संत निळोबाराय अभंग

ओम नमो सिध्दासी नमस्कार केला – संत निळोबाराय अभंग – 1565

ओम नमो सिध्दासी नमस्कार केला । ग्रंथारंभ झाला ज्याचे कृपें ॥१॥

त्याचिये कृपेचें अदभुत सामर्थ्य । दावी सिध्दपंथ चालावला ॥२॥

चालविला ग्रंथ ज्ञानदेवाभेटी । आले उठाउठी चांगदेव ॥३॥

चांगदेव जन्मविदयेचा आयास । आणि योगाळयास मूळकथा ॥४॥

कथा हे विचित्र करितां श्रवण । पुण्यपरायण होती श्रोते ॥५॥

नारायणडोहो पुण्यक्षेत्र ग्राम । वस्ती गृहस्थाश्रम मुधोपंत ॥६॥

ग्रामलेखनवृत्ति यजुर्वेदी ब्राम्हण । पंचमहायज्ञ कुळशीळ ॥७॥

धर्मपत्नी झाली गर्भातें धरिती । गर्भाधाम रीती संस्कारे ॥८॥

आणूनि कुळगुरु केलें पुंसवन । आले मरुदगण उदरासी ॥९॥

होतां नवमास प्रसूतीचा काळ । उपजला बाळ कुळदीप ॥१०॥

स्वरुपें सुंदर सभार लक्षणी । देखतां लोचणीं मनोहर ॥११॥

अनुलोभन केलें सीमंतनयन । जातीकर्म विधान नामकरण ॥१२॥

बहुतचि चांगलें चांगा म्हणउनी । जनिता जननी नाम ठेवी ॥१३॥

निष्क्रमण आणि अन्नप्राशन झालें । पुढें आरंभिले चौलोपनयन ॥१४॥

व्रतबंध दीक्षा अनुग्रह गायत्री । संध्या वेदमंत्रीं संपादिलीं ॥१५॥

प्रज्ञाशीळ बुध्दि गुरुमुखें ऐकतां । संध्या संपादिलें ॥१६॥

चारी वेद साही शास्त्रें अभ्यासिलीं । अर्थे विचारिलीं स्वानुभवें ॥१७॥

उपवेद आणि उपशास्त्रें घोकिलीं । पुराणे अवगमिलीं अष्टादश ॥१८॥

व्रतें उदयापनें कथानकें वो वसे । अध्यात्में इतिहासें निपुण जाला ॥१९॥

क्षुल्लकादिकमंत्र क्षुल्लकादिक विदया । आभ्यासिल्या सध्या चमत्कृता ॥२०॥

चौदा विदया आणि चौसष्टीही कळा । अध्ययनीं आगळा दुजा नाहीं ॥२१॥

अतीथि ब्राम्हण येती दर्शनासी । वंदुनी चांगयासी करिती पूजा ॥२२॥

म्हणती विदयासिध्द अवतार जाहला । नेणों ब्रम्हा आला येणें वेषें ॥२३॥

सकळांसी हा पूज्य सकळांसी वंदय । सकळांसी हा अदय गुरु होय ॥२४॥

ऐसा स्तुतिवाद करिती ब्राम्हण । समर्पिती धन कनक वस्त्रें ॥२५॥

अमर्याद धन चांगया बहुमान । म्हणती कन्यादान दयावें यासी ॥२६॥

सत्पात्र जोडलें निज भाग्ययोगेसी । करिती मुधोपंतासी विज्ञापना ॥२७॥

वरासी दक्षिणा देऊं शें होन । तंव दुजा म्हणे व्दिगुण देईन मी ॥२८॥

एक म्हणती सहस्त्रमुद्रांचा संकल्प । करितों तरी अल्प्‍ यथाशक्त्या ॥२९॥

महानाम्नी व्रत महाव्रत गोदान । जाहलें उपनयन चतुर्दश ॥३०॥

तंव वेदमूर्ती गुरु बैसवुनी पंगती । पूजन करुनि स्तविती चांगदेव ॥३१॥

या उपरी करा लग्नाचा विचार । हमणती लहान थोर आप्तवर्ग ॥३२॥

विनवित अती नम्र पुसती सकळांसी । उदईक प्रारंभासी ग्रळा कोण ॥३३॥

विनवीत अती नम्र पुसती सकळांसीं । उदईक प्रारंभासी ग्रंथ कोण ॥३४॥

तंव ते विस्मित होउनी बोलती ब्राम्हण । कुळासी मंडण जन्म तुझा ॥३५॥

आतां नाहीं पहावया उरला । एक तो रहिला योग्याभ्यास ॥३६॥

तरी उपदेशा म्हणती चांगदेव । दयावा अनुभव त्याचा स्वामी ॥३७॥

तेवढीच विदया राहातें तें काय । पुरुष प्रश्ना नव्हे श्लाघ्यपण ॥३८॥

तंव ते म्हणती आम्ही नेणों योगमार्ग । नाहीं तो प्रसंग विचारिला ॥३९॥

काय आम्हां चाड तया योगेवीण । करुं संध्यास्नान जपादिपत ॥४०॥

युक्त आहारी जे कां इंद्रियांचे जती । तेचि योग्य होती मार्गी ॥४१॥

मितलें बोलणें मितलें चालणें । मितलें ज्यार घेणें  अन्नरसा ॥४२॥

नैराश्य निर्लोभ लौकिकाविरहित । तेचि प्रवर्तत अभ्यासीं या ॥४३॥

हठयोगें करितां प्राणनिरोधन । तो आव्हाटा भरोन विटंबी देहा ॥४४॥

मग हा ना तोसा ठावो नपवोनि साधक । पावती निष्टंक क्षीणता देहे ॥४५॥

काळासी वंचन करितां क्षोभे काळ । मग तो नेदी स्थळ विश्रांतीचें ॥४६॥

नाना विघ्नें लय विक्षेप कशाय । रसस्वादनें अपाय रची त्यासी ॥४७॥

सिध्दीचा संभ्रम घालूनियां आड करी त्याचा नाड स्वहिताचा ॥४८॥

ऐशिया संकटी बळिया तोचि पावे । इतरांसी नागवे दुर्जय पवन ॥४९॥

तरी म्हणती सुज्ञा ऐकावें वचन । आहे तें कारण निस्पृहाचें ॥५०॥

जे अखंड एकांती शुचिष्मंत चित्तीं । तेचि दृढावती योगासनीं ॥५१॥

तरी ते योगी कोठें आहेती स्वामीया । सांगा जाईन पायां शरण त्यांच्या ॥५२॥

तंव व्दिज हमणती योगी नाहींत स्वदेशीं  । असती वाराणसीमाजी विरुळे ॥५३॥

तरी म्हणती चांगदेव जाऊं महाक्षेत्रा । योग आणि यात्रा उभय कार्यी ॥५४॥

मग तीर्थरुपा आज्ञा मागोनि यात्रेसी । करिती मुहूर्तेसी स्वस्त्ययन ॥५५॥

क्षौरादिक विधी केलें घृतस्नान । दक्षिणा भोजन देउनी व्दिजां  ॥५६॥

गणपती पूजन पुण्याहवाचन । केलें आवाहन पूर्वजांचें ॥५७॥

पूजियेलीं मातापिता उभयतां । आप्तवर्गा गोता गौरविलें ॥५८॥

समर्पिले तयां पुरे ऐसें धन । होय पुनरागमन आपुलें तों ॥५९॥

क्षेत्र प्रदक्षिणा पूजिंलें ब्राम्हणां । वंदिलें चरणां शिष्टांचिया ॥६०॥

निघाले बाहेरी मुहूतें प्रस्थान । आले बहुत जन बोळवित ॥६१॥

ऐकोनि प्रांतवासी आखमदीन जने । विनविती स्तवनें चांगयासी ॥६२॥

म्हणती आम्हां नाहीं घडली वाराणसी । आणि हेत तो मानसी बहूत काळ ॥६३॥

तरी चला समागमें क्षणती चांगदेव । होईल निर्वाहो सर्वांविशीं ॥६४॥

मग अनाथें दुर्बळें निघालीं बाहेरी । चालिलीं परिवारीं लक्षावत ॥६५॥

खर्चा वेंचा तया देती चांगदेव । आणि सांभाळिती सर्व मागें पुढें ॥६६॥

सुसंग जोडला म्हणती सकळ जन । नलगे घेणे ऋण संगे याच्या ॥६७॥

भागल्या श्रमल्या जाणे हा उपाय । रोगें येऊं नये याचे दृष्टी ॥६८॥

चालतां मारगी सामोरे जन येती । ऐकोनि कीर्ति अलौकिक ॥६९॥

महाव्याधी हरी अंधळयासी डोळे । वांझा पुत्रफळें पंगुसी पाय ॥७०॥

जे जे रोगी येती तयांसी उपाय । करिती तया काय उणें मग ॥७१॥

प्रार्थनी करिती पूजा समर्पिती धनें । तोषविती स्तवनें नारीनर ॥७२॥

भरिल्या गाडया धनें वस्त्रांच्या समृध्दी । जाती राजपदीं मिरवत ॥७३॥

ऐसे आले वाराणसी एकोनि व्दिजवर । क्षेत्रवासी भार पाहों आले ॥७४॥

देखोनि योग्यता सकळिकीं पूजिला । बहुमान जाहला महाक्षेत्रीं ॥७५॥

केला तीर्थविधी यथाशास्त्रन्यायें । पूजिलें समुदाये ब्रम्हवृंदा ॥७६॥

ग्रहप्रवृत्तिदानें मठभिक्षा दिधली । अष्ट तीर्थां केली प्रदक्षिणा ॥७७॥ म

ग गंध अक्षता व्दिजां करुनी पूजन । आर्तीचें वचन अनुवादती ॥७८॥

म्हणेती कोणा आहे योगाची धारणा । ते म्हणती आपणा गम्य नाहीं ॥७९॥

वेदाध्ययनीं आम्ही स्वधर्मी निरत । नेणों कैसी मात योगाची ते ॥८०॥

यज्ञाचार आम्हां षटकर्मांचा धंदा । नेणो उदावादा पवनाभ्यास ॥८१॥

महा विवरीं एक आहे योगिराज । ऐकतसों सहज कर्णोकणीं ॥८२॥

परी तें स्थळचि परम गुप्त अवघड भयंकर । करवे संचार कोणा तेथें ॥८३॥

तरी म्हणती चांगदेव जाऊं दर्शनासी । केलें स्तंभनासी व्याघ्रसर्पां ॥८४॥

पंचाक्षरी विदया भारियेली भूतें । केलीं शरणागतें वेजाळादी ॥८५॥

तंव प्रार्थिती व्दिजवर नवजावें आपण । काय त्या योगेविण खेळंबलें ॥८६॥

सर्व विदया तुम्हा आहेती स्वाधीन । कोणेविशीं न्युन पडिलें सांगा ॥८७॥

तया म्हणती चांगदेव जी एवढीच उणीव । येते येर सर्व आलोटिलें ॥८८॥

तरी म्हणती देवा ऐकावें वचन । जीवासी येतन तेथें जातां ॥८९॥

दरकुटी विशाळ आहे भयानक । जातां सकळ लोक मुकती प्राणा ॥९०॥

पिशाचें बहुवस असती विंचु सर्प । माजी गडदधुप अंधकार ॥९१॥

घरामाजी घरें व्दारामाजी व्दारें । विवरांत विवरें लक्षवरी ॥९२॥

गेलीया निर्गम नव्हेचि कोणासी । वर्जितों स्वामीसी याचिलागीं ॥९३॥

समागमी सर्व येती काकूलती । अहो कृपामूर्ती चांगदेवा ॥९४॥

नवजावें आपण कदा विवरांत । सांगती आघात सर्व तेथे ॥९५॥

परी चांगदेवा साधणें हदगत । ते नाईकती मात कोणाचीही ॥९६॥

म्हणती आम्हां आहे खर्चावया धन । एक मास पाहेन जावें मार्ग ॥९७॥

करुनियां संचार शोधिलें विवर । गेले योगेश्रवर जेथें होता ॥९८॥

लागोनियां चरणां वेदाक्षरीं स्तविला प्रसन्न तो केला तपोराशी ॥९९॥

तो म्हणे बाळका कैसा तूं आलासी । संचार पवनासी नसतां येथें ॥१००॥

येरु म्हणे स्वामी आपुल्रूा प्रसादें । आला आशिर्वादें चरणांपाशीं ॥२॥

संसारे पीडिलां जहलों खेदक्षीण । म्हणोनि शरण आलों देवा ॥३॥

स्वामीच्य वचनें कजन्मांतरें फेरे । चुकती आणि दुस्तरें हरती कर्मे ॥४॥

करोनियां कृपा म्हणावा जी आपुला । सेवक धाकुला नेणता मी ॥५॥

नुपेक्षावा कदा आला शरणागत । हे तों धर्मनीत स्वमी खरी ॥६॥

हदगत हें माझें पाववावें सिध्दी । अहो कृपानिधी गुरुराया ॥७॥

मज शरणागता करावा उपदेश । सांगा योगाभ्यास करीन मी ॥८॥

विचारिती गुरु आपुल्या मानसीं । म्हणती अनुतापेसी शरण आला ॥९॥

अव्हेरितां यासी येईल दृशण । विरक्त हा पूर्ण् मुमुक्षू जाला ॥१०॥

अनुतापाचें लेणें लेऊनियां अंगी । जाहालासे विरागी देहगेहा ॥११॥

वयें तो लहान दिसतो सगुण । अध्ययनें संपन्न वेदवेत्ता ॥१२॥

सच्छिष्य विरळा जोडे भाग्ययोगें । महिमा ज्याच्या संगे गुरुत्वासी ॥१३॥

देउनी आलिंगन आश्रवसिला कृपा । म्हणती केला बापा अंगिकार ॥१४॥

यथा सांप्रदायें आज्ञा समावेश । दावियेल सौरस परंपरे ॥१५॥

बैसउनी सन्मुख घालविलें आसन । कळा स्थान मान उपदेशिती ॥१६॥

कृपावंत गुरु म्हणती यमनियम । करीं प्राणायाम प्रत्याहार ॥१७॥

ध्यान हे धारणा आसन हे मुद्रा । साधवी शिष्येंद्रा सिध्दीलागीं ॥१८॥

रेचक पूरक कुंभक त्राहाटक । पवनाभ्यास ऐक स्थिरबुध्दि ॥१९॥

सगर्भ अगर्भ दिविले प्रकार । करी पवन स्थिर मनेजयें ॥२०॥

देह शीतल पडतां करी अग्निधारण । सोमधारण उष्णें पडितां देह ॥२१॥

प्राणनिरोधन सोहंमंत्रे जाण ॥ करी प्राणापान ऐक्य दोघां ॥२२॥

षटचक्रांचे भेद दाविले विषद । मुक्त ब्रम्हरंघ्र जेणें ॥२३॥

काकीमुख अग्निचक्र औटपी॥ गोल्हाट । सहस्ऋदळ श्रीहट पावावया ॥२४॥

नाद बिंदू कळा ज्योतीचा अनुभव । जेणें साधे सर्व तें तें आंगे ॥२५॥

जालंधर भेद आंताळी अभ्याळी । भ्रमरगुंफा कंकाळी पावे जेणें ॥२६॥

ऐकतां सादर मुद्रा ठसावली । समाधि लागली चांगयासी ॥२७॥

सद्गुरुच्या वचनें ऐके ज्या ज्या खुणा । पावे त्या त्या स्थाना तेचि क्षणीं ॥२८॥

परी ते सविकल्प समाधी काष्ठा म्हणती तीसी । नावडे संतांसी मूर्च्छा म्हणोनी ॥२९॥

वासनेचा क्षय नव्हे ऐशा रीती । न चुके पुनरावृत्ति जडत्व तें ॥३०॥

देखोनि त्याची प्राप्ति विस्मय करिती गुरु । म्हणती हा चमत्कारु थोर झाला ॥३१॥

एकाचि क्षणें कैसा झाला या अनुभव । प्रज्ञा अभिनव बाळकाची ॥३२॥

बहुत दिवस मीही करितों अभ्यास । परी न लभेचि सौरस याच्या ऐसा ॥३३॥

नवल हें देखिलें एकाचि उपदेशें । भेदियेलीं निमिषें चौदा चक्रें ॥३४॥

भ्रमरगुंफेमाजी केला रहिवास । गिळोनि नि:शेष दशहि प्राण ॥३५॥

ऐशी सप्त वरुषें समाधि भोगिली । सत्रावी शोषिली अमृतकळा ॥३६॥

जिंकोनियां काळ घातला तोडरीं । उभविली गुढी विजयाची ॥३७॥

झाली योगसिध्दि मांडिलें व्युत्थान । केलें उन्मज्जन इंद्रियांचे ॥३८॥

देखोनि गुरुदेव आलिंगन देती । आणि अनुभव मागती समाधीचा ॥३९॥

वचनें तयासी अवस्था लाविली । कसोटी दाविली सिध्दाईची ॥४०॥

घेऊनि अनुभव निघाले बाहेरी । ते आले घाटावरी मनकर्णिके ॥४१॥

तंव त्या देखियेलें तीरींच्या ब्राम्हणीं । ते लागले चरणी्र धवोनियां ॥४२॥

म्हणती समागमी बहू झाले चुकूर । नव्हतां सत्वर तुमचें येणें ॥४३॥

क्षेत्रवासी ब्राम्हणीं करुनियां खेद । म्हणती प्रमाद थोर झाला  ॥४४॥

गेले तें सांगती तुमचे ग्रामासी । न येतां तुम्ही रुदन करित ॥४५॥

नेले क्षेत्रामाजी वादयांच्या गंजरीं । घोष जयजयकारीं करुनि हर्षें ॥४६॥

बाणली असुमाई आंगी योगकळा । गुरुत्वें आगळा भसे लोकां ॥४७॥

उपरम झाला सकळ इंद्रियां । स्वरुपी विलया मन गेलें ॥४८॥

ऐसिया स्वानंदे बुझाविवलें चित्त  । राहिली अवचित वदनीं वाचा ॥४९॥

अष्टही आविर्भाव उरले आंगी । प्राणी प्राणरंगीं निजवासें ॥५०॥

वेदत्रयी ठसा पडिला शरीरा । वृत्ती गेली घरा निजाचिया ॥५१॥

निमोनियां गेले शब्दाचें बोलणें । पवनुची प्राणें शोषियेला ॥५२॥

ऐसा सुखासुखी पावला विश्रांती । पदपिंडा समाप्ती करुनियां ॥५३॥

देशोदेशीं वार्ता विस्तारली ऐसी ॥ ते येती दर्शनासी सिध्दाचिया ॥५५॥

राजे भेटी येती अनुग्रहीत होती । आशीर्वाद इच्छिती लहानथोर ॥५६॥

जया जे जे पाहिजे ते ते विदया देती । म्हणोनी शरण येती प्राणीमात्र ॥५७॥

नाना उपासना शिकती बीजें न्यास । मंत्रादि यंत्रांस करिती साध्य ॥५८॥

वेदांचीं अध्ययनें शास्त्रांची परिज्ञानें । शिकती रसायनें चिकित्सा नाडी ॥५९॥

ज्योतिष आयुर्वेद निघंट घेकिती । कोश विचारित पंचाक्षरा ॥६०॥

जारणमारणादि सप्तही प्रयोग । एक ते आगम योग करिती साध्य ॥६१॥

गारुडाचे दंश नृत्य संगीतास । घेती बहुत शिष्य विदया ॥६२॥

असो आतां ऐसे शिष्य लक्षवत । झाले शरणागत करिती सेवा ॥६३॥

यावरी व्दितीय प्रकरणींची कथा । परिसावी ते श्रोता देउनी चित्त ॥६४॥

निळा म्हणे पुढें ज्ञानेश्वर आख्यान । अदभुत महिमान सिध्दाईचें ॥६५॥

॥ इति श्रीचांगदेवचरित्रे जन्मकर्म विदयायोगाभ्यासकथनं नाम प्रथम प्रकरणं समाप्तम ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *