यावरी गडियांसीं खेळत
आला यमुनेतीरा आंत
क्रीडा करितां करितां आर्त
देखिलें ऐसें यमुनेचें ॥१॥
जैशा येऊनियां गौळणी
कृष्णमुखीं घालिती लोणी
मीच अंतरलें गे पापिणी
होऊनियां पाणी वाहातुसे ॥२॥
कृष्ण म्हणे तुझिाया पोटीं
आहेती नवनिताचिया खोटी
काढूनी गाळ तो जगजेठी
सुखें भक्षितु बैसला ॥३॥
हें देखोनियां ते गडे
म्हणती बैसोनि एकीकडे
माती खातो हा निवाडें
सांगों धाविले यशोदे ॥४॥
म्हणती मृतिका आणूनि हरि
बैसला भक्षीत आवडीं करीं
ऐसें ऐकोनियां सुदरी
धांवली क्रोधें आवेशें ॥५॥
हातीं घेऊनिया सिपुटी
आली जवळीके नेहटीं
येरें देखोनियां ते दिठीं
मृत्तिका लपवुनी पळतसे ॥६॥
निळा म्हणे हाकारिते
माया धांवे आटोपित
नाटोपेचि मग ते म्हणत
घरां आलिया ताडीन ॥७॥