डोळियाचाही डोळा बुध्दी ।
माझी उघडूनियां कृपानिधी ।
देखणी करुनियां त्रिशुध्द ।
निजात्मपदीं स्थापिली ॥१॥
तेणें दिसती ठायां ठावो ।
हदय सकळांचेही भाव ।
संत दावी जे अनुभव ।
आणखीही सर्व मायाकृत ॥२॥
नवल कृपेची हें जाती ।
फिटली मोह ममता भ्रांती ।
उत्पत्ति स्थिती प्रळय होती ।
तें तें निगुती आटलें ॥३॥
देखणें झालें नयनानयन ।
देखती आपुलेंही वर्तन ।
राहिलें ठायींच ते जडोन ।
अभेद होऊन देखती ॥४॥
निळा स्वामी सद्गुरुनाथा ।
देखणा तूंचि मी नाहीं आतां ।
तोडूनी मी हे माझी ममता ।
आपण आतौता मेळविलों ॥५॥