मूळ डाळ बीजीं अवघे शाखा पल्लव ।
फळीं पुष्पीं विस्तारला परि तेंचि सर्व ॥१॥
तैसा एक बीजरुप विटेवरी उभा ।
विश्वाकारें प्रगटला व्यापूनियां नभा ॥२॥
सर्वहि होऊनि देवो देवी आपणाचि सकळ ।
भूत व्यक्ति नाना वर्ण सूक्ष्म स्थूळ ॥३॥
निळां म्हणे एकाविण नाहीं दुसरें ।
एकीं एकपणही नुरे सेवटिलें मरे ॥४॥