म्हणती कृष्ण आवडे – संत निळोबाराय अभंग – ९६
म्हणती कृष्ण आवडे कैसा
जीवप्राण का पढिये जैसा
एकी म्हणती गे मानसा
भुलवाणाचि सुंदरपणें ॥१॥
यातें पाहों जातां दिठी
पहाते पहाणेंचि नुरें शेवटीं
संचरोनियां हा पाठीपोटीं
करी आपणासारिखें ॥२॥
वेधूचि लावियेला मना
येणें गोविलें वो लोचना
आमुच्या चित्ताचिया वासना
येणेंचि हिरोनियां घेतल्या ॥३॥
वाटे तयासीचि परिचार
करुनी असावें निरंतर
क्षणही एक न व्हावा दूर
माया माहेर आमुचा हा ॥४॥
विनोद चर्चा याशींच करणें
आवडे कृष्णासीं बोलणें
यावीण दुजें दृष्टी
नावडो याविण आणिकी गोष्टी
विश्रवा आधीं हा शेवटीं
पाहावा पोटीं हेंचि आवस्था ॥६॥
निळा म्हणे ऐशीं कृष्णें
हिरोनी घेतलि यांचि मनें
मग या राजीवलोचनें
मांडिली विंदानें आणिकही ॥७॥