मग बैसवूनियां पाटावरी
ताटीं वाढिल्या नानापरी
दूध दहीं तूप साय वरी
शर्करा तेही ठेवियेली ॥१॥
कृष्ण म्हणे कालवी आतां
जेववीं मज तें वो जेवितां
येरी म्हणे परिसें ताता
रुचि त्याच्या भिन्न भिन्न ॥२॥
येरु म्हणे रसनायक
भिन्न कैंचे वो आणिक
येरी म्हणे तुझी एकैक
नवाईच शब्दाची ॥३॥
मग कालवूनि एके ठायीं
म्हणें कृष्णा आतां घेंई
येरु म्हणे वेगळें देंई
करुनियां हें ठायीचें ॥४॥
तंव ते म्हणे न चले युक्ती
नको छळुं रे श्रीपती
त्यांची एकत्र करविलें अंती
मज कां म्हणसीं निवडी हें ॥५॥
ऐसें कोणा आहे ज्ञान
मिश्रित झालें तें करी भिन्न
येरें पालवें झांकून
दाविले पदार्थ वेगळाले ॥६॥
निळा म्हणे देखोनिया माता
आश्रचर्य मानी ते तत्वतां
म्हणे याचिये हातीं सर्वहि सत्ता
आहे सकळ विश्रवाची ॥७॥