माझिया मनें धरिला विश्वास ।
तुमच्या नामीं घातली कास ।
नाहीं उपेक्षा आणि आळस ।
तुमच्या ठायीं शरणांगत ॥१॥
बहुतां सांभाळिलें देवा ।
केला बहुतांचा कुडावा ।
बहुतां दानें वाढल्या सेवा ।
बहुतां स्थपिलें निजपदीं ॥२॥
बहुतीं गाईलें तुम्हां गीतीं ।
बहुतीं स्तपिलें तुम्हां स्तुतीं ।
बहुतां ध्यानीं तुमची मूर्ती ।
आलिंगिली हदयांत ॥३॥
बहुतीं तुम्हां आराधिलें ।
बहुतीं पूजनीं तुम्हां पूजिलें ।
बहुतीं यज्ञावदानीं याजिलें ।
बहुती पाहिलें ज्ञानदृष्टीं ॥४॥
बहुतीं वेदस्तवनमिसें ।
तुमतें कवळिलें मानसें ।
बहुतीं योगादि सायासें ।
लाविलें पिसें आपणीया ॥५॥
तुम्ही पुरलेती त्यांचीया भावा ।
सर्वज्ञपणें जी व्यापक देवा ।
घेऊनिया सेवा आपुलिया गांवा ।
नेलें केशवा निजवस्ती ॥६॥
ऐशी ऐकोनियां संतवाणी ।
मिठी विश्वासें घातली चरणीं ।
निळा म्हणे माझी आरुषवाणी ।
लावावी गुणीं आपुलिये ॥७॥