कृष्णाचा पाळणा – बाळा जो जो रे कुळभूषणा । …
बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना ।
निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥धृ॥
जन्मुनि मथुरेत यदुकुळी । आलासी वनमाळी ।
पाळणा लांबविला गोकुळी । धन्य केले गौळी ॥१॥
बंदिशाळेत अवतरुनी । द्वारे मोकलुनी ।
जनकशृंखला तोडुनी । यमुना दुभंगोनी ॥२॥
मार्गी नेतांना श्रीकृष्णा । मेघनिवारणा ।
शेष धावला तत्क्षणा । उंचावूणी फणा ॥३॥
रत्नजडित पालख । झळके आमोलिक ।
वरती पहुडले कुलतिलक । वैकुंठनायक ॥४॥
हालवी यशोदा सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।
पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जति जयजयकारी ॥५॥
विश्वव्यापका यदुराया । निद्रा करी बा सखया ।
तुजवरि कुरवंडी करुनिया । सांडिन मी निज काया ॥६॥
गर्ग येऊनी सत्वर । सांगे जन्मांतर ।
कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार ॥७॥
विश्वव्यापी हा बालक । दृष्ट दैत्यांतक ।
प्रेमळ भक्तांचा पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥८॥
विष पाजाया पूतना । येता घेईल प्राणा ।
शकटासुरासी उताणा । पाडिल लाथे जाणा ॥९॥
उखळाला बांधता मातेने । रांगता श्रीकृष्ण ।
यमलार्जुनांचे उद्धरण । दावानव प्राशन ॥१०॥
गोधन राखिता अवलिळा । कालिया मर्दीला ।
दावानल वन्ही प्राशील । दैत्यध्वंस करी ॥११॥
इंद्र कोपता धांवून । उपटील गोवर्धन ।
गाईगोपाळा रक्षून । करीन भोजन ॥१२॥
कालींदीतीरी जगदीश । व्रजवनितांशी रास ।
खेळुनि मारील कंसास । मुष्टिक चाणुरास ॥१३॥
ऎशी चरित्रे अपार । दावील भूमीवर ।
पांडव रक्षील सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥१४॥