फुटलें धरण आला लोंढा – संत निळोबाराय अभंग – ८१२
फुटलें धरण आला लोंढा ।
नावरे तोंडा माझिया तो ॥१॥
कृपाघनें वृष्टी केली ।
वाचा गर्जिन्नली बोधवरें ॥२॥
प्रतीति विदयुल्लता झळकती ।
थेंबुटे पडती ब्रम्हरसें ॥३॥
निळा म्हणे पिकलें पीक ।
आलें सकळीक भागासी तें ॥४॥