दळणीं कांडणीं गाइन मंगळीं -संत निळोबाराय अभंग – 1581

दळणीं कांडणीं गाइन मंगळीं । कान्हों वनमाळी प्राणसखा ॥१॥

हरीचिया नामें हरती महादोष । तुटती कर्मपाश निमिषमात्रें ॥२॥

सद्गुरुरायाचीं पाउलें गोमटीं । वंदितांची भेटे हदयस्थ ॥३॥

माझया सद्गुरुचें अवलोकितां मुख । समाधिचें सुख तुच्छ वाटें ॥४॥

सद्गुरुरायाचें स्वरुप पहातां । विश्वीं एकात्मता भासों लागे ॥५॥

नित्य सद्गुरुचीं आळवितां नामें । येती निजधामें भेटों सये ॥६॥

सद्गुरु स्वामीचा महिमा अगाध । वचनेंचि बोध करी शिष्यां ॥७॥

सद्गुरु सद्गुरु करितां उच्चार । येती हरीहर भेटों सये ॥८॥

सद्गुरुच्या नामें पोट माझें धाय । आनंदाचा होय पाहुणेरु ॥९॥

निळा म्हणे माझया सद्गुरुची मूर्ति । सकळांही विश्रांति विश्रातीसी ॥१०॥


राम कृष्ण  हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.