यावरी गौळणी सुंदरी – संत निळोबाराय अभंग ९३
यावरी गौळणी सुंदरी ।
नूऊनियां निजमंदिरीं ।
खेळविती परमात्मया श्रीहरी ।
नाना उपचारी पूजिती ॥१॥
देऊनियां चंदनउटी ।
केशरी टिळक लाविती लल्लाटीं ।
नाना सुमनहार कंठी ।
घालिती वरवंटी श्रीकृष्णा ॥२॥
गुंफूनी सुमनटोप शिरीं
विचित्र तुरे खोंविती वरी ।
लेवूनियां दिव्य अळंकारीं ।
वस्त्रें परिधानें गौरविती ॥३॥
एकी जाणविती विंजणवारा ।
एकी चवरी विंजती सुंदरा ।
म्हणती वो नंदकुमारा ।
दासी आम्ही तुमचिया ॥४॥
शर्करा घृत परिपक्व लाडू ।
नाना स्वाद फळांचे घडू ।
आणूनियां करिती सुरवाडु ।
कृष्ण वदनीं समर्पिती ॥५॥
एकी उचलूनियां कडिये घेती ।
एकीं खांदिये बैसविती ।
एकी ह्रदयींची आळंगिती ।
चुंबन देती पैं एकी ॥६॥
निळा म्हणे परब्रम्ह सेजे ।
आवडीं घेऊनि निजतीं निजें ।
ऐशिया सुखाचीं नाचती भोजें ।
परमात्मा आप्त झालिया ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.