आणिकांसी सांगे आशेचें बंधन ।
सदाचा बराडी असोनी आपण ॥१॥
काय म्हणावें यावरि आतां ।
नष्टाचा परम नष्ट हाचि हा पहातां ॥२॥
भक्ताच्या हाताची पाहातसे वास ।
कांही देतील म्हणउनी टोकतचि बैसे ॥३॥
जळ फळ पुष्प् देतां कांहींचि न सोडी ।
देऊं जातांचि घाली हा तोंडीं ॥४॥
आशेचा बांधला देव हा कैसा ।
कायं निवारील आमुची आशा ॥५॥
भक्त् नदिती तैं उपवासीचि बैसे ।
काय खाईल जवळी कांहींचि या नसे ॥६॥
निळा म्हणे हा अनाथ बापुडा ।
जाणती संत परि न बोलती भीडा ॥७॥