पावले ब्राम्हण अलंकापुरासी – संत निळोबाराय अभंग – 1568

पावले ब्राम्हण अलंकापुरासी । आनंदमानसीं न समाये तो ॥१॥

देखिला दंडक्षेत्रवासी जन । प्रात:काळीं प्रश्न करिती तीर्थी ॥२॥

पूजूनि सिध्दासी नरनारी बाळें । जाताती राउळा आपुलाल्या ॥३॥

बाळलीळा वेषें आनंदें खेळती । नर नारी देखती येतां जातां ॥४॥

खालावुनी माथा श्रीमुख पाहती । आपुलाल्या जाती कामा लोक ॥५॥

देखोनियां ब्राम्हण मनीं विवारिती । येथें नमस्कारिती मार्गी कोणा ॥६॥

पुढें देखियेल्या खेळतां कुमारी । पुसती उच्चस्वरीं तयांप्रती । ॥७॥

निवृत्ति ज्ञानदेव वसताती कोठें । कोणीकडे मठ आहे त्यांचा ॥८॥

ऐकोनि कुमारी हिडसुनी धिक्कारी । बोट कानावरी ठेवूनियां ॥९॥

कोठील रे तुम्ही नेणां विनीतता । उध्दट बोलतां महामूर्ख ॥१०॥

अर्भकाच्या परी नामें उच्चारुनी । पुसतां महामुनी सिध्दराया ॥११॥

दीर्घस्वरें करिती नामाचा उच्चार । नेणोनियां पार महिमा त्यांचा ॥१२॥

गव्हाराच्या परी बोला सैरा शब्द । मूर्ख तुम्ही मुग्ध हीनबुध्दी ॥१३॥

व्यापकासी स्थान अपारासी मान । मानितां अज्ञान मूढमती ॥१४॥

ऐकावें स्वर्गीचे श्रीमंत गोसावी । नाटक लाघवी ब्रम्हांडाचे ॥१५॥

तया एकदेशी कल्पूनियां स्थान । पुसतां अज्ञान मठ त्यांचा ॥१६॥

तिहींलोकांवरी मिरवे ध्वज ज्यांचा । नेणां महिमा त्यांचा मतिमन ॥१७॥

अरे ब्रम्हादिकां पूज्य ईश्वर अवतार । बोलतां उत्तर अमर्यादें ॥१८॥

संज्ञामात्रें नेत्र खुणेनें दाविती । पहा ते खेळती नित्यमुक्त ॥१९॥

ज्ञानप्रभा दिनमणी ते उगवले । ते प्रत्यक्ष देखिले देव तिन्ही ॥२०॥

सहजाचें आसन आंगी योगकळा । देखियेली लीळा आत्मनिष्ठ ॥२१॥

देखतां लोटिले देह लोटांगणीं । लागले चरणीं अति नम्र ॥२२॥

म्हणती ज्ञानदेव चांगयापासून । आले हे ब्राम्हण समाचारा ॥२३॥

तें ऐकोनियां व्दिज म्हणती अंतर्निष्ठ । जाणीतलें स्पष्ट अंतरींचे ॥२४॥

यावरी सिध्दाइ्र असावी ते कैसी । सर्वांतरवासी देवचि हे ॥२५॥

लागोनियां चरणीं दिधली पत्रिका । सांगितलें निकें वर्तमान ॥२६॥

म्हणती चांगदेवें प्रणिपात केला । मस्तक ठेविला चरणांवरी ॥२७॥

पत्राचें उत्तर मागितलें स्वामी । भेटी अंतर्यामीं इच्छिताती ॥२८॥

म्हणती निवृत्तिनाथ वाचा ज्ञानेश्वरा । तंव ते म्हणती कोरा अर्थ आहे ॥२९॥

कोरें पत्र बरें निवृत्ति बोलती । पाकाची निष्पत्ती होय तेथें ॥३०॥

कोरें ते सोंवळें खरकटें ओंवळें । धुतल्याही जळें शुध्द नोहे ॥३१॥

कोरें तें निर्मळ स्वीकारिलें जाय । अमंगळ राहे खरकटें तें ॥३२॥

कोरीया अक्षर उमटे कसोटी । रददी जाय हाटी विकावया ॥३३॥

एकाक्षर ब्रम्ह प्रणवाचे कुशीं । नुच्चारे पुरेशी उच्चारिता ॥३४॥

पाविजे अक्षर गुरुकृपा खुणे येराशी उमाणे नुकलवे ॥३५॥

शिणती बहुतें करितां खटपट ।  अर्थ उफराटा पडे तयां ॥३६॥

अक्षर परब्रम्ह वेदा अगोचर । कैंचा अनुस्वार उमटला ॥३७॥

न चले जाणीव न चले शाहाणीव । तुर्का नुरे ठाव अक्षर तें ॥३८॥

पत्र लिहा तुम्हीं कृपेचा प्रसंग सोरसें । अज्ञापिलें ऐसे निवृत्तिनाथें ॥३९॥

रेखियेली पत्रीं लिखिती पासष्टी । पाहतां अर्थ दृष्टीं तत्वी पडे ॥४०॥

परम गुह्या गुह्य उपनिषदीभाग । कृपेचा प्रसंग संपादिला ॥४१॥

वाचिलीया अर्थ अणितां मानसीं । पाकजे अनायसी परमतत्वा ॥४२॥

न करितां यजन अध्ययन अध्ययन । न करिता साधन आत्मप्राप्ती ॥४३॥

देऊनियां पत्र म्हणती चांगदेवा । निरोरपर सांगावा विवराहे ॥४४॥

घेऊनियां पत्र निघाले ब्राम्हण । वंदिले चरण पुढतोपुढतीं ॥४५॥

आले तप्तीतीरा नमिलें सिध्दासी । वर्तमान त्यासी निरोपिलें ॥४६॥

म्हणती सिध्दराया पाहिला जी महिमा । आंगी निरुपमा सामर्थ्याचा ॥४७॥

अदभुत ऐश्वर्य देखिलें लोचनी । दिधलें लिहोनी पत्र तुम्हां ॥४८॥

देऊनियां पत्र म्हणती व्दिजवरा । देवाचे अवतार नि:संदेहें ॥४९॥

मग करुनियां पूजा पत्र वाचियेलें । तंव गुह्य देखिलें न चले युक्ती ॥५०॥

मग म्हणे अभिमान अदयापि न जाळे । तिमिरें गेले डोळे न दिसे हित ॥५१॥

कृत्रिम आचरणें दशा झाली ऐशी । विश्वास मानसीं थार नेदी ॥५२॥

ऐकतों श्रवणीं पहावें लोंचणी । निश्चय तो मनी दृढ केला ॥५३॥

अनुतापें उददेश धरिला चांगदेवें । अळंकापुरा जावें सिध्दा भेटी ॥५४॥

तरी सार्थक धरिलिया जन्माचें । नाहीं तरी काळाचें भातुकलें ॥५५॥

न चुकती जन्म चौर्‍यांयशी यातना । काळासी वंचना कोठवरी ॥५६॥

पाचारिले वर्स परिपत्य अधिकारी । सांगती तयारी करावी त्यां ॥५७॥

वहनें सामग्रीया सिध्द करा वेगीं । जाणे भेटीलागीं सिध्दाचिये ॥५८॥

कोठवळे जमादार आले पोतनीस । सरंजाम त्यांस आज्ञापिला ॥५९॥

ऐकोनियां सर्व गृहस्थ शिष्यवर्ग । धांविले सवेग आले जवळी ॥६०॥

म्हणती सिध्दराया परिसावी विनंती । जाणें तरी युक्ति ऐसें जावें ॥६१॥

प्रतापें महत्वें आपुल्या महिम्यानें । ऐश्वर्य भूषणें सिध्दाईच्या ॥६२॥

विदयेच्या सामथ्यें आपुलीया वैभवें । जाऊनि भेटावें बडिवारे ॥६३॥

आपणा देखोनि झांकेल त्यांचे तेज । येतील तेहि सहज शरण पायां ॥६४॥

तैसाचि योजिला युक्तीचा प्रसंग । विस्तारिलें सोंग बहुविध ॥६५॥

व्याघ्रावरी स्तंभनें सर्पासी मोहनें । सिध्द केलीं वहनें रथ वारु ॥६६॥

हाकारिला सर्व शिष्यसमुदाय । सांगितलें काय तयांप्रती ॥६७॥

बैसा व्याघ्रावरी सर्प धरा करीं । नाना अळंकारी जाऊ चला ॥६८॥

जाती चांगदेव भेटी समुदायें । महा महोत्साहें अलंकापुरा ॥६९॥

तप्तीतीराहूनि गृहस्थ अपार । सवें दळभार गजवारु ॥७०॥

कश्यप स्वामीचा फळला आशिर्वाद । राजश्रिया पद भोगप्राप्ती ॥७१॥

चालियेला राजे गृहस्थ मंडळी । केलीं विप्रकुळीं परस्थानें ॥७२॥

म्हणती सिध्दा भेटी होईल परस्परें । पाहों अत्यादरें उत्साह तो ॥७३॥

परिवारें सांगतीं घेतलीं स्त्रियाबाळें । व्यवसायीं पाठयाळ थोपटिली ॥७४॥

निघाला उदमि म्हणती सौदागर । भरियेले संभार गोणीयांचे ॥७५॥

हांशील जकाती न लगे चौकी देणें । लाभा नाहीं उणें पिकला कौल ॥७६॥

नटवे नृत्यांगना गुणिजनांचे भार । चालिले अपार समागमें ॥७७॥

ठाकूर नगारी गर्जती पवाडे । सवें चालती देव्हडे सिध्दापुढें ॥७८॥

गजावरी वादयें निशाणें कुसरी । द्रव्यें भरिल्या हारी गाडीयांच्या ॥७९॥

नरंमिन्याचीं दिंडें सवें शिकारखाना । राज्यभार सेना तैसा चालें ॥८०॥

डेरे कनातांचे लादियेले उंट । चालती संघाट काटीयांचे ॥८१॥

नौबनी नगारे वादयजात सकळ । घाषें तया भूगोल दुमदुमिला ॥८२॥

लक्षावत यात्रा तप्तीतीराहुनी । चालतां अवनी न पुरे मार्ग ॥८३॥

छबिने पताका मोरपिसा कुंचे । टाळ मृदंगांचे समारंभें ॥८४॥

शृंगारिला भेख विदयेच्या कुसरी । सोंगें नानापरी दर्शनाचीं ॥८५॥

सवारले शिष्य गुरु आज्ञेवरी । नाना वेषधारी बाह्यरंग ॥८६॥

चर्चियेलीं भस्में काशांबरवासी । मृग व्याघ्र चर्मासी संख्या नाहीं ॥८७॥

कडुक कुंडले शिरीं जटाभार । मुक्तकेशी दिगंबर नागवेचि ॥८८॥

जागवटे सैल्या फुलमाळा शोभती । कथा विराजती नानावर्ण ॥८९॥

झोळया बटवे कक्षेमाजी जडया बुटया । आडबंद लंगोटया बटूवस्त्रें ॥९०॥

कुबडया काठया छडया वेणूदंड हातीं । टोप विराजती कफणीया ॥९१॥

कुंडले सांगातें भांग घोटावया । चिलमी ओढाया गुडगुडया ॥९२॥

पक्ष्यांचे पिंजरे सांगाते कुतरे । चितळें सामरें सोकविलीं ॥९३॥

पांवे मोह्या चंग किन्नरी झल्लरी । डफ हुडुक करीं नागसरे ॥९५॥

गोरख छंदे हाती गोलाणें धनुष्यें । धांवति आवेशें विदयोचिया ॥९५॥

कुशळ कवि ते वाचाळ बोलते । बहुमतें झाकविते तर्कवादी ॥९६॥

फळें जळाहारी एक दुग्ध पिती । मौन्याचे व्रतस्थी पवनाभ्यासी ॥९७॥

व्याघ्रा आरोहणें रथाचीं वहनें । सर्पाचीं वेष्टणे नानाविध ॥९८॥

योगमुद्रा अंगी दाविती कसोटी । नाना लक्ष दृष्टी उफराटिया ॥९९॥

कलरवापरी अंजनें घालूनि नयनीं । दाविती लोचनीं तिमिर तेज ॥१००॥

भाविका नरनारी बाळा झकविती । हेंचि ब्रम्हा म्हणती तेजाकार ॥१॥

सत्याचा दुष्काळ असत्याची रुढी । दाविताती प्रौढी थोरपणा ॥२॥

मार्गीचे जन लोक सामोरे धांवती । लोटांगणी येती चांगदेवा ॥३॥

नानावस्त्रें भेटी सिध्द सामग्रिया । समर्पोनी पायां नमस्कारिती ॥४॥

याचेनि दर्शनें जडजीवां उध्दार । करिती जयजयकार नामघोषें ॥५॥

आले पुण्यस्तंभा श्रीगोंदें सन्निध । केला तीर्थविधी स्नान संध्या ॥६॥

व्दिज संतर्पणें वांटियेलीं दाने । पुढारी गमनें आरंभिलीं ॥७॥

आळेखिंडीवरुनि चालियेले भार । केले नमस्कार म्हैसीपुत्रा ॥८॥

केंदुरावरुनि उतरले घाट । गर्जती उध्दट सिध्दनामें ॥९॥

कान्होपाठक प्रीतीं चालविले सवें । प्रार्थुनी चांगदेवें अत्यादरें ॥१०॥

आले भीमातीरीं स्नानीं स्थिरावले । पुढें पाठविलें सांगोनियां ॥११॥

यावरी म्हणे निळा होईल सिध्दभेटी । परस्परें ते गोमटी आहे कथा ॥१२॥

बहुत अपूर्व असमाई चरित्र । परिसोत सर्वत्र श्रोतेजन ॥१३॥

॥ इति श्रीचांगदेवचरित्रे सिध्ददर्शनंनाम चतुर्थ प्रकरणं समाप्तम् ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.