाधिक ॥४॥
तंव दुर्योधन म्हणे वीरा । आतां चलावें मेळीकारा । बैसोनी एक वाट विचारा । योजावें कांहीं ॥५॥
ह्माळसेनु विनवी श्रीहरी । स्वाभी जावें मेळीकारी । दिनु मावळलियावरी । येईन देवा ॥६॥
आजी कौरवाजी पैज । जंववरी मावळेल सूर्य । तंववरी घेईन झुंज । रणा-माजी ॥७॥
जंव असे आस भरोवरी । तंव घेईन झुंजारी । रेखा पुसलिया संसारीं । कवणु वांचे ॥८॥
जंव मावळे दिन । तंववरी वांचेल प्राण । तरी देखेन तुझे चरण । नारायणा ॥९॥
नातरी पि-तयाचे कारणीं । माझे प्राण वेंचिती रणीं । तरी सदैव मजवांचुनी । दुजा नाहीं ॥१०॥
आणि कोटी जन्माचें पुण्य । जे देखिले तुझे चरण । तरी मज वैकुंठभुजन । वस्ति करी ॥११॥
तंव बोलिला शारंगपाणी । जे जे इच्छा धरिसी मनीं । तितकी पावसी निर्वाणीं । संदेहो नाहीं ॥१२॥
ऐसें बोलोनी निघाला । सैन्या पुढीचा भंवडिला । श्रीकृष्ण पाडवेसी आला । मेळीकारीं ॥१३॥
मग पाठविलें बंदीजना । जा-उनी सांगा दुर्योधना । केंवि सांडोनी अभिमाना । जात असा ॥१४॥
न जिंकतां पुढील वैरी । कैसें जातां मेळीकारीं । ऐसी नव्हे भरो-वरी । क्षात्रधर्माची ॥१५॥
मेळीकारीं जातां सैन्य । तंव पातले बंदीजन । तेहीं देउनीं आशिर्वचन । ब्रह्मावो केला ॥१६॥
म्हणती दुर्योधना राजाधिराजा । क्षात्रपणाची घेउनी पैजा । तरी कां आणि-तसा लाजा । क्षात्रपणासी ॥१७॥
रणीं वैरिया देऊन पाठी । न घालितां पुरुषार्थाची गांठी । मेळीकारा उठाउठी । केवी जातां ॥१८॥
नातरी सांडुनी हातीयेरा । राज्य द्यावें युधिष्ठिरा । जावें आपुलिया घरा । कुटुंबामाजी ॥१९॥
मनामाजी न धरावी लाज । सांडावी वांटिवेची पैज । तरी तुमचें निकें काज । फळासी येईल ॥२०॥
जरी क्षात्रधर्माची आयनी । पुरुषार्थ कराल समरंगणीं । तरी भ-टाची कास धरूनि । युद्धासी चला ॥२१॥
ऐसीं तिखत उत्तरें करून । बोलते जाले बंदीजन । तेणें खोंचलें मन । महा वीरांचें ॥२२॥
मग कुंचा भवंडिला जाणा । सैन्य लागलें भेरी निशाणा । शंख नादाचें स्फुरणा । रण तुराचे ॥२३॥
वीर सिंहनादें गर्जती । कुंजर किंका-ळिया देती । रथ चक्रें घडघडती । थोर नादें ॥२४॥
उन्नत जालिया आरणी । कौरव उभे ठेले रणीं । भाटा दिधली पेटवणी । बोलावी वेगीं ॥२५॥

भाट जाऊनि वेगेसि । सांगती ह्याळसेनासी । कौख प्रवर्तले युद्धासी । आले वेगीं ॥२६॥
मग चालिले दळभार । चा-लिले पायाचे मोगर । तेथें तुंबळ झालें थोर । दोहीं दळीं ॥२७॥
महींद्र मंथनीचे हल्लाळ । तैसें उसळलें पायदळ । अशुद्धाचें खल्लाळ । रणामाजी ॥२८॥
मग उठावलें असिवार । तेंही भंगविलें पायाचे मोगर । रणकंदन केलें थोर । समरंगणीं ॥२९॥
मग कुंजर भार उठावले । तेही असिवारां भंगिले । रक्तमांस कालविलें । चिखलु झाला ॥३०॥
मग उठावले रहंवर । तेही पळविले कुंजर भार । शस्त्रीं न दिसे दिनकर । अभ्रामाजी ॥३१॥
तेथें सुटले शरजाळ । बाणीं व्यापिलें अंतराळ । उठती अग्नीचे कल्लोळ । दही दिशा ॥३२॥
तंव कर्णू उठावला । तेणें सबळ वाहानु पाचारिला । ह्मणे साहें साहें वहिला । जासी झणीं ॥३३॥
ह्मणे साहें साहें गा वीरा । झणीं सरसील माघारा । माझिया घायाचा दरारा । लागला तुज ॥३४॥
हें परिसोनियां उत्तर । कोपें खवळला महावीर । मग चा-लिला समोर । कर्णाउजु ॥३५॥
ह्मणे एक वेळां पडिलासी । रण-भूमि सांडूनि पळसी । मुख दाखवितां न लाजसी । निर्लज्जा तूं ॥३६॥
रणभूमि सांडूनि पळिजे । तेणें मुख केंवि दाखविजे । ह्लदय फुटोनि मरिजे । तरीचे भलें ॥३७॥
अपकीर्तीसी जिणें । तें अप्रयोजक मी म्हणें । मुख दाखवितां लजिरवाणें । वीरांमाजी ॥३८॥
ऐसें ह्मणोनियां गुणीं । विंधिला खडतर बाणीं । जैसा कोपला शूल-पाणी । महाभूतीं ॥३९॥
कर्णू तोडी वरिच्यावरी । परी कासावीस केला भारी । सारथी आणि वारू चारी । पाडिले भूमीं ॥४०॥
बाण घातीं विकळ केला । मूर्च्छागत भूमीं पडला । तंव अश्वत्थामा पावला । सांवरी वीरा ॥४१॥
मग संधानाच्या शरीं । अश्वत्थामा येतां दुरी । तो भेदिला शरधारीं । विकळ केला ॥४२॥
तंव पा-वला दु:शासन । तेणें खडतर घातले बाण । झाकुळले रविकिरण । आच्चदिलें दिसे ॥४३॥
तयाचे शर तोडुनी । मग विंधिला अनि-वार बाणीं । दु:शासन पळविला रणीं । रथेंसहित ॥४४॥
भूरि-श्रवा सोमदत्तु । तेही पाचारिला वीरनाथु । तुझा थोर पुरुषार्थु । देखिला आम्हीं ॥४५॥
कृतवर्मा आणि पौंडरिकू । भगदत्तू पिंगाक्षू । अनंत विजयो बाहाळिकू । उठावले ॥४६॥
तये वेळीं सबळ वाहानु । विरक्षत्रिया पंचाननु । तेणें तोडिलें बाणें बाणु । पाडिलें भूमीं ॥४७॥
मग तेही सकळ वीरीं । रघु घातला माझारीं । वर्षताती शरधारीं । मेघ जैसें ॥४८॥
प्रळयकाळीं जळधार । वर्षती अखंड धार । जैसा झाकोळला दिनकर । अभ्रामाजी ॥४९॥
बापु येकला वीर राणा । सावरिपु असे त्याचिया बाणा । ते न साहवेचि म्हाळसेना । महावीरा ॥५०॥

मग लेटिला रहंवरु । जैसा तृणावरी वैश्वानरु । कीं तमावरी दिनकरु । उदय करी ॥५१॥
कीं महाभूतावरी रुद्नु । कीं प्रळयकाळीं समुद्नु । कीं दैत्यसैन्यावरी इंद्रु । वज्रघातें ॥५२॥
तैसा रथ घडघडितु । जैस काळावरी कृतांतु । कीं राक्षससैन्यावरी जैसा हनुमंतु । तैसियापंरी ॥५३॥
वर्षताती खडतर बाणीं । सैन्य घाय-वटलें थोर रणीं । वीरासी झाली भंगणी । क्षणामाजी ॥५४॥
करीं घेऊनियां गदा । रथ घोडे करी चेंदा । केला महा वीरासी धोदा । रणामाजी ॥५५॥
सारथी आणि महारथी । थोर घाईं पाडिले क्षितीं । रथ सैरा धांवती । रणामाजी ॥५६॥
कर्णाचा मनोरथु । पुर-विला मोडुनी रथु । कर्णु करूनि विरथु । चरणीं चाले ॥५७॥
दु:शासनु गदें हाणितला । तो मूर्च्छागत पाडिला । सकळ देखोनी पळाला । सांडुनी रथू ॥५८॥
मग घेउनी रथ बाण । खडतर करितसे संधान । तें सापिच्छी खडतरोन । विसंसर होती ॥५९॥
सैन्य पळालें गेले भंगीं । आपण उभा रणरंगीं । जैसा माया त्यजुगी योगी । निर्वि-कारू ॥६०॥
तें न साहत तेणें । मग घातले खडतर बाण । व्यापुनी ठेविले रवी किरण । अभ्रामाजीं ॥६१॥
आणिक सोडिले शर । अति तिखट अनिवार । जैसे उलथले डोंगर । कल्पांतसमयीं ॥६२॥
तें देखोन ह्याळसेन । केले शंखाचें स्फुरण । मग पाचारिला द्रोण । समरंगणीं ॥६३॥
म्हणे कालच्या दिवशीं गुरू । सांडुनी पळालेती रहंवरू । मागुता घेतला विचारू । झुंजावयासी ॥६४॥
तंव द्रोणु आवेशला । अग्निशस्त्रेंकरुनी हाणितला । जैसा त्रिनेत्रु उघडिला । महारुद्रें ॥६५॥
अग्नि प्रजळला अंबरीं । जे प्रळय काळची लहरी । ह्याळसेन सैन्यावरी । झेंपावला ॥६६॥
तें देखिलें ह्याळसेनें । शस्त्रें सोडिलें पर्जन्यें । चार्‍ही मेघ अव्हानुन । एकेठायीं ॥६७॥
धन्य पावन पांगुळला । गगनीं चहूं मेघांचा मेळा । उदक वाहताहे खळाळा । रणाभाजी ॥६८॥
सैन्यक वीर पुरीं वाहत । मेघ मुसळधारी वर्षत । ऐसें वर्तलें झूंजात । कौरव सैन्यीं ॥६९॥
तंव द्रोणें काय केलें । वायो अस्त्र मोकलीलें । मेघमंडळ विध्वंसिलें । क्षणामाजीं ॥७०॥
उडताती गिरिकंदर । पाषाण गोटी तरुवरें । जेवीं प्रळयकाळीं वसुंधरें । कंपु होय ॥७१॥
उडती रथचिया मो-डुनी । भ्रमतसें अंतराळीं । जेवी गिधाची हाऊळीं । तैसें दिसे ॥७२॥
ध्वजस्तंभ मोडले । रथचि साटे सोडले । पताकाचे सडे झाले । भूमंडळीं ॥७३॥
तें देखोन ह्माळसेन । काढिला नवनी सीतुबाण । पन्नग अस्त्र अभिमंत्रून । लविलें गुणीं ॥७४॥
सर्प चालिले लक्ष कोटी । फणिया उभारिल्या अंबरीं । गरळ वमिताती त्रिकुटीं । जैशा अग्निज्वाळा ॥७५॥

एक शत फणीयाचे । एक शत सहस्त्र लक्ष कोटीचे । जैसे डोंगर असीचे । उसळले गगनीं ॥७६॥
वायो भक्षिता न लागे वेळ । मुखें वमताती हळाहळ । तेणें जळताहे अंतराळ । अग्नि ज्वाळीं ॥७७॥
तंव द्रोणु आवेशला । बाणु गुणीं लविला । लविला । गरुडास्त्र जपिन्नला । मंत्रसिंधु ॥७८॥
गरुड चालिले अ-संख्यात । नखीं पक्षीं विदारीत । सर्पा वर्तलें झुंजात । तये वेळीं ॥७९॥
न लागतां अर्ध घडी । सर्प नेले तडातोडी । मग चालिले लक्ष कोडी । रणामाजी ॥८०॥
तंव ह्माळसेनें काय केलें । पर्वतास्त्र मोकलीलें । तेथें पर्वत चालिले । गगन मार्गें ॥८१॥
असो हें मज पाहतां । पूर्वी पंख होते पर्वता । ते चालले असंख्यात । धर्मकाजा ॥८२॥
तेणें गरुड रगडिले भारी । पाडिले रणा माझारी । मग कौरव सैन्यावरी । वर्षताती ॥८३॥
तंव कोपला द्रोण गुरु । तेणें गुणीं लविला शरु । तो बाणु आणि बारु । कृतांतु जैसा ॥८४॥
वज्र अस्त्र प्रजिलें । तेणें पर्वत कुट केलें । ठिकरीया करूनि सांडिलें । क्षणामाजी ॥८५॥
तंव तेणें म्हाळसेनें । इंद्रास्त्र सोडिलें त्राणें । वज्र गेलें पळोन । गगन- पंथें ॥८६॥
इंद्रास्त्र सत्राणें । विस्तारिलें सहस्त्र गुणें । तें करीतसे संहारणें । कौरवासी ॥८७॥
तें द्रोणें देखोन नयनीं । विष्णुशस्त्र लविलें गुणीं । तें नेलें पिटोनी । इंद्र शस्त्रातें ॥८८॥
मग चालले गजवदन । विकट शुंडा दंड दारुण । फरश घातें संहारून । वैरि-यासी ॥८९॥
तंव म्हाळसेन कोपोनी । गदास्त्र लविलें गुणीं । तेणें नेलें पिटोनि । विष्णुस्वरूपा ॥९०॥
तया गजाचा प्रतापू । वरी द्रोणा-चार्या़चा कोपू । तो धनुर्वाडियाचा बापू । काय करी ॥९१॥
सिंहास्त्र दारुण । बाण सोडिला शीत ओढून । गजासुरा नि:पातुन । क्षणामाजी ॥९२॥
तंव कोपला म्हाळसेनू । गुणीं लविला चामुंडा-बाणू । अठरा भुजा दारुणू । बाबरझोंटी ॥९३॥
मुख विकाळें ता-णीत । डोळे गरगरां भवंडित । कौरवा वर्तलें जुगांत । तयेवेळीं ॥९४॥
तंव द्रोण कोपला महावीरू । गुणीं लविला एक शरू । मै-राळ अस्त्र विक्राळू । गगनामाजी सोडिलें ॥९५॥
शस्त्रें शस्त्र विलया गेलें । तेजें तेज हारपलें । तंव ह्माळसेनें विंधिलें । सातें बाणें ॥९६॥
चारी चहूं वारुयासी । एकु भेदिलें सारथियासी । दोनी भेदिलें द्रोणासी । तयेवेळीं ॥९७॥
द्रोणु आला मूर्च्छागतू । म्हाळसेनें सां-डिला रथू । आला गदा भवंडितू । कर्णावरी ॥९८॥
गदाघातें रथु हाणितला । कर्णु दुसरिया रथावरी गेला । तोही रथु चूर्ण केला । भूमंडळीं ॥९९॥
कर्णु पळाला घायत्राणें । मग लक्षिला दु:शासनें । तोही गदाघातें हाणोन । लोळवीला ॥१००॥

मना पवना वेगु नाहीं । तैसा धांवसु तसे पाहीं । संहारितु गदाघांई । कौरवांसी ॥१०१॥
अश्वत्थामा केला विरथू । कृपाचार्य सांडी रथू । सबळु पळाला जी-वंतू । देखोनियां ॥१०२॥
मग पाचारिला दुर्योधनू । आतां राखें आपुला प्राणू । नातरी रिघाणें शरणू । युधिष्ठिरा ॥१०३॥
तंव पावला दुर्मदू । एकवटले दोघे बंधू । करूनि सिंव्हनादू । मिसळले घांई ॥१०४॥
दुर्मदु ह्मणे म्हाळसेनासी । बहु बोलतां पार जासी । आपणा-कडे न पाहसी । मी कवणु ऐसें म्हणोनि ॥१०५॥
सुखें असतं आ-पुले ठासीं । नेणसी सुखदु:खा कांहीं । तो तूं मराया आपल्या पायीं । आलासी येथें ॥१०६॥
पुरे आयुष्याची विधी । जेविं सर्पु लागे पानधी । तुज कवणें शिकविली बुद्धी । मतिहीनें ॥१०७॥
जरी चिर-काळ असे जिणें । तरी जाय नगर टाकून । वृथा वेंचूनि प्राण । कासया जासी ॥१०८॥
आम्हीं तरी आपुले तरी आपुले गांठीं । बांधली मरणाची खुंटी । विधि पुरलिया शेवटीं । वांचुन तेणें ॥१०९॥
पाहें पां कालचे दिवसीं । जे परी झाली बा अभिमन्यासी । तरी ओकूनियां कां प्राण देसी । वृक्षा काजें ॥११०॥
तंव बोलिला ह्माळसेनू । हें जाणें भेडसावणें । आधीं गाठीं बांधोन मरण । आलों येथें ॥१११॥
परी देख तुझें अंतरंग तूं । या अकरा क्षोणि स- हितू । तुह्मी पावाल मृत्यू । एकेएकु ॥११२॥
तुमचे निर्वंश होती । हें देखतसे अंतर्गती । पांडव राज्य करिती क्षिती । निश्चयेंसी ॥११३॥
धन्य धन्य अभिमन्य । तेणें रणीं वेंचिले प्राण । अंतीं तुष्टला नारायण । मुक्तिदाता ॥११४॥
आजी पितयाचे कारणीं । माझे प्राण वेंचले रणीं । परी सदैव मजहुनी । दुजा नाहीं ॥११५॥
असो तुह्मासी काय नीती । तुह्मी असा पापमूर्ती । तुम्हांसी कैंची मती । भूमिभार ॥११६॥
ऐसें बोलोनी खडतरी । दुर्मदु विंधिला दाही शरीं । ते बाण नहेती मलार्‍ही । यमदंड ॥११७॥
तंव दुर्मदें केलें संधान । चारी सांडुनी तोडून । सहा बाण तिष्टपणें । पावले वेगीं ॥११८॥
चारी चहूं वारुयांसी । एकु भेदला सारथीयासी । एंकु भेदला दुर्मदासी । एकु पडला रणीं ॥११९॥
तें देखोन दुर्योधन । पळाला रथ मुरडुन । हासिन्नला म्हाळसेन । म्हणे परतोन पाहें ॥१२०॥
तंव द्रोणु सावधु झाला । दळभारु एकवटला । तेथें संग्रामु झाला । अति दारुण ॥१२१॥
कृपाचार्य आणि द्रोणू । अश्वत्थामा आणि सूर्यनंदनू । भूरिश्रवा विकर्णू । सोमदंतु ॥१२२॥
सोरट आणि पढीवारू । चीन चीनभोठ आणि बर्बरू । परी एकला न सावरू । बागड राये ॥१२३॥
अतिबळ आणि सबल । कळाईत निकुंभ अनिळ । ऐसें एकवटलें दळ । कारैवांचें ॥१२४॥
सैन्या कुंचा भवंडिला । शंखनादें कोंदाटला । येथें सवेंचि पावला । दुर्योधनू ॥१२५॥

तंव म्हाळसेनाचिया सैनीं । अंबर गर्जिन्नला निशाणीं । शंख नादाचिया ध्वनीं । नाद कोंदे ॥१२६॥
अतिरथी आणि महारथी । वीर घालाघाली करिती । ते सिंहनादें गर्जती । महावीर ॥१२७॥
वीरसेनु दळभंजनू । वीरबाहो सबल बाहानू । अग्निकेतु रणमर्दनू । पराजितु ॥१२८॥
ऐसें सैन्यकहो वीर । सौर-पणें रणरंगधीर । जेंही जिंकिले नृपवर । मेदिनीचे ॥१२९॥
ऐसें सैन्य चालिलें रणीं । मागुती परतली आयिनी । पुढती द्बंद्बयुद्धें मांडोनी । तुंबळ झालें ॥१३०॥
वीर पेटले महा-मारी । वरुषताती खडतर शरीं । तेथें जुगांत झालें भारी । कौरव सैन्या ॥१३१॥
तया कौरव सैन्या आंतू । थोर हलकल्लोळ होतू । जैसा मांडला आवर्तू । प्रळयकाळीं ॥१३२॥
तंव कर्ण द्रोणें वाहलें । कौरवसैन्य एकवटलें । तेथें घोरांदर झालें । महा दारुण ॥१३३॥
बाणजाळ सुटलें कैसेम । सूर्यमंडळीं अभ्र जैसें । सूर्यकिरण न दिसे । अंधकारीं ॥१३४॥
बाणीं खोंचलें सकळ सैन्य । परी न भंगेची दारुण । तें देखताहे ह्माळसेन । महावीरु ॥१३५॥
मग तेनें पेलिला रथू । जेंवी काळवरी कृतांतू । कीं चंद्रावरी राहूकेतु । पर्व-समयीं ॥१३६॥
कीं काळावरी महाकाळू । कीं दैत्यसैन्यावरी रण-कंदोळू । कीं मनामाजी परिवळू । दाहो जैसा ॥१३७॥
कीं सृष्टि सं-हारितां तयेवेळीं । जैसा विखें चंद्रमौळी । कीं वडवानल समुद्रजळीं । दांहो करी ॥१३८॥
तैसा तो ह्माळरोन । संहारी कौरवसैन्य । बाण नव्हती ते दारुण । काळदंड ॥१३९॥
ना आणिकु एक मज गमत । खेळ खेळताहे श्रीअनंत । ह्याळसेने निमित्यें । कौरवासी ॥१४०॥
ऐसा उठावला महावीर ।  फांकले तेजाचे अंकूर । पळोन गेला अंधकार । रविबिंब जैसें ॥१४१॥
शंख वाहिला घनघोषू । गर्जिन्नला स्वर्ग लोकू । पाताळभुवनीं शेषू । कांपिन्नला ॥१४२॥
जेणें रथासि वेगु देऊनि । पावला टाकितु आरणी । कौरव सैन्य भंगुनी । सैन्यका वीरा ॥१४३॥
देखोनि कुंजरांचा भारू । खवळिला महावीरू । करितां झाला घोरू । गदाघातें ॥१४४॥
एकातें धरितु चरणीं । एकातें टा-कितु गगनीं । कुंजरभर संहारूनि । चालिला पुढा ॥१४५॥
पुढा दे-खोनि असिवारा । प्रवर्तला महा मारा । तंव पुढा रमावरा । देखतां झाला ॥१४६॥
मग रथें रथु हाणें । घे घे पुढिलातें ह्मणे । आकाशीं टाकी सत्राणें । टाकी यासी ॥१४७॥
तो मनातें टाकी मागें । पवन आटोपे वेगें । जैसा मीनु तरंगे । समुद्र जळीं ॥१४८॥
तो सैरावैरा धांवतु । पाठी येताहे रथु । तयाचा वर्णितां पुरुषार्थ । खुंटली वाणी ॥१४९॥
तंव द्रोणासि देखोनि नयनीं । तो धाविन्नला चरणीं । गदाघातें संहारूनि । चारी वारू ॥१५०॥

द्रोणु बानीं नरुषत । ते सर्वांगीं खडतरत । अशुद्धाचे पुर वाहत । तयेवेळीं ॥१५१॥
परी न मानी तयाचिया मना । जंव गदाघातु द्याबा द्रोणा । तंव कर्णे केलें संधाना । तयेवेळीं ॥१५२॥
तैसाच दिधला अवघातू । मोडिला कर्णाचा रथू । तयेवेलीं तो सूर्यसुतू । चरणीं चाले ॥१५३॥
कर्ण द्रोण वरुण चाली । वरुषताती शरधारीं । तेथें खोचे जिव्हारी । महावीरु तो ॥१५४॥
कृपाचार्य अश्वत्थामा । थोर पेटले संग्रामा । दु:शासना साउमा । पावला तेथें ॥१५५॥
ऐसें कौरवसैन्य मिळालें । शरधारीं वरुषले । जैसे अ-भ्रामाजीं झांकुळलें । रविबिंब ॥१५६॥
तेवेळीं तो ह्माळसेनू । करीं घेउनी धनुष्यबाणू । करिता जाला संधानू । वीरराजु ॥१५७॥
तेणें शरजाळ तोडुनी । धनुष्य पाडिलें धरणीं । खंड विखंड अरणी । कौरवसैन्य ॥१५८॥
मग भुद्नल हातीं घेतला । चरण चाली उतरला । गुरु हाणितला । मस्तकावरी ॥१५९॥
घाईघाई आली कळवळी । मूर्च्छा येऊनि पडला भूमंडलीं । तंव पिटिली एक टाळी । कौरवसैन्यीं ॥१६०॥
मागुता आला रथावरी । कर्णूं विंधिला दारी शरीं । सा-रथि आणि वारू चारी । पडिले रणीं ॥१६१॥
सवेंचि गदा घेऊनि । धावि-त्रला चरणीं । अश्वत्थामा हाणोनि । पाडिला धरणीं ॥१६२॥
तयाची परी कृपाचारी । गदाघातें हाणितला शिरीं । पाडिला धरणीयेवरी । मूर्च्छागतु ॥१६३॥
तें देखोन दुर्योधनू । पळाला रथ घेऊनि । सबळु आणि दु:शासनू । पळती पुढा ॥१६४॥
तंव समसप्तकु पाचारिला । वीरा राहे राहे सैरा । तेथें दोघां संग्रामु झाला । घोर देखा ॥१६५॥
उरीं शिरीं कपाळीं । जानु जांग वक्षस्थळीं । दोघे वीर महाबळी । न लोटती एकमेकां ॥१६६॥
तंव तेणें ह्माळसेनें । समसप्तकु हाणि-तला त्राणें । थोर मूर्च्छा आली तेणेम । पडला धरणीं ॥१६७॥
दे-खोनि सैन्या सुटला पळू । कौरव सैन्यामाजी हलकल्लोळू । तो खव-ळला महाकाळू । अंगवेना ॥१६८॥
कौरवसैन्य पुढें पळत । थोर हाहाकार होत । तेथें वर्तले जुगांत । महावीर ॥१६९॥
तंव वो-लिला दुर्योधनु । श्रीगुरु कोठवरी पळोन । या पुढें नाहीं जाणें । सर्वथा आह्मी ॥१७०॥
हा कपटिया नारायणू । येणें रचिलेंसे नि-र्वाणू । नातरी कैमचा ह्माळसेनू । कोठुनी आला ॥१७१॥
न कळती या कृष्णाचें मत । एकएकासी निर्माण करीत । जय देणें पांडवांसा । भलतीयेपरी ॥१७२॥
पहाजी सोळा वरुषाचा वीरु । अभिमन्यु धा-कुटें लेंकरूं । तेणें केला संहारूं । महावीरांचा ॥१७३॥
तंव बोलले द्रोण गुरु । इतुका जाणसी विचारु । तरी कां करिसी वैराकारु । राज्य नेदिसी त्यांचें ॥१७४॥
देवो तयाचा सारथी । ऐसें जाणसी निगुती । तरी कां धरितोसी अनिती । विचारू दुजा ॥१७५॥

ऐसें जाणतं मनीं । पांडवा सारथी चक्रपाणी । तरी कासया निर्वाणीं । येतां तुह्मी ॥१७६॥
तया सारथी देवरावो । तो पांडवांसी देईल जयो । कौरवांसी करी क्षयो । हें निभ्रांत जाणा ॥१७७॥
धरूनि मच्छाचा वेषू । दैत्य वधिला तो शंखू । कूर्मवेषें भूमि गोळकू । धरिला पृष्टीं ॥१७८॥
जैं वराहरूप नटला । तो हिरणाक्षु दैत्य वधिला । हिरण्यकश्यपू वधिला । नरसिंहवेषें ॥१७९॥
जें खुजें रूप धरूनि । बळीं पाताळीं घालूनि । पृथ्वी नि:क्षेत्री करुनी । परशरामें ॥१८०॥
विरोचनाची होऊनि नारी । मग तो निर्दाळिला वैरी । ऐसा कपटी श्रीहरी । नेणसी राया ॥१८१॥
पहिलचि घेतला विचारू । तरी कासया होता संहारू । भीष्म देवासारखा वीरू । कासया पडता ॥१८२॥
कासया पडता लक्ष्मण । जयद्रथा होतें कां निर्वाण । ऐसें तुझें मूर्खपण । दुर्योधना ॥१८३॥
आतां सांगसी विचारू । तोचि आम्ही करूं । वांयां करितोसी संहारू । महावीरांचा ॥१८४॥
पाहें तुझिये कारणीं । वीर पडती रणीं । ऐसी तुझी करणी । दुर्योधना ॥१८५॥
ऐसें द्रोणगुरु बोलिला । दुर्योधनु काळवंडला । उगाची तो राहिला । मौनरूपीं ॥१८६॥
तंव बोलिला कृपाचारी । गूढा असे याच्या शरीरीं । श्रीगुरु तुमच्या उत्तरीं । न बोले कांहीं ॥१८७॥
तंव बोलिला गुरुरावो । तुवां कां धरिला मौनभावो । जो सांगसी उ-पावो । तोचि करूं ॥१८८॥
तंव बोलिला दुर्योधनू । या वीरासी संहारून । यामागें जीवूं कीं मरून । भलतेंचि घडो ॥१८९॥
तंव द्रोणू बो-लिला रायासी । ब्रह्मशस्त्र आहे मजपाशीं । येणें शस्त्रें अर्जुनाशीं । घातु असे ॥१९०॥
हें शस्त्र गा दुर्योधना । घातुक याचिया प्राणा । उदैक पार्थाचिया प्राणा । घेऊं आम्हीं ॥१९१॥
तंव दुर्योधन ह्मने गुरूसी । यापुढा जेव्हां वांचसा । मग अर्जुनातें वधिसी । समरांगणीं ॥१९२॥
भ्रस्तुत चुकवावें मरणारात्रीं आडतें कायसें विघ्नाहें कार्य अवश्य करून । यासी वधावें ॥१९३॥
श्रीगुरु बोले उत्तरीं । अभिमन्यु मारिला जया परी । तैसोंचि करावें वीरीं । आजीं देखा ॥१९४॥
मग एकवटले वीर । चालिला कौरवांचा भार । शत्रा अस्त्रीं अंधकार । पडिला तेथें ॥१९५॥
तें देखिएलं ह्माळसेनें । तेणें पचारिला द्रोण । तुह्मां लाज नाहीं मी ह्मणे । पळतां रणीं ॥१९६॥
वीर ह्मणवितां भारथीचे । थोर पुरुषार्थ तुमचे । महत्त्व न राखा नांवाचें । पळतां रणीं ॥१९७॥
क्षेत्रीं झुंजतां रणीं । पाठी देउनी पळे प्राणी । तो पडे यमवदनीं । कोटि वरुषें ॥१९८॥
नातरी पळतियासी मारी । कीं नि:शस्त्रिया अव-धारी । कीं शरणागतासी वधारी । तो अप्रयोजकू ॥१९९॥
एकवळा कीं करुनी । एकलियासी वधिती रणीं । तयासी होय यमजाचणी । चंद्रार्क वरी ॥२००॥

तरी तुम्ही कालच्या दिवशीं । रणीं वधिलें अभिमन्यूसी । तें मूळ आहे तुह्मांसी । यमयातना ॥२०१॥
असो तुम्हासी काय सांगणें । तुह्मी ठाईंहूनि कपट करणें । तैसेंच भोगाल पतनें । सत्य जाणा ॥२०२॥
ऐसें बोलोनी घेतले बाण । तोडिलें तयाचें संधान । तंव आणिक आलें तीव्रपणें । तेंहि तोडिलें ॥२०३॥
तितकीया वीरांचें संधान । एकलचि सांवरी त्राण । जैसें नपूंसकाचें जिणें । निरर्थक ॥२०४॥
मग एक वेळा करुनी । रथा-भोंवता वेढा घालुनी । मग वरुषताती बाणीं । जलधारा जैसे ॥२०५॥
कर्णु ह्मणे देख देख । हें सांवरी माझें लक्ष । म्हणोनि विंधिलें धनुष्य । तुटलें शीत ॥२०६॥
तंव ते वज्रापासाव कठारे । काय करी कर्णाचा शर । मांडी देउनी महावीर । चढविलें सीत ॥२०७॥
मग घेउनी गदेतें । कर्ण हाणितला अव्हाटे । कूट करूनि रथांत । पाडि-ला भूमी ॥२०८॥
अश्वत्थामा तये क्षणीं । चारी वारु खिळले बाणीं । तें देखोनियां नयनीं । तोडिलें वीरें ॥२०९॥
तयाच्या संधाना आंत लखलखीत बाण सात । अश्वत्थामा करूनि विरथ । पाडिला रणीं ॥२१०॥
तयेच वेळीं कृपाचारी । आखु छेदावया दाखवी दाही शरीं । येतां देखिलें दुरी । म्हाळसेंनें ॥२११॥
ते बाणें बाण तोडिले । मग कृपाचारी तें लक्षिलें । मूर्च्छित पाडिले । मोडिला रथू ॥२१२॥
तंव दु:शासनु पातला । तेणें ध्वजास्थ देखिला । तो वज्रापासावो घडि-ला । केवीं तुटे ॥२१३॥
मग सोडिला बाण । ह्लदयीं विंधिला दु:शा-सन। पडला मुरकुंडी येऊन । तये वेळीं ॥२१४॥
मग ह्मणे जी जी श्रीगुरू । तुह्मी कां न करा हाती येरू । एवढा वाटीवेचा बडिवारू । वृथा जातु ॥२१५॥
आवेशोनी द्रोणाचारी । म्हाळसेनु विंधिला दाही शरीं । तंव दृम दुहाकारी । साहे माते ॥२१६॥
तंव पावला सबळू । झणें होसी बरळू । आतां करीन हलकल्लोळू । वीरा तुज ॥२१७॥
कर्णू अश्वत्थामा पावला । कृपाचारी विकर्ण आला । शैल्य सोमदंतु धाविन्नला । थोर क्रोधें ॥२१८॥
ते देखोनियां वैरी । जैसा सिंह गजावरी । मग गदा घेऊनियां करीं । उतरे चरणीं ॥२१९॥
वीर-वाहो सबळ वाहानू । वीरसेनू दळभंजनू । अग्निकेतु रण मर्दनू । पावले वेगीं ॥२२०॥
शरधारी वरुषती । तयाचीं संधानें तोडिती । म्हाळसेनु करील ख्याती । महा वीरेसी ॥२२१॥
कर्णु गदे करून हाणि-तला । विकर्णु क्षितीवरी पाडिला । अश्वत्थामा पावला । चरण चाली ॥२२२॥
पुढा देखोनी कृपाचारी । तयातें घावो देवोनी शिरीं । सबळासी केला परी । तें सांगवेना ॥२२३॥
द्रुपदासी धरुनी चरणीं । तयासी भवंडिलें गगनींरिथेसी दिधला टाकोनी । शैल्यावरी ॥२२४॥
तंव पुढा देखिला सोमदंतू । तयाचा मोडूनियां रथू । भूरिश्रवाचा पुरुषार्थू । भंगिला तेणें ॥२२५॥

तो खवळला महाबाहो । रथ घोडिया एक चि घावो । फेडीतु वैरियाचा ठावो । महावीरू ॥२२६॥
मागें म्हाळसेनाचे वीर । तेहि भंगिले कौरवांचे भार । थोर होताहे हल-कल्लोळ । रणामाजी ॥२७॥
पुढें पळे कौरवसैन्य । पाठीं धांवे ह्माळ-सेन । थोर होताहे कंदन । कौरवांचें ॥२२८॥
तंव दुर्योधनु बोले । गुरु तुह्मीं विचारिलेम । कीं हा मेलिया भलें जालें । सकळिकांचें ॥२२९॥।
दुर्यो-धनाचे नांवें । तेचि पांडव जाणावे । जरी हा न वांचला जिवें । रणामाजी ॥२३०॥
मज घातु जालियावरी । तुह्मी वोळंगावें माझे वैरी । ऐसें खडतर उत्तरीं । खोंचला द्रोणु ॥२३१॥
ह्मणे तूं होसी कुळहीनू । म्हणोनि बोलतोसी उणें । तुझें तुज साजे बोलणें । बोलतो मज ॥२३२॥
गांधारीया सहजा सांगितलें । तेंचि आजी आठवलें । तुझे प्रसूतसमयीं शब्द झाले । जंबुकाचे ॥२३३॥
तैंच म्यां वर्तिलें वर्तन । कुळक्षयो याचेन गुण । तेंचि आलें वचन । पुढें देखा ॥२३४॥
अरे तुझीये कारनीं । येथें अनाथें पाडिलीं रणीं । शेवटीं पुढें निरवाणीं । तूंहि जासील प्राणा ॥२३५॥
हा सर्वगतु श्रीहरी । सर्वत्र सर्वांच्या उदरीं । एकमेकां करूनि वैरी । संहारावो ॥२३६॥
आमुचे सहजी वृद्धपणें । यावरी कीर्ति जिणें । तरी तुमचा कां जी प्राण वेंचणें । सत्य जाण ॥२३७॥
इतकें बोलेनि वचन । गुणीं लविलां रुद्रबाण । पाचारिला ह्याळसेन । तये वेळीं ॥२३८॥
राख राख आपलिया प्राणा । म्हणोनी सोडिलें रुद्रबाणा । तेणें तेजें गगना । उजेडु जाला ॥२३९॥
तें ह्माळ-सेनें देखोनी नयनीं । वैष्णवास्त्र लविलें गुणीं । तेणें नेलें पिटोनी । रुद्रशस्त्रातें ॥२४०॥
तेजें तेज हरपलें । शस्त्रें शस्त्र विलया गेलें । तंव ह्माळसेनें पाचारिलें । द्रोणाचार्यासी ॥२४१॥
मग हाणितला पांच बाणीं । चारी वारू पाडिले रणीं । सारथी बाणें खडतरोनी । पडला देखा ॥२४२॥
ते वेळीं द्रोणु विरथू जाला । आणिका रथावरी गेला । गदाघातें चूर्ण केला । तोही रथू ॥२४३॥
मग पळतसे चर-णचाली । थोर होताहे मारी । मग द्नोणु विचारी । मनामाजी ॥२४४॥
आतां करावें निर्वाण । नाहीं तरी नाहीं जिणें । मग काढिला बाण । निर्वाणींचा ॥२४५॥
ब्रह्मअस्त्र लविलें गुणीं । तयासी प्रार्थना करुनी । वैरियासी संहारुनी रणीं । क्षणामाजी ॥२४६॥
पळत पळतां सोडिला बाणू । तेणें व्यापिलें गगन । तें ह्माळसेनाचें सैन्य । देखतें जालें ॥२४७॥
वरुषती शस्स्त्रधारी । शर पडती धरणीवरी । परी ह्माळ-सेनाचे शरीरीं । धाकु नाहीं ॥२४८॥
गदाघातु जेथ देत । वारु मारी मोडी रथ । उलंडले मदोन्मत । गिरी जैसे ॥२४९॥
कोटि सूर्यांचा प्रकाशू । तैसा गगनीं आयासू । करावया प्राणनाश । वैरि-यांचा ॥२५०॥

धगधगीत तत्क्षणीं । शस्त्र आलें गगनींहुनी । तें हाणितले गदे करुनी । थोर निघातें ॥२५१॥
घायें उसळला बाण । गेला र-विमंडळा भेदून । पुनरपी मावळतां दीन । उतरलें भूमी ॥२५२॥
रणीं भीडता महावीरं । द्यावो लागला पाठीमोरा । बाण खडतरल सामोरा । ह्लदयावरी ॥२५३॥
बाण ह्लदयीं खडतरला । मूर्च्छागतु भूमीं पडला । जैसा मेरु उलंडला । पृथ्वीवरी ॥२५४॥
रामकृष्ण गोविंद ह्मणत । धरणीं झाला मूर्च्छागत । ह्लदयीं आला श्रीअनंत । अविनाश मूर्ती ॥२५५॥
काळें सलिला महाकाळू । कीं सागरें दा-हिला वडवानळू । कीं उलथला भूमिगोळू । येरी वाही ॥२५६॥
तैसा उलंडला धरणी । हाहा:कारू झाला सैनीं । एकटाळी आ-रणीं । गर्जिन्नलीं ॥२५७॥
तंव ह्माळसेनाचे वीर । विधितलें समोर । जैसे वर्षताती जलभर । प्रळयकाळीं ॥२५८॥
ब्रह्मशस्त्राचा प्रतापू । वरी द्रोणाचार्याचा कोपू । रणीं मालविला दिपू । अर्जुनाचा ॥२५९॥
सूर्योदय होउनी मावळला । त्रैलोक्या अंधार पडिला । तैसा पां-डवकुळीं झाला । अंधकारू ॥२६०॥
वीर चालिले थोर रणीं । तेही भंगीलिया आरणी । कौरव गेले पळोनी । मेळीकारा ॥२६१॥
मग तेहि सैन्यकीं वीरीं । ह्याळसेनु घातला रथावरी । वेगीं आले मेळीकारीं । पांडवाचे ॥२६२॥
आणुनी घातला श्रीकृष्णाचे चरणीं । तो पांडवीं देखिला नयनीं । आंग टाकिलें धरणीं । पांचही जणीं ॥२६३॥
तंव ह्माळसेनु सावधु झाला । तेणें । श्रीकृष्ण विनविला । च-रणीं स्थापावें घननीळा । कृपानिधी ॥२६४॥
आजी पितयाच्या काजा । प्राणु वेंचला माझा । अंतकाळीं वैकुंठ राजा । भेटला मज ॥२६५॥
आजी धन्य मी ये सृष्टीं । मज जोडला जगजेठी । पावन झालों वैकुंठीं । कल्प कोटी ॥२६३॥
ऐसें बोलत बोलतां । प्राण गेला अवचिता । तें देखोनी पंडुसुता । दु:ख झालें ॥२६७॥
तंव बोले सारड्गधरू । याचा शोक नक करूं । तुह्मीं घ्यावा विचारू । अंतर्गतू ॥२६८॥
ब्रह्मशस्त्र दारुन । घेतें पांचा-जणाचे प्राण । तें झालें निर्माण । ह्माळसेनासी ॥२६९॥
यासी संस्कारू कीजे । ऐसें बोलोनी गरुडध्वजें । ह्मणे सकळ जनीं निधीजे । भागीरथीसी ॥२७०॥
तयासी संस्कारू करूनी । मग तिलांजुली देउगी । मेळीकारासी येउनी । रात्रीमाजी ॥२७१॥
पांडवासी दु:ख झालें । अन्न उदक वर्जिलें । पाहा वो कैसें झालें । ह्माळसेनासी ॥२७२॥
मग बोलिले नारायण । धन्य या कौर-वांचें जिणें । नित्य होताहे संहारणें । महावीरांचें ॥२७३॥
मागुते संग्रामी येती । परी साभिमानु न सांडिती । तुह्मी वांयांविण चित्तीं । दु:ख धरितां ॥२७४॥
कर्वतु जातसे सैरा । परी कर्वताती दोन्ही धारा । तैसा संग्रामु अवधारा । परस्परें ॥२७५॥
स्मशान वैराग्य धरणें । तरी कायसें राज्याचें कारणें । मागुता वनवासु सेवनें । साही जणीं ॥२७६॥
आमुची संगति ऐसी । जें दु:ख न धरावें मा-नसीं । ऐसें बोले ह्लषिकेशी । तयांप्रती ॥२७७॥
तंव भीम बोलिला वचनीं । हे सर्व माया तुझी करणी । जें जें असेल तुझ्या मनीं । तैसें वर्तूं आह्मी ॥२७८॥
तंव ह्माळसेनाचा वीरीं । तेंहि विनविला श्रीहरी । तूम आव्याप्पु मुरारी । परमपुरुषु ॥२७९॥
आतां आह्मां आशिर्वाद देणें । तुवां पांडवाचें साह्य करणें । अनाथांसी रक्षणें । तुझ्या चरणीं ॥२८०॥
मग तेहि आज्ञा घेऊनि । पांडवासी पुसोनि । मागा काय करील करणीं । नारायणू ॥२८१॥
नाना विष्णुदास विनवितु । तो लाघवी श्रीअनंतु । कौरवां करूनि नि:पातु । जय देणें पांडवां ॥२८२॥

“संत नामदेव गाथा” द्रोणपर्व-ह्माळसेन-कथा एकूण २८२ अभंग समाप्त 

“संत नामदेव गाथा द्रोणपर्व-ह्माळसेन-कथा”


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *