भावें आळवितां देवा – संत निळोबाराय अभंग – ८४१
भावें आळवितां देवा ।
लागला हातीं जुनाट ठेवा ।
दैव मोडीनी आले दैवा ।
सुख विश्रांती पावलों ॥१॥
आतां वेचूं खाऊं जेऊं ।
शोभती अळंकार ते लेऊं ।
आपुलें सुहद गौरवूं ।
हरिभक्त वैष्णव साबडे ॥२॥
अपार संपत्ती आली घरां ।
नाहीं आतां वोढावारा ।
नलगे जाणें आणिकांच्या घरां ।
कांहीं मागावें यासाठीं ॥३॥
खरें नाणें खरें केणें ।
खरिया मोलें घेणें देणें ।
खरें विकें खरेपणें ।
न पडे उणें भरलेंसे ॥४॥
निळा म्हणे माझिया दैवें ।
जोडिलें होतें पडिलें ठावें ।
कृपा केली विठ्ठल देवें ।
दिधलें भांडार ॥५॥