सांगो नवरसलक्षण ।
तरी शृंगार हास्य करुण ।
धीर वीर भयानक जाण ।
बीभत्स अदभुत शांतरस ॥१॥
शृंगारिक तें माधुर्य गाणें ।
हास्य तें विनोदकरणें ।
कारुण्य तें कींव भाकणें ।
धैर्य उपजवणें तें धीर ॥२॥
वीर ते युध्दाच्या गांठीं ।
शब्दामागें शब्द उठी ।
भयानक रसा भय घाली पोटीं ।
बीभत्स त्याहुनी कुष्टी उच्छुंखल ॥३॥
अदभुत रस ते नवलवाणें ।
जे का अचाटचि बोलणें ।
श्रोतयातें विस्मय देणें ।
ऐकतां शहाणे निर्बुजती ॥४॥
शांतरस तो शुध्द सात्विक ।
विकारविवर्जित माजीं विवके ।
निळा म्हणे हे नवरस देख ।
जाणति गायक चतुर ते ॥५॥