जीवाचा ही जीव तूंचि प्राणांचा प्राण ।
नयनाचेहि नयन तूंचि घ्राणाचे घ्राण ॥१॥
सर्वही इंद्रियभाव तूंचि माझे श्रीहरी ।
तुजविण न दिसे पाहतां मज मी माझारी ॥२॥
चित्ताचेंहि चित्त तूंचि मनाचें मन ।
श्रवणाचेंहि श्रवण तूंचि रसनेची रसना ॥३॥
निळा म्हणे तूंचि माझा सर्वहि व्यापक ।
देहादेहीं शोधूनि पाहतां न दिसे आणिक ॥४॥