संत निळोबारायांच्या विरहिणी
१८९
आजि पुरलें वो आतींचें आरत । होतें ह्रदयीं वो बहु दिवस चिंतित । मना आवरुनि इंद्रयां सतत । दृष्टी पाहों हा धणिवरी गोपिनाथ वो ॥१॥
तेंचि घडोनियां आलें अनाययसें । जातां यशोदे घरा वाणचिया मिसें । आला खेळत खेळत बाळवेषें । कवळी घालि मिठी गदगदां हांसे वो ॥२॥
मुख अमृताचा मयंक उगवला । दंत हियाचा प्रकाश फांकला । नयनीं रत्पकीळ तारा वो चमकला । देखतां ह्रदयीं निजवास त्याचा झाला वो ॥३॥
जन्म जन्मांतरी बहु केले सायास । याचें भेटिलागीं व्रतें उपवास । सेविलीं गंगेची तटाकें उदास । त्याचिया सुकृताचे आले नेणों घोष वो ॥४॥
आजि आनंदाशी आनंद माझया झाला । आजि सुखशीं सुखें लाभ केला आजि हर्शाषीं हर्ष भेटों आला । तेणें श्रीरंग निजदृष्टी स्थिरावला वो ॥५॥
भोग भोगितां वो सरले समस्त । गेलें उडोनियां प्रारब्ध संचित । विटलें विषयावरुनियां चित्त । निळा म्हणे घडला हरिशीं एकांत वो ॥६॥
१९०
एक ना दुसरें वो नव्हते मजपांशी । मी मज नोळखतां आप आपणासी । होति ये निर्जनी वो निराभास देसीं । नेणों कोणें आणियेलें कर्मभूमिसी ॥१॥
तैंसपासूनियां विसरलें निजसुखा । वाटे जीव माझाचि परि मज वो पारिखा । देखोनि आपपर पात्र जालें बहु दु:खा । सांगो कोणापासि सये जाला ऐसा वाखा वो ॥२॥
मी मज माझियानि वेढाळिलें बाई । चित्तासि या चिंतने वो घातलें प्रवाही । नेणेंचि विश्रांति कोठे विचरतां मही । जेथूनियां आलिये ते नाठवेचि कांही वो ॥३॥
नसतेंचि काम क्रोध लागले हे वैरी । येऊनियां आशा चिंता बैसल्या जिव्हारी । व्दैषनिंदेचिया नित्य नाना भरोवरी । कामना कल्पना ह्या दाटल्या शरीरीं वो ॥४॥
किती तरी करुं या संसारा पुरवणी । किती सोसू येऊं जाऊं यमाची जाचणी । किती येऊं जाऊं भोगूं नाना यातिचिया खाणी । किती गर्भवासी बैसों थर अडचणि वो ॥५॥
ऐसि जाजावलि बहु अनुतापें बाळा । घेऊनियां विकृतियां विषयाचा कंटाळा । मनोभावें चिंतिला बा श्रीरंग सांवळा । पावली निजस्थान पुनरपि म्हणे निळा वो ॥६॥
१९१
एकली एकटची होती ये सदनीं । तव आयीकिली मुरलीची ध्वनी ॥ गेले धांवोनियां पहावया लोचनीं । तंव गेलिये देहभाव विसरोनी ॥१॥
हरि देखतांची मदनाचा पुतळा । गेला जडोनियां बैसला तो डोळा ॥ मनीं आठवे साजणी वेळोवेळां । नेल्या शोषुनी माझीया जीवनकळा वो ॥२॥
नव्हतें जवळी दुसरें बाई कोणी । नको जाऊं ऐसें सागावया लागुनी ॥ नेईल जीवभाव सर्व हा हरुनी । मग पडसि तूं याचेचि व्यसनीं वो ॥३॥
ऐसि जाजावोनि बोले सखियाप्रती । येरी टकमकां पाहोनि हांसती । म्हणती जाणोनियां होसि कां नेणती । भाग्यें लाधलिसी धरुनी राहें चित्तीं वो ॥४॥
आजि तुझिया भाग्यासी नाहीं पार । झाला परिचय पाहिला सारंगधर । ज्यालागी शिणति हे योगी मुनीश्वरा तोचि तुझें ह्रदयींचा परात्पर वो ॥५॥
निळा म्हणे मोडोनि वैभवा वैभव । सकळहि सुखचीच जोडली राणिव । देखिला यदुपति निजलावण्याची ठेव वो ॥६॥
१९२
एकलें न कंठचे याविण मज आतां । घेवोनि विचरेन सवें प्राणनाथा । जनी वलीं वो एकांति वसतां । न करि वेगळा हो युगें कल्प जातां वो ॥१॥
हातीं लागला वो युगादिचा निध । भाग्यें माझिया वे जोडियला सिध्द । करुनि उपचार पूजिन सावध । न वंचीं शरीर सेविन एकविध वो ॥२॥
याचिये संगतीं वो सुखाचिया कोडीं । वेचतां युगें कल्प मज वाटे घडी । भोगीन नित्य नवा जीवाचे आवडी । भरुनि निज दृष्टी पाहेन घडी घडी वो ॥३॥
अवघे निवेदिन अंतरीचे भोग । यासि करुनियां सये अंगसंग । कांही न वंचिता मन बुध्दी अंग । भोगिन निजशेजें श्रीरंग वो ॥४॥
त्यागें जीवाचिया घालीन यासि मिठी । जातां युगसंख्या कल्पाचिया कोटी । धरिन अंतरीं वो बांधोनियां गांठीं । यावरी न करि मी कदा यासि तुटी वो ॥५॥
कळे अंतरीचा भाव या परेशा । होय प्रियवादें जैसा केला तैसा । पुरवीं निजदासीं केला जो धिवसा । निळा म्हणे आहे कृपावंत ऐसा वो ॥६॥
१९३
झाला विरह हे नये देहावरी । देतां वोषधे वो आणितां पंचाक्षरी । देवि देवतांची नचले येथें थोरी । नाना उपायांच्या करिता भरोवरी वो ॥१॥
आण वेगिरी तो सावळा सुंदर । मदनमूर्ति वो नदाचा कुमर । तया भेटतांचि होईल उतार । पुरेल आर्त हे वाचेल सुंदर वो ॥२॥
येकि सखिया त्या येउनि विनविती । येकि हरिचीया पायावरी लोळती । येकि करुनि पंचप्राणातिं आरती । म्हणति चला वेगीं येकांता श्रीपति वो ॥३॥
येकी घालिती हरिसी विंझणवारा । येकि देति विडि त्या सुंदरा । येकि वारिती वरी चौया सकुमारा । ये म्हणति हरि चलावे मंदिरा वो ॥४॥
येकि देति चंदनाचि उटी । येकी लाविती कस्तुरिमळिवटी ये घालिती त्या तुळसिमाळा कंठि । येकि म्हणती चलावें जगजेठी ॥५॥
ऐसा विनउलि आणिला ऐकोनि जिविं ते सुखावलि बाळी । उठोनि सेजेवरी बैसली वेल्हाळी । निळयास्वामी तीचे आर्त पुरवि तये काळीं वो ॥६॥
१९४
देतां आलिंगन नंदाच्या कुमरा । पडेल उतार हे वांचेल सुंदरा । नका आड घालूं संदेह दुसरा । लावा उठवूनि जाऊं दया इतरां वो ॥१॥
ऐसे बोलती त्या जीवीच्या जिवलगा । झाला विरह गे वांचवा सुभगा । आणा पाचारुनी गे एकांता श्रीरंगा । दुजा उपावोचि नचले या प्रसंगा वो ॥२॥
आहे ठाउकें हें अंतरी आम्हांसी । याचा वेध झाल्या दशाचि हे ऐसी । होते आटणी गे जिवा आणि शिवासी । तेथें देहबुध्दी नाठवे देहासी वो ॥३॥
हदयी होतांचि या कामाचा संचार । न्यावा एकांतासि निष्काम यदुवीर । देईल सुख तोचि नाहीं ज्यासि पार । सांडा चावटी आणिक विचार वो ॥४॥
नाहीं अनुभव हा ठाउका जयासी । त्याचि भोगिती या अनुदिनीं दु:खासी । येती जाति पुन्हा होति कासाविसी । आम्ही न विसंबो या सावळया कृष्णासी वो ॥५॥
नाही जीवीं या जीविताचि चाड । याच्या संगसुखें घालूं वो धुमाड । स्वामी निळयाचा पुरवील कोड । आणा तोचि आतां सांडा बडबड वो ॥६॥
१९५
देवें भक्तालागीं उपचार मांडिले । शांति सुखसनी मागें बैसविलें । धरुनि तन्मयाचीं छत्रें गौरविलें । ज्ञानसंपत्तीचे दळभार दिधले ॥१॥
सुखें राज्य करा म्हणे त्रिमुवनीं । माझें ऐश्वर्य हें सर्वांगी लेंउनी । मिरवा भूषणें हीं यश कीर्ति दोन्हीं । माझीं आयुधें हीं देतों संतोषोनी वो ॥२॥
शांती विरक्ती हे मूर्तिमंत दया । क्षमा नित्यानंदें तुम्हां अर्पिलिया । अखंड नैराश्यता सेवे तुमचिया । ठेविली निकट वासें नवजती आन ठाया वो ॥३॥
निळा म्हणे ऐसा भक्तांचा समुदाय । देवैं आनंदविला प्रीतीच्या उत्साहें । म्हणे निर्भय असा जवळीच मी आहें । भोगा सुख माझें निजाचें अव्दय वो ॥४॥
१९६
नित्य श्रीहरीचें आठवितें गुण । वदनीं त्याचिया वो नामाचें स्मरण । ह्रदयीं धरुनियां निजभावें चरण । करीतें अनुदिनीं हेंचि अनुष्ठान वो ॥१॥
येथे आलिये वो याचि निजकार्या । केलीं कर्मे तीं अनुदिनी हेंचि अनुष्ठान वो ॥२॥
येथें आलिये वो याचि निजकार्या । केलीं कर्मे तीं मागील भोगाया । आतां घडती तीं याते समर्पाया । नाहीं भय त्या निजस्थाना जावया वो ॥३॥
वाचें असत्याचा नेदी लागों वारा । केलें सांडणें वो देह संसारा । चित्तीं विषयाचा मोडियला थारा । नाहीं गुंतलें या दंभ अहंकारा वो ॥४॥
संतीं सांगितलें केलें तें जतन । नाहीं आज्ञें त्याचें केलें उल्लंघन । मतमतांतरां नाहीं दिल्हें मन । ह्रदयीं धरिलें या हरीचें चिंतन वो ॥५॥
कांही ठाकलें तें केलें लोकहित । काया वाचा वो हें वेचुनीयां चित्त । नाहीं वंचूनियां ठेविलें संचित । काळ याचिपरि सारियेला वो ॥६॥
नित्य नवा वो हा आवडीचा दिवस । केला करुनियां कीर्तनी उल्हास । नाहीं गोवियेला कोठें आशापाश । निळा म्हणे वर्तोनि उदास वो ॥७॥
१९७
पाहों गेलिया वो नंदाचा नंदन । नेत्रीं लेऊनियां आतींचे अंजन । जेथें उभा होता राजीवलोचन । भोंवते मेळवुनी गडि संतसज्जनें वो ॥१॥
दृष्टी तेथेंहि निवाली वो इंद्रियें सकळ । जालि तटस्थचि देखोनियां घननीळ । मुकुट विराजित कुंडलें वनमाळ । सुंदर श्रीमुख चतुर्भुज सरळ वो ॥२॥
शंख चक्र हातीं गदा पीतांबरधारी । देहुडा पाउलीं वो मुरली अधरीं । वाजवितां सप्तस्वर उमठती माझारीं । देखतां देहभाव नुरतीच शरीरीं वो ॥३॥
वेधी वेधले वो ज्याचे विधाता हरिहर । इंद्र आदिकरुनी सकळहि सुरवर । सिध्द महामुनि योगी ऋषिश्वर । नारद तुंबरादी महानुभव थोर वो ॥४॥
तेंथे कोण पाड आम्हां मानवांचा । ज्यातें न पुरती स्तवितां वेद वाचा । नकळे महिमा वो याच्या स्वरुपाचा । नयनीं पाहतांचि सुकाळ सुखाचा वो ॥५॥
रुप नागर वो सुंदर गोजिरें । चरणीं वाजती वो मंजुळ रुणझुणिती नुपुरें । ऐकतां निजानंदा होतसे चेईरे । निळा म्हणे माझे तेथेंचि मन मुरे वो ॥६॥
१९८
भावभक्तिचिया प्रीतीं जेवविला । देऊनि ढेकर वो पूर्णपणें घाला । नेणों आनंदाचा प्रवाह लोटला । ऐसिया स्वानंदाचीं वचनें अनुवादला वो ॥१॥
म्हणे केले ते पावले उपचार । तुम्ही आवडीनें प्रेमाचे प्रकार । झाली तृप्ति आतां घ्यावो देतों वर । पुन्हां नातळो हा तुम्हांसि संसार वो ॥२॥
तातल्या सोसूनियां विरक्तिच्या ज्वाळा । बरव्या शिजविल्या समृध्दी सकळा । झाला रसस्वाद भोजनीं आगळा । वाढिलीं पंचामृतें जेवतां जे वेळोवेळां वो ॥३॥
ऐसें जेऊनियां घाले विश्वंभर । भक्ता उभविला अभयाचा कर । काढुनी घालिती कठींचे तुळसीहार । निळया स्वामी गौरविती वारंवार वो ॥४॥
१९९
मनींचा माझिया वो संदेह फिटला । देव पाहों जातां जवळींच भेटला । अवघा मागें पुढें तोचि वो ठाकला । जनीं जनार्दन भरोनियां दाटला वो ॥१॥
पुरलें जीवींचे आर्त साजणी । पाहें जेथें तेथें दिसे चक्रपाणी । लोकलोकांतरी त्याचीचि भरणी । भरोनि उरला अवघ्याचि वाणी खाणी वो ॥२॥
झाला सुकाळ हा सुखाचा मानसा । पडिला त्रिभुवनीं एकरुप ठसा । धरा व्यापूनियां अंबर दशदिशा । आतां भोगीन मी सर्वकाळ ऐसा वो ॥३॥
नाना भूताकृति एकचि आभासे । नाना नामें आळवितां वो देतसे । नाना अळंकार एकचि लेतसे । नागिवा उघडाही बरवाची दिसे वो ॥४॥
नाना वस्त्रें हा नेसला पांघुरला । जेथील तेथेंचि हा बहुरंगें नटला । शस्त्रें अशस्त्रे हा हातें मिरवला । सौम्य क्रूर ऐसा होऊनियां राहिला वो ॥५॥
एका निववी भोगवी नाना भोग । एका खाववी जेववी दावी जग । एका विचरे देऊनि अंगसंग । निळा म्हणे हा एकलाचि अनंग वो ॥६॥
२००
मी मज माझीयाचा तुटला संबंध । ऐसा लाविला वो येणें मज वेध । जिविं जीवाचा हा मोडिल कंद । नुरे देहभाव ऐसा केला बोध वो ॥१॥
सखिये साजणी वो ऐके माझें गुज । याति पाहतां वो बोलतां सहज । नेलें हरुनियां अंतरींचें निज । पुढें नाचवि हा आपलेंचि भोज वो ॥२॥
करितां कामधाम विसरुचि पडे । ध्यानिं आठवे हो याचेचि रुपडे । राहें वेष्टूनियां हाचि मागें पुढें । याविण न दिसेचि केले मज वेडे वो ॥३॥
करितां भोजन वो निजतां शयनीं । जागृतिं जागतां वो बोलतां वदनिं । हाचि जडोनियां ठेला माझें मनीं । नेदि हा पारिखेचि दिसों जनिंवनिं वो ॥४॥
नेदि उमजो हा येऊं देहावरि । केलि माझिया संसारा बोहरी । हाचि व्यापुनियां ठेला घरींदारीं । ऐसा नाटक हा नंदाचा खिल्लारि वो ॥५॥
येणें ऐशाचि वो मोहिल्या सुंदरा । नेल्या भुलउनि आपुल्या मंदिरा । हें मी नेणोनियां गेले याच्या दारा । तव निळा म्हणे वेधिले अंतरा वो ॥६॥
२०१
माझें मजचि वो आतुडलें गुज । नाहीं आणिकांचे कामा आलें काज । सांडिली लौकिकाची बरें झालें लाज । तेणें लाधलीये निजाचेंही निज वो ॥१॥
पडिली गांठी या गुणसवें । एकनिष्ठ वो शरण जातां भावें । मनीचें राखतां वो आर्त नित्य नवे । झाला प्रसन्न हा देवाचाही देव वो ॥२॥
याचिलागीं म्या सोशिले गर्भवास । घेतले जन्म वो याचीच केली आस । नाहीं देखिले वो कोणाचे गुणदोष । म्हणेनि कृपावंत झाला हा परेश वो ॥३॥
जें जें अर्चिलें तें सुकृत याचिसाठीं । नाही वेंचिले वो जतन केलें गांठी । भोगी त्यागी वो याचि वरी दिठी । म्हणोनि आजि हा लाधले जगजेठी वो ॥४॥
धरिलें जन्म तें सार्थक झालें माय । भेटवूनी याशीं वो फळलें उपाय । चुकले अवघेचि अघात अपाय । म्हणोनि आलिंगन देती यादवराय वो ॥५॥
केलें ब्रीद वो साच येणें काळें । अनाथबंधु हे दीनाच्या दयाळें । केली कृपा वो पुरविले सोहळें । म्हणोनि निळा नित्य चरणावरीं लोळे वो ॥६॥
२०२
माझी मजचि वो पडियली भुली । गेलें मर्यादा वो विसरोनि आपुली । याची अणुमात्र पडतांचि साउली । वृत्ति तदाकार होऊनियां ठेली वो ॥१॥
आलें वाचें तेंचि करितें बडबड । नये भ्रांतीचें वो वस्त्र दृष्टी आड । मना आलें तैसा नाचतें धुमाड । नेणों काय पुढें आरंभला नाड वो ॥२॥
नाहीं देखिलें तें येऊनि पडे दृष्टी । तेंचि उच्चारें वो येऊनि वाचे ओंठी । नेणोनि अनुभवा ज्ञानाची कसोटी । नेणों काय येऊनि सांठवलें पोटीं वो ॥३॥
वाचे अनिर्वाच्य येऊनि आदळे । ह्रदयीं वाउगेचि होताती सोहळे । उठिति स्फुर्तिचेचि क्षणक्षणां उमाळे । माझिये जाणिवेचें फोडूनि पेंडोळें वो ॥४॥
होतें तैसें तुम्हां निवेदिलें पांई । न कळे यावरी तुमचे कृपेची नवाई । ठेवाल जैसें तेथें रहावें ते ठायीं । कैची सत्ता आम्हां बोलावें तें काई वो ॥५॥
यावरी कराल तें तुम्हीं करा देवा । मीं तों नुरोनियां उरलें देहभावा । कांहिंचि नेणोनियां हिताहित तेव्हां । निळा म्हणे साक्षी तुम्हीचि या सर्वा वो ॥६॥
२०३
माझया मीपणचा करोनि फराळ । उरलें खावयासी बैसला सकळ । ऐसा भुकाळु हा नंदाचा गोवळ । यासि न पुरेचि ग्रासितां माझा खेळ वो ॥१॥
आतां काय देऊं नसंता जवळी । संचितप्रारब्ध तें भक्षिले समुळीं । कर्माकर्माच्या घेतल्या कवळी । विषयवासना त्या ग्रासिल्या निमिषमेळिं वो ॥२॥
भक्षिलें संपत्ती विपत्तीचे भोग । कांही नुरविताचि कोणाचाही भाग । अवघे भक्षूनियां नुरवि हा माग । नामरुप तेंही नेदीचि उरों सोंग वो ॥३॥
ऐसा भक्षूनियां पूर्ण नव्हे कधी । अवघ्या भक्षूनियां संसारउपाधी । जीव भवाचिया नुरवूनियां आधीं । केले येका येकि निजरुप अनादि वो ॥४॥
आधीचि दुर्बळ मी नव्हति कांही जोडी । पूर्वीच भक्षूनियां गेला वो तातडी । आणूं कोठूनि वाढूं या परवडी । हा तो भुकाळुचि सदाचा बराडी वो ॥५॥
आतां तृप्तीलागीं दिसें एक शेवटीं । भावभक्ति याचे वोगरीन ताटीं । तेणेचि होईल हा क्षुघेचि संतुष्टी । ऐसें निळा म्हणे विचारिलें पोटीं वो ॥६॥
२०४
येऊनि जाऊनि करी गौळणीचे कोड । पुरवूनि सकलही अंतरींची चाड । नेदी प्रेम त्याचें खंडो करी वाड । ऐसा कृपाळू हा सुखाचा सुरवाड वो ॥१॥
धन्यभाग्याचा त्या जन्मल्या संसारी । ज्यांचे ध्यानी मनीं नित्यकाळ हरी । करीतां काम काज दृष्टी यावरी । बोलतां चालतां जेवितां निरंतरीं वो ॥२॥
त्यांचा विकिला ऐसा रावें त्यांच्या घरीं । पडिलें काम काज तेंहि आपण करी । नवचे पळभरी त्या सांडूनियां दुरी । त्यांची न लाजोचि म्हणवितां कामारी वो ॥३॥
त्यांचा येवजाव सासुरें माहेर । झाला आपणाचि लेणें अलंकार । अवघें धन वित गोत परिचार । झाला नाम रुप दीर भावे वर वो ॥४॥
नेदी उरों त्या आणिक दुसरें । विण आपण वो सोयरे धायरे । गाई म्हशी पशु पोटींची लेंकुरें । झाला घरदार त्यांचे एकसरे वो ॥५॥
खाती जेविती ते भोग सकळही । झाला आपणाचि संचरोनि देहीं । नेदी आपपर ऐसें दिसों कांहीं । निळा म्हणे ऐसी ऐक्याची नवाई वो ॥६॥
२०५
याचिलागीं वो त्यजियलें भोग । याचिलागीं वो केले नाना याग । याचिलागीं वो अष्टांगादी योग । याचिलागीं या विषयांचे त्याग वो ॥१॥
जन्माजन्मांतरी केली हे सूचना । याचिलागीं वो वसविलें निर्जना । भक्षूनि फळ मूळ प्राशिले जीवना याचिलागीं केलें तीर्थाटना वो ॥२॥
याचिलागीं वो आसनीं शयनीं । केली निरंतर याचि चिंतवणी । बैसलें धरुनियां रुप निज ध्यानी । नामी नेमियेली नित्य याचे वाणी वो ॥३॥
याचिलागीं वो मंत्रजप केला । याचिलागीं वो वेदांत पाहिला । याचिलागीं वो निजधर्म आनुष्ठिला । याचिलागीं म्यां संसार त्यजिला वो ॥४॥
याचिलागीं हे नित्यज्ञान । केलें सायास ते याचि वो लागून । याचिलागीं नियमीं निरोधिलें मन वों ॥५॥
याचिलागीं मी झालीये उदास । सांडूनि आपुलिया परिख्याची आस । याचिलागिं याचा निजध्यास । धरिला निळा म्हणे निशिदिनी ध्यास वो ॥६॥
२०६
येणे आपुलिया कुपेची गुणें । माझीं पोशिली वो सर्वागजीवनें । देऊनि क्षेम अवघीं निवविली करणें । यासी काय देऊनि व्हावें म्या उत्तीर्ण वो ॥१॥
माझें जीवींचा हा जिवलग सोयरा । यासी करुनि काय पूजावें उपचारा । जें जें कीजे तो तो उपाधी पसारा । कैसेनि पावेल या निज निविकारा वो ॥२॥
करुनि पूजूं जंव मंत्र तंत्र जप । जंव हा शब्दातीत निर्गुण अरुप । कोण करु यासी न पवेचि वो तप । ध्यानीं ध्याता हा अरुपीं अरुप वो ॥३॥
यासि न पुरे वो जाणिवे जाणतां । यासी न चले वो शहाणीव करितां । नाना तर्कवाद यापुढें वृथा । आतां कोणा करुं उपचार तत्वतां वो ॥४॥
करितां योगाभ्यास न पवे ती सिध्दी । करितां नाना याग वाढती उपाधी । नित्यनित्यज्ञानें अभिमानाची वृध्दी । आतां कोण्या युक्ति तोषवूं कृपानिधी वो ॥५॥
ऐसें जें करुं म्हणे आपुलिये मतीं । तें तें सांडीं परतें न धरी हा हातीं येकचि आवडे या शुध्द भाव भक्ती । निळा म्हणे वर्म दाविलें हें संती वो ॥६॥
२०७
येणें एकलें वो जाणेंही शेवटीं येथें राहणेचि नाहीं कल्पकोटी । जोडिलें धन तें न चले लक्ष कोटी । म्हणेनि आलिये या सांवळियाचे भेटी वो ॥१॥
आतां घाला वो याच्या पायांवरी । हाचि चुकवील जन्माचि भोंवरी । शिणलें बहुत वो चौंयांयशींचे फेरीं । तोडिल चिंता हा हेचि आशा थोरी वो ॥२॥
बहुत गांजियलें मायामोहभ्रमें । रततां विषयीं या विषयाच्या कामें । करितां भरोवरी रित्या मनोधर्मे । याशी कृपा येतां हरील हा कर्मे वो ॥३॥
काम क्रोधीं वो जाचिलें बहुत । नेदी राहो वो क्षण एक निवांत । वरी पडती वो गर्वाचे आघत । म्हणोनि विनवणी सांगा त्वरित वो ॥४॥
आशा कल्पना या मातल्या पापिणी । मनशा चिंता डंखिती सर्पिणी । येती लहरी वो जाणिवेचि जाचाणी । म्हणोनि विनवितें हेंचि क्षणक्षणीं वो ॥५॥
आहे शेवटींचें माझें येथें पेणें । वाटे निश्चय हा याचिया दर्शनें । राहिलें चित्तीं वो याचेंचि चिंतन । निळा म्हणे आजि ऐकिलें गाहाणें वो ॥६॥
२०८
सये आनंदाचा अवचिता आला पुर । याचे मुरलीचर उठितांचि गजर । मी मज नाठवेचि कैचें घरदार । ठेलें तटस्थचि राहिलें शरीर वो ॥१॥
ऐसे मोहन नाटक येणें केलें । जीव चैतन्य वो हरुनि नेलें । एकलें एकवटचि करुनी ठेविलें । नाठवें सासुरें ना माहेर ऐसें झालें वो ॥२॥
याचा नवलाहो हाचि एक वाटे । जीवीं जीव नुरे आनंदचि भेटे । तेणें सुखानंदें संसारचि आटे । मी हें माझें तों न दिसेचि कोठें वो ॥३॥
मनीं मानसीहि नुरोनिया थार । हदयभुवनीं होय याचाचि प्रसार । बुध्दी चाकाटली राहे निरंतर । सुखीं सुखाचाचि होतसे आदर वो ॥४॥
होतें आपुलीये घरीं हो निश्चळ । कोठें पाहें गेलें याचा निज खेळ । तैंचि पासूनि वृत्ति झालीं वो वोढाळ । मनीं नाठवेचि लेंकरुं ना बाळ वो ॥५॥
एका एकीची पडियेला फासा । याचा नेणोनियां स्वभाव वो ऐसा । माझा मजचि हा नवलावो मानसा । निळा म्हणे होता संचिताचा ठसा वो ॥६॥
२०९
वदन निमासुरें कटांवरीं कर । उभा विटेवरीं पुंडलिका समोर । चरणीं ब्रीदावळी रुळती असूर । वरी वाळे वांकी रुणझुणिती मधुर वो ॥१॥
तेणें नवलचि केलें वो साजणी । सहज अवलोकितां संचारला नयनीं । त्याविण न दिसेचि दुजें जनीं वनीं । जें जें दिसे तें तें हाचि भासे मनीं वो ॥२॥
कांसे कसिला वो मिरवें सोनसळा । कटीं कटिसूत्र जडित मेखळा । उदरीं त्रिवळीं वों तुळसी वनमाळा । कौस्तुभ पदकें व्दिजचरणांकुश सोज्ज्वळा ॥३॥
मुखमयंक पूर्णाशें उगवला । भक्त चकोरासी अमृतें वंरुषला । दंत हिरयाचा प्रकाश फांकला । अधर सोज्जवळ वो नासाग्र सरळा वो ॥४॥
निडळीं रेखिलें वो केशर झळके । श्रवणीं कुंडलाचें तेज फांके । नयनीं सुतेज विदयुल्लता चमके । माथां मुगुटावरी मयूरपिच्छा स्तवकें वो ॥५॥
सुंदर साजिरें वो स्वरुप ठाणमाण । तेणें आकर्षिलें माझे पंचप्राण । नावडे आणिक वो त्याचीच मज आण । निळा म्हणे मी माझें याची झाली बोळवण वो ॥६॥
२१०
होतें बहुत दिवस आर्त वागविलें । आजी अकत्मात तें फळ देऊं आलें । दृष्टी श्रीहरीची देखिलीं पाऊलें । घेतलें जन्म मागें सार्थक त्यांचे झालें वो ॥१॥
धन्य हे आनंदाची सापडली वेळ । तेणें संत सज्जन भेटले कृपाळ । त्यांनींचि फेडियेला बुध्दीचा वो मळ । दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ वो ॥२॥
नाना साधनांच्या केलिया खटपटा । परी त्या न पावतीचि वो याच्या दारवंटा । जाणो जातां जाणिव घाली आडफांटा । योगाभ्यासें सिध्दी रोधिताती वाटा वो ॥३॥
यज्ञयागें स्वर्गभोग आड येती । करितां तपें काम क्रोध खवळती । नित्यानित्यज्ञानें अभिमान वाढती । करितां तीर्थाटनें अहंकाराचीचि प्राप्ती वो ॥४॥
जपतां मंत्रबीजें चळचि घाली घाला । करीतां दान धर्म पुढें भोगवितो फळा । सोंवळे मिरवितां विधिनिषेध आगळा । आतां हेंचि बरवे धणी पाहों याला वो ॥५॥
ऐसे शोधियले मार्ग नानापरी । न येती प्रतीति मग सांडियले दुरी । आतां गाऊनि गीतीं नाचों हा मुरारी । निळा म्हणे करुं संसारा बोहरी वो ॥६॥
२११
ऐशिया सुखामाजीं राहेन सुखरुप । दुजा वागों नेदी आड येऊं संकल्प । भोगिन याचोंचि वो सर्वदा पडप । करुनि भावना अखंड तद्रूप वों ॥१॥
ऐशी ये निश्चयाची सांगितली मात । तुम्हीही आयका हो कृपावंत संत । नकळे माझा मज सत्याचा इत्यर्थ । तुम्हीचि दावाल तो मानीन हितार्थ ॥२॥
येईल चित्तासी ते सांगा विचारुनी । माझे निजहित तेंचि विवरुनी । मी तो नेणोंचि वो याचिये वाहाणी । हेंचि कळासलें हदयभुवनीं वो ॥३॥
हाचि निजानंद आवडला मना । करुं सर्व काळ हेचि विवंचना । रुप दृष्टीपुढें धरुनि गाऊं गुणा । करुनि तदाकार वृत्तीची भावना वो ॥४॥
यावीण नावडे चित्ता ऐसें झालें । दिवसरात्रीं हें ध्यानचि लागलें । सांगती इतरें तें न मानेचि भले । नेणों कोण ऐसें कर्म उभें ठेलें वो ॥५॥
हेंचि राहेन वो धरुनियां दृष्टी । रुप नागर वो मुरली वाजे ओटीं । खांदिये घोंगडें वो घेऊनि वेताटी । चाले गाईमागें सवें गोवळथाटी वो ॥६॥
ऐसिये आवडीचें पुरविलें आर्त । येऊनी एकांतीं वो भेटले गोपिनाथ । तेणें मानस वो माझें झालें स्वस्थ । निळा म्हणे वो भोगिन एकचित्त वो ॥७॥
२१२
काय करुं वो भुलविलें भुलीं । चित्त माझें या विषयाचे चाली । आड कल्पना ठोकोनि राहिली । त्याणें संगती वो याची अंतरली वो ॥१॥
पायां पडतें वो दाखवा मज वाट कर्माकर्मा चुकूनियां घाट । कामक्रोधाचें ऐकोनि बोभाट । भय वाटे तें हें देखोनि दुर्घट वो ॥२॥
मज तो विचार न सुचे आपुल्या मतें । न्याल तुम्ही त्या येईन सुपंथें । घेउनी धर्म मज पाववा वो तेथें । जेथें असती सांवळे गोपिनाथ वो ॥३॥
कोठें गेले या करुं वोरबारा । आगी लागो या अघोरा संसारा । पडते गुंति हा अधिक्ची पसारा । भेटवा आतां मज न्यावो सारंगधरा वो ॥४॥
येथें होती हे बहुतचि उत्पात । जन्म जरा या व्याधींचे आघात । भुलले वाट वो न मिळतां संघात । तुम्ही पाववा वो रमानाथ जेथें वो ॥५॥
आहे भरवसा हा तुमचाचि मज । संत जाणतसां अंतरींचें गुज । आले शरण ते पावविता सहज । निळा म्हणे आतां राखा माझी लाज वो ॥६॥
२१३
खेळी खेळता वो विकळ सुंदरा । जालि आठविता नंदाच्या कुमारां । स्वेद कंपखेद दाटला शरिरा । जाला विरह तो नेणती इतरा वो ॥१॥
धरा आवरुनी म्हणति वो साजणी । धीर न धरत पडिलि धरणी । येकी सांगति वो जालि झाडपणी । वेगीं आणा आतां पंचाक्षरी गुणीवो ॥२॥
जातो प्राण वो येताति लहरे । येकी म्हणति वो डंखिली विखारें । आंग तापलें वो येतु आसे शियारे । येकि म्हणति वो मोडसियेचा भरें वो ॥३॥
येकि म्हणति गे लागलें दैवत । कुळिचें दारुण वो नेदि करु मात । घाला गोंधळ वो विनवा समस्त । ठेवा आण भाक करुनि येकचित्त वो ॥४॥
ऐसा मिळाला वो भेंवताला पाळा । होती चुकुर येकी रडताती बाळा । पाजा वोखदें वो वांचवा वेल्हाळा । नका उशिर गे धांवा उतावेळा वो ॥५॥
मग ते येकांतिची सांगे सखियासी । नका बाहेरि वो फुटो कोणापाशीं । आणा नंदाचा नंदनु येकांतासी । निळया स्वामीची हे भावना निश्चयेसी वो ॥६॥
२१४
झाला विरह अंतरी कामिनीसी । न ये सांगतां बोलतां कोणापासी । मुख सुकलें वो तापली विशेषी । आंग कापे तेणें झाली कासाविसी वो ॥१॥
हदई आठवे रीरंगसावळा । मनचि गुंतलें तयापासिं डोळा । कोण आणिल वो तया याचि वेळा । दयावया आलिंगन जिव उतावेळा वो ॥२॥
कोठें न गमे वो नावडे आणिक । जिविं जिवामाजि पडियलें ठक । उघडे नयन वो लागलि टकमक । कोण आणिल तो हरिल माझे दु:ख वो ॥३॥
जालि अवस्था ते नकळे कोणासी । जातां सांगो होईल हांसे पिसुणासी । होईल लाज वो कारण उपहासासी । कांहिंची न सुचे मी काय करुं यासी वो ॥४॥
कोण जिवलग वो येईल धांवती । माझें जिविचें आर्त उगविल निगुती । नेदितां कळो कोण आणिल श्रीपति । संग त्याचा माझा करिल एकांति वो ॥५॥
ऐसि विरहानळें पिडियलि बाळा । ह्रदयीं आठविते हरि वेळोवेळा । जाणोनी अंतरीं तो कृपेचा कोवळा । येउनि निवविले तिये म्हणे निळा वो ॥६॥
२१५
होतें लेउनियां आतींचे अंजन । तेणें देखिलें वो निक्षेपीचें धन । होतें वेदरायें ठेविलें जोडून । तेंचि सांपडलें आईतें निधान वों ॥१॥
जनीं जनार्दन प्रत्यक्षचि होता । तोचि मुसावोनि कृष्ण झाला आतां । मंडित चतुर्भज वेणुवाजविता । मुकुट कुंडले वो माळाचा मिरवता वो ॥२॥
प्रगट असोनियां न दिसेचि कोणा । आड आलिया वो बुध्दीचीं कल्पना । जाय हरपोनी अविदयेच्या भावना । तेणेंचि न देखती भूतीं भगवाना वो ॥३॥
कैसा मायामोह भ्रम झाला गाढा । तेणें जाणीवची धावें पुढा पुढा । विधिनिषेधाचा माझारी झगडा । तेणें अंतरला न सांपडे मूढा वो ॥४॥
इंद्रियां विषयाची सदा लगबग । मातले अहंकार काम क्रोध मांग । मदमत्सराचे धांवती निलाग । तेणें हातींच्या हातीं अंतरला श्रीरंग वो ॥५॥
ऐसें चुकवुनी आघात अपार । आजी सांपडले आईते भांडार । तेणें झालिये वो निजसुखें निर्भर । निळा म्हणे भोगुं सुखाचे संभार वो ॥६॥
संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav | निळोबारायांची विरहिणी । nilobarayanchi virhini |
तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .