घरीं आपुलिया मातेपाशीं – संत निळोबाराय अभंग – ९७
घरीं आपुलिया मातेपाशीं
देखोनियां मागें शशी
म्हणे देंईवा खेळावयासी
आणूनी तो मज हातीं ॥१॥
येरी म्हणे परिसे ताता
गगनींचा तो नये हाता
नको छळूं रे कृष्णनाथा
नाहीं तेंचि मागों नको ॥२॥
येरुं म्हणे रे पैल दिसे
नाहीं त्यासी म्हणसी कैसें
येरे म्हणे असाध्य तें असें
नाहींपणाचि सारिखें ॥३॥
राया घरींची संपदा
दुर्बळा घरीं कैंची सदां
येरु हांसोनियां गदगदां
मुखचंद्रातें दाखवितु ॥४॥
म्हणे पाहे दसवंतिये
हा गे जवळींच चंद्र आहे
तारे तुटती लवलाहे
षोडशकळीं प्रकाशला ॥५॥
यशोदा म्हणे न कळे महिमा
तुझा आम्हां पुरुषोत्तमा
दिठावसील रे मेघ:शामा नको विंदाने करुं ऐशीं ॥६॥
निळा म्हणे ओंवाळून
सांडी वरुनी निंबलोण
मग त्या वोसंगा घेऊन
म्हणे भोजन करीं बापा ॥७॥