तुकाराम गाथा तेलगु
दैनंदिन काम करत असताना बरेच चांगले अनुभव येतात.संत साहित्य वेबसाईटवर काम करत असताना आज एक पुन्हा चांगला अनुभव आला. तीन दिवसापूर्वी नागराज व्यंकयला या इसमाचा ईमेल आला होता. त्यामध्ये मोडक्यातोडक्या इंग्रजीमध्ये संत तुकाराम गाथा अँप तेलगू भाषेमध्ये उपलब्ध होईल का अशी विचारणा करत होता. तुकाराम महाराजांचा आणि तेलुगू भाषेचा काय संबंध हा सगळ्यात पहिले विचार मनामध्ये आला त्यामुळे त्याच्या ई-मेलची उत्तर जवळजवळ नाही ठरलेलं होतं. तरीपण त्याने विचारलेला प्रश्न आवडला होता त्यामुळे खरच तुकाराम गाथा तेलगु मध्ये उपलब्ध आहे का याचा शोध घेणे सुरू केले. काही जाणकार मंडळींबरोबर यावरती चर्चा केली परंतु हे काम जवळजवळ अशक्य या मता पर्यंत मी जाऊन पोहोचलो होतो. ईमेलचं उत्तर लिहिण्याच्या तयारीला मी लागलो पण ईमेल करण्याऐवजी त्यांच्याशी फोनवर बोललेलेच बरे राहील या विचाराने मी त्यांना कॉल केला.तसे ई-मेलमध्ये त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर नमूद केला होता.
हिंदी मराठी इंग्रजी तिन ही भाषा न येणारा नागराज माझ्याशी तोडकेमोडके हिंदीमध्ये बोलू लागला आमचे संभाषण मध्ये मी संत तुकाराम गाथा तेलुगूमध्ये बनवणे कसे अशक्य आहे हे सांगू लागलो कारण तुकाराम गाथेमध्ये एखाद्या अभंगातील शब्दांमधील मात्रा जरी राहिली तरी शब्दाचा अर्थ वेगळा निघतो आणि अभंगाचा अर्थ बदलतो हे मला सांगणे भाग होते आणि मग तुकाराम गाथा तेलुगूमध्ये बनवताना मराठी आणि तेलुगू भाषेच्या ज्ञान बरोबरच संत साहित्याची ही जाण असणारा व्यक्ती शोधणं पुन्हा जवळजवळ अशक्य. हे त्याला सांगत होता. माझं म्हणणं सविस्तर ऐकून घेतल्यानंतर त्याने त्याच्या परिचयातील बालू महाराज यांचा नंबर मला दिला व त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यास सांगितले बालू महाराजांना मराठी चांगली जमते त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा त्यांनी मला सुचवले आणि आमचा फोन उरकला.
वेळ न जाऊ देता मी बालू महाराजांशी संपर्क केला. बालू महाराज तसे उमरग्याचे आणि मृदंग वाजवण्याचे शिक्षण घेण्यासाठी आळंदी येथे आठ वर्षे राहिले होते. त्यामुळे मराठी उत्तम जमते आणि आता तेलंगणामध्ये कीर्तन सेवा करत आहेत. तीन दिवसापासून असलेला माझा गैरसमज तुकाराम गाथा तेलुगूमध्ये नाही हा त्यांनी मोडून काढला. त्यांनी मला सांगितले की संत तुकाराम गाथा ही तेलुगूमध्ये बनवण्यात आलेली आहे.होय ! तुकाराम गाथा तेलगु मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी देखील तेलगू मध्ये उपलब्ध आहे.परंतु त्याचे अँप नाही. पुढील सविस्तर चर्चेमध्ये संत साहित्य वेबसाईट वरती संत तुकारामांचे तेलुगु मधील अभंग देखील येणे सुरू होतील आणि कालांतराने ॲप बनवू अशा चर्चेने आमचा फोन संपला.
यात शिकण्यासारखं भरपूर होतं विठोबाचे भक्त फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरात आहेत. तुकारामाचे अभंग ऐकण्यामध्ये शिकण्या मध्ये तेलगु भाषिक देखिले इच्छुक आहेत. तसेच इतर भाषिक देखील असतील आणि महत्त्वाचं म्हणजे अशक्य असं काहीच नाही…
तुकाराम गाथा तेलगु
प्रा. किरण अरुण सुपेकर